Home Blog Page 54

दिल्लीत गुरुग्रामच्या कारमध्ये स्फोट:कार मालक घरात मालक झोपलेला आढळला, म्हणाला- दीड वर्षांपूर्वी गाडी विकली

0

लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाल्यानंतर दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. स्फोट झालेल्या i-20 कारचा हरियाणा नोंदणी क्रमांक (HR 26-CE 7674) होता. ही कार गुरुग्राम आरटीओमध्ये मोहम्मद सलमानच्या नावाने नोंदणीकृत आहे.

गाडीच्या नोंदणी प्रमाणपत्रावर दिलेल्या पत्त्यावरून, गुरुग्राम पोलिसांनी शांती नगरमध्ये त्याचा शोध घेतला. तिथल्या घरमालकाने त्यांना सांगितले की सलमानने पाच वर्षांपूर्वी घर सोडले आहे. तो आता सोहना येथील एका सोसायटीत राहतो. रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांनी दार ठोठावले तेव्हा सलमानच्या मुलीने उत्तर दिले. विचारणा केल्यावर तिने सांगितले की सलमान आत झोपला आहे.पोलिस आल्यावर त्यांना सलमान झोपलेला आढळला. चौकशीदरम्यान त्याने सांगितले की त्याने दीड वर्षांपूर्वी गाडी विकली होती. पोलिसांनी सलमानला गाडीबद्दल विचारले असता त्याने सांगितले की त्याने ती दीड वर्षांपूर्वी विकली होती. त्याने खरेदी-विक्रीशी संबंधित कागदपत्रेही दाखवली. तथापि, पुढे गाडी कोणाची होती हे अद्याप निश्चित झालेले नाही.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानने ही कार नदीम नावाच्या व्यक्तीकडून खरेदी केली होती. त्यानंतर त्याने ती ओखला येथील देवेंद्रला विकली. देवेंद्रनेही काही काळापूर्वी ही कार अंबाला येथील एका गॅरेजमध्ये विकली होती. तिथून ती कोणी खरेदी केली याचा तपास पोलिस करत आहेत.सलमानने ही कार नदीम नावाच्या व्यक्तीकडून खरेदी केली होती. त्यानंतर त्याने ती ओखला येथील देवेंद्रला विकली. देवेंद्रनेही काही काळापूर्वी ही कार अंबाला येथील एका गॅरेजमध्ये विकली होती. तिथून ती कोणी खरेदी केली याचा तपास पोलिस करत आहेत.

शिवसेनेच्या चिन्हावर निर्णायक लढत:सर्वोच्च न्यायालयात उद्या अंतिम सुनावणी

मुंबई-शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या चिन्हा वरून सुरू असलेला राजकीय आणि कायदेशीर वाद आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालय बुधवारी या प्रकरणावर अंतिम सुनावणी घेणार असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या ऐतिहासिक खटल्याकडे लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह वापरण्याची परवानगी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली होती. मात्र, या निर्णयाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आता सर्वोच्च न्यायालय या याचिकेवर अंतिम निर्णय देणार असल्याने राज्याच्या राजकारणात मोठे बदल घडू शकतात.

