Home Blog Page 482

केंद्रीय जीएसटी व सीमाशुल्क विभागातर्फे पुण्यात क्रीडा स्पर्धा

पुणे-

केंद्रीय जीएसटी व सीमाशुल्क, पुणे क्षेत्रातर्फे आज व उद्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक मंडळाद्वारे (पश्चिम विभाग) या स्पर्धा होत आहेत.

पाषाण, पुणे  येथील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था अर्थात आयसर मध्ये या क्रीडा स्पर्धा होत आहेत. आज मयंक कुमार, आयआरएस, मुख्य आयुक्त, सीजीएसटी आणि सीमाशुल्क, पुणे क्षेत्र यांच्या हस्ते या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन झाले. के. आर. उदय भास्कर, आयआरएस, प्रधान मुख्य आयुक्त, सीजीएसटी, मुंबई, हॉकीपटू पद्मश्री धनराज पिल्ले व प्रा. सुनील भागवत, संचालक, आयआयएसईआर, पुणे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

डावीकडून उजवीकडे- के. आर. उदय भास्कर, मुख्य आयुक्त CGST मुंबई क्षेत्र, मिहिर कुमार, प्रधान आयुक्त, मयंक कुमार, CGST पुणे विभाग, पदमश्री डॉ. धनराज पिल्ले, प्रा. सुनील भागवत

अॅथलेटिक्स, बास्केटबॉल, फुटबॉल, क्रिकेट स्क्वॅश, लॉन टेनिस अशा 17 क्रीडा स्पर्धांचा समावेश या क्रीडा स्पर्धांमध्ये आहे. या स्पर्धेमध्ये गुजरात, गोवा तसेच महाराष्ट्रातील केंद्रीय जीएसटी, सीमाशुल्क व आयकर विभागाचे सहाशेहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले आहेत.

शाळकरी मुलांना अंडी व फळे देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत का?

मुंबई, दि. ३० जानेवारी २०२५
भाजपा युती सरकारने आता शाळकरी मुलांच्या आहारावरच गदा आणली आहे. मध्यान्न भोजन योजनेतून शाळकरी मुलांना आहारातून प्रोटीन मिळावे यासाठी अंडी व फळे दिली जात होती. परंतु भाजपा युती सरकारने आता अंडी व फळांना निधी देण्यास नकार देत शाळा व्यवस्थापनांनी स्वतः खाजगी देणगीदारांकडून पैसे उपलब्ध करावेत असा जीआर काढला आहे. सरकारचा हा निर्णय सरकारी शाळांमध्ये जाणाऱ्या सर्वसामान्य गरिब घरातील मुलांवर अन्याय करणारा आहे. हा निर्णय रद्द करून निधी पूर्वीप्रमाणेच द्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारु, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना अतुल लोंढे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार अजब गजब निर्णय घेणारे सरकार आहे. शालेय मुलांच्या मध्यान्न भोजन योजनेतील अंडी, दूध व फळांसाठी सरकारक़डे पैसे नसतील तर सरकारची आर्थिक परिस्थिती रसातळाला गेली आहे किंवा सर्वसामान्य गरीब घरांतील मुलांना पौष्टीक आहार मिळू नये असा त्याचा अर्थ आहे. गरिबांना महिन्याला ५ किलो मोफत धान्य व १५०० रुपये दिले म्हणजे हा घटक गप्प बसेल व सरकारला प्रश्न विचारणार नाही यासाठी हे षडयंत्र असावे. परंतु सरकारच्या या निर्णयाला काँग्रेस पक्षाचा विरोध आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा एक अंडे दिले जाते, त्यासाठी किती निधी लागणार आहे? तेवढेही पैसे सरकार नाहीत असे नाही. स्वतःची जाहिरातबाजी करण्यासाठी सरकार कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करते पण गरिबांना काही द्यायचे असेल तर निधी नसतो कसा? असा सवाल अतुल लोंढे यांनी विचारला आहे.

कलेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला आनंद देणारा दिवस – सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार

अभिनेते रमेश देव मार्गाचा नामकरण सोहळा संपन्न

मुंबई-मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते अशी चतुरस्र कामगिरी तब्बल सहा दशके करणारे ज्येष्ठ अभिनेते कै. रमेश देव यांच्या ९६ व्या जयंती दिनानिमित्ताने अंधेरी पश्चिम, वर्सोवा येथील रस्त्याचे ‘अभिनेते श्री. रमेश देव मार्ग’ असे नामकरण करण्यात आले.

मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंतांचा गौरव करण्यासाठी निर्मिलेल्या ‘मराठी चित्रपट कट्टा’ चे लोकार्पण आणि रस्त्याचे नामकरण सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार अमित साटम यांच्या संकल्पनेतून हे नामकरण करण्यात आले.

‘मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेते रमेश देव यांची महती खूप आहे, या महान कलाकाराच्या नावाचा मार्ग होणे हे समस्त महाराष्ट्रासाठी आणि कलेवर प्रेम करणाऱ्या सर्वांना आनंद देणारा दिवस असल्याची भावना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी यावेळी व्यक्त केली. ‘मराठी चित्रपट कट्टा’च्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंतांचा सन्मान करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आमदार अमित साटम, नगरसेवक रोहन राठोड या प्रत्येकाने आपल्यापरीने केलेलं काम महत्त्वपूर्ण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केलेले प्रयत्न आज यशस्वी झाले त्याचा आम्हाला अभिमान असल्याचे प्रतिपादन यावेळी केले. 

याप्रसंगी बोलताना अभिनेते अजिंक्य देव म्हणाले, ‘आज संपूर्ण देव कुटुंबियांसाठी हा स्वप्नपूर्तीचा आणि आनंदाचा दिवस आहे. आज बाबांच्या प्रेमापोटी इथे उपस्थित असलेल्या सर्वांचे मी आभार मानतो. बाबांच्या नावाचा मार्ग झाला याचा खूप आनंद झाला आहे.  यासाठी मी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, भाजप नेते विनोद तावडे, आमदार अमित साटम, नगरसेवक रोहन राठोड यांचे मनःपूर्वक आभार मानतो. या प्रस्तावावर त्यांनी विचार करून पुढाकार घेत यासाठी परवानगी दिली. हे बाबांचे आशीर्वाद आहेत. याचा त्यांना ही निश्चितच आनंद झाला असेल.  

