Home Blog Page 497

आकारी पडच्या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळण्यासाठी सुलभ कार्यप्रणाली करण्याबाबत शासनासोबत यांच्यासमवेत बैठक घेणार – डॉ. नीलम गोऱ्हे

  • महाराष्ट्रातील आकारी पड जमीन बाधितांना शासनाच्या निर्णयाने न्यायाची आशा “, खेड तालुका व जि. पुणें येथील समस्त शेतकरी बांधवांचे प्रतिपादन

मुंबई : पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील काही भागात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आकारी पड जमिनीसंदर्भातील संघर्षात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे शेतकऱ्यांना महत्त्वाचे योगदान लाभले. यासंदर्भात शेतकरी आणि शासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत दि. १४ नोव्हेंबर २०१९ रोजी डॉ. गोऱ्हे यांनी बैठक घेऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी शासनास निर्देश दिले होते. या अनुषंगाने अत्यंत सूक्ष्म अभ्यास करून शेतकरी बांधवांना या आकारी पडमधून बाहेर काढण्याचे काम नीलमताईंनी केल्यामुळे आज समस्त आकारी पड बाधित शेतकऱ्यांच्यावतीने त्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. तसेच, भविष्यात त्यांना न्याय देण्याचे कामात उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या सहकार्यातुन व्हावे असे प्रतिपादन समस्त आकारी पड शेतकरी बांधवांच्यावतीने करण्यात आले.

राज्यशासनाने आकारी पड जमिनी शेतकऱ्यांना मिळण्यासाठी रेडीरेकनरच्या २५% भरण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. असे असले तरी, आजच्या या अनौपचारिक बैठकीत, आकारी पड बाधित शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या सध्या स्थितीची माहिती दिली. यामुळे यानियमात शासनाने निर्णयात शिथिलता आणली जावे अशी विनंती केली आहे. त्यासंदर्भात नीलमताई यांनी शासन स्तरावर प्रयत्न करावेत अशी विनंती शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने त्यांच्याकडे केली. “या मागणीबाबत, मी लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन मा. मंत्री महोदय, महसूल मंत्री त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमोर वस्तुस्थिती आणुन सहकार्य करेन’, असे आश्वासन डॉ. गोऱ्हे यांनी दिले आहे.

यावेळी बैठकीला, पुणे जिल्हा भाजप उपाध्यक्ष गणेश सांडभेर बाधित शेतकरी, बी.के.कदम माजी पंचायत समिती सदस्य, खेड, बाळासाहेब दाते जिल्हाध्यक्ष, इंडस्ट्रीयल असोसिएशन, नितीन दाते सामाजिक कार्यकर्ते, सिताराम कदम (बाधित शेतकरी), बाबासाहेब हजारे (बाधित शेतकरी) उपस्थित होते. तसेच, लवकरच पुन्हा शेतकऱ्यांच्या आकारी पड जमिनीसंदर्भात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बैठकीचे आयोजन करणार आहेत.

टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा अखंड ऊर्जेचा स्रोत – क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि.19 : टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धास्थळी उपस्थित राहून क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आहेत. सामाजिक सलोखा वाढविणारी, बंधुभाव वाढविणारी, माणसं जोडणारी ही मॅरेथॉन प्रत्येकाला आकर्षित करणारी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेली ही मॅरेथॉन उत्कृष्टता आणि सामुदायिक भावनेला मूर्त स्वरूप देते. ही मॅरेथॉन ऊर्जेचा स्रोत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेला उपस्थित राहून शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी आयोजक, विविध क्षेत्रातील मान्यवर, स्पर्धक उपस्थित होते. श्री. भरणे यांच्या उपस्थितीत स्पर्धेची सुरुवात झाली.मंत्री श्री. भरणे म्हणाले, टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत धावणाऱ्या प्रत्येकाला वर्षभर सकारात्मक ऊर्जा मिळते. इथं मिळणारं हे प्रेम आणि आनंद शब्दात व्यक्त करता येणं शक्य नाही. मुंबई मॅरेथॉनच्या हजारो स्वयंसेवकांची पाणी, एनर्जी ड्रिंक्स, रिलिफ स्प्रे, फळं देण्यासाठी सुरू असलेली धावपळ वाखाणण्याजोगी असते. आपल्या शरीराची आणि मनाची सलग धावण्याची क्षमता आहे, याची प्रचिती आल्याने अभिमान वाटतो. टाटा मुंबई मॅरेथॉनच्या ऐतिहासिक पर्वाच्या या उत्सवात सहभागी होऊन प्रत्येकानं आनंद घेतला पाहिजे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोससाठी रवाना

  • महाराष्ट्राचा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या गुंतवणूक परिषदेत सहभाग