न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठासमोर बुधवारी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. न्यायालयात उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेली मूळ याचिका आणि त्यासोबत सादर केलेले अंतरिम अर्ज यावर सुनावणी होईल. 12 नोव्हेंबरच्या कामकाज यादीप्रमाणे, या खटल्याला आयटम नंबर 19 वर स्थान देण्यात आले आहे. पक्षचिन्ह आणि अपात्रता या दोन्ही मुद्द्यांवरील याचिका एकत्र ऐकली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीदरम्यान अनेक संवैधानिक आणि राजकीय प्रश्नांवर चर्चा होणार असल्याचे दिसून येत आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने 2022 मध्ये दिलेल्या निर्णयानुसार, शिवसेनेच्या नावाचा आणि धनुष्यबाण चिन्हाचा वापर करण्याचा अधिकार एकनाथ शिंदे गटाला देण्यात आला होता. या निर्णयाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भुकंप निर्माण केला. उद्धव ठाकरे गटाने हा निर्णय असंवैधानिक आणि पक्षपाती असल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले. याचिकेत म्हटले आहे की, मूळ शिवसेना पक्षाची स्थापना आणि कार्यसंघटना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चालू होती. त्यामुळे पक्षाच्या चिन्हावर आणि नावावर हक्क हा त्यांच्या गटाचा आहे, असे उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे, शिंदे गटाने आयोगाचा निर्णय योग्य असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते, बहुसंख्य आमदार आणि खासदार शिंदे यांच्या बाजूने असल्याने, मूळ पक्षाचे प्रतिनिधित्व त्यांचा गटच करतो. त्यामुळे निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय संवैधानिक तरतुदींनुसारच असल्याचे शिंदे गटाचे म्हणणे आहे. या वादामुळे दोन्ही गटांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून तीव्र संघर्ष सुरू आहे. महाराष्ट्रातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी या निर्णयाचा मोठा राजकीय परिणाम होऊ शकतो.

धर्मेंद्र यांच्या मृत्यूचे वृत्त खोटे,प्रकृती स्थिर असल्याचे हेमामालिनी आणि ईशा देओल यांनी म्हटले ..

0

अभिनेते धर्मेंद्र (८९) यांच्या मृत्यूचे वृत्त हेमामालिनी आणि ईशा देओल यांनी फेटाळून लावले आहे.हे वृत्त खोटे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर हेमा मालिनी यांनीही नाराजी व्यक्त केली आणि लिहिले-
जे घडत आहे ते अक्षम्य आहे. जबाबदार चॅनेल्स उपचारांना प्रतिसाद देत असलेल्या आणि बरे होणाऱ्या व्यक्तीबद्दल खोट्या बातम्या कशा पसरवू शकतात? हे अत्यंत अनादरपूर्ण आणि बेजबाबदार वर्तन आहे. कृपया कुटुंबाचा आणि त्यांच्या गोपनीयतेच्या गरजेचा आदर करा.

सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ईशा म्हणाली:
“मीडिया पूर्णपणे खोट्या बातम्या पसरवत आहे. पप्पांची प्रकृती स्थिर आहे आणि ते बरे होत आहेत. आम्ही सर्वांना विनंती करतो की त्यांनी आमच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करावा. पप्पांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल धन्यवाद.”

सोमवारी (१० नोव्हेंबर) धर्मेंद्र यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांची प्रकृती स्थिर न झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पुढील ७२ तास त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.देओल कुटुंबाच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांच्या मुलींना परदेशातून मुंबईत बोलावण्यात आले आहे. काल रात्री सनी देओल रुग्णालयाबाहेर खूप भावनिक झाल्याचे दिसून आले, तर बॉबी देओल देखील ‘अल्फा’ चित्रपटाचे शूटिंग आटोपून मुंबईत परतले आणि ते आपल्या वडिलांना भेटले. सोमवारी रात्री उशिरा शाहरुख खान आणि सलमान खानसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचले.

दिल्ली बॉम्बस्फोटापूर्वीचे CCTV फुटेज:कारमधील व्यक्ती दहशतवादी डॉ. उमर असल्याचा संशय; आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू, 24 जण जखमी

0

सोमवारी संध्याकाळी ६.५२ वाजता दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ एका चालत्या कारमध्ये स्फोट झाला. आतापर्यंत २ महिलांसह ९ जणांचा मृत्यू झाला आहे आणि २४ जण जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी स्फोटापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये पार्किंगमधून एक पांढऱ्या रंगाची आय-२० कार बाहेर पडताना दिसत आहे. दहशतवादी डॉ. मोहम्मद उमर त्यात असल्याचा संशय आहे.

