मुंबई, दि.४:- महाराष्ट्रातील डिजिटल मिडियाला शासकीय जाहिराती देण्यासंदर्भात “मार्गदर्शक सूचना अधिसूचना” जारी करुन राज्यातील डिजिटल पत्रकारांना राजमान्यता दिल्याबद्दल राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेशसिंह यांचे डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना व तमाम डिजिटल पत्रकारांच्यावतीने खास सोलापुरी नॅपकिन गुच्छ देवून आभार मानले.
आज मंत्रालयात ब्रिजेशसिंह यांच्या दालनात राजा माने यांनी भेट घेतली.काल दि.३ जून २०२५ रोजी राज्य शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमधील अनेक मुद्द्यांवर ब्रिजेशसिंह यांच्याशी चर्चा झाली. डिजिटल पत्रकारिता आणि डिजिटल पत्रकारांच्या विकासासाठी शासन अनुकूल असल्याची ग्वाही त्यांनी दिली.राजमान्यतेचे द्वार खुले करण्याची ऐतिहासिक जबाबदारी राज्य सरकारने पार पाडल्याबद्दल माहिती व जनसंपर्क विभाग ,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्र्यांनी एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच डिजिटल पत्रकारांच्या चळवळीला गेल्या सहा वर्षांपासून बळ देणारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे राजा माने यांनी आभार मानले.
महासंचालक ब्रिजेशसिंह यांचेराजा माने यांनी मानले आभार!
वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर सोलापुरातील आशाराणी भोसले प्रकरणाने खळबळ; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची गंभीर दखल
“कोणताही दबाव न घेता कायद्याच्या चौकटीत निष्पक्षपणे तपास करून न्याय दिला जावा”; पोलीस प्रशासनाला निर्देश
सोलापूर, दि. ४ जून २०२५ : सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली एमआयडीसी, तालुका मोहोळ येथे राहणाऱ्या २६ वर्षीय सौ. आशाराणी भोसले यांनी दिनांक ३ जून २०२५ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली, असा प्राथमिक अंदाज माध्यमांतून समोर आला आहे. मात्र ही आत्महत्या नसून सासरच्या मंडळींच्या मानसिक छळामुळे त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली असून, त्यांनी तातडीने सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली व सखोल तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.
आशाराणी भोसले या तीन महिन्यांच्या गर्भवती होत्या, आणि त्यांना दोन वर्षांची मुलगीही आहे, ही बाब मन हेलावणारी आहे. त्यांच्या नातेवाईकांनी सांगितल्याप्रमाणे, सासरच्या मंडळींकडून त्यांना सातत्याने छळ सहन करावा लागत होता. चार ते पाच वेळा घरगुती वाद निर्माण झाल्यानंतर त्यांच्या माहेरच्या मंडळींनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अखेर या मानसिक छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त होत आहे.
पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर लगेचच सोलापूरात घडलेली ही घटना महिलांच्या सुरक्षिततेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित करत डॉ. गोऱ्हे यांनी या प्रकरणी पोलीस प्रशासनाला सखोल आणि निष्पक्ष तपासाचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यांनी सांगितले की, ही आत्महत्या की पूर्वनियोजित हत्या याचा तपास वैज्ञानिक आणि न्यायवैद्यकीय पद्धतीने करण्यात यावा. घटनास्थळाचा पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, आणि गळफास लावण्याच्या स्थितीचा वस्तुनिष्ठ अभ्यास करावा.
या प्रकरणात सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून, डॉ. गोऱ्हे यांनी तत्काळ आरोपींना अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. कोणताही दबाव न घेता कायद्याच्या चौकटीत निष्पक्षपणे आणि जलदगतीने तपास करून न्याय दिला जावा, अशी आग्रही भूमिका डॉ. गोऱ्हे यांनी घेतली आहे.
पीडित कुटुंबाला आवश्यक ती कायदेशीर व मानसिक मदत सरकारमार्फत पुरवण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. या अनुषंगाने, पोलीस अधीक्षकांनी माहिती दिली की आशाराणी यांची दोन वर्षांची मुलगी सध्या तिच्या आजोबा-आजींकडे म्हणजेच आईच्या माहेरी आहे. यावर प्रतिक्रिया देताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “या बाळासाठी कोर्टाची ऑर्डर घ्यावी लागेल का, की तिच्या माहेरची मंडळी स्वतः तिला सांभाळण्यासाठी तयार आहेत, याची माहिती घेऊन त्यानुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवावी.”
