पुणे-राज्यातील धर्मादाय खाजगी रुग्णालयांची तपासणी संदर्भात संयुक्त समितीची बैठक मुंबईतील विधानभवन येथे पार पडली.यावेळी रुग्णांना OPD ते तात्काळ उपचार पर्यंत या ना त्या कारणाने टाळणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई ची गरज आहे असे स्पष्ट प्रतिपादन येथे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केले विधी व न्याय राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. यामध्ये दोन्ही सभागृहातील सदस्य, धर्मादाय आयुक्त व मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख उपस्थित होते.
या बैठकीत आमदार शिरोळे यांनी अधोरेखित केलेले मुद्दे :
▪️OPD सेवा अनेक रुग्णालयांतून गरजू रुग्णांना दिली जात नाही; शासनाने audit करून आकडेवारी घेऊन कार्यवाही करावी.
▪️महात्मा फुले जनआरोग्य योजना व धर्मादाय योजना अंतर्गत रुग्णालयांनी अपत्कालीन रुग्ण व accident patients यांना तत्काळ उपचार द्यावेत, ही तरतूद असूनही ICU बेड, तज्ञ डॉक्टरांची अनुपलब्धता सांगून उपचार टाळले जातात – ही गंभीर बाब आहे.
▪️रुग्णालयांनी त्वरित ऍडमिट करून, नंतर कागदपत्रांची पूर्तता घेणे अपेक्षित असतानाही डिपॉझिटची मागणी केली जाते, आणि वेळ वाया जातो.
कोल्हापूर परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तात्काळ कार्यवाहीची मागणी
मुंबई, १ जुलै २०२५ : वारीच्या काळात भक्तांवर होणाऱ्या हल्ल्याची संतापजनक घटना समोर आली असून, पंढरपूर दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांवर दौंड तालुक्यातील चिंचोली परिसरात हल्ला झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, कोल्हापूर परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तातडीने सखोल चौकशी करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.
३० जून रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरून एक कारमधून काही भाविक श्री विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरकडे जात होते. चिंचोली येथे चहा पिण्यासाठी थांबले असताना दोन अज्ञात दुचाकीस्वार घटनास्थळी आले आणि त्यांनी एका महिला भाविकाच्या तोंडावर मिरचीपूड फेकून पलायन केले. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, “वारी ही महाराष्ट्राची अध्यात्मिक आणि सामाजिक ओळख आहे. अशा पवित्र प्रवासात भाविकांवर हल्ला होणे अत्यंत दुर्दैवी असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करावी.” त्यांनी पुढील उपाययोजना सुचवल्या आहेत : ● महामार्गांवरील पोलीस गस्त वाढविणे ● भाविकांच्या मार्गावरील सुरक्षेची पुनर्रचना ● विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करणे ●महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी विशेष गस्ती गाड्या सुरू करणे
या घटनेच्या पार्श्वभूमीवर शासनाने भाविकांच्या सुरक्षेच्या बाबतीत अधिक दक्षता घेणे आवश्यक असल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
पुणे दिनांक: 1 जुलै 2025- आज Doctors’ Day निमित्त, कळस भागातील कै. गेनबा तुकाराम म्हस्के सरकारी रुग्णालयात खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पुणे महानगरपालिकेकडून मंजूर झालेल्या ₹50 लाख निधीच्या पार्श्वभूमीवर सुरू होणाऱ्या प्रसूतीगृहाच्या निमित्ताने येथील डॉक्टरांचा तसेच कळस भागातील सर्व डॉक्टर बांधवांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रम “आप पुणे शहर महिला आघाडीच्या पूनम अमित म्हस्के” व “आप पुणे शहराध्यक्ष युवा आघाडी अमित उद्धव म्हस्के” यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात उपस्थित डॉक्टरांनी आनंद व्यक्त करत सांगितले की, “या भागात सुरू होणाऱ्या प्रसूतीगृहामुळे महिलांना मोठा दिलासा मिळेल. ही खरोखरच लोकहिताची बाब आहे.” तसेच डॉक्टरांनी “कळस गावासाठी आम आदमी पार्टीकडून केले जात असलेले कार्य उल्लेखनीय आहे,” असे गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाला आम आदमी पक्षाचे पुणे शहर सह-संघटन मंत्री मा. मनोज शेट्टी, महिला उपाध्यक्ष श्रद्धाताई शेट्टी, रिक्षा संघटनेचे अनिलजी धुमाळ, जोगिंदर पाल सिंग, प्रताप म्हस्के, अरुण शेट्टी, वैभव सकट, यश म्हस्के व इतर मान्यवर उपस्थित होते.Doctors’ Day च्या निमित्ताने “आम आदमी पार्टी पुणे” यांच्यावतीने हा सन्मान सोहळा कळसगाव आणि विश्रांतवाडी भागात साजरा करण्यात आला.