पोलिसांचे म्हणणे आहे की उमर फरिदाबाद मॉड्यूलचा भाग असू शकतो. अलीकडेच, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी हरियाणातील फरिदाबाद ते लखनऊ येथे ऑपरेशन केले आणि २९०० किलो स्फोटके (संशयित अमोनियम नायट्रेट) जप्त केली. या कारवाईत फरिदाबाद येथील डॉ. मुझम्मिल शकील आणि लखनऊ येथील डॉक्टर शाहीन शाहिद यांना अटक करण्यात आली आहे.

मृतांचे वय २१ ते ५८ वर्षे होते. दोन मृतदेहांची ओळख पटली आहे. काही जण गंभीरपणे जळाले होते किंवा त्यांचे मृतदेह परिसरात पसरलेले होते. कारच्या मागील बाजूस स्फोट झाला आणि त्याचा आवाज एक किलोमीटरपर्यंत ऐकू आला. स्फोटात जवळपासच्या सहा कार, दोन ई-रिक्षा आणि एक ऑटो-रिक्षा जळाल्या.

पोलिसांच्या माहितीनुसार, स्फोट झालेल्या कारमध्ये तीन जण होते. ही कार हरियाणातील गुरुग्राममध्ये सलमानच्या नावावर नोंदणीकृत होती. पोलिसांनी सलमानला ताब्यात घेतले आहे. सलमानने ही कार पुलवामा येथील तारिकला विकली होती. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

सुरक्षा संस्थांनी आत्मघातकी हल्ल्याच्या दृष्टिकोनातूनही तपास सुरू केला आहे. घटनास्थळी आरडीएक्सचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. दिल्ली आणि मुंबईसह सर्व प्रमुख शहरे आणि राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. राजधानीत शेवटचा मोठा बॉम्बस्फोट ७ सप्टेंबर २०११ रोजी झाला होता, ज्यामध्ये ११ लोक मृत्युमुखी पडले होते.

काँग्रेसची मनसेसोबत आघाडीला ठाम नकार:ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांचा स्पष्ट इशारा, कोणत्याही परिस्थितीत मनसेबरोबर जाणार नाही

संगमनेर-आगामी मुंबई महापालिका तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अशातच काँग्रेसकडून मोठा राजकीय संदेश देण्यात आला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर, आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही स्पष्ट भूमिका मांडली आहे. काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत जाणार नाही, असे थोरात यांनी ठामपणे सांगितले. त्यामुळे मनसेसोबत संभाव्य आघाडीच्या चर्चेला पूर्णविराम लागल्याचं स्पष्ट दिसत आहे.

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. यावेळी, संगमनेर येथील त्यांच्या कार्यालयात बंद दाराआड चर्चा झाली. या बैठकीत थोरात यांनी कार्यकर्त्यांशी मनमोकळ्या गप्पा मारत अनेक गैरसमज दूर केले. मी नगर आणि नाशिक वेगळं मानत नाही, त्यामुळे कार्यकर्ते माझ्याकडे येत असतात. नाशिक येथे झालेल्या बैठकीत सीपीआयच्या प्रतिनिधींनी मला आमंत्रण दिलं होतं. तिथे कोण कोण उपस्थित राहणार आहे, हे मला माहीत नव्हतं, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. माध्यमांमध्ये झालेल्या चर्चेबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं की, मीडियाने वेगळा अर्थ लावू नये. हर्षवर्धन सपकाळ हे आमचे प्रांत अध्यक्ष आहेत, आम्ही नेहमीच एकत्र काम केलं आहे आणि पुढेही करत राहू.

बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट सांगितलं की, काँग्रेसचा निर्णय ठाम आहे, मनसेबरोबर कोणतीही आघाडी होणार नाही. त्यांच्या या वक्तव्याने काँग्रेसची निवडणूक रणनीती अधिक स्पष्ट झाली आहे. गेल्या काही दिवसांत मनसे आणि काँग्रेसच्या संभाव्य सहकार्याबाबत अफवा पसरल्या होत्या. मात्र, थोरात यांच्या भूमिकेमुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेस मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचं संकेत आता अधिक ठळकपणे मिळत आहेत.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयावर आंबेडकरी कार्यकर्त्यांचा मोर्चा

