Home Blog Page 501

साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभास उपमुख्यमंत्री अजित पवार येणार

संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही
पुणे : सरहद, पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभास उपस्थित राहण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्य केले असून संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन आज दिले.
98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत दिल्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी (तालकटोरा स्टेडियम) येथे होत आहे. दि. 23 रोजी आयोजित समारोप सोहळ्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही उपस्थिती असणार असून उपमुख्यमंत्री पवार यांनी या प्रसंगी उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे. संमेलनाचे आंतरराष्ट्रीय समन्वयक डॉ. सतिश देसाई आणि व्यवस्थापन समिती सदस्य युवराज शहा यांनी आज (दि. 14) मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन संमेलनास उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिले.
निमंत्रणाचा अजित पवार यांनी स्वीकार केला असून अनेक वर्षांनंतर दिल्लीत संमेलन होत असून मराठी भाषेची अस्मिता जपण्यासाठी आणि शासन म्हणून सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही पवार यांनी दिली असल्याचे डॉ. देसाई यांनी सांगितले.
दिल्लीत होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून साहित्यप्रेमी दिल्लीस येण्यास इच्छुक असल्याचे डॉ. देसाई आणि शहा यांनी अजित पवार यांना सांगितल्यानंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला अभिमान वाटेल अशा पद्धतीने संमेलन यशस्वी करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

जन्म-मृत्यूचा पट उलगडाणाऱ्या ‌‘दास्तान ए रामजी‌’ने रसिक मंत्रमुग्ध

पुणे : दि. बा. मोकाशी यांच्या ‌‘आता आमोद सुनासि आले‌’ या कथेवर आधारित ‌‘दास्तान ए रामजी‌’ या अनोख्या प्रयोगाद्वारे अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी यांनी रसिकांना जन्ममृत्यूचा पट उलगडणाऱ्या कथेत खिळवून ठेवले. सृजन फाऊंडेशन आयोजित सृजन महोत्सवातील दुसऱ्या दिवशी (दि. 14) हा अनोखा कार्यक्रम सादर करण्यात आला.
केंबळ खेड्यात पावसाने अनेक दिवस धरलेली संततधार, त्यामुळे गावातील नदीला आलेला पूर, त्यातच वाहून गेलेला रामजी लोहाराचा मुलगा, त्यामुळे रामजीच्या आयुष्यात साचलेले दु:ख, नियतीचा खेळ भोगताना रामजीला आलेले रिकामपण, वारसाहीन झालेले आपले घराणे, 30 वर्षांहून अधिक काळ केलेली पंढरीची वारी, ज्ञान-अज्ञानाच भेद कथन करणारी ज्ञानेश्वरी असे अनेक पैलू असणाऱ्या या कथेचे प्रभावी सादरीकरण अनुभवताना रसिक त्या कथेशी, पात्रांशी एकरूप झाले आणि ते जणू ही कथा जगले.
दु:खात कुठलेही शब्द समाधान देत नाहीत हे वास्तव मांडताना लेखकाने रामजीच्या आयुष्यात घडलेल्या अनेक घटनांचे आणि पात्रांचे अतिशय चपखल वर्णन केले आहे. काही घटना व प्रसंगातून रामजीला अज्ञेयाशी झटपट करून आपल्या आयुष्यातील गमावलेले क्षण परत मिळविण्याचा प्रयत्न करणे आणि त्यातून काही क्षणांकरीता सृजनाचा आनंद मिळविणे याचे भावपूर्ण वर्णन कलाकारांनी अतिशय तन्मयतेने सादर करून रसिकांना कथानकाशी पूर्णवेळ खिळवून ठेवले.
या अनोख्या प्रयोगाविषयी माहिती सांगताना अक्षय शिंपी म्हणाले, मनोरंजनाची साधने उपलब्ध नसतानाच्या काळात मौखिक परंपरा जपत कथामालिका सांगत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी उर्दू भाषा परंपरेत अशा प्रकारे सादरीकरण केले जात असे. सादरीकरणाचा हा प्रकार पर्शिया येथून भारतात आला आणि अवध प्रांतांत स्थिरावला त्यामुळे आम्ही अवध प्रदेशातील व्ोशभूषा परिधान करून सादरीकरण करत आहोत.
कलाकारांचा सत्कार सृजन फाऊंडेशनचे उपाध्यक्ष पोपटलाल शिंगवी यांनी तर प्रास्ताविक फाऊंडेशनचे अध्यक्ष अधीश प्रकाश पायगुडे यांनी केले.
महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी उद्या (बुधवार, दि. 15) सृजन फाऊंडेशन आणि कोहिनूर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या सृजन-कोहिनूर गौरव पुरस्काराने नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे संस्थापक-अध्यक्ष विठ्ठल काटे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ निरुपणकार उल्हास पवार यांच्या हस्ते होणार असून प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात‘कोलाहल’

स्मिता तांबे आणि शुभांगी भुजबळ मध्यवर्ती भूमिकेत

२१ व्या  थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची  शानदार सुरुवात झाली असून विविध आशियाई देशांतील  चित्रपटांची  मेजवानी रसिकांना  मिळत आहे. या महोत्सवात अभिनेत्री स्मिता तांबे आणि  शुभांगी भुजबळ यांची भूमिका असलेल्या ‘कोलाहल’ या   लघुपटाचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.  बुधवार १५ जानेवारीला अंधेरीच्या मुव्ही मॅक्स चित्रपटगृहात दुपारी २.१५ वा. हा लघुपट  रसिकांना पहाता येईल.  

