Home Blog Page 487

शरदशास्त्री जोशी आणि स्वानंद पुंड यांना श्री देवदेवेश्वर संस्थानचे पुरस्कार जाहीर

श्री देवदेवेश्वर संस्थान अंतर्गत सारसबाग मंदिराच्या सिद्धिविनायक देवतेच्या वार्षिक महोत्सव अंतर्गत पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

पुणे : श्री देवदेवेश्वर संस्थान अंतर्गत सारसबाग मंदिरातील श्री सिद्धिविनायक देवतेचा वार्षिक महोत्सव गुरुवार दिनांक ३० जानेवारी ते सोमवार दिनांक ३ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. या महोत्सवात श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक ,अध्यात्मिक आणि सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यंदाचा पुरस्कार प. पू. भागवताचार्य शरदशास्त्री जोशी (पुणे)आणि स्वानंद पुंड (वणी) यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार रविवार दिनांक २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सारसबागेच्या श्री सिद्धिविनायक मंदिराच्या प्रांगणात होणार आहे. अशी माहिती श्री देवदेवेश्वर संस्थानचे प्रमुख विश्वस्त रमेश भागवत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी संस्थानचे विश्वस्त सुधीर पंडित, पुष्कर पेशवा, जगन्नाथ लडकत, आशिष कुलकर्णी उपस्थित होते. पुरस्कार समारंभाच्या अध्यक्षा डॉ. कल्याणीताई नामजोशी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

गुरुवार दिनांक ३० जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता महिलांचे सामुदायिक श्री ब्रम्हणस्पतीसूक्त पठण होणार आहे. सायंकाळी ६ वाजता डॉ. शिल्पा थोरात यांचे आयुर्वेद आणि आयुष्यमान या विषयावर व्याख्यान होणार आहे, तर रात्री ८ वाजता उपेंद्र भट यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता महिलांचे सामुदायिक श्री सूक्त पठण होणार आहे. त्यानंतर ॲड. वैशाली भागवत यांचे ‘ डिजिटल व सायबर क्राईम ‘या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी परिमंडळ २ च्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर रात्री ८ वाजता मंजिरी आलेगावकर यांचे शास्त्रीय गायन होणार आहे.

शनिवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता सामुदायिक अथर्वशीर्ष पठण होणार आहे. सकाळी ९ वाजता गणेश याग होणार आहे. रात्री ८ वाजता दिलीप काळे यांचे संतूर वादन होणार आहे. रविवारी सायंकाळी ४ ते ५ या वेळेत मंत्र जागर होणार आहे. सोमवार दिनांक ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वारकरी संप्रदायाचे कीर्तन होणार आहे. हे सर्व कार्यक्रम सारसबागेच्या श्री सिद्धिविनायक मंदिराच्या प्रांगणात होणार आहेत.

कृषी विभांगांतर्गत पदभरतीसाठी शनिवार व रविवार रोजी व्यावसायिक चाचणी परीक्षा

पुणे, दि. २७ : कृषी आयुक्तालय व अधिनस्त कार्यालयांच्या आस्थापनेवरील लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी व उच्च श्रेणी) संवर्गातील सरळसेवा भरतीच्या ऑनलाईन परीक्षेच्या निकालाच्या आधारे पात्र उमेदवारांची व्यावसायिक चाचणी दिनांक १ व २ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती कृषी आयुक्तालयाचे सहसंचालक गणेश घोरपडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविली आहे.

कृषी विभागाच्या ८ विभागांमध्ये ही चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांना त्यांनी आवेदन पत्रामध्ये सादर केलेल्या त्यांच्या वैयक्तिक ई-मेल वर पाठविण्यात आले आहेत. परीक्षार्थीना प्रवेशपत्राबाबत (हॉल तिकीट) ई-मेल प्राप्त झाला नसल्यास संबंधित विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात २८ ते २९ जानेवारी २०२५ रोजी संपर्क साधावा. प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेण्याची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. अधिक माहितीसाठी www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट दयावी, असेही श्री. घोरपडे यांनी कळविले आहे.

शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार

पुणे, दि. २६: शेतीत प्रगती साधण्याच्यादृष्टीने शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे; शेतकरी संशोधक असला पाहिजे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आयोजित ‘इंदापूर कृषी महोत्सव २०२५’  च्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार बाबासाहेब देशमुख, उप विभागीय कृषी अधिकारी तुळशीराम चौधरी, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार जाधव, उपसभापती मनोहर ढुके, आजी, माजी संचालक मंडळ आदी उपस्थित होते.

यावेळी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने अतिशय नेत्रदीपक कृषी प्रदर्शन, जनावरे, घोडेबाजार व डॉग शो आयोजित केला. यामुळे शेतकऱ्यांना नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होते. त्यादृष्टीने नवीन माहिती, तंत्रज्ञान यासोबतच जातिवंत जनावरांची ओळख इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती करत आहे ही समाधानाची बाब आहे. या बाजार समितीला शेतकरी निवास उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

श्री. पवार पुढे म्हणाले, या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने, आधुनिक शेतीची साधने, महिला बचत गटांची उत्पादने, गृहोपयोगी वस्तू पाहायला मिळाल्या. पुणे जिल्ह्यातील एकमेव घोडेबाजार या ठिकाणी पाहायला मिळाला. महाराष्ट्रातील देशातील दोनशे प्रकारची जातीवंत घोडे वैशिष्ट्यपूर्ण डॉग शो, खिलार जनावरे, बैल, गाई या ठिकाणी पाहायला मिळाले.

इंदापूर तालुक्यातील शेतकरी डाळिंब, केळी, पेरू, द्राक्षे, ड्रॅगन फ्रुट आदी फळबागांत अग्रेसर आहे. येथील शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे द्राक्षाचे वाण तयार केले आहेत. हे पाहता शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे. शेतीत आधुनिक तंत्रज्ञान वापरले पाहिजे. शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, पिकाला माफक पाणी देण्याची पद्धत, ऊसाचे उत्पादन वाढविणे, चांगल्या प्रकारची फुले, फळे कशी पिकवावीत याबाबतचे ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले पाहिजे. आपल्याकडे शेतीत आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, इतर राज्यातील, देशातील तंत्रज्ञान आणावे लागेल, अशी सूचनाही त्यांनी केली.