मुंबई दि.१९ : स्वित्झर्लंड मधील दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्यावतीने आयोजित गुंतवणूक परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून रवाना झाले.दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने २० ते २४ जानेवारी या कालावधीत ही परिषद आयोजित केली आहे. यापूर्वी श्री. फडणवीस त्यांच्या पहिल्या कार्यकाळात तीन वेळा दावोसमधील या परिषदेत सहभागी झाले होते. त्यानंतर मुंबईत दोन वेळा मॅग्नेटिक महाराष्ट्र या गुंतवणूक परिषदेचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या नेतृत्वात आयोजन झाले होते. यामुळे महाराष्ट्र औद्योगिक गुंतवणुकीत पाचव्या स्थानावरुन महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला होता.आताही या दावोस दौर्‍यात गुंतवणूकदारांना आकर्षित करता येईल यादृष्टीने भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. यात मुख्यमंत्री श्री.फडणवीस अनेक जागतिक नेत्यांच्याही भेटी घेणार आहेत. या दौर्‍यात उद्योगमंत्री उदय सामंत, तसेच एमआयडीसी, एमएमआरडीए, सिडको यांचे अधिकारी शिष्टमंडळ सहभागी होणार आहे.डेटा सेंटर्स, ऑटोमोबाईल्स, सेमिकंडक्टर, ईव्ही, इलेक्ट्रॉनिक्स, स्टील, अन्नप्रक्रिया, वस्त्रोद्योग, औषधी आणि पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रात मोठ्या संख्येने सामंजस्य करार या दौर्‍यात होणार आहेत. महाराष्ट्राच्या १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक राज्यात आणण्याचा प्रयत्न या दौर्‍यातून साध्य करण्याचा प्रयत्न होईल. अर्थात प्रामुख्याने यातून रोजगारनिर्मितीचेही उद्दिष्ट साध्य केले जाणार आहे.

सातव्या आयोगामुळे राज्यावर साडेतीन लाख कोटींचा बोजा, सरकारी कर्मचारी तुपात..तर कंत्राटी,खाजगी जात्यात..


केंद्र सरकारने वेतन आयोग लागू केला तरीही राज्यांवर वेतन आयोग लागू करण्याचे कायदेशीर वा घटनात्मक बंधन नसते, पण राजकीय स्वार्थ आणि कर्मचाऱ्यांचा दबाव किंवा खुशमशकरी करण्याच्या वृत्तीने राज्ये केंद्राचा वेतन आयोग लागू करतात. खाजगी आणी कंत्राटी कर्मचाऱ्यांना असलेला पगार आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन यातील तफावत ही जमीन आसमांनची आणि प्रचंड विषमता निर्माण करणारी आहे याकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते.

सातव्या वेतन आयोगामुळे पडलेला फरक
●वेतन : २ लाख ९२ हजार कोटी
●निवृत्ती वेतन : ६२ हजार ४०० कोटी

मुंबई : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाची घोषणा होताच राज्यातही नवीन वेतन आयोग स्थापन करण्याच्या मागणीने जोर धरू लागली आहे. त्याचवेळी सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे गेल्या १० वर्षांत वेतन आणि निवृत्तिवेतनातील फरकामुळे राज्य सरकारवरील जवळपास साडेतीन लाख कोटींचा बोजा वाढला आहे.
सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे केंद्रावर दरवर्षी सुमारे एक लाख कोटींचा बोजा पडला होता. विविध राज्यांमध्येही सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्ति वेतनावरील बोजा वाढत गेला. महाराष्ट्रात २०१६-१७ ते २०२५-२६ या सातव्या वेतन आयोगाच्या कालावधीत वेतन व निवृत्ति वेतनावरील फरकाच्या रक्कमेमुळे सुमारे साडेतीन लाख कोटींचा बोजा वाढला आहे. सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर केंद्र व राज्य सरकारांच्या आर्थिक परिस्थितीचा वेध १५व्या वित्त आयोगाने घेतला होता. आयोगाच्या तज्ज्ञांनी राज्य सरकारांच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास करून अहवाल तयार केला.तज्ज्ञांनी सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगांची तुलना करून १० वर्षांच्या कालावधीत वेतन फरकाचा किती बोजा वाढेल याचा मुख्यत्वे अभ्यास केला. वेतन फरकामध्ये देशात महाराष्ट्र सर्वात आघाडीवरील राज्य ठरले आहे. दहा वर्षांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च २ लाख ९२ हजार कोटींनी वाढला. तर, निवृत्तिवेतनाच्या फरकाने खर्चात ६२ हजार ४०० कोटींची वाढ अपेक्षित धरण्यात आली. सातव्या वेतन आयोगाचे पुढील २०२५-२६ हे अखेरचे वर्ष असेल.
पाचवा, सहावा आणि सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर महाराष्ट्रासह सर्वच राज्यांची वित्तीय तूट वाढल्याचे निरीक्षण वित्त आयोगाने नोंदविले आहे. राज्यांमध्ये भांडवली खर्च म्हणजेच विकास कामांवरील खर्च कमी होत गेला. आस्थापना खर्च वाढू लागल्याने बहुकेत सर्वच राज्यांनी नोकरभरतीबाबत कठोर उपाय योजले. सरसकट भरती करण्याचे टाळून खासगीकरणावर भर दिला गेल्याने सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या तुलनेत वाढली नाही. यातून सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च फारसा वाढलेला नाही. पण निवृत्ती वेतन आणि कर्जावरील व्याज फेडण्याच्या खर्चात मोठी वाढ झालेली दिसते.

सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यातून अटक!

सकाळी ९ वाजता पत्रकार परिषद

मुंबई:अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी (Saif Ali Khan Attack Case) मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस सकाळी ९ वाजता पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देतील.

वृत्तसंस्था एएनआयने याबद्दल माहिती दिली आहे.मुंबई पोलिसांचा हवाला देत एएनआयने वृत्त दिले आहे की, अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. ठाण्यातील कासारवडवली येथील हिरानंदानी इस्टेटच्या मागील परिसरातून मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक केली.

