Home Blog Page 481

निरगुडी व वडगाव शिंदे येथे वन उद्यान उभारा; बापूसाहेब पठारे यांची मागणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मागणीचा प्रस्ताव सादर

मुंबई: वडगावशेरी मतदारसंघातील निरगुडी व वडगाव शिंदे या गावात असलेल्या वनविभागाच्या जागेत नागरिक बांधवांच्या सुख-सोयीसाठी व येणाऱ्या काळात पर्यावरणाचा समतोल कायम ठेवण्यासाठी उच्च दर्जाचे वन उद्यान विकसित व्हावे, अशी मागणी आमदार बापूसाहेब पठारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.

मुंबई येथे काल (ता. २९) बापूसाहेब पठारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेतली. भेटीदरम्यान, निरगुडी व वडगाव शिंदे गावात वन विभागाच्या जवळपास २२९ हेक्टर जागेत वन उद्यान उभारण्याच्या संदर्भाने विस्तृत चर्चा पार पडली. अजित पवार यांनीही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते.

मौजे निरगुडी येथील गट क्र. ५३, १३६ व १६३-अ मध्ये वनविभागाची २२९ हेक्टर जागा आहे. सदर जागा वन उद्यानासाठी वापरात आल्यास नागरिकांना फायदा होईल. सद्यपरिस्थितीला, निरगुडी व वडगाव शिंदे सोबतच लोहगाव, धानोरी या भागातील नागरिकांसाठी चांगल्या दर्जाचे सुविधांयुक्त उद्यान उपलब्ध नाही. “वाढती लोकसंख्येचा विचार करता, उद्यानांची गरज भासणार आहे. या जागेत वन उद्यान विकसित झाल्यास अनेक दृष्टीने याचा फायदा नागरिकांना तसेच पर्यावरणाला व वन विभागाला होईल. म्हणूनच, सदर वनविभागाच्या जागेत उद्यान व्हावे, जेणेकरून नागरिकांना उद्यानासारखी मूलभूत सुविधा मिळेल. सोबतच, या एकूणच भागाच्या निसर्ग वैभवात निश्चितच भर पडेल, असे मत बापूसाहेब पठारे यांनी मांडले.

सदर वन उद्यान उभारल्यास काय फायदे होतील?

पर्यावरणीय फायदे:

  • जैवविविधतेचे संवर्धन होण्यास मदत होईल.
  • वृक्षराजीमुळे मातीची धूप थांबेल.
  • प्रदूषण कमी होऊन ऑक्सीजन प्रमाण वाढेल.

नागरिकांसाठी फायदे:

  • आरोग्यदायी जीवनशैलीला चालना मिळेल.
  • निसर्गाच्या सहवासात मानसिक स्वास्थ्य सुधारेल.

वन विभागासाठी फायदे:

  • वनसंवर्धन व हरित विकासाचे उत्तम उदाहरण निर्माण होईल.
  • शैक्षणिक केंद्र म्हणून उपयोगास येईल.

महसूल अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय भेटीत कुचराई केल्यास शिस्तभंगाची कारवाई!

  • महसूल विभागाचे १३ कलमी परिपत्रक जारी
  • जिल्हाधिकारी महिन्यातून एकदा, एसडीओ-तहसीलदार दोनवेळा क्षेत्रीय भेट देणार
  • मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर महसूल विभागाचे परिपत्रक

मुंबई, : राज्यातील महसूल यंत्रणा लोकाभिमुख करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट परिपत्रक जारी करून जिल्हाधिकाऱ्यांनी महिन्यातून एकदा व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी दोनवेळा आपल्या क्षेत्रात दौरा करून आपल्या विभागातील शासकीय ध्येयधोरणे व योजना जनतेपर्यंत पोहोचतात की नाही याचा वस्तुनिष्ठ अहवाल द्यावा असे म्हटले आहे. या कामात कोणी कुचराई केल्यास शिस्तभंगाची कारवाई विनाविलंब केली जाईल असेही बजावण्यात आले आहेत.

महसूल मंत्री बावनकुळे यांनी महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना परिपत्रकाबद्दलची संपूर्ण माहिती दिली. जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात मुख्यमंत्र्यांच्या या संदर्भातील निर्देशांचा स्पष्ट उल्लेख केला आहे. या भेटीदौऱ्यांचे मॉनिटर करण्यासाठी ऑनलाइन प्रणाली तयार करून त्याद्वारे दौऱ्याचे नियोजन करून विभागीय आयुक्त कार्यालयाने या संदर्भात समन्वय राखावा अशा सूचना दिल्या आहेत.

तेरा कलमी कार्यक्रम

महसूल व वन विभागाच्या या परिपत्रकात क्षेत्रीय भेटींचा १३ कलमी कार्यक्रम अधिकाऱ्यांना आखून देण्यात आला आहे. महसूल अधिकाऱ्यांनी भेटी देऊन, पाहणी करून जनतेशी संवाद साधून जनतेचे अभिप्राय नोंदवावेत. नैसर्गिक आपत्तीप्रवण भागात आपत्ती काही टाळता येईल याची उपाययोजना करून मंत्रालयास सूचना करावी.

अचानक भेट तंत्र वापरा

गावपातळीवर कर्मचारी व अधिकारी कामकाज करत आहेत की नाही याची खातरजमा अचानक तंत्राचा (आकस्मिक भेटी) वापर करून यंत्रणा सतर्क करावी. या भेटी देताना ई-ऑफिस प्रणाली, सेवाहक्क कायदा पोर्टल, आपले सरकार पोर्टल, पीजी पोर्टल, इम्युटेशन, ई-पीकपाणी तसेच, सेतू कार्यालयासहित महसूल विभागातील सर्व ऑनलाइन सेवांचा वापर कटाक्षाने केला जातो की नाही याचा आढावा घ्यावा. स्वच्छता, सुविधा, कार्यालयासमोर नामफलक, नागरिकांची सनद व उपलब्ध सुविधा, अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक यांची नोंद, जनतेच्या तक्रारी व निराकरण महसूल वाढीसाठी प्रयत्न याबाबत लक्ष द्यावे. अधिकारी व कर्मचारी जनतेशी सौजन्यपूर्ण वागतो की नाही याची माहिती संवेदनशीलतेने घ्यावी. तसेच, १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमाचाही वेळोवेळी आढावा घ्यावा अशा सूचनाही या १३ कलमांमध्ये आहेत.


