Home Blog Page 498

सैफ अली वर हल्ला- ज्याला पकडले तो आरोपी नाही

मुंबईचे डीसीपी गेदाम दीक्षित म्हणाले की या अभिनेत्यावर त्याच्या घरात चाकूने हल्ला करण्यात आला. बुधवारी रात्री 2.30 वाजताच्या सुमारास मुंबईतील खार येथील गुरु शरण अपार्टमेंटच्या 12 व्या मजल्यावर ही घटना घडली.या हल्ल्यात अभिनेत्याची मान, पाठ, हात आणि डोके अशा 6 ठिकाणी चाकूने वार करण्यात आले. जखमी सैफला रात्रीच लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुंबई:

अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी चौकशीसाठी वांद्रे पोलिस ठाण्यात आणलेल्या संशयिताचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. शुक्रवारी दुपारी मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली. या प्रकरणात अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

तत्पूर्वी, सकाळी 11 वाजताच्या सुमारास, वृत्तसंस्था एएनआयने वृत्त दिले होते की सैफ अली खानवरील हल्ल्यातील संशयिताला पोलिसांनी चौकशीसाठी आणले आहे. त्याचे नाव शाहिद असल्याचे सांगण्यात आले. त्याच्याविरुद्ध घरफोडीचे पाच गुन्हे आधीच दाखल असल्याचे सांगण्यात आले.

सैफ मुलगा तैमूरसह पायी रुग्णालयात दाखल झाला
मुंबईतील लीलावती रुग्णालयाचे मुख्य न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे आणि सीओओ डॉ. नीरज उत्मानी यांनी शुक्रवारी सांगितले की, सैफला आयसीयूमधून रुग्णालयातील एका खास खोलीत हलवण्यात आले आहे. तो धोक्याबाहेर आहे.
बुधवारी रात्री उशिरा सैफ अली खानवर त्याच्या घरात चाकूने हल्ला करण्यात आला. त्याच्या मान, पाठ, हात आणि डोके अशा सहा ठिकाणी चाकूने वार करण्यात आले. रात्रीच त्याला रुग्णालयात नेण्यात आले.
लीलावती रुग्णालयाचे सीओओ डॉ. नीरज उत्तमानी म्हणाले की, सैफच्या पाठीच्या कण्यामध्ये चाकूचा तुकडा अडकला होता आणि त्यातून द्रवही गळत होता. तो शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात आला आहे.
डॉक्टरांनी सांगितले की जर चाकू अभिनेत्याच्या मणक्यात 2 मिमी खोल असता तर पाठीच्या कण्याला गंभीर नुकसान झाले असते.
lलीलावती रुग्णालयाचे डॉ. नितीन डांगे म्हणाले, “सैफ त्याचा मुलगा तैमूरसोबत पायी रुग्णालयात आला. त्याच्या हातावर दोन जखमा होत्या. त्याच्या मानेवरही एक जखम होती ज्यावर प्लास्टिक सर्जरी झाली आहे. चाकू पाठीच्या कण्याजवळ अडकला होता.” शस्त्रक्रियेद्वारे तो तुकडा काढून टाकण्यात आला आहे. संसर्गापासून सैफचे संरक्षण करण्यासाठी, डॉक्टरांनी त्याला भेटण्यास बंदी घातली आहे. डॉक्टरांनी बेड रेस्टचा सल्ला दिला आहे. एका आठवड्यात बरे होण्याची अपेक्षा आहे.”

तथापि,मुंबई वांद्रे झोनल डीसीपी म्हणतात की अद्याप याबद्दल काहीही समोर आलेले नाही. डीसीपींनी लोकांना अफवा पसरवू नयेत असे आवाहनही केले आहे.सैफला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या ड्रायव्हरने सांगितले- सैफचे संपूर्ण शरीर रक्ताने माखले होतेऑटो चालक भजन सिंग म्हणाला, ‘मी रात्री गाडी चालवत होतो. सतगुरु बिल्डिंगच्या समोरून कोणीतरी हाक मारली. रिक्षा, रिक्षा. मी गेटजवळ ऑटो थांबवला. गेटमधून एक माणूस बाहेर आला. तो रक्ताने माखला होता. शरीराच्या वरच्या भागात जखम होती आणि त्यातून खूप रक्तस्त्राव होत होता. मी लगेच त्याला माझ्या रिक्षात बसवले.

‘ते आपापसात बोलत होते की त्यांनी होली फॅमिलीत जावे की लीलावतीमध्ये.’ मी विचारले- तुम्हाला कुठे जायचे आहे? तर ते म्हणाले, चला लीलावती हॉस्पिटलमध्ये जाऊया. त्यांच्यासोबत एक लहान मूल आणि एक तरुणही होता. एकूण 3 लोक होते. मी त्यांना ओळखत नव्हतो. त्या माणसाच्या पाठीवर खोल जखम होती आणि त्याच्या मानेवरही जखमा होत्या. संपूर्ण शरीर रक्ताने माखले होते. मला तिथे करीना कपूर दिसली नाही. पोलिसांनीही अजून माझी चौकशी केलेली नाही.

पिफ’ स्पर्धात्मक विभागातील मराठी चित्रपटांची यादी जाहीर

चित्रपट महोत्सवासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू

पुणे फिल्म फाउंडेशन, सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र शासन व दादासाहेब फाळके चित्रनगरी यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ते २० फेब्रुवारी २०२५ दरम्यान आयोजित करण्यात येत असलेल्या २३ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा(पीफ)तील स्पर्धात्मक विभागातील मराठी चित्रपटांची यादी आज महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी जाहीर केली.

या स्पर्धेसाठी एकूण ४० मराठी चित्रपटांनी आपला सहभाग नोंदवला. यातून ७ चित्रपटांची अंतिम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. गिराण (दिग्दर्शक – विजय श्रीरंग खुडे), सांगला (दिग्दर्शक – रावबा गजमल), मॅजिक (दिग्दर्शक – रवींद्र विजय करमरकर), सिनेमॅन (दिग्दर्शक – उमेश बागडे), निर्जली (दिग्दर्शक – स्वाती सदाशिव कडू), रावसाहेब (दिग्दर्शक – निखिल महाजन), स्नो फ्लॉवर (दिग्दर्शक – गजेंद्र अहिरे) या ७ चित्रपटातून सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटाची निवड चित्रपट महोत्सवात परदेशी आंतरराष्ट्रीय ज्युरी चित्रपट बघून करतील.

महाराष्ट्र शासनाचा संत तुकाराम उत्कृष्ट आंतराष्ट्रीय मराठी चित्रपट या स्पर्धात्मक विभागासाठी ५ लाख रुपयांचा रोख पुरस्कार आहे. चित्रपट महोत्सवाचा सांगता समारंभात हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाईल.

चित्रपट महोत्सवासाठी डेलीगेट नोंदणी प्रक्रिया www.piffindia.com या संकेतस्थळावर सुरू झाली असून, सर्वांसाठी कॅटलॉग फी केवळ रु. ८०० इतकी आहे.

