Home Blog Page 502

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे २४२ प्रवासी असलेले विमान कोसळले

१२ जून २०२५ चा दिवस गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला. या अपघाताची भीषणता इतकी प्रचंड होती. त्याची झळ दूरदूरपर्यंत पोहोचली. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टेक ऑफ करताना एअर इंडियाचं प्रवासी विमान AI171 मेघानी नगर परिसरात कोसळलं.

प्रवासी आणि क्रू मेंबर्स अशा २४२ जणांना घेऊन लंडनच्या दिशेने झेपावलेल्या एअर इंडियाचेविमानाचा भीषण अपघात झाला. गुरुवारी (१२ जून) दुपारी ही घटना घडली.
अहमदाबाद विमानतळावरून या विमानाने उड्डाण केले. विमान हवेत झेपावल्यानंतर काही मिनिटातच कोसळले आणि मोठा स्फोट झाला. या घटनेत लोकांचा तडफडून मृत्यू झाला. या अपघाताचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.

एअर इंडियाचे AI171 हे विमान दिल्लीवरून आले होते आणि अहमदाबादवरून लंडन जात होते. प्राथमिक माहितीनुसार, विमानात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेबर्स, असे एकूण २४२ लोक होते.

विमानाने गुरुवारी (१२ जून) दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी उड्डाण केले. पण,त्यानंतर काही मिनिटांतच अहमदाबाद शहरातील मेघानीनगर भागात ते कोसळले. हे विमान कोसळले वैद्यकीय रुग्णालयाच्या वसतिगृहांच्या इमारतींवर!
ज्या भागात एअर इंडियाचे विमान कोसळले, ते मेघानीनगर विमानतळापासून १५ किमी दूर आहे. विमान कोसळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

एअर इंडिया विमानाच्या अपघाताचा व्हिडीओ

एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरून हवेत झेपावते. त्यानंतर विशिष्ट उंचीपर्यंत वर जाते. पण, त्यानंतर विमान हळूहळू खाली येत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर अधूंक दिसायला लागते. त्यावेळी ते जमिनीवर कोसळते आणि मोठा स्फोट होतो.अपघातग्रस्त झालेले विमान दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अहमदाबादमध्ये आले होते. काही वेळानंतर ते लंडनकडे निघाले होते.

मृतांच्या कुटुंबीयांना एक कोटींची मदत

या विमान अपघातात विमानातील २४० जण मरण पावले आहेत. यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश आहे.

या घटनेबद्दल टाटा समूहाने दुःख व्यक्त केले आहे. हे दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत, अशा शब्दात टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे.

टाटा समूहाने मृतांच्या वारसांना प्रत्येकी एक कोटी रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर जे जखमी झाले आहेत, त्यांच्या उपचाराचा खर्च टाटा समूह करणार आहे. विमान अपघातात वसतिगृहाचे मोठे नुकसान झाले आहे, त्याच्या उभारणीचा खर्चही टाटा समूह करणार आहे, असे चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे.

विमानाची वैशिष्ट्ये:

बोइंग ७८७-८ ड्रीमलाइनर हे अमेरिकन कंपनी बोइंगचे अत्याधुनिक, लांब पल्ल्याचे मध्यम आकाराचे वाइड-बॉडी विमान आहे. हे ड्रीमलाइनर मालिकेतील सर्वात लहान मॉडेल असून, इंधन-कार्यक्षमता आणि प्रवासी सुविधांसाठी प्रसिद्ध आहे. एअर इंडियाने या विमानाचा वापर युरोप, मध्य पूर्व आणि पूर्व आशियातील आंतरराष्ट्रीय मार्गांवर केला.

विमानाचे वय:

व्हीटी-एएनबी हे बोइंग ७८७-८ ड्रीमलाइनर २०१२ मध्ये तयार झाले आणि सप्टेंबर २०१२ मध्ये एअर इंडियाच्या ताफ्यात सामील झाले. यामुळे हे विमान सुमारे १३ वर्षे जुन्या होते.

प्रवासी क्षमता:

या विमानाची सामान्य कॉन्फिगरेशन २५६ प्रवाशांना सामावून घेते. यात १८ बिझनेस क्लास सीट्स (पूर्णपणे फ्लॅट-बेड) आणि २३८ इकॉनॉमी क्लास सीट्स (अतिरिक्त लेगरूमसह) आहेत. या उड्डाणात २३० प्रवासी होते, जे विमानाच्या क्षमतेनुसार होते.

विमानाची वैशिष्ट्ये:

कार्बन कंपोझिट मटेरियलपासून बनलेले हे विमान हलके आणि २०% अधिक इंधन-कार्यक्षम आहे. यात मोठ्या खिडक्या, डिम होणारी इलेक्ट्रोक्रोमिक खिडक्या, सुधारित केबिन प्रेशर आणि कमी आवाजाची पातळी आहे. याची उड्डाण रेंज १३,६२० किमी आहे, ज्यामुळे अहमदाबाद-लंडनसारख्या लांब मार्गांसाठी ते योग्य आहे.

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून ना. पाटील यांचे अभिष्टचिंतन

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या कामाचा आदर्श सर्वांनी घ्यावा!- केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पुणे :राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव झाला. ना. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, शुभारंभ लॉन्स येथे आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर, अबाल-ज्येष्ठांपासून अनेकांनी ना. पाटील यांना प्रत्यक्ष भेटून, दुरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.

वाढदिवस साधेपणाने साजरा करतानाच विविध समाजोपयोगी उपक्रम, कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून विविध ठिकाणी आरोग्य आणि रक्तदान शिबीर, वृक्षारोपण अशा अनेकविध मोहिमांचे आयोजन करण्यात आले. त्यासोबतच वाढदिवसानिमित्त हार-तुरे नको सामाजिक उपक्रमांसाठी निधी संकलनात सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देत विविध समाजोपयोगी उपक्रमांसाठी निधी संकलनात हातभार लावला.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आ. शंकरभाऊ जगताप, हेमंत रासने, भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, सरचिटणीस राजेश पांडे, नेत्या रेश्मा सय्यद, शिवसेना नेते नाना भानगिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे, सुभाष जगताप, बाबुराव चांदेरे, रुपालीताई ठोंबरे पाटील, समीर चांदेरे, अंकुश काकडे, बाळासाहेब दाभेकर, दत्ताभाऊ सागरे, दीपक मानकर, ॲड. मंदार जोशी, पराग ठाकूर, खरवडे देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, पुणे शहर पोलीस मित्र संघटना, बघतोय रिक्षावाला संघटना, पतितपावन संघटना, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी चंद्रकांतदादा पाटील यांना शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले.

