पुणे : डीआरडीओच्या पुणे येथील उच्च उर्जा पदार्थ अनुसंधान प्रयोगशाळेतर्फे राष्ट्रीय ट्रेकिंग कॅम्प आयोजित करण्यात आला होता. या कॅम्पमध्ये डीआरडीओच्या राष्ट्रीय पातळीवरील जवळपास 100 शास्त्रज्ञ व संशोधकांनी सहभाग घेत किल्ले सिंहगडावर यशस्वी ट्रेक केला.
शिवव्याख्याते सौरभ कर्डे यांनी अभ्यासपूर्ण व अमोघ वाणीद्वारे सुभेदार तानाजी मालुसरे यांचा त्याग व बलिदानाबाबतचा इतिहास सांगितला. कल्याण दरवाजा, तानाजीकडा येथील रणसंग्राम प्रत्यक्षात पाहतोय अशी अनुभूती शास्त्रज्ञ व संशोधकांना आली. किल्ले सिंहगडाचा इतिहास, शिवकालीन युद्धनीती व शस्त्रास्त्रांचे वैशिष्ट्य या बाबतही कर्डे यांनी मार्गदर्शन केले.
सुभेदार तानाजी मालुसरे यांनी कर्तव्यनिष्ठेबाबत स्थापित केलेल्या उदाहरणातून प्रेरणा घेत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
या प्रसंगी किल्ले सिंहगडावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. एचईएमआरएल व एआरडीई यांच्यामार्फत वनविभागास चार कचरापेट्या देण्यात आल्या.
या प्रसंगी संचालक अनिल प्रसाद दास, संचालक डॉ. हिमांशू शेखर, व्यवस्थापक संजीव गुप्ता, क्रीडा विभाग सचिव शिशिर कुमार श्रीवास्तव व डीआरडीओ वेस्ट झोन स्पोर्ट्स काऊन्सिलचे अध्यक्ष के. पी. सी. राव, सचिव चेतन सोळंकी व खजिनदार तृप्ती पटेल उपस्थित होते.
एचईएमआरएल स्पोर्ट्स कमिटीमधील कृष्णकांत जाधव, सिद्धार्थ गायकवाड, जितेंद्र भेगडे, मोरेश्वर देशपांडे, जितेंद्र राऊत, संजय लोहकरे व मुरली शिंदे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
डीआरडीओतील शास्त्रज्ञ, संशोधकांनी जाणला तानाजी मालुसरे यांच्या शौर्याचा इतिहास
पुण्यात पुन्हा १८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या…
पुणे-शहर पोलीस दलातील १८ पोलीस निरीक्षकांच्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बदल्या केल्या आहेत. प्रशासकीय कारणासाठी या बदल्या केल्याचे या आदेशात म्हटले आहे.
बाणेर पोलीस ठाण्याचे गुन्हे निरीक्षक नवनाथ जगताप यांची बाणेर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांची बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हे पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. या बदल्यांमध्ये प्रामुख्याने पोलीस ठाण्यातील गुन्हे निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
बदली करण्यात आलेले पोलीस निरीक्षक (सध्याचे ठिकाण) व त्या पुढे बदलीचे ठिकाण
नवनाथ संभू जगताप (गुन्हे, बाणेर) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बाणेर पोलिस स्टेशन
शर्मिला शिवाजी सुतार (गुन्हे, खडक) ते (गुन्हे) समर्थ पोलिस स्टेशन
संगीता संपतराव देवकाते (गुन्हे, भारती विद्यापीठ) ते सायबर पोलिस स्टेशन
अजित पोपटराव गावीत (गुन्हे, पर्वती) ते नियंत्रण कक्ष
अनिल शिवाजी माने (गुन्हे, चंदननगर) ते (गुन्हे) अंलकार पोलिस स्टेशन
गुरुदत्त गोरखनाथ मोरे (गुन्हे, विशेष शाखा) ते (गुन्हे) नांदेड सिटी पोलिस स्टेशन
विकास तुकाराम भारमळ (गुन्हे शाखा) ते (गुन्हे) स्वारगेट पोलिस स्टेशन
रंगराव पांडुरंग पवार (गुन्हे शाखा) ते (गुन्हे) बाणेर पोलिस स्टेशन
राजेश दत्तू खांडे (वाहतूक शाखा) ते (गुन्हे) फुरसुंगी पोलिस स्टेशन
राघवेंद्रसिंह आबाजी क्षीरसागर ( नियंत्रण कक्ष) ते पोलीस कल्याण
मनोज एकनाथ शेडगे (नियंत्रण कक्ष) ते कोर्ट कंपनी
स्वाती रामनाथ खेडकर (गुन्हे, येरवडा) ते (गुन्हे) चंदननगर पोलिस स्टेशन
सुरज दत्तात्रय बेंद्रे (गुन्हे, कोंढवा) ते (गुन्हे) बिबवेवाडी पोलिस स्टेशन
अमर नामदेव काळंगे (गुन्हे, हडपसर) ते (गुन्हे) काळेपडळ पोलिस स्टेशन