सोनाली लोहार  लिखित आणि  संतोष पाठारे  दिग्दर्शित ‘कोलाहल’ या लघुपटाची कथा ऐकू न येणाऱ्या एका  स्त्री भोवती फिरते. थर्ड आय आशियाई चित्रपट या नावाजलेल्या महोत्सवात ‘कोलाहल’चे विशेष स्किनिंग होत असल्याचा आनंद अभिनेत्री स्मिता तांबे हिने व्यक्त केला. आपल्या वेगळ्या धाटणीच्या भूमिकांसांठी स्मिता तांबे ओळखली जाते. ‘कोलाहल’ लघुपटातील भूमिका आणि हा लघुपट प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेईल असा विश्वास दिग्दर्शक संतोष पाठारे यांनी व्यक्त केला. या लघुपटाची निर्मिती रुपाली भारद्वाज आणि आरती पाठारे यांनी केली आहे.

या महोत्सवात नव्या दमाच्या दिग्दर्शकांचं विशेष सत्र आयोजित करण्यात  येणार आहे.  या चर्चा सत्रात देश-विदेशातील दिग्दर्शक चित्रपटातील आपले अनुभव  व  चित्रपट विषयाशी निगडीत चर्चा  करणार आहेत. चर्चेत चंदन आनंद, सनी हिंदुजा या  दोन  होतकरू दिग्दर्शकांसोबत हिरेन बोरा, जदुमणी दत्ता, समिक रॉय चौधरी हे देखील सहभागी होणार आहेत.

श्रीराम पथकाच्या वतीने रॅली काढत स्वामी विवेकानंदाना अभिवादन

श्रीराम पथक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजन : २०० हून अधिक वादकांचा सहभाग 
पुणे: श्रीराम पथक चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे विवेकानंद जयंती आणि राष्ट्रीय युवा दिनानिमित्त दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या फेरी मध्ये १०० दुचाकी आणि शोभा रथ यांचा सहभाग होता. दुचाकी रॅलीमध्ये २०० हून अधिक नागरिकांचा सहभाग होता. 
फेरीचे आयोजन प्रमुख म्हणून अभिजीत गरवारे, प्रणीत गराटे, वैभव महाशब्दे, पंकज वर्तक यांनी काम पाहिले. रॅलीचा समारोप शिव व्याख्याते आणि लेखक सौरभ कर्डे यांच्या व्याख्यानाने झाली. यावेळी रा. स्व. संघाचे पर्वती भाग कार्यवाह दर्शन मिरासदार, सहकार्यवाह महेश डाबी आणि बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहायक आयुक्त प्रदीप आव्हाड, ट्रस्टचे अध्यक्ष विलास शिगवण आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. 

सारसबाग बागेमागील मैदान, अभिनव चित्रशाळा चौक, एस पी कॉलेज चौकातून डावीकडे निलायम पूल,  राजीव गांधी ई लर्निंग स्कूल चौकात उजवीकडे, मुक्तांगण शाळा, वाळवेकर नगर सातारा रस्ता चौक उजवीकडे, स्वामी विवेकानंद पुतळा पद्मावती येथे रॅलीचा समारोप झाला.  सूत्रसंचालन मयंक पुरंदरे यांनी केले. देवेंद्र आठवले यांनी आभार मानले.

देशात वन्य प्राण्यांसाठी सरकारकडे एकही हॉस्पिटल नाही माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी

सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त वन्यजीव संरक्षक पर्यावरण परिषद आणि पुरस्कार वितरण
पुणे : भारतीय जंगले ही ३० वर्षात मोठ्या प्रमाणात कापली गेली. जंगल आणि प्राणी हे परस्परावलंबी आहेत. त्यामुळे जंगल वाचवायची असतील तर मांस खाणे हे कायद्याने बंद व्हायला हवे. वन्यजीव विषयक कायदे आपण शिकायला हवे. देशात वन्य प्राण्यांसाठी सरकारकडे एकही हॉस्पिटल नाही, हे दुर्देवी आहे, असे माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी सांगितले.

सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रीय कर्तव्य परिषद पुणे आणि राष्ट्रीय वन्यजीव संरक्षण पर्यावरण परिषदेचे आयोजन सोयरे वनचरे सामाजिक संस्था, स्वर्गीय बेनके गुरुजी सोशल ट्रस्ट, यांच्या सहयोगाने  घोले पाटील रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले. यावेळी  गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, पद्मश्री गिरीश प्रभुणे, राष्ट्रीय कर्तव्य अभियान मुख्य संयोजक विजय वरूडकर, नारीशक्ती पुरस्कार प्राप्त सर्पमित्र वनिता बोराडे, डॉ. हेडगेवार स्मारक सेवा समितीचे कोषाध्यक्ष अभय माटे, ह.भ.प. अक्षय महाराज भोसले, डी भास्कर, अभय माटे, रमेश अग्रवाल, बापू पाडळकर, गणेश बाकले  यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना स्वामी विवेकानंद जीवनगौरव पुरस्कार आणि मनेका गांधी यांना राजमाता जिजाऊ पुरस्काराने गौरविण्यात आले. वन्यजीव रक्षक सर्पमित्र एस.बी.रसाळ, विनय कुलकर्णी, डॉ गणेश गायकवाड, ह.भ.प.कु राजश्री कडगल, बाळ काळणे, सूकेश झंवर यांना  विवेकानंद वन्यजीव रक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेचे दिवंगत विश्वस्त सामाजिक कार्यकर्ते स्व नारायणकुमार फड यांच्या नावाने सामाजिक कार्यकर्ता प्रथम पुरस्कार स्वप्नील गंगणे यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्यासह योगाचार्य रमेश अग्रवाल लिखित ‘आरोग्य साक्षरता’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.

मनेका गांधी म्हणाल्या, अनेक प्राणी संग्रहालय ही अनाधिकृत आहेत, तिथे काम करणारे प्रशिक्षित नाहीत. त्यामुळे प्राणी व पक्षी प्रेमींनी याकरिता एकत्र येण्याची गरज आहे. वन्यजीव, पक्षी प्राणी यांचे संरक्षण केले तरच पर्यावरण समतोल राहील असे त्यांनी सांगितले.

शेखर मुंदडा म्हणाले, महाराष्ट्रातील सर्व गोशाळांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे आमचे ध्येय आहे. अंत्यविधी करता लाकूड नाही, तर शेणाच्या गोवऱ्या वापरल्या तर गाय आणि झाडे दोन्ही वाचतील. त्यामुळे गोआधारित शेती प्रशिक्षण सुरु असून गाय वाचली तर देश वाचेल, असेही त्यांनी सांगितले.

गिरीश प्रभुणे म्हणाले, भारत हा प्रतिभावान देश आहे. त्यामुळे त्याचा शोध घ्यायला हवा. पक्षी, प्राणी आणि निर्सगाने समृद्ध असा हा देश होता. त्या गोष्टी आपल्याला आता दिसत नाहीत. परंपरा आणि आधुनिकता मिळून शिक्षणपद्धती राबविणे आवश्यक आहे. तरच प्रतिभावान भारताची पुर्ननिर्मिती होऊ शकेल.

विजय वरुडकर म्हणाले, प्राणी मित्रांचे सक्षमीकरण व्हावे, त्यांना येणाऱ्या अडचणी दूर करता याव्या, हा आमचा प्रयत्न आहे. वन्यजीव रक्षक आणि संस्था कार्यकर्ता यांचे फेडरेशन व्हावे, ही आमची इच्छा आहे. त्यामुळे परिषदेत वन्यप्राण्यांच्या संरक्षण, वन्यजीव रक्षक यांच्या समस्या व निवारण उपाय यावर विषयी चर्चा व विचारमंथन झाले. वन्यजीव रक्षकांचे राज्य पातळीवर संघटन बांधणी व सक्षमीकरण हे या परिषदेचे महत्व होते, असेही त्यांनी सांगितले.  

याशिवाय विवेकानंद वक्तृत्व स्पर्धा २०२५ चे बक्षीस वितरण देखील कार्यक्रमात झाले. सुनील बेनके ज्योत्स्ना वरूडकर, पौर्णिमा इनामदार, सारिका शेठ, विक्रमादित्य शिंदे, विशाल वरूडकर, ऍड कान्होपात्रा गायकवाड, रवींद्र वाघोले, जगदीश गरऋषी, बाबू शिवांगी, उमेश दुगानी, चेतन मराठे, सागर पाटील यांनी कार्यक्रम संयोजन केले.

अचूक बिलिंगसाठी सदोष, नादुरुस्त मीटर तातडीने बदला

महावितरणचे सीएमडी श्री. लोकेश चंद्र यांचे निर्देश

पुणेग्राहकसेवेच्या कृती मानकांनुसार निश्चित केलेल्या कालावधीत मागेल त्यांना नवीन वीजजोडणी त्वरीत देण्यात यावी. सोबतच महावितरण व वीजग्राहकांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आणि अचूक बिलिंगसाठी नादुरुस्त व सदोष वीजमीटर तातडीने बदलण्यात यावेत असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी मंगळवारी (दि. १४) दिले.

पुणे येथील ‘प्रकाशभवन’मध्ये आयोजित पुणे प्रादेशिक विभागातील विविध कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे, मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार (पुणे), श्री. धर्मराज पेठकर (बारामती), श्री. स्वप्निल काटकर (कोल्हापूर), प्रभारी महाव्यवस्थापक (वित्त) सौ. माधुरी राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र म्हणाले, की वीजग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटचे बिलिंग होणे आवश्यक आहे. मात्र नादुरुस्त किंवा सदोष वीजमीटरमुळे महावितरण व ग्राहकांना आर्थिक फटका बसतो. वीजग्राहकांना मासिक वीजवापर देखील अचूक कळत नाही. त्यामुळे प्राधान्याने नवीन वीजजोडण्या देण्यासोबतच सदोष व नादुरुस्त वीजमीटर बदलण्यास वेग देण्यात आला आहे. नवीन वीजमीटर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे नादुरुस्त, सदोष वीजमीटर तातडीने बदलण्यात यावेत, अशी सूचना यावेळी त्यांनी केली.  