याप्रसंगी ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ गायिका वैशाली सामंत, दिव्या खोसला कुमार, कांचन घाणेकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.

सत्ताधारी पक्षातच दररोज गंभीर आरोप, फडणवीसांनी वकिली करण्यापेक्षा मुख्यमंत्रीपदाला न्याय देण्याचे काम करावे: नाना पटोले.

अजित पवारांना शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू दिसत नाहीत का? पीकविमा घोटाळ्यावर खोटे बोलण्याची गरज काय?

सोयाबीनला ६ हजार रुपये भाव देण्याचे काय झाले? भावांतर योजनेचा सरकारला विसर पडला काय?

मुंबई, दि. ३० जानेवारी २०२५
भाजपा युती सत्तेवर आल्यापासून तीन पक्षात मलईसाठी मारामारी सुरु आहे. सरकारमध्ये गम्मत जम्मत सुरु असून दररोज एका मंत्र्यांवर गंभीर आरोप होत आहेत. हिवाळी अधिवेशनात बीड व परभणीतील घटनांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे उत्तर दिले त्यातूनच चित्र स्पष्ट झाले. एखादा निष्णात वकील जसा आरोपीला वाचवण्याचे काम करतो तेच काम मुख्यमंत्री यांनी केले. फडणविसांनी विधानसभेत मुख्यमंत्री म्हणून भाषण केले नाही. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत नाहीत म्हणूनच राज्य पेटले आहे, असा घणाघाती आरोप करत फडणविसांनी अशी वकिली सोडून मुख्यमंत्रीपदाला न्याय देण्याचे काम करावे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

टिळक भवनमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सरकारमध्ये परिस्थिती भयावह आहे, सरकारला लाडक्या बहिणीची चिंता नाही. २४ लाख विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी अर्ज केले आहेत त्यातील लाखो बहिणींना सरकार नोकरी देऊ शकत नाही. लाडक्या बहिणींचे पती शेतकरीही आहेत आणि हा शेतकरी दररोज आत्महत्या करत आहे. सोयाबिनला ६ हजार रुपयांचा भाव देणार होते पण ३ हजाराचाही भाव मिळत नाही, धान, कांदा, कापसाची स्थितीही अशीच आहे. भावांतर योजना लागू करून फरक देण्याचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले. सरकार फक्त जनतेला लुटण्यासाठी सत्तेत आले आहे. भाजपा युती सरकारमध्ये ६५ टक्के मंत्री कलंकीत आहेत. दररोज महाराष्ट्राची प्रतिमा खराब केली जात आहे. बीड जिल्ह्यातील भ्रष्टाचाराची प्रकरणे दररोज उघड होत आहेत तीच परिस्थिती पुणे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदारच भ्रष्टाचार झाल्याचे उघड सांगत आहेत. मागील अडीच वर्षापासून हेच सुरु आहे. शेतकऱ्यांच्या योजनेत ४ टक्के भ्रष्टाचार होतो हे मंत्र्यांनीच सांगितले.

बीड जिल्ह्यात पीक विमा घोटाळा झाला नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले या पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, सत्ताधारी पक्षाचा आमदारच पीक विमा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे सांगतो, कृषी मंत्र्यांनीही भ्रष्टाचार झाल्याचे सांगितले. पीक विमा घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने भ्रष्टाचार झाल्याचे सांगितले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार जर घोटाळा झालाच नाही असे म्हणत असतील तर ते धादांत खोटे बोलत आहेत. त्यांनी खोटे बोलू नये, कशासाठी ते खोटे बोलत आहेत असा प्रश्न विचारून अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू व शेतकऱ्याच्या विधवा पत्नीच्या कपाळावरचे कुंकू विसरू नये, असे पटोले म्हणाले..

कविश लिमये याने पटकावले विजेतेपद

विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट आणि हिंद शक्ती सोशल फाउंडेशन यांच्या वतीने राज्यस्तरीय जलद बुद्धिबळ स्पर्धा : दहा वर्षांखालील गटात वेदांत कुलकर्णीची बाजी

पुणे : कविश लिमये याने १६व्या विनायक नवयुग मंडळ खुल्या राज्यस्तरीय जलद बुद्धिबळ स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या गटाचे विजेतेपद पटकावले. त्याने सात फेऱ्यांअखेर सहा गुणांची कमाई केली, तर दहा वर्षांखालील गटात वेदांत कुलकर्णीने बाजी मारली.

विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट आणि हिंद शक्ती सोशल फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा भांडारकर रोडवरील साने डेअरी चौक येथील मिलेनियम टॉवर्स येथे झाली. या स्पर्धेतील १४ वर्षांखालील मुलांच्या गटातील सातव्या आणि अखेरच्या फेरीत पहिल्या पटावर कविश लिमये (१५९६ रेटिंग) आणि रिजूल कुरडे (१५५१ रेटिंग) यांच्यातील डाव बरोबरीत सुटला.

दुसरीकडे, काळ्या मोहरांसह खेळताना विहान देशमुखने ध्येय गोंढाला, तर भूवन कोन्नूरने चिराग रेड्डीला पराभूत केले. त्यामुळे कविश लिमये, विहान देशमुख आणि भूवन कोन्नूर यांचे सात फेऱ्यांअखेर प्रत्येकी सहा गुण झाले. मात्र, टायब्रेकमध्ये सरस ठरल्याने कविशने अव्वल क्रमांक पटकावला. विहानने दुसरा, तर भूवन तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

स्पर्धेतील पहिल्या दहा क्रमांकांच्या खेळाडूंना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यात कविशला २ हजार ५०० रुपये आणि करंडक, विहानला दोन हजार रुपये आणि करंडक, तर भूवनला १५०० रुपये आणि करंडक देऊन गौरविण्यात आले.