मुंबई : जगभरातील अनेक जण उपचारांसाठी पुण्यात येत असतात, हे लक्षात घेऊन पुणे मेडिकल टुरिझम हब म्हणून जाहीर करावे, अशी सूचना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (मंगळवारी) विधानसभेत बोलताना केली.
सद्यस्थितीत आफ्रिका, मध्य पूर्व आशिया आणि दक्षिण आशिया या खंडातील अनेक जण उपचारांसाठी भारतात येतात आणि खास करून पुण्यात उपचार घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. थायलंड, मलेशिया, जॉर्डन, तुर्कस्तान या देशांमध्ये मेडिकल टुरिझमला जगभरातून लोकं जातात, तर मेडिकल टुरिझमसाठी लोकं पुण्यातही येऊ शकतात. यासाठी राज्य शासनाने पुणे मेडिकल टुरिझम प्रमोशन बोर्ड स्थापन करावे. त्याद्वारे सर्व रुग्णालये, वेलनेस सेंटर्स आणि डायग्नोस्टिक सेंटर्स एकत्र आणावीत, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी भाषणात बोलताना सांगितले.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात इंद्रायणी मेडिसिटी उभारण्यात येत आहे. यामध्ये रुग्णालयाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधन केंद्रांचाही अंतर्भाव असेल, ही इंद्रायणी मेडिसिटीची उभारणी लवकर व्हावी, अशी अपेक्षा आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केली.
पुणे-कॅम्प परिसरातील साचापीर स्ट्रीट येथे मंगळवारी दुपारी एक भीषण दुर्घटना घडली. ओयसिस हॉटेल शेजारील बिल्डिंग क्रमांक ४९५/४९६ मध्ये सुरु असलेल्या बांधकामा दरम्यान चौथ्या मजल्यावरील जिन्याचा स्लॅब कोसळून एक कामगार ठार, तर दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत.ही दुर्घटना मंगळवारी दुपारी सुमारे १२.३० वाजता घडली. स्थानिक पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकामस्थळी कामगार जिन्याचे काम करत असताना अचानक स्लॅब तुटून कोसळला. तीन कामगार त्यात अडकले. एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पुणे कॅन्टोन्मेंट पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व बचावकार्य हाती घेण्यात आले. या घटनेनंतर संबंधित बिल्डर आणि ठेकेदाराची चौकशी सुरू करण्यात आली असून कामात निष्काळजीपणा झाला का? याचा तपास सुरू आहे.घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांनी बांधकाम क्षेत्रातील सुरक्षाविषयक उपाययोजना आणि नियंत्रणाची मागणी केली आहे.दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा उपायांची अंमलबजावणी झाली होती का?, याचा शोध प्रशासन आणि पोलिसांकडून घेतला जात आहे.
ज्येष्ठ कलाकारांच्या मानधनाविषयक कार्यप्रणाली (एसओपी) सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा कळवावी असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांनी आज विभागाला दिले. त्याचप्रमाणे प्रत्येक ज्येष्ठ कलाकाराला त्याच्या आवेदनासंदर्भात लेखी पत्रोत्तर ठरलेल्या कालावधीत दिले गेलेच पाहिजे अशाही सूचना मंत्री आशिष शेलार यांनी दिल्या.