आरोपीचे नाव मोहम्मद अलियान उर्फ ​​BJ आहे. या हल्ल्यानंतर पकडले जाण्याच्या भीतीने आरोपीने आपले खरे नाव उघड केले नाही. त्याने सुरुवातीला पोलिसांना स्वत:चे बनावट नाव विजय दास असल्याचे सांगितले. तसेच, आरोपी ठाण्यातील Ricky’s बारमध्ये हाऊसकीपिंग वर्कर म्हणून काम करत होता.
दरम्यान, गुरुवारी पहाटे अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या वांद्रे येथील अपार्टमेंटमध्ये हल्ला झाला होता. यावेळी हल्लेखोराने त्याच्यावर चाकूने अनेक वार केले. गंभीर दुखापत झाल्यानंतर, सैफ अली खानला तातडीने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सैफ अली खानवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

महापालिकेने केली 200 हुन अधिक अतिक्रमणावर कारवाई

पुणे: महापालिका अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागामार्फत 200 हुन अधिक ठिकाणी कारवाई करण्यात आली.पुणे मेट्रो, जिल्हा न्यायालय या जागेतील अनधिकृत अतिक्रमण काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली. शिवाजीनगर सिव्हिल कोर्ट येथील मेट्रो स्टेशनच्या डेंगळे पुलालगतच्या जागेत मागील काही महिन्यात अंदाजे ५० अनधिकृत झोपड्या अतिक्रमण करून बांधण्यात आल्या होत्या. या झोपड्यांवर कारवाई करून अतिक्रमण हटविण्यात आले. ही कारवाई परिमंडळ दोनचे उपायुक्त अविनाश सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर-घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त गोविंद दांगट यांच्या नियंत्रणाखाली उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, चार पोलीस निरीक्षक, १५ पीएसआय, ७८ अंमलदार पोलीस, ५० सुरक्षा अधिकारी आणि इतर यांनी ही कारवाई केली.

पुणे महापालिका आणि पुणे मेट्रो यांनी ही संयुक्त कारवाई केली. यात दोन जेसीबी, सहा टेम्पो, एका हायड्रा, ४० कर्मचारी यांचा समावेश होता. यावेळी मुख्य प्रकल्प व्यवस्थापक अमोलकुमार मोहोळकर यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते. दोनशेहून अधिक अतिक्रमणांवर कारवाई
महापालिका आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर नगर रस्ता परिसरातही अतिक्रमण कारवाई केली. परिमंडळ एक अंतर्गत असलेल्या तिन्ही क्षेत्रीय कार्यालयांनी मिळून कारवाईचा धडाका लावला आहे. या सलग सुरू असलेल्या कारवाईत तीन दिवसात २०० हून अधिक अनाधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली.

नगर रस्ता परिसरातील मंत्री मार्केट, खराडी बायपास येथील १०२ अनाधिकृत हातगाड्या, स्टॉल, काउंटर, झोपड्या आदींवर कारवाई करण्यात आली. याच कारवाईअंतर्गत बुधवारी (दि. १५) दुपारपर्यंत खराडी आयटी पार्क परिसरातील गेरा बार्कलेजसमोरील ३० अनधिकृत व्यावसायिकांचे स्टॉल जेसीबी लावून तोडण्यात आले. या मोहिमेअंतर्गत ताडीवाला रस्ता ढोले, पाटील रस्ता, सौरभ हॉल परिसरातील ७२ अनधिकृत हातगाड्या, स्टॉल, काउंटर, झोपड्या, पथारी व्यवसायिकांवर कारवाई करण्यात आली.
या कारवाईत कोंढवा, येवलेवाडी येथील फ्रंट मार्जिन तसेच रस्ता व पदपथावरील अतिक्रमणे काढण्यात आली. या कारवाईत ४० काउंटर, दोन हातगाड्या, सहा सिलिंडर तसेच आदी साहित्य जप्त करून अतिक्रमण गोडाऊन येथे जमा करण्यात आले. तसेच कारवाईमध्ये कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील घनकचरा व्यवस्थापन विभागातील सेवकांद्वारे अस्वच्छता, प्लास्टिक वापराबाबत एकूण २६ नागरिकांवर कारवाई करून २३,७०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. कोंढवा येवलेवाडी कार्यालयातील परवाना व आकाशचिन्ह विभागातील सेवकांद्वारे बोर्ड, बॅनर, फ्लेक्स, लॉलीपॉप, केऑक्स आदींवर कारवाई करून दोन हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला.

परिमंडळ क्रमांक चारच्या यांच्या नियंत्रणाखालील कोंढवा येवलेवाडी कार्यालयाअंतर्गत व्हीआयटी कॉलेज चौक ते कान्हा हॉटेल या परिसरात अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम निर्मूलन, प्लास्टिक प्रतिबंधात्मक, परिसर स्वच्छता कारवाई करण्यात आली. ही कारवाई अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी., उपायुक्त (परिमंडळ क्र.४) जयंत भोसेकर आणि सहाय्यक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आली

