Home Blog Page 527

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा.

प्रदेश काँग्रेसकडून राज्यभर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा’चे आयोजन.

मुंबई, दि. २४ डिसेंबर २०२४
राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भाजपा नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अपमान केल्याने देशभर संताप व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानप्रकरणी अमित शाह यांनी देशाची माफी मागावी तसेच त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आज राज्यभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा काढून भाजपा व अमित शाह यांच्याविरोधात तीव्र आंदोलन केले.

लातूरमध्ये माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोटार सायकल रॅली काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. नांदेडमध्ये शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीने खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, शहराध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले.
चंद्रपूरमध्ये खासदार प्रतिभाताई धानोकर यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात माजी आमदर जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेते व पदाधिकारी यांनी सहभाग घेऊन भाजपा व अमित शाह यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अमरावती मधील मोर्चात जिल्हाध्यक्ष बबलु शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, प्रदेश उपाध्यक्ष भैय्या पवार, प्रदेश सरचिटणीस किशोर बोरकर यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी भाग घेतला.

अकोला महानगर काँग्रेसकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर अमित शहा यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वात हे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी अकोला महानगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ प्रशांत वानखडे, माजी आमदार बबनराव चौधरी, प्रकाश तायडे, अशोक अमानकर यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते. बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीनेही अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले. यावेळी जेष्ठ नेते लक्ष्मणराव घुमरे, अॅड बाबासाहेब भोंडे, प्रा. संतोष आंबेकर, गणेशराव पाटील, शहराध्यक्ष दत्ताभाऊ काकस, यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
पालघरमध्ये काँग्रेसनेही डॉ, बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा काढून भाजपा व अमित शाह यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानप्रकरणी काँग्रेसने अमित शाह व भाजपाविरोधात सुरु केलेले आंदोलन यापुढेही सुरुच राहणार आहे. जालनामध्ये शुक्रवारी आंदोलन केले जाणार आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख व मा. आमदार कैलास गोरंट्याल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शनिवारी शरद पवार यांचा साहित्य परिषदेत सत्कार .

पुणे : २१/२२/२३ फेब्रुवारी२०२५ या काळात, सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी ( तालकटोरा स्टेडियम) नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे. दिल्लीत ७१ वर्षांनी होणाऱ्या या ऐतिहासिक संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शरद पवार यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.त्या निमित्ताने त्यांचा शनिवार दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सरहद् आणि महाराष्ट्र साहित्य परिषद या संस्थांच्या वतीने माधवराव पटवर्धन सभागृह,महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता, पुणे ४११०३० येथे ज्येष्ठ विचारवंत आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ रावसाहेब कसबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे तसेच या प्रसंगी १९५४ साली दिल्लीत झालेल्या ३७ व्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ आणि संमेलनाचे उद्घाटक पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भाषणाच्या ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांनी संपादित केलेल्या ‘ दिल्लीतील साहित्य चिंतन’ या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.या प्रसंगी साहित्य परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष प्रा डॉ शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्वस्त डॉ पी. डी. पाटील, माजी आमदार अनंत गाडगीळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत अशी माहिती सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांनी आज एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

वरिष्ठ गट राष्ट्रीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेसाठीगुरुवारी खुली राज्य निवड चाचणी

पुणे, दि. 24 : व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या तदर्थ समितीद्वारा जयपूर राजस्थान येथे होणाऱ्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी राज्य संघाची निवड करण्यासाठी खुल्या राज्य व्हॉलीबॉल निवड चाचणीचे आयोजन गुरुवार 26 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, गुलटेकडी येथे करण्यात येणार आहे.

जयपूर राजस्थान या ठिकाणी 7 ते 13 जानेवारी 2025 या कालावधीत सन 2025 मधील वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी राज्य संघाच्या निवडीसाठी खुल्या राज्य व्हॉलीबॉल निवड चाचणीला शाळा, महाविद्यालय, क्लब यातील इच्छुक स्पर्धकांना जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.
00000

ख्रिसमस सणानिमित्त पुणे शहरात वाहतुकीत बदल

पुणे, दि. २४: ख्रिसमस सणानिमित्त पुणे कॅम्प भागातील महात्मा गांधी मार्गावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक सुरळीत रहावी म्हणून २४ व २५ डिसेंबर २०२४ रोजी दोन्ही दिवस सायं. ७ वा. ते गर्दी संपेपर्यंत वाहतुकीत आवश्यकतेनुसार तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात येत आहेत.

