Home Blog Page 48

पुण्याच्या नवले पुलावर भीषण अपघात:दोन ट्रकला आग, दोघांमध्ये कार अडकली

५ जणांचा मृत्यू

पुणे-येथील नवले पुलावर भीषण अपघात झाला आहे. दोन ट्रकला आग लागली असून या दोन्ही ट्रकच्या मध्ये एक कार अडकली असून यात 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोन ट्रक एकमेकांना धडकले होते आणि त्यात एक कार अडकली होती, अशी माहिती समोर आली आहे.

साताराच्या दिशेने पुण्याकडे येणाऱ्या दोन्ही ट्रकचा अपघात झाला आणि यात एक कार अडकली होती. यावेळी दोन्ही ट्रकला आग लागली असून यात मृतांची संख्या देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या अपघातामुळे नवले ब्रिजवर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

अग्निशमन दलाकडून ट्रकला लागलेल्या आग विझवण्याचे प्रयत्न करत असून यावेळी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. नवले पुलावर अनेक अपघात होत असतात, परंतु हा अपघात सर्वात मोठा असल्याचे बोलले जात आहे. दोन ट्रकचा अपघात झाला असून यात मागच्या ट्रकचा चालक अद्यापही ट्रकमध्येच अडकला असल्याचे दिसून येत आहे. तर सध्या या अपघातात अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. चारचाकी जी या दोन्ही ट्रकच्या मध्ये अडकली होती, या कारमधील प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एका ट्रकचा ब्रेक फेल झालेला होता आणि त्या ट्रकने पुढच्या ट्रकला धडक दिली. मध्ये एक कार होती, त्यात 4-5 लोक होती, ती संपूर्णपणे जळून खाक झाली आहेत. ट्रक चालक देखील ट्रकमध्येच अडकली असून त्यांना देखील आगीमुळे उतरता आले नाही. त्यांचा सुद्धा मृत्यू झाला आहे. तसेच मागे एक ट्रॅव्हलर होती, त्याला सुद्धा धडक देण्यात आली, त्यात 17-18 लोक होती. जवळपास 20-25 लोक जखमी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागा खऱ्या ओबीसींनाच मिळाव्यात

कुणबी प्रमाणपत्रावर आधारित उमेदवार दिल्यास संघर्षाचा इशारा

पुणे:

पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत इतर मागास प्रवर्गातील राखीव जागांवर खऱ्या ओबीसींना उमेदवारी मिळावी. कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे उमेदवारी दिली गेल्यास ओबीसी बहुजन महासंघ सर्वच जागांवर उमेदवार उभे केले जातील, असा इशारा ओबीसी बहुजन महासंघाचे बाळासाहेब झोरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ओबीसी बहुजन महसंघाचे भानुदास पानसरे, किसन नांगरे, चंदाताई केदारी, आनंद रोकडे, राजेंद्रभाऊ नांगरे, विशाल शेळके, महादेव मरगळे, भाऊसाहेब मरगळे, अशोक कांबळे, भाऊसाहेब आखाडे, कृष्णा पानसरे आदी उपस्थित होते.

मुळशी तालुक्यात पंचायत समितीच्या नऊ जागांपैकी इतर मागास प्रवर्गासाठी ३ तर अनुसूचित जातीसाठी १ जागेवर आरक्षण मिळाले आहे. या जागांवर केवळ खऱ्या ओबीसींचाच हक्क आहे. त्यामुळे या जागांवर खऱ्या ओबीसी उमेदवारांनाच संधी मिळावी, अशी आग्रही मागणी ओबीसी बहुजन महासंघाने सर्वच राजकीय पक्षांना केली आहे.

ओबीसींच्या हक्काच्या जागांवर कुणबी प्रमाणपत्र मिळविल्या उमेदवारांना उभे केल्यास ओबीसी बहुजन महासंघ आरक्षित जागाच नव्हे तर सर्वच ९ जागांवर निवडणूक लढविण्याचा इशारा महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे. केवळ निवडणूक जिंकणे, हरणे एवढ्यापुरता हा प्रश्न नाही तर ओबीसी, बहुजन समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. उद्या आमचे ग्रामपंचायत सदस्य पदावरही ओबीसी बहुजन दिसणार नाही. गावगाड्यातून आम्हाला नाहीसे करण्याचा हा प्रयत्न आहे, अशा तीव्र भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

गुरुवारी ओबीसी महासंघाच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन

आपल्या भावना सर्वच राजकीय पक्षांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आणि ओबीसी बहुजन आणि रिपब्लिकन समाजाची एकजूट दाखविण्यासाठी गुरुवार दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी मुळशी तालुका ओबीसी बहुजन महासंघाच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महामेळाव्याला ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, मंगेश ससाणे, रिपब्लिकन पक्षाचे राज्य संघटन सचिव परशुराम वाडेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही : हर्षवर्धन सपकाळ

नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांवर शिक्कामोर्तब, राजकीय मंडळाच्या बैठकीत निर्णय.

आगामी काळात काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा ओघ वाढणार, सत्ताधारी पक्षातील अनेकजण काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक.

