Home Blog Page 477

धर्माला द्वेषाचा पाया नसावा

बाबा भारती यांचे विचार मौलिक : डॉ. श्रीपाल सबनीस
लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानतर्फे ‌‘समग्र बाबा भारती‌’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मनिरपेक्ष परंपरा जोपासण्याचे कार्य बाबा भारती यांनी पुढे नेले आहे. धर्माला द्वेषाचा पाया नसावा हा महान विचार बाबा भारती यांनी मांडला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. धर्मनिरपेक्ष विद्वानाच्या भूमिकेतून कर्मठवाद टिकत नाही तर लोककल्याणाचा धर्म टिकतो ही भूमिका बाबा भारती यांनी मांडल्याचे गौरवपूर्ण विचार त्यांनी व्यक्त केले.

पालि-मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार बाबा भारती यांच्या जन्मशताब्दीनिमित्त लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानतर्फे ‌‘समग्र बाबा भारती‌’ या पुस्तकाचे प्रकाशन आज (दि. 2) झाले. पुस्तकाचे प्रकाशन डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिदषेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रम झाला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती, ज्येष्ठ बौद्ध विचारवंत दि. वा. बागुल, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक पगारिया, अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. भीमराव गायकवाड, अनिल सोनवणे, डॉ. संभाजी मलघे, रजनी उद्धव कानडे मंचावर होते. प्रास्ताविकात महेंद्र भारती यांनी पुस्तक निर्मितीविषयी माहिती सांगितली. महेंद्र भारती, उद्धव कानडे, डॉ. संभाजी मलघे यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे.
बौद्ध धर्माची मांडणी भारती यांनी सोप्या सुलभ मराठी भाषेत जनसामन्यांपर्यंत पोहोचविली आहे, असे सांगून डॉ. सबनीस पुढे म्हणाले, बाबा भारती यांचे राष्ट्रभान व धर्मभान पक्के होते त्यातून त्यांनी अनेक धर्मांची तुलना केली. विविध धर्मातील दोष मांडले. गांधी-आंबेडकर वादही मांडला. परंतु भारती यांना विश्वभान महत्त्वाचे वाटल्याने धार्मिक अतिरेक विश्वाच्या एकात्मतेला मारक असल्याचा विचारही त्यांनी मांडला आहे. धर्माची दारे खुली करून भारती यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. वडिलांची वैचारिक पुण्याई पुढील पिढीपर्यंत पोहोचवत असल्याबद्दल सबनीस यांनी महेंद्र भारती यांचे अभिनंद केले.

दि. वा. बागुल म्हणाले, बाबा भारती यांचे साहित्य मोलाचे असून बुद्धांच्या वंदना मराठी भाषेत आणण्याचे महान कार्य त्यांनी केले आहे. धम्म सुरस आणि सोप्या मराठीत आणण्यात बाबा भारती यांचा मोलाचा वाटा आहे.

अशोक पगारिया म्हणाले, बाबा भारती यांचे साहित्य, मौलिक विचार समाजासमोर आणण्याचे कार्य या पुस्तकाच्या माध्यमातून झाले आहे.

लोकशिक्षक बाबा भारती यांच्या नावे समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल डॉ. भीमराव गायकवाड, बाबा कांबळे, आनंदा कांबळे, सूर्यकांत तिवडे, राजकुमार कांबळे, शंकर कांबळे, विक्रांत कांबळे, प्रकाश परांजपे, भाऊसाहेब कांबळे, सचिन कांबळे, विजय कांबळे, सुरेश देशमुख, प्रकाश कांबळे, सतिश केकनीस यांचा गौरव करण्यात आला. पुरस्कारप्राप्त व्यक्तींपैकी सूर्यकांत तिवडे, शंकर कांबळे, आनंदा कांबळे, सतिश केकनीस यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांच्याशी पुरुषोत्तम सदाफुले यांनी संवाद साधला.
मान्यवरांचे स्वागत निमिष भारती यांनी केले. सूत्रसंचालन सीमा गांधी यांनी तर आभार डॉ. संभाजी मलघे यांनी मानले.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात श्री गणेश जन्मसोहळा उत्साहात साजरा

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

पुणे-
हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती अशी ओळख असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ येथे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही माघ शुध्द चतुर्थीला गणेश जन्म सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने गणेशयाग, अथर्वशीर्ष पठण, भजन सेवा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
गणेश चतुर्थीनिमित्त मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सकाळी सात वाजता याग करण्यात आला. यावेळी सरस्वती भजनी मंडळांने सादर केलेल्या भजनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. दुपारी बारा ते एक या दरम्यान अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करण्यात आले होते. तर सायंकाळी आकर्षक सजावटीसह गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोश करत आणि फुलांची उधळण करीत गणपती पालखी (नगर प्रदक्षिणा) सोहळा संपन्न झाला. सायंकाळी पुणे महानगर संघचालक मा. रविंद्र वंजारवाडकर यांच्या हस्ते श्रींची महाआरती करण्यात आली, याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे यांच्यासह विश्वस्त, कार्यकर्ते व गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मूषकाची फुलांनी आकर्षक सजावट
‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरा’त श्री गणेशाचे वाहन असणाऱ्या मूषकाची फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. बाप्पाच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूनी जास्वंदीच्या पांढऱ्या फुलांनी आणि गुलाब पाकळ्यांनी साकारलेले मूषक भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. त्यापुढे सूर्यफुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