श्री. पवार पुढे म्हणाले, आपल्या कृषी प्रधान देशात कृषी विकासाला प्रचंड क्षमता आहे. कृषी क्षेत्रात शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाला वाव देऊन अनेक संधीचा लाभ देता येऊ शकतो. शेतीतून मिळणारे उत्पादन खाद्यासोबतच देशाच्या उद्योग व्यवसाय प्रक्रियेत वापरले जाते. आता जगामध्ये जागतिक हवामान बदलासह शेतीसमोर अनेक आव्हाने असून त्यामुळे कृषी मालाचा पुरवठा कमी होऊ शकतो. निविष्ठा खर्चामुळे शेतकऱ्यांना पुरेसे उत्पन्न मिळत नाही. लांब आणि खंडित जमीन असल्यामुळे उत्पादकता कमी होते. यावर मात करून शेतकऱ्यांना पुढे जाणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकरिता आगामी अर्थसंकल्पात शक्य तितकी मदत करण्यात येईल. सरकार जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करत असताना गैरफायदाही घेण्याचा प्रकार होऊ नये, असेही श्री. पवार म्हणाले.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी जनावरांचे प्रदर्शन, घोड्यांची शर्यत, डॉग शो पाहिला व यातील उत्कृष्ट ठरलेल्या जनावरांच्या मालकांना बक्षिसे वितरीत केली. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात उत्कृष्ट ठरलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनाही बक्षीस वितरण केले.

७५ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीत विविध संकटांवर मात करत भारत देश भक्कम उभा-उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. २६: भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान, शिवाजीनगर येथे झालेल्या शासकीय कार्यक्रमात ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी त्यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
लोकांनी, लोकांसाठी चालवलेले, लोकांचे राज्य, हा विचार घेऊन, देशाने गेल्या ७५ वर्षांची गौरवशाली वाटचाल केली. या ७५ वर्षात देशासमोर अनेक संकटे आली, आव्हाने निर्माण झाली; परंतु देश कुणापुढे झुकला नाही. वाकला नाही. डगमगला नाही. भक्कम उभा राहीला, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी काढले.

यावेळी आमदार बापुसाहेब पठारे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, ‘पीएआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, स्वातंत्र्यसैनिक यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.

नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, शेकडो वर्षांच्या पारतंत्र्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला. त्यावेळी आपल्यासमोर अनेक संकटे, आव्हाने होती. त्या संकट व आव्हानांवर मात करण्याची दिशा २६ जानेवारी १९५० ला भारताला प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून स्विकारुन आपण निश्चित केली. तेव्हापासून ७५ वर्षात देशासमोरच्या प्रत्येक संकटाला, आव्हानाला, एकजुटीनं, निर्धारानं सामोर जाण्याचं काम प्रत्येक देशवासियांनी केलं.
देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता, संविधान, देशातली लोकशाही, देशाच्या सीमा, सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक सुपुत्रांनी प्राणांचं बलिदान दिल. अनेक कुटुंबांनी सर्वस्वाचा त्याग केला. त्या सर्वांच्या त्याग, बलिदानापुढे नतमस्तक होण्याचा आजचा दिवस आहे. भारतीय प्रजासत्ताकाचा, भारतीय लोकशाहीचा, भारतीय स्वातंत्र्याचा उत्सव आज साजरा करण्याचा दिवस आहे.

देशांतर्गत कितीही मनभेद, मतभेद असले तरी, देशासमोरच्या बाह्य संकटासमोर संपूर्ण देश एक आहे, ही भावना गेल्या 75 वर्षात अधिक मजबूत केली. ही भावना मजबूत होण्यामागे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाची ताकद आहे. देशानं स्विकारलेला सर्वधर्मसमभावाच्या विचारांचं बळ आहे. गेल्या ७५ वर्षात जगातल्या इतर देशात लोकशाही व्यवस्थेला धक्के बसत असतांना आपली लोकशाही सुरक्षित राहीली. याचं श्रेय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेला, राज्यघटनेवरच्या, लोकशाहीवरच्या देशवासियांच्या विश्वासाला आहे.

देशानं गेल्या ७५ वर्षात, शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, सहकार, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, सामाजिक सुधारणा अशा क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली. या प्रगतीचं श्रेय ७५ वर्षांच्या काळात, देशाच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक, आर्थिक क्षेत्रातल्या नेतृत्वानं जी मेहनत घेतली, कार्यकर्त्यांनी जी साथ दिली. त्यांच्या त्या मेहनतीला आहे.

पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारतर्फे राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (मरणोत्तर), गायक पंकज उधास (मरणोत्तर), निर्देशक-अभिनेते शेखर कपूर यांना पद्मभूषण तसेच अभिनेते अशोक सराफ, गायिका आश्विनी भिडे देशपांडे, निसर्गअभ्यासक मारुती चितमपल्ली, वनसंवर्धक चैत्राम पवार, होमिओपॅथी डॉ. विलास डांगरे, गायिका जसपिंदर नरुला, बासरीवादक रोणु मजुमदार, चित्रकार वासुदेव कामत, सुलेखनकार अच्चुत पालव, बँकर अरुंधती भट्टाचार्य, कृषी क्षेत्रातील कामगिरीबद्दल सुभाष खेतुलाल शर्मा यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत, हे पुरस्कार राज्याच्या राजकीय संस्कृती, कलासमृद्धीचा गौरव आहे, अशा शब्दात श्री. पवार यांनी पुरस्कारार्थीचे अभिनंदन केले.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने पोलिस-अग्निशमन पदक तसेच सेवापदक व शौर्यपदक तसेच ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने प्रदान करण्यात आलेल्या वीर गाथा राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्याचेही अभिनंदन केले. ज्या अधिकारी, कर्मचारी बांधवांना, मान्यवरांना आज उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरवण्यात आलं, त्यांचा हा प्रातिनिधीक सत्कार आहे, याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे.
यावेळी समाज कल्याण विभागाच्यावतीने पालकमंत्री श्री. पवार यांना भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रत देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.
‘जीबीएस’ आजारग्रस्त रुग्णांवर पुणे महानगरपालिकेने कमला नेहरु रुग्णालय, पिंपरी-चिंचवड महानगरापालिके यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

श्री. पवार यांच्या हस्ते ॲग्री स्टॅक योजेनाच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच ‘पीएमआरडीए’च्या आपत्ती प्रतिसादक दलाकरीता वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी डेहराडून (उत्तराखंड) येथे होणार्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचा ध्वज उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते पथकप्रमुख संजय शेटे यांच्याकडे ध्वज हस्तांतरित करण्यात आला.

