Home Blog Page 503

१२ ते १४ जूनला राज्यभर काँग्रेसचे मशाल मोर्चे:-कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी

राहुलजी गांधी यांच्या लेखाने
भाजप हादरले

फडणवीसांचे उत्तर
महाराष्ट्राची दिशाभूल करणारे

पुणे – महाराष्ट्रातील भाजप युती सरकार मतदानाच्या चोरीचा पॅटर्न वापरून सत्तेवर आले आहे. यावर प्रकाशझोत टाकणारा लेख लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी वर्तमानपत्रात लिहीला, त्यामुळे भाजप नेते हादरले. या लेखाला उत्तर देणारा मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लेख हा मूळ मुद्द्याला बगल देऊन, महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करणारा आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे.

काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांनी लेखामध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबद्दलच आक्षेप घेतले आहेत. यावर निवडणूक आयोगाकडून उत्तर अपेक्षित असताना मुख्य मंत्री फडणवीस उत्तर का देत आहेत? त्यांच्या लेखामुळे निवडणूक घोटाळ्याबाबतचा संशयच बळावला आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे. निवडणूक आयुक्त नेमण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी घटनेत बदल केला. निवड समितीत पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि भारताचे सरन्यायाधीश या तिघांचा समावेश असे. पण, घटनेत बदल करून मोदी यांनी सरन्यायाधीशांना बाजूला केले आणि त्याजागी गृहमंत्री अमित शहा यांची नेमणूक केली. निवड समितीवर वर्चस्व मिळवले. मोदी यांच्या या डावपेचातूनच निवडणूक घोटाळ्याची सुरूवात झाली. याबाबत फडणवीस यांच्या लेखात अवाक्षरही का नाही? असा सवाल मोहन जोशी यांनी केला आहे.

काँग्रेस पक्षाने निवडणूक आयुक्त नेमताना पारदर्शक भूमिका घेतली, राजकीय हस्तक्षेप केला नाही आणि त्यांनी नेमलेल्या निवडणूक आयुक्तांबाबत कोणीही आक्षेप घेतले नाहीत. ही वस्तुस्थिती फडणवीस यांनी हेतुत: नजरेआड केली आणि लेखामध्ये उथळ आरोप केले. जनतेची दिशाभूल केली. २०२४ साली विधानसभेसाठी मतदारांची संख्या वाढली याबद्दल महाराष्ट्रातील जनतेत आजही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मतदानाची वेळ संपल्यावरही काही ठराविक मतदारसंघात मतदान झाले. त्याबाबतही फडणवीस यांनी बगल दिलेली आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

निवडणूक आयोगाची विश्वासार्हता पणाला लागली आहे, लोकशाही व्यवस्थेवर घाला घातला जात आहे, हे लक्षात घेऊन प्रदेश काँग्रेस १२ ते १४ जूनला राज्यभर मशाल मोर्चे काढून जनजागृती करणार आहे, अशी माहिती मोहन जोशी यांनी दिली.

पुणे नगर रस्त्यावर नागरिकांच्या सुरक्षेच्या आणि वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात

पुणे: पुणे-नगर रस्त्यावरील वाढती वाहतूक कोंडी, अपुऱ्या सुविधा, रस्त्यांची दुरवस्था व पादचारी मार्गांच्या असुरक्षित अवस्थेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या वाहतूक संबंधित समस्यांवर तातडीने उपाययोजना व्हाव्यात यासाठी वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी महानगरपालिका प्रशासन, वाहतूक नियंत्रण विभाग, पुणे शहर वाहतूक शाखेकडे निवेदनाद्वारे मागण्या मांडल्या आहेत.

तत्पूर्वी, येरवडा, शास्त्री नगर, कल्याणीनगर, रामवाडी, विमाननगर, टाटा गार्डन, खराडी बायपास, जनक बाबा दर्गा, युवान आयटी पार्क, खराडी जकात नाका या परिसरांमध्ये सिग्नल फ्री योजना अंमलात आणली आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग वाढला असला, तरी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना प्रलंबित असल्याचे दिसून येते. याच पार्श्वभूमीवर बापूसाहेब पठारे यांनी मागणीद्वारे उपाययोजना सुचवल्या आहेत.


बापूसाहेब पठारे यांनी सूचवलेल्या प्रमुख उपाययोजना:

  • बीआरटी मार्ग काढल्यानंतर विस्कळीत झालेला डिव्हायडर रस्त्याच्या मध्यभागी नेणे, ज्यामुळे रचना संतुलित व सुरक्षित होईल.
  • झेब्रा क्रॉसिंग, फूटपाथ व काही सेकंदाचे पादचारी सिग्नल यांची उभारणी.
  • डिव्हायडर सुरू होणाऱ्या ठिकाणी प्रतिबिंबित फलक
  • प्रमुख भागांकडे जाण्यासाठी दिशादर्शक फलक, रस्ता मार्गदर्शक सूचना फलक
  • विमाननगर व चंदननगर येथील भुयारी मार्गांची तातडीने दुरुस्ती, प्रकाशयोजना व साफसफाई
  • वाहतूक नियंत्रणासाठी स्मार्ट सिग्नल यंत्रणा

याशिवाय, दुसऱ्या निवेदनाद्वारे पठारे यांनी विमाननगर व चंदननगर येथील भुयारी मार्गांची अत्यंत खराब स्थिती अधोरेखित केली आहे. या भुयारी मार्गांची तातडीने दुरुस्त करून नागरिकांना सुरक्षित वापरासाठी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी महानगरपालिका मुख्य अभियंता केली आहे. या भुयारी मार्गांमध्ये प्रकाशयोजना अपुरी असून, स्वच्छतेचा अभाव आहे. त्यामुळे महिला, मुली, विद्यार्थीवर्ग तसेच वृद्ध नागरिकांना या मार्गांचा वापर करताना असुरक्षितता वाटते.