जनतेची दिशाभूल करणारा, पोकळ घोषणांचा अर्थसंकल्प

केंद्रीय अर्थसंकल्पावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया 

आपल्या देशाचा कृषी विभाग अत्यंत महत्वाचा घटक आहे. अर्थमंत्र्यानी कृषी विभागाचं कौतुक केलं परंतु शेतकऱ्यांची प्रमुख मागणी असलेल्या हमी भाव मिळण्याचा कायदा याबाबत काहीच घोषणा केली नाही. आजही राज्यात दररोज शेतकरी आत्महत्या होत आहेत. जर खर्चापेक्षा कमी उत्पन मिळालं तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणार कसे ? याबाबत सरकारने ठोस घोषणा करणे अपेक्षित होते. 
 टॅक्स बाबत केंद्र सरकारने आत्ताच्या बजेटमध्ये ज्या घोषणा केलेल्या आहेत त्याबाबत देशातील जनतेला नक्कीच कुतहल वाढलेले आहे. याआधी कमीत कमी सात लाखापर्यंत कर द्यावा लागत नव्हता ती लिमिट वाढवून आता बारा लाख रुपये पर्यंत केली आहे. केंद्र सरकारने जी टॅक्समध्ये सूट दिलेली आहे  यामुळे महागाईने जे मध्यमवर्गीयांचे कंबरडे मोडले आहे त्याची भरपाई होईल असे काही वाटत नाही. लॉन्ग टर्म कॅपिटल कॅपिटल गेन्सवर सूट मिळायला हवी होती ती काही मिळालेली नाही. 
आपल्या देशावर बेरोजगारीच वाढतं संकट यावर केंद्र सरकारकडून काही ठोस पर्याय व योजना आखल्या जातील अशी अपेक्षा होती परंतु असे कोणतेही चित्र होताना दिसले नाही. मनरेगा सारखी जी योजना आहे जी ग्रामीण भागात उपयोगी पडते ती योजना शहरी भागामध्ये लागू होण्यासाठीची मागणी असताना त्याबाबत काहीही निर्णय घेतलेला दिसत नाही. 
शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठी गुंतवणूक होईल किंवा मोठे अमलाग्र बदल होतील अशा कोणत्याही प्रकारच्या घोषणा झालेल्या नाहीत. एका बाजूला बेरोजगारीचे संकट आहे, 40% पेक्षा जास्त बेरोजगारीचा दर आहे तर दुसऱ्या बाजूला कृत्रिम बुद्धिमत्ता सारखे एक आव्हान आपल्यासमोर आहे त्यामधून रोजगार जाण्याची जी भीती आहे त्यावर सरकारने ठोस पावले उचलणे गरजेचे होते. सरकारने आयआयटीच्या संख्या वाढवलेल्या आहेत आता देशात 23 आयआयटी संस्था झालेल्या आहेत विद्यार्थी संख्या मर्यादा 65000 वरून 1 लाख 35 हजार पर्यंत वाढवली गेली आहे. सद्या आयआयटी सारखी नामांकित संस्था इतकी निष्प्रभ होत आहे की इतक्या महत्त्वाच्या संस्थेमध्ये एक लाख 35 हजार जागा असून सुद्धा त्या ऍडमिशन पूर्ण होत नाहीत. कारण आयआयटीमध्ये 41% प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत त्यामुळे आयआयटीचा दर्जा इतका खालावला गेला आहे की  आयआयटी मधील सर्वच्या सर्व जागा भरल्या जात नाहीत व आयआयटी मधून पास झालेल्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या देखील मिळत नाहीत अशी परिस्थिती सध्याची आहे, असे आधी कधीही आयआयटी बाबत होत नव्हते. आयटी मधून पास आऊट झालेल्या विद्यार्थ्यांना देशातच नव्हे तर जगात मागणी होत होती. मोदी सरकारच्या काळात आयआयटी चा ब्रँड हा निष्प्रभ झालेला आहे. 
आजच्या बजेटमध्ये असे दिसले की विमा क्षेत्रामध्ये 74% परकीय गुंतवणुकीची मर्यादा होती ती वाढवून आता शंभर टक्के केलेली आहे. त्यामुळे शंभर टक्के विदेशी कंपन्या आपल्या भारतातील विमा क्षेत्रात प्रवेश करतील. खाजगी विमा कंपन्यांचा इतिहास अमेरिकेसारख्या देशांमध्ये फार काही चांगला नाही. लोकांनी विमा कंपन्यांमध्ये गुंतवलेले पैसे खाजगी कंपन्या जर फेल झाल्या किंवा त्या जर कोलमडल्या तर लोकांचे गुंतवलेले पैसे कोण परत देणार हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे त्यामुळे आमची मागणी आहे की विमा क्षेत्राचा खाजगीकरण करताना परदेशातील कंपन्यांना भारतीय विमा क्षेत्रात प्रवेश करण्याआधी भारतीय विमा कंपन्यांना अधिक मजबूत केले पाहिजे ते या धोरणामध्ये काही दिसत नाही. 
विद्युत निर्मिती क्षेत्रात केंद्र सरकारने सध्याच्या बजेटमध्ये एक मोठी घोषणा केलेली आहे की, अणुऊर्जा क्षेत्रामध्ये एक अमुलाग्र बदल करण्याचे धोरण आखलेले दिसत आहे. सध्या भारतामध्ये अणु क्षेत्रातून आठ हजार मेगावॅट वीज निर्मिती होते. आठ जिगावॅट वरून 100 जिगावॅट असे जवळपास 12 पट  2047 पर्यंत भारत सरकारने वाढ करण्याचे ठरवलेले आहे. इतक्या वेगाने वाढ खाजगी क्षेत्राला अमेरिकन कंपन्यांना मुक्त प्रवेश दिल्याशिवाय होणार नाही आणि त्याकरिता भारत सरकारने अणुऊर्जा कायदा आणि सिविल न्यूक्लिअर लायबिलिटी कायदा जो मी पंतप्रधान कार्यालयाचा मंत्री असताना केला गेला होता तो कायदा बदलणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी भाषणात सांगितले. अणुऊर्जा हे फक्त ऊर्जा निर्मितीचे क्षेत्र नसून त्याला सामरीक महत्त्व आहे. त्यामुळे अणुऊर्जा क्षेत्र हे इतर क्षेत्रांसारखे असा इतका सोपा विषय नाही त्यामुळे अणुऊर्जा विभागात मोठ्या प्रमाणात परदेशी खाजगी कंपन्यांना प्रवेश देताना अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे आमचा त्याला विरोधच असेल हे क्षेत्र सार्वजनिक क्षेत्र असले पाहिजे कारण याला सामरिक महत्त्व आहे.

पुस्तक हातात आल्यावरच चिंतनाची प्रक्रिया सुरू होते-बालसाहित्यिका स्वाती राजे

अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि श्री शिवाजी मराठा सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५ व्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचा समारोप
पुणे : मराठी भाषा येत नाही मराठी भाषा संपत आहे असे म्हणतात, परंतु दोन दिवसात मोठ्या संख्येने मुले साहित्य संमेलनात आली ते पाहून विश्वास वाटतोय की मराठी भाषा अजूनही संपलेली नाही.  फक्त आपल्या हृदयात डोकावून त्याचे मेंदूशी नाते जोडायला पाहिजे. पुस्तक हातात येते तेव्हा आपण अंतर्मुख होतो आणि माहिती मिळून चिंतनाची प्रक्रिया होते. वाचन, मनन, चिंतन या ज्ञान मिळवण्याच्या ३ पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढल्यानंतरच माणूस शहाणा होतो, असे मत बालसाहित्यकार स्वाती राजे यांनी व्यक्त केले.

अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि श्री शिवाजी मराठा सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ५ वे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन शुक्रवार पेठेतील श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या प्रांगणात करण्यात आले होते. साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रसेवा दलाचे सचिव शिवाजी खांडेकर, शिवाजी मराठा सोसायटीचे मानद सचिव अण्णा थोरात, अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राजन लाखे, बाल अभिनेता शर्व गाडगीळ, संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र जगताप, सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे, नियामक मंडळ अध्यक्ष सत्येंद्र कांचन, कारभारी मंडळ अध्यक्ष सुरेश देसाई यावेळी उपस्थित होते. यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

अण्णा थोरात म्हणाले, मुलांमध्ये साहित्याची गोडी निर्माण व्हावी, यासाठी साहित्य संमेलना सारखे कार्यक्रम व्हायला हवेत. यानिमित्ताने शालेय विद्यार्थी भाषेच्या आणखी जवळ आले आणि साहित्यातले विविध पैलू त्यांना जवळून अनुभवता आले. मराठी साहित्य जगण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.

राजन लाखे म्हणाले, पालकांनी विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल देण्यापेक्षा आधी पुस्तके द्यावीत. विद्यार्थ्यांनी देखील मोबाईल वापरताना किती वापरायचा याची मर्यादा ठेवावी, असेही त्यांनी सांगितले. शर्व गाडगीळ आणि शिवाजी खांडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. अमित गोगावले यांनी सूत्रसंचालन केले. विनोद वाघ यांनी आभार मानले.

राष्ट्रवादीचे पुणे आणि पिंपरी चिंचवड निरीक्षक सुरेश पालवे पाटील यांचा सत्कार

पुणे-“राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे व पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा निरीक्षक पदी सुरेश पालवे पाटील निवड झाल्याबद्दल पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सत्कार करण्यात आला”
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड निरीक्षकपदी नुकतीच सुरेश पालवे पाटील यांची नियुक्ती झाली आहे. आज त्यांनी गुप्ते मंगल कार्यालय येथील शहर कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी त्यांचे स्वागत आणि सत्कार केला. शहराध्यक्ष म्हणून दीपक मानकर यांनी पदभार स्विकारल्यानंतर पक्षवाढीसाठी महत्वाचे कार्यक्रम केले त्या सर्व बाबींचा समावेश असलेला कार्य अहवाल देखील त्यांना यावेळी देण्यात आला.

