Home Blog Page 50

मागोवा घेत ट्रॅव्हल्सच्या बसचा पाठलाग करत मकोका मधील फरार आरोपीला पकडले

पुणे- मकोका लावल्यावर फरार झालेल्या आरोपीचा मागोवा काढत ट्रॅव्हल्सच्या बस अड्ड्यावर शोध घेत नंतर ट्रॅव्हल्सच्या बसचा पाठलाग करत या आरोपीला पुणे पोलिसांनी पकडले अजय युवराज कसबे, वय-२४, रा-भिमज्योत मित्र मंडळ, लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे असे या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि,’येरवडा पोलीस स्टेशन गु.र.नं.४३६/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ११८ (२) (३) (५) सह भारतीय हत्यार कायदा ४, २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (ब), १३५, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट ३, ७. महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम ३ (१) (२), ३(२), ३(४) अन्वये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील आरोपी हे मकोका अंतर्गत कारवाई झालेनंतर फरार झाला होता . या आरोपींना तात्काळ ताब्यात घेणेबाबत वरीष्ठांनी सुचना दिल्या होत्या.
या सुचनांच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त, परिमंडळ ०४, सोमय मुंडे, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग प्रांजली सोनवणे यांनी देखील सुचना केल्या होत्या त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस अंमलदार शैलेश वाबळे यांनी आरोपीचा मोबाईल क्रमांक तांत्रिक विश्लेषनातुन मिळवुन त्या आधारे आरोपी हा वारंवार मोबाईल क्रमांक, वास्तव्य व ओळख लपवुन वावरत असल्याने तसेच श्रेणी पोलीस उप निरीक्षक प्रदिप सुर्वे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की संबधित आरोपी पुणे सोलापुर रोड मार्गे मुळ गावी पळुन जाण्याचे तयारीत आहे तेव्हा तपास पथकाचे सहप्रभारी प्रदिप सुर्वे, पोलीस अंमलदार जायभाय, कांबळे, शिंदे यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन सापळा रचुन पाळत ठेवली .तिथे आरोपी हा खाजगी ट्रव्हल्स मधुन गावी जात असल्याबाबत माहिती मिळाली परंतु त्याठिकाणी खाजगी ट्रॅव्हल्सची संख्या जास्त असल्याने आरोपी शोधणे कठीण होते. आरोपीच्या शोधार्थ प्रत्येक ट्रॅव्हल्सची तपासणी सुरु असताना माहिती मिळाली की काही वेळापुर्वीच सोलापुरचे दिशेने २-३ टॅव्हल्स या निघुन गेल्या आहेत अशी माहिती मिळाताच त्याबाबत खातरजमा करणेकरीता तपास पथकातील नमुद अधि/कर्मचारी यांनी त्यांचेजवळील कारने भरधाव वेगाने २० ते २५ किमी गाडीचा पाठलाग करुन सदर ट्रॅव्हल्सला थांबवुन तपासणी करत असताना एका ट्रॅव्हल्स मध्ये सगळे प्रवासी तपासकामी सहकार्य म्हणुन खाली उतरले परंतु एका सीटवरील प्रवासी हा आपली ओळख लपवुन सीट खाली लपत असताना मिळुन आला. त्याचे जवळ जाण्याचा प्रयत्न केला असता तो झटापट करुन पळून जाण्याचे तयारीत असताना त्यास शिताफीने ताब्यात घेतले त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव अजय युवराज कसबे, वय-२४, रा-भिमज्योत मित्र मंडळ, लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे असे असल्याचे सांगितले. या आरोपीस पुढील करावाईसाठी येरवडा पोलीस स्टेशन येथे आणले असुन पुढील तपास सहा. पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे हे करत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ ०४ सोमय मुंडे,सहा. पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे,वरीष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक विजय ठाकर, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी फौजदार महेश फटांगरे, सहप्रभारी प्रदिप सुर्वे, पोलीस हवालदार शिंदे, कोकणे, वाबळे, जायभाय, सोगे, कांबळे, सुतार, जाधव, अडकमोल, गायकवाड, निलख यांनी केली आहे.

महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्षपदी अविनाश बागवे यांची निवड

0

मुंबई-महाराष्ट्र राज्यातील सर्व बॉक्सिंग प्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाची ठरलेली महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना निवडणूक २०२५ धर्मदाय आयुक्त कार्यालय, येथे उत्साहात व यशस्वीपणे पार पडली.या निवडणुकीत पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक अविनाश रमेश बागवे यांची महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड होऊन त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या प्रेरणेतून आणि अविनाश बागवे यांच्या नेतृत्वाखाली, पुणे शहर बॉक्सिंग संघटना गेली दोन दशके युवा पिढीमध्ये क्रीडाभाव, शिस्त, आत्मविश्वास आणि समाजात सकारात्मक विचारांची प्रेरणा निर्माण करण्याचे कार्य सातत्याने करत आहे.या निवडीमुळे महाराष्ट्रातील बॉक्सिंग क्षेत्रात नवी ऊर्जा, नवा जोश आणि नवी दिशा निर्माण होईल, अशी सर्वत्र अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धा म्हणजे संघभावनेचा संस्कार-संचालक राजेंद्र पवार

0

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेचे अमरावतीमध्ये थाटात उद्घाटन

अमरावती: महावितरणने खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. अनेक महिला व पुरुष खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत. कोणत्याही सांघिक खेळ प्रकारात खेळाडूंमधील परस्पर सहकार्य, समन्वय व विश्वास या त्रिसुत्रीशिवाय विजय शक्य होत नाही. त्यामुळे खेळाडूंमध्ये प्रथम संघभावना निर्माण होणे आवश्यक आहे. महावितरणच्या दरवर्षी होणाऱ्या राज्य क्रीडा स्पर्धा या महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी एकजुटीचा व संघभावनेचा संस्कार आहे असे प्रतिपादन संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी बुधवारी (दि. १२) केले.

अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडा संकुलात राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटक म्हणून संचालक श्री. पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयोजन समितीचे अध्यक्ष व मुख्य अभियंता श्री. अशोक साळुंके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कोकणचे सहव्यस्थापकीय संचालक श्री. दिलीप जगदाळे, कार्यकारी संचालक श्री. प्रसाद रेशमे, पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे, मुख्य अभियंते सर्वश्री सुहास रंगारी, दिलीप दोडके, स्वप्नील काटकर, चंद्रमणी मिश्रा, संजय पाटील, राजेश नाईक, अरविंद बुलबुले, संजीव भोळे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. संजय ढोके, महाव्यवस्थापक श्री. राजेंद्र पांडे तसेच प्राचार्य श्रीनिवास देशपांडे यांची उपस्थिती होती.

या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत महावितरणच्या १६ परिमंडलाच्या संयुक्त आठ संघातील सुमारे ११७० महिला व पुरुष खेळाडू सहभागी झाले आहेत. या खेळाडूंनी संचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजन समितीचे अध्यक्ष व मुख्य अभियंता श्री. अशोक साळुंके यांनी केले. सूत्रसंचालन सौ. क्षिप्रा मानकर, श्री. विजय पांडे यांनी केले तर उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. मधुसूदन मराठे यांनी केले. या क्रीडा स्पर्धेत २२ खेळ प्रकारातील सामने रंगणार असून येत्या शनिवारी (दि. १५) समारोप होणार आहे.

