Home Blog Page 503

२६ जानेवारी २०२५ ते २६ जानेवारी २०२६ ‘संविधान वाचवा राष्ट्रीय पदयात्रा’ व्यापक जनसंपर्क अभियान.

मुंबई, दि. १३ जानेवारी २०२४
भाजपाकडून संविधान व संविधाननिर्मात्याचा सात्यत्याने अवमान केला जात असताना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान, राज्यघटना, सामाजिक न्याय व समानतेच्या मुल्यांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्ष कट्टीबद्ध आहे. याच हेतूने काँग्रेस पक्षाने ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ हे अभियान आयोजित केले आहे. देशपातळीवर ३ जानेवारीपासून हे अभियान सुरु झाले असून २६ जानेवारी रोजी मध्य प्रदेशातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, महू येथे एक भव्य रॅलीने त्याची सांगता होणार आहे.

राज्यघटनेच्या ७५ व्या वर्धापनदिनी २६ जानेवारी २०२५ रोजी ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ रॅलीचे राज्य, जिल्हा व ब्लॉक स्तरावर आयोजन करण्यात आले आहे. हे अभियान अधिक मजबूत करण्यासाठी २६ जानेवारी २०२५ ते २६ जानेवारी २०२६ या दरम्यान ‘संविधान वाचवा राष्ट्रीय पदयात्रा’ ही देशव्यापी जनसंपर्क मोहिम सुरु केली जाणार आहे. या अभियानात प्रदेश काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, आजी माजी आमदार, खासदार, सेल व विभागाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतील अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी पारदर्शक पद्धतीने पडताळणी प्रक्रिया राबवा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या तपासणी आणि पडताळणी प्रक्रियेबाबत कार्यशाळा संपन्न

पुणे, दि. १३: राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या बर्न्ट मेमरी, मायक्रो कंट्रोलरच्या तपासणी आणि पडताळणी प्रक्रियेच्या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी अर्थात यशदा येथे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेवरील नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवा, असे निर्देश श्री. चोक्कलिंगम यांनी यावेळी दिले.

यावेळी राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, भारत निवडणूक आयोगाचे अवर सचिव कनिष्क कुमार, पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. जितेंद्र डूडी यांच्यासह राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे (बीईएल) अभियंता उपस्थित होते.

श्री. चोक्कलिंगम यावेळी म्हणाले, लोकसभा निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल होती. त्याबाबत न्यायालयाने सुनावण्या घेऊन, पक्षकारांचे म्हणणे ऐकून ईव्हीएम पूर्णतः विश्वसनीय असल्याचा निकाल दिला. याबरोबरच लोकांच्या ईव्हीएममधील मायक्रोकंट्रोलर चीपबाबत ज्या तक्रारी, शंका आहेत त्या देखील दूर व्हाव्यात यासाठी यंत्रणा निर्माण करावी, असे न्यायालयाने भारत निवडणूक आयोगाला निर्देशित केले. त्यादृष्टीने आयोगाने बीईएलच्या साहाय्याने ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या बर्न्ट मेमरी, मायक्रो कंट्रोलरच्या तपासणी आणि पडताळणीसाठी तांत्रिक प्रमाणित कार्यपद्धती तयार केली आहे.

ते पुढे म्हणाले, निवडणुकीनंतर या चीपमध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप करून निकालात बदल (मॅनीप्युलेशन) करण्यात आलेले नाही या बाबत नागरिकांची खात्री करणे यादृष्टीने या कार्यपद्धतीला महत्त्व आहे. लोकांचा निवडणूक प्रक्रियेवर विश्वास राहावा यासाठी ही कार्यपद्धती राबवायची आहे. त्यामुळे ही तपासणी व पडताळणी प्रक्रिया व्यवस्थितरित्या राबविण्याची मोठी जबाबदारी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांवर आहे. ही नवीन पद्धती असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी समजून घ्यावी यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे श्री. चोक्कलिंगम म्हणाले.

किरण कुलकर्णी म्हणाले, राजकीय पक्ष आणि उमेदवारांमधील संभ्रम दूर व्हावा या उद्देशाने या कार्यपद्धतीबाबत संक्षिप्त माहिती देणे ही जिल्हा निवडणूक अधिकारी यांची जबाबदारी आहे. त्यादृष्टीने पक्ष आणि उमेदवारांसोबत बैठक आयोजित करण्यात यावी, असेही ते म्हणाले.

यावेळी बीईएलच्या अभियंत्यांनी या तांत्रिक कार्यपद्धतीबाबत सादरीकरण केले तसेच ईव्हीएमच्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणीचे प्रात्यक्षिक करून दाखवले. जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी मांडलेल्या विविध शंकांचे निरसनही यावेळी करण्यात आले.

हजारो योगप्रेमी रमले प्रगाढ शांतीच्या विलक्षण अनुभूतीत!

महा-ध्यान शिबिरात डॉ. संप्रसाद विनोद यांनी दिली जीवनदृष्टी

पुणे – धकाधकीच्या जीवनात ताणतणावांचे सुयोग्य व्यवस्थापन कसे करायचे आणि मनाची स्वस्थता कशी मिळवायची हे जाणून घेण्यासाठी जमलेल्या हजारो योगप्रेमींनी प्रत्यक्ष ध्यान करून प्रगाढ शांतीचा विलक्षण अनुभव घेतला. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आत्मयोग-गुरु डॉ. संप्रसाद विनोद यांनी उपस्थितांना ध्यानाविषयी बहुमोल मार्गदर्शन करून दैनंदिन जीवनात योगाचे महत्त्व कथन केले आणि जीवनदृष्टी दिली.
निमित्त होते, महर्षि विनोद रिसर्च फौंडेशनच्या वतीने गणेश कला क्रीडा मंदिरात आयोजित केलेल्या महा-ध्यान शिबिराचे. स्वामी विवेकानंद आणि विश्वशांतिदूत महर्षी न्यायरत्न विनोद यांची जयंती, राष्ट्रीय युवा दिन आणि डॉ. संप्रसाद विनोद यांच्या सुवर्णसाधनेच्या अमृतयोग वर्षानिमित्त हे ‘महा-ध्यान शिबिर’ आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, मराठवाडा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव, माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर, प्रख्यात अभिनेता गिरीश कुलकर्णी आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुण्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य योगप्रेमी या शिबिरात उत्साहाने सहभागी झालेले होते. त्याचप्रमाणे देशभरातून अनेक योगप्रेमींनी थेट प्रक्षेपणही पाहिले. दोन सत्रांमध्ये झालेल्या या शिबिरात उपस्थितांकडून प्रत्यक्ष ध्यान करून घेण्यात आले आणि ध्यान कसे करायचे याचे बारकावे समजावून सांगितले. सभेच्या ठिकाणी उच्चासनावर बसून उपदेश करण्यापेक्षा खाली उतरून लोकांमध्ये मिसळून डॉ. संप्रसाद विनोद यांनी सर्वांबरोबर मोकळेपणाने संवाद साधला. असा मैत्रीपूर्ण संवाद सगळ्यांनाच मनापासून भावला. त्यामुळे, वातावरणात खूपच मोकळेपणा आला. साहजिकच, कुठलंही दडपण न घेता ध्यानाची प्रक्रिया समजून घेणं आणि ध्यानाची अनुभूती घेणं यात सगळे रमून गेले. प्रगाढ शांती आणि शक्तीचा अनुभव घेऊ शकले.
अतिशय भारलेल्या आणि मोकळ्या वातावरणात पार पडलेल्या महा-ध्यान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या समुदायाशी संवाद साधताना डॉ. संप्रसाद विनोद म्हणाले, “ईश्वर म्हणजे आपल्यामधील चैतन्य. आपल्या अस्तित्वाची आपल्याला होणारी जाणीव. आपण अस्तित्वात असल्यामुळेच विविध शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक क्रिया करून जगण्याचा अनुभव घेऊ शकतो. आपल्यामधील ह्या चैतन्याची अनुभूती घेणं म्हणजे खरं अध्यात्म आहे. अशी अनुभूती येण्यासाठी मन पूर्णपणे शांत व्हावं लागतं. निर्विचार व्हावं लागतं. ‘मी’ पणा देखील शांत व्हावा लागतो. ‘मी’ पणा शांत झाला, की आपल्यामधील चैतन्याच्या अस्तित्वाची आणि आंतरिक शक्तीची प्रचीती येते. शांतीमुळे स्वत:ला आणि परिस्थितीला समजून घेणं सोपं जातं. शांतीच्या जोडीला आत्मबल असल्यामुळे दोन्हीमध्ये समतोल साधला जातो. रोज योग्य प्रकारे ध्यान केल्याने हे शक्य होते.”
महाध्यानाचा अनुभव घेतल्यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी एकमेकांचे हात हातात घेतले आणि आपण परस्परांशी जोडलेलो आहोत याची अनुभूती आनंदाने घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पराग पोतदार यांनी केले.
मन:शांती हा स्व-भाव होण्यासाठी ध्यान महत्त्वाचे – डॉ. संप्रसाद विनोद