रजनी जालिंदर सरवदे (वाहतूक शाखा) ते विशेष शाखा
आशालता गणेश खापरे (विशेष शाखा) ते (गुन्हे) विमानतळ पोलिस स्टेशन
सुरेखा मोतीराम चव्हाण (गुन्हे, अलंकार) ते (गुन्हे) सहकारनगर पोलिस स्टेशन
हर्षवर्धन वसंत गाडे (वाहतूक शाखा) ते नियंत्रण कक्ष
विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिला जीवे मारण्यासाठी अल्पवयीन विद्यार्थ्याने दिली 100 रुपयांची सुपारी
दौंड येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील प्रकार
पुणे- विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिला जीवे मारण्यासाठी 100 रुपये सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील दौंड येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत 22 जानेवारी रोजी हा प्रकार घडला. पालकांची खोटी स्वाक्षरी केल्याचे शिक्षकांना सांगितल्याचा राग आल्याने विद्यार्थिनीची सुपारी दिल्याची माहिती आहे. ही बाब शिक्षकांना समजल्यानंतरही शाळेची बदनामी होऊ नये, यासाठी शाळा प्रशासनाने हे प्रकरण झाकण्याचा प्रयत्न केला. ही बाब समोर आल्यानंतर मुख्याध्यापकांसह वर्गशिक्षक व शिक्षिका यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौंड येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत एका विद्यार्थ्याने पालकांची खोटी सही केली होती. हे सर्व त्याच वर्गातील एका विद्यार्थिनीने पाहिले. त्यानंतर तिने ही बाब त्या विद्यार्थिनीने वर्ग शिक्षिकेला सांगितली. विद्यार्थीनी वर्ग शिक्षिकेकडे तक्रार केल्यामुळे विद्यार्थ्याने तिच्याबद्दल मनात राग धरला होता. खोट्या सहीची माहिती शिक्षकांना सांगितल्याचा मनात राग धरून संबंधित विद्यार्थ्याने अल्पवयीन विद्यार्थिनीवर आधी बलात्कार करावा नंतर तिची हत्या करावी यासाठी 100 रुपयाची सुपारी दुसऱ्या वर्गातील अल्पवयीन विद्यार्थ्याला दिली
मुलांनी ज्या विद्यार्थ्याला सुपारी दिली, त्यानेच हा सर्व प्रकार अल्पवयीन विद्यार्थिनीला येऊन सांगितला. त्यानंतर त्या विद्यार्थिनीने आपल्या पालकांना याची माहिती दिली. आपल्या मुलीने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर वडिलांनी शाळेत जाऊन वर्गशिक्षक, सुपर वायझरसह मुख्याध्यापकांकडे याबाबत विचारणा केली. मात्र, शाळा प्रशासनाने त्यांना योग्य तो प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी थेट दौंड पोलिस ठाण्यात धाव घेत शाळा प्रशासनाविरोधात फिर्याद दिली.
शाळेचे मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांनी शाळेची बदनामी होऊ नये म्हणून हा धक्कादायक प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला. तसेच अल्पवयीन विद्यार्थिनीनेच मुलाची बदनामी करण्याच्या हेतुने सुपारी दिल्याचे सांगत तिला मानसिक त्रास देत तिचे शैक्षणिक नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून मुख्याध्यापक, वर्गशिक्षक आणि शिक्षिका अशा तिघांवर दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.
संताची शिकवणुक सत्य, न्यायाची चाड असणारी व निर्भयतेची असल्याने,संतांच्या महाराष्ट्रात, संत संस्कारांचे अधिष्ठान बळकट होण्याची गरज !
- काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी*
पुणे :
महाराष्ट्रात नुकत्याच बीड, परभणी, बदलापूर, ठाणे येथे घडलेल्या घटना या मानवतेस लाज आणणाऱ्या व देशात राज्याची बदनामी करणाऱ्या आहेत, तर दुसरीकडे संताची शिकवणुक सत्य, नैतिकता, मानवता व न्यायाची चाड असणारी व निर्भयतेची असल्याने.. सद्यः परीस्थितीत राज्यातील समाज जीवनात
संत संस्कारांचे व नैतिकतेचे अधिष्ठान अधिक बळकट करणे काळाची गरज असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी व्यक्त केले.