एकूणच मागण्यांबाबत बोलताना बापूसाहेब पठारे म्हणाले, की “वडगावशेरी मतदारसंघामधील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या दृष्टीने विविध माध्यमातून मी प्रयत्नशील आहे. वाहतूक कोंडी फोडून सुरळीत वाहतुकीसोबतच सुरक्षित वाहतूक असणेही गरजेचे आहे. मी मांडलेल्या मागण्यांचा विचार प्रशासन दरबारी होईल, ही खात्री आहे. वाहतूक व दळणवळण नागरिक बांधवांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि त्या दृष्टीने कोणतीही तडजोड होऊ नये.”

“सामाजिक उपक्रमातून साजरा केलेला वाढदिवस सर्वोत्तम” – ना. चंद्रकांतदादा पाटील.

0

“दादांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध संस्थांना क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने उपयुक्त साहित्य भेट” – संदीप खर्डेकर.

पुणे :माझाच वाढदिवस नव्हे तर कोणाचाही वाढदिवस किंवा कोणताही आनंदाचा प्रसंग साजरा करताना त्याला समाजोपयोगी उपक्रमाची जोड दिली तर तो समारंभ अधिक आनंददायी होतो व आपला आनंद इतरांसोबत वाटल्याने त्याचे महत्व ही वाढते असे मत ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.
ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने क्रिएटिव्ह फाउंडेशन, मुकुलमाधव फाउंडेशन, ग्लोबल ग्रुप आणि वेस्टर्न इंडिया फोर्जिंग यांच्या वतीने आठवडाभर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे मत व्यक्त केले.
यावेळी ग्राहक पेठेचे प्रमुख सूर्यकांत पाठक, नगरसेविका मंजुश्री संदीप खर्डेकर, नगरसेवक राजेश येनपुरे,वेध निसर्गोपचार व आयुर्वेदिक संशोधन केंद्राचे डॉ. अजय कुलकर्णी, महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे अध्यक्ष डॉ. सचिन बोधनी,डेक्कन वरील स्वामी समर्थ मठाचे रामभाऊ दिघे,सौ. कल्याणी प्रतीक खर्डेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ग्राहक पेठ परिवार, महाराष्ट्र ब्राह्मण सभा व स्वामी समर्थ मठास स्पीकर सेट भेट देण्यात आला तर डॉ. अजय कुलकर्णी यांच्या निसर्ग व आयुर्वेदिक उपचार केंद्रास व्हीलचेयर भेट देण्यात आली.
ना. चंद्रकांतदादांची शिकवण ही “अधिकाधिक गरजुंना मदत करावी आणि समाजात जिथे जे कमी आहे ते यथाशक्ती भरून काढण्यासाठी कार्य करावे” अशी आहे आणि त्यास अनुसरूनच आम्ही वाटचाल करत आहोत असे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले. काही कार्यक्रम प्रकाशात येतात मात्र क्रिएटिव्ह चे कार्य अखंडित पणे सुरु असून अनेक सेवाभावी संस्थांना मदतीची गरज असते हे समजून घेऊन समाजातील दानशूरांनी आपले योगदान देत राहिले पाहिजे असेही खर्डेकर म्हणाले.
यावेळी डॉ.सचिन बोधनी यांनी भगवान परशुराम यांचा पुतळा भेट देऊन दादांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.
क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त सौ.मंजुश्री खर्डेकर व सौ.कल्याणी प्रतीक खर्डेकर यांनी संयोजन केले.

वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्या

पुणे दि.११ : राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविण्याची निर्देश असून नागरिकांनी वाहनांना एचएसआरपी बसवून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने एका रिट याचिकेत दिलेल्या निकालानुसार राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 50 नुसार सर्व वाहनांना एचएसआरपी बसविण्याची तरतूद आहे. त्यानुसार परिवहन आयुक्त कार्यालयामार्फत जुन्या वाहनांना एचएसआरपी लावण्याचे कामकाज गतीने सुरू आहे, याकामात अधिक गतीमानता येण्याकरीता विशेष उपाययोजना करण्याकरीता आयुक्तालयाच्यावतीने निर्देश देण्यात आले आहे.