मुंबई, दि. १३ नोव्हेंबर २०२५

राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारमध्ये अंतर्गत वाद पराकोटीला गेले आहेत पण सत्तेसाठी हे सर्वजण एकत्र आहेत. सत्तेसाठी काहीही व वाट्टेल ते अशी त्यांची भूमिका आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्तेसाठी लाचार आहेत त्यामुळे सत्ता सोडून ते राहू शकत नसल्यानेच ते सत्तेतून बाहेर पडणार नाहीत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

टिळक भवन येथे काँग्रेसच्या राज्य निवडणूक मंडळाची दोन दिवसांची बैठक पार पडली. या बैठकीला विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, सहप्रभारी बी. एम. संदीप, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य, माजी मंत्री नसीम खान, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, वजाहत मिर्झा,प्रदेश सरचिटणीस संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील, सिद्धार्थ हत्तीअंबिरे, सचिन नाईक आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राज्य निवडणूक मंडळाच्या दोन दिवस चाललेल्या या बैठकीत नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करून उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय समिकरणं वेगळी आहेत. स्थानिक पातळीवर समविचारी पक्षांशी चर्चा करून आघाडी करण्यात आली आहे. काही जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी, शेकाप, शेतकरी संघटना, रासप यांच्याशी आघाडी झालेली आहे. मनेसशी आघाडी करण्यासंदर्भात कोणत्याच जिल्ह्यातून प्रस्ताव आलेला नाही, असे सपकाळ यांनी सांगितले.

भाजपा पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश..
चंद्रपूर जिल्ह्यातील भाजप आमदार बंटी भागडिया यांचे कट्टर समर्थक आणि भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री जुनेद खान यांनी आपल्या सहकाऱ्यांसह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.

महायुतीमध्ये फसवणूक झाल्याची भावना तीनही पक्षातील असंख्य पदाधिकाऱ्यांच्या मनात वाढीस लागलेली आहे. आगामी काळात सत्ताधारी पक्षातील अनेक महत्वाचे नेते काँग्रेस पक्षात प्रवेश करतील, असे हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले..

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष डॉ. सत्येंद्र भूसारी यांचे काल अपघातात दुःखद निधन झाले. आजच्या राज्य निवड मंडळ बैठकीच्या सुरूवातीला सर्वांनी मौन राहून त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

चांदणी चौक ते बावधन रस्ता पूर्ण रुंदीने विकसित करून उतार कमी करण्याचे ओमप्रकाश दिवटेंचे आदेश

पुणे- शहर वाहतूक सुधारणा करण्याच्या अनुषंगाने चांदणी चौक ते बावधन (सर्वे नंबर २०, गल्ली नंबर १, बावधन खुर्द) येथील तीव्र उताराच्या रस्त्याचे रुंदीकरण करून उतार कमी करण्याचे आदेश आज येथे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिले या रस्त्या बाबत आज दि. १३/११/२०२५ रोजी जागा पाहणी झाली.यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष)ओमप्रकाश दिवटे, अधीक्षक अभियंता, पथ विभाग अभिजित आंबेकर, उप अभियंता, पथ विभाग सुनील भोंगळे उपस्थित होते.
वाहतूक सुधारणा करण्याचे अनुषंगाने दिवटे यांनी चर्चा करून निर्देश दिले .हा रस्ता पूर्ण रुंदीने विकसित करून त्याचा उतार काही प्रमाणात कमी करण्याच्या अतिरिक्त आयुक्त यांनी सूचना दिल्या.या रस्त्याला काटकोनात जोडल्या जाणाऱ्या अन्य रस्त्याचे स्टेटस, ताबा इत्यादी बाबी संबंधित खात्याकडून तपासणी करून घ्या आणि रस्त्यासाठी उर्वरित जागांचा ताबा मिळाल्यास आवश्यक त्या सुधारणा करून वाहतुकीमधील अपघात प्रवणता कमी करा असेही यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले.
हा रस्ता विकसित केल्यास नवीन लिंक रोड तयार होऊन सदरच्या परिसरातील नागरिकांना हायवेपर्यंत जाणे सुरक्षित व सोयीस्कर होईल या दृष्टिकोनातून पथ विभागाने पुढील कार्यवाही करणे अपेक्षित आहे.

जप्त वाहनांचा १८ नोव्हेंबर रोजी जाहिर ई-लिलाव

पुणे, दि. १३:प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्या वायुवेग पथकाद्वारे मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांमध्ये अटकावून ठेवलेली, मोटार वाहन कर न भरलेली तसेच हक्क सांगून सोडवून न घेतलेली एकूण २९ वाहने www.mstcindia.co.in या संकेतस्थळावर ऑनलाईन जाहिर ई-लिलावाद्वारे विक्रीस ठेवण्यात आली आहेत.

वाहने “जशी आहेत तशी” या तत्वावर विकली जाणार असून, सदर ई-लिलाव रद्द अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कराधान प्राधिकारी, पुणे यांच्याकडे राखीव आहेत. ही वाहने वाघोली वाघेश्वर वाहनतळ आवारात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत पाहणीकरिता उपलब्ध आहेत.

वाहन मालक, चालक, वित्तदाते किंवा ज्या कोणाचे हितसंबंध आहेत त्यांनी लिलावाच्या तारखेपूर्वी महसूल भरून किंवा हक्क सांगून वाहने सोडवून घेता येतील. लिलावानंतर कोणतीही हरकत ग्राह्य धरली जाणार नाही, असेही आवाहन कराधान प्राधिकारी तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण केंद्राची स्थापना

पुणे, दि. 13 नोव्हेंबर : जिल्ह्यातील १४ नगरपरिषद व ३ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय येथे तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात आला आहे.

