Home Blog Page 520

अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि करुणा मुंडेंचीही महिला आयोगाकडे आहे तक्रार -रुपाली चाकणकर

पुणे- अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने केलेली तक्रार राज्य महिला आयाेगास ईमेलद्वारे प्राप्त झाली आहे. याबाबत संबंधित पोलिसांना चाैकशी करुन त्याबाबत कार्यवाहीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल आयाेगास सादर करण्याचे सूचना दिल्या आहे, अशी माहिती राज्य महिला आयाेगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकारांना दिली आहे.त्याच बरोबर करुणा मुंडे यांच्यादेखील तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारी या पुण्यातील येरवडा पोलिस स्टेशन व संगमनेर पोलिस स्टेशन यांच्या हद्दीतील हाेत्या. नवीन पक्ष स्थापन करण्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेऊन दाेनजणांनी फसवणुक केल्याची तक्रार घेतली आहे. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात आली. येरवडा येथे काेणीतरी त्यांच्यावर अश्लील शेरेबाजी केली त्याबाबत करुणा मुंडे यांना कारवाई करुन न्याय दिला गेला. त्यांची तिसरी तक्रार धनंजय मुंडे यांच्याबाबत असून ती मी न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने त्यात आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही असे चाकणकर यांनी सांगितले.

चाकणकर म्हणाल्या,’ महाराष्ट्रात काम करणाऱ्या महिलांची संख्या सुमारे ३५ टक्के आहे. कामाच्या ठिकाणी सुरक्षा मिळविण्यासाठी आम्ही समितीच्या माध्यमातून उपाययाेजना राबवत आहे परंतु त्यात आम्हाला फारसे यश अद्याप मिळाले नाही. समितीकडे तक्रार नाेंदवणे, व संबंधित आराेपीकडून आणखी त्रास हाेईल यामुळे महिला तक्रारीस पुढे येत नाही. विविध क्षेत्रात महिला कार्यरत राहून अग्रेसर राहत आहे. परंतु साेशल मिडियाच्या माध्यमातून महिलांचे चारित्र्य हनन तक्रारी वाढल्या आहे. मागील तीन वर्षात आयाेगाकडे ३० हजार ७५५ तक्रारी प्राप्त झाल्या त्यापैकी ३० हजार ३४७ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहे. ४०८ कारवाईसाठी हाेत्या व त्यावर मागील दाेन महिन्यात कारवाई करण्यात आली आहे.

चाकणकर म्हणाल्या, साेशल मिडियाच्याद्वारे एखाद्या महिलेचे किंवा तिच्या कुटुंबाचे फाेटाे माॅर्फ करुन अश्लील पाेस्ट करुन टीआरपी वाढविण्यासाठी वेगवेगळे कॅप्शन देऊन युटयुबद्वारे प्रसारित केले जातात. यामध्ये संबंधित कुटुंब व व्यक्तीवर विपरीत परिणाम हाेताे व सदर महिलेचे चारित्र्य हनन हाेते यामुळे नैराश्यातून आत्महत्येचे घटना घडत आहे. त्यामुळे यावर अंकुश बसणे गरजेचे आहे. अभिव्यक्ती विचारस्वातंत्र्य म्हणजे एखाद्या व्यक्तीचे आयुष्य उध्दवस्त करणे, चारीत्र्य हनन करणे हे अपेक्षित नाही. याबाबत सायबर शाखेकडून कारवाई करण्यात यावी. डिजीटल माध्यमातून काेणतीही युटयुबचे टीआरपी वाढावे यासाठी दिशाभूल मजकूर प्रसारित केला जाताे त्यास कारवाई करुन आगामी काळात आळा बसेल. सायबर सुरक्षाबाबत राज्य महिला आयाेग विविध महाविद्यालय, शाळेत जाऊन जनजागृती करत आहे. आमच्याकडे येणाऱ्या तक्रारी लवकर निकाली काढण्यात येत आहे.

नववर्षांच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त-जयस्तंभ अभिवादनाला 10 लाख अनुयायी येणे अपेक्षित:पोलिस आयुक्तांची माहिती

नववर्षांच्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबरला पुणे पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. त्याअनुषंगाने सर्वच पोलीस ठाण्यातंर्गत बंदोबस्त तैनात केला असून, शहरभरात ३ हजारांवर पोलीस अमलदारांसह अधिकारी दक्ष राहणार आहेत. त्यासोबत ८०० वाहतूक अमलदार, अधिकारी तैनात केले आहेत. प्रामुख्याने शहरभरातील २७ महत्वाच्या ठिकाणांवर ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह पॉइंट केले आहेत. त्यानुसार बेशिस्त वाहन चालक, मद्यपी चालकांविरूद्ध दंडात्मक कारवाईसह प्रसंगी वाहन जप्तीचीही कारवाईचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.अमितेश कुमार म्हणाले, राज्य शासनाच्या आदेशानुसार पोलिसांकडून विविध नियमांची अमलंबजावणी केली जाणार आहे. त्यापार्श्वभूमीवर हॉटेल पब, बार मालकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अल्पवयीनींना मद्याची विक्री न करणे, वेळेचे बंधन पाळणे महत्वाचे आहे. तसेच पबमधील संगीताचा आवाज इतरांना त्रासदायक ठरणार नाही, याचीही संबंधितांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

पुणे-जयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी पुणे पोलीस सज्ज झाले असून, अनुयायींच्या सुरक्षिततेसाठी तब्बल ५ हजार पोलीस अमलदार, एक हजार होमगार्ड, ४१४ पोलीस अधिकारी, १३२ पोलीस निरीक्षक, ४५ एसीपी, १६ उपायुक्त, ३ अपर आयुक्त असा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच आपत्कालीन घटना रोखण्यासह ३०० सीसीटीव्ही आणि दहा व दोन मोबाईल सर्विलन्स व्हॅन याद्वारे मॉनिटरींगच्या माध्यमातून बारीक गोष्टींवर लक्ष देण्यासाठी विशेष प्राधान्य दिल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त मनोज पाटील, अपर आयुक्त अरविंद चावरिया उपस्थित होते.