पुणे- केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या कार्यालयावर आंबेडकरी संघटनांनी मोर्चा काढला . ‘राज्याचं सरकार हे आंबेडकरी समाजाची फसवणूक करतंय’, असा थेट आरोप आंदोलकांनी केला आहे. पुणे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे (Ambedkar Sanskrutik Bhavan) विस्तारीकरण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. ही जागा एका खाजगी बिल्डरच्या कंपनीला दिल्याचा आरोप करत, ‘ही जागा आमची आहे’ अशा आशयाचे फलक घेऊन आंदोलकांनी मोहोळ यांच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडला. पोलिसांनी आंदोलकांना अडवले, या प्रश्नी तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ स्फोट, 8 जणांचा मृत्यू:

0

दिल्ली- सोमवारी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका कारचा अचानक स्फोट झाला. आग इतक्या वेगाने पसरली की जवळच उभ्या असलेल्या तीन कारही जळून खाक झाल्या.या अपघातात एकाचा मृत्यू झाला. स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की स्फोटाचे कारण तपासले जात आहे.पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी उपस्थित आहे. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बाणेर मध्ये’फार्म कॅफे’ शेतातल्या हुक्का बारवर छापा

पुणे- बाणेर येथे अनाधिकृतपणे शेतात चालु असलेल्या हुक्का बारवर कारवाई करुन पोलिसांनी ४८६५०/-रु. किं.चा मुददेमाल केला जप्त केला . आणि जागा मालक याच्यासह ५ जणांवर गुन्हा दाखल केला .
चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर हद्दीमध्ये दिनांक ०८/११/२०२५ रोजीचे कॉम्बींग ऑपरेशन मोहिमेदरम्यान तपास पथक मधील स्टाफ व पोलीस अधिकारी यांना माहिती मिळाली की, फार्म कॅफे, सर्वे नं.२२४, औंध बाणेर लिंक रोड, बाणेर पुणे ४५ येथील शेतामध्ये अनाधिकृतपणे हुक्का बार चालु आहे त्यामुळे त्यांनी या ठिकाणी जावुन मिळालेल्या बातमीची खात्री करुन सदर ठिकाणी छापा टाकला . या कॅफेमध्ये ग्राहकांना धुम्रपानासाठी अवैधरीत्या तंबाखुजन्य हुक्का पुरवुन व जवळ बाळगुन हुक्का बार चालवित असताना मिळुन आल्याने एकुण ५ आरोपी विरुध्द त्यामध्ये जागा मालक व मॅनेजर व कामगार यांचेविरुध्द चतुः श्रृंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर, गु.र.नं.४४७/२०२५, सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम- २०१८ चे कलम ४ (अ), २१ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्यामध्ये २० हुक्का पॉट, तबाखुजन्य हुक्का फलेवर व इतर साहित्य असा एकुण-४८,६५०/-रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. तसेच दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा सहा. पो. निरीक्षक अनिकेत पोट चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर हे करीत आहेत.
तसेच सदरची कामगिरी ही अपर पोलीस आयुक्त,मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ४ पुणे शहर सोमय मुंडे, सहा. पोलीस आयुक्त, विठठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती आश्विनी ननावरे, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी, सहा.पो.निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार बाबासाहेब दांगडे, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, बाबुलाल तांदळे, वाघेश कांबळे, तुषार गिरंगे यांनी केली आहे.

३ दिवसात पोलिसांनी पकडले २५० मद्यपी वाहनचालक

पुणे -शहरपोलीस उपायुक्त कार्यालय वाहतूक शाखेने मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहिम हाती घेऊन ३ दिवसात अडीचशे मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांन पकडले आणि त्यांच्यावर कारवाई केली .

