Home Blog Page 494

‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ (GBS) च्या प्रतिबंधासाठी तातडीच्या उपाययोजना करा:आमदार हेमंत रासने यांनी महापालिका अधिकाऱ्यांना सुनावले

पुणे (दि २२) : शहरात काही भागामध्ये ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ (Guillain-Barré Syndrome – GBS) या आजाराचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. हा आजार दुर्मिळ असल्यामुळे नागरिकांमध्ये याबद्दल संभ्रमावस्था आहे. या आजारामुळे रुग्णांवर होणारा परिणाम पाहता त्वरित निदान आणि उपचार मिळणे गरजेचे असून महापालिका तसेच संलग्न असणाऱ्या रुग्णालयांमध्ये माफक दरात उपचार उपलब्ध करून देण्यात यावेत, जीबीएस आजार दूषित पाण्यामुळे होत असल्याचे दिसून आल्याने पाण्याच्या साठवण टाक्यांची स्वच्छता नियमितपणे ठेवली जावी तसेच पाणी शुद्धीकरण मोहिम राबवा, असे आमदार हेमंत रासने यांनी महापालिका प्रशासनाला सुनावले आहे.

गेली दोन दिवसांपासून पुणे शहरातील काही भागांमध्ये गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराचे रुग्ण सापडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात योग्य उपाययोजना करण्याची मागणी हेमंत रासने यांनी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज पी बी यांची भेट घेत केली आहे. नागरीकांमध्ये GBS विषयी जनजागृती करणे गरजेचे असून आरोग्य केंद्रांमध्ये या आजाराच्या निदानासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध केले जावे.


रुग्णांना त्वरित उपचार मिळण्यासाठी मोठ्या रुग्णालयांमध्ये GBS साठी स्वतंत्र विभाग तयार करावेत तसेच आर्थिक दुर्बल रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून देण्याची मागणी रासने यांनी यावेळी केली

याविषयी बोलताना हेमंत रासने म्हणाले, गेली दोन दिवसांपासून पुणे शहरात जीबीएसचे रुग्ण आढळून येत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आजार संसर्गजन्य नसल्याने नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये, मात्र दूषित पाण्यामुळे हा आजार होत असल्याचं पुढे आल्याने उकळून घेऊनच पाणी प्यावे आणि उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. महापालिका तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून टास्क फोर्सच्या माध्यमातून उपायोजना केल्या जात आहेत.यावेळी मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे, सरचिटणीस अमित कंक, प्रणव गंजीवाले, राजू परदेशी, चंद्रकांत पोटे, माजी नगरसेवक राजेश येनपुरे , सरस्वती शेंडगे, योगेश समेळ, अजय खेडेकर, आरती कोंढरे, गायत्री खडके, शहर सरचिटणीस प्रमोद कोंढरे, युवा मोर्चा अध्यक्ष निर्मल हरिहर आदी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

कसबा मतदारसंघातील विविध प्रश्न संदर्भात देखील यावेळी चर्चा करण्यात आली. कचरा मुक्त कसबा अभियान यशस्वी करण्यासाठी करावयाच्या उपायोजना. मुख्य रस्त्यांवर असणारी अतिक्रमणे हटवणे, तसेच मतदारसंघात काही भागांमध्ये पाणीपुरवठा संदर्भात नागरिकांकडून तक्रारी येत असल्याने सुरळीत व प्रेशरने पाणीपुरवठा करण्याची मागणी यावेळी हेमंत रासने यांनी केली आहे.

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेच्या दहा वर्ष पूर्ती निमित्त कार्यक्रमांचा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या हस्ते शुभारंभ

पुणे, दि. २२: ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेला दहा वर्ष झाल्याच्या निमित्ताने देशभरात, महिला व बालविकास मंत्रालयाने विविध कार्यक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यातील कार्यक्रमांचा शुभारंभ स्वाक्षरी मोहिमेद्वारे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी उपस्थितांना अभियानाच्या अनुषंगाने प्रतिज्ञा दिली.

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण जामसिंग गिरासे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी मनिषा बिरारीस, बालविकास प्रकल्प अधिकारी संध्या नगरकर, मोनिका रंधवे तसेच पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होत्या.

जिल्हाधिकारी श्री. डूडी यावेळी म्हणाले, बाल लिंग गुणोत्तर प्रमाण वाढावे, बालिकांच्या शिक्षणाला चालना मिळावी तसेच त्यांचे अधिकार आणि विकासाच्या संधी त्यांना मिळाव्यात यासाठी देशभरात ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत बाल लिंग गुणोत्तराचे पुणे जिल्ह्याचे प्रमाण वाढावे याकरिता पुढील सहा आठवड्यांमध्ये सर्व ग्रामपंचायत स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

भारुड, आदिवासी बोहाडा, कळसूत्री बाहुल्या, गोंधळ, पिंगळा सादरीकरणातून दुर्मिळ लोककलांना उजाळा 

लोकसाहित्य व लोकसंस्कृतीच्या कार्यशाळेतून लोककलेचा जागर संस्कृति कार्य संचलनायानच्या उपक्रमाला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद

पुणेमहाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई आयोजित आणि भारतीय लोककला अभ्यास संशोधन कल्याण केंद्र व सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने व फोकलोर अँड क्लचरल हेरीटेज फाउंडेशन पुणे यांच्या समन्वयातून व्याख्यान, परिसंवाद, कार्यशाळा, शोधनिबंध वाचन, लोकसंस्कृती विषयक सांस्कृतिक कार्यशाळाचे दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन संत नामदेव सभागृह, पुणे विद्यापीठ येथे केले होते.  या दोन दिवशी कार्यशाळेमध्ये पहिल्या दिवशी  लोकसंस्कृतीतील मौखिक परंपरा, परिसंवाद लोकसंस्कृतीची बलस्थाने आणि मर्यादा, परिसंवाद लोकसंस्कृतीतील स्त्री जीवन, शोधनिबंध वाचन,  अंबाजोगाईची लळीत परंपरा, आदिवासी बोहाडा, पिंगळा, भारुड, गायन, लोकसंगीत मोठ्या उत्साहात पार पडले.तर दुसऱ्या दिवशी लोक दैवत संप्रदाय आणि भक्ती संप्रदाय, लोकरंगभूमीच्या भौतिक संस्कृतीमधील तथ्य आणि मिथक, लोक संस्कृतीतील रंजानात्म्क अविष्कार,  कळसूत्री बाहुल्या,  गोंधळ जागरण,  लोकजीवनातून लुप्त झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण म्हणी, वाक्यप्रचार, उखाणे, कोंडी यांचे लोककथेच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आले.  कथक आणि लावणी जुगलबंदी सादर करून या लोकसाहित्य व लोकसंस्कृती कार्यशाळेची सांगता करण्यात आली.सदरील कार्यशाळेला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला. यामध्ये तरुणाई पासून वयोवृद्धांपर्यंत आवर्जून उपस्थिती लावली होती. सदरील महोत्सवाचे संयोजक  सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे आणि लोकसाहित्य आणि फोकलोर अँड क्लचरल हेरीटेज फाउंडेशन  समन्वयक डॉ.सुनीता धर्मराव होत्या. 

