Home Blog Page 478

पुण्यात GBS रुग्णांची संख्या १०७ ,प्रत्यक्षात पहा कुठे किती रुग्ण आहेत –

पुणे- पुण्यात GBS च्या संशयित रुग्णांची संख्या १०७ असली तरी प्रत्यक्षातGBS चे निदान झालेल्या रुग्णांची संख्या ७६ आहे आणि व्हेंटीलेटर वर असलेल्या रुग्णांची संख्या १७ एवढी आहे २० जण उपचार घेऊन घरी सोडण्यात आले आहेत. घरी गेल्यावर त्यांना फ़िजिओथेरपीची आवश्यक्यता असते असे महापालिकेने कळविले आहे. किरकीटवाडी , नांदेड सिटी , DSK विश्व मधील रुग्णांची संख्या अधिक असली तरी बाजीराव रोड, पर्वती दर्शन, धनकवडी , कोथरूड , कर्वे नगर,कात्रज, वडगाव ,मुंढवा ,उंड्री, खडकवासला अशा विव्बिध भागात १ ते ५ च्या आकड्यात रुग्ण आढळले आहेत .

प्रत्यक्षात पहा कुठे किती रुग्ण आहेत –

महापालिकेने असेही कळविले आहे कि,
Guillain Barre Syndrome आजारामध्ये बाधित रुग्णांची मज्जातंतूवर आघात झाल्याने सदर आजार संभवतो. (Autoimmune) सदर आजाराची लागण सर्वसाधारणतः सर्व वयोगटातील व्यक्तीना होते. सदर आजाराचे अत्यल्प रूग्णांमध्ये गंभीर स्वरूपाची लक्षणे आढळून येतात.
Guillain-Barre Syndrome आजाराचे सर्वसाधारण लक्षणे पुढीलप्रमाणे –
१) हातापायातील ताकद कमी होणे.
२) हातापायाला मुंग्या (Tingling Sensations) येणे.
३) गिळण्यास व बोलण्यास त्रास होणे.
४) धाप लागणे श्वास घेण्यास त्रास होणे.
पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात सिंहगड रोड व जवळील परिसरामध्ये अशा प्रकारचे अधिक संशयित रुग्ण आढळल्याने या भागात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना नियमितपणे करण्यात येत आहेत.
• जी.बी. सिंड्रोमचे जे रुग्ण दवाखान्यामधून बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत अशा रुग्णांच्या पुढील उपचाराकरिता फिजीओथेरेपीची आवश्यकता असल्याने या भागातील पुणे महानगरपालिकेच्या लायगुडे दवाखान्यामध्ये फिजीओथेरेपीस्ट या तज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे.
• बाधित झालेल्या भागातील आढळून येणाऱ्या अतिसाराच्या रुग्णांच्या उपचाराकरिता पुणे महानगरपालिकेकडून या भागामध्ये रुग्णांना तत्पर सेवा मिळणेकरिता दि. ३१/०१/२०२५ रोजी पासून मोबाईल दवाखाना सुरु करण्यात आला असून ८० रुग्णांना उपचार देण्यात आले आहे.
• पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये १५ आयसीयू बेड्स असून तेथे न्यूरोलॉजिस्ट (मेंदूरोगतज्ञ) यांची नेमणूक करण्यात आली.
• पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी काशीबाई नवले रुग्णालय येथील जी.बी. सिंड्रोम रुग्णांची भेट घेवून त्यांच्या समस्यांचे नीराकरण करण्यात आले.
• पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या फिरते पथक वाहन / घंटागाडींना माहितीची ध्वनिफीत दिलेली असून त्यांच्या मार्फत जी.बी. सिंड्रोम आजाराबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
• पुणे महानगरपालिकेतर्फे २४*७ वैद्यकीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. संपर्काकरिता नियंत्रण कक्षाच्या खालील संपर्क क्रमांकांना प्रसिद्ध देण्यात यावी.
१) ०२०२५५०१२६९,
२) ०२०२५५०६८००,
३) ०२०६७८०१५००.
• सर्व्हेक्षणाअंती बाधित भागात सापडलेल्या १४४ अतिसाराच्या रुग्णांचे शौच नमुने, रक्त नमुने व लघवीचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येत आहेत.
• जी.बि.एस.च्या रुग्णांचे निदान करणेकरिता नर्व्ह कंडक्शन व्हेलॉसिटी टेस्टचा खर्च पुणे महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे.

फास्टट्रॅक कंपनीच्या नावाने बनावट घड्याळ विक्रेत्यांवर कारवाई

पुणे- फास्टट्रॅक कंपनीचे कॉपीराईट केलेले घड्याळ विक्रेत्यांवर पुणे पोलिसांनी कारवाई करून एकुण १७५ घड्याळे जप्त केली आहेत.
या संदर्पोभात पोलिसांनी सांगितले कि,’ उपआयुक्त गुन्हे शाखा पुणे शहर यांच्या आदेशान्वये युनिट ५ गुन्हे शाखा कडील सपोनि विजयकुमार शिंदे, पोलीस हवालदार प्रताप गायकवाड, महिला पोलीस हवालदार पल्लवी मोरे, महिला पोलीस हवालदार स्वाती तुपे, पोलीस शिपाई उमाकांत स्वामी असे युनिट कार्यालय येथे मिळाले बातमीच्या अनुषंगाने फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत इसम नामे देवजीबाई प्रजापती रा. घर.नं. ५१२, उमाप्रसाद सोसायटी शनिवार पेठ, पुणे याने त्यांचे चामुंडा नॉव्हेल्टीज शहाबिया सोसायटीचे पार्कीगमध्ये असलेल्या शॉपमध्ये शुक्रवार पेठ मध्ये फास्टट्रॅक कंपनीचे मनगटी घड्याळ कॉपीराईट केलेले एकुण १७५ नग किंमत रुपये १,७५,०००/-रुपयांचे त्यांने स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी विक्री करीत असताना मिळुन आला म्हणून फरासखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. २२/२०२५ कॉपीराईट कायदा १९५७ चे कलम ६१,६३,६५ या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुठील तपास फरासखाना पोलीस स्टेशन कडील अधिकारी करीत आहेत.