यावेळी शुभेच्छा देताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करताना दादांचा संवेदनशील माणूस म्हणून सहा वर्षे जवळून अनुभवतोय. समाजातील अत्यंत दुर्लक्षित घटकाला न्याय देताना; समाजातील उपेक्षिताचे दु:ख हे आपलं दुःख मानून ते सदैव काम करत असतात. त्यामुळे त्यांच्या कामाचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे. यातून समाजातील दु:खच संपेल, असं माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटतं, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी पुणेकरांतर्फे डिजिटल लायब्ररी 

जनहित चॅरिटेबल ट्रस्टचा पुढाकार ; ई लर्निंग सेट सह विविध पुस्तकांची भेट
पुणे : गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त आणि अतिदुर्गम भागात कायमचा शिक्षकांची उणीव भासते.  त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. हीच उणीव दूर करीत पुणेकरांतर्फे गडचिरोलीतील विद्यार्थ्यांसाठी डिजिटल लायब्ररी देण्यात आली. यामध्ये दोन शाळांना शैक्षणिक ऍप अपलोड केलेले ई लर्निंग सेट आणि लायब्ररीसाठी विविध पुस्तकांची भेट देण्यात आली.

जनहित चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्सव समिती, पुणे च्या पुढाकाराने सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधन मंडळ येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, ट्रस्टचे प्रकाश ढमढेरे, शिरीष मोहिते, उदय जगताप, पियुष विजय शहा, निलेश खाणेकर, अनिल ढमढेरे, वसंत खुटवड, हेमंत तिरळे, रोहन जाधव, शंतनू मुक्कावार, ओंकार ठाकूर आदी उपस्थित होते.

संस्थेतर्फे पाच गो शाळांना सकस आहार देखील प्रदान करण्यात आला. यावेळी मिलिंद एकबोटे, फार्मडीलचे संदीप शहा, कवाड परिवार, गणेश सातपुते यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. लायन्स क्लब ऑफ सारसबाग यांनी उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संयोजक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश ढमढेरे व उत्सव समितीचे अध्यक्ष पियुष विजय शहा यांनी संयोजन केले. 

डॉ. पराग काळकर म्हणाले, अजूनही भारतात असे अनेक भाग आहेत, जिथे आपण शिक्षणाच्या माध्यमातून पोहोचलेलो नाही. मात्र, अशा ठिकाणी पुस्तके वाचून चांगले विचार पोहोचतील. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात २०२५ पर्यंत ५० टक्क्यांपर्यंत आपण पोहोचणार आहोत. अजूनही अनेकांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणायचे आहे, राष्ट्रभक्ती निर्माण करणारी भावना देखील यामाध्यमातून रुजवायची आहे.

पांडुरंग बलकवडे म्हणाले, पुढील थोड्याच दिवसात नक्षलवादाचे उच्चाटन होईल, असा विश्वास आहे. मात्र, त्यावेळीच आपल्या आदिवासी बांधवांना राष्ट्राच्या प्रवाहात आणण्याचे कार्य करावे लागणार आहे. राष्ट्र पुरुषांकडून प्रेरणा घेण्याकरिता जयंती सारखे उत्सव साजरे करायला हवे.

उदय जगताप म्हणाले, नवी पिढी पुस्तक वाचनाकडे वळत नाहीत, हे आपण पाहतो. गडचिरोलीमध्ये पुस्तक संस्कृती रुजविणे, ही काळाची गरज आहे. अनेक चांगले प्रयोग त्या भागात केले आहेत. यामुळे तेथील परिस्थिती चांगल्या पद्धतीने बदलली आहे, हे पुण्यातील गणेशोत्सव मंडळांचे व पुणेकरांचे यश आहे, असेही त्यांनी सांगितले.

वारकरी संप्रदायाच्या गुणात्मक वृद्धीसाठी अभ्यासक्रमाची गरज


वारकरी संप्रदाय तत्वज्ञानावर आधारित वर्धिष्णु संप्रदाय

ह. भ. प. योगीराज महाराज गोसावी : भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सतर्फे भारती कीर्तन महोत्सव

पुणे :  वारकरी संप्रदाय हा केवळ भक्तीप्रधान नसून, तो तत्त्वज्ञानावर आधारित एक ‘वर्धिष्णु’  संप्रदाय आहे. या संप्रदायाचा विस्तार होत असताना केवळ संख्यात्मक वाढ झाली आहे, परंतु गुणवत्तात्मक वृद्धीची कमतरता जाणवते. भारती विद्यापीठाच्या कीर्तनाच्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून याचा सखोल अभ्यास होणार आहे. आजकाल अनेक ठिकाणी जे कीर्तन सादर केले जाते, त्याला खरेच कीर्तन म्हणावे का, असा प्रश्न निर्माण होतो. कारण कीर्तन हे उदरनिर्वाहाचे साधन नसून तो भक्तीचा मार्ग आहे. याच विचाराने विद्यार्थ्यांनी कीर्तनाचे शिक्षण घ्यावे, असे मत ह. भ. प. योगीराज महाराज गोसावी यांनी व्यक्त केले.

भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सतर्फे भारती कीर्तन महोत्सवाचे आयोजन टिळक स्मारक मंदिर येथे करण्यात आले होते. संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७०४ वा प्रकट दिन, संत तुकाराम महाराज यांचा ३५४ वा बीज सोहळ्यानिमित्त आयोजित कीर्तन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी योगीराज महाराज बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ह. भ. प. योगीराज महाराज गोसावी, प्रमुख पाहुणे म्हणून ह. भ. प. डाॅ. सदानंद महाराज मोरे यांच्यासह ह.भ.प. डाॅ. भावार्थ महाराज देखणे, ह.भ.प. उल्हास महाराज सूर्यवंशी, ह.भ.प. सचिन महाराज पवार, ह.भ.प. भागवत महाराज साळुंखे, भारती विद्यापीठ सहकार्यवाह डॉ. के. डी. जाधव, डाॅ. म.शि. सगरे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक शारंगधर साठे उपस्थित होते. महोत्सवात ह.भ.प.गणेश महाराज भगत आणि ह.भ.प.प्रमोद महाराज जगताप यांचे वारकरी कीर्तन झाले.