निवडणुकीच्या तक्रार निवारणबाबत केंद्राचा ०२०-२६०६१७०५ दूरध्वनी क्रमांक आहे. संबंधितांनी या क्रमांकावर संपर्क साधून निवडणुकीसंदर्भातील आपल्या तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन नगरपालिका प्रशासन शाखेच्या प्र. जिल्हा सह आयुक्त ॲलिस पोरे यांनी केले आहे.
000

दिव्यांग कल्याण क्षेत्रात कामकरणाऱ्या संस्थांनी नोंदणी करणे अनिवार्य : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. 13 नोव्हेंबर: दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील कलम ४९-५३ नुसार दिव्यांगांच्या कल्याण पुनर्वसन आणि सक्षमीकरण क्षेत्रात काम करणा-या नागरी समाज संघटना/ संस्थांची नोंदणी अनिवार्य आहे. यासाठी आयुक्त, दिव्यांग कल्याण महाराष्ट्र राज्य, पुणे यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात करण्यात आलेले असल्याचे जितेंद्र डुडी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय समिती दिव्यांग यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

शासन निर्णय दि.१७ ऑक्टोंबर २०२५ नुसार कोणतीही व्यक्ती अथवा नागरी समाज संघटना, संख्या दिव्यांग क्षेत्रात वैध नोंदणी शिवाय कार्य करू शकत नाही. जिल्हयातील ज्या व्यक्ती,संस्था,संघटना यांना दिव्यांग क्षेत्रात कार्य करावयाचे आहे. त्यांनी ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत आयुक्त दिव्यांग कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडे नोंदणी करावी व नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे, असेही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी कळविले आहे.

आयुक्त, दिव्यांग कल्याण यांचेकडे नोंदणी नसलेल्या संस्था, व्यक्ती दिव्यांग क्षेत्रात कार्यरत असल्याचे दिसून आल्यास संबंधिताविरुदध दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील कलम ९१ नुसार व इतर अनुषंगिक कायद्यानुसार कारवाईस पात्र असतील.

अधिक माहितीसाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे येथे संपर्क साधावा.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये तज्ञ प्रशिक्षकांची आवश्यकता

0

पुणे, दि. 13 नोव्हेंबर: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच शासकीय तांत्रिक विद्यालयांत उपलब्ध असलेल्या सुविधांचा उपयोग करून अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अल्पमुदतीचे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तांत्रिक विद्यालयांमध्ये मानधन तत्त्वावर तज्ञ प्रशिक्षकांची आवश्यकता आहे.

तरी इच्छुक तज्ञ प्रशिक्षकांनी आपली माहिती https://tinyurl.com/TOTITI लिंकवर भरावी. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रास्ता पेठ, पुणे (दूरध्वनी क्रमांक ०२०-२६१३३६०६) येथे संपर्क साधावा.
000000

त्रिभाषा धोरण निश्चिती समितीचा शिक्षण क्षेत्रासह विविध घटकांशी संवाद

पुणे, दि. १३: राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीने विधानभवन येथे शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी, भाषातज्ज्ञ, विचारवंत, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, नागरिक आदींशी संवाद साधून त्यांच्या सूचना व प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने त्रिभाषा धोरण निश्चित करण्यात आलेली समिती या अनुषंगाने विभागनिहाय भेटी देऊन विविध घटकांशी संवाद साधत आहे. त्याअंतर्गत विधानभवन येथे हा जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, आमदार बापूसाहेब पठारे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, समितीचे सदस्य तथा शिक्षणतज्ज्ञ डॉ. अपर्णा मॉरिस, डेक्कन महाविद्यालयाच्या मराठी भाषा विज्ञान प्रमुख डॉ. सोनल कुलकर्णी जोशी, बालमानसतज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ल, पुणे विभागीय अतिरिक्त आयुक्त तुषार ठोंबरे, महाराष्ट्र प्राधमिक शिक्षण परिषदेचे उपसंचालक संजय डोर्लीकर, पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची राज्यात अंमलबजावणी कशा पद्धतीने करावयाची या अनुषंगाने शिफारशी करण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने सन २०२१ मध्ये आपला अहवाल सादर केला होता. त्या अहवालात त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीचीही एक शिफारस आहे, असेही ते म्हणाले.

डॉ. जाधव पुढे म्हणाले, राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र कोणत्या इयत्तेपासून, कशा प्रकारे लागू करावे या अनुषंगाने राज्य शासनाने समिती गठित केली असून विभागनिहाय भेटी देऊन मते व सूचना जाणून घेण्याचा निर्णय घेतला असून आज पुणे येथे संवाद साधण्यात येत आहे. यावेळी येणाऱ्या सूचनांचा सखोल विचार करण्यात येईल. तसेच त्रिभाषा समितीचे https://tribhashasamiti.mahait.org हे संकेतस्थळही विकसित करण्यात आले असून त्यावर उपलब्ध करुन दिलेली प्रश्नावली आणि सविस्तर मते मांडण्यासाठीची मतावली भरून संकेतस्थळावर सादर करावी, जेणेकरून येणाऱ्या सूचनांवर विचार करुन राज्य शासनाला डिसेंबर अखेर अहवाल सादर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

यावेळी खासदार श्रीमती कुलकर्णी, आमदार श्री. पठारे तसेच विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनीही आपले विचार व सूचना मांडल्या.

यावेळी मराठी भाषेशी संबंधित किंवा संलग्न शासकीय किंवा अशासकीय, खासगी शिक्षण संस्थांचे अध्यक्ष, सदस्य, प्राथमिक, माध्यमिक शिक्षक संघटना, पालक-शिक्षक संघटनाचे पदाधिकारी, महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, शाळांचे मुख्याध्यापक, भाषा विषयाचे शिक्षक आदींनी त्रिभाषा सूत्र अंमलबजावणी, संगणक अभ्यासक्रम, मूल्यशिक्षण आदी अभ्यासक्रमांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने विविध सूचना केल्या.