पेरणे फाटा परिसरातील जयस्तंभ सोहळ्यासाठी देशभरातील लाखो अनुयायी १ जानेवारीला दाखल होतात.त्यापार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी दक्षता घेतली आहे. जागोजागी कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून, विविध पथकांकडून सुरक्षिततेसाठी विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य करण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफची पथके तैनात केली आहेत. जागोजागी पोलीस मदत केंद्र, वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत. त्यासोबतच सोहळ्यासाठी आलेल्या अनुयायींच्या वाहन पार्विंâगसाठी मोठ्या जागेची उपलब्धता करण्यात आली आहे.कोणत्याही प्रकारे गर्दी अडचण होणार नाही यादृष्टीने सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आले आहे. ४५ पार्किंग ठिकाणे निश्चित करण्यात आली असून त्यात ३० हजार कार आणि ३० हजार दुचाकी पार्किंग व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. वाहन तळापासून ६५० सार्वजनिक बसेसच्या माध्यमातून अनुयायींची जयस्तंभापर्यंत ने-आणची मोफत सोय करण्यात आली आहे.चोरी घटना रोखण्यासाठी विशेष पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे. सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नसल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

पुजारी यांच्या कविता मनाचा व नात्यांचा शोध घेणाऱ्या -शेखर गायकवाड


निवृत्त वनाधिकारी रामदास पुजारी यांच्या ‌‘खोल मनाच्या तळाशी‌’ कवितासंग्रहाचे प्रका

पुणे : “सरकारी नोकरी दीर्घकाळ करूनही ज्यांनी संवेदनशीलता जपली आहे, असे वनाधिकारी रामदास पुजारी यांच्या संवेदनशीलतेचे प्रतिबिंब त्यांच्या कवितेत दिसते. त्यांच्या कविता म्हणजे मनाचा व नात्यांचा शोध घेणाऱ्या आहेत”, असे उद्गार यशदाचे अतिरिक्त महासंचालक आणि लेखक शेखर गायकवाड यांनी येथे काढले.

निमित्त होते निवृत्त वनाधिकारी रामदास पुजारी यांच्या ‌‘खोल मनाच्या तळाशी‌’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशनाचे. गायकवाड यांच्यासह बालभारतीचे संचालक डॉ. कृष्णकुमार पाटील तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या कवितासंग्रहाचे प्रकाशन वनभवन, गोखलेनगर येथील सभागृहात झाले. निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. शेषराव पाटील, कवी रामदास पुजारी, साहित्यविश्व प्रकाशनाचे विक्रम शिंदे, पुजारी यांच्या परिवारातील सदस्य व्यासपीठावर होते. मुख्य वनसंरक्षक (प्रा.) पुणे व कुंडल वनप्रबोधिनीचे महासंचालक एन. आर. प्रवीण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

शेखर गायकवाड म्हणाले, पुजारी यांनी वनविभागातील सरकारी नोकरी करत असताना कवितासंग्रहांचे प्रकाशन करून सरकारी विभागातील रूक्षता स्वतःमध्ये येऊ दिली नाही. गणितासारखा विषय, वनविभागातील जबाबदारी, फिरत्या स्वीकारूनही त्यांनी संवेदनशीलता जपली आहे. सरकारी नोकरीत असणाऱ्या अनेकांनी लिहिते राहिले पाहिजे आणि वेगळे अनुभवविश्व मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे माझे सांगणे आहे. पुजारी यांनी कवितासंग्रहाचे प्रकाशन करून ते सिद्ध केले आहे, हे उल्लेखनीय आहे.

डॉ. कृष्णकुमार पाटील म्हणाले, बालभारती प्रत्येक घरातला घटक आहे. पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार आणि वाचन आदर्श उभे करण्याचा प्रयत्न अभ्यासमंडळे करत असतात. पुजारी यांच्या कवितेतही संस्कार करण्याचे सामर्थ्य दिसते.

डॉ. शेषराव पाटील म्हणाले, पुजारी यांनी आपल्या कवितांमधून शेतकऱ्यांचे कष्ट मांडले आहेत. तसेच नात्यांविषयी भाष्य केले आहे. त्यांचे भावविश्व उलगडणाऱ्या या कविता आहेत.

पुजारी यांनी निवृत्त झाल्यावर न थांबता दुसरी खेळी जणु सुरू केली आहे. त्यांच्यातील शिक्षक पुन्हा कार्यरत झाला आहे आणि कवितासंग्रहाच्या निमित्ताने कवीही लिहिता झाला आहे, हे विशेष वाटते. त्यांनी यापुढेही लिहीत राहावे, अशा शब्दांत एन. आर. प्रवीण यांनी अध्यक्षीय समारोप केला.

मनोगत मांडताना कवी रामदास पुजारी यांनी आपली जडणघडण, संस्कार करणारे गुरूजन, कुटुंबीय, स्नेही आणि संघर्षाचे दिवस उलगडले. आई, वडील, गुरू हे श्रद्धेचे तर शेतकरी, निसर्ग, वृक्ष हे सारे जिव्हाळ्याचे विषय आहेत. नात्यांविषयीचे कुतूहल जागे असल्याने नात्याविषय़ीच्या कविता लिहिल्या गेल्या तर काही कविता प्रसंगानुरूप सुचत गेल्या, असे ते म्हणाले.
साहित्यविश्व प्रकाशनाचे विक्रम शिंदे यांनी आभार मानले तर अनिता देशपांडे व सुनीता पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

शिक्षणाला नैतिकतेची गरज -महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर

लिटमस फाउंडेशन तर्फे आदर्श सेवा व आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा
पुणे : व्यक्तिमत्व विकास झालेला माणूसच समाजाला दिशा देऊ शकतो, अशी माणसे शिक्षकच घडवू शकतात, परंतु शिक्षकांना जर नैतिकता नसेल तर त्या शिक्षणाचा काहीही अर्थ नसतो. आज केवळ शिक्षणाची गरज नाही तर शिक्षणाला नैतिकतेची गरज आहे, असे मत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले.
लिटमस फाउंडेशन तर्फे आदर्श सेवा व आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा नवी पेठेतील पत्रकार भवन च्या सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी माजी आमदार उल्हास पवार , अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त गिरीश हूकरे, ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत देशमुख, जेष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. सुधाकरराव आव्हाड  आदी यावेळी उपस्थित होते. 
लिटमस फाउंडेशन तर्फे अमोल परदेशी, संतोष मोरे, अभिलाष कदम आदीनी काम बघितले. कार्यक्रमाचे आणि पाहुण्याचे स्वागत प्रियांका परदेशी यांनी केले. अनिल बेलकर यांनी फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली , कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहित माने यांनी सादर केले, तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन फाउंडेशनचे अभिलाष मोरे यांनी मानले.
ऍड.सुधाकरराव आव्हाड म्हणाले, देशाला आज राज्यकर्त्यांची नव्हे तर अर्थतज्ज्ञांची गरज आहे. विचारशील तरुण चांगला समाज घडवू शकतात, त्यासाठी शिक्षक आणि शाळांची समाजाला गरज आहे. उल्हास पवार म्हणाले, मोबाईल आणि लॅपटॉप सारख्या तंत्रज्ञानाच्या तुरुंगामध्ये आज माणूस अडकला आहे. या तुरुंगातून बाहेर पडून या माणसाने समाजामध्ये वावरले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने समाज प्रगती पथावर जाऊ शकेल.

अशोक वानखेडे म्हणाले, आज सर्वाधिक जबाबदारी ही शिक्षकांवर आहे. परंतु दुर्दैवाने सर्वाधिक दुर्लक्षित घटकही शिक्षकच आहेत. देश आपला आहे ही भावना तरुणांमध्ये निर्माण केली पाहिजे. या देशांमध्ये संविधानानुसार काम सुरू राहिले पाहिजे यासाठी पत्रकारांनी दक्ष राहिले पाहिजे.
 श्रीकांत देशमुख म्हणाले, तरुणांमध्ये अस्वस्थता वाढली तरच देशांमध्ये चळवळ निर्माण करू शकतो. इतिहासाच्या नायकांना खलनायक बनवण्याचे काम सध्या सुरू आहे ही प्रवृत्ती बंद झाली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

आदर्श सेवा पुरस्कार प्रसन्न जगताप, संजय शहा, निशा भोसले, प्रदीप सिंग ठाकूर, जयंत येलुलकर, गणेश निंबाळकर, पप्पू गुजर यांना ,युवा उद्योजक पुरस्कार विनीत देसाई, विकास काळे यांना प्रदान करण्यात आला. क्रीडा रत्न पुरस्कार श्रद्धा वाल्हेकर, कल्याणी जोशी यांना, तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार राजेंद्र पाटील, राजेंद्रसिंग परदेशी, वैशाली बांगर, रत्नमाला कांबळे, मानसी बुवा, कुसुम खेडकर, संजीवनी दौंड ,राहुल इंगळे, धायबर निवेदिता  आदींना सन्मानित करण्यात आले.

वाहतूक कोंडीवर रडार बेस तंत्रज्ञानाचा उपाय:पोलिस आयुक्त अमितेश कुमार

मोक्कातील गुन्हेगारांवर करडी नजर-गेल्या काही वर्षात पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) शहरातील गुंड टोळ्यांवर कारवाई केली. टोळ्यांमधील ७०० जण जामीन मिळवून बाहेर आले आहेत. काही जण जामीन मिळवण्यासाठी प्रयत्नात आहेत. झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात आली आहे. स्थानबद्ध केलेले सराईत कारागृहात बाहेर पडले आहेत. शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणणारे, तसेच गंभीर गु्न्हे करणाऱ्या सराइतांवर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई वेळोवेळी करुन योग्य ती समज देण्यात येणार आहे. अल्पवयीन मुलांमधील गुन्हेगारी चिंतेचा विषय आहे. त्यांचे समुपदेश करणे, त्यांच्या पालकांशी संवाद साधण्याच्या सूचना पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

पुणे- शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी लवकरच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर (रडार बेस टेक्नॉलाॅजी) करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत तज्ञांसोबत सन्मवय साधण्यात आला आहे. एखाद्या भागात वाहतुकीचा वेग किती आहे, कोणती वाहने प्रवास करतात याचे वर्गीकरण करणे आणि वाहतूक सुरळीत आहे का नाही याबाबतची माहिती समजण्यास मदत होणार आहे. ही माहिती मिळाल्यास पोलिसांनी वाहतूक कोंडीची ठिकाणी समजू शकतील. वाहतूक कोंडीची ठिकाणे निश्चित करणे, प्रमुख चौकातील सिग्नल यंत्रणेचे सुसुत्रीकरण, तसेच वाहतूक सुरळीत ठेवून पुणेकरांचा सुरक्षित प्रवास सुरक्षित कसा होईल. यादृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी सांगितले.

कुमार म्हणाले, पुणे शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे. रस्ते अपघातात बळी पडणाऱ्यांची संख्या वाढती आहे. मात्र, गेल्या दोन ते तीन वर्षांची रस्ते अपघाताची आकडेवारी विचारात घेतल्यास यंदा गंभीर स्वरुपाच्या रस्ते अपघातांची संख्या जवळपास २० ते २५ टक्क्यांनी कमी झाली आहे. पोलिसांनी शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. महापालिका, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), महमेट्रोच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

पुण्यातील वाहतूक कोंडी, त्याअनुषंगाने निर्माण होणाऱ्या समस्या सोडविण्यास यापुढील काळात प्राधान्य देण्यात येणार आहे.पुणे शहराचा विस्तार वाढत आहे. शहरातील सर्व सिग्नलचे सुसुत्रीकरण करण्याची योजना मांडण्यात आली आहे. याबाबत राज्यशासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव लवकरच मंजूर होईल. शहरात सध्या १५०० कॅमेरे आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आणखी २८०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी होणारे प्रमुख चौक, रस्ते, उपरस्ते निश्चित करण्यात आले आहेत. या भागातील कोंडी दूर करण्यासाठी पोलिसांकडून विविध यंत्रणांशी समन्वय साधण्यात येणार आहे.

हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करणे हाच भाजपचा अजेंडा-नितेश राणेंनीसर्व मर्यादा ओलांडल्या – बाळासाहेब थोरात

केरळ मिनी पाकिस्तान आहे,राहुल आणि प्रियांका गांधी यांना मतदान करणारे अतिरेकी आहेत -या नितेश राणे यांच्या वक्तव्यामुले देशभर संताप

पुणे- कॉंग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष आणि माजी मंत्री ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आज नितेश राणे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याबद्दल संताप व्यक्त केला आहे . हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करणे हाच भाजपचा अजेंडा असल्याचे यामुळे स्पष्ट झाले असून मंत्री होऊनही घेतलेल्या शपथेचे पावित्र्य भंग करणाऱ्या नितेश राणेंनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

केरळ सारख्या राज्याला मिनी पाकिस्तान म्हणणे, राहुल आणि प्रियांका गांधी यांना मतदान करणारे दहशतवादी असे हिणवणे हे उद्योग फक्त भाजपचे मंत्री करू शकतात! काही सकारात्मक करू शकत नसले की भाजप नेते हिंदू मुस्लिम, भारत पाकिस्तान हाच अजेंडा राबवतात. पण मंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीने सार्वजनिक रित्या बोलताना, वागताना भान बाळगले पाहिजे पण नितेश राणे यांनी सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत!

जितकी जास्त बाष्कळ बडबड तितकी जास्त प्रगती हे समीकरण भाजपमध्ये असल्याने मंत्री महोदयांनी पुन्हा एकदा तारे तोडले आहेत. पण मुख्यमंत्र्यांनी किमान आपल्या सहकाऱ्याला समजूत द्यावी, ही भाषा, हे वर्तन योग्य नाही, मंत्र्यांनी आपल्या पदाचे ग्रहण करताना शपथ घेतली आहे याची तरी आठवण ठेवावी आणि समाजात तेढ वाढणार नाही असे वर्तन करू नये!

नितेश राणेसारख्या व्यक्तीला मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार आहे का? हे भाजपाने स्पष्ट करावे :- अतुल लोंढे.

धर्मांधता व द्वेषाच्या राजकारणामुळे महाराष्ट्राची देशात पिछेहाट.

मुंबई, दि. ३० डिसेंबर २०२४
देशाची एकता व अखंडता राखण्याची शपथ घेऊन मंत्री झालेले नितेश राणे केरळला भारताचा पाकिस्तान म्हणतात आणि भारतीय जनता पक्षाला मतदान न करता काँग्रेस व इतर विरोधी पक्षांना मतदान करणाऱ्यांना दहशतवादी म्हणतात, अशा व्यक्तीला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे का? हे राष्ट्र प्रथम म्हणणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे स्पष्ट करावे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री नितेश राणे यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेत प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, नितेश राणे सारख्या व्यक्तीकडून काय अपेक्षा करणार? पण आमचा प्रश्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे की, आजच प्रसिद्ध झालेल्या व्यक्तीगत खर्चाच्या आकडेवारीमध्ये महाराष्ट्राला बिहार व उत्तर प्रदेशच्या बरोबर नेऊन ठेवले आहे. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश व तेलंगणा ही गैरभाजपा शासित राज्ये यात दुपटीने आघाडीवर आहेत. शहर व ग्रामीण भागातील लोक जास्त कमावतात व जास्त खर्च करण्याची क्षमता ठेवतात हे सरकारचे आकडे आहेत. भाजपाने महाराष्ट्रात धर्मांधता व द्वेषाचे विष पेरल्याने राज्याची ही अवस्था झाली आहे म्हणूनच, कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? असा प्रश्न विचारावा लागत आहे.

राज्यात सर्वात जास्त बेरोजगारी व महागाई आहे, शेतमालाला भाव नाही, एक जात दुसऱ्या जातीविरोधात लढवली जात आहे, हिंदू मुस्लीम तणाव वाढत आहे, रोज खून, बलात्कार होत आहेत. याला कारण धर्मांधता व द्वेषाचे राजकारणाच जबाबदार आहे. मंत्री नितेश नारायण राणे यांचे विधान महाराष्ट्राची प्रतिमा कलंकित करणारे असून भाजपा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर खुलासा करावा, असेही अतुल लोंढे म्हणाले.

३१ डिसेंबरच्या तोंडावर बनावट दारू प्रकरणी १ कोटी २० लाखाहून अधिक किंमतीचा ऐवज जप्त

