Home Blog Page 545

निर्यातदारांचे एक दिवसीय संमेलनाचे आयोजन

पुणे, दि. 11: उद्योग संचालनालय, उद्योग, उर्जा व कामगार विभागामार्फत ‘निर्यातदारांचे एक दिवसीय संमेलन’ जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली १३ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी 10 वा. द्वारा मे. गॅबेरिएल इंडिया लि. 29, माईलस्टोन, पुणे-नाशिक महामार्ग, मौजे कुरुळी, ता. खेड, येथे आयोजित करण्यात येणार आहे.

या संमेलनात निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना औद्योगिक समूह, औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादन, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबधित उपक्रमांचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यात संबंधीकामकाज करणारे घटक, संशोधक, बँकेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक वृषाली सोने यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

पुणे, दि. ११: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा इच्छुक सुशिक्षित बेरोजगार व कारागीर व महिला बचतगटाने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस.आर. खरात यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत उत्पादन प्रक्रिया उद्योगाकरीता ५० लाख रुपये तर सेवा उद्योगाकरीता २० लाख रुपये इतकी कर्ज मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अर्जदाराचे किमान वय १८ ते ४५ वर्षे दरम्यान असावे. अनुसूचित जाती ,जमाती , महिला, इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त-जमाती, अल्पसंख्याक, दिव्यांग आणि माजी सैनिकांकरीता वयोमर्यादा पाच वर्ष शिथील राहतील.

अर्जदार यापुर्वी शासनाच्या कोणत्याही योजनेतध्ये अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. केवळ नवीन उद्योजक, कारागिर, संस्था व बचत गट योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहील. दहा लाखावरील प्रकल्पासाठी सातवी उत्तीर्ण व २५ लाख रुपयावरील प्रकल्पासाठी १० वी उत्तीर्ण असावा. एका कुटुबांतील एकाच व्यक्तीला योजनेचा लाभ घेता येईल.(कुटुंबाची व्याख्या ही पती पत्नी अशी राहील.)

अर्ज करतावेळी आधारकार्ड, शैक्षणिक दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, लोकसंख्येबाबत ग्रामसेवकाचा दाखला, प्रकल्प अहवाल विहित नमुन्यातील इंग्रजीतील अंडरटेकिंग फॉर्म, पॅन कार्ड, गुण् पत्रिका या कागदपत्रांसह छायाचित्र सोबत असावे.

इच्छुकांनी https://maha-cmegp.gov.in/homepage या संकेत स्थळावर अर्ज ऑनलाईन अर्ज करावे. अर्ज करतांना ‘केव्हीआयबी’ या एजन्सीची निवड करावी. अधिक माहितीकरीता जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, २४-ब पुणे मुंबई रस्ता, शासकीय दुध डेअरी समोर नवीन शिवाजी नगर. एस.टी. स्टॅन्ड शेजारी खडकी पुणे-४११००३ तसेच दु.क्र. ०२० २५८११८५९ आणि -dviopune@rediffmall.com या इमेल पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. खरात यांनी केले आहे.

पुण्याचे पालकमंत्री ? चंद्रकांतदादाना पसंती :अजितदादांना नापसंती ?

पुणे- केवळ राजकीयच नाही तर बांधकाम व्यावसायिक,आणि उद्योजक यांच्या वर्तुळातून आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या वर्तुळातून देखील पुण्याच्या पालकमंत्री पदी कोण हवे असा प्रश्न विचारला तर कोथरुडचे आमदार,माजी मंत्री चंद्रकांतदादा यांच्या नावालाच पसंती मिळते आहे.अजितदादांच्या नावाला मात्र नापसंती मिळते आहे.शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना मंत्रीपद दिले तर त्यांचाही नावाला पालकमंत्री पदाची मोठी पसंती या क्षेत्रांतून मिळताना दिसत आहे.

दरम्यान पुण्याचे पालकमंत्रिपदासाठी दोन्ही नेते आग्रही असल्याचे सांगितले जाऊ लागल्याने महायुतीमध्ये मंत्रिपदावरून मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रिपद होते. आताच्या सरकारमध्ये देखील त्यांनाच मिळणार की भाजप चंद्रकांत पाटलांना पुण्याचे पालकमंत्री करणार याकडे सध्या लक्ष लागले आहे.

अजित पवार महायुतीमध्ये आल्यावर त्यांनी पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रह केला आणि त्यांना पालकमंत्रिपद देण्यात आले. चंद्रकांत पाटलांना सोलापूरचे पालकमंत्रिपद देण्यात आले. जेव्हा चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री होते तेव्हा देखील अजित पवारांनी जिल्ह्याच्या प्रशासनावर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच अजित पवार मूळ पुण्याचेच असल्याने त्यांचा पुण्यातील प्रशासनावर पूर्वीपासूनच दबदबा राहिला आहे.सडाफटिंग स्वभाव,रोज पहाटेच उठणे आणि सर्वांना धारेवर धरून कामाला लावणे या गुणांसह..अनेक निवेदने आणि पत्रांना सरळ सरळ केराची टोपली दाखविणे अशा प्रकारच्या तक्रारीसह हम करेसो वृत्ती देखील अजितदादा राबवितात असा त्यांच्यावर आरोप केला जातो तर चंद्रकांतदादा हे मात्र मृदू स्वभावाचे ऐकून घेणारे आणि मध्य मार्ग काढून कोणी नाराज होणार नाही याची काळजी घेणारे म्हणून ओळखले जातात.या दोहोंना पालकमंत्रीपद द्यायचे ठरविले नाही तर सिद्धार्थ शिरोळे यांना पालकमंत्रीपद देऊन पाहावे असे अनेकांचे मत आहे.

