Home Blog Page 505

हिंदू वीरशैव लिंगायत मंच च्या वतीने आयोजित कार्यक्रमात 75 शिवाचार्याच्या हस्ते महाआरती संपन्न

– समाज, राष्ट्रहितासाठी विविध ठराव संमत

पिंपरी : हिंदू वीरशैव लिंगायत मंचच्या वतीने राष्ट्राच्या हितासाठी, समृद्धीसाठी एक दिवशीय संत समावेश या विशेष कार्यक्रमाचे आयोजन मल्लिकार्जुन मंदिर, निगडी प्राधिकरण येथे करण्यात आले होते. याप्रसंगी महाराष्ट्रा सह कर्नाटकातील वीरशैव लिंगायत समाजातील 75 शिवाचार्य यांच्या उपस्थितीत महाआरती संपन्न झाली तसेच समाज आणि राष्ट्र हितासाठी विविध ठराव मंजूर करण्यात आले.

श्री. ष. ब्र. 108 डॉ. विरुपाक्षे शिवाचार्य स्वामीजी, मुखेड, श्री. ष. ब्र. 108 संगणबसव शिवाचार्य महायस्वामीजी, मणगुळी, कर्नाटक श्री. ष. ब्र. सिडधाराम महास्वामीजी विरक्त मठ, मसमनाळ, कर्नाटक यांच्यासह हिंदू वीरशैव लिंगायत मंच चे पदाधिकारी हेमंतराव हरहरे, अण्णाराय बिराजदार, एस. बी. पाटील, दानेश तीमशेट्टी, गुरुराज चरंतीमठ, अजय मुंगडे,नारायण बहिरवाडे,गुरुराज कुंभार, दत्तात्रय बहिरवाडे,राजेंद्र हिरेमठ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह महेश्वर मराठे आदि मान्यवर उपस्थित होते.

महाआरती पूर्वी दत्तोपंत म्हस्कर न्यासाचे अरविंद – वृंदा सभागृह येथे झालेल्या विशेष चर्चासत्र आणि परिसंवादामध्ये आज देशात साधू, संतांवर होत असलेल्या अन्याय, अत्याचाराला आला घालण्यासाठी, समाजातील समस्या निवारून समृद्ध समाजनिर्मितीसाठी करावयाच्या उपाय योजनावर चर्चा करण्यात आली.
परिसंवादाचे बीज भाषण करताना महेश्वर मराठे म्हणाले, धर्माची ग्लानी दूर करण्यासाठी हिंदू समाजाने एकत्र येण्याची गरज आहे. भ्रम निर्माण करण्याच्या रूपाने हिंदू धर्मावर पहिले आक्रमण झाले आहे, याशिवाय व्होट जिहाद, जमीन जिहाद आणि लव्ह जिहाद हिंदू धर्मावर अतिक्रमण सुरू आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील संताच्या माध्यमातून हिंदू समाज एकत्र आल्याशिवाय समाज टिकणार नाही असेही मराठे यांनी नमूद केले.

देशाच्या आगामी जनगणनेत हिंदू समाजाची संख्या घटणार नाही यासाठी सर्व समाजाने आपली नोंद हिंदू म्हणून करण्यासाठी सर्व संतांनी समाजाला जागृत करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच हिंदू वीरशैव लिंगायत मंच चा महाराष्ट्राबाहेर कर्नाटकात विस्तार करण्यासाठी एक समिती नेमून आराखडा तयार करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

धर्मांतर रोखण्यासाठी आणि यापूर्वी धर्मांतरीत झालेल्या समाज बांधवांना पुन्हा समाजात आणण्यासाठी आवश्यक ती पावले उचलून उपाययोजना करण्यास सर्व संतानी एकमताने मंजूरी दिली. तसेच संताचे एकत्रीकरण करण्यासाठी आजच्या कार्यक्रम प्रमाणे कर्नाटकात बिजापूर किंवा बागलकोट जिल्ह्यात संत समावेश कार्यक्रम घेण्याचे निश्चित करण्यात आले.

‘संत समावेश’ कार्यक्रमाच्या सांगता समारंभापूर्वी मल्लिकार्जुन मंदिर ते महात्मा बसवेश्वर पुतळा या दरम्यान 75 शिवाचार्य यांची भव्य पदयात्रा काढण्यात आली, यामध्ये बॅंड पथक, बाल वारकरी,महिला आणि समाज बांधव यांचा समावेश होता. महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

नगर रोड क्षेत्रीय कार्यालयासाठीच्या कचरा गाड्यांचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते लोकार्पण

पुणे:वडगावशेरी मतदारसंघातील नगर रोड क्षेत्रीय कार्यालयासाठी महानगरपालिकेकडून कचरा संकलनासाठी कचरा गाड्या देण्यात आल्या. आमदार बापूसाहेब पठारे यांच्या उपस्थितीत गाड्यांचा लोकार्पण सोहळा (ता. १०) पार पडला.

वडगावशेरी मतदारसंघात कचरा संकलनासाठी कचरा गाड्यांची जाणवणारी कमतरता लक्षात घेता, आमदार बापूसाहेब पठारे यांनी पालिका आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. तसेच, सातत्याने पाठपुरावा करून कचरा संकलनासंदर्भातील अडीअडचणी निर्दशनास आणून दिल्या.