औंधच्या मुरकुटे प्लाझा मध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय-थायलंडच्या चौघींसह ९ तरुणींची सुटका

पुणे- औंधच्या मुरकुटे प्लाझा मध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करवून घेणा-या ०४ आरोपीवर गुन्हा दाखल करुन केली ०९ पिडीत मुलींची सुटका पोलिसांनी केली आहे.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दि.१/०१/२०२५ रोजी गोपनिय बातमीदारामार्फतीने मुरकुटे प्लाझा औंध पुणे येथे मसाज स्पा सेंटरचे नावाखाली वेश्याव्यवसाय करिता मुली ठेवुन त्यांना पुरुष गि-हाईकांना मसाजच्या नावाखाली पुरवुन त्यांचेकडुन वेश्याव्यवसाय करवुन घेत असलेबाबत खात्रीशिर बातमी प्राप्त झाली.
सदर बातमी प्रमाणे खात्री करुन कारवाई करणेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. अजय वाघमारे यांनी आदेशीत केल्याने त्याप्रमाणे बनावट गि-हाईकास पाठवुन खात्री करुन छापा टाकुन पाहिजे आरोपी १) स्पा मालक २) मॅनेजर ३) कॅशियर व ४) मॅनेजमेट करणारा रिकबुल हुसेन आबुल हुसेन वय २६ वर्षे, रा. सदर ठिकाणी, मुळ बेरबेरी रोड, जामा मस्जित, जमुना मुख, जि. नागांव, राज्य आसाम यास ताब्यात घेतले व त्यांचे ताब्यातील ०९ महिला त्यापैकी ०४ महाराष्ट्र राज्य, ०१ गुजराज राज्य, ०४ थायलंड देशातील महिला, यांची सुटका केली. त्यांचेकडे अधिक चौकशी करता ते मसाज सेंटरमध्ये मसाजचे नावाखाली स्वतःच्या आर्थिक फायदया करीता कामासाठी येणा-या महिलेकडुन जबरदस्तीने वेश्यागमन करवुन घेत होते. त्याप्रमाणे आरोपीविरुध्द चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं.६७/२०२५ अनैतिक मानवी वाहतुक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३,४,५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १४३,३ (५) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची उल्लेखनिय कामगिरी ही मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, पुणे श्री निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-२, श्री, राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली युनिट-४, चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजय वाघमारे, व चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री विजयानंद पाटील यांचे सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक, नरेंद्र पाटील, पोलीस उप निरीक्षक, वैभव मगदुम व गुन्हे शाखा युनिट-४, पथक व चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनकडील स्टाफने कारवाई केली आहे.

मेटाकुटीला आलेल्या घटकांचा आवाज दुर्लक्षित पण प्रचारकी ‘आवाज वाढव डीजे‘ म्हणणारे बजेट!

आर्थिक पाहणी अहवालातील अपयशाच्या मुद्यांकडे दुर्लक्ष करणारे बजेट: मुकुंद किर्दत , आप

या बजेटमध्ये अर्थसंकल्पामधून मध्यमवर्गाला अपेक्षित आयकर सवलत मर्यादा 12 लाखापर्यंत वाढवली ही महत्त्वाची मागणी मान्य झाली ही बाब चांगलीच आहे. परंतु त्याचबरोबर शिक्षण बजेट रक्कम नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे किमान १०% पर्यंत वाढवावे ही अपेक्षा होती. उलट शिक्ष्णावरची तरतूद कमी करण्यात आली आहे . तसेच आरोग्य बजेट हे दहा टक्के पर्यंत वाढवावे. आरोग्य विमा वरील कर रद्द करावा. जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी रद्द करावा, ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीटामध्ये सूट द्यावी अशा सामान्य वर्गाच्या अपेक्षा होत्या. त्यातून त्याचे जीवनमान या गोष्टीतून अधिक सुखकर होवू शकते. परंतू या सर्वच बाबी संदर्भात निराशा झाली आहे.
मागील वर्षी साडेआठ कोटी लोकांनी त्याच भरला त्यातील तब्बल साडेचार कोटी लोकांचा उत्पन्न गट अडीच ते पाच कोटी उत्पन्नाचा आहे. त्यामुळे हा गट लोकसंख्येच्या तुलनेत अल्पसंख्यांक असला तरी त्याचा राजकीय आवाज मोठा असल्याने ही मागणी मान्य झाल्याचे दिसते आहे. दुसरीकडे स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागू करण्याची आश्वासन जाहीरनाम्यात देऊन दहा वर्षे झाली आणि आत्ताही हरियाणा बॉर्डरवर शेतकरी उपोषणाला बसलेले असताना त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. आर्थिक पाहणी अहवालातील उतरता विकास दर, रुपयाचे अवमूल्यन, असंघटित क्षेत्रातील वाढत्या समस्या, आर्थिक विषमता, महागाई, कंपन्यांचा वाढता नफा त्याच वेळेस नोकरदारांच्या पगारात वाढ नाही, बेरोजगारी, मोठया भांडवलदारांची कर्ज माफी याबाबत सरकार बजेट मध्ये मूक आहे.
मुकुंद किर्दत, प्रवक्ता, आम आदमी पार्टी