सन २०२७ किंवा २०२८ ला होणार भारत तिसरी अर्थव्यवस्था:अर्थतज्ज्ञ दीपक करंजीकर

पुणे : भारतात मोठया प्रमाणात झालेल्या डिजिटलायझेशनमुळे प्रत्येक सेवेची आर्थिक नोंद होत आहे. प्रत्यक्ष नोंद होत असल्याने देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) मध्ये देखील याची गणना केली जाईल. आपण प्रत्येकाला रोख व्यवहारापासून दूर नेत डिजिटलाईज झालो, तर सन २०२७ किंवा २०२८ ला भारत तिसरी आर्थिक महासत्ता होईल, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ दीपक करंजीकर (मुंबई) यांनी केले. 
स्वानंद प्रतिष्ठानच्यावतीने स्वानंद व्याख्यानमालेचे आयोजन सिंहगड रस्त्यावरील अभिरुची मॉल येथील संस्कार गुरुकुल येथे करण्यात आले आहे. त्यातील पहिल्या सत्रात ते बोलत होते. यावेळी अर्थतज्ज्ञ सुनील सप्रे, सुनील भिडे, माजी नगरसेविका अश्विनी पोकळे, नीता दांगट पाटील, प्रतिष्ठानचे प्रकाश असलेकर आदी उपस्थित होते. केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा संदेश पाठविला. 
दीपक करंजीकर म्हणाले, अर्थव्यवस्थेचे मापन हे सकल राष्ट्रीय उत्पन्नावर केले जाते. जगात आपली अर्थव्यवस्था पाचव्या स्थानी असून अमेरिका, चीन, जपान, जर्मनी हे चार देश याबाबत आपल्या पुढे आहेत. आपला देश श्रमिकांचा असल्याने यापूर्वी प्रत्येक आर्थिक व्यवहाराची नोंद केली जात नसे. आता बँक ट्रान्सफर सारख्या व्यवस्थेमुळे भ्रष्टाचार कमी झाला असून दलाली देखील मोठया प्रमाणात संपुष्टात येत आहे. 
ते पुढे म्हणाले, आपली अर्थव्यवस्था ही जीवनाशी जोडली गेली आहे. तशा म्हणी देखील आपल्या संस्कृतीत आहेत. आर्थिक क्रयशक्ती वाढ, शेतकरी सबलता आणि उत्पन्नावरील कर व्यवस्था पद्धती जर नीट झाली, तर भारताची अर्थावाय्वस्था चांगली होण्यास मदत होईल. शेती आणि शेतकऱ्यांनी कोविड काळात आपल्याला वाचविले. त्यामुळे देशाच्या बजेटमध्ये शेतीला जास्त महत्व असायला हवे. अल्पभूधारक शेतकरी देशात मोठया संख्येने आहे. त्यामुळे यावर सहकारी शेती हा उपाय असला, तरी राजकारण आणि भांडवलदार यांनी शेतीची नासाडी केली, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. प्रकाश असलेकर यांनी प्रास्ताविक केले.  प्रशांत पितालीया यांनी सूत्रसंचालन केले. 

राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी राज्यस्तरीय अधिकाऱ्यांना दिले शाळा भेटीचे निर्देश

पुणे, दि.१८: राज्याचे शिक्षण आयुक्त श्री सचिद्र प्रताप सिंह यांनी सर्व शिक्षण संचालक, सहसंचालक व उपसंचालक यांना शनिवारचे औचित्य साधून “आनंददायी शनिवार ” या उपक्रमासह, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत शाळांना भेटी देण्याचे शुक्रवारी सायंकाळी निर्देश दिले होते.

शिक्षण आयुक्त श्री सचिद्र प्रताप सिंह यांनी स्वतः देखील आज शनिवारी दिनांक 18/01/2025 रोजी पानशेत व परिसरातील शाळांना अचानक भेटी दिल्या त्यांच्या समवेत प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था पुणे, शिक्षणाधिकारी प्राथमिक पुणे व अन्य अधिकारी देखील उपस्थित होते. पानशेत समूह शाळा भेटीदरम्यान विद्यार्थी- शिक्षक यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थ्यांचे आनंददायी शनिवार अंतर्गत नाट्यीकरण, कविता, नृत्य, भाषा व गणित खेळ पाहिले. स्वतः शिक्षण आयुक्त तब्बल 40 मिनिटे विद्यार्थ्यांमध्ये उभे राहून विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारून संवाद साधत होते. विद्यार्थ्यांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांना त्यांनी आयएस या परीक्षेत उत्तीर्ण कसे झाले याचा प्रेरणादायी प्रवास उलगडून सांगितला. शाळांमध्ये सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली.

तसेच राज्यस्तरावरील सर्वच अधिकाऱ्यांनी देखील राज्यातील विविध भागातील आज अचानक शाळांना भेटी दिल्या. या अधिकाऱ्यांनी शाळांच्या भेटीदरम्यान शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आनंददायी शनिवार, शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, शाळेत दिल्या जाणाऱ्या आहाराची स्थिती पाहिली. इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग असणाऱ्या शाळातील विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त अभियानाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यालयास सुट्टी असल्याने शनिवारी राज्यातील वरिष्ठ अधिकारी शाळांमध्ये भेटी देऊन विद्यार्थ्यांमध्ये रममान झाल्याचे चित्र दिसून आले.

