Home Blog Page 475

भटक्या-विमुक्त समाजाच्या मागण्यांबाबत विधानभवनात उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे आणि मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक; सकारात्मक निर्णयांची ग्वाही

मुंबई, २ जुलै २०२५ : महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानभवनात भटक्या-विमुक्त समाजाच्या दीर्घकालीन व प्रलंबित मागण्यांवर लक्ष केंद्रीत करत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विधानपरिषद उपसभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे आणि इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री मा. ना. अतुल सावे उपस्थित होते. दोन्ही मान्यवरांनी समाजाच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून, महसूल विभागाच्या समन्वयाने लवकरच प्रभावी व सर्वसमावेशक उपाययोजना राबविण्याचे आश्वासन दिले.

या बैठकीस भटक्या-विमुक्त समाजाचे विविध प्रतिनिधी — श्रीमती मुमताज शेख, स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त श्रीमती जेहलम जोशी, अरुण जाधव, बाबुसिंग पवार, भावना वाघमारे, यशवंत फडतरे, शोभा पवार — तसेच बहुजन कल्याण विभागाचे सचिव आप्पासाहेब धुळज आणि खासगी सचिव चेतन गिरासे हे उपस्थित होते.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले की, आज आझाद मैदानावर समाजाच्या विविध संघटनांनी एकत्र येत जातीचा दाखला, रेशन कार्ड, महात्मा फुले आरोग्य योजना व रोजगाराच्या संधी यासारख्या मूलभूत गरजांबाबत आवाज उठवला. स्वतंत्र मंत्रालयाची मागणी, शासकीय योजना आणि आवश्यक कागदपत्रे मिळावीत यासाठी आंदोलनाचे माध्यम निवडले गेले.

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, “मंत्री अतुल सावे यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून, महाज्योतीचे संचालक, विभागीय अधिकारी आणि आधार केंद्रांचे प्रतिनिधीही चर्चेला उपस्थित होते. लवकरच या समाजासाठी स्वतंत्र शासन निर्णय (जीआर) जाहीर केला जाईल. महसूल व सामान्य प्रशासन विभागाच्या समन्वयातून योजनांची प्रभावी अंमलबजावणी होईल. वसंतराव नाईक महामंडळ व भटक्या-विमुक्त महामंडळासाठी अधिक निधी मिळविण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.”

“मी स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून अनेक वर्षे या समाजासाठी काम करत आहे. आज या प्रयत्नांना संस्थात्मक पाठबळ मिळत असल्यामुळे सामाजिक न्यायाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले जात आहे,” असे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

विधानपरिषद उपसभापतींनी समाजाच्या मागण्यांना सक्रिय पाठिंबा जाहीर करत शासनाच्या स्तरावर ठोस निर्णय घेतले जातील, असा विश्वासही व्यक्त केला.

❝अनधिकृत बांधकाम नियमितीकरण धोरणाचा पुनर्विचार व्हावा – आमदार भिमराव तापकीर यांची विधानसभेत मागणी❞

पुणे महानगरपालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) हद्दीत गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर झालेल्या अनधिकृत घरबांधणी प्रकरणांचा प्रश्न विधानसभेत उपस्थित करत आमदार भिमराव तापकीर यांनी शासनाचे लक्ष वेधले.

आज (दि. २ जुलै २०२५) विधानसभेच्या चालू अधिवेशनात “औचित्याचा मुद्दा” मांडत त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र गुंठेवारी विकास (अनधिकृत बांधकामे नियमित करणे) अधिनियम, २००१ अंतर्गत धोरण अमलात असले तरी त्याच्या अंमलबजावणीत गंभीर त्रुटी असल्यामुळे नागरिकांना अपेक्षित दिलासा मिळत नाही.

तापकीर यांनी विधानसभेत सांगितले की, नियोजित धोरणातील अटी अत्यंत खर्चिक, जाचक आणि नागरिकांच्या आवाक्याबाहेरच्या असल्याने अनेकांनी अर्ज प्रक्रियेकडे पाठ फिरवली आहे. त्यांनी यासाठी खालील मुख्य कारणे मांडली:

  • नियमितीकरणासाठीचे शुल्क सर्वसामान्य व मध्यमवर्गीयांसाठी परवडणारे नाही.
  • आवश्यक कागदपत्रे, मोजणी नकाशे व सेवा योजनेचे दस्तावेज गोळा करणे कठीण आहे.
  • अर्ज प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची, अपारदर्शक व वेळखाऊ आहे.
  • विविध झोनमध्ये असलेल्या बांधकामांना कोणतीही सवलत न देता थेट अपात्र ठरवले जाते.

“या धोरणामुळे नागरिकांमध्ये कायदेशीरतेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे, जी सामाजिकदृष्ट्या अन्यायकारक व नागरी हक्कांवर घाला आहे,” असे सांगून त्यांनी शासनाकडे पुढील मागण्या सादर केल्या.