यावेळी शिक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिस्तभंगाच्या नोटीसला रुपाली पाटलांनी दिलं खणखणीत उत्तर

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अलीकडेच रुपाली ठोंबरे पाटील यांना पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस पाठण्यात आली होती. या नोटीसला रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Patil Thombare) यांनी आता रितसर पद्धतीने पत्र पाठवून उत्तर दिले आहे. त्यांनी पक्षाकडे आपला खुलासा पाठवताना म्हटले की, मी कुठेही पक्षशिस्तीचा भंग केलेला नाही. फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यूसंदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या मताशी मी सहमत नाही, हे माझे मत मी मांडले होते. मला पक्षाने खुलासा पत्र मागितलं होते. राज्य महिला आयोग आणि प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याबद्दल वक्तव्य केल्याबद्दल काल मी खुलासा दिला आहे. मी राज्य महिला आयोगाबद्दल बोलले आहे, प्रदेशाध्यक्षाबद्दल बोलले आहे. फलटण प्रकरणावर त्या जे काही बोलल्या त्यामुळे महाराष्ट्रभर असंतोष निर्माण झाला. मी कोणाबद्दल वाईट वक्तव्य केलेले नाही. मला पक्षाकडून नोटीस का देण्यात आली, मला याची कल्पना नाही, असे रुपाली ठोंबरे पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. या स्पष्टीकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे समाधान होणार का, हे आता बघावे लागणार आहे.

नेमके रुपाली पाटील यांनी पत्रात काय उत्तर दिले आहे ते वाचा जसेच्या तसे ….

प्रति,
श्री. संजय खोडके
संघटन सरचिटणीस

यास

आपण दिनांक ०७/११/२०२५ रोजी जावक क्रमांक १३१३ द्वारा राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष यांच्या बाबतीत प्रसार माध्यमांमध्ये केलेले वक्तव्य पक्षशिस्त भंग करणारे आहे व त्यासंदर्भात शिस्तभंगाची कारवाई का करू नये याबाबत खुलासा पत्र मागवले आहे.
त्याबाबत आपणास खुलासा येणेप्रमाणे राज्य महिला आयोग अध्यक्ष तसेच प्रदेशाध्यक्ष यांचे बाबत नक्की कोणते वक्तव्य शिस्तभंग करणारे आहे. याविषयी नोटीस मध्ये कोणताही माहिती नसल्याने त्याबाबत खुलासा देणे शक्य नाही. सविस्तर एखादे वाक्य आपण आपल्या नोटीसीमध्ये नमूद केले असते तर त्यावर मला खुलासा करणे योग्य झाले असते. तसेच राज्य महिला आयोग व राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष स्वतंत्र विभाग आहेत.
त्यावर माझे सांगणे की, स्वर्गीय डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्या प्रकरणी राज्य महिला आयोगाने अध्यक्षा यांनी जे वक्तव्य केले होते त्यामध्ये समाज माध्यमांमध्ये तसेच लोकांमध्ये अत्यंत रोष, असंतोष निर्माण झाला होता. राज्य महिला आयोगाने केलेले वक्तव्याने पक्षालासुद्धा रोषाला सामोरे जावे लागत होते. पक्षाची अत्यंत बदनामी झाली त्यानंतरून मी स्वतः बीड येथे जाऊन डॉक्टर संपदा मुंडे यांचे कुटूंबीय व आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. अजित दादा पवार यांची बोलणे करून दिले होते त्यावेळी देखील मा.दादांनी मी महिला आयोगाच्या मताशी सहमत नसल्याचे सांगितले होते.
मी केवळ राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मताचा सन्मान करून माझे म्हणणे मांडले होते. यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांची बाजू मांडणे हे प्रवक्त्याचे प्रथम कर्तव्य असताना सदरची नोटीस का देण्यात आली याची कल्पना नाही. त्यामुळे कोणताही शिस्त भंग झालेला नाही.
तसेच याबाबत हा माझा खुलासा समजावा.

अॅड. रुपाली पाटील ठोंबरे
दि. १२/११/२०२५,
प्रत रवाना :-
मा.ना.श्री.अजित दादा पवार
(राष्ट्रीय अध्यक्ष)
मा.खा.श्री. प्रफुल्लभाई पटेल
(राष्ट्रीय अध्यक्ष)
मा.ना.श्री. सुनील तटकरे
( प्रदेशाध्यक्ष)


शासकीय जमिनी हडपा: हवेलीच्या सहाय्यक दुय्यम निबंधक विद्या शंकर बडे निलंबित

पुणे-सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कथित भूखंड घोटाळ्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. अजित पवार यांनी हा व्यवहार रद्द करण्याची घोषणा केली आहे. पण या प्रकरणी त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असल्यामुळे सरकारवरील दबाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडच्या ताथवडे येथील शासनाच्या जमिनीची परस्पर विक्री केल्याची घटना उजेडात आली आहे. हा व्यवहार जानेवारी 2025 मध्ये झाला. पण तो आता प्रकाशझोतात आला. पशुसंवर्धन विभागाला अंधारात ठेवून पिंपरी चिंचवडच्या ताथवडे येथील शासनाच्या या तब्बल 15 एकर जमिनीची कोट्यवधी रुपयांना परस्पर विक्री करण्यात आली आहे. या प्रकरणी हवेलीच्या सहाय्यक दुय्यम निबंधकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणी हवेलीच्या सहाय्यक दुय्यम निबंधक विद्या शंकर बडे (सांगळे) यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. पुणे जिल्ह्यातील ताथवडे गावातील शाससकीय ताब्यातील जमीन विक्रीस नोंदवण्याच्या प्रक्रियेतील गैरव्यवहारात सहभागी झाल्यामुळे प्रभारी दुय्यम निबंधक विद्या शंकर बडे (सांगळे) यांना निलंबित करण्यात येत आहे, असे यासंबंधीच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

