Home Blog Page 543

अजितदादांनंतर अमित शहा शरद पवारांच्या भेटीला:इकडे भाजप नेते म्हणाले – पवार महायुतीत येणार असतील तर आनंदच…

नवी दिल्ली- अजित पवार यांनी आज सकाळी शरद पवार यांची निवासस्थानी भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आता सायंकाळी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील शरद पवार यांची निवासस्थानी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा की, भेटीमागे काही वेगळे राजकारण आहे का? अशा चर्चांना सध्या सुरुवात झाली आहे. तर शरद पवार महायुतीत येत असतील तर त्याचा आम्हाला आनंदच होईल, असे भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देताना म्हटले.

शरद पवार यांचा आज 85 वा वाढदिवस आहे. देशातील विविध क्षेत्रातील मान्यवर शरद पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत. आज सकाळीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रातील विविध मंत्री पवार यांना शुभेच्छापर संदेश पाठवीत होते. या दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी शरद पवार यांची सहकुटुंब आणि पक्षाच्या नेत्यांसह भेट घेतली होती. त्यानंतर आता अमित शाह यांनी देखील भेट घेतली आहे.

सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अमित शाह 6 जनपथवरती दाखल झाले. खासदार सुप्रिया सुळे यांनी अमित शाह यांचे स्वागत केले. काहीच मिनिटांत अमित शाह आणि पवार यांची भेट झाली. अमित शाह यांनी पुष्पगुच्छ देऊन पवार यांचा सत्कार केला तसेच निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले. दरम्यान, शरद पवार यांचा आज वाढदिवस असल्यामुळे ही भेट झाली असावी, असा अंदाज काढला जात आहे. मात्र, भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, जर शरद पवार महायुतीत येत असतील तर त्याचा आम्हाला आनंदच होईल.

अजित पवार यांच्यासोबतच खासदार सुनेत्रा पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, पार्थ पवार हे देखील शरद पवार यांच्या निवास्थानी शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर शरद पवार यांचा आर्शीवाद घेण्यासाठी आलो.आज शरद पवार तर उद्या काकींचा वाढदिवस असतो. त्यामुळे त्यांचे आर्शीवाद घेतले असल्याचे अजित पवारांनी सांगितले.

आज सकाळीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रातील विविध मंत्री पवार यांना शुभेच्छापर संदेश पाठवीत होते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अमित शाह यांनीही पवार यांना फोन करून दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.आणि भेटीची वेळ ५ वाजता ठरविली.

साताऱ्याची ‘मान्याचीवाडी’ ठरली सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 प्रदान : महाराष्ट्राला सहा पुरस्कार

0

मुंबई-

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते  आज 11 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवनाच्या प्लेनरी हॉलमध्ये पंचायती राज मंत्रालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आले.  केंद्रीय पंचायती राज आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ लालन सिंह आणि केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री प्रा.एस. पी.सिंग बघेल हे देखील  या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते.

शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाप्रति त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी विविध श्रेणीतील 45 पुरस्कार विजेत्यांना या कार्यक्रमात पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ठळक वैशिष्ट्यांमध्ये  पुरस्कार रकमेचे  डिजिटल हस्तांतरण आणि पुरस्कार विजेत्या पंचायतींचे अभिनव  उपक्रम अधोरेखित करणारा लघुपट यांचा समावेश होता. याप्रसंगी ‘पुरस्कारप्राप्त पंचायतींच्या कामांवरील सर्वोत्तम पद्धती’ या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 मध्ये महाराष्ट्रातील पंचायतींनी त्यांच्या उल्लेखनीय कार्याने  राज्यासाठी अभिमानास्पद कामगिरी केली  आहे. पंचायती राज मंत्रालयाने स्थापन केलेले हे पुरस्कार, शाश्वत विकास उद्दिष्टांच्या  स्थानिकीकरणामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सर्वोत्कृष्ट पंचायतींची दखल घेऊन त्यांना  प्रोत्साहन देतात.

महाराष्ट्राने आपल्या ग्रामपंचायती, तालुका  पंचायती आणि संस्थांच्या उल्लेखनीय  प्रयत्नांचे दर्शन घडवत   विविध श्रेणींमध्ये सहा प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले आहेत. तालुका, जिल्हा, राज्य/केंद्रशासित प्रदेश आणि राष्ट्रीय स्तरांवर आयोजित केलेल्या स्पर्धेसह हे पुरस्कार पिरॅमिड संरचनेचे अनुसरण करतात. त्यांच्यामध्ये स्पर्धात्मक भावनेला चालना देत शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने पंचायतींचे मूल्यांकन करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हे पुरस्कारांचे उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्रातील राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 च्या विजेत्यांनी ग्रामीण नवोन्मेष, शाश्वतता आणि समुदाय-चालित उपक्रमांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे.

1. मान्याचीवाडी: सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत (क्रमांक  1)

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा पुरस्कार मिळाला आहे. तिने  राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 – नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार (क्रमांक  1) जिंकला आहे.

शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी  सर्वांगीण आणि अभिसरण दृष्टीकोनाचा अवलंब करण्यात मान्याची वाडी ग्रामपंचायत सरस ठरली आहे. 420 लोकसंख्येसह, पंचायतमध्ये 98 घरांचा  समावेश आहे आणि सहा निर्वाचित प्रतिनिधी (तीन पुरुष आणि तीन महिला) त्याचे नेतृत्व करतात.

या ग्रामपंचायतीने शाश्वत पद्धती आणि एकात्मिक ग्रामीण विकासासाठी आपली वचनबद्धता दर्शवून सर्व 9 शाश्वत विकास उद्दिष्टांच्या स्थानिकीकरण संकल्पनेनुसार अपवादात्मक कामगिरीचे प्रदर्शन केले.

2. तिरोडा: सर्वोत्कृष्ट गट पंचायत (क्रमांक 3)

गोंदिया जिल्ह्यातील पंचायत गटाला सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणीअंतर्गत  शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) साध्य करण्यासाठी दाखवलेल्या उत्कृष्ट वचनबद्धतेसाठी  राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 – मधील नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत शाश्वत विकास तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. या पंचायतीने कुशल प्रशासनाचा आदर्श ठेवून  नाविन्यपूर्ण विकास धोरणांचे एकत्रीकरण आणि ग्रामीण वातावरणात टिकाऊपणाला प्रोत्साहन दिले आहे, त्यांच्या या प्रभावी उपक्रमांसाठी त्यांना राष्ट्रीय स्तरावर हा बहुमान मिळाला आहे.

दत्त जयंती निमित्त सासवड ते कापूरहोळ रस्त्यावरील अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने

पुणे: पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायणपूर येथे दत्त जन्म व दत्तजयंती निमित्त मिरवणूक सोहळा साजरा होत असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी सासवड ते कापूरहोळ रस्त्यावरील जड- अवजड वाहतूक १३ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजेपासून १५ डिसेंबर रोजी सायं. ६ वाजेपर्यंत पर्यायी रस्त्यावरुन वळविण्याचे आदेश जारी केले आहे.

सासवड ते बंगळुरू महामार्गाकडे जाणारी जड- अवजड वाहने परींचे गाव- वीर मार्गे सारोळा अशी जातील. तसेच सासवड- दिवेघाट मार्गे कात्रज चौक अशी जातील. कापूरहोळ ते सासवड या मार्गावरील अवजड वाहने कापूरहोळ- शिंदेवाडी- कात्रज चौक मार्गे सासवडकडे जातील. कार, जीप आदी हलक्या वाहनांची वाहतूक पुर्वीप्रमाणेच सासवड ते कापूरहोळ मार्गावर सुरू राहील.

