Home Blog Page 484

बालगृहातील मुली व अठरा वर्षावरील माजी संस्थाश्रयी महिलांचे मूलभूत प्रश्न तात्काळ सोडवण्यावर भर द्यावा- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

चौथे महिला धोरण व बालगृहातून बाहेर पडलेल्या मुली व महिला यांच्या मागण्यांबाबत आढावा बैठक

मुंबई : ४ थे महिला धोरणाद्वारे बालगृहातून बाहेर पडलेल्या मुली आणि महिलांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याअनुषंगाने बालगृहातून बाहेर पडलेल्या मुली व महिलांचे अनाथ प्रमाणपत्र व मूलभूत प्रश्न तात्काळ सोडवण्यावर भर द्यावा, असे निर्देश विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आजच्या बैठकीत दिले.

यावेळी ४ थे महिला धोरण व बाल गृहातून बाहेर पडलेल्या मुली व महिला यांच्या मागण्यांबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आढावा घेतला. यावेळी महिला व बाल कल्याण विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण प्रवीण पडवळ, महिला व बालविकास विभागाचे सह आयुक्त राहुल मोरे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक रुपेश राऊत,गृहविभागाचे सह सचिव राहुल कुलकर्णी, महिला व बाल विकास विभागाचे उपसचिव आनंद भोंडवे, कौशल्य विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे, सनाथ वेल्फेअर फाउंडेशनच्या अध्यक्ष गायत्री पाठक उपस्थित होत्या.

याप्रसंगी बोलताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या, बालगृहातून बाहेर पडलेल्या मुली व महिलांना अनाथ प्रमाणात देण्यासाठी लोकशाही दिनासारखा महिन्यातील एक दिवस देण्यात यावा, जेणेकरून अनाथ मुली महिलांचा त्रास कमी होऊन संस्थेला कामकाज करताना सुलभता निर्माण होईल. तसेच अनाथ मुली व महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी महिला व बाल विकास विभाग व कौशल्य विकास विभागाने संयुक्तपणे प्रशिक्षण सत्र आयोजित करावे.

उपसभापती डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, भूमिहीन अनाथ महिलांना प्रधानमंत्री आवास योजना व घरकुल योजनांमध्ये, लाडकी बहीण व संजय गांधी निराधार योजनांमध्ये कसे सामावून घेता येईल याचा देखील विचार करण्यात यावा. तसेच अनाथ महिलांना शिक्षण, शैक्षणिक साहित्य व भोजन व्यवस्था मोफत देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

अनाथांना न्याय देण्यासाठी अनाथांची व्याख्या कशी शोधायची याबाबत ‘एसओपी’ तयार करण्यात यावे. कोरोनामध्ये आई-वडील गमावलेल्या बालकांचा सध्य परिस्थितीचा आढावा महिला व बालविकास विभागाने घ्यावा. पॉक्सो प्रकरणातील मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी व्हाट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून त्यांच्या आत्मविश्वास निर्माण होऊन सक्षमतेने स्वतःसाठी लढतील, असेही यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

बालगृहांचे आधुनिकीकरण करावे

बालकांना बालगृहांमध्ये आल्यावरती आपलेपणाची जाणीव निर्माण व्हावी तसेच सकारात्मक वातावरण तयार होण्यासाठी बालगृहांचे आधुनिकीकरण करावे, असे उपसभापती डॉ. गोऱ्हे यावेळी सांगितले. तसेच पोलीस विभागाने देखील बालस्नेही पोलीस स्टेशन उभारावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पुणे महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवणार – शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे

विश्व मराठी साहित्य संमेलन आणि आभार दौऱ्यानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे जिल्हा दौऱ्यावर; सासवड येथे होणार भव्य जाहीर सभा..!

पुणे/प्रतिनिधी

महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा निवडणुकीत भरभरून दिलेल्या आशीर्वादाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यभर आभार यात्रा काढत महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानत आहे. जालना येथे देखील आभार यात्रा काढत जाहीर सभे दरम्यान जनतेचे आभार मानले. याच पार्श्वभूमीवर दिनांक ३१ जानेवारी रोजी सासवड येथील पालखी तळ येथे आभार यात्रा काढून जनतेचे आभार मानणार आहेत. त्याचबरोबर पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात होणाऱ्या विश्व मराठी संमेलनास देखील भेट देणार असून या दोन्ही कार्यक्रमांच्या नियोजनार्थ शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन आढावा बैठक पार पडली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात महायुतीने विधानसभा निवडणूक लढवली. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती सरकारने केलेली कामे, युवक, महिला, शेतकरी, विद्यार्थी, कष्टकरी या सर्वांसाठी आखलेली धोरणे या जोरावर नागरिकांनी महायुतीला विजयी केले. या विजयाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने राज्यभर आभार यात्रा सुरू आहे. नुकत्याच जालना येथे पार पडलेल्या आभार दौऱ्यात नागरिकांचे त्यांनी आभार मानले. तसेच यावेळी नियोजित सभेस नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर येणाऱ्या 31 जानेवारीला सासवडच्या पालखी तळ येथे आभार यात्रेनिमित्त सभा पार पडणार आहे. तसेच फर्ग्युसन महाविद्यालयात सुरू होणाऱ्या विश्व मराठी संमेलनास देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून या दोन्ही कार्यक्रमाच्या नियोजनासाठी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सासवड येथे होणाऱ्या आभार यात्रेस पुणे शहरातून हजारो शिवसैनिकांसह नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती नाना भानगिरे यांनी दिली. त्याचबरोबर येणाऱ्या काळात पक्ष संघटन वाढीसाठी एकजुटीने काम करून महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना विजयाचा झेंडा फडकविणार असल्याचा एकमुखी निर्धार पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी केला.

कोट –
विधानसभा निवडणुकीत जनतेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेऊन महायुतीला भरघोस मतदान करत विजयी केले. येणाऱ्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत देखील जनता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेऊन महायुतीला विजयी करतील. तसेच येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा पुणे महानगरपालिकेवर फडकविणार असल्याचा निर्धार केला.