निरीक्षक सुरेश पालवे पाटील यांनी पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधताना म्हणाले, राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री,पालकमंत्री मा.ना.श्री.अजित दादा पवार यांच्या पाठीशी आपण भक्कम उभे राहले पाहिजे. पुणे शहराचे शहराध्यक्ष दीपक मानकर आणि माझा गेली २० ते ३० वर्षापासूनचा संपर्क आहे. विधान परिषद पदवीधर निवडणुकीत दीपक मानकर यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. गेली दोन वर्षांपासून शहराध्यक्ष दीपक मानकर आणि त्यांची पक्ष संघटनेतील पदाधिकारी हे पुणे शहरात खूप चांगल्याप्रकारे काम करीत असून राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री,पालकमंत्री मा.ना. श्री.अजित दादा पवार यांचे हात अजून बळकट करीत आहात. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची पूर्वतयारी करावी, सदस्य नोंदणी, मतदार नोंदणी, नव्याने करावयाची पदनियुक्ती करणे त्याचबरोबर कार्यकर्त्याला शासनाच्या विविध कमिटीवर काम करण्याची संधी दिली जाईल.
शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी सांगितले की, राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री,पालकमंत्री अजित दादा पवार यांनी निरीक्षक सुरेश पालवे पाटील या अतिशय योग्य व्यक्तीची निवड केलेली. आहे. निरीक्षक सुरेश पालवे यांचे पुणे शहराशी जवळचे नाते असून तळागाळापर्यंत ते काम करतात. आदरणीय दादांची महाराष्ट्रासह पुण्यातील ताकद अजून वाढली पाहिजे. पुणे शहरातील कार्यकर्ते तळमळीने पक्षाचे काम करतात. त्यांना वेगवेगळ्या पदांची संधी मिळायला पाहिजे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरु असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही पुणे शहरात एक नंबर असेल.
सदर प्रसंगी शहराध्यक्ष दीपक मानकर, उपाध्यक्ष दत्ता सागरे, पुणे शहर निरीक्षक रुहीसबा सय्यद, सरचिटणीस अर्चना चंदनशिवे,विद्यार्थी अध्यक्ष शुभम माताळे, सामाजिक न्याय सेल अध्यक्ष जयदेव इसवे, सोशल मिडिया सेल अध्यक्ष शीतल मेदने, तृतीयपंथी सेल अध्यक्ष निर्जला गायकवाड, बँक कर्मचारी अध्यक्ष गिरीश मेंगे,महिला कोथरूड अध्यक्ष तेजल दुधाणे, कसबा अध्यक्ष सुप्रिया कांबळे, पुणे कँन्टोमेंट अध्यक्ष नीता गायकवाड, विधानसभा पर्वती कार्याध्यक्ष रामदास गाडे, पुणे कँन्टोमेंट कार्याध्यक्ष राहुल तांबे, शिवाजीनगर कार्याध्यक्ष बाळासाहेब आहेर, युवती कार्याध्यक्ष लावण्या शिंदे, विद्यार्थी कार्याध्यक्ष सत्यम पासलकर,शाम शेळके आदी पदाधिकारी उपस्थित होते.

समाजाच्या दोष देण्यामुळे ९२ टक्के महिला सायबर अत्याचाराबद्दल बोलत नाहीत-अॅड. वैशाली भागवत

श्री देवदेवेश्वर संस्थान अंतर्गत सारसबाग मंदिराच्या सिद्धिविनायक देवतेच्या वार्षिक महोत्सवात डिजिटल व सायबर क्राईम ‘या विषयावर व्याख्यान

पुणे : मुलांच्या लैंगिक अत्याचाराचे आणि महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. समाज माध्यमातून होणारे चॅट, गेमिंग साईटस मुळे असे गुन्हे घडताना दिसतात. या गुन्ह्यांची नोंद खूप कमी प्रमाणात होते. ज्येष्ठ नागरीक देखील याला बळी पडताना दिसून येतात. समाजाने पीडिताला दोष देणे यामुळे ९२ टक्के महिला याबद्दल बोलत नाहीत. याबद्दल आपण विचार करण्याची गरज आहे. असे मत अॅड. वैशाली भागवत यांनी व्यक्त केले. 
श्री देवदेवेश्वर संस्थान अंतर्गत सारसबाग मंदिरातील श्री सिद्धिविनायक देवतेच्या वार्षिक महोत्सवात आयोजित  ‘ डिजिटल व सायबर क्राईम ‘या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. यावेळी श्री देवदेवेश्वर संस्थानचे प्रमुख विश्वस्त रमेश भागवत, संस्थानचे विश्वस्त सुधीर पंडित, पुष्कर पेशवा, जगन्नाथ लडकत, आशिष कुलकर्णी उपस्थित होते. 
अॅड. वैशाली भागवत म्हणाल्या, बाहेरच्या देशातील लोकांना समाजमाध्यमाच्या माध्यमातून आपल्या मुलांपर्यंत पोहोचणे सोपे आहे. भारतासारख्या देशात सेक्शुअल टुरीझम होते. बाहेरच्या देशातील लोकांना समाजमाध्यमाच्या माध्यमातून आपल्या मुलांपर्यंत पोहोचणे सोपे आहे. पालकांनी मुलांच्या बाबत सजग असणे गरजेचे आहे. 
त्या पुढे म्हणाल्या, आधार कार्डवर अतिशय संवेदनशील माहिती असते. त्यामुळे सहजरित्या आपले आधार कार्ड कोणालाही देऊ नका. आधारवरील माहिती चुकीच्या हातात पडली तर आपणच जबाबदार आहोत. 
काही गुन्ह्यामध्ये अवैध मार्गाने पैसा बाहेर जातो, अशावेळी पैसे परत मिळण्याची शक्यता कमी असते. अशावेळी गुन्ह्याची नोंद करायची नाही असे करु नका. ही आंतरराष्ट्रीय संघटीत गुन्हेगारी असते, त्याची पोलिसात नोंद करणे आवश्यक आहे.
रमेश भागवत म्हणाले, जे तंत्रज्ञान आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त वाटते, ज्याच्या माध्यमातून आपण सहज कितीतरी गोष्टी करतो, ते तंत्रज्ञान तितकेच घातक आहे. त्यामुळे जबाबदारीने सतर्क होऊन तंत्रज्ञान वापरले पाहिजे. अशक्य वाटले तरी योग्य काळजी घ्यायला हवी, नाहीतर त्याची किंमत मोजावी लागते. सायबर गुन्हे आणि कायद्याविषयी प्रबोधन होण्यासाठी संस्थानच्या वतीने येत्या काळात या विषयावरील व्याख्याने आयोजित करु, असेही त्यांनी सांगितले. 

आयुष्यात कुटुंब हा घटक मोठा – भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची भावना

चितळे बंधू मिठाईवाले यांच्या व्यवसायाला ७५ वर्ष झाल्याच्या निमित्ताने कृतज्ञता सोहळा

पुणे, दिनांक २ फेब्रुवारी : आयुष्यात कुटुंब या घटकाला खूप महत्व आहे, आपल्या चांगल्या क्षणी, अडचणीच्या प्रसंगी कोणतीही अपेक्षा ना ठेवता तुमच्याबरोबर तुमचे कुटुंबच असते, क्रिकेट खेळात असताना घर​, ड्रेसिंग रूम आणि करोडो भारतीय ही माझी फॅमिलीच होती अशी भावना भारतरत्न सचिन तेंडुलकर याने रविवारी व्यक्त केली. चितळे बंधू मिठाईवाले यांच्या व्यवसायाला ७५ वर्ष झाल्याच्या निमित्ताने कृतज्ञता सोहळा कार्यक्रमाचे आयोजन​ कर्वे नगर येथील पंडित ​फार्म्स ​येथे करण्यात आले होते. भारतरत्न सचिन तेंडुलकर ​यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम​ संपन्न झाला. यावेळी माधव, श्रीकृष्ण, संजय, केदार व इंद्रनील चितळे उपस्थित होते.