” ध्यान हा योगविद्येचा प्राण आहे. ध्यान बुदधिनिष्ठ आहे. तरीही त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागतो. त्यासाठी क्वालिटी टाईम काढावा लागतो. आपले अग्रक्रम बदलावे लागतात. ध्यानातून येणारा मन:शांतीचा अनुभव रोज घेत गेलं, की मन:शांती हा आपला स्वभावच होतो. मग, दैनंदिन जीवनातील समस्यांनी, अडचणींनी आपण गडबडून जात नाही. टिकाऊ मन:शांती लाभली, की कुठलीही समस्या समजून घेणं आणि सोडवणं सोपं जातं. ” असे प्रतिपादन डॉ. संप्रसाद विनोद यांनी केले.

महावितरणच्या खेळाडूंची थेट आंतरराष्ट्रीय भरारी-धावपटू वसावेंना २ सुवर्ण तर वाईकर भारतीय खो-खो संघाचे कर्णधार

पुणे, दि. १३ जानेवारी २०२५: महावितरणच्या पुणे परिमंडलाचे कर्मचारी व उत्कृष्ट खेळाडू गुलाबसिंग वसावे (शिवाजीनगर विभाग) व प्रतिक वाईकर (पर्वती विभाग) यांनी थेट आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भरारी घेतली आहे. कर्नाटकातील आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत गुलाबसिंग वसावे यांनी भारताला दोन सुवर्ण तर एक रौप्यपदकाची कमाई करून दिली. तर प्रतिक वाईकर यांची खो-खो वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.

मंगरूळ (कर्नाटक) येथे दि. १० ते १२ जानेवारी दरम्यान आयोजित साऊथ एशिया मास्टर्स ओपन अॅथलेटिक्स स्पर्धेत धावपटू गुलाबसिंग वसावे यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. यात त्यांनी २०० आणि ४०० मीटर धावस्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. तर ४×४०० रिले धावस्पर्धेत रौप्यपदक मिळवले. या स्पर्धेत भारतासह श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळ, भूतान आदी देशातील सुमारे दोन हजार क्रीडापटू सहभागी झाले होते.

तसेच प्रतिक वाईकर यांना खो-खो वर्ल्ड कप स्पर्धेत १५ सदस्यीय भारतीय संघाचे नेतृत्व करण्याचा मान मिळाला आहे. भारत, अमेरिका, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, पोलंड, दक्षिण कोरिया, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, ब्राझील आदी तब्बल २० देशांच्या सहभागाची खो-खो वर्ल्ड कप २०२५ स्पर्धा दि. १३ ते १९ जानेवारी दरम्यान नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये होणार आहे. महाराष्ट्र शासनाचा श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त असलेले प्रतिक वाईकर यांचा राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत दबदबा आहे. एक उत्कृष्ट खो-खोपटू म्हणून त्यांचा देशात नावलौकिक आहे.

महावितरणचे श्री. गुलाबसिंग वसावे व श्री. प्रतिक वाईकर यांच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र, संचालक (संचालन) श्री. अरविंद भादिकर, पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे व मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी कौतुक केले आहे.

श्री. राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल– ‘गुलाबसिंग वसावे यांनी वैयक्तिक कामगिरी करीत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत २ सुवर्ण पदक पटकावले. तर प्रतिक वाईकर खो-खोच्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करीत आहे ही कामगिरी महावितरणसाठी अतिशय गौरवाची व अभिमानाची आहे. दोघेही अतिशय मेहनती आहेत. नियमित सरावातून त्यांना हे यश मिळाले आहे. गुलाबसिंग यांनी २ सुवर्णपदकांची कमाई केली तर प्रतिक यांच्या नेतृत्वात खो-खोच्या वर्ल्डकपचा भारतीय संघ मानकरी ठरेल अशी खात्री आहे’.