यासंबंधीच्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे परिसरात पशुसंवर्धन विभागाची सर्वे नंबर 20 येथे 15 एकर जागा आहे. या जागेची कोट्यवधी रुपयांत पशुसंवर्धन विभागाला अंधारात ठेवून परस्पर विक्री करण्यात आली. हा व्यवहार हेरंब गुपचूप नामक व्यक्तीने जानेवारी 2025 मध्ये केला. मुद्रांक शुल्क विभागाने त्याची माहिती पशुसंवर्धन विभागाला दिली. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्तांनी त्याची तक्रार पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे केली. त्यानुसार आता पुण्याचे विभागीय आयुक्त व पशुसंवर्धन विभाग या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ताथवडे येथील सर्वे नंबर 20 मधील 6 हेक्टर 32 आर क्षेत्रफळ असणाऱ्या जमीन विक्रीचा दस्त क्रमांक 685/2025 दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी नोंदवण्यात आला होता. पण नोंदणी करताना अद्ययावत 7/12 उतारा जोडला नव्हता. दस्तासोबत 2023 मधील जुना 7/12 जोडण्यात आला होता. त्यावर शासनाचा ताबा किंवा विक्रीवरील बंदीचा उल्लेख नव्हता. चौकशीत असे निष्पन्न झाले की, फेब्रुवारी 2025 मधील अद्ययावत 7/12 उताऱ्यावर या जमिनीवर ‘आयुक्त पशुसंवर्धन यांचा ताबा असून शासनाच्या परवानगीशिवाय विक्रीस बंदी’ असा स्पष्ट शेरा होता. त्यानंतरही दुय्यम निबंधकांनी तांत्रिक अडचणीमुळे म्युटेशन होत नव्हते म्हणून ‘स्किप ऑप्शन’ वापरून दस्त नोंदवला. परंतु यासाठी त्यांनी वरिष्ठांची परवानगी घेतली नाही.

ही गंभीर अनियमितता मानून विद्या शंकर बड़े (सांगळे) यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 अंतर्गत 12 नोव्हेंबर 2025 पासून पुढील आदेश येईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय प्रधान मुद्रांक कार्यालय, मुंबई येथे राहील आणि त्यांनी वरिष्ठांची पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असेही सरकारच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दहशतवाद्यांना बाबरी पाडण्याचा बदला घ्यायचा होता:देशभरात 32 कारने स्फोट घडवण्याचा होता कट

0

दिल्ली बॉम्बस्फोटाच्या चौकशीत ईडीचा प्रवेश, दहशतवादी निधीची चौकशी करणार-एनआयए, एनएसजी, आयबी आणि दिल्ली पोलिसांनंतर, ईडी दिल्ली लाल किल्ला स्फोटात सहभागी असलेली पाचवी तपास संस्था बनली आहे. डॉक्टरांनी स्फोटके खरेदी करण्यासाठी २.३ दशलक्ष रुपये कुठून जमवले याची अंमलबजावणी संचालनालय चौकशी करेल. ईडी अल-फलाह विद्यापीठाच्या व्यवहारांचीही चौकशी करेल.तपास यंत्रणेतील सूत्रांचा दावा आहे की, आरोपी डॉ. मुझम्मिल, डॉ. आदिल, उमर आणि शाहीन यांनी मिळून अंदाजे २० दशलक्ष रुपये जमवले, जे त्यांनी उमरला दिले.या व्यक्तींनी आयईडी तयार करण्यासाठी गुरुग्राम, नूह आणि आसपासच्या भागातून ३ लाख रुपयांचे २० क्विंटलपेक्षा जास्त एनपीके खत खरेदी केले. उमर आणि मुझम्मिलमध्ये आर्थिक वादही झाला होता.

दिल्लीतील लाल किल्ला स्फोटाच्या तपासात एक मोठा खुलासा समोर आला आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, ३२ गाड्यांमध्ये बॉम्ब आणि स्फोटके बसवून देशभरात स्फोट घडवून आणण्याचा कट रचण्यात आला होता. १० नोव्हेंबर रोजी स्फोट झालेली आय20 कार या मालिकेतील बदला घेण्याच्या हल्ल्याचा भाग होती.बाबरी मशीद पाडल्याच्या वर्धापन दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी दिल्लीसह अनेक ठिकाणी स्फोट घडवण्याची दहशतवाद्यांची योजना होती.तपास यंत्रणांनी आतापर्यंत चार गाड्या जप्त केल्या आहेत. यामध्ये ब्रेझा, स्विफ्ट डिझायर, इकोस्पोर्ट आणि आय२० सारख्या गाड्यांचा समावेश आहे.१० नोव्हेंबर रोजी लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटात तेरा जणांचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी एका जखमीचा मृत्यू झाला. २० जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.

दिल्ली लाल किल्ला स्फोट-अटक केलेल्या १२ दहशतवाद्यांमध्ये सहा डॉक्टरांचा समावेश आहे.
-डॉ. मुझम्मिल शकील (३६)
जन्म : पुलवामा
आरोपः २९०० किलो स्फोटके
गोळा करून साठवली.

डॉ. शाहीन शाहिद (४५)
जन्मः लखनौ
आरोपः मुझम्मिलचा जवळचा सहकारी, कारमध्ये सापडली रायफल.

डॉ. आदिल अहमद (३८)
जन्मः काझीकुंड, काश्मीर आरोपः लॉकरमध्ये सापडलेले एके-४७, जैशचे धमकीचे पोस्टर लावणे.
-डॉ. सज्जाद अहमद (३२)
जन्म : पुलवामा
आरोपः डॉ. उमरचा मित्र,

पुलवामा-लपण्याच्या मॉड्यूलशी संबंध ठेवतो.
डॉ. परवेझ अन्सारी (४१)
जन्मः लखनौ, उत्तर प्रदेश आरोपः मॉड्यूलशी संबंधित फोन आणि कागदपत्रे सापडली.
-डॉ. तजामुल अहमद मलिक
जन्मः कुलगाम, काश्मीर आरोपः दहशतवादी मॉड्यूलशी संबंध कागदपत्रे सापडली.