वेदांतला जेतेपद
स्पर्धेतील दहा वर्षांखालील गटात वेदांत कुलकर्णीने सहा गुणांसह बाजी मारली. त्याला २ हजार ५०० रुपये आणि करंडक देऊन गौरविण्यात आले. शौनक पाठक (६) दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याला दोन हजार रुपये आणि करंडक देऊन सन्मानित करण्यात आले. अर्जुन कौलगुड (५.५) तिसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याला एक हजार पाचशे रुपये आणि करंडक देण्यात आला. अव्वल दहा क्रमांकांच्या खेळाडूंना रोख पारितोषिक आणि पदक देण्यात आले.

या स्पर्धेच्या बक्षीस समारंभप्रसंगी आंतरराष्ट्रीय टेनिसपटू ऋतुजा भोसले, दाते आणि कंपनीचे हेमचंद्र दाते, उद्योजक अतुल कटारिया, चिराग कटारिया,  आर्बिटर राजेंद्र शिदोरे, दीप्ती शिदोरे, मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय फंड, सुनील पांडे- लोहगावकर, अभिजित मोडक, भूषण मोरे, अक्षय शहाणे, निखिल जोशी, ऋषिकेश आर्य, अपर्णा कुऱ्हाडे, सुजित गोटेकर हे उपस्थित होते.

निकाल – १४ वर्षांखालील गट : सातव्या आणि अखेरच्या फेरीचे काही निकाल – कविश लिमये (६) बरोबरी वि. रिजूल कुरडे (५.५), ध्येय गोंढा (५) पराभूत वि. विहान देशमुख (६), चिराग रेड्डी (५) पराभूत वि. भूवन कोन्नूर (६), चिन्मय रेड्डी (४.५) पराभूत वि. विनय एस. के. (५.५), अद्वैत कुमार (४.५) पराभूत वि. वरद मोरे (५.५), नरसिंहभन भोसले (५) वि. वि. स्पृहा कासार (४), तनय कुलकर्णी (४) पराभूत वि. सई देव (५), आयू जयस्वाल (४) पराभूत वि. आदित्य तेलंगी (५), आर्या कदम (४) पराभूत वि. रावी महेरिया (५), राजवर्धन लोदम (४) पराभूत वि. वेदांग अस्निकर (५), नंदिनी लोदम (४.५) वि. वि. खूष पारेख (४), अद्वय देशपांडे (४) बरोबरी वि. अक्षज पाटील (४), अवनीश पाटे (४) बरोबरी वि. कनिका साने (४), रितेश अभंग (३) पराभूत वि. सार्थक कुलकर्णी (४), बिनीवाले (४) वि. वि. अमर्त्या कुबल (३).

१० वर्षांखालील मुले : वेदांत कुलकर्णी (६) बरोबरी वि. अर्जुन कौलगुड (५.५), शौनक पाठक (६) बरोबरी वि. साहिल सुतेरवाला (५.५), राघव पाठक (४.५) पराभूत वि. अधिराज सिंह (५.५), सचिन पार्थ (४.५) पराभूत वि. कृष्णा नतेजा (५.५), रिधान जैन (४) पराभूत वि. रेयांश पदेगावकर (५), वीर पाटील (४) पराभूत वि. रेयांश कमेरकर (५), क्रिशव कान्हेरकर (४) पराभूत वि. ईशान सिंह (५), श्रेयस दमराजू (४) पराभूत वि. मंदा राणा (५), अद्विक नवल (४) पराभूत वि. रिषभ ताडे (५), आज्ञा काटकर (४.५) वि. वि. नुर्वी कुलकर्णी (३). 

‘हे तो प्रचितीचे जगणे’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे :

​’आजही देशातील सामान्य लोकांपर्यंत आपण खरे ज्ञान पोहचवू शकलो नाही, याची मनोमन खंत वाटते, या सामान्य लोकांपर्यंत खरे ज्ञान पोचवण्याचे आणि देशातील ही ज्ञानातील विषमता दूर करण्याचे आव्हान हे ‘प्रचिती’च्या आणि एकूणच देशातील सामाजिक कार्यकर्त्यापुढे आहे,’ असे स्पष्ट मत ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ.माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले.

१९९० च्या दशकातील ‘प्रचिती’ या महाविद्यालयीन संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या अनुभव आणि वाटचाल यांवर आधारित लेखांचे संकलन असलेल्या ‘हे तो प्रचितीचे जगणे’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या हस्ते आणि स्नेहालय (अहिल्यानगर) संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्या विशेष उपस्थितीत प्रबोध सभागृह, ज्ञान प्रबोधिनी (सदाशिव पेठ), पुणे येथे झाले. या प्रकाशन कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रचिती कार्यकर्त्यांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजनही करण्यात आले होते. दि. २६ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी हा कार्यक्रम झाला.

या कार्यक्रमात डॉ . माधव गाडगीळ यांनी सामाजिक कार्यकर्त्यांपुढील आव्हानांचा वेध घेतला. श्री. गाडगीळ म्हणाले, “येत्या तीन वर्षात आधुनिक तंत्रज्ञानामुळे भाषेत क्रांती घडून येईल आणि जगातील सर्व भाषेतील ज्ञान सर्वांना अगदी सहज उपलब्ध होईल. त्यामुळे सर्वसामान्य लोकांपर्यंत ज्ञानाची गंगा नेणे हे गुरूजनांना शक्य होईल. गुगलमधील काही ऍपमुळे जसे की इमेज ऍपमुळे आदिवासी तरुण वनरक्षकांनाही दुर्मिळ वनस्पतींची शास्त्रोक्त नावे मोबाईलद्वारे फोटो काढून लगेच बघता येतात. नवं तंत्रज्ञान अशाप्रकारे सर्वांनाच ज्ञानार्जन करण्याला उपयुक्त ठरत आहे, ही चांगलीच गोष्ट आहे.”