’जे दुसऱ्यांना चांगले म्हणतात, ते स्वतः चांगले असतात’—रेणुताई गावस्कर यांचा विद्यार्थ्यांशी हृदयस्पर्शी संवाद
-‘झेप’ उपक्रमाचे उद्घाटन उत्साहात संपन्न
पुणे – पद्मश्री महर्षी डॉ. सौ. सिंधूताई सपकाळ (माई) संस्थापित ‘सप्तसिंधू’ महिला आधार, बालसंगोपन व शिक्षण संस्था संचलित ‘सन्मती बाल निकेतन’, मांजरी (बु.), पुणे येथे विद्यार्थ्यांच्या कलात्मक व सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘झेप’ उपक्रमाचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष व उद्घाटक म्हणून ज्येष्ठ समाजसेविका आणि एकलव्य न्यासाच्या अध्यक्षा मा. रेणुताई गावस्कर, रयत शिक्षण संस्थेच्या के. के. घुले विद्यालयाचे प्राचार्य मा. रविंद्र निगडे, ‘सप्तसिंधू’ महिला आधार, बालसंगोपन व शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा ममता सिंधूताई सपकाळ आदी मान्यवर उपस्थित होते.आपल्या सहज, आपुलकीच्या आणि प्रेरणादायी शैलीत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि आत्मविश्वासाचे बीज पेरले. “जे दुसऱ्यांना चांगले म्हणतात, ते स्वतः चांगले असतात!” अशा विचारांनी त्यांनी सर्वांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्थेच्या के. के. घुले विद्यालयाचे प्राचार्य मा. रविंद्र निगडे सर होते. त्यांनी आपल्या भाषणात शिस्त, मेहनत आणि चिकाटी या गुणांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
‘झेप’ या उपक्रमामागील संकल्पना संस्थेच्या अध्यक्षा ममता सिंधूताई सपकाळ यांनी आपल्या प्रास्ताविकातून उलगडली.“‘झेप’ हे केवळ एक शिबिर नसून, अभ्यासाच्या पुढे जाऊन मुलांमधील सुप्त गुणांना उजाळा देणारे आणि त्यांना जीवनकौशल्यांची पायाभरणी करून देणारे एक मंच आहे,” असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रताप चिंचोले यांनी तर आभार प्रदर्शन दिनेश शेटे यांनी केले. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन संस्थेचे संचालक मंडळ व संपूर्ण कर्मचारीवृंद यांनी मुलांसमवेत केले.
या उद्घाटनाने ‘झेप’ उपक्रमाचा प्रारंभ सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणेच्या वातावरणात झाला आहे.
सन १९६२, १९६५ च्या युद्धातील वीर जवानांच्या आठवणींना उजाळा
सैनिक मित्र परिवारातर्फे सन १९६२, १९६५ च्या युद्धातील बेपत्ता शूरवीरांच्या वीरपत्नींचा सन्मान : सन १९६५ च्या युध्दाला नुकतीच ६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : ज्यांनी संसाराचे स्वप्न साकार होण्याआधीच देशासाठी पती गमावले… ज्यांचे वैवाहिक जीवन काही क्षणांचेच ठरले, पण मनात देशभक्तीचा अभिमान सदैव दरवळत राहिला… अशा सन १९६२, १९६५ च्या युद्धातील बेपत्ता जवानांच्या अकरा वीरपत्नींचा सन्मान वानवडी येथील वीर स्मृती वसाहत येथे करण्यात आला.
सन १९६२ च्या आणि सन १९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धाला नुकतीच ६० वर्षे पूर्ण झाली, यानिमित्ताने सैनिक मित्र परिवारच्या वतीने वीरपत्नींच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, तसेच सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, सैनिक मित्र परिवारचे आनंद सराफ, किरण पाटोळे, विष्णू ठाकूर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी वीरपत्नींना मानाचे उपरणे, तसेच मिठाई प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे स्विय सहाय्यक अभिजीत मोडक यांच्याकडे वीर स्मृती वास्तू दुरूस्ती व नूतनीकरणासाठी निवेदन देण्यात आले.
आनंद सराफ म्हणाले, सन १९६२ च्या भारत-चीन युद्धात बेपत्ता झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी आणि त्यांच्या बलिदानाची स्मृती जपण्यासाठी, वीर स्मृती ही वसाहत १९६८ साली वानवडी बाजार येथे उभारण्यात आली. ही वसाहत केवळ निवासस्थान नसून, ती देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांच्या त्यागाची आणि धैर्याची साक्ष देणारे एक स्मारक आहे. वीरपत्नींच्या या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने केवळ शूरवीर नव्हे, तर त्यांच्या मागे उभ्या राहणाऱ्या धैर्यवती स्त्रियाही देशाच्या अस्सल प्रेरणा आहेत, असेही त्यांनी सांगितले.
स्वतःवर विश्वास असणारेच खरे आस्तिक: सचिन पिळगावकर
छायाचित्रकार अक्षय परांजपे यांच्या संघर्षमय जीवनावरील ‘अक्की’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे: सतत पूजापाठ करून देखील यांचा स्वतःवर विश्वास नाही, असे लोक नास्तिक असतात तर कोणतेही कर्मकांड न करता देखील ज्यांचा स्वतःवर अतूट विश्वास आहे, तेच खरे आस्तिक असतात, असे मत विख्यात अभिनेते सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केले.विल्सन या दुर्मिळ आजाराशी आत्मविश्वासाच्या जोरावर यशस्वी झुंज देऊन छायाचित्रकार म्हणून आपला ठसा उमटवणारे अक्षय परांजपे यांच्या प्रेरणादायी जीवनावर त्यांचे वडील संतोष परांजपे यांनी लिहिलेल्या अक्की या पुस्तकाचे प्रकाशन पिळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, गीतकार वैभव जोशी, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अजित गाडगीळ, अमोल रावतेकर, सीमा देशमुख, श्रीरंग देशमुख, गिरीश कुलकर्णी, अथर्व सुदामे, इंद्रनील कामत, अथर्व कर्वे, राधा सागर या पुस्तकाचे लेखक संतोष परांजपे, आणि ज्यांच्या जीवनावर आधारित असलेले अक्षय परांजपे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
आत्मविश्वास हा गुण प्रत्येक व्यक्तीकडे असतोच. मात्र काही वेळेला त्यावर धूळ साचते. ती झटकावी लागते. त्यासाठी काही वेळा इतर कोणाची मदत मिळते तर काही वेळेला स्वतःच ही धूळ झटकण्याचे काम करावे लागते. त्यासाठी अक्षयच्या जीवनावरील हे पुस्तक प्रेरणादायी ठरेल, असे पिळगावकर यांनी यावेळी सांगितले. चित्रपट सृष्टीमध्ये अनेक जण छोट्या छोट्या कारणांनी निराशावादी बनतात. त्यांच्यासाठी ही हे पुस्तक उपयुक्त असून चित्रपटसृष्टीत त्याचा प्रसार झाला पाहिजे, अशी अपेक्षाही पिळगावकर यांनी व्यक्त केली.