१०० मीटर धावस्पर्धेत प्रिया पाटील, गुलाबसिंग वसावेंची बाजी – अतिशय चुरशीच्या १०० मीटर धावस्पर्धेत पुरुष गटात श्री. गुलाबसिंग वसावे (पुणे-बारामती) यांनी सुवर्णपदक तर साईनाथ मसाणे (सांघिक कार्यालय-भांडूप) यांनी रौप्यपदक पटकावले. तर महिला गटात प्रिया पाटील (सांघिक कार्यालय-भांडूप) यांनी सुवर्णपदक तर श्वेतांबरी अंबादे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) यांनी रौप्यपदक मिळवले. विजेत्यांना संचालक श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते सुवर्ण व रौप्यपदक प्रदान करण्यात आले.

दुसऱ्या तिमाहीत किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लि.ची स्वतंत्र निव्वळ विक्री 1,500 कोटींहून अधिक; महसुलात वार्षिक 35% वाढ;वार्षिक 44% ची वाढ :स्वतंत्र निव्वळ नफा 141 कोटी

पुणे, : अंतर्गत ज्वलन इंजिनजनरेटर सेट आणि कृषी उपकरणे यांच्या उत्पादनातील आघाडीची कंपनीआणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लक्षणीय उपस्थिती असलेल्या किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेडने (KOEL) (BSE: 533293; NSE: KIRLOSENG) 31 मार्च 2026 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे आणि सहामाहीचे अलेखापरिक्षित आर्थिक निकाल जाहीर केले.

या निकालांबाबत किर्लोस्कर ऑइल इंजिन्सच्या व्यवस्थापकीय संचालक गौरी किर्लोस्कर म्हणाल्या, “किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेडने (KOEL) आर्थिक वर्ष 26 च्या दुसऱ्या तिमाहीत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. जी कंपनीच्या वाढीच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे. तिमाहीत प्रथमच आम्ही ₹ 1,500 कोटी महसूलाचा टप्पा ओलांडला आणि ₹ 3,027 कोटींची आमची आतापर्यंतची सहामाहीतील सर्वोच्च विक्री गाठली. मार्केटमधील आमची मजबूत स्थिती आणि ऑपरेशनल उत्कृष्टता दर्शवत स्वतंत्र व्यवसायातील सर्व विभागांनी दुहेरी अंकी वाढ नोंदवली. पॉवर जनरेशन बिझनेस युनिटने देखील त्यांची मजबूत कामगिरी सुरू ठेवली असून त्याला आमचे विस्तृत वितरण नेटवर्क, मजबूत ब्रँड इक्विटी आणि इंजिन तसेच जनरेटर तंत्रज्ञानातील सातत्यपूर्ण  नवोपक्रमाचे समर्थन मिळाले.

10 ऑक्टोबर रोजी, आम्ही आमच्या B2C ऑपरेशन्सची धोरणात्मक पुनर्रचना देखील जाहीर केली. आमची पूर्ण मालकीची उपकंपनी, ला-गज्जर मशिनरीज प्रायव्हेट लिमिटेडला स्लम्प सेलद्वारे हा व्यवसाय हस्तांतरित केला. हे पाऊल आमचे लक्ष्य अधिक बळकट करते आणि 2030 पर्यंत $2 अब्जच्या टॉप लाईनपर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या दीर्घकालीन धोरणात्मक दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. या प्रगतीमुळे आणि ध्येय निश्चित असल्याने शिस्त आणि सातत्यपूर्ण अंमलबजावणीच्या माध्यमातून धोरणात्मक प्राधान्ये पूर्ण करण्यास आम्हाला प्रोत्साहन मिळते.”

आर्थिक वर्ष 26 च्या दुसऱ्या तिमाहीतील आर्थिक कामगिरीचा आढावा (स्वतंत्र):

·         वार्षिक 35% वाढ नोंदवत आर्थिक वर्ष 26 च्या दुसऱ्या तिमाहीत निव्वळ विक्री ₹ 1,593 कोटी; आर्थिक वर्ष 25 च्या दुसऱ्या तिमाहीत ती ₹1,184 कोटी एवढी होती.

·         आर्थिक वर्ष 26 च्या दुसऱ्या तिमाहीत EBITDA# ₹ 214 कोटींवर तर आर्थिक वर्ष 25 च्या दुसऱ्या तिमाहीत तो ₹148 कोटी एवढा होता. वार्षिक वाढ 45%

·         आर्थिक वर्ष 26 च्या दुसऱ्या तिमाहीत EBITDA# मार्जिन 13.4% एवढे होते. तर आर्थिक वर्ष 25 च्या दुसऱ्या तिमाहीत ते 12.4% होते.

·         वार्षिक 44% वाढ नोंदवत आर्थिक वर्ष 26 च्या दुसऱ्या तिमाहीत निव्वळ नफा ₹141 कोटी होता. आर्थिक वर्ष 25च्या दुसऱ्या तिमाहीत तो ₹98 कोटी एवढा होता.

·         रोख आणि रोख समतुल्य* ₹ 475 कोटी

* कर्जाचे एकूण प्रमाण; ट्रेझरी गुंतवणूक समाविष्ट आहे तर दावा न केलेले लाभांश वगळले आहेत.

आर्थिक वर्ष 26च्या दुसऱ्या तिमाहीतील आर्थिक कामगिरीचा आढावा (एकत्रित):

·         वार्षिक 30% वाढ नोंदवत चालू कामकाजातून मिळणारा महसूल आर्थिक वर्ष 26 च्या दुसऱ्या तिमाहीत ₹1,948 कोटी एवढा होता. आर्थिक वर्ष 25च्या दुसऱ्या तिमाहीत तो ₹1,499 कोटी होता; 

·         चालू कामकाजातून# मिळणारा निव्वळ नफा आर्थिक वर्ष 26 च्या दुसऱ्या तिमाहीत ₹159 कोटी होता तर आर्थिक वर्ष 25 च्या दुसऱ्या तिमाहीत ₹ 106 कोटी होता; वार्षिक 51% वाढ

आर्थिक वर्ष 26च्या पहिल्या सहामाहीतील आर्थिक कामगिरीचा आढावा (स्वतंत्र):

·         आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या सहामाहीत निव्वळ विक्री ₹3,027 कोटी झाली तर आर्थिक वर्ष 25च्या पहिल्या सहामाहीत ती ₹2,518 कोटी झाली; वार्षिक 20% वाढ

·         आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या सहामाहीत EBITDA# ₹405 कोटी एवढा तर आर्थिक वर्ष 25 च्या पहिल्या सहामाहीत तो ₹323 कोटी एवढा होता; वार्षिक 25% वाढ

·         आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या सहामाहीत EBITDA# मार्जिन 13.3% होते तर आर्थिक वर्ष 25च्या पहिल्या सहामाहीत ते 12.7% एवढे होते.

·         आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या सहामाहीत निव्वळ नफा# ₹264 कोटींवर गेला तर आर्थिक वर्ष 25च्या पहिल्या सहामाहीत तो ₹215 कोटी एवढा होता; वार्षिक 23% वाढ

आर्थिक वर्ष 26च्या पहिल्या सहामाहीतील आर्थिक कामगिरीचा आढावा (एकत्रित):

·         आर्थिक वर्ष 26च्या पहिल्या सहामाहीत चालू कामकाजातून मिळणारा महसूल ₹3,712 कोटी होता तर आर्थिक वर्ष 25च्या पहिल्या सहामाहीत तो ₹3,130 कोटी एवढा होता; वार्षिक 19% वाढ नोंदवली गेली.