“बऱ्याच काळापासून अपुऱ्या कचरा गाड्यांमुळे कचरा संकलनाचा मोठा प्रश्न मतदारसंघात निर्माण झाला होता. गाड्या नसल्यामुळे कचरा संकलन होत नाही, परिणामी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात. एकूणच कचरा व्यवस्थापनाच्या अभावामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते आणि म्हणूनच या प्रश्नावर तातडीने उपाययोजना राबवणे गरजेचे होते. यावर महापालिकेने लक्ष घालून कचरा गाड्यांची व्यवस्था केल्याबद्दल आभारी आहे. या कचरा गाड्यामुळे नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील कचरा संकलनाचा व व्यवस्थापनेचा प्रश्न सुटण्यास काही प्रमाणात मदत होईल”, असे यावेळी पठारे यांनी सांगितले.

लोकार्पणाच्या प्रसंगी, महापालिकेचे अधिकारी, पोलीस कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक बांधव उपस्थित होते.

सारथीमार्फत दीड हजार तरुणांना वाहनचालक प्रशिक्षण

पुणे, दि. ११: सारथीमार्फत “सरदार सुर्याजी काकडे सारथी वाहन चालक कौशल्य विकास प्रशिक्षण” कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजातील एक हजार ५०० विद्यार्थ्यांना दरवर्षी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानुसार १० जानेवारी पासून नोंदणी सुरु असल्याची माहिती सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी कळविली आहे.

प्रशिक्षित वाहन चालकांची देशात व देशाबाहेर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. प्रशिक्षित वाहनचालक उपलब्ध करण्यासाठी तरुण-तरुणींना रोजगार व स्वयंरोजगारासाठी संधी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांच्या रस्ता सुरक्षा अंतर्गत उपक्रमांतर्गत असलेल्या आय.डी.टी.आर. पुणे या केंद्र शासनाच्या संस्थेमार्फत एका महिन्याचे प्रशिक्षण विनामूल्य देण्यात येणार आहे. दररोज आठ तासासाठी हे प्रशिक्षण राहील त्यामध्ये वाहनांचे भाग त्याचे देखभाल व दुरुस्ती तसेच ड्रायव्हिंगचे भारतातील व परदेशातील नियमांची माहिती देण्यात येईल.

दररोज क्षेत्रीय स्तरावर
सराव व प्रशिक्षण देण्यात येईल. या विद्यार्थ्यांना एका प्रशिक्षण महिन्यासाठी रुपये १० हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात तसेच परदेशात या माध्यमातून रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे. याकरिता जास्तीत जास्त सारथी लक्षीत गटातील उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सारथी संस्थेच्या संकेतस्थळावर http://sarthi- maharashtragov.in.>Notice Board>Skill Development येथे नोंदणी करावी. असे आवाहन श्री. काकडे यांनी केले आहे.

000

पशुधन अर्थव्यवस्थेतील बदलासाठी उद्योजकता विकास परिषदेचे आयोजन

पुणे,दि.११:- उद्योजकतेला सक्षम करणे आणि पशुधन अर्थव्यवस्थेत बदल करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सोमवार, १३ जानेवारी रोजी पिंपरी चिंचवड येथील ग.दि. माडगूळकर सभागृहात उद्योजकता विकास परिषद-२०२५ आयोजित करण्यात आली आहे. ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, उद्योजक आणि पतपुरवठादारांना सुविधा देणे, भागधारक आणि उदयोन्मुख उद्योजक यांच्यात समन्वय साधुन उद्योजकांना प्रोत्साहन देणे हा या परिषदेचा उद्देश आहे.

या कार्यक्रमाला भारत सरकारचे केंद्रीय मत्स्यपालन, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री श्री. राजीव रंजन सिंह, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, पशुसंवर्धन मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रीय पशुधन अभियान उद्योजकता विकास कार्यक्रम (एनएलएम-ईडीपी) ऑपरेशनल मार्गदर्शक तत्त्वांची माहिती देणे, ज्ञानाची देवाणघेवाण, पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी (एएचआयडीएफ) आणि एनएलएम-ईडीपी योजनेच्या सहाय्याने उभारण्यात आलेल्या पाच प्रमुख प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

या एक दिवसीय परिषदेत उद्योजकांचा सत्कार, प्रकल्पांचे दृकश्राव्य पद्धतीने उद्घाटन, तांत्रिक सत्रांसह विविध सत्रे होणार आहेत. कार्यक्रमात एकुण १००० उद्योजक, लाभार्थी, शेतकरी,शासकीय अधिकारी आणि उद्योग संघटना सहभागी होणार आहेत. संमेलनाच्या आयोजनामुळे योजनांविषयी जनजागृती होईल. परिषदेच्या माध्यमातून योजनेच्या आतापर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येणार असल्याचे आयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी कळविले आहे.