अतिक्रमणे आणि बेकायदा बांधकामे यावर आता पोलीस कारवाई सुरु

पुणे- शहरात वाढत असलेली धूळ, प्रदूषण आणि वाहतूक कोंडी आणि घुसखोरी लक्षात घेता घटनेने दिलेले अधिकार वापरून पुणे पोलिसांनी आता शहरातील अतिक्रमणे आणि बेकायदा बांधकामे यावर कारवाई करायचे ठरविलेले दिसते आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकतेच २ दिवसापूर्वी याबाबतचे संकेत दिले होते आणि आज काही ठिकाणी कारवाई सुरु झाल्याचे दिसून आले आहे. फक्त हि कारवाई मोठ्या स्वरूपात होणार कि किरकोळ हे मात्र येणाऱ्या काळात होणाऱ्या कारवायांच्या हालचाली वरूनच स्पष्ट होणार आहे.

आता पर्यंत केवळ महापालिका अशा ठिकाणी कारवाई करत होती . मात्र घटनेने पोलिसांना देखील अशा प्रकारचे अधिकार दिलेले आहेत जे कधी पोलिसांनी वापरलेले नाहीत. सुरक्षित वाहतूक व्यवस्था आणि जीविताचे रक्षण हि जबाबदारी पोलिसांवर देखील घटनेने दिलेली आहे. त्या अनुषंगाने रस्त्यांवरील अतिक्रमणे किंवा महापालिकेचा परवाना नसताना होणारी बांधकामे ,साईड मार्जिन, फ्रंट मार्जिन मधील पार्किंग च्या जागेत सुरु केलेले व्यवसाय, पदपथावर असलेली अतिक्रमणे हि सरार्स कोणतीही सूचना न देता पोलीस हटवू शकतात .

या पार्श्वभूमीवर काळेपडळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी कळविले आहे कि,आज दिनांक 29/01/25 रोजी आम्ही स्वतः व काळेपडळ पोलीस स्टेशन कडील स्टाफसह काळेपडळ पोलीस स्टेशन हद्दीमधील रहेजा विस्टा मोहम्मद येथील Vibgyor शाळे जवळ 100 ते 200 मीटर मधील पाच पान टपऱ्या सिगरेट व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करताना मिळून आल्याने सदरच्या पान टपऱ्या जेसीबीच्या सहाय्याने जमीन दोस्त करण्यात आल्या व पान टपरी चालक यांच्या विरुद्ध कोपटाच्या केसेस करण्यात आले.

हडपसर पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी कळविले आहे कि,’आज दिनांक 29/01/2025 रोजी मा पोलीस आयुक्त सो पुणे शहर यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही स्वतः तसेच पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे व तपास पथक अधिकारी व अंमलदार असे पुणे अतिक्रमण विभागास बोलावून मा सहायक पोलीस आयुक्त श्रीमती अनुराधा उदमले यांच्या उपस्थितीत कड वस्ती मगरपट्टा मागील रोडवरील शाळेच्या 100 मीटर अंतरामध्ये असलेल्या पानटपऱ्यांवर कारवाई करून 3 पानटपऱ्या चालकांविरुद्ध कोफ्ता कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.



तुमच्याकडे महिला कामावर आहेत ? मग वाचा, आणि पाळा पोलिसांची SOP

पुणे- जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विमाननगर मधील आय टी कंपनीतील तरुणीवर हल्ला झाल्याच्या घटनेने येथील महिला सुरक्षा विषयक वातावरण ढवळून निघाले असून आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जिथे जिथे महिला कामावर आहेत तिथे तिथे महिला सुरक्षा विषयक SOP लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ती जी कंपनी अगर व्यावसायिक पाळणार नाही त्याचेवर कारवाई करण्यात येईल. सध्या दोन महिन्यांच्या कलावधी साठी SOP तयार करण्यात आली असून यावर काही सूचना अगर आक्षेप अगर हरकती आल्यास त्यावर विचार करून आवश्यक वाटल्यास पुन्हा नवीन SOP करण्यात येईल किंवा आहे त्या SOP त बदल करण्यात येतील असे पोलीस आयुक्त यांनी म्हटले आहे.

काय आहे हि SOP

कामाच्या ठिकाणी महिलांची सुरक्षा मार्गदर्शक तत्वे / मानक कार्यप्रणाली (SOP)
प्रस्तावना :-
सर्व प्रकारच्या हिंसाचार आणि भेदभावापासुन मुक्त, सुरक्षित आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण हे महिलांचे मुलभुत अधिकार ओळखुन या मार्गदर्शक तत्वे मानक कार्यप्रणाली (SOP) चे उद्दीष्ट आहे की, पुणे शहरातील सर्व कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चीत करणे.
प्रमुख तरतुदी : –
१) सुरक्षा समित्यांची स्थापना :
१. १० किंवा अधिक महिला कर्मचारी असलेल्या प्रत्येक आस्थापनाने गहिलांच्या सुरक्षेशी संबंधीत समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक अंतर्गत समिती अनिवार्यपणे स्थापन करावी.
२. समितीमध्ये व्यवस्थापनाचे प्रतिनिधी, महिला कर्मचारी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी नियुक्त अधिकारी यांचा सनावेश असेल.
२) सुरक्षा ऑडिट :
१. पुणे शहरातील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी लक्षणीय महिला कामगार असलेल्या आस्थापनांचे नियमीत सुरक्षा लेखापरिक्षण (Security Audit) करावे.
२. पोलीस स्टेशनस्तरावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक व चौकी प्रभारी अधिकारी यांच्यासह अशा आस्थापनांचे एच. आर. (H.R.) प्रमुख अणि सुरक्षा प्रमुख यांचे व्हॉट्सअॅप ग्रुप्स तयार करावेत.