चित्रकार कपिल भीमकर यांनी काढलेले चित्र देऊन सचिनचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी बासरीवादक अमर ओक, कवी वैभव जोशी आणि पंडित आनंद भाटे यांनी विशेष कार्यक्रम सादर केला. त्यानंतर क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी सचिन तेंडुलकरची मुलाखत घेतली.

आवड, नेतृत्वक्षमता आणि कामाप्रती असणारी वचनबद्धता असली कि कामामध्ये यश मिळते. चितळे बंधूनी हे गुण जपत आपले कुटुंब एकत्र ठेवून व्यवसाय वाढवला आज त्यांच्याबरोबर आपण जोडले गेलो असल्याचा आनंद असल्याची भावना सचिनने यावेळी व्यक्त केली.​ माझी बहिण लग्नानंतर पुण्यात राहायला आली त्यामुळे मी पण कुठेतरी थोडासा पुणेकर आहे असे सांगत सचिन म्हणाला की मुंबईसाठी जुनिअर लेव्हलला खेळायच्या करिअरची सुरुवात १९८५ साली पुण्यात झाली होती, त्यामुळे पुणे कायमच माझ्यासाठी विशेष आहे.

आयुष्यात शॉर्टकटला घेणे चुकीचे असल्याचे सांगताना सचिन म्हणाला, तुला यश मिळाले नाही तर तू अपयश पचव, पण त्यासाठी शॉर्टकट घेऊ नकोस, असे धडे मला घरातूनच मिळाले होते. शाळेत असताना उन्हाळ्याची सुटी होती, तेव्हा मी खूपच मस्तीखोर होतो, झाडाच्या कैऱ्या पाड, कुणाच्या गाडीची हवा सोड असे उद्योग करायचो, त्यामुळे माझा मोठा भाऊ मला रमाकांत आचरेकर सरांकडे घेऊन गेला आणि माझे क्रिकेट सुरु झाले.

आजकाल अपेक्षांचे ओझे खूप असते त्यामुळे प्रेशर येते असे आपण ऐकतो. तुझ्यावर १०० कोटींपेक्षा जास्त भारतीयांच्या अपेक्षांचे ओझे असायचे त्या तू कसे हाताळले असा प्रश्न विचारला असता सचिन म्हणाला की आपल्यावर दबाव असणे आवश्यक आहे, तसे असेल तर काम चांगले होते. २०११ मध्ये विश्वचषक खेळत असताना संघाच्या बैठका व्हायच्या, त्यामध्ये अपेक्षा व्यक्त व्हायच्या, आपण विश्वचषक जिंकायला हवा, अशी प्रत्येकाची भावना असायची. आपल्याला हा कप जिंकायचा आहे, पण त्याचा दबाव घेऊ नका, अशा चर्चा तेव्हा व्हायच्या. पण सकारात्मकते बरोबरच प्रत्येकजण दबावात होता, त्यामुळे विश्वचषक जिंकू शकलो, त्यामुळे आयुष्यात दबाव असणे आवश्यक असल्याचे सचिन यावेळी म्हणाला.​

१९८३ मध्ये भारताने क्रिकेटचा विश्वचषक जिंकला होता, त्यामुळे आपण एकदा तो उचलायला हवा अशी भावना सहा वर्षांचा असतानाच माझ्या मनात आली होती. माझे कोच आचरेकर सर माझ्याकडून कसून सराव करून घ्यायचे आणि सरावानंतर स्टम्पवर एका रुपयांचे नाणे ठेवायचे आणि तू १० मिनिटे आउट व्हायचे नाही असे सांगायचे. शिवाजी पार्कच्या मैदानात कुणीही तुझा झेल घेतला ​की तू आउट असा नियम आचरेकर सरांनी मला घालून दिला असल्याने मला १० मिनिटे आऊट ना होता खेळावेच लागायचे व चेंडू हवेत मारता यायचा नाही. सरांच्या या शिकवणीतून आयुष्यात शॉर्टकट न घेता मानसिक दृष्टया सक्षम होण्याचा गुण अवगत झाल्याची आठवण सचिनने यावेळी सांगितली.

चूक केली तर आपला कान धरणारी व्यक्ती हवी? या प्रश्नाचे उत्तर देताना बंगळुरूमध्ये ऑस्ट्रलियाबरोबरच्या सामन्यात आपण केलेली चूक आणि त्याबदल्यात अजितने धरलेला कान याची आठवण ताजी केली. मी आणि व्हीव्हीएस लक्ष्मण दोघेजण फलंदाजी करत होतो, माझ्या ३५ धावा झाल्या होत्या. मैदानावर प्रेक्षकांचा गलका सुरु होता​ ​आणि ​दुसरी भाव घेण्याच्या प्रयत्नात मी रन आउट झालो. तेव्हा मी मैदानावर नाराजीची प्रतिक्रिया दिली आणि तंबूत परतलो. मॅच झाल्यावर घरी परतलो, तेव्हा अजित मला म्हणाला, तू बाद झाल्यावर तिथे प्रतिक्रिया देण्याची काय गरज होती, त्यामुळे​ व्ही व्ही एस लक्ष्मण विचलित झाला असेल​, त्याला तर पुढे फलंदाजी करायची होती असे म्हणत त्याने माझी ​अशी प्रतिक्रिया चुकीची होती हे दाखवून दिले.

अजित मला आचरेकर सरांकडे घेऊन नसता तर मी क्रिकेटपटू म्हणून घडलो नसतो. अनेक खेळाडू माझ्यासाठी धावले नसते तर माझ्या इतक्या धावा झाल्या नसत्या, माझे कुटुंब, मित्र, ग्राउंडमन असे अनेकजण माझ्यासाठी नेहमीच तयार असायचे. आवड असली कि त्याला सीमारेषा नसतात, असेही तो एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला.

७५ वर्षाच्या अभिमानाची चवीची परंपरा ही ग्राहकांमुळे टिकून असल्याचे श्रीकृष्ण चितळे यावेळी म्हणाले. मागे वळून पाहताना घरातल्या प्रत्येकाने व्यवसाय वाढवण्यासाठी दिलेले योगदान मोठे आहे. रघुनाथराव मुंबईमध्ये व्यवसाय करायचे तेव्हा, युद्धाचे दिवस होते. सैन्याला मोठ्या प्रमाणात लोण्याची आवश्यकता असे तेव्हा ते जळगाव, मुंबई या भागातून प्रवास करून लोणी मिळवून देत असत. १९६१ मध्ये पुण्यात आलेल्या पानशेत पुराच्या दरम्यान राजाभाऊ चितळे यांनी आपला कारखाना बंद ठेवून दुकानातील कर्मचारी मंडळींची राहण्याची व्यवस्था केल्याची आठवण त्यांनी सांगितली. आधीच्या पिढीने लावलेल्या हे रोप पुढे नेत नव्या पिढीने त्यावर कळस चढवला असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

ग्राहक हा आमच्यासाठी कायमच ब्रँड अँबेसिडर राहिलेला आहे. विश्वास, गुणवत्ता या तत्वामुळेच आणि चितळे कुटुंबातील अन्नपूर्णा यांनी दिलेल्या गुणवत्तेच्या जोरावरच आमची उत्पादने अमेरिका आणि जगाच्या अनेक भागात जाऊन पोहचली आहेत, भविष्य काळात विदेशात अनेक ठिकाणी प्लँट सुरु करण्याचा मानस असल्याचे संजय चितळे यावेळी म्हणाले.​ येत्या काळात आम्ही लॉयल्टी प्रोग्रॅम सुरु करणार असल्याचे केदार चितळे यांनी सांगितले.

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले, इंद्रनील चितळे यांनी आभार मानले.