पुणे शहर वाहतूक विभागामार्फत दिनांक ७, ८ व ९ नोव्हेंबर २०२५ या तीन दिवसांच्या कालावधीत मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध विशेष कारवाई मोहिम राबविण्यात आली.या कालावधीत वाहतूक पोलिसांनी शहरातील प्रमुख चौक, मार्ग व गर्दीच्या ठिकाणी नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी केली. या विशेष मोहिमेत २५० वाहनचालक मद्यपान करून वाहन चालवत असल्याचे आढळून आले.संबंधित सर्व वाहनचालकांवर मोटार वाहन अधिनियम, १९८८ मधील कलम १८५ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, त्यावरील पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे कि,’मद्यपान केल्यानंतर कोणत्याही प्रकारचे वाहन चालवू नये.स्वतःची तसेच इतर नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे.जबाबदार नागरिक म्हणून सुरक्षित वाहतूक संस्कृती जोपासावी.पुणे शहर वाहतूक विभागाकडून अशा विशेष मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार आहेत, जेणेकरून रस्ते अपघातांचे प्रमाण कमी व्हावे आणि सर्वांसाठी सुरक्षित वाहतूक वातावरण निर्माण व्हावे.

‘वर्षा’ बंगल्यावर धडक…मरीन ड्राईव्हवर रास्ता रोको, गिरगाव चौपाटीवर आंदोलन-डॉ. संपदा मुंडेंना न्याय देण्याच्या मागणीसाठी युवक काँग्रेस आक्रमक.

मुंबई, दि. १० नोव्हेंबर २०२५

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी युवक काँग्रेसने मुंबईत आज तीव्र आंदोलन केले. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर थेट धडक दिली. नरीमन पॉइंट, मरीन ड्राईव्ह व वर्षा बंगला अशा तीन ठिकाणी युवक काँग्रेसने आंदोलन करून भाजपा महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस व मुंबई युवक काँग्रेसने आयोजित केलेल्या या आंदोलनात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदन भानू चिब, युवक काँग्रेसचे प्रभारी मनिष शर्मा, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे, मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष झीनत शबरीन, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश शर्मा, वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत, युवक काँग्रेसचे प्रभारी अजय चिकारा यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

गिरगाव चौपाटी येथून सुरु झालेले आंदोलन थेट वर्षा बंगल्यावर पोहचले. युवक काँग्रेसचे आंदोलन दडपून टाकण्यासाठी सरकारने पोलिसांच्या मदतीने प्रयत्न केला. अनेक कार्यकर्त्यांना चर्नी रोड स्थानकात अडवून ठेवले. गिरगाव चौपाटी भागातही ठिकठिकाणी बॅरिकेटींग करून कार्यकर्त्यांची धरपकड केली. पण आक्रमक कार्यकर्त्यांनी वानखेडे स्टेडियमजवळ मरिन ड्रायव्हवरच रास्ता रोको केला, यामुळे जवळपास अर्धा तास वाहतुक ठप्प झाली होती. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले पण युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तन्वीर अहमद विद्रोही, लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रविणकुमार बिराजदार आणि नागपूर ग्रामीण जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मिथिलेश कान्हेरे यांनी मात्र पोलिसांना गुंगारा देऊन वर्षा बंगल्यावर धडक मारली व जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यासह सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना ताब्यात घेतले.

डॉ. संपदा मुंडे यांना भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व पोलीसांच्या अनन्वित छळाला कंटाळून आत्महत्या करावी लागली. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असली तरी यामागचा मुख्य सुत्रधार भाजपाचा माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर मात्र अद्याप मोकाटच आहे. मुख्यमंत्र्यांनी तर निंबाळकरांना कोणत्याही चौकशी आधीच क्लिन चिट देऊन टाकली आहे. काँग्रेस पक्षाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुंडे कुटुंबियांना दिली आहे. सरकार चौकशीच्या नावाखाली मुख्य आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, पण जोपर्यंत संपदा मुंडे यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत काँग्रेसचा हा लढा सुरुच राहील.