दहशतवादी उमरच्या शेवटच्या २४ तासांच्या हालचाली ट्रॅक-५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेजच्या आधारे पोलिसांनी शेवटच्या २४ तासांत डॉ. उमर नबीच्या हालचालींवर लक्ष ठेवले. तपासात असे दिसून आले की, तो रविवार, ९ नोव्हेंबर रोजी रात्री दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवरून फरिदाबादहून निघाला आणि हरियाणातील नूह जिल्ह्यातील फिरोजपूर झिरका येथील एका ढाब्यावर थांबला, जिथे त्याने त्याच्या कारमध्ये रात्र काढली.

दुसऱ्या दिवशी सकाळी, तो हळूहळू एक्सप्रेसवेवरून दिल्लीला परतला. वाटेत तो दोनदा चहा पिण्यासाठी आणि फोन तपासण्यासाठी थांबला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो सकाळी ८:१३ वाजता बदरपूर टोल ओलांडताना दिसतो. त्यानंतर तो ओखला, कॅनॉट प्लेस, अशोक विहार आणि मध्य दिल्लीसारख्या भागातून प्रवास करत होता.

दुपारी, त्याने अशोक विहारमधील एका ढाब्यावर जेवण केले. त्यानंतर तो रामलीला मैदानाजवळील असफ अली रोडवरील एका मशिदीत गेला, जिथे त्याने पार्किंगमध्ये तीन तास घालवले आणि नमाज पठण केले. पोलिसांना असा संशय आहे की, याच दरम्यान त्याला पुढील सूचना मिळाल्या.

दुपारी ३:१९ वाजता, त्याची पांढऱ्या रंगाची ह्युंदाई i२० कार लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये उभी असलेली दिसली. गाडी सुमारे तीन तास तिथेच उभी होती. संध्याकाळी ६:२२ वाजता, ती मेट्रो स्टेशनकडे निघाली आणि संध्याकाळी ६:५२ वाजता मोठा स्फोट झाला. या स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला आणि २५ हून अधिक जण जखमी झाले.
इको स्पोर्ट्स कार पूर्ण सुरक्षेसह खांडवली गावातून टो करून नेण्यात आले.खांडवली गावात सापडलेली एक फोर्ड इकोस्पोर्ट कार पोलिसांनी जप्त केली आहे.दिल्ली कार बॉम्बस्फोट प्रकरणात, फरीदाबाद पोलिसांनी खंडावली येथे लाल रंगाची इकोस्पोर्ट कार पार्क करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पार्क करणाऱ्याचे नाव फहीम असल्याचे सांगितले जात आहे, जो आरोपी डॉ. उमर उन नबीचा नातेवाईक आहे.

जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या काउंटर इंटेलिजेंस शाखेने गुरुवारी व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल आणि दिल्ली लाल किल्ला स्फोटाच्या संदर्भात खोऱ्यातील अनेक ठिकाणी छापे टाकले. काउंटर इंटेलिजेंस काश्मीर (CIK) १३ ठिकाणी छापे टाकत आहे. चौकशीसाठी सुमारे १५ लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून अनेक डिजिटल उपकरणे आणि गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले आहे.

दिल्ली बॉम्बस्फोटातील 3 खुलासे…

पहिला: जानेवारीमध्ये लाल किल्ल्यावर पुन्हा हल्ला करण्यात आला – दिल्लीत दहशत माजवण्याचा कट जानेवारीपासूनच रचला जात होता. अटक केलेल्या आरोपींच्या मोबाईल डेटावरून असे दिसून आले की फरीदाबादच्या अल फलाह विद्यापीठातून अटक केलेले सहाय्यक प्राध्यापक डॉ. मुझम्मिल गनी आणि स्फोटात ठार झालेले डॉ. उमर नबी यांनी जानेवारीमध्ये अनेक वेळा लाल किल्ल्यावर पुन्हा हल्ला केला होता. दोघांनाही तेथील सुरक्षा आणि गर्दीची पद्धत समजली होती. दहशतवाद्यांनी २६ जानेवारी रोजी लाल किल्ल्यावर हल्ला करण्याची योजना आखली होती, जी नंतर हाणून पाडण्यात आली, असा पोलिसांना संशय आहे.
दुसरा: दिल्लीत ६ डिसेंबर रोजी हल्ला करण्याची योजना आखण्यात आली होती – नबीला ६ डिसेंबर रोजी दिल्लीवर हल्ला करायचा होता, परंतु मुझम्मिलच्या अटकेमुळे ही योजना उधळून लावण्यात आली. आठ आरोपींच्या चौकशीदरम्यान ही माहिती उघड झाली. हे आंतरराज्यीय मॉड्यूल फरीदाबादमध्ये होते. अटक केलेल्यांपैकी सहा दहशतवादी डॉक्टर आहेत. आणखी एक संशयित, श्रीनगरचा रहिवासी डॉ. निसार फरार आहे. तो काश्मीरच्या डॉक्टर्स असोसिएशनचा अध्यक्ष देखील आहे आणि अल फलाह येथे शिकवत होता. जम्मू आणि काश्मीर सरकारने डॉ. निसार यांना बडतर्फ केले आहे.
तिसरे: घनी खताच्या पिशव्या असल्याचे सांगून स्फोटके गोळा करत होता – फरीदाबादच्या अल फलाह विद्यापीठात काम करणारे काश्मिरी डॉ. मुझम्मिल घनी हे भाड्याच्या खोलीत खताच्या पिशव्या असल्याचे सांगून स्फोटके साठवत होते. २० दिवसांपूर्वी मुझम्मिल खोलीत काही पोत्या ठेवण्यासाठी आला होता, तेव्हा शेजाऱ्यांनी त्याला विचारले होते की त्यात काय आहे? उत्तरात मुझम्मिल म्हणाला होता की या खताच्या पिशव्या आहेत. या काश्मीरला घेऊन जायच्या आहेत. या खोलीपासून १०० मीटर अंतरावर असलेल्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले आहे.

