Home Blog Page 506

भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात रक्तदान शिबिर

पुणे:भारती विद्यापीठचे संस्थापक स्व.डॉ. पतंगराव कदम यांची जयंती तसेच भारती विद्यापीठचे सहकार्यवाह,भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयचे प्र-कुलगुरू डॉ. विश्वजीत कदमयांच्या वाढदिवसानिमित्त भारती विद्यापीठ,पुणे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरासाठी १२०० स्वयंसेवकांनी नोंदणी केली, तर ७०० हून अधिक पिशव्या रक्त संकलित करण्यात आले.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये कुलगुरू डॉ. विवेक सावजी,सहकार्यवाह डॉ.के.डी.जाधव,भारती परिवारचे अध्यक्ष बाबा मामा शिंदे,अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य राजेश प्रसाद, मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे प्राचार्य डॉ. मंदार करमरकर,रक्तदान शिबिराचे समन्वयक व उपप्राचार्य डॉ. सचिन चव्हाण,उपप्राचार्य डॉ.सुनीता जाधव,रक्तदान शिबिर प्रमुख डॉ.अमोल कदम,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रशांत यादव,सहकार्यक्रम अधिकारी प्रा.सागर बंदपट्टे यांचा समावेश होता.

डॉ.सुनीता जाधव यांनी स्वागतपर भाषण केले.डॉ. सचिन चव्हाण यांनी भारती ब्लड बँक, पुरंदर ब्लड बँक आणि जनसेवा ब्लड सेंटरचे प्रतिनिधीचे स्वागत केले.डॉ.अमोल कदम यांनी मान्यवरांचे परिचय करून दिला. प्रा. प्रशांत यादव यांनी आभार मानले. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रिया हिरवे यांनी केले.

‘एसएफए बास्केटबॉल स्पर्धेत’ ध्रुव ग्लोबलला कांस्यपदक

पुणे, दि.११ जानेवारी : एसएफए यांच्या कडून आयोजित शालेय स्तरावरील ‘एसएफए बास्केटबॉल स्पर्धेत’ नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या अंडर ११ टीम ने आपल्या पूलमधील सर्व सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला.आणि  एकतर्फी पराभव करून आपले वर्चस्व सिद्ध केले. संघाने कांस्यपदकाच्या लढतीत यजमान (४)आणि (१४)असा पराभव करून पदक जिंकले. खेळाडूंनी मिळवलेल्या यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी आणि प्राचार्या संगीता राऊतजी यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
ध्रुव ग्लोबल स्कूल, नांदे कडून सायली जैन, अन्वी बंग, अद्विता मुसळे, कियारा शाह, अनुष्का देव,  शनाया पडळकर आणि प्रिशा काळे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
यशवर्धन मालपाणी म्हणाले की, ध्रुव ग्लोबल स्कूल प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे. भविष्यातही ही शाळेतील क्रीडा विभाग नवनवीन उंची गाठत राहील. या यशाबद्दल त्यांनी समर्पित प्रशिक्षक पूनम बुटी आणि संकेत कुंभार यांचे अमूल्य मार्गदर्शन आणि सहकार्याबद्दल विशेष आभार मानले.
प्राचार्या संगीता राऊतजी म्हणाल्या,  ही स्पर्धा जिंकून संघाने उत्कृष्ट कामगिरी व खिलाडूवृत्ती दाखवली आहे.

कात्रजच्या मांगडेवाडीत ४४ लाखाचा चरस व गांजा जप्त

पुणे- गुन्हेगारीचे आगर बनत चाललेले पुण्याचे दक्षिण द्वार कात्रज मधील मांगडेवाडीततील प्रीतम हाईटस मध्ये छापा टाकून भारती विद्यापीठ पोलिसांनी सुमारे ४४ लाखाचा चरस -गांजा जप्त करून अरोरा नामक ५० वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. बोगस दारू, अंमली पदार्थ, आणि लुटमार या परिसरात वाढतच चालली असून त्या अनुषंगाने पोलिसांनी आता कंबर कसली आहे आणि गुन्हेगारांची धरपकड सुरु केली आहे.

या कारवाईत अंमली पदार्थ विरोधी पथकाकडुन ४३,८७,०००/- रु किं. चा चरस व गांजा जप्त करण्यात आला असे पोलिसांनी सांगितले , पोलिसांनी असेही पुढे सांगितले कि,’दि.१०/०१/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, चे सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व स्टाफ असे भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना मिळालेले बातमीवरुन इसम नामे अरुण अशोक अरोरा वय-५० वर्षे, रा-प्रितम हाईट्स, मांगडेवाडी, कात्रज पुणे याच्या ताब्यात एकुण ४३,८७,०००/- रू.कि.चा ऐवज त्यामध्ये २ किलो १४० ग्रॅम चरस व १ किलो ७९० ग्रॅम गांजा अंमली पदार्थ तसेच इतर ऐवज जप्त करून त्याचे विरुध्द भारती विदयापिठ पोस्टे गु.र.नं.२७/२०२४, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अनिकेत पोटे, अं.प.वि.प.१. गुन्हे शाखा, पुणे शहर हे करीत आहेत.
हीकारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे,निखील पिंगळे सहा पोलीस आयुक्त, गुन्हे.२, राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार योगेश मांढरे, प्रशांत बोमादंडी, नितीन जगदाळे, आझाद पाटील, संदिप जाधव, दिशा खेवलकर, रविंद्र रोकडे यांनी केली आहे.

अजितदादांच्या इशाऱ्यानंतर सीपी अॅक्शन मोडवर-सहा सहायक पोलीस आयुक्तांना दिले महत्वाचे विभाग

पुणे -शहरातील वाढती गुन्हेगारी आणि त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या इशाऱ्यानंतर पोलीस दलात मोठे बदल करत आयुक्त अमितेश कुमार अॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळाले. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिलेल्या आदेशानंतर आयुक्तांनी आता नॉयलोन मांजा विक्र्त्यांवरही कारवाई सुरु केली आहे. शहर पोलीस दलातील सहा सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. प्रशासकीय कारणास्तव तात्पुरती नेमणुक करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आदेशात म्हटले आहे.