याअंतर्गत वाय जंक्शन वरुन महात्मा गांधी मार्गाकडे येणारी वाहतूक ही १५ ऑगस्ट चौक येथे बंद करुन ती कुरेशी मशिद व सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे. इस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक बंद करुन सदरची वाहतूक एसबीआय हाऊस चौक उजवीकडे वळून तीनतोफा चौक सरळ लष्कर पोस्ट अशी वळविण्यात येणार आहे.

व्होल्गा चौकातून महमंद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतूक सरळ ईस्ट स्ट्रीट मार्गाने इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येईल. इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतूक इंदिरा गांधी चौकातून लष्कर पोलीस ठाणे चौकाकडे वळविण्यात येईल.

सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतूक ताबूत स्ट्रीट मार्गाने पुढे सोडण्यात येईल, असे आदेश पुणे वाहतूक. शाखेचे पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे यांनी जारी केले आहेत.

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रदर्शनाचे आयोजन

पुणे, दि. २४ : ग्राहकांना कायदे व हक्कांची माहिती व जाणीव व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित प्रदर्शनाचे अपर जिल्हाधिकारी डॉ. सुहास मापारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, अन्नधान्य वितरण अधिकारी प्रशांत खताळ, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे उपाध्यक्ष विलास लेले, पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तुषार झेंडे पाटील, सायबर क्राईम सेलचे पोलीस उपनिरिक्षक तुषार भोसले उपस्थित होते.

श्री. लेले म्हणाले, आर्थिक शोषण टाळण्यासाठी ग्राहकांनी सजग राहून संघटित होणे गरजेचे आहे. फसवणुकीचे प्रकार बदलले आहेत. त्यामुळे ग्राहकांनी संघटित झाल्याशिवाय न्याय मिळणार नाही, असे सांगितले.

श्री. भोसले यांनी सायबर क्राईमबद्दल सविस्तर माहिती देताना सांगितले की, सध्या ऑनलाईन पद्धतीने लोकांची आर्थिक फसवणूक होत असून ती कशी थांबवता येईल, याबाबत सायबर क्राईमपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी यासंदर्भात मार्गदर्शन केले.

प्रदर्शनात विधी सेवा प्राधिकरण, भारतीय जीवन विमा, वाहतूक नियंत्रण, पीएमपीएमएल, प्रादेशिक परिवहन अधिकारी, एसबीआय इन्शुरन्स, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, बीएसएनएल, जिल्हा कृषी अधिकारी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, अग्रणी बँक, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, राज्य आरोग्य प्रयोगशाळा, अन्नधान्य वितरण कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी, वैधमापन शास्त्र, पोलीस सायबर सेल, जिल्हा व सत्र न्यायालय, भारतीय मानक ब्युरो, अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या वतीने स्टॉल लावण्यात आले होते.

माजी न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यम राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्तीवर काँग्रेसने केले प्रश्न उपस्थित

0

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यम यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. आता त्यांच्या नियुक्तीवर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत.काँग्रेसने जारी केलेल्या नोटमध्ये असे म्हटले आहे की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे हेदेखील NHRC अध्यक्षांच्या निवड समितीमध्ये होते, परंतु त्यांचे मत गांभीर्याने घेतले गेले नाही.बुधवारी निवड समितीची बैठक झाली, मात्र ती पूर्वनियोजित व्यायाम असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. यामध्ये एकमेकांची संमती घेण्याच्या परंपरेकडे दुर्लक्ष करण्यात आले. अशा परिस्थितीत हे आवश्यक आहे.

हे निःपक्षपातीपणाचे तत्त्व कमी करते, जे निवड समितीच्या विश्वासार्हतेसाठी आवश्यक आहे. समितीने प्रत्येकाच्या मताचा विचार करून प्रोत्साहन देण्याऐवजी बहुमतावर विसंबून राहिली. या बैठकीत अनेक न्याय्य समस्या मांडल्या गेल्या, पण त्या बाजूला करण्यात आल्या.