राज्याची धोरणे, लोकाभिमुख योजना, उपाययोजना, त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी महसूल विभागाने पुढाकार घेतला असून, जिल्हाधिकारी ते कोतवाल अशा सर्व स्तरांवर नियोजन व अंमलबजावणी सुरू ठेवण्यासाठी महसूल यंत्रणा त्यांच्या कार्यक्षेत्रात सक्रिय असली पाहिजे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व यंत्रणा त्यांच्या भागात फिरस्तीवर असली पाहिजे हा यामागचा उद्देश आहे. विभागीय आयुक्तांनी पाठवलेल्या अहवालावर आपण स्वतः लक्ष देणार असून, त्याची नोंद सेवापुस्तिकेत घेतली जाईल.

  • चंद्रशेखर बावनकुळे
    महसूल मंत्री, महाराष्ट्र

कलाकार स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

बालगंधर्व परिवार महाराष्ट्र, मेघराज राजेभोसले फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

पुणे : आपल्या भारतीय सांस्कृतिक परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रात याच मकर संक्रातीचे औचित्य साधून पहिल्यांदाच बालगंधर्व परिवार महाराष्ट्र आणि मेघराज राजे भोसले फाउंडेशन (एम.आर.बी.फाउंडेशन ) तसेच अनेक कला संस्थांच्या संयुक्त विद्यमाने .पुणे शहर आणि जिल्ह्यातील महिला आणि पुरुष कलाकारांचा भव्य दिव्य स्नेह मेळावा अतिशय उत्साहात तिळगुळ वाटप करून व हळदीकुंकू वाण वाटप करून अतिशय उत्साहात संपन्न झाला .यावेळी सुप्रसिद्ध निवेदक खेळांचा बादशहा बाळकृष्ण नेहरकर यांनी खास महिला व पुरुष कलाकारांसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे विशेष सादरीकरण केले .यात सर्वच कलाकारांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी विजेत्या महिला कलाकारांना खास मानाच्या पैठणी साड्या भेट देण्यात आल्या तसेच उपस्थित महिला व पुरुष कलाकारांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून विशेष बंपर बक्षिसे देण्यात आली. या प्रसंगी विविध क्षेत्रात कर्तुत्व गाजविणाऱ्या मान्यवर महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई. अलविरा मोशन एंटरटेनमेंटच्या संस्थापक, निर्मात्या दिपाली कांबळे, एम. आर .बी. फाउंडेशनच्या संचालक. हेमलता मेघराज राजेभोसले. सामाजिक कार्यकर्त्या स्वाती हांडे ,नगरसेविका स्वाती पोकळे , अभिनेत्री. प्राजक्ता गायकवाड . अभिनेत्री सुरेखा कुडची, प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, लावणी सम्राज्ञी माया खुटेगावकर प्रसिद्ध अभिनेत्री हेमा तुपे- जगताप .चित्रपट निर्मात्या विजयालक्ष्मी जाधव आणि बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले इत्यादी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

याप्रसंगी मेघराज राजे भोसले फाउंडेशन ,बालगंधर्व परिवार महाराष्ट्र ,अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ,पिंपरी चिंचवड कलाकार संघ ,कला परिवार हडपसर ,नृत्य परिषद महाराष्ट्र ,यांच्या माध्यमातून खास कलाकारांसाठी “आरोग्य तुमचे संरक्षण आमचे” या धरतीवर आरोग्य विमा मेडिक्लेम पॉलिसीचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कलाकार मग तो रंगमंचावरचा असो ,पडद्यामागील असो किंवा मालिका चित्रपटात काम करणारा अथवा तमाशातील संगीतबारीतील लोककलावंत असो किंवा साऊंड, लाईट, नेपथ्यकार या प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी म्हणून अत्यंत अल्प दरात कलाकारांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आरोग्य विमा काढून स्वतःच्या आरोग्या विषयी जागरूक आणि सतर्क राहायला हवे असे यावेळी रूपाली चाकणकर म्हणाल्या.
कलाकारांनीच कलाकारांसाठी आयोजित केलेल्या या स्नेह मिळाव्यात येऊन खऱ्या अर्थानं आनंद वाटला .कलाकारांच्या अडचणींना वाचा फोडण्यासाठी व त्या सोडविण्यासाठी मी नेहमीच सर्व कलाकारांच्या सोबत कायम असेल असे या वेळी तृप्ती देसाई म्हणाल्या.
कलाकारांच्या अडचणी म्हणजे या माझ्या अडचणी आहेत. कलाकारांच्या संरक्षणाची जबाबदारी ही माझी जबाबदारी आहे. कोणत्याही परिस्थितीत कलाकारांना मी वाऱ्यावर सोडणार नाही. त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला मी तयार आहे. म्हणूनच मी मोठ्या प्रयत्नाने संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील कलाकारांसाठी हा आरोग्य विमा आणलेला आहे कलाकारांनी आजारपणात कुणापुढे हात पसरू नये व त्यांनी स्वाभिमानाने जगावे ही माझी प्रामाणिक भावना असल्याचे यावेळी मेघराज राजेभोसले म्हणाले.
कलाकारांच्या अडचणी सोडविण्यासाठी विशेषतः महिला कलाकारांच्या अडचणी सोडवण्यासाठी आदरणीय मेघराज भैय्यांनी फक्त आवाज दिला तरी मी कायम कलाकारांच्या पाठीशी उभी आहे असे दिपाली कांबळे म्हणाल्या.
बालगंधर्व परिवार महाराष्ट्र आणि मेघराज राजेभोसले फाउंडेशन तसेच सर्व कला संस्थांच्या माध्यमातून या स्नेह मिळाव्याचे विशेष आयोजन करण्यात आले ,पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील शेकडो महिला कलाकारांनी यात सहभाग घेतला .प्रास्ताविक मेघराज राजेभोसले यांनी केले. आभार अनिल अण्णा गुंजाळ यांनी मानले. तर पराग चौधरी, .चित्रसेन भवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व महिला व पूरूष कलाकारांनी पुढाकार घेऊन विशेष परिश्रम घेतले.