  1. सद्य धोरणाचे पुनरावलोकन करण्यासाठी उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीची तातडीने स्थापना करावी.
  2. विविध झोनमधील बांधकामांसाठी समायोजक पर्याय, सवलती किंवा पुनर्वसन योजनेची अंमलबजावणी करावी.
  3. अर्ज प्रक्रिया डिजिटल माध्यमातून पारदर्शक व सुलभ करावी.
  4. गरजू व मध्यमवर्गीय नागरिकांसाठी स्वतंत्र सवलतीची योजना अमलात आणावी.
  5. २००१ च्या मूळ अधिनियमाच्या उद्दिष्टानुसार सुधारित नियमावली २०२५ मध्ये प्रभावीपणे अंमलात आणावी.

तापकीर यांनी अधोरेखित केले की, “हा विषय केवळ शहरी नियोजनपुरता मर्यादित नसून, तो सामाजिक न्याय, कायदेशीर स्थैर्य व लोकसहभाग यांच्याशी निगडित आहे. शासनाने तातडीने पुनर्विचार करून न्याय्य निर्णय घ्यावा,” अशी मागणी त्यांनी केली.

“अल्पवयीन मुलींच्या पुनर्वसन प्रक्रियेत धोरणात्मक सुधारणा आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेत ठाम भूमिका”

“चौथ्या महिला धोरणाच्या माध्यमातून अंमलबजावणी यंत्रणा अधिक सक्षम करू”

मुंबई, २ जुलै २०२५ :
संभाजीनगर येथील विद्यार्थिनी बालगृहातून नऊ अल्पवयीन मुली पळून गेल्याच्या घटनेवर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज सभागृहात तीव्र चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “कायद्याच्या चौकटीत राहत असताना अल्पवयीन मुलींना स्वातंत्र्याची आणि आत्मनिर्णयाची गरज असते. मात्र, वय अठराच्या आत असल्याने त्यांचे पुनर्वसन बालकल्याण समिती, बाल न्याय मंडळ आणि बालगृहांच्या माध्यमातून करावे लागते, ज्यात अनेक धोरणात्मक अडचणी आहेत.”

महिला व बालविकास मंत्री मा. अदिती तटकरे यांनी या घटनेबाबत सभागृहात निवेदन सादर केले. त्यावर प्रतिक्रिया देताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “खासगी बालगृहांतील गैरप्रकारांवर कठोर कारवाई आवश्यक आहे. परंतु अशा घटनांमागे बाहेरील दलालांचे जाळे कार्यरत असल्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.”

त्या पुढे म्हणाल्या की, “समुपदेशनाच्या पद्धती, त्याचा कालावधी आणि काही वेळा मुलींना इतरांपासून वेगळे ठेवण्याची गरज या सर्व बाबी व्यवस्थापनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.”

डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी पॉक्सो कायद्याच्या अंमलबजावणी प्रक्रियेचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा संदर्भ दिला. त्या म्हणाल्या की, “चौथ्या महिला धोरणाच्या माध्यमातून एक सशक्त, प्रभावी आणि संवेदनशील अंमलबजावणी यंत्रणा उभारली जाईल.”

तसेच, यासंदर्भातील पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

लोहगावसह समाविष्ट गावांचा विकास आराखडा मंजूर करा; आमदार बापूसाहेब पठारे यांची अधिवेशनात मागणी

मुंबई: पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या लोहगावसह इतर गावांचा विकास आराखडा आजतागायत शासनाकडून मंजूर झालेला नाही, ही गंभीर बाब आमदार बापूसाहेब पठारे यांनी पावसाळी अधिवेशनात मांडली. या कारणामुळे स्थानिक विकासाच्या कामांवर मोठा परिणाम होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

लोहगावसह समाविष्ट भाग पीएमआरडीएकडून तयार करण्यात आलेल्या आराखाड्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र शासनाकडून तो मंजूर झालेला नसल्यामुळे या गावांमध्ये घरबांधणीच्या परवानग्या रखडल्या आहेत. तसेच, पाणी, ड्रेनेज, रस्ते, उद्याने, शासकीय शाळा-रुग्णालय यांसारख्या मूलभूत सुविधा उभारण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

“नागरिकांच्या मूलभूत गरजा व नियोजनबद्ध शहरविकासासाठी हा विकास आराखडा तातडीने मंजूर होणे आवश्यक आहे,” अशी स्पष्ट मागणी पठारे यांनी केली.

घराच्या खरेदीखताची प्रत मिळवून देण्यासाठी ६ हजारांची लाच; महिला रायटरला अटक

पुणे-घराच्या खरेदीखताची प्रत काढून देण्यासाठी तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांसाठी लाच मागणाऱ्या खासगी महिला रायटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. ही कारवाई सासवड येथील अनिता विनोद रणपिसे (वय ५४) या महिलेवर करण्यात आली असून, ती हवेली १ दुय्यम निबंधक कार्यालयाबाहेर खासगी रायटर म्हणून काम करत होती.
४५ वर्षीय तक्रारदार व्यक्तीने त्यांच्या घरावर कर्ज घेण्यासाठी अर्ज केला होता. कर्जासाठी बँकेत १९८७ सालच्या खरेदीखताची प्रत आवश्यक होती. ही प्रत मिळवण्यासाठी ते हवेली १ दुय्यम निबंधक कार्यालयात गेले असता, तेथे उपस्थित असलेल्या अनिता रणपिसे यांनी कार्यालयातील अधिकार्‍यांसाठी ५ हजार आणि स्वतःसाठी १ हजार रुपये अशी एकूण ६ हजार रुपयांची लाच मागितली.