अजित पवार पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही असण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, पुण्यातील राजकारण हे प्रामुख्याने सहकार क्षेत्रावर अवलंबून आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांचे साखर कारखाने तसेच सहकारी संस्था आहेत. त्यामुळे पुण्याचे पालकमंत्री होणे हे अजित पवारांसाठी महत्त्वाचे आहे. अजित पवार जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आमदारांना निधी देखील उपलब्ध करून देतात. मात्र, आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत त्यामुळे पुण्याचे पालकमंत्रिपद भाजप ला मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

लोकशाही वाचविण्यासाठी सर्व निवडणुका बॅलेट पेपर वरती घ्या- अरविंद शिंदे

पुणे-नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल फक्त काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीसाठीच नाही तर राज्यातील जनतेसाठी धक्कादायक, अविश्र्वसनीय व अकल्पनीय आहेत. कोणतीही लाट नसताना पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतील निकालाच्या एकदम उलट निकाल कस काय लागू शकतात असा प्रश्न पडला आहे. त्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार राज्यामध्ये ‘सर्व निवडणुकी बॅलेट पेपरवरती घ्याव्‍यात’ ही मोहिम राबविण्यात येत आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज नवी पेठ येथील महाराष्ट्र बँकेशेजारी सह्यांची मोहिम राबविण्यात आली.

     यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर व चिंताजनक प्रकारे आहे. निवडणुक आयोगाने जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता ५८.२२% मतदान झाले, त्याच रात्री ११.३० वा., ते ६५.०२% तर दुसऱ्या दिवशी २१ नोव्‍हेंबर रोजी हेच मतदान ६६.०५ % झाल्याचे सांगितले, यात एकूण ७.८३% वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. तब्बल ७६ लाख मतांची ही वाढ असून मतदानाचा टक्का कसा वाढला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे ईव्‍हीएम संदर्भातही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत म्हणूनच सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्‍यात ही मोहिम राबवित आहोत.’’  

     यावेळी असंख्य नागरिकांनी या मोहिमेस पसंती दर्शवली आणि या मोहिमेत सहभाग घेवून सह्या केल्या.

     यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, दिप्ती चवधरी, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी,प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे,माजी नगरसेवक रफिक शेख,अजित दरेकर, लता राजगुरू, हनुमंत पवार, राज अंबिके, सुनिल घाडगे, ब्लॉक अध्यक्ष हेमंत राजभोज, अक्षय माने, सुजित यादव, आसिफ शेख, रमेश सोनकांबळे, राजू ठोंबरे, डॉ. रमाकांत साठे, अविनाश अडसुळ, राज घेलोत, प्रकाश पवार, प्राची दुधाने, अर्चना शहा, राजश्री अडसुळ, सुंदरा ओव्‍हाळ, पपिता सोनवणे, प्रिंयका मदाळे, अनिता धिमधिमे, विजया थोरात, जान्हवी दुधाने, प्राजक्ता गायकवाड, विमल खांडेकर, कल्पना शंभरकर, लता घडसिंग, मुन्ना खंडेलवाल, रोहित घोडके, नितीन वायदंडे, अभिजीत महामुनी, सुरेश चौधरी आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.  

‘रिकंस्ट्रक्टिव्ह युरोलॉजी’मुळे मूत्राशय मार्गाशी संबंधित उपचारांत सुलभता-डॉ. संजय कुलकर्णी

‘युरोकुल’तर्फे दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत जगभरातील ६०० युरोलॉजिस्टचा सहभाग
पुणे : “आक्रसलेला मूत्रमार्ग मोठा करण्यासह त्यातील अडथळा दूर करणे, लघवीचा मार्ग शेंड्याऐवजी अंडकोशाजवळून असेल, तर तो नीट करणे, लिंगाची वक्रता घालवणे, ताठरता येण्यासाठी कृत्रिम उपकरण बसवणे, अपघातात तुटलेला लघवीचा मार्ग जोडणे या आणि अशा किचकट शस्त्रक्रिया करून मूत्राशय मार्गाच्या स्वास्थ्यासाठी ‘रिकंस्ट्रक्टिव्ह युरोलॉजी’ उपयोगी ठरत असून, उपचारांत सुलभता येत आहे,” असे प्रतिपादन युरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे युरोलॉजिस्ट डॉ. संजय कुलकर्णी यांनी केले.