महात्मा गांधींचे विचार मारण्याचा आजही प्रयत्न होत आहे

राज्याच्या माजी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकुर : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे आयोजित आठव्या युवा संसदेत ‘राजकारणातील व समाजकारणातील महिलांचा सहभाग’ यावरील सत्र

पुणे : महात्मा गांधी यांना आजच्या दिवशी ठार मारण्यात आले. परंतु महात्मा गांधी ही केवळ व्यक्ती नव्हती तर तो एक विचार होता. महात्मा गांधी यांना गोळ्या घालून त्यांचे विचार संपतील हा गैरसमज आहे. आजही महात्मा गांधींच्या विचारांविरोधातील लोक त्यांचे विचार मारण्याचा रोज प्रयत्न करत आहेत, ते लोक संपतील पण महात्मा गांधींचे विचार संपणार नाही. असे मत महाराष्ट्र राज्याच्या माजी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे नऱ्हे येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या आठव्या युवा संसद मध्ये ‘राजकारणातील व समाजकारणातील महिलांचा सहभाग’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रामध्ये यशोमती ठाकूर बोलत होत्या. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, अहिल्या फाउंडेशनच्या अध्यक्ष रमाबाई लटपटे, इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी यावेळी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य पूजा पारगे यांना आदर्श जिल्हा परिषद सदस्य पुरस्काराने गौरवण्यात आले.

यशोमती ठाकूर म्हणाल्या, स्त्री पुरुष समानता ही आपल्या घरातून सुरू झाली तर त्याचा प्रचार समाजामध्ये होऊ शकतो. परंतु आज खऱ्या अर्थाने स्त्री पुरुष समानता अस्तित्वात आहे का ?असा प्रश्न पडला आहे. स्त्री पुरुष समानता केवळ कागदावर असून भागणार आहे तर ती प्रत्यक्षात अंमलबजावणी केली पाहिजे. त्यासाठी महिलांकडे पूर्वग्रह दृष्टीने न पाहता सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून त्यांच्या कार्याला नेहमीच प्रोत्साहन दिले पाहिजे.

रूपाली चाकणकर म्हणाल्या, महिला आरक्षणामुळे समाजकारण आणि राजकारणातील महिलांचे प्रमाण वाढत आहे, परंतु ते प्रमाण पुरेसे नाही. महिलांच्या नावाने पुरुष सत्तेचा उपभोग घेत असेल तर या आरक्षणाचा उपयोग होणार नाही. त्यासाठी महिलांनी सबलीकरण केले पाहिजे आणि स्वतःचा कारभार स्वतः चालवण्यासाठी सक्षम असले पाहिजे. महिलांच्या पाठीशी पुरुष समर्थपणे उभे राहिले तर महिला सशक्तीकरणाच्या लढ्याला अधिक गती येऊ शकेल आणि तरच खऱ्या अर्थाने पुरोगामी महाराष्ट्राचे स्वप्न साकार होऊ शकेल.

तृप्ती देसाई म्हणाल्या, महिला जेव्हा समाजकारण आणि राजकारणामध्ये काम करतात तेव्हा त्यांना प्रथम विरोध होतो त्यानंतर त्यांना धमक्या दिल्या जातात आणि त्यापुढे जाऊन त्यांचे चारित्र्य बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. या सर्व प्रकारांना सामोरे जाण्यासाठी महिलांनी मानसिकरित्या तयार असले पाहिजे. आजही महिलांना मंदिरामध्ये प्रवेश मिळण्यासाठी लढावे लागत आहे हे पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. महिलांनी स्वतःच्या मनातील भीती दूर करून स्वतःचे अस्तित्व दाखवण्यासाठी पुढे आले तरच खऱ्या अर्थाने त्यांचे अस्तित्व समाजाला दिसू शकेल.

पूजा पारगे म्हणाल्या ,महिलांना राजकारणामध्ये आरक्षणामुळे संधी मिळत असली तरी जर समाजासाठी खरंच चांगले काम केले असेल तर समाज आपली दखल घेतो आणि आपल्याला पुन्हा संधी देतो. राजकारण हे समाजकारण करण्याची एक संधी आहे ही बाब महिलांनी लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे चूल आणि मूल याच्या पलीकडे आपल्या अस्तित्व दाखवून देण्यासाठी महिलांनी राजकारणामध्ये सक्रियपणे सहभाग घेतला पाहिजे.

रमिला लटपटे म्हणाल्या, राजकारणाकडे केवळ पैसा आणि सत्ता मिळवण्याचे साधन म्हणून न पाहता राजकारणाकडे एक जबाबदारी म्हणून पाहिले तर निश्चितच बदल करू शकतो. नरेंद्र मोदी यांनी २०४७ सालापर्यंत सशक्त भारत निर्माण करण्याचे स्वप्न संपूर्ण भारताला दिलेले आहे त्यामध्ये आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी प्रत्येकाने जर प्रामाणिकपणे स्वतःच्या क्षेत्रामध्ये काम केले तर निश्चितच हे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

२५ लाख ५१ हजारांचे अंमली पदार्थ पकडले

पुणे- गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकांने तीन कारवायांमध्ये २५ लाख ५१ हजारांचे मॅफेड्रॉन (एम.डी) व गांजा अंमली पदार्थ जप्त केले आहेत .
पुणे शहर पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या सुचनेप्रमाणे शहरात अंमली पदार्थ विरोधी गोहिम राबवुन अंगली पदार्थांचे समुळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने पुणे शहर गुन्हे शाखा, अंमली पदार्थ विरोधी पथकांनी दि.३१/०१/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड व स्टाफ असे विमानतळ पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार चेतन गायकवाड यांना मिळालेले बातमीवरुन लोहगाव वाघोली रोड, संतनगर, पुणे येथे इसम नामे कुमेल महम्मद तांबोळी वय २८ वर्षे, रा-प्लॅट नं ३, सुखकर्ता अपा. गोकुळनगर, धानोरी पुणे याचे ताब्यात एकुण १९,१७,३००/- रु.कि.चा ऐवज त्यामध्ये ८३ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम. डी) हा अंमली पदार्थ तसेच इतर ऐवज जप्त करून त्याचे विरुध्द विमानतळ पोस्टे गु.र.नं.६७/२०२५, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच दि.३०/०१/२०२५ रोजी पोलीस अंमलदार अझिम शेख यांना मिळालेले बातमीवरुन आनंदनगर बिबवेवाडी रोड, मार्केटयार्ड येथे इसम नामे सैफन ऊर्फ शफिक इस्माईल शेख, वय ५२ वर्षे, रा.५८० आनंदनगर पुणे याचे ताब्यात एकुण ७,०००/- रु.कि.चा ३५० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ जप्त करून त्याचे विरुध्द मार्केटयार्ड पोस्टे गु.र.नं.१३/२०२५, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील अधिकारी व अंमलदार असे पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार संदिप शिर्के यांना मिळालेले बातमीवरुन पुणे येथील विमाननगर चौकाकडुन श्रीकृष्ण हॉटेल चौका कडे जाणाऱ्या रोडवर मारुती सुझुकी शो रुम समोर सार्वजनिक रोड, विमाननगर पुणे येथे इसम नामे किरण भाऊसाहेब तुजारे वय २४ वर्षे, रा-श्री बिल्डींग, दुसरा मजला, प्लॅट नं.०६, मराठी शाळे शेजारी, आव्हाळ वाडी, वाघोली पुणे. याचे ताब्यात एकुण ६,२७,०००/- किं.रु.चा ऐवज त्यामध्ये ३० ग्रॅम ३५ मि.ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ जप्त करुन त्याचे विरुध्द विमानतळ पोलीस स्टेशन गु.र.नं.६६/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.वरील नमुद कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. १ श्री. गणेश इंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. २, राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक१, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक उल्हास कदम, अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस उप निरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलीस अंमलदार चेतन गायकवाड, संदिप शिर्के, अझिम शेख, साहिल शेख, रविंद्र रोकडे, संदिप जाधव, मयुर सुर्यवंशी, आझाद पाटील, योगेश मांढरे, दिनेश बास्टेवाड, दिशा खेवलकर, रेहाना शेख, दयानंद तेलंगे पाटील, विनायक साळवे. दत्ताराम जाधव, ज्ञानेश्वर घोरपडे, योगेश मोहीते, प्रविण उत्तेकर, मारुती पारधी, विशाल दळवी, संदेश काकडे, नुतन वारे, विपुल गायकवाड यांनी केली आहे.