१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जून्या परिवहन संवर्गातील वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण, परवानाविषयक कामकाज व खाजगी संवर्गातील वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरण कामकाज वगळून वाहन हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्रामध्ये पत्ता बदल करणे, वित्त बोजा चढविणे किंवा उतरविणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र देणे, नाहरकत प्रमाणपत्र जारी करणे, वाहनांमध्ये बदल करणे आदी वाहनविषयक सर्व कामकाज एचएसआरपी बसविल्याशिवाय १६ जून २०२५ पासून करण्यात येणार नाही. तथापि, वाहन मालकांनी एचएसआरपी बसविण्यासाठी पूर्व नियोजित दिनांक व वेळ घेतली असल्यास त्या पावतीची खातरजमा करून त्यांच्या वाहनांचे कामकाज करण्यात येईल. १६ जून २०२५ पासून एचएसआरपी न बसवलेल्या वाहनांचे कामकाज करण्यात येणार नाही, असे पिंपरी चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

‘नारायण राणे असताना नितेश राणेंचे बाप फडणवीस कसे झाले कळलं नाही’, अंबादास दानवेंनी डिवचलं

भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे हे वारंवार आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन अडचणीत येत असल्याचं वारंवार दिसून येतं. अशातच धाराशिवमध्ये केलेल्या त्या वक्तव्यामुळे महायुतीतील पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं चित्र आहे. नितेश राणेंच्या वक्तव्याचे पडसाद काल (मंगळवारी) मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिसून आले. धाराशिव येथील संवाद मेळाव्यात भाषण करताना, नितेश राणेंनी तेथील स्थानिक शिवसेना नेत्यांना उद्देशून बोलताना भाजपचा मुख्यमंत्री सगळ्यांचा बाप बसलेला आहे, असे वक्तव्य केलं त्याला आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत, तुमचा कोण?, असा सवाल शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नितेश राणे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. या प्रकारचे बोलणे टाळले पाहिजे, असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंना दिला. राणेंच्या वक्तव्याचे पडसाद सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहेत. अशातच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी नारायण राणेंचं नाव घेत डिवचलं आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी नारायण राणेंचं नाव घेत नितेश राणेंना डिवचलं, माध्यामांच्या प्रश्नावर उत्तर देताना दानवे म्हणाले, नितेश राणे यांचे बाप नारायण राणे आहेत. हे सगळं असताना देवेंद्र फडणवीस त्यांचे बाप कसे झाले, ते मलाही कळालं नाही.

धाराशिव जिल्हा नियोजन समितीमधील निधीवाटपाच्या स्थगितीवर बोलताना नितेश राणे यांनी घटक पक्षांना इशारा दिला. कुणी कितीही ताकद दाखवली, कसेही नाचलं तरी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसलाय हे लक्षात ठेवा असा दमच नितेश राणेंनी दिला होता. सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय सगळ्यांनी लक्षात ठेवा, अशी धमकीच नितेश राणेंनी स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांना दिली. कुणी कितीही ताकद दाखवली , कोणीही कसेही नाचले तरी देशात भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याचं लक्षात ठेवा, असेही नितेश राणे म्हणाले होते. त्यावरती शिवसेना नेते व महाविकास आघाडीतील नेत्यांकडूनही टीका झाली. तर, मंत्रिमंडळ बैठकीतही आज तो विषय निघाला, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी राणेंना समज दिली.

नितेश राणेंच्या वक्तव्याचे पडसाद काल (मंगळवारी) मंत्रिमंडळ बैठकीत पाहायला मिळाले. आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत, तुमचा कोण?, असा सवाल शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नितेश राणे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. या प्रकारचे बोलणे टाळले पाहिजे, असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंना दिला. तसेच, कुणाचाही बाप काढणं योग्य नाही, संबंधित मंत्र्यांशी मी बोललो, ते म्हणाले माझा बोलण्याचा तसा अर्थ नव्हता, पण मी त्यांना सांगितलं, तुमच्या मनात जो काही अर्थ असेल त्यापेक्षा जे परसेप्शन जातं ते राजकारणात महत्त्वाचं असतं, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली.

मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो:तो जनतेचा सेवक असतो, नारायण राणेंनी टोचले नितेश राणेंचे कान

धाराशिव -मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो. मी नितेशला समज दिली आहे, असे भाजप खासदार नारायण राणे यांनी म्हटले आहे. भाजप आमदार व मंत्री नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी धाराशिव येथे बोलताना महायुतीमध्ये भाजपचा मुख्यमंत्री सगळ्यांचा बाप आहे, असे वक्तव्य केले होते. त्यावरून महायुतीमध्ये अंतर्गत वाद पेटला होता. त्यानंतर नीलेश राणे यांनी देखील ट्विट करत नितेश राणे यांना विधाने जपून करावीत असा सल्ला दिला होता. आता नारायण राणे यांनी देखील समज दिल्याचे समजते.

नारायण राणे म्हणाले, मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो. मी नितेशला समज दिली आहे. मुख्यमंत्री हा जनतेचा सेवक असतो. मी मुख्यमंत्री असताना मी सांगायचो की, मला साहेब म्हणू नका सेवक म्हणा. नारायण राणे हे धाराशिव येथे आले होते. तुळजापूरमध्ये तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोणाचा निधी अडवणे हे चुकीचे आहे, त्याबद्दल मी सूचना देणार असल्याचे देखील राणे यांनी म्हटले आहे.

नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मनसे नेते प्रकाश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, प्रकाश महाजन हा मेंटल माणूस आहे. त्याच्याशी माझी तुलना का करता? मी दिल्लीला होतो आणि तो इकडे कुठे उभा राहतो क्रांती चौकात, त्याला भेटायला मी यायचे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, याबद्दल मला माहीत नाही. ते एकत्र आले तर चांगलीच गोष्ट आहे.

नितेश राणे काय म्हणाले होते?

धाराशिव येथील कार्यक्रमात नितेश राणे यांनी भाषण केले. यावेळी ते म्हणाले होते की, कोणी कितीही ताकद दाखवली, कसेही नाचले तरी महायुतीमध्ये भाजपचा मुख्यमंत्री सगळ्यांचा बाप बसला आहे हे लक्षात ठेवा, असे विधान केले होते. यावरून त्यांच्यावर महायुतीमधील इतर पक्षाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच शिवसेना शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे यांनी नाराजी व्यक्त केली होती.

ठाण्यात तीन हात नाका परिसरात शिवसेना ठाकरे गटाकडून नितेश राणे यांच्या विरोधात बॅनर लावण्यात आले होते. ठाकरे गटाचे सहप्रवक्ता तुषार रसाळ यांनी भलामोठा बॅनर लावला होता. यावर ‘मी तुषार दिलीप रसाळ.. दिलीप पंढरीनाथ रसाळ हे माझे जन्मदाता (बाप). श्री. देवेंद्र गंगाधर फडणवीस हे माझे बाप नाहीत’, असा मजकूर लिहिला होता. या बॅनरचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर ठाणे मनपाने हे बॅनर हटवले आहेत.

डिजीलॉकरमध्ये विजेची बिले उपलब्ध लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन

मुंबई दि. ११ जून, २०२५- आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला अशी महत्त्वाची कागदपत्रे इलेक्ट्रॉनिक स्वरुपात सुरक्षित ठेऊन हवे तेव्हा उपलब्ध करून देणाऱ्या केंद्र सरकारच्या डिजिलॉकर या ऑनलाईन सुविधेमध्ये आता महावितरणची वीजबिलेही उपलब्ध झाली असून वीज ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी बुधवारी केले.

मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून वीज ग्राहकांना ईज ऑफ लिव्हिंगच्या आधारे अधिकाधिक सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महावितरणने केंद्र सरकारच्या डिजिलॉकरशी वीजबिले जोडली आहेत. यामुळे वीज ग्राहकांना आपल्या मोबाईल फोनमध्ये डिजिलॉकर ॲपमध्ये ठेवलेल्या महत्त्वाच्या दाखल्यांसोबतच वीजेची बिलेही उपलब्ध होणार आहेत. त्यांना वीजबिल भरण्यासाठी तसेच गरजेनुसार हे बिल कोणाला पाठविण्यासाठी किंवा त्याचा प्रिंट काढण्यासाठी याचा उपयोग होईल.

डिजिलॉकर हा केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने डिजिटल इंडिया कार्यक्रमाच्या अंतर्गत सुरू केलेला महत्त्वाचा उपक्रम आहे. त्याचा वापर करून नागरिकांना आपले पॅन कार्ड, वाहन नोंदणी कागदपत्रे, रेशन कार्ड, दहावी मार्कशीट, बारावी मार्कशीट, निवासाचा दाखला असे अनेक दस्तऐवज ॲपमध्ये सुरक्षित ठेवता येतात आणि गरजेनुसार त्यांचा वापर करता येतो. सर्व दाखले मोबाईलच्या ॲपमध्ये ठेवलेले असल्याने ते सदैव सोबत उपलब्ध राहतात. देशात आतापर्यंत ५२ कोटी ८९ लाख नागरिकांनी डिजिलॉकरचा वापर सुरू केला असून त्यांनी त्यात ८५९ कोटी कागदपत्रे ठेवली आहेत. माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या नियमावलीनुसार डिजिलॉकरमधील दस्तऐवज मूळ कागदी प्रत्यक्ष दाखल्याच्या समान समजले जातात व त्याला कायदेशीर दर्जा आहे.

महावितरणने आपल्या संगणकीय व्यवस्थेतील बिलांची माहिती डिजिलॉकर सुविधेला उपलब्ध करून दिली आहे. वीज ग्राहकाने आपल्या डिजिलॉकर ॲपमध्ये गेल्यानंतर महावितरण वीज कंपनीची निवड करून आपला वीज ग्राहक क्रमांक दाखल करण्याची कृती एकदाच करायची आहे. त्यानंतर त्या ग्राहकाला आपल्या डिजिलॉकरमध्ये विजेचे चालू महिन्याचे बिल उपलब्ध होईल.

गंगाधाम चौकात ट्रकने घेतला एका तरुण महिलेचा बळी

पुणे: गंगाधाम चौकात शिस्तीने दुचाकी चालविणाऱ्या ला ट्रकने मागून धडक एका तरुणीचा बळी घेतला.