अम्युनेशन फॅक्टरी व सलग्न संस्था खडकी यांच्यावतीने हभप ‘किर्तन महोत्सवांचे’ आयोजन करण्यात आले होते. याच्या समारोप प्रसंगी गोपाळ दादा तिवारी यांनी विचार मांडले. कीर्तनकार ह.भ.प. संतोष महाराज पायगुडे, किर्तन महोत्सवाचे संयोजक व अध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर पंढरीनाथ वांजळे, रमेश भिडे पाटील, विकास नाना दांगट, भोलाशेठ वांजळे इ यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना गोपाळदादा तिवारी म्हणाले, वरील अमानवी घटनांमुळे महाराष्ट्र देशभर बदनाम होत असून
शिव – छत्रपतींच्या महाराष्ट्रात संतांचे संस्कार लोप पावत चालले काय(?) असा प्रश्न विचारून ते म्हणाले की,
“मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदूं ऐसे।
भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी।”
असे संत तुकाराम महाराज सांगून गेले आहेत. राष्ट्राला आदर्श ठरणाऱ्या संतांच्या भूमीत नीतिमत्तेला पायदळी तुडवून विकृती डोके वर काढत असेल तर वारकरी संप्रदायाने सज्जनांचा धाक वाढण्यासाठी, संतांची चळवळ तीव्र करणे व नैतिक अधिष्ठान प्रस्तापित करणे गरजेचे आहे असे काँग्रेस नेते, गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले.
हभप संतोष महाराज पायगुडे यांनी समारोपाच्या किर्तनात सांगितले की, ‘भारतभूषण म्हणावे असे आपले पुणे आहे. पुण्यात पहिला अभंग लिहिला गेला, ज्ञानेश्वरी पुण्यात लिहिली गेली इतकेच नव्हे तर देशातील पहिला दारूगोळा कारखाना पुण्यात उभा राहिला, अशी पुण्याची कीर्ती आहे.
या प्रसंगी.. सामुदायिक अभंगां बरोबरच.. “जहां सत्य, अहिंसा और धर्म का पग-पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा’ ही देश भक्तीपर सामुहीक गीत देखील गायले गेले..!
पैलवान माणिक ढोले, संतोष देशमुख, दगडूशेठ ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी कीर्तन महोत्सवाला भेट दिली.
अमिनेशन फॅक्टरीचे मुख्य महाप्रबंधक संजय हजारी, दीपक महाजन, विजय कुटील, मनमोहन खंदारे यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
महिलेचा विनयभंग करणार्या रिक्षाचालकास अटक
पुणे-
हडपसर येथून घरी जात असताना सिरम इस्टिट्युटजवळ रिक्षाचालकाने महिलेचा हात धरुन तिच्याबरोबर लज्जास्पद वर्तन केले होते. या रिक्षाचालकाला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.
शिवशंकर वैजनाथ परळीकर (वय २१, रा. श्रमिक वस्ती,गल्ली नंबर १८ कर्वेनगर) असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. ही घटना २४ जानेवारी रोजी घडली होती.
फिर्यादी या हडपसर येथून रिक्षाने त्यांच्या घरी मांजरी येथे जात होत्या. सिरम इस्टिट्युटजवळ रिक्षाचालकाने फिर्यादी यांचा हात धरुन त्यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या सूचनेनुसार तपास पथकाने त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले़ घटनास्थळ भागातील वेगवेगळ्या ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे रिक्षा निष्पन्न केली. तांत्रिक तपासाद्वारे शिवशंकर परळीकर याला अटक केली.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, गुन्हे निरीक्षक निलेश जगदाळे, अमर काळंगे यांच्या सुचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार संदीप राठोड, समीर पांडुळे, अभिजित राऊत यांच्या पथकाने केली आहे.
राज्य शासनातर्फे यावर्षीपासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव
- साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने घोषित
- तांत्रिक आणि बालकलाकार विभागातले पुरस्कार जाहीर
मुंबई : मराठी चित्रपट क्षेत्राला बळ देण्यासाठी यावर्षीपासून राज्य शासन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक मंत्री अॅड.आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली. त्याचबरोबर साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार विभागातले पुरस्कार जाहीर करण्यात आले.
मागील ६० वर्षापासून राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. राज्यात विविध ठिकाणी विविध संस्थांच्या मार्फत आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे आयोजन केले जाते. अशा संस्थांना १० लाखापासून ४ कोटीपर्यंत शासन अर्थसहाय्य करते. यावर्षीपासून मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्याची संकल्पना सांस्कृतिक मंत्री अॅड.आशिष शेलार यांनी मांडली, त्याला आता मुर्त स्वरूप आले आहे. यावर्षीचा हा पहिला चित्रपट महोत्सव मुंबईत होणार असून तीन दिवसांचा हा महोत्सव असेल. जे मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचत नाहीत असे चित्रपट या महोत्सवात दाखविण्यात येतील. प्रत्येक चित्रपटासोबत त्या चित्रपटाची टीम उपस्थित असेल जी थेट दर्शकांशी संवाद साधेल, या निमित्त काही विशेष परिसंवाद व या विषयातील अभ्यासकांच्या मुलाखती अशा आंतरराष्ट्रीय मानकांच्या स्वरूपात राज्याचा मराठी चित्रपट महोत्सव आयोजित केला जाणार आहे. याबाबतच्या तारखा व नियमावली लवकरच जाहीर करण्यात येतील. या महोत्सवात दर्जेदार मराठी चित्रपटांचा आस्वाद घेण्याची संधी चित्रपट रसिकांना मिळणार आहे. याबाबतची अंमलबजावणी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे.
राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने
सन 2022 या वर्षातील साठाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या अंतिम फेरीसाठी अनन्या, पाँडिचेरी, सनी, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे, ४ ब्लाईंड मेन, समायरा, गाभ, ह्या गोष्टीला नावच नाही, ग्लोबल आडगाव, हर हर महादेव या दहा चित्रपटांना अंतिम फेरीत नामांकन प्राप्त झाले आहे.
तर उत्कृष्ट बालकलाकार म्हणून श्रीनिवास पोकळे (छुमंतर) व अर्णव देशपांडे (आम्ही बटरफ्लाय) यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट कला दिग्दर्शन महेश कुंडलकर (उनाड), उत्कृष्ट छाया लेखन अभिजीत चौधरी (फोर ब्लाइंड मेन) ओंकार बर्वे (ह्या गोष्टीला नावच नाही) उत्कृष्ट संकलन यश सुर्वे (काटा किर्र), उत्कृष्ट ध्वनिमुद्रण सुहास राणे (ह्या गोष्टीला नावच नाही), उत्कृष्ट ध्वनी संयोजन लोचन प्रताप कानविंदे (हर हर महादेव), उत्कृष्ट वेशभूषा उज्वला सिंग (ताठ कणा), उत्कृष्ट रंगभूषा सुमित जाधव (ताठ कणा), यांना तांत्रिक विभागातील पुरस्कार जाहीर झाले आहेत.
पुरस्काराच्या प्राथमिक फेरीसाठी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या वर्षात सेन्सॉर झालेल्या एकूण ५० प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. या चित्रपटांचे परीक्षण मुग्धा गोडबोले, विवेक लागू, बाबासाहेब सौदागर, विजय भोपे, श्रीरंग आरस, राजा फडतरे, शरद सावंत, मेधा घाडगे, चैत्राली डोंगरे, विनोद गणात्रा, प्रकाश जाधव, शर्वरी पिल्लेई, जफर सुलतान, देवदत्त राऊत, विद्यासागर अध्यापक यांनी केले होते.
नामनिर्देशन विभागातील पुरस्कारांची नामांकने पुढीलप्रमाणे ;
- सर्वोत्कृष्ट कथा :
१. अनिल कुमार साळवे (ग्लोबल आडगाव)
२. पूर्वल धोत्रे (4 ब्लाईंड मेन)
३. सुमित तांबे (समायरा )
- उत्कृष्ट पटकथा :
१. इरावती कर्णिक (सनी)
२. पूर्वल धोत्रे- अभिषेक मेरुरकर (4 ब्लाईंड मेन)
३. तेजस मोडक – सचिन कुंडलकर (पॉंडिचेरी)
- उत्कृष्ट संवाद :
१. प्रवीण तरडे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)
२. मकरंद माने (सोयरिक)
३. सचिन मुल्लेमवार (टेरिटरी)
- उत्कृष्ट गीते :
१. प्रशांत मडपूवार (ग्लोबल आडगाव/गाणे – यल्गार होऊ दे)
२. अभिषेक रवणकर (अनन्या/गाणे-ढगा आड या)
३. प्रकाश (बाबा) चव्हाण : (फतवा/गाणे-अलगद मन हे)
- उत्कृष्ट संगीत :
१. हितेश मोडक (हर हर महादेव)
२. निहार शेंबेकर (समायरा)
३. विजय गवंडे (सोंग्या)
- उत्कृष्ट पार्श्वसंगीत :
१. अविनाश विश्वजीत (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)
२. हनी सातमकर (आतुर)
३. सौमिल सिध्दार्थ (सनी)
- उत्कृष्ट पार्श्वगायक :
१. मनिष राजगिरे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे/गीत – भेटला विठ्ठल माझा)
२. पद्मनाभ गायकवाड (गुल्ह/ गीत – का रे जीव जळला)
३. अजय गोगावले (चंद्रमुखी/गीत – घे तुझ्यात सावलीत)
- उत्कृष्ट पार्श्वगायिका :
१. जुईली जोगळेकर (समायारा/गीत – सुंदर ते ध्यान)
२. आर्या आंबेकर (चंद्रमुखी/गीत – बाई ग कस करमत नाही)
३. अमिता घुगरी (सोयरिक/गीत – तुला काय सांगु कैना)
- उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक :
१. राहूल ठोंबरे-संजीव होवाळदार (टाईमपास 3 / गीत – कोल्ड्रीक वाटते गार, वाघाची डरकाळी )
२. उमेश जाधव (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे/गीत- आई जगदंबे)
३. श्री. सुजीत कुमार (सनी/ गीत – मी नाचणार भाई)
- उत्कृष्ट अभिनेता :
१. प्रसाद ओक (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)
२. वैभव तत्ववादी (पॉन्डीचेरी)
३. ललीत प्रभाकर (सनी)
- उत्कष्ट अभिनेत्री :
१. सई ताम्हाणकर (पॉन्डीचेरी)
२. अमृता खानविलकर(चंद्रमुखी)