आज मंत्रालयात ज्येष्ठ कलाकारांच्या मानधन प्रक्रिये संदर्भात आढावा बैठक पार पडली, त्यावेळी मंत्री महोदयांनी हे निर्देश दिले. यावर्षीची ज्येष्ठ कलाकारांच्या मानधनासाठीची आवेदन प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. दरवर्षी ज्येष्ठ कलाकारांच्या मानधनविषयक अनेक तक्रारी येतात. या तक्रारींचे कालबद्ध निवारण करण्यासाठीही मंत्री आशिष शेलार यांनी योग्य ते निर्देश सांस्कृतिक कार्य संचालकांना दिले आहेत. प्रत्येक ज्येष्ठ कलाकाराला त्याच्या मानधनविषयक आवेदनाचे उत्तर लेखी स्वरूपात वेळेत दिले गेले पाहिजे, त्यामुळे कलाकारांमधे प्रक्रियेसंदर्भात विश्वास अधिक वाढीस लागेल, असे ते म्हणाले. अनेक जिल्ह्यात ज्येष्ठ कलाकार मानधन विषयक समित्यांचे गठन अजून सुरू आहे. त्यामुळे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ज्येष्ठ कलाकार मानधन विषयक प्रक्रियेची कार्यप्रणाली पुन्हा एकदा कळवणे आवश्यक आहे, असेही आशिष शेलार यांनी सांगितले.
या वेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे उप सचिव महेश वाव्हळ, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे, सह संचालक श्रीराम पांडे यांच्यासह अन्य वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पिंपरी (दि.१) : हिंजवडी, माण आणि मारुंजी भागातील नागरी समस्यांसह वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि.१) पाहणी केली. यात नैसर्गिक ओढे – नाल्यांतील पाण्याचा प्रवाह रोखणाऱ्यांना दिलेल्या निर्देशानुसार त्यांनी अपेक्षित दुरुस्ती केली, की नाही याची पाहणी या दरम्यान करण्यात आली.
हिंजवडी फेज – १, २ आणि ३ तसेच मेट्रो मार्गासह परिसरात १३ ठिकाणी ओढे – नाल्यांचा नैसर्गिक पाण्याचा प्रवाह परस्पर बदल / अडवल्याचे पुढे आले होते. त्यामुळे संबंधितांना पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि एमआयडीसीतर्फे नोटीस देत पाण्याचा प्रवाह ३० जूनपर्यंत नैसर्गिकरित्या मोकळा करण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने मंगळवारी महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्यासह इतर यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या हिंजवडी, माण, मारुंजी भागात पाहणी करत नोटीस बजावण्यात आलेल्या संबंधितांनी त्यांना दिलेल्या निर्देशानुसार काम केले, की नाही याची पाहणी केली. यासंबंधी अहवाल आल्यानंतर संबंधितांनी पाण्याचा प्रवाह खुला केला नसेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश यावेळी दिले.
मारुंजी – विप्रो सर्कल रोडवरील शेवटच्या ३०० मीटर रस्त्याचे काम उद्यापासून हाती घेण्यात येणार असून १५ ते २० दिवसात ते पूर्ण करण्यात येणार आहे. यासंबंधी अडचणी समजून घेत तातडीने काम सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले. संबंधित रस्ता पुढे लक्ष्मी चौकात निघत असल्याने हिंजवडीतील वाहतूक कोंडीला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल. यासह विविध भागाची पाहणी करून मेट्रो प्रकल्पांतर्गत चालू असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, मुख्य कार्यकारी अभियंता रिनाज पठाण, विकास परवानगी व नियोजन विभागाचे संचालक सुनिल मरळे यांच्यासह इतर प्रशासकीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
मुंबई, १ जुलै २०२५ : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कृषी क्षेत्रातील भक्कम कार्य करणारे नेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवन परिसरात त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी, मंगळवार दिनांक १ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता हा अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, विधान परिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री आशिष शेलार यांच्यासह विधानसभेतील आणि विधान परिषदेतील अनेक आमदारांनी उपस्थित राहून वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.स्व. वसंतराव नाईक यांच्या कार्याचा आदरपूर्वक स्मरण करत सर्व मान्यवरांनी त्यांच्या विचारांचा व कार्याचा आदर्श आजच्या राजकारणातही प्रेरणादायी असल्याचे नमूद केले.कार्यक्रमादरम्यान परिसरात अनुशासनबद्ध वातावरण असून, राज्याच्या या थोर नेत्यास कृतज्ञतेने अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन विधिमंडळ सचिवालय व राजेश राठोड यांनी केले होते.