लाडकी बहीण अपात्र असेल तर … आदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण

मुंबई : लाडकी बहिण योजनेतील फॉर्म अपात्र ठरल्यास आधीचे पैसे दंडासह वसूल करणार?; चर्चेवर मंत्री आदिती तटकरेंनी स्पष्टीकरण दिलं आहे
निकषात न बसणाऱ्या महिलांचा अर्ज बाद होणार असला तरी त्यांना आधी दिलेली रक्कम वसूल करण्याचा सरकारचा विचार नाही, असं स्पष्टीकरण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलं आहे.
सरकारकडून रक्कम वसूल करण्याच्या भीतीने राज्यातील ४ हजार महिलांनी या योजनेतून आपलं नाव कमी केलं जावं, यासाठी अर्ज केल्याची माहिती आहे. परंतु सरकार ज्या महिला निकषात बसत नाहीत त्यांना लाडकी बहीण योजनेतून पैसे देणं आपण बंद करणार आहे. असं असलं तरी त्यांच्याकडून आधी दिलेली रक्कम परत घेण्यात येणार नसल्याचा खुलासा आदिती तटकरे यांनी केला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता येत्या २६ जानेवारीपूर्वी दिला जाणार आहे. या योजनेच्या जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यासाठी ३६९० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने गुरुवारी मान्यता दिली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आला आहे. त्यानंतर जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप या लाभार्थीना मिळाला नसून हा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष आहे.

सहा महिन्यांपूर्वी, जुलैमध्ये राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची’ घोषणा केली. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या २१ ते ६५ या वयोगटातील २ कोटी ४६ लाख महिलांना आतापर्यंत दरमहा १५०० रुपये देण्यात येतात. डिसेंबर महिन्याचे पैसेही २ कोटींहून अधिक पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले.

पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर झाली

अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रिपद असणार आहे. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रिपद असणार आहेत. तर, अजित पवार यांच्याकडे बीड जिल्ह्यासोबतच पुण्याचीही जबाबदारी देण्यात आली आहे. तर धनंजय मुंडे यांचं नाव पालकमंकत्र्यांच्या यादीतून वगळण्यात आलेलं आहे.मस्साजोग सरपंच हत्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने मंत्री धनंजय मुंडे यांना पालकमंत्र्यांच्या यादीतून वगळल्याचे दिसून येत आहे. तर मुंडे यांच्याकडे बीडचे पालकमंत्रीपद देऊ नये, अशी मागणी जनतेकडून केली जात होती. त्यामुळेच बीडचे पालकमंत्रीपद हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले आहे.

राज्यातील सर्व पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी पुढीलप्रमाणे आहे

  • देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री) – गडचिरोली
  • एकनाथ शिंदे – (उपमुख्यमंत्री) – ठाणे, मुंबई शहर
  • अजित पवार – (उपमुख्यमंत्री) – पुणे, बीड
  • चंद्रशेखर बावनकुळे – नागपूर, अमरावती
  • राधाकृष्ण विखे पाटील – अहिल्यानगर
  • हसन मुश्रिफ – वाशिम
  • चंद्रकांत पाटील – सांगली
  • गिरीश महाजन – नाशिक
  • गणेश नाईक – पालघर
  • गुलाबराव पाटील – जळगाव
  • संजय राठोड – यवतमाळ
  • आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा (सहपालकमंत्री) – मुंबई उपनगर
  • उदय सामंत – रत्नागिरी
  • जयकुमार रावल – धुळे
  • पंकजा मुंडे – जालना
  • अतुल सावे – नांदेड
  • अशोक उईके – चंद्रपूर
  • शंभुराज देसाई – सातारा
  • अदिती तटकरे – रायगड
  • शिवेंद्रराजे भोसले – लातूर
  • माणिकराव कोकाटे – नंदूरबार
  • जयकुमार गोरे – सोलापूर
  • नरहरी झिरवळ – हिंगोली
  • संजय सावकारे – भंडारा
  • संजय शिरसाट – छत्रपती संभाजीनगर
  • प्रताप सरनाईक – धाराशिव
  • मकरंद जाधव – बुलढाणा
  • नितेश राणे – सिंधुदुर्ग
  • आकाश फुंडकर – अकोला
  • बाबासाहेब पाटील – गोंदिया
  • प्रकाश आबिटकर आणि माधुरी मिसाळ (सहपालकमंत्री) – कोल्हापूर
  • आशिष जयस्वाल (सहपालकमंत्री) – गडचिरोली
  • पंकज भोयर – वर्धा
  • मेघना बोर्डीकर – परभणी

योगिता भोसले पुणे महापालिकेच्या नगरसचिवपदी…

पुणे:महापालिकेच्या नगरसचिवपदी राजशिष्टाचार अधिकारी योगिता भोसले यांची अखेर पदोन्नतीद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे. एका बाजूला महापालिका अमृतमहोत्सव ( ७५ वर्षे) पूर्ण करत असतानाच पालिकेच्या इतिहासातील त्या पहिल्या महिला नगरसचिव बनल्या आहेत. सर्वात कमी सेवावधित झालेल्या त्या नगरसचिव मानल्या जाऊ शकतील आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी त्यांची नगरसचिव पदावर नियुक्ती केली आहे

३१ ऑगस्ट २०२० रोजी सुनील पारखी सेवानिवृत्त झाल्यानंतर नगरसचिव पदाचा अतिरिक्त कारभार कामगार कल्याण अधिकारी शिवाजी दौंडकर यांच्याकडे सोपविण्यात आला होता. १ सप्टेंबर २०२० ते ३१ मे २०२३ पर्यंत शिवाजी दौंडकर सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कारभार होता. शिवाजी दौंडकर सेवानिवृत्त झाल्यानंतर १ जून २०२३ पासून राजशिष्टाचार अधिकारी योगिता भोसले यांच्याकडे नगरसचिव पदाचा अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला होता. त्यानंतर आता आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी नगरसचिव पदावर नियुक्ती केली आहे.