·         चालू कामकाजातून# मिळणारा निव्वळ नफा आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या सहामाहीत ₹293 कोटी होता तर आर्थिक वर्ष 25च्या पहिल्या सहामाहीत ₹238 कोटी एवढा नफा झाला होता. वार्षिक 23% वाढ

–    वर नोंदवलेला निव्वळ नफा आणि EBITDA, जिथे लागू असेल तिथे अपवादात्मक बाबी वगळून आहे.

– # मागील कालावधीतील आकडेवारीमध्ये मागील वर्षांत केलेल्या विक्रीसाठी ग्राहकासाठी केलेल्या थकीत प्राप्तीसाठीचे रिव्हर्सल प्रोव्हिजन वगळले आहे. चालू कालावधीत असे कोणतेही रिव्हर्सल नाही. मागील कालावधीसाठी म्हणजेच Q2 FY 25 आणि H1 FY 25 साठी रिव्हर्सल संख्या खालीलप्रमाणे आहेत:

– EBITDA मार्जिनस्वतंत्र पातळीवरअनुक्रमे 13.9% आणि 14.4% होते.

– एकत्रित पातळीवरनिव्वळ नफा अनुक्रमे ₹125 कोटी आणि ₹281 कोटी होता.

– तपशीलांसाठीकृपया स्टॉक एक्स्चेंजवर प्रकाशित झालेल्या अनऑडिटेड आर्थिक निकालांची नोंद‘ पहा.

कोमल मानकर, स्वामिनी सोनवणे यांनाराज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक

पुणे: धायरी येथील धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान संस्थेतील विद्यार्थिनींनी राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करून संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षात संस्थेचे आणि पुण्याचे देशभर उज्ज्वल केले आहे. रायगड येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत ६९ किलो वजनी गटात कोमल मानकर हिने सुवर्णपदक पटकविले, तर गाझियाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेत स्वामिनी सोनवणे हिने सांघिक कामगिरीत सुवर्णपदक मिळवले. उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर कोमल मानकर आता गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. 

कोमल मानकर व स्वामिनी सोनावणे या दोन्ही सुवर्णकन्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष सोपान उर्फ काकासाहेब चव्हाण व संचालक अनिकेत चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेचे अन्य पदाधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षकवृंद उपस्थित होता. कोमलने अतिशय दमदार आणि कौशल्यपूर्ण खेळ करत हे यश मिळवले आहे, तर राष्ट्रीय स्तरावर संस्थेचे व महाराष्ट्राचे नाव उंचावणारी कामगिरी स्वामिनीने केली आहे. 

काकासाहेब चव्हाण म्हणाले, “संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षात या विद्यार्थिनींनी केलेली सुवर्ण कामगिरी संस्थेसाठी अभिमानास्पद क्षण आहे. या यशामागे खेळाडू, त्यांच्या कुटुंबियांचा आणि क्रीडा शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. संस्थेच्या या दोन्ही सुवर्णकन्यांनी दाखवलेली जिद्द, मेहनत आणि यश हे आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.”

अनिकेत चव्हाण यांनी सांगितले की, “लवकरच आपल्या परिसरात आधुनिक ‘स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स’ उभारण्यात येणार असून, यामुळे धायरी व सिंहगड रोड परिसरातील अनेक नवोदित खेळाडूंना उत्तम दर्जाचे प्रशिक्षण मिळणार आहे.”

एमक्योर फार्मास्युटिकल्सतर्फे महसुलात 13% वाढ आणि करपश्चात नफ्यात 25% वाढ

• कामकाजामधून मिळणारा महसूल 2,270 कोटी रु., वार्षिक 13.4% वाढ

• EBITDA मार्जिन 19.3%, EBITDA 439 कोटी रु., वार्षिक 15.2% वाढ

• PAT 251 कोटी रु., वार्षिक 24.7% वाढ

• स्थानिक व्यवसाय विक्री 1,031 कोटी रु., वार्षिक 10.6% वाढ

• आंतरराष्ट्रीय व्यवसाय विक्री 1,238 कोटी रु., वार्षिक 15.8% वाढ

पुणे: एमक्योर फार्मास्युटिकल्स (BSE:544210, NSE: EMCURE) तर्फे  30 सप्टेंबर 2025 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी आपले एकत्रित आर्थिक निकाल जाहीर करण्यात आले.


या तिमाहीत कंपनीच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही व्यवसायांमध्ये मजबूत कामगिरी झाली.

स्थानिक व्यवसायात 10.6% वाढ नोंदवली गेली असून, सर्व प्रमुख उपचार विभागांतील मजबूत कामगिरी आणि नव्या उपक्रमांमुळे ही वाढ साध्य झाली. देशांतर्गत व्यवसाय हा कंपनीसाठी एक महत्त्वाचा केंद्रबिंदू राहिला आहे आणि आम्ही सातत्याने आमचा उत्पादन पोर्टफोलिओ वाढवत असून व्यवसायासाठी टीम मजबूत करत आहोत. अलीकडेच कंपनीने नोवो नॉर्डिस्क सोबत धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली असून त्याअंतर्गत पोविझ्ट्रा® हे जैविक इंजेक्टेबल सेमाग्लूटाइड भारतात सादर करण्यात येणार आहे. या कराराचा एक भाग म्हणून एमक्योर ही पोविझ्ट्राच्या व्यवसायीकरण आणि प्रसारासाठी जबाबदार असलेली एकमेव वितरक कंपनी असेल. पोविझ्ट्रा® हे जास्त वजन असलेल्या किंवा स्थूलतेने ग्रस्त व्यक्तींमध्ये दीर्घकालीन वजन व्यवस्थापन आणि स्थूलतेमुळे उद्भवणाऱ्या हृदयविकारांशी संबंधित गंभीर जोखीम कमी करण्यासाठी सुचवलेले औषध आहे. या तिमाहीत कंपनीने आपल्या झुवेंटस या उपकंपनीतील अल्प भागभांडवलाचे अधिग्रहणही पूर्ण केले.

आंतरराष्ट्रीय व्यवसायातही मजबूत वाढ दिसून आली असून 16% वाढ नोंदवली गेली. नवीन उत्पादन सादरीकरण आणि मॅन्क्स (Manx) युनिटच्या वाढत्या उत्पादनामुळे युरोपमध्ये 23% वाढ झाली. कॅनडामध्ये व्यवसायाने 18% वाढ कायम ठेवली आहे. जगातील उर्वरित भागातील व्यवसायात नॉन-एआरव्ही व्यवसायाच्या आधारावर स्थिर गती दिसून आली.

निकालांवर भाष्य करताना एमक्योर फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सतीश मेहता म्हणाले, “दुसऱ्या तिमाही मध्ये आमच्या सर्व व्यवसायांनी मजबूत कामगिरी केली. आम्ही आमच्या लक्ष केंद्रीत केलेल्या बाजारपेठांमध्ये परवाना करार आणि इन-हाऊस विकासाद्वारे आमचा पोर्टफोलिओ वाढवत आहोत. नोवो नॉर्डिस्क सोबतची भागीदारी आम्हाला वेगाने वाढणाऱ्या स्थूलता उपचार विभागात मजबूत स्थान मिळवून देत असून बाजारपेठेला आकार देण्यासाठी आम्हाला सक्षम करण्याकरता  लवकर प्रवेश मिळवून देत आहे. आम्ही आमच्या सर्व प्रमुख व्यवसायांमध्ये मजबूत वाढ आणि मार्जिन सुधारणा सादर करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.”