बालगंधर्व कलादालनात साकारली व्यंगचित्रांची दुनिया

पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाला सुरुवात
देश-परदेशातील 280 व्यंगचित्रकारांच्या व्यंगचित्रांचा समावेश
शनिवार-रविवारी परिसंवाद, प्रात्यक्षिकांचे आयोजन

पुणे : देश-विदेशातील व्यंगचित्रकारांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रांची दुनिया आज (दि. 17) बालगंधर्व कलादालनात पुणेकरांना पाहण्यासाठी खुली झाली आहे. व्यंगचित्र महोत्सव रविवार, दि. 19 जानेवारीपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत सर्वांसाठी खुला आहे. जवळपास 280 व्यंगचित्रकारांची चित्रे यात मांडण्यात आली आहेत.
युवा संवाद सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी ज्येष्ठ पत्रकार अविनाश भट यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ व्यंगचित्रकार वैजनाथ दुलंगे, घन:श्याम देशमुख, लहु काळे, गणेश जोशी आणि ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी यांची प्रमुख उपस्थिती होती.
व्यंगचित्र महोत्सवाचे संयोजक, व्यंगचित्रकार धनराज गरड यांनी प्रास्ताविकात उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, कार्टुनिस्ट कंबाईन या संस्थेच्या सहकार्याने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून पुण्याच्या सांस्कृतिक पटलावर व्यंगचित्रांच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण करावी याकरीता व्यंगचित्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. शनिवार (दि. 18) आणि रविवारी (दि. 19) व्यंगचित्रांची प्रात्यक्षिके आणि परिसंवादांचेही आयोजन करण्यात आले आहे.
राजकीय, सामाजिक, पर्यावरण, आधुनिक तंत्रज्ञान, प्रदुषण, पाणी टंचाई, जागतिक पातळीवरील युद्ध परिस्थिती अशा विविध विषयांवर मार्मिक टीका-टिप्पणी करणारी व्यंगचित्रे प्रदर्शनात असून महाराष्ट्रासह देश-विदेशातील व्यंगचित्रकारांची प्रतिभा यातून पाहावयास मिळणार आहे.
उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना अविनाश भट म्हणाले, व्यंगचित्रकार त्याच्या चित्राच्या माध्यमातून मोठा आशय व्यक्त करीत असतो. व्यंगचित्रकार हा जन्माला यावा लागतो त्याचे काम सर्जनशील असते. व्यंगचित्रकार समाजातील बारकावे मिश्किल भावातून आपल्या चित्रांद्वारे प्रकट करतो त्याचप्रमाणे समाजातील संवेदनशीलता जीवंत ठेवतो.
वैजनाथ दुलंगे म्हणाले, व्यंगचित्रकला ही गांभीर्याने करण्याची करण्याची गोष्ट असून ती दुधारी तलवार आहे. व्यंगचित्रकाराला राजकीय, सामाजिक तसेच आजूबाजूच्या घटनांचा डोळसपणे, सखोल अभ्यास करावा लागतो. व्यंगचित्रकाराने स्वत:च्या शैलीतून ओळख निर्माण करताना झोकून देऊन मेहनत करणे आवश्यक आहे. हसवसा हसवता विचार करायला लावणारी तर काही वेळा हादरवून टाकणारा आशय मांडणारी अशी ही व्यंगचित्रकला आहे. घन:श्याम देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर गरड यांनी केले.

पिंपरीत 400 एकरमध्ये होणार महाराष्ट्राचा 58वा निरंकारी संत समागम

24 जानेवारीपासून निरंकारी संत समागमात मानवतेचा महासंगम

पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो स्वयंसेवक पूर्वतयारीमध्ये सहभागी

पिंपरी: महाराष्ट्राचा 58वा निरंकारी संत समागम सुरु होण्यास अवघे काही दिवस उरले असल्याने समागमाच्या पूर्वतयारीमध्ये लागलेले निरंकारी भाविक भक्तगण समागम स्थळ समतल व सुंदर बनविण्यासाठी त्यामधील प्रत्येक व्यवस्थेला अंतिम रुप देत आहेत. समागमाच्या पूर्वतयारीमध्ये पुणे झोनसह संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो सेवादल स्वयंसेवक आणि भाविक भक्तगण सातत्याने आपल्या निष्काम सेवा अर्पण करत आहेत. पिंपरीतील मिलिटरी डेअरी फार्मच्या सुमारे 400 एकरच्या विस्तीर्ण मैदानात शुक्रवार, दि.24 जानेवारी 2025 पासून हा तीन दिवसीय संत समागम सुरू होत असून, त्याची सांगता 26 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. मुख्य सत्संग कार्यक्रम दररोज दुपारी 2 वाजता सुरू होईल ज्यामध्ये अनेक वक्ते, गीतकार, कवी सद्गुरु आणि ईश्वराप्रती आपल्या मनातील भावना व्यक्त करतील. शेवटी रात्री ८ वाजल्यापासून सर्वांना सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांचा पवित्र आशीर्वाद लाभणार आहे.

मागील एक महिन्यांपासून महाराष्ट्रा व्यतिरिक्त इतर राज्यांतून निरंकारी भक्तगणांनी समागम स्थळांवर येऊन आपल्या निष्काम सेवांच्या माध्यमातून समागम स्थळाला एका सुंदर नगरीच्या रुपात परिवर्तित केले आहे. सर्व श्रद्धाळू ज्या उत्साहाने, आवडीने, भक्तिभावाने, मर्यादा व अनुशासनाचे पालन करत आपल्या सेवा निभावत आहेत ते पाहून जनसामान्य अत्यंत प्रभावित आहेत. समागम स्थळाचे हे अनुपम दृश्य आजूबाजूने जाणाऱ्या वाटसरूंना आणि स्थानिक नागरिकांना आकर्षण व उत्सुकतेचे केंद्र बनून राहिले आहे.

मानवतेच्या कल्याणासाठी आयोजित केलेल्या या संत समागमाचे साक्षी बनण्यासाठी समस्त भाविकांना व निरंकारी भक्तगणांना नुक्कड नाटक, बॅनर तसेच पुण्याच्या कानाकोपऱ्यात खुल्या प्रांगणांमध्ये सत्संगच्या माध्यमातून सादर आमंत्रित केले जात आहे ज्यायोगे त्यांनी या संत समागमामध्ये सहभागी होऊन आपले जीवन सार्थक करावे.

समागमात सहभागी होणाऱ्या सर्व भक्तगणांसाठी व्यापक स्तरावर निवासी तंबू, लंगर, कॅन्टीन, दवाखाने, सुरक्षा व्यवस्था, पार्किंग आणि रेल्वे स्थानक आणि बसस्थानकातून ये-जा करण्यासाठी वाहतूक व्यवस्था इत्यादीची यथोचित व्यवस्था करण्यात आली आहे. समागम स्थळावर स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जात आहे. प्रकाशन विभागाकडून समागम स्थळावर वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल लावले जात आहेत. संत निरंकारी मिशनचे सचित्र दर्शन घडविण्यासाठी आकर्षक निरंकारी प्रदर्शनीचेही आयोजन केले जात आहे यासह एकूण आठ कार्यशाळा असलेली भव्य बाल प्रदर्शनी देखील असेल, प्रत्येक कार्यशाळा मुलांना आकर्षक आणि शैक्षणिक अनुभव प्रदान करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. हे सर्व सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन मार्गदर्शनानेच शक्य झाले आहे.

भक्तिभावाने केल्या गेलेल्या या सर्व पूर्वतयारीमध्ये कुशलतेची एक सुंदर झलक पहायला मिळत आहे. निश्चितच या संत समागमामध्ये देश-विदेशातील विविधतेने नटलेल्या संस्कृतीची व सार्वभौमत्वाची छटा उमटलेली पहायला मिळेल आणि यामध्ये सहभागी होणारे समस्त भाविक भक्तगण अलौकिक आनंदाची प्राप्ती करत सद्गुरु व संतांच्या दिव्य वाणीने प्रभावित होऊन आपल्या जीवनाच्या मूळ उद्देशाकडे अग्रेसर होत प्रेमाभक्तीच्या भावनेचा विस्तार करतील.