वेटलिफ्टिंग व रेसलिंग स्पर्धेत पीसीपी मुलांच्या संघ विजेता

पिंपरी, पुणे (दि.१ फेब्रुवारी २०२५) इंटर इंजीनियरिंग डिप्लोमा स्टुडन्ट स्पोर्ट्स असोसिएशन, डी.१ झोन च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वेटलिफ्टिंग व रेसलिंग स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक (पीसीपी) मधील मुलांच्या संघाने प्रथम व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
राजगड पॉलिटेक्निक भोर , पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत पॉलिटेक्निकच्या विविध तेरा महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. यामध्ये मुलांच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत विजेते गौरांग राम विंचूरणे याने ७७ किलो वजनी गट, श्रेयश सचिन काकडे याने १०५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक, शिवम कैलास बिरादार याने ५६ किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक, अमन विश्वंभर कांबळे याने ९४ किलो वजनी गटात द्वितीय पटकावला. वेटलिफ्टिंग मध्ये सोहम साळुंखे याने ५७ किलो गटात प्रथम क्रमांक, विकी सांगले ९७ किलो वजनी गटात प्रथम पटकावला.
कुस्ती स्पर्धेत ९७ किलो वजनी गटात विकी सांगळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर ५७ किलो वजनी गटात सोहम साळुंखे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या स्पर्धकांना पंच सुधीर म्हाळसकर, पंच साठे, पंच गणेश, प्राचार्य डी. के. खोपडे, समन्वयक प्रा. एस. के. नाणवरे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
यशस्वी विद्यार्थी व संघ व्यवस्थापक प्रा. गणेश राजे, प्रा. चेतन चिमोटे, अतुल मराठे , डी. बी.सोरटे, राहुल पवार, ठाकरे सर, क्रीडा समन्वयक सुनिल जगताप, किशोर गव्हाणे, लक्ष्मी दरकुडे, प्राचार्या डॉ. विद्या बॅकोड यांचे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी अभिनंदन केले.

जर्मनीमध्ये उच्च शिक्षण आणि रोजगाराच्या मोठ्या संधी – डॉ. क्रिस्टीना रथ

पीसीयू मध्ये “एक्सप्लोर जर्मनी २०२५” चे यशस्वी आयोजन

पिंपरी, पुणे (दि. १ फेब्रुवारी २०२५) जर्मनीमध्ये उच्च शिक्षण आणि रोजगार वाढीसाठी आगामी काळात आणखी मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांनी जर्मन भाषा अवगत करावी आणि जर्मनीमधील विद्यापीठांमधून मिळणाऱ्या शिष्यवृत्ती चा लाभ घेऊन स्वतःचे करिअर घडवावे असे मार्गदर्शन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ. क्रिस्टीना रथ यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) मध्ये “एक्सप्लोर जर्मनी २०२५” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात जर्मनी संस्कृती, भाषाचा उत्सव साजरा केला.
यावेळी फर्ग्युसन सेंटर फॉर लँग्वेजच्या संचालक डॉ. सरिता केळकर, जीईडीयुचे कंट्री हेड कुबेर कपूर, दिल्ली दुतावासातील अधिकारी शरयू जोरकर, विद्यार्थिनी दक्षा ओक आदी उपस्थित होते.
पीसीयुच्या कुलगुरू डॉ. मनीमाला पुरी यांनी सांगितले की, खुल्या आर्थिक धोरणामध्ये उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय भाषा आणि इंग्रजी शिवाय ज्या देशात आपण शिक्षण घेऊ इच्छित आहोत, त्या देशातील भाषा शिकणे देखील आवश्यक आहे. आगामी काळात वाहन उद्योग क्षेत्रात जर्मनी सारख्या प्रगतिशील राष्ट्रात मोठ्या संधी तयार होणार आहेत. त्यासाठी पीसीयू च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. नवीन भाषा शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते.
डॉ. सरिता केळकर यांनी जर्मनी आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक समानतेबद्दल माहिती दिली.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

१२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करणे हा ऐतिहासिक निर्णय-मुरलीधर मोहोळ

  • ‘सर्वसमावेशी आणि विकसित भारताच्या दिशेने मार्गक्रमण करणारा अर्थसंकल्प’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा अर्थसंकल्प हा १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केल्यामुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देणारा तर आहेच, शिवाय विकसित भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकणाराही आहे. गरीब, युवा, अन्नदाता आणि नारी (GYAN) या चार घटकांना केंद्रस्थानी ठेवतानात या अर्थसंकल्पाला असलेला सर्वसमावेशी आणि दूरदर्शीपणा मोदी सरकाराच्या विकासाच्या धोरणांचे प्रतीक आहे.

करप्रणालीमध्ये बदल करतानाच १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करणे हा ऐतिहासिक निर्णय असून यामुळे मध्यमवर्गीय घटकाला मोठा फायदा होणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ५ लाखांपर्यंत नेणे, हाही अतिशय महत्त्वाचा भाग आहे. हा अर्थसंकल्प सशक्त, समृद्ध आणि आत्मनिर्भर भारताच्या नवनिर्माणाला दिशा देणारा आहे.

समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यापासून तर उत्तम आरोग्य सुविधा, लघु उद्योगांचे सक्षमीकरण, विमा क्षेत्रातील गुंतवणूक आणि निर्यात धोरण या सर्व बाबींवर विशेष लक्ष देण्यात आले आहे, ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. शिवाय शेतकऱ्यांसाठीच्या योजना, एमएसएमई आणि महिला उद्योगांचे सक्षमीकरण, वैद्यकीय शिक्षणाच्या विस्तारासाठी उचललेली पावले आणि एआय प्रणालीला मिळणारे प्रोत्साहन याही महत्त्वाच्या बाबींना दिलेले स्थान मोदी सरकारची सर्वांगीन विकासाची कटिब्धता दर्शविते.