वीजबिलांच्या वसूलीमध्ये सुमारे ८५ ते ९० टक्के वीजग्राहक नियमित वीजबिल भरतात. मात्र उर्वरित १० ते १५ टक्के ग्राहक वीजबिल भरण्याकडे दरमहा दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे थकबाकी वाढत जाते. अशा थकबाकीदार ग्राहकांवर लक्ष केंद्रीत करून थकबाकी व चालू वीजबिल वसूलीवर भर द्यावा. प्रामुख्याने उच्चदाब वर्गवारीमध्ये ग्राहकांकडे थकबाकी वाढणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यांची थकबाकी महावितरणकडे जमा असलेल्या अनामत रकमेएवढी झाल्यास वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्याची कार्यवाही करावी असे श्री. लोकेश चंद्र यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, राज्याच्या वीजक्षेत्रात महावितरणची आश्वासक वाटचाल सुरु आहे. ऐन हिवाळ्यात शनिवारी (दि. ११) २५ हजार ८०८ मेगावॅट विजेची विक्रमी मागणी होती. ती पूर्वनियोजनामुळे अतिरिक्त वीज खरेदी न करता पूर्ण करण्यात आली. अन्य राज्यांच्या तुलनेत महावितरणकडून सर्वाधिक मागेल त्यांना सौर कृषिपंप देण्यात आले आहेत. तसेच मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे सोबतच प्रामुख्याने औद्योगिक व व्यावसायिक वीजदर देखील कमी होणार आहे. त्यामुळे या योजनेच्या वेगवान अंमलबजावणीसाठी युद्धपातळीवर कामे पूर्ण करावीत. त्यासाठी महसूल विभागाशी समन्वय ठेवावा असे निर्देश अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी दिले.  

या बैठकीला अधीक्षक अभियंते सर्वश्री विजयानंद काळे, अरविंद बुलबुले, सिंहाजीराव गायकवाड, युवराज जरग, अमित कुलकर्णी, अनिल घोगरे, संजीव नेहेते, गणपत लटपटे, दीपक लहामगे, भाऊसाहेब हळनोर, चंद्रशेखर पाटील, पुनम रोकडे, सुरेश सवाईराम (प्रभारी), साईप्रकाश आरळी (प्रभारी) आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जतिन, खूश अंतिम फेरीत दाखल

योनेक्स सनराईज पीवायसी एचटीबीए अमनोरा कप १५ वी जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धा

हवेली तालुका बॅडमिंटन संघटनेच्या वतीने आयोजन 

पुणे: जतिन सराफ, खूश दीक्षित यांनी पीवायसी एचटीबीसी-अमनोरा कप जिल्हा सुपर-५०० मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत १३ वर्षांखालील मुलांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखान्याच्या बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील १३ वर्षांखालील मुलांच्या उपांत्य फेरीत अग्रमानांकित जतिन सराफने सातव्या मानांकित प्रथमेश जगदाळेवर २१-८, २१-१२ असा विजय मिळवला. त्याची लढत दुस-या मानांकित खूश दीक्षित विरुद्ध होईल. खूशने दुस-या उपांत्य लढतीत सिद्धार्थ सामंतवर २१-७, २१-९ असा विजय मिळवला.

माधव-चिन्मय यांच्यात फायनल

स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलांची अंतिम लढत माधव कामत आणि चिन्मय फणसे यांच्यात होईल. उपांत्य फेरीत माधव कामतने विहान कोल्हाडेला २१-१७, २१-१६ असे नमविले. यानंतर दुस-या मानांकित चिन्मय फणसेने अनय एकबोटेवर २१-१४, २१-१२ असा विजय मिळवला.

शरयू, सोयराची आगेकूच

स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलींच्या उपांत्य फेरीत अग्रमानांकित शरयू रांजणेने सान्वी पाटीलला २१-७, २१-१३ असे, तर सोयरा शेलारने ख्याती कत्रेला २१-१२, १८-२१, २१-१४ असे नमविले. युतिका-सफा आमनेसामनेस्पर्धेतील १९ वर्षांखालील मुलींच्या उपांत्य फेरीत अग्रमानांकित युतिका चव्हाणने मनीषा विष्णूकुमारला २१-१७, २१-१८ असे नमविले. दुस-या उपांत्य फेरीत सफा शेखने जिया उत्तेकरचे आव्हान २२-२०, २०-२२, २१-३ असे परतून लावले.