अधिकारी जितका भ्रष्ट, तितका नेत्यांचा लाडका:पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवलेंमुळे हे पुन्हा एकदा सिद्ध-विजय कुंभार

0

पुणे-माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार बोपोडी जमीन घोटाळ्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेले पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या कथित भ्रष्ट कारभारावरून सरकार व राजकारण्यांवर कडक शब्दात टीका केली आहे . अधिकारी जितका भ्रष्ट, तितता तो राजकारण्यांचा लाडका हे पुण्याची तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या निमित्ताने पु्न्हा एकदा सिद्ध झाले. त्यामुळे त्यांच्यामागे कुणाचे राजकीय छत्र आहे? हे पाहणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणालेत.त्याचबरोबर संबधित तहसीलदार येवले यांच्या १४ वर्षाच्या कारकिर्दीत ७ वेळा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. मंत्रालयातून सेटिंग लाऊन पोस्टिंग करवून घेणारे अधिकारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे .

बोपोडी येथील सरकारी दूध डेअरीच्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी त्यांच्यासह इतर 6 जणांवर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर येवले व राजकारण्यांतील कथित संबंधांवर भाष्य करताना आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवलेच्या निमित्ताने पुन्हा सिद्ध झालं की अधिकारी जितका भ्रष्ट, तितका तो राजकारण्यांचा लाडका. अशा माणसाला नागपूरहून पुण्यात कुणी आणि का आणलं? इतके गंभीर आरोप असूनही त्याला कार्यकारी पद का देण्यात आलं? त्याच्यामागे कोणाचं राजकीय छत्र आहे?.सर्वोच्च न्यायालयाने अशा पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोटाळा होऊ नये, राजकीय हस्तक्षेप होऊ नये यासाठी महाराष्ट्रासह सर्व राज्यांमधे नागरी सेवा मंडळ नावाची यंत्रणा स्थापन करणे बंधनकारक केले आहे . ती यंत्रणा येवले प्रकरणात काय करत होती? की त्या यंत्रणेला डावलून येवलेंची बदली केली? केली असेल कोणी केली? नागरी सेवा मंडळाने शिफारस केली असेल तर त्यांच्या सदस्यांवर कोण आणि कधी कारवाई करणार?

येवलेंचे पराक्रम …

येवले यांनी 2001 मध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा दिली. 361 गुण आणि अपंग (कर्णबधिर) कोट्यातून पास झाल्याने त्यांना नागपूर विभागात 2004 मध्ये नायब तहसीलदार पद देण्यात आले. पण खरंच कर्णबधिर आहेत का? नसतील तर हे थेट महाराष्ट्रातील पूजा खेडकर प्रकरण ठरेल !त्याआधी येवलेंनी सर्वसाधारण गटातून परीक्षा दिली होती असे म्हणतात. 2001 चा MPSC घोटाळा गाजला होता . 398 उमेदवारांच्या उत्तरपत्रिका बदलल्या,प्रत्येकाकडून ₹3-₹5 लाख घेतल्याचे आरोप झाल्यानंतर मुंबई HC ने सर्व नियुक्त्या रद्द केल्या होत्या. आता ज्याची सेवेत रुजू होतानाची कारकीर्द अशी असेल त्याच्याकडून चांगल्या वर्तणुकीची अपेक्षा कशी करता येईल ?येवले यांना 2011 मध्ये उमरेड (नागपूर) येथे ₹10,000 ची लाच घेताना पकडले. 6 दोषारोपपत्रं ठेवण्यात आली, पण चौकशीचा पत्ता नाही. त्यानंतर गडचिरोलीला हजर न राहिल्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात आलं पण सेटिंग लावून परत रुजू झाले. 2014 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सिरोंचा कोतवाल भरती प्रकरणात प्रत्येकाकडून ₹2 – ₹ 2.5 लाख लाच घेतल्याचा आरोप . हा प्रकार कानावर येताच नक्षलवाद्यांनी अशा अधिकाऱ्यांना सोडणार नाही असे जाहीर केले. 2016 मध्ये पुणे विभागात बदली.

14 वर्षांत 7 वेळा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप2016 मध्येच इंदापूर तहसीलदार म्हणून रुजू 58 सरकारी जमिनींचं अनियमित वाटप,वाळूमाफियाकडून संगनमत यामुळे जिल्हाधिकारी पुणे यांनी निलंबन केलं. 14 वर्षांत 7 वेळा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, पण प्रत्येक वेळी “सेटिंग” लावून बचाव. मोबोज हॅाटेल जमीन घोटाळा प्रकरणी त्यांच्याविरुद्ध आरोप करण्यात आले, आंदोलने झाली परंतु पुढे काहीच झाले नाही. येवले “मुंढवा जमीन घोटाळा” प्रकरणात अमेडिया कंपनीला फायदा पोहोचवण्यासाठी प्रचंड सक्रिय होते, असे विजय कुंभार यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे, बोपोडी जमीन घोटाळ्याप्रकरणी सूर्यकांत येवले यांनी दिलेले आदेश रद्दबातल करण्याची कारवाई जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. यासंबंधीच्या अर्जाच्या पुनर्विलोकनास अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून या प्रकरणातील जमिनीची माहितीही घेतली आहे. बोपोडी येथील ही जमीन नावावर करावी, असा अर्ज आल्यानंतर येवले यांनी ही जागा संबंधितांच्या नावावर करण्याचे आदेश दिले होते. त्याबाबत जिल्हा प्रशासनाला माहिती मिळताच येवले यांच्यावर शिस्तभंग आणि गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची शिफारस जिल्हा प्रशासनाने केली होती.त्या शिफारशीनुसार, येवले यांना निलंबित कऱण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार, उपविभागीय अधिकारी विठ्ठल जोशी यांनी येवले यांनी जमीन नावावर करण्याचे दिलेले आदेश रद्द करण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी सतीश राऊत यांच्याकडे पुनर्विलोकन अर्ज दाखल केला. त्यानुसार, राऊत यांनी हा अर्ज मान्य केला असून पुढील कार्यवाही प्रशासनाकडून सुरू आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती करणार नाही: शरद पवार गटाचा आघाडी म्हणून एकजुटीने लढण्याचा निर्धार

पुणे- महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाने महायुतीतील कोणत्याही पक्षासोबत युती किंवा आघाडी न करण्याचा निर्णय घेतला आहे. याऐवजी, पक्ष महाविकास आघाडी म्हणून एकजुटीने निवडणूक लढवणार आहे. पक्षाच्या ५२व्या मासिक आढावा बैठकीत हा निर्धार करण्यात आला, जी पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे पार पडली.शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत महानगरपालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि इतर समविचारी गटांसोबत आघाडी करून मैदानात उतरणार आहे. या बैठकीत इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज वाटपाचाही शुभारंभ करण्यात आला.इच्छुक उमेदवारांनी पक्ष कार्यालयातून उमेदवारी अर्ज घ्यावेत, असे आवाहनही जगताप यांनी केले. या बैठकीला आमदार बापूसाहेब पठारे, माजी आमदार जयदेवराव गायकवाड, ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, माजी शहराध्यक्ष रवींद्र माळवदकर, प्रकाश म्हस्के यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही परिस्थितीत महायुतीतील घटक पक्षांसोबत आघाडी किंवा युती केली जाणार नाही. त्यांनी महायुतीवर पुणे शहराला वाहतूक कोंडी, गुन्हेगारी आणि बकालपणात ढकलल्याचा आरोप केला. तसेच, महायुतीतील तिन्ही पक्ष समाजात धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा दावाही त्यांनी केला. अशा धर्मांध शक्तींना सोबत न घेता, पुरोगामी महाराष्ट्राची पताका घेऊन पुणे शहराला पुन्हा एकदा सुसंस्कृत आणि सुनियोजित बनवण्यासाठी पक्ष निर्धाराने लढेल, असे जगताप म्हणाले.