श्रीक्षेत्र नारायणपूर येथे १३ ते १५ डिसेंबर २०२४ दरम्यान श्री दत्त सेवेकरी मंडळ यांचेवतीने दत्त जयंती सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, तामिळनाडू, कनार्टक, राजस्थान या राज्यातूनदेखील भाविक दर्शनासाठी येत असतात. जवळच असलेल्या केतकावळे गावी असणारे बालाजी मंदीर या ठिकाणी देखील भाविक जात असतात. दोन्ही देवस्थानची ठिकाणे ही सासवड- कापूरहोळ या मार्गावर असून, यात्रा कालावधीत वाहतुकीचे नियमन व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यावरील अवजड वाहनांची वाहतुक वळविण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मुंबई, पुणे आणि नागपूर 7 व्या स्मार्ट इंडिया हॅकाथॉन 2024 च्या भव्य अंतिम सोहळ्याचे भूषवत आहेत यजमानपद

0

स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024: वास्तविक जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांकरिता एक राष्ट्रव्यापी नवोन्मेष आव्हान

मुंबई, 12 डिसेंबर 2024

स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या अंतिम फेरीच्या उद्घाटन दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे युवा नवोन्मेषकांशी संवाद साधला. आजचा भारत सर्वांच्या प्रयत्नांसह वेगाने प्रगती करू शकतो आणि आजचा उपक्रम हे  त्याचे उदाहरण आहे, असे पंतप्रधानांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले.  “स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या महाअंतिम फेरीची मी आतुरतेने वाट पाहत होतो”, असे पंतप्रधान म्हणाले.  युवा नवोन्मेषकांसोबत आपल्याला  काहीतरी नवीन शिकण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळते, असे पंतप्रधानांनी आवर्जून नमूद केले. पंतप्रधानांशी झालेल्या संवादादरम्यान, वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च, मुंबईच्या मिस्टिक ओरिजनल्सच्या टीम लीडरने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडद्वारे प्रदान केलेल्या सुरक्षा आव्हानाचा सामना करण्याविषयी माहिती दिली.  याअंतर्गत माइक्रो डॉपलर आधारित लक्ष्य वर्गीकरण, जसे की देण्यात आलेली वस्तू पक्षी आहे की ड्रोन ओळखण्यास साहाय्यभूत करण्याचे आव्हान त्यांना देण्यात आले. टीम लीडरने अधिक माहिती देताना सांगितले, रडारवर पक्षी आणि ड्रोन सारखे दिसत असल्याने चुकीचा इशारा दिला जाऊ शकतो आणि यातून संभाव्य सुरक्षा धोका, विशेषतः संवेदनशील क्षेत्रात उद्भवू शकतो.

चमूतल्या दुसऱ्या सदस्याने उपायाचे तपशीलवार विश्लेषण सादर केले.  मानवाच्या वैशिष्ट्यपूर्ण  बोटांच्या ठशांप्रमाणेच  मायक्रो डॉप्लर सिग्नेचर्स विविध वस्तूंद्वारे निर्माण होणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण नमुन्यांचा उपयोग करते. त्यावर पंतप्रधानांनी विचारले, उपायांतर्गत वेग, दिशा आणि अंतर ओळखता येते का? त्यावर हे लवकरच साध्य होईल, असे चमूतल्या सदस्याने सांगितले. ड्रोनचे विविध सकारात्मक उपयोग आहेत, मात्र  काही शक्ती ड्रोन्सचा उपयोग इतरांना इजा पोहोचवण्यासाठी करतात आणि हे सुरक्षा आव्हान बनले असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. अशा प्रकारचे आव्हान भेदण्यास उपाय सक्षम आहे का, या पंतप्रधानांच्या प्रश्नावर चमूतल्या सदस्याने प्रक्रिया विशद केली. हे एक कॉम्पॅक्ट सोल्यूशन असून हे  किफायतशीर उपकरणांवर वापरले जाऊ शकते आणि विविध प्रकारच्या वातावरणात अनुकूल आहे. पंतप्रधानांनी देशातील विविध क्षेत्रात ड्रोनच्या वापरावर प्रकाश टाकला आणि नमो ड्रोन दीदी योजनेचे उदाहरण दिले. देशातील दुर्गम भागात औषधे आणि अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी ड्रोनच्या वापराचा  उल्लेखही त्यांनी केला.  तर शत्रू त्यांचा वापर सीमेपलीकडून बंदुक आणि अमली  पदार्थांची तस्करी करण्यासाठी करतात.

राष्ट्रीय सुरक्षेच्या अशा समस्यांना तोंड देण्यासाठी युवा नवोन्मेषक अत्यंत गांभीर्याने काम करत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या सहभागींसोबत पंतप्रधानांनी साधलेल्या  संवादाबद्दल येथे अधिक जाणून घ्या.त्यापूर्वी दिवसाच्या सुरुवातीला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन  2024 च्या भव्य अंतिम फेरीचे आभासी माध्यमातून उदघाटन केले. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुकांता मजुमदार देखील उदघाटन समारंभाला उपस्थित होते. उदघाटन समारंभाबद्दल येथे आणखी वाचा.  7वी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (SIH) 11 डिसेंबर 2024 रोजी देशभरातील 51 नोडल केंद्रांवर एकाच वेळी सुरू झाली. सॉफ्टवेअर एडिशन सलग 36 तास चालेल, तर हार्डवेअर एडिशन 11 ते 15 डिसेंबर 2024 पर्यंत सुरू राहील.महाराष्ट्रात, मुंबई, पुणे आणि नागपूर ही शहरे  स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या महाअंतिम फेरीचे यजमानपद  भूषवत असून  तिन्ही केंद्रांमध्ये राष्ट्रीय उद्घाटनापूर्वी कार्यक्रमाचे स्थानिक उद्घाटन झाले.

स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2024 चे मुंबईतील आयोजन स प मंडळी यांच्या  प्रिं. एल एन वेलिंगकर व्यवस्थापन विकास व संशोधन संस्थेने केले आहे. उदघाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून योगेश ब्राह्मणकर, नवोन्मेष संचालक, शिक्षण मंत्रालय , तर मान्यवर अतिथी म्हणून राहुल चंदेलिया, मुख्य कार्यकारी अधिकारी, WOL3D, निलेश लेले,अध्यक्ष, लघु व मध्यम उद्योग विकास मंडळ, कॅप्टन मयांक कुक्रेती,(राष्ट्रीय सुरक्षा बल ) आणि वेंकट नागभूषणम जेट्टी, उप व्यवस्थापक, भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. उपस्थित होते.  

स्पर्धा केंद्रावर कृत्रिम बुद्धिमत्ता / मशीन लर्निंग, अनॅलिटीक्स, इमेज अनॅलिटीक्स व प्रॉब्लेम स्टेटमेंट्स या विषयांवरील स्पर्धांमध्ये  34 संघ सहभागी झाले होते. स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2024 चा  मुंबईतील समारोप 12 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळच्या समारोप सत्रानंतर होईल.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या भोपाळच्या ओरिएंटल विज्ञान व तंत्रज्ञान संस्थेच्या मुस्कान मिश्रा हिने सांगितले, “आम्ही महिलांची सुरक्षा हा विषय निवडला होता. महिलांना त्यांच्या आयुष्यात कोणकोणत्या अडचणी येतात याबद्दल एक अल्गोरिदम वापरून त्यावर उपाययोजना कशी करावी हे सांगणारे एक ऍप आम्ही विकसित केले होते. आम्हाला आशा आहे कि आम्ही हि स्पर्धा नक्कीच जिंकू.”

पुण्यामधील स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2024 चे आयोजन एम आय टी कला, डिझाईन व तंत्रज्ञान विद्यापीठाने केले होते. पुण्यातील या कार्यक्रमाला अभिषेक रंजन, नवोन्मेष अधिकारी,  शिक्षण मंत्रालय, डॉ मोहित दुबे, प्रकुलगुरू, एम आय टी ए डी टी विद्यापीठ, डॉ महेश चोपडे, रजिस्ट्रार, डॉ रेखा सुगंधी, नोडल अधिकारी, तसेच इतर अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.

स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2024 साठी निवडलेल्या देशभरातल्या 51 नोडल केंद्रांमध्ये नागपूरच्या  जी एच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड झाली होती. या केंद्रात 20 संघांनी नोंदणी केली होती. त्यातील सॉफ्टवेअर विभागात 11 व 12 डिसेंबर रोजी होणाऱ्या स्पर्धांमध्ये  120 स्पर्धक व 24 मेंटॉर समाविष्ट आहेत. उदघाटन समारंभात सुनील रायसोनी, संचालक, रायसोनी समूह, शिव सोनी, वरिष्ठ टेक्निकल आर्किटेक्ट, इन्फोसिस, डॉ रिझवान अहमद, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, डेलाप्लेक्स आणि सुनील उंटवाले, संचालक, जी. एच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय,हिंगणा, नागपूर हे उपस्थित होते.