वास्तविक, व्ही. रामसुब्रमण्यन यांची सोमवारी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या आधी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अरुणकुमार मिश्रा हे आयोगाचे अध्यक्ष होते. या वर्षी 1 जून रोजी ते या पदावरून निवृत्त झाले. तेव्हापासून आयोगाच्या सदस्या विजया भारती स्यानी या कार्यवाह अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत होत्या.
राहुल आणि खरगे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रोहिंटन फली नरिमन आणि न्यायमूर्ती केएम जोसेफ यांच्या नावावर एकमत केले होते. राहुल गांधी आणि खरगे यांनी गुणवत्ता आणि सर्वसमावेशकता लक्षात घेऊन ही नावे सुचवली होती.
राहुल आणि खरगे म्हणाले होते की, एनएचआरसी ही महत्त्वाची संस्था आहे. समाजातील उपेक्षित घटकांतील लोकांच्या मूलभूत मानवी हक्कांचे रक्षण करणे हे त्याचे कार्य आहे. एनएचआरसीने विविध समुदायांच्या चिंतेकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबत ते संवेदनशील राहिले.
न्यायमूर्ती रोहिंटन फली नरिमन हे अल्पसंख्याक पारशी समाजातील आहेत. संविधानाप्रति असलेल्या त्यांच्या बांधिलकीसाठी ते ओळखले जातात. जर त्यांना अध्यक्ष बनवले असते तर NHRCच्या देशासाठीच्या समर्पणाचा मजबूत संदेश गेला असता.
त्याचप्रमाणे न्यायमूर्ती कुट्टीयिल मॅथ्यू जोसेफ, जे दुसऱ्या अल्पसंख्याक ख्रिश्चन समुदायाचे आहेत, त्यांनी वैयक्तिक स्वातंत्र्य आणि उपेक्षित वर्गांच्या संरक्षणावर जोर देणारे अनेक निकाल दिले.
कोण आहेत व्ही. रामसुब्रमण्यम?

आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ती पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या 6 सदस्यीय समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती करतात. या समितीमध्ये पंतप्रधान, लोकसभेचे सभापती, राज्यसभेचे उपाध्यक्ष, संसदेच्या दोन्ही सभागृहातील प्रमुख विरोधी पक्षांचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री यांचा समावेश असतो.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) ही भारतातील एक केंद्रीय मानवाधिकार संस्था आहे. त्यात एक अध्यक्ष आणि पाच सदस्य असतात. आयोगाचे अध्यक्ष भारताचे निवृत्त सरन्यायाधीश आहेत. आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांचा कार्यकाळ पाच वर्षे किंवा वयाच्या 70 वर्षांपर्यंत (जे आधी असेल ते) आहे.
एक सदस्य हा सर्वोच्च न्यायालयाचा सेवारत किंवा निवृत्त न्यायमूर्ती असतो आणि एक सदस्य हा उच्च न्यायालयाचा सेवारत किंवा निवृत्त मुख्य न्यायाधीश असतो. इतर दोन सदस्यांना मानवी हक्कांशी संबंधित कामाचे ज्ञान किंवा अनुभव असावा.
आयोगात एक महिला सदस्यही असावी. या सदस्यांव्यतिरिक्त आयोगात इतर चार पदसिद्ध सदस्य आहेत. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोगाचे हे अध्यक्ष आहेत.

पुढचा महाराष्ट्र कसा असेल याबाबत भीती वाटू लागली – सुप्रिया सुळे

बारामती – आजवर जे सिनेमात गुन्हेगारीचे चित्र पाहायला मिळायचे ते आता महाराष्ट्रात वास्तवात दिसू लागले आहे. या घटना महाराष्ट्राला शिभणाऱ्या नाही. आता पुढचा महाराष्ट्र कसा असेल अशी भीती मला वाटत आहे, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राच्या भविष्याची काळजी व्यक्त केली आहे. परभणी येथील घटनेवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, परभणीतील घटना महाराष्ट्रासाठी अतिशय निंदनीय आहे. अर्थात या ठिकाणी शरद पवार गेल्यानंतर राज्यातील इतर नेते, लोक गेले तोपर्यंत कोणीही त्या ठिकाणी भेट द्यायला गेले नव्हते, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या सध्या बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारीवर भाष्य करत चिंता व्यक्त केली आहे. तसेच पक्षाची 8 व 9 जानेवारी रोजी मुंबईत बैठक होणार असल्याची देखील त्यांनी माहिती दिली आहे. यात पक्षाची आगामी भूमिका ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या,सुप्रिया सुळे म्हणाल्या, फक्त पोलिसांची बदली करून चालणार नाही. त्यापेक्षा कोण आरोपी आहे हे शोधले पाहिजे. बीड आणि परभणीमध्ये ज्या घटना झाल्या त्यावर विश्वास बसत नाही. जे सिनेमात पाहिले ते वास्तव महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे. पुढचा महाराष्ट्र कसा असेल अशी भीती वाटत आहे, मला कधीही भीती वाटली नाही पण आता वाटत आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा आहेत, त्यांनी महाराष्ट्राला न्याय द्यावा. सुरेश धस, नमित मुंदडा यांचे कौतुक आहे. करण राजकीय मतभेद बाजूला ठेऊन लढण्याची आज आवश्यकता आहे. मात्र, धनंजय मुंडे यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घ्यावा, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, जेव्हा गुन्हेगारी वाढते तेव्हा आर्थिक विकास मंदावतो. केंद्र सरकारचा आजवरचा डेटा देखील हेच सांगतो. महाराष्ट्रात वाढती गुन्हेगारी ही आर्थकारणाला खिळ बसवणारी ठरले असा धोका असल्याचे सुळे म्हणाल्या आहेत. यावेळी त्यांनी मराठी साहित्य संमेलनबद्दल देखील भाष्य केले. त्या म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील साहित्य संमेलनाला येणार आहेत. साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वेसाठी अश्विनी वैष्णव प्रयत्न करतील यासाठी आम्ही मिळून प्रयत्न केला आहे तसेच दिल्लीत होणारे हे साहित्य संमेलन यशस्वी करण्यावर आमचा भर राहणार आहे.