३. भौतिक सुरक्षा उपायांचे ऑडीट (प्रकाश, सीसीटीव्ही कव्हरेज, प्रवेश नियंत्रण) करावे, आपत्कालीन प्रतिसाद प्रोटोकॉल आणि कर्मचाऱ्यांसाठी जागरुकता कार्यक्रमांचे आयोजन करतील.
३) प्रवेश नियंत्रण :
१. कामाच्या ठिकाणी सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी क्ष-किरण बॅग स्कॅनर डी.एफ.एम.डी., इत्यादी उपकरणांचा वापर प्रवेश नियंत्रण साठी करावा.
२. अशा कंपन्यांच्या व्यवस्थापनाद्वारे महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी उपयुक्त ठिकाणे (vantage points), अंधार असलेल्या गल्ल्या, पाकींगची जागा या ठिकाणांची अचानकपणे तपासणी केली जाईल.
४) संवाद आणि सहयोग :
१. जलद संवाद सुलभ करण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या समस्यांना समन्वयीत प्रतिसाद देण्यासाठी कंपनी सुरक्षा प्रमुख आणि एच.आर. (H.R.) प्रमुख यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपची स्थापना करण्यात यावी. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी खात्री करणे आवश्यक आहे की प्रतिसाद जलद आहे आणि समस्यांचे त्वरीत निराकारण केले जाईल.
२. ज्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात महिला वर्ग काम करीत आहे अशा कंपन्यांची माहिती घेणेबाबतची कार्यवाही पोलीस उप आयुक्त, गुन्हे यांनी घेतली आहे. तसेच पोलीस उप आयुक्त / सहाय्यक पोलीस आयुक्त यांचे मार्फतीने माय सेफ पुणे (My Safe Pune) अॅपचे देखरेखीखाली क्युआर कोड आधारित बिट मार्शल गस्त तैनात करण्यात येणार आहे.
५) सीसीटीव्ही पाळत ठेवणे :
१. सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त (Wireless), आयटी टिम्स आणि स्थानिक पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांच्या समन्वयाने सर्व आस्थापनांच्या सीसीटीव्ही कव्हरेजबाबत सर्वसमावेशक तपासणी करतील, प्रवेश/निर्गमन क्षेत्र, पार्कीग परिसर आणि सामान्यांच्या आसपासच्या उपयुक्त ठिकाणे (vantage points) यावर विशेष लक्ष केंद्रित करतील

अंमलबजावणी :-

या निर्देशांच्या तरतुदींचे पालन न करणे हे बेपर्वाईचे कृत्य आणि अधिकृत आदेशांचे पालन न करणे मानले जाईल.
ही मार्गदर्शक तत्वे ६० दिवसांच्या कालावधीसाठी तात्पुरती जारी केली जात आहेत. या संदर्भात सूचना/आक्षेप कंपनी किंवा नियोक्त्याद्वारे किंवा सार्वजनिक सदस्याद्वारे ईमेल आयडीः वर किंवा पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे येथे सादर केले जाऊ शकतात. सूचना/आक्षेपांचा योग्य विचार केला जाईल आणि आवश्यक असल्यास आवश्यक ते फेरबदल केले जातील.

जनता वसाहतीत 48 तासात तब्बल 40 वाहनांची तोडफोड; 4 अल्पवयीन मुलांसह 6 जण पकडले .

पुणे : जनता वसाहतीत जुन्या भांडणाच्या वैमनस्यातून लोकांनी रस्त्यावर लावलेल्या गाड्यांना लक्ष्य केले आहे. सलग दोन दिवस जनता वसाहत व दत्तवाडी परिसरात वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडल्या असून त्यात ४० वाहनांचे नुकसान झाले आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील यांनी या भागाचा आज दौरा केला.

याबाबत पोलीस अंमलदार आनंद चव्हाण (वय ३४, रा. शिवमल्हार सोसायटी, कोंढवा) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सौरभ विनोद वीर (वय १९, रा. जनता वसाहत, पर्वती) आणि रितेश अशोक चंदनशिवे (वय २१, रा. पानमळा, दत्तवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तसेच इतर ४ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडिलांना मारहाण केल्याच्या जुन्या वादातून आरोपींनी आपल्या साथीदारांसह येऊन रस्त्यावर पार्क केलेल्या ३० ते ३५ वाहनांची तोडफोड केली. ही घटना जनता वसाहतीतील गल्ली क्रमांक १५, १६, १७ मध्ये २८ जानेवारी रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामध्ये २५ दुचाकी आणि ५ रिक्षा फोडण्यात आल्या. या टोळक्याने हातात लोखंडी रॉड घेऊन समोर दिसेल त्या वाहनांवर घाव घालण्यास सुरुवात केली. तोडफोडीच्या आवाजाने बाहेर आलेल्या काही नागरिकांना दमदाटी करत टोळक्याने दहशत माजवली.

या घटनेचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्हीवरुन दोघांना अटक केली. त्याच्या चार अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.

याघटनेनंतर २९ जानेवारी रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा निलायम पुलाजवळील कॉर्नरवर लावलेल्या ४ रिक्षा व ४ दुचाकी फोडण्यात आल्या.याबाबत अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील यांनी सांगितले की, जुन्या वादातून काल टोळक्याने ३० ते ३५ वाहनांची तोडफोड केली होती. पर्वती पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांचे इतर साथीदार अल्पवयीन आहे. आज सकाळी सिंहगड रोडवरुन आलेल्या टोळक्याने ४ रिक्षा व दुचाकीवर हातातील हत्याराने वार करुन त्यांची तोडफोड केली आहे. पर्वती पोलीस यांचाही शोध घेत आहेत.

पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, हा टोळी युद्धांचा प्रकार नाही. जनता वसाहतीतील दोन्ही टोळ्यांमधील गुंड सध्या कारागृहात आहेत. जुन्या भांडणाच्या वादातून या घटना घडल्या आहेत.