अनुजा अजित देशमाने ACP Anuja Deshmane (खडकी विभाग) ते फरासखाना विभाग

विठ्ठल दिगंबर दबडे ACP Vitthal Dabade (विशेष शाखा, १) ते खडकी विभाग
अनुराधा विठ्ठल उदमले ACP Anuradha Udmale (विशेष शाखा २) ते हडपसर विभाग

नुतन विश्वनाथ पवार ACP Nutan Pawar (फरासखाना विभाग) ते विशेष शाखा २
अतुलकुमार यशवंत नवगिरे ACP Atulkumar Navgire (वाहतूक शाखा) ते विशेष शाखा १

अश्विनी गणेश राख ACP Ashwini Rakh (हडपसर विभाग) ते वाहतूक शाखा

याबरोबरच १० सहायक पोलीस निरीक्षक आणि १५ पोलीस उपनिरीक्षक यांच्या त्यांच्या विनंतीनुसार अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

मराठी बोलीभाषा टिकली तर मराठी टिकेल

शोध मराठी मनाचा२० व्या  जागतिक मराठी संमेलनातील सूर

सातारा :  जागतिक मराठी अकादमी आणि  रयत शिक्षण संस्था सातारा या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथे छत्रपती शिवाजी कॉलेजच्या प्रांगणात सुरु असलेल्या शोध मराठी मनाचा या जागतिक संमेलनात आज दुसरे सत्रात ‘ अभिजात मराठी आणि माध्यमे’ या विषयावर संवाद सत्र झाले. या संवाद सत्रात रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकात दळवी, बंगलोर येथील जगन्नाथ पाटील, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विनोद कुलकर्णी, नाशिकच्या मराठी विद्या प्रसारक संस्थेचे नितीन ठाकरे ,मराठीतील बाल वाडमय लेखिका लीला शिंदे इत्यादी वक्ते म्हणून सहभागी झाले. संवादक म्हणून पत्रकार अरुण खोरे व महेश म्हात्रे यांनी संवादक म्हणून या विषयावर चर्चा घडवून आणली.

 या सत्रात प्रारंभी चंद्रकांत दळवी यांना विचारणा केली असता त्यांनी भाषा संचालनायाच्या अधिकारी यांना मराठीसाठी पुरेशे बजेट नसल्याने उत्साह नसल्याचे सांगून मराठी भाषेसाठी विशेष प्रोत्साहन द्यावे लागेल असे म्हणाले. रयत शिक्षण संस्थेमध्ये आम्हाला जाणवत आहे की मराठी माध्यमाच्या काही माध्यमिक शाळा आहेत किंवा प्राथमिक शाळांच्यामध्ये सुद्धा इंग्लिश मीडियमला मुलांना घालण्याची जी काही एक लाट आली आहे त्या लाटेमध्ये  मराठी प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळांना विद्यार्थ्यांची पटसंख्या घटत चाललेली आहे पटसंख्या घटना मागचं मुख्य कारण असं दिसतं की इंग्लिश मीडियमच्या शाळा निघाल्यामुळे पटसंख्या घटते आहे असे ते म्हणाले.

          लीला शिंदे म्हणाल्या की मी मराठीतून जवळपास ४० मुलांच्यासाठी पुस्तके लिहिली आहेत. सर्वसाधारण समाजात दारिद्र्य आणि गरिबी असल्याने विद्यार्थ्यांना दर्जेदार पुस्तके मिळत नाहीत. मराठी भाषिकात अनेक गट तट आहेत, आमच्या मराठवाड्याकडे जे लेखन करतात त्यांच्या भाषेत परिसराचा प्रभाव असणारच आहे. शहरी भागात लहान मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. शिक्षण अधिकारी यांनी मुलांना उत्तम बाल वाड्मय वाचण्यास मिळवून दिले पाहिजे.

 नितीन ठाकरे म्हणाले की ‘प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे मराठी भाषेतच व्हावे. इंग्रजी शाळा वाढवण्याचे काम सरकारच करीत आहे. सरकारचे शिक्षणाकडे लक्ष कमी आहे. विना अनुदानितकडे शासनाचे लक्ष आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी परकीय भाषेमध्ये शिक्षण घेण्यापेक्षा ते आपल्या मातृभाषेमध्येच देणे गरजेचे आहे त्याकरता जे आपले शिक्षण तज्ञ आहेत त्यांनी सुद्धा मी आता म्हटलं त्या पद्धतीने आपला उच्च माध्यमिक असेल किंवा त्याच्या पुढच्या जे काही प्रोफेशनल कॉलेज आपण म्हणतो तिथे सुद्धा त्या मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे. इंजीनियरिंग कॉलेजचा सिल्याबस सुद्धा मराठी मध्ये असावा अशा प्रकारचा मतप्रवाह आता सुरू झालेला आहे.

  आमचे शालेय शिक्षण मंत्री यांच्या नाशिकची आहे दादाजी भुसे यांनी परवा ही घोषणा केली की ज्या केंद्रीय शाळा आहेत त्या शाळेमध्ये सुद्धा मराठी हा विषय आम्ही आता अनिवार्य करणार आहोत. मी त्या निमित्ताने त्यांचे मनापासून अभिनंदन करतो की एक चांगला निर्णय आपण घेतला. कारण आतापर्यंत केंद्रीय शाळांमध्ये अशा प्रकारचा निर्णय कधी झालेला नव्हता आणि त्यामुळे मराठी हा विषय कुठल्याही माध्यमाची शाळा असो त्या शाळेमध्ये मराठी विषय घेतलाच पाहिजे, कंपल्सरी केलं पाहिजे. आपल्याकडे कुठली गोष्ट अनिवार्य केल्याशिवाय ती आपण स्वीकारत नाही आणि म्हणून या निमित्ताने किंवा मंत्रिमंडळाचे या निमित्ताने अभिनंदन करतो आणि मराठी भाषेला खरंच चांगले दिवस आहेत. आपण सगळे मिळून प्रयत्न केला तर नक्कीच ही भाषा पुढे जाईल.