म्हातोबा टेकडीवरील झाडे जगविण्यात यश

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून आनंद व्यक्त

पुणे : कोथरूड मधील म्हातोबा टेकडीवर लावलेल्या झाडांना आग लावून नष्ट करण्याचा प्रकार जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात झाला होता. या प्रकारामुळे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे देखील कमालीचे संतप्त झाले होते. आता ही झाडे वाचविण्यात चंद्रकांतदादा पाटील यांच्या टीमला यश असून, त्यासाठी अनेक हातांच्या कष्टाचे चीज झाले असल्याची भावना नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.

वृक्ष संवर्धनासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या १० जून २०२४ रोजी ६५ व्या वाढदिवसानिमित्त ६५ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला होता. त्यानुसार कोथरूड येथील, महात्मा, म्हातोबा, पाषाण भागातील टेकड्यांवर वृक्ष लागवड करण्यात आली होती. त्यापैकी म्हातोबा टेकडीवर ६५०० औषधी वनस्पतींसह पर्यावरण संवर्धनात अतिशय महत्वाचे ठरणारे वृक्ष लावण्यात आले. त्याच्या संवर्धनासाठी विशेष व्यवस्था देखील केली आहे. यामध्ये टेकडीवरील झाडांना पाण्याचे पाईप, टाक्या, खते, वृक्ष संवर्धनासाठी आवश्यक बाबीची व्यवस्था करण्यात आल्या. तसेच, त्यांच्या देखरेखीसाठी सात जणांची नेमणूक केली होती.

मात्र काही टवाळखोरांनी आग लावून ही झाडे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या आगीची २५०० झाडांना झळ बसली होती. त्यामुळे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील देखील कमालीचे संतप्त झाले होते. या घटनेनंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन टवाळखोरांवर चाप बसविण्याचे निर्देश दिले होते. दुसरीकडे झळ बसलेल्या झाडांना जगविण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेऊन काम देखील सुरु केले.

त्यासाठी आठ जणांच्या टीमची नेमणूक केली होती. वनविभाग आणि टेकडीवर येणारे सामान्य कोथरुडकर यांच्या मदतीने अथक प्रयत्न केले. त्यामुळे या झाडांना पुन्हा एकदा पालवी फुटली आहे. त्यामुळे ही झाडे जगाविण्यासाठी केलेल्या कष्टाचे चीज झाल्यामुळे एक वेगळाच आनंद होत असल्याची भावना नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज व्यक्त केली.

हुंडाबळी:71 वर्षाचे सासरे अन 65 वर्षाच्या सासूसह पतीला 7 वर्षाची शिक्षा

पुणे- हुंडाबळीच्या प्रकरणात 71 वर्षाचे सासरे अन 65 वर्षाच्या सासू सह पतीला 7 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली

सदर घटना ही १५ नंबर, मनिष सुपर मार्केटमागे, लक्ष्मी कॉलनी, हडपसर, पुणे येथे दिनांक ३०/११/२०१२ ते दिनांक २५/०५/२०१३ रोजीच्या दरम्यान घडली आहे. यातील आरोपी १) संतोष विठ्ठल पवार (पती), वय ४२ वर्षे रा. १५नंबर, मनिष सुपर मार्केटमागे, लक्ष्मी कॉलनी, हडपसर, पुणे २) विठ्ठल तुकाराम पवार (सासरे) वय ७१ वर्षे रा. सदर व ३) सौ. मंगल विठ्ठल पवार (सासू) वय ६५ वर्षे रा. सदर यांनी लग्नात राहिलेली भांडी, दोन तोळे सोने, कुलर, फ्रिज, पिठाची गिरणी इ. वस्तू दिले नसल्याने ते घेऊन येण्या करीता हुंड्यासाठी मानसिक व शारिरीक छळ करुन मारहाण करीत होते. त्यामुळे दिनांक २५/०५/२०१३ रोजी मयत सविता संतोष पवार वय २३ वर्षे रा. सदर हिने राहते घरी सततच्या होणाऱ्या छळाला कंटाळून अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन मयत झाल्याने हडपसर पोलीस ठाणे, पुणे शहर येथे गुन्हा क्रमांक २१५/२०१३ भा.दं. वि. कलम४९८ (अ), ३०४ (ब), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास श्री. बी.एम. पवार, पोलीस उप निरीक्षक यांनी केला व यातील आरोपींविरुद्ध मा. न्यायालयामध्ये मुदतीत दोषारोपपत्र सादर केले. सदर केसचा सेशन केस क्र. ९२४/२०१३ असा आहे.
वरील प्रकरणामध्ये सबळ साक्षीपुराव्याअंती मा. जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांनी आरोपींनादिनांक ३०/०१/२०२५ रोजी सात वर्षे सश्रम कारावास व ८ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साधाकारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
सरकारी पक्षातर्फे सहा. सरकारी वकील श्री. प्रदिप गेहलोत, कोर्ट पैरवी सपोफौ श्रीशैल तेलुनगी, व पोलीस अंमलदार अविनाश गोसावी, यांनी कामकाज पाहिले. सदर कामगिरी करीता प्रोत्साहन म्हणून मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५, पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे यांनी कोर्ट पैरवी सपोफौ श्रीशैल तेलुनगी व पोलीस अंमलदार अविनाश गोसावी व नमूद गुन्हयाचे तपासी अधिकारी पोउनि बी.एम. पवार यांना १० हजार रुपये बक्षिस मंजूर केले आहे.