मानवतेच्या या महामेळाव्यासाठी प्रत्येक धर्मप्रेमी बंधू भगिनींना आदरपूर्वक आमंत्रित करण्यात येत आहे.

भारतीय स्वातंत्र्यांच्या स्व’त्वाची ओळख ऊभी करण्यात योगदान नसणाऱ्यांनी, त्याची व्याख्या ठरवणे.. हे एककल्ली पणाचे, संकुचित व दुर्दैवी लक्षण ..! काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

स्वातंत्र्यांच्या ‘स्व’त्वाची व प्रतिष्ठेची व्याख्या एककल्ली ठरवण्याचा भागवतांचा प्रयत्न संकुचित, हास्यास्पद व दुर्दैवी..!!
देशाची ‘स्वातंत्र्य प्राप्ती व स्वप्रतिष्ठा’ वेगळी कशी..?
देशाची स्व-प्रतिष्ठा १५ ॲा १९४७ च्या ‘स्वातंत्र्य प्राप्तीमध्येच’ प्रस्थापित झाली.. हे का मान्य नाही..?
– काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

पुणे दि – १७ : देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात कोणताही त्याग, संघर्ष, योगदानाची भुमिका न घेताही, प्रजासत्ताक भारतात केवळ खोट्या व तथ्यहीन आरोपांच्या व वारेमाप आश्वासनांच्या आधारे सत्ता प्राप्ती झालेल्यांना देशाच्या ‘स्वातंत्र्य संग्रामाचे’ मोल कळणे अवघड असल्याची टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वातंत्र्या प्रती नुकत्याच केलेल्या विधानावर केली.
ते पुढे म्हणाले की, मोहन भागवत यांनी किमान याचे स्मरण ठेवावयास पाहिजे होते की, इंग्रजांच्या गुलामगिरी काळात ‘राजेशाही व निजामशाहीत’ विभागलेल्या खंड – प्राय भारतात.. तब्बल ४५० वर्षे न सुटलेला ‘राम मंदिराचा’ प्रश्न.. केवळ प्रजासत्ताक भारतातील ‘संविधानीक – न्यायव्यवस्थे’ मुळेच् ७० वर्षात शांततेने मार्गी लागला.
स्वातंत्र्य प्राप्ती व देशाची स्वप्रतिष्ठा वेगळी कशी..?
देशाची स्व-प्रतिष्ठा १५ ॲा १९४७ च्या ‘स्वातंत्र्य प्राप्तीमध्येच’ प्रस्थापित झाली.. हे संघास का मान्य नाही..? स्वातंत्र्य संग्रामात योगदान नसल्याच्या न्यूनगंडामुळे संघ, जनसंघ वा भाजप समर्थकांकडून हे होत आहे काय..? असे सवाल ही काँग्रेस राज्य प्रवक्ते यांनी केले.
खरेतर, भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीत काँग्रेस’च्या योगदानावर भागवतांनी या पुर्वीच प्रशंसनीय विधाने ही केली आहेत, मात्र स्वातंत्र्य संग्रामा बाबत पुन्हा – पुन्हा तिरस्कार दर्शवणारी वक्तव्ये मोहनराव भागवत ‘कोणाच्या दबावाखाली करतात’ (?) त्यातुन स्वातंत्र्य संग्राम विषयी संघाच्या कृतघ्नतेचे संस्कारच पुन्हा पुन्हा स्पष्ट होत असल्याचे ही गोपाळदादा तिवारी यांनी म्हटले आहे.

शोभा यात्रेने झाली बाल साहित्य संमेलनाची नांदी

जागर माय मराठीचा, संदेश महाराष्ट्राच्या ऐक्याचा.

पुणे;शुक्रवार दि. १७ जानेवारी रोजी सरहद शाळेच्या प्रांगणात सकाळी ७.३० वाजता मराठीच्या प्रचार व प्रसारार्थ शोभा यात्रेने बाल साहित्य संमेलनाची थाटात सुरुवात झाली.
सरहद, पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळचे ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २१, २२ व २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत दिल्ली येथील छत्रपती शिवाजी साहित्य नगरी (तालकटोरा स्टेडियम) येथे होत आहे. नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर सरहद मध्ये बाल साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
दोन दिवसीय बाल साहित्य संमेलनाची सुरुवात दि. १७ रोजी सकाळी ७.३० वाजता शोभा यात्रेने करण्यात आली. ग्रंथ पूजन करून शोभा यात्रेस सुरुवात झाली. ढोल-ताशा, टाळ मृदुंग, लेझीम,साहित्यिक व संतांच्या, वारकऱ्यांच्या वेशभूषेतील पूर्व प्राथमिक विभागाचे बालचमुही यात सहभागी झाले होते.वाचनाचे महत्त्व, साहित्यिकांचे विचार सांगणारे फलक विद्यार्थ्यांनी हाती घेतले होते.चला चला रे वाचू आपण पुस्तक, ज्ञाना पुढे होऊ नतमस्तक’ असा संदेश देत, मराठी भाषेचे महत्व सांगणाऱ्या घोषणा विद्यार्थी देत होते.
संस्थेचे अध्यक्ष संजय नहार, सचिव सुषमा नहार, विश्वस्त शैलेश वाडेकर, मुख्याध्यापिका कविता वानखेडे,प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका दिपाली कोंडे, ज्यु.कॉलेजच्या पर्यवेक्षिका रुबीना देशमुख, माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका स्वाती राऊत, पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका पल्लवी पासलकर, सर्व विभागाचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक वृंद उपस्थित होते.

शिक्षण विभागाकरीता आखण्यात आलेल १० कलमी कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

पुणे, दि. १७ : मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार शिक्षण विभागाकरीता आखण्यात आलेल्या १० कलमी कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी; विभागाच्या अधिकाधिक सेवा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करण्याच्यादृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ येथे शालेय शिक्षण आयुक्तालयाच्या अधिनस्त असलेल्या विषयाबाबत आढावा बैठकीत त्यांनी सूचना दिल्या. यावेळी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावर, शिक्षण संचालक माध्यमिक संपत गोसावी, शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी, योजना संचालक महेश पालकर, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील आदी उपस्थित होते.

श्री. भुसे म्हणाले, माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी कृती कार्यक्रम आखून राज्यात कॉपीमुक्त अभियान राबवावे. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घ्यावा, भेटीदरम्यान स्वच्छतागृह, स्वयंपाकगृह, आहार, स्वच्छ पिण्याचे पाणी, बैठक व्यवस्था आदी भौतिक सुविधांसोबत अभ्यासक्रमावरही लक्ष केंद्रीत करावे. शाळेतील भौतिक सुविधांबाबत राज्यस्तरीय आराखडा तयार करावा, याकरीता आवश्यकतेनुसार सुधारणात्मक उपाययोजना कराव्यात. याकामी विविध सामाजिक संस्थांचीही मदत घ्यावी. अधिकाऱ्यांनी एक शाळा दत्तक घेण्याबाबत नियोजन करावे. शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री प्रत्यक्ष शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत, त्यादृष्टीने नियोजन करावे.

विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कला, क्रीडा अशा गुणांचा विकास झाला पाहिजे, याकरीता विभागनिहाय शाळेबाबत नियोजन करावे. तालुकास्तरावर इतर शाळांना मार्गदर्शक ठरेल अशी एखादी आदर्श शाळा निर्माण करा, त्यामध्ये वाचनालय, अत्याधुनिक प्रयोगशाळा, संगणकीकृत वर्ग, क्रीडांगण, खेळाचे साहित्य आदींचा समावेश करावा. शालेय प्रवेश प्रक्रियेत पालक व विद्यार्थ्यांची गैरसोय होता कामा नये, शाळेत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आहार द्यावा, विद्यार्थ्यांची नियमितपणे आरोग्य तपासणी करावी, आजाराचे निदान होईपर्यंत त्याला मदत करावी, असेही ते म्हणाले.

विविध जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून त्याबाबत राज्यस्तरीय अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावेत. नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकाला प्रोत्साहान देण्यात यावे, शैक्षणिक क्षेत्रात गुणात्मक परिवर्तन करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करावा. आदर्श शिक्षकांच्या अंगी असलेल्या कौशल्याचा इतर ठिकाणाही उपयोग करुन घ्यावा. शिक्षकांचे वैद्यकीय प्रतिपूर्तीचे देयक वेळेत मिळेल यादृष्टीने नियोजन करावे. शिक्षक भरती प्रक्रियेला गती द्यावी. शैक्षणिक क्षेत्रात परिवर्तनात्मक बदल घडविण्याच्या कार्यात पालक, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक संस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. भुसे यांनी केले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. सीबीएसई पॅटर्नच्या शाळेकरीता प्रशिक्षित शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची कार्यवाही करावी. राष्ट्रगीतानंतर राज्य गीताचे गायन होईल, याबाबत दक्षता घ्यावी. कामकाज करताना त्रुटी राहिल्यास त्याची पूर्तता करुन पुढील कामाचे नियोजन करावे.

श्री. भुसे यांच्या हस्ते शिक्षण आयुक्तालयाच्या ‘दिशादर्शिका वर्ष २०२५’ चे अनावरण करण्यात आले.

श्री. सिंह म्हणाले. आगामी काळात शैक्षणिक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर विभागाचा भर आहे. शिक्षकांना शैक्षणिक कार्यात सहभागी करुन शालेय पातळीवर गुणात्मक परिवर्तन घडविण्याकरीता प्रयत्न करण्यात येईल, असेही श्री. सिंह म्हणाले.

श्री. गोसावी यांनी प्राथमिक विभाग, श्री. सूर्यवंशी यांनी माध्यमिक विभाग आणि श्री. पालकर यांनी योजना विभागाचा आढावा यावेळी सादर केला.
00000

सूर तालांच्या मिलापातून रंगली शास्त्रीय संगीताची मैफल

कलायन कल्चरल सेंटर तर्फे भारतीय शास्त्रीय संगीत कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : तबल्याच्या थापेतून निर्माण होणारे मनोहारी ताल, त्याला हार्मोनियमची सुरेल साथ आणि विविध रागांमधून तयार झालेले  शास्त्रीय संगीत अशा ताल आणि सुरांच्या मिलापातून संगीतमय सुरेल बैठक रंगली. तन्मय  बिच्चू यांनी उस्ताद झाकीर हुसेन यांच्या कल्पनेतून निर्माण झालेली कला रसिकांच्या समोर सादर केली. त्यांचे तबलावादन ऐकून रसिकांना उस्ताद झाकीर हुसेन यांच्या तबला वादनाचा आनंद मिळाला.

कलायन कल्चरल सेंटर तर्फे कर्वे रस्त्यावरील संस्थेच्या सभागृहामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे शिष्य तन्मय बिच्चू आणि मेहेर परळीकर यांनी कार्यक्रमात सादरीकरण केले. अमेय बिच्चू, ऋषिकेश जगताप, सारंग काटकर आणि छाया गोरले यांनी त्यांना साथसंगत केली.

तन्मय बिच्चू यांनी  तीन तालातून मैफिलीची सुरुवात केली. अमेय  बिच्चू यांनी त्यांना हार्मोनियम वर साथ दिली. नादमय वादन, कठीण लयकारी आणि काव्यमय रचना असे अनेक पैलू उलगडत अप्रतिम तबलावादन तन्मय बिच्चू यांनी केले. मेहेर परळीकर यांनी राग यमन ने आपल्या मैफिलीची सुरुवात केली आणि त्या नंतर राग खामज प्रस्तुत केला. विविध तालातील बंदिश यांनी नटलेल्या त्यांच्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

महिलांच्या विरोधात जे हिंसाचार आणि अत्याचाराचे गुन्हे आहेत ते रद्द करता कामा नयेत, त्याचे पुनर्निरीक्षण करा’; पुणे पोलीस आयुक्तालय येथील बैठकीत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचना

पुणे शहरात सिग्नलची व्यवस्था स्मार्ट सिटीकडून पुणे पोलिसांकडे सोपविण्यात यावी या प्रस्तावाचा मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करतो- महाराष्ट्र गृहराज्यमंत्री योगेश कदम

पुणे दि. १७ : पुणे शहरांमध्ये नोव्हेंबर २०२४ पासून आतापर्यंत जे गुन्हे घडलेले आहेत त्याबाबत आज पुणे पोलीस आयुक्तालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. त्याचबरोबर पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घडलेल्या गुन्ह्यांच्या कारवाईबाबत सादरीकरण केले. यावेळी घडलेल्या घटनांवर गांभीर्याने लक्ष देत अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काही महत्त्वाच्या सूचना देत उपायोजना करण्याबाबत सांगितले आहे.

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, अशा सूचना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी दिल्या. तसेच, पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “आज या बैठकीत मी चार-पाच प्रश्न समोर मांडले आणि त्यामध्ये पहिला प्रश्न म्हणजे पुण्यातल्या वाहतूक कोंडी संदर्भातला आहे. यामध्ये सिग्नलची व्यवस्था, पुणे शहरांमध्ये स्मार्ट सिटीकडून पुणे पोलिसांकडे सोपवण्यात यावी हा प्रस्ताव अजूनही विचाराधीन आहे, बऱ्याच वर्षापासून हा प्रयत्न चाललेला आहे. तर तो प्रस्ताव सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार यांच्याकडे मी पाठपुरावा करतो असं गृहराज्यमंत्री श्री. योगेश कदम यांनी सांगितले. दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे नवीन दंड सहितेनुसार, महिलांच्या विरोधात जे हिंसाचार आणि अत्याचाराचे गुन्हे आहेत ते B Summery केले जातात म्हणजे ते रद्द केले जातात परंतु, दंड संहितेत म्हटलेले आहे की असे कुठलेही गुन्हे रद्द करता कामा नयेत, तर त्याचे पुनर्निरीक्षण करा, अशा मी त्यांना सूचना दिलेल्या आहेत.

