Home Blog Page 521

अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट:आमदार सुरेश धस यांच्याविरोधात दिले निवेदन

0

मुंबई- प्राजक्ता माळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली आहे. यावेळी प्राजक्ता माळीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देत आमदार सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची देखील मागणी करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे समजते.बीड येथे माध्यमांशी बोलताना आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नावाचा उल्लेख केला होता. इव्हेंट पॉलिटिक्स शिकायचे असेल तर बीडमधून शिका या संदर्भात बोलताना आमदार सुरेश धस यांनी काही अभिनेत्रींचा उल्लेख केला त्यात प्राजक्ता माळीचा देखील होता. यावरून प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत जाहीर माफी मागण्याचे आव्हान धस यांना केले आहे.

प्राजक्ता माळी यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्यांच्या सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल. त्यांच्या विरोधात यूट्यूबवर काही लोक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करत आहेत, अशी तक्रार त्यांनी केली आहे. त्या सर्वांवर कारवाई करण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

दरम्यान, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर टीका केली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवावा. कोणत्याही महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

आरोपी वाल्मीक कराडचे शेवटचे लोकेशन उज्जैनमध्ये, नंतर गायब,त्याच्यासह 4 फरार आरोपींची बँक खाती सील

0

मुंडेंचे मंत्रिपद वाचवण्यासाठी कराड शरण येणार

मुंबई-मस्साजोगच्या आवादा कंपनीस दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी आरोपी असलेला वाल्मीक कराड याच्यासह संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे अशा एकूण चार आरोपींची बँक खाती सीआयडीकडून गोठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचबरोबर आरोपींच्या पासपोर्टबाबतही कारवाई सुरू आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील ३ आरोपी २० दिवसांपासून फरार आहेत. त्याचबरोबर खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड अशा एकूण चार फरार आरोपींच्या तपासासाठी सीआयडीच्या ९ पथकांकडून देशभरात तपास केला जात आहे. आतापर्यंत १०० पेक्षा अधिक जणांची चौकशी केली आहे. आरोपींना मंत्री धनंजय मुंडे यांचे अभय असल्याचा आरोप करत विरोधकांनी शनिवारी बीडमध्ये भव्य मोर्चा काढला होता. त्यानंतर कारवाईला गती आली आहे.

वाल्मीक कराड याच्या अटकेसाठी सरकारवर मोठ्या प्रमाणावर दबाव वाढला आहे. धनंजय मुंडे यांचे मंत्रिपदही धोक्यात आले आहे. कराडला अटक झाल्याशिवाय या प्रकरणावर पडदा पडणार नाही. त्यामुळे कोणत्याही क्षणी त्याला बीडबाहेर शरण येण्यास भाग पाडले जाऊ शकते, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली.

११ डिसेंबरला खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आरोपी वाल्मीक कराड २० दिवसांपासून पोलिसांना सापडलेला नाही. गुन्हा नोंद झाला त्या दिवशी कराड हा मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये होता. विशेष म्हणजे या वेळी त्याच्यासोबत अंगरक्षक पोलिस कर्मचारीही होता. १३ डिसेंबरपर्यंत तो मध्य प्रदेशातच असल्याचे मोबाइल लोकेशनवरून स्पष्ट झाले, पण नंतर मोबाइल बंद झाल्याने त्याचा शोध लागलेला नाही. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातही वाल्मीक कराडवर संशय आहे. तो मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, सध्या सीआयडीकडून कराडच्या पत्नीची रविवारी दुसऱ्यांदा चौकशी केली.

पंधरा कॅबिनेट अन् 5 राज्यमंत्र्यांनी अजून मंत्रालयातील पदभारच स्वीकारला नाही, एकनाथ शिंदे गटातील मंत्र्यांची संख्या अधिक

0

राज्यमंत्री : माधुरी मिसाळ यांच्यासह पाच जणांची अजूनही मंत्रालयाकडे पाठ

माधुरी मिसाळ ( नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ) आशिष जयस्वाल (वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार)
पंकज भोयर : गृह ( ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म
मेघना बोर्डीकर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम).
इंद्रनील नाईक : उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद आणि जलसंधारण.
या मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही

गुलाबराव पाटील (पाणीपुरवठा व स्वच्छता)
दादाजी भुसे (शालेय शिक्षण)
उदय सामंत (उद्योग, मराठी भाषा)
जयकुमार रावल (पणन, राजशिष्टाचार)
अतुल सावे (इतर मागास, बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा)
शंभूराज देसाई (पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण)
आशिष शेलार (माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य)
माणिकराव कोकाटे (कृषी)
दत्तात्रेय भरणे (क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ)
शिवेंद्रसिंहराजे भोसले (सार्वजनिक बांधकाम- सार्वजनिक उपक्रम वगळून)
नरहरी झिरवाळ (अन्न व औषध प्रशासन , विशेष साहाय्य)
संजय सावकारे (वस्त्रोद्योग)
भरत गोगावले (रोजगार हमी, फलोत्पादन, खारभूमी विकास)
मकरंद जाधव (पाटील) (मदत व पुनर्वसन)
प्रकाश आबिटकर (सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट ३६ कॅबिनेट आणि ६ राज्य मंत्र्यांपैकी १९ जणांनी मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात येऊन पदभार स्वीकारला आहे, तर १५ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्र्यांनी विविध कारणांमुळे अद्याप थेट मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारलेला नाही, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाशी संबंधित सूत्रांनी दिली.

मंत्रालयाच्या राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या चर्चेनुसार काही मंत्र्यांनी त्यांच्या पसंतीचे खाते न मिळाल्याने पदभार स्वीकारण्यास जाणीवपूर्वक विलंब केला आहे. याशिवाय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे काही मंत्र्यांनी या आठवड्यात पदभार स्वीकारला नाही आणि आता सोमवारी पदभार स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रालय आणि विस्तारित इमारतीमध्ये स्थित बहुतांश मंत्र्यांच्या कार्यालयांच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे ३६ मंत्र्यांपैकी जवळपास निम्म्या मंत्र्यांनी अद्याप मंत्रालयात येऊन काम सांभाळू शकलेले नाहीत. मात्र, या मंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर आपापल्या विभागांशी संबंधित बैठका घेऊन कामाला सुरुवात केली आहे. दरम्यान, दुय्यम दर्जाचे खाते मिळाल्याने अनेक मंत्री हे नाराज असल्याची चर्चाही सध्या मंत्रालय परिसरात होत आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मातृशोक.

