Home Blog Page 486

‘मोबाईल शॉप ऑन ई- व्हेईकल’ योजनेच्या लाभासाठी दिव्यांगांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. २८: दिव्यांग व्यक्तींना हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळाकडून करण्यात आले आहे.

सन २०२४-२५ करिता दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने ही योजना लागू करण्यास १० जून २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे तसेच सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार, कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हे या योजनेचे उद्देश आहेत.

या योजनेचा लाभ मिळण्यासाठी https://register.mshfdc.co.in हे नाव नोंदणी पोर्टल सुरू करण्यात आले असून दिव्यांग व्यक्तींनी त्यावर ऑनलाईन अर्ज करावेत. अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय- सामाजिक न्याय भवन, प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण इमारत, विश्रांतवाडी, येरवडा, पुणे येथे संपर्क साधावा, असेही महामंडळाचे पुणे जिल्हा व्यवस्थापक सी. के. माने यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिलमध्ये ? : आजची सुनावणी टळली, दोन्ही वकिलांनी दर्शवली सकारात्मकता

मुंबई-ओबीसी आरक्षणावरील स्थगितीमुळे आधीच लांबलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता आणखी रखडल्या आहेत. या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर तातडीने, निश्चित तारीख देऊन पुढील सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने तयारी दर्शवली असली तरी त्यासाठी आता 25 फेब्रुवारी ही तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे 25 फेब्रुवारी रोजीच या संबंधीचा निकाल समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाले तर एप्रिलमध्ये या निवडणुका होण्याची शक्यता आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणासंदर्भात राहुल रमेश वाघ यांनी साधारण सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी आधीच खूप विलंब झाल्याने तसेच आता विधानसभा निवडणुकाही झाल्याने सुनावणी लवकर घ्यावी, अशी मागणी वाघ यांचे वकील देवदत्त पालोदकर यांनी केली होती. तर राज्य शासनाच्या वतीने बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीही या प्रकरणी लवकर निवडणुका घेण्याची राज्य सरकारची इच्छा असल्याचे सांगितले. त्यामुळे न्यायालयाने 5 फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली होती. मात्र, त्याच दिवशी दिल्ली विधानसभेच्या निवडणुका असल्याने न्यायालयाने हे प्रकरण ऐकण्यासाठी आता 25 फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली आहे.

मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रानेही नव्याने समिती गठीत करुन ओबीसींचा इम्पिरिकल डेटा तयार करुन ट्रिपल टेस्ट पूर्ण केली आणि त्याचा अहवाल कोर्टाला सादर करून आरक्षणासह निवडणुकीला परवानगी मागितली आहे. त्यावेळी न्या. खानविलकर यांनी अशी संमती दिली. मात्र, आधी परवानगी दिलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आरक्षणाशिवाय आणि यानंतरच्या निवडणुका आरक्षणासह होतील, असे स्पष्ट केले होते. न्या. खानविलकर निवृत्त झाल्याने हे प्रकरण सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्यासमोर सुनावणीला आले. त्याच दरम्यान महाराष्ट्रात सत्ताबदल झाला आणि नव्या सरकारने कोर्टाकडे अर्ज करुन, आधी आणि नंतर संमती दिलेल्या अशा सगळ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याची परवानगी मागितली. न्या. रमण्णा यांनी या प्रकरणावर तात्पुरती स्थगिती देत ते न्या. चंद्रचूड यांच्याकडे वर्ग केले होते. यावर प्रत्यक्ष सुनावणी होऊ न शकल्याने ही स्थगिती कायम आहे. हे प्रकरण न्या. चंद्रचूड यांनी न्या. सूर्यकांत आणि न्या. भुयान यांच्याकडे वर्ग केले आहे.

महाराष्ट्राने ओबीसी आरक्षणासाठीची ट्रिपल टेस्ट पूर्ण केली नसल्याचे सांगत दोन वर्षांपूर्वी सुप्रीम कोर्टाचे तत्कालीन न्या. अजय खानविलकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला स्थगिती दिली होती. मात्र, त्या वेळी कार्यकाळ संपलेल्या काही संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्यास परवानगी दिली. याच दरम्यान मध्य प्रदेशनेही ट्रिपल टेस्ट पूर्ण न केल्याने तेथील निवडणुकांनीही कोर्टाने स्थगिती दिली होती. मात्र, मध्य प्रदेश सरकारने तातडीने राज्यातील ओबीसींचा इम्पिरिकल डेटा तयार करून ट्रिपल टेस्ट पूर्ण केली आणि तसा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर केला होता. त्यामुळे ओबीसी आरक्षणासह तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास कोर्टाने परवानगी दिली होती. आता महाराष्ट्रातही लवकरच या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्ये लुटुनी खाती; पालिका अन पंचायती …

२०२० मध्ये कोरोना काय आला,आणि तो गेलाही…पण स्थानिक स्वराज्य संथांना जे साखळदंड त्या निमित्ताने घातल्या गेल्या त्या अजूनही कोणी सोडवू शकलेले नाही.मुंबई महापालिका,पुणे महापालिका,पिंपरी महापालिका यासह राज्यांतील बहुधा सर्वच नगरपालिका,महापालिका आणि पंचायती या पारतंत्र्याच्या जोखडात अडकल्या.लाखो कोटी रुपयांचा व्यवहार अजूनही प्रशासनाच्या माध्यमातून राज्य सरकारच पाहते आहे. त्यावरील स्थानिक लोकप्रतिनिधीच नसल्याने स्थानिक नियंत्रण सारे कधीच निसटून गेलेय.येथील हजारो कोटीचा व्यवहार आपणच नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या मार्फत राज्य सरकारच आता हाताळीत आहे. मुख्य सभा,स्थायी समिती..अशा सर्व घटनात्मक परंपरेने चालणाऱ्या महापालिकांनी घटनेची कास कधीच सोडलीय..आणि राज्यातील मंत्री महोदयांचे मार्गदर्शन पत्करत अधिकारी वर्गानी महापालिकांच्या तिजोऱ्यांची उघडझाप राज्य सरकारच्या इशाऱ्यावर सुरु ठेवली आहे.