त्याचबरोबर शहरामध्ये बाराशे-तेराशे पॉक्सोची प्रकरणे आहेत. त्यामधल्या मुलींना प्रत्येक तारखेच्या आधी कळवणे क्रमप्राप्त असते की, त्यांची तारीख आहे आणि त्यांना कोणत्या अडचणी आहेत का? त्या प्रत्येक मुलीला दर महिन्यात त्यांच्या तारखेच्या वेळेला पुणे पोलीस फोन करतात कोणती अडचण असेल तर, गृह भेट देतात. यावर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुलींची उमेद वाढवण्याच्या दृष्टीने काही साहित्य उपसभापती कार्यालय आणि स्त्री आधार केंद्राच्यावतीने देण्याची इच्छा असल्याचे व्यक्त केले आणि यासाठी त्यांचा अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

तसेच, पुणे शहराची वस्ती वाढत आहे म्हणून महिला दक्षता समितीच्या ज्या पोलीस स्टेशन पुरत्या मर्यादित आहेत तशा न ठेवता बीट स्तरावरती महिला दक्षता समिती कराव्यात असे सुचवले. पोलीस निधी हा जो उपक्रम आहे तो शाळा, कॉलेजपर्यंत मर्यादित आहे. तर जे बीटचे कॉन्स्टेबल्स आहे ते त्या परिसरामध्ये सातत्याने जातच असतात त्यांनी महिलांची समिती बीट स्तरावरती करावी याला पण पोलीस आयुक्त यांनी मान्यता दिलेली आहे आणि त्याच्याबद्दल ते सकारात्मक होते. या खेरीज ड्रग्से प्रमाण कमी झाले पाहिजे, वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या अपघातासाठी आणि सायकल प्रेमींसाठी सुरक्षिततेची पावलं उचलली गेली पाहिजेत,” असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

पुढे ऑनर किलिंग सारख्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “ऑनर किलिंगची एकही घटना पुणे शहरात घडलेली नाही आहे. परंतु, ऑनर किलिंग हे टायटल गुन्ह्यांमध्ये असावं जेणेकरून एखादी जरी ऑनर किलिंगची घटना घडली तर त्याची गांभीर्याने दखल घेतली जाईल.”

धर्मवीर संभाजी राजेंचे स्मारक उभे राहिल्यास शंभूराजेंनी धर्मासाठी केलेल्या त्यागाची प्रेरणा मिळेल हा विश्वास – प्रमोद नाना भानगिरे

  • मित्र मंडळ चौकात छत्रपती संभाजीराजेंचे स्मारक व्हावे ही शिवसैनिकांची इच्छा; आयुक्तांना निवेदनाद्वारे केली मागणी..!

पुणे – छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत स्वारगेट जवळील मित्रमंडळ चौक येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभे रहावे ही तमाम शिवसैनिकांची इच्छा असून या मागणीसंदर्भात शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी आयुक्तांची भेट घेवून मागणी केली. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभे राहिल्यास संभाजी राजेंनी धर्मासाठी केलेला त्याग याबाबत निश्चितच प्रेरणा मिळणार असल्याचा विश्वास ही प्रमोद नाना भानगिरे यांनी व्यक्त केला.

स्वारगेट जवळील मित्र मंडळ चौक येथे जुने झालेले पृथ्वीचे शिल्प असून याची देखभाल, दुरुस्ती व्यवस्थित केली जात नसून या शिल्पातून सामाजिक संदेश अथवा प्रेरणा देखील मिळत नाही, त्यामुळे याठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे 30 फुटाचे भव्य स्मारक उभे व्हावे यासाठी शिवसेना पर्वती विधानसभा मतदारसंघाचे विभागप्रमुख महेंद्र जोशी यांनी पुणे शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांची भानगिरे यांची भेट घेतली होती

यानंतर तत्काळ शंभू राजेंच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून प्रमोद नाना भानगिरे यांनी यासंदर्भात पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांची महेंद्र जोशी यांच्या समवेत भेट घेवून मित्र मंडळ चौकात संभाजी महाराजांचे स्मारक निर्माण करावे अशी मागणी केली. या मागणी संदर्भात आयुक्तांनी सकारात्मकता दर्शवली असून याबाबत लवकर कार्यवाही करणार असल्याचा विश्वास दिला असून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभे राहिल्यास या स्मारकातून धर्माभिमान, धर्मरक्षण आणि संभाजी महाराजांनी धर्मासाठी केलेला त्याग याबाबत निश्चितच प्रेरणा मिळेल असे पुणे शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी सांगितले.

वेदांता रिसोर्सेसने नवीन दोन टप्प्यांतील बाँड इश्यूद्वारे उभारले 1.1 अब्ज डॉलर्स

 प्रमुख गुंतवणूकदारांमध्ये अमेरिकेतील, ईएमईए आणि आशियातील प्रतिष्ठित गुंतवणूकदारांचा समावेश.

●    बाँड्सना S&P ग्लोबलकडून ‘B’ आणि मूडीज रेटिंगकडून ‘B2’ रेटिंग दिले जाण्याची अपेक्षा.

●    मूडीजने अलीकडील हालचालींच्या पार्श्वभूमीवर वेदांता रिसोर्सेस लिमिटेडच्या (VRL) कॉर्पोरेट रेटिंगला B2 वरून B1 पर्यंत सुधारले.

●    सप्टेंबर 2024 पासून व्हीआरएलने 3.1 अब्ज डॉलर्सचे USD बाँड्स उभे केले.

वेदांता रिसोर्सेसने आंतरराष्ट्रीय रोखे भांडवली बाजारात नवीन दुहेरी ट्रान्च इश्यूद्वारे 1.1 अब्ज डॉलर्स उभे केले असल्याचे कंपनीने सिंगापूर एक्स्चेंज फायलिंगमध्ये सांगितले.

एक्स्चेंज फायलिंगनुसार, बाँड इश्यू दोन भागांमध्ये आहे – 5.5 वर्षांच्या कालावधीसाठी 9.475% व्याजदराने $550 दशलक्षचा भाग आणि 8.25 वर्षांच्या कालावधीसाठी 9.850% व्याजदराने $550 दशलक्षचा भाग. या दोन्ही टप्प्यांना गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी मिळाली असून, 135 हून अधिक खात्यांकडून बाँडसाठी $3.4 अब्ज अंतिम ऑर्डर्स प्राप्त झाले, ज्यामुळे 3.1 पट ओव्हरसब्स्क्रिप्शन झाले, असे कंपनीने सांगितले. या इश्यूमधून मिळणारी निव्वळ रक्कम व्हीआरएलचे बाँड्स प्रीपेमेंट करण्यासाठी आणि त्यासंबंधित व्यवहार खर्चासाठी वापरण्यात येईल.

अंतिम बाँड वाटपामध्ये 5.5 वर्षांच्या टप्प्यासाठी आशियात 61%, ईएमईएमध्ये 30% आणि अमेरिकेत 9% वाटप करण्यात आले. 8.25 वर्षांच्या टप्प्यासाठी आशियात 54%, ईएमईएमध्ये 30% आणि अमेरिकामध्ये 16% वाटप करण्यात आले.

मुख्य वित्तीय अधिकारी अजय गोयल म्हणाले, “ह्या व्यवहाराने वेदांताच्या पुनर्रचनेतून साकारलेल्या बाँड्सचे संपूर्ण पुनर्वित्तकरण पूर्ण केले आहे. या व्यवहारांच्या मालिकेत मिळालेला मजबूत गुंतवणूकदारांचा विश्वास वेदांताने मागील अनेक तिमाहीत घेतलेल्या महत्त्वपूर्ण धोरणात्मक उपाययोजनांवर आधारित आहे, जसे की, विक्रमी उत्पादन, खर्चाचे कार्यक्षम नियोजन आणि कर्ज कमी करणे.”

