Home Blog Page 526

ताम्हीणी घाटामध्ये हायड्रोक्लोरीक ॲसिड असलेला टँकर झाला पलटी

0

पुण्यातून कोकणात जाणाऱ्या व कोकणातून पुढे जाणाऱ्या पर्यटकांची गर्दी असतानाच माणगाव ते पुणे मार्गावर ताम्हिणी घाटात अॅसिडने भरलेला टँकर उलटल्याने खळबळ उडाली आहे. हा मार्ग तातडीने सुरक्षेच्या उपायोजना म्हणून वाहतुकीसाठी तात्काळ बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा आहेत. हा मार्ग सुरू होण्यासाठी अजून तीन ते चार तासांचा कालावधी लागेल असे सांगितले जात आहे. घटनास्थळी पुणे जिल्ह्यातील व रायगड जिल्ह्यातील पोलीस व सुरक्षा यंत्रणा दाखल झाले आहेत.ताम्हिणी घाटात डोंगरवाडी गावाजवळ रविवारी (ता. 25) सकाळी हायड्रोक्लोरिक अॅसिड नेणारा टँकर रस्त्याच्या कडेला खाली पलटी झाला. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अॅसिड गळती झाली आणि धूर देखील निघत होता. या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. घटनास्थळी वन विभागाचे कर्मचारी व पोलीस पोहचले त्यांनी खबरदारी घेऊन त्या ठिकाणी नियोजन केले. वाहतूक सुरळीत केली.त्यानंतर सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेची टीम त्या ठिकाणी पोहोचली व अॅसिड गळती रोखणे, आजूबाजूचा परिसर सुरक्षित करणे आदी कार्यवाही सुरु झाली आणि टँकर काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, या सगळ्यांसाठी अद्याप काही वेळ लागण्याची शक्यता आहे. रविवारची सुट्टी असल्याने सुट्टी संपून कोकणाकडून पुण्यात जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी आहे तर या वेळेला सुट्ट्यांच्या शेवटच्या टप्प्यात पुण्यातून कोकणात दाखल होणाऱ्या वाहनांची संख्याही मोठी आहे.कोकणात रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातून पुण्याकडे जाणारा हा सगळ्यात जवळचा मार्ग आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, खेड, मंडणगड, गुहागर चिपळूण तालुक्यातील अनेक प्रवासी वाहने या मार्गाचा उपयोग करतात. टँकर पलटी झाला ते डोंगरवाडी परिसरातील घाटातील ठिकाण पुणे जिल्ह्याचे हद्दीत आहे, पुणे पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत दरम्यान रायगड जिल्ह्यातील माणगाव पोलीसही घटनास्थळी रवाना झाले आहेत.

MH 04 HD 4530नंबरच्या या टँकर मध्ये अंदाजे 28000 हजार लिटर हायड्रोक्लोरिक ऍसिड होते. महाड ते पुणे असा प्रवास करत हा टँकर मे. बीटा केमिकल महाड MIDC येथून मे. पुणे मार्केटिंग, भेकराई नगर फुरसुंगी यथे जात असतांना गाव -डोंगरवाडी ताम्हिणी घाट जवळ धुके असल्यामुळे रोडचा अंदाज न आल्याने खचलेल्या रोडवरून सदर टँकर पलटी झाला टँकर मधील वाहन चालक अडकलेले होते मागून येणाऱ्या बस चालकाने बस थांबवून अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढले चालकाला किरकोळ हातांच्या बोटाला जखम झाली.टँकर मधील ऍसिड हे खाली असलेल्या खोल दरीत वाहत गेले रोड वर वाहनांची वर्दळ असल्यामुळे ये जा करण्याऱ्यांना डोळ्यांची जळजळ होऊ लागली जवळपास 90% टँकर रिकामे झाले आहे सध्या क्रेन च्या साह्याने पलटी झालेले टँकर बाजूला करण्यात आले आहे. या कार्यामधे PMRDA अग्निशमन दल, मुळशी आपत्ती व्यवस्थापन टीम, LCS रिस्पॉस टीम, रायगड रेस्क्यू टीम, पोलीस अधिकारी, कर्मचारी मदतीने घटने ठिकाणी मदतकार्य पूर्ण झाले आहे.अपघातस्थळी कोणत्याही प्रकरची जीवितहानी झालेली नाही.

विजय महाजन -PMRDA

भारत चौथ्या क्रमांकाची जागतिक अर्थशक्ती;पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची ऐतिहासिक घोडदौड-उपमुख्यमंत्री अजित पवार

0

मुंबई, दि. 25: “भारताची अर्थव्यवस्था चार ट्रिलियन डॉलर्सच्या टप्प्यावर पोहोचली असून, आपला देश आज जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थशक्ती ठरला आहे, ही बाब प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची आणि आनंदाची आहे. हे यश प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या सक्षम नेतृत्वाचे आणि सातत्याने घेतलेल्या ठोस निर्णयांचे फलित आहे. त्यांनी दिलेल्या ‘विकसित भारत-2047’चे लक्ष्य गाठण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण क्षमतेने सज्ज आहे. या ऐतिहासिक कामगिरीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो,” अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात की, नीती आयोगाच्या बैठकीनंतर भारताच्या आर्थिक स्थितीबाबत नीती आयोगाचे सीईओ बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने जपानला मागे टाकून चौथा क्रमांक पटकावला आहे. आता आपल्यापुढे केवळ अमेरिका, चीन आणि जर्मनी आहेत. ही केवळ आकड्यांची झेप नाही, तर सक्षम धोरणांची, प्रभावी नेतृत्वाची आणि ठोस अंमलबजावणीची प्रचिती आहे.