बाणेर येथील युरोकुल युरोलॉजी इन्स्टिट्यूट आणि इंटरनॅशनल सोसायटी ऑफ रिकंस्ट्रक्टिव्ह युरोलॉजी यांच्या वतीने मूत्राशय मार्गाच्या किचकट शस्त्रक्रियांची दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळा नुकतीच झाली. युरोकुल येथे डॉ. संजय कुलकर्णी यांच्या नेतृत्वात पुण्यातील डॉ. पंकज जोशी, लंडन येथील प्रा. अँथनी मंडी, इटली येथील डॉ. गुइडो बार्बगली, तामिळनाडू येथील डॉ. गणेश गोपालकृष्णन, लंडन येथील ज्युलियन शाह, डॉ. मिरोस्लाव्ह दोर्डोव्हिक, कतार येथील डॉ. तारिक अब्बास, अमेरिकेतील डॉ. ली झाह, डॉ. दिमित्री निकोलावास्की या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात ही कार्यशाळा झाली. भारतातील पाचशे, तर विदेशातील ८० तज्ज्ञ युरोलॉजिस्ट या कार्यशाळेत सहभागी झाले होते.

डॉ. संजय कुलकर्णी म्हणाले, दोन दिवसांच्या या कार्यशाळेत एकूण १८ शस्त्रक्रिया झाल्या. ‘युरोकुल’मध्ये झालेल्या या शस्त्रक्रियांचे लाईव्ह प्रक्षेपण बंतारा भवन येथील सभागृहात झाले. जगभरातून आलेल्या ५०० हुन अधिक युरोलॉजिस्टने या शस्त्रक्रिया ‘याची देही याची डोळा’ पाहिल्या. कार्यशाळेतून मिळालेल्या नाविन्यपूर्ण माहितीमुळे सहभागी यूरोलॉजिस्टच्या चेहऱ्यावर कुतूहल व आनंद दिसत होता. माझ्याकडे असलेले ज्ञान इतरांना देऊन चांगले युरोलॉजिस्ट तयार करण्याचा माझा प्रयत्न आहे.

‘युरेथ्रोप्लास्टी’मुळे मूत्राशय आणि संबंधित विकारांच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. काही मुलांना जन्मतःच मूत्रविसर्गाची जागा शिश्नाच्या खालील बाजूस असते. अशा रुग्णांसाठी अद्ययावत शस्त्रक्रिया उपलब्ध आहे. तसेच संभोग करण्यास पुरुषाचे लिंग जर अकार्यक्षम असेल, तर रुग्णाच्या शरीरात ‘थ्री पीस पिनाईल प्रोस्थेसिस’ हे उपकरण शस्त्रक्रियेद्वारे बसवले जाते. त्यानंतर रुग्णाच्या इच्छेनुसार अंडकोषाजवळ बसवलेले बटन दाबल्यानंतर पुरुषाचे लिंग ताठ होते आणि तो संभोग करण्यास सक्षम होऊ शकतो. अपघातामध्ये किडनी व लघवीची पिशवी जोडणारी नळी तुटल्याने पोटात होणारी लघवी थांबवण्यासाठी नाजूक नळी परत जोडण्याचे ऑपरेशन रोबोटच्या साह्याने करण्यात आले. यासह अशा स्वरूपाच्या शस्त्रक्रिया रोबोटमार्फत इथे करण्यात आल्याचे डॉ. संजय कुलकर्णी यांनी नमूद केले.

प्रा. मंडी व प्रा. ली जाह म्हणाले की, पूर्वी मूत्रमार्ग मोठा करण्यासाठी दुर्बिणीच्या सहाय्याने शस्त्रक्रिया, स्वतः नळी घालून उपाययोजना कराव्या लागत. आता या उपचारांमुळे रुग्णांचे जीवन सुसह्य झाले आहे. ‘रिकंस्ट्रक्टिव्ह युरोलॉजी’मुळे मूत्राशय आणि संबंधित विकारांच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

‘युरोकुल’ची सामाजिक बांधिलकी’
‘युरोकुल’विषयी बोलताना भारतातील पहिल्या महिला लॅप्रोस्कोपिक तज्ज्ञ डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी म्हणाल्या, ‘युरोलॉजी’ व ‘नेफरोलॅाजी’साठी समर्पित १०५ बेडचे ‘युरोकुल’ भारतातील तिसरे मानांकित हॉस्पिटल आहे. मूत्रमार्गाच्या विकारांवरील अद्ययावत व सुसज्ज सेवा एकाच छताखाली २४ तास उपलब्ध आहेत. रुग्णांवर परवडणाऱ्या किंमतीत शस्त्रक्रिया, तसेच बिल भरण्यासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णाला परत पाठवले जात नाही, हे येथील वैशिष्ट्य आहे. या सामाजिक बांधिलकीमुळे देश-विदेशातील रुग्णांमध्ये ‘युरोकुल’ आपलेसे झाले आहे.