महाराष्ट्राला संकटातून बाहेर काढण्यासाठी साहित्यिकांनी लेखणीद्वारे सहकार्य करावे : शरद पवार

दिल्लीतील साहित्य संमेलनानिमित्त शरद पवार यांनी साधला साहित्यिकांशी संवाद

पुणे : देशाच्या राजधानीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हावे, ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील साहित्यप्रेमींची इच्छा पूर्ण होणार आहे. या साहित्य संमेलनामुळे मराठी भाषेचा सुगंध देशाच्या कानाकोपऱ्यात दरवळेल. राजधानीत होणारे हे संमेलन आगळेवेगळे ठरेल असा विश्वास ज्येष्ठ नेते आणि 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. सध्या महाराष्ट्र संकटात आहे. या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी साहित्यिकांनी लेखणीच्या माध्यमातून सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
सरहद, पुणेतर्फे दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा साहित्यिकांशी संवाद हा उपक्रम आज (दि. 11) घेण्यात आला. त्या वेळी पवार बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ विचारवंत आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहबे कसबे, साहित्य परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, सरहद, पुणेचे संस्थापक अध्यक्ष, संमेलनाचे संयोजक संजय नहार, घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, सरहद, पुणेचे विश्वस्त शैलेश वाडेकर मंचावर होते.
पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, उदगीर येथे झालेल्या साहित्य संमेनलाचे अध्यक्ष भारत सासणे, संमेलनाचे आंतराष्ट्रीय समन्वयक डॉ. सतिश देसाई यांच्यासह साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
दिल्ली येथे होत असलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आनंदाने स्वीकारले असल्याचे अधोरेखित करून शरद पवार यांनी जेथे संमेलन होणार आहे त्या तालकटोरा स्थळाचे ऐतिहासिक महत्त्व विशद केले. सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी दिल्ली काबीज केल्यानंतर अनेक मराठी जनांनी दिल्लीत वास्तव्य केले असल्याचे सांगून त्यांच्या पुढील पिढीतील घरांमध्ये आजही जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र पहायला मिळते. सध्या माझे वास्तव बराचकाळ दिल्लीत असल्याने संमेलनाच्या निमित्ताने येणारी मंळडी हे माझे सगेसोयरे, बांधव आहेत याचा आनंद आहे.
पवार पुढे म्हणाले, किल्लारीचा भूकंप, मुंबईतील बॉम्बस्फोटानंतर उसळलेली दंगल, मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर या काळात महाराष्ट्रात उद्भवलेली परिस्थिती हाताळताना साद दिली की लोक साथ देतात हे मराठी मंडळींचे वैशिष्ट्य प्रकर्षाने जाणवले. सध्या महाराष्ट्रात दहशत-भीतीचे वातावरण आहे अशा काळात मराठी बांधवांमध्ये ऐक्य राहणे गरजेचे आहे. यातून महाराष्ट्राची स्थिती लौकरच पूर्वपदावर येईल, असा विश्वास दर्शवत पवार पुढे म्हणाले, साहित्यिकांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून महाराष्ट्राला या संकटकाळातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.


पुण्यातही सध्या मराठी बोलले जात नाही, हिंदीत बोला असा आग्रह पुण्यातील उपनगरामंध्ये केला जातो. मराठी भाषा टिकावायची असेल तर मराठी भाषा सक्तीची करावी, असा मुद्दा प्रेक्षकांमधून उपस्थित झाल्यानंतर तुमचा निरोप मी उद्धव ठाकरे यांना देतो अशी मिश्लिक टिप्पणी पवार यांनी केली.
रावसाहेब कसबे म्हणाले, शाहू-फुले-आंबेडकर यांच्या वारशाची जपणूक करणारे नेते म्हणजे शरद पवार होय. पवार यांच्या भोवती नेहमीच साहित्यिकांचा गोतावळा असतो. सर्वसमावेशक अशा राष्ट्रवादाचे पवार समर्थक असून असा राष्ट्रवाद नेहमीच समाजाबरोबर उभा राहतो.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, शरद पवार हे राजकारणातील पंढरी दुमदुमवून साहित्य पंढरीत आलेले नेते आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर साहित्य, संस्कृती आणि कलेशी शरद पवार यांनी नाळ जपली आहे. लेखन परंपरा, संगीत, नाटक, कला क्षेत्रात काय घडते आहे, याविषयी शरद पवार नेहमीच अवगत असतात.
प्रास्ताविकात संजय नहार म्हणाले, महाराष्ट्राला एकसंघ ठेवण्यासाठी कृतिशील व्यक्ती म्हणजे शरद पवार होय. शरद पवार यांनी सामाजिक ऐक्यासाठी मोठे काम केले असून त्यांचे साहित्याशी देखील जवळचे नाते आहे. महाराष्ट्रात एकमेकांमध्ये भेद असला तरी दिल्लीत जाताना आम्ही एक आहोत अशी भावना त्यांच्यात असते. समाजात ऐक्य भावना कमी होत असताना शरद पवार यांची संवादात्मक भूमिका पिढ्यानुपिढ्या आदर्श राहिल.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, मराठ्यांचा दिल्लीशी निकटचा संबंध आहे. मराठ्यांचे राज्य हे नेहमीच प्रेमाचे होते. दिल्लीवर राज्य केलेले महादजी शिंदे हे उत्तम साहित्यिक होते. साहित्य, संस्कृती आणि सत्ता एकत्रितपणे महाराष्ट्रात नांदतात आणि त्याचे प्रतिक म्हणजे शरद पवार आहेत.
भाषा, संगीत, नाट्य, ज्ञानविज्ञान, अध्यात्म, कृषी परंपरा आदी क्षेत्रात रमणारे आणि कलावंतांचा सन्मान करणारे व्यक्तीमत्त्व म्हणजे शरद पवार होय, असे डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले तर आभार डॉ. वंदना चव्हाण यांनी मानले. सुरुवातीस शरद पवार यांचा सत्कार डॉ. रावसाहबे कसबे, प्रा. मिलिंद जोशी, संतोष बालवडकर आणि अनुज नहार यांनी केला.
.

