Home Blog Page 519

फरार आरोपी नीलेश चव्हाणच्या नेपाळमधून आवळल्या मुसक्या


पुणे-वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात प्रमुख आरोपींमध्ये समावेश असल्याचा आरोप केला जाणारा नीलेश चव्हाण याला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. नीलेश गेल्या काही दिवसांपासून फरार होता. मात्र आता त्याला नेपाळमधून पोलिसांनी अटक केली आहे. नीलेश चव्हाण याच्यावर बाळाची हेळसांड केल्याचा तसेच कस्पटे कुटुंबावर बंदूक रोखण्याचा देखील आरोप आहे. नीलेश चव्हाण याच्या अटकेनंतर आता या प्रकरणात अनेक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाशी संबंधित प्रकरणात पीडित कस्पटे कुटुंबीयांना धमकावल्या प्रकरणी नीलेश चव्हाण या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणावर वैष्णवीचे बाळ घेण्यासाठी गेलेल्या वैष्णवीच्या कुटुंबीयांना धमकावल्याचा आरोप आहे. तसेच त्याने त्याच्या पत्नीचा अमानुष छळ व तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केल्याची संतापजनक बाब उजेडात आली आहे. या प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून तो फरार होता. त्याला आता नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. त्याला आज रात्रीपर्यंत पुण्यात आणले जाणार आहे.नीलेश चव्हाण हा वैष्णवी हगवणेचे पती शशांक हगवणे आणि बहिण करिष्मा हगवणे यांचा मित्र आहे. त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे. त्याच्यावर त्याच्या पत्नीचा अमानुष छळ केल्याचा ठपका आहे. तो स्पाय कॅमेऱ्याच्या मदतीने आपल्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ चित्रित करायचा. या प्रकरणी त्याच्यावर 2019 मध्ये पुण्यातील वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याच ठाण्यात नीलेश चव्हाणवर वैष्णवी हगवणेचे बाळ मागण्यासाठी गेलेल्या तिच्या माहेरच्यांना पिस्तुल दाखवून धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंबंधीच्या माहितीनुसार, नीलेश चव्हाणचे लग्न 3 जून 2018 रोजी झाले. त्यानंतर जानेवारी 2019 मध्ये त्याच्या पत्नीला आपल्या बेडरूममधील सीलिंग फॅनला काहीतरी संशयास्पद वस्तू अडकवण्यात आल्याचा संशय आला. तिने याविषयी नीलेशला विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पुढच्या फेब्रुवारी महिन्यात त्याच्या पत्नीला घरातील एसीलाही काहीतरी संशयास्पद वस्तू अडकवण्यात आल्याची बाब निदर्शनास आली. यावेळी तिचा संशय अधिकच बळावला. त्यानंतर तिने आपल्या पतीला म्हणजे नीलेश चव्हाणला त्याचा जाब विचारला.

त्यावर नीलेशने पुन्हा उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर त्याच्या पत्नीने त्याचा लॅपटॉप उघडून पाहिला असता त्यात त्यांच्या शरीर संबंधांचे व्हिडिओ स्पाय कॅमेऱ्याने रेकॉर्ड केल्याचे तिला आढळले. एवढेच नव्हे तर नीलेशचे इतर मुलींसोबतचे आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडिओही तिच्या निदर्शनास आले. तिने या प्रकरणी नीलेशकडे विचारणा केली असता त्याने घरातील चाकू दाखवून तिला धमकावले. तिचा गळा दाबला. एवढेच नाही तर तिच्याशी बळजबरीने शारिरीक संबंध ठेवले.नीलेशच्या पत्नीने या प्रकाराची माहिती त्याच्या आई-वडिलांना व घरातील इतर सदस्यांना दिली. त्यानंतर त्यांच्याकडूनही तिचा छळ सुरू झाला. त्यानंतर पुढील अनेक महिने नीलेशने पीडित महिलेचा म्हणजे आपल्या पत्नीचा अतोनात छळ केला. त्यामुळे तिने आपले घर सोडण्याचा निर्णय दिला. त्यानंतर 14 जून 2022 रोजी तिच्या तक्रारीनुसार नीलेश व त्याच्या कुटुंबीयांवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. उल्लेखनीय बाब म्हणजे त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळण्यात आल्यानंतरही वारजे पोलिसांनी त्याला अटक केली नाही. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला.

नीलेश चव्हाण हा बांधकाम व्यावसायिक आहे. त्याचा पोकलेन मशीनचाही व्यवसाय आहे. नीलेश चव्हाण हा मयत वैष्णवी हगवणेचा पती शशांक हगवणे याची बहीण करिश्मा हगवणेचा मित्र आहे. शशांक व वैष्णवी यांच्यातील वादात अनेकदा त्याने हस्तक्षेप केल्याचीही माहिती आहे. कर्वेनगर भागातील औदूंबर पार्क सोसायटीत नीलेशच्या वडिलांचे 3 फ्लॅट आहेत.

पीओके प्रमाणे, काँग्रेस नव्हे तर ‘भ्रष्टाचारी व्याप्त भाजप’कॉँग्रेस प्रवक्ते तिवारींचे प्रत्युत्तर !