आग्य्राहून सुटका ३५८ व्या स्मृतिदिनानिमित्त पालखी सोहळा आणि विविध कार्यक्रम 

श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
पुणे : श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ३५८ व्या आग्य्राहून सुटका स्मृती दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १५, २१ व २२ डिसेंबर या दरम्यान हा स्मृतिदिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला मंडळाचे संजय दापोडीकर, अजित काळे, अनिरुद्ध हळंदे, सुनील वालगुडे, समिर रुपदे, मंगेश राव,  योगेंद्र भालेराव,  अमित दारवटकर, अमोल व्यवहारे, सागर चरवड, सतिश सोरटे, वीरेंद्र ठाकूर आदी उपस्थित होते. आग्य्राहून सुटका स्मृतिदिन सोहळा दुर्ग राजगड येथे मागील ४३ वर्षांपासून साजरा करण्यात येत आहे. यंदा सोहळ्याचे ४४ वे वर्ष आहे.
सोहळ्यानिमित्त लाक्षणिक पालखी प्रस्थान सोहळा रविवार, दिनांक १५ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता लाल महाल येथे पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. यावेळी श्री कसबा गणपतीची पूजा आरती करून ढोल ताशांच्या गजरात पालखी प्रस्थान होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डचे भारतीय सल्लागार मिलिंद वेर्लेकर, कॉसमॉस बँकेचे संचालक मिलिंद पोकळे, शिल्पकार विवेक खटावकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी इतिहास अभ्यासक रायबा नलावडे यांचे व्याख्यान होणार आहे. 
शनिवार, दिनांक २१ रोजी दुर्ग राजगडावर सांस्कृतिक कार्यक्रम, स्थिर वादन, मर्दानी खेळ तसेच शिवव्याख्याते  विनायक खोत यांचे व्याख्यान होणार आहेत. विविध क्षेत्रातील वक्ते, इतिहासकार यावेळी उपस्थित राहणार आहेत. रविवार, दिनांक २२ डिसेंबर रोजी सूर्योदयाला सकाळी ६ वाजता वंशपरंपरेने किल्लेदार असणारे सूर्यकांत भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि पद्मावती देवीचे पूजन होणार आहे. सकाळी ९.३० वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा पालखी सोहळा ढोल ताशांच्या गजरात पाली दरवाजा- सदर आणि पद्मावती देवीचे मंदिर असा निघणार आहे. अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी शिवप्रेमींनी संपूर्ण सोहळ्यात मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पवारांवर टीका होताना अजित पवार आक्षेप का घेत नाहीत?:युगेंद्र पवारांचा थेट सवाल

बारामती -विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेला राहिलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे त्यांचे पुतणे युगेंद्र पवार हे आता पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघात त्यांनी बैठका सुरू केल्या आहेत. तसेच मतदारसंघाचा दौरा देखील ते करणार आहेत. मात्र या दरम्यान त्यांनी अजित पवार यांच्यावर पलटवार केला आहे. भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केलेले टिकेवरुन त्यांनी अजित पवार गटाला सुनावले आहे. महायुतीतील भाग असून देखील शरद पवार यांच्या बद्दल असे वक्तव्य केल्यानंतर अजित पवार आक्षेप का घेत नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

या संदर्भात युगेंद्र पवार म्हणाले की, गोपीचंद पडळकर यांच्याकडून आणखी काही अपेक्षित देखील नाही. ते कायमच काहीतरी बोलत असतात. आमच्यासाठी ते नाही नवीन नाही. मात्र आता अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीचा भाग आहे. यावर अजित पवार गटाने काहीतरी बोलायला हवे. तेथे आक्षेप घ्यायला हवा. अखेर पवार साहेब एक ज्येष्ठ व्यक्ती आहेत. आणि कोणत्याही ज्येष्ठ व्यक्तीबद्दल असे बोलणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. तसेच महाराष्ट्राला ते आवडत नसल्याचे युगेंद्र पवार यांनी म्हटले आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी पवार विरुद्ध पवार लढाई झाली होती. यात अजित पवार हे एक लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आले आहेत. त्यानंतर युगेंद्र पवार राजकारणात सक्रिय राहतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र आता ते पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारीही त्यांनी सुरु केली आहे. इतकेच नाही तर त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून आपलाच विजय निश्चित होता. मात्र ईव्हीएम मध्ये काहीतरी गडबड झाली असल्याचा आरोप केला आहे.

शिंदेंचा फिरत्या मंत्रिपदांचा फॉर्म्युला:​​​​​​​मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांना प्रत्येकी अडीच वर्षांसाठी मंत्रीपद देणार असल्याची चर्चा

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मर्यादित मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे यांच्यापुढे आपल्या पक्षाच्या इच्छुक आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदेंना या मुद्यावर तोडगा काढण्यात यश आले आहे. त्यानुसार त्यांनी मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांना प्रत्येकी अडीच वर्षांसाठी मंत्रिपद देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यानंतर गत 5 तारखेला राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार स्थापन झाले. पण या सरकारला अद्याप आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करता आला नाही. सध्या मुख्यमंत्री व 2 उपमुख्यमंत्री हे तिघेच राज्यशकट हाकत आहेत. त्यातच आता महायुतीमधील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना मंत्रिपदासाठी वेध लागलेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेच्या वाट्याला यावेळी मर्यादित खाती येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यापुढे कोणत्या नेत्याला मंत्रीपद द्यायचे? हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. पण शिंदेंनी या मुद्यावरही तोडगा काढला आहे. त्यानुसार, शिंदे यांनी आपल्या पक्षातील आमदारांना फिरती मंत्रिपदे देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. या पॅटर्ननुसार शिवसेनेच्या इच्छुक आमदारांना अडीच-अडीच वर्षांसाठी मंत्री होता येईल.