“मराठी कलाकारांना ना PF मिळतो ना पेंशन … सरकारने लक्ष द्यायला हवं – वैशाली सामंत”

सावनी रविंद्रच्या पॉडकास्ट मध्ये वैशाली सामंतने केली सरकारकडे मागणी“मराठी सिनेसृष्टीत आता समुद्रमंथनाची वेळ आली आहे – वैशाली सामंत”
आपल्या महाराष्ट्रात टॅलेंटची कमी अजिबात नाही आहे.गरज आहे ती फक्त सोबतीची, एका पाठबळाची.
 नुकतच राष्ट्रीय पुरस्कार विजेती सावनी रविंद्रने Music Podcast सुरू केला असून, त्यात संगीत सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांना बोलतं केलं आहे. याला प्रेक्षकांनी प्रचंड चांगला प्रतिसाद देखिल दिला आहे.    
नुकतच सावनीच्या या Podcast साठी सुप्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली सामंत आल्या होत्या. सावनीने आपल्या मराठी संगीत सृष्टीत काय बदल हवे आहेत असं विचारल्यावर वैशाली सामंत म्हणाल्या की, सरकराने आपल्या महाराष्ट्रात असलेल्या कलाकारांना घेऊन अनेक उपक्रम राबवले पाहिजेत. “आपल्या कलाकारांना PF मिळतो का तर नाही, पेंशन मिळते का तर नाही. मला असं वाटत की, एका कलाकाराला यशस्वीपणे पुढे जाण्यासाठी त्यांचे बेनिफिट्स योग्य वेळेत त्याला मिळाले तर तो नक्कीच गगन भरारी घेईल. आम्ही कलाकार जीव ओतून काम करायला तयार आहोत. आम्हाला एक संधी द्या आणि ही संधी फक्त सरकारच देऊ शकते. थोडसं सरकारने मराठी सिनेसृष्टीत लक्ष घालाव. सरकारने प्रत्येक कलाकाराला दरवर्षी एक तरी प्रोजेक्ट द्याला हवे त्यांचा संपूर्ण आढावा देखिल घ्यावा. आपल्याला सरकारच्या पाठबळाची गरज आहे. आता आपलं Competition हे मराठीत मर्यादित न राहता जगातल्या प्रत्येक कलाकारांशी आहे. आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे याचा आनंद आहे. कलाकार ही एक स्वतंत्र कंपनी आहे आणि हे सरकारला कळायला हवं. आता समुद्रमंथनाची वेळ आली आहे.” असं म्हणत वैशाली सामंत यांनी सरकारकडे मदतीचा हात मागितला आहे. आता सरकार याकडे कितपत लक्ष घालेल हे पाहणं गरजेच आहे.

श्री सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोडवर तृप्ती देसाई यांनी घेतला आक्षेप.. श्रद्धा महत्वाची, तुम्ही कपडे पाहणार कि श्रद्धा?

पुणे– श्री सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू केल्याने भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी यावर तीव्र आक्षेप नोंदविला आहे, त्या म्हणाल्या , भक्तांची श्रद्धा महत्वाची असते , त्याचे कपडे नाही . त्याचे कपडे तुम्ही पाहणार कि श्रद्धा ?

मुंबई येथील प्रसिद्ध मंदिर व असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान म्हणजे श्री सिद्धिविनायक मंदिरात जाताना आता ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. तसेच प्लॅस्टिक बंदीचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. काही भाविकांच्या तक्रारींनंतर ‘न्यास’च्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. या बद्दलची माहिती श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासचे सदस्य राहुल लोंढे यांनी दिली आहे. मात्र, या निर्णयावर आता भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी आक्षेप घेतला आहे.

तृप्ती देसाई यांनी श्री सिद्धिविनायक मंदिरात जाण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ड्रेस कोडवर आक्षेप घेतला आहे. त्या म्हणाल्या, सिद्धिविनायक मंदिरात आज ड्रेस कोड लागू करण्यात आलेला आहे. त्या संदर्भात असे सांगण्यात आलेले आहे की तिथे येणाऱ्या भक्तांनी जे आहे ते तोकडे कपडे घालायचे नाही. जीन्स असेल, वेस्टर्न कपडे चालणार नाहीत. पारंपरिक वेशभूषा करावी. पण आपण जर बघितले तर आपल्या इथे संविधानाने व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. कोणी कसे राहावे? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि जो मंदिरात येतो, तो श्रद्धेने येत असतो. त्यामुळे त्याची श्रद्धा बघायची, त्याच्या कपड्यांकडे कोणाचे लक्ष जात नसते, असे मत तृप्ती देसाई यांनी मांडले आहे.

पुढे बोलताना तृप्ती देसाई म्हणाल्या, भक्तांवर कुठलेही अशा पद्धतीचे नियम तुम्ही लाऊ शकत नाही कारण सिद्धिविनायकाचे दर्शन घ्यायला जगभरातून जे लोक येतात, ते वेगवेगळ्या जाती धर्मांचे लोक आहेत आणि वेगवेगळ्या जाती धर्मांची वेगवेगळी वेशभूषा असते. ते त्यांच्या वेशभूषेत जे आहे ते दर्शनाला येत असतात. त्यामुळे या संदर्भामधील सिद्धिविनायक ट्रस्टने हा निर्णय घेतला पाहिजे कारण कोणीही चुकीचे कपडे घालून मंदिरात दर्शनाला येत नाही. मंदिरात दर्शनाला कसे यावे हे भक्तांना चांगले कळते. ते तुम्ही शिकवण्याची अजिबातच गरज नाही, असेही तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत.

दरम्यान, श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासचे सदस्य राहुल लोंढे म्हणाले, मंडळाच्या विश्वास्तांची बैठक झाली. मंदिरात ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय बैठकीत घेतला आहे. काही भक्तांच्या तक्रारी, तर काहींच्या सूचना न्यासकडे आल्या होत्या. मंदिरात काही भाविक येतात. ते कुठल्या जातीचे, धर्माचे पंथाचे असतील. स्त्री असो वा पुरुष, अनेकांचे पेहराव हे समोरच्या व्यक्तींना संकोच वाटेल असे होते, अशी माहिती राहुल लोंढे यांनी दिली आहे.