फडणवीसांकडून बौद्धिक दिवाळखोरी व विकृतीचेच प्रदर्शन..!
पुणे  : एकीकडे ‘वायूसेना प्रमुखांच्या’ वक्तव्यातून ‘संरक्षण खात्याची वास्तवता’ समोर आल्याने, सत्ता पक्षाची पोलखोल झाली आहे.  राहुल गांधी यांचे देशाप्रती काळजी दर्शवणारे प्रश्न योग्यच असल्याचे सिद्ध झाले असल्याने त्यांची  भुमिका जागरुक व समंजस विरोधी पक्ष नेत्याची असल्याचे वेळोवेळी सिद्ध होत असुन देशभर प्रशंसा होत आहे. यामुळेच भाजप नेते बिथरल्याचेच् बघायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे देशातील विरोधी पक्षाचे नेत्यावर अश्लाघ्य व अतार्किक टिका करत फडणवीस आपल्या बौद्धिक दिवाळखोरी व विकृतीचेच प्रदर्शन करत असल्याची प्रखर टीका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, खरेतर फडणवीसांना पीओके प्रमाणे प्रमाणे तुलनाच करायची असेल तर ती काँग्रेस नव्हे तर भाजप सोबतच चांगल्या पध्दतीने होऊ शकते. ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणवणाऱ्या भाजप’ने भ्रष्टाचार मुक्त देशाची घोषणा करून एकीकडे ११ वर्षात ‘एकाही भ्रष्टाचारी नेत्यावर’ खटला चालवून, त्यास गजाआड टाकण्याचे काम केलेले नाही, तर उलटपक्षी ‘भ्रष्टाचार व्याप्त वा काँग्रेस व्याप्त भाजप’ करण्याचे पवित्र कार्य करून अनायसे काँग्रेस सह अन्य राजकीय पक्ष स्वच्छ करण्याचेच कार्य केले आहे.
देशाच्या “संरक्षण वा गृह खात्याची” जबाबदारी असलेले भाजप नेते, देशाच्या वा राज्याच्या सुरक्षा विषयक प्रश्नांवर वा आपल्या संविधानीक ऊत्तरदायीत्वावर चकार शब्द न बोलता वा स्वराजधर्माचे पालन न करता, जनतेने प्रश्न विचारण्यास निवडून दिलेल्या प्रतिनिधींवरच अश्लाघ्य आरोप करण्यात धन्यता मानत असून आपल्या ‘राजकीय नादानपणाचे व बेजबाबदारपणाचे’ प्रदर्शन करत असल्याचे प्रतिपादन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.

देशाच्या विरोधी पक्ष नेत्यावर वा राष्ट्रीय प्रश्नांवर तारे तोडण्यापेक्षा, स्व-अखत्यारीतील व राज्यातील अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काही करावे, एमएमआरडीच्या हजारो कोटी भ्रष्टाचाराकडे लक्ष केंद्रित करावे तसेच कायदा – सुव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करून बीड, परभणी, बदलापूर, पुणे जिल्हा इ मधील खुनांच्या तपास प्रकरणांना गती द्यावी, धुळे मंत्री महोदयांच्या स्वीय सहाय्यकांच्या खोलीत मिळालेल्या १॥ कोटी रकमे बाबत बोलावे, पोर्शे कार प्रकरणी, वाढत्या ड्रग्ज व सायबर गुन्हे प्रकरणी अधिक लक्ष केंद्रित करावे व ‘राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री’ नात्याने, जनतेप्रती संविधानीक कर्तव्यांची पुर्तता करावी व अपेक्षित राजधर्माचे पालन करावे.. असे खडे बोल काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या प्रसिद्धी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांनी सुनावले.

‘कम्युनिटी बिल्डींग फॉर इन्कलुसिव्ह इकॉनॉमिक ग्रोथ अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट’ विषयावरील दोन दिवसीय परिषद ३१ पासून

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे  

पुणे दि.३० मे: देशातली व्यावसायिकतेची परंपरा समाजातल्या काही घटकांपुरती मर्यादित न राहता इतर अपारंपारिक समाज घटकांपर्यंत पोहोचावी. शेती प्रधान देश उद्योजकता प्रधान व्हावा आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रित यावे. तसेच  उद्योजकता, आर्थिक स्वातंत्र्य, स्टार्टअप व नवनवीन कल्पनेला प्रोत्साहन देण्याचा मुख्य उद्देश ठेवून एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्यावतीने दोन दिवसीय ‘कम्युनिटी बिल्डींग फॉर इन्कलुसिव्ह इकॉनॉमिक ग्रोथ अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद ३१ मे व १ जून रोजी नाशिक येथील हॉटेल शेरेटन मध्ये संपन्न होईल. अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र-कुलगुरू डॉ.मिलिंद पांडे आणि एमआयटी स्कूल ऑफ बिझनेसचे सहअधिष्ठाता प्रा.डॉ. गौतम बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘कम्युनिटी बिल्डींग फॉर इन्कलुसिव्ह इकॉनॉमिक ग्रोथ अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट’ या परिषदेचा उद्घाटन सोहळा ३१ मे रोजी दुपारी २.३० वा. होणार आहे. यावेळी कोल्हापूर येथील महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड हे असतील.
तसेच, बीव्हीजी इंडिया लिमिटेडचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक डॉ. हणमंतराव आर. गायकवाड, चितळे ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गिरीश चितळे, इंन्फोटेक सॉफ्टवेअर अँड सिस्टमचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशिम पाटील व तौराल इंडिया प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी भरत गिते हे उपस्थित राहतील.