कौशल्याद्वारे विद्यार्थ्यांनी स्वत:ला विकसित करावे : पद्मश्री डॉ. संजय धांडे

रोटरी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित ‌‘टेक टॉक वीक 2025‌’चा शुभारंभ
पुणे : प्रखर निरीक्षण शक्ती, प्रश्न उपस्थित करण्याची क्षमता, कुतूहल, सर्जनशीलता, कृतिशीलता, प्रयोगशीलता आणि संवाद कौशल्यावर भर देऊन विद्यार्थ्यांनी स्वत:ला विकसित करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आयआयटी कानपूरचे माजी संचालक, अवंतिका विद्यापीठाचे कुलगुरू पद्मश्री डॉ. संजय धांडे यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ पुणे युनिर्व्हसिटी, रोटरी क्लब ऑफ पुणे कॅम्प आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ‌‘टेक टॉक वीक 2025‌’चे आयोजन करण्यात आले असून या सप्ताहाचे उद्घाटन आज (दि. 12) डॉ. धांडे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संत ज्ञानेश्वर सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, विद्यापीठातील तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर, रोटेरियन बलबीर चावला, अरुण कुदळे, रोटरी क्लब ऑफ युनिर्व्हसिटीचे अध्यक्ष डॉ. शंतनू देशपांडे, रोटरी क्लब ऑफ कॅम्पच्या अध्यक्षा वैशाली रावल मंचावर होते. ‌‘टेक टॉक वीक 2025‌’ अंतर्गत पुण्यातील विविध महाविद्यालयांमध्ये तज्ज्ञांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले असून याचा शुभारंभ राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे तसेच राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून करण्यात आला.
डॉ. धांडे पुढे म्हणाले, जगात आज तांत्रिक क्षेत्रात काय घडते आहे, तंत्रज्ञान कशा पद्धतीने बदलते आहे, त्याच्यातून विद्यार्थ्याने स्वत:ला कसे घडवावे या विषयी आयोजित व्याख्यानांमधून बदलत्या जगाची ओळख विद्यार्थ्यांना होणार आहे. आजच्या शिक्षणपद्धतीविषयी बोलताना डॉ. धांडे म्हणाले, माहिती तंत्रज्ञानाचे शिक्षण शालेय वयापासूनच देणे गरजेचे आहे. साचेबद्ध अभ्यासक्रम न शिकवता आधुनिक तंत्रज्ञानाचीही माहिती विद्यार्थ्यांना योग्य वयात देणे गरजेचे आहे. मुलभूत शिक्षणाचा पाया पक्का असल्यास उच्च शिक्षण घेणे सोपे जाते. कामाप्रती निष्ठा, वचनबद्धता, वक्तशीरपणा, संवादकौशल्य हे गुण आजच्या काळात आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, तंत्रज्ञानातील प्रत्येक क्षेत्र एकमेकांवर अवलंबून असते. यामुळे त्यांचा विचारपूर्वक वापर होणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष वापर या काळात तफावत असते. व्यावसायिक क्षेत्रात नव्याने आलेल्या तंत्रज्ञानाविषयी विद्यार्थ्यांना त्या-त्या वेळी अवगत केल्यास त्यांची कारकिर्द घडणे सोपे होते. ‌‘टेक टॉक वीक 2025‌’ या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान क्षेत्रातील अद्ययावत माहिती समजण्यास उपयोग होईल.
डॉ. पराग काळकर म्हणाले, अभियांत्रिकी व शास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानात काय बदल घडत आहेत याविषयी विविध क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे.
बलबीर चावला म्हणाले, व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींकडून आजच्या तंत्रज्ञानाविषयी माहिती देण्यासाठी तसेच संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे.
डॉ. आदित्य अभ्यंकर यांनी ‌‘टेक टॉक 2025‌’ या उपक्रमाविषयी प्रास्ताविकात माहिती दिली. रोटरी क्लब ऑफ पुणे कॅम्पतर्फे पद्मश्री डॉ. संजय धांडे यांचा तसेच डॉ. सुरेश गोसावी आणि डॉ. पराग काळकर यांचा व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रांती शहा यांनी केले तर आभार डॉ. शंतनू देशपांडे यांनी मानले.
कार्यक्रमाची रूपरेषा
सोमवार, दि. 13 रोजी सायंकाळी 4 वाजता : विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बिबवेवाडी येथे लिडरशीप इन द एरा ऑफ आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स, मंगळवार, दि. 14 रोजी सायंकाळी 4 वाजता महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमेन येथे हेल्थ केअर ॲण्ड बायो टेक्नॉलॉजी, बुधवार, दि. 15 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे एनर्जी ॲण्ड इको डिझायनिंग-द हार्मनी फोरम, गुरुवार, दि. 16 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता पुणे विद्यार्थी गृहाचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी येथे इनोव्हेटिव्ह इनसाईट्स ॲण्ड अपॉर्च्युनेटिज इन सीडब्ल्यूएस, शुक्रवार, दि. 17 रोजी सायंकाळी 4 वाजता पीईएस मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे रिॲलिटी रिइमॅजिन्ड : डेटा सायन्स, व्हिआर/एआर इनसाईट्स, शनिवार, दि. 18 रोजी सायंकाळी 4 वाजता एआयएसएसएमएस ॲण्ड सीओईपी ॲट सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिर्व्हसिटी ऑडिटोरियम येथे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट या विषयांवर तज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या ‌‘कथा आमच्या शिक्षणाची‌’ नाटिकेस भालबा केळकर करंडक


नानासाहेब शिरगोपीकर करंडक कला केंद्र, पुणेच्या ‌‘माझा बाप्पा‌’ला

पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आणि नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित भालबा केळकर नाटिका स्पर्धेत मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयाने (टिळक रोड) सादर केलेल्या ‌‘कथा आमच्या शिक्षणाची‌’ या नाटिकेने भालबा केळकर करंडक पटकाविला. विजेत्या संघास भालबा केळकर करंडक, स्मृतिचिन्ह व रोख तीन हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. नाविन्यपूर्ण व कल्पक सादरीकरणाचा नानासाहेब शिरगोपीकर करंडक, स्मृतिचिन्ह व दोन हजार 500 रुपये रोख पारितोषिक कला केंद्र, पुणेच्या ‌‘माझा बाप्पा‌’ या नाटिकेस जाहीर झाला आहे.
महाराष्ट्रीय कलोपासक आणि नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित भालबा केळकर नाटिका स्पर्धा दि. 11 व 12 जानेवारी रोजी भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत 19 संघांचे सादरीकरण झाले. रविवारी रात्री निकाल जाहीर करण्यात आला. सांघिक द्वितीय कृष्णदेव मुळगुंद करंडक, स्मृतिचिन्ह व दोन हजार रुपये रोख आर्यन्स वर्ल्ड स्कूल, वारजे संघाने सादर केलेल्या ‌‘व्हाईट वॉश‌’ या नाटिकेला तर सांघिक तृतीय क्रमांक राजा भाऊ नातू करंडक, स्मृतिचिन्ह व एक हजार रुपये रोख नवीन मराठी शाळा पुणेच्या ‌‘जीवन त्यांना कळले हो!‌’ या नाटिकेस जाहीर करण्यात आला आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल :
अभिनय नैपुण्य उत्तेजनार्थ पारितोषिक (प्रमाणपत्र व कै. भालबा केळकर यांच्या कुटुंबियांकडून प्रत्येकी शंभर रुपयांचे रोख पारितोषिक/कलाकार, भूमिका, नाटिका, संघाचे नाव या क्रमाने) :
आरुष बोपर्डीकर (छोकू, एकाच तिकिटात तीन बालनाट्ये, आर्यन्स वर्ल्ड स्कूल, भिलारेवाडी), नील देशपांडे (देण्या, मिशन गणपती, नाटकाची शाळा, पुणे), राजवी बामगुडे (आई व शिरीन, चि. का. गो., भारतीय विद्या भवन परांजपे विद्या मंदिर, कोथरूड), मीरा आडकर (मीरा व प्रमिला, पणजीची गोष्ट, श्रीनिवास सिरीन काऊंटी एबीसी को-ऑप सोसायटी), देवप्रशांत सूर्यवंशी (रघु, शेवटचा गणपती, शिशुविहार प्राथमिक शाळा, एरंडवणा), स्वरांश लेले (काकु, रंगीत गोष्ट, आकांक्षा बालरंगभूमी), हर्ष गारोळे (काळ्या, वाढदिवस, मानव्य, पुणे), विवान कुलकर्णी (बाबा, मॅजिक फॅक्टरी, एसपीएम इंग्लिश स्कूल, पुणे), अर्जुन दारव्हेकर (अर्जुन व मॉनिटर, मॉनिटर, स्वरसाधना, पुणे), रित्वी करडे (चेटकीण नं. 2, एकाच तिकिटात तीन बालनाट्ये, आर्यन्स वर्ल्ड स्कूल, भिलारेवाडी).
सर्वोकृष्ट लेखन : (सुमन शिरवटकर पुरस्कृत करंडक, स्मृतिचिन्ह व 501 रुपये रोख) : निखिल गाडगीळ (एकाच तिकिटात तीन बालनाट्ये, आर्यन्स वर्ल्ड स्कूल, भिलारेवाडी).
उत्तेजनार्थ : (प्रदीप जंगम पुरस्कार, स्मृतिचिन्ह व 251 रुपये रोख) : भैरवी पुरंदरे (मिशन गणपती, नाटकाची शाळा).
सर्वोकृष्ट दिग्दर्शक : (दिनानाथ टाकळकर करंडक, स्मृतिचिन्ह व 501 रुपये रोख) : संतोष माकुडे (माझा बाप्पा, कला केंद्र पुणे)
उत्तेजनार्थ : (प्रमाणपत्र व 251 रुपये रोख) : अमृता जोगदेव (व्हाईट वॉश, आर्यन्स वर्ल्ड स्कूल, वारजे).
अभिनय नैपुण्य : अभिनेता : (सतिश तारे पुरस्कार, स्मृतिचिन्ह व 251 रुपये रोख) : आरुष खानझोडे (वरद, माझा बाप्पा, कला केंद्र, पुणे)
अभिनय नैपुण्य : अभिनेत्री : (शितल केतकर पुरस्कार, स्मृतिचिन्ह व 251 रुपये रोख) : नंदिनी यावलकर (सूत्रधार 1 व इंद्र, जीवन त्यांना कळले हो!, नवीन मराठी शाळा, पुणे).
वाचिक अभिनय नैपुण्य : (स्मृतिचिन्ह व 501 रुपये रोख) : अक्षरा जोशी (जेरी, व्हाईट वॉश, आर्यन्स वर्ल्ड स्कूल, वारजे)
सर्वोकृष्ट वैयक्तिक अभिनय नैपुण्य (प्रभाकर वाडेकर पुरस्कार, स्मृतिचिन्ह व 501 रुपये रोख) : गार्गी वैद्य (नटी, कथा आमच्या शिक्षणाची, मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालय, टिळक रोड).
स्पर्धेचे परिक्षण अनिरुद्ध दिंडोरकर, राजू बावडेकर व केतकी पंडित यांनी केले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार, दि. 16 रोजी सायंकाळी 5 वाजता भरत नाट्य मंदिर येथे इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष प्रसाद वनारसे यांच्या हस्ते होणार आहे.