स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2024 बद्दल माहिती:

दैनंदिन आयुष्यातील महत्वाच्या अडचणी सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे यादृष्टीने आयोजित केलेला स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन हा एक राष्ट्रव्यापी उपक्रम आहे. नवोन्मेष व समस्या निराकरणासाठीचे व्यावहारिक कौशल्य विकसित करणारी संस्कृती जोमाने तयार व्हावी यासाठी स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन (SIH) मध्ये दैनंदिन आयुष्यातील समस्यांवर व्यवहार्य उपाययोजना सुचवू शकणाऱ्या  विद्यार्थ्यांसाठी देशव्यापी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले होते.

मंदिर-मशीद वादावर कोर्टांनी आदेश देऊ नये:मशीद-दर्ग्यांच्या सर्व्हेचेही आदेश देऊ नका; केंद्राला म्हटले महिन्यात भूमिका स्पष्ट करा -सुप्रीम कोर्टाचे आदेश

0

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्र सरकारला प्रार्थनास्थळांच्या कायद्याच्या घटनात्मकतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 4 आठवड्यांच्या आत आपली भूमिका मांडण्यास सांगितले.CJI म्हणाले, ‘जोपर्यंत आम्ही या प्रकरणाची सुनावणी करत आहोत, तोपर्यंत देशातील धार्मिक स्थळांबाबत कोणताही नवीन खटला दाखल केला जाणार नाही. प्रलंबित प्रकरणांमध्ये न्यायालय अंतिम आदेश देणार नाही.सीपीआय-एम, इंडियन मुस्लिम लीग, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, आरजेडी एमपी मनोज कुमार झा यांच्यासह सहा पक्षांनी या कायद्याविरोधात याचिका दाखल केली आहे.सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती पीव्ही संजय कुमार आणि न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांच्या विशेष खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

काय आहे प्रार्थनास्थळ कायदा-1991 मुद्दे …

  1. भारतातील विविध धर्मांच्या प्रार्थनास्थळांची विद्यमान स्थिती कायम ठेवण्यासाठी 15 ऑगस्ट 1991 रोजी प्रार्थनास्थळ कायदा लागू करण्यात आला.
  2. कायद्यात असे सांगण्यात आले होते की, देशातील प्रार्थनास्थळे स्वातंत्र्याच्या वेळी म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी होती त्याच स्थितीत ठेवली जातील.
  3. संविधानाच्या अनुच्छेद 25 आणि 26 अंतर्गत धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारांतर्गत, नागरिकांना त्यांच्या धर्माचे पालन आणि आचरण करण्याचे स्वातंत्र्य आहे.
  4. हा कायदा या अधिकारांतर्गत कोणत्याही धार्मिक स्थळाला एका धर्मातून दुसऱ्या धर्मात बदलण्यास मनाई करतो.
  5. प्रार्थना स्थळ कायदा हा कायदा सर्व धार्मिक स्थळांना लागू होतो. म्हणजे हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन किंवा कोणत्याही धार्मिक स्थळाचे अन्य कोणत्याही धर्मात धर्मांतर करता येणार नाही.
  6. कायद्यात अशी तरतूद आहे की धार्मिक स्थळाच्या बदलाबाबत काही कायदेशीर वाद असल्यास निर्णय देताना 15 ऑगस्ट 1947 ची परिस्थिती विचारात घेतली जाईल.

भाजप नेते आणि वकील अश्विनी उपाध्याय, सुब्रमण्यम स्वामी, कथाकार देवकीनंदन ठाकूर, काशीच्या राजकुमारी कृष्णा प्रिया, धार्मिक नेते स्वामी जितेंद्रनंद सरस्वती, निवृत्त लष्करी अधिकारी अनिल कबोत्रा, वकील चंद्रशेखर, रुद्र विक्रम सिंह, वाराणसी आणि इतर काही जणांनी याचिका दाखल केली आहे.

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या याचिका फेटाळण्याची मागणी

या याचिकांविरोधात जमियत उलेमा-ए-हिंदने याचिका दाखल केली आहे. जमियतचा असा युक्तिवाद आहे की या कायद्याविरुद्धच्या याचिकांवर विचार केल्यास देशभरातील मशिदींविरुद्ध खटल्यांचा पूर येईल. मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड आणि ज्ञानवापी मशिदीची देखभाल करणाऱ्या अंजुमन व्यवस्था मशीद व्यवस्थापन समितीनेही या याचिका फेटाळण्याची मागणी केली आहे.

यूपी, मध्य प्रदेश, राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये मंदिर-मशीद प्रकरणे
सर्वोच्च न्यायालयाचे वकील हरिशंकर जैन यांनी 19 नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली. यामध्ये संभलची जामा मशीद हे हरिहर मंदिर असल्याचा दावा करण्यात आला होता. त्याच दिवशी याचिका स्वीकारण्यात आली. दुसऱ्या दिवशी न्यायालयाने जामा मशिदीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले.

5 दिवसांनंतर म्हणजेच 24 नोव्हेंबर रोजी टीम पुन्हा सर्वेक्षणासाठी जामा मशिदीत पोहोचली. तिथे लोकांची गर्दी जमली. दगडफेक आणि गोळीबारात 5 जणांचा मृत्यू झाला. दोन दिवसांनंतर हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी राजस्थानच्या अजमेर शरीफ दर्ग्यावर संकटमोचन महादेव मंदिर असल्याचा दावा केला.

न्यायालयाने याचिका स्वीकारली. हा ट्रेंड देशाच्या विविध भागात सुरू आहे. या प्रकरणांपूर्वी वाराणसीतील ज्ञानवापी मशीद, मथुरा येथील श्री कृष्ण जन्मभूमी-ईदगाह आणि मध्य प्रदेशातील धार येथील भोजशाळा येथील मशिदीबाबत खटले दाखल करण्यात आले आहेत. राम मंदिरावरील निर्णयानंतर या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.

कोलवडी – साष्टे परिसरातील २ अवैध दारू भट्ट्या उध्वस्त

पुणे-कोलवडी – साष्टे परिसरातील २ अवैध दारूभट्टीवर छापा मारून त्या पोलिसांनी उध्वस्त केल्या या ठिकाणी सुमारे साडेचार लाखाचे रसायन व साहित्य पोलिसांना मिळून आले.

या प्रकरणी पोलिसांनी सांगितले कि,’दि.११/१२/२०२४ रोजी गुन्हे शाखा युनिट ६ कडील पोलीस उप-निरीक्षक रामकृष्ण दळवी व पथक असे हद्दीत गुन्हे अवैध धंदे प्रतिबंधक गस्त करत असताना माहिती मिळाली की, कोलवडी साष्टे येथील रिकामेवस्ती परिसरात नदीचे कडेला एक इसम दारूची भट्टी लावुन दारू तयार करत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाली.
सदर ठिकाणी जावुन छापा टाकला असता इसम नामे ज्ञानेश्वर गब्बर रजपूत, वय २१, रा. वाडेगाव, ता. हवेली, जि. पुणे हा साष्टे गाव, रिकामेवस्ती येथे भट्टी लावुन दारू काढत असताना मिळुन आला असुन त्याचे ताब्यात ७० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू, ८००० लिटर कच्चे रसायण व इतर साहित्य असा २,९२,०००/- किमतीचा माल मिळुन आला तसेच अशाच प्रकारे हातभट्टीची दारू एक महिला हि देखील तयार करत असल्याची माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी अचानक छापा टाकला असता सदर ठिकाणी ५० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू, ४००० लिटर कच्चे रसायण व इतर साहित्य असा एकुण १,५०,०००/- रू. कि.चा माल मिळुन आला दोन्ही कारवायांमध्ये एकुण ४,४२,०००/- रू.कि.चा माल मिळुन आला.
सदरबाबत लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.११७१/२०२४, महाराष्ट्र प्रोव्हिबिशन कायदा कलम ६५ (फ) (ब) (क) (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कामगीरी अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री शैलेश बलकवडे, मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, युनिट -६ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप-निरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, सुहास तांबेकर, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, गणेश डोंगरे, शेखर काटे, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे

‌‘मोदी 3.0‌’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यक्तीमत्वाचे पैलू उलगडणार प्रकाश जावडेकर

पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटी आयोजित ‌‘मोदी 3.0‌’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर उलगडून सांगणार आहेत.
रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटी आयोजित कार्यक्रमात हा कार्यक्रम रविवार, दि. 15 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता आबासाहेब गरवारे महाविद्यालय, कर्वे रोड येथील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष डॉ. शंतनू देशपांडे आणि सचिव अमृता कुलकर्णी यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रीमंडळात कार्यरत असताना प्रकाश जावडेकर यांनी पंतप्रधानांचे व्यक्तीमत्त्व व कार्यपद्धती अनुभवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती, विचारप्रणाली, दूरदृष्टी, निर्णय क्षमता, समन्वयाची भूमिका आदी वैशिष्ट्यांसह व्हिजन 2047 या विषयी प्रकाश जावडेकर बोलणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

परकीय शक्तींची घुसखोरी ‘सिटीझन कार्ड’द्वारे रोखणे सहजशक्य : आबा बागुल

पुणे-
नुकतेच म्यानमारमधील दोन रोहिंग्यांचे वास्तव पुण्यात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे त्यातील एकाने चक्क घरही बांधल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी देशात पुणेच काय सर्वच शहरांमध्ये परकीय शक्तींची होणारी घुसखोरी ही देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घातक आहे. मात्र ती ‘सिटीझन कार्ड’ द्वारे रोखणे सहजशक्य आहे. हे सिटीझन कार्ड केवळ परकीय शक्तींवर नजर ठेवण्यापुरते मर्यादित असणार नाही तर लोकसंसंख्येची घनता , नागरिकांचे स्थलांतर , पायाभूत सुविधांवरील ताण यासह कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी वरदान ठरणार आहे. महाराष्ट्रापासून देशात हे ‘सिटीझन कार्ड’ निश्चितच पथदर्शी ठरेल. त्यामुळे ‘सिटीझन कार्ड’विषयीच्या सविस्तर सादरीकरणासाठी वेळ द्यावा आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. अशी मागणी माजी उपमहापौर आबा बागुल यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री व सर्व पक्ष नेत्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

याबाबत आबा बागुल यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री ,सर्व पक्ष नेते तसेच राज्याचे पोलीस महासंचालक,पुणे पोलिस आयुक्त, पुणे महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, प्रत्येक शहराच्या शाश्वत विकासासाठी काळानुसार बदलायचे असते ,त्यासाठीच सिटीझन कार्ड ही अभिनव योजना जी पुण्यासाठीच काय देशासाठी नक्कीच पथदर्शी ठरणार आहे.आज पुण्यात वास्तव्यास असणारे आणि शिक्षण , नोकरी, पर्यटन, स्थलांतरित , वैद्यकीय उपचार या निमित्ताने पुण्यात येणाऱ्यांचे प्रमाण पाहता त्याची नक्की किती आकडेवारी आहे हा प्रश्न जितका महत्वाचा आहे, त्याहीपेक्षा या सर्वांमुळे पुण्याच्या पायाभूत सुविधेवर पडणारा ताण हा मुद्दा दुर्लक्ष करून चालणार नाही. वाढत्या नागरीकरणामुळे पायाभूत सुविधा तोकड्या पडतात पण मूळ पुणेकर पर्यायाने करदात्या नागरिकांवर त्याचा भार पडतो. शिवाय वाढती गुन्हेगारी यासह अन्य निर्माण होणारे प्रश्न हे वेगळेच.अशीच परिस्थिती प्रत्येक शहरांची आहे. त्यात आता परकीय शक्तींची घुसखोरी होत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे ती घुसखोरी रोखण्यासाठी हे सिटीझन कार्ड वरदान ठरणार आहे. देशातील नागरिक कुठल्याही शहरात कोणत्याही कारणांसाठी जाऊ शकतो. मात्र ती व्यक्ती कुठे ,कशासाठी आली याची माहिती व्हावी यासाठी सिटीझन कार्ड त्या- त्या शहरात देणे अशी व्यवस्था असणे आवश्यक आहे. आपण परदेशात जाताना ज्या ज्या प्रक्रियेतून जातो. ती त्या त्या देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाची असते. आपल्याकडून तेथील पायाभूत सुविधांच्या वापरापोटी जसे कि पाणी वापर, स्वच्छता आदींचा कर आपल्याकडून ते वळते करून घेत असतात. शिवाय त्या त्या देशांना आपल्यामुळे एकप्रकारे उत्पन्न मिळते म्हणजेच एकप्रकारे महसूल त्या देशाला मिळतो आणि बाहेरील व्यक्तींच्या येण्याने पायाभूत सुविधांवर पडणारा भार तेथील नागरिकांवर पडत नाही. याच धर्तीवर हे सिटिज़न कार्ड प्रत्येक शहरासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

सिटीझन कार्ड म्हणजे नेमके काय ?

*जन्मापासून ते मृत्यूपर्यंतची इत्यंभूत माहिती.

  • आरोग्यापासून शिक्षणापर्यंत इतकंच काय कुटुंबांची संपूर्ण माहिती.
    *रहिवासासह आवश्यक ते सर्व कागदपत्रे (रेशनकार्ड, इलेक्शन कार्ड, आधार कार्ड, वाहन परवाना, पारपत्र, फोटो ) सिटीझन कार्डमध्ये एकत्रित करण्याची योजना.
    *सरकारी ,निमसरकारी अथवा शाळा, महाविद्यालय अशा कोणत्याही कामांसाठी आवश्यक कागदपत्रे नेण्याची गरज नाही.
    *केवळ एका ‘ क्लिक ‘ वर सर्व कामकाज असे स्वरूप.
  • आधार कार्डच्या धर्तीवर सिटीझन कार्ड, ज्यात आधार कार्डचाच क्रमांक असणार.
  • केंद्र सरकारच्या योजनांसाठीही ग्राहय आणि लाभार्थीसाठीही पात्र.
    *दरवर्षी आपोपाप नूतनीकरण होणार.
    *शिक्षण , नोकरी, पर्यटन, स्थलांतरित , वैद्यकीय उपचार या निमित्ताने कोणत्याही शहरात येणाऱ्यांनाही अस्थायी स्वरूपाचे सिटिज़न कार्ड.

सोनू आणि कोमलच्या हळदीत दाभाडे कुटुंबाचा जल्लोष..

‘फसक्लास दाभाडे’मधील धमाल ‘यल्लो यल्लो’ गाणं प्रदर्शित.

सध्या सगळीकडे लग्नसराईचा हंगाम सुरू असून लग्नातील हळदी समारंभ हा सर्वात खास आणि धमाल समारंभ असतो. याच धमाल वातावरणात, ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटातील ‘यल्लो यल्लो’ गाणं एक नवा रंग घेऊन आलं आहे. नुकताच दाभाडे कुटुंबियांच्या घरातील हळदी सोहळा मोठ्या दणक्यात पार पडला. यानिमित्ताने ‘यल्लो यल्लो’ हे हळदीचे खास गाणंही प्रदर्शित करण्यात आलं. या सोहळ्यात दाभाडे कुटुंबाने एकत्र येऊन धमाल, मजामस्ती, नाचगाणी आणि विविध खेळ खेळत सोनू आणि कोमलचा हळदी समारंभ अगदी थाटामाटात साजरा केला. या हळदी समारंभाला हेमंत ढोमे, क्षिती जोग, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, निवेदिता सराफ, हरीश दुधाडे, राजन भिसे आणि राजसी भावे उपस्थित होते.

सोनू आणि कोमलच्या हळदी समारंभातील ‘यल्लो यल्लो’ गाण्यात धमाल पाहायला मिळत असून या गाण्याला अमितराज यांचे संगीत लाभले आहे. गाण्याचे बोल क्षितिज पटवर्धन यांचे असून या गाण्याने हळदी सोहळ्याचा उत्साह द्विगुणित केला आहे. या धमाकेदार गाण्यात नकाश अझीझ यांच्या आवाजाने अधिकच रंगत आणली आहे. सोनू आणि कोमलच्या हळदीचं हे गाणं प्रत्येकाला थिरकायला लावणारं आहे. ‘यल्लो यल्लो’ या गाण्यात हळदी समारंभातील धमाल क्षण पाहायला मिळत असून गाण्यात उत्साही वातावरणात कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा आनंद आणि मस्तीची झलक दिसतेय.

निर्माते भूषण कुमार म्हणतात, ‘’हे गाणं म्हणजे आमच्या तुमच्या घरातील लग्नातले चित्रण आहे. यातील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षक स्वतःमध्ये कुठेतरी शोधतील. खूप सुंदर असे सादरीकरण असून प्रत्येकाला थिरकायला लावणारे हे गाणे आहे.’’