या परिषदेत विनजीत टेक्नॉलॉजी प्रा.लि.चे सह संस्थापक अश्विन कंडोई, नाशिक येथील सह्याद्री फर्मचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, आर्मस्ट्राँग डेमॅटिकचे चेअरमन विनीत माजगावकर, एएमटी ग्रुप कंपनिजचे संचालक चेतन सावंत, थॉयोकेअरचे संस्थापक डॉ. ए. वेलूमणी, टु ब्रदर्स ऑर्गेनिक फॉर्मचे संस्थापक अजिंक्य हांगे आणि सत्यजीत हांगे, थॅर्माकॉल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळख असणारे माने ग्रुपचे संस्थापक रामदास माने, नाशिक येथील वेदमुथा इंडिस्ट्रीज लि.चे व्यवस्थापकीय संचालक अजय वेदमुथा, टिमस लाईफ स्टाइलचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुमित तिवारी, स्लाइडवेल मेल्यूअर टेक प्रा.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंबर प्रधान, निर्मिती प्रोमॅक कन्स्लटन्स प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक राहुल वैद्य हे आपली यशस्वी गाथा मांडतील.
या परिषदेचा समारोप १ जून रोजी दुपारी ३.३० वा. होणार आहे.

 सैयारा या चित्रपटाचा टीझर रिलीज

यशराज फिल्म्सने बहुप्रतिक्षित मोहित सुरी दिग्दर्शित सैयारा या चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे आणि ही अहान पांडे आणि अनीत पड्डा अभिनीत एक तीव्र प्रेमकथा आहे!

यशराज फिल्म्स (YRF) निर्मित आणि मोहित सुरी दिग्दर्शित, सैयारा या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून, तो YRF आणि मोहित यांना एकत्र आणतो, जे कालातीत प्रेमकथा तयार करण्यासाठी ओळखले जातात.

आज, YRF ने ‘सैयारा’ चा टीझर प्रदर्शित केला, ही एक तीव्र प्रेमकथा आहे जी अहान पांडेला हिंदी चित्रपटसृष्टीत एक नायक म्हणून ओळख करून देते आणि त्यात अनित पद्डा (ज्याने बहुचर्चित मालिका ‘बिग गर्ल्स डोन्ट क्राय’ मध्ये तिच्या उत्कृष्ट अभिनयाने मन जिंकले) ही मुख्य अभिनेत्री म्हणून आहे. ‘सैयारा’ कंपनीचे सीईओ अक्षय विधानी यांनी निर्मित केली आहे.

सैयारा चा टीझर पहा :

‘सैयारा’ या शीर्षकाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे आणि टीझरने त्याचा अर्थ उलगडला आहे. ‘सैयारा’ चा अर्थ स्पष्टपणे भटकणारा खगोलीय पिंड असा होतो, परंतु कवितेत ते बहुतेकदा एखाद्या (किंवा एखाद्या व्यक्तीला) चमकदार, अलौकिक किंवा परलोकीय – एक भटकणारा तारा – नेहमी चमकणारा, नेहमी मार्गदर्शन करणारा, परंतु नेहमीच पोहोचाबाहेर असलेल्या – चे वर्णन करण्यासाठी वापरले जाते.

YRF, त्याच्या ५० वर्षांच्या इतिहासात, भारताला यश चोप्रा आणि आदित्य चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेले काही कल्ट रोमँटिक चित्रपट देण्यासाठी ओळखले जाते. सध्या चित्रपटसृष्टीत २० व्या वर्षी असलेल्या मोहित सुरीने आशिकी २, मलंग, एक व्हिलन इत्यादी काही सर्वात आवडत्या रोमँटिक चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले आहे.

‘सैयारा’ हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

”सातारा कारागृहात क्षयमुक्त भारत 2025 कार्यक्रम”

सातारा-राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत सन 2025 पर्यंत क्षय मुक्त भारत करण्याचे केंद्र शासनाचे तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण आहे.

त्या अनुषंगाने जिल्हा क्षयरोग केंद्र, साताराचे जिल्हा क्षयरोग अधिकारी श्री डॉक्टर श्री सचिन पाटील यांच्या माध्यमातून तसेच जिल्हा शासकीय रुग्णालय येथील इतर अधिकारी कर्मचारी यांच्या माध्यमातून तसेच अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक डॉक्टर सुहास वारके, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकर, कारागृह उप महानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 26.5.2025 ते 29.5.2025 पर्यंत सलग 4 दिवस सदर “क्षयमुक्त भारत 2025 या शिबिराचे” आयोजन करण्यात आले.

या शिबिरामध्ये सातारा जिल्हा कारागृहामधील एकूण 15 महिला बंदी व 350 पुरुष बंदी यांची AI बेस डिजिटल एक्स-रे मशीनद्वारे क्षयरोग तपासणी करून सर्वांचे एक्स-रे काढण्यात आले. यानुसार ज्या बंदयांच्या एक्स-रेमध्ये काही दोष आढळून येतील त्यांचे उपचार तातडीने सुरू करण्यात येणार आहेत, असे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर सचिन पाटील यांनी सांगितले.