उपमुख्यमंत्री यांच्याकडून सारथी संस्थेच्या नव्या इमारतीची पाहणी

पुणे, दि. 23: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी शिवाजीनगर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानवविकास संस्था (सारथी) मुख्यालयाच्या इमारतीची पाहणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री यांनी नवीन इमारतीच्या कामाबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर यांनी श्री. पवार यांचे स्वागत केले.
यावेळी श्री. पवार म्हणाले सारथी संस्थेच्या अडीअडचणीबाबत लवकरच मार्ग काढण्यात येईल व संस्थेस आवश्यक असणारा निधी लवकरच उपलब्ध करुन देण्यात येईल. सारथी संस्थेच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सारथी संस्थेचे अध्यक्ष श्री. निंबाळकर यांनी संस्थेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत झालेल्या प्रगतीचा व संस्था राबवीत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी सारथी संस्थेचे संचालक मधुकर कोकाटे, उमाकांत दांगट, नवनाथ पासलकर, व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, निबंधक संजीव जाधव आदी उपस्थित होते.


धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ विकास कामांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

प्राचीन आणि आधुनिकतेचा संगम साधून छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ उभारावे-उपमुख्यमंत्री

पुणे, दि.२३: श्री क्षेत्र तुळापूर येथील स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ प्राचीन आणि आधुनिकतेचा संगम साधून महाराजांचा गौरवशाली इतिहास जगासमोर येईल तसेच जगाला हेवा वाटेल अशा स्वरूपात उभारण्यात यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे तुळापूर (ता. हवेली) येथील बलिदान स्थळ विकास कामांची त्यांनी पाहणी केली. याप्रसंगी आमदार ज्ञानेश्वर कटके, प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर, कार्यकारी अभियंता अमोल पवार, तुळापूरच्या सरपंच ॲड. गुंफा इंगळे, वढू बुद्रुकच्या सरपंच अंजली शिंदे आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ विकासकामे करताना ऐतिहासिक दृश्यस्वरुपातील आणि दर्जेदार साहित्याचा वापर करावा. विकासकामे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील, याकडे लक्ष द्यावे. कोणतीही कामे प्रलंबित राहणार नाहीत, याबाबत दक्षता घ्यावी. विकासकामे करताना दगडी कातीव, कोरीव बांधकाम, मातीच्या वैविध्यपूर्ण विटा आदींचा वापर करत बांधकामाला मजबुती येईल अशा पद्धतींचा अवलंब करावा.

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ व समाधी स्थळ स्मारक वढू (बु.) विकास आराखडा अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील एकूण २६४ कोटी रुपयाच्या कामाबाबत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास शासनस्तरावर बैठक घेऊन त्वरित मंजूरी देण्यात येईल. या कामांचे सविस्तर आराखडे व अंदाजपत्रक तयार करुन निविदा काढण्याची कार्यवाही करावी.