पुणे- विटभट्टी साठी लागणाऱ्या कोळशाच्या पावडरच्या आडून व फ्रूट पल्प च्या पॅकींग च्या नावाखाली अवैध गोवा बनावट मद्याच्या ट्रक राज्य उत्पादन शुल्क सासवड विभाग तसेच भरारी पथक क्र ०३ यांनी छापा मारून पकडल्या तसेच प्रवासी लक्झरी बस मधून होणाऱ्या मद्याच्या तस्करीचा पर्दाफाश केला. या कारवाईत सुमारे १ कोटी २० लाखाहून अधिक किंमतीचा मुद्देमाल उत्पादन शुल्क विभागाने जप्त करून ९ जणांना अटक केली आहे.
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी ,सहआयुक्त प्रसाद सुर्वे (द.व. अं) यांचे आदेशान्वये पुणे विभागाचे विभागीय उप-आयुक्त सागर धोमकर, अधीक्षक चरणसिंग बी. राजपुत , उपअधीक्षक संतोष जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त बातमीच्या अनुषंगाने, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सासवड विभाग, पुणे या पथकाने दि.२९/१२/२०२४ रोजी फक्त गोवा राज्यात विक्रीकरीता असलेल्या मदयावर महाराष्ट्रात येथे धडक कारवाई केली. नाताळ व नववर्षाच्या स्वागत समारंभाच्या पार्श्वभूमीवर अधिक प्रमाणात मद्य पार्थ्यांचे आयोजन केले जाते या कालावधी मध्ये कर बुडवून आणलेल्या विदेशी मद्य परराज्यातील मद्य बनावट मद्य यांवर नियंत्रण आणण्या साठी पुणे जिल्ह्यात पथके तयार केलेलि आहेत त्या अनुषंगाने निरीक्षक राज्य् उत्पादन शुल्क् सासवड विभाग, पुणे या पथकाने मोहिम राबवुन, मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार दि.२९/१२/२०२४ रोजी संशईत वाहनाची तपासणी केली असता त्या मध्ये गोवा बनावटी मद्याचे ०३ बॉक्स मिळून आले . चालकास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सांगितल्याप्रमाणे नसरापूर येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला असता तिथे एक इसम तिथे उभ्या असलेल्या अशोक लेलंड ट्रक या गाडीतून गोवा बनावटी मद्याचे बॉक्स गाडीतून उतरून गोडाऊन मध्ये ठेवत होता त्यास ताब्यात घेऊन सदर ट्रक व पत्र्याचा शेड ची तपासणी केली असता ट्रक मध्ये विटभट्टी साठी लागणाऱ्या कोळशा ची पावडर आणि गोवा बनावटी चे विविध ब्रांड च्या विदेशि मद्यचे बॉक्स तसेच पत्रा शेड मध्ये थर्माकोल च्या बॉक्स मध्ये गोवा बनावटीचे मद्य मिळून आले. सदर मद्य थेर्मकॉल बॉक्स मध्ये पकींग करून फ्रुट पल्प चा नावा खाली गुजरात व इतरत्र पाठवण्यासाठी पॅकींग केले जात असल्याचे आढळून आले. तेथील सर्व मद्याचा साठा, सुझुकी ग्रांड विटारा चार चाकी अशोक लेलंड सहा चाकी ट्रक, गोवा बनावटी चे विविध ब्रान्ड चा विदेशि मध्याच्या १७१० बाटल्या (११६ बॉक्स) व इतर असा एकूण रु ५१,९५१७० चा मुद्देमाल जप्त करून ०४ आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (ए) (ई), ८०, ८१, ८३,९०, १०३ व १०८ अन्वये सासवड विभागाने गुन्हा रजि नं. ३३८/२०२४ दि २९/१२/२०२४ नुसार गुन्हा नोंद केला.
सदर कारवाईत निरीक्षक एस. एस. बरगे, दुय्यम निरीक्षक पी.एम. मोहिते, .एस.सी. शिंदे, तसेच स.दु.नि. संदिप मांडवेकर, जवान सुनील कुदळे, दत्तात्रय पिलावरे, अंकुश कांबळे, ऋतिक कोळपे, , बाळू आढाव, यांनी सहभाग घेतला. सदर गुन्हयाचा पुढील तपास श्री.पी. एम. मोहिते दुय्यम निरीक्षक राज्य् उत्पादन शुल्क् सासवड विभाग, बीट क्र.०२ पुणे हे करीत आहेत. असे निरीक्षक संभाजी बरगे यांनी सांगितले पुढील तपास चालू आहे.
तसेच दुसऱ्या एका कारवाईत दि.२९/१२/२०२४ रोजी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र.३, पुणे या पथका मार्फत निगडी गावचे हद्दीत पवळे ब्रिज खाली भक्ती शक्ती चौक पुणे देहु रोडवर ता. हवेली, जि. पुणे येथे गोवा राज्यात विक्री करीता असलेले विदेशी मद्य व बिअर असा एकुण रु. १,३४,२३०/- किंमतीचा मद्य साठा एका सहा चाकी निळ्या रंगाच्या लक्ष्मी क्वीन ट्रॅव्हल कंपनी असे नाव असलेल्या खाजगी प्रवासी वाहतुक बस क्र. एमएच १२ व्ही दी ९३४५ या बस मधुन वाहतुक करताना वाहनचालक यांना ताब्यात घेवून जप्त करण्यात आला आहे. सदरचा मद्यसाठा हा खडकी औंध रोड खडकी स्टेशन जवळ या ठिकाणी वितरीत करणार असल्याने त्या ठिकाणी जाऊन मद्यासह एकूण ०५ आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्यासोबतचा २ दुचाकी वाहने व एक सहा चाकी बस जप्त करण्यात आली आहे. यामध्ये विदेशी दारुच्या ७५० मि.ली. क्षमतेच्या १२६ सिलबंद बाटल्या, बडवायझर बिअर ५०० मि.ली क्षमतेच्या २४ सिलबंद बाटल्या. सदर गुन्हयामध्ये असा एकुण रु. ६८, ३७,७३०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ), (ई), ८१, ८३, ९०, १०३, १०८ अन्वये गुन्हा क्रमांक. १६२/२०२४ दिनांक. २९/१२/२०२४ नोंद करण्यात आलेला आहे. त्याचा पुढील तपास निरीक्षक, राउशु, भरारी पथक क्रमांक. ३ हे करत आहे.
असा एकूण दोन्ही गुन्ह्यातील मिळून एकूण रु 12032900/- (एक कोटी वीस लाख बतीस हजार नऊशे) एवढ्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे तसेच विदेशी मद्याचा 1668 बाटल्या व ५ वाहने जप्त करण्यात आलेली आहेत.