जगन्नाथ पाटील  म्हणाले की, या विषयाच्या दृष्टिकोनातून आणि एकूण ऍक्टिव्हिटीच्या दृष्टीने परिघाबाहेरचा माणूस आहे. गेली 22 वर्ष मी महाराष्ट्राच्या बाहेर आहे आणि आजही महाराष्ट्र बाहेर आहे. परंतु माझं मराठी पण अजून सोडलेलं नाहीये. त्यामुळे मला या संमेलनाला अनेक वर्ष बोलावता येत आणि बाहेर काय चाललंय आणि बाहेरच्या मराठी माणसांच्या मनामध्ये महाराष्ट्रात काय चाललंय याच्याबद्दलची जी रुख रुख आहे चिंता आहे. मी जपानमध्ये होतो. जपान सरकारने मला शैक्षणिक सल्लागार म्हणून बोलावलं होतं एक वर्षभर आणि त्यामुळे तिथल्या वेगवेगळे विद्यापीठ आणि इतर शिक्षण व्यवस्था याच्याशी अतिशय जवळून पाहण्याचा किंबहुना त्यांना सल्ला देण्याचा असा अनुभव माझ्या गाठीशी आहे. तेथे सर्व शिक्षण जपानी भाषेतच दिले जाते हे महत्वाचा आहे.

  लीला शिंदे म्हणाल्या  मी ज्या कॉलेजमध्ये शिकत होते ते सगळे तिथे बंजारा होते. दांड्यावरून आले होते. त्यांना मराठी कुठली येणार म्हणजे आम्हाला अशा पद्धतीची सर्कसच करावे लागले की आधीच साधी भाषा बोला मग त्यांच्या काही शब्द आणि मग हळूहळू अभिजात माझ्याकडे आम्ही वळलो तेव्हा कुठे आम्ही समाजशास्त्र काही प्रमाणात शिकवू शकलो. पण त्यांची भाषा पण आम्हाला काही शब्द हसता नाही पण काही शब्द इतके समृद्ध असतात की आमच्या मराठवाड्यामध्ये आम्ही अगदी तालुका पातळीवर खेड्यापर्यंत बालकुमार संमेलन भरवतो.  

         विनोद कुलकर्णी  म्हणाले की, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा सहजा सहजी मिळालेला नाही. २०१३ नंतर १० वर्षे संघर्ष केला. राजकीय इच्छाशक्ती प्रबळ असेल तर प्रश्न सुटत सुटतात. सातारा जिल्ह्याने एक लाख पत्रे पाठविली. महाबळेश्वर देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवले. दिल्लीत जाऊन आंदोलन केले. शरद पवार ते इतर राजकीय नेते यांना जागरूक केले.  मद्रास उच्च न्यायालय स्थगिती आली होती. त्रिशंकू कौल जनतेने दिला – त्यामुळे  सारा बदल झाला. भाषेची मते मिळण्यासाठी अभिजात भाषेचा दर्जा दिला – संजय राउत बोलले कुठेही अध्यादेश जाहीर नाही.. नंतर  दिल्लीला जाऊन अभिजात मराठी भाषेचा दर्जा असल्याचे पत्र उदय  सामंत यांनी आणले.

लीला शिंदे म्हणाले की, मराठी भाषा ज्ञान भाषा व्हायला हवी. बोली भाषा टिकली तर मराठी भाषा टिकेल, मराठी भाषा यातूनच समृद्ध होईल.बोली भाषा एकजीव व्हायला हवी.

नितीन ठाकरे यांना धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक या परिसरात आदिवासी बोली असल्याचे सांगून या बाबतीत नाशिक परिसरात तुम्ही काय काम करीत असल्याबद्दल विचारले. आदिवासीचे वाड्मय स्वतंत्र असावे, त्याचा फायदा आदिवासी व मराठी भाषिकांना होईल. असे सांगितले. आदिवासी विद्यापीठे आदिवासी परिसरातील जिल्ह्यात करण्याचे विषयी त्यांनी माहिती दिली.

उपजीविका देणाऱ्या भाषेला प्राध्यान्य हा न्याय असल्यामुळे मराठीचे कसे होणार या विषयी विचारणा केली तेंव्हा जगन्नाथ पाटील म्हणाले आता अभियांत्रिकी शिक्षण देखील त्या त्या भाषेत घ्यावे. शिक्षकांनी मराठी भाषेचे अभ्यासक्रम तयार करून घ्यायला हवे. स्वायत्तता त्यांना नको वाटते, प्रत्येक शिक्षकाचे आता मुल्यांकन करण्याची गरज आहे.त्याच्या गुणवत्तेप्रमाणे त्यांना पगार द्यावा .

चंद्रकात दळवी म्हणाले की आपल्या देशात अनेकविध भाषा असल्यामुळे प्रत्येक प्रादेशिक भाषेला जास्त महत्व मिळेल असे नाही पण सगळ्याच भाषेचे जतन व संवर्धन करण्याचे धोरण योग्यच आहे. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा करण्यासाठी आपल्या सर्वच भाषा त्या योग्यतेच्या लगेच करणे यातील मर्यादा समजून घ्यावी.

११ कोटी मराठी भाषिक लोक आहेत. मराठीमध्ये आपण सोफ्टवेअर करण्याची गरज आहे. म्हात्रे म्हणाले की दिल्लीचे तख्त मराठी चालवीत होते, तेंव्हा राजभाषा, व्यवहार भाषा पुढे नेली. ज्यांची भाषा पुढे जाते तेच लोक राज्यकर्ते बनतात. भाषा, भूषा, भोजन, भवन या चार गोष्टी महत्वाच्या आहेत. असे सांगितले.