आईच्या बॉयफ्रेण्डचा भर रस्त्यात कोयत्याने केला खात्मा

पुणे : कोथरूडमधील राहुल जाधव नामक तरुणाचा भर रस्त्यावर ३ ते ५ जणांच्या टोळक्याने कोयत्या सारख्या तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केला . याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात आईच्या बॉय फ्रेंड असलेल्या राहुल जाधवचा खात्मा मुलाने अशा प्रकारे केला असावा अशी माहिती पुढे येत आहे.

दुचाकीवरुन जात असलेल्या तरुणावर कोयतासदृश शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याची घटना पुणे शहरातील कोथरुड परिसरात गुरुवारी सायंकाळी घडली. हल्ल्यानंतर आरोपी कोयते नाचवून आरडाओरड करीत पळून गेले.भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे कोथरूड परिसरात दहशतीचे वातावरण होते. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी चार अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. एका तरुणाच्या आईसोबत मयत तरुणाचे प्रेमसंबंध असल्याचे समोर आले आहे. या कारणातूनच हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.राहुल जाधव असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. कोथरूड येथील सागर कॉलनी परिसरात सायंकाळी सव्वापाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. राहुल दुचाकीवरून जात असताना तीन ते पाच जणांच्या टोळक्याने आरडाओरडा करून पालघन (कोयतासदृश शस्त्र), कोयता व अन्य शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला केला.प्राथमिक माहितीनुसार, मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे एका तरुणाच्या आईसोबत प्रेमसंबंध होते. या प्रकरणाची कुणकुण लागल्यानंतर आरोपींनी राहुलला ठार मारण्याचा कट रचून त्याच्यावर हल्ला केला.

माजी आमदार महादेव बाबर यांनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट

पुणे: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हडपसर चे माजी आमदार महादेव बाबर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. त्यांनी नुकतीच एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

महादेव बाबर हडपसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. यंदाही ते विधानसभा निवडणूक लढण्यास उत्सुक होते. पण महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुटली. त्यामुळे बाबरांची विधानसभा निवडणूक लढण्याची संधी हुकली. त्यानंतर बाबर नाराज झाले होते. विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या पक्षाचं पानीपत झाल्यानंतर बाबर यांनी आता शिंदेंच्या शिवसेनेचा रस्ता धरला आहे.फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात २५ माजी सर्वपक्षीय नगरसेवकांना घेऊन शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बाबर यांनी सांगितलं. पुण्यात ठाकरेंना सातत्यानं धक्के बसत आहेत. आता बाबर यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्यानं धक्क्यांची मालिका सुरुच आहे. आधी ५ माजी नगरसेवकांनी ठाकरेसेनेची साथ सोडली. त्यानंतर ३०० ते ४०० शाखाप्रमुख, विभागप्रमुखांनी पक्ष सोडला. यानंतर आता माजी आमदार महादेव बाबर यांनी शिवबंधन सोडलं आहे.महादेव बाबर २००९ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर हडपसरमधून निवडून आले. पक्षफुटीनंतर ते ठाकरेंसोबत राहिले. त्यांना विधानसभा निवडणूक लढायची होती. पण जागावाटपात हडपसर मतदारसंघ शरद पवारांच्या पक्षाकडे गेला. प्रशांत जगताप यांनी अजित पवारांचे आमदार चेतन तुपे यांना चांगली लढत दिली. त्यांनी १ लाख २७ हजार ६८८ मतं घेतली. पण त्यांचा ७ हजार १२२ मतांनी पराभव झाला.

तुमच्या चुकांवर पांघरूण घालता .. माझेच पांघरूण फाटलेय-अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांना सुनावले

‘प्रत्येक ठिकाणी सरड्यासारखे रंग बदलणारी जमात असते. ती माझ्या पक्षातही आहे. यापुढे हे चालणार नाही. तुमच्या चुकांवर पांघरूण घालून, तुम्हाला पदरात घेऊन माझेच पांघरूण फाटलेय, मलाच पदर उरला नाही. यापुढे चुकीचे वागणाऱ्यांची गय करणार नाही,’ असा शब्दांत उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सुनावले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी प्रथमच आलेल्या पवारांनी पक्षाची बैठक घेतली. या वेळी मंत्री धनंजय मुंडेह हजर होते.

वाल्मीक कराड, विष्णू चाटे हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी खंडणी, खून प्रकरणात अटकेत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीची बदनामी झाली. धनंजय मुंडे गोत्यात आले. या पार्श्वभूमीवर पवार म्हणाले, ‘पक्षात व बीडमध्ये गुन्हेगारी कृत्ये खपवून घेणार नाही. आज सत्ता आल्याने हौशे-गवशे मला भेटतात. निवडणुकीपूर्वी ते विरोधात होते?’ असे पवार म्हणाले.

अजित पवारांसोबतचे कार्यक्रम संपल्यानंतर गुरुवारी सायंकाळी धनंजय मुंडे भगवान गडावर मुक्कामी आले. तिथे दर्शन घेऊन त्यांनी महंत नामदेवशास्त्री यांच्याशी गोपनीय चर्चा करून पुढील वाटचालीबाबत त्यांचे मार्गदर्शन घेतले.

बीड जिल्ह्यात उद्योगपती गुंतवणूक करतील. पवनचक्की, सौरऊर्जेचे प्रकल्प येत आहेत. या उद्योगपतींकडून खंडणी मागणाऱ्यांना, त्यांचा रस्ता अडवणाऱ्यांना माफ केले जाणार नाही, रिव्हॉल्व्हरच्या रील्स काढण्याचे प्रकार यापुढे दिसले तर त्यांचे लायसन्स रद्द केले जाईल, असा इशाराही अजित पवार यांनी दिला.

जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू असताना धनंजय मुंडे व खासदार बजरंग सोनवणे यांच्यात पवारांसमोरच खडाजंगी झाली. बीडच्या अधिकाऱ्यांवर दहशत असल्याचा मुद्दा मुंडे यांनी उपस्थित केला. त्यावर सोनवणे यांनी कुणाची दहशत आहे हे उघड करा, असे विचारले.