मुलांच्या गटात सुदीप खोराटेने अंतिम फेरीत प्रवेश केला. सुदीपने श्लोक डागाला २४-२२, १५-२१, २१-१६ असे नमविले. आता त्याची अंतिम लढत चौथ्या मानांकित ओजस जोशीविरुद्ध होईल. ओजसने देवांश सकपाळवर २१-११, २१-१२ असा विजय मिळवला.

निकाल – १७ वर्षांखालील मुले – उपांत्यपूर्व फेरी – अर्हम रेदासानी वि. वि. अभिज्ञ सिंघा २२-२०, २१-१५, ओजस जोशी वि. वि. विहान कोल्हाडे २१-६, २१-९, विहान मूर्ती वि. वि. शार्दूल अवारी २१-१६, २१-१६, कपिल जगदाळे वि. वि. नितीन एस. ७-२१, २१-१८, २१-१७.

१७ वर्षांखालील मुली – उपांत्यपूर्व फेरी – शरयू रांजणे वि. वि. नाव्या रांका २१-१०, २१-१३, ख्याती कत्रे वि. वि. एस. डाखणे २६-२४, २१-१२, सोयरा शेलार वि. वि. सान्वी पाटील २१-१२, २१-११, मनीषा विष्णूकुमार वि. वि. भक्ती पाटील २१-१७, २१-११.

३५ वर्षांवरील पुरुष एकेरी – उप-उपांत्यपूर्व फेरी – चैतन्य डोणे वि. वि. साईकिरण एल्ला २१-१५, २१-११, पंकज अरोरा वि. वि. विपूल अन्वेकर २१-१५, २१-१५, नवीनकुमार वि. वि. जावेद शेख २१-७, २१-८, दर्शन सेलोत वि. वि. जतिन ठक्कर २१-१२, २१-१७, सौरभ राय वि. वि. शौनक गाडगीळ २१-१८, २१-१८, हर्षद भागवत वि. वि. सुनील जयस्वाल २१-६, २१-८.

मुंबईहून मिळाला अलर्ट अन ,हडपसरमधील एटीएम मशीन फोडणार्‍यास जागेवरच अटक

पुणे-हडपसरमधील घुले वस्ती येथील एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये पहाटे साडेचार वाजता शिरुन मशीनची तोडफोड करु लागला. लागलीच त्याचा अलर्ट मुंबईहून हडपसर पोलीस ठाणे आणि ११२ ला मिळाला. तातडीने पोलीस संबंधित एटीएम सेंटरमध्ये पोहचले आणि तोडफोड करणार्‍या चोरट्याला पकडले.

शंभू कुमार श्रीनगेंद्र सिंग महतो (वय २९, रा. गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक) असे या चोरट्याचे नाव आहे. याबाबत एटीएम सर्व्हिलन्स अधिकारी हर्षल सुरेंद्र सुतार (वय ३७, रा. आदर्शनगर, उरुळी देवाची) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मांजरी येथील घुले वस्तीमधील एचडीएफसी बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये सोमवारी पहाटे साडेचार वाजता घडला.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घुले वस्तीत एचडीएफसी बँकेचे एटीएम सेंटर आहे. हे सेंटर इंटरनेटद्वारे मुंबईतील सर्व्हरशी जोडले गेले आहे. त्याच्यावर २४ तास सीसीटीव्हीमार्फत नजर ठेवली जाते. पहाटे साडेचार वाजता शंभु महतो हा एटीएम सेंटरमध्ये शिरला. त्याने एटीएम मशीनमध्ये छेडछाड करण्यास सुरुवात केली. त्याबरोबर मुंबईतील सेंटरला याची खबर लागली. त्यांनी एकाचवेळी ११२ आणि हडपसर पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. शंंभु याने मशीनचे समोरील बॉक्स बाहेर काढला. त्याचे पैसे बाहेर येतात, ते काऊंटर तोडले, मशीन उघडण्याचा प्रयत्न करु लागला. मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत पोलीस तेथे पोहचले. त्यांनी शंभु महतो याला अटक केली. पोलीस अंमलदार शिंदे तपास करीत आहेत.

दिल्ली-पुणे विमान प्रवासात बॅगेतील 1 लाख 80 हजाराची रोकड चोरीला

पुणे-दिल्ली मेट्रो स्टेशन येथे एअर इंडियाच्या काऊंटरवर बॅग दिल्यानंतर पुणे विमानतळावर बॅग परत घेतली असता बॅगेतील १ लाख ८० हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत प्रसन्न विजय नहार (वय ४२, रा. यमुनानगर, निगडी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार दिल्ली ते पुणे विमान प्रवासात १२ जानेवारी रोजी सायंकाळी सहा ते १३ जानेवारी रोजी मध्यरात्री बारा वाजेच्या दरम्यान घडला.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फियार्दी हे दिल्ली ते पुणे विमानाने प्रवास करत होते. त्यांनी न्यू दिल्ली मेट्रो स्टेशन येथे एअर इंडिया कंपनीचे काऊंटरवर बॅग चेक इन साठी बॅग दिली. त्यानंतर ते पुणे विमानतळावर उतरले. बेल्ट नं. ३ वरुन त्यांनी बॅग घेतली. बॅग उघडली असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी बॅग तपासली असता बॅगेत ठेवलेले १ लाख ८० हजार ४५० रुपये चोरीला गेल्याने लक्षात आले. दिल्ली ते पुणे विमान प्रवासात ही चोरी झाली.