नदीच्या कडेला बांधकाम करताना नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला कोणताही बाधा येणार नाही यासाठी सर्व पर्यावरणाच्या नियमांचे पालन करावे; तसेच नदीच्या अनुषंगाने लाल रेषा, निळी रेषाबाबतच्या अटींचे काटेकोर पालन करावे. परिसरात अधिकाधिक वृक्षारोपण करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

यावेळी श्री. पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ वढू बु. (ता. शिरुर) स्मारक विकास आराखड्याबाबत माहिती घेतली तसेच अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

मुख्य अभियंता श्री. चव्हाण, अधीक्षक अभियंता श्री. बहीर आणि कार्यकारी अभियंता श्री. पवार यांनी सुरु असलेल्या विकासकामांबाबत माहिती दिली.
0000

राहुल गांधी केवळ राजकीय हेतूने परभणीत :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

पुणे-राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. या भेटीनंतर सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्याने त्याची हत्या केली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी पोलिस तसेच मुख्यमंत्री जबाबदार असल्याचे देखील त्यांनी म्हंटले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर माध्यमांशी संवाद साधला. राहुल गांधी यांनी परभणी येथे दिलेल्या भेटीवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की राहुल गांधी केवळ राजकीय हेतूने परभणीत आले होते. ही राजकीय भेट होती. लोकांमध्ये जाती जातीत भेद निर्माण करायचे ते गेली अनेक वर्षे काम करत आहेत. त्यामुळे मला असे वाटते की त्यांचे जे विद्वेषाचे काम त्यांनी त्या ठिकाणी जाऊन केले आहे. आमचे सरकार संवेदनशील असल्यामुळेच या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात येणार आहे. यात सगळे समोर येईल, तसेच कुठल्याही आरोपीला सोडण्यात येणार नसल्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली आहे.

यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याविषयी विधान करताना म्हणाले की आम्ही सगळे त्यांचा सन्मान करतो. मंत्रिमंडळात घेण्यात आले नाही तेव्हा आमच्या मनात त्यांना राष्ट्रीय पातळीवर पाठवण्याचा विचार होता, तसेच भुजबळांसारखे नेते आमच्या सोबत असलेच पाहिजेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत या वर्षी आपल्याला केंद्र सरकारने साडे सहा लाख घरे मंजुर करण्यात आली होती आता ते टार्गेट वाढवण्यात आले आहे. अतिरिक्त 13 लाख घरे आपल्याला देण्यात आली आहेत. एकूण आपण विचार केला तर जवळपास या वर्षी केंद्र सरकारच्या वतीने गरिबांसाठी, बेघरांसाठी तसेच कच्च्या घरात राहणाऱ्यांसाठी एका वर्षात 20 लाख घरे देण्याची घोषणा केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी केली आहे. महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे. तसेच देशाच्या इतिहासात कुठल्याच राज्यात एका वर्षात एवढी घरे मिळालेली नाहीत. आणखी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे की ज्यांची नावे सुटली होती त्यांना नव्या सर्वेक्षणात घेण्यात येणार आहे. असा निर्णय माननीय मोदी यांनी केला आहे. आणि हा संकल्प शिवराज सिंह चव्हाण यांनी सांगितला आहे.

राज्यात वाळू माफियांना पायबंद घालू! महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

· अभ्यास करुन वाळूविषयक सुलभ धोरण
· महसूल विभाग ‘जनता सर्वोपरी’ ठरवू
· झुडपी जंगल जमिनींचा प्रश्न मार्गी लावणार

मुंबई- जनतेला त्रासदायक ठरलेल्या महाराष्ट्रातील वाळू माफियागिरीला पायबंद घालण्यासाठी सरकार विशेष लक्ष देईल. वाळू विषयक सुलभ धोरण आणू.” अशी घोषणा राज्याचे महसूल मंत्री चन्द्रशेखर बावनकुळे यांनी केली. ते म्हणाले,” जनतेला वाळू सहज उपलब्ध होईल असे सुलभ धोरण देशातील कोणत्या राज्यात आहे, त्यासंदर्भात अभ्यास करून महाराष्ट्रात वाळूविषयक सुलभ धोरण अस्तित्वात आणू.”
महसूल मंत्री चन्द्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. महसूल विभागामुळे जनतेला त्रास होतो आहे; हे मी बघू शकणार नाही. ‘जनता सर्वोपरी..’ असे आपले कामजाजाचे धोरण राहणार असून देशातील सर्वांत चांगला महसूल विभाग महाराष्ट्राचा असेल अशी ओळख मी निर्माण करेन, असा निर्धार बावनकुळे यांनी व्यक्त केला.