यावेळी उल्लेखनीय सेवेबाबत अपर पोलीस महासंचालनालयाचे तुरुगांधिकारी तात्यासाहेब निंबाळकर, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ, तुरंगाधिकारी प्रकाश उकरंडे, सेवानिवृत्त सुभेदार आनंदा हिरवे राष्ट्रपती सुधार सेवा पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेबाबत अधीक्षक येरवडा खुले कारागृहाचे अधीक्षक अनिल खामकर, तुरुंगाधिकारी तानाजी धोत्रे, सुभेदार प्रकाश सातपुते, कारागृह उपमहानिरीक्षक कार्यालयाचे तुरुगांधिकारी विजय कांबळे राष्ट्रपती सुधार सेवा पदक प्राप्त झाले असून त्यांचा उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी झालेल्या शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. परेड संचलनात पुणे शहर, पुणे जिल्हा ग्रामीण, पिंपरी-चिंचवड पोलीस दल, पुणे शहर पोलीस आयुक्तालय परीमंडळ १ ते ५, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १ व २, पुणे लोहमार्ग, राज्य उत्पादन शुल्क, गृहरक्षक दल, वनविभाग पुरुष व महिला, वाहतूक विभाग, डायल ११२ वाहन, वज्र वाहन दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, वरुण वाहन दंगल नियंत्रण पथक, शासकीय रुग्णवाहिका १०८, बालभारती, श्वान पथक, अग्निशमन दल, पीएआरडीए आपत्ती प्रतिसादक दल तसेच विविध शाळांच्या पथकांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, निमंत्रितांची भेट घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

एनएफडीसी आणि सीबीएफसी यांनी  स्वच्छता  पंधरवडा  उपक्रमासह प्रजासत्ताक दिन केला साजरा

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ  (एनएफडीसी ) आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ  (सीबीएफसी ) यांनी एकत्र येत  26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात  साजरा केला.

ध्वजारोहण समारंभाने कार्यक्रमाची सुरुवात झाली, ज्यात दोन्ही संस्थांचे वरिष्ठ अधिकारी आणि संपूर्ण कर्मचारी यांचा सक्रिय सहभाग पहायला मिळाला.  देशाप्रति  एकात्मता आणि समर्पणाच्या भावनेचा गौरव करून राष्ट्रगीत गायनासह राष्ट्रध्वज फडकवण्यात आला.

ध्वजारोहणानंतर, एनएफडीसी आणि सीबीएफसीच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता पंधरवडा  उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. उपक्रमाचा एक भाग म्हणून, न वापरलेल्या फाइल्स आणि दस्तावेजांचे पद्धतशीरपणे पुनरावलोकन करण्यात आले आणि त्या हटवण्यात  आल्या. यातून कामाच्या ठिकाणी स्वच्छता, शाश्वतता आणि कार्यक्षम संसाधन व्यवस्थापनाप्रति  त्यांची वचनबद्धता अधिक बळकट झाली.

या सहकार्यात्मक प्रयत्नाने  स्वच्छ भारत अभियानाच्या उद्दिष्टांना अनुरूप  स्वच्छ आणि संघटित पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित केले आणि स्वच्छ भारतासाठी प्रत्येक नागरिकाच्या सामायिक जबाबदारीवर भर दिला.

सामूहिक अभिमानाच्या भावनेने आणि राष्ट्राच्या प्रगतीत सकारात्मकपणे  योगदान देण्याच्या निर्धाराने या कार्यक्रमाची सांगता झाली.

खडकी रेल्वे भुयारी मार्गाचे रुंदीकरण वर्षभरात करणार – सिद्धार्थ शिरोळे

पुणे -मुंबई रस्त्यावरून जाताना खडकी पोलीस ठाण्यालगतच्या लोहमार्गाखालील भुयारी मार्गाची रुंदीकरण करण्याबाबत सोमवारी सकारात्मक चर्चा झाली. येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सध्यापेक्षा दुप्पट मार्ग करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. येत्या वर्षभरात नवीन भुयारी मार्ग बांधून पूर्ण करण्याचे ठरले.
आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी ही बैठक रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांच्या कार्यालयात आयोजित केली होती. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनाक्षी लोहिया, रेल्वे आणि पुणे महापालिकेचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
शिरोळे म्हणाले, वाहतूक कोंडीचा नागरिकांना त्रास होत आहे. औंध, बोपोडी येथून राहणाऱ्या नागरिकांच्या दृष्टीने हा भुयारी मार्ग महत्त्वाचा आहे. त्याबाबत गेले वर्षभर चर्चा सुरू आहे. या चर्चेतून मार्ग निघाला असून अंतिम आराखडा लवकर तयार करावा. त्याला मान्यता घेऊन तातडीने भुयारी मार्गाची बांधकाम करावे.
रेल्वे, महापालिका यांच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर रेल्वे विभागीय व्यवस्थापक वर्मा म्हणाले, दोन्ही विभागाच्या अभियंत्यांनी एकत्र बसून 15 फेब्रुवारीपर्यंत या प्रकल्पाचा अंतिम आराखडा तयार करावा. त्याला योग्य ती मान्यता घेऊन त्यानंतर सहा महिन्यात प्रकल्प पूर्ण करण्यात यावा.
शिरोळे म्हणाले, हा प्रकल्प लवकर पूर्ण झाल्यास या परिसरातील वाहतूक कोंडी सुटेल. वाहनचालकांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध होईल. लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण करून आगामी वर्षात नागरिकांना त्याचा वापर करता येईल या दृष्टीने सर्व विभागांनी काम करावे.
पुणे महापालिकेचे कार्यकारी अभियंता श्रीकांत गायकवाड, अभिजीत आंबेकर, उप अभियंता हेमंत जगताप, रेल्वेचे या प्रकल्पाचे सल्लागार सुधीर पाटील यांच्यासह रेल्वेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