उदाहरणार्थ, मंत्रिमंडळात विस्तारात शपथ घेणाऱ्या आमदारांना शपत घेतल्याच्या तारखेपासून अडीच वर्षांपर्यंत मंत्रीपदी राहता येईल. त्यानंतर आपल्या सहकारी आमदारांसाठी आपले पद सोडावे लागेल. शिवसेना त्यांच्याजागी नव्या इ्च्छुक आमदाराची मंत्री म्हणून नियुक्ती करेल. दुसरीकडे, भाजपने मागील सरकारमध्ये समाधानकारक कामगिरी नसणाऱ्या व वादग्रस्त नेत्यांना मंत्रिपदे देण्यास विरोध दर्शवला आहे. त्यामुळे या नेत्यांची मनधरणी करण्याचेही मोठे आव्हान शिंदे यांच्यापुढे आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार व संजय राठोड यांच्या नावाला भाजपने विरोध दर्शवला आहे. हे तिन्ही नेते शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते गणले जातात. त्यामुळे शिंदे त्यांची मनधरणी कशी करतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, आमदार संजय शिरसाट, भरत गोगावले व प्रताप सरनाईक यांना मागील मंत्रिमंडळात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे ते यावेळी मंत्रिपदासाठी आग्रही आहेत. त्यांच्यासाठी शिंदेंनी फिरत्या मंत्रिपदाचा तोडगा काढल्याची चर्चा आहे. पण त्यांचा हा फॉर्म्युला त्यांच्या आमदारांना किती पचनी पडतो हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

सतीश वाघ अपहरण आणि हत्येमागचे गूढ उकलले:अटक चार आरोपींची नावे पोलिसांनी सांगितली, पाचवा अद्याप फरार

भाडेकरूने दिली सुपारी आणि रचला कट

पुणे- सतीश वाघ अपहरण आणि हत्येमागचे गूढ उकलले असून अटक चार आरोपींची नावे पोलिसांनी सांगितली आहेत , पाचवा संशयित मात्र अद्याप फरार असल्याचे पोलीस सांगत आहेत . अवघ्या २/३ दिवसात पुणे पोलिसांनी या गुन्ह्याचा जलदगतीने तपास करून पवन श्याम कुमार शर्मा वय ३० वर्षे राहणार शांतीनगर, धुळे,नवनाथ अर्जुन गुरसाळे वय ३२ राहणार अनुसया पार्क वाघोली पुणे तसेच अक्षय हरीश जावळकर आणि विकास शिंदे अशा चौघांना अटक केली आहे.

