Home Blog Page 514

HMPV या चिनी विषाणूचा भारतात तिसरा रुग्ण:कर्नाटकात 8 महिने आणि 3 महिन्यांची दोन बालके संक्रमित, गुजरातेत 2 महिन्यांचे बाळ पॉझिटिव्ह


चीनमध्ये पसरलेल्या HMPV या कोरोना सदृश विषाणूचा तिसरा रुग्ण भारतात आढळून आला आहे. अहमदाबादमध्ये एका 2 महिन्यांच्या बाळाला ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) ची लागण झाल्याचे आढळून आले. तत्पूर्वी, सोमवारीच कर्नाटकात 3 महिन्यांची मुलगी आणि 8 महिन्यांच्या मुलामध्ये हाच विषाणू आढळला होता.

कर्नाटकातील दोन्ही प्रकरणांबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले होते की, मुले नियमित तपासणीसाठी रुग्णालयात पोहोचली होती. चाचणी केल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, मुलांचे नमुने सरकारी प्रयोगशाळेत नव्हे तर खासगी रुग्णालयात तपासण्यात आल्याचे कर्नाटक आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

गुजरातमधील ऑरेंज हॉस्पिटलचे डॉ. नीरव पटेल यांनी सांगितले की, अहमदाबादमधील एका दोन महिन्यांच्या मुलाला प्रकृती अस्वास्थ्यामुळे 15 दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मुलाला सर्दी आणि खूप ताप होता. सुरुवातीला त्यांना पाच दिवस व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. यानंतर करण्यात आलेल्या अनेक चाचण्यांमध्ये मुलाला विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.कोविडसारख्या विषाणूची लक्षणे, लहान मुले सर्वात जास्त प्रभावित होतात
एचएमपीव्ही विषाणूचा संसर्ग झाल्यावर, रुग्ण सर्दी आणि कोविड-19 सारखी लक्षणे दाखवतात. त्याचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर होत आहे. यापैकी 2 वर्षांखालील मुलांना सर्वाधिक त्रास होतो.

केंद्र सरकारने म्हटले होते – HMPV हा या हंगामातील सामान्य विषाणू आहे
चीनमध्ये एचएमपीव्हीच्या वाढत्या प्रकरणांमध्ये, भारत सरकारने 4 जानेवारी रोजी संयुक्त देखरेख गटाची बैठक घेतली. बैठकीनंतर सरकारने म्हटले होते की फ्लूचा हंगाम लक्षात घेता चीनची स्थिती असामान्य नाही.

सैफी बुरहानी एक्सपोला सुट्टीच्या दिवशी पुणेकरांचा प्रतिसाद

पुणे :- दाऊदी बोहरा समाजातर्फे आयोजित सैफी बुरहानी बिझनेस एक्सपो २०२५ चे पुण्यातील डेक्कन काॅलेज ग्राऊंड येथे शनिवार ४ जानेवारीला शानदार उद्घाटन संपन्न झाले आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारचा सुट्टीचा दिवस पाहता या एक्सपोला पुणेकरांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत प्रतिसाद दिला आहे.
दाऊदी बोहरा समाजाचे सैयदना मुफद्दल सैफुद्दीन साहब यांचे चिरंजीव हुसैन बुऱ्हानुद्दीन यांच्या हस्ते संपन्न झालेल्या या उद्घाटन समारोहाला किर्लोस्कर न्यूमेटिक्सचे चेअरमन राहुल किर्लोस्कर, आयकर आयुक्त डाॅ. नितिन वाघमोडे, पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, भाजप व्यापारी आघाडीचे प्रमुख उमेश शाह यांच्यासह मोठ्या संख्येने दाऊदी बोहरा समाजाचे उद्योगपती-व्यावसायिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध प्रकारच्या उद्योग-व्यवसायांना एक-दुसऱ्यांसोबत कनेक्ट करण्याच्या उद्देशाने या बिझनेस एक्स्पोचे आयोजन करण्यात आलेले आहे.
दाऊदी बोहरा समाजाच्या वतीने फत्तेचंद रांका आणि उमेश शाह यांना सन्मानित करण्यात आले.

सोमवार ६ पर्यंत चालणाऱ्या या बिझनेस एक्स्पोमध्ये पुणे आणि महाराष्ट्रासह देशभरातील विविध राज्यांमधील तसेच विदेशातून आलेल्या उद्योगपती आणि व्यावसायिकांचे स्टाॅल्स लावण्यात आलेले आहेत. यामध्ये एमएसएमईज, स्टार्टअप्स, वुमेन आंत्रप्रेन्योर, रिटेलर्स, रिअल इस्टेट डेव्हलपर्स, सर्व्हिस प्रोव्हायडर, एज्युकेशनल इन्स्टीट्यूट्स, हेल्थकेअर आणि वेलनेस प्रोफेशनल्स यांचे १७० स्टाॅल्स आहेत.

पुणेकरांनी विविध स्टाॅल्सवर जाऊन विविध वस्तूंची माहिती घेतली यामध्ये फर्निचर, हार्डवेअर, गृह सजावटीच्या वस्तूंची खरेदीदेखील केली. एक्स्पोसंदर्भात दाऊदी बोहरा समाजाच्या नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

“उडान नारीशक्ती रन” यशस्वी: रंगली महिलांच्या उत्साहाची पर्वणी..

पुणे (5 जानेवारी):
सौ.पूनम विशाल विधाते (रा. काँ. पा. पुणे जिल्हा शहराध्यक्षा/वामा वुमन्स क्लब अध्यक्षा)
पूनम विशाल विधाते आयोजित, महिलांच्या आरोग्य आणि सशक्तीकरणासाठी आयोजित केलेला “उडान नारीशक्ती रन” समारोह उत्साह आणि जल्लोषात यशस्वीपणे पार पडला.
आज सकाळी बाणेर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान, ताम्हाणे चौक येथे झालेल्या या उपक्रमात महिलांचा प्रचंड सहभाग आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवली गेली.
कार्यक्रमासाठी चंद्रकांत दादा पाटील (उच्च तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य), सौ सुनेत्रा ताई पवार (खासदार), शंकर भाऊ मांडेकर (आमदार, भोर-मुळशी-राजगड मतदारसंघ), रूपालीताई चाकणकर (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी महिला काँग्रेस), आणि प्रसिद्ध सिने अभिनेत्री श्रुती मराठे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.
“उडान नारीशक्ती रन” हा उपक्रम केवळ महिलांच्या आरोग्यासाठीच नाही, तर त्यांच्या सशक्तीकरणासाठी प्रेरणादायी ठरला आहे.
यावेळी खासदार सौ सुनेत्रा अजित पवार यांनी आपले विचार मांडताना नमूद केले की, “पहिल्या वर्षी मी या उडान रन ला एक सामान्य नागरिक म्हणून उपस्थित होते, आणि आज दुसऱ्या वर्षी खासदार म्हणून तुमचं नेतृत्व करण्यासाठी तुमच्या समोर उभी आहे. सौ. पूनम विशाल विधाते यांनी महिलांच्या आरोग्य जागृतीसाठी आणि सबलीकरणासाठी सुरू केलेला वामा वुमन्स क्लब तसेच या उपक्रमाअंतर्गत होणारी विविध शिबिरे खरोखरच कौतुकास्पद आहेत.”
या कार्यक्रमात 14,000 महिलांनी विक्रमी सहभाग नोंदवून “उडान नारीशक्ती रन” ला मोठे यश मिळवून दिले. विशेषतः 81 वर्षांच्या आजीबाईंनी आणि सात महिन्यांच्या गर्भवती महिलेनं सहभाग नोंदवून सर्वांचे लक्ष वेधले. महिलांनी या कार्यक्रमाचा खूप आनंद घेतला आणि एकत्र येऊन उत्साहाने सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाची संपूर्ण यशस्विता सौ. पूनम विशाल विधाते आणि त्यांच्या टीमच्या अथक प्रयत्नांमुळे साध्य झाली आहे. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आणि महिलांनी व्यक्त केलेल्या आनंदाने हा उपक्रम संस्मरणीय ठरला.