0

मातोश्री मीराबाई पटोले यांचे वृद्धापकाळाने निधन.

साकोली, दि. २९ डिसेंबर २०२४.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, साकोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नाना पटोले यांना मातृशोक झाला आहे. नाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे आज दि.२९ डिसेंबर २०२४ रोजी स.६ वाजता सुकळी येथे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ९० वर्षांच्या होत्या.

नाना पटोले यांच्या जडणघडणीत मोठा वाटा असलेल्या मीराबाई खूपच सोज्वळ स्वभावाच्या होत्या, त्यांच्या मनमिळावू स्वभावाने त्या कार्यकर्त्यांसाठी मातेसमान होत्या. नाना पटोले यांच्याकडे कोणत्याही कामाने येणार्‍या व्यक्तींची स्नेहाने व आपुलकीने विचारपूस करून त्यांचा आदर सत्कार करणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या निधनाने नाना पटोले यांच्याबरोबरच संपूर्ण कार्यकर्त्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मीराबाई पटोले यांच्या मृत्यूपश्चात दोन मुले, सूना, तीन मुली, जावई, नातवंडे असा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज रविवारी दुपारी २ वाजता साकोली तालुक्यातील मौजा सुकळी महालगांव या नाना पटोले यांच्या गृहगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह हजारो लोक उपस्थित होते.

व्हीव्हीपॅडच्या मतदानात छेडछाड करता येऊ शकते. पुण्यातील चर्चासत्रात सत्रात आरोप

पुणे –\नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मतांची झालेली चोरी संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवली आहे . या चोरीबाबत आणि एकूणच यंत्रणेच्या कारभाराबाबत थेट प्रात्यक्षिकही माध्यमातून सखोल चर्चा करण्यासाठी आज रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पुण्यात चर्चासत्राच्या आयोजन करण्यात आले होते. याचा चर्चा सत्रातील व्यक्तींनी निवडणूक आयोगाने एकूणच यंत्रणेच्या कारभारावर अनेक आक्षेप नोंदवले आहेत . सहभागी तज्ञांनी मतदानाच्या मशीन बरोबर व्हीव्हीपॅडच्या यंत्रणेतही छेडछाड करता येऊ शकते याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविले. दरम्यान सहा जानेवारीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पराभूत उमेदवाराकडून मुदतीची याचिका दाखल केली जाणार आहे पुण्यातील दी एंबेसेडर हॉटेल, जगताप डायनिंग हॉल जवळ, मॉडेल कॉलनी. या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान.. माजी खासदार वंदना चव्हाण माजी आमदार विद्या चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष माजी महापौर प्रशांत जगताप आदि उपस्थित होते . विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगा चे कोणत्याही प्रकारचे नियम पाळले नाहीत. सर्व नियम धाब्यावर बसवून ही निवडणूक घेण्यात आली आहे. असा गंभीर आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यापूर्वीच केली आहे. त्यामुळे हायकोर्टात याचिका दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान ६ जानेवारीच्या आधी सगळ्या उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र भरून घेतले जाणार आहे. व त्यानंतर ६ जानेवारी पर्यंत मुदत याचिका दाखल करण्यात येणार आहे. अशी माहिती यावेळी देण्यात आली.

पं. बबनराव हळदणकर यांना ‌‘स्वरआदरांजली‌’गानवर्धन आयोजित मैफलीत कविता खरवंडीकर, मानस विश्वरूप यांचे गायन