ह. भ. प. योगीराज महाराज गोसावी म्हणाले,  मागील सात-आठ वर्षांपासून भारती विद्यापीठाने वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम केले आहे. कीर्तनाकडे धर्म, भक्तीचे, प्रबोधनाचे माध्यम म्हणून पाहिले गेले आहे. संत साहित्य हे कालातीत आहे. ते सर्व काळासाठी मार्गदर्शक ठरते. ती केवळ कला नाही तर वारकऱ्यांच्या भक्तीचे मोठे माध्यम आहे. नवविधा भक्तीत कीर्तनाला दुसरे स्थान प्राप्त असून त्याद्वारे श्रद्धा, समर्पण आणि आत्मिक उन्नतीचा मार्ग सुचवला जातो.

डाॅ. सदानंद मोरे म्हणाले,  महाराष्ट्रात अनादी काळापासून कीर्तन परंपरा आहे. कीर्तन परंपरेमुळे संतपरंपरा देखील टिकून राहिली आहे. मराठी प्रमाण भाषा कीर्तनात टिकवली जाते. शब्दांचे अर्थ सांगितले जातात. कीर्तन हे वैचारिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध करणारे असते. या कीर्तन परंपरेला आधुनिक चौकट देऊन विद्यापीठीय चौकटीत कीर्तनाचे शिक्षण द्यायची सुरूवात भारती विद्यापीठाने केली आहे. त्यामुळे विद्यापीठाचे कौतुक करावे लागेल. 

मिलिंद जोशी म्हणाले, कीर्तनाने समाजाचे वैचारिक भरण पोषण केले आहे.  कीर्तनकारांनी समाजाला ज्ञान देण्याचे कार्य केले. लाखो लोक कीर्तनातून प्रेरणा घेतात. कीर्तन ही एक कला आहे, पण त्याचे करिअर देखील होऊ शकते.  कीर्तन शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकवले पाहिजे यासाठी भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स ने कीर्तन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केले आहेत. 

 शारंगधर साठे म्हणाले,  भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स ही नवी शैक्षणिक धोरणानुसार ‘कीर्तन’ विषयातील पदवी अभ्यासक्रम सुरू करणारी पहिली संस्था ठरली आहे. आता कीर्तन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पीएच.डी. करण्याची संधीही उपलब्ध झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी कीर्तनाचे प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम सुद्धा सुरू केले आहेत.

ह. भ. प.  उल्हास महाराज सूर्यवंशी, ह. भ. प.  सचिन महाराज पवार, ह. भ. प. भागवत महाराज साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले.

श्री हरिहरेश्वर, मारळ, श्रीवर्धनच्या पर्यटन विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

श्री हरिहरेश्वर, मारळ, श्रीवर्धनचे प्रस्ताव केंद्र सरकारच्या ‘प्रसाद’ योजनेसाठी तातडीने पाठवावेत;
पर्यटन विकास आराखड्यांसाठी आवश्यक सर्व मंजुरीचे टप्पे पूर्ण करून तातडीने कार्यवाही सुरू करा

  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई, दि. 11:- रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर, मारळ, श्रीवर्धन या महत्वाच्या पर्यटन क्षेत्रांच्या विकासासाठीचे प्रस्ताव केंद्र सरकारच्या ‘प्रसाद’ (तिर्थयात्रा कायाकल्प आणि अध्यात्मिक संवर्धन अभियान) योजनेत समाविष्ट करण्यासाठी तातडीने केंद्र सरकारकडे पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. तसेच या प्रस्तावाच्या मंजूरीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करतानाच पर्यटन विकास आराखड्यांसाठी आवश्यक असलेले सर्व मंजुरीचे टप्पे पूर्ण करून तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर, मारळ, श्रीवर्धन येथील पर्यटन विकास आरखड्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी पर्यटनमंत्री शंभूराज देसाई, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार सुनील तटकरे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव राजेश देशमुख, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी, रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे, रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

रायगड जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी दक्षिण काशी म्हणून ओळख असणाऱ्या श्रीक्षेत्र हरिहरेश्वर, दिवेआगर, मारळ व श्रीवर्धन येथील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी पर्यटन विकासाचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. या बैठकीत श्री हरिहरेश्वर मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गाचा विकास व सौंदर्यीकरण, तसेच मारळ येथे प्रस्तावित स्टार गेजिंग (आकाश निरीक्षण केंद्र) या दोन्ही प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. हरेश्वर प्रकल्पासाठी अंदाजे 22 कोटी 66 लाखांचा खर्च अपेक्षीत आहे. तसेच मारळ येथील प्रस्तावित स्टार गेजिंग सुविधा ही रायगड जिल्ह्यातील पहिली प्रगत खगोल निरीक्षण केंद्र असणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 25 कोटी 6 लाख रुपये इतका अपेक्षीत आहे. याअंतर्गत पर्यटकांना पारदर्शक गेस्ट डोम्स, कॅम्पिंग, साहसी खेळ, व्याख्यान केंद्र, आणि वनसंपदेसह पर्यटनाचा एकत्रित अनुभव घेता येणार आहे.

पर्यटन विकासाच्या या आराखड्यामुळे रायगड जिल्ह्यातील अध्यात्मिक, निसर्ग, खगोल पर्यटनाला नवे बळ मिळेल. तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

डॉ. श्याम मुडे फर्ग्युसनचे प्राचार्य

पुणे-डॉ. श्याम मुडे यांची डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे (स्वायत्त) अठरावे प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मुडे यांनी भूगर्भशास्त्र या विषयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून पी. एचडी. पदवी संपादन केली आहे. शिक्षण, संशोधन आणि अध्यापनाच्या माध्यमातून भूगर्भशास्त्र या विषयात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे पन्नासहून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. सन 2022 पासून ते फर्ग्युसनच्या भूगर्भशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांना आयएनएसए सायंटिस्ट आणि शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सहयोगी संशोधनासाठी त्यांनी तैवान मधील राष्ट्रीय चुंग चेंग विद्यापीठातील पृथ्वी आणि पर्यावरण विज्ञान विभागाला भेट देऊन या संस्थेबरोबर सामंजस्य करार केला आहे.

जागतिक शिक्षण आणि उद्योगांच्या मागणीनुसार कौशल्याधारित अभ्यासक्रम, भारतीय ज्ञान प्रणालीचे सक्षमीकरण आणि जगभरातील विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक आणि उच्च गुणवत्तेचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात मिळावे या उद्देशाने कार्यरत राहणार असल्याचे डॉ. मुडे यांनी सांगितले.

