Home Blog Page 489

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विश्व मराठी संमेलनाचे उद्घाटन होणार

  • ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांना साहित्य भूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार; उदय सामंत यांची घोषणा.
  • ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत पुण्यात होणार संमेल

पुणे-पुण्यात होणाऱ्या विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर ते फर्ग्युसन महाविद्यालय, अशी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना ‘साहित्य भुषण पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे. तर, रितेश देशमुख यांना कलारत्न पुरस्काराने सांगता समारंभात सन्मानित केले जाणार आहेत, अशी माहिती मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, संमेलन नगरीला पु. ल. देशपांडे यांचे, तर व्यासपीठाला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात येणार आहे, असेही सामंत यांनी सांगितले.

⁠राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने ‘विश्व मराठी संमेलन २०२५’ यंदा फर्ग्युसन महाविद्यालयात होत आहे. या संमेलनाच्या पूर्वतयारीची माहिती देण्यासाठी सामंत यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे आणि चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे उपस्थित होते.

सामंत म्हणाले, ‘३१ जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात हे संमेलन होणार असून, केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर होणारे हे पहिले संमेलन आहे. दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मराठी भाषा विभागाने दोन कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यांच्या काही अडचणी असल्यास, त्यांनी त्या आमच्याकडे मांडाव्यात, त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू.

मराठी विश्वात पोहोचवण्यासाठीच ‘तो’ निर्णय…

विश्व मराठी संमेलनासाठी परदेशातूनही मराठी बांधव किंवा साहित्य प्रेमींनी मोठ्या संख्येने यावे, मराठीचा डंका जगाच्या पाठीवर वाजावा, असा आमचा हेतू आहे. त्यामुळेच संमेलनाला अमेरिकेतून येणाऱ्या व्यक्तीला ७५ हजार रुपये दिले जाणार आहे. तर, युरोपमधून येणाऱ्यांना ५० हजार आणि दुबईमधून येणाऱ्यांना २५ हजार रुपये दिले जाणार आहे. या खर्चावर टीका करण्यापेक्षा टिकाकारांनी त्या मागील उद्देश समजुन घ्यावा. मराठी विश्वात पोहोचवण्यासाठी हा प्रयत्न आहे, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

‘पुस्तक आदान-प्रदान उपक्रम’

आपल्या जवळील पुस्तक देऊन, दुसरे पुस्तर घेऊन जाण्याचा ‘पुस्तक आदान-प्रदान उपक्रम’ या संमेलनात राबवला जाणार आहे. अशा प्रकारचा उपक्रम प्रथमच होत आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

२५ हजार विद्यार्थ्यांना पुस्तके देणार

संमेलनात विविध शाळा, महाविद्यालयातील २५ हजार विद्यार्थी सहभागी होणार असून, त्यांना प्रत्येकी एक पुस्तक भेट दिले जाणार आहे. पुणे पुस्तक महोत्सवाकडून ही पुस्तके दिली जाणार आहेत. दरम्यान, पुणे पुस्तक महोत्सव हा पुण्यापुरता मर्यादित राहिला नाही. तो जगाच्या पाठीवर पोहोचला. त्याच ठिकाणी आता संमेलन होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुणे जगाच्या पाठीवर जाईल, असे उदय सामंत म्हणाले. दरम्यान, या संमेलनात पुणे पुस्तक महोत्सव संयोजन समिती देखील सहभागी आहे.

निवडणुकांच्यावेळी उत्कृष्ट कार्य केल्यामुळे देशात राज्याचा गौरव-अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी

पुणे, दि. २५ : लोकसभा व विधानसभा निवडणूक २०२४ च्या वेळी सर्वांनी उत्कृष्ट कार्य केल्यामुळे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात देशात राज्याचा गौरव होत आहे, ही आपल्याकरीता आनंदाची व अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी केले.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, एम.आय.टी. विद्यापीठ आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, छत्रपती संभाजीनगर विभागाचे दिलीप गावडे, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मीनल कळसकर, एम.आय.टी. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदारांना शुभेच्छा देवून डॉ. कुलकर्णी म्हणाले, यावर्षीपासून राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राज्यातील विविध भागात राज्यपातळीवरील कार्यक्रम आयेाजित करण्याचा निर्णय मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने घेतला आहे; त्याची सुरुवात पुणे येथून करण्यात आली आहे. समाजातील मतभेद चर्चेतून सोडविण्याकरीता, लोकशाहीप्रती आपली निष्ठा व्यक्त करण्याकरीता मतदार दिवस साजरा करण्यात येतो. मतदान हे पवित्र कार्य असून मतदारांनी त्याचा व्यापक अर्थ समजून घेतला पाहिजे.

राज्यात एक लाखाहून अधिक मतदान केंद्र आहेत, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत सर्व संबंधित शासकीय यंत्रणेचे सुमारे १६ लाख कर्मचारी काम करीत असतात. निवडणुकीच्या वेळी काम करणाऱ्या प्रत्येकांचा सहभाग महत्वपूर्ण आहे, प्रत्येक व्यक्ती सत्कारास पात्र आहे, प्रत्येकांपर्यंत निवडणूक आयोगाची भावना पोहचली पाहिजे, यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा प्रातिनिधीक स्वरुपात सन्मान करण्यात येतो, असेही डॉ. कुलकर्णी म्हणाले.