पार्थ पवारला अटक झाली पाहिजे आणि तत्काळ अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे – अंजली दमानिया

मुंबई– पार्थ अजित पवार यांच्या जमीन घोटाळ्यात पार्थ पवार यांना अटक झालीच पाहिजे आणि तात्काळ अजित पवार यांनी राजीनामा दिलाच पाहिजे अशी मागणी आज अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. पुण्यातील अनधिकृत जमीन व्यवहार अमेडिया कंपनीने केला, त्याचे अनेक खुलासे मी येत्या काही दिवसांत करणार आहे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. या व्यवहाराची चौकशी नेमण्यात आलेल्या समितीमध्ये सहा पैकी पाच सदस्य हे पुण्यातील आहेत. चौकशी समितीतील पाच सदस्य पुण्यातील असताना आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना, ही समिती निःपक्ष चौकशी करू शकेल का? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला. या व्यवहारातील चौकशी निःपक्ष होण्यासाठी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तसेच पुण्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही अंजली दमानिया यांनी केली.

अंजली दमानिया म्हणाल्या, या व्यवहारात १८०४ कोटींची जमीन ३०० कोटींना घेतली. त्यावर स्पॅम्प ड्युटी भरली नसल्याचे म्हटले जात आहे. माझा पहिला प्रश्न, तिथे असणाऱ्या गायकवाड कुटुंबाला महार वतनाची जमीन मिळाली, ती नंतर खालसा झाली. जमीन खालसा झाल्यानंतर गायकवाड कुटुंबीयांना परत कधीही दिली गेली नसताना, त्यांनी पॉवर ऑफ अटोर्नी देऊन व्यवहार कसा करू शकतात? असा सवाल दमानिया यांनी केली.ती जमीन गायकवाड कुटुंबीयांच्या नावावर होणे अपेक्षित होते. त्यानंतरच त्यांना हा व्यवहार करता आला असता. पण शीतल तेजवानीने ११ हजार रुपये ३० डिसेंबर २०२३ रोजी भरते. त्याचे पत्र ३० डिसेंबर २०२४ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवते आणि तेव्हा जिल्हाधिकारी त्यावर कुठलीही कारवाई करत नाही. अशा जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित केले पाहिजे, अशीही मागणी अंजली दमानिया यांनी केली.या जमिनीची पॉवर ऑफ अटोर्नी सुद्धा नोंदणीकृत नसल्याचा दावा दमानिया यांनी केला. त्यामुळे विक्रीचा व्यवहारात पॉवर ऑफ अटोर्नी नोंदणीकृत असावी लागते, असा कायदा सांगतो, असे दमानिया म्हणाल्या.

पार्थ पवार यांच्यावरही ताबडतोब FIR दाखल करा, असे अंजली दमानिया यांनी म्हटले. अजित पवारांनी सांगितले त्याप्रमाणेच झाल्याचाही दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणात अंजली दमानिया यांनी थेट अजित पवारांचाच राजीनामा मागितला आहे. अमेडिया कंपनीबद्दल आपण अजून काही मोठे खुलासे करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.कुठलाही व्यवहार रद्द करताना, जागेचा मालक आणि खरेदी करणारा तो रद्द करू शकतात. पण या प्रकरणात शीतल तेजवानी जागेची मालक नाही. तिला गायकवाड कुटुंबाच्या वतीने खरेदीखतावर सही करण्याचे अधिकार नाहीत. तसेच हा व्यवहार पार्थ पवार, अमेडिया कंपनी, शीतल तेजवानी यापैकी कुणीही रद्द करू शकत नाही. कारण हा व्यवहार रद्द करण्याचे अधिकार दोन्ही मंडळींना नाही. कारण त्यांच्याकडे मुळात जमिनीचेच अधिकार नाहीत. हा व्यवहार रद्द करण्याची एक प्रक्रिया आहे. सरकारने कोर्टात दावा करून हा व्यवहार रद्द करू शकतात. ४२ कोटी रुपये भरूनही शीतल तेजवानी, अमेडिया कंपनी, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यापैकी कुणीही का व्यवहार रद्द करू शकत नाही. कायद्याने हा व्यवहार रद्द करता येणार नाही, असे अंजली दमानिया यांनी सांगितले.

महिला नेत्या रुपाली पाटलांवर गुन्हा दाखल:पोलिस ठाण्यात बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी कारवाई

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्या विरोधात पुणे शहरातील खडक पोलिस ठाण्यात बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपाली पाटील यांची बहीण आणि अन्य तीन जणांवर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या संतापल्या होत्या आणि याच गुन्ह्याचा जाब विचारण्यासाठी त्या पोलिस ठाण्यात गेल्या होत्या.पोलिस ठाण्यात गेल्यानंतर रुपाली पाटील ठोंबरे यांनी थेट वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्यासोबत अरेरावी करण्याचा प्रयत्न केला, तसेच उपस्थित पोलिसांवरही त्या संतापल्या असा त्यांच्यावर आरोप आहे . या संपूर्ण प्रकारानंतर पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणि बेकायदेशीर जमाव जमवल्याच्या आरोपावरून पोलिसांनी रुपाली पाटील ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

माधवी खंडाळकर नावाच्या महिलेने रुपाली पाटील यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. याचा राग मनात धरून रुपाली पाटील यांच्या बहिणीने आपल्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ माधवी खंडाळकर हिने व्हायरल केला होता. जरी नंतर गैरसमजातून हे घडल्याचे तिने सांगितले असले, तरी माधवी खंडाळकर हिने खडक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर रुपाली पाटील यांच्या बहिणीसह अन्य तीन जणांवर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता .

या घटनेनंतर रुपाली पाटील यांच्या बहिणीनेही माधवी खंडाळकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असून, त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, रुपाली पाटील ठोंबरे यांनी या संपूर्ण वादामागे महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा हात असल्याचा थेट आरोप केला आहे.माधवी खंडाळकरने रुपाली ठोंबरे पाटील यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती. त्यानंतर ती पोस्ट डिलीट करण्यात आली. मात्र, त्या बदल्यात रुपाली पाटलांच्या बहिणीने हल्ला केल्याचा आरोप खंडाळकरने केला होता. त्यावरून हे संपूर्ण प्रकरण घडले आहे.

पत्रकारांनी एआय जनरेटेड कंटेंट वापरताना पडताळणी करणे आवश्यक

  • प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह

मुंबई, दि. ११ : एआय-जनरेटेड कंटेंटची पडताळणी आता आवश्यक असून डीपफेक तपासासाठी आता १५–२० पॅरामीटर्सवर आधारित विशेष टूल्स तयार झाली आहेत. त्याचबरोबर, फॅक्ट-चेकिंग संस्थांही सर्व फॅक्ट्स पडताळत नाहीत. त्यामुळे पूर्वग्रह असू शकतो. ‘एआय’मधील बायस हा आज जागतिक पातळीवरील मोठा प्रश्न आहे, असे मत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केले.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ तसेच मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयात आयोजित वृत्तपत्र तसेच डिजिटल माध्यम पत्रकारांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते.