व्हीआरएलने सप्टेंबर 2024 पासून चार सलग आंतरराष्ट्रीय बाँड व्यवहारांद्वारे $3.1 अब्ज यूएस डॉलर बाँड्सचे पुनर्वित्तकरण केले आहे. वेदांताने उभारलेल्या एकूण यूएसडी बाँड्सची रक्कम 2022 नंतर कोणत्याही भारतीय संस्थेकडून उभारण्यात आलेली सर्वात मोठी रक्कम आहे. हा इश्यू म्हणजे व्हीआरएलसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, ज्याने मागील 3 वर्षांत आपले कर्ज $4.6 अब्जने कमी केले आहे आणि ते गेल्या दशकातील सर्वात कमी स्तरावर आणले आहे.

मूडीज आणि S&P ग्लोबल या दोन प्रमुख संस्थांनी अलीकडील घडामोडींना लक्षात घेऊन व्हीआरएल आणि त्यांच्या साधनांच्या रेटिंगमध्ये सुधारणा केली आहे. 13 जानेवारी रोजी मूडीजने व्हीआरएलच्या कॉर्पोरेट कौटुंबिक रेटिंगला B2 वरून B1 पर्यंत सुधारले असल्याचे सांगितले, तसेच व्हीआरएलद्वारे हमी दिलेल्या प्राधान्यकृत असुरक्षित बाँड्सच्या रेटिंगला B3 वरून B2 पर्यंत, म्हणजेच एक स्तर सुधारणा केली आहे, तसेच स्थिर दृष्टिकोन राखला आहे. मूडीजने व्हीआरएलच्या प्रस्तावित वरिष्ठ असुरक्षित बाँड इश्यूसाठी B2 रेटिंग दिले आहे.

S&P ग्लोबलने 13 जानेवारी रोजी व्हीआरएलच्या वरिष्ठ असुरक्षित नोट्ससाठी ‘B’ चे प्राथमिक रेटिंग दिले. हे सध्याच्या रेटिंगपेक्षा एक स्तर सुधारलेले आहे. त्यांनी रेटिंगला क्रेडिट वॉच पॉझिटिव्हवर ठेवले आहे.

घरकाम करणाऱ्या महिला आपल्या कुटुंबाचाच भाग – मंजुश्री खर्डेकर.

  • संक्रातीला गरजूना साड्या वाण म्हणून देताना आनंद – तेजस्विनी दाभेकर

पुणे – घरकाम करणाऱ्या महिला ह्या आपल्या कुटुंबाचाच एक भाग आहेत असे समजूनच त्यांच्याशी वागले पाहिजे आणि त्यांच्या सुखदुःखात आपण सहभागी झाले पाहिजे असे मा. नगरसेविका व शिक्षण समिती अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या आज संक्रातीच्या हळदीकुंकवाच्या निमित्ताने घरकाम करणाऱ्या गरजू भगिनींना साड्या वाण म्हणून देताना खूप आनंद होतं आहे असे भरत मित्र मंडळाच्या महिला उत्सव प्रमुख तेजस्विनी दाभेकर म्हणाल्या.

भरत मित्र मंडळाच्या वतीने हळदीकुंकू समारंभ व गरजू महिलांना साडी भेट देण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ह्या दोघींनी हे मत व्यक्त केले.घरकाम करणाऱ्या महिला ह्या कबाडकष्ट करून आपला संसार सावरत असतात तसेच त्या अनेक वेळा सणासुदीला सुद्धा धुणी भांडी, झाडू पोछा, कपडे धुणे इ कामं करत असतात, त्यांना क्वचितच सुट्टी मिळते, अश्या परिस्थितीत ह्या महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा यासाठी आम्ही असे उपक्रम राबवत असल्याचे मंजुश्री खर्डेकर आणि तेजस्विनी दाभेकर म्हणाल्या.यावेळी 35 महिलांना साडी वाण म्हणून भेट देण्यात आली तर सुमारे 500 महिलांना हळदीकुंकू व भेटवस्तू वाण म्हणून देण्यात आल्या.

यावेळी भरत मित्र मंडळाचे संस्थापक बाळासाहेब दाभेकर,क्रिएटिव्ह फॉउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर,उत्सव प्रमुख निरंजन दाभेकर,अनिल यनपुरे,चंदन बकरे इ मान्यवर उपस्थित होते.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ‘त्या’ माजी नगरसेवकांमध्ये दिलजमाई

पुणे – शिवसेना गटाचे शहर प्रमुख नाना भानगिरे आणि भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या शिवसेना (उबाठा) गटातील माजी नगरसेवक विशाल धनवडे यांची मकर संक्रांत पर्वात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिलजमाई झाली.

देशात इंडिया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर असताना, राज्यातील महायुतीच्या घटक पक्षांमध्ये आणि नेत्यांमध्ये एकवाक्यता असून, आम्ही एक कुटुंब म्हणून एकत्र असल्याचे मत चंद्रकांतदादा पाटील यांनी या वेळी व्यक्त केले.

माजी नगरसेवक विशाल धनावडे म्हणाले, “खरी शिवसेना कोणती याबाबत पत्रकार परिषदेत प्रश्न विचारल्यानंतर अनवधानाने उद्धव ठाकरे असे उत्तर दिले गेले. त्याबद्दल कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. महायुतीतील आम्ही सर्वच पक्ष एकदिलाने काम करत असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेबद्दल आमच्या सर्वांच्या मनात नितांत प्रेम, आदर आणि विश्वास आहे.”

शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे म्हणाले, “धनवडे यांनी केलेल्या खुलाशानंतर आमच्या मनात त्यांच्याबद्दल किंवा भाजपमध्ये नुकत्याच प्रवेश केलेल्या शिवसेना (उबाठा) नगरसेवकांबद्दल कोणताही आक्षेप नाही. राज्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी वडिलकीच्या नात्याने आमची एकत्र भेट घडवून आणली, त्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. पुणे शहराच्या विकासासाठी या पुढील काळात आम्ही महायुती म्हणून एकदिलाने काम करणार आहोत.”

विशाल धनवडे, बाळा ओसवाल, पल्लवी जावळे, संगीता ठोसर, प्राची आल्हट या नगरसेवकांनी भाजपमध्ये नुकताच प्रवेश केला.

२३ वी छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा पुरूष विभागात पालघर, पुणे शहर, कोल्हापूर, अहमदनगर तर महिला विभागात ठाणे शहर, सांगली, पुणे शहर, पालघर विजयी

बारामती:- महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथे सुरू असलेल्या २३ व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक पुरुष विभागात पालघर,पुणे शहर, कोल्हापूर, अहमदनगर, पिंपरी चिंचवड, मुंबई उपनगर व महिला विभागात ठाणे शहर, सांगली, पुणे शहर, पालघर आपआपल्या गटात विजय मिळविले.
रेल्वे मैदानावर सुरू असलेल्या वरिष्ठ पुरूष व महिला गट कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीच्या सायंकाळच्या सत्रात पुरूषांच्या अ गटात पालघर संघाने अमरावती संघावर ५३-३२ असा विजय मिळविला. मद्यंतराला पालघर संघाकडे २७-१४ अशी आघाडी होती. पालघरच्या प्रतिक जाधवने आक्रमक खेळ करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. अमरावतीच्या अभिषेक पवार याने चांगल्या खेळाचे प्रदर्शन करीत एकाकी लढत दिली. ड गटात पुणे शहर संघाने सांगली संघावर ३५-२७ असा विजय मिळविला. मद्यंतराला पुणे शहर १३-१४ असा पिछाडीवर होता मात्र प्रशिक्षक तुषार नागरगोजे यांनी खेळाडूंना संयम ठेऊन खेळण्यास सांगितले व त्याचा सकारात्मक परिणाम होऊन संघाला विजय मिळाला. पुणे शहर संघाच्या भाऊसाहेब गोरणे यांने चौफेर आक्रमण करीत आपली पिछाडी भरून काढली. तर कर्णधार सुनिल दुबिले याने चांगल्या पकडी घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सांगलीच्या जीवन प्रकाश याने उत्कृष्ठ चढाय़ा केल्या. तर कर्णधार अभिषेक गर्ग याने पकडी घेत सामन्यात रंगत आणली.