मतदारांमधील उदानसिनता कमी करण्याकरीता प्रयत्न करणे गरजेचे- डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

डॉ. पुलकुंडवार म्हणाले, लोकशाही सशक्त करण्यामध्ये निवडणुकीची भूमिका महत्वपूर्ण आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, अचूक पद्धतीने पार पाडण्याकरीता गाव पातळीपासून ते भारत निवडणूक आयोगापर्यंत सर्वच अहोरात्र काम करीत असतात. यामध्ये मतदार यादी आणि मतदार हा निवडणुकीचा आत्मा आहे. त्यामुळे शहरी भागात तसेच नवमतदारांमधील उदासिनता कमी करण्याकरीता शासकीय यंत्रणेसोबत विविध सामाजिक संस्था, शाळा, महाविद्याविद्यालयांनी पुढे येवून प्रयत्न करणे गरजेचे आहे. शैक्षणिक संस्थांनी शिक्षणासोबतच मतदानाचे महत्व पटवून देण्याकरीता चर्चासत्रे, कार्यशाळांसारखे कार्यक्रमाचे आयोजन करण्याची आवश्यकता आहे, याकरीता स्व:तामध्ये बदल केला पाहिजे, नवीन पिढीला त्याबाबत जाणीव झाली पाहिजे, असे आवाहन डॉ. पुलकुंडवार यांनी केले.

निवडणूक यंत्रणेचे कार्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करावे- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

प्रास्ताविकात श्री. डुडी म्हणाले, मतदार जनजागृती करुन मतदार नोंदणीचे कार्य, निवडणूक यंत्रणेचे कार्य गावोगावी पोहोचविणे हा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे. भारतीय लोकशाहीत निवडणुक प्रक्रिया आणि मतदानाचे महत्त्व लक्षात घेता मतदार जनजागृती व पात्र मतदारांची मतदारयादीत नाव नोंदणी मोहिम वर्षभर राबविण्यात यावी. निवडणूक यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी नागरिकांपर्यत पोहोचून ही कामे करीत असतात. गतवर्षी पार पडलेल्या निवडणुकीच्यावेळी सर्वांचा सहभाग घेवून पात्र मतदार नोंदणीचे काम चांगल्याप्रकारे झाले.

निवडणूक यंत्रणेने विविध सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये आदींमार्फत निवडणूक यंत्रणेचे कार्य कुटुंबापर्यंत पोहोचिवण्याचे कार्य करावे. 18 वर्ष पूर्ण झालेल्या नवमतदारांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवून घ्यावे. आपले एक मत बहूमुल्य असून मतदान करतांना कोणत्याही प्रकारच्या प्रभोलनाना बळी पडू नका, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपद्धतीने होत असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, असे श्री. डुडी म्हणाले.

डॉ. चिटणीस म्हणाले, निवडणुकीच्या काळात प्रशासनासोबत ‘मतदार राजा जागा हो’ कार्यक्रमाचे आयोजन करुन विद्यार्थ्यांमध्ये मतदानाविषयी मोठ्याप्रमाणात जनजागृती करण्यात आली. निवडणूक यंत्रणेकडून करण्यात येणाऱ्या कार्यात एम.आय.टी. विद्यापीठाला सहभागी करुन घ्यावे, असेही डॉ. चिटणीस म्हणाले.


यावेळी लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, टपाली मतपत्रिकांची देवाण-घेवाण करण्याचे नियोजन, मतदान साहित्य वाटप करून घेण्याचे नियोजन, मतदार सुविधा, वार्तांकन पुरस्कार आणि शासकीय भागीदारी यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४: उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कार २०२५ : नंदूरबारच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनिषा खत्री, लातूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, अकोला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार, गडचिरोली जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने, हातकणंगलेचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे आणि मुंबई उत्तर पूर्वचे अतिरिक्त जिल्हाधिकारी उपेंद्र तामोरे

विधानसभा निवडणुकीच्यावेळी टपाली मतपत्रिकांची देवाण- घेवाण उत्कृष्ट नियोजन : छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४: उत्कृष्ट मतदार सुविधा पुरस्कार २०२५: अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था ) संजय सक्सेना, बृहन्मुंबई शहरचे सह आयुक्त ( कायदा व सुव्यवस्था) श्री. सत्यनारायण.

लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४: उत्कृष्ट निवडणूक वार्तांकन पुरस्कार २०२५: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे तत्कालिन संचालक राहल तिडके, प्रभारी संचालक तथा उपसंचालक (वृत्त) दयानंद कांबळे.

यावेळी मतदार जागृती दालन, सेल्फी पॉईंट, मतदार जागृती खेळ आणि पथनाट्याचाही आयोजन करण्यात आले. १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांना मतदार ओळखपत्राचे वाटप कार्यक्रमाबरोबरच मतदारांना शपथ देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या संदेशाची चित्रफित दाखविण्यात आली.

यावेळी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणी सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर, ऑलिम्पिक महिला नेमबाज तथा निवडणूक सदिच्छादूत राही सरनोबत, भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव, एव्हरेस्टवीर उमेश झिरपे, अंतराळ उद्योजक श्वेता कुलकर्णी, तृतीयपंथी कार्यकर्ता तथा निवडणूक सदिच्छादूत श्री. गौरी सावंत, तृतीयपंथी छायाचित्र पत्रकार झोया लोबो, अमुक-तमूक यूट्यब चॅनेलचे ओंकार जाधव व सावनी वझे आणि खास रे टी.व्हीचे संजय कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणी सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर, ऑलिम्पिक महिला नेमबाज तथा निवडणूक सदिच्छादूत राही सरनोबत, भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव, एव्हरेस्टवीर उमेश झिरपे, अंतराळ उद्योजक श्वेता कुलकर्णी, तृतीयपंथी कार्यकर्ता तथा निवडणूक सदिच्छादूत श्री. गौरी सावंत, तृतीयपंथी छायाचित्र पत्रकार झोया लोबो, अमुक-तमूक यूट्यब चॅनेलचे ओंकार जाधव व सावनी वझे आणि खास रे टी.व्हीचे संजय कांबळे उपस्थित होते.