प्रधान सचिव ब्रिजेश सिंह म्हणाले की, ‘एआय’ हे सत्याचा स्रोत नाही. ते माहितीचे स्वरूप बदलू शकतात, सारांश देऊ शकतात, पण ते सत्य ठरवू शकत नाही. नव्या पिढीचे टूल्स (उदा. रिअल-टाइम सर्च करणारी AI) अनेक स्रोतांमधून माहिती गोळा करून त्वरित सारांश देऊ शकतात. हे पत्रकारांना त्वरित संदर्भ देऊन रिपोर्टिंग सोपे करतात; परंतु या माहितीचे स्रोत तपासणे आवश्यक असल्याचेही त्यांनी आर्वजून सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे मिळालेल्या संदर्भांवर मानवी पडताळणी नसतानाही निष्कर्ष देणे धोकादायक ठरू शकते. म्हणूनच मानवी नियमन आणि पडताळणी अनिवार्य असावी, असे त्यांनी ठळकपणे नमूद केले.

संवेदनशील किंवा दस्तऐवजीकरण ऑनलाईन टूल्समध्ये अपलोड करण्यापूर्वी सतर्कतेची गरज असल्याचे मत व्यक्त करत प्रधान सचिव ब्रिजेश सिंह म्हणाले की, ऑनलाईन प्रश्न, अपलोड केलेली सामग्री आणि शोधमागील ट्रेस कायम राहतात आणि संबंधित कायदेशीर चौकशीत प्राप्त करण्यायोग्य असू शकतात. त्यामुळे गोपनीय माहिती शेअर करताना व्यवस्थात्मक व कायदेशीर बाबी समजून घेणे गरजेचे ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

 ‘एआय’ कधीकधी खोटे संदर्भ तयार करू शकते, त्यामुळे वैज्ञानिक किंवा कायदेशीर बाबींमध्ये ‘एआय’ वर अवलंबून राहणे धोकादायक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. डीपफेक तयार करणे सोपे झाले आहे, परंतु ते शोधणे कठीण होत चालले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘एआय’ जनरेटेड कंटेंटवर वॉटरमार्किंगसारखे नियमन असल्याचेही त्यांनी सांगितले

प्रधान सचिव सिंह यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता हे शक्तिशाली साधन आहे परंतु त्याचा वापर करताना स्रोत-पुष्टीकरण, गोपनीयता संवर्धन, कायदेशीर जबाबदाऱ्या आणि मानवी नियमन या सर्व गोष्टींना प्राथमिकता द्यावी. त्यांनी सांगितले की, ऑफलाइन, एन्क्रिप्टेड आणि स्थानिक जीपीयू-वर चालणाऱ्या वातावरणात संवेदनशील तपासणी करणे सर्वोत्तम पद्धत आहे. त्याचबरोबर तंत्रज्ञान वेगाने बदलत असल्याने पत्रकारितेतील कार्यप्रणाली व कायदे यात पत्रकारांनी सतत अद्ययावत राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
000

मानवतावादाची जपणूक करणारे साहित्य निर्माण होण्याची गरज

0

संमेलनाध्यक्ष दशरथ यादव यांचे प्रतिपादन

अहील्यानगर दि. ११ : “सध्याचा काळात समाज संभ्रमावस्थेतून जात असून अशावेळी साहित्यिकांनी वास्तवाचे भान ठेवून निर्भीडपणे लेखन करावे, मानवतावादी मूल्याची जपणूक करणे गरजेचे आहे.” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी केले.

मराठी साहित्य मंडळ मुंबई आयोजित सोळाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अहिल्यानगर (केडगाव) येथे आयोजन कऱण्यात आले होते त्यावेळी संमेलनाध्यक्ष पदावरून श्री यादव बोलत होते. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले.
श्री यादव म्हणाले, ” मराठी भाषा जगवली ती डोंगर खोऱ्यात राहणाऱ्या शेती करणाऱ्या ग्रामीण माणसांनी. शेताच्या बांधावर काम करणाऱ्या समाजाचे दुःख साहित्यात मांडायला हवे, लेखकांनी सभोवतालचे वास्तव साहित्यात मांडणे गरजेचे आहे, सत्याचा शोध घेतलेले साहित्य हे टिकावू असते, मराठी साहित्याला फार मोठी परंपरा आणि विचार आहे, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांचे संत साहित्य समजला दिशा आणि प्रेरणा देणारे आहे .”
आमदार संग्राम जगताप यांनी ग्रामीण भागात साहित्य संमेलने व्हायला हवीत. साहित्यातून समाज उभा राहतो. डिजिटल मिडिया च्या काळात वाचन संस्कृती कमी होत आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
डॉ जयप्रकाश घुमटकर यांनी मराठी साहित्य मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला. कवी ना घ पांचाळ यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी विनायक जाधव, अनिता काळे यांनी मनोगत व्यक्त केले.
संमेलनांचे संयोजन नानासाहेब डोंगरे, बाळासाहेब देशमुख, अनिता काळे, सुदर्शन धस, आशा शिंदे, भीमराव घोडके, बबनराव खामकर आदींनी केले आहे.सुत्रसंचालन विलास रासकर यांनी केले.

“वाढत्या आत्महत्या :या “शिक्षणा”चा काय उपयोग ?”

तिकडे पंजाब राज्याचे माजी पोलिस महासंचालक मोहम्मद मुस्तफा आणि त्यांची पत्नीच नाही तर पंजाब राज्याच्या मंत्री राहिलेल्या रझिया सुलतान यांच्या अकील अख्तर या ३८ वर्षाच्या मुलाने १६ ऑक्टोबर २०२५ रोजी आत्महत्या केली.तत्पूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने त्याचे वडील आणि त्याची पत्नी यांचे अनैतिक संबंध असल्याचे तसेच आई,बहीण यांच्या त्रासाला वैतागून आत्महत्या करीत असल्याचे लिहून ठेवले आहे. तर अकील अख्तर हा व्यसनी होता,असे त्याचे वडील सांगत आहेत.

तर इकडे महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील फलटण येथील शासनाच्या ग्रामीण आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी
डॉ संपदा मुंडे यांनी फलटण पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक गोपाल बदने याने चार महिन्यात चारदा बलात्कार केल्याचे तसेच त्या रहात असलेल्या घर मालकाचा मुलगा; प्रशांत बनकर हा शारीरिक आणि मानसिक छळ करीत असल्याचे डाव्या हाताच्या तळहातावर लिहून ठेऊन, ऐन दिवाळीत २४ ऑक्टोबर रोजी स्थानिक हॉटेलमधील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. यातील आरोपी प्रशांत बनकर हा केवळ घर मालकाचा मुलगाच नाही तर आयटी इंजिनिअरही आहे! आता या दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून तपास सुरू आहे. त्या विषयीच्या बातम्या सतत वाचायला , पहायला मिळत आहेत,त्यामुळे त्या विषयी अधिक भाष्य नको.

यापूर्वी दोन आय ए एस दाम्पत्याच्या तरुण मुलीने आणि मुलाने दोन स्वतंत्र घटनांमध्ये मुंबईत उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्या .

ही तीन ठळक उदाहरणे दिली असली तरी, दररोजच कुठे ना कुठे,कुणाच्या ना कुणाच्या आत्महत्या होत असतात. किंवा आत्महत्या करण्याचे प्रयत्न होत असतात. काही गाजत राहतात,तर काही एका दिवसाच्या ,एका क्षणाच्या बातमीचा विषय होऊन संपून जातात.