जीवनाचा उद्देश केवळ भौतिक प्रगती नसूनं आत्मिक उन्नतीमध्ये निहित आहे-सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज

भक्तिचा सुगंध सर्वत्र पसरवत ५८ व्या निरंकारी संत समागमाची यशस्वीरित्या सांगता

पिंपरी, पुणे 27 जानेवारी, 2025: ‘‘जीवनाचा उद्देश केवळ भौतिक प्रगतीमध्ये नसून आत्मिक उन्नतीमध्ये निहित आहे.’’
असे उद्गार निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या ५८ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या समापन दिवशी लाखोंच्या संख्येने उपस्थित मानव परिवाराला संबोधित करताना व्यक्त केले. या तीन दिवसीय संत समागमाची रविवारी रात्री विधिवतपणे यशस्वीरित्या सांगता झाली.
सतगुरु माताजी पुढे म्हणाल्या, मानवी जीवन एवढ्याचसाठी श्रेष्ठ मानले गेले आहे, की या जीवनात आत्मज्ञान प्राप्त करण्याची क्षमता आहे. परमात्मा निराकार असून या परमसत्याला जाणणे हेच मनुष्य जन्माचे परम लक्ष्य होय.
शेवटी, सतगुरु माताजींनी सांगितले, की जीवन एक वरदान असून ते परमात्म्याशी क्षणोक्षणी संलग्न राहून जगायला हवे. क्षणोक्षणी जीवन योग्य दिशेने व्यतीत केल्याने आपल्याला आत्मिक शांती मिळू शकते आणि आम्ही अनंताच्या दिशेने अग्रेसर होऊ शकतो.
तत्पूर्वी समागमाच्या दुसऱ्या दिवशी सतगुरु माताजींनी आपल्या प्रवचनामध्ये सांगितले, की जीवनामध्ये ज्ञान आणि कर्म या दोहोंचा संगम गरजेचा आहे ज्यायोगे जीवन सुखमय बनू शकेल. जसे पक्ष्याला आकाशात झेप घेण्यासाठी दोन्ही पंखांची गरज असते तसेच जीवनात उंच भरारी घेण्यासाठी ज्ञान प्राप्त करुन त्यानुसार कर्म करण्याची गरज असते. ब्रह्मज्ञानी भक्त जीवनात परमात्म्याशी नाते जोडून प्रत्येक कार्य त्याच्या अनुसंधानामध्ये राहून करत असतो. खरं तर हेच भक्तीचे वास्तविक स्वरूप होय.
समागमात आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांनी आपल्या विचारांमध्ये सांगितले, की भक्ती करण्याचा हेतु हा परमात्म्याशी प्रेम जोडण्याचा असावा. या संदर्भात संतांचे जीवन आम्हाला प्रेरणादायी ठरते. कारण संत आपल्या आत्म्याचे मूळ स्वरूप जाणून जीवनाला योग्य दिशेला घेऊन जाण्याची शिकवण देतात. आपण आपली आस्था आणि श्रद्धेला सत्याकडे वळविले पाहिजे तेव्हाच परमात्म्याच्या प्रति प्रेम उत्पन्न होईल आणि खऱ्या अर्थाने भक्तीचा विस्तार सार्थक ठरेल.

कवी दरबार
समागमाच्या तिसऱ्या दिवशी एका बहुभाषी कवी दरबारचे आयोजन करण्यात आले ज्याचे शीर्षक होते ‘विस्तार – असीम की ओर।’ महाराष्ट्रा व्यतिरिक्त देशाच्या विविध भागातून आलेल्या एकंदर २१ कवींनी मराठी, हिन्दी, इंग्रजी, कोंकणी, भोजपुरी आदि भाषांच्या माध्यमातून काव्य पाठ करत मिशनचा दिव्य संदेश प्रसारित केला. श्रोत्यांनी या कवी दरबाराचा भरपूर आनंद लुटण्याबरोबरच कवि सज्जनांचे कौतुक केले.
मुख्य कवी दरबारा व्यतिरिक्त समागमाच्या प्रथम दिनी बाल कवी दरबार तर दुसऱ्या दिवशी महिला कवी दरबाराचे आयोजन केले गेले. या दोन्ही लघु कवी दरबारांमध्ये मराठी, हिन्दी व इंग्रेजी भाषांच्या माध्यमातून बाल कवी आणि महिला कवियत्रिंनी काव्य पाठ केला ज्याची श्रोत्यांनी खूप प्रशंसा केली.

निरंकारी प्रदर्शनी
या समागमात ’विस्तार-असीम की ओर’ या मुख्य विषयावर आधारित निरंकारी प्रदर्शनी श्रोत्यांसाठी विशेष आर्कषणाचे केंद्र बनून राहिली. या प्रदर्शनीचे मुख्यतः दोन भागांमध्ये विभाजन करण्यात आले होते. प्रथम भागात मिशनचा इतिहास, विचारधारा आणि सामायिक उपक्रमांच्या व्यतिरिक्त सतगुरुंनी देश व विदेशांमध्ये केलेल्या मानव कल्याण यात्रांची सचित्र माहिती देण्यात आली होती तर दुसऱ्या भागात संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन मार्फत राबविल्या जाणाऱ्या सामाजिक कार्याची माहिती दर्शविण्यात आली होती. त्यामध्ये प्रामुख्याने संपूर्ण भारतात राबविला जात असलेला प्रोजेक्ट वननेस वन तसेच प्रोजेक्ट अमृत हे उल्लेखनीय होते. या शिवाय निरंकारी इंस्टिट्यूट ऑफ म्युझिक अॅन्ड आर्ट्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे दिसले.

कायरोप्रॅक्टिक शिविर
समागमामध्ये काईरोप्रॅक्टिक थेरपी द्वारे निःशुल्क उपचार करण्याचे शिबिर आयोजन करण्यात आले होते. ही थेरपी मुख्यत्वे पाठीच्या कण्याच्या विकारांशी निगडित आहे. या तंत्राने उपचार करणारी ऑस्ट्रेलिया, यूनायटेड किंगडम, फ्रांस, अमेरिका येथील १८ डॉक्टरांची टीम आपल्या निष्काम सेवा प्रदान करत होती. यावर्षी जवळपास ३५०० लोकांनी या थेरपीद्वारे उपचाराचा लाभ घेतला.