‘संघर्षगाथा माझ्या आयुष्याची’

आत्मकथनाचे शुक्रवारी प्रकाशन

पुणे: संपर्क बालग्राम संस्थेचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी यांच्या ‘संघर्षगाथा माझ्या आयुष्याची’ आत्मकथनाचे प्रकाशन येत्या शुक्रवारी (ता. १४ नोव्हेंबर) सकाळी १० वाजता कमिन्स सभागृह, पत्रकार भवन, नवीपेठ पुणे येथे होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे व भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय सचिव, माय होम इंडिया फाउंडेशनचे संस्थापक सुनील देवधर यांच्या शुभहस्ते या आत्मकथनाचे प्रकाशन होणार आहे. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य, तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य प्रसेनजीत फडणवीस, माजी शिक्षणाधिकारी व साहित्यिक डॉ. अनिल गुंजाळ, साहित्यिक प्रसाद मिरासदार, अमितकुमार बॅनर्जी, प्रकाशक सु. वा. जोशी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
अनाथ, गरजू मुलांच्या संगोपनासाठी अमितकुमार बॅनर्जी यांनी संपर्क बालग्राम संस्थेच्या माध्यमातून उभारलेल्या कार्याचा हा खडतर प्रवास या आत्मकथनातून मांडला आहे. वेगवेगळ्या प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या मुलांना संस्कार, नैतिकता आणि सामाजिक भान देऊन जबाबदार नागरिक घडविण्यासाठी बॅनर्जी यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले आहे. प्रेम, सुरक्षितता, काळजी आणि त्यांचे जीवन पुन्हा निर्माण करण्यासाठी पोषक वातावरण देऊन त्यांचा भूतकाळ विसरत चांगला भविष्यकाळ घडवण्यासाठी त्यांनी निःस्वार्थ भावनेने केलेल्या कार्याचा आढावा, या आत्मकथनातून घेतला गेला आहे.

प्रेम, हास्य आणि दुसरी खेळी – दुर्लभ प्रसाद की दसरी शादी या डिसेंबरमध्ये चित्रपटगृहात

लग्नाचे रहस्य उलगडले – दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी प्रेमाचा एक नवीन अध्याय पडद्यावर

संजय मिश्रा आणि महिमा चौधरी यांच्या अलिकडच्या “लग्नाच्या फोटोंबद्दल”, ज्याने सोशल मीडिया आणि मनोरंजन पोर्टल्समध्ये उत्सुकता निर्माण केली होती, ती अखेर दूर झाली आहे. त्यांच्या आगामी ‘दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर अधिकृतपणे अनावरण करण्यात आले आहे, ज्यामुळे व्हायरल झालेले फोटो या हृदयस्पर्शी रोमँटिक कॉमेडीचा भाग असल्याचे पुष्टी होते. हा चित्रपट आता १९ डिसेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

पोस्टरमध्ये संजय मिश्रा आणि महिमा चौधरी एका आकर्षक आणि विचित्र दृश्यात दाखवले आहेत – एका निसर्गरम्य हिल स्टेशनच्या पार्श्वभूमीवर एकमेकांसमोर बसलेले. संजय मिश्रा “सेकंड इनिंग्ज” नावाचे पुस्तक हातात धरून खेळकर हास्य दाखवत आहेत, तर महिमा तिच्या बाजूला “जस्ट मॅरीड” लिहिलेली हँडबॅग घेऊन शांतपणे वाचत आहे. त्यांचे भाव, त्यांची उबदारता आणि त्यांच्यातील सहजता त्यांच्या पात्रांबद्दल आणि त्यांच्या अपारंपरिक प्रेमकथेबद्दल त्वरित उत्सुकता निर्माण करते. पहिल्या लूकवरून हे स्पष्ट होते की चित्रपटात सहज आणि परिपक्व अशी केमिस्ट्री आहे – जी मुख्य प्रवाहातील हिंदी चित्रपटसृष्टीत क्वचितच पाहायला मिळते.

दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी हा चित्रपट कथाकथनात एक नवीन बदल घडवून आणतो – सहवास आणि पुन्हा सुरुवात करण्याचे धाडस साजरे करतो. एकक्षा एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली सिद्धांत राज सिंग दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती एकांश बच्चन आणि हर्षा बच्चन यांनी केली आहे, तर रमित ठाकूर सह-निर्माते आहेत. कथा आणि पटकथा प्रशांत सिंग यांनी लिहिली आहे. संजय मिश्रा आणि महिमा चौधरी यांच्यासोबत, या चित्रपटात व्योम यादव, पल्लक लालवानी, प्रवीण सिंग सिसोदिया आणि श्रीकांत वर्मा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत, जे चित्रपटाच्या विनोद आणि भावनिक बळकटीला हातभार लावतात.