ब गटात कोल्हापूर संघाने विदर्भातील तगड्या समजल्या जाणाऱ्या वाशिम संघाला ४२-२३ असे पराभूत केले. मद्यंतराला कोल्हापूर संघाकडे १९-१५ अशी आघाडी होती. कोल्हापूरच्या ओमकार पाटील व साहिल पाटील यांना जोरदार चढाया करीत वाशिम संघाला सावरण्यास संधीच दिली नाही. तर आदित्य पोवार व दादाो पुजारी यांनी सुरेख पकडी केला. वाशिमच्या गजानन कुऱ्हे व आकाश चव्हाण यांनी चांगला खेळ केला. ब गटात अहमदनगर संघाने मुबंई शहर पश्चिम संघावर ४७-२४ असा दणदणीत विजय मिळविला. मद्यंतराला अहमदनगर संघाकडे २५-११ अशी आघाडी होती. अहमदनगरच्या आदित्य शिंदे याने चौफेर आक्रमण करीत संघाला विजय मिळवून दिला. तर सौरभ राऊत याने चांगल्या पकडी केल्या. मुंबई शहर पश्चिम संघाच्या जयेश यादव याने काहीसा प्रतिकार केला.
क गटात पिंपरी चिंचवड संघाने भंडारा संघावर ५५-३२ असा सहज विजय मिळविला. मध्यंतराला पिंपरी चिंचवड संघाकडे ३६-१३ अशी आघाडी होती. पिंपरी चिचवडच्या संकेत लांडगे, हर्षद माने यांनी जोरदार खेळ केला. तर विशाल ताटे याने पकडी घेतल्या. भंडाऱ्याच्या पवन शेंडे उत्कृष्ठ चढाया केल्या, व ईश्वर उईके याने पकडी केल्या. ड गटात मुंबई उपनगर पूर्व संघाने यवतमाळ संघाचा ४८-३२ असा विजय मिळविला. मध्यंतराला मुंबई उपनगर पूर्व संघाकडे ३०-१५ अशी आघाडी होती. मुंबई उपनगर पूर्व संघाच्या आकाश रुदेले व सोहम पुंडे यांनी आक्रमक चढाया केल्या. तर अक्षय बरडे यांनी चांगल्या पकडी केल्या. यवतमाळच्या विक्रम राठोड व यशवंत जाधव यांनी चांगला प्रतिकार केला. तर जगदीश राठोड व राहुल भैसरे यांनी पकडी केल्या.
महिला विभागात, ब गटात ठाणे शहर संघाने अमरावती संघावर ५८-१६ असा अकतर्फी विजय मिळविला. मध्यंतराला ठाणे शहर संघाकडे ३५-८ अशी भक्कम आघाडी होती. ठाणे शहर संघाच्या प्राजक्ता पुजारी व देवयानी पाटील यांनी वेगवान चढाया करीत आपल्या संघाला सहज विजय मिळवून दिला. तर माधुरी गवंडी व जुजा जाधव यांनी उक्तृष्ठ पकडी घेतल्या. अमरावतीच्या स्नेहा चौधरी व कल्याणी मेहेर यांनी चांगला प्रतिकार केला. तर दिव्या शर्मा हिने पकडी केल्या.
ड गटात पुणे शहर संघाने नागपूर ग्रामीण संघावर ६३-१६ असा एकतर्फी विजय मिळविला. मध्यंतराला पुणे शहर संघाकडे ३७-८ अशी निर्णायक आघाडी होती. पुणे शहर संघाच्या आम्रपाली गलांडे हिने आक्रमक खेळ करीत कर्णधाराला साजेसा खेळ केला. दिप्ती शिंदे हिने चांगल्या पकडी करीत विजयात हातभार लावला. नागपूर ग्रामीणच्या साक्षी झळके हिने एकाकी लढत दिली.
क गटात पालघर संघाने अकोला संघावर ६६-२० असा सहज विजय मिळवित आपली घोडदौड सुरू ठेवली. मद्यंतराला पालघर संघाकडे ३५-१० अशी भक्कम आघाडी होती. पालघरच्या मोक्षा पुजारी, ज्युली मिस्किता यांनी उत्कृष्ठ चढाया करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. शाहिन शेख व श्रृती सोमसे यांनी चांगल्या पकडी केल्या. अकोल्याच्या प्रिती शिरसाठ व आर्या राऊत यांनी चांगली लढत दिली.
अ गटात सांगली संघाने नागपूर शहर संघावर ६१-२२ असा विजय मिळविला. मद्यंतराला सांगली संघाकडे २१-११ अशी आघाडी होती. सांगलीच्या कर्णधार श्रध्दा माळी हिने उत्कृष्ठ खेळ केला. ऋतुजा अंबी हिने चांगला खेळ केला. नागपूर शहरच्या नताशा रोडकर हिने उत्कृष्ठ चढाया केल्या तर ईश्वरी मुळणकर हिने पकडी घेतल्या.
आयोजकांनी केलेल्या अतिशय देखण्या आणि नेटक्या आयोजनाने तमाम कबड्डी रसिक मंत्रमुग्ध झाले. विम्बल्डन स्पर्धेची आठवण व्हावी, अशी मैदानाची आसन व्यवस्था असल्याचे उपस्थित प्रेक्षक सांगत होते.स्पर्धेसाठी आत्याधुनिक मॅटची मैदाने तयार करण्यात आलेली असुन प्रेक्षकांच्या करीता भव्य बैठक गॅलरी उभारण्यात आलेली आहे. ही स्पर्धा साखळी व बाद फेरी पद्धतीने खेळविली जाणार असून सायंकाळी 4.00 ते 8.00 वाजेपर्यंत रेल्वे मैदानावार प्रकाशझोतात सामने होणार आहेत.
छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या इतिहासामध्ये प्रथमच आयोजन समिती मार्फत रोख पारितोषिक रक्कमेमध्ये भरघोस वाढ करण्यात आलेली असून सदर स्पर्धेमध्ये खेळाडूंना रु.44.60 लक्षची प्रोत्साहनपर रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. स्पर्धेत महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या वरीष्ठ गट राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेमधील गुणानुक्रमे प्रथम 12 संघ व विदर्भ कबड्डी असोसिएशनच्या वरीष्ठगट राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेमधील गुणानुक्रमे प्रथम 4 असे एकुण 16 महिला व 16 पुरुष असे एकुण 32 संघ सहभागी होणार आहेत. सदर स्पर्धेत एकुण 32 संघामधील खेळाडू, व्यवस्थापक तसेच तांत्रीक अधिकारी मिळुन अंदाजे 548 व्यक्ती सहभागी होणार आहेत.पुणे जिल्ह्यातून पुणे महानगरपालिका,पिंपरी-चिंचवड महानगरपालिका,पुणे जिल्हा असे एकूण पुणे जिल्ह्याचे 3 संघ सहभागी होणार असून जिल्ह्यातील प्रतिभावान खेळाडूंना अधिकची संधी यामुळे प्राप्त झाली आहे.
प्रतिष्ठेच्या या स्पर्धेत प्रो कबड्डी स्टार-अजित चौहान ,शिवम पठारे, प्रणय राणे, आकाश शिंदे, संकेत सावंत, विशाल ताठे, शंकर गदई, सुनील दुबिले, जयेश महाजन, श्रेयस उबरदंड, आम्रपाली गलांडे, सलोनी गजमल, रेखा सावंत, हरजीत संधू, सोनाली शिंगटे,दिव्या गोगावले, समरीन बुरोंडकर, मंदिरा कोमकर, यशिका पुजारी, कोमल देवकर या पुरुष व महिला आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा दर्जेदार व कौशल्यपुर्ण खेळ पाहण्याची सुवर्णसंधी पुणे जिल्ह्यातील कबड्डी रसिकांना प्राप्त झाली आहे.