मावळ तालुक्याचे माजी आमदार, ‘शिक्षणमहर्षी’ म्हणून ओळखले जाणारे थोर समाजसेवक आणि लोकनेते मा. कृष्णराव भेगडे यांच्या निधनानंतर राज्यभरातून शोकसंदेश व्यक्त केले जात आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. भेगडे सर हे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील एक दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व होते, असे डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या शोकसंदेशात नमूद केले आहे. “त्यांचे योगदान केवळ राजकारणापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि समाजकारणाच्या क्षेत्रात भरीव कार्य केले. मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात शिक्षणाची दारे खुली करत त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले,” असेही त्या म्हणाल्या.डॉ. गोऱ्हे यांनी भेगडे सरांच्या कार्याची आठवण काढताना सांगितले की, “राजकीय मतभेद असले तरीही समाजविकासासाठी समन्वयाने काम करण्याची त्यांची वृत्ती विशेष होती. पुणे जिल्ह्यातील राजकारणात सामंजस्य आणि सुसंवादाचे वातावरण राखण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.” भेगडे सरांची राजकीय कारकीर्द जनसंघापासून सुरू होऊन दोन वेळा आमदार आणि एकदा विधान परिषदेचे सदस्य म्हणून उल्लेखनीय ठरली.भेगडे सर यांचे निधन म्हणजे एक अनुभवी, कर्तृत्ववान, आणि दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाचे दुःखद नुकसान आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल,” असे गौरवोद्गार काढत डॉ. गोऱ्हे यांनी त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थना केली.
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने गेली ११ वर्षे आपत्कालीन वैद्यकीय सेवा अर्थात १०८ रुग्णवाहिका सेवा राज्यातील नागरिकांना पुरवण्यात येत आहे. या सेवेचा राज्यातील १ कोटी पेक्षा अधिक नागरिकांनी लाभ घेतला आहे. दिनांक १ जुलै रोजी निवडक रुग्णवाहिका चालक व डॉक्टरांनी अचानक संप पुकारला आहे. परंतू या संपाचा आपत्कालीन वैद्यकीय सेवेवर कोणताच परिणाम झाला नाही.
महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या राज्यात ९३७ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. यात ७०४ रुग्णवाहिका या बेसिक लाईफ सपोर्ट (ALS) या प्रकारतल्या आहेत. त्याचबरोबर ९३७ रुग्णवाहिका या बेसिक लाईफ सपोर्ट (BLS )या प्रकारातल्या आहेत. या रुग्णवाहिकांद्वारे हृद्यविकाराच्या घटंना, गंभीर जखमी झालेले अपघातग्रस्त व प्रसुती या सारख्या अनेक आपत्कालीन सेवा यशस्वीपणे हाताळल्या जात आहेत.