सर्वसमावेशी आणि दूरदर्शी अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन !

मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री

मायमराठी व्हावी लोक प्रशासनाची भाषा

‘प्रशासनातील मराठी भाषा’ परिसंवादात सनदी अधिकाऱ्यांची भूमिका

पुणे : ‘मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही मायमराठी ही लोक प्रशासनाची भाषा झाली पाहिजे यावर भर द्यावा. कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करतानाच, जनतेचे प्रश्न सोडविण्याच्या कळकळीतून प्रशासनाची भाषा नक्कीच सुलभ होईल,’ असा विश्वास सनदी सेवेतील अधिकाऱ्यांनी शनिवारी विश्व मराठी संमेलनाच्या व्यासपीठावर व्यक्त केला.

विश्व मराठी संमेलनाच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मुख्यमंचावर ‘प्रशासनातील मराठी भाषा’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री कार्यालय आणि सांस्कृतिक विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, पुणे महापालिकेचे उपायुक्त राजीव नंदकर, वस्तू व सेवा कर पुणे विभागाच्या अतिरिक्त आयुक्त वैशाली पतंगे यांनी या परिसंवादात सहभाग घेत प्रशासनाच्या भाषेबाबत विचार मांडले. बालभारतीचे संपादक किरण केंद्रे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

विकास खारगे म्हणाले की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभारात फारसी भाषेऐवजी मराठी भाषेचा वापर सुरू केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजी भाषेला पर्यायी मराठी शब्द प्रचलनात आणले. त्यांचा वारसा चालविताना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लोकांना समजेल अशी भाषा वापरून जनतेची सेवा केली पाहिजे. इतर भाशेतील शब्दांना पर्यायी मराठी शब्द नक्कीच प्रचलनात आणले जाऊ शकतात. मराठी भाषा विभागाने विविध कोष तयार करून भाषाविकासात योगदान दिले आहे.’

अशोक काकडे म्हणाले की, ‘केवळ प्रशासकीय अधिकारीच नव्हे, तर अनेक लोक अवघड शब्द वापरताना दिसतात. पर्यायी मराठी शब्द अनेकांना सुचत नाहीत. भाषेचे स्वरुप काळानुरूप वेगाने बदलत असून, सोपे पर्यायी शब्द सर्वांनी वापरले पाहिजेत. शब्दाचा अनर्थ होऊ नये, या विचारातून प्रशासनात क्लिष्ट भाषा वापरण्याचा प्रघात सुरू झाला. मात्र, आशय हा सोप्या शब्दांत, थोडक्यात मांडल्यास तो खूप लोकांपर्यंत पोहोचतो.’

राजीव नंदकर यांनी संविधानिक भाषा, राजभाषा, राष्ट्रभाषा, प्रमाण भाषेच्या तरतुदींची माहिती दिली. ‘राज्यघटनेच्या सतराव्या भागात राजभाषा आणि संघराज्याची भाषा याबाबत विवेचन केले आहे. त्या आधारे राजभाषा अधिनियम तयार करण्यात आला. त्यामध्ये केंद्र सरकारची राजभाषा हिंदी झाली, तर राज्यांना त्यांची राजभाषा ठरविण्याची मुभा देण्यात आली. त्या आधारे महाराष्ट्र राज्याने १९६५ मध्ये राजभाषा अधिनियम संमत करत मराठी ही राजभाषा आणि प्रमाण भाषा ठरविली. केंद्राने २००४ नंतर भाषांना अभिजात दर्जा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे,’ असे त्यांनी सांगितले.

वैशाली पतंगे म्हणाल्या, ‘प्रशासकीय कारभारात भाषा अतिशय उपयुक्त असते. प्रयोजनानुसार भाषेचे स्वरुप बदलते. कायद्याची अंमलबजावणी हे प्रशासनाचे प्रयोजन आहे. कायद्याची चौकट मोडू नये, यासाठी शब्दाचा दुसरा अर्थ निघणार नाही, भाषेचा विपर्यास होऊ नये, याची सातत्याने काळजी प्रशासनाला घ्यावी लागते. त्यातून प्रशासनात क्लिष्ट भाषेचा वापर होतो. परंतु, जनतेचे प्रश्न सोडविण्याची कळकळ असेल, तर प्रशासनाची भाषा नक्कीच सोपी होईल.’

सरकारी योजनांचा प्रसार करताना बोजड शब्द टाळा

‘प्रशासनात फाइलला नस्ती असे म्हटले जाते. त्या नस्तीवर टिपण्या, प्रशासकीय भाषा ही अधिकारी, कर्मचाऱ्यांना माहिती असते. परंतु, जनतेसाठी योजना राबविताना, सार्वजनिक कार्यक्रम घेताना अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बोजड शब्दांचा वापर टाळावा,’ असे विकास खारगे म्हणाले.

‘कंटेट क्रिएटर’ बनण्यासाठी सुरुवातीला फार खर्च नको

जोखीम लक्षात घेऊन गुंतवणूक करण्याचा ‘इन्फ्लूएंसर’चा सल्ला

पुणे-“तरुणांमध्ये ‘सोशल मीडिया ‘इन्फ्लूएंसर’ बनण्याची इच्छा असल्याचे दिसून येते. तुम्हाला याच क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर खुशाल करा; मात्र सुरुवातीला त्यासाठी किती गुंतवणूक करायची, याचा गांभीर्याने विचार करा. त्यातून रिटर्न किती मिळणार, जोखीम किती, याचा विचार करावा,” असे आवाहन सोशल मीडिया ‘इन्फ्लूएंसर’ने शनिवारी पुण्यात केले.