शास्त्रीय संगीत-नृत्य, गायनाने सजला ‘गंगाधर स्वरोत्सव युव-रंग’युवा कलाकारांचे बहारदार सादरीकरण

स्वरनिनाद आयोजित मैफलीला रसिकांचा उदंड प्रतिसाद
पुणे: मनमोहक कथक नृत्य, वैविध्यपूर्ण व मधुर गायकी, राग व बंदिशींचे भाव अन ठुमरीने झालेली सांगता अशा शास्त्रीय संगीत, नृत्य व गायनाने सजलेल्या ‘गंगाधर स्वरोत्सव युव-रंग’मध्ये युवा कलाकारांच्या बहारदार सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. स्वरनिनाद पुणे संस्थेच्या वतीने दोन दिवसीय शास्त्रीय संगीत महोत्सवाचे नुकतेच आयोजन केले होते. युवा पिढीतील प्रतिभावान कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणारा हा महोत्सव आहे. या महोत्सवाला राहुल देशपांडे, अमोल निसळ, तेजस उपाध्ये, राजस उपाध्ये, रईस खान, अंजली दाते, गायत्री जोशी, धनंजय गोखले आणि मेहेर परळीकर यांसारख्या अनेक नामवंत कलाकारांनी उपस्थित राहून युवा कलाकारांना प्रोत्साहन केले. वृषाली निसळ यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

पहिल्या दिवशी पंडिता शमा भाटे यांच्या शिष्या ईशा नानलच्या कथक नृत्याने महोत्सवाची सुरुवात झाली. ईशाने ‘वंदना’, ‘चौताल’ (तोडे, तुकडे, तत्कार) आणि ‘अभिनय पक्षात’ ‘एक और एकलव्य’ या कलाकृती सादर करत उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या नृत्यातून कथक परंपरेची शुद्धता आणि अभिनयाची खोली दिसून आली. पंडित अजय चक्रवर्ती यांचे शिष्य अनुभव खमारूने यमन रागामध्ये विलंबित एकतालात ‘सुमरन तोरा’ ही बंदिश, ‘झपताल’मध्ये ‘चंद्रमा ललाट पर’ आणि ‘द्रुत एकताल’मध्ये ‘गुन नाही एको’ सादर केले. ‘द्रुत तीन ताला’मध्ये तराणा आणि ‘पिलू रागा’मध्ये ‘पिया के बोल ना बोल’ ही ठुमरी सादर केली. तबल्यावर यशद गायकी, हार्मोनियमवर अभिनय रवंदे यांनी साथ दिली. एस. आकाश यांच्या प्रभावी गायनाने पहिल्या दिवसाची सांगता झाली. रागेश्रीमध्ये आलाप, ‘झपतालात’ गत आणि ‘तीन ताला’मधील द्रुत गत सादर केली. त्यांना तबल्यावर आशय कुलकर्णी यांनी साथ दिली.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात अथर्व वैरागकर यांच्या मधुर गायनाने झाली. गुरु ओंकार वैरागकर आणि गायत्री जोशी यांचे शिष्य असलेल्या अथर्वने ‘राग मधुवंती’मध्ये ‘विलंबित एकताल’मध्ये ‘कोयलिया बोले डाल’ आणि ‘द्रुत बंदिश’ ‘काहे छेडत बलिहारी’ सादर केली. तसेच त्यांनी ‘पहाडी रागा’मध्ये ठुमरी सादर करत आपल्या गायन कौशल्याची झलक दाखवली. त्यांना कार्तिकस्वामी आणि माधव लिमये यांनी साथ दिली. तेजस उपाध्ये यांचे शिष्य अमन वरखेडकरने ‘रागेश्री’मध्ये आलाप, जोड आणि झाला सादर केले. तसेच त्यांनी ‘रूपक ताल’ आणि ‘तीन ताला’मध्ये गत सादर करत रसिकांची दाद मिळवली. त्यांना कार्तिक स्वामी यांनी तबल्यावर साथ दिली.

‘स्वरनिनाद’च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सामूहिक गायनाने दुसऱ्या दिवसात रंगत आणली. त्यांनी ‘खमाज थाटा’तील सरगम गीत सादर केले. ज्यात तिलककामोद ,देस, जयजयवंती, झिंझोटी, कलावती या रागांच्या छटा होत्या. त्यानंतर ‘कल्याण रागा’त तिल्लाना सादर करत त्यांनी उपस्थितांना आनंदित केले. तबल्यावर यशद गायकी, हार्मोनियमवर निषाद जोशी आणि व्हायोलिनवर आशिष बेहरे यांनी साथ दिली. महोत्सवाची सांगता शरयू दातेच्या प्रभावी शास्त्रीय गायनाने झाली. अश्विनी भिडे यांच्या शिष्या असलेल्या शरयूने ‘राग नंद’मध्ये ‘विलंबित एकताल’मध्ये ‘ढूंडु बन सैंया’ ही बंदिश आणि ‘द्रुत तीन ताला’तील ‘मोहे करून दे बिया’ ही बंदिश सादर केली. तसेच त्यांनी साडेसात मात्राच्या तालामध्ये ‘राग प्रतीक्षा’ सादर करत मैफिलीला उंचीवर नेले. त्यांना आशय कुलकर्णी आणि माधव लिमये यांनी साथ दिली.

प्रभाग रचना लोकहिताची नव्हे तर राजकारण्यांच्या हिताची ..राज्य सरकारने पुण्यात एक वार्ड एक नगसेवक पद्धती राबवावी ..अन्यथा कोर्टात जाऊ

ज्याला त्याला आपापल्या कर्तुत्वावर निवडून येऊ द्यात

प्रभाग पद्धतीने मतदार संभ्रमात .. आणि मतदारांचा निवडणुकी नंतर फुटबॉल

मुंबई प्रमाणेच अन्य महापालिकांच्या निवडणुका व्हाव्यात

पुणे-प्रभाग रचना लोकहिताची नव्हे तर राजकारण्यांच्या हिताची आहे राज्य सरकारने पुण्यात एक वार्ड एक नगसेवक पद्धती राबवली पाहिजे जी लोकहिताची आहे जर जास्त प्रभाग पद्धती पुण्यात राबविली तर ती भाजपा आणि सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर पडणार आहे असा जनमताचा सूर असताना आता याच पार्श्वभूमीवर पुण्यातही मुंबई प्रमाणेच एक सदस्यीय प्रभाग रचना व्हावी. जर चार सदस्यीय प्रभाग रचना आमच्यावर लादली तर आम्ही या निर्णयाच्या विरोधात कोर्टात जाऊ, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाने दिला आहे. तसेच पुण्यातील कॉंग्रेस पक्षाने देखील या चार सदस्यीय प्रभाग रचनेला विरोध केला आहे.