यावेळी कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी उपस्थितांमध्ये पुणे जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील भाऊ चांदेरे, पुणे महानगरपालिकेचे मआजी नगरसेवक प्रमोद अण्णा निम्हण, माजी नगरसेविका सुषमाताई निम्हण, पंचायत समिती मुळशीच्या माजी सभापती सारिकाताई मांडेकर, औंध प्रभाग समितीचे माजी स्वीकृत सदस्य अर्जुन शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराचे उपाध्यक्ष राहुल दादा बालवडकर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणपत मुरकुटे पाटील, माजी उपसरपंच चंद्रकांत जाधव, महाळुंगे गावचे उपसरपंच युवराज कोळेकर, मा उपसरपंच काळुराम गायकवाड,माजी उपसरपंच अजिंक्य निकाळजे, माजी उपसरपंच पांडुरंग पाडाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोथरूड मतदार संघाचे कार्याध्यक्ष नितीन कळमकर, पैलवान समीर कोळेकर, योगीराज नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मुरकुटे, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन ननावरे, संजय जी ताम्हाणे ,प्राईड ग्रुपचे सर्वेसर्वा अरविंद जैन, नाईकनवरे डेव्हलपरचे संचालक आनंद नाईकनवरे, उद्योजक विनायक काकडे, नितीनजी खोंड, भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष राहुल पारखे, राष्ट्रवादी युवकचे प्रभाग अध्यक्ष शेखर सायकर, उद्योजक प्रणवजी कळमकर, बालेवाडीचे मा. पोलीस पाटील अशोक कांबळे, मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष निलेश पाडळे ,बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन विजय विधाते ,रामदास विधाते ,भगवान विधाते राजेश विधाते ,सुनील विधाते ,गौरव विधाते ,अक्षय विधाते ,तुषार विधाते तसेच बाणेर, बालेवाडी, सूस, माहाळुंगे येथील विविध सोसायट्यांचे चेअरमन, पदाधिकारी आणि प्रतिष्ठित मान्यवर महिला भगिनी उपस्थित होत्या…

कविता, किश्श्यांनी रंगली नायगावकरी मैफल

प्रा. मिलिंद जोशी यांनी साधला संवाद : पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनात मुलाखतीचे आयोजन
पुणे :
वरवर मिष्किल वाटणाऱ्या पण समाजातील गांभीर्य मांडणाऱ्या खुमासदार नायगावकरी कवितांचे सादरीकरण, त्यावरील त्यांचेच हटके भाष्य आणि त्यातून श्रोत्यांमध्ये पुन्हा-पुन्हा पिकणारी खसखस अशा वातावरणात ज्येष्ठ हास्यकवी अशोक नायगावकर यांच्याशी रंगलेल्या गप्पांच्या मैफलीला श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.
किस्स्यामागून किस्से, शाब्दीक कोट्या, वर्तमानातील परिस्थितीवर मार्मिक भाष्य करणाऱ्या कवी अशोक नायगावकर यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि प्रसिद्ध लेखक, वक्ते मिलिंद जोशी यांनी संवाद साधला. निमित्त होते पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनात आयोजित कवी अशोक नायगावकर यांच्या प्रकट मुलाखतीचे.
मराठी भाषेची थोरवी-गोडी सांगताना जगात फक्त मराठी भाषेतच ‌‘चोराच्याही मनात चांदणे असते‌’, असे नायगावकर यांनी म्हटल्यावर मराठी भाषेच्या सौंदर्याची श्रोत्यांना पुन्हा एकदा ओळख पटली. मराठी भाषेच्या सद्यस्थितीवरही खास टिप्पणी करताना भाषेतील वाक्‌‍प्रचारांमधील खाचाखोचा आजच्या पिढीला कळत नसल्याने त्यातील गंमत नाहीशी झाल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
उपरोधाच्या माध्यमातून गंभीर समाजचिंतन मांडणाऱ्या कवितांच्या साथीने राजकीय, समाजवास्तव, कौटुंबिक नातेसंबंध, भोवताली भेटणारी माणसे, त्यांचे स्वभाव, वर्तणूक यांच्या सूक्ष्म निरीक्षणातून टिपलेली वैशिष्ट्ये नायगावकर यांच्या कवितांमधून रसिकांना अनुभवास आली. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सुमारे दोन तास हास्याचे फवारे उसळत राहिले. लोकप्रिय हास्यकवी नायगावकर यांनी आपल्या मिष्किल शैलीने एक उर्जाप्रवाह सभागृहात खळखळत ठेवला.
‌‘मी वाईचा, कृष्णाकाठचे संस्कार घेऊन वाढलो. कृष्णेच्या घाटांवर होणारे उत्सव, वसंत व्याख्यानमाला, विश्वकोश मंडळाचे सान्निध्य, तिथे येणारी विद्वान मंडळी, बंधूंची विश्वकोश ग्रंथालयातील नोकरी, त्यामुळे लागलेले वाचनाचे वेड आणि हाती आलेला पुस्तकांचा खजिना, यातून संस्कार घडले‌’, असे नायगावकर यांनी सांगितले. ‌‘पराकोटीचा साधेपणा, हे महाराष्ट्राचे आणि मराठी माणसांचे वैशिष्ट्य आहे, याचा अनुभव लहानपणापासून घेतला. पुढे मुंबईत आल्यावर अनेक मान्यवरांचा सहवास मिळाला. नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे, शंकर वैद्य यांच्यासह अनेक नवे मित्र मिळाले. विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट यांच्यामुळे रंगमंचीय कविता सादरीकरणाचे संस्कार मिळाले. 31 वर्षे बँकेत कार्यरत होतो. मुंबईत आल्यावर सुरवातीला आईसोबत पापड विकण्याचे काम केले‌’, अशी आठवणही त्यांनी सांगितली.
‌‘टिळक‌’, ‌‘बाराखडी‌’, ‌‘संपत‌’ अशा गाजलेल्या कविता सादर करत नायगावकर यांनी राजकीय वास्तव, सामाजिक प्रदूषण, मराठी भाषेविषयीची अनास्था, कौटुंबिक स्तरावर झालेले विपरित परिणाम, बदललेल्या मानसिकता अशा अनेक मुद्द्यांवर उपरोधिक, तिरकस भाष्यही केले. प्रत्येक मराठी कुटुंबातील तिसऱ्या पिढीत मराठी भाषा वाचणारा, लिहिणारा, बोलणारा प्रतिनिधी आहे का, हा त्यांचा प्रश्न भाषेचे भवितव्य गडद करणारा होता. भाषा लोप पावते आहे, अचूकता हे मराठी भाषेचे शक्तिस्थान मागे पडते आहे, याची जाणीव करून देत असतानाच, नायगावकर यांनी रसिकांना खुमासदार व मार्मिक भाष्य करून हास्यरसात भिजवत ठेवले त्याचवेळी अंतर्मुखही केले.
प्रा. मिलिंद जोशी यांचे संवाद कौशल्य, त्यातून नायगावकर यांना सुचलेल्या आठवणी, कविता, शाब्दिक कोट्या, खुमासदार किस्से, विनोद अशा मिश्रणाने मुलाखतीत रंग भरले.
यावेळी अशोक पगारिया, डॉ. सुनीता धर्मराव, प्रतिमा दुरुगकर, सुनीता ओगले, दिलीप कुंभोजकर आणि अनिल दामले या रोटेरियन लेखकांचा सत्कार करण्यात आला. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले.

हौशी कलाकारांचे ‘रंगोत्सव’ चित्रप्रदर्शन मंगळवारपासून

आर्टफॅन्स’ या हौशी चित्रकारांच्या समूहातर्फे आयोजन ; कला क्षेत्रातील विविध शैली व कल्पकतेने भरलेले  प्रदर्शन
पुणे : ‘आर्टफॅन्स’ या हौशी चित्रकारांच्या समूहाचे ‘रंगोत्सव’ हे प्रदर्शन घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा आर्ट गॅलरीत दि.७ ते १२ जानेवारी दरम्यान भरविण्यात येत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मोनिका मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते दि.७ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे.

प्रदर्शनात १४ कलाकारांच्या ७० कलाकृती सादर केल्या जातील. या कलाकृतींमध्ये निसर्गचित्रे, म्युरल्स, आणि स्टिल लाईफसारख्या विविध शैलींचा समावेश असून, त्या ऑइल, ऍक्रेलिक, तसेच पेन्सिल शेडिंगसारख्या माध्यमांमध्ये साकारण्यात आल्या आहेत.