महाराष्ट्रातील लोककला व कलाकारांना मिळणार नवसंजीवनी – चवरेमहाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या मार्फत अशाच कार्यशाळा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेतल्या जाणार असून अशा कार्यशाळांतून लुप्त होत चाललेल्या लोककला, लोकसंस्कृती व कलाकारांना नवसंजीवनी देण्यात येणार आहे. अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली.

 स्वप्नातील लग्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी टाटा एआयए लाइफ तर्फे ‘शुभ मुहूर्त’ सादर

मुंबई: भारतातील लग्नसमारंभ केवळ विधीवत समारंभ नसतात तर जिथे संस्कृती, प्रेम आणि आनंद मोठ्या प्रमाणावर साजरे होतात असे उत्सव असतात. प्रत्येक कुटुंबासाठी तो आयुष्यातील सर्वाधिक महत्त्वाचा टप्पा असतो. त्याचबरोबर आता लग्नसमारंभ हा सामाजिक प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. त्यातून थीम आणि डेस्टिनेशनवर आधारित लग्नांचे ट्रेंड सुरू झाले आहेत. अशी लग्नं अनेक दिवसांपासून ते आठवड्यांपर्यंत चालतात. परिणामी, या प्रसंगासाठी पुरेसा निधी निश्चित करणे हे फक्त काही महिन्यांचे नव्हे, तर अनेक वर्षांचे काटेकोर आर्थिक नियोजन आवश्यक बनले आहे.

लग्नाचे महत्त्व आणि त्याचा ग्राहकांवरील आर्थिक परिणाम लक्षात घेऊन भारतातील अग्रगण्य जीवन विमा कंपन्यांपैकी एक टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स (टाटा एआयए) ‘शुभ मुहूर्त’ नावाची नाविन्यपूर्ण जीवन विमा योजना सादर करत आहे. या योजनेत इक्विटीमध्ये गुंतवणूक यांसह भांडवली हमी, इच्छित लाभार्थ्याला निश्चित लाभ, जीवन संरक्षण, मृत्यू सारखा प्रसंग उद्भवल्यास तत्काळ निधी अशा अनेक गोष्टी समाविष्ट आहेत. यामुळे पालकांना त्यांच्या मुलाच्या स्वप्नातील लग्नासाठी बचत करण्यात मदत होईल आणि हा क्षण आयुष्यभरासाठी संस्मरणीय बनेल हे सुनिश्चित करता येऊ शकेल.

ही योजना सुरू करण्याबद्दल बोलताना टाटा एआयएचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी अय्यर म्हणाले: “टाटा एआयए लाइफमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांच्या जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यांनुसार त्यांच्या अनोख्या गरजा समजून त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो. पालकांसाठी लग्नाचे महत्त्व काय असते हे आम्हाला समजते. लग्न हा केवळ प्रेम आणि एकत्र येण्याचा उत्सव नसून कुटुंबीयांच्या भावना आणि आकांक्षांचे प्रतीक आहे. ‘शुभ मुहूर्त’ कुटुंबांना पूर्वनियोजन करण्यासाठी मदत करेल.”

“जोडीला आम्हाला अशी उपाय सुविधा द्यायची होती की जर दुर्देवाने पालकांचा मृत्यू ओढवला तरी उद्दिष्ट सुरक्षित राहील. ‘शुभ मुहूर्त’द्वारे आम्ही कुटुंबांना आनंदाच्या या क्षणांचे आत्मविश्वासाने नियोजन करण्यात मदत करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहोत आणि त्यांच्या जीवनातील या महत्त्वाच्या टप्प्याला साजरे करण्यासाठी त्यांना ‘तयार’ करू इच्छितो.”

ही योजना ज्यांच्या मुलांचे वय 1 ते 20 वर्षे आहे अशा 31 ते 50 वर्षे वयोगटातील पालकांसाठी सर्वोत्तम आहे. या योजनेत लवकर गुंतवणूक केल्यास पालकांना त्यांच्या मुलाच्या भव्य लग्नासाठी हवे असलेले भांडवल जमविण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.

शुभ मुहूर्त ची खास वैशिष्ट्ये

लग्नाचे नियोजन हा आनंददायी आणि तणावमुक्त अनुभव होईल अशा प्रकारे शुभ मुहूर्त योजना डिझाइन करण्यात आली आहे. यातील अनोखे लाभ पुढीलप्रमाणे:

·         लग्नाशी संबंधित विविध खर्चांचे नियोजन: लग्नामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खर्च समाविष्ट असतात. त्यात लग्नासाठीचे ठिकाण आरक्षित करणे, समारंभ आयोजित करणे, अन्न-पदार्थ आणि पेये यावर होणारा खर्च, दागिने आणि लग्नाचे पोशाख खरेदी करणे, पाहुण्यांसाठी निवासाची सोय करणे इत्यादी. शुभ मुहूर्ताचे नियोजित पेआऊट आवश्यक वेळेस निधी उपलब्ध करून देतात. त्यामुळे पालकांना अंतिम क्षणी पैसा जमवण्याची चिंता करण्याऐवजी सोहळा साजरा करण्यावर लक्ष केंद्रित करता येते.

·         इक्विटी एक्स्पोजरसोबत भांडवली हमी: भरलेल्या प्रीमियमचे संरक्षण केल्यामुळे पालकांना आर्थिक सुरक्षा आणि मनःशांती मिळते. भलेही बाजारात चढ-उतार होत असले, तरीही हमी रक्कम हे सुनिश्चित करते की लग्नाचे नियोजन बाजारातील अनिश्चिततेमुळे बिघडणार नाही.

·         दीर्घकालीन संपत्ती वृद्धी: लग्नसमारंभाशी मोठ्या आकांक्षा जोडलेल्या असतात. शुभ मुहूर्त बाजाराशी जोडलेल्या गुंतवणुकीच्या माध्यमातून कालांतराने मोठे भांडवल तयार करण्यात मदत करते. यामुळे इतर जीवन उद्दिष्टाशी तडजोड न करता डेस्टिनेशन लग्न किंवा उच्चस्तरीय व्यवस्था यांसारख्या भव्य शाही लग्नांसाठी आवश्यक आर्थिक स्त्रोत उपलब्ध होतात.

·         MWPA अंतर्गत विशेष संरक्षण: मॅरिड वुमन प्रॉपर्टी अॅक्ट (MWPA) अंतर्गत पॉलिसी उत्पन्नाचे संरक्षण केल्यामुळे मुलाच्या लग्नासाठी राखलेला निधी कायदेशीररित्या संरक्षित राहतो आणि कोणत्याही बाह्य आर्थिक दाव्यांपासून सुरक्षित राहून नॉमिनीला उपलब्ध होतो.

लाभ संरक्षण रायडर: हा रायडर अतुलनीय सुरक्षा प्रदान करतो:

·         तात्काळ मृत्यू लाभ: विमाधारकाच्या मृत्यूच्या दुर्दैवी घटनेत, कुटुंबाला आर्थिक सहाय्य दिले जाते. त्यामुळे त्यांचे जीवनाचे उद्दिष्ट निर्विघ्नपणे पुढे जाऊ शकते.