 प्राचीन ते आधुनिक योगाची प्रात्यक्षिके करीत १२०० विद्यार्थी करणार योगाचा विश्वविक्रम

योगाद्वारे उच्च दर्जाचे आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिकपटू घडवणार : मुख्याध्यापिका धनावडे

पुणे : विद्यार्थ्यांना लहान वयातच योगाची गोडी लागावी आणि त्यातून ते शारीरिकदृष्ट्या सुदृढ व बौद्धिकदृष्ट्या उन्नत व्हावे, या उद्देशाने डीईएस प्राथमिक शाळेत गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. या वेळेस क्रीडा क्षेत्रात काही अनोखे करण्याच्या उद्देशाने डीईएस प्राथमिक शाळेत दि. १८ जानेवारी २०२५ रोजी १२०० विद्यार्थी व पालक प्राचीन ते आधुनिक काळापर्यंतच्या विविध योगांचे प्रात्यक्षिक दाखवून एक विश्वविक्रम प्रस्थापित करणार आहे, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना धनावडे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.
या विश्वविक्रमा संदर्भात सविस्तर माहिती देताना मुख्याध्यापिका धनावडे बोलत होत्या. या पत्रकार परिषदेला सीमरन गुजर, प्रोजेक्ट मॅनेजर ग्रेसी डिसूझा, क्रीडा शिक्षिका योगिनी कानडे आणि योगा उपक्रमाचे सल्लागार डॉ. मिलिंद संपगावकर आदी उपस्थित होते. शाळा समिती अध्यक्ष अंड. राजश्री ठकार यांचे ही या उपक्रमांस सहयोग लाभले आहे.
या वेळी बोलताना मुख्याध्यापिका धनावडे आणि उपस्थित शिक्षिकांनी सांगितले की, या योगा विश्वविक्रमात विद्यार्थी काल योग, सूर्यनमस्कार, चंद्रनमस्कार, ट्रायबल योगा, अॅनिमल योगा, बर्ड पोजेस, दंड योग, पार्टनर योगा, रिव्होल्यूशनरी पोजेस, तालीयोग, ऱ्हिदमिक योगा, इक्विमेंट योगा, थेरा बँड योग, ब्रिक्स योग, चेअर योगा, मेडिसनल बाॅल योगा, योगा फाॅर स्पोर्ट्स, डान्स योगा, पॅट्रियाॅटिक मंडल योग, अॅक्वा योगा, स्पिरिच्युअल योगा आणि पावर योगा सादर करणार आहेत. या कार्यक्रमात पालकांच्या ढोलताशा पथकाचे संचलन पालकांद्वारे सादर होईल. शंखनाद करून कार्यक्रमाची सुरवात होईल व त्यानंतर सरस्वती पूजन झाल्यानंतर विद्यार्थी विविध योगासने सादर करतील.
कोरोना काळानंतर विद्यार्थ्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामुळे आम्ही योगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शारीरिकदृष्ट्टया तंदुरुस्त आणि बौद्धिक दृष्ट्या तल्लख बनवण्यासाठी दोन वर्षांपूर्वी योगा क्लासेसची सुरवात केली. यात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. हा विश्वविक्रमाचा उपक्रम त्याचीच एक प्रचिती आहे. या माध्यमातून आमचा आंतरराष्ट्रीय दर्जाचे आॅलिम्पिकपटूदेखील घडवण्याचा मानस आहे.डाॅ. मिलिंद संपगावकर यांनी सांगितले की, १५० मिनिटांमध्ये विद्यार्थी हे ३० अॅक्टिव्हिटी सादर करतील. त्यासाठी विद्यार्थ्यांची जोरदार तयारी करण्यात आली आहे. शाळेने पालकांनादेखील यामध्ये सामावून घेतल्यामुळे आज त्याचा खूपच सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांवर झाला आहे.

नायलॉन मांजा विक्रेत्यांची सुरु झाली धरपकड – ५ जण पकडले, ३७ हजाराचा मांजा जप्त

पुणे- अखेरीस पुणे पोलिसांनी नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची धरपकड सुरु केली असून ५ जण पकडून त्यांच्याकडून , ३७ हजाराचा मांजा जप्त केला आहे. अजूनही हि कारवाई कायमस्वरूपी सुरु ठेवण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी प्रत्येक पोलीस ठाण्यांना दिले आहेत .

पुणे शहरात नववर्ष आगमन व संक्रात सण मोठ्या उत्सहात साजरा होतो त्या निमीत्त मोठ्याप्रमाणात आकाशात पतंग उडविले जातात परंतू त्यासाठी घातक असा नायलॉन मांजा वापरण्यात येतो. नायलॉन मांजामुळे रोडवरून जाणा-या सामान्य नागरिकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. तसेच झाडांमध्ये आडकलेल्या माज्यामुळे कित्येक वेळा पक्षांचे जीव धोक्यात आलेले आहेत. नायलॉन मांजावर मा.न्यायालयाने बंदी घातलेली आहे परंतु तरीही काहीजण अशा नायलॉन मांजाची बेकायदेशिर रित्या चोरून विक्री करतात त्याअनुशंगाने नायलॉन मांजाची चोरून विक्री करणा-या विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त, अमितेश कुमार यांनी दिलेले आहेत.
त्याअनुषंगाने पुणे पोलीस आयुक्तालय अतंर्गत खालील प्रमाणे मांज्या विक्रत्यावर कारवाई करण्यात आलेली आहे.
१) सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.न.०८/२०२५ भा.न्या.सं.२२३,१२५, पर्या. संरक्षण अधि.५,१५ अन्वये कारवाई करून इसम नामे राहूल शाम कांबळे वय १९ वर्षे यांचे ताब्यातुन १८,०००/-रू. कि.चे ३० रिळ नॉयलॉन मांज्या जप्त करण्यात आलेला आहे.
२) चतुश्रृंगी पोलीस स्टेशन गु.र.नं.१७/२०२५ भा.न्या.सं. २२३, पर्या. संरक्षण अधि.५,१५ अन्वये कारवाई करू इसम नामे इलियास समीम शेख वय ४२ वर्षे यांचे ताब्यातुन १४,२००/-रू. कि.चे १२ नग मांज्या जप्त करण्यात आलेला आहे.
३) विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं.०५/२०२५ भा.न्या.सं.२२३,१२५, पर्या. संरक्षण अधि.५. अन्वये कारवाई करू इसम नामे मयुर महादेव अनारसे वय ३४ वर्षे यांचे ताब्यातुन १,७२०/-रू.कि.चे दोन चकरी मांज्या जप्त करण्यात आलेला आहे..
४) वारजे माळवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं.२४/२०२५ भा.न्या.सं.२२३, पर्या. संरक्षण अधि.५,१५ अन्वये कारवाई करू इसम नामे सिध्दार्थ संतोष वखारे वय १९ वर्षे यांचे ताब्यातुन ५००/- कि.चे १ नग रिळ मांज्या जप्त करण्यात आलेला आहे.
५) मार्केट यार्ड पोलीस स्टेशन गु.र.नं.०३/२०२५ भा.न्या.सं.२२३, पर्या. संरक्षण अधि.५, अन्वये कारवाई करू इसम नामे धनंजय चंद्रकांत मोहोळ वय २६ वर्षे यांचे ताब्यातुन २,४००/-रू. वे ३ नग चकरी मांज्या जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार ,पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