या प्रकरणाची तक्रार २६ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल करण्यात आली होती. त्यानंतर २७ व ३० जून रोजी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. यावेळी अनिता रणपिसे यांनी ३ हजार रुपये अ‍ॅडव्हान्स आणि उर्वरित काम झाल्यावर देण्याचे स्पष्टपणे सांगितले, यावरून तिची लाच मागणी निश्चित झाली.

१ जुलै रोजी हवेली तहसील कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत लाचलुचपत विभागाने सापळा रचला. तक्रारदाराकडून ६ हजार रुपये घेतल्यानंतर त्यातील १ हजार रुपये तिने परत दिले. लाच स्वीकारल्यानंतर अनिता रणपिसे हिला रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलीस उपअधीक्षक भारती मोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

महिला जनसुनावणीच्या माध्यमातून पिडीत महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणीत करण्याचे काम-राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर

पुणे, दि. २: राष्ट्रीय महिला आयोगाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीचे जलद आणि प्रभावी निराकरण करण्यासाठी महिला जनसुनावणीचे आयोजन करण्यात येत असून प्रशासनाच्या माध्यमातून पिडीत महिलांना न्याय मिळवून देत त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणीत करण्याचे काम करण्यात येत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित ‘महिला जन सुनावणी’ प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड महानगर पालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी चिंचवड शहरचे पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पिडीत महिला उपस्थित होत्या.

श्रीमती रहाटकर म्हणाल्या, राष्ट्रीय महिला आयोगाकडे देशातील विविध भागातून पिडीत महिलांच्या तक्रारी प्राप्त होत असतात. या महिलांना दिल्ली येथील आयोगाच्या कार्यालयात येण्याजाण्यास येणाऱ्या अडचणींचा विचार करता ‘राष्ट्रीय महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत राज्याच्या राजधानी तसेच विभागनिहाय ‘महिला जन सुनावणी’ आयोजित करण्यात येत असून त्याला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. येत्याकाळात लवकरच महिला जन सुनावणीची शंभरी पूर्ण होणार आहे. या सुनावणीत सर्व संबधित विभागाच्यामदतीने पिडीत महिलांना न्याय देण्याची आयोगाची भूमिका आहे. त्यामुळे महिलांच्या तक्रारीची प्रशासनाने गार्भियांने दखल घेवून तक्रारी मार्गी लावण्याकरीता पारदर्शकपणे कामे करावीत.

श्रीमती रहाटकर यांच्या समक्ष सुनावणीसह सुरुवात करण्यात आली, आज झालेल्या महिला जन सुनावणीत आयोगाकडे एकूण ३५ प्राप्त तक्रारी, तसेच ऐनवेळी आलेल्या २१ तक्रारीची दखल घेवून कार्यवाही करण्यात आली. यातील २० तक्रारीबाबत जागेवरच निर्णय घेण्यात आले तर उर्वरित प्रकरणामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्वरित तक्रारीची दखल घेण्याचे श्रीमती रहाटकर यांनी निर्देश दिले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मनीषा बिरारीस यांनी केले.

फळपिक शेतकऱ्यांना ४ दिवसांचा ‘विमा’ दिलासा : कृषी मंत्री अॅड माणिकराव कोकाटे

विमा योजनेला केंद्राकडून मुदतवाढ; कृषीमंत्र्यांची माहिती-संकेतस्थळावरून ०६ जुलै २०२५ पर्यंत अर्ज करता येणार

मुंबई, दि. ०२ : हवामान आधारित फळ पिक विमा योजनेच्या मर्यादित कालावधीत केंद्रसरकारने मुदतवाढ करून राज्यातील फळपिक शेतकऱ्यांना ४ दिवसांचा ‘विमा’ दिलासा दिल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योग्य समन्वयामुळे पिक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना आता ०६ जुलै २०२५ पर्यंत अर्ज करता येणार असल्याचे कृषी मंत्री अॅड. कोकाटे यांनी सांगितले.

हवामान आधारित फळ पिक विमा योजनेंतर्गत मृग बहार २०२५ मध्ये द्राक्ष, पेरू, लिंबू, संत्रा, चिकू, मोसंबी या पिकांसाठी विमा योजनेत भाग घेण्यासाठी अंतिम दिनांक ३० जून २०२५ होती, मात्र २७ जून २०२५ पासून आधार संकेतस्थळाबाबत समस्या असल्याने विमा अर्ज करण्यामध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी शेतकरी बांधवांकडून येत होत्या. याबाबत केंद्र सरकारशी योग्यवेळी समन्वय साधल्याने एकूणच परिस्थितीचा विचार करून दिनांक ०३ जुलै २०२५ ते दिनांक ०६ जुलै २०२५ असे एकूण ४ दिवसवरील पिकांकरिता फळ पिक विमा योजनेत भाग घेण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या www.pmfby.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन विमा योजनेचा अर्ज करावा, असे आवाहन कृषी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी केले आहे.