बारामतीत अत्याधुनिक दर्जाचे पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारणार-उपमुख्यमंत्री अजित पवार

  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘कृषिक २०२५’ कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

बारामती, दि. १६: बारामतीच्या नावाला साजेसे, परिसराच्या वैभवात भर घालणारे अत्याधुनिक दर्जाचे पशुवैद्यकीय महाविद्यालय येथे उभारण्यात येईल; अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट व कृषी विज्ञान केंद्राला राज्यशासनाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशीही ग्वाही त्यांनी दिली.

कृषी विज्ञान केंद्र माळेगाव खु. येथे आयोजित ‘कृषिक २०२५’ या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष तथा
ज्येष्ठ खासदार शरद पवार, खासदार सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे, ऑक्सफर्ड विद्यापीठाचे संचालक डॉ. अजित जावकर, आयआयटी खरगपूरचे शास्त्रज्ञ डॉ. पियुश सोनी, ॲग्री पायलटचे प्रकल्प संचालक प्रशांत मिश्रा, बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेयरमन राजेंद्र पवार, विश्वस्त प्रतापराव पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, दरवर्षी आयोजित ‘कृषिक’ प्रदर्शनात बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा वापर करुन बी-बियाणे, पिके, फुले व फळांच्या जाती, भाजीपाल्यामध्ये संशोधन करुन अधिकची भर पडत आहे. यावर्षीच्या प्रदर्शनात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हे एक नवीन आकर्षण आहे. या प्रदर्शनाला लाखो शेतकरी भेट देवून नवनवीन गोष्टी आत्मसात करतात, आपल्या शेतात त्याचा वापर करतात. त्यामुळे खऱ्याअर्थाने या प्रदर्शनाला एक वेगळ्या प्रकारची उंची प्राप्त झालेली आहे.

जागतिक पातळीवर कृषी क्षेत्रात संशोधन आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येतो, आता शेतकऱ्यासमोर दुष्काळ, पर्जन्यमानाची अनियमितता, घटते जमिनीचे क्षेत्र अशी विविध प्रकारची आव्हाने उभी असून त्यावर मात करण्याकरीता प्रयत्न करावेत. राज्यात कृषी विषयात विविध संशोधन होत असून यामधून नव्याने उदयास आलेली बी-बियाणे, पिके, फुले व फळांच्या जातींची मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

उत्पादनात वाढ होण्याच्यादृष्टीने शेतकऱ्यांनी ऊसक्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, उसाच्या नवनवीन वाणाची लागवड करावी. शेतमालाची उत्पादकता वाढविण्याकरीता राज्य व केंद्रशासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल. कृषी विभागाच्या जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी, साखर कारखान्यातील शेतकी अधिकारी, पदाधिकारी, नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देऊन लाभ घ्यावा, असेही आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.

शेतकऱ्यांना विविध योजनांचा पारदर्शकपद्धतीने लाभ देण्याकरीता तंत्रज्ञानाचा वापर करणार- कृषीमंत्री

कृषीमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले, शेती विषयात होणारे संशोधन, तंत्रज्ञान, नवीन प्रयोगाचा, तसेच विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पारदर्शक पद्धतीने पोहचविणारी यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येईल. त्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्यात येईल. यादृष्टीने शेतकऱ्यांचा सर्वांगीण विचार करुन ॲग्रीस्टॉक संकेतस्थळ विकसित करण्यात येत आहे. शेतकरी, शेतकरी गट, महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनाच्या विक्रीकरीता शहरी भागात तसेच आठवडी बाजारपेठांमध्ये जागा राखीव ठेवण्याबाबत विचार करावा लागेल. लोककल्याणकारी योजनांचा प्रभावीपणे लाभ देवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्याकरीता प्रयत्न करण्यात येईल.

बारामती कृषी विज्ञान केंद्राचा दर्जा व गुणवत्तेत सातत्य राहील यादृष्टीने उत्तम नियोजन करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडेल असे विविध नाविन्यपूर्ण प्रयोग करुन समाजाला दिशा देण्याचे केंद्राने काम केले आहे, त्यामुळे ही संस्था देशात क्रमांक एकची संस्था आहे. प्रयोगशाळा स्थापन करुन नवनवीन संशोधनाकरीता कृषी विज्ञान केंद्राला राज्यशासनाच्यावतीने जागा उपलब्ध करुन देण्यात येईल, याकामी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ, संशोधकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ॲड. कोकोटे यांनी केले.

मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या, वाढत्या लोकसंख्येचा विचार करता शेतीत गुणवत्तापूर्ण उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. आगामी काळात बारामतीत अत्याधुनिक दर्जाचे पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारण्याकरीता सकारात्मक विचार करण्यात येईल. ‘कृषिक’ प्रदर्शनाच्या माध्यमातून नवनवीन गोष्टी शिकता आल्या, याचा दुष्काळी भागात निश्चित उपयोग होईल. यापुढे अशाच प्रकारचे प्रदर्शन प्रत्येक तालुक्यात आयोजित करण्यात यावे, असेही श्री. मुंडे म्हणाल्या.

ज्येष्ठ खासदार श्री. पवार म्हणाले, जागतिक पातळीवर कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात जागृती होत असून त्यामुळे विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर परिवर्तन येत्या काळात होणार आहे. खत, पाणी, पीक, रोग व्यवस्थापन, उत्पादनाची गुणवत्ता, उत्पादनाचा अंदाज आणि हवामानानुसार पीक पद्धतीचे नियोजन याकरीता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याची गरज आहे. याकामी केंद्र सरकार व राज्य शासन मिळून पूर्ण ताकतीने काम करीत आहे, असेही श्री. पवार म्हणाले.

श्रीमती सुळे म्हणाल्या, आगामी काळाची गरज लक्षात घेता बारामती ॲग्रीकल्चर ट्रस्टच्यावतीने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात क्रांती घडविण्याच्यादृष्टीने प्रयोगशील उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या कार्यात केंद्र सरकार व राज्य शासनासोबत ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि विद्या प्रतिष्ठान काम करीत आहे, असेही श्रीमती सुळे म्हणाल्या.

यावेळी श्री. प्रतापराव पवार यांनी आपले विचार व्यक्त केले तसेच श्री. राजेंद्र पवार यांनी प्रास्ताविकात कृषिक प्रदर्शनाची माहिती दिली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते कृषी अभ्यासक्रमात विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करुन गौरविण्यात आले. तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठ, लंडन आणि बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाविषयी माहिती देणाऱ्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.