१ वर्षापूर्वी काम पूर्ण, तरीही अग्निशामक केंद्र बंदच .. आयुक्तासाहेब लक्ष द्या हो … अमोल बालवडकर

पुणे-बाणेर येथील “अग्निशामक केंद्र” तातडीने सुरु करा अशी मागणी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी आयुक्तांना लेखी निवेदन देऊन केली आहे.
मौजे बाणेर येथील स.नं.६६ येथे पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉ.लि. यांच्या माध्यमातून अग्निशामक केंद्र उभारण्यात आलेले आहे. सदर अग्निशामक केंद्राचे काम सुमारे १ वर्षापूर्वी पूर्ण होऊन हे केंद्र पुणे महानगरपालिकेला हस्तांतरित देखील केले गेलेले आहे. २ अग्निशामक गाडी क्षमता असलेले हे अग्निशामक केंद्र अजूनही बंद अवस्थेत आहे.
बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुस-म्हाळुंगे हा भाग अतिशय झपाट्याने वाढत असताना या भागातील गृहनिर्माण संस्था, लोकवस्ती तसेच लोकसंख्या देखील वेगाने वाढत आहे. लाखोंच्या संख्येने लोक या भागात राहत आहेत. या परिसरातील नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी हे अग्निशामक केंद्र तातडीने सुरु होणे गरजेचे आहे. या भागात उंच इमारती (हाय राईज बिल्डींग) असून या भागाकरिता अत्याधुनिक अशा उंच शिडीच्या २ अग्निशामक गाड्या (फायर वेहिकल) आणि तसेच अधिकारी व कर्मचारी यांची आवश्यकता आहे. तरी या गोष्टी तातडीने उपलब्ध करून हे अग्निशामक केंद्र सुरु करावे.
या बाबतचे निवेदन नगरसेवक श्री.अमोल बालवडकर यांनी आयुक्तांना प्रत्यक्ष भेटून दिले. यावर तातडीने तरतूद उपलब्ध करून देऊन हे “अग्निशामक केंद्र” लवकरच सुरु करण्यात येईल असे आयुक्तांनी आश्वस्त केले.

आयुक्तसाहेब … FC रोडवरील अतिक्रमणांचा कायमचा बंदोबस्त करा हो – संदीप खर्डेकर

पुणे- महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांना भाजपचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी … आयुक्त साहेब … FC रोडवरील अतिक्रमणांचा कायमचा बंदोबस्त करा हो – असे कळकळीचे आवाहन केले आहे.

या संदर्भात त्यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि,’तरुणाईचे आवडते ठिकाण म्हणजे ना. गोपाळकृष्ण गोखले पथ ( फर्गयुसन रस्ता ). येथे सणासूदीला,शनिवार रविवार तर गर्दी चा उच्चांक असतोच पण इतर दिवशी देखील नागरिक व पर्यटकांनी रस्ता गजबजलेला असतो. ह्या रस्त्यावरच्या पदपथावरील अतिक्रमण, स्टॉल, खोकी टाकून व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध शहरातील अनेक संस्था, संघटना, जागरूक पुणेकर, वृत्तपत्र सर्वांनी आवाज उठविला आहे. मी देखील 2/3 वेळा आंदोलन, निदर्शने केली आहेत व वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रारी देखील केल्या आहेत.मात्र येथील अतिक्रमणकर्ते आणि प्रशासन यांचे नाते येवढे घट्ट आहे की येथे तात्पुरती कारवाई होते आणि पुन्हा पहिले पाढे पंचावन्न !!
काल येथे पाहणी केली असता पदपथा लगत भरपूर स्टॉल दिसून आले…. हे कमी की काय तर बहुतांश इमारतींच्या साईड मार्जिन, फ्रंट मार्जिन, पार्किंग च्या जागेत व अन्यत्र पत्र्यांच्या शेड उभारून आतल्या आत भरपूर दुकाने थाटल्याचे निदर्शनास आले.अगदी चिंचोळ्या जागेत फॅब्रिकेशन करून, लोखंडी जिने उभारून ही दुकाने थाटली आहेत. 2/3 ठिकाणी तर इतकी गर्दी आणि कच्ची शेड ठोकून तेथे फॅशन मार्केट ची उभारणी बघितली आणि अंगावर काटा आला. चुकून एखादा अपघात घडला तर कोणाच्याही वाचण्याची सूतराम शक्यता नाही.”Seeing is Believing” आज उद्याच वेळ काढून बघा, सोबत अतिक्रमण आणि बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना देखील न्या.
ह्या सर्वांना मनपा ची परवानगी आहे का ? असल्यास कोणत्या नियमानुसार ? काही ठिकाणी जागा मालकाने सीमाभिंत म्हणून उभारलेल्या पत्र्यांवर कपडे लटकवून त्यावर व्यवसाय चालू आहे. माहिती घेतली असता ह्या स्टॉल धारकांचे प्रकरण म्हणे न्याय प्रविष्ट आहे.अश्या बाबतीत प्रशासन, मनपा चा विधी विभाग काय करतोय याची माहिती देखील उघड करावी ही विनंती.
ह्या रस्त्यावर जगप्रसिद्ध फर्गयुसन महाविद्यालय, रानडे इन्स्टिट्युट,हॉटेल वैशाली,लगतच्या रस्त्यावर बी एम सी सी, आय एम डी आर, गोखले इन्स्टिटयूट, मराठवाडा महाविद्यालय अश्या अनेक प्रतिष्ठित संस्था आहेत.
एकीकडे परदेशात असते तसे गुडलक चौकात कलाकार कट्ट्यावर कलेचे प्रदर्शन करणारे, त्याभोवती गर्दी करणारे दर्दी पुणेकर आणि दुसरीकडे हे भयानक बेकायदेशीर चित्र !!आता परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी सावरा हा पसारा आणि प्रामाणिकपणे कायमस्वरूपी कठोर कारवाई करा अशी आग्रही मागणी करत आहे.असे संदोप खर्डेकर यांनी म्हटले आहे.

सह्याद्रि हॉस्पिटल मध्ये करण्यात आली पुण्यातील पहिली रोबोटिक-असिस्टेड हिप सर्जरी

अतुलनीय अचूकतेने करण्यात येणारी आणि रुग्णांना सुधारित परिणाम मिळवून देणारी क्रांतिकारी प्रक्रिया

पुणे, ३० डिसेंबर, २०२४: सह्याद्रि हॉस्पिटल्सने डायरेक्ट ऍन्टेरियर अप्रोच वापरून पुण्यातील पहिले रोबोटिक-असिस्टेड हिप रिप्लेसमेंट यशस्वीपणे करून ऑर्थोपेडिक सर्जरीमध्ये क्रांतिकारी यश नोंदवल्याची घोषणा केली आहे. साताऱ्याचे रहिवासी असणारे, ६५ वर्षांचे सेवानिवृत्त, श्री ज्ञानेशराव प्रधान (नाव बदलण्यात आले आहे) यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांना हिपचे अवस्क्युलर नेक्रोसिस झाल्याचे निदान झाले होते ज्यामध्ये मांडीच्या हाडाचे टिश्यू अपुऱ्या रक्तपुरवठ्यामुळे कमजोर होतात.