या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की,
आज रोजी मार्केट यार्ड पोलीस ठाण्याचे हद्दीमध्ये गंगाधाम चौकामध्ये सकाळी 11:15 वाजे च्या दरम्यान ट्रक क्रमांक MH 14 AS 8852 याने एक स्कूटर गाडी …स्कूटर चालक जगदीश पन्नालाल सोनी वय 61 (जखमी) व पाठीमागे बसलेली महिला नामे दिपाली युवराज सोनी वय 29 (मयत) हे सिग्नल सुटून पुढे जात असताना पाठीमागचे बाजूने त्यांना धडक दिली.

त्यामध्ये वरील महिला दिपाली सोनी या जागीच मयत झाल्या आहेत . सोबतचा इसम जखमी आहे. जखमीला स्पायरल हॉस्पिटल गंगाधाम चौक या ठिकाणी उपचारांसाठी पाठवलेले आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे.
सदर ट्रक ताब्यात घेतलेला आहे.ड्रायव्हर शौकत आली पापालाल कुलकुंडी वय 51 राहणार भवानी पेठ पुणे यास ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय तपासणी चालू आहे.BNSS कलम 105 (आयपीसी 304) प्रमाणे गुन्हा दाखल करत आहोत.सध्या रोड पूर्णपणे चालू असून कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न नाही.
भविष्यात असे प्रकार घडू नये म्हणून वाहतूक पोलीस व महानगरपालिका या अनुषंगाने योग्य ती कारवाई करत आहोत.

‘आधुनिक जंगल‌’मधून उलगडले मुलांचे भावविश्व : मृणालिनी कानिटकर-जोशी

.कविता वाचनातून मुलांवर होतात शब्दसंस्कार : मृणालिनी कानिटकर-जोशी
ज्योती उटगीकर-देशपांडे लिखित ‌‘आधुनिक जंगल‌’ बालकविता संग्रहाचे प्रकाशन

पुणे : सध्याच्या बालसाहित्यातून वास्तवता मांडली जात असली तरी त्यातून रम्यता, कल्पकता हरवत चालली असल्याचे दिसून येत आहे. मात्र ज्योती उटगीकर-देशपांडे लिखित ‌‘आधुनिक जंगल‌’ बालकविता संग्रहातून मुलांच्या भावविश्वाची निरागसता उलगडली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यवाह मृणालिनी कानिटकर-जोशी यांनी केले.
उत्कर्ष प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‌‘आधुनिक जंगल‌’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मंगळवारी लोकमान्य नगरमधील रुईया मूकबधीर विद्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी जोशी बोलत होत्या. ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी, स्नेह सेवा संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राधा संगमनेरकर, प्रकाशक सु. वा. जोशी, प्राचार्य श्याम भुर्के, एकपात्री कलाकार बंडा जोशी मंचावर होते.
कविता वाचनातून मुलांवर शब्दसंस्कार होतात, असे सांगून मृणालिनी कानिटकर-जोशी म्हणाल्या, बालवयात मुलांना चांगले, सकस साहित्य वाचायला मिळाल्यास मुलांची जडणघडण चांगल्या माणसात होईल.
अंजली कुलकर्णी म्हणाल्या, ‌‘आधुनिक जंगल‌’ या बालकविता संग्रहातून जुन्याचे आधुनिकतेशी संधान साधले गेले आहे. लहान मुलांसाठी साहित्यनिर्मिती करणे ही फार अवघड गोष्ट असते. मुलांच्या अंतरंगात शिरून व्यक्त व्हावे लागते, बालसुलभ कुतुहलता, जिज्ञासा असावी लागते. ज्योती उटगीकर-देशपांडे यांनी तन्मयतेतून लिखाण केले आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा काव्यामुळेच मिळाला असल्याचे सांगून श्याम भुर्के म्हणाले, ज्योती उटगीकर-देशपांडे यांच्या कविता अंतर्मुख करायला लावणाऱ्या आहेत. बंडा जोशी म्हणाले, मराठी वाचनासाठी मुलांना उद्युक्त केले पाहिजे त्याच प्रमाणे शाळा-शाळांमध्ये बालकवितांच्या वाचनाचे कार्यक्रम व्हावेत. सु. वा. जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.
पुस्तक लिखाणाविषयी ज्योती उटगीकर-देशपांडे यांनी भूमिका विशद केली. चित्रकार अशोक बोकील यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली अत्रे यांनी केले.

गायिका सुनिधी चौहान यांची गाण्यातून वडिलांना साद

वडील आणि मुलीच्या नात्यातील गोडवा शब्दांतून व्यक्त करणं तसं अवघडच. जन्मापासून
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वडिलांची साथ, पाठिंबा महत्त्वाचा असतो याची जाणीव मुलींना
नक्कीच असते. या सुंदर नात्यावर आधारलेलं एक गीत लवकरच आपल्या भेटीला येत आहे.
आगामी ‘अवकारीका’ या मराठी चित्रपटातील हे गीत सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान हिने
गायलंय.
का रे बाबा … का रे पप्पा
कुठे हरवल्या तुझ्या छान-छान गप्पा….
तू सांग ना तू सांग ना
तू सांग ना…. हा माझ्या बाबा