“हे तो प्रचितीचे जगणे…” या पुस्तकातील लेखकांचं जगणं, जीवनानुभव आणि जीवन चळवळीविषयी वाचकांना जाणून घेता येईलच पण त्याचबरोबर संस्थात्मक कार्य मोठ्या प्रमाणावर कसे उभे करावे, याचा हे पुस्तक रोल मॉडेल ठरेल. या पुस्तकाची प्रस्तावना लिहिण्याच्या निमित्ताने मी सर्व लेख वाचले आणि वाचल्यावर असे वाटले की या पुस्तकाच्या वाचनाने वाचकांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल. माझ्या आयुष्यात अशी ‘प्रचिती’ आली असती तर माझ्यासमोरच्या प्रश्नांकडे मीही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकलो असतो,” अशी प्रांजळ कबुलीही प्रमुख पाहुणे डॉ.गिरीश कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना दिली. “समाजकार्य करताना ‘मी नाहीतर कोण आणि आता नाही तर केव्हा?’ ह्या प्रश्नाचा सतत पाठपुरावा करत राहणं कसं आवश्यक आहे, यावरही गिरिश कुलकर्णी यानी प्रकाश टाकला.

“आपल्यातलेच/आपल्यासारखेच हे युवक-युवती आहेत, त्यामुळे करिअरच्या उंबरठ्यावर असणाऱ्या अनेकांना यातून प्रेरणा मिळेल,” असा विश्वास पुस्तकाच्या प्रयोजनाविषयी बोलताना अजित कानिटकर यांनी व्यक्त केला. विवेक कुलकर्णी यांनी “प्रचिती विचार चिंतन” या विषयीची सविस्तर भूमिका मांडली.

‘जनरेशन एक्स, वाय, झेड किंवा अगदी अलीकडच्या अल्फा, बिटा यांचं पालकत्व स्वीकारून त्यांना योग्य दिशा दाखवण्यासाठी त्यांचे अधिमित्र (Mentor) म्हणून काम करण्याची आजच्या काळाची गरज त्यांनी अधोरेखित केली.

कार्यक्रमाची सुरुवात करून देताना राजेंद्र आवटे यांनी पुस्तकामागचा थोडा इतिहास सांगून सर्वच प्रचिती सदस्यांच्या मनात असणारी विवेक कुलकर्णी यांच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त केली आणि पाहुण्यांचा परिचय करून दिला. वैशाली कणसकर यांनी पुस्तक संपादन निर्मिती प्रक्रियेविषयी माहिती दिली. गीतांजली देगावकर, संग्राम गायकवाड, नीलम ओसवाल आणि मुकेश कणसकर यांनी लेखनामागच्या भावना व्यक्त केल्या.

‘देशप्रश्न घालती युवा मना साद, समजसेवेचा लगे खुळा नाद| नवी पिढी घडो हेच आहे मागणे || हे तो प्रचितीचे जगणे…’ अशा शब्दांत सुभाष देशपांडे यांनी कार्यक्रमाचा समारोप करताना सगळ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी धर्माधिकारी यांनी केले तर मिलिंद संत आणि प्रचिती सदस्यांनी ‘आज प्रचिती द्या’ हे पद्य सादर केले.

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत पाण्यासाठी बोंबाबोंब -महापालिकेवर हंडा मोर्चा

पुणे- भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ नागरिकांवर येऊ लागली असून क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील नागरिकांची मागील १५ दिवसांपासून पाण्यासाठी वणवण चालू आहे, यासाठी जबाबदार असणारे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांच्या टोलवा टोलवीमुळे आज जनता बेहाल झाली आहे. भवानी पेठ, गुरूवार पेठ, नाना पेठ व इतर अनेक भागातील नागरिकांना जबाबदार अधिकारी वर्गाकडूनही योग्य सहकार्य मिळत नाही. सदर विषयात ठेकेदार हात वर करून प्रशासनाला जबाबदार असल्याचे सांगत आहे. ह्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.यामुळे आज शिवसेनेने महापालिकेवर हंडा मोर्चा नेला .

आज केलेल्या आक्रमक धडक मोर्चा आंदोलनामधे महापालिका अधिकाऱ्यांसमोर हवेत हंडे भिरकवण्यात आले. महिला पाण्यासाठी इतक्या आक्रमक होत्या कि पालिका अधिकारी आपल्या जागा सोडून पळून गेले. पोलीस महापालिका अधिकाऱ्यांना घेउन आले त्यांनी निवेदन स्वीकारून मिडीया समोर कबुली दिली आणि साध्या कागदावर लेखी आश्वासन दिले कि उद्या पाणी पुरवठा सुरळीत केले जाईल. तत्पूर्वी सकाळी क्षेत्रिय कार्यालयावर शिवसेनेचा हंडा मोर्चा धडकणार समजल्यानंतर त्वरीत मनपा अधिकारी शिवसेना पदाधिकाऱ्यांना भेटून आश्वासन देत होते. मोर्चा काढू नका आजच्या आज पाणी चालू करतो असे सांगितले . पण शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांनी ,’ 15 दिवसापासून तुम्हाला निवेदन देत आहोत तर आमच्या पदाधिकाऱ्यांच्या नावाची 100 नं वर फोन करून तक्रार दाखल करता. मग आम्ही तुझे का ऐकावे ? मोर्चा निघणारच आणि जाब विचारणारच अशी भूमिका स्पष्ट केली होती

मोर्चा च्या प्रसंगी पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, शहर संघटक राजेंद्र शिंदे, जावेद खान, युवती जिल्हा समन्वयक निकीता मारटकर, आंगणवाडी प्रमुख गौरी चव्हाण अधिकारी सनी गवते, महिला उपशहर संघटिका पद्मा सोरटे, रोहिणी कोल्हाळ, स्वाती कथलकर, ज्योती चांदेरे, सुलभा तळेकर, मेघा पवार, सुनिता खंडाळकर, अमृत पठारे, करूणा घाडगे व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