पंडित सी. आर. व्यास भारतीय शास्त्रीय संगीतातील ‘चिंतामणी रत्न’

पॉप्युलर प्रकाशन प्रकाशित शशी व्यास, श्रुती पंडित लिखित ‘चिंतामणी : एक चिरंतन चिंतन पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : पंडित सी. आर. व्यास यांचे सुरांशी अनोखे नाते होते. गाण्यातील सातत्य, रियाज संगीताला प्रवाहित ठेवते या विचारांनी पंडित व्यास यांनी आपल्या सर्व शिष्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या गायन साधनेला आध्यात्मिक बैठक होती. क्षमाशिलता ही त्यांची मोठी ताकद होती. ते संन्यस्त गृहस्थ होते. त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताप्रती विलक्षण ओढ होती. भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रांतात ते चिंतामणी रत्नच होते, अशा शब्दांत पंडित सी. आर. व्यास यांचा सांगीतिक जीवनपट उलगडला.

निमित्त होते ग्रेस फाऊंडेशनचे प्रमुख शशी व्यास आणि श्रुती पंडित लिखित ‘चिंतामणी : एक चिरंतन चिंतन’या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे. हिराबाग येथील श्रीराम लागू रंगअवकाश (ज्योत्स्ना भोळे सभागृह आवार) येथे पॉप्युलर प्रकाशनतर्फे या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शशी व्यास, श्रुती पंडित, पंडित सुहास व्यास, मोनिका गजेंद्रगडकर, अपर्णा केळकर यांनी पंडित सी. आर. व्यास यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या. पॉप्युलर प्रकाशनच्या अस्मिता मोहिते यांनी संवाद साधला. पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे.
पंडित सी. आर. व्यास यांचे ज्येष्ठ सुपुत्र व शिष्य पंडित सुहास व्यास म्हणाले, वडिलांनी आपल्याला कायमच इतर शिष्यांप्रमाणेच गुरूच्या भूमीकेतून संगीताचे ज्ञान दिले. संगीताच्या रियाजाविषयी ते कायम आग्रही होते. ‘सा’ची साधना धनाच्या अपेक्षेशिवाय करा ही बाबांची शिकवण होती.
शशी व्यास म्हणाले, पंडित सी. आर. व्यास यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा द्यावा, बंदिशकार म्हणून असलेली त्यांची महती, त्यांच्या सृजनशीलतेचा काळ, गुरूंसाठी केलेला संघर्ष वाचकांसमोर यावा या हेतूने त्यांचा सांगीतिक जीवनप्रवास ‘चिंतामणी : एक चिरंतन चिंतन’या पुस्तकाच्या माध्यमातून उलगडण्यात आला आहे.
श्रुती पंडित म्हणाल्या, पुस्तक लिहिताना संगीत क्षेत्रातील वंदनीय व्यक्तीला आपण न्याय देऊ शकू का याविषयी मी साशंक होते. परंतु पंडित सुहास व्यास यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे मी लिहिती झाले. त्यांची संगीत कलेविषयी असलेली विलक्षण ओढ, राजबिंडे व्यक्तीमत्त्व, स्वभाववैशिष्ट्ये या पुस्तकाद्वारे उलगडली गेली आहेत.
या दिग्गज कलाकाराच्या जीवनप्रवास उलगडणाऱ्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिणे माझ्यासाठी आनंददायक असले तरी ही एक धाडसी जबाबदारी होती, असे सांगून मोनिका गजेंद्रगडकर म्हणाल्या प्रस्तावना लिखाणातून मी माझाच शोध घेत गेले. पुस्तकाची रचना ललित अंगाने जाणारी असून चरित्ररूपात न बसणारे, संवाद स्वरूपातील वाचनिय पुस्तक संगीतप्रेमींसाठी उपलब्ध झाले आहे. पंडित सी. आर. व्यास यांची गायकी घराण्याच्या पलिकडे जाणारी आणि आध्यात्मिक अधिष्ठान असणारी होती.
पंडित सी. आर. व्यास यांच्या शिष्या, प्रसिद्ध गायिका अपर्णा केळकर म्हणाल्या, पंडित सी. आर. व्यास यांनी साहित्य व रागाचे चलन यांच्या कल्पना आपल्या बंदिशींमधून मांडल्या आहेत. राग सादरीकरण सुरू झाल्यानंतर त्याचा चेहरा दिसला पाहिजे ही त्यांची शिकवण होती. मकरंद केळकर यांनी पंडित सी. आर. व्यास यांच्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस अपर्णा केळकर यांची गायन मैफल रंगली. त्यांनी राग स्वानंदीमधील गुणीदास रचित ‘जियरा मानत नाही तुम बिन’ ही बंदिश सादर केली. त्याला जोडून पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी रचलेला ‘दिम तमदिम तन देरेना’ हा तराणा ऐकविला. गुरू पंडित सी. आर. व्यास रचित ‘चतुर तुम हो प्राणप्रिया’ या बंदिशीने त्यांनी मैफलीची सांगता केली. सुरेल, सुमधूर व संयत गायनाने रसिकांना अनोखी सांगीतिक पर्वणी मिळाली. त्यांना कौशिक केळकर (तबला), अमेय बिचू (संवादिन), श्रुती डोरले, श्रावणी अत्रे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ पुत्र जयंत जोशी, डॉ. विकास कशाळकर, शीला देशपांडे, डॉ. शुभांगी बहुलीकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चारुश्री वझे यांनी केले.

सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळीचे प्रमाण वाढले:शुद्धता तपासणी मशीनची मागणी वाढली

पुणे-साेन्याचे दागिने परीधान करणे ही आपल्याकडील अनेक कुटुंबात परंपरा आहे. परंतु सध्या साेन्याचा किंमती सुमारे एक लाख प्रति १० ग्रॅम झाले असल्याने दागिन्यांत भेसळ करुन विक्रीचे प्रमाण देखील वाढत असल्याचे तक्रारी माेठ्या प्रमाणात येऊ लागल्या आहेत. ग्राहक नवीन दागिन्यांसाठी जुन्या – दागिन्यांची अदला बदली माेठ्या प्रमाणावर करत आहेत. त्यामुळे पुनर्नूतनीकरण केलेल्या साेन्याच्या व्यवहारात वाढ झाली आहे. तसेच साेन्याचे दागिने गहाण ठेऊन देखील कर्ज काढण्याचे प्रमाण वाढलेले असल्याने साेन्याची तात्काळ शुध्दता तपासणे महत्वपूर्ण बनले असून साेने शुध्दतेची तपासणी करणाऱ्या एक्सरे मशीन मागणी वाढत असल्याचे मत गाेदरज एंजटरप्राइजेस ग्रुपच्या सुरक्षा समाधान व्यवसायाचे प्रमुख पुष्कर गाेखले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.

गाेखले म्हणाले, साेने हे माैल्यवान दागिने असल्याने त्याची सुरक्षा देखील महत्वाची मानली जात आहे. परंतु ते साेनार किंवा बँकेकडे गहाण ठेवण्यासाठी ग्राहक आल्यावर त्याची शुध्दता तात्काळ तपासणीसाठी गाेदरेजने डिफेंडर ऑरम प्राे राॅयल उपकरण आणले आहे. ज्वेलरी रिटेल, हाॅलमार्किंग केंद्रे व साेने कर्ज सेवात संलग्न बँका यांच्यासाठी शुध्दता तपासणीसाठी ते महत्वपूर्ण ठरत आहे. त्याचप्रमाणे घरफाेडीचे प्रमाण देखील वाढत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने जमीनी खालील लाॅकरची मागणी वाढली आहे. सेंट्रल व्हिस्टा, लष्करी संस्थेसह अनेक महत्वपूर्ण ठिकाणी आम्ही लाॅकर देत असून जीपीएस ट्रॅकिंग व्यवस्था, रिमाेट वापर यांना देखील मागणी आहे. सध्या साेने कर्ज व्यवसाय २८ ते ३० टक्क्यांनी वाढलेला असून साेने कर्ज तारण याेजनेत अनेक कंपन्या, बँका उतरल्या आहेत. साेन्याचे भाववाढीमुळे तात्काळ छाेट कर्ज घेण्यासाठी साेने तारण कर्ज वाढल्याने त्याची सुरक्षा देखील महत्वपूर्ण ठरत आहे.

आंबेगाव पठारावर भर रस्त्यात महिलेवर हत्याराने वार करून खून

पुणे- आंबेगाव पठार परिसरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे . एका ३१ वर्षीय महिलेचा डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आला. ही महिला २० मे रोजी रात्री नऊच्या सुमारास शहीद कर्नल पाटील पेट्रोल पंप ते म्हशीचा गोठा या सेवा रस्त्यावर बेशुद्धावस्थेत सापडली होती. उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला

प्रिती सचिन वाखारे (रा. खोपडेनगर ) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलीस नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीवरून आंबेगाव पठार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांनी प्रिती वाखारे यांना खासगी अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दिनांक २१ मे रोजी पहाटे तीचा मृत्यू झाला. पोलीस तपासादरम्यान समजले की, मयत महिलेला डोक्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या असून त्या धारदार हत्याराने झाल्या आहेत. ससून रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालानुसार ही मृत्यूचे कारण “डोक्याला इजा असे नमूद करण्यात आले आहे.

प्राथमिक चौकशीतून असे समोर आले आहे की, प्रिती वाखारे या नवले पुल परिसरात कामासाठी जात असत, आणि तिथे त्यांचे काही अनोळखी व्यक्तींशी वाद झाले होते. सध्या अज्ञात इसम विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०३ (१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या घटनेविषयी काहीही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. आरोपीचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास प्रतिबंध आदेश जारी