२०२० ला कोरोना २०१९ आला आणि देशभरच्या झोपा उडाल्या..पण या संकटात हि ते संकट न मानता संधी मानून काही राज्यकर्त्यांनी त्याचा पुरे पूर उपयोग करवून घेतला.स्थानिक स्वराज्य संथांच्या मार्फत अनेकांनी हि संधी साधली.महामारीचा काल म्हणून कायद्याची बंधने,प्रोसिजर सारे गळून पडले होते.आहे त्या लोकप्रतिनिधींना मुदतवाढ न देता कोरोनाच्या नावाने थेट स्थानिक स्वराज्य संथाच्या निवडणुका घेण्याचे टाळण्यात आले. कधी प्रभाग रचनेचे कारण देण्यात आले तर कधी हद्दींचे कारण, कधी न्यायालयाचे कारण आणि कधी जणगणनेचे कारण देत निवडणुकांचा चेंडू पुढे पुढे ढकलत गेला. दरम्यानच्या काळात लोकसभा,विधानसभा निवडणुका घेतल्या गेल्या.विधानसभा निवडणुका होण्यापूर्वी सुमारे पावणेदोनशे कर्मचाऱ्यांनी पुणे महापालिकेतून निवृत्ती घेतली.राज्य सरकराने येथे अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक करायची आणि राज्य सरकारनेच या लोकांच्या मार्फत सारा कारभार पाहायचा अशी प्रथा आता सुरु आहे.महापालिकेत पूर्वीच्या ८० टक्के अधिकारी कर्मचाऱ्यांनी आता नौकरीला राम राम ठोकलाय.स्थायी समिती, मुख्य सभा, महापालिकेचे कायदे सारे काही कागदी खेळणे बनले.ना स्थायी समितीची सभा जनतेला समजली, ना मुख्य सभा कधी झाली अन कधी संपली जनतेला समजले, चीत भी मेरी, पट भी मेरा या मार्गाने सुरु झालेला हा बाजार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बेड्या दिवसेंदिवस आणखी घट्ट आवळत गेला.

वार्ड १ ,आणि १ लोकप्रतिनिधी हि सर्वमान्य, जनमान्य प्रथा मोडून प्रभाग समिती हि राजकीय सोयीसाठी आणली गेलेली पद्धती सर्वप्रथम या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गळा घोटण्यास वापरली गेली. महापालिका,नगरपालिका हद्दीवर नियंत्रण ठेवायचे नाही, अन अकार्यक्षम, मात्र धन दांडग्या व्यक्तींना स्थानिक स्वराज्य संस्थांवर नेण्यासाठी प्रभाग समित्यांचा वापर करायचा हे सूत्र अजूनही लोकांच्या लक्षात आले नसेल तर नवलच.मुंबई महापालिकेत १ वार्ड १ लोकप्रतिनिधी पद्धती चालते तर इतरत्र का नाही ? असा सवाल हि विचारणार कोण ? ज्याला लोकप्रतिनिधित्व करायचे त्याला स्वबळावर निवडून येऊ द्यात या लोक इच्छेला इथे विचारतोय कोण ? धन दांडग्या च्या आयुष्याला कलाटणी देण्यासाठी त्याचे राजकीय भवितव्य, करिअर निर्माण करण्यासाठी प्रभाग समितीचा वापर होऊ लागला. एक चांगला,लोकप्रिय लोकप्रतिनिधी आणि मग त्याच्या सोबत..अन्य हे असे दांडगे..जोडून प्रभाग जोडायचा आणि निवडून आणायचा हि पद्धतीच मुल लोकशाहीला मारक.पण त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले गेले.

स्थानिक स्वराज्य संथांमध्ये स्थानिक प्रतिनिधित्वच उरलेले नाही.बाहेरून आलेले प्रशासन आणि राज्य सरकार यांचाच अंमल उरलाय, कायद्याची,प्रथेची परंपराही इथली संपलीय. पारतंत्र्याच्या जोखडात अडकलेल्या या संस्थांची सोडवणूक आता वर्षभर होईल असे वाटत नसले तरी जेव्हा होईल तेव्हा देखील त्याच प्रशासनाच्या अंमलाखाली आणि EVM खाली होईल.

निरंकारी सामूहिक विवाह समारोहामध्यें 93 जोडपी विवाहबद्ध

एकमेकांचा आदर करत प्रेमपूर्वक कर्तव्यांचे पालन करावे

  • सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज

पिंपरी, पुणे २७ जानेवारी, २०२५:
निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात सोमवार, दि. २७ जानेवारी २०२५ रोजी आयोजित सामूहिक विवाह समारोहामध्ये महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांतून व विदेशातून आलेल्या ९३ जोडप्यांचा विवाह संपन्न झाला. महाराष्ट्राच्या ५८व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची विधिवत सांगता झाल्यानंतर पिंपरीच्या मिलिटरी डेअरी फार्म ग्राउंडवरच या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
नव विवाहित वधू-वरांना सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी एकमेकांचा आदर-सत्कार करत प्रेमपूर्वक आणि भक्तीभावनेने कर्तव्यांचे पालन करत जीवन व्यतीत करण्याचा आशीर्वाद प्रदान केला व त्यांना शुभेच्छा दिल्या. या सामूहिक विवाह सोहळ्या मध्ये पारंपारिक जयमाला तसेच निरंकारी विवाहाचे विशेष चिन्ह सांझा- हार (सामायिक हार) प्रत्येक जोडीच्या गळ्यामध्ये मिशनच्या प्रतिनिधींमार्फत परिधान केले. त्यानंतर आदर्श गृहस्थ जीवन जगण्याची शिकवण प्रदान करणाऱ्या निरंकारी लावांचे सुमधूर गायन करण्यात आले.
समारोहामध्ये सतगुरु माताजी व आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांनी वधूवरांवर पुष्प-वर्षा करुन आपला दिव्य आशीर्वाद प्रदान केला. कार्यक्रमात उपस्थित वधू-वरांशी संबंधित कुटुंबीय आणि साध संगतने देखील पुष्प-वर्षा केला, निश्चितपणे हे एक अलौकिक दृश्य होते.
आजच्या या शुभ प्रसंगी महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापुर, सोलापुर, सातारा, डोंबिवली, छत्रपती संभाजीनगर,अहिल्यानगर, धुळे, नासिक, नागपुर, वडसा, चिपळूण आणि खरसई इत्यादि विभिन्न ठिकाणांव्यतिरिक्त गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगना राज्ये आणि विदेशातून मिळून एकूण 93 जोडपी सहभागी झाली होती. सामूहिक विवाहानंतर सर्वांच्या भोजनाची उचित व्यवस्था करण्यात आली होती.
उल्लेखनीय आहे की या साध्या विवाह समारंभात अनेक पदवीधर, पदव्यूत्तर पदवीधर आणि उच्च शिक्षित वधू- वरांचा समावेश होता. काही परिवार असेही होते जे आपल्या मुलांचे विवाह मोठ्या थाटामाटात करु शकत होते. परंतु त्यांनी सतगुरुंच्या पावन छत्रछायेमध्ये त्यांच्या दिव्य शिकवणीचा अंगीकार करत साध्या पद्धतीने विवाह करुन समाजासमोर एक आदर्श उदाहरण प्रस्तुत केले. निःसंदेह साध्या विवाहांचे हे अलौकिक दृश्य जाती-वर्ण इत्यादिंची विषमता दूर करुन एकत्वाचा सुंदर संदेश प्रस्तुत करत होते, जो संत निरंकारी मिशनचा संदेशदेखील आहे.