दिनांक १ जुलै रोजीचा आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा अहवाल खालिल प्रमाणे,
महाराष्ट्र आपत्कालीन रुग्णसेवेचाअहवाल खाली दिल्याप्रमाणे १ जुलै २०२५–
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू होऊन आठ वर्षे पूर्ण होत असून ही एक ऐतिहासिक आर्थिक सुधारणा म्हणून नावारूपास आली आहे, असें पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. जीएसटीने भारताच्या आर्थिक परिदृश्याला नवा आकार दिला आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
पंतप्रधानांनी एक्स या सामाजिक माध्यमावरच्या एका संदेशात म्हटले आहे की,
जीएसटी लागू होऊन आठ वर्षे झाली आहेत. ही एक ऐतिहासिक सुधारणा ठरली असून तिने भारताच्या आर्थिक परिदृश्याला नवा आकार दिला आहे, अनुपालन भार कमी करून विशेषतः लघु व मध्यम उद्योगांसाठी जीएसटीने व्यवसाय सुलभतेत लक्षणीय सुधारणा केली आहे. भारताच्या बाजारपेठेला एकात्मिक करण्याच्या या प्रवासात राज्यांना समान भागीदार बनवून खऱ्या सहकारी संघवादाला चालना देत जीएसटीने आर्थिक विकासासाठी एक शक्तिशाली इंजिन म्हणून देखील काम केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रोजगार निर्मितीला पाठिंबा देण्यासाठी, रोजगारक्षमता वाढविण्यासाठी तसेच सर्व क्षेत्रांमध्ये सामाजिक सुरक्षा वाढविण्यासाठी, विशेषतः उत्पादन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यासाठी रोजगाराशी संबंधित प्रोत्साहनपर (ईएलआय) योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत, पहिल्यांदाच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे वेतन (15,000/- रुपयांपर्यंत) मिळेल, तर नियोक्त्यांना अतिरिक्त रोजगार निर्मितीसाठी दोन वर्षांपर्यंत प्रोत्साहन दिले जाईल, तसेच उत्पादन क्षेत्रासाठी आणखी दोन वर्षांसाठी वाढीव लाभ दिले जातील. 4.1 कोटी तरुणांना रोजगार, कौशल्य आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधानांच्या पाच योजनांच्या पॅकेजचा भाग म्हणून 2024-25 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात इएलआय योजना जाहीर करण्यात आली होती, जिचा एकूण अर्थसंकल्पीय खर्च 2 लाख कोटी रुपये आहे. 99,446 कोटी रुपये खर्चाच्या इएलआय योजनेचे उद्दिष्ट 2 वर्षांच्या कालावधीत देशात 3.5 कोटींहून अधिक नोकऱ्या निर्माण करण्यास प्रोत्साहन देणे असे आहे. यापैकी 1.92 कोटी लाभार्थी पहिल्यांदाच कामगार क्षेत्रात प्रवेश करतील. या योजनेचे फायदे 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 दरम्यान निर्माण झालेल्या नोकऱ्यांना लागू होतील.
या योजनेचे दोन भाग आहेत. भाग अ पहिल्यांदाच काम करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करतो तर भाग ब नियोक्त्यांवर लक्ष केंद्रित करतो:
भाग अ: पहिल्यांदाच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर वेतन:
ईपीएफओमध्ये नोंदणी असलेल्या पहिल्यांदाच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दखल घेत , या भागात 15,000 रुपयांपर्यंतचे एक महिन्याचे ईपीएफ वेतन दोन हप्त्यांमध्ये दिले जाईल. 1 लाख रुपयांपर्यंत पगार असलेले कर्मचारी यासाठी पात्र असतील.
पहिला हप्ता 6 महिन्यांच्या सेवेनंतर तर दुसरा हप्ता 12 महिन्यांच्या सेवेनंतर आणि कर्मचाऱ्याने आर्थिक साक्षरता कार्यक्रम पूर्ण केल्यानंतरच देय असेल. बचतीची सवय लावण्यासाठी प्रोत्साहनपर वेतनाचा एक भाग एका निश्चित कालावधीसाठी ठेव खात्याच्या बचत साधनात ठेवला जाईल आणि नंतरच्या तारखेला कर्मचारी ही रक्कम काढू शकेल.
भाग अ चा फायदा पहिल्यांदाच काम करणाऱ्या सुमारे 1.92 कोटी कर्मचाऱ्यांना होईल.