मागील  आठ वर्षे चित्रकलेत नवनवे प्रयोग करणाऱ्या या चित्रकारांमध्ये २२ वर्षांच्या तरुणांपासून ७५ वर्षांच्या अनुभवी चित्रकारांचा समावेश आहे. कला क्षेत्रातील विविध शैली व कल्पकतेने भरलेले हे प्रदर्शन असणार आहे.

वैदेही दाबक, नितीन महानव, शैला कारखानीस, उल्हास भानू, आल्हाद नाईक, मृदुला धोंगडे, हेमांगी गोरे, जयश्री बेडेकर, स्वाती कुट्टे, संगीता ताकवले, कविता ठाकरे, नेहा पाटील, माधवी दिवेकर, आणि श्रीकला राव यांचा प्रदर्शनात सहभाग आहे. दि. १२ जानेवारी पर्यंत दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ यावेळेत हे प्रदर्शन रसिकांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

चित्रकलेवरील प्रेमाने एकत्र आलेल्या वेगवेगळ्या वयोगटातील आणि क्षेत्रातील कलाकारांनी ‘आर्टफॅन्स’ हा समूह स्थापन केला. सुरुवातीला एकत्र येऊन चित्रे पाहणे, त्यावर चर्चा करणे, आणि आपल्यालाही अशा प्रकारे चित्र काढता येईल का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करताना या कलाकारांचा प्रवास सुरू झाला.

सन २०१८ मध्ये मुंबईतील नेहरू आर्ट गॅलरीत समूहाला स्वतःचे पहिले प्रदर्शन करण्याची संधी मिळाली. या प्रदर्शनाच्या यशात उल्हास भानू यांचे मोलाचे योगदान होते. त्यानंतर पुण्यातील पी.एन. गाडगीळ औंध, ग्लिंप्स, बालगंधर्व कलादालन यांसारख्या ठिकाणीही ‘आर्टफॅन्स’ ने आपली कला सादर केली. मात्र, ही प्रदर्शने इतर कलाकारांच्या समूहासोबत होती. तेव्हापासून आर्टफॅन्स ला पुण्यात आपले स्वतंत्र प्रदर्शन सादर करण्याची इच्छा होती.

समूहातील सदस्य सतत नवीन माध्यमे शिकण्याचा प्रयत्न करत राहिले. २०२३  मध्ये त्यांनी नितीन महानव यांच्याकडून ऍक्रेलिक कलेचे धडे घेतले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आर्टफॅन्स च्या कलाकारांनी आपले प्रदर्शन अधिक आकर्षक बनवले आहे.

सरहद स्कूल कात्रज येथे संत व साहित्यिकांची वेशभूषा अप्रतिमपणे स्पर्धा संपन्न

पुणे-सरहद आयोजित दिल्ली येथे होणारे आगामी १ ले अभिजात आणि ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिनांक २१, २२ व २३ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. संमेलनानिमित्त सरहद संस्थेतील सर्व विभागातून मराठी विषयाचे विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
आज सरहद स्कूल कात्रज येथे संत व साहित्यिकांची वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली.
चिमुकल्या प्रति संत व साहित्यिकांना पाहून सगळेच जण दंग झाले. विद्यार्थ्यांनी प्रति संत जनाबाई, तुकाराम, मुक्ताबाई , नामदेव, गाडगे बाबा रामदास स्वामी, सावता माळी तसेच आचार्य अत्रे, पू. ल. देशपांडे, सावित्री बाई फुले , बहिणाबाई , शांता शेळके या व अशा व्यक्तिरेखा, त्यांचे सामाजिक कार्य व विचार अप्रतिमपणे सादर केल्या.

विशेष आकर्षण म्हणजे इयत्ता पहिलीतील शिवांश शिवणकर याने गायलेल्या लहानपण देगा देवा या अभंगातून संत तुकाराम महाराज समोर उभे असल्याचा आभास झाला .
कार्यक्रमाला मुख्याध्यापिका कविता वानखेडे, पर्यवेक्षिका दिपाली कोंडे, विद्या भोसले, पौर्णिमा कदम, शिक्षक वृंद व शालेय विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता जाधव आणि पल्लवी शिर्के यांनी केले तर परीक्षक म्हणून पूर्व प्राथमिक विभागाच्या शिक्षिका सौ वैशाली शिंदे मॅडम आणि सोनल कडू मॅडम यांनी काम केले.

कोथरूड मधील मृत्युंजय मंदिराशेजारील नाला बुजवितोय कोण ?

पुणे- नाले बुजवून , रस्त्याचे पदपथ गिळंकृत करून वा अन्य मार्गाने सरकारी जमिनी लाटून राजकीय आसरा घेऊन बिल्डरांनी पुण्याचे वाट्टोळे केले असल्याचे जगजाहीर आहे. आता पुण्याचा मुकुटमनी मानला जाऊ लागलेल्या कोथरूडहि यातून सुटलेले नाही . आता सध्या तर कोथरूड मधील मृत्युंजय मंदिराशेजारील नाला खुले आम बुजविला जात असल्याचे दिसत असूनही त्यावर ठाम भूमिका घेताना कोणी दिसत नाही या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे याबाबत त्वरित कार्यवाही करावी…अशी मागणी केली आहे.
त्यांनी आयुक्तांना असे म्हटले आहे कि,’काही नागरिकांच्या तक्रारी वरून आज सकाळी कोथरूड च्या मृत्युंजय मंदिराशेजारील नाल्याची पाहणी केली असता अनेक गोष्टी निदर्शनास आल्या.मुळात संपूर्ण नाला हिरवं गार्डन नेट लावून बंद केल्यामुळे आत काय चाललंय हेच कळत नाही. आज आत जाऊन बघितलं असता चित्र भयावह असल्याचे निदर्शनास आले.याबाबतीत देवदेवेश्वर संस्थान चे विश्वस्त रमेश भागवत यांची भेट घेतली असता ” सदर नाला आमच्या वहीवाटीचा असून आम्ही देखील तेथे चाललेल्या घडामोडी बाबत प्रशासनास पत्र लिहिलं आहे असं त्यांनी सांगितले “.त्यांच्या पत्रावर प्रशासनाने काय कारवाई केली हे स्पष्ट करावे. तसेच त्वरित ह्या ठिकाणी पथक पाठवून नेमके काय चालले आहे त्याचा अहवाल जाहीर करावा.
येथे चाललेल्या बांधकामामुळं नाला बुजण्याची भीती व्यक्त होतं असून त्यामुळे पूर आल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल असे स्पष्टपणे नमूद करत
आहे.

‘माई’ सिंधुताई सपकाळ म्हणजे ग्लोबल मदर – न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांचे मत

  • डॉ. प्राजक्ता गिरीश कुलकर्णी आणि जीवन आनंद संस्था, सिंधुदुर्ग यांना ‘पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यशोदामाई राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ प्रदान

पुणे : हजारो अनाथ लेकरांची माय झालेल्या सिंधुताई सपकाळ यांना ‘माई’ असे संबोधतात, त्यावर एकाने मला म्हटले होते की त्यांना आई म्हणायला हवे, पण मला वाटते एका मुलांची असते ती आई आणि हजारोंची असते ती ‘माई’, त्या अर्थाने ‘माई’ सिंधुताई सपकाळ म्हणजे ग्लोबल मदर होत्या असे मत मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेण्यासाठी व्यक्तिशः आणि संस्थात्मक स्वरूपात ‘पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यशोदामाई राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो, बालगंधर्व रंगमंदिर येथे माईंच्या तिसऱ्या स्मृती दिनानिमित्त आयोजित पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानावरून न्यायमूर्ती डिगे बोलत होते. यावेळी कृष्ण प्रकाश (महाराष्ट्र पोलीस प्रमुख, फोर्स वन, मुंबई), रवी नगरकर (व्यवस्थापकीय संचालक, कल्याणी टेक्नोफोर्ज लि.),ममता सिंधुताई सपकाळ, दीपक गायकवाड, विनय सपकाळ,सीमा घाडगे,माजी आमदार उल्हास पवार, पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप,सागर ढोले पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. डॉ. प्राजक्ता गिरीश कुलकर्णी, अहिल्यानगर आणि जीवन आनंद संस्था, सिंधुदुर्ग यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जीवन आनंद संस्थेचा पुरस्कार संदीप परब यांनी स्वीकारला. रुपये ५१,००० चा धनादेश, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते.