पुणे दि. ३०: पुणे ग्रामीण जिल्ह्यात कोणत्याही खाजगी व्यक्ती, कार्यक्रम व्यवस्थापन (इव्हेंट मॅनेजमेंट) व छायाचित्रण करणाऱ्या व्यावसायिकांनी ड्रोन कॅमेराचा वापर करताना त्याची पूर्व माहिती ७ दिवस आधी संबंधित पोलीस ठाण्यास कळवून संबंधीत प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांची रितसर परवानगी घेणे बंधनकारक राहील, असे आदेश जारी करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात महत्त्वाची धार्मिक स्थळे, धरणे, केंद्रीय संस्था असून दहशतवादी कारवायांमध्ये ड्रोन कॅमेराद्वारे टेहळणी होवून त्याचा अतिरेकी कारवायांमध्ये उपयोग केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच दौंड, बारामती, शिरुर तालुक्याच्या परिसरामध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन उडत असल्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत असून नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाळू माफिया देखील टेहळणीसाठी ड्रोनचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ड्रोनच्या माध्यमातून टेहाळणी करुन इतर प्रकारच्या चोऱ्याही होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे हे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात ड्रोन, रिमोट-नियंत्रित मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरा मोटर्स, हँग ग्लायडर, हॉट एअर बलून आणि तत्सम सर्व हवेत उडणाऱ्या वस्तूंच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. कोणतीही खाजगी व्यक्ती, इव्हेंट मॅनेजमेंट व छायाचित्रण करणारे व्यावसायिकांनी ड्रोन कॅमेराचा वापर करताना त्याची पूर्व माहिती ७ दिवस अगोदर संबंधित पोलीस ठाण्याला देवून परवानगी घेणे बंधनकारक आहे.

आदेशाचा भंग करुन पोलीसांच्या परवानी शिवाय कोणताही व्यक्ती ड्रोन कॅमेरादवारे चित्रीकरण करताना आढळून आल्यास अशी व्यक्ती भारतीय न्याय संहितेचे कलम २३३ प्रमाणे पात्र राहतील, असेही अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
0000

रास्तभाव दुकानातून तीन महिन्याचे धान्य मिळणार जूनमध्येच

पुणे :-पावसाळा तसेच परिणामी पूर इत्यादि प्रतिकूल परिस्थितीमुळे राज्य व केंद्रशासित प्रदेशांना अन्नधान्याची उचल व वाटप करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता एनएसएफए अंतर्गत लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वेळेत वितरण करण्यासाठी तीन महिन्यांचे अर्थात ऑगस्टपर्यंतचे धान्य जूनमध्येच देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.या धान्याची उचल ३१ मे पर्यंत व वाटप ३० जून पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, मुळशी, खेड, बारामती, इंदापूर, दौंड, शिरुर, भोर, वेल्हा, पुरंदर, हवेली या तालुक्यातील तहसिलदारांनी त्या अनुषंगाने एनएसएफए अंतर्गत करण्यात येणाऱ्या ऑगस्ट २०२५ पर्यंतच्या अन्नधान्याची उचल व वाटप विहित कालावधीत पूर्ण करण्याबाबत तातडीने आवश्यक कार्यवाही करावी. तसेच पात्र लाभार्थ्यांनी माहे ऑगस्ट २०२५ पर्यंतच्या धान्याची उचल रास्तभाव दुकानामधून करावी, असे आवाहनही जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. सुधळकर यांनी केले आहे.

गानवर्धनतर्फे नेहा महाजन यांचा कै. सुचेता नातू स्मृती युवा सतारवादक पुरस्काराने गौरव

पुणे : ‘तो न गातो ऐकतो तो सूर आपला’ या ज्येष्ठ कवी चिं. त्र्यं. खानोलकरांच्या उक्तीप्रमाणे कलाकाराचा प्रवास आपल्या आतल्या स्वराचा आर्त आवाज ऐकत जनतेसाठी गाणारी गाणी जनार्दनापर्यंत पोहोचणारा असावा. अनुभव आणि अनुभूती यांचा मेळ घालत कलाकाराने साधना करावी, असे आवाहन सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे सामाजिक कार्यकर्ते सुरेश रानडे यांनी केले.

अभिजात संगीताला प्रेरणा देणाऱ्या गानवर्धन संस्थेमार्फत कै. सुचेता नातू स्मृती युवा पुरस्काराने सतारवादक नेहा विदुर महाजन यांना आज (दि. २९) सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे वितरण सुरेश रानडे आणि जयश्री रानडे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी सुरेश रानडे बोलत होते. दहा हजार रुपये, शाल आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गानधर्वन संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर, डॉ. सदानंद मोरे, पीएनजीचे पराग गाडगीळ, ज्येष्ठ गायिका निर्मला गोगटे, राजश्री महाजनी मंचावर होते.

कृ. गो. धर्माधिकारी यांनी अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वी स्थापन केलेली गानवर्धन संस्था शास्त्रीय संगीत आणि नृत्यासाठी कलाकारांना सतत प्रोत्साहन देत असते. गानवर्धनतर्फे दरवर्षी विविध पुरस्कारही दिले जातात. शिष्यवृत्ती, युवा पुरस्कार, उदयोन्मुख कलाकार पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार यातून सर्व स्तरातल्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यात गानवर्धन सतत प्रयत्नशील असते, असे संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर यांनी प्रास्ताविकात सांगितले.