भाग ब: नियोक्त्यांना पाठिंबा:
या भागात उत्पादन क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करून सर्व क्षेत्रांमध्ये अतिरिक्त रोजगार निर्मितीचा समावेश असेल. 1 लाख रुपयांपर्यंत पगार असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी नियोक्त्यांना प्रोत्साहन रक्कम मिळेल. किमान सहा महिने सलग नोकरी करणाऱ्या प्रत्येक अतिरिक्त कर्मचाऱ्यापोटी सरकार नियोक्त्यांना दोन वर्षांसाठी दरमहा 3000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन रक्कम देईल. उत्पादन क्षेत्रासाठी, प्रोत्साहनपर रक्कम तिसऱ्या आणि चौथ्या वर्षासाठी देखील विस्तारित केली जाईल.
ईपीएफओकडे नोंदणीकृत असलेल्या आस्थापनांना किमान दोन अतिरिक्त कर्मचारी (50 पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या नियोक्त्यांसाठी) किंवा पाच अतिरिक्त कर्मचारी (50 किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या नियोक्त्यांसाठी) किमान सहा महिन्यांसाठी सलगपणे नियुक्त करावे लागतील.
प्रोत्साहन रचना खालीलप्रमाणे असेल:
EPF Wage Slabs of Additional Employee (in
Benefit to the Employer (per additional employment per month)
Up to Rs 10,000*
Upto Rs 1,000
More than Rs 10,000 and up to Rs 20,000
Rs 2,000
More than Rs 20,000 (upto salary of Rs 1 Lakh/month)
Rs 3,000
*10,000 रुपयांपर्यंत ईपीएफ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रमाणानुसार प्रोत्साहनपर वेतन मिळेल.
या भागामुळे सुमारे 2.60 कोटी व्यक्तींसाठी अतिरिक्त रोजगार निर्मिती केल्याबद्दल नियोक्त्यांना प्रोत्साहनपर रक्कम मिळण्याची अपेक्षा आहे.
प्रोत्साहनात्मक पेमेंट यंत्रणा:
योजनेच्या भाग अ अंतर्गत पहिल्यांदाच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्व पेमेंट आधार ब्रिज पेमेंट सिस्टम (एबीपीएस) वापरून डीबीटी( थेट लाभ हस्तांतरण) मोडद्वारे केले जातील. भाग ब अंतर्गत नियोक्त्यांचे पेमेंट थेट त्यांच्या पॅन-संलग्न खात्यांमध्ये केले जाईल.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राजा दिनकर केळकर संग्रहालय विस्तारावर उच्चस्तरीय बैठक
मुंबई/पुणे (दि १ जुलै): राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या विस्तारित कामाला गती देण्यासाठी आज उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. बावधन बुद्रुक येथील ६ एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य संग्रहालय उभारण्यासाठी नामांकित आर्किटेक्चर नेमणुकीसाठी प्रशासकीय समितीची स्थापना, सविस्तर आराखड्यानंतर निधीची तरतूद करणे, तसेच नव्याने उभारल्या जाणाऱ्या ‘म्युझियम सिटी’ला राजा दिनकर केळकर यांचेच नाव कायम ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी दिली आहे.
वैभवशाली इतिहासाचे जतन आणि संवर्धन करणाऱ्या केळकर संग्रहालयात ९ व्या शतकापासूनच्या २५,००० हून अधिक वस्तूंचा संग्रहीत ठेवा आहे. सध्या जागेअभावी केवळ १०% वस्तू सध्या जनतेसाठी खुल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संग्रहालयाच्या विस्तारासाठी राज्य सरकारकडून यापूर्वीच बावधन बुद्रूक येथे ६ एकर जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हेमंत रासने, सांस्कृतिक कार्य अपर मुख्य सचिव विकास खरगे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्तीय सुधारणा सचिव श्रीमती शैला ए, वित्त व नियोजन सचिव श्री. राजेश देशमुख, संग्रहालयाचे संचालक सुधन्वा रानडे, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य सुरेंद्र रानडे, वास्तुरचनाकार राजेंद्र रानडे, प्रशासकीय अधिकारी भारती न्याती तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी आदी उपस्थित होते.