अनन्या, सई, सिद्धी यांची विजयी सलामी

 योनेक्स सनराईज पीवायसी एचटीबीए अमनोरा कप १५ वी जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धाहवेली तालुका बॅडमिंटन संघटनेच्या वतीने आयोजन

पुणे : अनन्या बोंद्रे, नाव्या रांका, सिद्धी जगदाळे आणि सई जोशी यांनी पीवायसी एचटीबीसी-अमनोरा कप जिल्हा सुपर-५०० मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत १७वर्षांखालील मुलींच्या गटात विजयी सलामी दिली. पीवायसी हिंदू जिमखाना येथील बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. 
या स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या सलामीच्या लढतीत सई जोशीने प्रेरणा खाडेवर २१-१५, २१-१५ अशी, तर नाव्या रांकाने शिप्रा कदमवर २१-१०, २१-११अशी, तर अनन्या बोंद्रेने साची संचेतीवर २१-१८, २१-१३ अशी मात केली. सिद्धी जगदाळेने लतिका पुजारीवर २१-१५, २१-१२ असा विजय मिळवला.
देवश्री जिनराळकरने इरा कपिलाला २१-१०, २१-११ असे, तर शिवांजलीने कर्डिलेला २१-९, २१-१५असे नमविले.   मोक्षित, ओंकार तिसऱ्या फेरीत या स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या दुस-या फेरीत मोक्षित पोरवाल तिस-या मानांकित जयंत कुलकर्णीला १८-२१, २१-१३, २१-१४ असा पराभवाचा धक्का दिला. निनाद कुलकर्णीने जतिन ठक्करला २१-२, २१-७ असे सहज नमविले. ओंकार लिंगेगौडाने दिव्यांश सिंगवर २२-२०, २१-१५ अशी मात करून तिसरी फेरी गाठली.अग्रिमा-निधीमध्ये अंतिम लढतस्पर्धेतील ११ वर्षांखालील मुलींच्या गटातील अंतिम लढत अग्रिमा राणा आणि निधी गायकवाड यांच्यात होणार आहे. उपांत्य फेरीत अग्रिमाने केयारा साखरेवर २१-३ २१-८ अशी, तर निधीने स्वरा कुलकर्णीवर २१-१५, २१-१२ अशी मात केली.
सान्वी, सोयराची आगेकूच स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलींच्या उपांत्यपूर्व फेरीत शरयू रांजणेने आराध्या ढेरेवर २१-११, २१-११ असा, सान्वी पाटीलने शर्वरी सुरवसेने १७-२१, २१-१५, २१-१९ असा, ख्याती कत्रेने स्वराली थोरवेवर २१-४, २१-९ असा आणि सोयरा शेलारने समन्वया धनंजयवर २१-१३, २१-५ असा विजय मिळवला. कायरा-गार्गीत फायनल स्पर्धेतील १३ वर्षांखालील मुलींच्या गटाच्या उपांत्य फेरीत कायरा रैनाने ध्रुवी कुम्बेफाळकरला २१-१२, २१-१९वर अशी, तर गार्गी कामठेकरने धानी झालवादियावर २१-१७, २१-१७ अशी मात केली. 
निकाल – पुरुष एकेरी – दुसरी फेरी – चैतन्य खरात वि.वि. रौनक चंडक २१-५, २१-७, अनिश भूजबळ वि. वि. समीर गणपुले २१-१७, २१-१७, विवेक चंद्रवंशी वि. वि. विनीत पानळे २१-१८, २१-१०, सुजल खुडे वि. वि. जिनेश मुथा २१-१९,२१-१२, कोनार्क इंचेकर वि. वि. अरिजित गुंड १७-२१, २१-१७, २१-११, ध्रुव निकम वि.वि. ईशान कौशिक २१-१३, २१-१४, सुदीप खोराटे वि. वि. श्लोक डागा १०-२१, २१-१९,२२-२०, अभिजित कदम वि. वि. साईदत्त गुंडू २१-६, २१-१२, ध्रुव खोबरे वि. वि.हर्षवर्धन अगरवाल २१-१४, २१-१३, देवेश पाटील वि. वि. वैष्णव गोळे २३-२१, २१-१४,गणेश जाधव वि. वि. साईराज पवार २१-५, २१-४. 
१५ वर्षांखालील मुले – उपांत्यपूर्व फेरी – अनय एकबोटे वि. वि. एस. सोमजी २१-१८, २१-१९, चिन्मय फणसे वि. वि. महिराज सिंह राणा २१-१०,२१-९. १९ वर्षांखालील मुले – दुसरी फेरी – निक्षेप कात्रेवि. वि. नितीन एस. २१-१८, २१-१७, सुदीप खोराटे वि. वि. श्रेयस मासळेकर २१-१८,२४-२२.  महिला एकेरी – पहिली फेरी – जिया उत्तेकर वि. वि.जान्हवी कुलकर्णी २१-१२, २१-४, मधुरा काकडे पुढे चाल वि. इंदिरा पाचरणे, यशस्वी काळे वि. वि. नेहा गाडगीळ २१-११, २१-१२, एकिशा मेदाने वि. वि. प्रणाली डोईफोडे २१-१९, २१-१६, २१-१९.

भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स ठरले उपविजेते

 ३८ व्या पश्चिम विभागीय युवा महोत्सवात घवघवीत यश
पुणे : भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्च्या विद्यार्थ्यांनी ३८ व्या पश्चिम विभागीय युवा महोत्सवात पदकांची लयलूट केली आहे. विविध कला प्रकारात विद्यार्थ्यांनी  ४ सुवर्ण, २ रौप्य पदक पटकावत महाविद्यालयाला महोत्सवाचे  उपविजेते मिळवून दिले, अशी माहिती स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक शारंगधर साठे यांनी दिली.
गुजरात मेहसाणा मधील गणपत विद्यापीठ येथे आंतरविश्वविद्यालयीन युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय विद्यापीठ संघटने द्वारे आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने हा महोत्सव झाला. यामध्ये ४५ विद्यापीठातील १८७८ विद्यार्थ्यांनी २७ विविध प्रकारांमध्ये सहभाग घेतला.

डॉ. शारंगधर साठे, प्रा. डॉ. प्रवीण कासलीकर, डॉ.देविका बोरठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारांमध्ये यश संपादन केले.

अंजली गायकवाड (सुवर्ण, भारतीय सुगम संगीत), हर्षिद शंकर (सुवर्ण,भारतीय शास्त्रीय संगीत वाद्य), भारतीय लोक वाद्य वृंद गट (सुवर्ण), गौरी पेंडसे (सुवर्ण, भारतीय शास्त्रीय नृत्य), सूर्यकांत शिंदे (रौप्य, भारतीय शास्त्रीय संगीत तालवाद्य), नंदिनी गायकवाड (रौप्य,भारतीय शास्त्रीय संगीत गायन), भारतीय लोकनृत्य (चतुर्थ क्रमांक), नृत्य प्रकार चॅम्पियनशिप (प्रथम), संगीत प्रकार चॅम्पियनशिप (द्वितीय) अशा विविध कला प्रकारात बाजी मारत एकूण युवा महोत्सवात महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक पटकाविला.

विद्यापीठाचे कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, आमच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश विद्यापीठासाठी गौरवाची बाब आहे. त्यांच्या कठोर परिश्रमांमुळे आणि प्राध्यापकांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले.

सचिव व प्र-कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांची कला, मेहनत आणि आणि एकत्र येत केलेल्या परिश्रमामुळे हे यश मिळाले आहे.  विद्यापीठाला राष्ट्रीय पातळीवर गौरव मिळवून देणारे हे यश आहे. कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांनीही या यशाचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यापीठाच्या सांस्कृतिक विभागाने या यशामुळे भारती विद्यापीठाला नवीन ओळख दिली असून, विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे विद्यापीठाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकले आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

2025 च्या हज यात्रेसाठी दुसरी प्रतीक्षा यादी जाहीर

नवी दिल्‍ली, 11 जानेवारी 2025

भारत सरकारच्या अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या  अंतर्गत कार्यरत असलेल्या हज समितीने 2025 च्या हज यात्रेसाठी दुसरी प्रतीक्षा यादी जाहीर केली आहे. विविध राज्यांमधून (परिशिष्ट-I नुसार) 3,676 अर्जदारांना तात्पुरत्या जागा वाटप करण्यात आल्या आहेत. 

10 जानेवारी 2025 च्या परिपत्रक क्रमांक 25 नुसार, या अर्जदारांनी 23 जानेवारी 2025 रोजी किंवा त्यापूर्वी हज यात्रेच्या शुल्कापोटी एकूण ₹2,72,300/- (पहिला हप्ता ₹1,30,300 आणि दुसरा हप्ता ₹1,42,000/-) जमा करणे आवश्यक आहे.

याव्यतिरिक्त, अर्जदारांनी परिपत्रक क्रमांक 25 मध्ये नमूद केल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे 25 जानेवारी 2025 पर्यंत त्यांच्या संबंधित राज्य/केंद्रशासित प्रदेशातील हज समित्यांना सादर करणे आवश्यक आहे. सौदी अरेबियातील विमान भाडे आणि खर्चाच्या अंतिम निर्णयावर आधारित, उर्वरित हज रकमेची (तिसरी हप्त्याची) माहिती नंतर कळवली जाईल.

अधिक माहितीसाठी, अर्जदारांना भारतीय हज समितीच्या अधिकृत वेबसाईट https://www.hajcommittee.gov.in  वर उपलब्ध असलेले परिपत्रक क्रमांक 25 पहावे किंवा त्यांच्या संबंधित राज्य/केंद्रशासित प्रदेशातील हज समित्यांशी सपर्क साधावा असा सल्ला देण्यात येत आहे.

अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी, कृपया संपर्क साधा:

मोहम्मद नियाज अहमद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ऑपरेशन्स), हज कमिटी ऑफ इंडिया

ईमेल: dyceop.hci[at]gov[dot]in | फोन: +91-9650426727 

Annexure – I

Sr. NoName of States/ Union TerritoryWaiting List Nos given Provisional Selection
FromTo
1Chhattisgarh136160
2Delhi (NCT)626790
3Gujarat17242207
4Karnataka20752310
5Kerala17122208
6Madhya Pradesh9061136
7Maharashtra36974789
8Tamil Nadu10161319
9Telangana16322288

कल्याणीनगर भागात स्वच्छता मोहीम

आमदार बापसाहेब पठारे स्वच्छतेबाबत आग्रही; स्वच्छता मोहिमांचे आयोजन

पुणे : वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या माध्यमातून व पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. कल्याणीनगर येथे काल (ता. १०) सफाई कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने ही मोहीम पार पडली.