निर्माते आनंद एल राय म्हणतात, “ हळदीसारखा एक धमाल कार्यक्रमाचा आनंद ‘यल्लो यल्लो’ गाण्यात पाहायला मिळेल. दाभाडे कुटुंबातील हळदी समारंभाची मस्ती, प्रेम आणि नात्यांची मुरलेली गोडी या गाण्यात उत्तमरित्या दाखवण्यात आली आहे. या गाण्याने हळदी सोहळ्यातील धमाल रंग उधळले असून, हे गाणं प्रेक्षकांना त्यांच्या स्वतःच्या आठवणींशी जोडेल. मला खात्री आहे, हे गाणे इथून पुढे प्रत्येक हळदी समारंभात धमाल उडवेल.”

दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी गाण्याबद्दल म्हणतात, “हळद हा एक असा सोहळा असतो जिथे मस्ती, आनंद आणि नात्यांचे खेळ रंगतात. पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या या सोहळ्याची धमाल ‘यल्लो यल्लो’ गाण्यात पहायाला मिळणार आहे… हे मराठमोळं कौटुंबिक सेलिब्रेशन पाहायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.”

टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांचा आगामी चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’ २४ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, क्रिशन कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग आहेत. चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओजने केले आहे.

परभणीतील घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाचा अवमान, संविधानाची विटंबना करणा-यांना कठोर शासन करा: नाना पटोले.

परभणीत आंबेडकरी अनुयायांवरील पोलीस अत्याचार थांबवा, जिल्हा पोलीस अधिक्षकाला तात्काळ निलंबित करा.

परभणीत आगडोंब उसळत असताना भाजपा युती सरकार बेफिकीर, मंत्रीपदे व मलईदार खात्यांसाठी मारामारी.

मुंबई, दि. १२ डिसेंबर २०२४
परभणीत भारतीय राज्यघटनेची विटंबना करण्याची घटना अत्यंत निषेधार्ह आहे. हा प्रकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबडेकर व संविधानाला मानणा-या कोट्यवधी लोकांचा घोर अपमान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या पवित्र संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे, असा संतप्त सवाल करून संविधानाची विटंबना करणा-यांच्या मुसक्या आवळून त्यांना कठोर शासन करा, असे महाराष्ट्रात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

परभणीतील घटनेवर प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, या घटनेचा काँग्रेस पक्ष तीव्र शब्दात निषेध करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रात संविधानाची विटंबना करणाचा प्रकार चिंतानजक व महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालण्यास लावणारा आहे. अशा विकृती शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजेच पण परभणीत आगडोंब उसळत असताना राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री मात्र मलईदार खाती व मंत्रीपदे वाटून घेण्यात व्यस्त आहेत. या सरकारला राज्याचे काही देणेघेणे नाही. संविधान न माननाऱ्या विचाराचे लोक सत्तेत आहेत त्यामुळे असे प्रकार होत आहेत.

परभणीत संविधानाची विटंबना झाल्यानंतर शहरात पोलीसांनी बेडकरी अनुयायांना अमानुष मारहाण केली, अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या, संचारबंदी लावली, इंटरनेट, एसटी सेवा बंद केली. पोलीस व प्रशासन परभणीतील परिस्थिती व्यवस्थित हाताळू शकले नाहीत. आंबेडकरी अनुयायांना केलेल्या मारहणाची चौकशी करून जिल्हा पोलीस अधिक्षक यांना तात्काळ निलंबत करावे अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. परभणीतील घटनेचा नागपूरच्या अधिवेशनात सरकारला जाब विचारू पण अशा घटना महाराष्ट्रात होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. लोकांनी अफवांना बळी न पडता लोकशाही मार्गाने या घटनेचा निषेध करावा असे आवाहनही पटोले यांनी केले आहे.

‘ये काली काली आंखें’ च्या सीझन 3 साठी हिरवा कंदील

(Sharad Lonkar)

‘आभार आणि उत्साह: ताहिर राज भसीन यांची ‘ये काली काली आंखें’ च्या सीझन 3 वर प्रतिक्रिया’

नेटफ्लिक्सची सुपरहिट थ्रिलर ‘ये काली काली आंखें’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे! 22 नोव्हेंबर 2024 रोजी दुसऱ्या सीझन च्या थरारक प्रीमियरनंतर अवघ्या तीन आठवड्यांत या शोला तिसऱ्या सीझनसाठी हिरवा कंदील मिळाला आहे, ज्यामुळे जगभरातील चाहत्यांमध्ये उत्साह आहे .

डार्क ट्विस्ट्स, सायकोलॉजिकल खोली आणि थरारक लव ट्राइंगल साठी ओळखला जाणारा हा शो लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचत आहे। दुसऱ्या सीझनने नेटफ्लिक्स इंडिया टॉप 10 मध्ये #1 वर सुरुवात केली आणि पहिल्या सीझनबद्दल पुन्हा रस निर्माण केला, ज्यामुळे शोच्या मोठ्या आकर्षणाची आणि समीक्षकांच्या प्रशंसेची खात्री पटते। अवघ्या सहा भागांची प्रभावी कथा, आंतरराष्ट्रीय कटकारस्थान आणि सखोल पात्रांच्या कंगोऱ्यांनी याला वेगळी ओळख मिळवून दिली आहे।

मुख्य अभिनेता ताहिर राज भसीन, जो शोमध्ये विक्रांत सिंह चौहानची भूमिका साकारली, त्याने आपला आनंद व्यक्त केला, “मला खूप आनंद आहे की ‘ये काली काली आंखें’ ला तिसऱ्या सीझनसाठी मंजुरी मिळाली आहे आणि माझ्या पात्राला तसेच शोला मिळालेल्या प्रशंसेमुळे मी आभारी आहे। पहिला सीझन आपल्या पाल्प एंटरटेनमेंटने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ठरला, तर दुसऱ्या सीझन ने ‘सीझन 2 चा शाप’ मोडीत काढत मोठे यश मिळवले आहे। त्याच्या जबरदस्त ट्विस्ट्स आणि थरारक नाट्यामुळे प्रेक्षकांना खूप आनंद झाला आहे।”

ताहिरने आपल्या भूमिकेचे आव्हान आणि अनुभवावर सांगितले, “हे माझ्या कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक भूमिकांपैकी एक आहे। तिसऱ्या सीझनसाठी हिरवा कंदील मिळणे म्हणजे आपण केलेल्या परिश्रमांना मान्यता मिळणे आहे। विक्रांतला पुन्हा साकारणे रोमांचक आणि समाधानकारक ठरले, आणि मी पुढील अध्याय अधिक ट्विस्ट्स आणि तीव्रतेसह मांडण्यासाठी उत्सुक आहे। समीक्षकांची प्रशंसा आणि चाहत्यांचा पाठिंबा आम्हाला प्रत्येक वेळी अधिक चांगले करण्यासाठी प्रेरित करतो।”

शोचे निर्माता सिद्धार्थ सेनगुप्ता यांनी त्याच्या गतीशील घटनाक्रम आणि अप्रत्याशित वळणांना उत्कृष्टरीत्या हाताळले आहे, ज्यामध्ये उच्च स्तरावरील नाट्य आणि गुंतागुंतीच्या प्रेमकथेचा समतोल साधला आहे। सीझन 2 च्या क्लिफहॅंगर—विक्रांत जखमी आणि पूर्वा गर्भवती—मुळे तिसऱ्या सीझनमध्ये अधिक गडद आणि थरारक कथा उलगडली जाणार आहे।

आंचल सिंग, श्वेता त्रिपाठी आणि इतर कलाकारांचा दमदार अभिनय, शोचा अ‍ॅक्शन आणि रोमांसचा अनोखा समतोल, यामुळे ‘ये काली काली आंखें’ रोमँटिक थ्रिलर प्रकाराला नवे परिमाण देत आहे। चाहत्यांना खात्री आहे की सर्वात उत्तम अद्याप येणे बाकी आहे।

भारत, युरोप आणि जीसीसीमध्ये दोन नवीन लो-फ्लोर इलेक्ट्रिक सिटी बस – SWITCH EiV12 आणि E1 

नितिन गडकरी यांनी भारत आणि जगासाठी स्विच इलेक्ट्रिक बसच्या नवीन बसेसचे केले औपचारिक अनावरण

चेन्नई – अशोक लेलँडची सहायक कंपनी आणि हिंदुजा ग्रुपचा भाग असलेल्या, तसेच इलेक्ट्रिक बस आणि हलक्या वाणिज्यिक वाहनांचे आघाडीचे निर्माता असलेल्या स्विच मोबिलिटी लि.ने आज आपल्या आधुनिक इलेक्ट्रिक बस SWITCH EiV12 – या भारतीय बाजारासाठीची लो-फ्लोर इलेक्ट्रिक सिटी बसचे अनावरण केले. ही भारतातील पहिली लो-फ्लोर सिटी बस आहे, ज्यामध्ये चॅसिस-माउंटेड बॅटरी असते आणि यामध्ये 400+ kWh पेक्षा जास्त क्षमता असलेल्या स्केलेबल बॅटरीची सुविधा आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे मान्यवर मंत्री श्री. नितिन गडकरी यांच्या हस्ते हे वाहन लाँच करण्यात आले. यावेळी हिंदुजा ग्रुप कंपन्यांचे अध्यक्ष अशोक पी. हिंदुजा, इतर मान्यवर आणि उद्योग क्षेत्रातील लीडर्सची उपस्थिती होती.