बीड जिल्ह्याला बदनाम केले जात असल्याचे मुंडे यांनी सांगताच सोनवणे व आमदार सुरेश धस यांनी मुंडे यांना प्रत्युत्तर देत जिल्ह्यातील सत्य परिस्थिती आम्ही जनतेसमोर मांडत असल्याचे सांगितले. यावरून शाब्दिक खडाजंगी झाली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खासदार सोनवणे यांनी बाचाबाची व भांडण झाले नसल्याचे सांगत एवढ्या-तेवढ्या मुद्द्यावरून बोलचाल होतच असते असे सांगितले. तर आमदार धस म्हणाले की, एकमेकांना बोलल्याने लगेच वादावादी होते का? भांडणे लावता का तुम्ही? हे भांडण गुद्द्याचे नाही तर मुद्द्याचे भांडण आहे. मग आम्ही भांडण झाले असे म्हणणार नाही, असे आमदार धस म्हणाले.

महामेट्रोकडून जिल्ह्यातील १ लाख २६ हजार ४८९ कोटी रुपयांचा वाहतूक आराखडा सादर

लोकप्रतिनिधींनी आराखड्याचा अभ्यास करुन सूचना कळवाव्यात- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि.३० : जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या आणि रोजगारांची संख्या लक्षात घेऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने महामेट्रोकडून सादर पुढील ३० वर्षाच्या १ लाख २६ हजार ४८९ कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक वाहतूक आराखड्यामध्ये काही बदल, सूचना असल्यास सर्व लोकप्रतिनिधींनी येत्या ७ ते १० दिवसांमध्ये महामेट्रोला लेखी स्वरुपात कळवाव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे महानगर प्रभाव क्षेत्रातील सर्वंकष वाहतूक आराखडा अद्ययावत करणे व पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते. यावेळी क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार सुप्रिया सुळे, मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, आमदार अमित गोरखे, चेतन तुपे, योगेश टिळेकर, विजय शिवतारे, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, बापूसाहेब पठारे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पीएमपीएलच्या व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ- मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, लोकप्रतिनिधींना मेट्रोने सादर केलेल्या आराखड्याचा अभ्यास करुन त्यांना वाहतूक व्यवस्थेच्या अनुषंगाने वाहतूक कोंडी कशी कमी करता येईल त्यासाठी नवीन मार्ग, पर्यायी रस्ते आदींबाबत मेट्रोकडे सूचना कळवाव्यात. महामेट्रोकडून त्याबाबत तांत्रिक तसेच आर्थिक व्यवहार्यता तपासून आवश्यकतेप्रमाणे आराखड्यात बदल करण्यात येतील.

यावेळी श्री. हर्डीकर यांनी सादरीकरणाद्वारे बैठकीत हिंजवडी ते जिल्हा न्यायालय, पिंपरी चिंचवड ते निगडी व स्वारगेट ते कात्रज या मार्गावर नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या मेट्रो लाईन, बीआरटी व रेल्वे लाईन, मांगडेवाडी, कदम वस्ती, लोणीकंद व मोशी या ठिकाणी नवीन बस टर्मीनल, कोथरुड, कात्रज, हडपसर, मार्केटयार्ड व पिंपरी बस डेपोचा पुनर्विकास, पूलगेट, चिंचवड, भोसरी, निगडी, मुखई चौक, चिखली, वाघोली, रांजणगाव, तळेगाव व चाकण येथील जुन्या बस टर्मीनलचा पुनर्विकास, रिंग रोड, मिसींग लिंक, रेल्वे जंक्शनचा विकास, सायकल ट्रॅक, फूटपाथमध्ये सुधारणा, ट्रक टर्मीनल व लॉजिस्टिक हब, पार्कींग व्यवस्था, रस्ता रुंदीकरण, बसेसची उपलब्धता, रेल्वे ओव्हर ब्रीज, पीएमपीएमएलच्या नवीन मार्गावर बस सुरु करणे याविषयी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तसेच केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दर पाच वर्षांनी वाहतूक आराखडा अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्यानुसार आराखडा तयार करण्यात आला असल्याचे श्री. हर्डीकर यांनी सांगितले.

यावेळी श्रीमती सुळे यांनी वाहतूक विकास आराखडा तयार करताना पुरंदर येथील विमानतळाच्या जागेच्या अनुषंगाने सूचना केली.

श्री. शिवतारे यांनी पुणे ते लोणावळा लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात तसेच सासवड येथे बसडेपो सुरु करावा, पुणे ते नीरा लोकलची सेवा सुरु करावी, बंद केलेल्या मार्गावरील बसेस सुरु कराव्यात अशी मागणी केली.

श्री. तुपे म्हणाले, नवीन मुठा उजवा कालव्याच्या खडकवासला ते फुरसुंगीपर्यंत प्रस्तावित बोगद्यासाठी मंत्रिमंडळाने मान्यता देऊन पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे. संपूर्ण बोगद्याच्या अंतरापर्यंत जमिनीवर रस्ता आणि समांतर लोकल रेल्वे किंवा मेट्रो केल्यास वाहतुकीचा मोठा प्रश्न सुटू शकेल; त्याबाबत विचार व्हावा, असे ते म्हणाले.

आमदार श्री. तुपे यांनी मेट्रोच्या स्वारगेट कात्रज विस्तारित मार्गापासून कात्रज ते मंतरवाडी अशी सासवड मार्गाशी जोडणी प्रस्तावित करावी अशी मागणी केली.

भरभरून मते देणाऱ्या पुणेकरांचीहक्काच्या पाण्यासाठी भाजपकडून अडवणूक

-माजी आमदार मोहन जोशी

पुणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पुणेकरांनी भाजपला मते दिली. मात्र, त्या मतदारांनाच ठेंगा दाखवायला भाजपने सुरूवात केली असून, मागणीनुसार पाण्याचा हक्काचा कोटा न देता, महापालिकेलाच जलसंपदा खात्याने दंड ठोठवायला सुरुवात केली आहे, हा प्रकार संतापजनक आहे, अशी जळजळीत प्रतिक्रिया माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी व्यक्त केली आहे.

शहराची वाढ चौफेर होत असून त्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे. ही वाढ पाहता २१टीएमसी पाणी जलसंपदा खात्याने पुण्याला द्यावे, तसा करार करावा, अशी मागणी पुणे महापालिका राज्य सरकारच्या जलसंपदा खात्याकडे सातत्याने करीत आहे. ही मागणी न्याय्य आहे. त्याचा पाठपुरावा भाजप नेते करत नाहीत. उलट भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महापालिकेला थकबाकी वसुलीसाठी नोटीस पाठविली आहे.