या मोहिमेंतर्गत, कल्याणीनगर भागातील रस्ते, फुटपाथ, गटार तसेच अस्थाव्यस्थ पडलेले कचऱ्याचे ढीग इ. स्वच्छ करण्यात आले. “आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहुयात. स्वच्छता मोहिमेत प्रशासनासोबतच लोकसहभाग लाभणेही गरजेचे आहे. सोबतच सामाजिक संस्था, संघटना, शाळा यांनीही पुढे यावे. शालेय विद्यार्थ्यांमध्येही स्वच्छतेच्या महत्त्व रुजवावे लागणार आहे. संत गाडगेबाबांच्या कार्याचा वसा-वारसा जपून, पुढे नेऊन स्वयंस्फूर्तीने स्वच्छता राखूयात व ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ संकल्पना प्रत्यक्षात उतरवूया,” असे मत पठारे यांनी यावेळी व्यक्त केले.

स्वच्छता मोहिमेत सहभागी सफाई कर्मचाऱ्यांचे यावेळी आमदार बापूसाहेब पठारे यांनी आभार मानले. मागील आठवड्यातही विमाननगर भागातही अशा पद्धतीची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती; ज्यात ३०० सफाई कर्मचारी सहभागी होते. मतदारसंघातील स्वच्छतेबाबत पठारे हे विविध माध्यमातून प्रयत्न करताना दिसून येत आहेत.

बीव्हीजीचे चेअरमन हणमंतराव गायकवाड यांना “जागतिक मराठी भुषण” पुरस्कार प्रदान

सातारा (प्रतिनिधी) : जागतिक मराठी अकादमी व रयत शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाविद्यालायत  आयोजित करण्यात आलेल्या  जागतिक मराठी संमेलनात भारत विकास गृपचे (बीव्हीजी)  चेअरमन हणमंतराव गायकवाड यांना माजी कृषी मंत्री शरद पवार  यांच्या हस्ते जागतिक मराठी भुषण पुरस्कार प्रदान  करण्यात आला. या वेळी संमेलनाचे अद्यक्ष  डॉ. आ. ह. साळुंखे,  जागतिक मराठी अकादमीचे अद्यक्ष रामदास फुटाणे, स्वागताध्यक्ष चंद्रकांत दळवी, सांस्कृतीक कार्यमंत्री अशिष शेलार,  उद्योग मंत्री उदय सामंत, पत्रकार  राजीव खांडेकर, विकास देशमुख अभिनेते  सयाजी शिंदे उपस्थित होते.

या वेळी गायकवाड म्हणाले,”देशभरातील १ लाख लोक बीव्हीजी नावाच्या संस्थेत काम करत आहेत. या पुढे १० लाख  भारतीय युवकांना भारत सरकार व बीव्हीजीच्या माध्यमातून  परदेशात नोकरीच्या संधी निर्माण  करण्याचा माझा संकल्प आहे.

भक्तीरसाचा अवलंब केला तर यश मिळतेच. बीव्हीजी भक्तीरसातुन स्वच्छतेचे काम करते. त्यामुळे अयोध्येतील राम मंदीरासहीत अनेक  मंदीरे  स्वच्छ  ठेवण्याचे काम बीव्हीजी करत आहे.”

बीव्हीजी स्वच्छता सेवे बरोबर आरोग्य व कृषी क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहे. हृद्यरोग, यकृताचे अजार, कॅन्सर या सारख्या भयावह आजारांवरची विविध औषधे निर्माण करण्यात येत आहे. देशभरातील अनेक रुग्णांना या औषधांचा फायदा होत आहे.

पवार म्हणाले, हणमंतराव गायकवाड हे जिद्द व चिकाटीचे आदर्श उदाहरण आहे.  त्यामुळे परदेशात सुद्धा ते त्यांच्या कार्याचा ठसा उमटवतील. मराठी   उद्योजकांचे सुवर्णयुग गायकवाड यांनी सुरु केले आहे.

मंत्री चंद्रकांतदादांनी घेतली विद्यार्थ्यांची शाळा

पुणे-राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा यांनी आज फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित इंडिया सायन्स फेस्टिव्हलमध्ये उपस्थित विद्यार्थ्यांची शाळा घेतली. तसेच, विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात  यशस्वी होण्यासाठी शिक्षणासोबतच प्रशिक्षणही अत्यंत महत्त्वाचे असल्याची भावना व्यक्त केली.

फाउंडेशन फॉर ॲडव्हान्सिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजीतर्फे (फास्ट इंडिया) ११ आणि १२ जानेवारी २०२५ रोजी इंडिया सायन्स फेस्टिव्हलचे आयोजित करण्यात आले आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात होत असलेल्या या महोत्सवात वैज्ञानिक प्रयोगांसह विविध उपक्रम सादर होणार असून, विज्ञान क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या महोत्सवात लोणावळा मधील कल्पना चावला स्पेस ॲकेडमीच्या विद्यार्थी देखील सहभागी झाले आहेत. या अकाडमीमध्ये देशभरातून २५ विद्यार्थीचीच निवड झाली असून; या विद्यार्थ्यांना अंतराळ क्षेत्रात सुरु असलेल्या संशोधनाचे शिक्षण दिले जाते.