लिफ्टमध्ये अडकलेल्या जखमी महिलेला मदत न केल्याने पोलिसांनी मॉल प्रशासनाविरुद्ध केला गुन्हा दाखल

0

पुणे-गणेशखिंड रोडवरील एका मॉलमधील लिफ्टमध्ये अडकलेल्या जखमी महिलेला मदत न केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी सेंट्रो मॉलच्या प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शिवाजीनगर येथील एका ५५ वर्षाच्या महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सतप्रित आवस्थी, परवेंदर कुमार, पराग हार्डे, अभिजित कोल्हटकर या मॉलचे प्रशासकीय अधिकारी  व लिफ्टची देखभाल करणार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सेंट्रो मॉलमध्ये १२ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ६ ते ९ वाजेच्या दरम्यान घडला होता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजीनगर येथे राहणार्‍या महिला त्यांच्या दोन नातेवाईकांसह दिवाळीनिमित्त खरेदीसाठी गणेशखिंड रोडवरील सेंट्रो मॉलमध्ये गेल्या होत्या.  लिफ्टमधून जात असताना अचानक लिफ्ट बंद पडली. महिला आणि नातेवाईक लिफ्टमध्ये अडकले. त्यांनी लिफ्टमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा महिलेबरोबर असलेल्या एका नातेवाईकाने लिफ्टच्या काचेवर हात मारला. काचेचा तुकडा उडल्याने महिलेच्या कपाळाला जखम झाली. महिला जखमी झाल्यानंतर लिफ्टची देखभाल करणारे कर्मचारी आणि मॉलच्या प्रशासन विभागातील अधिकारी, कर्मचारी तेथे आले नाही, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.निष्काळजीपणा, तसेच हयगयीचे कृत्य केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

शाहू वसाहती’चाआता स्वयंपुनर्विकास होणार !उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून’ एसआरए’ला स्थगिती, नागरिकांना दिलासा

पुणे-
ज्यावेळी नागरीक एकत्र येतात आणि लढा देतात, त्यावेळी यश कसे मिळते याचा प्रत्यय पर्वतीमधील शाहू वसाहतीच्या झोपडपट्टी पुनर्वसनाला थेट उपमुख्यमंत्री व गृहनिर्माणमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिल्याने आला आहे. आता ‘शाहू वसाहती’ची एसआरए रद्द आणि स्वयंपुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाल्याची प्रतिक्रिया अखिल शाहू वसाहती मार्फत देण्यात आली.

याबाबत अधिक माहिती देताना अखिल शाहू वसाहत बचाव कृती समितीचे कार्तिक ढमढेरे म्हणाले की, पर्वती येथील स. नं. ९२ पैकी फायनल प्लॉट नं. पै. व स. नं. ९३ पैकी फायनल प्लॉट न. ५११ पैकी ५११ अ . पै. ५११ ब पै.येथे गेल्या पन्नास वर्षांहून अधिक नागरिक वास्तव्यास असून येथील घरे ही पक्की स्वरूपाची असून दुमजली आहेत. मात्र एका बिल्डर्ससाठी एसआरए स्कीम राबविण्यासाठी झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणाचे अधिकाऱ्यांनी बेकायदेशीररीत्या झोपडपट्टी पुनर्वसन योज़ना राबविण्याचा घाट घातला. त्यासाठी बिल्डर्सचे लोक आणि संबंधित अधिकारी यांच्या संगनमताने आम्हा रहिवाशांना धमकाविण्याचे प्रकार वारंवार झाले. आमचा येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला विरोध आहे,आणि आम्ही तसे स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेले असताना अधिकारीवर्ग संबंधित बिल्डर्सचा स्वार्थ आणि टीडीआरमधील भ्रष्टाचारासाठी दहशतीचे वातावरण निर्माण करून आम्हाला येथील एसआरए योजनेत सामील होण्यासाठी भाग पाडण्याचे कारस्थान करीत होते. इतकेच नाहीतर संबंधित बिल्डर्स / विकसक आणि अधिकाऱ्यांनी येथील रहिवाशांचा एसआरए योजनेत समावेशाबाबत खोट्या सह्या दाखविल्या. त्यामुळे अखिल शाहू वसाहतीचे सर्व नागरिकांनी एसआरएला तीव्र विरोध दर्शवत लढा उभारला. सामाजिक कार्यकर्ते हेमंत बागुल यांनी पाठिंबा देत शासनदरबारी दाद मागण्यासाठी नेहमीच मार्गदर्शन केले. त्यानुसार उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नागरिकांच्या व्यथा मांडताना दाद मागितली.त्यावर तत्परने सर्व बाबी तपासून शाहू वसाहतीमधील नागरिकांवर अन्याय होणार नसल्याची ग्वाही देत उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘ एसआरए’ला स्थगिती दिल्याचे आदेश काढल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आता आम्हीच ‘शाहू वसाहती’चा स्वयंपुनर्विकास करणार असल्याचे अखिल शाहू वसाहत बचाव समितीने स्पष्ट केले.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून विभागनिहाय प्रभा-यांची नियुक्ती