रास्त भाव दुकान परवान्यांसाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करता येणार

पुणे, दि. २: अन्नधान्य वितरण कार्यालय पुणे शहर अंतर्गत पुणे व पिंपरी -चिंचवड महानगरामधील परिमंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात १३ ठिकाणी नवीन रास्त भाव दुकान परवाने मंजूर करण्यात येणार असून त्यासाठी अर्ज करण्यास ३१ जुलै २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

परिमंडळ अधिकारी ‘अ’ विभागांतर्गत डांगे चौक गणेशनगर काळाखडक, रहाटणी रामनगर, पिंपळे निलख गावठाण, मामुर्डी शितोळेनगर, परिमंडळ अधिकारी ‘ग’ विभागांतर्गत लोहियानगर, परिमंडळ अधिकारी ‘ज’ विभागांतर्गत वैभव नगर, तपोवन मंदिर रोड पिंपरीगाव, विणी चर्च जवळ गणेशनगर दापोडी, जय शंकर मार्केट चिंचवड स्टेशन, परिमंडळ अधिकारी ‘म’ विभागांतर्गत रहाटवडे, कुडजे, खेड, शिवापूर, श्रीरामनगर अशा एकूण १३ ठिकाणी नवीन रास्त भाव दुकान परवाना मंजूरीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. रास्त भाव दुकान मंजुरीसाठीच्या सहामाही कालबद्ध कार्यक्रमास शासनाकडून मुदतवाढ देण्यात आलेली आहे. जाहिरनामा काढलेल्या ठिकाणांसाठी करावयाचे अर्ज संबंधित परिमंडळ अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध होतील. पात्रतेच्या अटी व शर्ती आदि माहितीसाठी संबंधित परिमंडळ कार्यालयाशी संपर्क साधावा.

तरी इच्छुक व पात्र संस्थांनी ३१ जुलैपर्यंत संबंधित परिमंडळ अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत अर्ज करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे अन्न धान्य वितरण अधिकारी प्रशांत खताळ यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

शिक्षिकेकडून 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार,पंचतारांकित हॉटेलमध्ये,निर्जनस्थळी नेऊन लैंगिक अत्याचार,विद्यार्थ्याला दारू पाजायची

मुंबई- येथील एका नामांकित शाळेत काम करणाऱ्या शिक्षिकेने 16 वर्षीय विद्यार्थ्यावर वर्षभर लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या शिक्षिकेला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.या विवाहित व मुले असलेल्या या शिक्षिकेवर पोक्सो कायद्यांतर्गत तसेच बाल न्याय व भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्षभर या शिक्षिकेने 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या विद्यार्थ्याला कधी निर्जन स्थळी तसेच पंचतारांकित हॉटेलमध्ये नेत त्याच्यासोबत अश्लील चाळे करण्यात आल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही इंग्रजी विषयाची शिक्षिका असून पीडित विद्यार्थी अकरावीत असताना शिकवत होती. डिसेंबर 2023 साली झालेल्या वार्षिक शाळेच्या कार्यक्रमासाठी नृत्य गट स्थापन करण्यात आला होता. या गटात पीडित विद्यार्थी देखील होता. याच दरम्यान शिक्षिका या विद्यार्थ्याकडे आकर्षित झाली. जानेवारी 2024 मध्ये या शिक्षिकेने या विद्यार्थ्याला लैंगिक हावभाव देखील दाखवल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पीडित मुलाला हे चांगले वाटले नाही म्हणून त्याने या शिक्षिकेला टाळण्यास सुरू केले. मुलगा आपल्याला टाळतोय असे लक्षात आल्यावर महिलेने तिच्या एका मैत्रिणीची मदत घेतली. या मैत्रिणीने मुलाला सांगितले की ती शिक्षिका आणि तू एकमेकांसाठी बनलेले आहात. त्यानंतर विद्यार्थ्याने शिक्षिकेला भेटण्याचा निर्णय घेतला. शिक्षिकेने या विद्यार्थ्याला एका निर्जन स्थळी नेते व तिथे त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. या घटनेनंतर विद्यार्थी तणावात राहायला लागला. तणावात राहू नये म्हणून या शिक्षिकेने त्याला काही औषध देण्यासही सुरू केले, असे तपासत समोर आले.

पोलिसांच्या तपासात असे देखील समोर आले की शिक्षिका या अल्पवयीन पीडित विद्यार्थ्याला दारू देखील पाजायची. कधी दक्षिण मुंबईतील तर कधी विमानतळाजवळ असलेल्या एक पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन जायची. तिथे त्याला जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडायची. हे वारंवार सुरू झाल्यानंतर पीडित विद्यार्थी हा घरात व्यवस्थित वागत नव्हता. त्याच्या वागण्यात झालेला बदल त्याच्या पालकांच्या लक्षात आला. पालकांनी त्याला विश्वासात घेत विचारपूस केली तेव्हा त्याने घडलेला सगळा प्रकार सांगितला. हे ऐकून पालकांना धक्काच बसला. बारावीचे वर्ष असल्याने त्यांनी संयमाने घेत संबंधित शिक्षिकेला तंबी दिली. बारावी झाल्यावर विद्यार्थ्याने शाळा सोडली.