निर्माते एकांश बच्चन म्हणतात, “प्रेम वय किंवा वेळेनुसार चालत नाही या कल्पनेला हा चित्रपट साजरे करतो. आम्हाला अशी कथा तयार करायची होती जी संबंधित, भावनिक आणि मनोरंजक असेल – प्रत्येक कुटुंबाने एकत्र पाहू शकेल.” निर्मात्या हर्षा बच्चन पुढे म्हणाल्या, “संजय मिश्रा आणि महिमा चौधरी यांची जोडी चित्रपटात एक ताजेतवाने आणि हृदयस्पर्शी ऊर्जा आणते. त्यांना एकत्र पाहून प्रेक्षकांना विश्वास बसेल की जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर प्रेम फुलू शकते.”

दिग्दर्शक सिद्धांत राज सिंह म्हणतात, “दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी ही केवळ एक विनोदी कथा नाही – ती आशा, सहवास आणि नवीन सुरुवातीचा उत्सव आहे. वाराणसीमध्ये चित्रीकरण केल्याने चित्रपटात एक प्रामाणिकपणा आला आणि प्रेक्षकांना ही कथा चित्रपटगृहात अनुभवण्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.”

सामाजिक भावनेने भरलेला एक रोमँटिक कॉमेडी, दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी हा चित्रपट प्रेम फक्त तरुणांसाठीच असते या रूढीला आव्हान देतो. हा चित्रपट हास्य आणि भावनांचे एक आनंददायी मिश्रण दाखवतो, जो परिपक्वता, विनोद आणि खोलीसह जीवन आणि प्रेमाच्या दुसऱ्या संधींचा शोध घेतो. त्याच्या अद्वितीय कथानकासह, शक्तिशाली कामगिरीसह आणि भावपूर्ण संगीतासह, हा चित्रपट वर्षातील सर्वात ताजेतवाने कौटुंबिक नाटकांपैकी एक बनण्यास सज्ज आहे.

दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी १९ डिसेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.

पुण्याच्या विकास आराखड्यातील रस्ते पूर्ण झाल्याशिवाय वाहतूक कोंडी सुटणार नाही- ना.चंद्रकांतदादा पाटील

सुतारवाडी बस डेपोच्या २४ मीटर रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

पुणे – कोथरुड मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, मतदारसंघातील सुतारवाडी मधील रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. ना. पाटील यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आज झाले. विकास आराखड्यातील रस्ते पूर्ण झाल्याशिवाय पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार नाही, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.कोथरुड मतदारसंघातील मिसिंग लिंकचा प्रश्न सोडवण्यासाठी आग्रही भूमिका असून, यासाठी सातत्याने महापालिकेत पाठपुरावा सुरु होता. ना. पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे रजपूत वीटभट्टी परिसरातील रस्त्याचे रुंदीकरण, एकलव्य महाविद्यालयापासून राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या मिसिंग लिंकचे काम पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण झाले आहे.

सुतारवाडी सुतारवाडी बस डेपो (सर्वे नं. १२४) येथील २४ मीटर रस्त्याच्या कामातील अडथळे दूर झाले असून, रस्ता रुंदीकरणासाठी पाच गुंठे जागेची आवश्यक्ता होती. यासाठी संबंधित जागा मालकांकडून जमीन हस्तांतरणाचे काम पूर्ण झाले आहे. सदर हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या कामाचे भूमिपूजन ना. पाटील यांच्या उपस्थितीत स्थानिक नागरिकांच्या हस्ते झाले. या कामांमुळे मुख्य महामार्गाकडून सुतारवाडी-सुस रोड शिवमंदिर चौक जाणाऱ्या नागरिकांची मोठी सोय झाली आहे. तसेच, जमीन अधिग्रहणामुळे समान पाणीपुरवठ्याच्या कामाला गती मिळून ते काम ही पूर्ण झाले आहे. त्यामुळे या परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.

यावेळी बोलताना ना. पाटील यांनी सर्व जागा मालकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले की, बाणेर बालेवाडी भाग विकसित होत असताना अनेक भागांचा महापालिकेशी जोडली गेली. या भागाच्या विकासासाठी नागरि सुविधा सुलभ होण्यासाठी अनेक विकास कामांची अवश्यक्ता असते. यामध्ये रस्ते विकास हा मोठा भाग असून, दोन भाग जोडण्यासाठी मिसिंग लिंक दुवा ठरतो. सुतारवाडीतील सुस गाव- सुतारवाडी शिव मंदिराला जोडणारा सर्व्हे नंबर १२४ चा भाग हा अतिशय महत्वाचा होता. ह्या रस्त्याच्या विकासामुळे सुतारवाडी-पाषाण-सुस गाव मधील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ते पुढे म्हणाले की, पुणे शहरातील वाहतूक कोंडी सुटण्यासाठी विकास आराखड्यातील रस्ते पूर्ण होणे आवश्यक आहे. समृद्धी महामार्गाला पाच पट मोबदला दिला. हा महामार्ग झाल्याने दळणवळण अतिशय सुलभ आणि गतिमान झाले आहे. त्यामुळे शासन अतिशय संवेदनशीलतेने आणि नागरी सुविधांसाठी काम करत असल्याने अनेक विकास कामे मार्गी लागत आहेत. सुतारवाडीतील रस्त्यासाठी स्थानिक नागरिकांनी ही सहकार्य केल्याने हा मार्ग सुकर होईल, अशी भावना यावेळी व्यक्त केली.

या भूमिपूजन कार्यक्रमावेळी सर्व सुतार कुटुंबीय, पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, भाजप उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, माजी अध्यक्ष सचिन पाषाणकर, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, आबा सुतार, शिवम सुतार, सचिन सुतार, राहुल कोकाटे, रोहन कोकाटे, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, प्रकाश तात्या बालवडकर, मोरेश्वर बालवडकर, सुभाष भोळ, सचिन दळवी, अनिकेत चांधेरे यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.