भारताला लाभलेली तरुण लोकसंख्या, नीती आयोगासारख्या संस्थांचे मार्गदर्शन आणि राज्य-केंद्र सरकारमधील प्रभावी समन्वयामुळे येत्या अडीच ते तीन वर्षांत भारत तिसऱ्या क्रमांकाची जागतिक अर्थव्यवस्था होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांना आपापल्या पातळीवर विकासाचे दीर्घकालीन व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला महाराष्ट्राने सकारात्मक प्रतिसाद दिला असून महाराष्ट्र नक्कीच देशाच्या विकासात आघाडीवर असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय धोरणानुसार, महाराष्ट्र सरकारने सुद्धा ‘महाराष्ट्र 2047’ असे व्हीजन तीन टप्प्यात तयार केले आहे. 100 दिवसांच्या सुशासन, नागरिक केंद्रीत उपाययोजना आणि उत्तरदायित्त्व अशा सूत्रावर एक कार्यक्रम महाराष्ट्र सरकारने हाती घेतला आहे. यात विविध विभागांनी 700 हून अधिक उद्दिष्ट साध्य केले. आता दीडशे दिवसांचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यात 2047 साठी दीर्घकालिन, महाराष्ट्र आपला अमृत महोत्सव साजरा करेल, त्या कालावधीचे म्हणजे 2035साठी आणि प्रतिवर्षाच्या उद्दिष्टांसह 2029 साठीचे अल्पकालिक 5 वर्षांचे असे व्हीजन तयार करण्यात येत आहे. विद्यमान अर्थव्यवस्था 2030 पर्यंत एक ट्रिलियन डॉलर्स करण्याचे मुख्य उद्देश आहे.

भारताच्या आर्थिक प्रगतीचे श्रेय देशातील सामान्य जनतेच्या कष्टांना, उद्योग जगताच्या योगदानाला आणि केंद्र सरकारच्या निर्णयक्षम, परिणामकारक नेतृत्वाला जाते. हे यश आपल्याला अधिक व्यापक, समावेशक आणि शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देणारे आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन करून त्यांचे आभार मानले.

नेहा महाजन यांना सुचेता नातू स्मृती युवा सतारवादक पुरस्कार

गुरुवारी सांगीतिक मैफलीचे आयोजन
नेहा महाजन यांचे सतारवादन तर कैवल्यकुमार गुरव यांची गायन मैफल

पुणे : गानवर्धन संस्थेच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या विशेष सांगीतिक कार्यक्रमात कै. सुचेता नातू यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या युवा सतारवादक पुरस्काराने नेहा विदुर महाजन यांचा गौरव केला जाणार आहे.
पुरस्कार वितरण समारंभ गुरुवार दि. 29 मे रोजी सायंकाळी 5:30 वाजता एस. एम. जोशी हॉल, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला आहे. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यरत असलेले सुरेश रानडे व जयश्री रानडे हे या पुरस्काराचे प्रायोजक असून त्यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. दहा हजार रुपये, शाल, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर नेहा महाजन यांचे सतार वादन होणार आहे. त्या नंतर पंडित कैवल्यकुमार गुरव यांच्या गायन मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. कलाकारांना सुयोग कुंडलकर (संवादिनी), प्रशांत पांडव, विनायक कुडाळकर (तबला) साथसंगत करणार आहेत.
नेहा या पंडित विदुर महाजन यांची कन्या असून त्यांना शाश्वती शहा, रवी गाडगीळ, जुनैन खान यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सतारवादनासह अभिनय आणि मॉडेलिंग या क्षेत्रात सुद्धा त्यांचा नावलौकिक आहे.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

सुरेल बंदिशी, मनमोहक चित्रांतून ‘रामगाना’ची रसानुभूती

भारतीय विद्या भवन, इन्फोसिस फाउंडेशन व अविष्कार क्रिएशन्सतर्फे ‘रामगान’च्या पहिल्या प्रयोगाचे आयोजन

पुणे: सुरेल बंदिशींना प्रासंगिक चित्रांची जोड, विविध रागांमध्ये गुंफलेल्या बंदिशी, कलाकारांचे कर्णमधुर सादरीकरण, बंदिशींना बोलके करणाऱ्या चित्रांचे दर्शन, या माध्यमातून रसिकांनी रामायणातील विविध प्रसंगांवर आधारित ‘रामागाना’ची रसानुभूती घेतली. राम जन्मापासून ते रावणवध करून प्रभू श्रीराम अयोध्येला परतल्यानंतर त्यांचा राज्याभिषेक होईपर्यंत, वनवासावेळी माता शबरीची भेट, अहिल्या उद्धार, सीताहरण, सीतेला शोधतानाचा विरह, राम हनुमान भेट, विजयी पताका व जयघोष असे अनेक शब्दबद्ध व चित्रबद्ध केलेले प्रसंग पाहून रसिक भारावून गेले. 

भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमाअंतर्गत आविष्कार क्रिएशन्सतर्फे आयोजित ‘रामगान’ या सांगितीक मैफिलीचे आयोजन केले होते. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांच्यासह कला क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. बंदिशकार, गायिका व चित्रकार भाग्यश्री गोडबोले यांनी रामायणातील विविध प्रसंगांवर स्वतः रचलेल्या रागाधारित बंदिशींचे सादरीकरण, तसेच त्यावर आधारित रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन अशा दृक-श्राव्य कार्यक्रमाचा हा पहिलाच प्रयोग रसिकांच्या विशेष पसंतीस पडला. पं. अमोल निसळ, भाग्यश्री गोडबोले, डॉ. सानिका गोरेगावकर, सावनी दातार, श्वेता कुलकर्णी यांचे सुरेल शास्त्रीय गायन, खुमासदार शैलीतील डॉ. सुनील देवधर यांचे निवेदन आणि तबल्यावर अमित जोशी, संवादिनीवर शुभदा आठवले, व्हायोलिनवर अंजली राव-सिंगडे यांची लाभलेली साथसंगत यामुळे मैफलीत रंगत वाढली.

‘रघुनंदन रूप मनोहर’ या भटियार, ललत रागातील बंदिशीने मैफलीची सुरुवात झाली. केदार रागातील ‘प्रकट होत खुद’ ही बंदिश श्वेता कुलकर्णी यांनी, तर मालकंस रागातील ‘कड कड कड नाद’ ही बंदिश अमोल निसळ यांनी सादर केली. वनवासाचे वर्णन करणाऱ्या हिंडोल रागातील ‘राम का हो निर्वासन’ व ललत रागातील ‘गमन करत रामलखन’ या बंदिशी सादर करीत सावनी दातार यांनी वनवासाचा प्रसंग उभा केला. सानिका गोरेगावकर यांनी जनसंमोहिनी या शांतरसाच्या रागात ‘रामचरण स्पर्श होत’, तर भूपेश्वरी रागात अमोल निसळ यांनी ‘शूर्पणखा अति क्रोधित’ बंदिशींतून शूर्पणखेचा संताप व्यक्त केला. सानिका गोरेगावकर यांनी ‘शबरी असीम रामभक्त’ ही मिश्र झिंझोटी व ‘मृग प्यारासा’ ही जौनपुरी रागातील बंदिश सादर केली. जयजयवंती रागातील ‘सीताहरण की बात’ बंदिशीतून श्वेता कुलकर्णी यांनी रावण सीतेचे हरण करत असल्याचा प्रसंग उभारला. सेतू बांधण्यात खारुताईचे योगदानावर भाग्यश्री गोडबोले यांनी सादर केलेली शुद्ध सारंग रागातील बंदिश, मारवा, मधुकंस, सोहोनी रागातील बंदिशींनी अशोक वाटीकेतील सीतेच्या मनातील भावना, हनुमान-सीतामातेची भेट, वानरसेनेने केलेल्या जयघोष असे अनेक प्रसंग उभारले. ‘राम सुमीर करुणाकर’ या भैरवीने मैफलीची सांगता झाली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोर्टाच्या आदेशामुळे:ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार, संजय राऊतांचा दावा

खासदार संजय राऊत म्हणाले की, भुजबळ यांनी मंत्रीपदाबद्दल अमित शहा, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले, मात्र अजित पवार यांचे नाव घेतले नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे – भुजबळ आता प्रत्यक्ष भाजपमध्येच आहेत. केवळ तांत्रिकदृष्ट्या वेगळ्या गटात आहेत. त्यांनी आता अमित शहा यांचे नेतृत्व मान्य केले आहे. ज्याचे काम शिवसेनेला तोडण्याचे, त्याचे नेतृत्व भुजबळ करतायत, हे दुर्दैव आहे, असेही राऊत म्हणाले. कधीकाळी सीमाप्रश्नासाठी आणि मराठी माणसासाठी रस्त्यावर उतरणारे भुजबळ, आज मुंबई आणि महाराष्ट्र तोडण्याच्या राजकारणात सहभागी झाले आहेत.

संजय राऊत म्हणाले की, मुंबई ही मराठी माणसाचे हृदय आहे. 106 हुतात्म्यांच्या बलिदानाने ही मुंबई आपली झाली. आता मोदी-शहा-फडणवीस यांचा डोळा या शहरावर आहे. मुंबई मराठी माणसाच्या हातातून काढण्यासाठी त्यांच्या पक्षाकडून नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप करत राऊत म्हणाले, भुजबळ आता याच पक्षात आहेत, हे मराठी जनतेने लक्षात ठेवायला हवे.

पुण्यात तिहेरी हत्याकांड? २ चिमुकल्या मुलांसह महिलेचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ

पुणे – जिल्ह्यातील रांजणगाव खंडाळे परिसरात एका महिलेसह दोन मुलांचा मृतदेह आढळून आला आहे. अहिल्यानगर हायवेजवळ ग्रोवेल कंपनीच्या मागच्या बाजूला तीन मृतदेह आढळल्यानं खळबळ उडालीय. मृतदेह जास्त जळाले असल्यानं त्यांची ओळख पटवणं कठीण आहे.प्राथमिक अंदाजानुसार नवऱ्याने पत्नी आणि मुलांना जाळलं असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास पोलीस करत आहेत.

घटनेची माहिती समजताच रांजणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी तपास सुरू आहे. ही घटना कौटुंबिक वादातून घडली की अन्य कोणते कारण आहे? याचाही तपाक केला जात आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तर घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे.

महिला आणि तिच्या दोन मुलाला जाळून टाकलं असून मृतदेहांची ओळख पटलेली नाही. रांजणगाव खंडाळे हद्दीमध्ये या तिघांना आणण्यात आलं. त्यांच्यावरती पेट्रोल टाकून त्यांना जाळण्यात आलं. मात्र पावसामुळे ते न पेटल्याने तिघांचेही मृतदेह तसेच राहिले असण्याची शक्यता आहे.

मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल:12 दिवस आधीच आगमन…

हवामान विभागाने सांगितले ,’आज 25 मे 2025 रोजी नैऋत्य मान्सून पश्चिममध्य आणि पूर्वमध्य अरबी समुद्राच्या काही भागात, कर्नाटकच्या काही भागात, संपूर्ण गोवा, महाराष्ट्राच्या काही भागात, पश्चिममध्य आणि उत्तर बंगालच्या उपसागराच्या काही भागात आणि मिझोरामच्या काही भागात, मणिपूर आणि नागालँडच्या काही भागात पुढे सरकला आहे.

मान्सूनची उत्तर सीमा 15.5°N/55°E, 15.5°N/60°E, 16°N/65°E, 16.5°N/70°E, देवगड, बेलागावी, हावेरी, मंड्या, धर्मपुरी, चेन्नई, 15°N/83°E, 18°N/87°E, 20°N/89°E, ऐझवाल, कोहिमा, 26.5°N/95°E, 27°N/97°E.

पुढील 3 दिवसांत नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या काही भागात, मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागात, कर्नाटकसह बंगळुरू, आंध्र प्रदेशचा काही भाग, तामिळनाडूचा उर्वरित भाग, पश्चिममध्य आणि उत्तर बंगालच्या उपसागराच्या काही भागात आणि ईशान्येकडील राज्यांच्या काही भागात पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे, अशी माहिती हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

यंदाच्या वर्षी राज्यात आणि देशभरात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, यंदा देशात मान्सून 107 टक्क्यांपर्यंत पाऊस पडू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. राज्यातही समाधानकारक आणि भरघोस पावसाची शक्यता असल्याने कृषी क्षेत्राला मोठा दिलासा मिळू शकतो.

1 जून ते 30 सप्टेंबर दरम्यानचा पाऊस मान्सून-मान्सून लवकर किंवा उशिराचा पावसावर परिणाम होत नाही. फक्त 1 जून ते 30 सप्टेंबर दरम्यानचा पाऊस मान्सूनचा म्हणून नोंदवला जातो. गेल्या 50 वर्षांत, मान्सून नियोजित तारखेला म्हणजे 1 जून रोजी फक्त तीनदा दाखल झाला. 25 वेळा तो 1 ते 12 दिवस आधी आला आहे. 22 वेळा तो उशिरा आला आहे. 2009 मध्ये, जेव्हा मान्सून 23 मे रोजी आला तेव्हा फक्त 78% पाऊस पडला. 2009 मध्ये मान्सून 13 जून रोजी आला होता, पण त्या वर्षी 102% पाऊस पडला होता.

राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा- अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे तसेच कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, नांदेड, लातूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाचे गुगल मॅपवरील नाव औरंगजेब अलामगीर करण्याचा खोडसाळपणा- अमोल बालवडकरांनी केली तक्रार


पुणे-म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रिडा संकुलाचे गुगल मॅप वर “छत्रपती औरंगजेब आलमगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स” असे नाव बदलण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी गंभीर दखल घेत माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी बाणेर पोलीस स्टेशन कडे धाव घेत संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.बालेवाडी म्हाळुंगे स्थित श्री शिवछत्रपती क्रिडा संकुलाच्या संदर्भात गुगल लोकेशन मॅपवर काही समाज कंटकांनी जाणून बुजून श्री. शिवछत्रपती क्रिडा संकुल ऐवजी “छत्रपती औरंगजेब आलमगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स” असे नाव बदलले आहे. अशी माहिती बालवडकर यांनी दिली.

या प्रकारामुळे समस्त शिवप्रेमी, खेळाडू, ग्रामस्त व नागरिक अत्यंत संतप्त झाले असून अशा या समाज कंटकांवर तातडीने कारवाई करण्यात यावी. गुगल ‘मॅप ला जाऊन अशा प्रकारे लोकेशन एडीट केले आहे. असे सांगत त्यांनी काही पुरावेदेखील सादर केले आहेत.या खोडसाळपणामुळे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रकार तंत्रज्ञानाचा चुकीचा उपयोग करून केला जात आहे. असा आरोपही त्यांनी यावेळी केला. तसेच, गुगल मॅपच्या एडीट पर्यायाचा वापर करून इंटरनेट वरील हॅकर्स इतरही अनेक असे गुन्हे करू शकतात तरी याला वेळीच आळा घालावा. असे बालवडकर यांनी म्हटले आहे.यासोबतच, गुन्हे हे शक्यतो Virtual Private Network वापरून केले जाते. तरी सदर प्रकरणातील गुन्हेगारांचा शोध घ्यावा. तरी सदर प्रकरणातील दोषींना तातडीने शोधुन अशा या समाज कंटकांवर तातडीने कारवाई करावी व संबंधित गुगल लोकेशन मॅपवरील नाव लवकरात लवकर बदलण्यात यावे. अशी मागणी बालवडकर यांनी केली आहे.

दिल्लीत वादळ आणि पाऊस, 25 विमाने वळविली :रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहने बुडाली; हिमाचलमध्ये ढगफुटी

नवी दिल्ली- रविवारी सकाळी दिल्लीत वादळासह मुसळधार पाऊस पडला. मिंटो रोड, मोती बाग आणि दिल्ली विमानतळ टर्मिनल-१ च्या रस्त्यांवर पाणी साचल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.अहवालानुसार, यामुळे १०० हून अधिक उड्डाणांवर परिणाम झाला आहे, त्यापैकी २५ हून अधिक उड्डाणे वळवण्यात आली आहेत. काही उड्डाणे उशिरा झाली तर काही रद्द करण्यात आली.