सह्याद्रि हॉस्पिटल्समधील कन्सल्टन्ट ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ अभिजित आगाशे यांच्या तज्ञ देखरेखीखाली, २७ नोव्हेंबर २०२४ रोजी ही सर्जरी करण्यात आली आणि ऑपरेशननंतर तब्येतीमध्ये उत्तम सुधारणा होत असल्याची खात्री झाल्यावर, श्री प्रधान यांना २ डिसेंबर २०२४ रोजी घरी पाठवण्यात आले. रिअल इंटेलिजन्स रोबोटिक सिस्टिम आणि डायरेक्ट ऍन्टेरियर अप्रोच यांचा वापर करून अतुलनीय अचूकता व सुरक्षिततेसह सर्जरी करून या क्षेत्रात नवे मापदंड रचले आहेत.

डॉ अभिजित आगाशे यांनी या क्रांतिकारी तंत्राच्या लाभांविषयी माहिती दिली, ते म्हणाले, हिप रिप्लेसमेंटच्या पारंपरिक पद्धतींच्या तुलनेमध्ये रोबोटिक-असिस्टेड डायरेक्ट ऍन्टेरियर अप्रोचमुळे अधिक अचूक  कमी इन्व्हेसिव्ह सर्जरी करता येते. रुग्णांना कमी वेदना सहन कराव्या लागतात, तब्येत वेगाने सुधारते आणि सर्जरीनंतर कमी वेळात अधिक नैसर्गिक हालचाली करता येतात. या तंत्रामुळे रुग्णांना सर्जरीनंतर मांडी देखील घालून बसता येते. हिपच्या समस्यांनी पीडित असलेल्या रुग्णांसाठी हे विशेष लाभदायक ठरते. या पद्धतीचे अधिक चांगले फंक्शनल परिणाम मिळतात, इतकेच नव्हे तर सर्जरीनंतर लगेचच हालचाली करता येतात, एव्हीएन हिपच्या रुग्णांची जीवन गुणवत्ता लक्षणीय प्रमाणात सुधारते.”

डॉ आगाशे पुढे म्हणाले, “रोबोटिक सिस्टिम आणि डायरेक्ट ऍन्टेरियर अप्रोच यांचा मिलाप सांधे बदलण्याच्या सर्जरीमध्ये झालेली लक्षणीय प्रगती दर्शवतो. ऑपरेशनच्या आधीची माहिती रोबोटिक सिस्टिममध्ये फीड करण्याच्या क्षमतेमुळे प्रत्येक रुग्णासाठी कस्टमाइज्ड सर्जरी प्लॅन तयार करता येतो, जो त्यांच्या विशिष्ट ऍनाटॉमीनुसार तयार करण्यात आलेला असतो, त्यामुळे अतिशय अचूक अलाइनमेंट  लेग लेंग्थ मिळते, यामध्ये अगदी मिलिमीटर देखील अचूकपणे मोजले जातात.”

आरोग्य देखभालीचे अधिक चांगले परिणाम मिळवून देण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान व पद्धतींचा वापर करण्यासाठी सह्याद्रि हॉस्पिटल्स वचनबद्ध आहे. ही प्रक्रिया यशस्वीपणे करून रोबोटिक-असिस्टेड सर्जरी हे हिप रिप्लेसमेंटमध्ये नवे मानक बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले आहे. 

पाकिस्तानी पंतप्रधानांकडून डॉ. मनमोहन सिंग यांचा अपमान:तेव्हा काँग्रेस त्यांचा समर्थनासाठी पुढे आली नाही- फडणवीस

0

मुंबई-जेव्हा आमचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा पाकिस्तानी पंतप्रधानांकडून अपमान झाला होता. पण तेव्हा त्यांच्या समर्थनासाठी काँग्रेस कधीच पुढे आली नाही,असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर घराणेशाहीचे राजकारण केल्याचा आरोप करत पक्षाने मनमोहन सिंग यांचा अपमान केल्याचा दावा केला आहे. कारण ते गांधी घराण्यातून नव्हते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करत लिहिले की, भारताचे महान अर्थतज्ज्ञ आणि राजकारणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने संपुर्ण देश शोक व्यक्त करत आहे. आपण सर्वजण दु:खात आहोत, मलाही दुख: वाटत आहे. त्यांच्या निधनानंतरही काँग्रेस घाणेरडे राजकारण करत आहे, हे दु:खद आहे.

भारताचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग यांनी गुरुवारी (26 डिसेंबर) रोजी जगाचा निरोप घेतला. दिल्लीतील एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान म्हणून 10 वर्ष देशाची धुरा सांभाळली. भारताला अर्थिक संकटातून बाहेर काढण्यात मोठे योगदान देणारे ते अर्थतज्ज्ञ होते. मनमोहन सिंग हे एक चांगले राजकारणी होते परंतू त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या नावाचे राजकारण संपलेले नाही.
मनमोहन सिंग गांधी घराण्यातून आलेले नसल्यामुळे काँग्रेसने त्यांचा अपमान केला असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, आम्ही याआधीही अशा अनेक बड्या नेत्यांचा अपमान होताना पाहिला आहे, केवळ ते गांधी घराण्यातून नव्हते म्हणून त्यांचा अपमान होतो. आम्ही असे प्रसंग पाहिले आहे जेव्हा आमचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा पाकिस्तानी पंतप्रधानांकडून अपमान झाला होता. पण त्यांच्या समर्थनासाठी काँग्रेस कधीच पुढे आली नाही.