युतिका, सफा उपांत्य फेरीत दाखल


योनेक्स सनराईज पीवायसी एचटीबीए अमनोरा कप १५ वी जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धाहवेली तालुका बॅडमिंटन संघटनेच्या वतीने आयोजन
पुणे : युतिका चव्हाण, सफा शेख यांनी पीवायसी एचटीबीसी-अमनोरा कप जिल्हा सुपर-५०० मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलींच्या गटात आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेतील १९ वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत अग्रमानांकित युतिका चव्हाणने एकिशा मेदानेवर २१-१२, २१-१२ असा विजय मिळवला. आता उपांत्य फेरीत तिची लढत मनिषा तिरुकोंडा आणि सान्वी पाटील यांच्यातील विजेतीशी होईल. चौथ्या मानांकित सफा शेखने सई अगवणेवर २१-१८, २१-१९ अशी मात केली.
यश, प्रद्युम्न चौथ्या फेरीतपुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत अग्रमानांकित चैतन्य खरातने अनिश भुजबळला २१-८, २१-३ असे, विवेक चंद्रवंशीने सुजल खुडेवर २१-३, २१-१० अशी, कोणार्क इंचेकरने सुमित भोळेवर २१-१३, २१-१५ अशी मात केली. सुदीप खोराटेने राहुल पाटीलचे आव्हान १५-२१, २१-४, २१-१० असे, मोक्षित पोरवालने अभिजित कदमचे आव्हान २१-१८, २१-१७ असे परतवून लावले. प्रद्युम्न खंदाडेने राजू ओव्हलवर २२-२०, २१-१३ असा, यश तावरेने घनश्याम पाटीलवर २१-१४, २१-८ असा विजय मिळवला.
निकाल : १७ वर्षांखालील मुली – तिसरी फेरी – शरयू रांजणे वि. वि. वेनिषा कोल्हे २१-९, २१-५, नाव्या रांका वि. वि. देवश्री जिनराळकर २१-१२, २१-५, एस. डाखणे वि. वि. अनन्या बोंद्रे २१-१६, २१-१६, सान्वी पाटील वि. वि. पर्णवी मोहळकर २३-२१, २१-१३, सोयरा शेलार वि. वि. शार्दूली माळी २१-११, २१-६.
१७ वर्षांखालील मुले – तिसरी फेरी – देवांश सकपाळ वि. वि. सौरिष काने २१-१८, २१-१८, श्रेयस मासळेकर वि. वि. आरव राय २१-१५, २१-८, अर्हम रेदासनी वि. वि. अर्णव मिरजकर २१-१३, २१-६, ओजस जोशी वि. वि. विस्मय म्हस्के २१-१०, २१-६, नील शोरन वि. वि. वरुण हवालदार २१-११, २१-३, अजिंत्य जोशी वि. वि. नचिकेत गोखले २१-१३, २१-८, विहान कोल्हाडे वि. वि. आरुष अरोरा २१-१६, १०-२१, २१-१६, कृष्णनील गोरे वि. वि. वेदान्त जोशी २१-१७, २१-१२, शार्दूल अवारी वि. वि. जयंत झाडे २१-१६, ११-२१, २१-१६, चिन्मय फणसे वि. वि. नंदन हुगर २१-२, २१-७, विहान मूर्ती वि. वि. कार्तिक दिनेश २१-७, २१-४, ईशान लागू वि. वि. माधव कामत १९-२१, २१-१६, २१-१४, नितीन एस. वि. विय स्वरित सातपुते २१-६, २१-१२.
महिला एकेरी – दुसरी फेरी – अस्मिता शेडगे वि. वि. कल्याणी वाकरेकर २१-३, २१-६, युतिका चव्हाण वि. वि. जिया उत्तेकर २१-१९, २१-११, मनाली देशपांडे वि. वि. गायत्री केंजळे २१-१३, २१-१९, मधुरा काकडे वि. वि. रिया तांबडे २१-८, २१-१, श्रेया शेलार वि. वि. यशस्वी काळे २१-१९, २१-१२, पायल बी. पाटील वि. वि. सुहासिनी यादव २१-१०, २१-४, एकिशा मेदाने वि. वि. प्रिया शेळके २१-१४, २१-१३, आयुषी मुंडे वि. वि. श्रुती कुलकर्णी २१-३, २१-६.
पुरुष एकेरी – तिसरी फेरी – वसीम शेख वि. वि. वेदांत शिंदे १५-२१, २१-४, २१-१०, कृष्णा जसूजा वि. वि. करण परदेशी २१-५, २१-१४, आदित्य ओक वि. वि. सिद्धार्थ भोसले २१-९, २१-१९, दिग्विजयसिंग राजपूत वि. वि. हिमांशू हरदेव २१-६, २१-८, अथर्व खिस्ती वि. वि. ऋग्वेद भोसले २१-१८, २१-१५, निक्षेप कात्रे वि. वि. आद्य पारसनीस २१-१६, २१-१५, सुजल लखारी वि. वि. प्रथमेश बेलदरे २१-१०, २१-१९.