विद्यार्थ्याने शाळा सोडली तरी शिक्षिकेने पुन्हा त्याच्याशी संपर्क साधला. शिक्षिकेने तिच्या घरातल्या एका कर्मचाऱ्याकडून पीडित विद्यार्थ्याशी संपर्क केला. पीडितेने शिक्षक आपल्याला पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती घरी सांगितली. त्यानंतर घरच्यांनी शिक्षिकेच्या विरोधात पोलिसांत धाव घेतली. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत पोलिसांनी पोक्सो कायद्याच्या कलम 4 (लिंगभेदक लैंगिक अत्याचार), 6 (तीव्र लैंगिक अत्याचार) आणि 17 (गुन्ह्यांचे निर्मूलन) तसेच आयपीसी आणि बाल न्याय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सौर कृषी पंपाच्या समस्या, मोबाईलवरून तक्रारीची सुविधा

मुंबई, दि. ०२ जुलै २०२५: राज्यात विविध योजनांमध्ये ५ लाख ६५ हजार सौर कृषी पंप बसविण्यात आले असून सौर पंप बसविल्यानंतर त्यातील बिघाडाबाबतच्या तक्रारी मोबाईल अॅपवरूनही नोंदविण्याची सुविधा महावितरणने शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे.

महावितरणने लाभार्थी शेतकऱ्यांना सौर कृषी पंप बिघडल्यास तक्रार करण्यासाठी यापूर्वी वेबसाईटवरून तक्रार करणे, संबंधित पुरवठादार कंपनीच्या वेबसाईटवर तक्रार करणे किंवा महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर फोन करून तक्रार करणे असे तीन पर्याय उपलब्ध करून दिले होते. आता मोबाईल फोनवरील महावितरणच्या अॅपद्वारे तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महावितरणचे मोबाईल अॅप लोकप्रिय ठरले असून वीज ग्राहक त्याचा वापर आपले वीज बिल जाणून घेणे, बिल भरणे यासह मीटर रिडिंग नोंदणी, वीज चोरी कळविणे, नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरची माहिती कळविणे अशा विविध कामांसाठी करत आहेत. त्याच प्रमाणे आता शेतकऱ्यांना या मोबाईल अॅपमध्ये ‘सौर पंप तक्रार’ यावर क्लिक करून सौर कृषी पंपाविषयी तक्रार दाखल करता येईल. तक्रार नोंदविताना शेतकऱ्याने सौर कृषी पंपाचा लाभार्थी क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक लिहिणे गरजेचे आहे.

सौर कृषी पंप बसविल्यानंतर पंप चालत नसणे, सौर पॅनेलची नासधूस होणे, सौर ऊर्जा संच काम करत नसणे, सौर पॅनेल्सची किंवा पंपाची चोरी होणे अथवा पंपातून कमी दाबाने पाणी येणे अशा विविध तक्रारी शेतकरी करू शकतील. सौर कृषी पंप संचाचा विमा उतरविण्यात आला आहे.

शेतात सौर कृषी पंप बसविल्यानंतर पाच वर्षे त्याची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित पुरवठादार कंपनीवर आहे. शेतकऱ्यांनी तक्रार नोंदविल्यानंतर तीन दिवसात तक्रारीचे निवारण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व कंत्राटदारांना त्यांनी ज्या जिल्ह्यात पंप बसविले आहेत त्या जिल्ह्याच्या ठिकाणी सेवा केंद्र उभारणे बंधनकारक करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निराकरण झाल्यावर त्यांना मोबाईलवर संदेश मिळेल. शेतकऱ्यांच्या तक्रारी व त्यांचे निराकरण याबाबत कंत्राटदार कंपन्यांच्या कामावर महावितरणच्या प्रत्येक मंडलाच्या अधीक्षक अभियंत्यांची देखरेख राहील.

मी शेतकऱ्यांची हजार वेळा माफी मागेल पण यांची नाही- बबनराव लोणीकर 

मुंबई- राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त विधान व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानसभेत तीव्र पडसाद उमटले. काल या प्रकरणी काँग्रेस सदस्य नाना पटोले यांचे दिवसभरासाठी निलंबन झाले होते. त्यानंतर विरोधकांनी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला होता. या प्रकरणी आजही विरोधक सरकारला धारेवर धरले.

भाजपचे माजी मंत्री आणि आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह विधान केली. या विरोधात महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतल्याने लोणीकर यांनी आज विधानसभेत स्पष्टीकरण दिले. मी जे बोललो नाही ते मी बोललो हा आरोप केला.ह्यात राजकारण आहे असा दावा बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत केला. महाविकास आघाडीने तेव्हा आक्षेप घेतला व जोरदार घोषणाबाजी केली.बबनराव लोणीकर विधानसभेत बोलताना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले, दोन दिवस माझ्या नावाचा उल्लेख केला जात आहे. हा माझा हरकतीचा मुद्दा आहे. जे मी आयुष्यात कधी बोललो नाही. 40 वर्ष मी राजकारणात आहे. मी शेतकरी विरोधी वक्तव्य केल्याचे म्हटले जात आहे. पण मी असे काही बोललोच नाही. काही लोक राजकारण करत आहेत. माझ्या मृत्यूनंतर माझे हाड सुद्धा म्हणतील की मी शेतकरी आहे. मी शेतकऱ्यांची एक हजार वेळा माफी मागेल, पण मी यांची माफी मागणार नाही. मी शेतकऱ्यांसाठी 40 वर्ष लढलो आहे.