रथसप्तमी निमित्त एकत्रित सूर्यनमस्कार यज्ञ संपन्न

सेवा वस्तीतील ७४० मुला-मुलांनी २४७४० सूर्यनमस्कार घातले.

पुणे-कोथरूड
रविवार, २ फेब्रुवारी-
सेवा आरोग्य फाऊंडेशनच्या वतीने रथसप्तमी निमित्त सूर्यनमस्कार यज्ञ कार्यक्रम उत्साहात पार पडला.कोथरूड येथील जीत मैदानावर सकाळी ८ ते १० या वेळेत झालेल्या या कार्यक्रमात विविध सेवा वस्त्यांतील विद्यार्थी,पालक,स्थानिक नागरिक तसेच विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे महापारेषणचे अधिक्षक अभियंता संदीप हाके आणि सेवा आरोग्य फाऊंडेशन संस्थेचे संचालक मनोज देशमुख,डॉ सतीश जोशी,डॉ हर्षदा पाध्ये यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि भारत माता प्रतिमा पूजन करून झाली.त्यानंतर सामूहिक प्रार्थनेने सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.

विशेष म्हणजे वस्तीतील ७४० जणांनी मिळून २४,७४० सूर्यनमस्कार घालून आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश दिला.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ नारायण देसाई,संस्थापक सदस्य आणि कार्यकारी संचालक, सोसायटी फॉर इकोलॉजिकल रिस्टोरेशन – इंडिया,कार्यकारी परिषद सदस्य मेन्सा इंडिया गिफ्टेड चाईल्ड प्रोग्राम यांनी सूर्यनमस्काराचे तंत्र,फायदे आणि त्याचे जीवनातील महत्त्व यावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले.उपस्थितांनी नियमित सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प यावेळी केला.

काही उत्कृष्ट सादरीकरण केलेल्या सहभागींना प्रातिनिधिक स्वरूपात पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी सेवा आरोग्य फाऊंडेशनचे संचालक मनोज देशमुख,डॉ हर्षदा पाध्ये,डॉ सतीश जोशी उपस्थित होते.प्रास्ताविकात डॉ सतीश जोशी यांनी सेवा आरोग्य फाऊंडेशनतर्फे घेत असलेल्या विविध आरोग्य तसेच संस्कार प्रकल्पांची माहिती दिली.प्रीती पाटकर यांनी आभार मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी यशवंत ववले,दत्ताजी वाळवेकर,दिलीप लिमये,विवेक बाकरे,प्रीती पाटकर,वैशाली चव्हाण,निरंजनी शिरसट,मानसी जाधव आदींनी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाला संस्थेचे कर्मचारी,कार्यकर्ते,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तसेच विविध शाळांचे शिक्षक उपस्थित होते.

समृध्दी वर्ग प्रकल्प समन्वयक निरंजनी शिरसठ यांनी सेवा आरोग्य टीम च्या सहाय्याने कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले.

कार्यक्रमाची सांगता कल्याण मंत्राने झाली.सर्व मुला मुलींना प्रमाणपत्र देण्यात आली.खाऊ वाटप करण्यात आला.

संगीत आनंदमठ पहिल्यांदाच मराठी रंगभूमीवरऋषी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंदमठ साहित्यकृतीवर आधारित नाट्याविष्कार

पुणे : ऋषी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेल्या, भारतीय अध्यात्म, राष्ट्रभक्ती यांचा अपूर्व संगम असलेल्या अर्वाचीन भारतीय साहित्यातील आनंदमठ या अजरामर कादंबरीवर आधारित संगीत आनंदमठ ही नाट्यकृती पहिल्यांदाच मराठी रंगभूमीवर येत आहे.
1870 च्या दशकात बिहारपासून आजच्या बांगलादेशपर्यंतच्या भूमीवर संन्याशांनी इंग्रज व बंगालमधील तत्कालीन सत्ताधीशांविरुद्ध केलेल्या सशस्त्र लढ्याचे चित्रण करणारी आनंदमठ ही कादंबरी आहे. यात नवरसांच्या आविष्कारांसह वीर आणि भक्ती रस केंद्रस्थानी आहेत.
या कादंबरीने स्वातंत्र्यलढ्यातील अरविंद घोष, नेताजी सुभाषचंद्र बोस अशा अनेक महत्त्वाच्या नेत्यांना क्रांतिलढ्याची प्रेरणा दिली. 7 नोव्हेंबर 1875 कार्तिक शुद्ध नवमीच्या दिवशी बंकिमचंद्रांनी वन्दे मातरम्‌‍ हे अमर काव्य लिहिले. 2025 हे वर्ष या तेजस्वी गीताचे 150 वे (सार्ध शती) स्फुरण स्मरण वर्ष असल्याने या संगीत नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग दि. 4 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला आहे, असे वंदे मातरम्‌‍चे अभ्यासक, नाटकाचे सूत्रधार मिलिंद सबनीस यांनी सांगितले.
1880 ते 1882 या काळात बंगदर्शन या अंकातून आनंदमठ कादंबरी क्रमशः प्रकाशित झाली. लगेचच डिसेंबर 1882 मध्ये आनंदमठ पुस्तक स्वरूपात आली. त्यानंतर 1883 मध्ये आनंदमठ नाट्यरूपात बंगाली रंगभूमीवर सादर झाली. सव्वाशे वर्षांनंतर ही साहित्यकृती प्रथमच मराठी रंगभूमीवर येत आहे.
कोलाज क्रिएशन्स या पुण्यातील प्रायोगिक नाट्य संस्थेची निर्मिती असून रवींद्र सातपुते या नाट्याचे दिग्दर्शन करीत आहेत. इतिहास व सांस्कृतिक विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन करणाऱ्या ज्येष्ठ लेखिका विनीता तेलंग यांनी आनंदमठ कादंबरीचे मराठी नाट्यरूपांतर केले आहे. ज्येष्ठ संवादिनीवादक तसेच संगीतकार अजय पराड यांनी या नाटकाचे संगीत दिग्दर्शन केले आहे. ओंकार कपलाने, वज्रांग आफळे, बद्रिश कट्टी, अनुष्का आपटे, शर्व कुलकर्णी, अनुजा जोशी, प्रसाद कुलकर्णी, संचिता जोशी, ईशान जबडे, पार्थ बापट, श्रीशैल शेलार, शार्दुल निंबाळकर, सिद्धांत गवारे, अमित नगरकर हे युवा कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

रंगत-संगत प्रतिष्ठान, करम प्रतिष्ठानतर्फेसानिका दशसहस्र यांचा गझल प्रतिभा पुरस्काराने सन्मान

पुणे : ‌‘या दिशहीन जगण्यास थारा हवा, आपला आपल्याला किनारा हवा, कोण जाणे कधी वेळ येईल ती वाट पाहिन पण तोच तारा हवा‌’ अशा मुक्तछंदातील ओळी सादर करून गझल प्रतिभा पुरस्काराने सन्मानित सानिका दशसहस्र यांनी आपल्या मनातील भावना प्रकट केल्या. गझल माझ्या मनात रुतलेली आहे असे सांगून ‌‘वर्तुळातल्या काट्यांवरती अखंड धावत आहे का, वेळ बदलण्यासाठी कोणी इतके झगडत आहे का‌’ ही गझल पेश करून गझल प्रेमींची दाद मिळविली.