असे बोल असलेलं हे गीत अरविंद भोसले यांनी लिहिलं असून श्रेयस देशपांडे यांचे संगीत
गीताला लाभले आहेत. बाप लेकीचे भावनिक नाते उलगडणारं ‘अवकारीका’ चित्रपटामधील
ह्रदयस्पर्शी गाणं ‘आपल्या आयुष्यात असलेले वडिलांचे स्थान आणि त्यांनी आपल्यासाठी
घेतलेले कष्ट या सर्वांची जाणीव करुन देते. येणाऱ्या ‘फादर्स डे’ च्या निमित्ताने हे गीत वडील
मुलीच्या नात्यासाठी सुंदर भेट ठरेल. हे गीत गाताना खूप मजा आली. प्रेक्षकांच्या अंतर्मनाचा
ठाव हे गाणं घेईल, असा विश्वास गायिका सुनिधी चौहान यांनी व्यक्त केला.
रेडबड मोशन पिक्चर या बॅनरअंतर्गत येत्या १ ऑगस्टला भेटीला येणाऱ्या ‘अवकारीका’
चित्रपटाचे दिग्दर्शन अरविंद भोसले यांचे आहे. या चित्रपटाची निर्मिती भारत टिळेकर, अरुण
जाधव यांनी केली असून सहनिर्मिती मनोज गायकवाड, अरविंद भोसले, मृणाल कानडे, गीता
सिंग यांची आहे.

पुणे जिल्ह्यासाठी यलो अलर्ट…विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या पावसाची शक्यता

पुणे-

आज दिनांक 11/06/2025 रोजी पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट दिलेला असून पुढील ३ ते ४ तासांत आपल्या जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या पावसासह ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे.असे आवाहन मंत्रालय, मुंबई कडून करण्यात आले आहे हि माहिती सचेत अँप वर देण्यात आली आहे.

दरम्यान ११ जून, आज सकाळी ताज्या उपग्रह निरीक्षणातून… असे सांगण्यात आले आहे कि गेल्या २४ तासांत काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडला, नांदेड, परभणी…आणि अन्य भागात पुढील ४,५ दिवस महाराष्ट्रात सक्रिय हवामानाची शक्यता वर्तविली आहे.

बिर्ला इस्टेट्सने दोन प्रकल्पांसाठी IFC कडून मिळविली 420 कोटी रुपयांची आर्थिक गुंतवणूक

मुंबई – आदित्य बिर्ला रिअल इस्टेट लिमिटेड (पूर्वीची सेंच्युरी टेक्सटाइल्स
अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज लिमिटेड) ची पूर्ण मालकीची उपकंपनी बिर्ला इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेड
(BEPL) ने वर्ल्ड बँक समूहाचा सदस्य असलेल्या इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन (IFC)
कडून गुंतवणुकीसाठी करारांवर स्वाक्षऱ्या केल्याची घोषणा केली. या गुंतवणूकीतून बिर्ला
इस्टेट्सची संपूर्ण भारतात शाश्वत आणि उच्च दर्जाची बांधकाम विकासकामे करण्याची
बांधिलकी अधोरेखित होते. अंदाजे 50 दशलक्ष (420 कोटी रु.) अमेरिकन डॉलर इतकी ही
गुंतवणूक बिर्ला इस्टेट्सच्या दोन मुख्य प्रकल्पांमध्ये करण्यात येणार आहे: सुमारे 148 कोटी
रु. पुण्यातील मांजरी प्रकल्पासाठी (सुमारे 3.13 दशलक्ष चौ.फुट विक्रीयोग्य क्षेत्र) आणि सुमारे
272 कोटी रु. बिर्ला इस्टेट्सच्या ठाण्यातील प्रकल्पासाठी (सुमारे 6.43 दशलक्ष चौ.फुट
विक्रीयोग्य क्षेत्र).
हे प्रकल्प बिर्ला इस्टेट्सच्या मालकीच्या आणि नियंत्रणाखालील दोन विशेष उद्देश वाहक
कंपन्यांद्वारे (Special Purpose Vehicles – SPVs) विकसित केले जाणार आहेत. IFC ही
गुंतवणूक या SPVs मध्ये करेल. दोन्ही प्रकल्पांच्या विकासासाठी त्या प्लॅटफॉर्म म्हणून काम
करतील. या रचनेनुसार, बिर्ला इस्टेट्स या SPVs मध्ये 56% आर्थिक सहभाग ठेवेल, तर
IFC चा 44% आर्थिक सहभाग राहील.
बिर्ला इस्टेट्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. के. टी.
जितेंद्रन म्हणाले, “शाश्वत आणि उच्च दर्जाच्या रिअल इस्टेट विकासाद्वारे शहरी
जीवनशैलीला पुर्नआकार देण्याच्या आमच्या कार्यात मौल्यवान गुंतवणूकदार म्हणून IFC चे
स्वागत करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. ही गुंतवणूक आमच्या विकास तत्वज्ञानाला
मान्यता देते आणि जबाबदारीने विस्तार करण्याची आमची क्षमता मजबूत करते. IFC चा
शाश्वत गुंतवणुकीतील जागतिक अनुभव आणि आमची खोलवरची बाजारपेठीय समज यांचा
समन्वय करून आम्ही भारतीय रिअल इस्टेटमध्ये नवीन मापदंड स्थापित करण्याचे उद्दिष्ट
ठेवत आहे.”
IFC चे दक्षिण आशिया विभागासाठीचे प्रादेशिक संचालक इमाद एन. फखुरी म्हणाले,
“गृहनिर्माण हा रोजगार, आनंद, आर्थिक विकास यासाठीचा एक प्रभावी प्रेरक घटक आणि
IFC साठी एक मुख्य प्राधान्यक्रमाची गोष्ट आहे. बिर्ला इस्टेट्ससोबतची आमची भागीदारी
विशेषतः पहिल्यांदाच घर घेणाऱ्या ग्राहकांवर लक्ष केंद्रित करून भारतातील वाढत्या
लोकसंख्येसाठी शाश्वत, उच्च दर्जाच्या गृहनिर्माणाची उपलब्धता आणि पोहोच वाढवून