३. सोनाली कुलकर्णी (तमाशा लाईव्ह)
- उत्कृष्ट विनोदी अभिनेता :
१. मकरंद अनासपुरे (वऱ्हाडी वाजंत्री)
२. संजय नार्वेकर (टाईमपास)
३. भरत गणेशपुरे ( पिल्लू बॅचलर)
- सहाय्यक अभिनेता :
१. योगेश सोमण (अनन्या)
२. किशोर कदम (टेरीटरी)
३. सुबोध भावे (हर हर महादेव)
- सहाय्यक अभिनेत्री :
१. स्नेहल तरडे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)
२. क्षिती जोग (सनी)
३. मृण्मयी देशपांडे (चंद्रमुखी)
- उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता :
१. अकुंर राठी (समायरा)
२. रोनक लांडगे (ग्लोबल आडगाव)
३. जयदीप कोडोलीकर (हया गोष्टीला नावच नाही)
- उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री :
१. ऋता दुर्गुळे (अनन्या)
२. सायली बांदकर (गाभ)
३. मानसी भवालकर (सोयरिक)
- प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती :
१. आतुर
२. गुल्हर
३. ह्या गोष्टीला नावच नाही
- प्रथम पदार्पण दिग्दर्शन :
१. 4 ब्लाइंड मेन
२. गाभ
३. अनन्या
संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई १८ एप्रिलला भेटीला
भक्त संप्रदायातील अगदी लहान वयात मान्यता पावलेली देदीप्यमान शलाका म्हणजे संत मुक्ताबाई!
बुद्धिमान, ज्ञानी अशा संतांना आपल्या प्रखर विद्वत्तेने आणि अधिकारवाणीने गुरुमंत्र देऊन ही शलाका तळपती झाली. अशा संत मुक्ताबाईंचे आणि त्यांच्या कुटुंबाचे प्रेरणादायी चरित्र उलगडून दाखवणारा दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य मराठी चित्रपट १८ एप्रिलला आपल्या भेटीला येतोय. रेश्मा कुंदन थडानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे.
सप्रेम निवृत्ती आणि ज्ञानदेव । मुक्ताईचा भाव विठ्ठलचरणी ।
-संत चोखामेळा
आदिमाया आदिशक्ती संत मुक्ताईला भेटूया १८ एप्रिल २०२५ पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.. अशा कॅप्शनसह आलेल्या या पोस्टरमधून चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. या पोस्टरमध्ये संत ‘मुक्ताई’ विठूरायाची आराधना करताना दिसते आहे.
देहरूपाने संपले तरी कार्यरूपाने संजीवन असणाऱ्या मुक्ताबाईंच्या कार्य व विचारांना जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी मुक्ताई’ने निभावलेल्या माता ,भगिनी, गुरु अशा विविध भूमिकांचे पदर ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातून उलगडणार आहेत. स्त्री-पुरुष भेदापलीकडे जगणे शिकविणाऱ्या संत मुक्ताईंचा खडतर आणि भक्तीरसाने परिपूर्ण जीवनप्रवास आजच्या पिढीला ज्ञात व्हावा यासाठी ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा वेगळा प्रयत्न केल्याचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सांगतात.
संगीताची जबाबदारी अवधूत गांधी, देवदत्त बाजी यांनी सांभाळली आहे. छायांकन संदीप शिंदे तर संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज तर ड्रोन आणि स्थिरछायाचित्रण प्रथमेश अवसरे यांचे आहे. रंगभूषेची जबाबदारी अतुल मस्के तर वेशभूषेची जबाबदारी सौरभ कांबळे यांनी सांभाळली आहे. नृत्यदिग्दर्शन किरण बोरकर तर ध्वनीआरेखन निखिल लांजेकर यांचे आहे. पार्श्वसंगीत शंतनू पांडे यांनी दिले आहे. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. सहनिर्माते सनी बक्षी आहेत. केतकी गद्रे अभ्यंकर कार्यकारी निर्मात्या आहेत.
अविरत चौहानने पटकावले विजेतेपद
विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट आणि हिंद शक्ती सोशल फाउंडेशन यांच्या वतीने राज्यस्तरीय जलद बुद्धिबळ स्पर्धा
पुणे: अविरत चौहान याने १६व्या विनायक नवयुग मंडळ खुल्या राज्यस्तरीय जलद बुद्धिबळ स्पर्धेत सात फेऱ्यांअखेर ६.५ गुण मिळवून खुल्या गटाचे विजेतेपद पटकावले.
विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट आणि हिंद शक्ती सोशल फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा भांडारकर रोडवरील साने डेअरी चौक येथील मिलेनियम टॉवर्स येथे झाली. या स्पर्धेत सातव्या आणि अखेरच्या फेरीत पांढऱ्या मोहरांसह खेळताना अविरतला आदित्य जोशी विरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले. मात्र, ही बरोबरीही विजयासाठी पुरेशी ठरली. पहिले सहा डाव जिंकल्यानंतर केवळ एका डावात त्याला बरोबरीवर समाधान मानावे लागले. यात केवल निर्गुण आणि सौरभ म्हामणे यांनी प्रत्येकी सहा गुण मिळवले. मात्र, टायब्रेकमध्ये सरस ठरल्याने केवल दुसऱ्या, तर सौरभ तिसऱ्या क्रमांकावर राहिला. कुशाग्र जैन चौथ्या आणि आदित्य जोशी पाचव्या क्रमांकावर राहिला.
पहिल्या पंधरा क्रमांकांच्या खेळाडूंना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यात विजेत्या अविरत चौहानला पाच हजार रुपये रोख आणि करंडक, तर दुसऱ्या क्रमांकावरील केवल निर्गुणला चार हजार रुपये आणि करंडक; त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकावरील सौरभ म्हामणेला तीन हजार रुपये रोख आणि करंडक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून गेहना शिंगवी (३.५ गुण, ७०० रुपये, करंडक) आणि समृद्धी मकतेदर (३ गुण, ३०० रुपये आणि करंडक) देऊन गौरविण्यात आले. सर्वोत्कृष्ट प्रौढ खेळाडू म्हणून चंद्रकांत डोंगरे (४ गुण, ७०० रुपये आणि करंडक) आणि लहुचंद ठाकूर (३.५ गुण, ३०० रुपये आणि करंडक) देऊन सन्मानित करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय टेनिसपटू अंकिता रैना, जलतरण प्रशिक्षक मनोज एरंडे, सुनील पांडे लोहगावकर यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी चीफ आर्बिटर राजेंद्र शिदोरे, दीप्ती शिदोरे माजी राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू अपूर्व सोनटक्के, वरुण जकातदार अभिजीत मोडक, क्रीडा समिती अध्यक्ष योगेश माळी, दिनेश अंबुरे, समीर हळंदे यावेळी उपस्थित होते.
सातव्या आणि अंतिम फेरीचे काही निकाल : खुला गट – अविरत चौहान (६.५) बरोबरी वि. आदित्य जोशी (५.५), केवल निर्गुण (६) वि. वि. निहिरा कौल (५), सौरभ म्हामणे (६) वि. वि. ओम नागनाथ (५), कुशाग्र जैन (५.५) वि. वि. अर्णव कदम (५), गौरव बाकलिवाल (५) वि. वि. कुणाल शिंदे (४), यश वातरकर (५) वि. वि. ओंकार जाधव (४), निखिल भुते (४) पराभूत वि. आरुष डोळस (५), मिहीर सरवदे (५) वि. वि. मिलिंद नांदळे (४), चंद्रकांत डोंगरे (४) पराभूत वि. कल्पेश देवांग (५), भुवन शितोळे (४.५) बरोबरी वि. अलौकिक सिन्हा (४.५), पद्मानंद मेमन (४) पराभूत वि. रिषभ जठार (५), ओंकार चक्रदेव (४.५) वि. वि. श्रीकांत मुचंदिकर (३.५), अंश नायर (४.५) वि. वि. लक्ष्मण खुडे (३.५), अथर्व बाखरे (४.५) दिग्विजय भापकर (३.५), चंद्रकांत बाभुळगावकर (३) पराभूत वि. शुभम राहिंज (४).
१०० कोटींचे कर्ज मिळवून देतो सांगून सव्वा कोटींची फसवणूक
पुणे-पुणे भोसरी एमआयडीसी परिसरातील एका व्यावसायिकाची त्याच्याच मित्रांनी स्वामी महाराजांच्या मदतीने सव्वा कोटी रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्यावसायिकाने आपली मोल्ड कंपनी विकल्यानंतर त्याच्याकडे दीड ते दोन कोटी रुपये आले होते.
ही बाब त्याच्या मित्रांना समजल्यानंतर त्यांनी कट रचून त्याला बांधकाम व्यवसायात उतरण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी १०० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले. आरोपींनी व्यावसायिकाला प्रथम मोशीतील एका स्वामी महाराजांकडे नेले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर गुजरातमधील सुरत येथील कथित महाराजांच्या संपर्कात नेले. मुंबईतील डेस्टक बँकेतून कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने प्रोसेसिंग फी म्हणून रक्कम उकळली.
आरोपींनी बनावट आरबीआय मॅनेजरची भेट घडवून आणली आणि त्याला पाच लाख रुपये दिले. शेवटी बँकेची बनावट कागदपत्रे देऊन कर्ज मंजूर झाल्याचे सांगितले. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी संतोष सावकार कमलकर, किरण जगताप यांच्यासह एकूण दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे यांचे पथक पुढील तपास करत आहे. आरोपींमध्ये पटेल महाराज, स्वामी महाराज, हसमुखभाई मनसुखभाई कावड, महाकाली यांचाही समावेश आहे.
भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी लिपी जिवंत ठेवणे आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 28 : अक्षरलिपी या सभ्यता व संस्कृतीच्या वाहक असतात. भारतीय संस्कृती प्राचीन असून संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या लिपीचे जतन करणे गरजेचे आहे. अन्यथा आपला इतिहास विसरला जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सुलेखनकार अच्युत पालव लिखित ‘अक्षरभारती’ या कॅलिग्राफी पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते जहांगीर आर्ट गॅलरी येथे झाले. यावेळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, नवनीत प्रकाशनाचे संचालक अनिल गाला, पद्मश्री अच्युत पालव उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, पद्मश्री श्री.पालव अक्षर कलेला सर्वत्र पोहोचवत असून अनेक लोकांना या कलेमध्ये समाविष्ट करत आहेत. कोणत्याही व्यक्तीला एखाद्या विषयात चांगले गुण मिळवायचे असतील तर त्यांचे अक्षर चांगले असणे आवश्यक आहे. एक मोठा ज्ञानाचा खजिना देखील या अक्षरांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतो, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी श्री.पालव यांचे पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.
‘कोरेगाव-फलटण’ रेडे घाट मार्गाची पाहणी करून आराखड्यासह अंदाजपत्रक तयार करावे -उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. 28:- कोरेगाव शहरासह तालुक्यात सातत्याने होणारी वाहतूक कोंडी आणि संभाव्य रस्ते अपघात टाळण्यासाठी ल्हासुर्णे ते कुमठे बाह्यवळण रस्ता, तसेच ल्हासुर्णे-कुमठे-वडाचीवाडी बाह्यवळण रस्त्यांची कामे पुढील तीस वर्षांचा विचार करून दर्जेदार पद्धतीने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच कोरेगाव ते फलटण अंतर कमी करणाऱ्या रेडे घाट मार्गाची तातडीने पाहणी करून आराखड्यासह खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
कोरेगाव (जि. सातारा) तालुक्यातील रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उपमुख्यमंत्री कार्यालयातील समिती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोरेगावचे आमदार महेश शिंदे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, ग्रामविकास (रस्ते) विभागाचे सचिव सतीश चिखलीकर, सार्वजनिक बांधकाम (रस्ते) विभागाचे सचिव सदाशिव साळुंके, साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे), सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे), राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता साहेबराव सुरवसे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता युवराज देसाई उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव शहरासह तालुक्यातील वाहतूक कोंडी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी ल्हासुर्णे ते कुमठे, ल्हासुर्णे-कुमठे-वडाचीवाडी बाह्यवळण रस्त्यांची कामे तातडीने हाती घेण्याची आवश्यकता आहे. मात्र ही कामे करताना पुढील तीस वर्षांच्या वाढणाऱ्या वाहतुकीचा विचार करण्यात यावा. हे रस्ते दर्जेदार व मजबूत करण्यावर भर द्यावा. त्याचबरोबर एकसळ ते कुमठे रस्त्याचे कामही मार्गी लावावे.
कोरेगाव तालुक्यातील वाहतुकीचा ताण असलेला वर्धनगड घाट व त्रिपुटी येथील रस्त्याचे रुंदीकरण करून खिंड फोडण्यासाठी वनविभागाची परवानगी घेण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने तातडीने वनविभागाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
फलटण ते कोरेगाव प्रवासाचे अंतर कमी करणाऱ्या रेडे घाट मार्गाचे तातडीने पाहणी करून आवश्यक आराखडा व खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथे जड वाहतुकीसाठी उड्डाणपूल बांधणे, कोरेगाव येथे उड्डाणपूल बांधणे, वडूथ व वाढे पूलाची पुनर्बांधणी करणे, माहुली (ता. सातारा) येथे नवीन पूल बांधणे, ल्हासुर्णे पुलाची उंची वाढविणे, तळगंगा नदीवर पूलाचे काम मार्गी लावणे, कोरेगाव शहराजवळील रेल्वे स्टेशनजवळील पूलाची उंची वाढविणे, कोरेगाव शहरात ड्रेनेजसह विटांच्या चेंबरचे काँक्रिटीकरण करणे या विषयांचा आढावा घेण्यात आला.
अटल सेतूवर सध्याच्याच सवलतीच्या दराने आणखी एक वर्षभर पथकर आकारणी
मुंबई-
अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवर सध्या सुरू असलेल्या सवलतीच्या दरानेच आणखी एक वर्षभर पथकर आकारणी करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूच्या वापराकरिता यापुर्वी ४ जानेवारी २०२४ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत एमएमआरडीएने प्रस्तावित केलेल्या दराच्या ५० टक्के सवलतीच्या दराने पथकर (कमीत कमी २५० रुपये इतका) आकारणीचा निर्णय घेण्यात आला होता. या दराचा एक वर्षानंतर आढावा घेण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. त्यानुसार आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी एक वर्षभर म्हणजेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत सध्या सुरु असलेल्या सवलतीच्या दरानेच पथकर आकारणीस मान्यता देण्यात आली.