तिसऱ्या मराठी विश्व संमेलनात दुसऱ्या दिवशी समाज माध्यमातील प्रभावी व्यक्तीमत्त्वांच्या (इन्फ्लूएंसर) परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सीए रचना रानडे, अथर्व सुदामे, पवन वाघुळकर, ओंकार व शार्दुल कदम, अरूण प्रभुदेसाई आदी सहभागी झाले होते. त्यांच्याशी ज्येष्ठ निवेदक सुनंदन लेले यांनी संवाद साधला. ‘सोशल मीडिया केवळ मनोरंजनाचे किंवा वेळ घालवण्याचे साधन नाही. त्याचा उपयोग लोकांच्या ज्ञानवृद्धीसाठी, सामाजिक समस्या समजून घेण्यासाठी आणि व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी होऊ शकतो. सोशल मीडिया वापरकर्त्यांना मानसिक स्वास्थ्याची काळजी घेण्याची गरज आहे आणि तो एक स्थिर मानसिकतेसह वापरणे आवश्यक आहे,’ असा सूर यावेळी ‘इन्फ्लूएंसर’ने आळवला.

अथर्व सुदामे म्हणाला, ‘रिल्स बनविताना दहा ते पंधरा सेंकदात प्रभावी कंटेट देण्यासाठी आपल्या भाषेचा उपयोग होतो. मातृभाषेत चांगल्या पद्धतीने व्यक्त होता येते. आपल्या भाषेत ती मजा आहे.’ पवन वाघुळकर म्हणाला. ‘सोशल मीडिया एक अत्यंत प्रभावशाली माध्यम आहे. आपण त्याचा वापर कसा करतो, यावर त्याचा परिणाम अवलंबून आहे. सोशल मीडिया जर योग्य पद्धतीने वापरला तर ते एक अमूल्य साधन ठरू शकतो.

रचना रानडे म्हणाल्या. “अर्थ विषयक चॅनल सुरू करताना लोकांना ते आवडेल का, असा प्रश्न मनात आला होता. मात्र, प्रत्यक्ष चॅनेल सुरू केल्यानंतर लोकांची त्यातील रुची दिसून आली. आपले लोकही मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीकडे वळाले असून, योग्य मार्गदर्शनासाठी ते माध्यम शोधत असतात.

‘सध्या सर्वच क्षेत्रात स्पर्धा आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या मानवत दडपण असते. मात्र, दहा-पंधरा सेंकदांच्या रिल्सने लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलते, त्यांचे मन हलके होते, याचा आम्हाला आनंद आहे,’ अशी भावना अरूण प्रभुदेसाई यांनी व्यक्त केली.

लिंगभाव समानतेसाठी हवा समान नागरी कायदा : डॉ. नीलम गोऱ्हे

विश्व मराठी संमेलनाच्या व्यासपीठावर दिले संकेत; महिलांना मिळेल न्याय

पुणे : ‘‘जेंडर पॅरिटी’ (लिंगभाव समानता) आणण्यासाठी देशात समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे. त्यातून महिलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. महाराष्ट्रात लवकरच समान नागरी कायदा लागू होईल,’ असे संकेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शनिवारी दिले. ‘न्यायदेवता डोळ्यावरील पट्टी काढून महिलांना न्याय देण्याचे काम करीत आहे. फौजदारी व दिवाणी न्यायालयांमध्ये निकालपत्र मराठी भाषेत देण्यासाठी मराठी भाषा विभागाने कार्यवाही करावी,’ असे निर्देशही त्यांनी दिले.

विश्व मराठी संमेलनाच्या आचार्य प्र. के. अत्रे मंचावर (अ‍ॅम्फी थिएटर) ‘महिलांविषयक कायदे व न्याय मराठी भाषेत’ या विषयावरील परिसंवादात डॉ. गोऱ्हे आणि ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. उज्वल निकम यांनी आपले विचार मांडले. कायद्याच्या चौकटीत मराठी भाषेचा परिणामकारक वापर केल्यास महिला आपल्या हक्क-अधिकारांबाबत जागरूक होतील. त्यातून पीडितांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल,’ अशी मांडणी दोन्ही मान्यवरांनी केली. अ‍ॅड. अनुराधा परदेशी यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, ‘‘शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये,’ अशी म्हण आहे. परंतु, न्यायव्यवस्थेत अनेक शहाणी माणसे पीडितांना न्याय मिळवून देण्याचे काम करतात. १९८० नंतर महिलांविषयक कायद्यांमध्ये विविध बदल झाले आहेत. पोलिसांपासून न्यायव्यवस्थेत लिंगभाव संवेदनशीलता आली आहे. त्यातून न्यायव्यवस्था सक्षम होत असून, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण वाढत आहे. महाराष्ट्र सरकारने सर्व फौजदारी आणि दिवाणी न्यायालयांची भाषा मराठी असेल हा निर्णय घेतला आहे. परंतु, अद्याप दोन्ही न्यायालयांमध्ये निकालपत्रे मराठी भाषेतून दिली जात नाहीत. त्यासाठी अनुवादक आणि प्रतिवेदकांची संख्या कमी असून, ही अडचण दूर करण्याची कार्यवाही मराठी भाषा विभागाने करावी.’