·         प्रीमियम सूट: भविष्यातील प्रीमियम माफ करून पॉलिसीची सातत्यपूर्णता राखली जाते आणि कुटुंबावर आर्थिक ताण येत नाही.

·         नॉमिनींसाठी मॅच्युरिटी लाभ: विमाधारकाच्या अनुपस्थितितसुद्धा मुलाच्या लग्नाचे उद्दिष्ट पूर्ण होईल हे सुनिश्चित करत ठरलेला मॅच्युरिटी लाभ देण्यात येतो.

शुभ मुहूर्त हा टाटा एआयए च्या शुभ सोल्यूशन्स मालिकेचा एक भाग आहे. मुलांच्या शिक्षणापासून त्यांचे लग्नाचे स्वप्न पूर्ण करणे यासाठी निधी उपलब्ध व्हावा याकरता सुरुवातीच्या वर्षात संपत्ती निर्मितीपासून सुवर्णवर्षांत आपल्या आकांक्षा पूर्ण करणे, परंपरा जोपासणे यासाठी जीवनातील प्रत्येक टप्प्यासाठी योग्य प्रकारचे विमा उत्पादन पुरवतो. टाटा एआयए च्या ‘हर वक्त के लिए तैयार’ या ब्रँड वचनाशी हा उपक्रम सुंदरपणे सुसंगत आहे.

प्रत्येक कुटुंबाच्या आकांक्षा वेगवेगळ्या असतात आणि काही विशिष्ट वेळेस मुलाच्या लग्नाऐवजी इतर उद्दिष्टांसाठी असू शकतात. हे लक्षात घेऊन, टाटा एआयएने या मालिकेतील दुसरी योजना  ‘शुभ फॉर्च्यून’* सादर केली आहे.

शुभ फॉर्च्यून ही एक व्यापक आर्थिक योजना आहे जी जीवनातील विविध महत्त्वपूर्ण टप्प्यांना सामोरे जाण्यासाठी तयार करण्यात आली आहे. सुरुवातीच्या करिअरमध्ये संपत्ती निर्माण करणे, मुलाच्या शिक्षणासाठी नियोजन करणे किंवा घर खरेदी करण्यासारख्या आकांक्षा पूर्ण करणे यासारखे जीवनातील महत्वपूर्ण टप्पे विनाअडथळा पार करण्यासाठी मदत करण्याकरता शुभ फॉर्च्यून डिझाईन करण्यात आली आहे.

कोणतीही तडजोड न करता भारतीय कुटुंबांना सोहळा साजरा करण्यासाठी सक्षम करणे

या नाविन्यपूर्ण योजना सादर करून, टाटा एआयए लाइफ भारतीय कुटुंबांना त्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यांचे नियोजन आणि ते साजरे करण्यास मदत करण्यासाठी आपले योगदान दृढ करते. संस्कृतीशी जोडलेले मूल्य आणि आर्थिक स्थैर्य यांचा संगम साधणाऱ्या योजना तयार करण्याच्या टाटा एआयएच्या ध्येयाचे हे प्रतीक आहे. त्यामुळे कुटुंबे कोणत्याही आर्थिक ताणाविना जीवनातील खास क्षण साजरे करू शकतात.

ही योजना टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स फॉर्च्यून गॅरंटी सिक्युअर (UIN:110N206V02) ची एक वैयक्तिकनॉन-लिंक्डनॉन-पार्टिसिपेटिंगजीवन विमा बचत योजना आणि टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स स्मार्ट फॉर्च्यून प्लस  (UIN:110L177V01एक युनिट-लिंक्डवैयक्तिक जीवन विमा बचत योजना यांचे संयोजन आहे.

“जळगाव जिल्ह्यातील ऑनर किलिंगची घटना माणुसकीला काळीमा फासणारी” आरोपींवर कडक कारवाई करण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

जळगाव : पिंप्राळा हुडको, जिल्हा जळगाव येथे राहणाऱ्या मुकेश रमेश शिरसाठ वय वर्ष २७ या तरुणाची प्रेमविवाह केल्याने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून मुकेश शिरसाठ व पूजा सोनवणे यांचा चार ते पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. पण त्यानंतर पूजाच्या घरच्यांसोबत मुकेश शिरसाठचे वारंवार वाद आणि खटके उडत होते. त्यावरून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार आणि एनसी दाखल करण्यात आल्या आहेत. पण पळून जाऊन लग्न केल्याचा राग अजूनही पूजाच्या नातेवाईकांच्या मनात होता, या संतापातून त्यांनी मुकेशची निर्घृणपणे हत्या केली. या गंभीर घटनेची तत्काळ दखल उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली असून जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जळगाव आणि पोलीस अधीक्षक जळगाव यांना कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

सदर घटनेदिवशी मृत मुकेश शिरसाठचे पूजाच्या घरच्यांसोबत वादविवाद झाले होते. त्यावेळी एकूण आठ-नऊ लोकांपैकी एकाने त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला आणि जागेवरच त्याचा जीव गेला. याचा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

‘ऑनर किलिंगची ही घटना संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे’; असे म्हणत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या अनुषंगाने काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. हा प्रेमविवाह होऊन चार-पाच वर्ष झाली होती त्याचबरोबर मयत मुकेश शिरसाठ व त्याच्या सासरची मंडळी यांच्यात सतत वादविवाद होत असल्याने संबंधित पोलीस स्टेशनला वेळोवेळी एनसी तक्रार दाखल करण्यात आली होती. ही बाब विचारात घेता या प्रकरणामध्ये वेळोवेळी पोलिसांमार्फत काय कार्यवाही करण्यात आली आहे याबाबत माहिती सादर करावी.

ऑनर किलिंग टाळण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन व पोलीस विभागामार्फत काय कार्यवाही यापूर्वी करण्यात आली आहे याबाबत माहिती सादर करावी. मयत मुकेश शिरसाठ याच्या कुटुंबास आवश्यक संरक्षण व सुरक्षागृहाची व्यवस्था गरजेनुसार पुरवण्यात यावी. साक्षीदार संरक्षण कायद्यांतर्गत साक्षीदारास आवश्यक संरक्षण पुरविण्यात यावे. आरोपीला कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक व ठोस साक्षी पुरावे मुदतीत संकलित करून चार्जशीट वेळेत दाखल करण्यात यावी. तसेच उर्वरित आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी.

याप्रकरणी अनुभवी निष्णात सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात यावी. मयत मुकेश शिरसाठ याच्या कुटुंबास सामाजिक अर्थसहाय्य योजनेमधून नियमानुसार लाभ देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत समाज प्रबोधन व समुपदेशन कक्षाच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात यावी. तसेच, ‘याप्रमाणे कार्यवाही करून उपसभापती कार्यालयास या संदर्भातील अहवाल वेळोवेळी सादर करण्यात यावा’ असेही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांना अक्षय शिंदे फेक एन्काऊंटर प्रकरणात आरोपी करा-ॲड. तोसीफ शेख यांची मागणी.