ज्येष्ठ नेत्यांवर विभागीय प्रभारी म्हणून जबाबदारी

मुंबई दि. १० नोव्हेंबर २०२५

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने या निवडणुकांची जोरदार तयारी सुरु केली असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्येष्ठ नेत्यांची विभागीय प्रभारी म्हणून नियुक्ती आहे.

नागपूर विभागाची जबाबदारी विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वड्डेटीवार यांच्याकडे, पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्याकडे सोपवली आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र, अॅड. यशोमती ठाकूर यांच्याकडे अमरावती विभागाची, मराठवाडा प्रभारी म्हणून माजी मंत्री आ. अमित देशमुख यांची तर कोकण विभाग प्रभारी म्हणून माजी मंत्री काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांनी दिली आहे.

पार्थ पवार जमीन घोटाळा :हिंमत असेल तर तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वात चौकशी करा, नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी चौकशी केली जाणार आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात चौकशी समिती गठित करावी, असे आव्हान कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी केले आहे.नाना पटोले म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी विकास खरगेंच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली आहे. या पद्धतीच्या चौकशीचा आणि कमिटीचा फार्स करून जनतेची जी दिशाभूल चाललेली आहे. महाराष्ट्र रोज लुटण्याचे काम सुरू आहे. तुमच्यात खरोखरच हिंमत असेल आणि दूध का दूध, पाणी का पाणी करायचे असेल तर तुकाराम मुंढेंच्या अध्यक्षतेखाली कमिटी बसवा, असे आव्हान केले आहे.

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, पार्थ पवारांच्या 1800 कोटींच्या जमीन घोटाळ्यात औद्योगिक नवीन धोरण आणायचे आणि स्टॅम्प ड्युटी वाचवण्याचे धोरण ही फक्त एक पद्धत आहे. मुंबई आणि बीकेसी मधील 500 एकर पेक्षा अधिक जमीन, सी लिंकच्या बाजूची जमीन, रस्ते विकास महामंडळाची जमीन, या सगळ्या जमिनी कशा आणि काय भावाने दिल्या? नवी मुंबईचे मार्केट यार्ड होते, ती जमीन मोदीजींच्या मित्रांना आयटी पार्कच्या नावाने देण्यात आली. असे सगळे सुरू असताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की ही गंभीर बाब आहे.महाराष्ट्रात अशा अनेक प्रकारच्या जमीन घोटाळ्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्याची चौकशी बसवण्याची गरज नाही, ते कागदावरच स्पष्ट होते. शासन तुम्ही चालवत आहात, सरकार तुम्ही चालवत आहात, अशा वेळेस चौकशी बसवायची गरजच काय? असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यातील मुंढव्यातील 1800 कोटींची जमीन 300 कोटींमध्ये लाटण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी असलेली 21 कोटींची स्टँप ड्युटीही भरली नाही. हे प्रकरण समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अतिरिक्त मुख्य सचिव विकास खरगे यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन केली आहे. यावरून नाना पटोले यांनी टीका केली आहे.

बकवास बंद करा, उत्तर द्या!:आरएसएस रजिस्टर्ड आहे का? निधी कुठून येतो? प्रकाश आंबेडकरांचा संघावर हल्लाबोल

जालना -वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयं सेवक संघावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत संघाला उद्देशून तीन प्रश्न उपस्थित केले आहेत. आरएसएस रजिस्टर्ड संस्था आहे का? नसेल, तर इतके फंडिंग कसे काय मिळत आहे? तसेच संघाने भारतीय तिरंगा स्वीकारला नव्हता, हे खरे आहे की खोटे? असा सवाल आंबेडकरांनी उपस्थित केला आहे.