कालच देशात मान्सूनचे आगमन झाले आहे. ते केरळमध्ये त्याच्या नियोजित वेळेच्या ८ दिवस आधी पोहोचले. त्याच वेळी, आजपासून नौतपा देखील सुरू होत आहे, जो २ जूनपर्यंत सुरू राहील. या काळात प्रचंड उष्णता असते.हवामान खात्याने आज देशातील २१ राज्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा जारी केला आहे. याशिवाय, उत्तराखंडमध्ये गारपीट आणि राजस्थानमध्ये धुळीचे वादळ-उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.शनिवारी ढगफुटीमुळे हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. यामुळे २५ हून अधिक वाहनांचे नुकसान झाले. डोंगरावरून ढिगारा पडल्यामुळे हिंदुस्तान-तिबेट रस्ता आणि राष्ट्रीय महामार्ग-५ बंद झाला.हवामान विभागाने २७ आणि २८ मे रोजी राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे, मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

पुण्यात मंगळवार पेठेत पहाटे गोळीबार:सराईत गुन्हेगार रोहित मानेसह, कासीम अन्सारीला पकडले

पुणे-मंगळवार पेठेतील भीमनगर कमानीजवळ आज (शनिवार) पहाटे गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली. रोहित माने (वय 32, रा. लोहियानगर) या सराईत गुन्हेगाराने गोळीबार केला असून, पोलिसांनी त्याला घटनास्थळीच अटक केली. या प्रकरणी त्याचा साथीदार कासीम अन्सारी यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांकडून पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे पाचच्या सुमारास किरण केदारी,शाम गायकवाड,अश्पाक शेख, संतोष कांबळे, हे चौघेजण मंगळवार पेठेतील भीमनगर कमानीजवळ बोलत थांबले होते. त्यावेळी आरोपी दुचाकीवरून ये जा करत होते. त्यांना हटकले. त्याचा राग आरोपींना आला त्यातून त्यांनी या चौघांच्या दिशेने गोळीबार केला. मात्र सुदैवाने कोणाला गोळी लागली नाही. घटनेची माहिती मिळताच फरासखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघा आरोपींना अटक केली.

गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि रोहित माने याला अटक केली. काही वेळातच त्याचा साथीदार कासीम अन्सारी यालाही पकडण्यात आले. पोलिसांनी दोघांकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि काही काडतुसे हस्तगत केली आहेत.

रोहित माने हा पूर्वीपासूनच पोलिसांच्या रडारवर असलेला गुन्हेगार असून, त्याच्यावर आर्म्स ॲक्ट, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवले गेले आहेत. सध्या गुन्हे शाखा आणि फरासखाना पोलिस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत असून, या घटनेमुळे मंगळवार पेठ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास सुरू आहे.

5 दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारेच्या वाहनावर गोळीबाराची घटना घडली होती. वारजे माळवाडी येथे गोळीबार केल्याने सदर परिसरात तणाव निर्माण झाला. दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी घारे यांच्या चारचाकी कारवर मंगळवारी (20) रात्री 12वाजता फायरींग केले होते.

स्त्री सक्षम झाली तर तिला आत्महत्येचा पर्याय निवडावा लागणार नाही

  आधार संस्थेच्या संस्थापक डॉ. नंदा शिवगुंडे यांचे मत ; वंचित विकास संस्थेतर्फे महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांचा ‘अभया सन्मान’ देऊन गौरव 
पुणे :  एक महिला शिकली, तर ती संपूर्ण कुटुंब सुशिक्षित करते. ती सक्षम झाली, तर तिला आत्महत्येसारखा पर्याय निवडण्याची वेळ येत नाही. फक्त मुलींना शिक्षण देऊन चालणार नाही, तर त्यांना स्वावलंबी देखील बनवले पाहिजे. यामुळे प्रत्येक स्त्री सक्षम बनेल, असे मत आधार संस्थेच्या संस्थापिका डॉ. नंदा शिवगुंडे यांनी व्यक्त केले.

वंचित विकास संस्थेतर्फे एकल महिलांचे संघटन करणे, आदिवासी निराधार महिलांचे सक्षमीकरण, तृतीयपंथीयांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणाऱ्या महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांना ‘अभया सन्मान’ देऊन गौरविण्यात आले. पुणे श्रमिक पत्रकार भवनच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी वुमनिया पुणे च्या संस्थापिका प्रीती क्षीरसागर,  वंचित विकास संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, संचालिका सुनीता जोगळेकर, मीना कुर्लेकर, मीनाक्षी नवले, देवयानी गोंगले, चैत्राली वाघ, तृप्ती फाटक आदी उपस्थित होत्या. 

बीड मधील केज तालुक्यातील एकल महिलांचे संघटन करणे, त्यांचे प्रश्न सोडवणे, संविधानीक मूल्य समाजात रुजविणे हे काम करणाऱ्या अनिता कांबळे, नागपूर मधील पांढराबोडी, रामनगर येथील आदिवासी निराधार महिला व आर्थिकदृष्ट्या दुर्बळ महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या बबीता धुर्वे, पुण्यात तृतीयपंथीयांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या कादंबरी शेख आणि बीडमध्ये अस्तित्त्वाची लढाई लढणारी कार्यकर्ती रत्नमाला गायकवाड यांना अभया सन्मान देऊन गौरविण्यात आले. 