उद्धव ठाकरे शत्रू नाही..:..तर त्यांचा पक्ष फोडून 40 आमदार अन् पक्ष का पळवला?, दुसऱ्या पक्षाला त्यांचे चिन्ह का देण्यात आले?- वर्षा गायकवाड

मुंबई -उद्धव ठाकरे हे जर देवेंद्र फडणवीस यांचे शत्रू नाही तर त्यांचा पक्ष का फोडला? दुसऱ्या पक्षाला त्यांचे चिन्ह का देण्यात आले? त्यांचे 40 आमदार वेशांतर कडून तोडले अन् त्यांच्यातील एकालाच मुख्यमंत्री केले, या प्रश्नावर एकनाथ शिंदेंनीही विचार करायला हवा, असे काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भाजपकडून महाराष्ट्राचे राजकारण गलिच्छ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. देशभरात भाजपच्या काळात पक्ष फोडायचे आणि चिन्ह चोरण्याचे काम राजाश्रयात झाले आहे.

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मविआबद्दल माध्यमांशी बोलण्यापेक्षा चर्चा करत निर्णय घ्यायला हवा, ते त्यांच्या पक्षाचे मत मांडत असतात, असे ठाकरे गटाने मनपा निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. यावर बोलताना काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी असे म्हटले आहे.काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड पुढे बोलताना म्हणाल्या की,आम्ही कायम महाविकास आघाडी एकत्र राहिली पाहिजे या दृष्टीने प्रयत्न केला आहे. आमच्या पक्षाचे वरीष्ठ नेते यासंदर्भात निर्णय घेत असतात. पक्षश्रेष्ठीसोबत या विषयी आम्ही चर्चा करु.

वर्षा गायकवाड म्हणाल्या की, आमच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की आम्हाला संधी मिळाली पाहिजे. मुंबईमध्ये आमच्या सीट निवडून येऊ शकल्या असत्या. पण मविआमुळे आम्हाला तिथे निवडणूक लढवता आली नाही. पण मविआची जागा निवडून यावी यासाठी आम्ही प्रयत्न केले. आघाडी धर्म आम्ही पाळला. लोकसभा निवडणूक असो की विधानसभा आम्हाला काही जागा सोडाव्या लागल्या. यात मलाही लोकसभा निवडणुकीत वेगळ्या मतदारसंघातून उमेदवारी मिळाली.वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबईपासून नागपूरपर्यंत काय निर्णय घ्यायचा ते आमचे पक्षश्रेष्ठी ठरवतील. संजय राऊत त्यांच्या पक्षाचे निर्णय सांगतात. आम्ही आमच्या पक्षाचे निर्णय झाला की तुम्हाला सांगू.

राजकारण कुठे नेऊन बसवेल याचा भरवसा नाही- मुख्यमंत्री फडणवीस:शरद पवार सोबत येण्याचे स्पष्ट संकेत

नागपूर -राजकारणात काहीही होऊ शकते. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेले, अजित पवार महायुतीत आले. राजकारणात काहीही होऊ शकते, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार कधीही सोबत येऊ शकतात असे स्पष्ट संकेत दिले. नागपुरात झालेल्या जिव्हाळा पुरस्कार वितरण कार्यक्रमात झालेल्या मुलाखतीत फडणवीसांनी रोखठोक उत्तरे दिली. सुप्रसिद्ध प्रवचनकार व ज्येष्ठ संपादक विवेक घळसासी यांनी ही मुलाखत घेतली.

फडणवीस म्हणाले की, २०१९ नंतर २०२४ पर्यंत घडलेल्या घडामोडीतून मला “नेव्हर से नेव्हर’ ही एक गोष्ट लक्षात आली. म्हणजे कुठलीही गोष्ट होणार नाही असे समजून कधी चालायचे नाही. झाले पाहिजे असे नाही. असे व्हावे असे बिलकुल नाही किंवा ते होणेही फार चांगले आहे या मताचा मी नाही. शेवटी राजकारणात हे लक्षात ठेवले पाहिजे की, खूप ठामपणे असे होणारच नाही, असे आपण म्हणतो. त्या वेळी राजकीय परिस्थिती तुम्हाला कुठे नेऊन बसवेल याचा काही भरवसा नसतो. मर्यादाहीन पातळी सोडून वैयक्तिक टीका झाली तरी संयमी राहिलो.

शरद पवारांनी त्यांच्या पक्षाच्या बैठकीत रा. स्व. संघाच्या कामाचे कौतुक केले. याविषयी फडणवीस म्हणाले की, शरद पवार अतिशय चाणाक्ष आहेत. फेक नॅरेटिव्हचे वातावरण पंक्चर करणारी शक्ती कोण याचा त्यांनी निश्चितच अभ्यास केला असेल. ही शक्ती नियमित राजकारण करणारी नव्हे तर राष्ट्रकारण करणारी शक्ती आहे. हे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी रा. स्व. संघाचे कौतुक केले असावे असे वाटते. शेवटी प्रतिस्पर्ध्याचेही कौतुक करावे लागते, असेही फडणवीस म्हणाले.

राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो:फडणवीसांच्या भूमिकेनंतर संजय राऊतांचे वक्तव्य

mनागपूर-राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. महाराष्ट्राच्या राजकारणात आम्ही कायम संस्कृती जपली असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राज ठाकरे माझे मित्र आहेत मात्र उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानाला संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. राजकारणामध्ये काहीही असंभव नसते, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.