अपहरण करून खून केलेल्या गुन्ह्याची पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने उकल केली . पोलिसांनी सांगितले कि,’ या गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की, फिर्यादी ओंकार वाघ यांचे वडील, जे भाजपा आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आहेत ते सतीश वाघ यांना दिनांक ९/१२/२०२४ रोजी सकाळी ०६/०० वा.चे दरम्यान मॉर्निंग वॉकला गेलेले असता अज्ञात इसमांनी शेवरले कंपनीच्या एन्जॉय या मोटार कार मधून अपहरण करून जिवानिशी ठार मारून त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटामध्ये फेकून दिला यावरून वरील गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दाखल गुन्हयाचा तपास करता गुन्ह्याच्या तपासा दरम्यान गुन्ह्यात वापरलेल्या वाहनाचे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे लोकेशन प्राप्त करून गुन्ह्यातील संशयित इसम नामे १. पवन श्याम कुमार शर्मा वय ३० वर्षे राहणार शांतीनगर, धुळे. २.नवनाथ अर्जुन गुरसाळे वय ३२ राहणार अनुसया पार्क वाघोली पुणे यांना वाघोली पुणे या परिसरातून चौकशीकामी ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली की मयत यांच्याकडे पूर्वी भाडेकरू म्हणून राहणारा इसम नामे अक्षय हरीश जावळकर यांचे व मयत यांचे वैमनस्याचे संबंध होते व त्या दोघांमध्ये वितुष्ट होते. या कारणावरून अक्षय जवळकर यांनी मागील चार ते पाच महिन्यापूर्वी मयत यास जीवे ठार मारण्याची सुपारी पवन शर्मा आरोपी क्र ०१ याला दिलेली होती तेव्हापासून आम्ही त्याचे मागावर होतो मागील चार ते पाच दिवसांपूर्वी पवन शर्मा याने त्यांचे साथीदार नवनाथ गुरसाळे विकास शिंदे यांचे सह एक संशयित यांनी मिळून संगणमताने कट रचला तसेच अक्षय जावळकर यांच्याकडून अॅडव्हान्स देखील स्वीकारले. ठरल्याप्रमाणे आठ तारखेला पुन्हा एकदा प्लॅन करून सकाळी नऊ तारखेला मयत मॉर्निंग वॉकला गेले असताना संशयित इसम नामे पवन कुमार शर्मा, नवनाथ गुरसाळे विकास शिंदे व अजुन एक संशयित यांनी त्यांचे अपहरण करून एन्जॉय गाडीच्या डिक्कीत टाकून सासवडच्या दिशेने निघून गेले. मयत यास गाडीत टाकल्यापासून त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या चाकूने मयत त्यांच्यावर वार करून जीवानिशी ठार मारून त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटामध्ये फेकून दिला अशा कबुली वरून संशयित इसम नामे अक्षय जवळकर यास ताब्यात घेतले असता त्याने मयतासोबत त्याचे वितुष्ट असल्याचे सांगून त्याला जीवे ठार मारण्याची पाच लाख रक्कमेची सुपारी दिल्याची कबुली दिली. तसेच संशयित इसम नामे विकास शिंदे यास आव्हाळवाडी रोड वाघोली येथून ताब्यात घेण्यात आले आहे अधिक चौकशी सुरू आहे.
पोलीस आयुक्त पुणे शहर यांचे आदेशावरून सदर दाखल गुन्हा हा गुन्हे शाखेकडे वर्ग केला असुन सदर गुन्ह्यामंध्ये अजुन कोणी आरोपी सामिल आहेत का, तसेच आरोपीतामध्ये पैशांची देवाण-घेवाण कशा पध्दतीने झाली याबाबत तपास करावयाचा असल्याने दाखल गुन्हयाचा पुढील तपास सुदर्शन गायकवाड अंमली पदार्थ विरोधी पथक २ गुन्हे शाखा पुणे यांचे कडे देण्यात येत आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा शनिवारी विस्तार:अजित पवारांचे सुपुत्र जय पवार यांचा दावा; महायुतीचे तिन्ही नेते यासाठीच दिल्लीला गेल्याची माहिती

बारामती -राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असले तरी देखील अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच आता याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी थेट तारीखच सांगितली आहे. 14 तारखेला मुंबईत मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार असल्याचे जय पवार यांनी म्हटले आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत पोहोचले आहेत. तर अजित पवार यांच्यासह महायुतीचे काही मोठे नेते देखील दिल्लीत जाण्याची जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विरोधकांकडून मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होत असल्यामुळे टीका होत आहे. मंत्रिमंडळ विस्तार 11 किंवा 12 तारखेला होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता मंत्रिमंडळ विस्तार 14 तारखेला होणार असल्याचे स्व:त जय पवार यांनी सांगितले आहे.

अजित पवार यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ बारामतीमध्ये आयेाजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम 14 डिसेंबर रोजी नियोजित होता. मात्र, याच दिवशी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याने सत्कार कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असल्याचे जय पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मात्र, हा सत्कार नंतर कधी होणार? या बाबत त्यांनी स्पष्ट माहिती दिलेली नाही. 16 डिसेंबरपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत आहे. त्यानंतरच हा सत्कार होईल.

पुनर्विवाहाचे आमिष दाखवत ज्येष्ठ नागरिकाला जाळ्यात ओढून ब्लॅकमेल करत उकळले पैसे

0

पुणे- फेसबूकवरील एका जाहिरात पाहून पुण्यातील सहवास सोसायटी येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने पुनर्विवाह करण्यासाठी अर्ज भरला. त्यानंतर त्यास एका महिलेने संपर्क साधून विश्वास संपादित करून जेष्ठ नागरिकास प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो काढले. सदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तसेचपोलिस कारवाई करण्याची धमकी देऊन सायबर चोरट्यांनी त्यांच्याकडून 72 हजार रुपये ऑनलाईन घेत फसवणूक केली. याप्रकरणी एका महिलेसह 3 आरोपीांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीषा शर्मा, विक्रम राठोड, राहुल शर्मा अशी या आरोपींची नावे आहेत .

याबाबत एका 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने अलंकार पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक कर्वेनगर भागात सहवास सोसायटी येथे राहण्यास आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मनीषा शर्मा, विक्रम राठोड, राहुल शर्मा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक घटस्फोटित असून ते पुनर्विवाह करण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी फेसबूकवरील एका जाहिरात नुसार नोंदणी केली होती. चोरट्यांनी त्यांना पुनर्विवाहसाठी एक फाॅर्म पाठविला. फाॅर्ममध्ये त्यांना वैयक्तिक माहिती भरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर मनीषा शर्मा असे नाव सांगणाऱ्या महिलेने त्यांच्याशी संपर्क साधला. शर्माने सोशल मीडियात अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी दिली. तिने बँक खात्यावर तातडीने पैसे भरण्यास सांगितले.आरोपी शर्माचा साथीदार विक्रम राठोडने त्यांच्याशी संपर्क साधला. दिल्ली पोलीस दलातून बोलत असल्याची बतावणी करुन त्यांना बळजबरीने धमकावले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची धमकी दिली. त्याचा साथीदार राहुल शर्माने त्यांच्याशी संपर्क साधला. समाज माध्यमात चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देऊन त्यांना बँक खात्यात 72 हजार रुपये जमा करण्यास सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या ज्येष्ठ नागरिकने त्याच्या बँक खात्यात पैसे जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता रोकडे पुढील तपास करत आहेत.