पुणे : राग देसी व राग गौड सारंगमधील कै. पं. बबनराव हळदणकार रचित बंदिशी, राग बहादुर तोडीमधील बडा ख्याल तसेच धमार, तराणा यांनी परिपूर्ण अशा विशेष मैफलीची मेजवानी आज (दि. 29) पुणेकर रसिकांना अनुभवयला मिळाली.
निमित्त होते आग्रा घराण्याचे थोर गायक आणि बंदिशकार कै. पंडित बबनराव हळदणकर स्मृतिप्रित्यर्थ गानवर्धन आणि पंडित बबनराव हळदणकर यांच्या शिष्यवर्गातर्फे आयोजित ‌‘स्वरआदरांजली‌’ या शास्त्रीय गायन मैफलीचे. मैफल लोकमान्य हॉल, केसरी वाडा येथे आयोजित करण्यात आली होती.
मैफलीची सुरुवात मानस विश्वरूप या युवा पिढीतील गायकाने राग बहादुर तोडीमधील बडा ख्यालातील ‌‘महादेव देवन पती पार्वती पती ईश्वरेश‌’ या बंदिशीने केली. यानंतर द्रुत लयीत त्यांनी ‌‘साजन की सावरी‌’ ही बंदिश सादर केली. अलवार आवाज, शुद्ध उच्चार, दमदार ताना आणि भावपूर्ण गायनाने त्यांनी रसिकांना आनंदित केले. धमार या गीत प्रकारातील ‌‘भिजो दयी सारी रंग मे आयो है अनोखे खिलाडी‌’ ही रचना सादर करून त्यांनी गायनाची सांगता केली.
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका कविता खरवंडीकर यांनी आपले गुरू पंडित बबनराव हळदणकर यांचे अस्तित्व आजही प्रत्येक मैफलीत जाणवते, असे सांगून मधुर अशा राग देसीमधील ‌‘अधिक मन आयो है‌’ ही रचना सादर केली. त्याला जोडून द्रुतमध्ये ‌‘म्हारो डेरे आवो‌’ ही बंदिश सादर केली. यानंतर गौड सारंग रागातील ‌‘तोरे कारण जागी हूँ निस दिन‌’ आणि द्रुत लयीत ‌‘मै तो लरूंगी लराई तो से सैय्या‌’ ही रचना ऐकविली. दमदार पण समधुर आवाज, उत्तम रागविस्तार आणि आवाजाची सहज फिरत ही वैशिष्ट्ये रसिकांना खूप भावली. खरवंडीकर यांनी मैफलीची सांगता करताना रसिकांच्या आग्रहास्तव ‌‘दीम्‌‍ तोम्‌‍ तान्न देरेना‌’ या तराण्याने केली. खरवंडीकर यांनी सादर केलेल्या सर्व रचना गुरू पंडित बबनराव हळदणकर यांनी रचलेल्या होत्या.
कलाकारांना धनंजय खरवंडीकर (तबला), उदय कुलकर्णी (संवादिनी), श्रुती खरवंडीकर (तानपुरा, सहगायन), धरित्री जोशी-बापट (सहगायन) यांनी समर्पकपणे साथ केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस गानवर्धन संस्थेतर्फे छत्रपती संभाजीनगर येथील युवा गायिका युगंधरा केचे हिला दहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती पंडित बबनराव हळदणकर यांच्या पत्नी उषा हळदणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. या वेळी बोलताना उषा हळदणकर म्हणाल्या, या माध्यमातून बुवांचे शास्त्रशुद्ध, भावपूर्ण गाणे पुढच्या पिढीत प्रवाहित होते आहे याचा आनंद आहे.
ज्येष्ठ शास्त्रीय गायिक शुभदा दादरकर यांनी शिष्या असलेल्या युगंधरा केचे हिने सुरुवातीस राग नटभैरव मध्ये ‌‘भोर भयी‌’ ही बंदिश सादर करून आपल्या गायन कौशल्याचे सादरीकरण उपस्थितांना दाखविले.
अरुण कशाळकर यांच्या हस्ते पंडित बबनराव हळदणकर लिखित आणि राज्य शासन पुरस्कारप्राप्त ‌‘जुळू पाहणारे दोन तंबोरे‌’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे तसेच ‌‘राग भेद आणि भावदर्शन‌’ या पुस्तकाचे प्रकाशन विद्या गोखले, दयानंद घोटकर, चंद्रशेखर महाजन, उषा हळदणकर, गौतम हळदणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
पंडित बबनराव हळदणकर यांचे ‌‘राग भेद आणि भावदर्शन‌’ हे पुस्तक गायकांना व रसिकजनांना विचार करायला प्रोत्साहित करेल तसेच ते प्रवर्तक बनेल अशी आशा ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित अरुण कशाळकर यांनी व्यक्त केली.
वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी ‌‘राग भेद आणि भावदर्शन‌’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले याचे समाधान आहे. या पुस्तकाच्या निर्मितीसाठी चंद्रशेखर महाजन यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे, असे गौतम हळदणकर म्हणाले.
मला लाभलेल्या गुरुंच्या सहवासामुळे पुस्तक निर्मितीला माझा हातभार लागला असून या पुस्तकाद्वारे गुरुजींचे विचार रसिकांपर्यंत पोहोचवायची इच्छा आहे, असे भाव पंडित बबनराव हळदणकर यांचे ज्येष्ठ शिष्य चंद्रशेखर महाजन यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष दयानंद घोटकर यांनी तर विश्वस्त डॉ. राजश्री महाजनी यांनी सूत्रसंचालन केले. कलाकरांचा सत्कार पंडित अरुण कशाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यंदा आव्वाज कोल्हापूरकरांचा …

पुरुषोत्तम करंडक महाअंतिम फेरीत ‌‘यात्रा‌’ची बाजी
‌‘कलम 375‌’ ठरली सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिका
पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत कोल्हापूरच्या देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सने सादर केलेल्या ‌‘यात्रा‌’ एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावित पुरुषोत्तम करंडकावर नाव कोरले. संघास पाच हजार एक रुपयांचे रोख पारितोषिक, प्रशस्तीपत्र आणि स्मृतीचिन्ह देण्यात आले. तर सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठी असलेला कुमार जोशी करंडक शहाजी विधी महाविद्यालयाने सादर केलेल्या ‌‘कलम 375‌’ या एकांकिकेने पटकाविला. या संघास रोख रुपये चार हजार एक, प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांच्या नावांची घोषणा होताच स्पर्धकांनी ‌‘गणपती बाप्पा मोरया‌’, ‌‘ज्योतीबाच्या नावाने चांगभलं‌’, ‌‘उद गं आई उद‌’ अशा आरोळ्या देत एकच जल्लोष केला. सांघिक प्रथम आणि प्रायोगिक एकांकिकेसाठी पारितोषिक पटकाविणाऱ्या कोल्हापूरातील संघांचा आवाज दणाणला.

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची महाअंतिम फेरी दि. 27 ते दि. 29 डिसेंबर या कालावधीत भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत एकूण 18 संघांनी सादरीकरण केले. स्पर्धेचा निकाल आणि पारितोषिक वितरण समारंभ आज (दि. 29) सायंकाळी भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला होता. स्पर्धेचे पारितोषिक वितरण सुप्रसिद्ध अभिनेते, पद्मश्री मनोज जोशी यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्रीय कलोपासकचे अध्यक्ष अनंत निघोजकर, परीक्षक सुषमा देशपांडे, अनिल दांडेकर, वैभव देशमुख मंचावर होते. स्पर्धेचा निकाल ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी जाहीर केला. सांघिक द्वितीय आलेल्या ‌‘पाटी‌’ या एकांकिकेस श्रीराम करंडक तर सांघिक तृतीय आलेल्या ‌‘देखावा‌’ या एकांकिकेस पंडित विद्याधर शास्त्री भिडे करंडक मिळाला.