‌‘देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध‌’मासिक धर्माचे महत्त्व विशद करित विद्यार्थिनींचा रिंगण सोहळा

पुणे : ‌‘पुंडलिक वरदे हरि विठ्ठल‌’, ‌‘सब महिला संतन की जय‌’ असा नामघोष आणि स्त्री संतांच्या अभंगांचा गजर करून शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी मासिक धर्माचे महत्त्व विशद करित आज (दि. 2) अनोखा रिंगण सोहळा साजरा केला.
निमित्त होते साईनाथ मंडळ ट्रस्ट आणि श्री शिवाजी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित उपक्रमाचे. नारायण पेठेतील एसएनडीटी कन्याशाळेत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संत साहित्याच्या अभ्यासिका प्रा. डॉ. रुपाली शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विठ्ठल-रखुमाईची वेशभूषा धारण केलेल्या विद्यार्थिनींच्या गळ्यात पुष्पमाला घालून रिंगण सोहळ्याची सुरुवात झाली. या अनोख्या रिंगण सोहळ्यात टाळ, झेंडे, अब्दागिरी, संतांची छायाचित्रे घेऊन विद्यार्थिनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्या होता. शाळा, महाविद्यालयातील शिक्षिका तसेच गणेश मंडळाच्या सदस्यांचा यात विशेषत्वाने सहभाग होता.
प्रास्ताविकात कार्यक्रमाची संकल्पना विशद करताना पियूष शहा म्हणाले, महिला संतांनी भक्तीपरंपरेत आणि मराठी साहित्य क्षेत्रात मोलाची भर घातली आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजाला समता, भक्ती आणि आध्यात्मिक ज्ञानाचा संदेश मिळाला आहे. हा संदेश पुढील पिढीपर्यंत जावा या उद्देशाने या अनोख्या रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. देहाचा विटाळ बाजूला सारून महिलांच्या मासिक धर्माविषयी जागृती करणारा हा पहिलाच रिंगण सोहळा आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
‌‘देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध‌’, ‌‘स्त्री जन्म म्हणोनी न होई उदास‌’ हे संत सोयराबाई आणि संत जनाबाई यांचे अभंग गात रिंगण सोहळा साजरा करण्यात आला. या रिंगण सोहळ्यात ‌‘छकुली‌’ नावाची घोडी सहभागी झाली होती. ‌‘वीर कन्यका, शूर कन्यका भारत मातेच्या; आम्ही मुली, आम्ही मुली कन्या शाळेच्या‌’, ‌‘हर्ष हर्ष जय जय‌’ अशा जोशपूर्ण घोषणाही विद्यार्थिनींनी दिल्या.
प्रा. डॉ. रुपाली शिंदे म्हणाल्या, महाराष्ट्राला स्त्री संतांची खूप मोठी परंपरा लाभली आहे. संत मुक्ताबाई, बहिणाबाई, सोयराबाई, जनाबाई, निर्मळाबाई यांनी अतिशय कष्टाने, समाजाचा विरोध पत्करून विठ्ठलाची भक्ती केली. त्यांच्या कार्याने आजच्या महिला घराबाहेरील जगात न घाबरता वावरायला शिकल्या आहेत. या स्त्री संतांनी प्रतिकूलतेशी संघर्ष करत अडचणींवर मात केली. ज्या काळी धर्मपरंपरेत स्त्री म्हणून भक्ती करण्याचाही अधिकार नव्हता त्या काळात मासिक धर्माच्या अपवित्रतेच्या समजुतीवर टीका करत अभंगही रचले आहेत.
एसएनडीटी कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका माया कोथळीकर, विजयश्री महाडिक, सुनिता उबाळे यांच्यासह साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पियूष शहा, श्री शिवाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद थोरात, रुचिका वरंदानी, प्रवचनकार स्मिता जोशी, गंधाली शहा, कोमल आण्वेकर, नंदू ओव्हाळ, रुत्विक आदमुलवार, गोविंदा वरदानी, कुमार आण्वेकर यांची उपस्थिती होती.

राज्यात यंदा ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली…सरकार म्हणते उद्या चर्चा करू .. विरोधक आक्रमक

मुंबई- राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहे. दररोज शेतकरी आत्महत्या होत आहे. राज्यात यावर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत 767 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. यातील 200 प्रकरणे अपात्र ठरली असून 194 प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे. एकीकडे शेतकरी आत्महत्या होतात त्यांना मदत सरकार देत नसल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे विधिमंडळातील नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंत्री बबनराव लोणीकर यांचे वक्तव्य आणि शेतकरी कर्ज माफीचा मुद्दा चांगलाच गाजला. या प्रश्नावर विरोधक चांगलेच आक्रमक झाले काँग्रेस पक्षाचे विधिमंडळातील नेते विजय वडेट्टीवार यांनी या विषयावर स्थगन प्रस्ताव मांडला. मात्र, अध्यक्षांनी हा प्रस्ताव फेटाळून लावल्याने विरोधक आक्रमक झाले .शक्तिपीठ महामार्गाच्या प्रकल्पासाठी सरकार 20 हजार कोटी मंजूर करतात पण शेतकरी कर्जमाफी साठी पैसे नाहीत का? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. त्यानंतर विरोधक शेतकऱ्यांच्या आडून राजकारण करत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे.