आंदोलनाच्या आक्रमक पवित्र्यानंतर प्रशासनाने तात्पूर्ते मलमपट्टीचे काम केले असून अजूनही पाणी गळती सुरूच आहे, त्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे, सदर गळतीमध्ये सांडपाणी मिक्स होत असल्याचे, तसेच नागरिकांना गढूळ पाणी पुरवठा होत असल्याचे नागरिकांच्या तक्रारी आहेत तर प्रशासन आणि ठेकेदार बिले काढण्यात मशगुल आहेत. आज १५ दिवस उलटूनही ह्या वादामुळे पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यामुळे शिवसेना पुणे शहराच्या वतीने आपल्याला मोर्चाद्वारे निवेदन देत सुरळीत पाणी पुरवठ्याची माागणी करण्यात आल्याचे मोरे यांनी म्हटले आहे.. जे नागरिकांच्या हक्काचे पाणी आहे ते त्यांना मिळणे कायद्यानुसार गरजेचे आहे. नागरिकांकडून मिळकत कर वेळेवर भरून घेतला जातो तर त्यांना पुणे महानगरपालिकेडून सर्व सुविधा वेळेवर देणे बंधनकारक आहे.या सदर विषयात तत्पर कारवाई होऊन पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास शिवसेना जनतेच्या हितासाठी प्रशासनास नक्की पाणी पाजेल हे लक्षात असावे.असाही इशारा मोरे यांनी दिला आहे.

GBS आजाराच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेबाबत नागरिकांनी दक्ष राहावे – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर डॉ. नीलम गोऱ्हे यांची महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया

पुणे, दि. ३० : पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले.

“जनतेच्या मजबूत जनादेशामुळे बैठकीची उत्सुकता होती”

याप्रसंगी बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “जनतेने दिलेल्या स्पष्ट जनादेशामुळे आम्ही या बैठकीची वाट पाहत होतो. बैठकीत प्रलंबित प्रश्न, आदिवासी आणि सामाजिक न्यायविषयक उपाययोजना, तसेच राज्य आणि जिल्ह्याशी संबंधित काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.”

पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेवर भर

गॅस्ट्रोएन्टेरायटिस (GBS) आणि पाण्याच्या शुद्धतेच्या मुद्द्यावर नागरिकांनी जागरूक राहण्याचे, यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आवाहन केले. “पाणी उकळून पिणे, ते व्यवस्थित थंड करूनच वापरणे गरजेचे आहे. पिण्याच्या पाण्याचे नळ आणि गटार वाहिन्या एकत्र आल्याने पाणी अशुद्ध होण्याचा धोका असतो. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या भागात अशा घटना घडत आहेत का, यावर लक्ष ठेवावे,” असे त्यांनी सांगितले.

शिक्षणाच्या दर्जावर चर्चा, ‘असर अहवाल’चा आढावा

डॉ. गोऱ्हे यांनी शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली.
“मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत ‘असर’ संस्थेच्या अहवालात अनेक उणिवा दाखवल्या आहेत. आम्ही हा मुद्दा बैठकीत उपस्थित केला आणि इतर सदस्यांनीही त्यावर चर्चा केली. पुणे जिल्हा परिषदेच्या आणि महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याची मागणी आम्ही केली. त्याला पालकमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

आदिवासी आणि सामाजिक न्याय योजनांवर स्वतंत्र बैठक

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे मेट्रो प्रकल्प आणि आदिवासी कल्याण योजनांवर लवकरच स्वतंत्र बैठक होणार असल्याचे जाहीर केले.

तसेच, बैठकीत सदस्यांनी महानगरपालिका रुग्णालयांमध्ये बाहेरून औषधं लिहून देण्याच्या समस्येवर आवाज उठवला.
“कमला नेहरू हॉस्पिटलसारख्या ठिकाणी ही समस्या जाणवते. हा मुद्दा सर्व सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पोहोचवला आहे,” असे त्यांनी सांगितले.

“विकास आराखड्याला सकारात्मक प्रतिसाद”

“पुणे जिल्ह्यातील विकास आराखड्याला पालकमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. शिक्षण, आरोग्य, आदिवासी विकास, आणि सामाजिक न्याय योजनांसाठी ठोस उपाययोजना हाती घेतल्या जातील हे स्वागतार्ह आहे ,असेही डॉ. गोऱ्हे यांनी शेवटी बोलताना नमूद केले.

कसब्यात १५ हजार महिलांच्या उपस्थितीत “सन्मान स्त्री शक्तीचा” गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून आयोजित सोहळ्याला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद

पुणे (दि ३०): विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव करणारा “सन्मान स्त्री शक्तीचा” सोहळा कसबा मतदारसंघात मोठ्या उत्साहात पार पडला. आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून भाजपच्या वतीने आयोजित या सोहळ्याला जवळपास पंधरा हजारांच्यावर महिलांनी उपस्थिती लावली. पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

आमदार हेमंत रासने आणि मृणाली रासने यांच्या माध्यमातून गेली दहा वर्षांपासून अखंडितपणे सन्मान स्त्री शक्तीचा गौरव सोहळा आणि भव्य हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात येते. बाजीराव रोडवरील नातूबाग मैदानावर यंदा हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. पुणे महापालिकेच्या पहिल्या महिला नगरसचिव योगीता भोसले, विश्वकप विजेता महिला खो-खो संघाच्या प्रशिक्षिका प्राची वाईकर, पत्रकार मीनाक्षी गुरव, समाजसेविका शर्मिला सय्यद, साहित्य क्षेत्रासाठी वसुंधरा काशीकर आणि आंतरराष्ट्रीय नृत्यांगना वैष्णवी पाटील यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना हेमंत रासने म्हणाले, “अनादी काळापासून आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रियांना नेहमी शक्ती आणि देवीचे रूप मानले जाते. आजच्या एकविसाव्या शतकात महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याने ठसा उमटवणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी गेल्या १० वर्षांपासून हा सोहळा अविरतपणे आयोजित केला जात आहे. समाजामध्ये काम करताना महिलांना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळावे, याच उद्देशाने आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. या निमित्ताने हजारोंच्या संख्येने महिलावर्ग एकत्र येत असल्याचा आनंद आहे”.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे, सरचिटणीस अमित कंक, प्रणव गंजीवाले, राजू परदेशी, चंद्रकांत पोटे, उमेश अण्णा चव्हाण, वैशालीताई नाईक, राणीताई कांबळे, महिला आघाडी अध्यक्ष अश्विनीताई पवार, वरिष्ठ उपाध्यक्ष निलेश कदम यांनी परिश्रम घेतले. निवेदन सुपेकर यांनी केले.