परकाया प्रवेशासाठी भाषेवर प्रभुत्व हवे : मनोज जोशी

भारतीय रंगभूमीवरील पुरुषोत्तम योग म्हणजे पुरुषोत्तम करंडक स्पर्धा आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख करून मनोज जोशी स्पर्धकांशी संवाद साधताना म्हणाले, नाटक हे प्रत्येक कलेचे मिश्रण आहे. एकांकिका स्पर्धांना सिरिअलमध्ये जाण्याची पायरी मानू नका. अभिनयाच्या ताकदीतून रसोत्पत्ती निर्माण करण्यासाठी नाटक पाहणे, तालीअम करणे आणि सतत वाचत राहणे गरजेचे आहे. हे त्रिगुण साधल्यास संगीत, नेपथ्य बाजूला पडून अभिनयाच्याद्वारे कलाकार रंगभूमीवर यश प्राप्त करू शकतो. माझ्यासाठी नाटक हे नुसते गंगास्नान नव्हे तर प्राणवायू आहे. भारतात कुठेही अशा स्वरूपाची स्पर्धा आयोजित केली जात नसावी. त्यामुळे मुंबईत वाढलेल्या मला पुरुषोत्तम स्पर्धेत भाग घेता आला नाही याचे कायम दु:ख वाटत राहिल. आज-काल आपण समृद्ध भाषा विसरत चाललो आहोत. शब्द भांडार कमी होत आहे. अशा परिस्थितीत भाषा आणि संस्कृतीचे देणे-घेणे वाढविण्यासाठी मिळेल त्या साहित्यकृती वाचत राहा. भाषेचा प्रकार अवगत नसेल, त्याचे ज्ञान नसेल तर वाचिक अभिनय करणे शक्य नाही. तसेच भूमिकेत शिरण्यासाठी परकायाप्रवेश करताना भाषेवर प्रभुत्व असणे अत्यंत आवश्यक आहे. नाटकात काम करताना इमानदारीत काम करा, नटेश्वराला संपूर्ण समर्पित झाला तर तो नक्कीच प्रसन्न होतो. नाटकाचे संस्कार असल्यास पुढील आयुष्यात सांघिक शक्ती, समर्पण भाव, एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती वाढीस लागते आणि तुम्ही उत्तम माणूस बनता.

उत्तम संवादफेक आवश्यक : सुषमा देशपांडे

परिक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा देशपांडे म्हणाल्या, एकांकिकेची निवड करताना मुलांनी भरपूर वाचन केले पाहिजे. अनेक नाटके वारंवार बघितली पाहिजेत. यातून विषयाची निवड करणे सुकर होते. एकांकिका व्यक्त होण्याचे माध्यम म्हणून वापरा. नाटकातील प्रोजेक्शनचा अर्थ समजून घ्या. तंत्रावर अवलंबून न राहता शब्द, भावना पोहोचण्यासाठी उत्तम संवादफेक असणे आवश्यक आहे. नाटकाचा उपयोग व्यक्तिमत्त्व विकासाठी नक्कीच होतो.

स्पर्धेचा सविस्तर निकाल :
सांघिक प्रथम : यात्रा (देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर)
सांघिक द्वितीय : पाटी (विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बारामती)
सांघिक तृतीय : देखावा (न्यू आर्टस्‌‍, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, अहमदनगर)
सर्वोकृष्ट प्रायोगिक करंडक : कलम 375 (शहाजी विधी महाविद्यालय, कोल्हापूर)

वैयक्तिक पारितोषिके
सर्वोकृष्ट अभिनय : पुरुषोत्तम नारायण गाडकीळ करंडक : श्रद्धा रंगारी (सुवर्णा, पाटी, विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बारामती)
अभिनय नैपुण्य : दिशा फाऊंडेशन करंडक : पुरुष : सुजल बर्गे, (अरविंद, पाटी, विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बारामती)
अभिनय नैपुण्य : अरुणा जोशी करंडक : स्त्री : अक्षता बारटक्के (म्हातारी, यात्रा, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर)
सर्वोकृष्ट वाचिक अभिनय नैपुण्य : विश्वास करंडक : पार्थ पाटणे (घन:श्याम, यात्रा, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर)
सर्वोकृष्ट दिग्दर्शक : चैतन्य प्रणित करंडक : अभिषेक हिरेमठ स्वामी (यात्रा, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर)
अभिनय उत्तेजनार्थ पारितोषिके : नाव, भूमिका, एकांकिका, महाविद्यालय या क्रमाने
पवन पोटे (शंकर, देखावा, न्यू आर्टस्‌‍, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, अहमदनगर)
यश पत्की (सदा मोरे, बस क्र. 1532, म. ए. सो.चे गरवारे वाणिज्य महाविद्यालय, पुणे)
ओम चव्हाण (सुदामा, सखा, आय. एम. सी. सी. पुणे)
श्रेया माने (सई, व्हाय नॉट, राजाराम बापू अभियांत्रिकी महाविद्यालय, साखराळे, इस्लामपूर)
अथर्व धर्माधिकारी (राजाराम-बाप, देखावा, न्यू आर्टस्‌‍, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, अहमदनगर)
मानसी बोळूरे (व्यक्ती 2, कलम 377, शहाजी विधी महाविद्यालय, कोल्हापूर)
शांभवी सुतार (म्हातारी, होळयोनागरा, फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी)
समर्थ तपकिरे (दिल्या, पिंडग्रान, डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोल्हापूर)
सुमित डोंगरदिवे (मास्तर, फाटा, देवगिरी महाविद्यालय, नाट्य शास्त्र विभाग, संभाजीनगर)
तृती येवले (म्हातारी/लक्ष्मी, सखा, आय. एम. सी. सी. पुणे)

वा उस्ताद.. वा.. बहोत खूब.. अन दुमदुमला टाळ्यांचा नाद;गुरुबंधूंच्या सहवादनाची मैफल रंगली झकास..