विमान प्रवासात बॅगेतील रोकड, वस्तू चोरीला जाण्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी दुबई ते पुणे विमान प्रवासात प्रवाशाच्या बॅगेचे लॉक तोडून त्यातील वस्तू चोरीला गेल्या प्रकरणी दोन गुन्हे विमानतळ पोलीस ठाण्यात नोंदविले गेले आहेत. त्याचा तपास लागला नसताना आता तिसर्‍या चोरीची घटना समोर आली आहे.

भर दिवसा भर रस्त्यावर, साडेतीन लाख रुपयांची कॅश मारहाण करून लुटण्याचा प्रयत्न अयशस्वी:चोरटे पळून गेले

पुणे-पेट्रोल पंपावरील साडेतीन लाख रुपयांची कॅश बँकेत भरण्यासाठी पायी जात असताना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मॅनेजरला मारहाण करुन पैशांची बॅग तिघा चोरट्यांनी लुटण्याचा प्रयत्न केला. या चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली तरी त्यांनी पैशांची बॅग काही सोडली नाही. तेव्हा ते चोरटे पळून गेले.

याबाबत सलीम सिंकदर शेख (वय ३१, रा. खडकवासला) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातफिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तिघा चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कात्रजमधील माऊलीनगरमधील जनता सहकारी बँकेसमोर सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता घडली. याबाबत सलीम शेख यांनी सांगितले की, कात्रज कोंढवा रोडवरील ए एम के इंटरप्राईज यांच्या पेट्रोल पंपावर गेली १० वर्ष ते मॅनेजर म्हणून काम करतात. पेट्रोल पंपावरील कॅश ते नेहमी पायी चालत जवळच असलेल्या जनता बँकेत भरणा करतात. सोमवारी पेट्रोल पंपावर दोन दिवसांची ३ लाख ४६ हजार रुपयांची कॅश बँकेत भरणा करण्यासाठी नेहमीप्रमाणे ते जात होती. पेट्रोल पंपावरुन त्यांनी रोड क्रॉस करुन समोरील फुटपाथवर आले. फुटपाथवरुन जनता बँकेत जात असताना एकाने त्यांना माऊलीनगरचा पत्ता विचारला. त्यांनी त्याला हेच माऊलीनगर आहे. तुम्हाला कोठे जायचे, असे विचारले. तोपर्यंत दोघे जण त्यांच्यापर्यंत आले. त्यांच्या हातातील पैशांची बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी बॅग काही सोडली नाही. त्यांनी हाताने व लाकडी दांडक्याने त्यांच्या डोक्यात मारहाण करुन जखमी केले. तरीही त्यांनी पैशांची बॅग शेवटपर्यंत सोडली नाही. त्यांचा आरडाओरडा ऐकून लोक जमा होत असल्याचे पाहून हे तिघे चोरटे पळून गेले.

सलिम शेख यांनी तातडीने ही बाब पोलिसांना कळविली. हे तिघेही चोरटे साधारण १९ ते २३ वर्षाचे असावेत. त्यांनी पाळत ठेवून जबरी चोरीचा प्रयत्न केला, पण सलिम शेख यांनी हातातील बॅग न सोडल्याने शेवटी ते तसेच पळून गेले.

याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी सांगितले की, चोरट्यांनी मारहाण केली तरी सलिम शेख यांनी पैशांची बॅग सोडली नाही. या चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून त्यावरुन चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.

पानिपत रणसंग्रामातील वीरांना ‘दीप मानवंदना’ 

इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने आयोजन ; शेकडो दीप प्रज्वलित करून गौरवशाली इतिहासाचे जागरण

पुणे : भारताच्या इतिहासात २६४ वर्षांपूर्वी झालेल्या पानिपत रणसंग्रामातील वीरांना मानवंदना देण्यासाठी श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या समाधीसमोर दीपमानवंदना हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी उपस्थित नागरिकांनी शेकडो दीप प्रज्वलित करून आपल्या गौरवशाली इतिहासाचे जागरण केले.
निमित्त होते, इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने आयोजित पानिपत रणसंग्रामातील वीरांना ‘दीप मानवंदना’ या कार्यक्रमाचे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष व इतिहास अभ्यासक मोहन शेटे, हर घर सावरकर समितीचे विद्याधर नारगोळकर, पर्वती संस्थानचे रमेश भागवत, रायगड स्मारक मंडळाचे सुधीर थोरात यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 
मोहन शेटे म्हणाले, दि. १४ जानेवारी १७६१ हा मराठ्यांच्या इतिहासातील विलक्षण दिवस होता. राष्ट्राच्या रक्षणासाठी मराठी वीरांनी पानिपतच्या रणभूमीवर पराक्रमाचे रण तांडव मांडले होते. अफगाणिस्तान च्या बादशाहाने नजीबखानच्या बोलावण्यावरुन भारतावर आक्रमण केले होते. अशा वेळेस श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी सदाशिवभाऊ आणि विश्वासराव यांच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्य उत्तरेला रवाना केले. मल्हारराव होळकर, जनकोजी शिंदे, इब्राहिमखान गारदी , समशेर बहाद्दर, विंचुरकर, पवार, गायकवाड,पायगुडे असा महाराष्ट्राचा शौर्य सागर पानिपतावर उभा ठाकला होता.
ते पुढे म्हणाले, दि. १४ जानेवारी १७६१ ला त्या महाभयंकर रणसंग्रामाला सुरवात झाली. दुपार पर्यंत विजयाची आशा दिसत असताना अचानक पारडे फिरले आणि दारुण पराभव झाला. मराठी तरुणाई भस्मसात झाली. मात्र, तरीही हा पराभव मराठ्यांना अपमानास्पद नव्हता. राष्ट्राच्या रक्षणासाठी मराठे कशाप्रकारे चिवट लढा देतात, हे सा-या जगाने अनुभवले. या युद्धानंतर भारतावर कधीही त्या दिशेने आक्रमण झाले नाही, असेही त्यांनी सांगितले. पानिपतच्या रणभूमीवर बलिदान करणा-या नरवीरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अभिनव कलाभारती च्या वतीने रंगावली काढण्यात आली.