७०० गायक-वादकांच्या स्वरलहरिने संध्याकाळ गुलजार

स्व. राज कपूर यांची जन्मशताब्दी व भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतीला सांगितिक अभिवादन

पुणे,२७ जानेवारी: पखवाजचा ताल, तबल्यावरील थाप, व्हायोलियनचा व गायकांचा सुर आणि भारत मातेला वंदन या नृत्याने उपस्थित हजारो श्रोते मंत्रमुग्ध झाले. तसेच  ७०० हून अधिक गायक-वादकांच्या स्वरलहरिने सादर करण्यात आलेल्या ‘वंदन भारतमातेला’ या संगीत मानवंदनेमुळे संध्याकाळ गुलजार झाली.
 देशात प्रथमच माईर्स् एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एमआयटी आर्टस्, डिझाईन अँड टेक्नॅालॅाजी युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वंदन भारतमातेला’ या कार्यक्रमात ७०० हून अधिक गायक-वादकांना एकत्रित आणून त्यांचे सादरीकरण विश्वराजबाग लोणी काळभोर केले. “संगीत साधनेतून ईश्वरदर्शन आणि शांतरसाची अनुभूती’ देणार्‍या या कार्यक्रमाने उपस्थितांना आध्यात्मिक अनुभूती मिळाली. स्व. राज कपूर यांची जन्मशताब्दी व भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतीला सांगितिक अभिवादन देणारा हा कार्यक्रम होता.
कार्यक्रमाची सुरूवात भारतीय संगीताचा अध्वर्यू मानल्या गेलेल्या पखवाज या प्राचीन वाद्यापासून झाली. पं. उद्धवबापू आपेगावकर यांनी शिव, गणपती पूजा आणि तांडव नृत्यला दिल्या जाणार्‍या तालाने पखवाज वाद्याने सुरूवात केली. जवळपास शेकडो वादकांनी एक सूर एक ताल ने उपस्थित प्रेक्षकांची दाद घेतली.
प्रसिद्ध तबला वादक गणेश तानवडे यांच्या मार्गदर्शनातील टीम ने तबल्यावरील थापेने संपूर्ण श्रोत्यांना आपल्या बोटांवर नाचविले. उत्कृष्ट वादनामुळे श्रोते स्वतःचे भान हरवून बसले होते. हा परफॉर्स स्व.पं. झाकीर हुसेन यांना समर्पित करण्यात आला. व्हायोलियन वादक तेजस उपाध्ये यांनी आपल्या वादनाने जशी काय श्रोतांच्या मनाची तारच छेडल्याची अनुभूती झाली.
यावेळी उपस्थित शेकडो गायकांनी राजकपूर यांच्या स्मृतिला आठवण करून सजन रे झूठ मत बोलो, मेरा जूता है जापानी, जिस देश में गंगा बहती या सारख्या गीतांचे सादरीकरण केले. यावेळी मेरा जूता है जापानी या गीतावर कलाकाराने सादरीकरण केले.
येथील विद्यार्थ्यांनी वंदे मातरम् या गितावर भारत मातेला समर्पित नृत्याचे सादरीकरण केले. सरते शेवटी ऐ मेरे वतन के लोगो हे गीत उपस्थित ७०० पेक्षा अधिक गायक वादकांनी सादर केलेल्या गीतामुळे उपस्थितांच्या डोळ्यात अश्रु टिपल्या गेले.
एमआयटी संस्थेची श्रद्धा व आस्था असलेल्या वारकरी संप्रदायाच्या काही भजन व सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “संगीत साधनेतून ईश्वरदर्शन आणि शांतरसाची अनुभूती’ देणारा हा कार्यक्रम भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाचे प्रतिक आहे. भारतमातेला वंदन  या  अभिवादन कार्यक्रमामुळे आंतरिक समाधान लाभले. आज ईश्वरअनुभूती झाली आहे.”
यावेळी या प्रसंगी योगी अमरनाथ, प्रसिद्ध उद्योजक फिरोज व लिला पुनावाला, डॉ. गोयल, डॉ. बत्रा, विनोद शहा यांच्या बरोबरच शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, उद्योग, आर्थीक क्षेत्राबरोबरच अन्य क्षेत्रातील शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, हभप तुळशीराम कराड, काशीराम कराड, डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, सौ. उषा विश्वनाथ कराड, डॉ. सुचित्रा कराड नागरे, प्रा. स्वाती कराड-चाटे, ज्योती कराड-ढाकणे, पुनम नागरगोजे यांच्या सहित संपूर्ण कराड  परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्याच प्रमाणे एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ.मिलिंद पांडे, डॉ. संजय उपाध्ये, दूरदर्शनचे माजी संचालक डॉ. मुकेश शर्मा, आदिनाथ मंगेशकर  उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.मिलिंद पांडे, डॉ.मिलिंद पात्रे व डॉ. शालिनी टोणपे यांनी केले.

जवळपास 200 पोलिस ‘आका’चे प्रेमी:भाजप आमदार सुरेश धस यांचा दावा; यादी मुख्यमंत्र्यांना देणार, मराठवाड्याबाहेर बदलीची मागणी

बीड- संतोष देशमुख प्रकरणात आता पुण्याच्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी देखील उडी घेतली आहे. बीडमधील 26 पोलिस अधिकारी हे वाल्मीक कराडच्या मर्जीतील असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच वाल्मीक कराडच्या मर्जीतले पोलिस अधिकाऱ्यांची बीडमधून बदली करण्याची देखील त्यांनी मागणी केली आहे. तृप्ती देसाई यांच्या आरोपावर आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया देत म्हंटले की त्यांनी सांगितलेला 26 हा फार कमी आकडा आहे.एका वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले, सर्व कर्मचारी पोलिस अधिकारी यांची जर बेरीज केली तर ती 200 इतकी होईल. मी लवकरच यादी करणार आहे आणि मुख्यमंत्र्यांना देणार आहे, असे सुरेश धस म्हणाले आहेत.