  • झुडपी जंगल जमिनींचा प्रश्न मार्गी लावणार
    ते म्हणाले,”राज्यात सुमारे 86 हजार हेक्टर झुडपी जंगल जमिनींचा प्रश्न प्रलंबित असून, यामुळे अनेक विकास प्रकल्प रखडले आहेत. या जमिनी प्रामुख्याने विदर्भात अधिक असून,यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात खटला चालू आहे. याखटल्याच्या बाबतीत न्यायालयात पाठपुरावा करून, हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू.”
  • जनतेचे हेलपाटे कमी करू
    शेतकरी-शेतमजूरांशी संबंधित असणाऱ्या या खात्यात अनेक कायद्यांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. त्याचा अभ्यास करून राज्याच्या विकासाची गती वाढविण्यात येईल, असे सांगून बावनकुळे म्हणाले, की कागदपत्रांशी निगडित नागरिकांची महसूल खात्याशी संबंधित अनेक कामे असतात. नागरिकांना या कामांसाठी तलाठी कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय ते शासनस्तरापर्यंत कमीत कमी हेलपाटे मारून काम कसे करता येईल, यासंबंधी लवकरच उपाययोजना आखू आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा देवू.”
    मुद्रांक शुल्क, जमाबंदी आयुक्त तसेच वाळूशी संबंधित धोरणांमध्ये सुलभीकरण करण्याचा तसेच वाळूमाफियांना पूर्णपणे पायबंद घालण्याचा माझा प्रयत्न आहे, असे सांगून बावनकुळे म्हणाले, धोरण प्रक्रियेत सुलभीकरण आणण्यासाठी इतर राज्यांतील उपयुक्त कायद्यांचाही अभ्यास करणार असून येत्या काळात महसूल विभागात सकारात्मक बदल आपल्याला पाहायला मिळतील.
  • सरकारमध्ये योग्य समन्वय
    बहु पक्षीय सरकार समजुतीने चालवावे लागते. त्यासाठी समन्वय आवश्यक असतो. महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय असून, खातेवाटपामध्येही तो दिसून आला आहे. तसेच, पालकमंत्रिपदांचे वाटप करतानाही कोणतीही कुरबूर न होता आमचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याबरोबर योग्य समन्वय साधून पालकमंत्रिपदांचे वाटप करतील, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
    छगन भुजबळ हे महायुतीतील महत्त्वाचे नेते असून, त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे त्यांच्या बाबतीत योग्य निर्णय घेतील, असेही बावनकुळे यांनी भुजबळ यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
    राहुल गांधी यांचा दौरा म्हणजे नौटंकी
    राहुल गांधी यांचा परभणी येथील दौरा हा नौटंकी आहे. परभणी येथे घडलेली घटना निश्चितच दुर्दैवी असून, घटनेतील आरोपी मनोरुग्ण आहे. आरोपीला पोलिसांनी तत्काळ अटक केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. तरीसुद्धा केवळ राजकारण करण्यासाठी राहुल गांधी हे परभणीचा दौरा करत आहेत. परंतु, मागासवर्गीय, ओबीसी असे सर्व समाज राज्यात एकत्र गुण्यागोविंदाने नांदत असून, कोणताही समाज त्यांच्या या राजकारणाला बळी पडणार नाही. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीत पराभूत केले. डॉ. आंबेडकर हे संसदेच्या कोणत्याही सभागृहात येऊ शकणार नाहीत, यासाठी राजकारण केले. त्यामुळे जनतेलाही काँग्रेस आणि राहुल गांधी यांची नौटंकी कळत असल्याचे चन्द्रशेखर बावनकुळे म्हणाले.

‘पुरुषोत्तम‌’चे लॉटस्‌‍ निघणार गुरुवारीज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते होणार पारितोषिक वितरण

पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचे लॉटस्‌‍ गुरुवार, दि. 26 डिसेंबर रोजी काढण्यात येणार असून स्पर्धेला शुक्रवार दि. 27 रोजी सुरुवात होणार आहे.
महाअंतिम स्पर्धा दि. 27 ते दि. 29 डिसेंबर 2024 या कालावधीत पुण्यात होणार आहे. अंतिम स्पर्धेत पोहोचलेले सर्व संघ शुक्रवारी (दि. 26) पुण्यात दाखल होणार आहेत. त्यानंतर स्पर्धेचे लॉटस्‌‍ काढण्यात येणार आहे. पुण्यासह अमरावती, रत्नागिरी, संभाजीनगर आणि कोल्हापूर विभागातील पारितोषिकप्राप्त एकांकिकांचे सादरीकरण होणार असून यातून महाअंतिम फेरीतील विजेता ठरणार आहे. महाअंतिम फेरी भरत नाट्य मंदिर येथे पाच सत्रात होणार आहे. दि. 27 आणि दि. 28 रोजी सकाळी 9 ते 1 आणि सायंकाळी 5 ते 9 आणि दि. 29 रोजी सकाळी 9 ते 1 या वेळात स्पर्धा होणार आहे. पारितोषिक वितरण सभारंभ दि. 29 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला असून पारितोषिकांचे वितरण ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते होणार आहे.