‘आधी दारू पाजली मग अभिनेत्रीवर बलात्कार’, भाजपच्या बड्या नेत्यासह दोघांवर गँगरेपचा गुन्हा

दिल्ली: काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील बदायु जिल्ह्यातून संतापजनक घटना समोर आली आहे. येथील बिल्सीचे भाजप आमदार हरिश शाक्य यांच्यासह 16 जणांनी एका महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप झाला होता. जमीनीच्या वादातून झालेल्या वादानंतर हा अत्याचार झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी भाजपच्या आमदारासह त्यांचे बंधू आणि इतर काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना ताजी असताना आता भाजपच्या एका बड्या नेत्यासह काही पदाधिकाऱ्यांनी एका अभिनेत्रीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मोहन लाल बडौली असं गुन्हा दाखल झालेल्या भाजपच्या बड्या नेत्याचं नाव आहे. ते हरियाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहे. बडौली यांच्यासह एक गायक आणि भाजपचा माजी नेता रॉकी मित्तल यांच्याविरोधात बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिमाचलच्या कसौली पोलीस स्टेशनमध्ये 13 डिसेंबरला हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका अभिनेत्रीवर अशाप्रकारे बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मोहन लाल बडौली यांनी आरोप फेटाळले हा राजकीय स्टंट असून संपूर्ण प्रकरण खोटं मोहन लाल बडौली आणि रॉकी मित्तल या दोघांनी 7 जुलै 2023 ला पीडितेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. रॉकी मित्तलने आपल्याला अभिनेत्री बनवतो असं सांगितलं तर बडौलीने सरकारी नोकरी लावतो, असं सांगून आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोपही तिने केला आहे. दरम्यान, मोहन लाल बडौली यांनी त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळले आहेत. हा राजकीय स्टंट असून संपूर्ण प्रकरण खोटं आहे, या प्रकरणामध्ये काहीही सत्य नाही, असा दावा मोहन लाल बडौली यांनी केला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी पीडित अभिनेत्रीला आधी दारू पाजली आणि त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर भाजपच्या या नेत्यांनी पीडित अभिनेत्रीचे बलात्कार केल्यानंतर नग्न फोटो आणि व्हिडीओ काढल्याचा आरोप देखील तक्रारदार महिलेकडून करण्यात आला आहे. अशाप्रकारे हरियाणातील एका बड्या नेत्यावर अत्याचाराचे आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे.

पुणे ते अयोध्या सायकल वारी: मध्यप्रदेश पोलिसांकडून पुण्याच्या सायकलस्वारांचे कौतुक, स्थानिकांचे मन जिंकले

पुणे: पुणे ते अयोध्या या ‘मिशन रस्ते सुरक्षा’ सायकल वारी दरम्यान सध्या वारी मध्यप्रदेशातील ब्यावराला पोहोचली आहे. या उपक्रमाचे ब्यावरा पोलीस आणि स्थानिक नागरिकांकडून भरभरून स्वागत आणि कौतुक होत आहे.

पुण्याचे सायकलस्वार नारायण पवार आणि सुयोग शहा हे रस्ते सुरक्षा नियमांचे महत्त्व पटवून देत विविध गावांत जनजागृती करत आहेत. हेल्मेट वापरणे, वाहन चालवताना सतर्कता बाळगणे, आणि योग्य वेग राखणे यासंबंधी त्यांनी स्थानिक नागरिकांना मार्गदर्शन केले.

ब्यावरा पोलीस प्रशासनाने या उपक्रमाचे कौतुक करत, अशा मोहिमांमुळे समाजात रस्ता सुरक्षेची जाणीव वाढेल, असे मत व्यक्त केले. स्थानिक नागरिकांनीही या वारीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, रस्ते सुरक्षा नियमांचे पालन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

वारीने केवळ जनजागृतीच केली नाही तर स्थानिकांचेही मने जिंकली आहेत. सायकलस्वारांच्या अथक प्रयत्नांमुळे अपघात टाळण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले जात असल्याचे दिसून येत आहे. भविष्यातही अशा उपक्रमांना चालना देण्याचा निर्धार सायकलस्वारांनी व्यक्त केला आहे.