माजी महापौरांनी केले निवडीचे स्वागत –
पुणे महापालिकेच्या नगरसचिव पदी योगिता भोसले यांची झालेली निवड ही अतिशय योग्य असल्याचे सांगत माजी महापौर संघटनेने भोसले यांच्या निवडीचे स्वागत केले आहे. पहिल्या महिला नगरसचिव होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. नगरसचिव कार्यालयात गेली अनेक वर्ष त्या काम करीत आहे. कुठल्याही राजकारणाला बळी न पडता नियमाप्रमाणे काम करीत आहेत, हे आम्ही अनेक जणांनी पाहिले आहे. या पुढील काळात त्यांच्याकडून अशाच प्रकारच्या कामाची अपेक्षा आहे. संघटनेच्या अध्यक्षा राजलक्ष्मी भोसले, सचिव कमल व्यवहारे व निमंत्रक अंकुश काकडे यांनी एका पत्रकाद्वारे या निवडीचे स्वागत केले आहे.

सेलिब्रिटी मास्टर शेफमध्ये निक्की आणि गौरवमध्ये खडाजंगी:

27 जानेवारी पासून या वर्षाची खाद्य दंगल बघण्यासाठी सज्ज व्हा, कारण सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे, एक चविष्ट रियालिटी शो ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ – सबकी सीटी बजेगी”. हा सीझन दर सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता प्रसारित होणार आहे. फराह खान या सीझनची होस्ट आहे, तर रणवीर ब्रार आणि विकास खन्ना हे सेलिब्रिटी शेफ परीक्षक आहेत. मनोरंजनाचा डोस घेण्यासाठी तयार रहा कारण उषा नाडकर्णी, गौरव खन्ना, दीपिका कक्कड, तेजस्वी प्रकाश, चंदन प्रभाकर, अर्चना गौतम, निक्की तांबोळी, राजीव अदातिया, अभिजीत सावंत, फैजल शेख आणि कविता सिंह आपले ग्लॅमरस जीवन सोडून अॅप्रन आणि शेफची हॅट घालून सेलिब्रिटी मास्टर शेफ हा किताब जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत.
केवळ शेगडीच नाही, तर वातावरणच तापले आहे, कारण सगळे स्पर्धक सर्वोच्च स्थान पटकावण्यासाठी एकमेकांशी चढाओढ करत आहेत आणि प्रत्येकाला सुरक्षित राहायचे आहे. त्यातील आव्हानांच्या दबावामुळे एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रकार देखील सुरू झाले आहेत. एका चॅलेंजमध्ये निक्की आणि गौरव यांची जोडी जुळवण्यात आली आणि एकच डिश फराह आणि परीक्षकांना सादर करायची होती. दोन्ही पैकी कोणता पदार्थ टेस्टिंगसाठी सादर करावा यावर त्यांचे एकमत झाले नाही त्यामुळे तणाव वाढला.
या नाट्यात भर घालत निक्की म्हणाली, “मला वाटते की मीच गेले पाहिजे” तर गौरवचा आग्रह होता की, त्याच्याच पदार्थाची चव परीक्षकांनी घ्यावी. त्यावर आक्षेप घेत निक्की म्हणाली, “मला जोखीम घ्यायची नाहीये.” फराहने त्यांना सल्ला दिला की, हार मानू नका, त्यावर निक्की आणि गौरव क्षणाचाही विलंब न करता एकदमच म्हणाले, “तेच तर!” गौरवला टोमणा मारत निक्की म्हणाली, “तू माझी कॉपीच कर फक्त, बास! मला याच्यासोबत का टाकले?”

प्रोमो येथे बघा: https://www.instagram.com/reel/DE2l7BNP0Mw/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

आता निक्की आणि गौरव यांच्यात आग लागली आहे, तर मग कोणाची वाजणार शिट्टी? सेलिब्रिटी मास्टरशेफ सुरू होत आहे 27 जानेवारी रोजी आणि दर सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता हा शो प्रसारित करण्यात येणार आहे, . !

सैफवर हल्ला:मध्य प्रदेशातून एका संशयिताला ताब्यात घेतलं

मुंबई:बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर गुरुवारी मध्यरात्री त्याच्या घरात हल्ला झाला. घरात शिरलेल्या दरोडेखोराने चाकूने वार केले, यात सैफ गंभीर जखमी झाला.या घटनेला दोन दिवस उलटले सैफवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आज (शनिवारी) मध्य प्रदेशातून एका संशयिताला ताब्यात घेतलं. सध्या अधिकारी त्याची चौकशी करत आहेत, असे वृत्त इंडिया टुडे टीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. सैफवर हल्ला करणाऱ्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जारी केले होते, त्यानंतरचे त्याचे वांद्रे व दादरमधील फोटो समोर आले होते. आता या प्रकरणी मध्य प्रदेशातून एकाला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

हल्लेखोराने सैफच्या घरातून बाहेर पडल्यावर कपडे बदलले होते. दोन ठिकाणी तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला होता, त्याआधारे पोलिसांनी तपास सुरू केला होता. अभिनेत्यावर हल्ला होऊन ५० तासांहून अधिक काळ लोटला, तरीही हल्लेखोराचा शोध सुरूच आहे. घुसखोराचे एक ताजे सीसीटीव्ही फुटेज आदल्या दिवशी समोर आले होते, ज्यामध्ये तो सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर दादरमधील एका दुकानातून हेडफोन खरेदी करताना दिसला होता. आता एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे.