अ‍ॅड. उज्वल निकम म्हणाले की, ‘कायद्याची भाषा ही सर्वसामान्यांना समजेल अशा प्रकारची असावी. महिलांनीही आत्मविश्वास जागवून मातृभाषेच्या आधारे आपल्यावरील अत्याचारांना वाचा फोडत न्याय मागितला पाहिजे. अत्याचारविरोधी कायद्यांमधील कठीण शब्दांना सोपे पर्यायी शब्द शोधले पाहिजेत. हे कायदे सोप्या भाषेत पुस्तिकेतून समाजात पोहोचविले पाहिजेत. ‘गुड टच, बॅड टच’बाबत मराठी भाषेचा वापर करून समाजात संवेदनशीलता निर्माण केली पाहिजे. त्यातून पीडितांचे अधिकार अधोरेखित होऊन, त्यांना न्याय मिळेल.’

घरातून संस्कार हवेत

‘महिलांवरील हिंसाचाराच्या घटना वाढत असून, अनेक जण त्याकडे मूकपणे बघत असतात. महिलांवर अत्याचार होत असतानाच पीडितेसह समाजाने गुन्हेगाराला रोखून प्रतिकार केला पाहिजे. ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’वरील चित्रपटांमध्ये असलेला हिंसाचार, शिविगाळ यांचा परिणाम मुलांवर होत आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांसह घरातूनही मुलांवर संस्कार झाले पाहिजे,’ अशी भूमिकाही उज्वल निकम यांनी मांडली.

“मराठी भाषा आणि स्त्री साहित्य” या विषयावर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे साधणार विशेष परिसंवाद

पुणे: मराठी भाषा आणि स्त्री साहित्य या महत्त्वपूर्ण विषयावर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उद्या विश्व मराठी संमेलनात परिसंवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमास श्रीमती मनीषा पाटणकर-म्हैसकर (अमुस, मराठी भाषा) आणि श्रीमती अश्विनी भिडे (मुख्य सचिव, मुख्यमंत्री कार्यालय) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

याशिवाय, प्रसिद्ध बालरंगभूमी लेखिका श्रीमती प्रतिभा मतकरी, ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती फैयाज शेख, तसेच नामवंत लेखिका डॉ. सिसिलिया कार्व्हालो हेदेखील या चर्चासत्रात सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमाचे निवेदन उत्तरा मोने करणार असून, मराठी भाषा, साहित्य आणि स्त्रियांचे योगदान या विषयांवर विविध पैलूंवर चर्चा होणार आहे. मराठी साहित्य आणि भाषेच्या संवर्धनासाठी आयोजित या कार्यक्रमाकडे साहित्यप्रेमींचे विशेष लक्ष लागले आहे.

नोकरदार करदात्यांसाठी रु. 75,000 स्टँडर्ड डिडक्शनसह उत्पन्नाची मर्यादा रु. 12.75 लाख

नवी दिल्‍ली, 1 फेब्रुवारी 2025

“आधी विश्वास ठेवा, मग छाननी करा” या सरकारच्या तत्वज्ञानाशी असलेल्या बांधिलकीची पुष्टी करत केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 ने मध्यमवर्गावर विश्वास दाखवला आहे आणि सर्वसामान्य करदात्यांना कराच्या बोज्यापासून दिलासा देण्याचा कल कायम ठेवला आहे. आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना, केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी करपात्र उत्पन्नाच्या स्तरात आमूलाग्र बदल आणि करदात्यांना लाभ देणारे दर सुचवले.

करदात्यांना आनंदाची बातमी देत अर्थमंत्री म्हणाल्या, “नव्या कररचनेत 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही प्राप्तिकर लागू होणार नाही( म्हणजेच भांडवली लाभ वगळून महिन्याला सरासरी एक लाख रुपये उत्पन्न). नोकरदार करदात्यांसाठी ही मर्यादा रु. 75,000 स्टँडर्ड डिडक्शनमुळे रु. 12.75 लाख असेल. कोणत्याही प्रकारे त्यांच्यावर कर लागू होणार नाही अशा प्रकारच्या करपात्र स्तरावरील दरकपातीमुळे मिळणाऱ्या लाभांव्यतिरिक्त कर सवलत देण्यात येत आहे.” सीतारामन यांनी सांगितले, “ नव्या रचनेमुळे मध्यमवर्गीयांवरील करात लक्षणीय कपात होईल आणि अधिक रक्कम त्यांच्या हाती येईल, ज्यामुळे घरगुती उपभोग, बचत आणि गुंतवणुकीत वाढ होईल.” नव्या कररचनेत अर्थमंत्र्यांनी करआकारणीच्या दरातील संरचनेत खालीलप्रमाणे बदल सुचवले आहेतः

करपात्र स्तरातील बदलांचे करविषयक लाभ आणि विविध उत्पन्न स्तरावरील सवलत खालील तक्त्यात दर्शवली आहेः

0-4 लाख रुपयेशून्य
4-8 लाख रुपये5 टक्के
8-12 लाख रुपये10 टक्के
12-16 लाख रुपये15 टक्के
16-20 लाख रुपये20 टक्के
20- 24 लाख रुपये25 टक्के
24 लाख रुपयांवर30 टक्के

कर मूल्यांकन पीएनजी

विकसित भारताचे स्वप्न साकार होण्यासाठी करसुधारणा या महत्त्वाच्या सुधारणांपैकी एक असल्याचे अधोरेखित करत सीतारामन म्हणाल्या की नवे प्राप्तिकर विधेयक न्यायाच्या भावनेचा पुरस्कार करेल. नवी कर प्रणाली करदात्यांना आणि कर प्रशासनाला समजण्यास सोपी असेल ज्यामुळे करनिश्चिती होईल आणि विवाद कमी होतील, अशी माहिती त्यांनी दिली.