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या:पोलीस तपासावर ताशेरे मारत हायकोर्टाने ५ आरोपी अखेर जामिनावर केले मुक्त

मुंबई- कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी पोलीस तपासावर ताशेरे मारत मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी पोलिसांनी पकडलेल्या ५ आरोपींना अखेरीस जामिनावर मुक्त केले आहे. सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित देगवेकर,भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या पाच आरोपींना जामीन मिळाला आहे. न्यायमूर्ती ए.एस. किल्लारे यांच्या एकलपीठाकडून हा निर्णय देण्यात आला आहे. या आरोपींना 2018 ते 2019 दरम्यान अटक करण्यात आली होती.कोल्हापूर येथे 16 फेब्रुवारी 2015 रोजी कॉम्रेड गोविंद पानसरे हे त्यांच्या पत्नीसह प्रभातफेरीसाठी गेले असताना त्यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर, चार दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला होता.

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील या आरोपींना अटक केल्यापासून ते तुरुंगातच असल्याचे समजते. त्यामुळे खटला लवकर निकाली लागण्याची शक्यता नसल्याने जामीन मंजूर करण्यात आल्याचे मुंबई उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. इतकेच नव्हेत तर हत्या प्रकरणातील तपासात लक्षणीय प्रगती झाली नसल्याने देखील हे पाचही आरोपी जामीनासाठी पात्र असल्याचा निर्वाळा देखील मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती ए.एस. किल्लारे यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आणखी एका आरोपी वीरेंद्रसिंह तावडेच्या जामीन अर्जाचा स्वतंत्रपणे आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील या आरोपींना तपासात प्रगती न दिसल्याने जामीनपात्र झाल्याचे न्यायालयाने म्हंटले आहे.

गेल्या सहा वर्षांपासून आपण अटकेत आहोत आणि अद्याप खटला सुरू आहे. नजीकच्या काळात तो संपण्याची शक्यता नाही, असा दावा करून आरोपींनी जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच दोन फरार आरोपीबाबत तपास वगळता कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या सर्व पैलूंनी तपास झाला आहे. त्यामुळे दोन फरार आरोपींच्या कारणास्तव प्रकरणाच्या तपसावर न्यायालयाने देखरेख सुरू ठेवण्याची गरज नसल्याचे काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते.

हत्येचे मुख्य सूत्रधार सापडेपर्यंत प्रकरणाच्या तपासावर देखरेख सुरूच ठेवण्याबाबत पानसरे कुटुंबीयांनी केलेली याचिका न्यायालयाने निकाली काढली. गेल्या 10 वर्षांहून अधिक काळापासून उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास सुरू होता.उपरोक्त निर्णय देताना, याप्रकरणी सुरू असलेला खटला जलदगतीने निकाली काढण्याच्या दृष्टीने खटल्याची दररोज सुनावणी घ्यावी, असे आदेशही न्यायालयाने दिले होते.

पाच महीन्यापासुन फरारी असलेल्या मोक्कातील ३ आरोपींना गुन्हे शाखेने पकडले

पुणे-मोक्का लावल्यावरही फरार झालेल्या, अन ५ महिने पोलिसांच्या हातावर तुरी दिलेल्या ३ आरोपींना अखेरीस गुन्हे शाखेने पकडले आहे.या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ अपर पोलीस आयुक्त गुन्हे, शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-२ राजेंद्र मुळीक, यांचे सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, युनिट-४ गुन्हे शाखा पुणे शहर यांनी युनिट-४ वे हद्दीमध्ये गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करुन रेकॉर्ड वरिल आरोपी वेक करणे तसेच गंभीर गुन्हयाचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकीस आणणे, पाहीजे फरारी आरोपी, मोक्कयातील आरोपीचा शोध घेवुन मिळुन आल्यास कारवाई करणेबाबत आदेश दिले.
दि.२८/०१/२०२५ रोजी गुन्हे शाखा, युनिट-०४ चे पथक चतुःश्रृंगी पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार जहांगीर पठाण, व विशाल गाडे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मोक्का गुन्ह्यातील पाहीजे आरोपी नामे किरण खुडे, दिपक डोके व अमन डोके हे इऑन आयटी पार्क समोरील गिल्ट हॉटेलमध्ये आहेत. अशी बातमी मिळाल्याने सदर पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांना माहीती दिली असता त्यांनी बातमीप्रमाणे खात्री करुन कारवाई करणेचे आदेश दिले.
गुन्हे शाखा, युनिट ०४ चे पथकाने बातमीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता बातमीतील वर्णनाचे इसम हे हॉटेल गिल्ट खराडी पुणे येथे मिळुन आल्याने सदर इसमांना ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्याची नावे १) अमन राजेंद्र डोके वय १९ वर्षे, रा. राजीव गांधीनगर, खडकी, पुणे, २) दिपक राजेंद्र डोके वय २३ वर्षे, रा. राजीव गांधीनगर, खडकी, पुणे, ३) किरण अनिल खुडे वय २३ वर्षे, रा. राजीव गांधीनगर, खडकी, पुणे असे असल्याचे सांगितले.
त्यांचेकडे प्राथमिक तपास करता, त्यांनी खडकी पोलीस स्टेशन गु. रजि. नं. २५२/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम १८९(२), १८९ (४), १९१(२), १९१(३), १९०, ११०, ३२४ (४) (५), ३३३, ३०५ (ए), ३१०, ३११ सह आर्म अॅक्ट ४ (२५) महाराष्ट्र पोलीस अधि. ३७ (१) सह १३५ क्रिमिनल लॉ अमेंडमेंड २०१३ चे कलम ७महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (२), ३(४) प्रमाणे त्याचे साथीदारांसह केला असल्याची कबूली दिली आहे. त्यांना पुढील कायदेशीर कारवाई करीता सहा. पोलीस आयुक्त खडकी विभाग पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.सदरची कामगिरीअपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-२ श्री. राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, युनिट-४ यांचे मार्गदर्शनात युनिट ४ कडील पोलीस उप निरीक्षक, वैभव मगदुम, पोलीस अंमलदार जहांगिर पठाण, विशाल गाडे, विठ्ठल वाव्हळ, प्रविण भालचीम, विनोद महाजन, सुभाष आव्हाड, चालक सहा.पो. फौ. शितल शिंदे यांनी केली आहे.