रंगत-संगत प्रतिष्ठान व करम प्रतिष्ठान यांच्यावतीने कवयित्री, गझलकारा सानिका दशसहस्र यांना गझल प्रतिभा पुरस्काराने आज (दि. 2)
गौरविण्यात आले. त्या वेळी त्यांनी मनोगत व्यक्त करताना कविता आणि गझलेच्या माध्यमातून भावभावना उलगडून दाखविल्या. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्काराचे वितरण रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर, मैथिली आडकर, प्रज्ञा महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

प्रास्ताविकात प्रमोद आडकर म्हणाले, युवा कलाकारांच्या पाठीवर थाप देऊन त्यांना त्यांच्या कार्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

गझलकाराने ‌‘गझल‌’-‌‘गजल‌’ शब्दोच्चाराच्या वादात अडकू नये : भूषण कटककर

पुरस्कारामागील भूमिका विशद करताना प्रसिद्ध गझलकार भूषण कटककर म्हणाले, कवींमधून अधिक उर्जादायक काव्यनिर्मिती व्हावी या करीता पुरस्कार दिला जात असून सानिका यांच्या गझला साध्या-सोप्या भाषाशैलीत परंतु सखोल अर्थ दडलेल्या असतात. आक्रोश किंवा आक्रस्ताळेपणाने मांडणी न करता मनोव्यवहारांचा खेळ त्यांच्या गझलातून मांडला जातो. ‌‘गझल‌’ किंवा ‌‘गजल‌’ या शब्दोच्चाराच्या वादत न पडता गझलकाराने आपली निर्मिती बहरू देणे आवश्यक आहे. गझल आणि कविता यांची मांडणी वेगळी असल्याचे सांगून कटककर म्हणाले, गझल लिहिताना शब्दांची मांडणी जाणिवपूर्वकपणे वृत्तात करावी लागते. त्यामुळे कवी पेक्षा गझलकाराचे परिश्रम अधिकच असतात. साहित्य संमेलनात गझलकारांसाठी स्वतंत्र कट्टा देणे अगात्याचे असावे, अशी आग्रही भूमिकाही त्यांनी मांडली.

गझल लेखानासाठी मिळालेला हा पहिला पुरस्कार असून या पुरस्काराने अधिक परिपक्व लिखाणाचे भान जागे केले असल्याचे सानिका दशसहस्र म्हणाल्या.
परिचय माधुरी डोंगळेकर यांनी करून दिला तर मानपत्राचे वाचन प्राजक्ता वेदपाठक यांनी केले. सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे, वैजयंती आपटे यांनी केले.

पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर आयोजित निमंत्रितांच्या गझल संमेलनात प्रभा सोनवणे, मिलिंद छत्रे, अमृता जोशी, नूतन शेटे, भालचंद्र कुलकर्णी, शैलजा किंकर, योगेश काळे, स्मिता जोशी-जोहरे, डॉ. मृदुला कुलकर्णी, सुहास घुमरे, रुपाली अवचरे यांचा सहभाग होता. संमेलनाचे सूत्रसंचालन निरुपमा महाजन यांनी केले.

शिक्षण, धाडस, इच्छाशक्तीच्या जोरावर मराठी तरुणांना उद्योग उभारणी शक्य

विश्व मराठी संमेलनात मान्यवरांचे मत

पुणे-मराठी तरुण उद्योगाच्या क्षेत्रात मोठे काम करू शकतो. मात्र, त्यासाठी शिक्षण, धाडस, इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे. त्याशिवाय तंत्रज्ञानाचा वापर, संशोधनावर भर देण्याचीही आवश्यकता असल्याचे मत मान्यवरांनी मांडले.

राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजित तिसऱ्या विश्व मराठी संमेलनात मराठी उद्योजकांविषयी चर्चासत्र झाले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, बीव्हीजी ग्रुपचे हनुमंतराव गायकवाड, सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदे, गर्जे मराठीचे आनंद गानू यांनी सहभाग घेतला. जयू भाटकर यांनी सूत्रसंचालन केले.

डॉ. माशेलकर म्हणाले, आज जगात ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे ज्ञानाधिष्ठित समाज, संशोधन करणे महत्त्वाचे आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात खासगी क्षेत्रासाठी २० हजार कोटी रुपयांची केलेली तरतूद स्वागतार्ह आहे. ही तरतूद उद्योगांसाठी महत्त्वाची आहे. संशोधनासाठी खूप खर्च येतो. मात्र तो खर्च उद्योग क्षेत्राकडून फार होत नाही. संशोधनाच्या जोरावर मोठी मजल मारणे शक्य आहे. भारतातील उद्योगांच्या एकूण उत्पादनाच्या १५ टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते. तसेच महत्त्वाच्या संशोधन संस्थाही महाराष्ट्रात आहेत. उद्योगांसाठी संशोधन आणि नवसंकल्पना गरजेच्या आहेत. आता मराठी तरूणांनी हनुमान उडी मारली पाहिजे. स्टार्टअपबाबत टॅलेंट, टेक्नॉलॉजी आणि ट्रस्ट हे तीन घटक महत्त्वाचे आहेत. राइट टू एज्युकेशनसह राइट एज्युकेशन आणि राइट वे ऑफ एज्युकेशन आवश्यक आहे. बदलत्या काळात शिक्षणाचा वेगळा विचार करणे, तंत्रज्ञानाचा शिक्षणावरील परिणाम विचारात घेणे गरजेचे आहे.

बीव्हीजी ग्रुपच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील कामांची माहिती देऊन गायकवाड म्हणाले, प्रत्येकामध्ये काही ना काही करण्याची ताकद आहे. मात्र, त्यासाठी ध्यास आणि इच्छाशक्ती असायला हवी. मराठी तरुणांनी जगावर राज्य केले पाहिजे. त्यासाठी धाडस केले पाहिजे, आपली कक्षा रुंद करावी लागेल. शिक्षण आणि उद्योगांची गरज यातील दरी दूर करण्याची आवश्यकता आहे.

उदरनिर्वाहासाठी देशाबाहेर गेलो. बाहेर गेल्यावर आपल्या देशात काय आहे याची जाणीव झाली. परदेशात काही वर्षे काम केल्यावर देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा निर्माण झाली. त्यामुळे भारतात परत येऊन फार्मस्युटिक कंपनी सुरू केली. त्यातून माझी प्रगती झाली. गर्जे मराठीच्या माध्यमातून परदेशातील १५ हजार मराठी माणसांना एकत्र केले आहे. अनेक विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी, शिक्षणसाठी मदत केली जाते, असे गानू यांनी सांगितले.

सह्याद्री फार्म्सच्या वाटचालीची माहिती देताना शिंदे म्हणाले, शेती हा व्यवसाय सन्मानाने करणे शक्य आहे. जागतिकीकरणामुळे शेतीमध्ये फार बदल झाला नाही. तसेच सरकारची धोरणेही शेतकरी पूरक झाली नाहीत. २०१०मध्ये स्थापन झालेल्या सह्याद्री फार्मच्या माध्यमातून आजवर २६ हजार शेतकरी एकत्र आले आहेत. ४२ हजार एकर शेतीमधून विविध उत्पादने घेऊन विक्री, निर्यात केली जाते. आता नांदेडसह विविध जिल्ह्यांमध्येही काम सुरू झाले आहे. शहर आणि गाव ही दरी संपवण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याची गरज आहे.

सार्वजनिक जीवनात मराठीला स्थान द्या-दिग्दर्शक आणि निर्मात्यांचे आवाहन

पुणे, ता. १ : मराठी भाषा टिकवण्याची जबाबदारी ही केवळ दिग्दर्शक – निर्मात्यांची नसून, आपल्या सर्वांची आहे. मराठी भाषा कधीच मरणार नाही, यादृष्टीने आपण सार्वजनिक जीवनात मराठी भाषेचा वापर वाढविण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे. मराठीचा अधिकाधिक वापर करण्याची सुरुवात ही सर्वप्रथम कुटुंबापासून व्हायला हवी. मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह आपण सर्वांनी धरायला हवा. त्यानंतर आपोआपच ती नाटक आणि चित्रपटांमधून खऱ्या अर्थाने वाढण्यास आणि समृद्ध होण्यास मदत होईल, असे आवाहन प्रतिथयश दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी केले.