मुंबई महानगर विकास प्राधिकरणातर्फे उभारण्यात आलेला हा सुमारे २२ किलोमीटर लांबीचा अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू प्रकल्प १३ जानेवारी २०२४ पासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
पुण्याची भाग्यश्री फंड तिसऱ्यांदा महिला महाराष्ट्र केसरी
वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद व महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-पुणे जिल्हा संघाला तृतीय क्रमांकाचे सांघिक विजेतेपद
पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आणि माजी खासदार रामदास तडस यांच्या वतीने वर्धा मधील देवळी येथे वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद व महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व केलेल्या भाग्यश्री फंड हिने हॅट्ट्रिक करत महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळविला. या स्पर्धेत कोल्हापूर शहर प्रथम, कोल्हापूर जिल्हा द्वितीय तर,पुणे जिल्ह्याला १२० गुणांसह तृतीय क्रमांकाचे सांघिक विजेतेपद मिळाले,
महसूलमंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाचे अध्यक्ष मेघराज कटके, वरिष्ठ उपाध्यक्ष माऊली आण्णा ताकवणे, जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाचे सल्लागार संदिप भोंडवे, विलास कथुरे, गणेश भाऊ दांगट, दिनेश गुंड, मारुती मारकड, कार्याध्यक्ष पांडाभाऊ खाणेकर, खजिनदार नवनाथ भाऊ घुले, सरचिटणीस प्रा. प्रदिप बोत्रे व इतर पदाधिकाऱ्यांच्या वतीने सर्व खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले.
मेघराज कटके म्हणाले, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने कुस्तीगीरांना पोषक वातावरण देण्याचा नेहमीच प्रयत्न असतो. या प्रयत्नांचे सार्थक करुन भाग्यश्री फंड हिने मिळविलेला विजय हा इतर महिला कुस्तीगीरांसाठी देखील प्रेरणादायी आहे.
महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील पुणे जिल्ह्याच्या महिला कुस्तीगीरांची कामगिरी पुढीलप्रमाणे:- ५० किलो :- अर्पिता गोळे – तृतीय, ५९ किलो :- आकांक्षा नलावडे -तृतीय
६५ किलो :- प्रीतम दाभाडे- तृतीय, महिला महाराष्ट्र केसरी किताब वजन गट :- भाग्यश्री फंड -प्रथम
म. गांधी पुण्यतिथीदिनी सामुदायिक प्रार्थना,भजन,व्याख्यान
गांधीभवन येथे ३० जानेवारी रोजी आयोजन
पुणे :
राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे गुरुवार,दि.३० जानेवारी २०२५ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी साडेआठ वाजता सामुदायिक प्रार्थना,भजन कार्यक्रम होणार असून खासदार सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.सायंकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी आदरांजली सभा आयोजित करण्यात आली आहे.या सभेनंतर ‘गांधीजींची आजची प्रासंगिकता’ या विषयावर माजी साहित्य संमेलनाध्यक्ष तसेच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त डॉ.लक्ष्मीकांत देशमुख यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.हे कार्यक्रम गांधी भवन(कोथरूड) येथे होतील.महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
पुण्यात बेकायदेशीररित्या वास्तव्य:येमेनी परदेशी नागरीकांवर कारवाई
पुणे –
पुणे शहरामध्ये बेकायदेशीररित्या वास्तव्य करणा-या परदेशी नागरीक यांची तपासणी मोहीम विशेष शाखा अंतर्गत परकीय नागरीक नोंदणी विभाग (एफ आर ओ) यांचे कडून राबविण्यात येत आहे. सदर कारवाई अंतर्गत कोंढवा पोलिस स्टेशन हद्दीत परदेशी नागरीक रहाणा-या सोसायट्यांची तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे. सदर मोहीमे अंतर्गत मोनार्च रेजेन्सी १ व २ एन आय बी एम उंद्री रोड, कोंढवा या सोसायटीत ५ येमन पुरूष व २ यमेन महिला बेकायदेशीरपणे पासपोर्ट / विजा मुदत संपल्या नंतरही वास्तव्यास असताना दिसून आले आहे.
त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्या कागदपत्रांची परकीय नागरीक नोंदणी विभाग (एफ आर ओ) विशेष शाखा पुणे शहर याच्याकडुन चौकशी करुन त्याना (Leave India Notice) लिव इंडिया नोटीस देवुन त्यांच्या मायदेशात परत पाठविण्याची (Deportation) कारवाई सुरू आहे.
मा. पोलिस आयुक्त पुणे शहर श्री अमितेशकुमार यांनी शहरामध्ये बेकायदेशीररित्या राहणा-या सर्व परदेशी नागरीकांना (Leave India Notice) लिव्ह इंडिया नोटीस देवून (Deportation) कारवाई पुणे शहरात व्यापक स्तरावर सुरू केली आहे.