सरकार शक्तिपीठ महामार्गाच्या प्रकल्पासाठी 20 हजार कोटी मंजूर करते. पण शेतकरी कर्जमाफी साठी सरकारकडे पैसे नाहीत का? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. त्याला सत्ताधारी पक्षानेही जोरदार प्रत्युत्तर दिले. शेतकऱ्यांच्या आडून विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले होते. माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्यावरुन कृषिमंत्री आणि लोणीकर यांनी माफी मागण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी थेट राजदंडला स्पर्श केल्याने अध्यक्षांनी त्यांना एका दिवसासाठी निलंबित केले होते. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्ताव मांडत शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा करण्याची मागणी केली होती. हा प्रस्ताव अध्यक्षांनी स्विकारला नाही.

कृषिमंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात, माजी मंत्री बबनराव लोणीकर शेतकऱ्यांविरोधात आक्षेपार्ह विधान करतात आणि त्यांचा अपमान करतात. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळत नाही. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही, कापसाला भाव मिळालेले नाही. सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला दीडपट भाव देऊ असे आश्वासन दिले होते. निवडणुकीआधी कर्जमाफी करू अशी घोषणा केली होती. आता मात्र सरकार समितीला पुढे करत आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी समिती नको अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत मांडली.

शक्तिपीठ महामार्गाच्या प्रकल्पासाठी सरकार 20 हजार कोटी मंजूर करतात पण शेतकरी कर्जमाफी साठी पैसे नाहीत का? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. नांगराला बैल जुंपण्याचा खर्च परवडत नाही म्हणून लातूरमधील एका 65 वर्षीय अंबादास पवार या शेतकऱ्याने बैलांऐवजी स्वतःला नांगराला जुंपलं. त्यामुळे सर्व कामकाज बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केली. अध्यक्षांनी स्थगन प्रस्ताव फेटाळल्या-मुळे विरोधक आक्रमक झाले, शेतकरी प्रश्नावर सरकार असंवेदनशील आहे, चर्चा टाळत असल्याने सरकारचा निषेध करत विरोधकांनी सभागृहाचा बहिष्कार केला.

शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे आणि राज्यातलं सरकार शेतकऱ्यांचे सरकार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी समजून घेऊन त्या सोडवणं, शेतकऱ्यांना मदत करणं सरकारची जबाबदारी असून आमचं सरकार ती पार पाडेलंच. शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्यास सरकार तयार आहे. मात्र, विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आडून राजकारण करु नये, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करीत विरोधी पक्ष सदस्यांना सभागृहात गोंधळ न घालण्याचे आवाहन केले.उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेत म्हणाले की, विरोधी पक्ष सदस्यांनी सभागृहात गोंधळ घालू नये. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. सरकारकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. सरकार चर्चेपासून पळ काढणार नाही, हे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेतंच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. विरोधी पक्षांना त्यांच्या उद्याच्या ठरावात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची संधी आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या अडचणींची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. कोणतीही अडचण असो, सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे आणि राहणार आहे. आम्ही केवळ बोलत नाही, तर प्रत्यक्ष कृतीवर विश्वास ठेवतो. शेती ही आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित साधणे, त्यांचे प्रश्न सोडवणे हे सरकारच्या धोरणात सर्वोच्च प्राधान्याने आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांना एकटे पडू देणार नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील बळीराजाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असल्याचा पुनरुच्चार केला.

पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून राज्याला मिळणाऱ्यानिधीतील एक रुपयाही परत जाणार नाही याची दक्षता घ्यावी


–उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

मुंबई, दि. 2 :- पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून राज्यात सुरु असलेल्या विकासप्रकल्पांच्या उभारणीसाठी केंद्र सरकारचे संपूर्ण सहकार्य मिळत आहे. राज्याच्या विकासाची ही कामे पुढील शंभर वर्षांचा विचार करुन आखावीत. नियोजित वेळेत पूर्ण करावीत. सर्व कामे दर्जेदार असतील याची काळजी घ्यावी. केंद्रीय अधिकाऱ्यांशी समन्वय, संपर्क ठेवून पंधराव्या वित्त आयोगाचा सर्व निधी वेळेत उपलब्ध होईल आणि चालू आर्थिक वर्षअखेर खर्च होईल, यादृष्टीने कार्यवाही करावी. राज्याच्या विकासासाठी मिळणारा एक रुपयाचा निधीही परत जाणार नाही, याची काळजी घ्या, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त, नियोजन व उत्पादन शुल्क मंत्री श्री. अजित पवार यांनी पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून राज्यात सुरु असलेल्या विविध विकास प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. 1) भारतीय नौदलातून निवृत्त आयएनएस गुलदार जहाजाचा उपयोग करुन सिंधुदुर्ग जिल्ह्यानजिक समुद्रात कृत्रिम प्रवाळ निर्माण करुन तिथे जागतिक दर्जाचे स्कुबा डायव्हिंग, पाणबुडीचा अनुभव, समुद्रात पाण्याखाली संग्रहालय आदी पर्यटन सुविधांची निर्मिती, 2) नवी मुंबईत उलवे येथे आंतरराष्ट्रीय विमानतळानजिक युनिटी मॉलची उभारणी, 3) नाशिक येथे ‘राम-काल-पथ’ ची निर्मिती आणि विकास, 4) राज्यातील ठाणे, नागपूर, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, पिंपरी चिंचवड, कल्याण-डोंबिवली, सोलापूर या सात ठिकाणी नोकरदार महिलांसाठी वसतीगृहांची उभारणी, 5) नगरविकास, ग्रामविकास, आपत्ती व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य आदी विभागांशी संबंधित विविध प्रकल्प आणि विकास योजना, 6) सांस्कृतिक वारसा जतन, 7) वने आणि वन्यजीव व्यवस्थापन, 8) रेवस-रेडी सागरी महामार्ग, 9) पोलिसांसाठी गृहनिर्माण योजना आदी कामांची प्रगती, त्यासाठी निधीची उपलब्धता यासारख्या बाबींचा आढावा घेऊन ही कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. ही कामे पूर्ण होण्यातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाकडून संपूर्ण सहकार्य मिळेल. मात्र कामे वेळेत पूर्ण झालीच पाहिजेत. ती दर्जेदार असली पाहिजेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत सांगितले. त्याअनुषंगाने सूचनाही केल्या.

पंधराव्या वित्त आयोगातून होणारी ही सर्व विकासकामे पुढील शंभर वर्षांचे नियोजन करुन नियोजित वेळेत पूर्ण व्हावीत, सर्व कामे दर्जेदार असतील याची काळजी घ्यावी. केंद्र सरकार राज्याला सर्वतोपरी सहकार्य करीत आहे. त्यांच्याशी समन्वय, संपर्क ठेवून पंधराव्या वित्त आयोगाचा सर्व निधी चालू आर्थिक वर्षअखेर खर्च होईल, यादृष्टीने कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज (2 जुलै) झालेल्या बैठकीला अर्थ विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता, ग्रामविकासचे प्रधान सचिव एकनाथ डवले, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, नगरविकासचे प्रधान सचिव डॉ. के.एच. गोविंदराज, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा) सचिव श्रीमती शैला ए., सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह, नाशिकच्या महापालिका आयुक्त मनीषा खत्री, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पहिल्यांदाच प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या!

पक्ष संघटन बळकट करण्यासाठी कार्यक्षम व मेहनती कार्यकर्त्यांना जबाबदारी

काम करणाऱ्यांनाच संघटनेत मिळणार पदे, महाराष्ट्रात तळागाळापर्यंत काँग्रेस मजबूत करण्याचा प्रयत्न.

मुंबई, दि. २ जुलै २०२५
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये संघटनात्मक बांधणी आणि पक्ष कार्याला गती देण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून राज्यभरातील तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या प्रत्यक्ष मुलाखत घेऊन करण्यात येत आहेत. आतापर्यंत प्रदेशाध्यक्षांनी स्वत: मुलाखती घेऊन एकूण ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत. पक्षात तळागाळात काम करणा-या कार्यक्षम व मेहनती कार्यकर्त्यांना या माध्यमातून महत्वांच्या पदांवर काम करण्यासाठी संधी देण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या निर्णयाचे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येत आहे. पक्ष संघटनेत नवे चैतन्य निर्माण झाले असून कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळाली आहे.

पक्ष निरिक्षकांनी जिल्ह्यांचे दौरे करून स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून काही नावांची शिफारस प्रदेश काँग्रेसला केली होती. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या निवड समितीच्या मुलाखतींनंतर या नेमणुका करण्यात आल्या आहेत. या निवड समितीत ज्येष्ठ नेते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आ. विजय वडेट्टीवार, विधान परिषद काँग्रेस गटनेते आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष व काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, खा. प्रणिती शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, कुणाल चौधरी प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील आदींच्या समावेश आहे.

ही निवड प्रक्रिया अजून सुरु असून उर्वरित तालुक्यांमधील नेमणुका लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, कार्यक्षमतेवर आधारित असून तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या दृष्टिकोनातून राबवण्यात आली आहे. यामध्ये अकोला – ८, बुलढाणा – १९ , चंद्रपूर – २, जळगाव – ८, सिंधुदुर्ग – १, उल्हासनगर – १, रत्नागिरी – ६, ठाणे शहर – ३, ठाणे ग्रामीण – ५, अहिल्यानगर – ३, सांगली – २, पुणे – २, सोलापूर – १, अमरावती – २, धाराशिव – १, जालना – ७, हिंगोली – २, छत्रपती संभाजीनगर – ६, बीड – ३, यवतमाळ – १ अशा नियुक्त्या आतापर्यंत करण्यात आल्या आहेत आणि उर्वरित नियुक्त्यांही लवकरच केल्या जाणार आहेत, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन अॅड. गणेश पाटील यांनी दिली आहे.