निःशुल्क डिस्पेन्सरी
समागम स्थळावर एक ६० बेडचे रुग्णालय तयार करण्यात आले होते ज्यामध्ये आपत्कालीन परिस्थितीत आयसीयूची सुविधाही उपलब्ध होती. या व्यतिरिक्त तीन ठिकाणी निःशुल्क होमियोपॅथी व डिस्पेन्सरींची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये वायसीएम रुग्णालय तसेच डी वाय पाटील रुग्णालय ने महत्वपूर्ण योगदान दिले. समागम स्थळावर ११ रुग्णवाहिका तैनात होत्या. स्वास्थ्य सेवेमध्ये २८२ डॉक्टरर्स तसेच जवळपास ४५० सेवादल स्वयंसेवक आपल्या सेवा देत होते.

लंगर
समागमामध्ये येणाऱ्या सर्व भाविकांसाठी निःशुल्क महाप्रसाद म्हणजेच लंगरची व्यवस्था तीन ठिकाणी करण्यात आली होती. या लंगर व्यवस्थेमध्ये ७२ क्विंटल तांदूळ एकाच वेळी सिजवला जाण्याची क्षमता होती तसेच ७० हजार भाविक एकाच वेळी भोजन करु शकतील अशी व्यवस्था होती. सतगुरु प्रवचना व्यतिरिक्त २४ तास लंगर उपलब्ध होते. या व्यतिरिक्त अत्यल्प दराने अल्पोपहार, मिनरल वॉटर व चहा-कॉफी इत्यादि उपलब्ध करुन देण्यासाठी ४ कॅन्टीन्सची व्यवस्था करण्यात आली होती.

मनावरील ताण तणाव कमी करता आला पाहिजे – सरश्री

मनात आणि अंतर्मनात सकारात्मक विचारांची पेरणी होणे गरजेचे – सरश्री

पुणे-

प्रख्यात आध्यात्मिक गुरु व लेखक सरश्री यांचा “जाणूनबुजून आपला मूड कसा सुधारायचा” हा आध्यात्मिक कार्यक्रम सिंहगड रोड येथील मनन आश्रम येथे मोठ्या उत्साहात पार पडला. हजारोंच्या संख्येने नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी सरश्री यांनी उपस्थित अनुयायांना  मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, की छोट्या छोट्या गोष्टीतून अनेक लोकांचा मूड ऑफ होत असतो. तो मूड सुधारण्यासाठी कोणत्या क्लुप्त्या वापरायच्या, त्याचे तंत्र त्यांनी सांगितले.

बरेच लोक मूड चांगला करण्यासाठी आल्याच्या चहाचे सेवन करतात. त्यांचा असा समाज आहे, की आल्याचा चहा प्यायल्याने खराब झालेला मूड देखील चांगला होतो. मात्र मूड चांगला करण्यासाठी मनात आणि अंतर्मनात सकारात्मक विचारांची पेरणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी नियमितपणे ध्यान करणे गरजेचे आहे. त्याने आपल्या जीवनात आमूलाग्र बदल  होतील. मनाची मशागत होणे गरजेचे आहे. मनावरील ताण तणाव कमी करता आला पाहिजे.

आजकाल  प्रत्येक माणसाला पटकन राग येतो. तो दिसेल त्याच्यावर तो ओरडत असतो. घरात, कार्यालयात, रस्त्यावर म्हणजे सर्वच ठिकाणी रागाचे प्रमाण वाढले आहे ? रागाची व्याप्ती, त्याची कारणे समजून घ्या. राग न येण्यासाठी त्याच्यावरील उपाय काय करायचे, ते समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही  स्वतःशी मनन, चिंतन, विचारमंथन, आत्मविश्लेषण करणे गरजेचे आहे. राग हा विनाशी आहे. तो क्षणात विनाशाकडे घेऊन जातो, म्हणूनच  रागापासून मुक्त व्हा, त्याशिवाय आपल्याला योग्य दिशा मिळणार नाही.

राजेंद्र पवार यांचा रामजीबाबा आंबेडकर स्मृती तर खासदार सुनेत्रा पवार, डॉ. विश्वनाथ कराड यांचा रमाईरत्न पुरस्काराने होणार गौरव

पुणे : महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकतर्फे शनिवार, दि. 1 फेब्रुवारी ते शुक्रवार, दि. 7 फेब्रुवारी 2025 या कालावधीत महामाता रमाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महोत्सवाचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड, महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर आणि कार्याध्यक्ष सचिन ईटकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या 128व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या स्मृतींना व विचारांना उजाळा देण्यासाठी महोत्सवाचे आयोजन केले जाते. लोकसहभागातून होणारा महामाता रमाई महोत्सव एकमेव आहे. महोत्सव दररोज सायंकाळी 6 ते 8 या वेळात रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, वाडिया कॉलेज समोर येथे होणार आहे. लता राजगुरू महोत्सवाच्या स्वागताध्यक्ष आहेत.


महोत्सवाचे उद्घाटन दि. 1 रोजी रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय संविधनाच्या प्रियांबलचे सामूहिक वाचन करून होणार आहे. रामजीबाबा आंबेडकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळा दि. 2 रोजी आयोजित करण्यात आला असून महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांचा पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे.


दि. 3 रोजी बाबासाहेबांच्या जीवनात रमाईंचे योगदान या विषयावर प्रबोधनकार ताहेर शेख यांचे व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी समाजसेवक अंजुम इनामदार असणार आहेत. दि. 4 रोजी आडकर फौंडेशनच्या सहकार्याने विनोदी कवितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यात भालचंद्र कोळपकर, अनिल दीक्षित यांचा सहभाग असून अध्यक्षस्थानी प्रभा सोनवणे असणार आहेत.
दि. 5 रोजी रमाईंच्या लेकरांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले असून महाराष्ट्रातील कवी यात सहभागी होणार आहेत. अध्यक्षस्थानी विनोद अष्ठुळ असतील. दि. 6 रोजी सरदार भोलासिंग आरोरा, फिरोज मुल्ला, विल्सन चंदवेळ, डॉ. वैष्णवी किराड, बौधाचार्य आर. के. लोंढे या धर्म प्रमुखांच्या उपस्थितीत महामाता रमाई यांना वंदन केले जाणार आहे.
रमाईरत्न पुरस्कार वितरण सोहळा दि. 7 रोजी आयोजित करण्यात आला असून खासदार सुनेत्रा पवार, एम. आय. टी. शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांचा पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. महोत्सव सर्वांसाठी खुला आहे.