अबब.. ६६ अब्ज रुपयांचा खर्च… परदेश दौरे अन जाहिरातीवर करणारे पहिले PM

विश्व भ्रमंती करतात म्हणूनच विश्व गुरु

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यावर आणि जाहिरातींवर तब्बल 66 अब्ज रुपयांचा खर्च झाल्याची माहिती मिळाली आहे.गेल्या साडेचार पंतप्रधानांनी एकूण 84 परदेश दौरे केले असून त्यावर 2,000 कोटींपेक्षा जास्त खर्च झाला आहे. त्यांचे अमेरिका दौरे 5 वेळा झाले आहेत. तर सरकारी जाहिरांतीवर 4,607 कोटी रुपये खर्च झाले आहेत. गेल्या साडेचार वर्षात NDA सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांवर आणि सरकारी जाहिरातींवर 920 दशलक्ष डॉलर ( अंदाजे 6,622 अब्ज रुपये) खर्च केले आहेत. त्यापैकी केवळ 280 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 2,000 कोटींहून अधिक रक्कम पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांवर खर्च झाली आहे. त्याच वेळी 640 दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे 4,607 कोटी रुपये सरकारी धोरणांशी संबंधित जाहिरातींवर खर्च केले गेले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात मोदींच्या परदेश दौऱ्याशी संबंधित माहिती दिली आहे.परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, गेल्या साडेचार वर्षांत पंतप्रधान मोदींनी 84 वेळा परदेश दौरा केला. तथापि, त्याच्या परदेश दौऱ्यादरम्यान सर्वात मोठा खर्च एअर इंडिया वनच्या देखभालीवर आणि सुरक्षित हॉटलाइन उभारण्यावर झाला. 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा पहिला विदेश दौरा जपानला होता.

पंतप्रधानांनी भेट दिलेल्या मोठ्या देशांमध्ये अमेरिका, जपान, चीन, जर्मनी, रशिया आणि ब्रिटन यांचा समावेश आहे. त्यांनी 5 वेळा अमेरिकेला भेट दिली आहे, तर फ्रान्स, जर्मनी आणि स्वित्झर्लंडला तीन वेळा भेट दिली आहे. ही माहिती उघड झाल्यावर विरोधी पक्षांनी पंतप्रधान मोदींच्या सततच्या परदेश दौऱ्यांच्या खर्चावर हल्लाबोल केला आहे

नवले ब्रिज भागातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी न‍िष्कासनाची कारवाई

पुणे / पिंपरी (दि.२३) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून नवले ब्रिज भागातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी सोमवारी (द‍ि.२३) न‍िष्कासनाची कारवाई करण्यात आली. सकाळी ७ वाजेच्या सुमारास अनधिकृतपणे उभारलेले २५ पत्राशेड गाळे काढून टाकण्यात आले. रहदारीचा व‍िचार करुन संबंध‍ितांसह इतरांनी सुद्धा अनधिकृत बांधकाम नये, असे आवाहन पीएमआरडीएच्या अध‍िकारी, कर्मचारी यांनी केले.

पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागाच्या वतीने गत काही द‍िवसांपासून अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत असून संबंध‍ित बांधकामे न‍िष्कास‍ित करण्यात येत आहे. सोमवारी पीएमआरडीएच्या पथकाने नवले ब्रिज भागात सातत्याने होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी द‍िलीप दादा नवले, वैशाली दांगट, सारंग नवले, अतुल चाकणकर, व‍िकास नाना दांगट यांच्यासह आदींचे अनधिकृतपणे उभारलेले २५ पत्राशेड गाळे काढून टाकण्यात आले.