प्रकाश आंबेडकरांनी ट्विट करत म्हटले की, इकडची तिकडची बकवास बंद करा आणि माझ्या तीन प्रश्नांचे उत्तर द्या. आरएसएस ही नोंदणीकृत संघटना आहे का? जर ती नोंदणीकृत नसेल, तर तिला कोट्यवधी रुपयांचा निधी कसा मिळत आहे? हे खरे नाही का की आरएसएसने भारतीय ध्वज स्वीकारला नाही? हे खरे नाही का की आरएसएसने अनेक दशकांपासून नागपूर येथील मुख्यालयात तिरंगा फडकवला नाही? हे खरे नाही का की गोळवलकर आणि सावरकर यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले समतावादी, लोकशाहीवादी आणि धर्मनिरपेक्ष संविधान नाकारले आणि मनुस्मृतीला संविधान बनवण्याची मागणी केली? असे प्रश्न आंबेडकरांनी उपस्थित केले आहेत.

वंचित बहुजन आघाडी आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते आता आरएसएस आणि मनुवादी शक्तींना तोंड देण्यासाठी एकत्र आले आहेत. तुम्ही आणि तुमच्या अर्ध्या अंतर्वस्त्रांच्या टोळीने एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, आपला देश मनुस्मृतीने नव्हे तर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाने चालेल, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आज प्रकाश आंबेडकर यांची जालना येथे जाहीर सभा झाली. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. आज धर्म नव्हे तर ओबीसी धोक्यात आहेत. ओबीसी सत्ताधारी झाल्याशिवाय आरक्षण वाचणार नाही. ओबीसींच्या राजकीय लढ्याला सुरुवात झाली आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. जालना येथे जाहीर सभेत ते बोलते होते. जरांगे मुंबईत ठिय्या मांडून बसले आणि कॉंग्रेस, भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचे 190 आमदार जरांगेंच्या दर्शनाला गेले. हेच आमदार देवेंद्र फडणवीस यांना भेरले तशी फडणवीस यांची भाषा बदलली, अशी टीका आंबेडकरांनी केली आहे.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, जे आमदार जरांगे यांना भेटले तेच आमदार जरांगे काय म्हणतात ते ऐकण्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांना सल्ला दिला आणि कुणबी प्रमाणपत्राचा जीआर निघाल, असा आरोप आंबेडकरांनी केला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस हा जीआर रद्द करणार आहेत का? असा सवालही त्यांनी विचारला आहे.

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने प्रकाश आंबेडकर म्हणाले, ओबीसींनी मोठ्या प्रमाणात आपले उमेदवार जाहीर केले पाहिजेत. प्रत्येक मतदारसंघामध्ये एक तरी ओबीसी मतदार असायला हवा. काही मतदारसंघ एससी प्रवर्गासाठी राखीव आहेत. काही मतदारसंघ एसटीसाठी राखीव आहेत. एसी आणि एसटी हा वर्ग आरक्षणवादी आहे. हे लक्षात घ्यायला हवे. जे लोक आरक्षणवादी आहेत, त्यांनाच मतदान करायला हवे. आपल मत हे ओबीसीला, आपले मत हे एसटीला असायला हवे, असे आवाहन आंबेडकरांनी केले आहे.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, धर्म नाही तर ओबीसी संकटात आला आहे. ओबीसी सत्ताधारी झाल्याशिवाय आरक्षण वाचणार नाही. ओबीसी नेत्यांच्या नाड्या तिसऱ्याच्या हातामध्ये आहेत. कळसूत्री बाहुल्याप्रमाणे हे ओबीसी नेते नाचवले जात आहेत, असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी ओबीसींनी राजकारणात उतरावे, असेही आवाहन केले आहे.