पुण्यातील चार सदस्यीय प्रभाग रचना लादली गेली तर या निर्णयाच्या विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी यांनी दिला आहे. तसेच चार सदस्यीय प्रभाग हे महानगरपालिकेमध्ये योग्य नाही. त्याच्या बदल्यात एक सदस्यीय प्रभाग केला पाहिजे. असे केल्यास नगरसेवकाला नीट काम करता येते. भारतीय जनता पक्षाला फक्त सत्ता भोगायची आहे. नागरिकांच्या समस्यांवर त्यांना काम करायचे नाही. आमचा या निर्णयाला विरोध आहे. भारतीय जनता पार्टी मात्र नेहमीप्रमाणे यावेळीही रडीचा डाव खेळणार, अशी टीका काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केली आहे.

दरम्यान, राज्यात मुंबई वगळता इतर ठिकाणी बहूसदस्यीय प्रभाग आहेत. राज्यातील महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात पुणे, नागपूर ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, वसई विरार, छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण डोंबिवलीसारख्या महापालिकांचा समावेश आहे.

पुण्यात 162 नगरसेवक असणार आहेत, त्यानुसार प्रभाग रचना केली जाणार आहेत. तर मुंबई महापालिकेत जुनेच 227 प्रभाग कायम असून त्या ठिकाणी एक सदस्यीय प्रभाग असणार आहे. तसेच राज्यातील इतर महापालिकांमध्ये तीन ते चार सदस्यीय प्रभाग असणार आहेत. पुण्यामध्येही बहुसदस्यीय प्रभाग असणार आहेत.

ड वर्गातील महापालिकेत प्रभाग रचना ठरवताना सर्वच प्रभाग चार सदस्यांचे करायचे आहेत. परंतु जर सर्वच प्रभाग चार सदस्यांचे होत नसल्यास एक प्रभाग तीन किंवा पाच सदस्यांचा होईल. ड वर्ग महापालिकांमध्ये अमरावती, अहिल्यानगर, अकोला, कोल्हापूर, सोलापूर, सांगली-मिरज-कुपवाड, मिरा भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, जळगाव, नांदेड, धुळे, मालेगाव, लातूर, चंद्रपूर, परभणी, पनवेल, इचलकरंजी आणि जालना या महापालिकेचा समावेश आहे.

अ वर्ग महापालिकांमध्ये पुणे आणि नागपूर महापालिकांचा समावेश होतो. ब वर्ग महापालिकेत ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड या महापालिका येतात तर क वर्ग महापालिकेत नवी मुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण डोंबिवली यांचा समावेश होतो.

धम्मप्रचारक निलेश गायकवाड यांचा संत कबीर पुरस्काराने गौरव

कबीरवाणीकार रतनलाल सोनग्रा यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

पुणे : महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातर्फे संत कबीर यांच्या जयंतीनिमित्त धम्मप्रचारक निलेश गायकवाड यांचा आज (दि. 11) संत कबीर पुरस्काराने गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण कबीरवाणीकार आचार्य रतनलाल सोनग्रा यांच्या हस्ते झाले.संत कबीर यांच्या जयंतीचे औचित्य साधून वाडिया कॉलेज जवळील महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संयोजक विठ्ठल गायकवाड, माजी नगरसेविका लता राजगुरू, भगवान धेंडे, फिरोज मुल्ला, बाबा ओव्हाळ, सचिन गायकवाड उपस्थित होते.निलेश गायकवाड यांचा परिचय आणि पुरस्काराविषयी विठ्ठल गायकवाड यांनी माहिती दिली.या वेळी बोलताना आचार्य सोनग्रा म्हणाले, संत कबीर यांनी देशात मानवी समतेचा उद्घोष सुरू केला. समाजातील दुष्ट चालीरिती, प्रथा या विषयी जनजागृती करत विद्रोहाचा प्रारंभ करून विवेकवादाची मशाल प्रज्वलीत केली. संत कबीर यांच्या विचारांची आज देशाला आवश्यकता आहे.मान्यवरांचे स्वागत लता राजगुरू यांनी केले तर सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी केले.

‘कला आणि करिअर‌’ विषयावर ‌‘नेक्स्ट जेन करिअर फेस्ट‌’चे आयोजन

सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज कलाकारांना ऐकण्याची संधी-नव्या शैक्षणिक धोरणाला अनुसरून सांस्कृतिक क्षेत्राशी निगडित महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम-ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचा विशेष सन्मान