पुढे बोलताना न्यायमूर्ती शिवकुमार डिगे म्हणाले, आजच्या पिढीकडे अपयश, दु:ख पचवायची ताकद कमी झालेली आहे. विशीत निराश्रित झालेली अबला स्त्री ते पद्मश्री हा प्रवास करणाऱ्या सिंधुताईंची अपयश पचवण्याची, निराश न होण्याची काय ताकद असेल हे आजच्या पिढीने समजून घेण्याची गरज आहे. वेदनेला कोणतीही भाषा नसते, यामुळे माईंचे कार्य भाषेच्या भिंती ओलांडून पसरले, त्यांनी जगभर प्रवास करत अनेकांच्या दु:खावर मायेची फुंकर घातली आहे.

चांगले काम करणाऱ्याला बळ दिले पाहिजे ही माईंची शिकवण आजच्या पुरस्काराच्या निमित्ताने अधोरेखित होते. आज पुरस्कार देणारी आणि ज्यांचा सन्मान होतोय त्याही सामाजिक संस्था आहेत. चांगले काम करणाऱ्या सामाजिक संस्था या समाजाच्या रक्तवाहिन्या असल्याचेही न्यायमूर्ती डिगे यांनी नमूद केले.

कृष्ण प्रकाश म्हणाले, सिंधुताई सपकाळ यांनी हजारो अनाथांचे आयुष्य घडविले, त्यांच्याकडे कोणताही राजपाट नव्हता मात्र एखादा चांगला राजा जशी आपल्या समाजाची काळजी करतो, सर्वस्व समाजाला अर्पण करतो तोच हेतु, ध्येय माईंच्या कामातून दिसते. एका हाताने घेऊन दुसऱ्या हातापर्यंत पोहचवण्याचे काम त्यांनी केले, एका दिव्याने दुसरं दिवा प्रज्वलित होतो तसे माईंचे काम दिव्यासारखे होते. त्यांची प्रेरणा घेऊन अनेकजण काम करतील असा विश्वास कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केला.

रवी नगरकर म्हणाले, माईंचे कार्य मोठे आहे. त्या अनेकांच्या जगण्याचा आधार बनल्या. आज कल्याणी ग्रुपच्या वतीने अनेक सामाजिक संस्थांना आम्ही मदत करत आहोत. या संस्था काही प्रमाणात स्वावलंबी व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

सत्काराला उत्तर देताना डॉ. प्राजक्ता कुलकर्णी म्हणाल्या, स्नेहालयाच्या कामाची दखल घेतल्याबद्दल मी ऋणी आहे. माईंच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार म्हणजे स्नेहालय वर असलेल्या जबाबदारीची जाणीव नव्याने करून दिल्यासारखे आहे.

संदीप परब म्हणाले, यशोदामाई राष्ट्रीय पुरस्काराने संस्थेची जबाबदारी आणखी वाढली आहे. समाजातील अनाथांना माईने आश्रय दिला, त्यांना घडविले, आज आई – वडील, आजी – आजोबा यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, तसे करू नका असे आवाहन त्यांनी समाजाला केले.

प्रास्ताविक करताना ममता सिंधुताई सपकाळ म्हणाल्या, “माईच्या प्रेरणादायी जीवनातून समाजसेवेची भावना जागृत व्हावी आणि त्यांच्या कार्याचा वारसा पुढे न्यावा, या उद्देशाने हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. या पुरस्काराने त्यांना नवी ऊर्जा मिळेल आणि समाजासाठी अधिक समर्पक कार्य करण्यास प्रेरणा मिळेल. आमच्याकडे जे काही ते आम्ही या पुरस्काराच्या माध्यमातून तुमच्याशी शेअर करत आहोत.समाजाच्या तळागाळात जाऊन प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना सन्मानित करणे ही माईंच्या कार्याला खरी श्रद्धांजली आहे.”

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रबोधनकार गणेश शिंदे आणि गायिका सन्मिता शिंदे यांच्या ‘मोगरा फुलला’ या सांगीतिक कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विणया देसाई यांनी केले.

‘तुम्ही मते दिली म्हणजे माझे मालक नाही झालात’; भर सभेत अजितदादा संतापले?

तुम्ही मते दिली म्हणजे माझे मालक नाही झालात…
अजित पवार नेहमीच वादग्रस्त बोलतात, परंतु मधल्या काळामध्ये ही वादग्रस्त वाक्ये कमी झाली होती. आज बोलता बोलता अजित पवारांनी पुन्हा मतदारांना असाच एक प्रश्न विचारला. अजित पवार मेडदमधील भाषणात बोलत असतानाच काही लोक निवेदन देत होते. भाषण सुरू असतानाच अजित पवार निवेदनं वाचत अधिकाऱ्यांना बोलावून ही कामे हात वेगळी करत होते आणि अधिकाऱ्यांना यामध्ये लक्ष घाला अशी सूचना करत होते.याच दरम्यान एका कार्यकर्त्याने बरीच महिने झाले हे काम झाले नाही असा धोशा लावला. त्यानंतर दुसऱ्याही कार्यकर्त्याने त्याच्या सुरात सूर मिसळला. हे पाहून काहीसं चिडलेल्या अजित पवार यांनी चेहऱ्यावर तसा आव न आणता एक वाक्य वापरले ते म्हणजे “तुम्ही मते दिली म्हणजे माझे मालक नाही झालात” असे अजित पवार म्हणाले आणि पुन्हा शांतता पसरली.

बारामती : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार याची चर्चा सुरू आहे. अद्यापही ना अजित पवारांनी याला दुजोरा दिला, ना शरद पवारांनी! मात्र राष्ट्रवादीचे आमदार, खासदारांमध्ये चर्चा सुरू आहे. आज बारामतीत अजित पवारांनी पुन्हा नेहमीचाच राग आळवत लोकसभेच्या वेळी लोकांनी जे फसवले त्याची नाराजी थोडीशी जाहीर केली, पण तरी देखील त्यांनी त्यांना मतदान दिले काय आणि मला मतदान दिले काय शेवटी “ताटात पडले काय आणि वाटीत पडले काय” असे म्हणत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या मनोमिलनाचे संकेत दिले.

अजित पवारांना यातून नेमकं काय सांगायचंय असा प्रश्न उपस्थित होतोय आणि त्यापेक्षाही अप्रत्यक्षरीत्या अजित पवार हे दुसऱ्या गटाला ही सामावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत का..? असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. आज बारामतीतील मेडद या ठिकाणी बारामती तालुका खरेदी विक्री संघाने उभा केलेल्या पेट्रोल पंपाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.अजित पवार नेहमीच खासगीत बोलताना राज्यातील कोणत्याही नेत्यांच्या तुलनेत एवढेच काय अगदी शरद पवारांच्या कामाशीही तुलना करतात. आजही त्यांनी अप्रत्यक्षरीत्या एक शब्द वापरला. पाच वर्षात अशी कामे करायची की, कुणाच्याही टर्ममध्ये एवढी कामे झाली नाहीत. अशी कामे आपण केली पाहिजेत. आपल्याला करायची आहेत असे ते म्हणाले.आज अजित पवारांनी एकाच भाषणात तीन वेळा “ताटात पडलं काय आणि वाटीत पडलं काय” असा शब्द वापरला. खराडवाडी या गावातील नागरिकांनी लोकसभेला आपल्याला फसवले याचा पुनरुच्चार अजित पवारांनी खराडेवाडीतील काहीजण समोर दिसताच त्यांची नावे घेऊन केला. पण पुन्हा ती नाराजी सावरत त्यांनी आपले शब्द आवरले आणि जाऊ द्या, मला माणूस दिसला की आठवतं असं म्हणत ताटात पडले काय आणि वाटीत पडले काय असे ते म्हणाले.
एकूणच अजित पवारांना लोकसभेच्या पराभवाचे शल्य अजूनही आहे, परंतु त्यापेक्षाही बदलत्या राजकीय परिस्थितीत अजित पवार हे राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाला चुचकारण्याचा प्रयत्न करत आहेत का? असाही प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे आणि त्याचीच आज दिवसभर चर्चा सुरू होती.

मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर खंडणीची बैठक- आमदार सुरेश धस

पुणे-

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी झाली.या हत्येला जवळपास २६ दिवसांचा कालावधी झाला आहे.या संपूर्ण कालावधीत संशयित आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले,सुधीर सांगळे यांच्यासह अन्य दोन जणांना अटक करण्यात आली आहे.तर आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे.तसेच या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील ठिकठिकाणी मोर्चे काढून निषेध नोंदविला जात आहे.
आज पुण्यातील लाल महाल ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या मोर्चाला सुरुवात झाली असून या मोर्चात संतोष देशमुख यांच्या कुटुंबांतील सदस्य सहभागी झाले होते.तसेच यावेळी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी लाल महालमधील जिजाऊ च्या पुतळ्यास अभिवादन देखील केले. मनोज जरांगे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार बजरंग सोनवणे यांचा सह विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच पुणे जिल्हय़ातील विविध भागातील नागरिक मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आरोपी वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे,मुख्यमंत्री साहेब धनंजय मुंडे चा राजीनामा घ्या,कर्तव्यात कसूर करणार्‍या पोलीस अधिकाऱ्यांना सहआरोपी करावे,मु.पो.बिहार (बीड) या आशयाचे फलक घेऊन नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली .

संतोष देशमुखांच्या हत्येची सुरूवात एप्रिलमध्येच, मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, सुरेश धसांनी तारीख वार सगळंच सांगितलं आहे
भाजपचे आमदार सुरेश धस यांनी खळबळजनक दावा करत थेट मंत्री धनंजय मुंडेवर गंभीर आरोप केला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येची सुरूवात एप्रिल-मे दरम्यान झाल्याचं सांगत मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर खंडणीची बैठक झाल्याचं म्हटलं आहे.संतोष देशमुख यांच्या हत्येची सुरुवात मे ते एप्रिल महिन्यापासून झाली आहे. आमच्याकडे कंपन्या येऊ लागल्या. नितीन बिक्कड याने स्वत:च्या पायाला गोळी मारून घेतली. कपंनीवर गुन्हा दाखल केला आणि कोर्टापर्यंत. पुढे हे सिद्ध झालं तरी कंपनीवाले म्हटले मिटवून टाका. तिथून पुढे बिक्कड परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यात वावर वाढत गेला. कंपन्यांच्या सिक्युरिटीचे काम घेऊ लागला. यादरम्यान त्याची वाल्मिक कराडसोबत भेट झाली. वालूबाबा, आकाची मीटिंग झाली. १९ जूनला वाल्मिक कराड, नितीन बिक्कड, अनंत काळकुटे, आवादा कंपनीचे अधिकारी शुक्ला यांची परळीमधील धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाली. आवादा कंपनीच्या शुक्ला यांना घेऊन नितीन बिक्कड परळीला वाल्मिक कराडकडे गेला. कंपनीवाले धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी प्रयत्न केले, ही बाब कराडला समजली. कराड मुंडे यांचे पीए देशमुख यांना काय म्हणायचं ते म्हणल्याचं धस यांनी सांगितलं.आय कंपनीची मीटिंग मुंबईला धनंजय मुंडे यांच्यासोबत बैठक ठरली. धनंजय मुंडे यांच्या सातपुडा बंगल्यावर आवादा कंपनीचे अधिकारी अल्ताफ तांबोळी, शुक्ला यांची वाल्मिक आणि नितीनची बैठक झाली. यावेळी तीन करोडची डील झाली. आका बोलले ३ कोटी द्या, यावेळी कंपनीचे अधिकारी बाहेर पडले आणि कंपनीच्या वरिष्ठांना सांगितलं. मात्र वरिष्ठांनी त्यांना २ करोडमध्ये फायनल करा असं सांगितलं. अधिकारी त्यांना बोलले की २ कोटी त्यावेळी जाताना ते म्हटले की पुढे ठरवू. पण निवडणुकीच्या काळात ५० लाख आकानी घेतले की बडे आकाने घेतले मला माहित नाही. सरकारी बंगल्यावर खंडणीसाठी बैठका झाल्याचं म्हणत सुरेश धस यांनी गंभीर आरोप केला आहे.

१० व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे १५ ते १९ जानेवारी २०२५ दरम्यान आयोजन

महोत्सवात भारतीय सिनेमा स्पर्धा विभागाचा समावेश, जगभरातील ६५ फिल्म्सचे होणार प्रदर्शन

छत्रपती संभाजीनगर (दि.०५): जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणार्‍या दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली असून बुधवार, दि. १५ ते रविवार, दि. १९ जानेवारी २०२५ या दरम्यान हा महोत्सव पीव्हीआर-आयनॉक्स थिएटर प्रोझोन मॉल, छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे.
नाथ ग्रुप, एमजीएम विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण सेंटर व मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन आयोजित अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संपन्न होत असून प्रोझोन मॉल यांचे विशेष सहकार्य या फेस्टिव्हलला मिळालेले आहे. एनएफडीसी व महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन यांची सहप्रस्तुती असणार आहे. डेलीहंट डिजीटल पार्टनर आहेत. सॉलीटेअर टॉवर्स हे या महोत्सवाचे सह आयोजक आहेत. एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्टस या महोत्सवाचे अ‍ॅकॅडमीक पार्टनर तर एमजीएम रेडिओ एफएम ९०.८ हे रेडिओ पार्टनर आहेत.

अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजनामागील उद्देश :
आजपर्यंतचे जागतिक दर्जाचे सर्वोत्त्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचावेत, चित्रपट दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलावंत व युवा पिढीतील सिनेमाची आवड असणार्‍या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळून कला व तांत्रिक पातळीवर चित्रपटाचे रसग्रहण होत चित्रपट जाणिवा अधिक सशक्त व समृद्ध व्हाव्यात, मराठवाडा व छत्रपती संभाजीनगरचे नाव चित्रपटाच्या निर्मितीच्या अंगाने सांस्कृतिक केंद्र म्हणून व प्रोडक्शन हब म्हणून जागतिक पातळीवर पोहोचावे, छत्रपती संभाजीनगर शहरातील पर्यटन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटकांपर्यंत पोहोचावे, मराठवाडा विभागातील गुणवंत कलावंतांना चित्रपट दिग्दर्शक, चित्रपट विषयातील तज्ज्ञ व तंत्रज्ञांपर्यंत पोहोचता यावे, त्यांच्यासोबत संवाद साधता यावा तसेच आताचा मराठी सिनेमा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचावा, हा या महोत्सव आयोजनामागे उद्देश आहे.

भारतीय सिनेमा स्पर्धा :
महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. महोत्सवात मागील वर्षाप्रमाणे भारतीय स्पर्धा गटाचा समावेश करण्यात आलेला आहे. यात विविध भारतीय भाषांतील नऊ सिनेमांचा समावेश असून पाच राष्ट्रीय पातळीवरील ज्युरी हे प्रेक्षकांसह चित्रपट पाहणार आहेत. यातील सर्वोत्त्कृष्ट भारतीय चित्रपटाला सुवर्ण कैलास पारितोषिक व एक लक्ष रूपये देण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट कलाकार (स्त्री/पुरुष) या वैयक्तिक पारितोषिकांचा देखील समावेश असणार आहे.
भारतीय सिनेमा स्पर्धा गट ज्युरी समितीच्या अध्यक्षा ज्येष्ठ अभिनेत्री सीमा बिस्वास (गुवाहाटी) या असणार आहे. तर ज्युरी सदस्य म्हणून ज्येष्ठ छायाचित्रकार सी. के. मुरलीधरन (मुंबई), ज्येष्ठ संकलक दिपा भाटीया (मुंबई), ज्येष्ठ दिग्दर्शक जो बेबी (कोचीन) व ज्येष्ठ पटकथा लेखक व अभिनेते गिरीश जोशी (मुंबई) हे मान्यवर असणार आहेत.
फिप्रेसी ही चित्रपट समीक्षकांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. फिप्रेसी भारत हे जगभरातील महोत्सवांमधून उत्तम चित्रपट निवडून त्यांना पुरस्कार प्रदान करतात. त्या पुरस्कारांना आंतरराष्ट्रीय सन्मान मानला जातो. त्यांचे तीन विशेष ज्युरी महोत्सवातील आताच्या पिढीतील ज्या दिग्दर्शकांच्या कारकिर्दीतील पहिले अथवा द्वितीय सिनेमे असणार आहेत, त्यांचे विशेष परीक्षण करणार आहेत. या समितीचे ज्युरी अध्यक्ष ज्येष्ठ लेखिका व चित्रपट समीक्षक लतिका पाडगांवकर व शीलादित्य सेन (पश्चिम बंगाल), जी. पी. रामचंद्रन (केरळ) हे मान्यवर या समितीत सदस्य असणार आहेत.