पुणे: २२.०१.२०२५: आझाद समाज पार्टीचे नेते,ॲड. तोसीफ चंद्र शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश यांना पत्र सादर करून महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अक्षय शिंदे, बदळापूर प्रकरणातील आरोपी, ज्याचा फेक एन्काऊंटर प्रकरणात आरोपी म्हणून समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.

पत्रात, ॲड. तोसीफ शेख यांनी स्पष्ट केले आहे की फडणवीस यांनी या एन्काऊंटरचे सार्वजनिकपणे समर्थन केले आहे आणि त्या कृत्याची प्रशंसा देखील व्यक्त केली आहे. तसेच, फडणवीस यांच्या हातात शस्त्र असलेल्या बॅनर्सचे प्रदर्शन केल्याचे देखील त्यांनी उल्लेख केले आहे, जे स्पष्टपणे extrajudicial हत्या ला समर्थन देणारे आहे. ॲड. तोसीफ शेख यांच्यानुसार, अशी कृत्य केवळ उच्च अधिकाऱ्यांकडून, विशेषतः गृहमंत्र्यांकडूनच, स्पष्ट आदेशाशिवाय केली जाऊ शकत नाही.

“Extrajudicial killings (हत्या) कायद्याच्या राज्याला गालबोट लावतात, जे न्यायसंगत समाजाची मूलतत्त्व आहे. हे प्रकरण, जे कायद्याचा स्पष्ट उल्लंघन आहे, गृहमंत्र्याच्या भूमिकेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे ,” असे ॲड. शेख यांनी मुख्य न्यायाधीशांना कळवलेल्या पत्रात नमूद केले.

ॲड. शेख यांनी या प्रकरणाची तपासणी मुख्य न्यायाधीशांच्या देखरेखीखाली केली जावी, यासाठी मागणी केली आहे, जेणेकरून न्यायप्रवणतेचे आणि पारदर्शकतेचे पालन सुनिश्चित होईल.

आझाद समाज पार्टी, ॲड. तोसीफ शेख यांच्या नेतृत्वाखाली, प्रत्येक प्रकरणात न्याय, पारदर्शकता आणि योग्य न्यायालयीन प्रक्रिया मागणी करत आहे आणि स्वतंत्र न्यायपालिका व बाह्य दबावापासून मुक्त असलेल्या न्यायालयाच्या गरजेवर जोर देत आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस अनोख्या सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार – शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे

विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी उपमुख्यमंत्री पुण्यात येणार..

पुणे-राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर शिवसेना आणि शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी तसेच हडपसर मधील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडणार असल्याची माहिती शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी दिली आहे.

दिनांक ९ फेब्रुवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस राज्यभर सर्वत्र ठिकाणी साजरा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे शहर शिवसेना आणि शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आणि भूमिपूजन तसेच लोकार्पण सोहळ्याचे आयोजन केले आहे. हडपसर मधील विविध विकासकामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लवकरच पार पडणार असल्याची माहिती भानगिरे यांनी दिली आहे.

वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात पुण्यातील लाडक्या बहिणींसाठी भव्य होम मिनिस्टर कार्यक्रम, दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव वाटप, महिलांना रोजगाराभिमुख साहित्य वाटप करणार आहे. होम मिनिस्टर कार्यक्रमात विजेत्यांना एमजी इलेक्ट्रिक कारसह लाखोंची बक्षिसे देखील वितरित करण्यात येणार आहे. तसेच यामध्ये उपस्थित असणाऱ्या प्रत्येक महिला भगिनींना आकर्षक भेटवस्तू दिले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभावी यासाठी शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून सकारात्मक प्रतिसाद देत कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचा विश्वास दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर हडपसर मतदारसंघातील तरवडे वस्ती येथे संतसृष्टी मध्ये नुकत्याच उभारण्यात आलेल्या २१ फुटांच्या भव्य विठ्ठलाच्या मूर्तीचे आणि संतसृष्टीचे लोकार्पण, महात्मा फुले जलतरण तलाव तसेच हडपसर ते महादेववाडी अंतर्गत डीपी रस्ते आणि विविध विकासकामांचे भूमिपूजन केले जाणार आहे. येणाऱ्या काळात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाने हडपसर मतदारसंघासह पुणे शहरात विविध विकासात्मक बदल घडवून आणण्याचा विश्वास दिल्याचे भानगिरे यांनी सांगितले.

बस आणि रेल्वे स्थानकावर मोबाईल चोरणाऱ्यास आणि ते विकत घेणाऱ्यास पकडून

पुणे-स्वारगेट एस.टी. स्टॅन्ड व पुणे रेल्वे स्टेशन परिसरामधुन प्रवाशांचे मोबाईल चोरी करणा-या चोरटयास जेरबंद करून पोलिसांनी चोरीचे मोबाईल विकत घेणाऱ्यालाहि पकडून त्याच्याकडून चोरीचे पावणे आठ लाखाचे एकूण ४३ मोबाईल जप्त केले .

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’स्वारगेट पोलीस ठाणे हद्दीतील स्वारगेट एस टी स्टैंड व पी एम पी एम एल बस स्टॉप येथेचोरीच्या घटना अधुन मधुन घडत असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वारगेट पोलीस स्टेशन यांनी तपास पथकातील पोलीस अंमलदार यांना सुचना देवुन सदर भागात सकाळी गर्दीचे वेळी गुन्हे प्रतिबंधकगस्त करणे बाबत आदेशित केले होते.
त्यावरुन दि.२२/०१/२०२५ रोजी सदर पथक गस्तीवर असताना एक इसम स्वारगेट पी एम पी एम एल बस स्टॉप येथे प्रवाशांच्या गर्दीत संशयीतरित्या वारंवार फिरत असल्याचे दिसुन आला त्याचे हालचालीवरुन त्याचेवर अधिक संशय बळावल्याने सदर पथकाने त्यास हटकले असता तो पळुन जावु लागल्याने त्यास स्टाफचे मदतीने जागीच ताब्यात घेवुन त्यास त्यांनी त्यांची ओळख सांगुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव सतिश ज्ञानेश्वर शिरोळे वय ३२ वर्षे रा. फिरस्ता (पुणे स्टेशन व स्वारगेट बस स्टँड परीसर) मुळ गाव मु पो दहीटणे ता. दौंड जि पुणे असे असल्याचे सांगितले त्यास त्याचे ओळखपत्र मागितले असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्यावेळी त्याचे ताब्यात तीन मोबाईल मिळुन आले. सदर मोबाईल फोन बाबत त्यास विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्यास अधिक चौकशी कामी स्वारगेट पोलीस ठाणे येथे आणुन त्यास विश्वासात घेवुन त्याचे कडे अधिक विचारपुस केली असता त्याने सांगितले की, मागिल महीन्यात सकाळचे वेळी स्वारगेट पी एम टी बस स्टॉप येथे बस मध्ये चढत असलेल्या एका महीलेचा मोबाईल गर्दीचा फायदा घेवुन चोरला आहे. तसेच दोन मोबाईल पुणे स्टेशन परीसरात चोरी केले आहेत. असे सांगितले
त्यानंतर मोबाईल फोन बाबत स्वारगेट पोलीस ठाण्याकडील गुन्हे अभिलेख पडताळुन अधिक माहीती घेतली असता सदर मोबाईल फोन बाबत स्वारगेट पोलीस स्टेशन गु.र.नं. २७/२०२५, भा. न्या. सं ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल असल्याची माहीती प्राप्त झाली. सदर गुन्हयांमध्ये आरोपीस अटक करुन त्याचे कडे अधिक तपास केला असता त्याने पुणे स्टेशन व स्वारगेट एसटी स्टॅन्ड परिसरातुन चोरी केलेले मोबाईल फोन हे त्याचे ओळखीचा मोबाईल दुकानदार नामे मोहम्मद शाहिद इलियास अन्सारी वय ३४ वर्षे धंदा हसना एंटरप्रायजेस मोबाईल शॉपी रा. लेन नं ०५, अल्ला हु अकबरबिल्डींग फ्लॅट नं ३०२,अशरफनगर, कोंढवा, पुणे यास विक्री केल्याचे सांगितल्याने त्याचे निवेदनावरुन सदर मोबाईल दुकानदार यांचेकडुन एकुण ७,४५,०००/- रु. किं. चे वेगवेगळया कंपन्यांचे एकुण ४३ मोबाईल फोन व सॉफ्टवेअर मारणे कामी वापरलेला एक लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच अटक आरोपी सतिश शिरोळे हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याचे चोरीचे एकुण ०६ गुन्हे दाखल आहेत. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार अश्रुबा मोराळे स्वारगेट पोलीस स्टेशन हे करीत आहे.
सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, प्रविणकुमार पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ २, स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, यांच्या आदेशान्वये तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर, पोलीस उप-निरी. रविंद्र कस्पटे, पोलीस अंमलदार अश्रुबा मोराळे, सचिन तनपुरे, सुजय पवार, दिपक खेदाड, हर्षल शिंदे, फिरोज शेख, हनुमंत दुधे, रमेश चव्हाण, प्रशांत टोणपे, संदीप घुले, यांनी केली.