‘दुकान जल गई है, भरोसा नही जला
कल आकर देखो, दुकान खुली मिलेगी,’
हा शेर आपल्याला अक्षय भेटल्यानंतर सुचल्याचेही पिळगावकर यांनी नमूद केले.
अक्की हे पुस्तक केवळ एका व्यक्तीच्या जिद्दीचे नव्हे तर एकमेकांना साथ देणाऱ्या संपूर्ण कुटुंबाचे पुस्तक आहे, असे मत मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. करुणा, प्रेम, जिद्द, कृतज्ञता, भक्ती, श्रद्धा आदी भावनांचा आविष्कार या पुस्तकातून घडत असल्याचे त्यांनी नमूद केले. श्रद्धा ही माणसाला सर्वाधिक बळ देते. सध्या एवढे बळ इतर कशातही नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. आपल्या जगण्याच्या हेतूचा शोध घेऊन तो साध्य करण्यासाठी प्रत्येकाने वाटचाल करावी, असेही त्या म्हणाल्या.
या पुस्तकाचे अभिवाचन अभिनेत्री लेखिका नेहा शितोळे आणि आकांक्षा परांजपे यांनी केले. या सर्व कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. मिलींद कुलकर्णी यांनी केले.
तीस वर्षांत लावले दीड कोटीहून अधिक झाडे
पर्यावरणाच्या सेवेसाठी आयुष्य वेचले; पंतप्रधानांच्या ‘एक पेड माँ के नाम’ मोहिमेचे ब्रँड ॲम्बेसेडर
पुणे : “पर्यावरणासाठी झाडे लावणे हे केवळ सामाजिक जबाबदारी नव्हे, तर जीवनधर्म आहे,” असे मानणारे विष्णु लाम्बा हे ‘ट्रीमॅन ऑफ इंडिया’ म्हणून देशभर प्रसिद्ध आहेत. गेल्या तीन दशकांपासून झाडे लावणे आणि त्यांचे संगोपन करणे याच कार्यात ते झपाटल्यासारखे कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांनी देशभरात दीड कोटींहून अधिक झाडे लावली आहेत.
राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील लाम्बा गावात जन्मलेले विष्णु लाम्बा यांचे निसर्गाशी नाते लहानपणापासूनच जोडले गेले. सातव्या वर्षी आईसोबत पहिले झाड लावले आणि त्यानंतर या कार्यात इतके गुंतले की आजवर त्यांनी लग्नही केले नाही. झाडे लावणे, त्यांचे संगोपन करणे, विकासाच्या नावाखाली तोडल्या जाणाऱ्या झाडांना वाचवणे हे त्यांचे जीवनध्येय झाले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रीन आर्मी योजनेचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणूनही त्यांनी काम केले असून, सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक पेड माँ के नाम’ या राष्ट्रीय मोहिमेत प्रमुख भूमिका बजावत आहेत. त्यांच्या श्री कल्पतरु संस्थेच्या माध्यमातून त्यांनी पुण्यातील तळजाई वनउद्यान, सीआरपीएफ तळेगाव, केंद्रीय विद्यालय देहूरोड येथे वृक्षारोपण करून हरित परिसर घडवले आहेत.
त्यांनी केवळ झाडे लावली नाहीत, तर समाजात पर्यावरणाबाबत जागृती निर्माण केली. पक्ष्यांसाठी ‘परिंदों के लिए परिंडा’ उपक्रम, पर्यावरणपूरक विवाह, माळा-फुलांच्या ऐवजी तुळशीचे रोप देऊन स्वागत अशा अनेक अभिनव उपक्रमांतून त्यांनी समाजात पर्यावरण संवेदनशीलता निर्माण केली आहे. त्यांच्या प्रयत्नांतून उंट राजस्थानचा राज्यप्राणी म्हणून संबोधण्यास, तर मोराच्या शिकारीवर बंदी घालण्यास मदत झाली.
झाडांबरोबरच दुर्मिळ वनस्पतींच्या प्रजाती, पक्षी आणि प्राणी यांच्या संवर्धनासाठीही ते कार्यरत आहेत. देशभरातील २२ राज्यांत, तसेच १३ देशांमध्ये त्यांचे कार्य पोहोचले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना राजीव गांधी पर्यावरण पुरस्कार, अमृता देवी बिश्नोई पुरस्कार यांच्यासह १५० हून अधिक सन्मान प्राप्त झाले आहेत. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी विष्णू लांबा यांना ‘ट्रीमॅन ऑफ इंडिया’ ही पदवी बहाल केली आहे.
त्यांच्या ‘हरित भारत, हर्षित भारत’ या घोषवाक्याने प्रेरित होऊन लाखो तरुण त्यांच्या मोहिमेत सामील झाले आहेत. ‘श्री कल्पतरु संस्थान’च्या माध्यमातून महिला सशक्तीकरण, पशू-पक्षी रेस्क्यू, पर्यावरण पूजन, वृक्षमित्र सन्मान समारंभ असे अनेक सामाजिक उपक्रम ते सातत्याने राबवत आहेत.