तालायनच्या मैफलीस रसिकांची उत्स्फूर्त दाद
पुणे ता.२९: आपल्या गतिमान तबला वादनशैलीमुळे रसिकांच्या मनात अधिराज्य गाजविणारे पं. सुखविंदर सिंह नामधारी (पिंकी) आणि बनारस घराण्याची कला समर्थपणे पुढे नेणारे पं. अरविंदकुमार आझाद या दोन दिग्गज गुरुबंधूंच्या सहवादनाने रसिकांना काल मंत्रमुग्ध केले. 
निमित्त होते तालायन म्युझिक सर्कलतर्फे तबलासम्राट पद्मविभूषण पं. किशन महाराज आणि पद्मभूषण पं. सी आर व्यास आणि उस्ताद झाकीर हुसैन यांच्या स्मरणार्थ झालेल्या श्रद्धा सुमन मैफिलीचे. तबलाही तालाच्या भाषेत किती सुरेल अन् तितकाच अवखळ संवाद साधू शकतो, याची विलक्षण प्रचिती जणू काल रसिकांना आली. वा उस्ताद.. वा.. बहोत खूब.. अशी रसिकांची उत्स्फूर्त दाद त्यांच्या प्रत्येक प्रस्तुतीला लाभली. 
मैफिलीची सुरुवात सुखविंदर सिंह नामधारी यांचे शिष्य जसमीत चाना यांच्या एकल तबला वादनाने झाली. कॅनडास्थित चाना यांनी पुण्यात प्रथमच आपली कला सादर केली. परंपरेनुसार, कायदा, रेला, चक्रदार, पंजाबी तोडा आदी रचना अत्यंत तयारीने त्यांनी पेश केल्या. डग्गा-तबल्याचा योग्य समतोल, नेटके सादरीकरण यातून गुरुकडून आत्मसात केलेल्या ज्ञानाचा एक सुंदर आविष्कार त्यांनी रसिकांसमोर मांडला. बनारस घराण्याचे संस्थापक पं. राम सहायजी, पं. किशन महाराज, पं. कंठे महाराज यांच्या रचना सादर करत त्यांनी रसिकांची मने जिंकली. त्यांना सुधीर टेकाळे(संवादिनी) यांनी समर्पक साथ दिली.  त्यानंतर पं. सुहास व्यास यांचे सुमधूर गायन झाले. त्यांनी राग ‘मारवा’ सादर केला. ‘गुरुजन बिन’ ही ख्याल पेश करत त्यांनी आपल्या घराण्याच्या गायकीचे सौंदर्य उलगडले. प्रेक्षकांशी संवाद साधताना त्यांनी पं. किशन महाराज यांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रत्येक कलाकाराने इतर कलावंतांचा तसेच त्यांच्या कलेचा आदर करावा, असा मौलिक सल्लाही त्यांनी यावेळी दिला. यमन रागातील झपताल प्रस्तुत करत त्यांनी आपल्या सादरीकरणाची सांगता केली. त्यांची खुली व भावपूर्ण गायन शैली रसिकांना भावली. त्यांना माधव लिमये (संवादिनी), आदित्य देशमुख (तबला), आनंद बेंद्रे आणि केदार केळकर (तानपुरा) यांची सुरेल साथ लाभली. पं. राजन साजन मिश्रा यांचे सुपूत्र आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं.रितेश मिश्रा व पं. रजनीश मिश्रा देखील यावेळी आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पं. सुखविंदर सिंह नामधारी (पिंकी) आणि पं. अरविंदकुमार आझाद यांचे सहवादन झाले. त्यांनी तीन ताल प्रस्तुत केला. त्यांच्या विलंबित, मध्य आणि द्रुत लयीच्या बहारदार प्रस्तुतीने रसिकांना खिळवून ठेवले. संवादिनी आणि सारंगीच्या मंजूळ सुरावटींशी लय साधत या दोन दिग्गजांची तबल्यावर थिरकणारी जादूई बोटे वादकांच्या दीर्घ रियाजाची साक्ष देऊन गेली. प्रत्येक तालातील ध्वनी तरंगांनी कधी रोमांच उभा केला तर कधी हळूवारपणे रसिकांच्या मनाला साद घातली. त्यांनी प्रथमच केलेले सहवादन ही रसिक पुणेकरांसाठी पर्वणी ठरली. संदीप मिश्रा (सारंगी), सुधीर टेकाळे (संवादिनी) त्यांना समर्पक साथ दिली. 

 नि:शब्द करणारे सादरीकरण: पं. रितेश-पं. रजनीश मिश्राआपला नियोजित कार्यक्रम लवकर आटपून पं. सुखविंदर सिंह आणि पं. अरविंदकुमार आझाद यांचे सहवादन ऐकण्याच्या उत्कंठेने पं. रितेश मिश्रा व पं रजनीश मिश्रा सभागृहात आले. त्यांचे सहवादन पूर्ण होताच दोन्हीही बंधूंनी रंगमंचावर जाऊन त्यांची भेट घेतली. तुमच्या सादरीकरणाने आम्हाला नि:शब्द केले आहे, अशी दाद देत त्यांना शुभेच्छा दिल्या.