दक्षिण कमांड मुख्यालयाने लष्करी भव्यतेसह आयोजित केला संरक्षण पुरस्कार प्रदान सोहळा

पुणे, 12 जानेवारी 2025

पुण्यात खडकी मध्ये प्रतिष्ठित बॉम्बे इंजिनियर्स परेड ग्राउंड येथे दक्षिण कमांडने आपल्या लष्करी परंपरा दृगोच्चर करत भव्यदिव्य असा संरक्षण पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित केला होता. या प्रतिष्ठित कार्यक्रमात लष्कराचे जवान आणि तुकड्यांचे अपवादात्मक धैर्य, शौर्य आणि अतुलनीय समर्पण यांचा यथोचित सन्मान करत त्यांच्या राष्ट्रासाठी केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल 34 वैयक्तिक पुरस्कार आणि 27 युनिट प्रशस्तिपत्रे बहाल करून त्यांना गौरवण्यात आले.

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, अति विशिष्ट सेवा पदक, दक्षिण कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. 08 सेना पदके (शौर्य), 09 सेना पदके (विशेष सेवा), 14 विशिष्ट सेवा पदके, 02 विशिष्ट सेवा पदके आणि बार, एक उत्तम जीवन रक्षा पदक आणि 27 जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ युनिट पदोन्नती पुरस्कारांसह संपूर्ण कमांडमधील युनिट्सच्या उत्कृष्ट प्रयत्नांचा गौरव करत प्रतिष्ठित पुरस्कारांच्या सादरीकरणाद्वारे हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला.

उत्कृष्ट सेवेचा गौरव करण्याचा रिवाज म्हणून लष्कराच्या कमांडरने विविध क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित दिग्गजांचा त्यांच्या निवृत्तीनंतरच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सत्कार केला. सक्रिय सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही या व्यक्तींनी सामाजिक कल्याणाच्या हेतूने समर्पण भावनेने निःस्वार्थरित्या राष्ट्रसेवा करत राहिल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.

खडकी येथील बीईजी केंद्र येथे आयोजित या सोहळ्यात लष्करी अचूकता, शिस्त आणि राष्ट्राभिमानाचे नेत्रदीपक प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.  या कवायतीत भारतीय सैन्याच्या विविध पलटण केंद्रांच्या आठ प्रतिष्ठित कवायत तुकड्यांसह प्रभावी मानवंदना कवायतींचा समावेश होता. या कार्यक्रमात प्रगत शस्त्रे, लढाऊ वाहने आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासह भारतीय लष्कराच्या तांत्रिक पराक्रमाचेही प्रदर्शन करण्यात आले.

राष्ट्रीय संरक्षण आणि विकासासाठी भारतीय सैन्याच्या योगदानाचा एक महत्त्वाचा पैलू दर्शविणारे प्रत्येकी एक असे चार चित्ररथ  देखील होते. यामध्ये लष्कराचा मिशन ऑलिम्पिक उपक्रम, राष्ट्र उभारणीत दिग्गजांची महत्त्वाची भूमिका, नेट झिरो कार्बन उत्सर्जन साध्य करण्यासाठीची वचनबद्धता आणि आधुनिक भारतीय सैन्याला आकार देणारी तांत्रिक प्रगती यासारख्या संकल्पनांचा समावेश होता.

पुण्यात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या सैन्य दिवस परेडच्या अनुषंगाने यंदाची इन्व्हेस्टिचर परेड काहीशी विशेष गणली गेली. यामुळे लष्करी क्रियान्वयनासाठी आकारात येणाऱ्या नवकल्पना आणि तांत्रिक प्रगतीचा प्रत्यक्ष साक्षीदार होण्याची दुर्मिळ संधी जनतेला प्राप्त झाली. उल्लेखनीय प्रदर्शनांमध्ये रोबोटिक म्युल्स, शत्रूचे स्थान निश्चित करणारे आणि परिमिती सुरक्षेसाठी बनवण्यात आलेले चतुष्पाद मानवरहित ग्राउंड व्हेइकल आणि स्वाथी शस्त्रास्त्र स्थान निश्चिती रडार, प्रतिकूल तोफखान्याचा अचूक मागोवा घेण्यास आणि प्रभावी प्रतिकार करण्यास सक्षम असलेली अत्याधुनिक प्रणाली यांचा समावेश आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरत्री शताब्दी जन्मोत्सव समिती च्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर व कार्यावर कीर्तन,प्रवचन

पुणे-
श्री महागणेश अधिष्ठान विश्वस्त न्यास संकीर्तनभारती, पुणे , महाराष्ट्र आणि सामाजिक समरसता मंच ,महाराष्ट्र ,गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सव समिती यांच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जीवन चरित्र व त्यांचे कार्य यावर ३०१ कीर्तने प्रवचने व व्याख्याने सर्व समाजात जाऊन करण्याचा संकल्प केला आहे या कार्यक्रमाचा प्रारंभ शुक्रवार दिनांक १० जानेवारी २५ रोजी पुण्यातील धन्वंतरी सभागृह येथे झाला .
या कार्यक्रमास श्री महागणेश अधिष्ठान विश्वस्त न्यासाचे संस्थापक व प्रधान विश्वस्त शक्तिपातमहायोग दिक्षाधिकारी , राष्ट्रीय कीर्तनकार हरीकीर्तन चक्रवर्ती मोरेश्वर बुवा जोशी चऱ्होलीकरमहाराज ,जेजुरी मंदिर संस्थान चे माजी विश्वस्त डॉ. प्रसादजी सुधाकर खंडागळे व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.नंदकुमार एकबोटे तसेच समरसता , गतिविधी पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य मा रवी ननावरे उपस्थित होते .
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि भारत माता व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय कीर्तनकार प.पू. श्री. मोरेश्वर बुवा जोशी चऱ्होलीकर महाराज यांनी केले .त्यानंतर रवी ननावरे यांनी सामाजिक समरसता मंचाच्या कार्याची माहिती सांगितली .
त्यानंतर नंदकुमार एकबोटे व प्रसाद खंडागळे यांनी आपल्या मनोगतातुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनचरित्र सांगितले.
राष्ट्रीय कीर्तनकार मोरेश्वरबुवा जोशी चऱ्होलीकर महाराज यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर कीर्तन करून सर्व उपस्थित कीर्तनकार प्रवचनकार यांना मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाची सांगता महाआरतीने झाली.या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड ,निगडी,तळेगाव येथुन कीर्तनकार व प्रवचनकार आलेले होते.सर्व उपस्थितांनी या उपक्रमात सहभागी होणार असे सांगितले. श्री महागणेश अधिष्ठान विश्वस्त न्यासाचा साधक परिवार व सामाजिक समरसता मंच यांच्या कार्यकर्त्यांनी उत्तम सहकार्य केले त्यामुळे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला .

“भारतीय धार्मिक परंपरेला निधर्मी करणे हा करंटेपणा”- शंकर अभ्यंकर

पुणेः – भारतीय धार्मिक परंपरा आणि संस्कृती ही आपल्या ऐतिहासिक आणि सामाजिक ओळखीचा अविभाज्य भाग आहे. ह्या हजारो वर्षांच्या धार्मिक परंपरेला निधर्मी करणे हा करंटेपणा होता, असे प्रतिपादन विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांनी केले.

भारतीय संस्कृती संगम, पुणे आणि आयडियल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पुष्पात “संतांची सामाजिक समरसता” या विषयावर डॉ. अभ्यंकर बोलत होते. या वेळी त्यांनी संतांच्या जीवनधारणा आणि त्यांच्या शिकवणीच्या माध्यमातून समाजातील समरसतेला प्रोत्साहन देण्याच्या विचारांची मांडणी केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. सुरेश गोसावी अध्यक्ष स्थानी होते.

‘निधर्मी’ पद्धतीला अप्रत्यक्षपणे हल्ला करत डॉ अभ्यंकर म्हणाले, “ह्या धार्मिक परंपरेला केवळ आधुनिक दृष्टिकोनातून पाहणे म्हणजे त्यांचा अपमान करणे होय. समाजाच्या ऐतिहासिक वारशाशी जोडलेली मूल्ये जपणे आवश्यक आहे, अन्यथा ती आपल्यापासून गमावली जाऊ शकतात. आधुनिक धर्मनिरपेक्षतेची संकल्पना भारतीय परंपरेच्या खोल अर्थाशी विसंगत आहे.”

समाजात चांगल्या गोष्टी उद्ध्वस्त केल्या जात असून वाईटाचे उदात्तीकरण होत आहे. त्यामुळे धर्माधिष्ठित लोकांना एकजूट करून वाईट प्रवृत्तीचा पराभव करणे गरजेचे आहे, असे डॉ. अभ्यंकर म्हणाले.

“संतांचं कार्य केवळ आध्यात्मिक उन्नती पर्यंत मर्यादित नव्हतं. त्यांनी सामाजिक समता, न्याय आणि मानवतेसाठी प्रयत्न केले. त्यांचे जीवन व कार्य समाजातील अनेक समानता विरुद्ध लढण्यासाठी एक प्रेरणा ठरले. त्यांनी पारंपरिक सामाजिक रुढी, जातीय भेदभाव, स्त्री भेदभाव, आणि इतर अन्यायपूर्ण परंपरांवर प्रहार केला, आणि तीच शिकवण घेऊन आपल्याला पुढे जायचा आहे.”

“आपण ज्या हिंदू संस्कृतीत जन्म घेतला, ती संस्कृती अत्यंत धन्य आहे. हिंदू धर्माचा मूलभूत तत्त्वज्ञान “वसुधैव कुटुंबकम्” म्हणजेच संपूर्ण पृथ्वी ही एक मोठी कुटुंब आहे. जे लोक आपले हृदय अकशासारखे विशाल ठेवून सर्व जगाला एक कुटुंब मानतात, तेच खरे हिंदू आहेत. हिंदू संस्कृती जगाला एक कुटुंब म्हणून पाहते, आणि याच दृष्टिकोनातून भारताला “देवघर” मानले जाते. आपल्या संतांनी संपूर्ण विश्वाला भारत रुपी देवघर प्रदान केले आहे, कारण त्यांनी जीवनाच्या उच्चतम मूल्यांचे वाचन आणि प्रसार केला, जे आजही आपल्याला प्रेरणा देतात,” असेही ते म्हणाले
.
समरसते विषयी बोलताना डॉ. अभ्यंकर म्हणाले की संतांचा समग्र दृष्टिकोन हा समाजात सर्वसमावेशकता, सहिष्णुता आणि एकोप्याचा होता. “ज्ञानेश्वर, रामदास स्वामी, संत तुकाराम ह्या सारख्या विभूतींनी कधीही जाती, धर्म किंवा सामाजिक स्थितीच्या आधारावर भेदभाव केला नाही. त्यांना सर्व मानवता एकच कुटुंब म्हणून दिसत होती, आणि त्याचाच आधार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘हिंदवी स्वराज्याची’ स्थापना केली.

आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ सुरेश गोसावी म्हणाले, संतांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी शंकर अभ्यंकरांचे कार्य अत्यंत आवश्यक आहे. समाजात समरसता आणण्यासाठी हे महत्त्वाचे आहे.

भारतीय संस्कृती संगम संस्थेचे विश्वस्त गोविंद बेडेकर यांनी मान्यवरांचा सत्कार केला.सुधीर पाचपोर यांनी पद्य सादर केले.श्रद्धा लोळे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले तर श्री ब्रह्मे यांनी आभार प्रदर्शन केले. निनाद केळकरांच्या सुश्राव्य पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

मराठी भाषा जगाने शिकावी: विवेक सावंत

20 व्या जागतिक मराठी संमेलनाचा उत्साहात समारोप
सातारा, ता. १२
“भारत हा मराठी भाषा बोलणाऱ्यांचा जगातील एक मोठा देश आहे. मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. पूर्वीच्या काळात वेगवेगळ्या देशांनी भारतात वसाहती केल्या मात्र आता भारताची मराठी भाषा जगाच्या वेगवेगळ्या देशात वसाहत करत आहे. मराठी भाषेचा प्रसार सर्वदूर होत असून मराठी भाषा जगाने शिकावी” असे प्रतिपादन विवेक सावंत यांनी केले. जागतिक मराठी अकादमी व रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विसाव्या जागतिक मराठी संमेलनाच्या समारोप समारंभात अध्यक्ष म्हणून बोलत होते. याप्रसंगी प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, डॉ. अनिल पाटील, सचिव विकास देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना विवेक सावंत म्हणाले, ” मराठी भाषा टिकवण्याची व समृद्ध करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. मराठी भाषेतून दर्जेदार संवाद कसा करावा याचा एक कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. जागतिक मराठी अकादमीने जर यात पुढाकार घेतला तर एमकेसीएल त्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे तांत्रिक सहाय्य करेल. आपण सर्वजण मिळून आपल्या भाषेचा, आपल्या संस्कृतीचा प्रसार करण्याचा प्रयत्न करूया. “
यावेळी या संमेलनाचे स्वागताध्यक्ष चंद्रकांत दळवी म्हणाले, “तीन दिवस चाललेल्या या जागतिक मराठी संमेलनामुळे रयत शिक्षण संस्थेतील दहा हजारहून अधिक विद्यार्थ्यांना याचा प्रत्यक्ष लाभ झाला आहे. विविध प्रसार माध्यमे, यूट्युब यांच्या माध्यमातून हे संमेलन सातासमुद्रापलीकडे गेले आहे. सर्वच क्षेत्रांना व्यापणाऱ्या या संमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात नक्कीच परिवर्तन होईल.” यावेळी चंद्रकांत दळवी यांनी हे संमेलन यशस्वी केल्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले.
दरम्यान तीन दिवस चाललेल्या या संमेलनामध्ये सातारा शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील यांनीही मनोगत व्यक्त करताना रयत शिक्षण संस्थेच्या शंभर वर्षातील हा सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असा क्षण असल्याचे नमूद केले.
माध्यमिक विभागाचे सहसचिव बी. एन. पवार यांनी आभार मानले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य मीनाताई जगधने, रयत विद्यापीठाचे कुलगुरू ज्ञानदेव म्हस्के, सचिव विकास देशमुख, उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव शिवलिंग मेनकुदळे, ऑडिटर राजेंद्र मोरे, विद्याधर अनासकर, उदय दादा लाड, अशोक पाटील, ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, महेश म्हात्रे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