याशिवाय संगीता भरत काळे आणि वैष्णवी प्रसाद काळे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. ओल्या हळदीच्या अंगाने सीमेवर जाण्यासाठी हसतमुखाने निरोप देणाऱ्या भारतीय सैन्यदलातील प्रसाद काळे यांच्या पत्नी वैष्णवी प्रसाद काळे व त्यांच्यावर राष्ट्रभक्तीचे संस्कार करणाऱ्या आई संगीता भरत काळे या दोघींचाही आदर्श समाजापुढे ठेवावा म्हणून सर्व भारतीयांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी ‘ग्राम परिवर्तन प्रबोधिनी’, मु. कटगुण, ता. खटाव, जि. सातारा या ग्रंथालयासाठी उपयुक्त पुस्तके भेट देण्यात आली. 

प्रीती क्षीरसागर म्हणाल्या, मी केवळ महिलांसाठी सोशल मिडीयाच्या माध्यमातून खूप काम केले आहे. परंतु आज प्रत्यक्ष महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील अनेक अडचणींना सामोरे जात सक्षमपणे उभे राहणाऱ्या प्रत्येकीचे कौतुक वाटते, असेही त्यांनी सांगितले.  

सन्मानाला उत्तर देताना कादंबरी शेख म्हणाल्या,  माणूस जन्माला एकटा येतो आणि एकटाच जातो; पण जीवनाच्या प्रवासात त्याला कुटुंबाची साथ लाभली, तर त्याचा सर्वांगीण विकास शक्य होतो. मात्र, एकल पालकांच्या मनातील एकटेपणाची भावना तेव्हाच संपते, जेव्हा अशा संस्था त्यांच्या पाठीशी कुटुंबाप्रमाणे उभ्या राहतात. आज बहुतांशी संवाद फक्त आभासी माध्यमांतूनच होताना दिसतो. अशा परिस्थितीत या कार्यक्रमासारख्या उपक्रमांतून प्रत्यक्ष भेटीगाठी, संवाद आणि माणुसकीची जाणीव निर्माण होते. माणसाने माणसाकडे माणुसकीच्या नजरेने पाहिलं पाहिजे. 

मीना कुर्लेकर म्हणाल्या, स्त्री जर स्वतंत्र विचार करायला शिकली, निर्भीड बनली, तर शिक्षण असून किंवा नसो ती खंबीर बनेल. स्वतः चे निर्णय स्वतः घ्यायला शिकली तसेच स्वतः विचार करायला शिकली, तर स्त्री आत्महत्या होणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. तृप्ती फाटक यांनी सूत्रसंचालन केले.  

ट्रेकिंगसाठी गेलेली तीन अल्पवयीन भावंडे परतीचा रस्ता चुकन डोंगरावर अडकले…पण पोलिसांनी …

पुणे-

लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत डोंगरावर हा प्रसंग काल घडला ,शुक्रवारी (ता.23) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास याबाबतची माहिती समजताच लोणी काळभोर पोलिसांनी तातडीने भर पावसात मुलांचा शोध घेऊन दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर मुलांची सुखरूप सुटका केली .

अनुष्का जीवन पवार (वय-16), नैतिक जीवन पवार (वय-14), व आर्यन गणेश गवानदे (वय-16, रा. गुजरात) अशी रस्ता चुकलेल्या मुलांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अनुष्का पवार व नैतिक पवार हे दोघे नात्याने सख्ये बहिण भाऊ आहेत. तर आर्थन गवानदे हा त्यांचा मावसभाऊ आहे. तिन्ही मुले ही सुट्ट्यांमध्ये त्याचे लोणी काळभोर येथील नातेवाईक नेहा भानुदास थोरात (वय-24, रा. जॉयनेस्ट सोसायटी, लोणी काळभोर) व उरुळी कांचन येथील सुनिल दत्तात्रय कांचन (वय – ३१) यांच्याकडे आले होते.

दरम्यान, अनुष्का, नैतिक व आर्यन यांचा रामदरा येथे ट्रेकिंगसाठी जाण्याचा प्लान ठरला. त्यानुषंगाने तिघेही रामदरा डोंगरावर ट्रेकिंगसाठी शुक्रवारी (ता.23) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गेले होते. डोंगरावर दोन तीन तास झाल्यानंतर अचानक पाऊस सुरु झाला. त्यातच अंधार पडायला लागला होता. डोंगरावरून घाईघाईने उतरताना त्यांचा रस्ता चुकला आणि तिन्ही मुले डोंगरावर अडकले.त्यानंतर मुलांनी रामदरा डोंगरावर रस्ता चुकून अडकल्याची माहिती पुणे शहर पोलिसांच्या कंट्रोल रूमला शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दिली. या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी, पोलीस अंमलदार मयुर बोरातके, वैभव खोत, प्रदीप गाडे व सोनवणे यांचे एक पथक तयार करून घटनास्थळी पाठवून दिले.पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा पावसाने जोर धरला होता. पोलीस फोनद्वारे मुलांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र फोन स्वीच ऑफ लागत होता. या परिस्थितीत पोलिसांनी डोक्यावर पावसाची रिमझिम झेलत, रात्रीच्या अंधारात टोर्चच्या सहाय्याने झाडी झुडपातून वाट करीत डोंगरावर निघाले होते. मुलांना आवाज देत डोंगर चढत होते. डोंगरावर दोन तास शोध घेतल्यानंतर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मुले डोंगरावर मिळून आले.