काळेपडळमध्ये पाण्याच्या भरधाव टँकर खाली अवघ्या १ वर्षाच्या बाळाचा अंत

काळेपडळमध्ये पाण्याच्या टँकरची का लागते आवश्यक्यता ? टँकर चा मालक कोण ? चालकाला कोणत्या कशा पद्धतीने ठेवले कामावर साऱ्यावर का बाळगलेय मौन ?

पुणे- पुण्यात भरधाव वेगाने वाहने चालविणाऱ्यांची संख्या घटता घटत नाही. अशाच एका भरधाव वेगाने जाणाऱ्या पाण्याच्या टँकर खाली काळेपडळ येथे अवघ्या १ वर्षाच्या बाळाचा करूण अंत झाला. या प्रकरणी पोलिसांनी विजयकुमार बालाजी फड, वय ३२ वर्षे, रा.लोहगाव, पुणे नावाच्या टँकरचालकाला अटक केली आहे. मात्र हा टँकर कुणाच्या मालकीचा होता ,या चालकाला त्याने तो कोणत्या पद्धतीने कामावर ठेऊन चालवायला दिला याबाबतची माहिती पुढे आलेली नाही .बबीतादेवी गहतो वय २२ वर्षे, रा. ऊरळी देवाची, फुरसुंगी, पुणे यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदविली आहे. काल दि.२१/०१/२०२५ रोजी दु.३ वाजता रोजी पी एम प्लॅस्टीक भंगाराच्या दुकानासमोर, ऊरळी देवाबी फुरसुंगी, पुणे येथे हि दुर्घटना घडली
यातील चालकाने त्याचे ताब्यातील पाण्याचा टँकर हा वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करून, हयगयीने, अविचाराने व भरधाव वेगात चालवुन, फिर्यादी यांचा लहान मुलगा कृष्णा राहुल महातो वय ०१ वर्षे, हा घराच्या बाहेर खेळत असताना टँकर हा त्याचे अंगावरून गेल्याने त्यात तो मयत झाला.
सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे मो. नं.८८८८८८३५८२ हे या प्रकरणी तपास करत आहेत . हा टँकर कुणाच्या मालकीचा होता ,या चालकाला त्याने तो कोणत्या पद्धतीने कामावर ठेऊन चालवायला दिला याबाबतची कोणतीही माहिती पोलिसांनी दिलेली नाही.काळेपडळमध्ये थंडीच्या दिवसातही पाण्याच्या टँकरची का लागते आवश्यक्यता या प्रश्नाचे उत्तरही कोणी दिलेले नाही .

डी.पी मधील तांब्याच्या तारा चोरणारी टोळी पकडली-९०० किलो तांबे हस्तगत

पुणे-डी.पी मधील तांब्याच्या तारा चोरणारी आंतराज्यीय टोळी जेरबंद एकुण १२ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आणि सुमारे ९०० किलो तांब्याच्या तारांसह साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ लोणीकंद व वाघोली पोलीस ठाणे हददीत विदयुत रोहीज (डी.पी.) मधील तांब्याच्या तारा चोरीच्या गुन्हयांमध्ये सतत वाढ होत असल्याने वरिष्ठांकडुन सदरचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेशित करण्यात आले होते. त्याप्रमाणे लोणीकंद पोलीस स्टेशन गु.र.क्र. ६७७/२०२४, कलम १३६ भारतीय विदयुत कायदा सह कलम ३२४ (३) भा.न्या. सं. हया गुन्हयाचा पुढील तपास युनिट ६, गुन्हे शाखा येथे वर्ग करुन समांतर तपास करण्यात येत होता. सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान पोलीस अंमलदार तनपुरे, युनिट ६, गुन्हे शाखा यांना मिळालेल्या गोपनीय माहीती व तांत्रिक तपासाच्या आधारावर युनिट ६, गुन्हे शाखा पथकाने ४ आरोपी अटक केले आहेत. १) अबरार बिलाल अहमद, वय २४ वर्षे, रा. जमुनी, ता. बांसी, जिल्हा. सिध्दार्थनगर, उत्तर प्रदेश २) आफताब नियामतउल्ला खान, वय ३२ वर्षे, रा. बोरीगाव, शंकर मंदीराजवळ, उरण, नवी मुंबई ३) नफीज हमीद अब्दुल, वय २३ वर्षे, मुळ रा. जमुनी, ता.वांसी, जि. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश, सध्या रा. कोंढापुरी, ता. शिरुर, जि. पुणे यांनी लोणीकंद ता. हवेली जि. पुणे ४) मोबीन हमीद अब्दुल, मुळ रा. जि. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश, सध्या रा. कोंढापुर ता. शिरुर जि. पुणे अशी त्यांची नावे आहेत,या अटक आरोपीकडुन खालील एकुण १२ गुन्हे उघडकीस आणुन त्यामधील एकुण १०,४२, २६०/- रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.हि कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली युनिट ०६चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप निरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, नितिन मुंडे, कानिफनाथ कारखेले, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, समीर पिलाणे, ऋषिकेश व्यवहारे, बाळासाहेब तनपुरे, शेखर काटे महिला पोलीस अंमलदार प्रतिक्षा पानसरे यांनी केली.