दिलीपराज प्रकाशनतर्फे गुरुवारीदीपक शिकारपूर लिखित 60व्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

पुणे : दिलीपराज प्रकाशनतर्फे ‌‘पर्यावरण संरक्षणासाठी आधुनिक स्मार्ट तंत्रज्ञान‌’ या दीपक शिकारपूर लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गुरुवार, दि. 30 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
पुस्तक प्रकाशन सोहळा सायंकाळी 5 वाजता नवलमल फिरोदिया सभागृह, भांडारकर इन्स्टिट्यूट, लॉ कॉलेज रोड येथे होणार आहे. दीपक शिकारपूर यांचे हे 60 वे पुस्तक असून त्यांच्या 60व्या वाढदिवसाचे निमित्त साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कायनेटिक उद्योग समूहाचे अध्यक्ष पद्मश्री अरुण फिरोदिया, प्रसिद्ध समाजसेविका व उद्योजिका पद्मश्री लीला पुनावाला, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती दिलीपराज प्रकाशनचे संचालक मधुर बर्वे आणि मोहित बर्वे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.

शहराबद्दलची दृष्टी महत्त्वाची!- अजित पवार

पुणे-

राजकारणापेक्षा शहराबद्दलची दृष्टी महत्त्वाची आहे. शहराचा वारसा दर्शवणाऱ्या वास्तू जपल्या पाहिजे. शहरातील इमारतींमध्ये नैसर्गिक वायुवीजन असणे गरजेचे असून पुण्यासारख्या शहरात हिवाळा व पावसाळा वगळता फक्त उन्हाळ्यातच एअर कंडिशनरची गरज असते हे लक्षात घेऊन वास्तुकलेच्या विद्यार्थ्यांनी शहराच्या सौंदर्यात कायमस्वरूपी भर पडेल अशा वास्तूरचना कराव्यात, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज म्हंटले. पुण्यातील बालगंधर्व कलादालन येथे ‘अॅकॅडेमिक एक्स्प्लोरेशन्स’ या वास्तुकला प्रदर्शनास त्यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी त्यांच्या सोबत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण उपस्थित होते.

विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पुण्यातील पद्मभूषण डॉ. वसंतदादा  पाटील  कॉलेज ऑफ आर्किटेक्चरतर्फे आयोजित ४ दिवसांच्या या प्रदर्शनाचा गौरव करून अजित पवार म्हणाले की, राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील यांनी फार मोठ्या प्रमाणात पॉलिटेक्निक व इंजिनीरिंग सारख्या उच्च शिक्षणाच्या सुविधा निर्माण केल्या. त्यांचे शिक्षण जरी कमी झालेले असले तरी शिक्षणाबाबतची त्यांची दृष्टी फार मोठी होती, असे सांगून अजित पवार म्हणाले की, पुण्यात शासकीय पातळीवर शालेय शिक्षण, कृषी, कामगार, सहकार, सामाजिक न्याय अशी विविध विभागांची  भवने  उभारली जात आहेत. या सर्व वास्तू अधिक आकर्षक कलात्मक दृष्ट्या बांधल्या जातील. पुण्याचा प्राचीन वारसा सांगणाऱ्या वास्तूंची मॉडल्स विविध मेट्रो स्टेशन्समध्ये उभारून पुणेकरांना याची माहिती व्हावी असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

आपल्या ज्येष्ठांनी निर्माण केलेल्या वास्तूरचना त्यांचा कित्ता न गिरवता वास्तूकलेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या कल्पक बुद्धिमत्तेच्या आधारे अधिकाधिक सुंदर व पर्यावरणपूरक वास्तूंची रचना करावी असे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह म्हणाले.

प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष अॅड. अभय छाजेड, उपाध्यक्ष – इंद्रकुमार छाजेड व  जेष्ठ सल्लागार आर्की. विकास भंडारी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. महाविद्यालयाच्या “कीस्टोन” या वार्षिक अंकाचे प्रकाशन पाहुण्यांचे हस्ते झाले. संचालक प्रसन्न देसाई यांनी ‘पुणे – द क़्विन ऑफ डेक्कन’ हे पुस्तक पाहुण्यांना भेट दिले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैक्षणिक समन्वयक शेखर गरुड यांनी केले. प्रसन्न देसाई यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी विजयकांत कोठारी, युवराज शहा यांसह अनेक आर्किटेक्ट, प्राध्यापक शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संतूरचे सुमधुर स्वर आणि सुश्राव्य गायनाने पुणेकर रसिक मंत्रमुग्ध…..