पुणे : नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना आवडत्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. दहावी-बारावीनंतर पुढे काय? असा प्रश्न भेडसावणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी ‌‘नेक्स्ट जेन करिअर फेस्ट‌’ या उपक्रमाअंतर्गत ‌‘कला आणि करिअर‌’ या विषयावर दि. 13 ते दि. 15 जून या कालावधीत प्रदर्शनी आणि मार्गदर्शन सत्रांचे विनामूल्य आयोजन करण्यात आले आहे.
सांस्कृतिक क्षेत्राशी निगडित आयोजित करण्यात आलेला महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम असून आवडीच्या क्षेत्रातील संधी जाणून घेण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज कलाकारांना ऐकण्याची संधी या निमित्ताने पालक आणि विद्यार्थ्यांना मिळणार आहे, अशी माहिती संवाद, पुणेचे सुनील महाजन, हाऊस ऑफ सक्सेसचे प्रसाद मिरासदार, भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍चे संचालक शारंगधर साठे, पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप तुपे, पुणे विद्यार्थी गृहाचे संचालक सुनील रेडेकर यांनी आज (दि. 11) पत्रकार परिषदेत दिली. तीन दिवसीय ‌‘नेक्स्ट जेन करिअर फेस्ट‌’ बालगंधर्व कलादालनात आयोजित करण्यात आला आहे. ‌‘नेक्स्ट जेन करिअर फेस्ट‌’चे यंदाचे दुसरे वर्ष आहे.
‌‘नेक्स्ट जेन करिअर फेस्ट‌’चे उद्घाटन शुक्रवार, दि. 13 रोजी सकाळी 11 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते होणार आहे. तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर, नृत्यगुरू सुचेता चाफेकर, भारती विद्यापीठाचे कुलसचिव श्री. जे. जयकुमार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
दुपारी 2 वाजता भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍तर्फे आयोजित मार्गदर्शन सत्रात ‌‘नृत्य कला आणि करियर‌’ नृत्यगुरू शमा भाटे, विदुषी स्मिता महाजन मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी 4 वाजता पुणे मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे ‌‘कला, उद्योजकता आणि आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन‌’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आंतरविद्याशाखेचे डीन डॉ. संजय तांबट, सृजन आर्ट गॅलरीचे संचालक, सुप्रसिद्ध चित्रकार चारुहास पंडित, पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटील यांचा सहभाग असणार आहे. सायंकाळी 6 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत असलेल्या रिसर्च पार्क फाऊंडेशनतर्फे ‌‘नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि करियरच्या संधी‌’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात रिसर्च पार्क फाऊंडेशनचे सीईओ डॉ. अरविंद शाळीग्राम, सीओइपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील भिरूड, भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍चे संचालक शारंगधर साठे यांचा सहभाग असणार आहे.
शनिवार, दि. 14 रोजी सकाळी 11 वाजता पुणे विद्यार्थी गृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजीतर्फे ‌‘कला करियर आणि एआय टूल्स‌’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात पुणे विद्यार्थी गृहाचे संचालक सुनील रेडेकर, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तज्ज्ञ, लेखक अमेय पांगारकर, पुणे विद्यार्थी गृह इंजिनिअरिंग महाविद्यालयातील एआय व डाटा सायन्स प्रमुख डॉ. मीनाक्षी अत्रे यांचा सहभाग असणार आहे. दुपारी 2 वाजता भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍ आयोजित ‌‘कीर्तन : भारतीय पारंपरिक कला व व्यवसाय‌’ या विषयावर ह. भ. प. गणेश भगत महाराज, ह. भ. प. सचिन पवार महाराज बोलणार आहेत. दुपारी 4 वाजता भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍ आयोजित ‌‘भारतीय संगीतकलेच्या क्षेत्रात करियर करताना‌’ या विषयावर सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक डॉ. विकास कशाळकर, सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार, प्रसिद्ध बासरीवादक पंडित राजेंद्र कुलकर्णी बोलणार आहेत. सायंकाळी 6 वाजता भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍ आयोजित ‌‘नाटक व रंगभूमी क्षेत्रात करियर करण्यातलं नाट्य‌’ या विषयावर सुप्रसिद्ध लेखक, नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक अभिराम भडकमकर, सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक व अभिनेते अमित वझे, सुप्रसिद्ध अभिनेते गजानन परांजपे, सुप्रसिद्ध अभिनेते पटकथाकार, दिग्दर्शक किरण यज्ञोपवित यांचा सहभाग असणार आहे.
रविवार, दि. 15 जून रोजी सकाळी 11 वाजता भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍ आयोजित ‌‘फिल्म इंडस्ट्री, ग्लॅमर, करियर आणि बरंच काही‌’ या विषयावर चित्रपट प्रशिक्षक समर नखाते यांची मुलाखत आयोजित करण्यात आली असून त्यांच्याशी लेखक, चित्रपट दिग्दर्शक प्रसाद नामजोशी संवाद साधणार आहेत. दुपारी 1 वाजता भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फोटोग्राफी ॲण्ड सिनेमॅटोग्राफी कार्यक्रमात भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फोटोग्राफी ॲण्ड सिनेमॅटोग्राफी विभागाच्या संचालक गीतांजली कुलकर्णी, सुप्रसिद्ध फोटोग्राफर व एआय तज्ज्ञ क्षितिज यादव, सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर सचिन सोनवणे यांचा सहभाग असणार आहे. दुपारी 3 वाजता भारती कला महाविद्यालय कॉलेज ऑफ फाईन आर्ट ॲण्ड स्कूल ऑफ व्हिज्युअल आर्टस्‌‍तर्फे ‌‘चित्रकला, दृश्यकला, शिल्पकला आणि करिअर संधी‌’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यात कॉलेज ऑफ फाईन आर्टच्या प्राचार्य डॉ. अनुपमा पाटील, चित्रकार प्रा. राधाकृष्ण पाटील, चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांचा सहभाग असणार आहे. सायंकाळी 5 वाजता समारोप समारंभ आयोजित करण्यात आला असून कला क्षेत्रात प्रदीर्घ कारकीर्द गाजविणारे, वयाची शतकपूर्ती साजरी करणारे लोकप्रिय व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचे ‌‘कला आणि करियर विषयक विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे. याच कार्यक्रमात त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.

स्मार्ट ई-बस लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल होतील- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

पुणे, दि. ११: कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली असलेल्या स्मार्ट ई- बसेस लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल होतील, असा विश्वास परिवहन मंत्री आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

स्मार्ट ई-बस सादरीकरण प्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना मंत्री सरनाईक बोलत होते. ते पुढे म्हणाले, राज्य शासनाचे ई- वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण एसटी महामंडळाने देखील अंगीकारले असून भविष्यात घेण्यात येणाऱ्या स्वमालकीच्या ५ हजार बसेस पैकी दरवर्षी किमान १ हजार बसेस या ई- बसेस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थात, या ई-बसेस देखील ए.आय. तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली बसवलेल्या असाव्यात अशा सूचना संबंधित बस तयार करणाऱ्या कंपनीला आम्ही सांगितले आहे. त्यानुसार त्यांनी उत्तर प्रदेश परिवहन महामंडळासाठी तयार केलेल्या स्मार्ट ई-बसचे सादरीकरण करण्यात आले. नव्याने घेण्यात येणाऱ्या या स्मार्ट ई-बसेससाठी विविध उत्पादकांकडून स्पर्धात्मक सादरीकरण मागविण्यात येणार आहेत, अशी माहितीदेखील श्री. सरनाईक यांनी दिली.

नव्या ई-बसमध्ये चालकांच्या हालचाली वर लक्ष ठेवणारे ए.आय. तंत्रज्ञानावर आधारित सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. गाडी चालवताना जर चालक जांभळ्या देत असेल, त्याची डुलकी लागत असेल, झोप येत असेल किंवा मोबाईल वापरत असेल तर सदर कॅमेरे मागील प्रवाशांना याबाबत अलर्ट करतील तशा प्रकारचा धोक्याचा अलार्म देखील वाजवला जाईल, अशी यंत्रणा नव्या स्मार्ट ई- बसेस मध्ये असणार आहे.