पुणे रेल्वे स्थानकाला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव द्या

पेशवाई किती समृद्ध होती हे लक्षात येण्यासाठी शनिवारवाड्याचे पूर्वीचे वैभव दृश्य स्वरुपात दाखवा- मेधा कुलकर्णी

पराक्रमाच्या गाथा सांगत शनिवारवाड्याचा २९३ वा वर्धापनदिन साजरा

शनिवारवाड्याचा २९३ वा वर्धापनदिन : थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे आयोजन

पुणे : मराठा साम्राज्याच्या वैभवाचे प्रतिक असलेला शनिवारवाडा….पराक्रम, शौर्य आणि स्वाभिमानाची साक्ष देणारा वाड्याचा प्रत्येक दगड आणि दरवाजा….दिल्ली दरवाजाची उंची आणि भव्यता…वाड्याच्या प्रत्येक पावलावर असणारा इतिहास आणि अशा इतिहासाचा साक्षीदार बनून शनिवारवाड्याने अनुभवलेल्या पराक्रमाच्या गाथा सांगत शनिवारवाड्याचा २९३ वा वर्धापनदिन थाटात साजरा करण्यात आला. 
यावेळी पुण्याच्या रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे पुणे रेल्वे स्थानक असे नाव द्यावे आणि शनिवारवाड्याचे पुनरुज्जीवन करावे, अशी मागणी थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने कुंदनकुमार साठे यांनी केली. 
थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे शनिवार वाड्याच्या  २९३ व्या वर्धापनदिनानिमित्त शनिवार वाड्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार हेमंत रासने, संदीप खर्डेकर, इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे,  पेशव्यांचे वंशज पुष्करसिंह पेशवे आणि कुटुंबिय, प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे, श्रीकांत नगरकर, चिंतामणी क्षीरसागर उपस्थित होते.  श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे आणि श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या प्रतिमेस यावेळी पुष्प अर्पण करण्यात आले.  यावेळी जगन्नाथ लडकत यांनी शनिवार वाड्याच्या आणि पेशव्यांच्या गौरवशाली इतिहासाची माहिती उपस्थितांना दिली. 

पेशवाई किती समृद्ध होती हे लक्षात येण्यासाठी शनिवारवाड्याचे पूर्वीचे वैभव दृश्य स्वरुपात दाखवा- मेधा कुलकर्णी
मेधा कुलकर्णी म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव घेतले जाते. इतिहासाची जपणूक ऐतिहासिक वास्तूंच्या जपणूकीतूनच होते. दिवस साजरे करणे हे निमित्त आहे, परंतु त्यामुळेच भविष्यात इतिहास जिवंत राहील. शनिवारवाड्यामध्ये बुरुज आणि दरवाजा या शिवाय काहीच नाही. पर्यटकांना पाहण्यासारखी ठिकाणे पुण्यात निर्माण करावी लागतील. शनिवारवाड्याचे पूर्वीचे वैभव दृश्य स्वरुपात दाखवावे, म्हणजे पेशवाई किती समृद्ध होती हे लक्षात येईल.
चंद्रकांत पाटील म्हणाले, शनिवारवाड्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी विशेषत: सीएसआरच्या माध्यमातून प्रयत्न करायला पाहिजेत. शासकीय दृष्ट्या देखील हे शक्य असले तरी परवानग्या आणि इतर प्रक्रियेमुळे विलंब होऊ शकतो. सीएसआर निधी ने मोठी ताकद निर्माण केली आहे, असे त्यांनी सांगितले.

सराईत वाहन चोराकडून एकूण ०६ मोटार सायकल जप्त

पुणे -सराईत वाहन चोराला अटक करून पुणे पोलिसांनी त्याच्या कडून चोरीच्या एकूण ०६ मोटार सायकल जप्त केल्या.

या संदर्भात पोलिसांनी संगीतले की,’खडक पोलीस स्टेशनचे हद्दीत वाढते वाहन चोरीचे गुन्हयांना आळा घालण्याचे दृष्टीकोनातुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशीकांत चव्हाण व पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती शर्मिला सुतार यांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या, त्याप्रमाणे तपास पथकातील प्रभारी अधिकारी अनिल सुरवसे, प्रल्हाद डोंगळे व तपास पथकातील स्टाफ असे खडक पोलीस स्टेशन पुणे शहर हददीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार शेखर खराडे, पोलीस अंमलदार विश्वजीत गोरे व पोलीस अंमलदार संतोष बारगजे यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, खडक पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ५१/२०२५ बी.एन.एस. कलम ३०३ (२) मधील मोटार सायकल चोरणारा एक संशयित इसम साठे कॉलनी, शुक्रवार पेठ पुणे येथे थांबला आहे अशी खात्रीशीर बातमी प्राप्त झाली.
सदरची बातमी लागलीच वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडक पोलीस स्टेशन यांना कळविली असता, त्यांनी सदरच्या इसमास ताब्यात घेणेबाबत आदेश दिल्याने लागलीच आम्ही स्वतः व तपास पथकातील पोलीस स्टाफ असे सदर ठिकाणी जावुन प्राप्त वर्णनाप्रमाणे इसम व होंडा प्लेजर ही गाडी मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव व पत्ता दत्ता ऊर्फ सुमित लहू जाधव वय २५ वर्षे रा. ५८० प्रेमनगर वसाहत, मार्केटयार्ड, पुणे मूळ पत्ता गांव पानचिंचोली, ता. निलंगा, जि. लातूर असे असल्याचे सांगितले. त्याचे ताब्यातील होडा प्लेजर गाडीचे मालका बाबत त्याचेकडे विचारपुस केली असता तो गाडीचे मालकाबाबत विसंगत माहीती देऊ लागल्याने आम्ही त्यास विश्वासात घेवुन त्याचे ताब्यातील गाडीबाबत विचारपुस केली असता त्याने सांगितले की, सदाशिव पेठ येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गल्लीतील मोकळ्या जागेतून चोरली असल्याची कबुली दिल्याने त्यास सदर गुन्हामध्ये अटक करुन तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे यांनी अधिक तपास करता त्यांच्याकडून चोरीच्या १,२८,०००/- रु. कि.च्या ०६ मोटारसायकल जप्त केल्या असून सध्या खडक पो.स्टे. चे ०४ गुन्हे व स्वारगेट पोलीस ठाणे ०१ तसेच खोपोली पोलीस ठाणे, ०१ येथील गुन्हे उघडकीस आणून इतर गुन्हे उघड करण्याचे काम सुरू आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ १ संदिपसिंह गिल, सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग अनुजा देशमाने, यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्रीमती शर्मिला सुतार , राहूल गौड सहा.पो.निरी. अनिल सुरवसे, पो.उप-निरी. प्रल्हाद डोंगळ, पोलीस अंमलदार हर्षल दुडम, किरण ठवरे, शेखर खराडे, विश्वजीत गोरे, सद्दाम तांबोळी, अक्षयकुमार वाबळे, कृष्णा गायकवाड, मयूर काळे, संतोष बारगजे, उमेश मठपती, शोएब शेख, महिला पोलीस हवालदार नंदा विरणक, व सोनाली आडकर यांनी केली.

