पुणे, ९: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुतेवर आधारित समाज निर्माण करण्यासाठी काम केले. परंतु आज महागाई, बेरोजगारी, खाजगीकरण, वाढता जातीवाद, धर्मांधता यांमुळे समाजातील विषमता अधिकाधिक वाढत चालली आहे. त्यामुळे बाबासाहेबांचे कार्य आपल्यासाठी प्रासंगिक, प्रेरणादायी आणि दिशादर्शक असून बाबासाहेबांचे साहित्य वाचण्याचा व ते समाजापर्यंत पोहचवण्याचा संकल्प करूयात असं एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने स्पष्ट मत मांडले. याला निमित्त होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील संविधान प्रेमी गटाने आयोजित केलेल्या उपक्रमांचे, ज्याला तरुण-विद्यार्थी-महिला यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहरात रविवार दिनांक 8 डिसेंबरला लोकायत हॉलवर संविधान प्रेमी गटातर्फे वाचन शिबिर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्युझियमला भेट अशा कार्यक्रमांचे आयोजन केले होते, असं संविधान प्रेमी गटाच्या समन्वयक कल्याणी दुर्गा रवींद्र यांनी सांगितले. यावेळी बाबासाहेबांनी लिहिलेले साहित्य व अनेक सामाजिक राजकीय विषयांवरची पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. बाबासाहेबांच्या कार्याबद्दल सांगताना महिलांनी सांगितले की, ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचे व्यक्तीमत्व अष्टपैलू होते. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक,धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या वक्तृत्वाने, लेखनाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांच्या, श्रमिकांच्या, महिलांच्या उन्नतीसाठी अविरतपणे काम केले’.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्युझिअम, पुणेला भेट या उपक्रमातही विद्यार्थी, तरुण, ज्येष्ठ नागरिक यांची उपस्थिती लक्षणीय होती. बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटनांचे फ़ोटो प्रदर्शन दाखवत माहिती देण्यात आली. कामगार मंत्री असताना बाबासाहेबानी केलेलं काम, स्वतंत्र मजदूर पक्षाची स्थापना, हिंदूंकोड बिल, चवदार तळे सत्याग्रह, भारतीय संविधान बनवण्यातील सहभाग अशा घटनांवर चर्चा करण्यात आली. तसेच म्युझियममध्ये बाबासाहेबांनी वापरलेली खुर्ची, टेबल, पुस्तके, जेवणाची भांडी ह्या वस्तू पाहून बाबासाहेब हे देखील आपल्यासारखे सामान्य मनुष्य होते व आपणही समाज परिवर्तनासाठी प्रयत्न केले पाहिजे याची जाणीव झाली. यातून आम्हाला समाजासाठी काम करण्याची नवीन ऊर्जा मिळाली, अशा भावनाही उपस्थितांनी व्यक्त केल्या.