या प्रसंगी युरोपीयन बाजारासाठी डिझाइन केलेली SWITCH E1 ही बस व्हर्च्युअली झेंडा दाखवून लाँच केली गेली. या दोन्ही बसेस समान डिझाइन आणि EV आर्किटेक्चरनुसार तयार केलेल्या आहेत. 

विशेषतः शहरातील प्रवासासाठी डिझाइन केलेला SWITCH EiV12 प्लॅटफॉर्म स्वदेशी पद्धतीने डिझाइन, विकासित आणि निर्माण केला गेला आहे. ही बस प्रदर्शन, सुरक्षा, विश्वसनीयता आणि आराम यांमध्ये जागतिक मानकांची पूर्तता करते. 39 प्रवाशांपर्यंत आसन क्षमता असलेली SWITCH EiV12 आपल्या विभागामध्ये अग्रगण्य आहे, ज्यामुळे ऑपरेटरसाठी जास्तीतजास्त महसुलाची संधी उपलब्ध होते.

हिंदुजा ग्रुप ऑफ कंपनीज (भारत) चे अध्यक्ष श्रीअशोक पी. हिंदुजा यांनी या वाहनांचे लाँच करताना सांगितले की, “या बसेस पीएम मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया : अर्थात, भारतासाठी आणि जगासाठी भारतात बनविलेल्या वस्तू, या दृष्टिकोनाचा भाग आहेत. स्विच मोबिलिटी नवीन तंत्रज्ञान आणि शून्य कार्बन उत्सर्जन असलेली नवी वाहने लाँच करण्यासाठी प्रेरित झाली आहेत. हे सर्व भारतातील अद्वितीय रस्त्याच्या पायाभूत सुविधांमुळे शक्य झाले आहे. मोदीजी आणि गडकरीजींसारख्या दूरदृष्टी असलेल्या व्यक्तींमुळे आणि अंमलबजावणी करणाऱ्यांमुळे हे निर्माण होत आहे.”

स्विच मोबिलिटीचे अध्यक्ष श्रीधीरज हिंदुजा म्हणाले, “स्विच EiV12 च्या लाँचिंग आणि स्पेनसाठी स्विच E1 चे फ्लॅग-ऑफ करणे हा हिंदुजा ग्रुप आणि अशोक लेलँडसाठी गर्वाचा टप्पा आहे. कंपनीच्या टिकाऊ गतिशीलतेसाठीची वचनबद्धता यातून दिसून येते. EiV12 आणि E1 सोबत स्विच आपल्या जागतिक ऑफरिंग्सला विस्तारित करण्यासाठी नवीन उत्पादनांची श्रेणी विकसित करत आहे. स्विच मोबिलिटीमध्ये, आम्ही हरित भविष्याकडे मार्गक्रमण करत आहोत आणि संपूर्ण जगभर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे लोकशाहीकरण करण्याच्या आपल्या दीर्घकालीन दृष्टिकोनास पुढे नेत आहोत.”

स्विच मोबिलिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमहेश बाबू म्हणाले, “स्विच मोबिलिटीमध्ये आम्ही भारत आणि युरोपसाठी दोन नवीन उत्पादनांची घोषणा करताना उत्साहित आहोत, जे सर्वांगीण EV आर्किटेक्चरवर आधारित आहेत. अत्याधुनिक EV तंत्रज्ञानाचा उपयोग करून उच्च कार्यक्षमतेसह सुरक्षा आणि प्रवाशांच्या आरामाची गुणवत्ता या बस प्रदान करतात. आमची लो-फ्लोर इलेक्ट्रिक सिटी बस, जी ऊर्जा कार्यक्षमतेसाठी आणि प्रवेशयोग्यतेसाठी डिझाइन केलेली आहे, त्यासाठी 1,800 ऑर्डर्स प्राप्त झाल्या आहेत—हे स्विच मोबिलिटीच्या टिकाऊ शहरी परिवहन भविष्याची दृष्टिकोनात बाजारपेठेतील विश्वासाचे पुरावे आहेत.”

भारतातील इलेक्ट्रिक सिटी बस मार्केट 2030 पर्यंत 21% CAGR दराने वाढण्याची अपेक्षा आहे, ज्यात EV प्रवेश 70% पर्यंत होईल. इलेक्ट्रिक सिटी बसच्या एकूण पार्कची संख्या 2030 पर्यंत 70,000 युनिट्स ओलांडेल, असा अंदाज आहे.

SWITCH EiV12 ने प्रवासी आराम, सुरक्षा आणि तंत्रज्ञान यांमध्ये नवीन मानक सेट केले आहे, ज्यामुळे EV क्षेत्रातील चित्र पुन्हा आकारले आहे. त्याची लो-फ्लोर एंट्री आणि निलिंग मेकॅनिझम प्रवाशांसाठी सहज प्रवेश व निर्गमन सुनिश्चित करते, तर ऑटोमेटेड व्हीलचेअर रॅम्प आणि समर्पित जागा वेगळ्या क्षमतेच्या प्रवाशांसाठी उपलब्ध करतात. महिलांच्या सुरक्षा लक्षात ठेवून डिझाइन केलेले, यामध्ये 5 CCTV कॅमेरे आहेत, ज्यामुळे कोणतेही ब्लाइंड स्पॉट नाहीत आणि 5 समर्पित महिला सीट्स समाविष्ट आहेत. विस्तृत पॅनोरमिक ग्लास क्षेत्र, जे या सेगमेंटमधील सर्वात मोठे आहे, उत्तम दृश्यता, प्रकाशमान आतील भाग आणि सुधारित सुरक्षा प्रदान करते. SWITCH iON, आमच्या मालकीच्या टेलीमॅटिक्स सीस्टमद्वारे चालविलेले, SWITCH EiV12 वाहनाच्या आरोग्याचे रिअल-टाइम मॉनिटरिंग, ITMS आणि कार्यक्षम फ्लीट व्यवस्थापन प्रदान करते. त्याचे कार्यक्षम रियर-एंड ड्युअल-गन चार्जिंग इंटरफेस केवळ जलद रिचार्ज सुनिश्चित करत नाही, तर डिपो जागा ऑप्टिमाइज करते, तर IP67 रेट केलेली बॅटरी बसला पुरात बुडालेल्या रस्त्यांवर सहजतेने कार्य करण्याची क्षमता देते.

SWITCH E1, आमची नवकल्पना जी विशेषत: युरोपीय बाजारासाठी डिझाइन केली गेली आहे, ती अत्याधुनिक अभियांत्रिकीची उदाहरण आहे, ज्यामध्ये हलका मोनोकोक बांधकाम आहे, जे सर्वोत्तम कार्यक्षमतेसाठी आणि कामगिरीसाठी सुनिश्चित करते. SWITCH E1 मध्ये इन-व्हील मोटर्स आणि बसच्या संपूर्ण भागामध्ये फ्लॅट गँगवे लेआउट आहे, ज्यामुळे प्रवाशांसाठी निर्बाधा हालचाल व प्रवेशयोग्यता प्रदान केली जाते. त्याच्या ट्रिपल-डोर कॉन्फिगरेशन (फ्रंट, सेंट्रल आणि रियर) मुळे बस त्वरित चढाई व उतरणीसाठी अपूर्व सोय प्रदान करते, जी शहरी परिवहन प्रणालीसाठी परिपूर्ण आहे. 93 प्रवाशांना, स्टँडिंगसह, बस सामावून घेण्याची क्षमता असलेली SWITCH E1, टिकाऊ आणि प्रवाशी-केंद्रित सार्वजनिक परिवहनामध्ये नवीन मानक सेट करते.