पुरस्कार वितरणानंतर नेहा महाजन यांचे सतारवादन झाले. त्यांनी राग मधुवंती सादर केला. सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली. विनायक कुडाळकर यांनी त्यांना तबल्यावर साथसंगत केली. ज्या मंचासमोर बसून मी अनेक मैफिली ऐकल्या आहेत तिथे सादरीकरण करण्याचे भाग्य मला मिळाले. खरेतर कलाकाराचे कौतुक कार्यक्रम झाल्यानंतर होते; पण माझ्या सादरीकरणाच्या आधीच तुम्ही मला पुरस्कार देऊन गौरविले आहे, यासाठी मी कृतज्ञ आहे, असे नेहा महाजन म्हणाल्या.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सुप्रसिद्ध गायक पंडित कैवल्यकुमार गुरव यांची मैफिल रंगली. राग भुपालीच्या द्रुत बंदिशीने त्यांनी गायनाची सुरुवात केली. त्यानंतर रूपक मध्ये ठुमरी सादर करून संत कबीरांच्या भजनाने मैफलीची सांगता केली. मंद्र, मध्य आणि तार सप्तकात त्यांचा आवाज लीलया फिरणाऱ्या आवाजाने रसिक मंत्रमुग्ध झाले. त्यांना सुयोग कुंडलकर (संवादिनी), प्रशांत पांडव (तबला), चारुहास दामले, आदित्य जोशी (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

संस्थेच्या कार्याध्यक्ष वासंती ब्रह्मे यांनी सूत्रसंचालन केले.

वारकऱ्यांना मिळणार विम्याचा लाभ याहीवर्षी वैद्यकीय सुविधा पुरवणार

0

वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना मिळणार टोल माफी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वारकऱ्यांना दिलासा

मुंबई :- आषाढी वारीनिमित्त वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल, तसेच त्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतील असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. आषाढी वारीनिमित्त केलेल्या उपाययोजना आणि वारकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक पार पडली होती. त्याविषयीची अधिक माहिती प्रसार माध्यमांना आज देतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे वारी मार्ग कुठेही खराब झाला असल्यास मुरूम, खडी आणि डांबरीकरण करून त्याची तातडीने डागडुजी करावी, वारकऱ्यांना मुबलक पाणी, विजेची जोडणी, पालखी तळावर वॉटरप्रूफ तंबू उपलब्ध करून घ्यावे तसेच वारीसाठी जाणाऱ्या गाड्यांना दरवर्षीप्रमाणे टोल मध्ये सवलत दिली जाईल असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

आरोग्य तपासणी

गतवर्षीप्रमाणे याहीवर्षी आषाढी वारीनिमित्त राज्याच्या आरोग्य विभागाकडून भव्य आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील, वारकऱ्यांसाठी कार्डीएक रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून दिली जाईल, पंढरपुरात तात्पुरती आयसीयू सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, या सर्व सोयी उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी स्वतः पंढरपूरला जाऊन आढावा घ्यावा असे निर्देश शिंदे यांनी यावेळी त्याना दिले. तसेच प्रत्येक जिल्ह्यातून निघणाऱ्या मोठ्या दिड्यांना वारीच्या काळात पूर्णवेळ सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नोडल अधिकारी नेमणार

यासोबतच गतवर्षी वारीदरम्यान झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांना शासनाद्वारे मदत केली जाईल, पोलिसांशी व्यवस्थित समन्वय व्हावा यासाठी नोडल ऑफिसर नेमण्यात येईल. वारकऱ्यांचे भोजन आणि इतर प्रथा परंपरा वेळच्या वेळी पार पाडाव्यात यासाठी वारी कुठे जास्त वेळ खोळंबणार नाही यासाठी प्रयत्न केला जाईल, यंदाची वारीही स्वच्छ वारी, निर्मल वारी हरित वारी म्हणून आपल्याला पार पाडायची असल्याने त्यासाठी लागेल ते सर्व सहकार्य शासनाकडून केले जाईल असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची आकर्षक पुष्पसजावट

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन ;
गणरायाच्या पाताळातील (शेषात्मज) गणेश जयंतीनिमित्त गाभा-यात शेषनागाच्या प्रतिकृतीत बाप्पाची चांदीची मूर्ती विराजमान

पुणे : शेषात्मज गणेश जयंतीच्या निमित्ताने फुलांच्या शेषनागांच्या प्रतिकृतींची मंदिरात केलेली आकर्षक आरास आणि गाभा-यात विविधरंगी फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये विराजमान लाडक्या गणरायाच्या चांदीच्या मूर्तीचे विलोभनीय रुप पहायला मिळाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे शेषनागाच्या विविधरंगी फुलांच्या प्रतिकृती साकारुन ही सजावट करण्यात आली. याच दिवशी श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता.

गणेश जयंतीनिमित्त मंदिरात शुक्रवारी ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक पार पडला. त्यानंतर पहाटे ४ वाजता पं. कैवल्य कुमार गुरव यांनी स्वराभिषेकातून गणरायाचरणी स्वरसेवा अर्पण केली. तसेच मंदिरात गणेश याग, सहस्त्रावर्तने, गणेशजाग देखील पार पडला.

ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, गाणपत्य संप्रदायात भाद्रपद आणि माघ मासाप्रमाणेच ज्येष्ठ चतुर्र्थीचा श्रीशेषात्मज जन्मोत्सव महत्वपूर्ण मानलेला आहे. भगवान ब्रह्मदेव सृष्टी रचनेच्या कार्यात असताना आपल्याच सृष्टीवर मोहित झाले. त्या मोहित अवस्थेत त्यांच्या नासिकेमधून एक बालक जन्माला आले. त्याच्याकडे पाहिल्यानंतर भगवान ब्रह्मदेव अधिकच मायायुक्त झाले. परिणामी आपल्या नव्या अपत्याला त्यांनी मायाकर असे नाव दिले. अनेकानेक वरदान देऊन त्याला परिपुष्ट केले. पुढे विप्रचित्ती नामक राक्षसाने या मायाकराला राक्षसांचा राजा केले. मायाकराने आपल्या अतुलनीय वरदानांच्या भरवशावर सगळी पृथ्वी आणि स्वर्ग लोक जिंकले. त्यानंतर त्याने पाताळावर आक्रमण केले. त्याच्या वरदानासमोर निष्प्रभ झालेल्या भगवान शेषांनी शेवटी भगवान गणेशांचे स्मरण केले.

श्रीशेष ध्यान करत असतांना त्यांच्या ध्यानातूनच भगवान श्री गणेश श्रीशेषात्मज रूपात ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला माध्यान्ह समयी प्रकट झाले. याच अवतारात पुढे गजासुर नामक राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्री गणेशांनी ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, देवी, सूर्य या पंचेश्वरांच्या शक्तिने युक्त असलेले मूषक हे वाहन त्यांना करायला सांगितले. या मूषकावर बसून श्री गणेशांनी गजासुर वध केल्यामुळे याच श्रीशेषात्मज अवताराला श्रीमूषकग असे पण नाव प्राप्त झाले.

१० पेक्षा अधिक मनुष्यबळ असलेल्या आस्थापनांना विशाखा समिती स्थापन करण्याचे आवाहन

पुणे, दि. २९: कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक (प्रतिबंध, मनाई व निवारण) कायदा २०१३ अंतर्गत सर्व शासकीय व खाजगी कार्यालयांमध्ये १० किंवा १० पेक्षा जास्त व्यक्ती काम करतात त्याठिकाणी अंतर्गत समिती (विशाखा समिती) स्थापन करणे बंधनकारक आहे. समिती स्थापन न करणाऱ्या संबंधित कार्यालय प्रमुख किंवा मालकांना ५० हजार रुपयापर्यंत दंड करण्याची तरतुद किंवा कार्यालयांचे नोंदणी प्रमाणपत्र किंवा परवाना रद्द करण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे. सर्व खाजगी आस्थापनांनी त्यांच्या अंतर्गत समित्यांची भारत सरकारच्या https://shebox.wcd.gov.in/registerOffices ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे.

तरी जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी कार्यालयांनी अंतर्गत समिती स्थापन केल्याबाबत त्यांच्या आदेशाची प्रत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयास lcpune2021@gmail.com या ईमेल इमेल पत्त्यावर पाठवावी. तसेच सर्व खाजगी आस्थापनांनी त्यांच्या अंतर्गत समित्यांची https://shebox.wcd.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनिषा बिरारी यांनी केले आहे.

सफाई कर्मचाऱ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यासाठी त्यांचा डाटाबेस तयार करावा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. २९ : सफाई कर्मचाऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देऊन त्यांची उन्नती व्हावी यासाठी त्यांची वयोगट, शिक्षण यानुसार यादी (डाटाबेस) तयार करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

सफाई कामगारांच्या विविध अडचणी व प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी समाज कल्याण सहायक आयुक्त प्रसार खैरनार, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ए. आर. गुजर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, पुणे मनपाचे मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे, ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लापा जाधव, बै.जी. वैद्यकीय महाविद्यालयाचे श्वसनोपचार विभागाचे विभागप्रमुख डॉ. संजय गायकवाड यांच्यासह पुणे, खडकी छावणी मंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे महानगरपालिका, पिंपरी महानगरपालिकांचे अधिकारी आदी उपस्थित होते.

सफाई कामगार आणि त्यांच्या पाल्यांच्या कल्याणासाठी काय उपाययोजना करता येतील यासाठी त्यांची निश्चित आकडेवारी असणे आवश्यक आहे. त्यानुसार सर्व रुग्णालये, नगरपालिका, महसूल कार्यालये आदी ठिकाणच्या सफाई कामगारांचे सर्वेक्षण करावे. या समाजातील तरुण पिढीला शिक्षणासाठी, युवा पिढीला विश्वकर्मा योजनेतून रोजगार आणि उर्वरितांना अन्य सामाजिक व आर्थिक सुरक्षा योजनांचा लाभ कसा देता येईल याबाबत प्रस्ताव तयार करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

ससून रुग्णालयातील सफाई कामगारांच्या वारसांच्या अनुकंपा भरतीविषयक प्रकरणे आदींवर कार्यवाही गतीने व्हावी यासाठी पुढील आढवड्यात बैठक घ्यावी. ४८ बदली कामगारांचे भरतीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा. सफाई कामगारांचे वेतन त्यांना रोख हातात न देता त्यांच्या बँक खात्यावर दरमहा ५ तारखेच्या आत जमा करण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदारांना द्याव्यात. तसेच तसे झाल्याबाबत दरमहा १५ तारखेपर्यंत बँक स्टेटमेंट मागवून खात्री करावी, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीत विविध स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधींनी सफाई कामगारांचे प्रश्न मांडले. त्यावर सकारात्मक राहून अधिकाऱ्यांनी काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.