सुरेश धस म्हणाले, फक्त 26 नाही तर 150 ते 200 अधिकारी हे वाल्मीक कराडच्या मर्जीतले असतील. तृप्ती देसाई यांनी 26 हा फार कमी आकडा सांगितला आहे. सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बेरीज केली तर 200 इतकी होईल. त्यांनी हा आकडा कमी सांगितला आहे. मी लवकरच या सर्वांची यादी मुख्यमंत्र्यांना देणार आहे. या सर्वांची बदली बीडच्या बाहेर नव्हे तर मराठवाड्याच्या बाहेर करावी, असेही मी त्यांना सांगणार आहे.

पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले, आकाचे पोलिस दलातील जे प्रेमी आहेत. आतापर्यंत एसपींनी पोलिस दलातच कसे ठेवले. मी कितीतरी वेळा याबद्दल बोललो आहे. महादेव मुंडेचे आरोपी आकाच्या मुलाच्या अवतीभवती फिरत होते. ते लगेच गायब झाले. त्या डीवायएसपी यांनी देखील अजून चार्ज घेतला नाही. ते सुद्धा आकाचेच आहेत, असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे.

सुरेश धस म्हणाले, महादेव मुंडेचे आरोपी सापडले पाहिजेत. ते 15 दिवसांच्या आत जेलमध्ये गेले पाहिजेत. त्याची हत्या होऊन 15 महीने झाले. अतिशय निर्घृण हत्या झाली. कॉलेजच्या ग्राऊंडमध्ये मारण्यात आले. त्यानंतर तहसीलदाराच्या दारात नेऊन टाकण्यात आले. एसपींनी ज्या पद्धतीने यंत्रणा हलवायला हवी, तशी यंत्रणा हलवली जात नाही, असेही सुरेश धस म्हणाले.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी डॉक्टरांवर केलेल्या आरोपांवर भाष्य करताना सुरेश धस म्हणाले, डॉ. अशोक थोरात हा चांगला माणूस आहे. अंजली दमानिया यांनी चुकीची माहिती दिली. डॉक्टरांचीही चौकशी करावी लागेल. संतोष देशमुखांचा पोस्टमॉर्टम रीपोर्ट हा अतिशय क्लियर आहे. संतोष देशमुखांचे डोळे जाळलेले नव्हते हे आम्हीही मान्य करतो. पण त्यांना मारहाण केलेली होती. मला ही सर्व माहिती मिळाली. त्यानंतर मग माझा संताप झाला. मी हा विषय सभागृहात मांडला आणि मी त्या भूमिकेवर आजही ठाम आहे, उद्याही असेन, असे धस यांनी म्हंटले आहे.

चौथ्या महिला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी योजना अंमलबजावणीत महिलाकेंद्री दृष्टीकोन आवश्यक’ उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : स्त्री आधार केंद्रातर्फे जागतिक महिलांवरील हिंसाचार विरोधी दिनानिमित्त भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. विधानपरिषद उपसभापती व स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्र शासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या ४ थे महिला धोरणातील मुद्द्यांवर प्रत्यक्षात काम करत असताना महिलांना कसा उपयोग करता येईल याबाबत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मार्गदर्शन केले. याबाबत गटचर्चाही करण्यात आली.

स्त्री आधार केंद्राच्या या कार्यक्रमांमध्ये दोन ठराव उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यामार्फत मांडण्यात आले आणि ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले. यामध्ये कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा २००५ ची अंमलबजावणी अद्यापपर्यंत होत नाही तसेच यामध्ये योग्यवेळी प्रतिबंधात्मक कारवाई संबंधित पीडितेच्या पतीवर करण्याबाबत पहिला ठराव संमत करण्यात आला. तसेच बीट स्तरावर महिला दक्षता समिती स्थापन करून महिलांचा सक्रिय सहभाग घेण्यात यावा याबाबत ठराव मांडण्यात आला.

स्त्री विषयक प्रश्नांवर काम करणाऱ्या विविध संघटना व स्त्री आधार केंद्र सदस्यांच्या स्थापित एकूण ४ गटांमार्फत ४ थे महिला धोरणातील १२ विषयांवर स्त्रियांचे प्रश्न व त्यावरील संभाव्य उपाययोजना याबाबत सखोल चर्चा करण्यात आली व त्याचे दस्तऐवजीकरण करण्यात आले.

महिलांचे प्रश्न, त्यावर सदस्यांनी केलेले काम आणि त्यातून आलेले अनुभव, त्यातील आव्हाने, शासनाची धोरणे, योजना तसेच अंमलबजावणीतील त्रुटी व अडचणी आणि त्यावरील उपाय यावर सखोल चर्चा होणे अपेक्षित आहे. स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून याची सुरुवात झाली असून यातून आपण गटचर्चेमधून आलेले निष्कर्ष नोंदवून सादर करावे असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आवाहन केले.

पीडित महिलांना योग्य न्याय मिळवून देण्यात समाज कमी पडत असल्याने स्त्री अत्याचार विरोधी काम करणाऱ्या संस्थांनी शासन दरबारी न्यायासाठी पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी विशद केले.

त्याचबरोबर, “विद्यमान सरकारचे स्त्री अत्याचार रोखण्यात महत्त्वाची भूमिका राहिली आहे. लाडकी बहीण योजनेतून शासनामार्फत मदतीचा हात स्त्रियांना मिळाला आहे. यामध्ये स्त्री विषयक विविध संघटनांचे निश्चितच योगदान आहे”; असेही डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

या चर्चासत्राचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे महिलांवरील हिंसाचाराची गंभीरता समजून घेणे, त्यावर जनजागृती करणे आणि महिलांना सुरक्षित आणि समान अधिकार प्राप्त होण्यासाठी आवश्यक पावले उचलणे हा आहे.

यावेळी कार्यक्रमाला स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी, शिरीष फडतरे, ॲड. प्रार्थना सदावर्ते, अपर्णा पाठक, अनिता शिंदे, शोभा कोठारी, शिवसेना पंढरपूर जिल्हाप्रमुख आरती बसवंती, आश्लेषा खंडागळे, अनिता परदेशी, सुवर्णा कांबळे, राखी शिंगवी, मंगल पाटील, मंगल सोनटक्के, अनिता परदेशी, शुभांगी जगताप, कल्पना आव्हाड, नंदा उबाळे, रेणुका नाईक, रेखा कदम आणि स्त्री आधार केंद्राच्या महिला सदस्य व इतर सामाजिक स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या.

“पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने २६ जानेवारी भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा”

पुणे-

“२६ जानेवारी भारताच्या ७६ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पक्ष कार्यालय,गुप्ते मंगल कार्यालय, नारायण पेठ येथे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर यांनी विचार मांडताना म्हणाले, १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनामुळे आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण स्वातंत्र्यवीरांच्या आठवणींना उजाळा द्यायला पाहिजे. स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात ज्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाच्या संमिधा जाळल्या. त्याचे निखारे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर शांत झाले. हेच निखारे प्रज्वलित करणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री,पालकमंत्री ना.अजितदादा पवार यांना बळ देण्याचे काम पुणे शहरातून आपण सर्वजण सातत्याने करीत आहोत. नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आपण पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खूप चांगल्याप्रकारे काम केले आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पुणे शहरातील विविध समित्यांवर काम करण्याची संधी मिळावी यासाठी पक्षातील प्रमुख नेत्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री ना.अजितदादा पवार यांची भेट घेणार आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, पुणे महानगरपालिका निवडणुका लवकरच जाहीर होणार आहे. त्यामुळे आतापासूनच नवीन मतदार नोंदणी करणे, सदस्य नोंदणी करणे,आरोग्य शिबीर,रक्तदान शिबीर, विविध स्पर्धेचे आयोजन करणे, शैक्षणिक उपक्रम राबवीत समाजाच्या तळागाळापर्यंत काम केले पाहिजे. बूथप्रमुख व हजेरी प्रमुख यांच्या बैठका घेऊन मतदार यादीचा आढावा घ्यावा. महानगरपालिका निवडणुकीची पूर्वतयारी करण्याबाबत शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या वेळी शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, प्रदेश प्रतिनिधी विजय आप्पा रेणुसे, प्रवक्ते महेश शिंदे, माजीविरोधी पक्षनेते दत्ता सागरे, सांस्कृतिक प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, माजी नगरसेवक फारुख इनामदार, उषा कळमकर, पद्मजा गोळे, विधानसभा कोथरूड अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, शिवाजीनगर अध्यक्ष अभिषेक बोके, पुणे कँन्टोन्मेंट अध्यक्ष नरेश जाधव, प्रदेश पश्चिम युवक अध्यक्ष महेश हांडे, शहरातील सेलचे सेवादल अध्यक्ष शशिकला कुंभार, युवती अध्यक्ष पूजा झोळे, विद्यार्थी शुभम माताळे, अल्पसंख्याक अध्यक्ष समीर शेख, सामाजिक न्याय अध्यक्ष जयदेव इसवे,महिला अल्पसंख्याक अध्यक्ष नूरजहाँ शेख, महिला बचत गट अध्यक्ष अश्विनी वाघ, ग्राहक संरक्षण अध्यक्ष राजेंद्र घोलप, दिव्यांग अध्यक्ष पंकज साठे, सोशल मिडिया अध्यक्ष शीतल मेदने, वैद्यकीय मदत कक्ष अध्यक्ष विजय बाबर, बँक कर्मचारी अध्यक्ष गिरीश मेंगे, ख्रिश्चन अध्यक्ष मायकल साठे,विधानसभा महिला कोथरूड अध्यक्ष तेजल दुधाने, शिवाजीनगर अध्यक्ष नूतन गायकवाड, हडपसर अध्यक्ष वैष्णवी सातव, कसबा अध्यक्ष सुप्रिया कांबळे, समन्वयक शंकर शिंदे, महिला कार्याध्यक्ष गौरी जाधव, पूनम पाटील, शहर सरचिटणीस शलाका पाटील, धनंजय पायगुडे, राम पालखे, अर्चना चंदनशिवे, अनिकेत कोठवडे, मंथन जागडे, शहर निरीक्षक रुहीसबा सय्यद, कोथरूड निरीक्षक माणिक दुधाने, पुणे कँन्टोन्मेंट निरीक्षक मुनीर सय्यद, शहर उपाध्यक्ष प्रवीण पवार, शीतल जौंजळ, डिंपल इंगळे, वनिता जगताप, आनंद सागरे, गजानन लोंढे, राहुल पायगुडे, रामदास गाडे, गिरीश मानकर, दत्ता कांबळे, आनंद तांबे, चेतन मोरे, रुपेश आखाडे, रुपेश संत, लावण्या शिंदे, सत्यम पासलकर, बाळासाहेब आहेर, विपुल म्हैसूरकर, प्रदीप पवार, विक्रम मोरे, विशाल आगरवाल, अतुल जाधव, कविता राक्षे, मारुती आवरगंड, मीना कट्टीमणी, वंदना साळवी, करुणा गायकवाड, माधवी मोरे, अविनाश पटेल, मुस्ताक पटेल,भाऊ तुपे, सागरराजे भोसले, संजय कडवे, सुनिता चव्हाण, सुजाता कटके, चांद मनुरे, नवनाथ खिलारे, राधिका वाईकर, शिवानी पोतदार, कार्तिक थोटे, अर्चिज पाटील, विजय चव्हाण, दिनकर रोडे, भारत पंजाबी, आशा दीक्षित, प्राजक्ता देसले, संदीप गाडे, अविचल आंबुलकर, मीना थोरात, अली शेख, संतोष गायकवाड, विशाल गद्रे, प्रकाश गोळे, कांता खिलारे, पूनम तुसाम, श्रद्धा गायकवाड, जयश्री जोरी, सोनाली चौगुले, अफजल पटेल, राजश्री शिंदे, मिनाज शेख, मंगेश वाघमारे,पराग गोडबोले, कृष्णा लिंगे, गौरव खापरे, हेमंत कदम, दत्तात्रय निंबाळकर, अर्जुन आदमाने, अमर पठारे, पूजा पठारे, शाम शेळके, अनिस शेख, युनुस अन्सारी, संजय चव्हाण, सुनील कांबळे, सुभाष कसबे,दीपक तांबे,अमोल पोतदार,प्रवीण दुधाने, लहू पारगे, सचिन अगरवाल, सुवर्णा गोरे, नितीन ढवळे, फरदीन पटेल, मनोरमा खंडागळे, आशा कांबळे, सुनिता म्हेत्रे, नीलम भिसे, पदाधिकारी,कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

इस्त्राईल येथील रोजगाराच्या संधींबाबत ३१ जानेवारीरोजी शिबाराचे आयोजन

पुणे, दि. २७: वैद्यकीय क्षेत्रातील अर्हताप्राप्त उमेदवारांना इस्राईल देशात ‘घरगुती सहायक’ या पदाकरीता रोजगाराची संधी उपलब्ध असून याबाबत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ, पुणे येथे ३१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता शिबाराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहायक आयुक्त सागर मोहिते यांनी दिली आहे.