दरम्यान, हल्लेखोर सैफ अली खानचा धाकटा मुलगा जेहच्या खोलीतील बाथरूममध्ये होता. घरातील मदतनीसने त्याला पाहिलं. त्याच्या हातात काठी व चाकू होते. तो जेहच्या पलंगाकडे धावत गेला, पण मदतनीसने त्याला अडवलं. हा गोंधळ ऐकून सैफ व करीना तिथे पोहोचले. तिथे सैफची त्याच्याबरोबर झटापट झाली. त्याचदरम्यान त्याने चाकूने सैफवर वार केले. सैफला मानेला, हाताला, पाठिला गंभीर जखमा झाल्या. तसेच मानेमध्ये चाकूचे टोक घुसले होते. घरातील मदतनीस व तैमूरने सैफला रिक्षातून रुग्णालयात नेलं. नंतर लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्याच्या पाठीतून चाकूचे टोक काढले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याला दोन ते तीन दिवसांत डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे समजते.

मुंबईत सेलिब्रिटी आणि गावात सरपंच सुरक्षित नाहीत तर सर्वसामान्यांची काय अवस्था असेल?: नाना पटोले

अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याला धर्माच्या दृष्टीकोनातून पाहू नका, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात जाती धर्माच्या भेदभावाला थारा नाही.

‘लाडकी बहीण’ योजनेच्या पारदर्शकतेची गरज आताच का भासली? मते घेताना भाजपा युती झोपली होती का?

दावोसला जाऊन गुंतवणुकीच्या नावाखाली जनतेच्या पैशाची उधळपट्टी करु नका.

मुंबई, दि. १८ जानेवारी २०२४
महाराष्ट्रात जंगलराज निर्माण झाले आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. दिल्लीत आज महाराष्ट्राची चर्चा जंगलराज म्हणून होत आहे हे दुर्दैवी आहे. भाजपा सरकारने महाराष्ट्राला कलंकीत करण्याचे काम केले असून सत्तेसाठी दहशत निर्माण करण्याचे काम भाजपाने थांबवले पाहिजे. राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली असून मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाहीत आणि गावात सरपंच सुरक्षित नाहीत अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेचे काय? असा प्रश्न उपस्थित होत असल्याचा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

नागपुरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली असून गुन्हेगारांना पोलिसांची भिती राहिली नाही. आमचे कुणी काही बिघडवू शकत नाही अशी मानसिकता गुन्हेगारांची झाली आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेला फक्त गृहमंत्रीच जबाबदार नाहीत, मंत्रिमंडळातच ६५ टक्के मंत्री दागी असतील तर यापेक्षा वेगळे चित्र काय दिसणार आहे, पण ही परिस्थिती बदलावी लागणार आहे. अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला जाती धर्माच्या दृष्टीकोणातून पाहू नका. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात जाती धर्माच्या भेदभावाला थारा नाही, या राज्यात सर्व जाती धर्माचे लोक सुरक्षित राहिले पाहिजेत.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या व परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीत झालेला मृत्यू या घटनाही जाती धर्माशी जोडून पाहणे चुकीचे आहे. मराठा-ओबीसी वाद भाजपा युती सरकारनेच निर्माण केला आहे, त्यातून जनतेचे मुळ प्रश्न बाजूलाच पडले आहेत. शेतमालाला भाव मिळत नाही, शेतकरी आत्महत्या वाढत आहेत, शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, युवकांना बरोजगारीचा सामना करावा लागत आहे, महागाई गगनाला भिडली आहे, हे प्रश्न महत्वाचे आहेत. जाती धर्माच्या वादात न पडता सरकारविरोधात सर्वांनी आवाज उठवला पाहिजे असेही नाना पटोले म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणीची मते हवी होती म्हणून सर्व बहिणींना योजनेचा लाभ दिला, याच बहिणींच्या मतांवर सत्तेत आले आणि आता भाजपा युती सरकारला लाडकी बहिण योजनेतील त्रुटी दिसत आहेत का? बहिणींची मते घेताना या त्रुटी व पारदर्शकता आठवली नाही का? सरकार आल्यानंतर पडताळणी करण्याची गरज का पडावी? बोगस लाभार्थी बहिणींकडून पैसे परत घेण्याची धमकी मंत्री देत आहेत, यातून भाजपा युतीचा खरा चेहरा उघडा पडला आहे. परंतु भाजपा युती सरकारने जाहिर केल्याप्रमाणे प्रत्येक लाडक्या बहिणीला सरसकट २१०० रुपये दिले पाहिजेत, असेही नाना पटोले म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनीही राज्यातील उद्योगपतींना दावोसला घेऊन दौरा केला होता, त्याची नक्कल देवेंद्र फडणवीस यांनी करू नये. महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात एक नंबरवर आहे हा दावा भाजपा सरकार करत आहे पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे, महाराष्ट्राची घसरण झालेली आहे. गुंतवणुकीच्या नावाखाली दावोसला जाऊन जनतेच्या पैशाची उधळपट्टी करू नका, असेही पटोले म्हणाले.