तळेगाव ‘सीआरपीएफ’मध्ये वृक्षारोपण
पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून श्री कल्पतरू संस्थान व तळेगाव येथील सीआरपीएफच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. या परिसरात पाच हजार झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असून, त्याचे औपचारिक उद्घाटन नुकतेच ‘सीआरपीएफ’चे पोलीस उपमहानिरीक्षक वैभव निंबाळकर व ट्रीमॅन ऑफ इंडिया विष्णू लांबा यांच्या हस्ते झाडे लावण्यात आली. शंभरपेक्षा अधिक केंद्रीय राखीव सुरक्षा दलातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या नावाने एकेक झाड लावले.
श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी मठात सुवर्ण महोत्सवी रक्तदान शिबिराचे आयोजन.
पुणे-मंगळवार दि. ०३ जून २०२५ रोजी ५० व्या सुवर्ण महोत्सवी रक्तदान शिबिराचा शुभारंभ माजी आमदार उल्हास पवार व उद्योजक श्री पुनीत बालन यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून झाला. यावेळी ३२१ भाविकांनी रक्तदान केले.
दर महिन्याच्या दुर्गाष्टमीस सातत्याने ५० महिने रक्तदान शिबीर आयोजीत करणारी शंकर महाराज समाधी ट्रस्ट ही एकमेव संस्था असून या पुर्वीच महाराष्ट्र शासनाने संस्थेस गौरव चिन्ह देऊन सन्मानीत केले आहे.
ट्रस्ट तर्फे दररोज ५,००० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत खिचडी प्रसादाचे वाटप होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भाऊ रंगारी गणपती मंडळ आणि धर्मवीर संभाजी शाळा नवी पेठ या तीन ठिकाणी दररोज मोफत भोजन प्रसादाचे वाटप होते, अशी माहिती विश्वस्त श्री सुरेंद्र वाईकर यांनी दिली.
या प्रसंगी उल्हास पवार म्हणाले आज मठ, मंदिर या सारख्या धार्मिक संस्थांनी आध्यात्मिक उपक्रमां बरोबरच समाजामध्ये सेवाभाव वाढवण्यासाठी सामाजिक उपक्रम राबवण्याची अत्यंत गरज आहे, ज्या योगे तरूणांना श्री सद्गुरू शंकर महाराजांची भक्ती आणि नामस्मरण यासोबतच समाजाची सेवा करण्याबाबत योग्य मार्गदर्शन मिळेल. तसेच सामाजिक कार्याला धार्मिक अधिष्ठान प्राप्त होईल.
पुनीत बालन यांनी मठाच्या अन्नदान उपक्रमास सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासीत केले. याप्रसंगी शिबीर सम्नवयक राम बांगड यांना सन्मानीत करण्यात आले.
विश्वस्त मंडळ
डॉ. मिहीर कुलकर्णी (अध्यक्ष), श्री सतीश कोकाटे (सचिव), श्री सुरेंद्र वाईकर, डॉ. पी. डी. पाटील, डॉ. मिहीर कुलकर्णी, श्री राजाभाऊ सुर्यवंशी, श्री निलेश मालपाणी, श्री प्रताप भोसले
इंदापूर येथील मुलांच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन
पुणे, दि. 4: महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, इंदापूर येथे २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरीता इ. 8 वी व पुढील शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ व शारीरिकदृष्ट्या दिव्यांग आदी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक मुलांनी प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शासकीय वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांना विनामुल्य भोजन, निवासाची व्यवस्था असून क्रमिक पुस्तके, शैक्षणिक साहित्य, गणवेश, शैक्षणिक सहल रक्कम इत्यादी करिता शासनाने ठरवून दिलेल्या आर्थिक मर्यादेपर्यंतची रक्कम व दरमहा रु. 500/- निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतो.
वसतिगृह प्रवेशासाठी विद्यार्थ्याची मागील वर्षाची गुणपत्रिका, जातीचा दाखला, पालकांचे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र, महाविद्यालयात शिकत असलेला बोनाफाईड दाखल, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र आदी कागदपत्रासह ऑनलाइन अर्ज https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर करणे आवयक आहे. अधिक माहितीसाठी गृहपाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, दूधगंगा दुधडेअरी समोर, जुना अकलूज-पुणे बायपास, इंदापूर, जि. पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन गृहपालांनी केले आहे.
‘एमआयटी एडीटी’ची तुषारा थुम्मलापल्ली भारतीय नौसेनेत पायलट
पुणे– एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातून 2024 मध्ये पदवी प्राप्त केलेल्या तुषारा थुम्मलापल्ली यांनी भारतीय नौसेनेत पायलट म्हणून गौरवशाली नियुक्ती मिळवली आहे. हा क्षण विद्यापीठासाठी अत्यंत अभिमानाचा असून, देशभरातील तरुण अभियंत्यांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे.
फक्त 23 वर्षांच्या वयात तुषारा यांनी नौदलाच्या विशेष पायलट गटात स्थान मिळवले आहे. अभियंता ते सैन्य अधिकारी असा त्यांचा प्रवास शैक्षणिक गुणवत्ता, निर्धार आणि राष्ट्रसेवेच्या प्रति कटिबद्धतेचे प्रतीक आहे. यांत्रिकी विभागातील प्राध्यापकांनुसार, तुषारा यांनी शिक्षण काळात नेहमीच उत्कृष्ट शैक्षणिक आणि नेतृत्वगुण दाखवले. तांत्रिक प्रकल्पांमध्ये आणि विभागीय उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता. “पहिल्याच दिवशीपासून तुषारामध्ये अधिकारी म्हणून लागणारे शिस्तप्रियता, चिकाटी आणि प्रेरणा स्पष्टपणे दिसून येत होती. भारतीय नौसेनेत तिच्या या नव्या प्रवासास सुरुवात होत असताना, तिची प्रेरणादायी कहाणी विशेषतः तरुण विद्यार्थिनींना संरक्षण आणि वैमानिक क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरणा देईल”, असे यांत्रिकी विभागातील प्राध्यापकांनी म्हटले आहे.