लोणी काळभोर पोलिसांनी तिन्ही मुलांना सुखरूप लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर पोलिसांनी मुलांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलाविले. तिन्ही मुलांना सुखरूप पालकांच्याकडे स्वाधीन केले.

‘राम गान’: काव्य, गायन, चित्ररूपी त्रिविध सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध !

…………भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांचे आयोजन

पुणे:

भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित ‘आविष्कार क्रिएशन्स, पुणे’ प्रस्तुत ‘राम गान’ या कार्यक्रमात रसिकांनी रामायणातील विविध प्रसंगांचा काव्य, गायन आणि चित्ररूपात आनंद घेतला.२४ मे २०२५ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता भारतीय विद्या भवन, सेनापती बापट रस्ता येथे हा कार्यक्रम झाला.

बंदिशकार व चित्रकार भाग्यश्री गोडबोले यांनी रामायणातील निवडक प्रसंगांवर रचना केलेल्या रागाधारी बंदिशींचे गायन आणि त्यावर आधारित त्यांच्याच चित्रांचे दृकश्राव्य प्रदर्शन सादर करून रसिकांना एक अद्वितीय अनुभव दिला. या कार्यक्रमात पं.अमोल निसळ, डॉ.सानिका गोरेगावकर,सावनी दातार, श्वेता कुलकर्णी आणि भाग्यश्री गोडबोले यांनी विविध रागांवर आधारित गायन सादर केले. कार्यक्रमाचे निवेदन डॉ. सुनील देवधर यांनी केले.

अमित जोशी (तबला), शुभदा आठवले (संवादिनी) आणि अंजली सिंगडे-राव (व्हायोलिन) यांनी उत्कृष्ट साथसंगत केली.भारतीय विद्या भवन पुणे केंद्र समितीचे सदस्य ग्रुप कॅप्टन सुहास फाटक, डॉ.जयश्री फिरोदिया, मोठ्या प्रमाणावर श्रोतु वर्ग उपस्थित होता. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकीर्डे यांनी प्रास्ताविक करून कलाकारांचा सत्कार केला.कार्यक्रमात सहभागी रसिकांनी सादरीकरणाची एकात्मता आणि कलात्मक सादरीकरणाची प्रशंसा केली.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमातील हा २४५ वा कार्यक्रम होता.प्रवेश विनामूल्य होता.या कार्यक्रमाला रसिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

पुढील वर्षी बाल पुस्तक जत्रेत सांस्कृतिक कार्य विभागाचा सहभाग- सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार

अ‍ॅड.आशिष शेलार यांची पुणे बाल पुस्तक जत्रेला भेट

पुणे, दि. २४: ‘पुणे बाल पुस्तक जत्रा’ सारख्या उपक्रमातून बालमनावर चांगले संस्कार होत असल्याने पुढील वर्षांपासून बाल पुस्तक जत्रेत सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांनी केले.

राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे महानगर पालिका, पुणे पुस्तक महोत्सव संवाद यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित ‘पुणे बाल पुस्तक जत्रा २०२५’ ला अ‍ॅड.आशिष शेलार यांनी भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार हेमंत रासने, महापालिका उपायुक्त पृथ्वीराज संचालक तथा पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, धीरज घाटे, संवाद संस्थेचे संस्थापक संचालक सुनील महाजन, चिंटूकार चारूहास पंडीत आदी उपस्थित होते.

अ‍ॅड.शेलार म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि इंटरनेटच्या युगात लहान मुलांच्या संवेदना जागृत रहाव्यात, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत आणि त्यांच्या गुणांचा विकास व्हावा यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन गरजेचे आहे. त्यामुळे सांस्कृतिक विभाग या बाल पुस्तक जत्रेचा अधिकृत सहयोगी होईल, राज्यात बालसंस्काराचे एक मॉडेल म्हणून हा उपक्रम ओळखला जाईल.

पुणे बाल पुस्तक जत्रेच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक करतांना ते म्हणाले, आज कुटुंब व्यवस्था मोडकळीस आली असतांना समाजासमोरच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी असे आयोजन उपयुक्त आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेला वास्तविक बुद्धिमत्तेची जोड दिल्याशिवाय प्रगती साधता येत नाही. मुलांमध्ये अशी बुद्धिमत्ता निर्माण करण्याची क्षमता बाल पुस्तक जत्रेत आहे. बालकांसाठी पुस्तके, खेळ, सांस्कृतिक देवाण घेवाण आणि इतिहासाची माहिती असे सर्व एकाच ठिकाणी पहिल्यानंतर उपक्रमाचे महत्व कळते आणि हे सर्व वातावरण आजच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अविश्वसनीय वाटते, अशा शब्दात अ‍ॅड.शेलार यांनी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.

महापालिका उपायुक्त पृथ्वीराज म्हणाले, पुणे महानगरपालिका स्थापनेचे ७५ वे वर्ष असल्याने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. बाल पुस्तक जत्रेला पहिल्याच वर्षी मिळालेला प्रतिसाद पाहता दरवर्षी हे आयोजन करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. राष्ट्रीय पुस्तक न्यासासाठी जागा महापालिकेने उपलब्ध करून दिली असून पुण्याला पुस्तकाची राजधानी करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात राजेश पांडे म्हणाले, महाराष्ट्रातील बाल पुस्तक जत्रेचा हा पहिलाच प्रयोग असून अडीच दिवसात २५ हजार मुलांनी भेट दिली. मुले जत्रेचा आनंद लुटत आहेत.राज्य शासनाचे सहकार्य असल्याने अशा कार्यक्रमांचे कार्यक्रम शक्य होते.