“नवीन संग्रहालयाचे बांधकाम दर्जेदार, आकर्षक आणि शाश्वत पद्धतीने व्हावे, अशी स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे. कसबा मतदारसंघाचा आमदार म्हणून शिवकालीन, पेशवेकालीन आणि पुण्याच्या वैभवशाली वारशाच्या जतनासाठी माझा सतत प्रयत्न आहे. शनिवारवाड्यासह अनेक ऐतिहासिक वास्तूंना पुनरुज्जीवित करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. भविष्यात या ‘म्युझियम सिटी’ची ओळख जागतिक पातळीवर पोहोचेल, असा विश्वास आहे”.
संग्रहालयाचे संचालक श्री. रानडे यांनी संग्रहालय निर्मितीची पार्श्वभूमी आणि त्याची वैशिष्ट्ये याबाबत सविस्तर सादरीकरण केले. यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, बावधन येथे प्रस्तावित असलेला ‘म्युझियम सिटी’ प्रकल्प हा केवळ एक संग्रहालय न राहता, आंतरराष्ट्रीय दर्जाचा आणि पुणे शहराचा लौकिक जागतिक पातळीवर वाढवणारा एक पथदर्शी उपक्रम ठरेल.
पुणे, दि. १ जुलै, २०२५- रास्तापेठ येथील महावितरणच्या परिमंडल कार्यालयात स्तनता माता महिला कर्मचाऱ्यांसाठी तसेच अभ्यागत महिला मातांसाठी ‘हिरकणी कक्ष’ सुरु करण्यात आला आहे. महावितरणचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांच्याहस्ते सोमवारी (३० जून) दुपारी या हिरकणी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. रास्तापेठ येथे महावितरणचे परिमंडल कार्यालय तसेच त्यांतर्गत येणारी इतरही अनेक कार्यालये आहेत. त्यामुळे येथे महिला कर्मचाऱ्यांची व विविध कामानिमित्त येणाऱ्या अभ्यागत महिलांची संख्याही मोठी आहे. महिलांची गरज व अडचण लक्षात घेऊन महावितरणने हिरकणी कक्षाची सुरुवात केली आहे. या कक्षात आवश्यक सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. उद्घाटन प्रसंगी मुख्य अभियंता सुनील काकडे यांचेसह रास्तापेठचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, संजीव नेहते (स्थापत्य), कार्यकारी अभियंते नितिन थिटे, प्रवीण पंचमुख (स्था.), अति. कार्यकारी अभियंता अजय सूळ यांचेसह महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पहिल्या छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन
पुणे, ता. १: “महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात भर घालण्याचे काम दिवाळी अंकांनी केले आहे. मन आणि मेंदूला बौद्धिक फराळ देऊन मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी दिवाळी अंक उपयुक्त ठरतात. खऱ्या अर्थाने दिवाळी अंक म्हणजे मराठी संस्कृतीचा अविभाग्य घटक आहे,” असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी केले.
दिनमार्क पब्लिकेशनच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात आयोजित स्वर्गवासी कमलाबाई रसिकलाल धारिवाल पुरस्कृत छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले. प्रसंगी माजी संमेलनाध्यक्ष डॉ. भारत सासणे, साहित्यिक व परीक्षक माधव राजगुरू, संयोजक दिनकर शिलेदार आदी उपस्थित होते. हे प्रदर्शन येत्या शुक्रवारपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, “संत ज्ञानेश्वर महाराजांनीही दिवाळीतील अक्षर फराळाचा उल्लेख करताना ज्ञानाची दिवाळी, असे म्हटले आहे. महाराष्ट्रातील दिवाळी अंकांना शंभरहून अधिक वर्षांची परंपरा आहे. मध्यमवर्गीय माणसाने दिवाळी अंकांना जीवित ठेवण्याचे काम केले. स्पर्धेच्या काळात काही अंक अल्पायुषी ठरले, तर काहींनी तग धरून हा वारसा जपला. दिवाळी अंकांचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत गेले. आजघडीला चारशेहून अधिक अंक प्रकाशित होतात. ज्ञान आणि मनोरंजनाचे ध्येय गाठताना अप्रतिम मुखपृष्ठ, चित्रे, आशय संपन्नता, विषयांतील वैविध्यता मराठी वाचकांना समृद्ध करणारी आहे. एवढेच नाही, तर दिवाळी अंकांनी अनेक लेखक, साहित्यिक घडवले आहेत.”