संविधान सन्मान दौड 2025 ला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

40 देशातील विद्यार्थ्यांसह 8 हजार पुणेकर संविधानाच्या सन्मानसाठी धावले
संविधानाने आम्हाला अंधारातून प्रकाशत आणले – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

पुणे : भारतीय संविधान दिन अमृत महोत्सवी वर्षा निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था ( BARTI), संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे जिल्हा हौशी अॅथलेटीक्स असोसिएशन, संविधान फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित  ‘संविधान सन्मान दौड 2025 ’  या मिनी मॅरेथॉन मध्ये आठ हजार पुणेकरांसह 40  देशातील विद्यार्थ्यांनी सहभागी होत या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतियसाद दिला. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या खाशाबा जाधव क्रीडा संकुल येथे स्पर्धेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) चे महासंचालक सुनील वारे , मुख्य आयोजक परशुराम वाडेकर, डॉ. विजय खरे, शैलेश भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी Preamble to the Constitution of India (भारतीय संविधानाची उद्देशिका) वाचन करण्यात आले.  तर स्पर्धेतील विजेत्यांना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, रोख पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, रिपाइंचे शहराध्यक्ष संजय सोनवणे,  प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर, रजिस्टार ज्योती भाकरे, बार्टी च्या निबंधक इंदिरा अस्वार, पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, मॅरथॉन संघटनेचे  अॅड. अभय छाजेड,  राहुल डंबाळे,  दीपक म्हस्के, श्याम गायकवाड, संतोष मदने आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, संविधान ही आमची शान आहे, आज पहाटे सहा वाजता अंधारात दौड ची सुरुवात झाली, विजेते दिवस उगवल्यावर मिळाले तसेच देशाच्या संविधानाने आम्हाला अंधारातून प्रकाशात आणण्याचे काम केले आहे. संविधानाच्या सन्मानसाठी विद्यार्थी, महिला, परदेशी विद्यार्थी सुद्धा धावले ही बाब कौतुकास्पद आहे. 

संविधान सन्मान दौड 2025 ही स्पर्धा  स्पर्धा 16 वर्षांखालील, 18 वर्षांखालील आणि खुल्या वयोगटात अशा तीन विभागात घेतली गेली,. ती प्रामुख्याने 3 किलो मीटर, 5 किलो मीटर आणि 10 किलो मीटर अंतराची होती,  याप्रमाणेच दिव्यांगांसाठीही दिव्यांग व्हीलचेयर रेस (अॅटोमॅटीक) आणि दिव्यांग व्हीलचेयर रेस (मॅन्यूअल) अशा दोन प्रकारात ही स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकह्या आयोजक परशुराम वाडेकर यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे सचिव दीपक म्हस्के यांनी केले. 

संविधान दौड 2025 मधील विजेत खालील प्रमाणे

दहा किलोमीटर (पुरुष )
प्रथम क्रमांक- अंकुश हक्के
द्वितीय क्रमांक -तुषार बिन्नर
तृतीय क्रमांक- निलेश आरसीकर

दहा किलोमीटर (महिला)

प्रथम क्रमांक -साक्षी जाड्याळ
द्वितीय क्रमांक -यामिनी ठाकरे
तृतीय क्रमांक – शीतल तांबे

पाच किलोमीटर (पुरुष)
प्रथम क्रमांक -हर्षद कदम
द्वितीय क्रमांक -अनुपमसिंग सिन्हा
तृतीय क्रमांक -गणेश डोंगरे

पाच किलोमीटर (महिला)

प्रथम क्रमांक -राणी मुचंडी
द्वितीय क्रमांक -साक्षी बोराडे
तृतीय क्रमांक -प्रियंका ओकसा

तीन किलोमीटर (पुरुष)
प्रथम क्रमांक -अजय सिंग
द्वितीय क्रमांक -अभिषेक गुळविले
तृतीय क्रमांक -आदिनाथ साळुंखे

तीन किलोमीटर (महिला)
प्रथम क्रमांक -अनुष्का अमरदीप शिंदे
द्वितीय क्रमांक -आदिती धनंजय हरगुडे
तृतीय क्रमांक -आदिती सोमनाथ तांबे

दिव्यांग व्हीलचेअर 
प्रथम क्रमांक -मोहम्मद फैयाज आलम
द्वितीय क्रमांक -अनिल कुमार कच्ची
तृतीय क्रमांक -सुरेश कुमार करकी
चतुर्थ क्रमांक – वाय. निजलिंगे

महाविद्यालयीन जीवनात खेळाडू घडतात-क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे

‘एमआयटी एडीटी’त ‘विश्वनाथ स्पोर्ट मिट’ला प्रारंभ

पुणेः आपला भारत देश युवकांचा देश आहे. या युवा शक्तीच्या ताकदीवरच उद्याच्या विकसित भारताचे स्पप्न आपण पाहत आहोत. या स्वप्नपूर्तीच्या वाटचालीत क्रीडा क्षेत्राचे व खेळाडूंचे अनन्यसाधारण महत्व आहे. कुठलाही खेळाडू हा मानसिक, शारीरिक रित्या फिट आणि सांघिक भावना, खिलाडूवृत्तीने भारलेला असतो. त्यामुळे, समोर येणाऱ्या कुठल्याही संकटाला तोंड देण्यास तो सक्षम असतो. खेळाडूंच्या जीवनात हे सर्व गुण बिंबवण्याचे काम महाविद्यालयीन जीवनात प्रामुख्याने होते. त्यामुळे, या काळात विश्वनाथ स्पोर्ट मिट सारख्या स्पर्धांचे व्यासपीठ मिळाल्याने खेळाडू घडतात, असे मत महाराष्ट्राचे क्रीडा व युवा कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी यांनी व्यक्त केले.ते एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टॅक्‍नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे तर्फे आयोजीत विश्वनाथ स्पोर्ट मिट (व्हीएसएम-२०२५) या राज्यस्थरीय आंतरमहाविद्यालयीन/ आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. 
याप्रसंगी माईर्स एमआयटी शिक्षण समुहाचे संस्थापक विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड, राजीव गांधी खेलरत्न व अर्जुन पुरस्कार प्राप्त नेमबाज अंजली भागवत व अर्जुन पुरस्कार विजेता पॅरा अँथलिट सचिन खिलारे (रौप्य पदक विजेता, पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धा २०२४), एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डाॅ. मंगेश तु. कराड, कुलगुरू प्रा.डाॅ. राजेश एस., कार्यकारी संचालक डाॅ.सुनिता कराड, प्र.कुलगुरु डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, क्रीडा विभागाचे संचालक व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा.पद्माकर फड, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डाॅ.सुराज भोयर उपस्थित होते.  भरणे पुढे बोलताना म्हणाले, सध्या भारतात क्रीडा क्षेत्राचा गोल्डन काळ चालू आहे. पूर्वी पालक आपल्या पाल्याला अभ्यासाकडे लक्ष दे असे दाटवून सांगायचे, मात्र आता त्याला क्रीडा क्षेत्राकडे वळण्यास सांगितले जाते. अशात एमआयटी एडीटी विद्यापीठाकडून एवढ्या मोठ्या स्तरावर क्रीडा स्पर्धेचे आयोजन होणे नक्कीच त्यांच्यासाठी प्रेरणादायी आहे. विद्यापीठातील क्रीडा सुविधाही जागतिक दर्जाच्या असल्याचे कौतुकही त्यांनी यावेळी केले.
प्रा.डाॅ.मंगेश कराड यावेळी म्हणाले, भारतातील क्रीडा संस्कृतीत वेगाने प्रगती होत आहे. त्यामुळे ऑलिंपिक-राष्ट्रकुल- आशियाई सारख्या जागतिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. या स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व वाढावे व एकंदर ग्रामीण तसेच शहरी भागातील खेळाडूंना प्रतिभा दाखविण्यासाठी एक चांगले व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न विश्वनाथ स्पोर्ट मिटच्या माध्यमातून आहे. त्याच उद्देशाने विद्यापीठात जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.विश्वशांती प्रार्थना व स्पर्धेचा ध्वज फडकवल्यानंतर मॅनेट कॅडेट तर्फे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देवून सुरुवात करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आला. तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांनी फुटबाॅल स्पर्धेचीही सुरुवात केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा नियोजन समितीचे चेअरमन व कुलगुरू प्रा. डॉ.राजेश एस. यांनी तर आभार प्रा.पद्माकर फड यांनी मानले.
खेळात सातत्य आवश्यक- खिलारे

सचिन खिलारे यावेळी म्हणाले, अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर मी ही स्पर्धापरिक्षेचा नाद सोडून पूर्णवेळ खेळायचे ठरविले. त्या निर्णयामुळेच मी पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत  ६०.३२ मीटर गोळा फेकीसह तब्बल ४० वर्षांनंतर या खेळात पदक मिळवणारा खेळाडू ठरलो. पदकानंतर पंतप्रधानांशीही फोनवरून संभाषण करण्याचे भाग्य मला केवळ या क्रीडाक्षेत्रामुळे लाभले. महाविद्यालयीन जीवनात विविध स्पर्धांत आपले नैपुण्य दाखविल्यानंतर खेळाडू कुठेतरी मागे पडतात. त्यामुळे हार न मानता विद्यार्थ्यांनी खेळात सातत्य दाखवायला हवे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
खेळात आत्मपरिक्षण महत्वाचे – भागवत

क्रीडा क्षेत्रात कोणाच्या सांगण्यावरून करिअर करण्याचा निर्णय घेवू नका. स्वतःला वाचायला, आत्मपरिक्षण करायला आणि सर्वांत महत्वाचे खेळ एन्जॉय करायला शिकावे. आवड म्हणून रोज कुठला तरी एक खेळ नक्कीच खेळावा मात्र, करिअर म्हणून त्याची निवड करताना वरील गोष्टींचा विचार नक्कीच करावा. पदक जिंकल्यानंतर देशाचे राष्ट्रगीत चालू असताना पोडियमवर उभे राहणे यासारखी अभूतपूर्व गोष्ट दुसरी कुठलीही नाही. खेळामुळेच, इंग्रजांच्या देशात तब्बल १६ वेळा राष्ट्रगीत वाजवून त्यांना उभे राहायला लावण्याचा आनंद मला मिळाल्याचेही, त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच त्यांनी एमआयटी एडीटी विद्यापीठातील जागतिक दर्जाच्या क्रीडा संकुलाचे भरभरून कौतुक केले.    
खेळ, आत्मशांतीचे माध्यम- डाॅ.कराड

खेळ ही अशी शक्ती आहे की ज्यातून केवळ शाररिक स्वास्थच नव्हे तर मानसिक आत्मशांती देखील साधता येते. खेळामुळे खेळाडूवृत्ती व आयुष्यात पराभव कसा पचवावा याचे बाळकडू खेळाडूंना मिळते. खेळ हे एकमेव माध्यम आहे की, ज्यामुळे जगात विश्वशांती प्रस्तापित करता येवू शकते, असे मत अध्यक्षस्थानावरून बोलताना विश्वधर्मी प्रा.डाॅ.विश्वनाथ दा. कराड यांनी मांडले. त्यांचे अवघे १५ मिनिटांचे भाषण ऐकताना उपस्थित मान्यवर व विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले होते.