या अशा आत्महत्या आणि त्यांच्या कायदेशीर बाबी, पोलिस तपास ,या नंतर घडणाऱ्या कारवाईपेक्षा मला भेडसावणारा मुख्य प्रश्न आहे, तो म्हणजे मुळात या आत्महत्या झाल्याच का ? होतातच का ? शिक्षणाने माणूस सुसंस्कारित झाला पाहिजे, एक जबाबदार नागरिक झाला पाहिजे अशी रास्त अपेक्षा असते. त्यात जर आपले प्रश्न मार्गी लागत नसतील तर संविधानाने निर्माण केलेल्या विविध शासकीय,निमशासकीय,
स्वयंसेवी संस्थांच्या, संबंधित क्षेत्रातील तज्ञ यांच्या माध्यमातून हे प्रश्न सोडविल्या गेले पाहिजेत. पण असे न होता,काही प्रकरणी अशा या यंत्रणांकडे जाऊनही कदाचित प्रश्न सुटत नसतील, उलट जास्तच त्रास वाढत असेल, किंवा दिल्या जात असेल आणि आहे त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा काहीच मार्ग दिसत नसल्याने शेवटी आत्महत्या हाच शेवटचा मार्ग समजून त्या दिशेने पाऊले उचलली जात असतील.

आत्महत्या हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने या विषयाचा अभ्यास करण्याचा मी नेहमी प्रयत्न करीत असतो. काही तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा करीत असतो. या सर्वांच्या आधारे ,मला असे वाटते की, गेल्या काही वर्षांमध्ये आत्महत्या वाढण्याची काही कारणे म्हणजे,उध्वस्त होत चाललेली कुटुंब व्यवस्था, आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यक्तीच्या मनावर ,जीवनावर, नाते संबंध यावर पडत चाललेला प्रतिकूल परिणाम,
आत्महत्या ग्रस्त व्यक्तीकडून कुटुंबीयांनी ,वरीष्ठ व्यक्तिंनी अवास्तव अपेक्षा करणे, स्वतःच्या मनाचा कल न ओळखता ,अशा अवास्तव अपेक्षांना बळी पडणे, स्पर्धेतून,कामातून निर्माण होणारा ताण तणाव, एकटेपणाची भावना, नैराश्य अशी मानसिक, भावनिक, कौटुंबिक,सामाजिक,आर्थिक, प्रशासकीय कारणे होत.

माझ्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ इथे काही उदाहरणे देता येतील.ज्या आयआयटीत प्रवेश मिळावा म्हणून मुले, मुली आणि त्यांचे पालक जीवाचे रान करतात,त्या
विविध आयआयटी संस्थांमधील पहिल्या ते चौथ्या वर्षात शिकत असलेल्या ११५ मुलामुलींनी गेल्या १० वर्षांत आत्महत्या केल्या आहेत.

ज्या एमबीबीएस,एमडी, एमएस अभ्यासक्रमांसाठी दिवसरात्र अभ्यास करून, प्रवेश परीक्षेची तयारी करून , लाखो, करोडो रुपये खर्च करून प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रवेश मिळविला आहे,अशा १२२ मुलामुलींनी गेल्या ५ वर्षात आत्महत्या केल्या आहेत.

पोलिस आणि सेना दलातील अधिकारी ,जवान हे शरीराने धट्टेकट्टे असतात. पण ते केवळ तसेच असून उपयोग नाही,तर ते मनाने सुद्धा तितकेच सुदृढ असले पाहिजे. अन्यथा भारतात गेल्या ५ वर्षांत पोलिस दलातील ९३० आणि भारतीय लष्करातील ६४२, भारतीय वायू सेनेतील १४८ तर भारतीय नौदलातील २९ अशा एकूण ८२९ जणांनी मृत्यूला कवटाळले नसते.

एकट्या २०२३ या वर्षात १०.७८६ शेतकऱ्यांनी , शेतीवर आधारित उपजिविका करणाऱ्यांनी जीवनाचा शेवट केला आहे.

उपरोक्त सर्व संघटित क्षेत्रे असल्याने एकत्र आकडेवारी उपलब्ध तरी आहे.पण इतर आत्महत्यांचे काय ?

कारणे काही का असेनात,
या सर्वच आत्महत्या अतिशय दुर्दैवी आहेत. या सर्व आत्महत्यांमुळे ,त्या त्या व्यक्तींचे कुटुंबीय आयुष्यभर आनंदात जगू शकतील, असे
मला तरी वाटत नाही. त्यात या सर्व आत्महत्या या केवळ त्या त्या कुटुंबांचीच हानी करणाऱ्या असतात,असे नाही तर इतके बुद्धिमान, आपापल्या क्षेत्रात दीर्घकाळ योगदान देऊ शकणारे मनुष्यबळ असे अकाली संपुष्टात येणे ही देशाचीच फार मोठी हानी आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या या निदान राजकीय कारणांनी का होईना,सतत संसद, संबंधित राज्यांची विधान मंडळे, निवडणुका, प्रसार माध्यमे यात चर्चिल्या तरी जातात. पण इतर क्षेत्रातील आत्महत्यांचे काय?

काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणी
भारत सरकारने विद्यार्थ्यांमधील आत्महत्या रोखण्यासाठी उपाय योजना करण्याचे निर्देश दिले आहेत. आता या निर्देशानुसार भारत सरकार आणि पुढे राज्य सरकारे काय धोरणे आखतात, काय उपाययोजना करतात,हे यथावकाश स्पष्ट होईलच. पण माझ्या दृष्टीने आजचे शिक्षण ,मग त्यात प्राथमिक,माध्यमिक, महाविद्यालयीन,व्यावसायिक,
शिक्षण,काही बाबतीत प्रशिक्षण अशा सर्व प्रकारच्या शिक्षणाचा समावेश आहे .तर असे हे सर्व मानसिक दृष्ट्या सक्षम,सुदृढ, सजग नागरिक घडविण्यासाठी कुचकामी ठरत चालले आहे का?
कुचकामी ठरत चालले असेल किंवा कुचकामी ठरले असेल तर ते का ? तसेच कायद्यांचे , नियमांचे पालन करणे हा कमीपणा नसून ती आपली स्वतः पोटी, कुटुंबाप्रत ,समाज आणि देशापोटीची जबाबदारी आहे, हे समाजभान निर्माण करण्यासाठीही हे सर्व शिक्षण कुचकामी ठरत चालले आहे का? तसे जर असेल तर संबंधित शिक्षणक्रमात बदल , सुधारणा करण्यासाठी देशातील शिक्षणतज्ज्ञ, मानसोपचार तज्ञ, राजकीय नेते, समाज शास्त्रज्ञ आणि ज्या कोणास हा विषय महत्वाचा वाटतो त्यांनी विचार मंथन करून भावी काळात तरी सर्व प्रकारच्या आत्महत्यांना पायबंद बसेल, असे पाहिले पाहिजे. अन्यथा काही आत्महत्या,काही ना काही कारणांनी गाजतात, काही दिवस गेलेत की तो विषय मागे पडतो आणि पुन्हा अशी एखादी आत्महत्या झाली की पुन्हा चर्चेला येऊन विस्मृतीत जातो. या अशा सर्व आत्महत्या कायमच्या थांबतील, तो सुदिन लवकरात लवकर येवो.
_ देवेंद्र भुजबळ.
( लेखक हे माजी पत्रकार, माजी दूरदर्शन निर्माता आणि निवृत्त माहिती संचालक आहेत)
ईमेल:devendrabhujbal @4760gmail.com
९८६९४८४८००.