महिलांची सुरक्षितता लक्षात घेता प्रवाशांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी देखील बसमध्ये दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. बसला अचानक आग लागल्यास ती आग अल्पावधीत विझवण्यासाठी फोम बेस अग्नीशामक यंत्रणा बसमध्ये असावी, असे मत यावेळी मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले. याबरोबरच स्वारगेटच्या घटनेनंतर बंद बस ही कोणत्याही बाह्य हस्तक्षेपामुळे उघडली जाणार नाही. तसा प्रयत्न केल्यास धोक्याचा अलार्म वाजेल अशी यंत्रणा देखील नव्या स्मार्ट ई-बसमध्ये बसविण्यात येणार असल्याचेही परिवहन मंत्र्यांनी सांगितले.
0000

लोणावळा परिसरात वाहतूक बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी

पुणे, दि. ११ : जिल्ह्यातील लोणावळा परिसरात ऐतिहासिक वास्तू, गड, किल्ले व स्मारके, पर्यटनस्थळे, धरणे आदी ठिकाणी वर्षाविहार, पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांमुळे वाहतूक कोंडी व अपघात होऊ नये, तसेच मोठ्या प्रमाणावर पाऊस पडून दुर्घटना घडू नये याकरिता सुरक्षिततेच्यादृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी पर्यटनस्थळ परिसरात ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत मोटार वाहन कायदा, १९८८ चे कलम ११५ मधील तरतूदीनुसार व गृह विभागाच्या १९ मे १९९० च्या अधिसूचनेनुसार वाहतुकीमध्ये बदल करुन पर्यायी मार्गाने वाहतुक वळविण्याचे आदेश जारी केले आहेत.

लोणावळा परिसरातील एकविरा देवी, कार्ला लेणी, भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, शिवलिंग पॉईंट, पवना धरण या परिसरात प्रामुख्याने पावसाळी पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. अशावेळी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून सदर आदेश देण्यात आले आहेत.

मौजे भाजे गावाकडून येणारी वाहतुक मौजे मळवली-कार्ला गावाकडे जाण्यासाठी वाहतूक बंद करण्यात येत असून, त्याऐवजी पर्यायी मार्गाने मौजे भाजे येथून पाटण ब्रिजवरुन डावीकडे देवले औंढे ब्रिजहून पुढे सर्व्हिस रोडने कुसगाव लोणावळा येथून जुना हायवे व एक्सप्रेस हायवेकडे जातील.
मौजे औंढे-देवले रोडने मळवली भाजे येथे येणारी वाहतूक बंद करण्यात येत असून, त्याऐवजी पर्यायी मार्गाने मौजे औंढे-लोणावळा-कर्ला फाटा-मळवली-भाजे अशी जातील.

मोजे मळवली व मौजे सदापूर येथून मौजे कार्ला येथे येणारी वाहतुक बंद करण्यात येत असून, त्याऐवजी पर्यायी मार्गाने मौजे मळवली-सदापूर-वाकसई फाट्यावरुन जुन्या हायवेकडे जातील.

मौजे वाकसई फाटा येथून सदापूर मळवली कडे जाणारी वाहने बंद करण्यात येत असून, त्याऐवजी पर्यायी मार्गाने मौजे कार्ला फाटा येथून सरळ पुढे मळवली, पाटण, माजे अशी वाहने जातील.

मौजे भाजे ते लोहगड या मार्गावरील वाहतूक एकेरी करण्यात येत असून, लोहगडाकडे जाण्यासाठी भाजे येथून पर्यायी मार्ग असेल.

लोहगड येथून पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनांनी लोहगड-दुधिवरे खिंड-औंढोली-औंढे यामार्गे पुणे-मुंबई व मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे या मार्गाचा किंवा लोहगड-दुधिवरे-खिंड-पवनानगर या मार्गे नवीन पुणे-मुंबई व मुंबई-पुणे हायवे या मार्गाचा वापर करावा. तसेच लोहगड येथून मुंबई किंवा पुणेकडे जाणारी दोनचाकी व तीनचाकी वाहनांनी लोहगड-दुधिवरे-खिंड-औढोली-आँढे-आँढे ब्रीजवरुन कुसगाव-लोणावळा येथून जुना मुंबई-पुणे व पुणे-मुंबई या मार्गाचा वापर करावा.

या कालावधीत जुना मुंबई-पुणे व पुणे-मुंबई रोडवरील कार्ला फाटा ते वेहेरगाव या मार्गावर अवजड वाहनांना
प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.

वाहतूक बदलाबाबतचे आदेश स्थानिक रहिवाश्यांना लागू नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सुरक्षितेतच्यादृष्टिने स्कूल बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन व्हावे-पोलीस आयुक्त अमितेश कुमार

पुणे, दि. 11 : शालेय विद्यार्थी वाहतूक हा अतिशय संवेदनशील विषय असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीच्या तसेच सर्व प्रकारच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शाळा तसेच विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बस चालकांनी स्कूल बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

पोलीस आयुक्तालयात आयोजित शालेय विद्यार्थी वाहतूक जिल्हा सुरक्षितता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, पुण्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले, पिंपरी चिंचवडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव, बारामतीचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी उपस्थित होते.

पोलीस आयुक्त श्री. कुमार म्हणाले, शाळेत मुलांची ने-आण करणारी बस व इतर वाहने मुलांकरिता सुरक्षित राहतील याची खबरदारी संबंधित शाळेने घ्यावी याकरीता प्रत्येक बस व इतर वाहनात सीसीटीव्ही लावणे अनिवार्य करावे. शाळेच्या बसमध्ये ६ वर्षाखालील मुलांना ने-आण करणेकरिता महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. वाहनचालक, कंडक्टर, क्लीनर आदींची पोलीस पडताळणी करुन घ्यावी. बसेसचे वाहनचालक चांगले प्रशिक्षित, नैतिकदृष्ट्या सक्षम, पूर्वेतिहास चांगला असणारे असल्याची खात्री शालेय परिवहन समितीने करणे आवश्यक आहे. स्कुल बस चालक व अटेंडंट यांचे चारित्र्य पडताळणी, नेत्रतपासणी आणि वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी.
शिक्षण विभागामार्फत शाळा स्तरावर परिवहन समिती स्थापन केल्याबाबतचा आढावा घ्यावा. स्कुल बसेसची वाहनांची कसून तपासणी करावी. खाजगी वाहनातून शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची विशेष तपासणी मोहिम राबवावी. नियमांचे उल्लंघन आढळलेल्या वाहनांवर, चालकांवर कठोर कारवाई करावी. सर्व संबंधित यंत्रणांनी बैठक घेऊन तसेच शालेय परिवहन समितीने स्कूल बस नियमावलीनुसार काम करीत असल्याची खात्री करावी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, स्कूल बसचे अपघात रोखण्यासाठी शाळा, परिवहन विभाग, पोलीस विभाग यांच्यामध्ये समन्वय असावा, असेही कुमार म्हणाले.