लोकशाही पायाभूत असणाऱ्या या देशात निवडणूक आयोगावर लोकांचा विश्वास उरणार नाही – कायदे तज्ञ डॉ. असीम  सरोदे

जागतिक मतदार दिनाचे औचित्य : काँग्रेस आक्रमक

पुणे- जागतिक मतदार दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राज्यभरात जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करत आक्रमक झाली असून, याच अनुषंगाने पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यघटनेने निवडणूक आयोगाला दिलेले स्वायत्तता अबाधित राखून निवडणूकितील पक्षपात थांबवावा असे निवेदन अप्पर तहसीलदार पुणे यांना सादर करण्यात आले. सदर प्रसंगी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्रातील नामवंत कायदेतज्ञ डॉ. असीम सरोदे यांनी म्हटले आहे की, ‘‘राज्यभरात नुकत्याच विधानसभा निवडणूका पार पडल्या आणि निवडणुकीचे निकाल अनाकलनीय, आश्चर्यकारक, अविश्वसनीय व काही तरी गडबड असल्याचे दिसून आले. तसेच राज्यभारत भाजपा व महायुती बद्दल प्रचंड नाराजी होती. अश्या काळात अचानक एवढा मोठा जनाधार भाजपा व महायुतीला मिळावा मोठा अविश्वास निर्माण करणारा निकाल राज्याने पाहिला असून, निवडणूक आयोगाला भारतीय राज्यघटनेने दिलेले स्वायत्तता अबाधित ठेवून निवडणुकीतील पक्षपात थांबवावा अन्यथा लोकशाही पायाभूत असणाऱ्या या देशात निवडणूक आयोगावर असणारा लोकांचा विश्वास हा राहणार नाही.’’

 यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात व पत्रकार परिषदेस, माजी आमदार रवींद्र धंगेकर,  ॲड. अभय छाजेड, माजी आमदार दीप्ती चवधरी, गोपाल तिवारी, माजी नगरसेवक अविनाश बागवे,रफिक शेख, , श्रीमती लता राजगुरू, सुजाता शेट्टी,युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, राज अंबिके,प्राची दुधाने, सुंदर ओव्‍हाळ, सीमा सावंत, शारदा वीर, ज्योती परदेशी, द. स. पोळेकर, ब्लॉक अध्यक्ष राजू ठोंबरे, विशाल जाधव, संतोष पाटोळे, हेमंत राजभोज, संतोष आरडे, वाल्मिक जगताप, भरत सुराणा, सेवादलाचे प्रकाश पवार, मतीन शेख यांच्यासह सर्व आजी-माजी नगरसेवक ब्लॉकचे अध्यक्ष प्रदेश पदाधिकारी, शहर पदाधिकारी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या.यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सुजित आप्पा यादव यांच्या हस्ते डॉ. असीम सरोदे यांचा संविधानाची फोटो फ्रेम व शाल देऊन सत्कार करण्यात आला. 

ह्युमॅनिटी फौंडेशन व अस शम्स फौंडेशन यांच्या वतीने रुग्णवाहीकेचे उद्घाटन

पुणे (दि.२४) ह्युमॅनिटी फौंडेशन व अस शम्स फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णवाहीकेचे (अँब्युलंस) उद्घाटन करण्यात आले. हॉटेल नाझ समोर झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी माजी पोलीस उपयुक्त सतीश गोवेकर, कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीसनिरीक्षक विनय पाटणकर, कुमेल रजा, मुर्तुजा शेख, यासीन शेख, अबू बकर, माजी नगरसेवक रईस सुंडके, हाजी फिरोज, माजी नगरसेवक साईनाथ बाबर, हुजूर इनामदार, संजय कांबळे, नइम शेख आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रांतील मान्यवर,कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना ह्युमॅनिटी फौंडेशनचे कुमेल रजा यांनी गरजू नागरिकांना त्वरित वैद्यकीय सेवा मिळावी या हेतूने याचे आयोजन केल्याचे सांगितले.

 काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने‘‘तिळगुळ व हळदी-कुंकू समारंभ संपन्न.

पुणे –

मकर संक्रांती निमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी महिला आघाडी आयोजित ‘‘तिळगुळ व हळदी-कुंकू समारंभ’’ काँग्रेस  भवन येथे महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये साजरा करण्यात आला.माजी आमदार दिप्ती चवधरी यावेळी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून शकुंतला खटावकर (पहिल्या अर्जुन पुरस्कार विजेत्या, कबड्डी), कादंबरी शेख (ट्रान्स वुमन, सामाजिक कार्यकर्त्या), अमृता गुजर (वास्तुशास्त्र तज्ञ), डॉ. स्वाती बढियेनिला नरेंद्र व्यवहारेसविता एस. या उपस्थित होत्या. या प्रमुख पाहुण्यांचा सन्मान कार्यक्रमाच्या आयोजकांनी केला.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांचा सपत्नीक सत्कार ही यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका व सामाजिक कार्यकर्त्या मेघना झुझम यांनी केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातून प्रबोधनात्मक कृतिशील विचारातून परिवर्तनशील हळदी-कुंकू समारंभ कसा असावा या विषयी त्यांनी उपस्थित महिलांना माहिती दिली.

  मा. अरविंद शिंदे यांनी सर्व उपस्थित माता भगिनींचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राची दुधाने यांनी केले तर आभार प्रदर्शन सीमा सावंत यांनी केले. यानंतर उपस्थित महिलांना हळद-कुंकू लावून वाण देण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन प्राची दुधाने, सीमा सावंत, अनिता धिमधिमे, सुंदर ओव्हाळ, प्रियांका मधाळे, माया डुरे, कांचन बालनायक, ज्योती चंदेवाल, व सहकाऱ्यांनी केले होते.

   कार्यक्रमप्रसंगी माजी नगरसेवक रफिक शेख, डॉ. स्नेहल पाडळे, बाळासाहेब दाभेकर, मेहबुब नदाफ, बाळासाहेब अमराळे, द. स. पोळेकर, राज अंबिके, विल्सन चंदेवाल, ॲड. रमेश पवळे, सुरेश नांगरे, शाम काळे, ब्लॉक अध्यक्ष हेमंत राजभोज, अक्षय माने, संतोष पाटोळे, विशाल जाधव, किशोर मारणे, रेखा घेलोत, कविता भागवत, नुर शेख आदीसंह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा विभागातील सहाजणांना राष्ट्रपती सेवा पदक जाहीर

पुणे- दिनांक 26 जानेवारी 2025 रोजीच्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा विभागातील सहा अधिकारी व कर्मचारी यांना गुणवत्तापुर्ण सेवेकरीता केंद्रीय गृह विभागाकडून राष्ट्रपतींचे सेवापदक जाहिर करण्यात आले आहे.