प्रारंभी मंत्री अ‍ॅड.शेलार यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेट दिली. मुलांचे खेळ पाहतानाच स्वत: त्यांनी विटी-दांडू हाती घेऊन खेळाचा आनंद घेतला. त्यांच्या हस्ते विविध बाल पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

काश्मीरमध्ये काहीतरी घडेल, पर्यटकांना मारतील हे आधीच बोललो होतो:ठाकरे आणि पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न-राज ठाकरेंचे खळबळजनक दावे

मुंबई-ठाकरे आणि पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न चालला आहे, असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. पण हे ब्रँड संपणार नाही, हे मी लिहून देतो, असेही त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले. तसेच राज ठाकरे यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याविषयी खळबळजनक दावा केला. मला गेले दीड, दोन वर्ष जे जाणवत होते काश्मीरबद्दल. काश्मीरमध्ये काही तरी मोठी घटना घडेल. पर्यटकांना मारतील. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण मी असे बोललो होतो, असे राज ठाकरे म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे रोखठोक शैलीत आपले मत व्यक्त करत असतात. आपल्या स्पष्ट बोलण्यामुळे आणि परखड भूमिका घेण्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत जाण्याबाबत भाष्य केले होते. आता त्यांनी ‘मुंबई तक’ वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत ठाकरे आणि पवार ब्रँड याबाबत विचारलेल्या प्रश्नावरही भाष्य केले आहे. तसेच पहलगाम हल्ल्याबाबत उपरोक्त दावा केला आहे.

नेमके काय म्हणाले राज ठाकरे?

दिल्लीमध्ये जेव्हा-केव्हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला जातो. तेव्हा दोन आडनावे प्रकर्षाने येतात ठाकरे आणि पवार. सध्याच्या परिस्थितीत या दोन्ही आडनावांचा जो ब्रँड आहे, तो संपवण्याचा प्रयत्न चाललाय का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, ठाकरे आणि पवार हे दोन ब्रँड संपवण्याचा प्रयत्न चालला आहे, यात काही वादच नाही. पण तो ब्रँड संपणार नाही मी हे लिहून द्यायला तयार आहे. आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचा महाराष्ट्रावर प्रभाव होता, त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंचा प्रभाव होता. संगीत क्षेत्राचा विचार केला, तर माझे वडील म्हणजेच श्रीकांत ठाकरेंचा प्रभाव दिसून आला. त्यानंतर माझा प्रभाव आहे, उद्धवचा आहे. व्यक्तिगत प्रभाव असतो पण आणखी एक गोष्ट महत्त्वाची असते. ती गोष्ट म्हणजेच आडनाव ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.

पहलगाम हल्ल्याबाबत राज ठाकरेंचा दावा काय?

काश्मीरमध्ये काही तरी मोठी घटना घडेल, असे मला गेले दीड, दोन वर्ष जाणवत होते, असे राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे हिंट दिली किंवा राज ठाकरेने सगळे सांगितले असे व्हायला नको होते म्हणून मी ही गोष्ट जाहीररीत्या कधी कुठे बोललो नव्हतो. पण तुम्हाला मी आता जे सांगतोय ते सत्य आहे. शपथपूर्वक सांगतोय.. गेले वर्षभर.. आमचे अनिल शिदोरे असतील किंवा.. इतर लोकं असतील. मी त्यांच्या भेटी घालून देईल तुम्हाला, असा दावा राज ठाकरे यांनी केला.

ते पुढे म्हणाले, अनेकांशी मी गेले वर्षभर बोलतोय.. की, काश्मीरमध्ये काही तरी मोठी घटना घडेल. तुमचा विश्वास नाही बसणार.. मी हे ही बोललो होतो की, पर्यटकांना मारतील. जे 370 कलम रद्द झाल्यानंतर काश्मीरमधील परिस्थिती होती. आपले लोकं तिकडे जात होते, खेळत होते.. सगळ्या गोष्ट होत होत्या.

मला गेले दीड, दोन वर्ष जे जाणवत होते काश्मीरबद्दलचे.. काय आहे की, शांतता आणि सन्नाटा यातील फरक तुम्हाला समजला पाहिजे. शांतता ही चांगली असते, सन्नाटा ही गंभीर गोष्ट असते. काश्मीरबद्दल मला जे जाणवत होतं तो सन्नाटा होता. त्यातून बाहेर काय-काय गोष्टी पडतील ते मला माहीत नाही. पण ज्या दिवशी ही घटना घडली. मी तुम्हाला आतापण मोबाइल फोन दाखवायला तयार आहे. अनिल शिदोरेंचा मेसेज आहे की, ‘तुम्ही बोललात तसे झाले’ त्या दिवशीचा मेसेज आहे त्यांच्याकडे, असे राज ठाकरे म्हणाले.

मी कोणी भविष्यवेत्ता नाही किंवा ज्योतिषी नाही. माझे काही ठोकताळे आहेत, माझे काही अंदाज आहेत. मला आतून काही वाटते की, या गोष्टी घडतील. मी त्या प्रकारे सांगतोय हे.. मी काही निवडणुकीसाठी बोलत नाही. माझ्यावर विश्वास ठेवा, असा दावा राज ठाकरे यांनी यावेळी केला आहे.