या शिबीरात उमेदवारांना इस्राईल येथील आरोग्य क्षेत्रातील संधीबाबत तपशीलवार माहिती देण्यात येणार असून इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणाऱ्या अर्जाबाबत माहिती देण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी या संधींचा लाभ घेण्याकरीता शिबारात सहभागी व्हावे.

या रोजगाराच्या संधींचा लाभ घेण्याकरीता २५ ते ४५ वयोगटातील उमेदवाराकडे इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असावे. यासोबतच उमेदवारांकडे काळजीवाहू (घरगुती सहायक) सेवांसाठी निपुण,पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त असलेले व किमान ९९० तासांचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. भारतीय प्राधिकरणाद्वारे मान्यता प्रदान केलेल्या मिडवायफरीमधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंटमधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक, तसेच जीडीए,एएनएम,जीएनएम, बीएससी नर्सिंग, पोस्ट बीएससी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे किमान ३ वर्षे वैध असणारा पासपोर्ट असणे अनिवार्य आहे. उमेदवाराने यापूर्वी इस्राईलमध्ये काम केलेले नसावे. त्याचा किंवा तिचा जोडीदार, पालक किंवा मुले इस्राईलमध्ये सध्या काम करत असू नयेत किंवा इस्राईल देशाचे रहिवासी नसावेत.

अधिक माहितीकरीता https://maharashtrainternational.com या या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे. जिल्हा कौशल्य विकास कार्यालयास ०२०-२६१३३६०६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्हयातील वैद्यकीय महाविदयालये, नर्सिंग महाविद्यालये व संबंधित संस्थांनी याबाबत पुढाकार घेऊन अधिकाधिक उमेदवारांपर्यंत पोहचवावी तसेच या शिबीरास उपस्थित राहण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन श्री. मोहिते यांनी केले आहे

कोथरुड मधील अंथरुणाला खिळलेल्या ज्येष्ठ रुग्णांसाठी ‘संजीवनी’

ना. चंद्रकांतदादा पाटील, संजीवन हॉस्पिटल आणि एमक्युअरच्या माध्यमातून ५० बेड्सचे केअर सेंटर कार्यान्वित

पुणे -कोथरुड मधील ज्येष्ठ नागरिकांना दुर्धर आजाराने अंथरुणाला खिळल्याने किंवा परावलंबीत्व आल्याने, आपला उतार वयातील आनंद त्यांना उपभोगता येत नाही. अशा ज्येष्ठ नागरिक रुग्णांसाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून आणि संजीवन हॉस्पिटल आणि एमक्युअरच्या माध्यमातून संजीवन केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले असून, त्यांचे उद्घाटन आज नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पत्नी अंजली पाटील यांच्या हस्ते झाले.

यावेळी महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पृथ्वीराजबाबा देशमुख, इंडियन बिझनेसचे अध्यक्ष अनिल कोथालिया, एमक्युअर फार्माचे राजेश नायर, सीजीएचएसचे सी. पी. चौधरी, एमटीईएसचे उपाध्यक्ष डॉ. प्रसाद केळकर, सचिव सुरेंद्र चौगुले, वैद्यकीय संचालक डॉ. जितेंद्र अगरवाल, डॉ. मनीषा सोळंकी, भाजपा कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

पुणे सारख्या महानगरात आज अनेकजण नौकरीच्या निमित्ताने परदेशात स्थाईक झाले आहेत. त्यांच्या आप्त स्वकीयांना एकटेपणामुळे मानसिक तथा दुर्धर आजारांना सामोरे जावे लागते. तर अनेकदा अपघात आणि इतर कारणाने अनेजण रुग्ण अंथरुणाला खिळतात. या रुग्णांची शुश्रूषा करणे बरीच अवघड गोष्ट असते. असे रुग्ण जास्त वेळ अंथरुणाला खिळल्याने ‘बेडसोल’ सारख्या समस्या निर्माण होत असते. त्यामुळे या रुग्णांची सुश्रूषा असते.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून आणि कोथरूड मधील संजीवन हॉस्पिटल आणि एमक्युअर फार्माच्या माध्यमातून संजीवन केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत असाध्य आजाराने ग्रस्त रुग्णांची वैयक्तिक स्वच्छता, औषधोपचार, उपचार, आहार, व्यायाम आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ५० बेड्सचे हे केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर केवळ सेवाभावी वृत्तीने हे केअर सेंटर चालविण्यात येणार आहे.

चंद्रकांतदादा पाटील हे अतिशय संवेदनशील मंत्री आहेत. एखादा विषय मनात आला की, तो पूर्ण करण्यासाठी ते झोकून देऊन काम करतात. दादांनी कोविड काळात कोथरुडकरांना अतिशय मोलाची मदत केली. त्यांच्या सारखे कार्य आजपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीनी केलेले नाही. सामान्य माणसाशी जोडले गेल्यानेच; समाजाची गरज ओळखून चंद्रकांतदादा आपले उपक्रम राबवित असतात, त्यातून सर्वांनाच प्रेरणा मिळते, अशी भावना महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पृथ्वीराजबाबा देशमुख यांनी व्यक्त केली.

एमक्युअरचे राजेश नायर म्हणाले की, समाजातील आंथरुणाला खिळलेल्या रुग्णांची सेवा करण्यासाठी हा उपक्रम सुरु होत आहे. आणि या उपक्रमात जोडलं जाणं हे अतिशय आनंदाचे आहे. संजीवन केअर सेंटरच्या माध्यमातून अशा गरजू रुग्णांची सेवा होईल, असा विश्वास व्यक्त केला.