या विद्यार्थ्यांशी नामदार पाटील यांनी संवाद साधला. यावेळी युवराज गुप्ता या विद्यार्थ्यांला वर्षभरात घेतलेल्या शिक्षणाची माहिती घेतली.‌ त्यावर त्याने अतिशय आत्मविश्वासाने वर्षभरातील शिक्षणाची माहिती दिली. हे ऐकून समाधान व्यक्त करत,विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात  यशस्वी होण्यासाठी शिक्षणासोबतच प्रशिक्षणही अत्यंत महत्त्वाचे असल्याची भावना व्यक्त केली.

यावेळी फास्ट इंडियाचे सह-संस्थापक वरुण अग्रवाल, माजी मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. के. विजय राघवन, फास्ट इंडियाचे सीईओ शील कपूर, चेअरमन डेक्कन एज्युकेशनचे प्रमोद रावत आदी उपस्थित होते.

भालबा केळकर नाटिका स्पर्धेला सुरुवात

पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आणि नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित भालबा केळकर आंतरशालेय नाटिका स्पर्धेला आज (दि. 11) सुरुवात झाली. भरत नाट्य मंदिर येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
भालबा केळकर नाटिका स्पर्धा 5 ते 10 वयोगटातील मुलांसाठी आहे. स्पर्धेचे यंदाचे 32वे वर्ष आहे. पहिल्या सत्राची सुरुवात भारतीय विद्या भवन संस्थेच्या परांजपे विद्या मंदिराने सादर केलेल्या चि. का. गो. या नाटिकेने झाली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेने ‌‘जीवन त्यांना कळले हो‌’, आर्यन्स वर्ल्ड स्कूल, भिलारेवाडीने ‌‘एकाच तिकिटात तीन बालनाट्ये‌’, एस. पी. एम. इंग्लिश स्कूलने ‌‘मॅजिकल फॅक्टरी‌’ या नाटिका सादर केल्या.
सायंकाळच्या सत्रात माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय (कथा आमच्या शिक्षणाची), ॲपॉस्ट्रॉफी नेक्स्ट (खट्याळ उंदिर), महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे व्हिजन इंग्लिश मिडियम स्कूल (हास्यमंत्र), टँगी ट्विस्टर बॉक्स ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍ (संप), सिल्व्हर क्रेस्ट स्कूल (मुकुटाचा मान कोणाला?) या नाटिका सादर झाल्या.

रविवारी (दि. 12) सादर होणाऱ्या नाटिका : दुपारी 1 ते 4
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे आरुणी विद्या मंदिर (विकल्प बन), रॅडक्लिफ स्कूल (जादूगार), मानव्य (वाढदिवस), आर्यन्स वर्ल्ड स्कूल वारजे (व्हाईट वॉश), आकांक्षा बालरंगभूमी (रंगीत गोष्ट).
सायंकाळी 5 ते 8
श्रीनिवास सिरिन काऊंटी एबीसी को.ऑप. सोसायटी (पणजीची गोष्ट), शिशु विहार प्राथमिक शाळा (शेवटचा गणपती), स्वर-साधना (मॉनिटर), कला केंद्र (माझा बाप्पा), नाटकाची शाळा (मिशन गणपती).

गुरुवारी (दि. 16) पारितोषिक वितरण समारंभ
भालबा केळकर नाटिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी (दि. 16) आयोजित करण्यात आला असून पारितोषिक वितरण इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष प्रसाद वनारसे यांच्या हस्ते होणार आहे.

सुजित कदम यांच्या ‌‘मोबाईल‌’ कवितेला प्रथम क्रमांक

स्वरचित काव्यस्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
रंगत-संगत प्रतिष्ठान आणि करम प्रतिष्ठानतर्फे आयोजन

पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठान आणि करम प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या स्वरचित काव्यस्पर्धेत सुजित कदम यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांनी वृद्धांची व्यथा मांडणारी ‌‘मोबाईल‌’ ही कविता सादर केली. चैतन्य कुलकर्णी (संशयाचे भाले) यांना द्वितीय तर योगेश काळे (सागर संगम) यांना तृतीय क्रमांक मिळाला.
रंगत-संगत प्रतिष्ठान आणि करम प्रतिष्ठानतर्फे आज (दि. 11) मराठी स्वरचित काव्यस्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पत्रकार भवन येथे आयोजित स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रभा सोनवणे आणि प्रज्ञा महाजन यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. स्पर्धेत 15 कवींचा सहभाग होता. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर, मैथिली आडकर मंचावर होते.
स्त्री शक्तीचे दर्शन घडविण्याबरोबरच प्रेम, ज्येष्ठांची मानसिक स्थिती तसेच मुक्तछंदातील कविता आणि जीवनात येणाऱ्या प्रसंगांवर थेट भाष्य करणाऱ्या कविता या वेळी सादर करण्यात आल्या.
स्पर्धेविषयी माहिती देऊन प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, कविता म्हणजे स्वत:ने स्वत:शी केलेला संवाद असतो. स्पर्धा ही खरेतर स्वत:साठीच असते. स्पर्धा हे लोकांपर्यंत पोहोचण्याचे एक माध्यम आहे. भूषण कटककर यांनी गझल सादर केली.
परिक्षकांच्या वतीने बोलताना प्रज्ञा महाजन म्हणाल्या, भावनांना शब्द देते ती कविता. दुसऱ्याशी स्पर्धा म्हणजे हरणे-जिंकणे नव्हे तर स्पर्धेच्या माध्यमातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. पूर्ण समाधानी असणे हे प्रगतीत अडथळा ठरू शकते. त्यामुळे स्पर्धांमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे.
निरुपमा महाजन, मुक्ता भुजबले यांनी संयोजन केले तर प्राजक्ता वेदपाठक, वैजयंती आपटे, वासंती वैद्य यांनी सूत्रसंचालन केले.