Tax Analysis.PNG

थिरुक्कुलमधील 542 वा श्लोक म्हणत अर्थमंत्री म्हणाल्या, “ज्या प्रकारे सजीव पावसाची अपेक्षा करत जगतात, नागरिक देखील उत्तम प्रशासनाच्या अपेक्षेत असतात.”  सुधारणा हे जनता आणि अर्थव्यवस्थेसाठी सुशासन स्थापित करण्याचे साधन आहे. सुशासन प्रस्थापित करण्यामध्ये प्रतिसाद देण्याला प्राधान्य असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार कशा प्रकारे जनतेच्या प्रश्नांना जाणून घेते आणि त्यांचे निवारण करते हे या कर प्रस्तावातून दर्शवले आहे, असे सीतारामन यांनी नमूद केले.

करपात्र उत्पन्नाची मर्यादा ७ वरून १२ लाख करणे हा निर्णय ऐतिहासिक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले पंतप्रधान मोदींचे अभिनंदन

मुंबई, १:- देशातील मध्यमवर्गासाठी स्वप्नवत अर्थसंकल्प आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला आणि १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करुन एक मोठा दिलासा मध्यमवर्गाला दिला. ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलणारा आणि नागरिककेंद्रीत गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

हा अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने नेणारा, सर्वसमावेशक आणि विकसित भारताचा ऐतिहासिक अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेला अधिक प्रगल्भ करणारा ठरेल. अर्थव्यवस्थेला आणखी सदृढ करणारा, मध्यमवर्गीय, पगारदार, युवा आणि शेतकरी, कष्टकरी या सगळ्यांना दिलासा देणारा आहे. या अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे महाराष्ट्राच्या अनेक महत्वाकांक्षी धोरणांना बळ मिळेल. विशेषत: महाराष्ट्र हे स्टार्टअपचे कॅपिटल असल्याने नवीन धोरणांचा मोठा लाभ मिळेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

प्राप्तीकराची मर्यादा वाढविल्याने तो पैसा अर्थव्यवस्थेत येईल आणि त्यामुळे मागणी वाढेल. करपात्र उत्पन्नाची मर्यादा ७ वरून १२ लाख करणे हा निर्णय ऐतिहासिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच ही मर्यादा अडीच लाखांवरून सात लाख करण्यात आली होती. ती आता १२ लाख करण्यात आली. हा प्रवास निश्चितच भारतीय अर्थव्यवस्थेसाठी परिणामकारक आहे. यातून मध्यमवर्गीय, पगारदार, युवक यांना मोठा दिलासा मिळणार आहे. एका मोठ्या वर्गाच्या हाती उत्पन्नाचा मोठा वाटा राहणार आहे. ज्यामुळे बाजारपेठांत चैतन्य निर्माण होईल. खरेदी वाढेल, मागणी वाढेल, उत्पादन वाढेल, रोजगार वाढतील विशेषत: एमएसएमई क्षेत्राला चालना मिळेल. यातून अर्थव्यवस्था आणखी बळकट होण्यास मदत होईल. या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठींही महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. देशातील 100 जिल्ह्यांसाठी विशेष प्रोत्साहन योजना, तेलबिया उत्पादनाला प्रोत्साहन, यात शंभर टक्के माल खरेदीचे धोरण यामुळे शेतकर्‍यांसाठी एक मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. मच्छिमारांना आता 5 लाखांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी मिळणार आहे. यातून त्यांना व्यवसायवाढीसाठी प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा आहे. कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढेल, अशा निर्णंयामुळे शेती आणि शेतकर्‍यांसाठी नव्या संधी निर्माण होणार आहेत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

युवा उद्योजकांसाठी एमएसएमई क्षेत्र महत्वाचे आहे. त्यांच्यासाठी कर्ज मर्यादा आणि वारंवारतेचा निकष वाढविण्याच्या निर्णय महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्र ही स्टार्टअपची राजधानी आहे. स्टार्टअपसाठी 20 कोटी रूपयांची कर्ज मर्यादा करण्यात आली आहे. यामुळे स्टार्टअपची इकोसिस्टिम मजबूत होणार आहे. वेगवेगळे स्टार्टअप आणि त्यामाध्यमातून होणार्‍या रोजगार संधी यामुळे आपल्या राज्याची या क्षेत्रातील वाटचाल आणखी दमदार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

पायाभूत प्रकल्पांच्या विकासाकरिता नवीन इन्फ्रास्ट्रक्चर धोरण तयार करण्यात येत आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी राज्यांना 50 वर्षे बिनव्याजी कर्ज योजनेचाही राज्याला सर्वाधिक फायदा झाला आहे आणि या अर्थसंकल्पातही त्या बाबतीत राज्य पुढे असेल. पीपीपी प्रकल्पांमुळे खाजगी क्षेत्रच्या गुंतवणूकीला प्रोत्साहन वाढेल, यातून मोठी रोजगार निर्मिती होईल. एकंदर हा अर्थसंकल्प देशाला पुढे घेवून जाणारा, देश प्रगल्भ आणि सर्वसमावेशक अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असल्याचे दर्शविणारा आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.

अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काय?
या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय, असा प्रश्न माध्यमांनी विचारला, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, काही प्राथमिक माहिती माझ्याकडे आली, त्यानुसार, महाराष्ट्र रुरल कनेक्टिव्हीटी इम्प्रुव्हमेंट प्रकल्पासाठी 683 कोटी, महाराष्ट्र अ‍ॅग्रीबिझनेस प्रकल्पासाठी 100 कोटी, इकॉनॉमिक क्लस्टरसाठी 1094 कोटी, उपसा सिंचन योजनांसाठी 186 कोटी अशा तरतुदी करण्यात आल्या आहेत. अर्थात आणखी तपशीलवार माहिती यथावकाश दिली जाईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या कारवाईत ३६ हजारहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त

पुणे, दि.१ : पुणे विभागाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत पेरणे गावाच्या हद्दीत छापा मारुन १ हजार १६८ ग्रॅम गांजासह इतर साहित्य असा एकूण ३६ हजार ४१० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांनी दिली आहे.