पंडित भीमसेन जोशी, पंडित शिवकुमार शर्मा यांना सांगीतिक मानवंदना

पुणे : पंडित शिवकुमार शर्मा यांचे शिष्य कुणाल गुंजाळ यांच्या सुमधुर संतूर वादनाने रसिकांना स्वरांची भुरळ पडली तर पंडित भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांच्या सुश्राव्य गायनाने पुणेकर रसिकांची सायंकाळ सुरेल झाली.
निमित्त होते भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आणि पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी गायन आणि वादनाच्या सांगीतिक मैफलीचे. भावे पूर्वप्राथमिक शाळेच्या ऑडिटोरियममध्ये या सांगीतिक मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात कुणाल गुंजाळ यांच्या संतूर वादनाने झाली. त्यांनी आपल्या वादन मैफलीची सुरुवात कर्नाटकी राग वाचस्पती याने केली. या मन आणि आत्म्याला प्रफुल्लित करणाऱ्या रागातील पारंपरिक आलाप, जोड, झाला सादर करताना कुणाल गुंजाळ यांनी संतूरच्या तारांवरील नाजूक आघातातून निर्माण होणाऱ्या सुमधूर स्वरांवरील आपली पकड रसिकांना दर्शविली. यानंतर कुणाल यांनी तबल्याच्या साथीने तीन बंदिशी पेश केल्या. झपताल, मध्य लय तीन ताल आणि द्रुत तीन तालात बांधलेल्या या बंदिशी सादर करून त्यांनी रसिकांना स्वराविष्काराची सुंदर अनुभूती दिली. संतूर वादन मैफलीची सांगता कुणाल यांनी मन मोहून टाकणाऱ्या पहाडी धुनने केली. त्यांना तबलावादक रोहित मुजुमदार यांनी समर्पक साथ केली.
कुणाल गुंजाळ हे पंडित शिवकुमार शर्मा यांचे शिष्य असून त्यांचे सध्या परदेशात वास्तव आहे. पुण्यात जवळपास पंधरा वर्षांनंतर वादन करत असल्याचे कुणाल गुंजाळ यांनी आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आजच्या पिढीचे आश्वासक युवा गायक विराज जोशी यांनी आपल्या गायनाने रसिकांना सुरांच्या विश्वात खिळवून ठेवले. विराज यांनी आपल्या गायन मैफलीची सुरुवात राग बागेश्रीने केली. त्यांनी आपल्या खुल्या व दमदार आवाजात ‌‘कौन गत भई री मोरी पिया‌’ ही पारंपरिक बंदिश सादर केली. याला जोडून द्रुतमध्ये ‌‘पायल बाजे मोरी झांजर प्यारे‌’ ही बंदिशी ऐकविली. विराज यांनी आपल्या मैफलीची सांगता संत एकनाथ महाराजांची रचना असलेल्या आणि पंडित भीमसेन जोशींच्या गायनाने सुपरिचित झालेल्या ‌‘माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तिरी‌’ या अभंगाने केली. विराज यांना रोहित मुजुमदार (तबला), अमेय बिचू (संवादिनी) यांनी सुरेल साथ केली.
सुरुवातीस सुप्रसिद्ध गायक श्रीनिवास जोशी, शिल्पा जोशी, विख्यात तबला वादक रामदास पळसुले, उल्हास गुंजाळ, पद्मजा गुंजाळ यांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले. कलाकारांचा सत्कार श्रीनिवास जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पूर्वा शहा यांनी केले.

एम्प्रेस गार्डन मध्ये पुष्प प्रदर्शनास नागरिकांची अलोट गर्दी

आज पुष्प प्रदर्शनाचा शेवटचा दिवस
पुणे :  एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन तर्फे 24 ते 27 जानेवारी दरम्यान सुरू असलेल्या पुष्प प्रदर्शनास 26 जानेवारी आणि रविवार सुट्टीचा आनंद घेत नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रकारचे रोपे खरेदी, हुर्डा पार्टी, विविध खाद्याच्या प्रकारावर ताव मारित, फुलांसोबत सेल्फी काढत पुष्प प्रदर्शनाचा आनंद लुटला.

एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन तर्फे 24 ते 27 जानेवारी 2025 दरम्यान पुष्प प्रदर्शनाचे आयोजन कारण्यात आले आहे. पुष्प प्रदर्शनाच्या तिसर्‍या दिवशी म्हणजेच 26 जानेवारी आणि रविवारची सुट्टी असल्याने नागरिकांनी एकच गर्दी केली होती. 26 जानेवारी निमित्त काही महिलांनी तिरंगा ड्रेस परिधान करून आले होते. सुट्टीचा दिवस असल्याकारणाने पुणे शहरासोबत विविध शहरातील, राज्यातील ऐवढेच नव्हे तर परदेशातूनही काही नागरिकांनी हजेरी लावत गर्दी केली होती. पुष्प चाहत्यांनी खुप गर्दी केल्याचे यावेळी दिसले. हे प्रदर्शन 27 जानेवारी 2025 पर्यंत  नागरिकांसाठी खुले असणार आहे.तसेच सोमवार, 27 जानेवारी रोजी सायंकाळी 6.00 वाजता सुनीता कल्याणी यांच्या हस्ते पुष्प प्रदर्शनातील विजेत्यांना पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आले आहे.

प्रदर्शनात विविध फुले, भाजीपाला, बोन्साय अशा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. यामध्ये नर्सरी, शेतीची अवजारे, खते, कुंड्या, बागकामाचे साहित्य, खाद्यपदार्थ असे विविध स्टॉल आहेत जेथे रौपे, खत, बागकाम साहित्य खरेदी करण्यासही गर्दी दिसून आली. तसेच येथे संस्थेतर्फे काही ठिकाणी सेल्फी पांईट बनविण्यात आले होते, येथेही गर्दी पाहण्यास मिळाली. तसेचे विविध फुलांच्या पाकळ्यांनी स्व. भीमसेन जोशी आणि स्व. लता मंगेशकर यांचे पुष्पचित्र साकारण्यात आले हेाते, जे पुष्पप्रदर्शनाचे आकर्षण ठरले. हे पुष्पचित्राचे फोटो काढल्याशिवाय कोणाचे पुष्पचित्र आहे हे समजत नाही.

यावर्षी जपानी पद्धतीने साकारलेल्या विविध पुष्परचना, बोन्साई वृक्षांचे विविध प्रकार, विविध झाडे, वेलींनी नटलेले एम्प्रेस गार्डन पाहण्याचा आनंद पुणेकरांनी घेतला. पुष्पप्रदर्शनाच्या निमित्ताने पुण्यातूनच नव्हे तर अगदी कोल्हापूर, सांगली, नाशिक, आंध्र प्रदेश इ. ठिकाणाहून नर्सरी व्यावसायिक या पुष्पप्रदर्शना मध्ये सहभागी झाले आहेत.या पुष्पप्रदर्शनाचे वैशिष्ठ्य म्हणजे यामध्ये केवळ फुलांचा समावेश न करता निरनिराळ्या प्रकारच्या शोभिवंत झाडांच्या कुंड्या, भाजीपाला, पुष्परचना, बागेच्या प्रतिकृती आदी गोष्टींचा समावेश असतो. पुष्प प्रदर्शनात लहान मुलांसाठी बग्गी रपेट, घोड सवारी, झोके आदी खेळणी उपलब्ध केले असून याचाही बालचमु सोबत मोठ्यांनीही आनंद लुटला.  