सदरीची कारवाई महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पोलिस अधिक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सह आयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील, उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार सच‍िन म्हस्के, रविंद्र रांजणे, पोलीस न‍िरीक्षक महेशकुमार सरतापे, कनिष्ठ अभियंता विष्णू आवाड, गणेश जाधव, अभ‍िनव लोंढे यांच्यासह पोलीस कर्मचारी, अग्न‍िशमन व‍िभागाचे कर्मचारी यांनी केली. पीएमआरडीएच्या हद्दीतील अनधिकृत होर्डिंगसह बांधकामांचा सर्वे सुरु असून न‍िष्कासनाची कारवाई करण्यात येत आहे. मालमत्ताधारकांनी परवानगी घेवूनच बांधकामे करावीत, यासह चालू असलेली अनधिकृत बांधकामे तात्काळ थांबवावीत, असे आवाहन करण्यात येत आहे. नवले ब्रिज भागातील आजच्या कारवाईमुळे न‍िश्व‍ितच वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागेल, असा व‍िश्वास पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी व्यक्त केला.

पुणे महानगरपालिकेतर्फे सुशासन सप्ताहानिमित्त परिसंवादाचे आयोजन

पुणे -प्रत्येक वर्षी २५ डिसेंबर हा दिवस “सुशासन दिन” म्हणून साजरा केला जात असून केंद्र शासनामार्फत जिल्ह्यात सुशासन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
१९ डिसेंबर ते २४ डिसेंबर २०२४ या कालावधीत हा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने आज २३ डिसेंबर २०२४ रोजी पुणे महानगरपालिकेमध्ये जुना जी. बी. हॉल मुख्य इमारत, तिसरा मजला या ठिकाणी परिसंवाद आणि प्रशिक्षणचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाला मा. आयुक्त राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य श्री. अनिल कवडे हे प्रमुख वक्ते म्हणून लाभले होते. “सुशासन” या विषयावर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी पुणे महानगरपालिकेच्या सह आयुक्त उल्का कळसकर, उप आयुक्त सामान्य प्रशासन प्रतिभा पाटील, उप आयुक्त संजय शिंदे, मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे, उप आयुक्त परिमंडळ क्रमांक ४ जयंत भोसेकर, उप आयुक्त परिमंडळ क्रमांक ३ आशा राऊत, उप आयुक्त परिमंडळ क्रमांक ५ डॉ. चेतना करूरे, माहिती व तंत्रज्ञान प्रमुख, राहुल जगताप आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप आयुक्त राजीव नंदकर यांनी केले.
यावेळी बोलतांना अनिल कवडे यांनी पुणे महानगरपालिकेच्या विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांना स्थानिक पातळीवरील प्रशासन आणि सार्वजनिक सेवा वितरण सुधारण्यासाठी सुप्रशासन कशा पद्धतीने करता येऊ शकते याविषयी मार्गदर्शन केले. प्रशासन म्हणजे सेवा, सुविधा आणि लाभ यांचे मिश्रण आहे. यामध्ये सुलभता, पारदर्शकता आणि विश्वासार्हतेचे महत्व त्यांनी उपस्थितांना पटवून दिले. या सर्व सुविधा शाश्वत असायला हव्यात आणि पुणे महानगरपालिकेने सतत नागरिकांच्या दृष्टीने विचार करून योग्य त्या सेवा आणि सुविधा पुरवल्या पाहिजेत. असे ते यावेळी म्हणाले.
पुढे बोलतांना ते म्हणाले, प्रशासनात काम करत असतांना लोकांमध्ये मानवी मूल्य, चांगले विचार रुजवण्याची जबाबदारीही आपलीच असते. नागरिकांना सेवा, सुविधा पुरवत असतांना योग्य त्या माध्यमाचा वापर व्हायला हवा यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजे. या सुविधा आणखी महानगरपालिकेच्या विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांना स्थानिक पातळीवरील प्रशासन आणि सार्वजनिक सेवा वितरण सुधारण्यासाठी सुप्रशासन कशा पद्धतीने करता येऊ शकते याविषयी मार्गदर्शन केले. प्रशासन म्हणजे सेवा, सुविधा आणि लाभ यांचे मिश्रण आहे. यामध्ये सुलभता, पारदर्शकता आणि विश्वासार्हतेचे महत्व त्यांनी उपस्थितांना पटवून दिले. या सर्व सुविधा शाश्वत असायला हव्यात आणि पुणे महानगरपालिकेने सतत नागरिकांच्या दृष्टीने विचार करून योग्य त्या सेवा आणि सुविधा पुरवल्या पाहिजेत. असे ते यावेळी म्हणाले. सुलभ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. तसेच शासकीय अधिकाऱ्यांनी आत्मचिंतन
करून नागरिकाभिमुख विचार केले पाहिजे असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामान्य प्रशासन विभागाचे ऋषिकेश जगताप यांनी केले.