व्यक्तिगत शत्रुत्व ठेवून राजकारण करण्याची ही परंपरा दुर्दैवाने भाजपने सुरु केली. राजकीय विरोधकांवर खोटे गुन्हे, खोटे खटले दाखल करून त्यांना तुरुंगात टाकायचे, हे भाजपने केले आहे. अशी परंपरा या महाराष्ट्रात कधीच नव्हती, असा दावा देखील राऊत यांनी केला आहे. ही परंपरा सध्याचे मुख्यमंत्री संपवणार असतील तर राज्यातील राजकीय वातावरण चांगले राहावे यासाठी याचा फायदाच होईल, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.

भारतीय जनता पक्षाचे राजकारण हे व्यक्तिगत सुडाचे आणि व्यक्तिगत शत्रुत्वाचे आहे. मात्र महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार अशा अनेक नेत्यांनी कधीच वैक्तिगत सुडाचे राजकारण केले नाही. या नेत्यांनी कधीच केंद्रीय तपास यंत्रणा किंवा पोलिसांचा गैरवापर करून राजकीय विरोधकांना तुरुंगवास भोगाव लावला नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. तर याची सुरुवात भारतीय जनता पक्षाने केली आहे. त्यामुळे देशाचे आणि राजकारणातील वातावरण बिघडले असल्याचे ते म्हणाले.

या संदर्भात संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हते तेव्हापासून शिवसेना आणि भाजप मित्र होते. मात्र कोण कुठे जाणार आणि कुठे येणार, हे देवेंद्र फडणवीस निश्चित करणार नाहीत. तर प्रत्येकाच्या पक्षाची एक स्वतंत्र विचारधारा असते. आमचा पक्ष तुम्ही फोडला हे कोणत्या धोरणात बसते? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. राजकीय विरोधकांवर खोटे खटले दाखल करून त्यांना संपवण्याची परंपरा भाजपने सुरू केली आहे. मात्र ही परंपरा तोडण्याचा देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत असतील तर त्याचे आम्ही स्वागतच करू. गडचिरोलीत त्यांनी चांगल्या कामाची सुरुवात केली, त्यांचेही आम्ही कौतुक केले असल्याचे ते म्हणाले. मात्र असे करत असताना भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेऊन ते सत्ता चालवतील, तोपर्यंत आमचा राजकीय संघर्ष सुरूच राहणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण बिघडू नये, ही आमची पहिल्यापासून भूमिका राहिली आहे. सत्तेवर कोण येते यापेक्षा महाराष्ट्रातील वातावरण चांगले राहिले पाहिजे, असा विचार करणारे आज आम्हीच असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. आम्ही आणि भाजप आता मित्र राहिलेलो नाहीत. आम्ही भाजपचे सर्वात जुने आणि विश्वासार्ह मित्र होतो. मात्र, आता आमच्यात मित्रता राहिली नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत हे रिकामटेकडे, ते रोजच काहीतरी मत व्यक्त करतात

मुंबई-संजय राऊत हे रिकामटेकडे आहेत. ते रोजच काहीतरी मत व्यक्त करतात. मात्र त्यांच्या मतावर मी व्यक्त व्हायलाच पाहिजे असे नाही. मला कामे असतात. मी रिकामटेकडा नाही. अशा कडक शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या स्वबळाच्या घोषणेवर प्रतिक्रिया दिली आहे. ते नागपूर येथे बोलत होते.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वभावावर लढवणार असल्याची घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्वच महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका शब्दात उत्तर दिले आहे. त्यांच्या या घोषणेवर काहीही बोलण्यास मुख्यमंत्र्यांनी नकार दिला आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांनी एकत्र निवडणूक लढवली होती. महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवलेल्या निवडणुकीत लोकसभेत या तीनही पक्षांना चांगले यश मिळाले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. या परभावानंतर महाविकास आघाडी टीकते का? असे प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यातच आता संजय राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे राऊत यांची ही घोषणा म्हणजे महाविकास आघाडी अस्तित्वात राहणार नसल्याचे संकेत मानले जात आहे.

ठाकरेंची शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवणार

मुंबई-मुंबई ते नागपूपर्यंत सर्व महानगर पालिका, जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला स्वळावर लढण्याचे सांगितले आहे. या संदर्भात आम्ही पदाधिकाऱ्यांशी तशी चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आम्हाला देखील पाहायचे आहे की काय होते? असे देखील ते म्हणाले. आघाडीमध्ये लढताना कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. त्याचा पक्षाच्या वाढीला देखील फटका बसतो. त्यामुळे महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषदेमध्ये आम्ही स्वबळावर लढणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र निवडणुका लढवल्या होत्या. यात लोकसभा निवडणुकीत आघाडीला मोठे यश मिळाले मात्र विधानसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी कायम राहणार का? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होणार आहे. या निवडणुका आघाडी एकत्र लढणार नसल्याचे संकेत उद्धव ठाकरे गटाच्या वतीने वारंवार दिले जात होते. त्यानुसार आज संजय राऊत यांनी स्पष्टपणे आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वभावावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडले असल्याचे बोलले जात आहेत.

आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्या वतीने त्यांच्या मातोश्री निवासस्थानी सर्वच स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू होते. यामध्ये सर्वच महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या कामाचा आढावा उद्धव ठाकरे घेत होते. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाची स्थिती आणि पक्ष मजबुत करण्यासाठी प्रयत्न उद्धव ठाकरे गटाच्या वतीने मागील काही दिवसांपासून सुरू होते. यातूनच उद्धव ठाकरे स्वबळाची तयारी करत असल्याचे संकेत मिळाले होते. त्यानुसार आता संजय राऊत यांनी स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीत संजय राऊत यांनी जागा वाटपाला उशीर केल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी काँग्रेसला चांगलेच सुनावले. महाराष्ट्रात काही नेते मुख्यमंत्रीपदाचा कोट शिवून तयार होते. त्यात आम्ही नव्हतो, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. या माध्यमातून संजय राऊत यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रात शिवसेनेमुळे पराभव झाला असे म्हणत असतील तर हरियाणा, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल मध्ये काँग्रेसचा पराभव का झाला? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. विजय वडेट्टीवार देखील या सर्व बैठकांना हजर होते. आघाडीमध्ये समन्वयाचे आणि तडजोडाची भूमिका स्वीकारावी लागते. तशी भूमिका ज्याची नसते, त्यांना आघाडीमध्ये राहण्याचा अधिकार नसतो. असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.