विश्व मराठी संमेलनात ‘नाटक, चित्रपटातील मराठी भाषा’ या विषयावरील परिसंवादात दिग्दर्शक महेश मांजरेकर, चंद्रकांत कुलकर्णी, दिग्दर्शक नागराज मंजुळे, दिग्दर्शक केदार शिंदे, दिग्दर्शक प्रवीण तरडे, निर्मात्या कांचन अधिकारी, अमेय खोपकर आदींनी सहभाग घेत, आपले परखड विचार व्यक्त केले. अजित भुरे यांनी त्यांच्याही संवाद साधला

बोलीभाषेचा संदर्भ देत मांजरेकर म्हणाले, आम्ही कोकणातले असल्याने, लहानपणी प्रमाणभाषा मला कळतच नव्हती. आम्ही घरी बोलीभाषेत बोलायचो. मात्र, त्यामुळे काहीही नुकसान होत नाही. चित्रपटात तुम्ही जो विषय निवडता, त्यानुसार भाषेची निवड करावी. मराठीला नाटकात मोठे स्थान आहे. मात्र, चित्रपटात नाही त्यामुळे काही वर्षांनंतर मराठी चित्रपट होते, असे म्हणावे लागू शकते. मराठी भाषेत चित्रपट केल्यावर, ते चित्रपटगृहात येत नाहीत. या विपरित नाटकाला चांगले दिवस आले आहेत. त्यामुळे नाटक करू पण सिनेमा नाही, असे वाटतंय. आर्थिक गणितांचा विचार केल्यावर, सध्यातरी मराठीत चित्रपट करू नये, अशीच भावना असल्याचे मांजरेकर यांनी स्पष्ट केले.

कुलकर्णी म्हणाले, नाटक, साहित्य, कविता, लेखन, चित्रपट अशा ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या मराठी भाषेची विभागणी करता येणार नाही. सर्वत्र मराठीचा विषयानुसार वापर होतो. आपल्याला बोलीभाषा आणि प्रमाणभाषा याची सरमिसळ करता येणार नाही. मराठी भाषा वैविध्यपूर्ण असून, फार जुनी आहे. आपल्याकडील साहित्यातील थोडफार आतापर्यंत नाटक आणि चित्रपटात झिरपले. काळानुसार मराठी भाषेची शैली बदलल गेली. दूरचित्रवाणीवर कोणी बोलीभाषा बोलत असल्यास, त्याला चुकीचे म्हणता येणार नाही.गेल्या पाच सहा वर्षांचा कालावधी बघितला, तर कोरोना काळात आपल्याला ओटिटीची सवय लागली. तेव्हा आपण सर्व भाषेतील कंटेंट पाहिला. त्यामुळे आता मराठी चित्रपट किंवा सिनेमा पाहायला लोक चित्रपटगृहात येत नसल्याचे चित्र नाही. ही परिस्थिती असतानाच आपल्याला मराठी भाषेची लाज वाटते, ही प्रमुख समस्या आहे. परदेशात जनऊसाठी आपण शालेय शिक्षणापासून इंग्रजीची सवय लावत आहोत. त्यामुळे आपण मनातून ठरवलं, तर मराठी भाषेचा प्रचार- प्रसार होण्यासोबत ती सहज टिकेल.

शिंदे म्हणाले की, भाषा हे संवादाचे माध्यम आहे. केवळ नाटक किंवा सिनेमात मराठी भाषा नसते, तर त्यापेक्षाही घरातील मराठी भाषा महत्त्वाची असते. त्यामुळे घरातील मराठी भाषा पुढे जाऊन, ती नाटक आणि सिनेमात येते. त्यामुळे आताच्या पिढीला आपल्या मराठी भाषेची ओळख होण्याची गरज आहे. सध्याच्या परिस्थितीचा विचार केल्यास, आई-वडील मुलांना वेळेसोबतच भाषाही देऊ शकत नसतील, तर यापेक्षा दुर्दैवी बाब नाही. अशा परिस्थितीत मुलांना आपली मातृभाषा मराठी शिकवण्याची जबाबदारी पालकांची आहे.

अधिकारी म्हणाल्या, आपण चित्रपटातून शांततेची भाषा अतिशय प्रभावी मांडू शकतो. नागराज मंजुळे यांनी ती सैराट चित्रपटात मांडली आहे.महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई अशी प्रांतनिहाय भाषा असून, त्याला महत्त्व आहे. त्यानुसार या भाषेचा वापरही होतो. आपण आपल्या मुलांना कोणती भाषा शिकवायची, हे आपल्या हातात आहे. त्यामुळे याचा पालकांनी विचार करायला हवा. आपण मुलांना मराठी भाषा शिकवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो. आपण दररोजच्या कामकाजात मराठीचा आग्रहाने वापर केल्यास, समोरचाही मराठीत उत्तर देईल. तरडे म्हणाले, चित्रपटात काही विषयाला भाषेचे बंधन राहत नाही. मात्र, चित्रपटात प्रांत, विषय किंवा प्रप्रतिमेनुसार भाषा निवडावी लागते. अशावेळी प्रमाणभाषेचा किंवा नेमक्या एखाद्या आग्रह धरता येणार नाही. मराठी भाषा असेपर्यंत, मराठी सिनेमा टिकणार आहे, तर मराठी सिनेमा असेपर्यंत मराठी भाषाही टिकणार आहे, असे तरडे यांनी स्पष्ट केले.

नाटक चित्रपटात प्रमाणभाषा असावी, असे काही नाही. प्रशासकीय कामकाजात प्रमाणभाषा योग्य आहे. मात्र, दररोजच्या संवादात त्याची गरज नाही. अभिजात असणे म्हणजे प्रमाणभाषा असणे, असे नाही. त्याचा तो गौरव आहे. सध्या हिंदी बोललं की बरे वाटते. मराठी तेवढी चांगली वाटत नाही. अशा पद्धतीने मराठीचे अवमूल्यन होत आहे. भाषेचे अवमूल्यन सुरू झाल्यावर, आपण तिला बोलण्यात स्थान देत नाही. त्यामुळे पुढे जाऊन ती मरते की काय, अशी भीती वाटायला लागली आहे. मात्र, जगण्याच्या संघर्षात मराठी भाषा टिकावी, असे वाटत असल्याचे नागराज मंजुळे यांनी स्पष्ट केले.

एकाच दिवशी सहा मराठी चित्रपट प्रदर्शित होत असतील, तर मध्यमवर्गीय कुटुंबातील लोकांना एवढे चित्रपट पाहायला परवडणार नाही. त्यामुळे एकावेळी अनेक चित्रपट प्रदर्शित होणार नाही, याबाबतची जबाबदारी निर्मात्यांची आहे. त्यांनी ठरवून आपले चित्रपट प्रदर्शित केले, तर चांगला प्रतिसाद मिळेल. मराठी भाषेला टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्व नागरिकांची आहे. त्यामुळे शक्य तिथे मराठीत बोला आणि मराठीचा आग्रह धरा, असे अमेय खोपकर यांनी स्पष्ट केले.