‘वंदन भारतमातेला’ ७०० हून अधिक गायक व वादकांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे सादरीकरण

स्व. राज कपूर यांची जन्मशताब्दी व भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतीला सांगितिक अभिवादन  

पुणे, २२ जानेवारी: माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एमआयटी आर्टस्, डिझाईन अँड टेक्नॅालॅाजी युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वंदन भारतमातेला’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम प्रजासत्ताक दिन म्हणजेच २६ जानेवारी रोजी सायं. ४.३० वा. राजबाग लोणी काळभोर येथील संत ज्ञानेश्वर-संत तुकाराम महाराज विश्वशांती घुमटाच्या प्रांगणात होईल. ७०० हून अधिक गायक व वादकांद्वारे संगीत मानवंदनेचा कार्यक्रम असेल. अशी माहिती एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डाॅ. राहुल विश्र्वनाथ कराड व  कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी डब्ल्यूपीयूचे सल्लागार डॉ. संजय उपाध्ये व दूरदर्शनचे माजी संचालक डॉ. मुकेश शर्मा उपस्थित होते.
या कार्यक्रमास चित्रकर्मी आणि व्ही शांताराम फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. किरण शांताराम, सुप्रसिद्ध गायक, संगीतकार आणि विचारवंत पं. हृदयनाथ मंगेशकर, प्रख्यात गायिका श्रीमती उषाताई मंगेशकर उपस्थित राहणार आहेत. तसेच विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड आणि एडीटीयूचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. मंगेश तु. कराड उपस्थित राहणार आहेत.
भारतीय सिनेसृष्टीच्या सुवर्णयुगाचे एक प्रमुख शिल्पकार, महान शोमन अशी ओळख असलेले स्व. श्री. राजकपूर यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून तसेच विश्वगानसम्राज्ञी भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर यांच्या स्मृतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहणारा आहे. ‘संगीत साधनेतून ईश्वरदर्शन आणि शांतरसाची अनुभूती’ देणारा हा विशेष कार्यक्रम आहे.
कार्यक्रमाची सुरूवात भारतीय संगीताचा अध्वर्यू मानल्या गेलेल्या पखवाज या प्राचीन वाद्यापासून होईल. तबला, व्हायोलिन, बासरी आदि वाद्यांच्या एकल वादनासह सिनेसृष्टीतील गाजलेली काही गीतांचे सादरीकरण करण्यात येईल. भारतमातेला वंदन करणार्‍या गीतांसह सिंथेसायझर (कीबोर्ड), गीटार अशा आधुनिक वाद्यांचा मेळ रसिकांना मंत्रमुग्ध करेल. एमआयटी संस्थेची श्रद्धा व आस्था असलेल्या वारकरी संप्रदायाच्या काही भजनांचा समावेश करून सामूहिक पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता होईल.  
आयोजित कार्यक्रमाची संकल्पना-संरचना एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांची आहे. विशेष बाब म्हणजे, भारतरत्न लता मंगेशकर ह्या माईर्स एमआयटीच्या विश्व शांती संगीत कला अकादमीच्या अध्यक्षा होत्या, त्यामुळे या कार्यक्रमास विशेष महत्त्व आहे.
भारतीय प्रजासत्ताकाची स्थापना ही भारताचे सार्वभौमत्व व लोकशाही मूल्यांवरील श्रद्धा व विश्वास दृढ करणारी घटना ७५ वर्षापूर्वी म्हणजेच २६ जानेवारी १९५० रोजी घडली. हे वर्ष साजरे करण्यासाठी व सार्वभौम प्रजासत्ताक भारतमातेला वंदन करण्यासाठी याचे आयोजन केले आहे. योगायोगाने डिसेंबर २०२४ मध्ये स्व. राजकपूर यांची १०० वी जयंती व गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचा दुसरा स्मृतिदिन ६ फेब्रुवारी रोजी असल्यामुळे त्यांना देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितिक मानवंदना दिली जाईल.
हा कार्यक्रम सर्व रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशिका डब्ल्यूपीयू व एडीटीयूच्या सुरक्षा विभागात उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविण्याचे आवाहन माईर्स एमआयटी शिक्षण समूहातर्फे केले आहे.

पृथ्वीराज मोहोळ महाबली चषकाचा मानकरी

महाराष्ट्र केसरीसाठी पुणे जिल्हा संघ जाहीर

अहिल्यानगर येथे होणाऱ्या ६७ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पुण्यातील कुस्तीगीर सज्ज

पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाच्या वतीने निवड चाचणी
पुणे : अहिल्यानगर येथे होणाऱ्या ६७ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची पुणे जिल्हा निवड चाचणी कोंढवा बुद्रुक मधील कामठे मळा येथे संपन्न झाली. या स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळ हा महाबली चषकाचा मानकरी ठरला. त्याच्यासह अभिजीत भोईर, भालचंद्र कुंभार, अमोल वालगुडे, आणि आंतरराष्ट्रीय कुमार गटात रौप्य पदक जिंकणारा प्रतीक देशमुख  यांची निवड पुणे जिल्हा संघात झाली आहे.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आणि उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, उपाध्यक्ष विलास कथुरे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मेघराज कटके,आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच दिनेश गुंड, आयोजक बाळासाहेब धांडेकर आणि  पुणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झाले. आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच मारुती सातव यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा पार पाडली.

मेघराज कटके म्हणाले,  या निवड चाचणी स्पर्धेत पुणे जिल्ह्यात असणाऱ्या ४५० हून अधिक कुस्तीगीरांमध्ये लढत झाली. विजेत्या खेळाडूंना पदक, चषक देऊन गौरविण्यात आले.