डॉ. सुनील अंभोरे यांचा आंतरराष्ट्रीय परिषदेत सन्मान

हैदराबादमध्ये ‘प्रोक्टोहिता २०२५’ आंतरराष्ट्रीय परिषद : पाईल्स, फिशर, फिस्चुला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष पुरस्कार
पुणे : आंतरराष्ट्रीय पाईल्स, फिशर व फिस्चुला परिषदेत पुण्याचे डॉ. सुनील दिवाकर अंभोरे यांना पाईल्स, फिशर व फिस्चुला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हैदराबादमध्ये ‘प्रोक्टोहिता २०२५’ ही आंतरराष्ट्रीय पाईल्स, फिशर व फिस्चुला विषयावरील भव्य परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांचा गौरव करण्यात आला. पद्मश्री डॉ. मनोरंजन साहू यांच्या हस्ते डॉ. अंभोरे यांना सन्मानित करण्यात आले.

या परिषदेत डॉ. अंभोरे यांना २ थेट शस्त्रक्रिया प्रात्यक्षिक व २ सत्रांचे संचालन करण्याचा मान मिळाला. देशभरातील सुमारे ४०० नामांकित सर्जन्सच्या उपस्थितीत या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. त्यांनी गुरु डॉ. एम.डी.पी. राजा सर यांचे आभार मानत त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त केले.

‘प्रोक्टोहिता २०२५’ या आंतरराष्ट्रीय परिषदेला जगभरातील मान्यताप्राप्त प्रॉक्टोलॉजिस्ट्सची उपस्थिती लाभली. यामध्ये सेप्टा ब्लाॅकचे जनक डॉ. अशोक लढ्ढा, स्लॉफ़्ट प्रक्रिया तयार करणारे डॉ. डी. यू. पाठक, कोलोरेक्टल सर्जन व वैद्यकीय लेखक डॉ. अजित कुकरेजा, तसेच राष्ट्रीय आयुर्वेद संस्थान जयपूरचे डीन डॉ. हेमंत कुमार यांचा सहभाग होता. याशिवाय डी. वाय. पाटील विद्यापीठाचे डीन डॉ. अमर द्विवेदी, डॉ. मुकुल पटेल, डॉ. रविशंकर परवाजे, डॉ. आलोक गुप्ता, डॉ. प्रवीण पाटील आणि डॉ. गजानन धाडवे हे प्रख्यात तज्ञही उपस्थित होते

एक शाळा, एक बंड, आणि इतिहासाशी झालेली भन्नाट गाठ! ‘इबलीस’चा ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा संपन्न

एक शाळा, एक बंड, आणि इतिहासाशी झालेली भन्नाट गाठ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच मान्यवरांच्या उपस्थितीत इबलिस या चित्रपटाचा ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा मुंबईतील प्लाझा सिनेमा येथे जल्लोषात संपन्न झाला. या सोहळ्याला चित्रपटाची निर्माती प्राजक्ता चौधरी, दिग्दर्शक राहुल मनोहर चौधरी, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायिका सावनी रविंद्र, संगीतकार चैतन्य अडकर तसेच अभिनेत्री पूनम शेंडे, मंगेश सातपुते आणि चित्रपटातील बालकलाकार वंदन वेलदे, अथर्व देशमुख, तन्मय लोहगावकर, ओवी कुलकर्णी, जान्हवी बोरसे, अंकिता दीक्षित, मृणाल नेहते, कारुण्य धुमाळी, अंकुर राव, शर्विन मुळे, रसिका बऱ्हाटे आणि कोरिओग्राफर लाभेश सोलंकी देखील उपस्थीत होते. हा चित्रपट येत्या २० जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल.

बंदुक्या फेम दिग्दर्शक राहुल मनोहर चौधरी यांनी इबलिस या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर अभिनेते नामदेव मुरकुटे यांनी या चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. तेशा गर्ल चाइल्ड प्रोडक्शन, सार्थी एंटरटेनमेंट आणि प्राजक्ता राहुल चौधरी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. विजय निकम, पूनम शेंडे, अशोक केंद्रे, मंगेश सातपुते, नामदेव मुरकुटे आणि राजेश आहेर हे प्रमुख कलाकार असून यात ११ लहान मुलांनी देखील या चित्रपटात उत्तम अभिनय केला आहे.