२००१साली जलसंपदा खात्याने महापालिकेला ११.५० टीएमसी कोटा मंजूर केला. त्यानंतर १९ साली महापालिकेने जलसंपदा खात्याकडे १७टीएमसी पाण्याची मागणी केली होती. त्यावर विचार झाला नव्हता. मात्र, वाढलेली लोकवस्ती, शहराची वाढलेली हद्द विचारात घेता महापालिकेची पाण्याची गरज त्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे मंजूर कोट्यापेक्षा ५.५० ते ८ टीएमसी अधिक पाणी महापालिका उचलते, हे कारण दाखवून जलसंपदामंत्री विखे पाटील यांनी नोटीस पाठविली असून ७१४कोटी रुपये थकबाकी वसुलीचे आदेश त्यांनी पुण्यात येऊन दिले. पुणेकरांवर हा सरळसरळ अन्याय आहे. पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊनही भाजप नेते ती मंजूर करून घेत नाहीत. जलसंपदा खात्याने नोटीस बजावल्यानंतरही पुण्यातील केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार, आमदार गप्प बसतात हे आश्चर्यकारक आहे. पुण्याला पुरेसे पाणी पुरवू, अशी फक्त आश्वासने निवडणुकीत द्यायची आणि नंतर त्या आश्वासनांना हरताळ फासायचा, हा प्रकार चालूच आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

जलसंपदा खात्याने पुण्यातील पाण्याची वाढीव मागणी तातडीने मंजूर करावी, अन्यथा काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करेल, असा इशारा मोहन जोशी यांनी दिलेला आहे. हक्काच्या पाण्यासाठी पुणेकरांची अडवणूक करणे मान्य केले जाणार नाही, असेही जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

यहा का मैं हूं किंग..कुख्यात गजा मारणेच्या नावाचा वापर करून गुन्हेगारी रील्स प्रसारित करणारे चार महाविद्यालयीन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

पुणे-समाज माध्यमावर (इन्स्टाग्राम) दर्शकसंख्या (फॉलोअरर्स) वाढविण्याच्या उद्देशातून कुख्यात गुंड गजा मारणे याच्या चित्रीकरणाचा प्रसार करून दहशत निर्माण करणाऱ्या चार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतले. संबंधित विद्यार्थ्यांनी गजा मारणेच्या नावाने समाज माध्यमावर पुण्याचा किंग, किंग ऑफ महाराष्ट्र, बादशहा अशा प्रकारे ओळी लिहून त्याच्या चित्रीकरणाचा प्रसार केला. त्यांच्याविरूद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकारे दहशत निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, यांच्या आदेशाने गुन्हेगारीचे फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मिडीया अकाऊंटवर गुन्हेगाराची उदात्तीकरण करुन समाजामध्ये भिती व दहशत पसरविणारे व्हिडीओ रिल्स प्रसारीत करणारे बर कारवाई करण्याचे आदेशीत केले होते. अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, व पोलीस उप आयुक्त गुन्हे निखील पिंगळे, यांच्या मार्गदर्शनानुसार व सुचनानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा श्री. विजय कुंभार, यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना गुन्हेगारीची उदात्तीकरण करुन समाजामध्ये भिती व वहशत पसरविणारे व्हिडीओ रिल्सची माहीती काढण्याबाबत सांगितले होते. त्यानुसार हमराज चौक कोथरुड पुणे येथील रेकॉर्ड वरील गुन्हेगार गजानन मारणे याचे नावाने इंस्टाग्राम या सोशल मिडीयावर बरेच अकाऊंट असल्याबाबत माहीती मिळाली.
त्यानंतर एकुण १३ इंस्टाग्राम अकाऊंट अॅक्टीव्हेट असल्याचे दिसुन आले. त्या इंस्टाग्राम अकाऊंट मध्ये किंग ऑफ पुणे सिटी मा. श्री गजानन महाराज मारणे, पुण्यातील गुन्हेगारींची मुंबईच्या टोळयांशी हातमिळवणी, किंग ऑफ महाराष्ट्र, पुण्याचा बाप कोण आहे हे अख्या पुण्याला माहित आहे या नावाने व्हिडिओ रिल्स, यहा का मैं हूं किंग, और मेरे चलते हे रुल्स, और उन रुल्स को आपणे हिसाब से बदलता रहीता हु, तो उने चुपचाप फॉलो करो, अगर इसके अलवा और कुछ करणे की कोशिस की, तो तेरे टुकडे टुकडे करके ताश तरह फैला दूंगा, तसेच KING OF PUNE CITY, जस मुंबईत एकच दादर तसच पुण्याचा एक FATHER, ड्रोन कॅमेराचा वापर करुन गज्या मारणेच्या गाडीचा ताफा, फोटो वापरुन गुन्हेगाराची उदात्तीकरण करुन समाजामध्ये भिती व दहशत पसरविणे अशा प्रकारचे व्हिडीओ रिल्स, फोटो प्रसारीत केलेले आहेत.
या अनुषंगाने इसम नामे १) अक्षय निवृत्ती शिंदे वय २० वर्षे रा. निमगाव खालु, ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर, २) सिध्दार्थ विवेकानंद जाधव वय १९ वर्षे रा. विठठल मंदिराच्या मागे, महमंदवाडी, हडपसर पुणे, ३) साहिल शादुल शेख वय १९ वर्षे रा. सुंबा, धाराशिव ४) इरफान हसन शेख वय १९ वर्षे रा. सुंबा धाराशीव यांना ताब्यात घेवुन पुढील कारवाई कामी कोथरुड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर १३ इंस्टाग्राम अकाऊंट धारकांच्या विरोधात फिर्यादी पोलीस अंमलदार प्रशांत शिवे, यांनी कोथरुड पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हा रजि. नं. १३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३, ३५३ (१), (ब), सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (२) (३), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुढे अशा प्रकारचे रिल्स बनवुन सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर टाकणारे व्यक्ती विरुध्द कारवाई सुरु राहणार आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त,अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे- २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शानाखाली खंडणी विरोधी पथक २, गुन्हे शाखा, वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय कुंभार, सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस उप निरीक्षक गौरव देव, पोलीस अंमलदार सैदोबा भोजराव, प्रशांत शिदे, सुरेंद्र जगदाळे, अनिल कुसाळकर, अमोल घावटे, चेतन आपटे, अजिनाथ येडे, दिलीप गोरे, चेतन चव्हाण, संग्राम शिनगारे, महिला पोलीस अंमलदार रुपाली कर्णवर, आशा कोळेकर यांनी केलेली आहे.