24 ते 27 जानेवारी दरम्यान एम्प्रेस गार्डन येथे सर्वात मोठा फुलांचा शो,  डॉ. सुहास दिवसे यांचे हस्ते उद्घाटन 


पुणे -एम्प्रेस गार्डनचे व्यवस्थापन अ‍ॅग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया करते आणि दरवर्षी जानेवारीमध्ये एम्प्रेस गार्डनमध्ये फ्लॉवर शो आयोजित केला जातो. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही 24 ते 27 जानेवारी दरम्यान पुण्यातील एम्प्रेस गार्डनमध्ये फ्लॉवर शो आयोजित करण्यात आला होता. या वर्षीचे फूल प्रदर्शनाचे उद्घाटन जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख डॉ. सुहास दिवस यांच्या हस्ते शुक्रवार, 24 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता होईल. या पुष्प प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हणजे जपानी शैलीत बनवलेल्या विविध फुलांच्या सजावटी, विविध प्रकारच्या फुलांच्या रचना आणि स्पर्धकांनी बनवलेल्या विविध प्रकारच्या बोन्साय झाडे, जे पुष्पप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र असतील. पत्रकार परिषदेत सुरेश पिंगळे, अनुपमा बर्वे यांनी ही माहिती दिली.
पुण्यासह अनेक राज्यातील नर्सरींचा समावेश असेल
या फुल प्रदर्शनात केवळ पुण्यातीलच नव्हे तर कोल्हापूर, सांगली, नाशिक, आंध्र प्रदेश आणि देशातील अनेक रोपवाटिका व्यावसायिक उपस्थित राहतील. पुष्प प्रदर्शनात विशेष मुलांसाठी चित्रकला आणि हस्ताक्षर स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात, विविध शाळांमधील सुमारे 1000 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होतात. यावर्षी देखील, रविवार, 12 जानेवारी रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आणि हस्ताक्षर स्पर्धा आयोजित केली जाईल.
या फ्लॉवर शोमध्ये वृद्धांचा सहभाग वाढावा यासाठी बागायतदारांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. तसेच या प्रदर्शनात फुलांची कलात्मक मांडणी, फळे आणि भाज्यांची स्पर्धा, आकर्षक पानांच्या कुंड्या, विविध बागेच्या फुलांचे सादरीकरण देखील सर्वसामान्यांसाठी करण्यात आले आहे.
 तसेच, या फ्लॉवर शो दरम्यान बागेत येणारे फूलप्रेमी नवीन सजवलेल्या एम्प्रेस गार्डनचा आनंद घेऊ शकतात. दरवर्षीप्रमाणे, या वर्षीही, फ्लॉवर शोमध्ये विविध प्रकारच्या बागांच्या रचना, आकर्षक कुंड्यांची व्यवस्था, वेगवेगळ्या पानांसह फुलांची सर्जनशील मांडणी आणि आकर्षक फुले पाहण्याची आणि अनुभवण्याची संधी मिळेल.एम्प्रेस गार्डनचे व्यवस्थापन अ‍ॅग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया द्वारे केले जाते. यासोबतच, संस्थेच्या माध्यमातून बागेत नेहमीच अनेक वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात. सामान्य माणसामध्ये निसर्ग आणि पर्यावरणाबद्दल प्रेम निर्माण करणे आणि प्रत्येक व्यक्तीला निसर्गाचा आनंद आणि अनुभव मिळावा यासाठी अ‍ॅग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया 1830 पासून काम करत आहे.

ऑनलाइन नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कडक कारवाई करा,जनजागृती करा ..

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रशासनाला निर्देश..

मुंबई, दि. 10: नायलॉन मांजामुळे राज्याच्या काही भागात नागरीक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही प्रकरणात, तर जीवितहानी झालेली आहे. अशा घटना टाळण्यासाठी नायलॉन मांजाच्या उत्पादनावर बंदी आणत राज्यात ज्या ठिकाणांहून तसेच ऑनलाइन मांजा विक्री केली जात आहे, अशा ठिकाणी सक्त कारवाई करण्यात यावी. मांजाच्या उपयोग टाळण्यासाठी जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दिल्या.

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी मुंबई, ठाणे, नाशिक, जळगांव, धुळे पुणे, छत्रपती संभाजीनगर महानगर पालिका क्षेत्रातील नायलॉन मांजा उपयोगावरील प्रतिबंधात्मक कारवाईबाबत ऑनलाईन पद्धतीने बैठक घेतली. बैठकीला ऑनलाईन पद्धतीने पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव विनीता सिंघल, मुंबई मनपा आयुक्त भूषण गगराणी, पेालीस उपायुक्त (उपक्रम) श्री. पठाण, छ. संभाजीनगर पोलीस आयुक्त प्रवीण पवार, ठाणे पोलीस आयुक्त प्रशांत परबकर, नाशिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, धुळे अतिरिक्त पोलीस अधिक्षक किशोर काळे, पुणे सह पोलीस आयुक्त रंजन कुमार, जळगांवचे अति. पोलीस अधिक्षक अशोक नकाते यांनी चर्चेत सहभाग घेतला.

नायलॉन मांजाच्या उपयोगाबाबत जनजागृती करण्याचे सांगत उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, महानगरांमध्ये गर्दीच्या ठिकाणी लाऊड स्पीकर, पोस्टर्स आदींद्वारे जनजागृती करावी. मात्र यामुळे नागरिकांचा उत्साह कमी होणार नाही, याची काळजी घ्यावी. संभाजीनगर पोलीस आयुक्तांनी चांगल्या संकल्पना राबविलेल्या आहेत. त्याचा अन्य महापालिका, पोलीस आयुक्त यांनी अवलंब करावा. दुचाकीला यु कमान लावण्यातबाबत तपासून घेण्यात यावे. तसेच मांजा विक्री, उत्पादन किंवा मांजामुळे घडणाऱ्या घटनांची माहिती देण्यासाठी टोल फ्री क्रमांक जारी करण्यात यावा.