पुन्हा नव्या अंदाजात CID … 21 डिसेंबर रोजी आणि दर शनिवारी आणि रविवारी रात्री 10 वाजता

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरून!

“CID हा भारतातील सर्वात जास्त काळ चाललेल्या TV शोज पैकी एक आहे, कारण, तो नेहमी काळाच्या पुढे असायचा”: CID मधील अभिनेता दयानंद शेट्टी

गुन्ह्याचा आणि गुन्हेगारांचा शोध घेणारा अत्यंत लोकप्रिय झालेला CID हा शो सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन वर 21 डिसेंबर 2024 पासून पुनरागमन करण्यास सज्ज आहे. दर शनिवारी आणि रविवारी रात्री 10 वाजता त्याचे प्रसारण करण्यात येईल. शिवाजी साटम (ACP प्रद्युमन), दयानंद शेट्टी (दया) आणि आदित्य श्रीवास्तव (अभिजीत) हे कलाकार पुन्हा एकदा त्याच्या गाजलेल्या भूमिकेत दिसणार आहेत. एका दिलखुलास मुलाखतीत या शोच्या पुनरागमनाबद्दल, पुन्हा प्रेक्षकांसमोर येण्याबद्दल असलेला रोमांच दयानंद शेट्टीच्या बोलण्यातून व्यक्त झाला. त्याने सांगितले की, नव्या सीझनमध्ये जुन्या आठवणींचे क्षण असतील आणि नवीन, वेधक केसिस व बरेच काही असेल.

CID परत येत आहे! इतक्या वर्षांनंतर पुन्हा दयाच्या भूमिकेत शिरताना कसे वाटते आहे?

फक्त मीच नाही, तर संपूर्ण टीम खूप रोमांचित आहे. आणि त्याहीपेक्षा आमच्या चाहत्यांचा उत्साह तर विचारुच नका! आम्ही 6 वर्षांनी परत येत आहोत. आमच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या, त्यांच्या भावना पाहिल्या की वाटते, हा शो आम्ही इतक्या लवकर बंद करायला नको होता. लोक या शो ला अजून फॉलो करतात, जुने एपिसोड आवडीने बघतात. लोक हा शो यूट्यूबवर, बसमध्ये किंवा टॅक्सीत बसूनही बघतात. असे वाटते की, त्यांचे केवळ या मालिकेशीच नाही, तर त्यातील व्यक्तिरेखांशीही एक नाते जडले आहे. त्यामुळे लोकांच्या आवडत्या दयाच्या रुपात परत येताना मला खूप आनंद होत आहे. हा दया आता CID च्या नवीन सीझनमध्ये बरेच दरवाजे तोडणार आहे.

इतकी वर्षे दयाची भूमिका करण्यातील सगळ्यात सुखद भाग काय आहे?

हा एक अद्भुत प्रवास आहे. यातला सगळ्यात आवडता भाग म्हणजे प्रेक्षकांकडून मिळालेले प्रेम. आम्ही कुठेही गेलो तरी असे कधी वाटलेच नाही, की आपला शो आता चालू नाही आहे. लोक सुरू असलेल्या मालिकांविषयी न बोलता CID विषयीच जास्त बोलत असत. हा शो अजूनही लोकांशी निगडीत आहे असे वाटायचे, जणू तो अजून चालूच असावा. याचे श्रेय प्रेक्षकांचे आहे. आमचे चाहते फारच निष्ठावंत आहेत. आजही काही चाहते माझा नंबर मिळवून मला व्हॉटस्अॅप मेसेज पाठवत असतात. मी सोशल मीडियावर फारसा सक्रिय नाही, पण लोक CID चे मीम्स शेअर करतात, त्यातल्या काही प्रसिद्ध संवादांविषयी बोलतात, हे मला माहीत आहे. त्यांचे प्रेम पाहून मी खरोखर भारावून जातो.

CID पुन्हा सुरू होत आहे, त्यामध्ये सगळ्यात जास्त आनंद तुला कशाबद्दल आहे? यावेळी तुमच्यासमोर काही आव्हाने आहेत का?

जेव्हा तुम्ही त्याच त्याच लोकांसोबत अनेक वर्षे काम करता, तेव्हा तुम्हाला एका कुटुंबासारखे वाटू लागते. त्यामुळे, माझ्यासाठी सगळ्यात आनंदाचा भाग हा आहे की, मला CID च्या टीमसोबत काम करण्याची संधी पुन्हा मिळणार आहे. यावेळी, आव्हान हे आहे की, लोकांनी पुन्हा प्रेमात पडावे असा शो आम्हाला सादर करायचा आहे. खास करून हा शो चालू नसताना त्यांनी आम्हाला जे प्रेम दिले आहे, त्यामुळे आता ही आमची जबाबदारी आहे. उदाहरणार्थ, CID चे संवाद खूप गाजले आहेत. यावेळी आम्ही संवाद लिहिण्याचे आणि ते बोलण्याचे काम करू पण ते किती गाजतात, हे तर लोकच ठरवतील. लोकांमुळेच त्यांची मीम्स बनतात किंवा ते रोजच्या संभाषणाचा भाग बनतात. उदाहरणार्थ, नुसते दार बघितले तरी लोकांना “दया, दरवाजा तोड दो!” हा संवाद आठवतो. त्यामुळे, हे आमच्या नियंत्रणात नाही. फक्त प्रेक्षकांचे प्रेम आणि त्यांची क्रिएटिव्हिटी यामुळेच हे संवाद जिवंत राहू शकतात. त्यांचे CID शी असलेले नातेच खास आहे, आणि त्यांच्यासाठी आम्ही परत येत आहोत, याचा आम्हाला आनंद आहे.

‘बाहुबली-कटप्पा’पेक्षा एक मोठे रहस्य हे आहे की, इंस्पेक्टर अभिजीतने दयाला का मारले?

इंस्पेक्टर अभिजीतने दयाला का मारले हे कोणालाच, चाहत्यांनाही माहीत नाही. सगळ्यांच्या मनात हा प्रश्न आहे. या गोष्टीमुळे लोकांना धक्का बसला होता आणि त्याचे उत्तर जाणून घेण्याचे कुतूहलही जागे झाले होते. पण, सगळ्या काहण्यांमध्ये कलटण्या असतातच ना! तुम्हाला 21 डिसेंबरलाच ते कळेल.

तुला हे पूर्वी कधी असे वाटले होते का की, CID मालिका इतकी गाजेल आणि मालिका बंद झाल्यावरही लोक तिची इतकी आठवण काढतील?

खरं सांगायचं तर, आम्ही जेव्हा पहिल्यांदा CID सुरू केली, तेव्हा आमच्यातल्या कोणालाच ही कल्पना नव्हती ही मालिका इतकी लोकप्रिय होईल आणि एकामागून एक दशके लोक या मालिकेवर प्रेम करतील. CID ने हा दर्जा मिळवला, त्याच्या मागे समस्त टीमचे परिश्रम आहेत- आमचे लेखक, दिग्दर्शक, सह-कलाकार आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आमच्या चाहत्यांनी दिलेले प्रेम. या गोष्टीचा मला अचंबा वाटतो की वेगवेगळ्या वयोगटातील, पिढ्यांमधील लोक अजूनही या मालिकेशी निगडीत आहेत. इतक्या लोकांसाठी ही मालिका इतकी जवळची झाली आहे हे पाहून मी भारावून जातो. अशा लोकप्रिय मालिकेत सहभागी असल्याची जाणीव मला नेहमीच आनंद देत राहील.

नवीन सीझनमध्ये प्रेक्षकांसाठी नवीन काय आहे? त्यात काही नवीन घटक आहेत की, तोच फॉरमॅट आहे?