धनंजय घाटे यांचे निधन

पुणे, ता. ३० – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सहकार्यवाह धनंजय रामचंद्र घाटे (वय ५३) यांचे आकस्मित निधन झाले. जनसेवा बॅंकेत ते अधिकारी पदावर कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी मनिषा, आई-वडील, मुलगा ज्ञानेश, भाऊ धीरज घाटे, बहिण धनश्री असा परिवार आहे.
त्यांच्यावर आज (३०) वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
बालपणापासून संघ स्वयंसेवक असलेले धनंजय घाटे १९९० ते ९५ या काळात मराठवाड्यातील भूम, कळंब येथे तालुका प्रचारक व धाराशिव येथे जिल्हा प्रचारक होते. २०११ मध्ये पुणे महानगर सहकार्यवाह आणि २०१८ पासून प्रांताचे सहकार्यवाह म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती. विविध सामाजिक व सांस्कृतिक संघटनांशी दांडगा त्यांचा संपर्क होता. शनिवार, ८ फेब्रुवारी रोजी रमणबाग शाळेत संध्याकाळी सात वाजता श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आहे.

राज ठाकरेंनी अजित पवारांवर बोलू नये, ते उठ दुपारी अन् घे सुपारीवाले नाहीत; NCP चा मनसेवर पलटवार

मुंबई-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून अजित पवारांवर निशाणा साधल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. राज ठाकरे यांची स्थिती गझनीच्या हिरोसारखी झाली आहे. त्यांनी अजित पवारांवर बोलू नये. कारण ते उठ दुपारी आणि घे सुपारी वाले नाहीत, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे यांनी गुरुवारी मनसेच्या मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीतील यशावर भाष्य केले होते. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचा केवळ 1 खासदार निवडून आला होता. त्यानंतर चारच महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे 42 आमदार निवडून आले. हे कसे घडले? हा सर्व प्रकार संशयास्पद आहे, असे ते म्हणाले होते.

राज ठाकरे यांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण व आनंद परांजपे यांच्यासह आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार पलटवार केला. अमोल मिटकरी यांनीही या प्रकरणी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. स्वतःच्या घरात दारुण पराभव झालेल्या लोकांनी आम्हाला शिकवू नये. राज ठाकरे यांना उशिरा उठून चिंतन करण्याची सवय आहे. त्यांनी स्वतःच्या मुलाचा पराभव का झाला? यावर बोलावे. अजित पवारांसारखे पहाटे 6 वा. उठून काम करावे, असे ते राज ठाकरे यांना टोला हाणताना म्हणालेत.

सुरज चव्हाण म्हणाले, राज ठाकरे यांनी अजित पवारांवर बोलू नये. कारण, ते उठ दुपारी आणि घे सुपारीवाले नाहीत. राज ठाकरेंची स्थिती गझनी चित्रपटातील हिरोसारखी झाली आहे. त्यांना माझा सल्ला आहे की, त्यांनी भाषणाला येताना आपण 2009, 2014, 2019 व 2024 साली काय विधाने केली ते तपासून पहावे. ते त्यांना पुढील काळात भाषण करताना उपयोगी ठरेल. गझनीसारखे लगेच विसरण्यापेक्षा त्यांच्या लक्षात राहील.

अजित पवार पहाटे 6 वाजेपासून लोकांची कामे करतात. लोकांमध्ये जाऊन त्यांची कामे मार्गी लावतात. राज ठाकरे यांच्यासारखे दुपारी उठायचे व सुपारी घेऊन बोलायचे असे ते करत नाहीत. मनसेच्या आमदाराला त्याच्याच गावात केवळ 1 मत पडले. कदाचित तो एकच व्यक्ती त्या आमदाराने केलेल्या कामाचा लाभार्थी असेल. लोकांची कामे न करणारे निवडून कसे येतील? असेही ते यावेळी राज ठाकरे यांना टोला हाणताना म्हणाले.

एनसीपीचे नेते आनंद परांजपे यांनीही या प्रकरणी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, राज याची भूमिका कायमच बदलणारी राहिली आहे. त्यांचा पक्ष ऋतुसारखा आपली भूमिका बदलो. त्यांनी आपला पक्ष व चिन्ह राहिल की नाही याची चिंता करावी. त्यांना 128 जागा लढवून केवळ 1.55 टक्के मते मिळाली. त्यामुळे त्यांनी आमच्यावर बोलण्यापक्षा स्वतःच्या पक्षावर लक्ष द्यावे. महाराष्ट्रातील जनतेलाही मनसे व राज ठाकरे यांच्यावर भरवसा राहिला नाही. परिणामी, विधानसभेत त्यांचा एकही प्रतिनिधी राहिला नाही.

मनसेच्या उमेदवारांना तेथील निकालावर विश्वास नव्हता तर राज ठाकरे आजवर गप्प का राहिले? त्यांनी 3 महिन्यांनंतर याविषयी संशय व्यक्त केला. त्यामुळे त्याला आता फारसा अर्थ राहिला नाही. राज ठाकरे यांचीही यापूर्वी ईडी चौकशी लागली होती. त्यामुळेच तर त्यांची भूमिका बदलली नाही ना? असे म्हणण्यास वाव आहे, असे ते म्हणाले.

“उशिरा का होईना, राज ठाकरे यांनी भाजपबद्दल सत्य बोलले’- खासदार अरविंद सावंत

पुणे-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. विधानसभा निवडणुकांमधील भाजपच्या विजयासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या भाष्याचे त्यांनी स्वागत केले आहे.

पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना सावंत म्हणाले की, “उशिरा का होईना, राज ठाकरे यांनी भाजपबद्दल सत्य बोलले आहेत. लोकशाही संपवून हुकूमशाहीकडे वाटचाल करण्याचे काम भाजपकडून सुरू आहे, त्याला आता विरोध होणे गरजेचे आहे.”