3-4 महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका:मुख्यमंत्री फडणवीसांची शिर्डीतील अधिवेशनात माहिती

मोदी माधव, तर मतदार केशवमहाराष्ट्रात व्होट जिहादचा दुसरा पार्ट

शिर्डी -विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे सर्वांच लक्ष लागलेले आहे. या निवडणुका कधी होणार, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. शिर्डी येथे भाजपचा राज्यस्तरीय मेळावा आज पार पडला. यावेळी बोलताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन-चार महिन्यात येतील, असे सूतोवाच देवेंद्र फडणवीस यांनी केले.

विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळवल्यानंतर भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. या अनुषंगानेच आज शिर्डी येथे राज्यस्तरीय अधिवेशन बोलावल्याचे म्हटले जात आहे. या अधिवेशनात मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांवार जोरदार हल्ला चढवला. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विधानसभेपेक्षाही मोठा विजय प्राप्त करायचा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका तीन-चार महिन्यात येतील, असे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सुप्रीम कोर्टाचा निकाल येणे बाकी आहे. तो निर्णय आल्यानंतर या निवडणुका होतील. विधानसभेत विजय मिळवला तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा विजय मिळवायचा आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र भाजपसाठी महत्वाचा आहे. ज्यांना श्रद्धा आणि सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत बुरी झाली, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता विरोधकांना टोला लगावला. कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे भाजपला विजय मिळाला असल्याचे म्हणत यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाभारतातील गोष्ट सांगत नरेंद्र मोदी यांना माधव आणि मतदारांना केशव अशी उपमा दिली. या केशव आणि माधव यांच्यामुळे आपल्याला निवडणुकीच्या युद्धात विजय मिळाला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मला कुठल्याही धार्मिक ग्रंथापेक्षा भारताचे संविधान महत्वाचे आहे. कारण हेच संविधान सामान्यांची सेवा करण्यासाठी मला शक्ती देते, असे नरेंद्र मोदी म्हणतात. संविधानाचे यंदाचे अमृतमहोत्सवी वर्ष भारताची लोकशाही मजबूत करण्यासाठी, संविधान रुजवण्यासाठी वापरायचे आहे, असे फडणवीस म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या काळात संविधान विरोधी शक्ती, अराजकतावादी शक्तींचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात पाहायला मिळाला. भाजप आणि मोदींना पराभूत करता येत नाही, असे जेव्हा काँग्रेस, उबाठा, शरद पवारांची पार्टी यांना वाटले, तेव्हा त्यांनी अराजकातावादी सारख्या शक्तींना एकत्र घेऊन या देशात अराजकाता पसरवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. या महाराष्ट्रात व्होट जिहाद, फेक नरेटीव्ह बघितला. परंतु, गेल्या सहा महिन्यात राष्ट्रीय विचारांच्या संघटनांची एकत्र येऊन राष्ट्रवादाचे पुन्हा रोपण केले आणि अराजकतावादी ताकदींना विधानसभा निवडणुकीत पूर्णपणे पराभूत केले. त्यांना पराभूत केले, तरी त्यांच्या कारवाया थांबल्या नाहीत, असा दावाही फडणवीस यांनी केला.

आपल्यासमोर बांगलादेशी घुसखोरांचे मोठे आव्हान आहे. देशात अलिकडच्या काळात बांगलादेशी घुसखोर सापडत आहेत. ते कागदपत्रे बनवून मतदार याद्यांमध्ये घुसत असल्याचा दावा केला. मालेगावमधून शेकडो नवीन जन्मप्रमाणपत्र लोकांना मिळाले. मालेगाव, अमरावतीतील अंजनगाव याठिकाणी अचानक 100 लोकांना जन्म प्रमाणपत्र मिळत आहे. 50-60 वर्षांचे लोक जन्मप्रमाणपत्र काढत आहेत. हा व्होट जिहादचा पार्ट सुरू झाला आहे, असा धक्कादायक दावा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. या घुसखोरांना बाहेर काढण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. एक हैं तो सेफ हैं हे पंतप्रधान नरेंद्र मोदींजींनी सांगितले आणि ते निवडणुकीत खरे ठरले, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पालिका आणि पंचायतीत विरोधकांना बसायला जागा ठेऊ नका – अमित शहा

0

शिर्डी- आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये विधानसभेपेक्षाही मोठा विजय झाला पाहिजे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले. शरद पवारांनी जे धोकेबाजीचे राजकारण सुरू केले होते त्याला 20 फुट खाली जमिनीत आपण गाडून टाकले आहे. उद्धव ठाकरेंनी आपल्यासोबतचे द्रोह केले होते, 2019 ला विचारधारा सोडली, बाळासाहेबांची विचारधारा सोडली, अशा उद्धव ठाकरे यांना आपण सर्वांनी मिळून त्यांची जागा दाखवून दिली आहे. 2024 पर्यंत महाराष्ट्र अस्थिर होते, त्याला स्थिर करण्याचे कार्य तुम्ही सर्वांनी मिळून मजबूत देवेंद्र फडणवीस सरकार आणून केले आहे, असे अमित शहा म्हणाले. काही निवडणूक या देशाच्या राजकारणाला बदलून टाकतात. विरोधकांचे महाराष्ट्रात येण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. पुन्हा एकदा परिवारवादाचे राजकारण करणाऱ्यांना कानफडात मारत महाराष्ट्राच्या जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेनाच बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे आणि अजित पवार यांचीच खरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी असल्याचे महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिल्याचे अमित शहा म्हणाले.