सरहद महाविद्यालयात मराठी गझल संमेलन – गझलगुंजनला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे-गझल आणि कविता म्हणजे जीवनाची मीमांसा असते, जीवनासंबंधीची प्रतिक्रिया असते, जीवनावर केलेले भाष्य असते. गझल लेखनातून जीवनानुभूतीचे प्रतिबिंब दिसावे. गझल म्हणजे केवळ सुख – दुःख नसते तर त्यातून जीवनच वाहत असते, असे मत व्यक्त करुन संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ गझलकार रमण रणदिवे यांनी मराठी गझल सादरीकरणातून वेगवेगळे पैलू सादर केले. डॉ. अविनाश सांगोलकर व अशोक भांबुरे प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते. आपल्या गझलांद्वारे त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. गझलकार श्रीकांत वाघ, सुधीर कुबेर, साजन पिलाने, मीना शिंदे, प्राजक्ता पटवर्धन, विजया देव यांनी देखील गझल सादरीकरणाद्वारे रसिकांची मने जिंकली.
सरहद, पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त घेण्यात येणाऱ्या ९८ कार्यक्रमांच्या अंतर्गत सरहद महाविद्यालयाच्या मराठी विभाग आणि मराठी वाड्मय मंडळातर्फे ‘मराठी गझल संमेलन- गझलगुंजन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कला शाखा व मराठी विभाग प्रमुख डॉ.वंदना चव्हाण यांनी अमृत राय, मोरोपंत, माधव जुलियन, सुरेश भट, रमण रणदिवे, डॉ. अविनाश सांगोलकर,अशोक भांबुरे यांनी लिहिलेले शेर सादर करुन गझल या काव्य प्रकाराचे स्वरूप, वाटचाल व महत्त्व सांगितले तसेच विद्यार्थ्यांना मराठी गझल या काव्य प्रकारामध्ये अभिरुची निर्माण व्हावी, या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, हे प्रास्ताविकामधून मांडले. कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये स्वरगंधार संस्थेचे संस्थापक गोपाळ कांबळे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या प्रसंगी सरहद संस्थेच्या सचिव सुषमा नहार, कांतीलाल नहार, अभय नहार, विश्वस्त शैलेश वाडेकर, अनुज नहार, प्रशांत तळणीकर, माजी प्राचार्य डॉ. हनुमंतराव जाधवर, प्राचार्य डॉ. संगीता शिंदे, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. श्रीराज भोर व प्रा. संगीता घुगे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. स्वप्ना थोरगुले यांनी केले.

भौगोलिक बंधनात न अडकता कवीने व्यक्त होणे गरजेचे : भारत सासणे

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे श्याम खामकर यांना भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार प्रदान

पुणे : आत्मसंवाद होतो तेव्हा काव्य निर्माण होते. शब्दांशी खेळणे म्हणजे गझल नाही. अस्वस्थ मनावर मात करण्यासाठी कविता, गझल उपयुक्त ठरते, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माझी अध्यक्ष भारत सासणे यांनी केले. चिंतनशील आणि प्रामाणिक लेखक-कवींना व्यक्त होण्यसाठी भौगोलिक बंधने आड येत नाहीत. त्याने व्यक्त होणे आवश्यक असते, असेही त्यांनी सूचित केले.
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे मराठीतील आद्य शायर भाऊसाहेब पाटणकर यांच्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध कवी, गझलकार श्याम खामकर (खडकवाडी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) यांचा भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्काराने आज (दि. 29) गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण भारत सासणे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. सिने-नाट्य अभिनेत्री, कवयित्री भाग्यश्री देसाई यांची विशेष उपस्थिती होती. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर मंचावर होत्या.
साहित्यिकाचा स्वसंवाद महत्त्वाचा असतो असे सांगून भारत सासणे पुढे म्हणाले, आपले काव्य किती लोकांपर्यंत पोहाचते आहे, किती लोक ऐकत आहेत याचा भयगंड बाळगू नये.
कलाकार हे सुंदरतेचे प्रवासी असतात असे सांगून भाग्यश्री देसाई म्हणाल्या, उपजीविकेनंतर जीविकेमागे लागणे महत्त्वाचे असते. जीविका करणारे फार कमी असतात. लोकांना आनंद देत सुंदरतेच्या वाटेवरून नेणे हे कलाकाराचे काम असते.
साहित्य संमेलनाच्या मंचावर गझलकारांना संधी का मिळू शकत नाही असा प्रश्न श्याम खामकर यांनी या वेळी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, गझल या प्रकाराकडे निखळपणे पाहणारे फार कमी आहेत. या काव्य प्रकाराला दुय्यम स्थान दिले जाते. अभ्यासक्रमामध्येही फारच कमी गझलकारांना स्थान मिळत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
सुरुवातीस ॲड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविकात रंगत-संगत प्रतिष्ठानच्या कार्याची ओळख करून दिली. मान्यवरांचा परिचय तनुजा चव्हाण, मानपत्राचे वाचन पल्लवी पाठक तर सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आयोजित गझल मुशायरा कार्यक्रमात प्रमोद खराडे, नचिकेत जोशी, डॉ. मंदार खरे, सुनिती लिमये, नूतन शेटे, कविता क्षीरसागर, चंचल काळे, डॉ. मृणालिनी गायकवाड, स्वाती यादव, उर्मिला वाणी, डॉ. मृदुला कुलकर्णी-खैरनार, प्रभा सोनवणे, स्वप्नील पोरे यांचा सहभाग होता. सूत्रसंचालन कांचन सावंत यांनी केले.

“पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यशोदामाई राष्ट्रीय पुरस्कार” २०२५ जाहीर

  • डॉ. प्राजक्ता गिरीश कुलकर्णी, अहिल्यानगर आणि जीवन आनंद संस्था, सिंधुदुर्ग यंदाचे मानकरी

पुणे : ज्येष्ठ समाजसेविका आणि अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेण्यासाठी व्यक्तिशः आणि संस्थात्मक स्वरूपात ‘पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यशोदामाई राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. यंदाचे हे तिसरे वर्ष असून डॉ. प्राजक्ता गिरीश कुलकर्णी, अहिल्यानगर आणि जीवन आनंद संस्था, सिंधुदुर्ग यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शनिवार, ४ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे होणाऱ्या या पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्षस्थान मा. न्यायमूर्ती शिवकुमार डिगे, उच्च न्यायालय, मुंबई भूषविणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. कृष्ण प्रकाश (महाराष्ट्र पोलीस प्रमुख, फोर्स वन, मुंबई) आणि मा. श्री. रवी नगरकर (व्यवस्थापकीय संचालक, कल्याणी टेक्नोफोर्ज लि.,पुणे) हे उपस्थित राहणार आहेत.पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि रुपये ५१,००० चा धनादेश असे आहे.

डॉ. प्राजक्ता गिरीश कुलकर्णी (संचालक, स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र, अहिल्यानगर ) यांनी दत्तक विधानाच्या माध्यमातून अनाथ बालकांचे पुनर्वसन आणि अल्पवयीन मातांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी गेल्या २२ वर्षांपासून अपार मेहनत घेतली आहे. त्यांच्या अथक कार्यामुळे अनाथ बालकांना आणि दुर्बल महिलांना नवा आधार मिळत आहे.