“संविधान गौरव महोत्सव”: सहा हजार महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा
मुंबई,दि.27 :- भारतीय राज्यघटनेच्या ७५ वर्षांच्या ऐतिहासिक पर्वानिमित्त राज्यातील सहा हजार पेक्षा अधिक महाविद्यालयांमध्ये फेब्रुवारीमध्ये संपूर्ण महिनाभर “संविधान गौरव महोत्सव” निमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन करणार असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, भारतीय राज्यघटनेने भारताला एक सार्वभौम, लोकशाही प्रजासत्ताक म्हणून स्थापित केले. भारताच्या इतिहासातील या ऐतिहासिक परिवर्तनात्मक क्षणाचा सन्मान करण्यासाठी फेब्रुवारी २०२५ मध्ये संपूर्ण महिनाभर संविधान गौरव महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
या महोत्सवाचा उ‌द्देश राज्यघटनेतील मूलभूत मूल्यांचा पुनरुच्चार करणे आणि नागरिकांना त्यांच्या घटनात्मक अधिकार व कर्तव्यांचे पालन करण्यासाठी प्रेरित करणे आहे. हा क्षण आपल्या सर्वासाठी व जगभरातील लोकशाही-प्रेमी नागरिकांसाठी अभिमानाचा क्षण असून लोकशाहीचा सण मोठ्या अभिमानाने साजरा करण्याचा हा प्रसंग आहे. असेही मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, दि. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारली या घटनेला दि २६ नोव्हेंबर २०२४ रोजी ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. दि.२६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना अंमलात येऊन २६ जानेवारी २०२५ रोजी या ऐतिहासिक घटनेस ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत.या ७५ वर्षांचा प्रवास उल्लेखनीय आहे आणि या प्रवासाच्या केंद्रस्थानी आपल्या संविधान निर्मात्यांची व्यापक दृष्टी आहे, ज्यांचे योगदान देशाच्या भावी वाटचालीसाठी आपल्याला मार्गदर्शन करीत राहील. राज्यघटनेच्या पूर्णत्वाची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये संविधान गौरव महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेची ओळख, नागरी कर्तव्ये व अधिकार या बाबत माहिती व्हावी, तसेच राज्यघटनेने दिलेल्या मुलभूत अधिकार व कर्तव्यांची माहिती समाजातील सर्व सामान्यापर्यंत पोहोचावी या उद्देशाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिनस्त असलेल्या सहा हजार महावि‌द्यालयांमध्ये फेब्रुवारी २०२५ मध्ये संपूर्ण महिनाभर ‘संविधान गौरव महोत्सव’ अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. असेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.
संविधान गौरव महोत्सव विविध उपक्रम
● संविधानाच्या ७५ वर्षपूर्तीनिमित्त राज्यातील सर्व अकृषि वि‌द्यापीठांमधून तज्ञांच्या व्याखानांचे आयोजन करणे,
●”भारतीय राज्यघटनेची ओळख” या विषयावर निबंध स्पर्धा व वत्कृत्व स्पर्धांचे आयोजन करणे, प्रश्नमंजुषा आयोजित करणे.पोस्टर / भित्तीपत्रके स्पर्धांचे आयोजन करणे, चर्चासत्र, कार्यशाळा, परिषदांचे आयोजन करणे.
●महावि‌द्यालयांमध्ये राज्य घटनेविषयीचे अभ्यासक, विषयतज्ञ यांना निमंत्रित करून त्यांची व्याख्याने आयोजित करणे.
●राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महावि‌द्यालयांनी सर्व सामान्यांपर्यंत राज्यघटना पोहोचवावी या करिता जनजागृती अभियान राबविणे.
●राज्यातील सर्व सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये राज्यघटने विषयी व्याख्याने आयोजित करणे

इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा मंत्री अतुल सावे यांनी घेतला आढावा

पुणे, दि. २७ : इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या घटकांसाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत विविध ५४ कल्याणकारी योजना राबविण्यात येत असून वसतिगृह व आश्रमशाळा योजनेंतर्गत विद्यार्थ्यांची उपस्थिती तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची वारंवार भेटी देऊन तपासणी करावी अशा सूचना मंत्री अतुल सावे यांनी दिल्या.

इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या स्थलांतरित कार्यालयाच्या उद्घाटनानंतर आयोजित विभागाच्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागाचे संचालक ज्ञानेश्वर खिलारी, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, महाज्योतीचे महासंचालक राजेश खवले, उपसचिव कैलास साळुंखे, सहसंचालक संतोष हराळे, प्रशांत शिर्के आदी उपस्थित होते.

मंत्री श्री सावे म्हणाले, राज्यात सन २०१७ मध्ये सामाजिक न्याय विभागातून नव्याने इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्थापना झाली. मागील अडीच वर्षात इतर मागास बहूजन समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. १०० विद्यार्थी क्षमतेचे मुला-मुलींसाठी ५६ वसतीगृह २६ जिल्ह्यात सुरु करण्यात आली आहेत. वसतीगृहात प्रवेश देताना जातप्रमाणपत्र पडताळणी करुनच प्रवेश देण्यात यावा. बोगस प्रमाणपत्र प्रकरणी गुन्हा दाखल करावा असे सांगून ते म्हणाले या विभागांतर्गत योजना राबविण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. परंतु शासनाच्या निधीचा योग्य विनियोग होईल याची सर्व अधिकाऱ्यांनी गंभीरपणे दखल घ्यावी. व विद्यार्थ्यांच्या तक्रारी येणार नाहीत यासाठी सर्व सोई उपलब्ध असल्याची वसतीगृह व आश्रमशाळांना भेटी देऊन खात्री करावी.

ते म्हणाले, ज्या जिल्ह्यात अद्याप वसतीगृहासाठी भाडेतत्त्वावर घेण्यासाठी जागा निश्चित करण्यात आलेल्या नाहीत त्या जिल्ह्यांनी तातडीने जागा निश्चित करुन प्रस्ताव सादर करावेत, विद्यार्थ्यांना भोजन भत्ता तसेच साहित्य पुरवठा प्राधान्याने करावा, वसतीगृह अनुदानाबाबत पाठपुरावा करावा असे त्यांनी सांगितले.

यावेळी मंत्री सावे यांनी मॅट्रिकोत्तर योजना, मॅट्रिकपूर्व योजना, परदेश शिष्यवृत्ती योजना, स्वयंम व आधार योजना, धनगर समाजातील विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी निवासी शाळेत प्रवेश,वसतीगृह योजना, आश्रमशाळा योजना, कै. वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना, कै. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, घरकुल योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, निपुण भारत योजनेंतर्गत विभाग व जिल्हा निहाय नोंदणी तसेच विभागातील रिक्त पदांचा आढावा घेतला.

प्रास्ताविकात श्री. खिलारी यांनी विविध योजना व त्याअंतर्गत खर्चाची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तसेच इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या वतीने संचालनालय स्तरावर आश्रमशाळा संहितेमध्ये सुधारणा करण्याचे कामकाज अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले.

बैठकीला पुणे, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नाशिक व लातूर प्रादेशिक उपसंचालक तसेच सहायक संचालक उपस्थित होते.