अपघात ग्रस्त व्यक्तींना मदत करणाऱ्यासाठी प्रोत्साहन रक्कम 5000 रुपये वरून 25 हजार रुपये करू: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची रस्ते सुरक्षा कार्यक्रमात माहिती

नागपूर, 11 जानेवारी 2025

रस्ते अपघात झाल्यानंतरच्या ‘गोल्डन अवर’ मध्ये अपघातग्रस्तांचे प्राण वाचणे आवश्यक असते यामुळे  अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तींना सरकारतर्फे 5 हजार रुपये दिले जातात या रकमेमध्ये वाढ करून ती 25 हजार रुपये करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली. नागपूरच्या वनामती सभागृहामध्ये आयोजित रस्ते सुरक्षा कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांना मुलाखत देताना गडकरी बोलत होते.

अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करणाऱ्या लोकांना पोलीस किंवा प्रादेशिक परिवहन अधिकारी कुठलेही प्रश्न विचारत नाहीत उलट या व्यक्तींना 5 हजार रुपये प्रोत्साहन म्हणून दिले जातात. या रकमेमध्ये आपण वाढ करणार असल्याचे सांगून  संसदेने या अपघात ग्रस्त व्यक्तींना मदत करणाऱ्यांसाठी ‘गुड सेमेरीटन ऍक्ट’ पारित केला असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.

समाजातील स्वयंसेवी संस्था तसेच समाजसेवक यांनी रस्ते सुरक्षा संदर्भात पुढाकार घेऊन काम करावे असं आवाहन त्यांनी केले. रस्ते सुरक्षा क्षेत्रात काम करणाऱ्या राजू मानकर आणि चंद्रशेखर मोहिते यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.

आपल्या देशामध्ये 10 हजार विद्यार्थी हे शाळेच्या आजूबाजूच्या सदोष ट्रॅफिक व्यवस्था तसेच चौकाची रचना यामुळे अपघाताला बळी पडतात 30 हजार व्यक्ती बिना हेल्मेट मुळे दगावतात अशी माहिती गडकरींनी दिली. नागपूरच्या अजनी मध्ये 25 वर्षांपूर्वी खूप अपघात होत असत परंतु या चौकातील रस्ते अभियांत्रिकीच्या माध्यमातून सुधारणा केल्यामुळे आता 25 वर्षात येथे एकही अपघात झाला नाही असे त्यांनी सांगितले. नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार तसेच रोडमार्क या  संस्थेने अपघात प्रवण स्थळ दुरुस्त केले असून नागपूर ग्रामीणमध्ये राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची संख्या 48% नी कमी झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.

याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी  रस्ते सुरक्षा बाबत प्रश्न विचारले असता गडकरींनी त्यांच्या उत्तरांचे समाधान देखील केले. या कार्यक्रमाला  नागपूरचे वाहतूक पोलीस आयुक्त अर्चित चांडक, राज्य परिवहन  कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी, रस्ते सुरक्षा संदर्भात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

अडीच लाखांची लाच घेताना फलोत्पादन उपसंचालकाला पकडले

पुणे- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये केलेल्या कसुरीबाबत एफआरआय दाखल न करण्यासाठी तीन लाखांची लाच मागून अडीच लाख रुपये लाच घेताना फलोत्पादनचे उपसंचालकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
संजय महादु गुंजाळ (उपसंचालक, फलोत्पादन ४ व प्रभारी सहसंचालक फलोत्पादन, कृषी आयुक्त कार्यालय, शिवाजीनगर) असे अटक केलेल्या अधिकार्‍याचे नाव आहे. या कारवाईनंतर त्यांच्या फोर्ट इको स्पोर्ट कारची तपासणी केली असता त्या कारमध्ये २ लाख १५ हजार रुपयांची रोकड मिळाली आहे.तक्रारदार हे २०१९ – २० मध्ये बुलढाणा जिल्ह्यात जळगाव जामोद येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कनिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत असताना त्यांनी सुक्ष्म सिंचन (ठिबक) च्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये केलेल्या कसुरीच्या अनुषंगाने झालेल्या चौकशीअंती अमरावती विभागाचे कृषी सहसंचालक यांनी त्यांना १७ डिसेंबर २०२४ रोजी सेवेतून निलंबित केले आहे.

कृषी आयुक्तालय येथील उपसंचालक संजय गुंजाळ याने तक्रारदाराकडे त्यांच्या झालेल्या निलंबनाच्या कारवाईमध्ये मदत करण्यासाठी तसेच तक्रारदाराविरुद्ध ठेवलेल्या आक्षेपांच्या अनुषंगाने चौकशी करुन एफ आय आर दाखल न करण्यासाठी ३ लाख रुपयांची लाच मागितली होती.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार आल्यानंतर तिची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी संजय गुंजाळ याने तडजोड करुन अडीच लाख रुपये लाच घेण्यास संमती दर्शविली. त्यानंतर शुक्रवारी संगमवाडी येथील खुराणा खासगी ट्रॅव्हलच्या कार्यालयासमोरील रोडवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तक्रारदाराकडून अडीच लाख रुपये घेताना संजय गुंजाळ याला पकडण्यात आले. येरवडा पोलीस ठाण्यात संजय गुंजाळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.