वक्फ दुरुस्ती विधेयक २०२४ बाबत बोलताना सावंत यांनी स्पष्ट केले की, संयुक्त संसदीय समितीमध्ये ४४ दुरुस्त्यांवर सहा महिने चर्चा झाली. मात्र केंद्र सरकारने कमी वेळ देऊन त्यांच्या पक्षाच्या सूचना स्वीकारल्या नाहीत. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची भूमिका लोकशाहीला मानणारी असताना, भाजपने चुकीचा गैरसमज पसरवल्याचाही आरोप त्यांनी केला.

पक्षांतर बंदी कायद्याबाबत त्यांनी सांगितले की, ठाकरे गटाकडून याचिका दाखल करूनही अद्याप अंतिम निकाल आलेला नाही. विधानसभा निवडणुकांमधील आश्चर्यकारक निकालांनंतर राज ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका घेतली, ही बाब चांगली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

एलिफंट टँक, इनोव्हेटेक्स द्वारे विद्यार्थ्यांना उद्योजक होण्याची संधी

– डी. वाय. पाटील पीजीडीएम इन्स्टिट्यूट व द डेटा टेक्स लॅब यांचा संयुक्त उपक्रम
–  विद्यार्थ्यांच्या संकल्पनेला मिळणार वाव

पुणे :  डी. वाय. पाटील पीजीडीएम इन्स्टिट्यूट, द डेटा टेक लॅब व जस्ट 4 आंत्रप्रेन्युअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने नवसंशोधन करणाऱ्या व भावी उद्योजक होऊ पाहणाऱ्या विद्यार्थासाठी एलिफंट टँक, इनोव्हेटेक्स या दोन उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रमाचे आयोजन ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी संस्थेच्या आकुर्डी येथील कॅम्पस मध्ये करण्यात आले आहे. याबाबतची माहिती डी वाय पाटील विद्यापीठाच्या पीजीडीएम इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. शलाका पारकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कल्पेश कुवर आणि ‘द डेटा टेक्स लॅब’ चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमित आंद्रे उपस्थित होते.

या उपक्रमाला आतापर्यंत विविध महाविद्यालयातील साडेसातशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये अडीचशे पेक्षा अधिक विद्यार्थाना इंटर्नशिप ची संधी देखील मिळणार आहे. तर, उद्योजकतेसंदर्भात १०० पेक्षा अधिक नवकल्पना डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या इनक्युबेशन सेंटरमध्ये स्वीकारल्या गेल्या आहेत. हा केवळ एक इव्हेंट नसून विद्यार्थ्यांना उद्योजकतेसाठी सक्षम करण्याचा चळवळीचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले.
एलिफंट टॅंक हे उद्योजक विद्यार्थ्यांसाठी अनोखे व्यासपीठ असून तेथे त्यांना त्यांच्या वेगळ्या व्यापारी कल्पना सादर करण्याची स्पर्धा आहे. या सादरीकरणातून विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील तज्ञ गुंतवणूकदार आणि मार्गदर्शकासमोर त्यांच्या स्टार्टअप कल्पना सादर करण्याची संधी मिळेल. त्यांचे मूल्यमापन निष्पक्षपणे मानवरहित यंत्रणेद्वारे केले जाईल आणि त्यांना योग्य गुण मिळतील, अशी माहिती आंद्रे यांनी दिली. एलिफंट टॅंक उद्योजकतेवर लक्ष केंद्रित करते, तर ‘इनोव्हेटएक्स’ हे विद्यार्थी आणि उद्योग क्षेत्रातील कंपन्यांना इंटर्नशिप, प्रोजेक्ट्स आणि करिअर संधी उपलब्ध करून देण्यासाठी विकसित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे विश्वस्त तेजस पाटील म्हणाले की, “एलिफंट टैंक विद्यार्थ्यांसाठी केवळ एक स्पर्धा नाही, तर हे त्यांच्यासाठी एक संधी आहे, जी त्यांना उद्योगात मोठे करण्यास मदत करेल”

डी. वाय. पाटील आकुर्डीचे कॅम्पस डायरेक्टर रिअर अॅडमिरल अमित विक्रम म्हणाले की, “उद्योग आणि शिक्षण एकत्र येणे अत्यंत आवश्यक आहे. इनोव्हेटएक्सच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना उद्योग जगताशी जोडत आहोत.

डॉ. शलाका पारकर म्हणाल्या की, “आंत्रप्रेन्युअरशिप म्हणजे केवळ व्यवसाय सुरू करणे नव्हे, तर समस्यांचे प्रभावीपणे निराकरण करणे आहे. एलिफंट टैंक हा त्यासाठी उत्तम प्लॅटफॉर्म आहे

डॉ. अमित आंद्रे म्हणाले की, “आमचे AI-आधारित मूल्यांकन विद्यार्थ्यांच्या कल्पनांना जागतिक मानकांशी जुळवून घेण्यास मदत करते. हे एक नवीन युगातील इनोव्हेशन आहे.

एलिफंट टँकचे मुख्य वैशिष्ट्येः

– इनोव्हेटएक्स हे उद्योग आणि विद्यार्थ्यांना जोडणारे व्यासपीठ
– डेटा टेक लॅब्स ने एक प्रगत ‘एआय’ आधारित प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. ज्यामुळे दस्तऐवज, व्हिडिओ आणि प्रेझेंटेशन स्वरूपात कल्पनांचे मूल्यमापन कृत्रिम बुद्धिमत्ता संचालित यंत्रणेदारे होईल.
– प्रत्येक कल्पना व्यवहार्यता, स्केलेबिलिटी (उपयुक्तता) आणि नाविन्य यावर आधारित प्रत्यक्ष मूल्यमापन  केले जाते.
– विद्यार्थ्यांना, स्टार्टअप संस्थापक, गुंतवणूकदार आणि वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून थेट मार्गदर्शन मिळते व निवडलेल्या कल्पनांना मार्गदर्शन, इनक्युबेशन आणि निधी मिळण्याची संधी.
–  निवडलेल्या कल्पनांना गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्रातील कंपन्यांसमोर सादर करण्याची संधी.
– इनोव्हेटएक्सद्वारे इंटर्नशिप आणि नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. विविध क्षेत्रातील कंपन्या प्रशिक्षण आणि इंटर्नशिप संधी मिळतात
– थेट प्रकल्प-आधारित शिक्षण विद्यार्थ्यांना वास्तविक उद्योगातील समस्या सोडवण्याची संधी मिळेल.
– उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ विद्यार्थ्यांना करिअर कोचिंग,  जॉब मार्केट ट्रेंड्स याबद्दल मार्गदर्शन मिळेल