आपण कितीही आधुनिक झालो, आपण कितीही प्रगती केली, तरी माणसांना एकमेकांशी जोडतात, त्यांना हेलावून सोडतात त्या भावनाच असतात. CID हा शो भारतात सर्वात जास्त काळ चाललेल्या मालिकांपैकी एक आहे, कारण तो पहिल्यापासून काळाच्या पुढे होता. फॉरेन्सिक सायन्ससारखी संकल्पना आम्ही दाखल केली होती, जी गोष्ट त्याआधी फारशी ज्ञात नव्हती. उदाहरणार्थ, 2004-05 मध्ये, एका भागात नार्को-अॅनालिसिस टेस्ट दाखवली होती. त्यावेळी, लोकांना असे वाटले होते की ही गोष्ट काल्पनिक आहे. एखाद्याला इंजेक्शन देऊन, त्याच्या डोक्याला इलेक्ट्रॉड जोडून तो माणूस खरं बोलत आहे की खोटं हे कसं काय कळू शकेल? पण आज, या पद्धती सगळ्यांना माहीत झाल्या आहेत. लोकांना माहीत नसलेली प्रगत टेक्नॉलॉजी दाखवून CID ने नेहमी पुढचे पाऊल टाकले आहे. आता यापुढे, आम्हाला आणखी नाविन्यपूर्णता आणावी लागेल. लोकांना कंटेंट आवडावा यासाठी नवीन संशोधने, प्रगती आणि वेधक गोष्टी आणाव्या लागतील. आणि त्याच बरोबर CID ची ओळख असलेला त्याचा गाभा तसाच जपावा लागेल. शेवटी, ही सुद्धा माणसांच्या नात्याचीच गोष्ट आहे. लोकांना अशा गोष्टी आवडतात, ज्यामध्ये भावना असतात, नाती असतात आणि नाट्य आणि विनोद यांचे हवहवेसे क्षण असतात. लोकांच्या पसंतीस उतरण्यासाठी एक असे पॅकेज असावे लागते, ज्यामध्ये इनोव्हेशन आणि मानवी भावनांचे आकर्षण यांचे सुंदर मिश्रण असेल.

CID चा प्रेक्षकवर्ग अत्यंत ईमानदार आहे. नवीन सीझनची वाट बघणाऱ्या प्रेक्षकांसाठी तू काय संदेश देशील?

इतकी वर्षे आमच्याशी निष्ठावान राहिलेल्या आमच्या सगळ्या चाहत्यांविषयी मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. प्रेक्षकहो, तुमचे प्रेम आणि निष्ठा हाच या मालिकेचा प्रेरणास्रोत आहे. मला माहीत आहे की, तुम्ही या मालिकेच्या नव्या सीझनची उत्सुकतेने वाट बघत आहात. मी तुम्हाला वचन देतो, तुम्ही केलेल्या प्रतीक्षेचे फळ तुम्हाला मिळेल. तुमचा उत्साह, तुमचे मेसेजिस आणि तुमचे समर्थन यामुळे इतकी वर्षे ही मालिका चालली आणि त्यानंतरही जिवंत राहिली. नवा सीझन देखील तसाच रोमांचक आणि मनोरंजक व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे आणि आम्हाला आशा आहे की, हा सीझन देखील तुमच्या जीवनात आनंद, रहस्य आणि न्याय भावना घेऊन येईल. CID तुमच्यामुळेच परत येत आहे!

-Sharad Lonkar

‘केन झुकरमन : लाईव्ह इन कॉन्सर्ट‌’ मंगळवारी

ऋत्विक फाऊंडेशन आणि डिपार्टमेंट ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍, मॉडर्न कॉलेजतर्फे संवादात्मक मैफलीचे आयोजन
सरोद वादक केन झुकरमन यांच्याशी अनुपम जोशी साधणार संवाद

पुणे : स्वित्झर्लंड येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सरोद वादक, ग्रॅमी नामांकनप्राप्त केन झुकरमन यांचे सरोद वादन आणि त्यांची प्रकट मुलाखत ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. केन झुकरमन हे भारतातील प्रसिद्ध सरोद वादनगुरू उस्ताद अली अकबर खान यांचे शिष्य आहेत.
ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍ आणि डिपार्टमेंट ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍, मॉर्डन कॉलेज कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‌‘केन झुकरमन : लाईव्ह इन कॉन्सर्ट‌’ या कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार, दि. 17 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता करण्यात आले आहे. कार्यक्रम शिवाजीनगर येथील डिपार्टमेंट ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍, मॉर्डन कॉलेज कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील भारतरत्न लता मंगेशकर सभागृहात होणार आहे, अशी माहिती ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍च्या समन्वयक श्रुती पोरवाल यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. केन झुकरमन यांच्याशी पुण्यातील सुप्रसिद्ध युवा सरोद वादक अनुपम जोशी संवाद साधणार आहेत. वादन मैफलीत केन झुकरमन यांना महेशराज साळुंके तबलासाथ करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
केन झुकरमन यांनी भारतातील प्रसिद्ध सरोद वादनगुरू उस्ताद अली अकबर खान यांच्या मार्गदर्शनाखाली 37 वर्षे सरोद वादनाचे प्रशिक्षण घेतले असून केन यांनी भारतासह युरोप, अमेरिका येथील अनेक सांगीतिक मैफलींमध्ये गुरू उस्ताद अली अकबर खान यांच्या समवेत सरोद वादन केले आहे. अतिशय प्रगत आणि प्रगल्भ वादक म्हणून ओळख असणाऱ्या केन झुकरमन यांनी सरोद आणि तानपुरा यांच्यामधील पारंपरिक गियर्ड ट्यूनर्सचे एकत्रिकरण, सरोद या वाद्याचा आवाज आणि गुणवत्ता वाढविणारी अनोखी संरचना केली आहे. तसेच ‌‘शांती‌’ नामक उपकरणाद्वारे स्वयंचलित एकध्वनिक तानपुऱ्याची रचनाही केली आहे. केन झुकरमन हे गेल्या 39 वर्षांपासून स्वित्झर्लंड येथील अली अकबर कॉलेज ऑफ म्युझिकचे संचालक असून उत्तर भारतीय शास्त्रीय संगीत आणि मध्ययुगीन संगीताचे प्रशिक्षण देत आहेत.
सरोद वादक अनुपम जोशी हे पंडित राजीव तारानाथ आणि पंडित तेजेंद्र नारायण मजुमदार यांचे शिष्य असून केन झुकरमन यांचेही त्यांना मार्गदर्शन लाभत आहे. अनुपम यांनी रुद्रवीणेच्या स्वरांजवळ जाणाऱ्या अनुमोहिनी वीणा या वाद्याची निर्मिती केली आहे. युवा पिढीतील तबलावादक महेशराज साळुंके यांनी पंडित उमेश मोघे तसेच पंडित नयन घोष यांच्याकडून तबला वादनाचे शिक्षण घेतले असून त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांना तबला साथ केली आहे.

महेश बाल भवन मध्ये अनोखा बाल मेळावा उपक्रम संपन्न

पुणे-समाजात वंचित मुलांना सुजाण नागरिक घडवण्यासाठी पुण्यातील कोथरूड येथी महेश बाल भवनने अनोखा उपक्रम राबवला आहे . आपल्यापेक्षा खालच्या वर्गाला कसे पुढे घेऊन जायचे आणि त्यांचा विकास कसा साधायचा या हेतूने छोटासा वस्तुपाठ मुलांना मिळावा म्हणून एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

समाजात वावरताना आणि आपल्या आयुष्याची जडण घडण होत असताना उच्य मध्यमवर्गीय मुलं याना मिळणाऱ्या चांगल्या सुविधा यातून होणार त्यांचा विकास हा उद्देश ठेवून सामाजितल गरीब ,वंचित , अडचणीत असणाऱ्या मुलांना जीवनाचा आनंद लुटता यावा म्हणून बाल दिनाच्या निमित्ताने महेश बाल भवन ने उच्य मध्यमवर्गीय लहान मुलामध्ये विज्ञान प्रयोग खेळ आणि संस्कार या माध्यमातून हा अनोखा बाल मेळावा उपक्रम राबवला आहे .

या उपक्रमात बालसाहित्यकार राजीव तांबे ,बालकर्मी माधुरी सहस्रबुद्धे ,प्रीती लाठी ,अरुण भराडिया ,संदीप सारडा तसेच महेश बाल भवन च्या संचालिका सुरेखा करवा , उपसंचालिका संगीत पिंपळीकर ,आणि इतर महिला प्राध्यापक वर्ग उपस्थित होता .

यामध्ये पुणे शहरातील ९ वेगवेगळी बालभवन आणि ९ वंचित विकास संस्थांनी एकत्र येऊन या मेळाव्याचे आयोजन केले होते . यामध्ये मुलांनी मुक्त खेळ ,चित्रकला ,हस्तकला ,प्रेरणा दायक चित्रपट ,गाणी ,नृत्य या द्वारे मनसोक्त आनंद लुटला .