मगरपट्टा आयटी कंपन्यांसोबत पोलीस आयुक्तांनी साधला संवाद

पुणे-
महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या ७ कलमी कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त पुणे शहर यांचा आयटी कंपन्यांसोबत परिसंवादाचे दिनांक २९/०१/२०२५ रोजी ११.०० ते १२.३० या कालावधीमध्ये अॅम्पी थिएटर, आदीती गार्डन जवळ मगरपट्टा हडपसर पुणे येथे डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-५, पुणे शहर यांनी आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक पोलीस आयुक्त अमितेश कुमारआणि पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, उद्योजक सतीश मगर,तसेच व्यवस्थापकीय संचालक, व आयटी कंपन्याचे संचालक/व्यवस्थापक/आयटी अभियंता/कर्मचारी तसेच मगरपट्टा परिसरातील शाळेचे विदयार्थी इ. मान्यवर असे सुमारे १००० अधिक नागरीक उपस्थित होते.
सदर समारंभामध्ये प्रमुख मार्गदर्शक पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आयटी कंपनीतील काम करणारे कर्मचारी तसेच अभियंते/संचालक यांचे कार्यालयात येणा-या अडीअडचणी, परिसरातील महिला सुरक्षा, सायबर सुरक्षा, तसेच मगरपट्टा परिसरात निर्माण होणारी वाहतुक समस्या यावर मार्गदर्शन केले.
तसेच तंबाखु व सिगारेट मुक्त शालेय परिसराबाबत स्थानिक हडपसर पोलीसांना कोप्टा कायदा अंतर्गत कारवाई करण्याच्या स्पष्ट सुचना दिल्या. पुणे शहर आयटी करीता देशातील सर्वात सुरक्षित शहर राहील या करीता पुणे पोलीस कटीबद्ध आहे असे त्यांनी प्रतिप्रादन केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. राजकुमार शिंदे पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांनी केली. तर सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार अनुराधा उदमले सहायक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग यांनी मानले.
सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडणेस परिमंडळ ५ मधील हडपसर पोलीस ठाणे व इतर पोलीस ठाणेकडील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी मोलाचे सहकार्य केले.

रमेश गायकवाड यांची भाजपा ओबीसी सेल उपाध्यक्षपदी निवड

पुणे – खडकवासल्याचे रहिवासी रमेश गायकवाड यांची भाजप ओबीसी सेल पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.ओबीसी सेलचे अध्यक्ष नामदेव माळवदे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. गायकवाड हे खडकवासला मतदार संघात गेली अनेक वर्षे सामाजिक तसेच राजकीय कार्यात सहभागी आहेत. खडकवासला ग्रामपंचायत मध्ये त्यांच्या मातोश्री यांनी सरपंच व रमेश गायकवाड यांनी पंचायत सदस्य म्हणून काम केलेले आहे.दांडगा जनसंपर्क आणि लोकांच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून ते या भागात परिचित आहेत.नियुक्ती बद्दल आमदार भीमराव तापकीर,नगरसेवक अमोल बालवडकर, महाराष्ट्र राज्य ओबीसी सरचिटणीस प्रल्हाद सायकर, सचिव दत्ता कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर धनकुडे,जिल्हा उपाध्यक्ष अनिल मते, गणेश हगवणे, चारुदत्त लोखंडे, अंकित कोल्हे आदींसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

GBS चा १ रुग्ण दगावला,आजाराच्या फैलावाला महापालिकेचे पाणीपुरवठा खाते जबाबदार

पुणे- GBS चा १ रुग्ण पुण्यात दगावला असून ,शहराच्या विविध भागातील ११० पाणी नमुने रासायनिक व जैविक तपासाणीसाठी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा यांच्याकडे पाठविण्यात आले होते त्यापैकी ८ पाणी नमुने स्रोत पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिल्याने GBS च्या फैलावाला महापालिकेचे पाणीपुरवठा खाते जबाबदार असल्याचा आरोप निश्चित होऊ शकणार आहे .यामुळे पाणीपुरवठ्यात लक्षणीय सुधारणा करण्याचे काम युद्धपातळीवर करणे गरजेचे झाले आहे.
दरम्यान या आजरा विषयी महापालिकेने अधिकृत रित्या दिलेल्या माहिती नुसार हा एक ऑटोइम्यून डिसऑर्डर आजार आहे जिथे शरीराची रोगप्रतिकारक प्रणाली मज्जासंस्थेवर हल्ला करते. स्नायूमध्ये कमकुवतपणा येतो आणि गंभीर आजारांमध्ये अर्धांगवायू होतो.
थोडक्यात महत्वाचे-
• आज पर्यत एकुण १११ रुग्ण सापडले आहेत. तसेच १ संशयित मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी ३१ रुग्णांची GBS म्हणून निदान निश्चिती झाली आहे.
• यापैकी २० रुग्ण पुणे मनपा, ६६ रुग्ण हे नव्याने पुणे मनपा अंतर्गत समाविष्ट केलेल्या गावामधील आहेत, १२ रुग्ण पिपरी चिंचवड मनपा व ५ रुग्ण पुणे ग्रामीण व ८ इतर जिल्हयातील आहेत.
• त्यापैकी ७७ पुरुप व ३४ महिला आहेत.
• यापैकी १३ रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत.
• आजाराची सर्वसाधारण लक्षणे –
अ) अचानक पायातील किंवा हातात येणारी कमजोरी / लकवा
व) अचानकपणे उद्भवलेले चालण्यातील आास किवा कमजोरी.
क) डायरिया (जास्त दिवसांचा)

  • आतापर्यत केलेल्या उपाययोजना
    2 राज्यस्तरावरील शीघ्र प्रतिसाद पथकाने बाधित भागाला त्वरित भेट दिली.