राहुल गांधींवर आरोप करत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यांच्या (मनमोहन सिंग) अपात्रतेचा अध्यादेशही राहुल गांधींनीच फाडला. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी मनमोहन सिंग यांचा अपमान केला असे अनेक प्रसंग आल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे. केवळ मनमोहन सिंगच नाही तर दिवंगत पीव्ही नरसिंह राव, दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनाही त्यांच्याच पक्षाच्या आणि घराण्यातील नेत्यांकडून अपमान सहन करावा लागला असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे. फडणवीसांनी पुढे लिहिले की, पीव्ही नरसिंह राव यांच्या पार्थिवालाही एआयसीसी मुख्यालयात प्रवेश दिला गेला नाही. या सर्व घटनांमुळे लोकशाही आणि संविधानाचे सार जपण्यासाठी घराणेशाहीचे राजकारण किती धोकादायक आहे, याची आठवण करुन देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या गाडीला आयशर टेम्पोने दिली धडक

0

मुंबई-शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या गाडीला रविवारी रात्री उशिरा मुंबईतील जोगेश्वरी भागात एसआरपीएफ कॅम्पच्या गेटजवळ अपघात झाला. पश्चिम द्रुतगती महामार्गावर झालेल्या या अपघाताच्या वेळी वायकर हे त्यांच्या वाहनातच होते. वायकर यांच्या कारला आयशर टेम्पोने धडक दिल्याने हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. तरी देखील पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. अपघाताच्या वेळी टेम्पो चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय आहे.एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वाराजवळ वायकर यांच्या वाहनाला टेम्पोने धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू केली. रवींद्र वायकर हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते आहेत. यापूर्वी वायकर यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटात प्रवेश केला होता.अपघाताच्या वेळी टेम्पो चालक दारूच्या नशेत होता का? याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. साक्षीदारांचा दावा आहे की, टेम्पो चालकाने बेपर्वाईने वाहन चालवत होता. मात्र, आता या प्रकरणाचा तपास सुरु असून अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.

2009 पासून ते जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत आणि 1992 मध्ये मुंबईतील नगरसेवक म्हणून त्यांची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द आहे. वायकर यांनी 2014 ते 2019 या काळात फडणवीस सरकारच्या काळात गृहनिर्माण आणि उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत, वायकर यांनी उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवली, त्यांनी उद्धव ठाकरे गटातील अमोल कीर्तिकर यांचा पराभव करून खासदार म्हणून लोकसभेत प्रवेश केला आहे.

मंत्री नितेश राणे यांचे पुन्हा वादग्रस्त विधान:म्हणाले, ‘केरळ हा मिनी पाकिस्तान; अतिरेकी प्रियंका गांधींना मतदान करतात’

पुणे- महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त विधान समोर आले आहे. केरळ हा मिनी पाकिस्तान आहे, त्यामुळेच राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी तेथे विजयी होतात, असे लोक त्यांना खासदार बनवण्यासाठी मतदान करतात, असे त्यांनी म्हटले आहे. नितेश राणे यांनी रविवारी पुण्यातील एका कार्यक्रमात भाषण करताना हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

या वेळी नितेश राणे म्हणाले की, केरळमध्ये फक्त अतिरेकी प्रियंका गांधींना मतदान करतात. त्यांच्या भाषणापूर्वीच महाराष्ट्र पोलिसांनी कार्यक्रमाच्या आयोजकांना मंत्री नितेश राणे भडकाऊ भाषण करणार नाहीत याची काळजी घेण्यास सांगितले होते. मात्र, आता राणे यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या आधी 2 नोव्हेंबर रोजीही केले होते प्रक्षोभक वक्तव्य

2 नोव्हेंबर 2024 रोजी देखील राणे यांना माध्यमांनी तुम्हाला मुस्लिमांची काय अडचण आहे? असा प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना ते म्हणाले होते की, “देशात 90 टक्के हिंदू राहतात. हिंदूंच्या हिताची काळजी करणे हा गुन्हा असू शकत नाही. याशिवाय देशातील बांगलादेशी हिंदूंच्या सणांवर दगडफेक करतात. जर या विरोधात आवाज उठवला गेला तर तो उठवल्याबद्दल गुन्हा दाखल झाला तर मी त्याला सामोरे जाण्यास तयार असल्याचे राणे यांनी म्हटले आहे.

मार्केटयार्ड गंगाधाम रोडवरील आई माता मंदिराजवळील हॉटेल बिलयन्स लाऊन्ज हुक्का पार्लरवर छापा:भरत गावडे, दिपेंद्र खडका आणि सिद्धार्थसिंग सिंह यांना अटक

पुणे : गंगाधाम रोडवरील एका हॉटेलमध्ये बिनधास्तपणे सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा घालून तिघांना अटक केली आहे.भरत देवाप्पा गावडे (वय ३३, रा. शिवराय कॉलनी, अप्पर इंदिरानगर), दिपेंद्र मानबहादुुर खडका (वय ३०, रा. अप्पर इंदिरानगर) आणि सिद्धार्थसिंग अशोक कुमार सिंह (वय २२, रा. शिवराय कॉलनी, अप्पर इंदिरानगर) अशी त्यांची नावे आहेत. ही कारवाई मार्केटयार्डमधील गंगाधाम रोडवरील आई माता मंदिराजवळील हॉटेल बिलयन्स लाऊन्ज येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजता करण्यात आली.

याबाबत पोलीस हवालदार पृथ्वीराज पांडुळे यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल बिलियन्स लाऊन्ज येथे हुक्का पिण्यास दिले जात असल्याची खबर गुन्हे शाखेच्या युनिट ५ ला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याची खात्री केल्यानंतर सायंकाळी हॉटेलवर छापा घालण्यात आला. त्यावेळी हॉटेलमध्ये हुक्का पॉट, तंबाखुजन्य अफजल, अलफकर, अलकियान हे हुक्का फ्लेवर ग्राहकांना धुम्रपानासठी अवैधरित्या विना परवाना विक्रीसाठी ठेवण्यात आलेले मिळून आले. सहायक पोलीस निरीक्षक सिसाळ तपास करीत आहेत.