जीवन आनंद संस्था, सिंधुदुर्ग ही २०१३ पासून रस्त्यावरील वंचित, निराधार, वयोवृद्ध, आणि मानसिक रुग्णांसाठी कार्यरत आहे. संस्थापक मा. श्री. संदीप परब यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था अन्न, वस्त्र, निवारा, आणि वैद्यकीय मदतीच्या माध्यमातून गरजूंसाठी आधारस्तंभ ठरत आहे.

या पुरस्काराबाबत माहिती देताना माईंच्या कन्या ममता सिंधुताई सपकाळ (अध्यक्षा,सप्तसिंधु ) म्हणाल्या, “माईच्या प्रेरणादायी जीवनातून समाजसेवेची भावना जागृत व्हावी आणि त्यांच्या कार्याचा वारसा पुढे न्यावा, या उद्देशाने हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. समाजाच्या तळागाळात जाऊन प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना सन्मानित करणे ही माईंच्या कार्याला खरी श्रद्धांजली आहे. या पुरस्काराने त्यांना नवी ऊर्जा मिळेल आणि समाजासाठी अधिक समर्पक कार्य करण्यास प्रेरणा मिळेल. पुरस्कार निवड कमिटीमध्ये मी स्वतः ,श्री दिपकदादा गायकवाड आणि विनय सिंधुताई सपकाळ यांच्या एकत्र विचार विनिमयातूनच ही नावे निश्चित करण्यात आली आहेत.”

माईंच्या कार्याचा वारसा पुढे नेताना ममता सिंधुताई सपकाळ यांनी सांगितले की, “ममता बाल सदन (सासवड), सन्मती बाल निकेतन (मांजरी), मनःशांती छात्रालय (शिरूर), सावित्रीबाई फुले वसतिगृह (चिखलदरा) या चार ठिकाणी संस्थेचे कार्य सुरू आहे. सुमारे ३१० मुले-मुली येथे शिक्षण घेत आहेत. तसेच वर्धा येथील गोपिका गो रक्षण केंद्रामध्ये २१८ भाकड गाईंचा सांभाळ केला जात आहे. माईंचा त्याग आणि समर्पण या प्रेरणादायी वारशाला अधिक विस्तार देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन माई परिवारातर्फे ममता सिंधुताई सपकाळ यांनी केले आहे.

अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी ‘विजयस्तंभ सुविधा’ ॲप

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, दि.२९: पेरणे फाटा येथे १ जानेवारी विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायींना तेथील सुविधांची माहिती मिळावी यासाठी जिल्हा परिषदेने ‘विजयस्तंभ सुविधा’ उपयोजक (ॲप) तयार केले असून त्याचे उद्घाटन शनिवारी (दि. २८) सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले.

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीदरम्यान हे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ, प्र. समाज कल्याण आयुक्त प्रवीण पुरी, प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पुणे शहर पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था तथा बार्टीचे महासंचालक सुनील वारे, समाज कल्याण सहआयुक्त सुरेंद्र पवार, प्रमोद जाधव, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आदी उपस्थित होते.

पेरणे येथे दरवर्षी लाखोंच्या संख्येने अनुयायी येत विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी येत असतात. शासनाच्यावतीने त्यांना बससेवा, आरोग्य सेवा, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, शौचालय सुविधा, निवारा कक्ष, पिण्याचे पाणी, पोलीस मदत कक्ष आदी विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. या सुविधांपर्यंत अनुयायांना लवकरात लवकर पोहोचता यावे व त्यांचा लाभ घेता यावा यासाठी ‘विजयस्तंभ सुविधा’ ॲप तयार करण्यात आले आहे.

हे ॲप https://initiatorstechnology.com/VijayStambhSuvidha.apk
या लिंकवरून डाउनलोड करून मोबाईलमध्ये इन्स्टॉल करावे लागेल. या ॲपमध्ये अनुयायांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व सुविधांचे गुगल लोकेशन मॅपिंग करण्यात आले आहे. त्यामुळे ॲपवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आवश्यक त्या सुविधा निवडल्यास त्या सुविधेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग गुगल मॅपवर दिसतो व इच्छित सुविधेपर्यंत पोहोचणे सोपे जाते, अशी माहिती प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी यावेळी दिली.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपी अद्यापही फरार,आरोपींच्या मालमत्ता जप्तीस सुरुवात:मुख्यमंत्र्यांनी दिले सीआयडीला आदेश

0

मालमत्ता जप्तीच्या आदेशावर धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी फरार आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत, मात्र आरोपींना स्वतःचे राहायला घर नाही. त्यांच्या काय मालमत्ता जप्त करणार? असा प्रश्न उपस्थित करीत आमचा माणूस गेलाय, तुम्ही माणूस परत देऊ शकत नाहीत. आम्ही फक्त न्याय मागतोय, न्याय द्या. असे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सांगितले.

बीड-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींचीह संपत्ती जप्त करण्याचे आदेश सीआयडीला दिले होते. सीआयडीने या प्रक्रियेस सुरुवात केली असल्याचे समजते.संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार असलेल्या तीन आरोपींच्या मालमत्तेची माहिती गोला करण्याचे काम सीआयडीने सुरू केले आहे. त्यानुसार आता प्रशासनाने आरोपींच्या मालमत्तेचा शोध घेणे तसेच माहिती गोला करत त्यावर जप्तीची कारवाई करण्यास सुरुवात केली असल्याचे दिसत आहे. या प्रकरणातील सुदर्शन घुले (26), कृष्णा आंधळे (27), सुधीर सांगळे, अशी तीन आरोपींची नावे आहेत.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराडवर गंभीर आरोप करणे सुरू आहे. वाल्मीक कराडवर खंडणीचा देखील गुन्हा दाखल असून सध्या फरार आहे. सीआयडीने त्याच्या पत्नीची चौकशी देखील केली होती. याच सोबत सीआयडीने राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या शहराध्यक्षाची देखील चौकशी केली होती. त्यामुळे या प्रकरणाला गती मिळाली असून लवकरच आरोपींना ताब्यात घेतले जाऊ शकते.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील बीडमधील गुन्हेगारी तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठे सत्यशोधक आंदोलन सुरू केले आहे. तसेच वाल्मीक कराड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याच सोबत अंजली दमानिया यांनी वाल्मीका कराड व धनंजय मुंडे यांच्या समर्थकांचे बंदूक घेऊन असलेले फोटो व व्हिडिओ देखील शेअर केले आहेत.