गायिका सावनी रविंद्र यांनी या चित्रपटातील मिरची सिंगापूरची हे गाण गायल आहे. त्या चित्रपटाविषयी आणि गाण्याच्या रेकॉर्डिंगविषयी म्हणाल्या, “खरंतर मी दिग्दर्शक राहुल चौधरी यांचे आभार मानते की त्यांनी मला या चित्रपटातील गाणं गायची संधी दिली. मी आजवर शास्त्रीय संगीत आणि रोमँटिक गाणी गायली आहेत. पहिल्यांदाच मी मिरची सिंगापूरची हे आयटम गाणं गायलं आहे. विशेष म्हणजे हे गाणं मी ७ वर्षापूर्वी गायलं होतं परंतु कोरोनामुळे हा चित्रपट प्रदर्शीत झाला नाही. आता ७ वर्षानंतर हा चित्रपट येत आहे म्हणून मीच राहुल सरांना सांगून हे गाणं नुकतंच पुन्हा फ्रेश रेकॉर्ड केल आहे. तुम्ही हे गाणं प्राची म्युझिक या युट्यूब चॅनेलवर नक्की बघा. आणि येत्या २० जूनला इबलिस हा चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा.”

दिग्दर्शक राहुल मनोहर चौधरी ‘इबलिस’ चित्रपटाविषयी सांगतात, “’इबलिस’ हा उर्दू शब्द आहे. अतिबुद्धिमान आणि सगळ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या लहान मुलांना गावाकडे इबलिस म्हणून संबोधले जाते. या चित्रपटात अशीच ११ लहान मुल आहेत त्यामुळे या चित्रपटाचं नाव इबलिस ठेवलं आहे. २०१७ – २०१८ मध्ये माझ्या बंदुक्या या चित्रपटाला जे यश मिळाल, अनेक पुरस्कार मिळाले, भरभरून प्रेम मिळाल. त्यामुळे सामाजिक विषयांना धरून मनोरंजक चित्रपट करावा अस मी ठरवलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार लहान मुलांमध्ये कसे रुजवू शकतो हा विचार मी करत होतो. मग मी ६ महिने रिसर्च करून अनेक वर्कशॉक घेवून तसेच या चित्रपटाचे लेखक नामदेव मुरकुटे यांच्याशी चर्चा करून हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. नुकतच रिलीज़ झालेल्या इबलिस चित्रपटाच्या ट्रेलरला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तसेच हा चित्रपट येत्या २० जूनला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे माझी प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी हा चित्रपट आपल्या मुलांसोबत आणि कुटुंबासमवेत जरूर पहावा.”

Link – https://www.youtube.com/watch?v=phg7G2T7rzw

माधव वझे यांच्या आठवणींचा स्मृतीगंध

आठवणींच्या पाऊलखुणा माणूस आयुष्यभर शिदोरी जपून ठेवावी तशा हृदयात जपून ठेवतो. १९५३ साली आलेला आचार्य अत्रे लिखित-दिग्दर्शित ‘श्यामची आई’ चित्रपट आणि त्या चित्रपटातील ‘श्याम’ आजही आपल्या स्मरणरंजनात आहे. या चित्रपटात श्यामची भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांचे नुकतेच निधन झाले. २७  जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्सच्या ‘ऑल इज वेल’ या मराठी चित्रपटात माधव वझे यांची खास भूमिका आहे. हा त्यांचा शेवटचा  चित्रपट ठरला आहे. माधव वझे यांच्या पश्चात प्रदर्शित होणारा ‘ऑल इज वेल’ हा  चित्रपट त्यांना श्रद्धांजली असणार आहे. 

माधव वझे यांच्यासारख्या अनुभवी, कलासंपन्न कलाकारासोबत काम करण्याची संधी मिळणे हा आम्हा सर्वांसाठी एक समृद्ध करणारा अनुभव होता. त्यांच्यासोबत चित्रीकरणादरम्यान व्यतीत केलेले क्षण आणि त्यांच्याकडून मिळालेले  मोलाचे मार्गदर्शन  कधीही विसरता न येण्याजोगे आहे असं  सांगताना, ‘ऑल इज वेल’ चित्रपटाची टीम त्यांच्या आठवणीत भावुक झाली. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असताना, त्यांच्या स्मृतींना उजाळा देत एक खास फोटो चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियावर शेअर केला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टिझर मध्येही ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांची झलक पहायला मिळतेय.

‘ऑल इज वेल’ चित्रपटात प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे, रोहित हळदीकर, सयाजी शिंदे, अभिजीत चव्हाण, नक्षत्रा मेढेकर, सायली फाटक, अजय जाधव, अमायरा गोस्वामी, दिशा काटकर आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश जाधव तर लेखन प्रियदर्शन जाधव यांचे आहे. निर्माते अमोद मुचंडीकर, वाणी हालप्पनवर आहेत. सहनिर्माते मल्लेश सोमनाथ मरुचे, विनायक पट्टणशेट्टी आहेत. चित्रपटाचे कार्यकारी निर्माते संजय ठुबे आहेत.संगीत चिनार-महेश, अर्जुन जन्या यांचे आहे. छायांकन मयुरेश जोशी तर संकलन अथश्री ठुबे यांचे आहे.नृत्यदिग्दर्शक राजेश बिडवे तर गीतकार मंदार चोळकर आहेत.