गोड्या पाण्यातील मासेमारी वाढविण्यासाठी धोरण तयार करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मत्स्य व्यवसाय विभागाच्या १०० दिवसांच्या नियोजनाचा घेतला आढावा

मुंबई, दि. २७ : राज्यात गोड्यापाण्यातील खंडांतर्गत मासेमारीला मोठा वाव आहे. सध्याच्या खंडांतर्गत मासेमारीमध्ये वाढ करण्यासाठी धोरण निश्चित करावे. तसेच मत्स्यबीज मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होण्यासाठीही धोरण तयार करावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे मत्स्य व्यवसाय विभागाच्या १०० दिवसांच्या नियोजनाचा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सविस्तर आढावा घेतला त्यावेळी त्यांनी सूचना केल्या.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, खंडांतर्गत मत्स्य व्यवसाय वाढवणे गरजेचे आहे. गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी मत्स्यबीज उपलब्धता अत्यंत महत्वाचे आहे. मत्स्यबीज उपलब्धता वाढविण्यासाठी ध्येयात्मक काम करावे. ज्या ठिकाणी राज्यात मत्स्य बीज प्रक्रियेविषयी चांगले काम होत आहे. त्यांना प्रोत्साहन आणि निधी देण्यात यावा. त्यासोबतच सागरी मासेमारी विषयी सर्वसमावेशक धोरण तयार करावे. केंद्र शासनाने मत्स्य व्यवसायास कृषी व्यवसायाचा दर्जा दिला आहे. केंद्राच्या नियमानुसार राज्यातील मत्स्य व्यावसायिकांना लाभ देण्याची कार्यवाही करावी. धरण क्षेत्रातील मासेमारी व्यवसायासाठीही सर्वसमावेशक धोरण तयार करावे. मासेमारी संस्थांचा कारभार पारदर्शक राहील असे पहावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.

मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन, यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे विभागाची माहिती सादर केली. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना यासह सागरी क्षेत्रात होणारे ड्रोन सर्वेक्षण, मासेमारी बोटी व मत्स्य व्यवसायिकांना देण्यात येणारे अनुदान व सोयी सुविधा, मत्स्य व्यवसाय वाढीसाठी उभारण्यात येत असलेल्या मत्स्य बंदर, मत्स्य बाजार, मरोळ येथील आंतरराष्ट्रीय मत्स्य बाजार यासारख्या सुविधांचीही माहिती देण्यात आली.

बैठकीस पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री यांचे मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासह संबंधित विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिव उपस्थित होते.

मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या स्थलांतरित कार्यालयाचे उद्घाटन

पुणे, दि. २७ : इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या स्थलांतरीत कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार उमा खापरे, आमदार बापूसाहेब पठारे, विभागाचे संचालक ज्ञानेश्वर खिलारी, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, महाज्योतीचे महासंचालक राजेश खवले, उपसचिव कैलास साळुंखे, सहसंचालक संतोष हराळे, प्रशांत शिर्के आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. सावे म्हणाले, कामाचे ठिकाण प्रशस्त असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामाचा उत्साह वाढेल. कार्यालयास पुरेशी जागा उपलब्ध करुन देण्यात आली असून विभागाने अधिक कार्यक्षमपणे व पारदर्शकपणे काम करावे. पेपरलेस कामकाजाला प्राधान्य द्यावे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजना तालुका स्तरापर्यंत पोहोचवाव्यात असे आवाहन त्यांनी यावेळी केले. श्री. सावे यांनी कार्यालयातील दालनांची यावेळी पाहणी केली.

यावेळी पुणे, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नाशिक व लातूर प्रादेशिक उपसंचालक, सहसंचालक, सहायक संचालक तसेच कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

देशातील प्रत्येक सैनिक महान योध्दा- ले.जनरल. बी.टी पंडीत

एमआयटी डब्ल्यूपीयूत ७६ वां प्रजासत्तादिन उत्साहात

पुणे, दि. २७ जानेवारी : “देशातील प्रत्येक सैनिक महान योध्दा असून भारतीय सेना सर्वोत्कृष्ट आहे. कल्पनेच्या जोरावर व्यक्तीचा विकास होतो परंतू देश अंतर्गत जीवन जगण्यासाठी संपूर्ण गोष्टींचे संतुलन आवश्यक आहे.”असे विचार पीव्हीएसएम ले.जनरल (निवृत्त) बी.टी पंडीत यांनी व्यक्त केले.
एमआयटी शिक्षण संस्था समूह, पुणे व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे तर्फे ७६वा प्रजासत्ताक दिन कोथरूड कॅम्पस येथे साजरा करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या प्रसंगी  ले.जनरल. बी.टी पंडीत व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिर्टीचे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड  यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी सौ. पुष्पा पंडीत, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, प्र कुलपती प्रा.डॉ. मिलिंद पांडे, डॉ. संजय कामतेकर, कुलसचिव प्रा.गणेश पोकळे व माईर अंतर्गत असलेल्या विविध संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहण नंतर एमआयटी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्ती पर कार्यक्रम सादर केले. तसेच एनसीसीच्या कॅडेट ने सादर केलेल्या परेड ने सर्वांना आकर्षित केले. तसेच सर्वांनी शपथ देण्यात आली.
बी.टी. पंडीत म्हणाले, “१९७१ च्या भारत पाकिस्तान लढाईत सहभागी असतांना अनेक अनुभव आले. यावेळी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी रेडिओच्या माध्यमातून सैनिकांनी केलेल्या कार्याची स्तुती करून संदेश दिला. वर्तमान काळात महिला सबलीकरण खूप गरजेचे आहे. या विद्यापीठाचे कार्य पाहता येथे देशातील नेतृत्व तयार होत असून ते राष्ट्र सेेवेसाठी महत्वाची भूमिका पार पाडतील.”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “आज संकल्पाचा दिवस आहे. भारतमातेसाठी समर्पित भावना जागविण्याचा हा दिवस आहे. भारतीय परंपरा आणि तत्वज्ञानाचे पालन करून सर्वांनी देशसेवा करावी. या देशातूनच संपूर्ण मानवतेला आणि विश्वासाठी शांतीचा संदेश दिला जात आहे. भारतमातेला विश्वगुरू बनण्याबरोबरच जगाला सुख, शांती आणि समाधान देण्याची शक्ती आहे.”
डॉ. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले, “प्रजासत्ताक दिनी स्वातंत्र्य सेनानींची आठवण गरजेचे आहे. त्यातून देश प्रेम, बलिदान आणि कर्तव्याची जाणिव होते. त्यांच्या तत्वांचे पालन करून हे विद्यापीठ सामाजिक समस्या सोडविण्यासाठी वचनबद्ध असून त्या दिशेने कार्यरत आहेत.”
यावेळी विद्यार्थी प्रतिनिधि पृथ्वीराज शिंदे यांनी विचार मांडले.
डॉ. आर.एम.चिटणीस यांनी प्रस्तावना मांडली.
प्रा.डॉ.गौतम बापट यांनी सूत्रसंचालन व अक्षदा सक्सेना यांनी आभार मानले.