1.   श्री.विवेक वसंत झेंडे, अतिरिक्त अधीक्षक, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह

2.   श्री.सुनील तांबे, पोलीस उपअधीक्षक, कारागृह मुख्यालय, पुणे

3.   श्री.अहमद शमसुद्दीन मनेर, हवालदार, सांगली जिल्हा कारागृह

4.   श्री.गणेश महादेव गायकवाड, हवालदार, येरवडा मध्यवर्ती कारागृह

5.   श्री.प्रल्हाद दत्तात्रय कुदळे, हवालदार, दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, येरवडा, पुणे

6.   श्री.तुळशीराम काशीराम गोरवे, हवालदार, सांगली जिल्हा कारागृह

‘त्या ‘ सूत्रांचा तर पुरेपूर बंदोबस्त करतो,GBS वरील उपचाराचा खर्च आता डॉक्टरांना विचारतो – अजितदादा

पुणे- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सूत्रांचा दाखला देत बातमी देणाऱ्या माध्यमांवर चांगलेच भडकले. या सूत्रांना जीवनगौरव दिला पाहिजे. मी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर कोणतेही विधान केले नाही. त्यानंतरही तशी बातमी चालवण्यात आली. हा माझी बदनामी करण्याचा प्रयत्न आहे, असे ते म्हणालेत.गुइलेन बॅरे सिंड्रोमवरील उपचार महाग असल्याची तक्रार येते आहे. याबाबत आता उपचाराचा खर्च किती आहे? हे आता डोक्त्रांनाच विचारतो असेही ते म्हणाले राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा उल्लेख मी केव्हाच केला नाही, असे विधान अजित पवारांनी केल्याचा दावा नुकताच काही माध्यमांनी केला होता. त्यामुळे महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आपल्या आश्वासनापासून माघार घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी उपरोक्त विधान केले आहे. अजित पवार शनिवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, प्रसारमाध्यमांनी अजित पवारांचा कर्जमाफीला विरोध अशा आशयाची बातमी चालवली. त्यांनी आपण काय बातमी देत आहोत याचा थोडासा विचार करावा. मी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही असे केव्हाच म्हणालो नाही. मी स्वतः शेतकरी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत होईल अशा गोष्टी करण्याचा आमचा प्रयत्न असतो. पण धादांत खोट्या बातम्या देऊन माझी बातमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही बातमी सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आली. या प्रकरणी काही बोलायचे असेल तर मी स्वतः बोलेन. तरीही प्रसारमाध्यमांकडून सूत्रांच्या हवाल्याने का बातम्या दिल्या जातात? या सूत्रांना जीवनगौरव पुरस्कार दिला पाहिजे. अजित पवार यांनी यावेळी पुण्यातील गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या वाढत्या संसर्गावरही भाष्य केले. ते म्हणाले, राज्य सरकार व आरोग्य विभाग या प्रकरणी बारीक लक्ष ठेवून आहे. या आजाराच्या उपचारासाठी जास्त खर्च येत आहे. आर्थिक बाबी सांभाळायचे काम सरकारकडे आहे. मी सोमवारी यासंबंधी मंत्रालयात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधणार आहे. अजित पवारांनी यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठात 60 कोटींच्या आराखड्याला मान्यता देण्यात आल्याचेही सांगितले. सामाजिक न्याय आयुक्तालय, दिव्यांग कार्यालयाच्या कामासाठी 225 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. पुण्यात लवकरच टाऊन प्लॅनिंग कार्यालय उभारण्यात येणार आहे. साखर संकुलाचे सहकार भवनात रुपांतर केले जाईल. राज्यातील अनेक कार्यालये पुण्यात होत आहेत, असे ते म्हणालेत. दुसरीकडे, भाजप नेते अशोक चव्हाण यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर महायुतीमधील घटकपक्षांत कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, सध्या कर्जमाफीच्या मुद्यावरून महायुतीत मतभेद असल्याची चर्चा आहे. पण सरकारमध्ये असे कोणतेही मतभेद नाहीत. अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतली. अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांच्या काही कल्पना असतील. त्याची मला माहिती नाही. राज्याच्या आर्थिक परिस्थितीविषयी चर्चा होऊन कर्जमाफीसंबंधी निर्णय घेतला जाईल. यात मतभेदाचा विषयच येत नाही.

नवीन ओळखपत्र तयार करण्याचे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने आवाहन

पुणे: डिसेंबर २०१९ पूर्वी ओळखपत्र प्राप्त केलेल्या जिल्ह्यातील सेवानिवृत्त सैनिकी अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरपत्नी, वीरमाता व वीरपितांनी https://mahasainik.maharashtra.gov.in व www.ksb.gov.in या संकेतस्थळावर नवीन ओळखपत्रकाकरीता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे.

तरी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत ३१ मार्च २०२५ नंतर आर्थिक मदत व इतर कामकाज ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे जुने ओळखपत्र कार्यालयात जमा करुन नवीन ओळखपत्र तयार करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स.दै. (नि) यांनी केले आहे.