वाहतूक पोलीसांनी नायलॉन मांजावरील कारवाईबाबत अलर्ट असावे. रस्त्यांवर आपत्कालीन पथकांची नेमणूक करावी. वेगात वाहन असताना मांजा गळ्याला लागून दुर्घटना झाल्याचे निदर्शनास येते. अशा वेळी जखमी व्यक्तीला मदत करण्यासाठी यंत्रणा निर्माण करावी. जेणेकरून जखमी व्यक्तीला तातडीने वैद्यकीय मदत मिळेल, अशा सूचनाही यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या. बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईची आणि प्रतिबंधात्मक उपायोजनांची माहिती दिली.

एशियन कल्चर’ पुरस्काराने लेखक आणि गीतकार जावेद अख्तर सन्मानित

२१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला प्रारंभ

एशियन फाऊंडेशन, महाराष्ट्रशासनाचा सांस्कृतिक विभाग‌ आणि फिल्मसिटी यांच्या सहकार्याने आयोजित २१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला प्रारंभ झाला असून या महोत्सवाचे उद्‌घाटन महाराष्ट्रफिल्म स्टेज अँड कल्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या  (MFSCDCL) व्यवस्थापकीय संचालक  स्वाती म्हसे-पाटील यांच्या  हस्ते करण्यात आले. यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, महामंडळाच्या वित्तीय सल्लागार व मुख्य लेखावित्तधिकारी चित्रलेखा खातू – रावराणे, मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी चित्रपट क्षेत्रातील अव्दितीय योगदानाबद्दल ‘एशियन कल्चर’या विशेष पुरस्काराने सुप्रसिद्ध पटकथा लेखक आणि गीतकार पद्मभूषण जावेद अख्तर यांना महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

या पुरस्काराचा आनंद व्यक्त करताना लेखक आणि गीतकार जावेद अख्तर  यांनी चित्रपट जगतात लेखकांना त्यांचा  योग्य तो मान व दाम मिळणं गरजेचं असल्याचं  प्रतिपादन केलं. आपल्याकडे उत्तम कलागुणांची खाण असून त्याला योग्य तो वाव  देत आपल्या मातीतल्या प्रादेशिक कलाकृतींसाठी आपण आग्रही राहायला हवे असं मत त्यांनी याप्रसंगी मांडलं. आपल्या चित्रपटांची परंपरा ही गीत-संगीताची आहे. असं असताना  हल्लीच्या चित्रपटांमध्ये मला गीत- संगीताचा अभाव दिसतो. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये ही परंपरा आवर्जून जपली  जाते . आपल्याकडे  चित्रपटांमध्ये  गीत- संगीताला जर महत्त्व दिलं  तर आपला चित्रपट हा जागतिक दृष्टया नक्कीच नावाजला जाईल असे मत लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी व्यक्त केले.

हिंदी चित्रपटसृष्टीतील लेखणीचे जादूगार समजले जाणारे जावेद अख्तर यांनी आपल्या गाणी, गझल, चित्रपट, संगीत आणि पटकथांद्वारे चित्रपटविश्वात एक वेगळे स्थान प्राप्त केले आहे. शोले , जंजीर, दिवार यांसारख्या अतिशय लोकप्रिय  चित्रपटांचे लेखन करणाऱ्या ज्येष्ठ लेखक आणि गीतकार जावेद अख्तर  यांनी रसिकांना आजवर अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिले आहेत. गीतकार, पटकथाकार आणि कवी म्हणून भारतीय चित्रपटांसाठी त्यांचे अमूल्य योगदान राहिले आहे.

यावेळी  बोलताना महाराष्ट्र फिल्म स्टेज अँड कल्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या  (MFSCDCL)  व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील म्हणाल्या  की, अनेक उत्तम  उपक्रम फिल्मसिटी  राबवत असते. त्या उपक्रमाचा लाभ अधिकाधिक चित्रकर्त्यानी घ्यावा. लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या सारख्या महान कलाकारासोबत व्यासपीठ शेअर करायला मिळणं हे खरंच भाग्याचं आहे. उत्तम सुविधा निर्माण करत ‘फिल्मसिटी’ ला जागतिक ‘प्रोडक्शन हब’  बनवण्याचा आमचा मानस आहे. त्याकरिता ‘कलासेतू’ हा  उपक्रम शासनाने सुरु केला असून त्याचा लाभ प्रत्येकाने घ्यावा.

दिवंगत सुधीर नांदगावकर यांच्या संकल्पेनेतून साकारलेल्या या  महोत्सवाचे  हे २१ वर्ष असून सातत्याने सुरु असणारा हा महोत्सव २५ वर्ष  यशस्वीरीत्या पूर्ण  करत चित्रपट रसिकांना उत्तम चित्रपट पाहण्याची संधी  देत राहील असा विश्वास महोत्सवाचेअध्यक्ष किरण शांताराम यांनी यावेळी  बोलून दाखविला. २१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने अनेक उत्तम जागतिक चित्रपट पाहण्याचा आनंद प्रत्येकाने जरूर घ्यावा असे सांगताना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी  हिने महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.यंदाच्या महोत्सवातील सर्वच कलाकृती दर्जेदार असून त्याचा आस्वाद रसिकांनी घ्यावा असे आवाहन फेस्टिव्हल डिरेक्टर संतोष पाठारे यांनी केले. ‘ब्लॅक डॉग’ चित्रपटाने महोत्सवाची शानदार सुरुवात झाली. १६ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या सात दिवसांच्या महोत्सवात विविध आशियाई देशांतील चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. या महोत्सवा दरम्यान अनेक दर्जेदार कलाकृती रसिकांना पाहण्यास मिळणार आहेत. स्क्रिनिंग कमिटी मेंबर संदीप मांजरेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे यावेळी आभार मानले.