या अनुषंगाने सूरज अशोक हिंगे वय १९ वर्षे रा. शिरुर कासार रोड, ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर यांच्याविरुद्ध अंमली औषधी द्रव्य व मनप्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ च्या कलमानुसार विभागीय भरारी पथक पुणे कार्यालयात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या कारवाईत निरीक्षक नरेंद्र थोरात, दुय्यम निरीक्षक विराज माने व धीरज सस्ते, प्रताप कदम, सतीश पोंधे, रणजीत चव्हाण, शशीकांत भाट, अमोल दळवी व राहुल तारळकर सहभागी झाले. गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक नरेंद्र थोरात करीत आहेत.

सुवर्णपाळण्यात ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात गणेश जन्म सोहळा थाटात

श्री विनायक जन्मोत्सव ; गणेशाचे वाहन असलेल्या मूषकांची फुलांमध्ये मंदिरावर आकर्षक आरास ; पीएनजी ज्वेलर्सतर्फे गणपती बाप्पाला दहा पदरी भव्य ‘कमळ हार’

पुणे : कुणी अमोद घ्या, कुणी अमोघ घ्या, या ग सयांनो या ग या… असे पाळण्याचे स्वर आणि जय गणेश दगडूशेठ गणपती बाप्पा… चा जयघोष श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात झाला. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही माघ शुध्द चतुर्थीला गणेश जन्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा श्री गणेशाचा विनायक अवतार आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे श्री गणेश जन्म सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही सुवर्णपाळण्यात पार पडला. यावेळी मृणालिनी रासने, ज्योती सूर्यवंशी, शारदा गोडसे, अर्चना भालेराव यांसह महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री गणेशाचे वाहन असलेल्या मूषकांची फुलांमध्ये मंदिरावर आकर्षक आरास करण्यात आली होती. मंदिरात शनिवारी पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक करण्यात आला. पहाटे ४ ते ६ यावेळेत स्वराभिषेक सुप्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे व सहकारी यांनी श्रीं चरणी अर्पण केला. त्यानंतर सकाळी ६ ते ११ आणि दुपारी १.३० ते सायंकाळी ६ यावेळेत गणपती सूक्त अभिषेक करण्यात आला.

सकाळी ८ ते ११.३० ते दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत गणेशयाग आणि दुपारी १२ वाजता गणेशजन्माचा सोहळा थाटात साजरा झाला. सायंकाळी ६ वाजता नगरप्रदक्षिणा मिरवणूक, रात्री ८.३० वाजता श्रींची महाआरती आणि रात्री १० ते पहाटे ३ वाजेपर्यंत श्री गणेश जागर झाला. भाविकांनी लाखोंच्या संख्येने पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी केली होती.

  • गणरायाला १ किलोचा १.०५ कोटी रुपयांचा ‘कमळ हार’ अर्पण
    पीएनजी ज्वेलर्सतर्फे गणपती बाप्पाला दहा पदरी भव्य ‘कमळ हार’ अर्पण करण्यात आला. श्रद्धा आणि उत्कृष्ट कारागिरीची परंपरा पुढे नेत पीएनजी ज्वेलर्सने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला दहा पदरी भव्य ‘कमळ हार’ अर्पण करत पुन्हा एकदा अध्यात्म आणि कलेप्रती आपली निष्ठा दर्शवली आहे. एक किलो वजनाच्या या हारामध्ये ४०० हून अधिक उपरत्ने जडवलेली असून हा हार म्हणजे अखंड भक्तीचे प्रतीक आहे. ‘कमळ हार’ हा पवित्र कमळाच्या प्रेरणेतून साकारलेला सोन्याच्या दागिन्याचा उत्कृष्ट नमुना आहे. पीएनजी ज्वेलर्सचे संस्थापक आणि गणपती भक्त दाजीकाका गाडगीळ यांनी ही अर्पण परंपरा सुरू केली. या कमळ हाराची किंमत १.०५ कोटी रुपये इतकी आहे, अशी माहिती ट्रस्टचे सरचिटणीस हेमंत रासने यांनी दिली.

‘कमळ हार’ हा अत्यंत नाजूकपणे साकारलेला दागिन्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे. यात अनेक आध्यात्मिक प्रतीके जडविण्यात आली आहेत. या हाराच्या मध्यभागी असलेले तेजस्वी कमळ शुद्धतेचे प्रतीक आहे, त्याला दोन मोरांचा आधार मिळाला आहे. मोर हे दिव्य वैभव आणि समृद्धीचे प्रतीक आहेत. हाराच्या आठ पदरांची रचना रुद्राक्षांच्या मण्यांसारखी आहे. ही रचना आध्यात्मिक संरक्षण आणि समतोलाचे प्रतीक दर्शवते. या हाराला भक्तीचा अनोखा स्पर्श देण्यासाठी गणपती बाप्पाच्या आवडत्या मोदकाच्या आकारातील गडद लाल रत्नांचा समावेश करण्यात आला आहे. यातून परंपरा आणि कलात्मक कौशल्याचा सुंदर मिलाफ घडवला आहे. हा अद्वितीय दागिना २० कुशल कारागीरांनी २५ दिवसांच्या परिश्रमाने साकारला आहे. या हाराच्या निमित्ताने पूर्ण भक्तीभावाने आणि समर्पित भावनेने त्यांनी हा सुंदर दागिना घडवला, असे पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांनी सांगितले.