शासकीय तंत्रनिकेतन संस्थेचा २५ वा पदविका प्रदान समारंभ संपन्न

पुणे,: शासकीय तंत्रनिकेतन संस्थेचा २५ वा पदविका प्रदान समारंभ 24 रोजी संपन्न झाला. यावेळी एक्साइड एनर्जी सोल्युशन लि. बँगलोरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंदार देव, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाचे सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव, नियामक मंडळाचे सदस्य मिलींद घोंगडे, प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील, शैक्षणिक समन्वयक डॉ. नितीन कुलकर्णी आदी उपस्थित होते.

यावेळी स्थापत्य, विद्युत, अणुविद्युत व दूरसंचार, यंत्र, धातुशास्त्र, संगणक, माहिती तंत्रज्ञान, ड्रेस डिझायनिंग अॅड गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग या अभियांत्रिकी विद्या शाखेतील स्नातकांना पदविका प्रदान करण्यात आल्या. शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा शाखानिहाय गुणानुक्रमे प्रथम क्रमांक व व्दितीय क्रमांक मिळविणाऱ्या विदयार्थ्यांना मानचिन्हे व पारितोषिके देवून त्यांचा गौरव करण्यात आला.

डॉ. मंदार देव यांनी मनोगत व्यक्त केले. श्री. पाटील यांनी संस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले. यावेळी परीक्षा नियंत्रक हनुमंत नाईकनवरे यांनी आभार प्रदर्शन केले.

स्कुटरवरून जाणाऱ्या 2 इंजिनिअर तरुणींचा भरधाव डंपरखाली हृदयद्रावक मृत्यू

पुणे- हिंजवडी परिसरात शुक्रवारी सायंकाळी एक भीषण अपघात झाला होता. त्यात भरधाव वेगातील एका डंपरने स्कुटरवरून जाणाऱ्या 2 इंजिनिअर तरुणींना चिरडले होते. हा डंपर अक्षरशः या तरुणींच्या अंगावर पडला होता. त्यामुळे त्यांच्या शरीराचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघाताच एक व्हिडिओ आता समोर आला आहे. त्यात या अपघाताची भीषणता स्पष्टपणे दिसून येते. अंगावर काटा आणणाऱ्या या व्हिडिओत चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर हा भरधाव महाकाय डंपर तरुणींच्या अंगावर पडताना दिसून येत आहे.पुण्यातील हिंजवडी भागात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका अपघातात डंपरखाली 2 इंजिनिअर तरुणी ठार झाल्या होत्या. या अपघाताचा अंगावर काटे आणणारा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. त्यात भरधाव वेगातील डंपरखाली दोन्ही इंजिनिअर तरुणी चिरडताना दिसून येत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, रेडिमिक्सने भरलेला डंपर हिंजवडीहून महाळुंगेच्या दिशेने जात होता. तो वडजाईनगर येथील चौकातून वळण घेत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. यामुळे तो उलटला. गंभीर बाब म्हणजे त्याचवेळी तेथून 2 तरुणी स्कुटरवरून जात होत्या. हा डंपर त्यांच्या अंगावर पडल्यामुळे त्यांचा चिरडून जागीच मृत्यू झाला. मृत तरुणींचे वय अंदाजे 20 ते 25 वर्षे असून, त्या आयटी क्षेत्रात अभियंता म्हणून कार्यरत होत्या.

यावेळी घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ अपघाताच्या दिशेने धाव घेतली. त्यापैकी काहींनी त्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसही लवकरच घटनास्थळी पोहोचले. त्यांनी क्रेनच्या मदतीने रेडिमिक्स डंपर बाजूला करून दोन्ही तरुणींना बाहेर काढण्याचे काम केले. सध्या मृत तरुणींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. सध्या हिंजवडी पोलिसांनी डंपरच्या चालकाला ताब्यात घेतले आहे.

शासन सहभागाने सांगली येथे ज्यूदो खेळाचे निपुणता केंद्र उभारणार- मंत्री चंद्रकांत पाटील

  • उद्योजक पुनीत बालन यांच्या मागणीवर पाटील यांचे आश्वासन
  • कॅडेट राष्ट्रीय ज्यूदो विजेत्यांसाठी बालन यांच्याकडून रोख बक्षीसांचा वर्षाव