तुषाराच्या या कामगिरीनंतर माईर्स एमआयटी शिक्षण समुहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डाॅ.विश्वनाथ दा.कराड, कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा. डाॅ.सुनीता कराड, कुलगुरू प्रा.डाॅ.राजेश एस., प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, विभागाचे संचालक डाॅ.विरेंद्र शेटे, अधिष्ठाता डाॅ.सुदर्शन सानप यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
“एमआयटी एडीटी विद्यापीठाने मला केवळ अभियंता म्हणून घडवले नाही, तर आयुष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यास तयार केले. येथे मिळालेले प्रत्येक शिक्षण, अनुभव माझ्या जडणघडणीसाठी मोलाचे ठरले. विद्यापीठाच्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाने माझ्या तांत्रिक प्रावीण्यासोबतच धोरणात्मक विचारक्षमतेच्या विकासातही महत्त्वाची भूमिका बजावली.”
– तुषारा थुम्मलापल्ली, पायलट, भारतीय नौसेना
चांडोली येथील मुलांच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन
पुणे, दि. 4: महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह चांडोली (ता. खेड) येथे २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरीता इ. 8 वी व पुढील शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ व शारीरिकदृष्ट्या दिव्यांग आदी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक मुलांनी प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शासकीय वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांना विनामुल्य भोजन, निवासाची व्यवस्था असून स्टेशनरी साहित्य, अंथरुण व पांघरुण दरमहा रुपये 500/- निर्वाह भत्ता अदा करण्यात येतो. शिवाय विद्यार्थ्यांकरिता अद्यावत ग्रंथालय व संगणक कक्ष आदी सुविधा येथे उपलब्ध आहेत.
वसतिगृह प्रवेश प्रक्रिया https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. अधिक माहितीसाठी अधीक्षक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह चांडोली ता. खेड, जि. पुणे येथे संपर्क साधावा , असे आवाहन वसतिगृहाच्या अधीक्षकांनी केले आहे
भारत आणि जपान यांच्यादरम्यान उद्योग, आर्थिक क्षेत्रांसह सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील सहकार्यही वृद्धिंगत करुया-उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जपानचे महावाणिज्यदूत यागी कोजी यांच्यातील चर्चेवेळी परस्पर सहकार्याचा निर्धार
पुण्यासह राज्यातील जपानी कंपन्यांसमोरच्या अडचणी सोडवण्यासह रस्ते, वीज, पाणी, सुरक्षेसारख्या पायाभूत सुविधा पुरवण्यावर भर देणार
–उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई दि. 4 :- भारत आणि जपान नैसर्गिक मित्र असून आध्यात्मिक, सांस्कृतिकदृष्ट्याही दोन्ही देशांचं वेगळं नातं आहे. भारताच्या औद्योगिक प्रगतीत, पायाभूत सुविधांच्या निर्मितीत जपानची भूमिका महत्वाची राहिली आहे. भारतात जपाननं मोठी औद्योगिक गुंतवणुक केली असून महाराष्ट्रात तीनशेहून अधिक तर, पुणे आणि परिसरात पन्नास कंपन्या कार्यरत आहेत. राज्याच्या औद्योगिक, आर्थिक, सामाजिक प्रगतीत, रोजगारनिर्मितीत मोलांचं योगदान देणाऱ्या या कंपन्यांच्या समस्यांचे निराकरण करुन त्यांच्यासाठी उद्योगपुरक वातावरण निर्माण करणं शासनाची जबाबदारी आहे. यापुढील काळात उद्योग, आर्थिक क्षेत्रातील सहकार्यासोबतच सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातही भारत आणि जपान यांच्यातील सहकार्य वाढविण्यासाठी प्रयत्न करुया, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत यागी कोजी यांच्या भेटीदरम्यान आज झालेल्या चर्चेवेळी केलं.
जपानचे मुंबईतील महावाणिज्यदूत यागी कोजी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी जपानी राज्यात जपानी गुंतवणूक वाढवण्यासह, उद्योगक्षेत्रासमोरील अडचणी दूर करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. उद्योग, आर्थिक क्षेत्रांबरोबरंच दोन्ही सामाजिक,सांस्कृतिक सहकार्य वाढविण्यावरही चर्चेत भर देण्यात आला. राज्याच्या नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते.
मुंबई, पुण्यासह राज्यात विविध ठिकाणी कार्यरत जपानी कंपन्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना सोडविण्यास राज्य शासन प्राधान्य देईल. चांगले रस्ते, पुरेशी वीज, आवश्यक पाणी, सुरक्षित वातावरण आदी पायाभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी शासनाची आहे, ती पार पाडण्यात येईल. पुण्याच्या औद्योगिक परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करणयात येईल. सणसवाडी ते पिंपळे जगताप या रस्त्यासाठी ८० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तिथे भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून पावसाळ्यानंतर या रस्त्याचे काम सुरू होईल. जिथे तातडीने रस्तादुरुस्ती आवश्यक आहे तेथे काँक्रीटच्या रस्त्याचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तातडीने सुरू करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिले.