चाळकवाडी येथे मराठी बालकुमार साहित्य संमेलन:ज्येष्ठ बालसाहित्यिक सूर्यकांत सराफ संमेलनाध्यक्ष

परिसंवाद, कथाकथन, कथावाचनासह शालेय विद्यार्थ्यांचे रंगणार कविसंमेलन
पुणे : सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या आणि बालसाहित्यातील मातृ संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणेतर्फे दि. 23 व दि. 24 जानेवारी रोजी मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे शिवांजली शैक्षणिक संकुल, चाळकवाडी-पिंपळवंडी, नारायणगाव (ता. जुन्नर) येथे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध बालसाहित्यिक ग. ह. पाटील यांच्या जन्मगावी हे संमेलन होत आहे.
मुलांना बालसाहित्याची ओळख व्हावी, त्यांची वाचनाची भूक वाढावी, त्यांच्या चौकस वृत्तीला विहारायला आणखी नवे आकाश लाभावे, नामवंत बालसाहित्यिकांना पाहता यावे, त्यांच्याशी संवाद साधता यावा या उद्देशाने संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू, विश्वस्त, कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी, संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुबंई पुरस्कृत संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ बालसाहित्यिक सूर्यकांत सराफ यांची निवड करण्यात आली आहे. संमेलन नगरीस ग. ह. पाटील बालसाहित्य नगरी असे नाव देण्यात आले असून कै. सौ. मातोश्री अलकामाई भिमाजी सोनवणे सभामंडपात संमेलन होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन गुरुवार, दि. 23 जानेवारी 2025 रोजी दुपारी 3 वाजता आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते होणार आहे. आमदार अतुल बेनके यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे, वसंतराव काकडे पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब काकडे, संस्थाध्यक्ष राजेंद्र पायमोडे, संस्था सचिव गजानन चाळक, शाला समिती सदस्य तुळशीराम नरवडे, सुभाष विद्या मंडळाचे अध्यक्ष रमण काकडे, यशवंत पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेव वाघ, चाळकवाडीच्या सरपंच मेघा काकडे, संस्था कोषाध्यक्ष कोंडीभाऊ वामन, प्रा. शा. समिती अध्यक्ष प्रदीप वायकर, संमेलनाचे निमंत्रक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरद लेंडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
शुक्रवार, दि. 24 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले असून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रंथदिंडीला सुरुवात होणार आहे. या प्रसंगी नारायणगाव ग्रामविकास संस्थचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर, विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आशा बुचके उपस्थित असणार आहेत.
संमेलनाच्या ध्वजारोहणानंतर पहिल्या सत्रात सकाळी 10:30 वाजता ‌‘बालसाहित्याची सद्य:स्थिती‌’ या विषयावर परिसंवाद होणार असून यात श्रीकांत पाटील (कोल्हापूर), अनिल कुलकर्णी (पुणे), जालिंदर डोंगरे (जुन्नर) यांचा सहभाग असणार आहे. अध्यक्षस्थानी डॉ. कैलास दौंड (पाथर्डी) असतील. दुसऱ्या सत्रात सकाळी 11:30 वाजता ‌‘मनोरंजनातून बालसाहित्य‌’ अंतर्गत सूर्यकांत सराफ (छत्रपती संभाजीनगर) आणि एकनाथ आव्हाड (मुंबई) मुलांशी संवाद साधणार आहेत. तिसऱ्या सत्रात दुपारी 1:30 वाजता ज्येष्ठ बालसाहित्यिक भास्कर बडे (बिड) यांच्या अध्यक्षतेखाली ‌‘शालेय विद्यार्थी कविसंमेलन‌’ होणार असून यात बालसाहित्यिक अलका सपकाळ (धाराशिव) यांच्यासह विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे.
चौथ्या सत्रात दुपारी 2:30 वाजता ‌‘कथा पंचक‌’ अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांचे कथावाचन होणार असून बालसाहित्यिक डॉ. विनोद सिनकर (छत्रपती संभाजीनगर) अध्यक्षस्थानी असणार आहेत. दुपारी 3:30 वाजता आयोजित पाचव्या सत्रात संजय ऐलवाड (पुणे), बालकृष्ण बाचल (पुणे) आणि उत्तम सदाकाळ (जुन्नर) ‌‘कथाकथन‌’ सादर करणार असून रमेश तांबे (मुंबई) अध्यक्षस्थानी असणार आहेत. सायंकाळी 4:30 वाजता प्रसिद्ध बालसाहित्य समीक्षक डॉ. विद्या सुर्वे-बोरसे (नाशिक) यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलनाचा समारोप होणार आहे. महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य विनोद कुलकर्णी, श्रीपाद अपराजित, समर्थ शैक्षणिक संकुलाचे प्रमुख वल्लभ शेळके, विशाल जुन्नर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे, जनमंगल परिवाराचे संस्थापक अनंत चौगुले, कुरण येथील जयहिंद शैक्षणिक संकुलाचे प्रमुख विजय गुंजाळ, गजानन महाराज शिक्षण संस्थेचे सचिव वैभव तांबे, जुन्नर येथील शिवाजी मराठा शिक्षण संस्थेचे सुनील ढोबळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
मुलांना साने गुरुजींच्या कथासंग्रहाची भेट
संमेलनात सहभागी होणाऱ्या मुलांना साने गुरुजी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त साने गुरुजी यांच्या कथांचा संग्रह भेट देण्यात येणार आहे.
अस्सल जुन्नरी मेजवानी
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या साहित्यिक व साहित्यप्रेमींना जुन्नर येथील अस्सल पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. मासवडी, बाजरीची भाकरी, आमटी असा खास बेत असणार आहे.