महाराष्ट्रात देशात सर्वात महाग वीज :बिलात 30% कपात केव्हा करणार? – जयंत पाटील

0

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती सरकारला त्यांनी दिलेल्या आश्वसनाची आठवण करून दिली आहे. वीज बिलात 30% कपात करणार, 5 वर्षे शेतकऱ्यांना मोफत वीज देणार असे म्हणणारे आज प्रचंड बहुमताने सत्तेत बसले आहेत. सध्या राज्यात असलेले अवाढव्य वीजदर कमी करण्यात आता सरकारला कोणतीही अडचण नसावी, असे त्यांनी म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. तर विरोधी बाकावरील महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. त्यानंतर आता विरोधकांकडून महायुती सरकारला त्यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत त्यांचे चिमटे काढण्यास सुरुवात केली आहे. राज्य विधिमंडळाच्या 16 तारखेपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी एका पोस्टद्वारे महायुती सरकारला वीज बील कपाचीच्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे.

जयंत पाटील आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले, वीज बिलात 30% कपात करणार असे महायुती सरकारमधील लोकं मागच्या 4-5 महिन्यांपासून म्हणत आहेत. 30% कपात सोडाच पण इतर राज्यांपेक्षा आपल्या महाराष्ट्रात सध्या वीज महाग मिळत आहे.राजस्थानमध्ये प्रति युनिटला 7.55 – 8.95 रुपये मोजावे लागत आहेत, तर मध्य प्रदेशमध्ये 3.34 ते 6.80 रुपये मोजावे लागत आहेत. शेजारच्या कर्नाटक राज्यात तर सरसकट प्रति युनिट 5.90 रुपये आहेत. सर्वात जास्त वीजदर म्हणजे प्रति युनिट 5.16 ते 17.79 रुपये महाराष्ट्रात मोजावे लागत आहेत.वीज बिलात 30% कपात करणार, पाच वर्षे शेतकऱ्यांना मोफत वीज देणार असे म्हणणारे आज प्रचंड बहुमताने सत्तेत बसले आहेत. सध्या राज्यात असलेले अवाढव्य वीजदर कमी करण्यात आता सरकारला कोणतीही अडचण नसावी!

भाजपा आमदाराचे मामा सतीश वाघ अपहरण आणि हत्या: शेजाऱ्याने दिली ५ लाखाची सुपारी _चौघे अटकेत

पुणे- पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले,’हडपसर येथील भाजपचे नेते आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे दोन दिवसापूर्वी अपहरण करून हत्या झाल्याची घटना घडली होती.तर या प्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेतले असून सतीश वाघ यांचे शेजारी राहणार्‍या व्यक्ती सोबत काही दिवसापूर्वी वाद झाला होता.त्यातून सतीश वाघ यांना मारण्यासाठी 5 लाख रूपयांची सुपारी देण्यात आली होती.ही माहिती तपासात समोर आली आहे.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा खून “वैयक्तिक” कारणातून झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. सतीश वाघ यांना मारण्यासाठी 5 लाख रुपयांची सुपारी दिली असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. सतीश वाघ यांच्या शेजारी राहत असलेल्या व्यक्तीनेच हे सगळं कृत्य केल्याचे तपासातून समोर आले असून खून हा खाजगी आणि वैयक्तिक कारणातूनच केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी 5 पैकी 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ज्या व्यक्तीने सतीश वाघ यांच्या खुनाची सुपारी दिली, त्याला देखील पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या संपूर्ण घटनेच्याबाबत सखोल तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले आहे.

संविधान, समता, न्यायाच्या दिशेने कायदे बदलणे गरजेचे -ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर

; मानवी हक्क संरक्षण जागृती संस्था, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, जिल्हा  प्राधिकरण, पुणे यांच्या वतीने जागर मानवी हक्काचा अभियान, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार 
पुणे : आज विस्थापित विरुद्ध प्रस्थापित असा लढा का द्यावा लागत आहे, याचा विचार करणे गरजेचे आहे. समाजात पसरलेली जातीची आणि धर्माची नशा थांबविणे गरजेचे आहे. यामुळे मानवता नष्ट होत आहे. ब्रिटीश  काळातील कायदे बदलण्याकरिता आमचा विरोध नाही. मात्र, संविधान, समता, न्यायाच्या दिशेने कायदे बदलणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी व्यक्त केले. 
मानवी हक्क संरक्षण जागृती संस्था, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, जिल्हा  प्राधिकरण, पुणे यांच्या वतीने जागर मानवी  हक्काचा अभियान, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन घोले पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले होते. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, भारतीय घटनातज्ञ प्रा. डॉ. उल्हास बापट, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश डी.जे. पाटील, प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, ऍड. शार्दूल जाधवर, विकास कुचेकर, अण्णा जोगदंड, डॉ. बबन जोगदंड आदी उपस्थित होते. 
महेंद्र महाजन म्हणाले, लोकशाही टिकण्याचे महत्वाचे कारण म्हणजे संविधान. भारतीय जागतिक पटलावर आपल्या संविधानामुळे यशस्वी वाटचाल करीत आहेत. मानवाला सुरक्षितरित्या जगण्याचा अधिकार म्हणजे मानवाधिकार नव्हे.  तर,आदराने व सन्मानाने जगण्याचा अधिकार म्हणजे मानवाधिकार आहे. 
प्रा.डॉ. उल्हास बापट म्हणाले, दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक देशांनी लोकशाही स्वीकारली. मात्र, केवळ भारतात लोकशाही जिवंत राहिली. पंतप्रधान जेव्हा शक्तिशाली होतात, तेव्हा लोकशाही व हक्काला धोका निर्माण होतो. जोपर्यंत नागरिक सतर्क असतील, तोपर्यंत हा धोका टाळता येईल.
प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर म्हणाले, न्यायव्यवस्थेतील अनेक गोष्टी सामान्य माणसाला माहीत नसतात. त्यामुळे याविषयी परस्पर संवादाचे काम  सामाजिक संस्था करीत आहेत. त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. विकास कुचेकर यांनी प्रास्ताविक केले. मोनिका जोशी यांनी सूत्रसंचालन केले. 

पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन

पुणेकरांनी मोठ्या संख्येने उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्याचे पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांचे आवाहन

पुणे : वाचन चळवळीला सक्षम करण्यासाठी आणि पुण्याला नवी ओळख देण्यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी १४ डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता होणार आहे. मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांचा पहिलाच पुणे दौरा असल्याने, सर्वांनाच उत्सुकता आहे. त्यामुळे उद्घाटन समारंभाला पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी मंगळवारी केले.

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर येत्या १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सव होत आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पांडे बोलत होते. यावेळी संयोजन समितीचे सदस्य प्रसेनजित फडणवीस, बागेश्री मंठाळकर, प्राचार्य डॉ. संजय चाकणे आदी उपस्थित होते. या महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात सुरू असून, उद्घाटनाचा कार्यक्रम हजारो पुणेकरांच्या उपस्थितीत जल्लोषात होणार असल्याचे पांडे यांनी सांगितले.

पांडे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे. देवेंद्र महोत्सवातील पुस्तकांच्या स्टॉलला भेट देऊन, लेखक, साहित्यिक, प्रकाशकांशी संवाद साधणार आहे. या निमित्ताने पुणेकरांना देवेंद्रजींशी संवाद साधण्याची संधी मिळेल. उद्घाटनाचा मुख्य कार्यक्रम फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या भव्य स्टेजवर होणार आहे. या कार्यक्रमाला कुलगुरू, साहित्यिक, लेखक, कवी, चित्रकार, संपादक, प्राचार्य अशी मंडळी उपस्थित राहणार आहे. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असल्याने, पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वाचन संस्कृतीला वाढविण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन पांडे यांनी केले.
आज ‘ शांतता…पुणेकर वाचत आहे’ उपक्रमात सहभागी व्हा
पुणे शहरात ‘ शांतता…पुणेकर वाचत आहे’ हा उपक्रम आज बुधवारी ११ डिसेंबरला दुपारी १२ ते १ या वेळेत अप्पा बळवंत चौकसह, शाळा, महाविद्यालये, पुणे मेट्रो स्टेशन, पीएमपीएमएल बसथांबे, विमानतळ, कारागृह, वाचनालये, ग्रंथालये अशा शेकडो ठिकाणी उत्साहात होणार आहे. हा उपक्रम सामाजिक संस्था आणि संघटनांनी उत्साहात साजरा करण्याचे ठरवले आहे. पुणेकरांनी आज १२ ते १ या वेळेत असेल त्या ठिकाणी आपल्या आवडीचे पुस्तक वाचून, वाचन चळवळ बळकट करण्यासाठी योगदान द्यायचे आहे, असे आवाहन राजेश पांडे यांनी केले आहे.
ज्ञानसरिता दिंडीचे आयोजन
पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटन होण्यापूर्वी शहरात नाविन्यपूर्ण ज्ञानसरिता दिंडी काढण्यात येणार आहे. या दिंडीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न १०१ महाविद्यालयातील दिंड्या सहभागी होणार आहेत. पुणे परिसरातील संत, क्रांतिकारक, समाजसुधारक, विचारवंत यांच्या कार्यावर आधारित दींड्या राहणार आहेत. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा सर्व विचारांची दिंडी टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश शाळेतून सुरू होऊन, फर्ग्युसन महाविद्यालयात येणार आहे, अशी माहिती बागेश्री मंठाळकर यांनी दिली.