अजित पवारांचा बारामतीत 20 हजार मतांनी पराभव:राज्यातील 150 मतदारसंघात गडबड- उत्तम जानकरांचा दावा

सुप्रीम कोर्ट भेदरलेल्या अवस्थेत,निवडणूक आयोग यांनी नेमलेल्या शिपायासारखे-उत्तम जानकर म्हणाले की, निवडणूक आयोग यांनी नेमलेल्या शिपायासारखे काम करतो. तर सुप्रीम कोर्ट हे भेदरलेल्या अवस्थेत आहे. परंतू या सगळ्याविरोधात लढणार आहोत. पुढील 4 महिन्यात लोकमताचे नसलेले हे सरकार जमीनदोस्त झालेले दिसेल अशी आम्ही तयारी केली आहे.

पुणे-अजित पवार यांचा बारामती मतदारसंघात 20 हजार मतांनी पराभव झाला आहे, राज्यातील विधानसभा निवडणुकीत 150 मतदारसंघात गडबड झाल्याचा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे.दरम्यान उत्तम जानकर पुढे बोलताना म्हणाले की, अजित पवार यांचे केवळ 12 आमदार या राज्यात निवडून आले आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे 18 तर भाजपचे 77 आमदार निवडून आले आहे. त्यांची सर्वांची संख्या मिळून 107 चा आकडा आहे.

उत्तम जानकर म्हणाले की, राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यासमवेत लवकरच निवडणूक आयोगाकडे या प्रकरणी आम्ही जाणार आहोत. विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांचे 12, तर एकनाथ शिंदे आणि भाजपचे, असे 107 मतदार निवडून आले आहेत.उत्तम जानकर म्हणाले की, जयकुमार गोरेंच्या मतदारसंघात एकास 5 अशी सेटिंग करण्यात आली होती. त्यांना 1 लाख 3 हजार मते आहेत. त्यांची जवळपास 30 हजार मते विरोधी उमेदवारांची आहे. ते 13 हजार मतांनी पडले आहे. मी या सर्व प्रकरणाचा अभ्यास करत आहोत.उत्तम जानकर म्हणाले की, या सरकारने राजीनामा द्यायला पाहिजे तुम्ही द्यायला तयार नसाल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. माझ्या मतदारसंघात पोटनिवडणूक घेतली पाहिजे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यात मराठा समाज आक्रमक .

राज्य चालविण्यास असक्षम मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – पुणे मराठा आंदोलन .

गेला वाल्मिकी कुणीकडे ? – मराठा आंदोलकांचा सवाल

पुणे, दि. २९ – सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे, धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हाकालपट्टी करा, बीड चा बिहार करायचा आहे का ? वाल्मिकी कराड ला शोधण्यास सरकार असक्षम आहे का ? आदी मागण्या सकल मराठा समाज अखिल नवीपेठ, सदाशिव पेठ विभागातर्फे करण्यात आल्या.
सरपंच देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मराठा समाजातर्फे नवी पेठ येथील गांजवे चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.
देशमुख हत्या प्रकरणात २० दिवस उलटूनही अद्याप वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली नाही. कराडला तात्काळ अटक करावी, गुन्ह्यातील दोषींना फाशी द्यावी, धनंजय मुंडे यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करा, राज्यात हत्या, महिलांवर होणारे अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने सामान्य मानसांच्या मनात भीती आहे. त्यामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यात असमर्थ ठरेलेले मुख्यमंत्री , गृहमंत्री यांनी राजिनामा द्यावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
शासनाने गुन्हेगारांना आमच्या ताब्यात द्यावे, आम्ही त्यांचा योग्य बंदोबस्त करू, अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलनात सहभागी महिलांनी दिली. तर शासनाने गुन्हेगारांना कठोर शिक्षा केली नाही, तर संपुर्ण ‘महाराष्ट्र बंद’ आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. यावेळी दिलेल्या ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणांनी नवी पेठ परिसर दणाणून गेला होता.
यावेळी अनंत घरत, निरंजन गुंजाळ, दिनेश भिलारे, अनिकेत गायकवाड, अनिल वांजले, शेखर पवार, केदार मानकर, प्रसाद काकडे, संजय साळवी, सुर्यकांत पवार, अमित काळे, धनंजय देशमुख, निलेश निगडे, गणेश मपारी, गणेश नलावडे, सागर काकडे, प्रशांत कुरुमकर, युवराज दिसले, सचिन वडघुले, श्रीकांत मेमाणे, अतुल धर्मे, गणेश ठोंबरे, कामिनी मेमाणे, मंजुषा देशमुख, मिलन पवार, दिलिप बेंद्रे, मुकुंद ढमाले, दिलीप पोमन, किशोर जाधव, अंकुश चोरगे, मोहन दातीर, सुमित बांदल, गोरख कदम, सचिन पाचंगे, गणेश वायाल, रोहन सांडभोर, किरण शिंदे, संजय चव्हाण, सचिन भारेकर, ओंकार मालुसरे, आदित्य बालघाटे, साहिल रावडे, सोमनाथ आवळे, दिलीप गळींदे, विलास नावडकर, नारायण दिघे, मच्छिंद्र उत्तेकर, संतोष हत्ते, प्रसाद भगत, दादू ठोंबरे, दादा भिलारे, अतुल रोकडे, रवींद्र मेमाणे, अनंता भगत, दिलीप लोळगे, आदी मराठा सेवक उपस्थित होते.