पंजाब CM च्या दिल्लीतील निवासस्थानावर EC चा छापा:म्हणाले- cVIGIL ॲपवर पैसे वाटपाची तक्रार मिळाली

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही एक्सवर पोस्ट टाकत या घटनेचा निषेध केला आहे. “दिल्ली पोलिसांच्या समवेत निवडणूक आयोगाने माझ्या दिल्लीतील निवासस्थानी धाड टाकली. दिल्लीत भाजपाचे नेते राजरोस पैसे वाटप करत आहेत. पण हे पोलीस आणि निवडणूक आयोगाला दिसत नाही. पण आमच्यावर मात्र कारवाई करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपाच्या इशाऱ्यावर दिल्ली पोलीस आणि आयोग पंजाबींना बदनाम करत आहे, हे निषेधार्ह आहे”, अशी टीका भगवंत मान यांनी केली.

दिल्ली- राजधानी दिल्लीत राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. यमुना नदीच्या अस्वच्छ पाण्यावरून शेजारचे हरियाणा राज्य या निवडणुकीत ओढले गेले असताना आत पंजाबलाही यात ओढले गेले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे नेते भगवंत मान यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी निवडणूक आयोगाने धाड टाकली असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. दरम्यान निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनीही आपली बाजू मांडली आहे. पैसे वाटल्याचा आरोप झाल्यामुळे भरारी पथकाने कपूरथाला निवासस्थानी धडक दिली होती. मात्र त्यांना घरात येऊ दिले नाही.निवडणूक अधिकारी ओ. पी. पांडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, इथून पैसे वाटप होत असल्याची तक्रार आम्हाला मिळाली होती. १०० मिनिटांच्या आत आम्हाला तक्रारीचे निवारण करायचे असते. आयोगाचे भरारी पथक येथे तपासणीसाठी आले होते. मात्र त्यांना आत जाऊ दिले नाही. त्यामुळेच मला यावे लागले. भरारी पथकाला कॅमेऱ्यांसह आत जाऊ द्यावे, अशी विनंती आम्ही केली आहे.

दिल्लीतील सर्व 70 जागांवर 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर 8 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहेत. विधानसभेच्या 70 जागांसाठी एकूण 699 उमेदवार रिंगणात आहेत. विधानसभेचा सध्याचा कार्यकाळ 23 फेब्रुवारीला संपत आहे.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी मध्ये माहले ग्रुप जर्मनीचे अध्यक्ष व सीईओ अर्न्ड फ्रांझ यांचा विद्यार्थ्यांशी संवाद  

पुणे: जागतिक स्तरावर वाहन उद्योग क्षेत्रातील तीस अग्रगण्य कंपन्यांपपैकी एक अशा माहले ग्रुप जर्मनीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अर्न्ड फ्रांझ यांच्या प्रेरणादायी भेटीने एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना नवीन दृष्टिकोन व आव्हाने पेलण्याची उर्मी मिळाली. विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या प्रमुख सत्रात त्यांनी त्यांच्या यशस्वी प्रवासाची कहाणी व नाविन्यतेसाठी त्यांची दृष्टी मांडली. त्यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना नवीन कल्पना आत्मसात करण्याची प्रेरणा मिळाली. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या प्रश्नोत्तर सत्राने विशेष आकर्षण निर्माण केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना श्री. फ्रांझ यांनी मुद्देसूद आणि मार्गदर्शक उत्तरे दिली, ज्यामुळे उपस्थित श्रोत्यांवर सकारात्मक प्रभाव पडला. या भेटीचा वैशिष्ठ म्हणजे “व्हेगापॉड हायपरलूप” क्लबच्या अधिकृत वेबसाईटचे उद्घाटन श्री. अर्न्ड फ्रांझ आणि इतर मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. याशिवाय, श्री. फ्रांझ यांनी माहले गटाच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे सखोल परीक्षण केले. यामध्ये व्हेगापॉड हायपरलूपच्या नाविन्यपूर्ण प्रोटोटाइप आणि पिरान्हा रेसिंगच्या सर्वभूमी वाहन प्रकल्पांचा समावेश होता. त्यांनी या प्रकल्पांवर तांत्रिक आणि व्यावसायिक दृष्टीकोनातून मौलिक सूचना देऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यामध्ये अधिक सुधारणा करण्यास प्रोत्साहित केले. विद्यापीठाच्या परंपरेनुसार श्री. अर्न्ड फ्रांझ, श्री. डॉ. रॉजर बुश – उपाध्यक्ष (सेल्स व इंजिनिअरिंग), श्री. मिलिंद गोडबोले – अध्यक्ष, माहले इंडिया, श्री.आशुतोष देशपांडे -अभियांत्रिकी सेवा प्रमुख तथा जोजी फिलिप्स- संचालक मानव संसाधन यांचे भारतीय संस्कृती नुसार स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजक आणि अभियांत्रिकी तथा तंत्रज्ञान संकुलाचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. गणेश काकांडीकर यांनी युनिव्हर्सिटीबद्दल विस्तृत सादरीकरण केले. एमआयटी  आणि माहले ग्रुप यांचा प्रतिनिधी मंडळाच्या बैठकीत परस्पर सहकार्यातून विद्यार्थ्यांचा विकास कसा साधता येईल यावर चर्चा झाली. यावेळी माननीय कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, कुलसचीव प्रा. गणेश पोकळे, अभियांत्रिकी तथा तंत्रज्ञान संकुलाचे अधिष्ठाता डॉ. सिद्धार्थ चक्रवर्ती,  संगणक विज्ञान तथा अभियांत्रिकी संकुलाचे अधिष्ठाता डॉ. मंगेश बेडेकर, यंत्र अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. शिवप्रकाश बर्वे, विद्यार्थी प्रकल्प प्रमुख डॉ. दीपक हुजरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. ओंकार कुलकर्णी, डॉ. चेतन पाटील, प्रा. श्रीकांत यादव, डॉ. आशिष उटगे, डॉ. आशिष पवार, डॉ. प्रशांत पाटने, प्रा. हेरंब फडके, डॉ. गणेश बोरीकर, प्रा. स्नेहल कोळेकर, प्रा. सचिन देशमुख, प्रा. प्रल्हाद पेसोडे, डॉ. कौस्तुभ कुलकर्णी, डॉ. प्रशांतकुमार, डॉ. विवेक पटेल, प्रा. अरुण माळी, डॉ. मिटुल सोळंकी, प्रा. मंगेश सराफ, डॉ. वैदेही साहू, डॉ. दीपक कुमार, डॉ. अभिषेक थोटे, प्रा. रवींद्र पवारकर सहायक कुलसचिव श्री, प्रदीप चाफेकर, श्रीमती सुलभा वाले यांनी परिश्रम घेतले.