छंदोत्सव २०२५ चे उदघाटन उत्साहात संपन्न

पुणे-महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील छंदिष्ठ व्यक्तींच्या छंदोमयी ग्रुपच्या विविध छंद संग्रहाचे छंदोत्सव २०२५ या प्रदर्शनचे उदघाटन काल् बाल साहित्यिक श्री राजीव तांबे यांच्या हस्ते आणी सायबर कायम नॅशनल अवॉर्ड विजेते धनंजय देशपांडे, तसेंच विंतेज माईल या संग्रहल्याचे संचालक श्री विनीत केंजले यांच्या प्रमुख उपस्थितीत् उत्साहात संपन्न झाले.
यावेळी मुलांची आवड ओळखून पालकांनी मुलांच्यातिल् गुण ओळखून, त्यांच्यातील आवडीला प्रोत्साहन देऊन त्यान्च्या छंदासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.त्यातूनच पुढे एखादा संशोधक, शिक्षक होवू शकतो.असे प्रतिपादन राजीव तांबे यांनी केले.
धनंजय देशपांडे यांनी छंदासारख्या सकारात्मक ऊर्जेमुळे मुले व्यसनांपासून आणी गुन्हेगारीपासून दूर राहतील आणी मेंदू सकारात्मक राहिल्याने सायबर गुन्हे घडणार नाही यासाठी छंद जोपासने आवश्यक आहे. तर विनीत केजले यांची छंद संग्रहातून प्राचीन वारसा जोपसला जातो असे सांगितले.
प्रदर्शनासाठी झुपूर्झा संग्रहालय, विंतेज माईल म्युझियम, कमलवाडा संग्रहलंय यांचे अनमोल सहकार्य लाभले. अशी माहिती छंदोमयी ग्रुपचे संस्थापक प्रसाद देशपांडे यांनी दिली .
मिलिंद क्षीरसागर यांनी निवेदन आणी प्रस्तावना केली.
प्रदर्शनासाठी ग्रुपचे सौरभ इनामदार, रत्नाकर् जोशी,अभिजी धोत्रे,अनंत कुलकर्णी आणी छंदोमयी ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतली.
पालकांनी त्यांच्या मुलांसह विवीध छंद संग्रह पाहून हरकून गेले. सर्वांनी ३/४ तास मोबाईल विसरून प्रदर्शनाचा आनंद घेतला.

महाराष्ट्रात माज फक्त मराठी माणसानेच करायचा:मनसेची हॉटस्टारला तंबी; क्रिकेटचे मराठीतून समालोचन करण्याची मागणी

हरियाणवी, भोजपुरीत समालोचन; पण मराठीत नाही,आता चॅम्पियन ट्रॉफीपासून मराठीत होणार समालोचन

मुंबई–मनसेचे चित्रपट विभागाचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आज मराठीच्या मुद्द्यावरून हॉटस्टार कार्यालयात धडक दिली होती. क्रिकेट सामन्यांच्या समालोचनासाठी मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली होती. ही मागणी मान्य करण्यासाठी अमेय खोपकर सुमारे 3 तास हॉटस्टारच्या कार्यालयात ठिय्या मांडून बसले होते. लेखी आश्वासनानंतर अमेय खोपकर यांनी आपला ठिय्या मागे घेतला. तसेच या आश्वासनाची पूर्तता लवकरात लवकर न केल्यास कार्यालयाच्या काचा फुटतील, असा इशाराही यावेळी कंपनीला देण्यात आला.

या आंदोलनानंतर अमेय खोपकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. आम्ही भेटायला नाही, तर धमकी द्यायला आलो होतो. महाराष्ट्रात मराठी भाषा लागावी यासाठी आम्हाला आंदोलन करावे लागत असले, तर यापेक्षा दुसरी काही शोकांतिका नाही. महाराष्ट्रात मराठी भाषेसाठी भांडावे लागते. इथे आल्यानंतर यांचे वरचे अधिकारी मराठी माणसाला पुढे करतात, असे ते म्हणाले.

हॉटस्टारवर प्रक्षेपित होणाऱ्या क्रिकेट सामन्यांचे मराठीमध्ये समालोचन करू, असे लेखी आश्वासन जोपर्यंत आम्हाला कंपनीकडून मिळत नाही, तोपर्यंत जाणार नव्हतो. आता हॉटस्टारकडून आम्हाला राज ठाकरेंच्या नावाने पत्र दिले आहे. इतर आवश्यक गोष्टींसाठी आम्ही त्यांना वेळ देत आहोत. आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीपासून हॉटस्टारवर क्रिकेट सामन्यांचे मराठी भाषेत समालोचन होणार असल्याची ग्वाही कंपनीने दिलेली आहे.

महाराष्ट्रामध्ये माज हा फक्त मराठी माणसानेच करायचा, इतर लोकांनी आमच्यावर दादागिरी करायची नाही, असा इशारा अमेय खोपकर यांनी दिला आहे. आपण देखील क्रिकेट सामना पाहताना मराठी भाषेचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी मराठी प्रेक्षकांना केले आहे.दरम्यान, 25 जानेवारी रोजी भारत आणि इंग्लंडमध्ये दुसरा टी-ट्वेंटी सामना झाला. या सामन्यात भारताने इंग्लंडला दोन गडी राखून पराभवाची धूळ चारली. या सामन्याचे प्रक्षेपण हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्म करण्यात आले होते. यावेळी हिंदी, इंग्लिश, तमिळ, तेलगूसह बंगाली, हरियाणी, कन्नड आणि भोजपुरी भाषेतून सामन्याचे समालोचन करण्यात आले. मात्र मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध नव्हता.‘हॉटस्टार’वर प्रसारित होणाऱ्या भारत-इंग्लंड टी-20 सामन्याचे समालोचन हरियाणी आणि भोजपुरी भाषेतूनही केले जात आहे, पण यात मराठी भाषा नाही. अभिजात भाषेचा दर्जा मिळूनही मराठीला ही अशी वागणूक देण्याची हिंमतच कशी होते? असा सवाल करत स्टार नेटवर्क यांना अभिजात म्हणजे काय त्याचा मनसे स्टाईल धडा द्यावाच लागेल, असा इशारा अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावरून दिला होता. त्यानंतर ते आज हॉटस्टारच्या कार्यालयात दाखल झाले.