महावितरणला सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय पुरस्कार

मुंबई, दि. १२ जानेवारी २०२४ :  शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा कऱण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या नाविन्यपूर्ण योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल महावितरण आणि एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर लिमिटेड कंपनीला शनिवारी बेळगावी येथे आयपीपीएआय पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याचसोबत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल विविध वर्गवारीतील एकूण आठ पुरस्कार देऊन महावितरणचा सन्मान करण्यात आला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चा गौरव झाल्याबद्दल महावितरणचे आणि अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांच्या नेतृत्वाखालील एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर लिमिटेड कंपनीचे अभिनंदन केले. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी मा. मुख्यमंत्र्यांचे आभार मानले असून कंपनीच्या गौरवाबद्दल महावितरणचे वीज ग्राहक तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

इंडिपेंडेन्ट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (आयपीपीएआय) या राष्ट्रीय संस्थेने देशभरातील विद्युत कंपन्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून हे पुरस्कार दिले. सौरऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करायची व त्या आधारे कृषी फीडर्स चालवून शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी दिवसा वीज पुरवठा करायचा अशी नाविन्यपूर्ण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० महावितरणतर्फे राज्य सरकारचा ऊर्जा विभाग व एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर लिमिटेड कंपनीच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अंमलात येणारी ही योजना शेतकऱ्यांना लाभदायक ठरण्यासोबत उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा बोजा कमी करणारी आणि एकंदरितच ऊर्जा क्षेत्रात परिवर्तन करणारी आहे. या योजनेमुळे कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत होणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणला शनिवारच्या सोहळ्यात दोन पुरस्कार देण्यात आले.

महावितरणचे प्रशिक्षण विभागाचे प्रमुख मुख्य महाव्यवस्थापक दत्तात्रय बनसोडे, वितरण विभागाचे अधीक्षक अभियंता अमित बोकील, विशेष प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता शरद बंड, उपकार्यकारी अभियंता आरती कुलकर्णी व सामग्री विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश देठे यांनी कंपनीतर्फे पुरस्कार स्वीकारले.

ग्राहकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या गटात असाधारण कामगिरी करणारी विद्युत वितरण कंपनी म्हणून महावितरणची निवड कऱण्यात आली. विद्युत वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाची कंपनी म्हणून महावितरणला पुरस्कार देण्यात आला. बड्या विद्युत वितरण कंपन्यांच्या गटात पहिल्या तीन सर्वोत्कृष्ट कंपन्यांमध्ये महावितरणचा समावेश झाला.

महावितरणला माहिती तंत्रज्ञानाचा कल्पक वापर करण्याबद्दल, विकेंद्रित स्वरुपात बॅटरी स्टोरेज सिस्टिम विकसित करण्याबद्दल आणि प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल असे आणखी तीन पुरस्कार प्राप्त झाले.

राज्यातील विद्यापीठांमध्ये सायबर सुरक्षेबाबत अल्पकालीन अभ्यासक्रम राबविण्यात येईल- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

पुणे, दि. १२: राज्यातील सर्व कुलगुरूंची बैठक घेऊन सायबर सुरक्षेबाबत अल्पकालीन अभ्यासक्रम तयार करण्यासह सर्व विद्यापीठात राबविण्यात येईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. हे अभ्यासक्रम राबविल्यामुळे सायबर योद्ध्यांची एक नवीन पिढी तयार होईल, असेही ते म्हणाले.

‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा अवॉर्ड्स’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, महाराष्ट्र सायबरचे उप महानिरीक्षक संजय शिंत्रे, क्विक हील फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर, क्विक हील टेक्नॉलॉजीस लि. चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास काटकर, सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय काटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल साळवी, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

स्वामी विवेकानंदांना जयंतीनिमित्त अभिवादन करून राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले, स्वामी विवेकानंदांची शिकवण लाखो लोकांना, विशेषतः तरुणांना, धैर्याने, शहाणपणाने आणि उद्देशाने नेतृत्व करण्यासाठी प्रेरणा देत आहे. त्यामुळे क्विक हील फाउंडेशनने आयोजित केलेल्या सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा पुरस्कारांमध्ये युवकांसोबत सामील होताना आनंद होत आहे.

२०१६ पासून हा कार्यक्रम सुरू करून आतापर्यंत ५४ लाख लोकांपर्यंत सायबर सुरक्षेबद्दल जागरूकता केल्याबद्दल फाउंडेशन आणि क्विक हील टेक्नॉलॉजीसचे अभिनंदन करून राज्यपाल म्हणाले, फाउंडेशनने समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यावर आणि सायबर-सुरक्षित समाज निर्माण करण्यासाठी त्यांना सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या फाउंडेशन बरोबर जोडले जाऊन तळागाळापर्यंत काम केलेले सर्व ‘सायबर वॉरियर्स’ कौतुकास पात्र आहेत.

ते पुढे म्हणाले, सायबर सुरक्षा ही भारतासह जगभरातील सर्वात गंभीर चिंतांपैकी एक म्हणून उदयास आली आहे, आज आपण पेमेंट स्वीकारण्यासाठी आणि करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानावर अधिकाधिक अवलंबून आहोत. अगदी अशिक्षित छोटा विक्रेता देखील डिजिटल पेमेंट स्वीकारतो. हे प्रधानमंत्री मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या तंत्रज्ञानाचे यश आहे.

तंत्रज्ञान पुढे जात असताना चुकीचे काम करणारे लोकदेखील वाढत आहेत. तथापि, त्यांची साखळी तोडणे आणि त्यांना पकडण्याचे कामदेखील आपल्याला करावे लागणार आहे. आज सायबर गुन्हेगारीत स्थिर गतीने वाढ होत आहे. त्यामुळे प्रत्येकाला सायबर गुन्हेगारीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. दुसऱ्या बाजूला सामान्य नागरिक त्याचा पैसा गमावणार नाही अशी यंत्रणा आपल्याला विकसित करावी लागेल. नुकसानीनंतर उपाययोजना करण्यापेक्षा नुकसानीला प्रतिबंध करण्याच्या आवश्यकतेवर राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी भर दिला.

शासनाच्या सायबर शाखेतील पोलीसांनाही अशा फाउंडेशनद्वारे सायबर गुन्हेगारीच्या विरोधात कसे काम करता येईल यासाठी संगणक यंत्रणेचे पुरेसे ज्ञान देण्यासाठी प्रशिक्षण देण्याची गरज आहे. सायबर गुन्हेगार अनेकदा इतर देशातून काम करत असल्यामुळे या आव्हानांना तोंड देण्यासाठी बहुआयामी दृष्टिकोन आवश्यक आहे. त्यामध्ये नवीन कायदे करण्यासह असलेली धोरणे अधिक मजबूत करणे, सायबरसुरक्षेत अधिक गुंतवणूक करणे, यासह जागरूकता पसरवण्यावर अर्थात तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांना आणि विशेषत: विद्यार्थ्यांना सुरक्षित ऑनलाइन पद्धतींबद्दल शिक्षित करणे यावर भर द्यावा लागेल, असेही ते म्हणाले.

अनुपमा काटकर म्हणाल्या, सायबर शिक्षा हा उपक्रम विद्यार्थ्यांना सक्षम करणे, आणि सर्वांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी त्यांना पुढे आणण्यासाठी राबविला आहे. हा उपक्रम केवळ सायबर सुरक्षेबाबत जागृती करण्यासाठीच नसून छोट्या शहरातील वंचित घटकातील विद्यार्थ्यांना एक आवाज देण्याचा, तेथील समाजघटकामध्ये या क्षेत्रात त्यांचे नेतृत्त्व तयार करण्याचा उपक्रम आहे.

यावेळी सायबर शिक्षा फॉर सायबर सेक्युरिटी उपक्रमात उत्कृष्ट काम केलेले प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी यांना सायबर वॉरियर्स पुरस्कार वितरीत करण्यात आले.