कालिया मर्दन विशेष प्रदर्शन, उद्घाटन सोहळा व जीवन गौरव पुरस्कार :
महोत्सवाच्या दशकपूर्ती वर्षाच्या निमित्ताने आयोजन समितीच्या वतीने रसिकांना एका विशेष कार्यक्रमाची भेट दिली जाणार आहे. भारतीय सिनेसृष्टीचे संस्थापक दादासाहेब फाळके यांनी १०५ वर्षांपूर्वी दिग्दर्शित केलेला प्रसिध्द मुकपट ‘कालिया मर्दन’ याचे विशेष प्रदर्शन उद्घाटन सोहळ्याआधी संपन्न होणार आहे. शंभर वर्षांपूर्वीचे मुकपट सिनेगृहात प्रत्यक्ष संगीताद्वारे (लाईव्ह ऑर्केस्ट्रा) दाखविले जात. तोच अनुभव रसिकांना मिळावा म्हणून कालिया मर्दन हा मुकपट कोलकाता येथील ‘सतब्दीर सब्द’ या वाद्यवृंद समूहातर्फे सादरीकरणाद्वारे दाखविला जाणार आहे. एमजीएम विद्यापीठाच्या रूक्मीणी सभागृहात बुधवारी, दि. १५ जानेवारी २०२५ रोजी सायं. ५ वा. या मुकपटाचे प्रदर्शन करण्यात येईल. कालिया मर्दन विशेष प्रदर्शन व उद्घाटन सोहळ्यासाठी सर्वांसाठी प्रवेश खुला असेल.
यानंतर लगेचच याच ठिकाणी चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा बुधवारी, दि. १५ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता रूक्मीणी सभागृह, एमजीएम परीसर, छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी महोत्सवाचे मानद अध्यक्ष व प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची उपस्थिती असणार आहे. यंदाचा पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कार प्रसिध्द व ज्येष्ठ लेखिका, नाटककार, निर्मात्या व चित्रपट दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे यांना त्यांच्या भारतीय सिनेमातील अतुल्य योगदानाबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून एनएफडीसीचे महाव्यवस्थापक डी. रामाकृष्णन, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, महोत्सव संचालक सुनील सुकथनकर, महोत्सवाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, प्रोझोनचे सेंटर डायरेक्टर व वरिष्ठ उपाध्यक्ष कमल आर. सोनी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळ्यानंतर रात्री ९ वा. पीव्हीआर-आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे यावर्षीची जागतिक पातळीवरील नावाजलेली फ्रेंच आणि तामिळ भाषेतील फिल्म ‘लिटील जाफना’ फेस्टिव्हलची ओपनिंग फिल्म म्हणून प्रदर्शित केली जाणार आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर पुढील चार दिवस महोत्सव पीव्हीआर-आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे संपन्न होईल.

समारोप सोहळा :
फेस्टिव्हलचा समारोप सोहळा रविवार, दि. १९ जानेवारी २०२५ रोजी सायं. ५ वाजता पीव्हीआर आयनॉक्स प्रोझोन मॉल येथे संपन्न होणार आहे. सुप्रसिध्द नृत्य व चित्रपट दिग्दर्शिका फराह खान, ऑस्कर विजेते साउंड डिझायनर रसूल पुक्कूट्टी व आयोजन समितीचे मानद अध्यक्ष प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप सोहळा संपन्न होईल.
सुवर्ण कैलास पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव समारोपाची फिल्म म्हणून यंदाच्या ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीतील महत्वपूर्ण फिल्म ‘द सीड ऑफ सॅक्रेड फिग’ (पर्शियन) दाखविण्यात येणार आहे.

मास्टर क्लास व विशेष व्याख्यान :
महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत चित्रपट प्रदर्शनांबरोबरच विविध भरगच्च कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. गुरुवार, दि. १६ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १२ वाजता पीव्हीआर-आयनॉक्स येथे पानसिंग तोमर, हासिल, साहब बीबी और गँगस्टर यांसारखे अनेक महत्वपूर्ण सिनेमांचे दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया यांच्या मास्टर क्लासचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक ज्ञानेश झोटींग हे त्यांच्याशी संवाद साधतील.
गुरूवार, दि. १६ जानेवारी २०२५ रोजी सायं ६ वा. पीव्हीआर-आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची ‘स्वदेसची वीस वर्षे…’ ही प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. प्रसिध्द नाट्य व चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी हे त्यांच्याशी संवाद साधतील.
शुक्रवार, दि. १७ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १२ वा. पीव्हीआर-आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे ‘ओटीटी माध्यमांवरील बदलता सिनेमा’ या विषयावर परीसंवादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. विविध भारतीय भाषांमधील महत्वपूर्ण चित्रपट दिग्दर्शकांचा यात सहभाग राहील.
शुक्रवार, दि. १७ जानेवारी २०२५ रोजी सायं. ६ वा. पीव्हीआर-आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे ‘मराठी भाषा अभिजात दर्जा व मराठी चित्रपट’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये लेखिका लतिका पाडगांवकर, प्रसिध्द अभिनेते सुबोध भावे, लेखक क्षितिज पटवर्धन, चित्रपट महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय सांवलकर, प्रसिध्द दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचा सहभाग असणार आहे. महोत्सव संचालक सुनील सुकथनकर या चर्चेचे संवादक असतील.
शनिवार, दि. १८ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १२ वा. पीव्हीआर-आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे ‘आधुनिक सिनेमातील तंत्र भाषा’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये ऑस्कर विजेते साउंड डिझायनर रसूल पुक्कूट्टी, ज्येष्ठ छायाचित्रकार सी. के. मुरलीधरन, ज्येष्ठ संकलक दिपा भाटीया, ज्येष्ठ दिग्दर्शक जो बेबी यांचा सहभाग असणार आहे. प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक जयप्रद देसाई हे या चर्चेचे संवादक असतील.
शनिवार, दि. १८ जानेवारी २०२५ रोजी सायं. ६ वा. पीव्हीआर-आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे भारतीय सिनेमा स्पर्धा गटातील चित्रपट दिग्दर्शकांसमवेत चर्चा आयोजित करण्यात आलेली आहे.
रविवार, दि. १९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वा. पीव्हीआर-आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे इंडिया फोकस या चित्रपट विभागातील दिग्दर्शकांसमवेत चर्चा आयोजित करण्यात आलेली आहे.
रविवार, दि. १९ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वा. पीव्हीआर-आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे हिंदी सिनेमांमधील प्रसिध्द नृत्य व चित्रपट दिग्दर्शिका फराह खान यांच्या मास्टरक्लासचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक जयप्रद देसाई हे त्यांच्याशी संवाद साधतील.

कलाकारांची उपस्थिती व संवाद :
स्पर्धा विभागातील सर्व प्रादेशिक चित्रपटांचे दिग्दर्शक, कलावंत आणि तंत्रज्ञ महोत्सवात उपस्थित राहणार असून त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर ते प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत.

मराठवाडा शॉर्ट फिल्म स्पर्धा :
महोत्सवाच्या निमित्ताने मराठवाड्यातील लघुपट निर्मिती करणार्‍या कलाकारांसाठी शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. या स्पर्धेला मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद लाभला. स्पर्धेतील अंतिम फेरीसाठी निवडलेल्या पाच शॉर्ट फिल्म महोत्सवादरम्यान दाखविण्यात येतील. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मला विशेष पारितोषिक व रोख २५,००० रूपये देऊन गौरविण्यात येणार आहे.

चित्रपट रसग्रहण कार्यशाळा :
चित्रपट महोत्सवामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा याकरिता छत्रपती संभाजीनगर शहरात पंचवीस महाविद्यालयांमध्ये चित्रपट रसग्रहण कार्यशाळांचे आयोजन चित्रपट समिक्षकांच्या उपस्थितीत दि. ६ ते १४ जानेवारी २०२५ दरम्यान करण्यात आले आहे.