पुण्यातील जपानी कंपन्यांना पायाभूत सुविधांबरोबरच रस्ते, वीज, पाणी दळणवळणासंदर्भातील प्रश्न तातडीने सोडवण्यात येतील. जपानी कंपन्यांच्या प्रश्नांसंदर्भात जपानी कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोवत पुण्यात बैठक आयोजित करण्यात येईल. धोरणात्मक आणि करासंदर्भातील प्रश्नही सोडवले जातील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जपानच्या मुंबईतील महावाणिज्यदूतांना दिली. यावेळी मियावाकी उद्याने, सामाजिक उत्तरदायित्व निधी, जायका, एस.टी.पी., पूर नियंत्रण अशा विविध प्रश्नांवर उभयतांमध्ये चर्चा झाली. पुढील काळात महाराष्ट्रातील गुंतवणुकीचे वातावरण अधिक चांगले होईल आणि भारत-जपान मैत्री आणखी दृढ होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महावाणिज्यदूत यागी कोजी यांनी व्यक्त केला.
मुंबईतील अब्जावधी रुपयांच्या जमिनी अदानीच्या घशात, आता मंत्रालय व विधिमंडळ कधी देणार?: हर्षवर्धन सपकाळ
अदानीला मुंबईतील संपत्ती देण्यात महाराष्ट्राचा फायदा काय ? मदर डेअरीची जागा देण्याचा निर्णय रद्द करा.
प्रार्थना स्थळांवरील भोंग्यांसंदर्भात गृहविभागाने काढलेला आदेश समाजात वाद निर्माण करणारा; वादग्रस्त जीआर रद्द करा.
काँग्रेस नेते अवकाळीने झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करुन नुकसान भरपाईसाठी राज्यपालांची भेट घेणार.
मुंबई, दि. ४ जून २०२५
भाजप महायुतीचे सरकार जनतेपेक्षा अदानीच्या फायद्यासाठी रात्रंदिवस काम करत आहे. मुंबईचे दोन्ही विमानतळ आधीच अदानीला दिले आहेत, धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली डंपिंग ग्राऊंडची जमीन दिलेली आहे, कुर्ल्यातील मदर डेअरीची ८.५ हेक्टर जमीन दिली आहे आणि वांद्र्यातील एमएसआरडीसीच्या कार्यालयाची जागाही देऊन टाकली आहे. आता फक्त मंत्रालय, प्रशासकीय इमारत व विधिमंडळच अदानीला देण्याचे बाकी आहे, ते कधी देणार आहात, असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे, त्याला मदत करण्यासाठी भाजपा युती सरकारकडे पैसे नाहीत. लाडकी बहिण योजनेतून भगिनींना देण्यास पैसे नाहीत, शेतकरी कर्जमाफी देण्यासाठी पैसे नाहीत परंतु अदानीला देण्यासाठी मात्र भाजपा युती सरकार तत्पर आहे. एवढे सर्व अदानीच्या पदरात टाकून महाराष्ट्राला काय मिळणार आहे तर फक्त भोपळा, असे सांगून सपकाळ यांनी मदर डेअरीची जमीन अदानीला देण्याचा निर्णय रद्द करावा अशी मागणी केली.
गृहविभागाने काढलेल्या परिपत्रकावर बोलताना सपकाळ म्हणाले की, भाजपा युती सरकार राज्यात जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणारे मुद्दे उकरून काढत असते. आता या सरकाच्या गृविभागाने राज्यातील मंदिर, मशिदी, गुरुद्वारा, चर्च अशा सर्व प्रार्थनास्थळांवरील लाऊडस्पिकर साठी एक फतवा जारी केला आहे. प्रार्थनास्थळावरील भोंग्याबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश घालून दिलेले असताना राज्य सरकारने वेगळा फतवा काढून आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे, हा फतवा मागे घ्यावा अशी मागणीही सपकाळ यांनी केली आहे.
राज्यात अवकाळी पावसाने शेतीचे प्रचंड मोठे नुकसान केले आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे. काँग्रेस पक्षाचे नेते लवकरच शेताच्या बांधावर जाऊन या नुकसानीची पाहणी करणार आहेत व या पाहणीनंतर राज्यपाल महोदयांना भेटून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात विनंती करणार असल्याचेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी सांगितले आहे.
यावेळी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना प्रदेश कार्याध्यक्ष, CWC सदस्य नसीम खान म्हणाले की, भाजपा युती सरकारने भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भोंग्याचा फतवा कढला आहे. धार्मिक स्थळावरील लाऊडस्पिकर बाबत सुप्रीम कोर्टाचे निर्देश असतानाही गृहविभागाने अशा पद्धतीने फतवा काढणे निषेधार्ह आहे. सरकारने हा आदेश तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी नसीम खान यांनी केली आहे.
या पत्रकार परिषदेला प्रदेश कार्याध्यक्ष, CWC सदस्य नसीम खान, प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील उपस्थित होते.
सिंबायोसिस कॉलेजमध्ये प्रवेशाच्या नावाने लुट करणारा कुणाल कुमार थायलंडला पळून जाताना पोलिसांनी पकडला
पुणे- येथील सिंबायोसिस कॉलेजमध्ये प्रवेशाच्या नावाने फसविणारा कुणाल कुमार आपल्या पत्नीसह थायलंडला पळून जातानाच पुणे पोलिसांनी पकडला
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ सिम्बायोसीस या संस्थेचा लोगो असलेल्या संस्थेच्या इमारतीचा फोटो वापरुन वेबपेज वरुन सिम्बायोसीस संस्थेची वेबसाईट असल्याचे भासवुन सिम्बायोसीस या संस्थेमध्ये अॅडमिशन करुन देणे बाबत्त ऑनलाईन खोटी जाहीरात करुन विदयार्थ्यांना सिम्बायोसीस मध्ये अॅडमीशनचे खोटे आमीष दाखवून कॉलेज फी व्यतिरीक्त लाखो रुपयाची मागणी करुन त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या दिव्या, आकाश यादव, कुणाल कुमार या परराज्यातील इसमांविरुध्द दि.०२/०४/२०२५ रोजी डेक्कन पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोद करण्यात आला होता.