श्री. भोसले यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. शालेय विद्यार्थ्यांच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने १ जानेवारी ते ३१ मे २०२५ दरम्यान १ हजार ३२१ स्कूल बस तसेच ६५० इतर वाहनांची तपासणी केली. यामध्ये ४१४ स्कूल बस व २०८ इतर वाहने दोषी आढळली असून या कारवाईत नियमांच्या उल्लंघनाबद्दल ५५ कोटी २३ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती त्यांनी दिली.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची महामार्गावरील हॉटेल थांब्यांना अचानक भेट

पुणे, दि.११: परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक पंढरपूर दौऱ्यावर असताना पुणे -सोलापूर महामार्गावरील एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्यांना अचानक भेट दिली. तेथील प्रवासी व एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला त्यांना मिळणारे अन्नपदार्थ ताजे आहेत का, अन्नपदार्थ वाजवी दरात मिळतात का, तसेच महामंडळाची नाश्ता योजना चालू आहे का याची चौकशी केली. याबरोबरच तेथील प्रसाधनगृहाची देखील त्यांनी आवर्जून पाहणी केली. यावेळी महिला प्रवाशांनी प्रसाधनगृहाच्या अस्वच्छते बाबत तक्रार नोंदवली. त्याची तातडीने दखल घेत मंत्री सरनाईक यांनी सदर प्रसाधनगृहे तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश संबंधित हॉटेल मालकाला दिले. तसेच आढळलेल्या इतर त्रुटी बाबत संबंधित मालकाला विहीत वेळेत त्या दूर करण्याचे निर्देश दिले. अन्यथा सदर हॉटेल थांबा नाईलाजाने रद्द करण्याचे निर्देश देऊ, असे सांगितले. दरम्यान हे हॉटेल थांबे ज्या पुणे विभागात येतात त्या विभाग नियंत्रक यांना संपर्क साधून या हॉटेल थांब्यांच्या त्रुटीची पूर्तता पुढील एक महिन्यात करण्याचे निर्देश दिले.

अनाधिकृत हॉटेल थांब्यावर एसटी बस थांबवणाऱ्या चालक- वाहकांवर कारवाई

दरम्यान भिगवन जवळील एका अनधिकृत हॉटेल थांब्यावर एसटी च्या अनेक बसेस थांबलेल्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तेथे भेट देऊन पाहणी केले असता, अत्यंत अस्वच्छ वातावरणात प्रवाशांना जेवण वाढले जात असल्याचे त्यांना दिसून आले. याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून संबंधितांवर कडक कारवाई करावी. असे एसटीच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

भिगवणला लवकरच नवे बसस्थानक होणार

परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक हे पंढरपूर दौऱ्यावर असताना महामार्गावरील भिगवन बसस्थानकाला त्यांनी भेट दिली. तेथील असुविधा बाबत स्थानिक रहिवाशांनी मंत्री सरनाईक यांच्या कडे कैफियत मांडली. महामार्गामुळे सदर बसस्थानक सखल भागात गेल्याने पावसाळ्यात पाणी साचून अत्यंत गैरसोय होते. तसेच येथील सध्या वापरात असलेले प्रसाधनगृहे देखील अत्यंत तकलादू व अस्वच्छ असतात, अशा तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली. याबाबत महामंडळाच्या बांधकाम विभागाचे महाव्यवस्थापक दिनेश महाजन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून नव्या प्रशस्त भिगवन बसस्थानकाची निविदा लवकरात लवकर प्रसिद्ध करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. त्यामुळे भिगवन येथे नवे बस स्थानक लवकरच आकाराला येईल असा आशावाद येथील रहिवाशांच्या मध्ये निर्माण झाला आहे.

गंगाधाम अपघाताने संतप्त कार्यकर्त्यांचा पथविभाग प्रमुख पावसकरांना घेराव

0

पुणे-गंगाधाम चौकात पुन्हा एका महिलेचा अपघाती मृत्यू झाल्याने महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या हलगर्जीपणाविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी महापालिकेत पथ विभाग प्रमुख यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना घेराव घालून खेळण्यातले ट्रक भेट देत वाहतूक नियोजनाला सोडून केलेले रस्ते याबद्दल संताप व्यक्त केला यावेळी पुणे शहर युवक अध्यक्ष किशोर कांबळे, अजिंक्य पालकर, रोहन पायगुडे, अमोल परदेशी,प्राजक्त जाधव,लखन वाघमारे,विद्या ताकवले,समीर पवार, अमोल ननावरे, प्राजक्ता जाधव , फारुख शेख, निलेश पवार, विद्या ताकवले, हर्षवर्धन दिघे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी कार्यकर्ते म्हणाले कि,’ आज दिनांक ११ जून २०२५ रोजी गंगाधाम मार्केट यार्ड चौक, बिबवेवाडी येथे एका भरधाव ट्रकच्या धडकेत एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणजे गेल्यावर्षीही याच भागात एका डंपरच्या धडकेत अशाच प्रकारे एका महिलेचा मृत्यू झाला होता.या दोन्ही घटनांसाठी थेट जबाबदार महापालिकेचे रस्त्यावरील दुर्लक्षित नियोजन आणि वाहतूक व्यवस्थेतील पोलीस प्रशासनाची निष्क्रियता हे मुख्य कारण आहे. नागरिकांचे प्राण हे राजकीय हस्तक्षेप, भ्रष्ट प्रशासन आणि निष्क्रिय यंत्रणेमुळे धोक्यात आले आहेत.याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस – पुणे शहर यांच्या वतीने मुख्य अभियंता (पथ विभाग), पुणे महानगरपालिका अनिरुद्ध पावसकर यांच्याकडे निवेदन देत तीव्र आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनावेळी अमोल परदेशी यांनी अंगाला रक्त लावून, डोक्याला पट्ट्या बांधून, जणू अपघातग्रस्त व्यक्तीच्या रूपात स्वतःला सादर करून महापालिकेच्या संवेदनशून्यतेविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. या रूपातून त्यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे होत असलेल्या जीवितहानीचे वास्तव मांडले.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात “खेळण्यातला ट्रक” मुख्य अभियंत्यांना भेट देऊन प्रशासनाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. हा ट्रक म्हणजे पुणेकरांच्या जीवाशी चाललेल्या महापालिकेच्या “खेळा”चे प्रतीक होता.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर यांची प्रमुख मागण्या:

अपघातप्रवण रस्त्यांचे तातडीने पुनर्निर्माण

वाहनगती नियंत्रणासाठी यंत्रणा उभारणे

वाहतूक पोलिसांची नियमित उपस्थिती

अपघात पीडित कुटुंबाला त्वरित मदत

महापालिकेच्या निष्क्रिय आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई

जर प्रशासनाने यापुढेही दुर्लक्ष केले, तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर यांच्यातर्फे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.