पुणे मनपा व जिल्हयाला बाधित भागामध्ये सर्व्हेक्षण सुरु करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.
12 रुग्‌णांचे ५७ शौच नमुने राष्ट्रीय विषाणु संस्था पुणे येथे तपासण्यासाठी पाठविण्यात आले आहेत त्यापैकी १७ नोरो व्हायरस व ५ शौच नमुने कॅम्फेलोबॅक्टर जेजुनी साठी पोझीटीव्ह आले आहेत.
एकूण ७६ रक्त नमुने राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे येथे पाठविण्यात आले. सर्व नमुने झिंका, डेंग्यू, चिकुनगुनिया साठी निगेटिव्ह आहेत.
शहराच्या विविध भागातील ११० पाणी नमुने रासायनिक व जैविक तपासाणीसाठी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत त्यापैकी ८ पाणी नमुने स्रोत पिण्यास अयोग्य आहेत.
आरोग्य शिक्षण करण्यासाठी सुचना देण्यात आल्या आहेत.
2 खाजगी वैदयकीय व्यवसायिकांना आव्हान करण्यात आले आहे की जीबीएस रुग्ण आढळुन आल्यास त्वरित शासकीय आरोग्य यंत्रणा यांना कळवावे.
2 नागरिकांनी घाबरुन जाण्याची आवश्यकता नसुन आरोग्य विभागाची प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत तयारी आहे.
घरोघरी सर्वेक्षण अंतर्गत आजपर्यंत पुणे मनपा ३००३५ घरे, पिंपरी चिंचवड मनपा ५८९६ घरे व पुणे ग्रामीण ९१२१ अशा एकूण ४५०५२ घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.
• नागरीकांनी घ्यावयाची काळजी
अ) पिण्याचे पाणी दुषित राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. उदा. पाणी उकळून पिणे.
व) अन्न स्वच्छ आणि ताजे असावे.
क) वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा.
ड) शिळे अन्न आणि अर्धवट शिजलेले अन्न (chicken, mutton) खावू नये.
तरी, नागरिकांना आवाहन करण्यात येते की, जनतेने घावरून न जाता या आजाराची लक्षणे आढल्यास त्वरीत शासकीय रुग्णालयात जावे, तसेच नागरिकांनी या आजाराच्या प्रतिबंधासाठी काळजी घ्यावी.
अशी माहिती २८ जानेवारी २०२५ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन महापालिकेने दिलेली आहे.

महाकुंभ – संगम तीरावर चेंगराचेंगरी, 14 ठार:आखाड्यांचे अमृतस्नान रद्द; मोदी-शहा यांची योगींशी चर्चा

मंगळवार-बुधवारी रात्री दीडच्या सुमारास प्रयागराजच्या संगम किनाऱ्यावर चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 14 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. 50 हून अधिक जखमी आहेत. मात्र, मृत किंवा जखमींची संख्या याबाबत प्रशासनाने कोणतीही माहिती दिलेली नाही.

चेंगराचेंगरीनंतर प्रशासनाच्या विनंतीवरून सर्व 13 आखाड्यांनी आज मौनी अमावस्येचे अमृतस्नान रद्द केले आहे. आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी म्हणाले – संगमवर जास्त गर्दी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पीएम मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी सीएम योगी यांच्याकडून फोनवरून घटनेची माहिती घेतली.दरम्यान येथे उपस्थित पत्रकारांच्या मते, एका अफवेमुळे संगम नाक्यावर चेंगराचेंगरी झाली. काही महिला जमिनीवर पडल्या आणि लोकांनी त्यांच्यावर धाव घेतली. अपघातानंतर 70 हून अधिक रुग्णवाहिका संगम बँकेत पोहोचल्या. जखमी आणि मृतांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातानंतर एनएसजी कमांडोंनी संगम तीरावर पदभार स्वीकारला. संगम नाक्यावर सर्वसामान्यांचा प्रवेश बंद करण्यात आला. गर्दी आणखी वाढू नये म्हणून प्रयागराज शहरातही भाविकांच्या येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यासाठी शहराला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रशासनाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.आज महाकुंभात मौनी अमावस्येला स्नान असून, त्यानिमित्त शहरात सुमारे ५ कोटी भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. रात्री उशिरापर्यंत संगमसह ४४ घाटांवर आठ ते दहा कोटी भाविक स्नान करतील, असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.याच्या एक दिवस आधी म्हणजेच मंगळवारी साडेपाच कोटींहून अधिक भाविकांनी संगमात स्नान केले. संपूर्ण शहरात 60 हजारांहून अधिक सैनिक सुरक्षेसाठी तैनात आहेत.