गंगाधाम चौक ते आई माता मंदीर हिलटॉप हिलस्लोपवरील बेकायदा गोदामांवर महापालिकेचा हाथोडा

अतिक्रमणांनी केलेली वाहतूक कोंडी सोडण्याचा प्रयत्न

पुणे- कोंढव्यात होणारी अनधिकृत बांधकाम विरोधी मोहीम आता हळू हळू बिबवेवाडीत हि सुरु होते आहे आज मार्केटयार्ड येथील गंगाधाम चौकातून आई माता मंदीर मार्गे कात्रज कोंढवा रस्त्याकडे जाणार्‍या बिबवेवाडीच्या हिलटॉप हिलस्लोपवरील बेकायदा गोदामांवर आज अखेर महापालिकेने जोरदार कारवाई केली. तब्बल २७ गोदामांचे ६४ हजार २५० चौ. फुटांचे शेडस् व बांधकामे पाडून टाकण्यात आली. यामुळे येथील व्यावसायीकांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष असे की, दोन वर्षांपुर्वी याठिकाणी लागलेल्या आगीच्या घटनेनंतर प्रशासनाने नोटीस देउनही व्यावसायीकांनी अतिक्रमण काढले नव्हते. राजकिय हस्तक्षेपांमुळे आतापर्यंत येथील व्यावसायीकांवर आकारलेली तीनपट कर आकारणी असो अथवा अतिक्रमण कारवाईला मुहूर्त मिळत नव्हता. अखेर महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मुहुर्त लागल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

बिबवेवाडी येथील हिलटॉप हिलस्लोपवर मोठ्याप्रमाणावर गोदामे उभारण्यात आली आहेत. बहुतांश गोदामे ही बेकायदा असून सुरक्षिततेसाठी कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. गंगाधाम चौक ते कात्रज कोंढवा रस्त्याला कान्हा हॉटेल येथे मिळणार्‍या या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी महापालिका मागील काही वर्षांपासून झटत आहे. भूसंपादनाअभावी अनेक वर्षे काम रेंगाळले आहे. याठिकाणी मोठ्या जागांवर असलेली मंगल कार्यालये आणि गोदामांमध्ये ये जाा करणारी वाहने अशातच रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या किरकोळ विक्रेत्यांच्या रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे या ठिकाणी सदासर्वकाळ वाहतूक कोंडी असते. येथील तीव्र उताराच्या रस्त्यावर प्राणांतिक अपघात होत असल्याने प्रशासनाने बॅरीअर्स उभारून जड वाहनांना प्रवेश बंद केला आहे. परंतू यानंतरही अंतर्गत रस्त्याने मोठी मालवाहू वाहने येत असल्याने कोंडीचा प्रश्‍न तसाच आहे. दरम्यान, महापालिकेने येथील बेकायदा बांधकामांसाठी तीनपट कर आकारणी केली आहे. कराची रक्कम मोठी असल्याने काहींनी गोदामे बंद केली तर काहींनी कर भरणाच केलेला नाही.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नुकतेच याठिकाणी व्हिजीट केली होती. यानंतर त्यांनी दिलेल्या आदेशानुसार महापालिकेच्या बांधकाम विभागाने पोलिस बंदोबस्त आणि अत्यावश्यक यंत्रणा घेउन आज सकाळीच नोटीसेस दिलेल्या २७ गोदामांची शेडस् पांडून टाकण्यात आली, अशी माहिती महापालिकेच्या अधिकार्‍यांनी दिली.

खुल्या संगीत नाट्यप्रवेश स्पर्धेत ‘स्वराधीन’ प्रथम

पद्मश्री जयमाला शिलेदार जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजन

पुणे : पद्मश्री जयमाला शिलेदार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त एकपात्री कलाकार परिषद, कलांगण अकादमी, निळू फुले कला अकादमी यांच्या वतीने घेण्यात आलेल्या खुल्या संगीत नाट्यप्रवेश स्पर्धेत ‘स्वराधीन’ संघाने संगीत सौभद्रमधील संगीतमय नाट्यप्रवेश सादर करून तर ‘संरचना’ संघाने संगीत एकच प्यालामधील गद्य प्रवेश सादर करत प्रथम क्रमांक पटकाविला.

निळू फुले कला अकादमी (शास्त्री रस्ता) येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या विविध भागातून संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. विजेत्या संघांना तसेच कलाकारांना रोख पारितोषिके आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल :

सांघिक संगीतमय प्रवेश : प्रथम – स्वराधीन (संगीत सौभद्र), द्वितीय – स्वरकीर्ती (संगीत संन्यस्तखड्ग), तृतीय – मन्वंतर (संगीत ययाती आणि देवयानी).

सांघिक गद्यप्रवेश : प्रथम – संरचना (संगीत एकच प्याला), द्वितीय – धन्वंतरी (संगीत संशयकल्लोळ), तृतीय – कलावैविध्य (संगीत संशयकल्लोळ).

वैयक्तिक पारितोषिके – उत्कृष्ट गायन – सृष्टी सबनीस, कीर्ती कस्तुरे, सिद्धा पाटणकर, ऐश्वर्या भोळे.

वैयक्तिक अभिनय – श्रद्धा मुळे, हेमंत संचेती, अर्चना साने, स्मिता दामले.

संगीत साथ – स्वानंद नेने, मास्टर लव्हेकर.

उत्तेजनार्थ – गायन, अभिनय – संज्ञा कुलकर्णी, डॉ. वंदना जोशी, मेधा गोखले, इरा गोखले, डॉ. राजन जोशी, आरोह देशपांडे.

स्पर्धेचे परिक्षण प्रसिद्ध गायक अभिनेते रवींद्र कुलकर्णी आणि ज्येष्ठ गायिका अभिनेत्री वर्षा जोगळेकर यांनी केले. पारितोषिक वितरण प्रसंगी सतार व संवादिनी वादक गौरी शिकारपूर, जेष्ठ सनदी लेखापाल विजयकांत कुलकर्णी, प्रदिप रास्ते, गायिका अभिनेत्री अस्मिता चिंचाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

परिक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना वर्षा जोगळेकर म्हणाल्या, एका विशिष्ट लयीत गद्याचे सादरीकरण करणे आणि त्यातच संगीताचा समावेश करणे यासाठी कौशल्य गरजेचे असते. रवींद्र कुलकर्णी म्हणाले, महाराष्ट्रात संगीत नाटकाला मोठी परंपरा असून त्याची जपणूक होत ती प्रवाहित राहणे आवश्यक आहे.

विजयकांत कुलकर्णी म्हणाले, संगीत नाटकाची ताकद खूप मोठी आहे. याचा प्रचार व प्रसार होणे आवश्यक आहे. संगीत नाटकाला पुन्हा सोन्याचे दिवस आणण्यासाठी एकत्रित प्रयत्न होणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील संगीत नाटकांची परंपरा टिकवायची असेल तर अशा प्रकारच्या स्पर्धा अतिशय महत्त्वाच्या आहेत, असे मत गौरी शिकारपूर यांनी व्यक्त केले.

प्रास्ताविकात संजय गोसावी म्हणाले, संगीत नाटकाच्या क्षेत्रात चांगले कलाकार घडावेत या करिता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सूत्रसंचालन अनुपमा कुलकर्णी यांनी तर आभारप्रदर्शन नरेंद्र लवाटे यांनी केले.