भारत सासणे म्हणाले, “दिवाळी अंकांची ही परंपरा आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली असून, मराठी व बंगाली भाषेत विशेष अंक निघतात. अनेक आव्हानावर मात करून ही परंपरा जाणार्या संपादकांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम आहे. अंकांची संख्या वाढतेय, याचा आनंद आहे.”
माधव राजगुरू म्हणाले की, अडीचशे तीनशे अंक वाचून समृद्ध झालो. वैविध्यपूर्ण आशय, मांडणी, संकल्पना अशा विविधतेने नटलेले हे अंक आहेत. ही स्पर्धा लेखकांना घडविणारी आहे. विविध प्रांतातील, भाषेतील, समाजातील हे अंक भारावून टाकणारे आहेत.”
प्रास्ताविकात दिनकर शिलेदार म्हणाले, “या प्रदर्शनात २३५ दिवाळी अंक आहेत. वैविध्यपूर्ण दिवाळी अंकांचे सादरीकरण एकाच छताखाली व्हावे, या उद्देशाने हे प्रदर्शन महत्त्वपूर्ण आहे. दिवाळी अंकांची यशस्वी परंपरा जपण्यासह त्यांना प्रोत्साहन देणारे हे प्रदर्शन आहे.” अन्वय बेंद्रे यांनी सूत्रसंचालन केले.
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे भव्य अश्वारूढ पुतळ्याची उभारणी
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करणारे अजेय योद्धा थोरले बाजीराव पेशवे यांचा खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचा अनावरण समारंभ शुक्रवार, दि. 4 जुलै रोजी आयोजित करण्यात आला असून अनावरण केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. अजेय योद्धा थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचा अनावरण सभारंभ सकाळी 10:45 वाजता राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सिटी ग्रुपचे संचालक अनिरुद्ध देशपांडे, थोरले बाजीराव पेशवे यांचे वंशज पुष्करसिंह पेशवा, एनडीएचे कमांडंट ॲडमिरल गुरचरण सिंह यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
अजेय योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या स्मृती कायम स्मरणात रहाव्यात या भावनेने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले असून कुंदनकुमार साठे सचिव आहेत. थोरले बाजीराव पेशवे यांचा भव्य अश्वारूढ पुतळा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी येथे उभारण्यासाठी माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या मदतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सहकार्य केल्याने पुतळा उभा करण्याची परवानगी मिळाली. सिटी ग्रुपचे संचालक अनिरुद्ध देशपांडे यांचेही पुतळा उभारण्यात सहकार्य लाभले आहे. थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्यावतीने साडेतेरा फुट उंचीचा भव्य असा पुतळा उभारण्यात आला आहे. चार हजार किलो ब्राँझचा वापर करून विपुल खटावकर यांनी या पुतळ्याची निर्मिती केली आहे. श्रीमंत बाजीराव पेशवे यांना दीर्घ आयुष्य लाभले नाही. 40 वर्षांच्या आयुष्यात श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी लढलेल्या प्रत्येक युद्धात विजय मिळविला होता. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी येथे उभारण्यात आलेल्या थोरले बाजीराव पेशवे यांच्या भव्य पुतळ्यामुळे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील प्रशिक्षणार्थींना अजेय योद्धा पेशवे यांचा भव्य पुतळा कायम प्रेरणादायी ठरेल, अशी भावना थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, सचिव कुंदनकुमार साठे यांनी व्यक्त केली.