पानिपत शौर्य दिनानिमित्त मराठा वीरांना आदरांजली

पुणे: पानिपत युद्धाचा हा 265 वा स्मृतिदिन व पानिपतच्या युद्धात बलिदान देणाऱ्या मराठा वीरांना महादजी शिंदे छत्री, वानवडी येथे पानिपत शौर्य दिनानिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. त्याचप्रमाणे ग्वाल्हेरच्या महाराणी व ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या मातोश्री माधवीराजे सिंधिया यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .
पानिपत शौर्य दिन कार्यक्रमाचे आयोजन उत्तमराव शिंदे सरकार यांच्यावतीने करण्यात आले होते . यावेळी सदानंदजी मोरे ( जगतगुरु संत तुकाराम महारानांचे वंशज, इतिहास तज्ञ), पांडुरंगजी बलकवडे (ज्येष्ठ इतिहास तज्ञ), प्रशांतजी जगताप ( माजी उपमहापौर, पुणे मनपा), अँड विकास खामकर (विद्यमान अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन) , अँड विकास ढगे पाटिल (माजी अध्यक्ष, पुणे बार असो), आबासाहेब पाटिल (प्रसिद्ध शिवव्याख्याते), रणवीर सत्यपाल शिंदे सरकार (नाशिक), राजाभाऊ राऊत (उद्योजक ), राजाभाऊ कोटमे (व्यवस्थापक, कोटमगाव ), माजी आमदार जगदिराजी मूळीक. मोहनरावजी शिंदे सरकार, विशाल पाटिल, अँड प्रवीण जी गायकवाड, चंद्रकांत शितोळे , उत्तमरावजी मांढरे, यशवंतजी भोसले, प्रा. प्रकाश दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
महापराक्रमी महाराज महादजी शिंदे यांच्या मंदिरातील पुतळ्यास् मान्यवरांकडून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नंतर मान्यवरांच्या शुभहस्ते पानिपतच्या पवित्र मातीचे कलशपूजन केले.
स्वर्गीय राजमाता माधवीराजे माधवरावजी सिंदिया यांना आदरांजली अर्पण करण्यात आले. सदानंदजी मोरे ( जगतगुरु संत तुकाराम महारानांचे वंशज, इतिहास तज्ञ) यांनी या वेळी पानिपत युद्धाची गाथा काही अनुभव सांगितले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक उत्तमराव शिंदे सरकार आणि स्थानिक नागरिकांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘बॅलेट पेपर’वर घेण्याची मागणी-डॉ.हुलगेश चलवादी

,पुणे:- 
हिंदुत्वादी विचारधारेवर राजकीय वाटचाल करणारा भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची छुपी यूती बहुजनांसाठी घातक असल्याचा दावा बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी सोमवारी (ता.१३) केला. बहुजनांच्या मतविभाजनासाठी करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या प्रयोगात भाजप यशस्वी झाला आहे. महाप्रचंड विजयानंतर आता पुन्हा भाजप-उद्धव ठाकरे सोबत येणार असल्याचे चित्र दृष्टीपथात येत असल्याचा दावा देखील डॉ.चलवादींनी केला. 
सत्ताधारी आणि विरोधक जेव्हा ‘समविचारी’ असतात तेव्हा सामाजिक बदलाची आणि समतेची अपेक्षा केली जावू शकत नाही.प्रस्थापित राजकीय पक्षांनी सदैव बहुजनांची अवहेलनाच केली आहे. साम-दाम-दंड-भेद नितीचा वापर करून ते बहुजनांना सत्तेपासून दूर ठेवतात. राजकारणातील बहुजनांचा राजकीय ‘अनुशेष’ संपवायचा असेल, तर बहुजन समाज पक्ष एकमेव ‘विचारपीठ’असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले. मान्यवर कांशीराम जी आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री सुश्री बहन मायावती जी यांच्या ‘सर्वजन हिताय,सर्वजन सुखाय’ या विचारानूसार तळागाळातील पीडित, शोषित, वंचित आणि उपेक्षितांना ‘शासनकर्ती जमात’बनवायचे असेल, तर प्रस्थापितांविरोधात एकत्रित राजकीय लढा द्यावाच लागेल.
ईव्हीएमची खेळी करीत मतदारांचे मत हस्तगत करणार्या पक्षांना यंदा बहुजन समाज जागा दाखवेल. निवडणूक आयोगाने होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी मागणी देखील डॉ.चलवादी यांनी केली.बहुजन समाज पक्ष भाजप, शिवसेना असो वा कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला त्यांच्या बहुजन विरोधी प्रयोगात आता यशस्वी होवू देणार नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बसपा तळागाळातील जनमानसात जात प्रस्थापित राजकीय पक्षांचे मनसुबे बहुजनांसमोर मांडणार आहे.