प्रतिनिधी नोंदणी :
चित्रपट महोत्सवास उपस्थित राहण्याकरीता प्रतिनिधी नोंदणीची सुरूवात करण्यात आलेली असून जगातील व देशातील सर्वोत्कृष्ट सिनेमे रसिकांना बघता यावे, याकरीता सर्वसामान्य नागरिकांकरीता केवळ पाचशे पन्नास रुपये कॅटलॉग शुल्क आकारण्यात येणार आहे, तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात केवळ तीनशे पन्नास रुपयांत या महोत्सवाचा आनंद घेता येणार आहे. प्रतिनिधी नोंदणी सुरुवात झाली असून aifilmfest.in या वेबसाईट वर चित्रपट रसिकांना ऑनलाईन प्रतिनिधी नोंदणी करता येईल तर प्रत्यक्ष नोंदणी पीव्हीआर-आयनॉक्स प्रोझोन मॉल, साकेत बुक वर्ल्ड (औरंगपुरा), विशाल ऑप्टीकल्स (उस्मानपुरा) व निर्मिक ग्रुप, व्यंकटेश मंगल कार्यालयासमोर, सुतगिरणी रोड येथे करता येईल.

संयोजन समिती :
छत्रपती संभाजीनगरचे नाव चित्रपट क्षेत्रात जागतिक व्यासपीठावर नेणार्‍या या महोत्सवात मराठवाड्यातील नागरिकांनी सहभाग नोंदवावा तसेच अधिक माहितीसाठी aifilmfest.in या वेबसाईटवर तसेच info@aifilmfest.in या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन महोत्सवाचे संस्थापक व संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम, मानद अध्यक्ष आशुतोष गोवारीकर, सतीश कागलीवाल, महोत्सवाचे संचालक सुनील सुकथनकर, कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, डॉ. अपर्णा कक्कड, आकाश कागलीवाल, डॉ. आशिष गाडेकर, महोत्सवाचे संयोजक नीलेश राऊत, क्रियेटिव्ह डायरेक्टर जयप्रद देसाई, ज्ञानेश झोटींग, शिव कदम, डॉ. रेखा शेळके, प्रा. दासू वैद्य, प्रेरणा दळवी, डॉ. आनंद निकाळजे, शिवशंकर फाळके, सुबोध जाधव, डॉ. कैलास अंभुरे, निखिल भालेराव, अमित पाटील, सुहास तेंडूलकर, डॉ. संदिप शिसोदे, किशोर निकम, अजय भवलकर आदींनी केले आहे.

शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड:10 फुटांवर 10 ते 15 मिनिटे अडकले

तिसऱ्या प्रयत्नात उड्डाण यशस्वी
चिपळूण-
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बीघाड झाल्याची घटना समोर आली आहे. शरद पवार हे चिपळूण दौऱ्याला गेले असता तेथून परत येत असताना ही घटना घडली आहे. हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हेलिकॉप्टरला सलग तीन वेळा उड्डाण करण्याचा प्रयत्न करावा लागला. अखेर तिसऱ्या प्रयत्नात हेलिकॉप्टरचे यशस्वी उड्डाण झाले.

चिपळूण येथे आयोजित कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम झाल्यानंतर शरद पवार परतीच्या प्रवासाला निघाले असता हेलिकॉप्टरमध्ये हा तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हेलिकॉप्टर दहा फुटांवर तब्बल दहा ते पंधरा मिनिटे अडकून पडले होते. उड्डाण घेण्यासाठी शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरला सलग तीन वेळा प्रयत्न करावे लागले. अखेर तिसऱ्या प्रयत्नामध्ये या हेलिकॉप्टरने उड्डाण केले.

शरद पवार हेलिकॉप्टर मध्ये बसल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांची धावपळ संपली होती. मात्र हेलिकॉप्टरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र काही वेळाने हेलिकॉप्टरने यशस्वी उड्डाण केले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी नि:श्वास सोडला. यापूर्वी सुनील तटकरे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये देखील बिघाड झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता शरद पवार यांच्या हेलिकॉप्टर मध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे.

चीनमध्ये श्वसनाशी संबंधित आजारांच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या संयुक्त देखरेख गटाची बैठक


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाद्वारे सर्व उपलब्ध स्रोतांच्या माध्यमातून चीनमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष, चीनमधील परिस्थितीबद्दल वेळोवेळी अद्ययावत माहिती सामायिक करावी अशी जागतिक आरोग्य संघटनेला केली विनंती

कोणत्याही आरोग्यविषयक आपत्ती आणि  आव्हानांना तातडीने प्रतिसाद देण्यासाठी भारत सज्ज, आत्तापर्यंतच्या देखरेख आणि तपासण्यांमध्ये असामान्य वाढ दिसून आली नाही

मुंबई –

गेल्या काही आठवड्यांपासून चीनमध्ये श्वसनाशी संबंधित आजारांच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारितील आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या (DGHS – Directorate General of Health Services) अध्यक्षतेखाली आज संयुक्त देखरेख गटाची (JMG) बैठक पार पडली. जागतिक आरोग्य संघटना (WHO), आपत्ती व्यवस्थापन विभाग, एकात्मिक रोग संनिरीक्षण कार्यक्रम (Integrated Disease Surveillance Programme – IDSP), राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR), आपत्कालीन वैद्यकीय मदत विभाग आणि  दिल्लीतील एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) रुग्णालयासह इतर रुग्णालयांमधले तज्ञ प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले.

या बैठकीत झालेल्या सविस्तर चर्चेनंतर आणि सध्या उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे उपस्थित प्रतिनिधींमध्ये काही मुद्द्यांवर सहमती झाली, हे मुद्दे खालीलप्रमाणे :

  • ताप सर्दी सदृश्य विषाणूजन्य संसर्ग अर्थात फ्लूचा सध्याचा हंगाम पाहता चीनमधील सध्याची परिस्थिती ही असामान्य नाही. या संदर्भातील उपलब्ध अहवालांमधूनही असेच सूचित गेले आहे की या ऋतुमध्ये सामान्यतः आढळून येणार्‍या आरएसव्ही आणि एचएमपीव्ही या रोगजन्य विषाणूंच्या संसर्गामुळेच तिथे श्वसनाशी संबंधित आजारांच्या प्रकरणांमध्ये वाढ दिसून येत आहे.
  • सरकार सर्व उपलब्ध स्रोतांच्या माध्यमातून तिथल्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, यासोबतच चीनमधील परिस्थितीबद्दल वेळोवेळी अद्ययावत माहिती सामायिक करावी अशी विनंती देखील जागतिक आरोग्य संघटनेला केली गेली आहे.
  • सद्यस्थितीत भारतासह जगभरात वर नमूद केलेल्या विषाणूंचा या आधीच प्रसार झालेला आहे.
  • सद्यस्थितीत भारतात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि एकात्मिक रोग संनिरीक्षण कार्यक्रम या दोन्ही संस्थांच्या विस्तारलेल्या व्यवस्थांच्या माध्यमातून इन्फ्लूएंझा विषाणू संसर्गसदृश्य आजार (ILI) तसेच गंभीर आणि तीव्र श्वसन विकाराअंतर्गच्या आजारांच्या बाबतीत एक मजबूत देखरेख प्रणाली या आधीपासूनच अस्तित्वात आहे. यासंदर्भात दोन्ही संस्थांनी उपलब्ध केलेल्या आकडेवारीवरून देशात  इन्फ्लूएंझा विषाणू संसर्गसदृश्य आजार (ILI) तसेच गंभीर आणि तीव्र श्वसन विकाराअंतर्गच्या आजारांच्या प्रकरणांमध्ये असामान्य वाढ झाल्याचे दिसून आलेले नाही.
  • गेल्या काही आठवड्यांमध्ये ऋतुंप्रमाणे अपेक्षित असलेले बदल वगळता देशभरात श्वसनाशी संबंधित आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली  नसल्याची बाबही विविध रुग्णालयांमधील डॉक्टरांनी स्पष्ट केली आहे.
  • भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या देशभरात विस्तारलेल्या व्यवस्थेने देखील श्वसन विषयक आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या एडेनोव्हायरस, आरएसव्ही, एचएमपीव्ही अशा विविध प्रकाराच्या विषाणुंच्या चाचण्या केल्या गेल्या आहेत. त्या सर्व नमुना चाचण्यांमध्ये देखील या रोगजन्य विषाणुंच्या प्रकरणांमध्ये असामान्य स्वरुपाची वाढ दिसून आली नाही. त्याचवेळी सध्याच्या परिस्थितीत खबरदारीची उपाययोजना म्हणून वैद्यकीय संशोधन परिषदेकडून देशभरात एचएमपीव्हीची चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळांची संख्या वाढवली जाणार आहे, आणि या सर्व प्रयत्नांच्या माध्यमातून वैद्यकीय संशोधन परिषद येत्या वर्षभरात एचएमपीव्हीचा कल कसा राहतो, याची कठोर देखरेख करणार आहे.
  • देशभरात अलिकडेच पूर्वतयारीशी संबंधीत प्रात्यक्षिके झाली. त्यातून हाती आलेल्या माहितीच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की जर देशात श्वसनाशी संबंधित आजारांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली तर अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारत पूर्ण क्षमतेने सज्ज आहे.