बालसाहित्य हे साहित्य विश्वातील सर्वात सुंदर दालन -बालसाहित्यिका स्वाती राजे

पुणे: साहित्य संमेलने म्हणजे वाद नाही. साहित्य संमेलनात विविध विचारप्रवाह आणि प्रणालीचे लेखक, साहित्यिक एकत्र येतात आणि त्यांच्यात संवाद होतो. समाजाला वैचारिक, सांस्कृतिक दिशा मिळावी या विचारातून साहित्य संमेलने भरवली जातात. साहित्य संमेलने हा विचारांचा उत्सव असतो. विविध साहित्य प्रवाहांनी साहित्य विश्व सजले आहे. यामधील सर्वात सुंदर दालन म्हणजे बालसाहित्य आहे, असे मत बालसाहित्यिका स्वाती राजे यांनी व्यक्त केले. 
अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि श्री शिवाजी मराठा सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ५ वे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन शुक्रवार पेठेतील श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या प्रांगणात करण्यात आले आहे. यावेळी बालसाहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्ष स्वाती राजे, ज्येष्ठ साहित्यिक न.म. जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन झाले. लेखक मिलिंद जोशी, श्री शिवाजी मराठा सोसायटीचे मानद सचिव अण्णा थोरात, अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राजन लाखे, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य प्रकाश होळकर, बाल अभिनेता शार्दुल धारणे, संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र जगताप, सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे, नियामक मंडळ अध्यक्ष सत्येंद्र कांचन, कारभारी मंडळ अध्यक्ष सुरेश देसाई यावेळी उपस्थित होते. सकाळी ९ वाजता ध्वजारोहण होऊन त्यानंतर ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे होते. विविध शाळेतील मुलांनी ग्रंथ दिंडीमध्ये सहभाग घेतला.
न. म. जोशी म्हणाले, देशाची प्रगती कोणा दुसऱ्यांच्या हातात नाही तर देशाची प्रगती आपल्याच हातात आहे, असे त्यांनी मुलांशी बोलताना सांगितले. राजन लाखे म्हणाले, आज मुलांसोबत मातृभाषेत संवाद साधण्याची गरज आहे. त्यांना भरकटण्यासाठी अनेक साधने उपलब्ध आहेत, परंतु साहित्याचा मार्ग आपण त्यांना दाखवायला हवा.
मिलिंद जोशी म्हणाले, आजच्या पिढीतील मुले हुशार आहेत. तंत्रज्ञान वापरासाठी असते, तर माणसे ही प्रेम करण्यासाठी असतात. परंतु आज नेमके उलटे चित्र झालेले आपल्याला दिसून येते. निराश झालेल्या मनाला प्रज्वलित करण्यासाठी पुस्तके वाचायला हवीत. जीवन समजावून सांगणारी पुस्तके वाचा. एकाच जीवनात अनेक जीवन पुस्तके वाचल्यामुळे आपण जगतो, असेही त्यांनी सांगितले.
प्रकाश होळकर, शार्दुल धारणे यांनी मनोगत व्यक्त केले. अमित गोगावले यांनी सूत्रसंचालन केले. विनोद वाघ यांनी आभार मानले.

दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी पाठबळ : मुख्यमंत्री

वी दिल्ली :
राजधानी दिल्लीमध्ये २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान सरहद, पुणे आयोजित ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाच्या दिल्ली कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पार पडले. यावेळी संमेलनाला राज्य सरकार सर्वतोपरी पाठबळ देईल आणि साहित्य संमेलन यशस्वी होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे संमेलन दिल्लीत होणार असल्याने या संमेलनाला विशेष महत्व आहे, हे संमेलन कुण्या एका व्यक्तीचे किंवा संस्थेचे नसून महाराष्ट्रासह जगाच्या पाठीवर असलेल्या सर्व मराठीजणांचे आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज मला या कार्यालयाचे उद्घाटन करताना अतिशय आनंद होत आहे. दिल्लीत होणारे हे साहित्य संमेलन निश्चितच भव्य होईल. हे संमेलन देशातील नव्हे तर जगभरातील मराठी माणसांसाठी अभिमानास्पद ठरेल. साहित्य संमेलनाचे आयोजन यशस्वी व्हावे यासाठी विविध यंत्रणा समन्वयाने कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासनही पुर्ण ताकदीने संमेलनाच्या पाठीशी आहे. राजधानीत होणारे हे साहित्य संमेलन विचारप्रवर्तक ठरेल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

सरहद, पुणे संस्थेच्या वतीने या संमेलनाचे आयोजन केले जात आहे. देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी साहित्य संमेलनाचे उद्घाटक आहेत तर ज्येष्ठ नेते मा. श्री. शरद पवार साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. दिल्लीतील जुन्या महाराष्ट्र सदनात हेमंत कक्षात साहित्य संमेलनाचे कार्यालय उभारण्यात आले. या कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री तथा संमेलनाचे सरकार्यवाह मा. श्री. मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त नीवा जैन मॅडम, उपयुक्त राजेश आडपवार सर, सहसंयोजक लेशपाल जवळगे, अतुल जैन, आनंद रेखी, प्रदीप पाटील, निवेदिता वैशंपायन, सचिन इटकर, शरद देशमुख आदी पदाधिकारी व सरहद संस्थेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येत उपस्थित होते.