सदर गुन्हा दाखल झाल्यापासुन दिव्या, आकाश यादव, कुणाल कुमार हे तिनही आरोपी फरार झाले होते. अंगली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी यांनी दोन ते तिन वेळा सदर आरोपींचा दिल्ली, हरीयाना या राज्यात जावुन शोध घेतला परंतु ते पोलीसांच्या हातावर तुरी देवुन पळुन जाण्यात यशस्वी होत होते. त्यानंतर तपास अधिकारी यांनी दाखल गुन्हयातील आरोपी यांचे लुक ऑऊट नोटीस जारी करुन त्यांचा दिल्ली, हरीयाना तसेच महाराष्ट्रभर कसोशीने शोध सुरु केला होता. यातील आरोपी नामे कुमार कुणाल बिरेंद्रकुमार विद्यार्थी, वय-३० वर्षे मुळ राज्य-बिहार याचा पुर्व गुन्हेगारी इतिहासाची माहिती घेतली असता, त्याचेविरुध्द सन-२०२१ मध्ये सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गु.र.नं ४६/२०२१, भा.द. वि. कलम ४१९, ४२०, १२० ब, २०१, ३४ सह आय. टी. अॅक्ट कलम ४३ (अ) (एफ) (जी) (आय), ६६ (सी), ६६ (डी) या गुन्हयात तो आरोपी असल्याचे निष्पन्न झालेले होते. सदर आरोपी याने मा.सत्र न्यायालय, पुणे येथे अटकपूर्व जामीन मिळण्याकरिता दिलेला अर्ज देखील मा.न्यायालयाने फेटाळलेला होता व सदर गुन्हयातुनही तो अद्यापपर्यंत फरार असल्याची माहिती समोर आली. आरोपी हा फसवणुक करणारा सराईत गुन्हेगार असल्याने त्याचा पुणे, मुंबई, दिल्ली येथे शोध घेणे कामी पोलीसांचे पथके तयार करण्यात आलेली होती.
त्यानंतर दि.३१/०५/२०२५ रोजी आरोपी कुणालकुमार बिरेद्रकुमार विद्यार्थी, हा त्याचे पत्नीसह थायलंड देशात कोलकत्ता विमानतळ येथुन जाणार असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने गुन्हे शाखेकडील एक पथक तात्काळ कोलकत्ता येथे जावुन कोलकत्ता विमानतळ येथे सापळा लावुन त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. नमुद आरोपी कुमार कुणाल बिरेद्रकुमार विद्यार्थी, यास दाखल गुन्हयात अटक करुन मा. न्यायालयात हजर केले असता त्याची दि.०५/०६/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक उल्हास कदम अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा हे करीत आहे.
सदरची कारवाई ही अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त, गुन्हे पुणे शहर निखील पिंगळे, सहा पो आयुक्त, गुन्हे-१ पुणे शहर गणेश इंगळे यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहा पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार प्रविण उत्तेकर, दत्ताराम जाधव, संदिप शिर्के, विशाल दळवी, मारुती पारधी, संदेश काकडे, यांनी केली आहे.
आदित्य ठाकरेंची राज ठाकरेंना एकत्र येण्यासाठी साद
मुंबई-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या पक्षांमध्ये संभाव्य युतीची चर्चा अलिकडच्या काही दिवसांपासून रंगू लागली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या सूचक वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गट व मनसे यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चांनी आणखीनच जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र व युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही मनसेला सोबत येण्याची साद घातली आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही कोणत्याही पक्षाबरोबर एकत्र येण्यास तयार आहोत. म्हणूनच आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला साद दिली असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले.
यापूर्वीही आदित्य ठाकरे यांच्याबरोबरच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, आमदार अनिल परब, आमदार अंबादास दानवे, आमदार सुनील प्रभू यांनी देखील वारंवार युतीबाबत अनुकूलता दर्शवली आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दुसऱ्या फळीतील काही नेते मात्र या युतीबाबत फारसे उत्साही दिसत नाहीत.
आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिला आहे. आमची भावना व्यक्त केली आहे. मराठी माणूस व महाराष्ट्राच्या हितासाठी जो कोणी आमच्या बरोबर यायला तयार असेल आम्ही त्यांना बरोबर घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू. काल परवा आमचे नेते दीपेश म्हात्रे व मनसेचे नेते राजू पाटील यांनी एकत्र येऊन आंदोलन केलं. हे त्याचंच उदाहरण आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. लोकांच्या मनात काय आहे हे आम्हाला माहिती आहे आणि आमचे मन देखील साफ आहे. जो कोणी नेता महाराष्ट्र हितासाठी आमच्याबरोबर यायला तयार असेल, जो पक्ष पुढे येत असेल, आम्ही त्यांच्याबरोबर एकत्र येऊन लढू, असेही ते म्हणाले.