देशाची आरोग्य यंत्रणा आणि देखरेखीशी संबंधित देशभरात विस्तारलेली व्यवस्था पूर्णतः सतर्क आहेत, आणि या माध्यमातून देश  अचानकपणे उद्भवणाऱ्या कोणत्याही आरोग्यविषयक आपत्ती आणि  आव्हानांना तातडीने प्रतिसाद देण्यासाठी सज्ज असल्याची सुनिश्चिती केली  जात आहे.

भारतीय युद्धनौका आयएनएस तुशिलचे, सेनेगल देशात डकार येथे आगमन

मुंबई- आय एन एस तुशील, ही भारतीय नौदलाची नवीकोरी, रडारवर टिपली न जाणारी युद्धनौका (स्टेल्थ फ्रिगेट), 03 जानेवारी 25 रोजी सेनेगलच्या डकार बंदरात डेरेदाखल झाली. या भेटीमुळे सेनेगलसोबतचे विद्यमान संबंध अधिक दृढ होतील आणि दोन्ही देशांच्या नौदलांमधील परस्परसंवाद वाढेल.

कॅप्टन पीटर वर्गीस यांच्या नेतृत्वाखालील आयएनएस तुशील तिच्या बंदरातील मुक्कामा दरम्यान (पोर्ट कॉल) विविध लष्करी आणि सामाजिक उपक्रमात सहभागी होईल. यामध्ये सेनेगलचे वरिष्ठ लष्करी आणि सरकारी अधिकारी यांच्याशी संवाद, तसेच अत्याधुनिक स्वदेशी बनावटीची शस्त्रे, संवेदक (सेन्सर्स) आणि जहाजावरील साधनसामुग्रीचे प्रदर्शन यांचा समावेश असेल. या युद्धनौकेवर, दोन्ही नौदलातील संबंधित तज्ञांमध्ये परस्परांना लाभदायक ठरणाऱ्या समस्या निवारणाच्या उपायांबाबत संवाद घडेल आणि प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षणही पार पाडेल. सेनेगलच्या हौशी नागरिकांसाठी योगाभ्यासाचे एक उत्साहवर्धक सत्र देखील, इथे नियोजित आहे.  भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन करण्यासाठी, इथे  सामाजिक संवादाचे आयोजन देखील होणार आहे. सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर, ही युद्धनौका संवाद आणि सहकार्य वाढवणाऱ्या संयुक्त सरावा (पॅसेज एक्सरसाइज -PASSEX) मध्ये भाग घेईल आणि पश्चिम आफ्रिकी  किनाऱ्यावळील समुद्रात सेनेगलच्या नौदलासह संयुक्त गस्त घालणारे संचलन करेल.  प्रादेशिक सुरक्षा वाढवून, आंतरपरिचालनाला चालना देत दोन्ही नौदलांमधील सागरी सहकार्य वाढवणे हा या सरावाचा उद्देश आहे.

भारताने सेनेगलसोबतच्या संबंधांना दिलेले महत्त्व आणि दोन्ही राष्ट्रांमधील वाढणारे संरक्षण सहकार्य आणि मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्याच्या प्रयत्नाचे हे आणखी एक प्रखर द्योतक आहे. यामुळे दोन्ही नौदलांना एकमेकांकडून शिकण्याची आणि सहकार्याचे नवीन मार्ग शोधण्याची संधी देखील मिळेल.

हशा आणि टाळ्या हीच माझी बिदागी : शि. द. फडणीस

पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनात शि. द. फडणीस यांचा रोटरी व्होकेशनल एक्सलन्स ॲवॉर्डने सन्मान

पुणे : ‌‘मराठी‌’चे होणार काय असा प्रश्न विचारला जात असतानाच रोटरी आयोजित मराठी साहित्य संमेलनामुळे अनेक लेखक, प्रकाशक समाजासमोर येतील, पुस्तके वाचली जातील, मराठी भाषाही टिकेल असा विश्वास व्यक्त करून असे साहित्यविषयक उपक्रम सातत्याने होत रहावेत, असे मत ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी व्यक्त केले. व्यंगचित्र, हास्यचित्रे काढणे हा माझा छंद होता. या छंदामुळे रसिकांनी मला हशा आणि टाळ्यांची बिदागी दिली, असेही कृतज्ञतापूर्वक उद्गार फडणीस यांनी काढले.
व्यावसायिक सेवा देताना सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीस मानाचे रोटरी व्होकेशनल एक्सलन्स ॲवॉर्ड देऊन गौरविले जाते. पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी (दि. 5) फडणीस यांचा गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण प्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना फडणीस बोलत होते. पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, प्रांतपाल शितल शहा, रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजचे अध्यक्ष सूर्यकांत वझे, रोटरी व्होकेशनल डायरेक्टर मधुमिता बर्वे, डीजीई संतोष मराठे मंचावर होते. उपरणे, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि वेलदोड्याचा हार असे पुरस्काराचे स्वरूप होते.
व्यावसायिक गुणवत्ता परीक्षा मी 40 वर्षांपूर्वीच दिली आणि या व्होकेशनल एक्सलन्स ॲवॉर्डच्या निमित्ताने त्याचे प्रमाणपत्र मला आज मिळत आहे, अशा भावना व्यक्त करून फडणीस पुढे म्हणाले, व्यंगचित्र, हास्यचित्र काढणे हा माझा छंद होता. हा छंदच पुढे माझे करिअर बनला. रसिकांनी भरभरून दिलेल्या प्रेमामुळे माझ्याकडे हशा, टाळ्या आणि प्रेमाचीच गणती जास्त होती. परंतु याचा मला कधीही खेद वाटला नाही. शंभरीत पदार्पण केलेल्या शि. द. फडणीस यांनी उभे राहून केलेल्या भाषणाला रोटेरियन्सनी टाळ्याच्या गजरात दाद दिली.
अशोक नायगावकर म्हणाले, रोटेरियन्सचे काम साहित्य क्षेत्राकडे वळते आहे हे मराठी भाषेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. शि. द. फडणीस यांच्या सारख्या महान कलाकाराच्या कार्यकर्तृत्वाची दखल जागतिक स्तरावर घेतली जावी. त्यांचा माझ्या हस्ते झालेला सन्मान हा मी माझाच सन्मान समजतो.
विश्वास पाटील म्हणाले, शि. द. फडणीस हे व्यंगचित्र, हास्यचित्र या कलाप्रकारात ‌‘या सम हा‌’ अशा अत्युच्य पदावर आहेत. सत्तर वर्षांहून अधिक काळ मोहिनी मासिकामध्ये चित्रे रेखाटून मोहिनीला शिदंनी चिरतरूण ठेवले आहे.
रोटरी व्होकेशनल एक्सलन्स ॲवॉर्डने शि. द. फडणीस यांना सन्मानित केल्याने कार्यक्रमाची उंची वाढली आहे, असे मत शितल शहा यांनी व्यक्त केले. रोटरी साहित्य संमेलन मोठ्या प्रमाणात आयोजित केल्याचा अभिमान आहे, असे सांगून संतोष मराठे म्हणाले, हा स्तुत्य उपक्रम सातत्याने सुरू रहावा.
पीएनजीचे प्रतिनिधी मिहिर केमकर यांचा सन्मान शितल शहा यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात पदन्यास कथक डान्स अकॅडमीच्या रेणुका केळकर-टिकारे आणि सहकाऱ्यांनी शिववंदनेद्वारे केली. मानपत्राचे लिखाण सुप्रिया जोगदेव यांनी केले होते तर वाचन प्रज्ञा डांगे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश दामले यांनी केले.