सामाजिक कार्याची दखल घेणाऱ्या सरहद परिवाराचे कार्य कौतुकास्पद : भीमराव तापकीर

  • गणेश जयंतीनिमित्त विधायक कार्य करणाऱ्या गणेश मंडळांचा कृतज्ञता सन्मान

पुणे : गणेश मंडळाच्या माध्यमातून कार्यकर्ता घडतो, मोठा होतो, त्याची प्रगती होते. सामाजिक संदेश देणारे देखावे, सामाजिक उपक्रम, समाज सुधारणा यातून गणेश मंडळांनी परंपरा जपत मोठ्या प्रमाणात विधायक कार्ये केली आहेत. अशा मंडळांच्या विधायक कार्याची दखल सरहद संस्थेने घेतली आहे हे कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन आमदार भीमराव तापकीर यांनी केले.सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त घेण्यात येणाऱ्या 98 कार्यक्रमांतर्गत गणेश जयंतीचे निमित्त साधून सामाजिक आणि राष्ट्रीय ऐक्याचे उपक्रम राबविणाऱ्या गणेश मंडळांचा कृतज्ञता सन्मान सोहळा सरहद, परिवारातर्फे सरहद स्कूल, कात्रज येथे आयोजित करण्यात आला होता. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार तापकीर यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.हिराबाग मित्र मंडळ, एकता मित्र मंडळ, अखिल मोहननगर मित्र मंडळ, साईनाथ मित्र मंडळ, शिवांजली मित्र मंडळ, फाईव्ह स्टार मित्र मंडळ या गणेश मंडळांना आज गौरविण्यात आले. आमदार भिमराव तापकीर, वरिष्ठ पोलिस निरिक्षक सावळाराम साळगावकर, सरहदचे विश्वस्त शैलेश वाडेकर, विश्वस्त अनुज नहार, दिलीप राऊत, मयूर मसूरकर, मनिषा वाडेकर, कविता वानखेडे, सुजाता गोळे, निर्मला नलावडे, पल्लवी पासलकर, गीता खोत आदी उपस्थित होते.संजय नहार यांच्या कार्याचे कौतुक करून तापकीर पुढे म्हणाले, सरहद संस्थेच्या माध्यमातून समाजभान जपणारे, दर्जेदार कार्य केले जात आहे. शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांवर परंपरा जोपासण्याचे संस्कार केले जात आहेत. या संस्थेत शिक्षण आणि संस्कारांचा संगम साधला जात आहे.शैलेश वाडेकर म्हणाले, अनेक गणेश मंडळे सामाजिक उपक्रम हाती घेत आहेत. पुण्यातील गणेश मंडळाच्या माध्यमातून पुण्यात घडणारे सामाजिक कार्य मोठे असून त्यातून चांगल्या समाजाची निर्मिती होईल आणि इतर गावातील मंडळेही समाजकार्याची प्रेरणा घेतील. मंडळांच्या एकत्रीकरणातून त्यांची ताकद वाढेल. या मंडळांचा आवाज दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातही उमटावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. गणेश मंडळांच्या विधायक कार्याचे कौतुक करून सावळाराम साळगावकर म्हणाले, या भागातील गणेश मंडळांनी एकत्र येऊन मिरवणूक काढण्याच्या निर्णयाने शांतता व सुव्यस्था राखण्यास पोलीस दलाला सोपे जात आहे. मंडळांनी ध्वनी प्रदुषण होऊ नये यासाठीही कायम सहकार्यच केले आहे. मंडळांच्या कार्यामुळे समाजात सलोखा राखण्यास मदत होते आहे. मंडळांच्या अफाट जनसंपर्कामुळे अनेकदा आमच्या खात्याला उपयोग झाला आहे. सरहद संस्थेचे सामाजिक क्षेत्रात असलेले योगदान मोलाचे आहे.हिराबाग मित्र मंडळाच्या वतीने स्मरण थोरात यांनी सन्मान स्वीकारला तर एकता मित्र मंडळाचा सन्मान शुभम वानखेडे यांनी, अखिल मोहननगर मित्र मंडळाच्या वतीने शंतनु येवले, साईनाथ मित्र मंडळ संतोष निकम, फाईव्ह स्टार मित्र मंडळाचा विजय क्षीरसागर तर शिवांजली मित्र मंडळाचा सन्मान अंकुश जाधव यांनी स्वीकारला.मंडळांच्या वतीने अंकुश जाधव, विकास काटे, विजय क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचाल वैशाली शिंदे यांनी केले तर आभार अमित सालेकर यांनी मानले.

 कैलास पार्वती आनंद झाला…तेजस्वी बालक जन्मास आला

अखिल मंडई मंडळात गणेश जन्म सोहळा साजरा 
पुणे : कैलास पार्वती आनंद झाला…तेजस्वी बालक जन्मास आला..सुखकर्ता दु:खहर्ता म्हणतात तुला, जो बाळा जो जो रे जो…विघ्नहर्त्याला नमन करु, बाप्पा मोरया चा जयघोष करु, बाळाचे नाव गणेश ठेऊ जो बाळा जो जो रे जो…असा पाळणा म्हणत अखिल मंडई मंडळात माघ शुद्ध चतुर्थीला गणेशजन्म सोहळा उत्साहात साजरा झाला.  
यावेळी मोठ्या संख्येने गणेशभक्त यावेळी गणेशजन्म सोहळ्यात सहभागी झाले होते. गणेशजन्म सोहळ्यानिमित्त मंदिरात अष्टविनायक गणपतीची आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. शारदा गजाननाची प्रसन्न मूर्ती कॅमेरात कैद करण्यासाठी भाविकांनी यावेळी गर्दी केली. 
अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, विश्वास भोर, राजेश कारळे, तुषार शिंदे, चेतन वाघमाले, सुचेता थोरात, जान्हवी शाह, सुरज थोरात उपस्थित होते. देविका थोरात यांनी पाळणा गायला.
अण्णा थोरात म्हणाले, गणेश जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन मंदिरात करण्यात आले होते. यामध्ये सकाळी ६ वाजल्यापासून अभिषेक, गणेश याग तर सायंकाळी पालखी पूजन आणि नगर प्रदक्षिणा मिरवणूक संपन्न झाली. यंदा वैशिष्ट्यपूर्ण फुलांची सजावट करण्यात आली होती, यामध्ये अष्टविनायक साकारण्यात आले आहेत.

 

श्री गणेश जन्मानिमित्त महागणपतीची पालखीतून नगरप्रदक्षिणा

मानाचा चौथा महागणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ ट्रस्टचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी (१२५) वर्ष ; दृष्टीहीन विद्यार्थींनीनी केले अथर्वशीर्ष पठण

पुणे : मानाचा चौथा महागणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी (१२५) वर्षी श्री गणेश जन्मानिमित्त महागणपतीची पालखीतून नगरप्रदक्षिणा आयोजित करण्यात आली. तसेच गणेश जन्माच्या निमित्ताने पूना ब्लाइंड स्कूल मधील दृष्टिहीन विद्यार्थ्यींनींनी अथर्वशीर्ष पठण देखील केले. मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या देखील नगरप्रदक्षिणेत सहभागी झाल्या होत्या. 
गणेश जयंती उत्सवानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. महाराष्ट्राच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पारंपारिक गणेश जन्मोत्सवात महिला कार्यकर्त्यां सोबत सहभाग घेतला. यावेळी उद्योजक आणि रौप्यमहोत्सवी वर्षाचे स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, राजेंद्र बाठिया, मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, उपाध्यक्ष विनायक कदम, कोषाध्यक्ष नितीन पंडित यांसह व्यापार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. गणेश यागासह विविध धार्मिक उपक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते. नगरप्रदक्षिणा पालखी मिरवणुकीत लोणकर बंधु नगारा वादन, श्री गजलक्ष्मी ढोल पथक, शिवमुद्रा ढोल पथकी – शिवराज्याभिषेक रथ, गंधर्व ब्रास बॅण्ड यांसह गणेशभक्त पारंपरिक वेशात सहभागी झाले होते.  तुळशीबाग गणेश मंदिर मार्ग गणपती चौक, काकाकुवा मॅन्शन, लिंबराज महाराज चौक, बँक ऑफ महाराष्ट्र, शनिपार चौक, जिलब्या मारूती गणपती, महात्मा फुले मंडई, बाबूगेनू चौक, समाधान चौक, लक्ष्मी रोड, गणपती चौक येथून तुळशीबाग गणेश मंदिर येथे नगरप्रदक्षिणा सांगता झाली.