पुणे: प्रतिनिधी
पुनीत बालन ग्रुप यांच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र असोसिएशनच्या मदतीने सांगली येथे ज्यूदो खेळाचे खेळाडू निपुणता केंद्र उघडण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
शिव छत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे बालेवाडी येथे इंस्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स आणि पुनीत बालन गृप यांचा सहकार्याने आयोजित 15 ते 18 वयोगटातील कॅडेट श्रेणीच्या कॅडेट गटाच्या राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धेचे उद्घाटन आणि चषक अनावरण कार्यक्रमात मंत्री पाटील बोलत होते. यावेळी युवा उद्योजक पुनीत बालन, इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्सच्या अध्यक्षा मनीषा मल्होत्रा- मुखर्जी, ॲक्सिस बँकेचे सईद हैदर तसेच आदित्य गोल्हटकर, भारतीय ज्यूदो महासंघाचे निरीक्षक वीरेंद्र वशिष्ठ आणि सहायक सचिव सी एस राजन उपस्थित होते.
यावेळी पुनीत बालन यांनी शासन सहभागाने जुडोचे निपुणता केंद्र उभारावे अशी विनंती आपल्या भाषणात मंत्री पाटील यांच्याकडे केली. त्यावर पाटील यांनी बोलताना तात्काळ हे केंद्र उभारण्याची घोषणा केली. पाटील पुढे म्हणाले, की देशाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये खेळ आणि खेळाडूंचा उत्कर्ष व्हावा यासाठी मोदी सरकार प्रयत्नशिल आहे. यासाठी खेळाडू आणि खेळांच्या कौशल्य विकासासाठी केंद्र सरकारने भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने देखील ऑलिम्पिकमध्ये खेळल्या जाणाऱ्या खेळांच्या यादीतील खेळाडूंना नोकरीमधील पाच टक्के आरक्षण आणि दहावी तसेच बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 25 मार्कांची उपलब्धता करून दिलेली आहे तसेच रोख रकमांचीही तरतूद केली आहे.
पुनीत बालन यांनी या राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धेतील कॅडेट गटाच्या विजेत्या खेळाडूंसाठी भरघोस बक्षिसांची घोषणा केली. यामध्ये त्यांनी मुलामुलींच्या एकूण 16 वजन गटातील प्रत्येक सुवर्णपदक प्राप्त खेळाडूसाठी 11 हजार , रौप्यपदक प्राप्त खेळाडूसाठी 7 हजार तर दोन कांस्यपदक विजेत्यांसाठी 5 हजार रुपये प्रत्येकी अशी जवळपास पांच लाख रुपयांच्या बक्षीस रकमेची घोषणा केली.
कार्यक्रमास द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक जीवन शर्मा आणि अर्जुन पुरस्कार विजेते यशपाल सोलंकी, स्पर्धा प्रमुख जे आर राजेश यांसह राज्य ज्यूदो संघटनेचे अध्यक्ष धनंजय भोसले यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र ज्यूदो संघटनेचे महासचिव शैलेश टिळक यांनी तर आभार तांत्रिक सचिव दत्ता आफळे यांनी केले.
दरम्यान या स्पर्धा दिनांक 23 ते 25 जानेवारी या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेसाठी 29 राज्यातील जवळपास 600 खेळाडू, प्रशिक्षक, पंच आणि पदाधिकारी यांनी पुणे शहरात आगमन केले आहे.
—————————-
हेमावती नागचा विशेष सत्कार
कार्यक्रमात छत्तीसगड राज्यातील अत्यंत दुर्गम परिसरात राहणाऱ्या कुमारी हेमावती नाग या आदिवासी बालिकेने कोणतीही विशेष साधन सुविधा उपलब्ध नसतानाही राष्ट्रीय शालेय आणि राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धेमध्ये अनेक पदके पटकावली आणि म्हणून तिला राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला, याबद्दल तिचा या कार्यक्रमात विशेष सत्कार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
आज होणाऱ्या स्पर्धेमध्ये मुलींच्या 40, 48, 52, आणि 57 किलोखालील गटांच्या तर मुलांच्या 50, 55, 60, आणि 66 किलोखालील गटांच्या स्पर्धांना प्रारंभ झाला. दुपारी चार नंतर या गटातील अंतिम सामान्यांना प्रारंभ होईल.

खो-खो वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघातील खेळाडूंचे पुण्यात जंगी स्वागत

  • आमदार हेमंत रासनेंच्या माध्यमातून दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार

पुणे (दि २४) : दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या खो-खो वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघाने दैदिप्यमान कामगिरी करत विजेतेपद पटकावले आहे. ही अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या विजयी संघातील खेळाडूंचे पुण्यात आगमन झाल्यानंतर जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी खेळाडूंच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करत विजयी रॅली काढण्यात आली.

आमदार हेमंत रासने यांनी पुरुष संघाचा कॅप्टन प्रतीक वाईकर, खेळाडू सुयश गरगटे, आदित्य गणपुले, पुरुष संघाचे प्रशिक्षक शिरीन गोडबोले, महिला संघाच्या प्रशिक्षिका प्राची वाईकर यांचा सत्कार करत अभिनंदन केले. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथून विजयी रॅलीची सुरुवात झाल्यानंतर सदाशिव पेठेतील चिमण्या गणपती चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.

यावेळी बोलताना हेमंत रासने म्हणाले, “खो-खोच्या पहिल्याच वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघाच्या यशामुळे संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण आहे. या विजयी संघामध्ये कसबा मतदारसंघातील अनेक खेळाडू असल्याचा अभिमान असून त्यांच्या कामगिरीने खो-खो या भारतीय पारंपरिक खेळाला जागतिक स्तरावर नवे महत्त्व मिळाले आहे. देशासाठी दैदिप्यमान करणाऱ्या खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी पुणेकरांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यापुढील काळात राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे”.

कर्णधार प्रतीक वायकर म्हणाला, “कर्णधार म्हणून दडपण नव्हतं, पण देशवासीयांच्या अपेक्षांची जबाबदारी होती. वर्ल्ड कप आपल्याच देशात असल्याने जिंकायचं होतं, आणि फायनलमध्ये मोठ्या फरकाने विजय मिळवल्याचा आनंद आहे. बर्मिंगहॅममध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी आम्ही तयार आहोत. खो-खो ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून शाळांमध्ये आणि अकादमींमध्ये या खेळाचे प्रशिक्षण महत्त्वाचे आहे.”

यावेळी भाजपा कसबा मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे, सरचिटणीस अमित कंक, प्रणव गंजीवाले, राजू परदेशी,सरचिटणीस अमित कंक, प्रणव गंजीवाले, राजू परदेशी, चंद्रकांत पोटे यांच्यासह सर्व मा नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेत 110 विद्यार्थी विजयी

  • समर्थ भारत अभियान व श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून आयोजन

पुणे ; प्रतिनिधी
समर्थ भारत अभियान आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरशालेय ’मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धा 2025 चे पारितोषिक वितरण नुकतेच संपन्न झाले. या स्पर्धेत 110 विद्यार्थी विजयी झाले.

पुण्यातील 28 शाळांमधील साडेचार हजार विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. त्यातून 680 विद्यार्थी अंतिम फेरीसाठी निवडली गेले व त्यामधील 110 विद्यार्थी विजयी झाले. या स्पर्धेत नर्सरी ते दहावी असे गट तयार करण्यात आले होते, यासोबतच शिक्षक आणि पालक यांच्यासाठी देखील ही स्पर्धा होती, या पारितोषक वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद दातार, समर्थ भारत अभियानाचे डॉ. राजीव नगरकर, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता तोडकर यांनी केले.