निकाल – बालगट – २५ किलो – प्रेमराज चौगुले (इंदापूर) विश्वमराज जाधव (भोर), २८ किलो – १) तुषार साळुंखे (वेल्हा), २) यशराज वायसे इंदापूर, ३२ किलो – १)राजवर्धन खाडे (इंदापूर) २) ओम पवार (मावळ), ३६ किलो – १) यशराज कोल्हटकर (दौंड), २) स्वराज बोडके (मावळ), ४० किलो – १) पृथ्वीराज डोंगरे (खेड), २) ओम घोडके (इंदापूर), ४४ किलो – १) रुद्रप्रताप साबळे (खेड), २) राज गायकवाड (इंदापूर), ४८ किलो – १) साई चांदेकर (मावळ), २) वेदांत मानकर (हवेली), ५१ किलो – १) धीरज शिंदे (मावळ), २) प्रज्वल डोंगरे (खेड), ५५ किलो – १) गणेश मिडगुले (दौंड), २) सोहम थोरात (इंदापूर), ६० किलो – १) स्वराज खांडेभराड  (खेड), २) यशराज चोरमले (इंदापूर) ,
माती विभाग वरिष्ठ गट- ५७ किलो – १) ओमकार निगडे  (भोर), २) अमित कुलाल (शिरूर), ६१ किलो – १) अमोल वालगुडे (वेल्हा), २) प्रवीण हरणावळ (इंदापूर), ६५ किलो – १) अभिजीत शेडगे (वेल्हा), २) कृष्णा हरणावळ (इंदापूर), ७० किलो – १) हर्षल फडतरे (इंदापूर), २) अभिषेक जाधव (मुळशी), ७४ किलो – १) हर्षद घोलप (खेड), २) सागर वाघमोडे (इंदापूर), ७९ किलो – १) विनायक शेंडगे (दौंड), २) संतोष पडळकर (बारामती), ८६ किलो – १) अविनाश गावडे (बारामती), २) शुभम शेटे (भोर), ९२ किलो – १) अंगद बुलबुले (बारामती), २) ऋषिकेश काळेल (इंदापूर), ९७ किलो – १) सागर देवकाते (इंदापूर), २) यश वासवंड (हवेली), १२५ किलो – १) अनिकेत मांगडे (हवेली), २) आकाश रानवडे (मुळशी)
गादी विभाग वरिष्ठ गट – ५७ किलो – १) मिलिंद हरणावळ (इंदापूर), २) सतीश मालपोटे (मावळ), ६१ किलो – १) अभिषेक लिम्हण (वेल्हा), २) यश बुदगुडे (भोर), ६५ किलो – १) भालचंद्र कुंभार (हवेली), २) प्रथमेश कोळपे (बारामती), ७० किलो – १) विपुल थोरात (इंदापूर), २) निखिल वाडकर (खेड), ७४ किलो – १) साईराज नलावडे (जुन्नर), २) चैतन्य साबळे (खेड), ७९ किलो – १) रितेश मुळीक (पुरंदर), २) केतन घारे (मावळ), ८६ किलो – १) वैभव तांगडे (मुळशी), २) कुलदीप इंगळे (शिरूर), ९२ किलो – १) अभिजीत भोईर (मुळशी), २) आदित्य पवार (शिरूर), ९७ किलो – १) ओंकार येलभर (शिरूर), २) विजयसिंह चोरमले (इंदापूर), महाराष्ट्र केसरी – १) पृथ्वीराज मोहोळ (मुळशी), २) प्रतिक देशमुख (मावळ)

अक्षय शिंदे फेक एन्काऊंटर प्रकरणी जबाबदार पोलिसांसह आदेश देणाऱ्या वरिष्ठांवरही कारवाई करा.

बीडमधील माफियाराजची सर्व माहिती गृहविभागाकडे पण सत्ता वाचवण्यासाठी सरकारची धडपड.

पालकमंत्रीपदाचा वाद जास्त मलई खाण्यासाठी, जनतेच्या हितासाठी नाही.

मुंबई, दि.२१ जानेवारी २०२५
निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य असतानाही सध्या निवडणूक आयोग ज्या पद्धतीने निवडणुका घेत आहे त्यामुळे आयोगाच्या विश्वासार्हततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजपा व निवडणूक आयोगाने विधानसभेच्या निवडणुकीत मतांवर दरोडा टाकून लोकशाहीचा गळा घोटला आहे. निवडणूक आयोगाच्या या कृत्यांविरोधात व लोकशाहीचे रक्षण तसेच मतदारांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्ष २५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनी राज्यभर जिल्हा व तालुका स्तरावर आंदोलन करुन जनजागृती करणार आहे. या आंदोलनात राज्यातील महत्वाचे नेतेही सहभागी होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

टिळक भवनमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत घोटाळा झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत ५० लाख मतदार कसे वाढले? मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ नंतर रात्रीच्या अंधारात ७६ लाख मतदान कसे वाढले? याचे पुरावे द्यावेत अशी मागणी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली होती पण अजून ही आकडेवारी दिलेली नाही. निवडणूक आयोगाला अशी माहिती देता येणार नाही असा कायदाच आता केंद्रातील भाजपा सरकारने केला आहे. हा कायदा म्हणजे निवडणूक आयोग व भाजपाने मतदारांच्या मतदानावर टाकलेला दरोडा लपवण्याचा प्रकार आहे.

बदलापूर फेक एन्काऊंटरचे आदेश कोणी दिले?
बदलापूरच्या एका शाळेतील लहान मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी अक्षय शिंदेचे फेक एन्काऊंटर केले, हे आम्ही त्याचवेळी सांगितले होते. आज त्यावर शिक्कामोर्तब झाले असून मा. उच्च न्यायालयाने संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करून कारवाईचे आदेश दिले आहेत. या पोलीसांवर कारवाई झालीच पाहिजे पण या एन्काऊंटरचे आदेश मंत्रालय व पोलीस महासंचालक कार्यालयातून कोणी दिले त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे.
बदलापूर प्रमाणेच परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. पोलीसांनी कोंबिग ऑपरेशनवेळी सोमनाथ सुर्यवंशीला अटक करुन कोठडीत मारहाण केल्याने मृत्यू झाला. पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत खोटी माहिती दिली. दम्याच्या आजाराने सुर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले, त्याविरोधात हक्कभंग आणणार आहोत. पण परभणीत कोंबिंग ऑपरेशनचे आदेश कोणी दिले, त्याची चौकशी झाली पाहिजे व सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्येस जबाबदार सर्वांवर कारवाई करावी.

बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली. बीड जिल्ह्यात खून, खंडणी, अपहरण, भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे, बीडमधील माफियाराज सत्तेतील एका मंत्र्याच्या आशिर्वादानेच सुरु आहे. सत्ताधारी पक्षाचा एक आमदारच बीडमधील माफियाराजची माहिती जाहिरपणे देत आहे पण सरकार चौकशीचा फार्स असून सत्तेची खूर्ची वाचवण्यासाठी सरकारचा हा प्रयत्न सुरु आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

पालकमंत्रीपदाचा वाद मलईसाठी..
राज्यात सत्तेवर आलेल्या सरकारमध्ये सुरुवातीपासूनच वाद आहेत. सरकार स्थापन करताना मुख्यमंत्रीपदावरून वाद होता. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटपावरुन वादावादी आणि आता पालकमंत्रीपदासाठी वाद सुरु आहेत. मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर गेले पण त्यांना तेथून नाशिक व रायगड जिल्ह्याच्या पालकंमत्रीपदाला स्थगिती द्यावी लागली. पालकमंत्र्याबरोबर सहपालकमंत्री पद हे दोघे मिळून खाऊ यासाठी तयार केले आहे.

पीक विमा घोटाळा शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार..

बीड जिल्ह्यातील पीक विमा घोटाळा उघड झाला असून पडीक जमिनीचा विमा काढून ३५० कोटी रुपयांची लूट केली आहे. या घोटाळ्यात पीकविमा कंपन्या व सरकारचा सहभाग आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही पण विमा कंपन्यांना भरपूर फायदा झाला आहे. तिजोरीतील पैशावर शेतकऱ्यांच्या नावाने दरोडा टाकला असून पीक विमा घोटाळा म्हणजे शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार असल्याचे नाना पटोले म्हणाले.