दुसरीकडे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील यावर भाष्य केले आहे. युतीच्या चर्चेवर कोणीही मौन बाळगलेले नाही. स्वतः मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या मनातली इच्छा व्यक्त केली आहे, त्यांच्या सहकाऱ्यांनी नव्हे. राज ठाकरे यांच्या इच्छेवर त्यांचे बंधू उद्धव ठाकरे यांनी देखील अनुकूल भूमिका घेतली आहे. त्यानंतर आम्ही सर्वांनी देखील योग्य भूमिका घेतल्या आहेत. त्यामुळे तुमच्या सर्वांच्या मनातली बातमी तुम्हाला लवकरच कळेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दोन्ही पक्ष आपली ताकद मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहेत. भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी शिंदे या महायुतीपुढे एक ताकदवान पर्याय उभा करायचा असेल, तर ठाकरे गट व मनसे यांच्यातील समन्वय महत्त्वाचा ठरू शकतो. परंतु, स्वतः आदित्य ठाकरे यांनी युतीबाबत केलेल्या वक्तव्यास त्यांचे काका राज ठाकरे प्रतिसाद देणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या -आता मुंडे वाचत नाहीत!
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बुधवारी धनंजय मुंडे यांच्याविरोधातील कथित कृषी घोटाळ्याचे पुरावे एसीबी अर्थात अँटी करप्शन ब्यूरोला दिले. तसेच या पुराव्यांमुळे आता धनंजय मुंडे वाचणार नाहीत असा ठाम दावाही केला. त्यांच्या या दाव्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात गेल्याचा दावा केला जात आहे.
अंजली दमानिया यांनी काही महिन्यांपूर्वी तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर एसीबीने त्यांना या आरोपांचे पुरावे देण्याचा समन्स बजावला होता. त्यानुसार, दमानिया यांनी बुधवारी अँटी करप्शन ब्यूरोच्या येथील कार्यालयाला भेट देऊन धनंजय मुंडे यांच्याविरोधातील पुरावे दाखल केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आता धनंजय मुंडे वाचणार नाहीत असा दावा केला.
अंजली दमानिया म्हणाल्या, मी आज कृषी घोटाळ्याशी संबंधित दस्तऐवज एसीबीला दिले. आत्ताच्या घटकेला मी एवढेच सांगेन की, अँटी करप्शन ब्यूरोने या प्रकरणी योग्य ती कारवाई केली, तर याच्यातून धनंजय मुंडे वाचत नाहीत. पण त्यांच्यावर शासकीय किंवा प्रशासनाची मेहेरबानी झाली तर मला माहिती नाही. पण आज जी काही माहिती मी दिली, ती अत्यंत खरी असून, त्यात कोणतीही शंका नाही. मी दिलेले दस्तऐवज 3 कंपन्यांशी संबंधित आहेत. त्यापैकी 2 कंपन्यांमध्ये ऑफिस ऑफ प्रॉफिट होते. त्यांनी पदावर असताना एवढा मोठा कृषी घोटाळा केला. त्यात पहिल्या टप्प्यात 341 कोटींपैकी 161 कोटी खाल्ले गेलेत. हा घोटाळा नाही तर काय आहे? असे त्या म्हणाल्या.
धनंजय मुंडे सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. ते तिथे काही धार्मिक विधी करत आहेत. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधण्यासही नकार दिला. पत्रकारांनी याविषयी अंजली दमानिया यांना छेडले असता त्या म्हणाल्या, धनंजय मुंडे यांनी तोंडावर बोट ठेवले असेल तर मी काय बोलणार? मी ज्या दिवशी कृषी घोटाळा उघड केला, त्यानंतर लगेचच त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी सर्वच आरोप चुकीचे असल्याचे म्हटले होते. एवढेच नाही तर त्यांनी मला वाट्टेल ती टोपण नावेही दिली होती. आज ती वेळ आली आहे.
आज पेपरद्वारे मी शासनाकडे खरी माहिती पोहोचवली आहे. आता त्यांना प्रत्येक गोष्टीत पुरावे देण्यासाठी यावे लागणार आहे. माझे पेपर्स एसीबीने घेतलेत. आता माझे स्टेटमेंट झाल्यानंतर त्यांना या दोन्ही गोष्टी लावून सरकारकडे परवानगी मागायची असते की, यांच्यावर कारवाई करायची की नाही? तिथे त्यांना परवानगी मिळाली, तर पुढची चौकशी होईल. अन्यथा त्यांना (धनंजय मुंडे) वरून दिलासा मिळाला तर काय होईल हे मला माहिती नाही, असे त्या म्हणाल्या.
अंजली दमानिया यांनी यावेळी वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी अडचणीत सापडलेल्या आयपीएस जालिंदर सुपेकर यांच्यावरही गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या, धनंजय मुंडे यांनीही आपल्यावरील आरोपांत कोणतेही तथ्य नसल्याचा दावा केला होता. त्यांनी 4 मार्च रोजी माझ्याविरोधात मानहाणीची कारवाई करण्याचा इशारा दिला होता. पण आजतागायत त्यांच्याकडून मला कोणतीही नोटीस आली नाही. आता जालिंदर सुपेकर यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांनीही मला मानहाणीची नोटीस पाठवण्याचा इशारा दिला. पण आजपर्यंत त्यांचीही नोटीस मिळाली नाही. आज सुरेश धस यांनी त्यांच्यावर जे आरोप केलेत, ते एक्झॅटली मला देखील कळवण्यात आले होते.
आता वाल्मीक कराडची तुरुंगात जी सरबरबाई होत आहे, ती सुपेकर यांच्यामुळेच होत आहे. त्यांच्याच मेहेरबानीने बीडच्या कारागृहात जे राहत आहेत, त्याचीही माहिती मला मिळाली होती. ती भाजप आमदार सुरेश धस यांनी आज मांडली. जालिंदर सुपेकर यांनी कैद्याकडून 300 कोटींची मागणी केल्याचा माहिती मला तुमच्याकडूनच मिळत आहे. मी जेव्हा बोलते ते पुराव्यांसकट बोलते. त्यामु्ळे धसांनी आपल्या आरोपांखातर पुरावे दाखवावे.