एस टी दरवाढ विरोधात शिवसेनेचे रास्ता रोको

पुणे : निवडणूका झाल्या त्याअगोदर लाडक्या बहीणींना पैसे वाटले, मत घेतली. भ्रष्टाचारी सरकार सत्तेवर आलं, लाडकी बहिण सावत्र झाली. आणि एस टी दरवाढ गोरगरीब जनतेवर लादली गेली. एका बाजूने मतांच्या जोगव्याकरीता लाडक्या बहिणींना पैसे वाटायचे आणि दुसऱ्या बाजूने म्हणजे एस टी दरवाढ करून लाडक्या बहिणीसह दाजींच्या खिशातून पैसे काढून घ्यायचे. या दरवाढी विरोधात शिवसेना पुणे शहराचे वतीने भ्रष्टाचारी राज्य सरकार व एस टी महामंडळाच्या विरोधात पुणे शहरातील स्वारगेट एस टी स्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. परिवहन मंत्री म्हणतात एस टी दरवाढ कोणी केली मला माहीत नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जर परिवहन मंत्र्यांना न सांगता दरवाढ करणार असतील तर सरकारमधे मंत्र्यांची काही गरजच उरली नाही. परिवहन मंत्र्यांच्या हक्कावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री गदा आणत असतील तर परिवहन मंत्र्यांनी या दोघांचा निषेध करून राजीनामा द्यावा. दोन महिन्यांपूर्वी एस टी फायद्यात आहे, असे जाहिर केले जाते. मग आता असे काय झाले कि १५ टक्के एस टी दरवाढ सर्वसामान्य प्रवासी नागरिकांवर लादली गेली. लालपरीची अवस्था सरकारच्या नाकर्तेपणामुळे अगोदरच बिकट झाली आहे. त्यात सुधारणा करायची सोडून गरिबांच्या खिशाला चाट मारली गेली. तसेच डुप्लिकेट वकील सदावर्ते सरकारच्या आशिर्वादाने एस टी कामगारांची फसवणूक करत त्यांचे पैसे लाटतोय. त्यांची पिळवणूक करत आहे. सरकार यामधे लक्ष घालत नाही. एस टि दरवाढ त्वरीत मागे घ्यावी, नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी शिवसेना रस्तावर उतरली. सरकारने पोलिसांच्या माध्यमातून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. याचा निषेध शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांनी केला. आंदोलनात पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, महिला संपर्क संघटिका स्नेहल आंबेकर, सहसंपर्क कल्पना थोरवे, युवाधिकारी राम थरकुडे, निकीता मारटकर, विद्या होडे, स्वाती कथलकर, रोहीणी कोल्हाळ, अमृता पठारे, ज्योती चांदेरे, सुनिता खंडाळकर, सुलभा तळेकर,पद्मा सोरटे, दिपाली राऊत, संगीता भिलारे, पूजा चांदगुडे, परेश खांडके, उपशहरप्रमुख भरत कुंभारकर, समीर तुपे, आबा निकम, प्रशांत राणे, राजेंद्र शिंदे, संतोष गोपाळ, किशोर रजपूत, उमेश वाघ, संजय वाल्हेकर, रमेश क्षीरसागर, सचिन पासलकर, निलेश वाघमारे, विधानसभाप्रमुख अशोक हरणावळ, विभागप्रमुख सूरज लोखंडे, चंदन साळुंके, मुकुंद चव्हाण, दिलीप व्यवहारे, पराग थोरात, दिलीप पोमण, मकरंद पेठकर, रूपेश पवार, नंदू येवले, संदिप गायकवाड उपस्थित होते.

एसटीची भाडेवाढ तात्काळ रद्द करा- नाना पटोले

जीबीएसचे रुग्ण वाढत असताना आरोग्य विभाग आहे कुठे? जीबीएसवर तात्काळ उपाययोजना करा.

मुंबई, दि. २८ जानेवारी २०२५
विधानसभा निवडणुकीत जनतेवर सवलतींचा वर्षाव करणाऱ्या भाजपा युती सरकारने सत्तेत येताच जनतेला लुटण्याचे काम सुरु केले आहे. आधीच महागाईवर नियंत्रण मिळवण्यात भाजपा युती सरकार सपशेल अपयशी ठरले असताना आता राज्यातील सर्वसामान्य जनतेची जीवन वाहिनी असलेल्या एसटीच्या तिकिटदरात १५ टक्के वाढ करून सरकार जनतेला लुटत आहे. ही तिकीट दरवाढ तात्काळ रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, एसटी बस सेवा राज्याच्या कानाकोपऱ्यात सुरु आहे, पण महामंडळाला ही सेवा व्यवस्थित देता येत नाही. एसटी महामंडळाच्या भोंगळ कारभाराचा फटका राज्यातील सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात तर एसटी बसची अवस्था पहावत नाही, शिवशाही नावाने सुरु केलेल्या बससेचीही दुरवस्था झाली आहे. प्रवाशांना व्यवस्थित सेवा देत येत नाही आणि दुसरीकडे महागाईचे कारण देत १५ टक्के भाडेवाढ केली आहे. एसटीच्या भाडेवाढीची परिवहन मंत्र्यांनाच माहिती नाही असे स्वतः मंत्रीच सांगत असतील तर त्यांनी पदावर कशाला रहावे? आपल्या खात्यात काय चालले आहे? याची माहितीच मंत्र्यांना नाही हे आश्चर्यकारक आहे. ज्या अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना विश्वासात न घेताच भाडेवाढीचा निर्णय घेतला त्यांना निलंबित करा. जनतेची लूट करणारा निर्णय माहित नसणाऱ्या मंत्री महोदयांना एसटी महामंडळाची राज्यातील १३६० हेक्टर मोकळी जागा बिल्डरांच्या घशात घालण्यात जास्त रस दिसत आहे. एसटी महामंडळ हे भ्रष्टाचाराचा अड्डा बनले आहे, हा भ्रष्टाचार थांबवला तरी भाडेवाढ करण्याची गरज पडणार नाही असेही पटोले म्हणाले.

गुइलेन बॅरे सिंड्रोम (GBS) आजाराकडे लक्ष द्या..
राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम (GBS) आजाराचे रुग्ण वाढत आहेत. या आजाराने सोलापुरात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची बातमीही प्रसार माध्यमातून आली आहे. राज्यात १०० पेक्षा जास्त रुग्णांना या रोगाची लागण झाली असून १३ रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याचे समजते. या आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलावीत, योग्य ती खबरदारी घेऊन जनजागृती करावी. राज्य सरकारने युद्ध पातळीवर यंत्रणा कामाला लावून या रोगाचा प्रसार होऊ नये यावर भर दिला पाहिजे. दुषित पाणी व अस्वच्छतेमुळे हा आजार होत असल्याचे समजते. ११ वर्षापासून ‘हर घर नल, हर नल में जल’ तसेच ‘स्वच्छता मोहिम’ राबिवली जात असतानाही स्वच्छ पाणी मिळत नसेल तर या योजना फक्त जाहिरातीतच दिसतात, असे म्हणावे लागेल असे नाना पटोले म्हणाले.