Home Blog Page 475

जी बी एस संसर्गजन्य नाही; महाराष्ट्रात पूर्णपणे नियंत्रणात; – केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची माहिती

पुणे शहरातील परिस्थिती लवकरच पूर्ववत होण्याचा वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केला विश्वास

पुणे : महाराष्ट्रात विशेष करून पुणे शहरात जी बी एस रुगाणची संख्या वाढत आहे. मात्र हा आजार संसर्गजन्य नाही, यामुळे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. तसेच राज्यात या आजारांवर लागणारी औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी आज झालेल्या ऑनलाइन बैठकीत सांगितले. 

यावेळी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, महाराष्ट्रचे आरोग्य मंत्री प्रकाश अविटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदीसाह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी सविस्तर आढावा घेत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना महत्वपूर्ण सूचना केल्या, यामध्ये ज्या ठिकाणी जी बी एस रुग्ण संख्या वाढत आहेत त्या भागात प्रत्यक्ष पहाणी करण्यात यावी, कुकुट पालन व्यावसाय असलेल्या परिसराला भेटी द्याव्यात. पाणी पुरवठा आणि शुद्धीकरण विभागाने विशेष जलशुद्धीकरण मोहीम राबवावी, ज्या ठिकाणी पाईप लाइन दुरुस्तीची गरज असेल तिथे ती तत्काल करण्यात यावी, तसेच मागील दोन महिन्यातील पाणी पुरवठा आणि आरोग्य विषयक बाबींचा आढावा घ्यावा असे निर्देश प्रशासनाला दिले. 

तसेच सर्व रुग्णालयांनी शासनाने ठरवून दिलेल्या एस ओ पी चे पालन करावे असे सांगत रुग्णांना फिजिओ थेरेपी सोबतच मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी सल्ला देण्याच्या सूचना जे पी नड्डा यांनी दिला.

बैठकीबद्दल माहिती देताना वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, पुण्यातील जी बी एस रुगाणबद्दलची इत्यंभूत माहिती आम्ही केंद्र सरकारला दिली आहे. राज्यातील जी बी एस परिस्थितीवर आमचे पूर्ण लक्ष असून पुणे महानगर पालिका आणि राज्य सरकार समन्वय साधून ह्या साठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहेत

शालेय पोषण आहारातून अंडी बंद – डॉ. कल्याण गंगवाल यांच्या लढ्याला यश

पुणे-शालेय पोषण आहारातून अंडी बंद करून महाराष्ट्र शासनाने एक महत्वाचे पाऊल उचललेले आहे. महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा निर्णय शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. कारण अंड्यांवरती कोणतेही एक्सपायरी डेट नसते. त्यामुळे ती अंडी ताजी की शिळी हा मोठा प्रश्न होता. त्यामुळे पोषण आहारात विद्यार्थ्यांच्या शरीरासाठी घातक होती. असे मत शाकाहार चळवळीचे पुरस्कर्ते, सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. कल्याण गंगवाल यांनी व्यक्त केले. गेल्या अनेक वर्षांपासून शाकाहारासाठी डॉ. कल्याण गंगवाल लढा उभारला आहे. त्यांच्या या लढ्याला यश मिअल्लेनासून  आता शालेय पोषण आहारातून अंडी कायमची बंद केली आहेत.

डॉ. गंगवाल म्हणाले, की शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याला अंड्यांची बिलकुल गरज नाही. कारण की अंड्यामध्ये १३.५ टक्के प्रोटीन असते. तर गव्हामध्ये २० -२५ टक्के आणि सोयाबीन मध्ये ४० -४५ टक्के प्रोटीन असते. शालेय आहारात अंडी नसली तरी काही फरक पडत नाही.  उलट अंड्यांमधली विषारी द्रव्य मुलांपर्यंत पोहोचणार नाहीत. प्रत्येक अंड्यामध्ये ३००-३५० मिली ग्रॅम कोलेस्ट्रॉल असते. जे हृदयाला उपायकारक आहे. कोंबड्यांला अनैसर्गिक आहार दिला जातो, त्यामुळे अंड्यात अनेक टॉक्सिन्स येतात. या पूर्वी अंड्यामध्ये डि. डी. टी (DDT) चे  अंश सापडले होते.

ते पुढे म्हणाले की, कोंबड्यांना अँटिबियटिक्स, हॉर्मोन्स दिले जातात. त्याचे अंश अंड्यात येतात. अंड्यामध्ये साल्मोनेला – टायफॉईडचे जंतू अनेक वेळा आढळतात. अंडी तयार करण्यासाठी कोंबड्यांवर पोल्ट्रीफार्ममध्ये भयानक अत्याचार केले जातात. अंडे २४ तास उजेडात ठेवणे, डीबेकिंग ऑपरेशन ऑपरेशन (चोंच तोडणे) केले जाते, व कोंबडीला केवळ अंडी देणार मशिन म्हणून ट्रीटमेंट देणे, हे सर्वच क्रूर आणि अत्याचारी आहे .त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून मी उभा केलेल्या  प्राणी आणि पक्षी संरक्षणाच्या लढ्याला अखेर यश आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाची विशेष आभार मानतो की हा त्यांनी घेतलेला निर्णय खूप योग्य आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.

महाराष्ट्र सरकारने ७ नोव्हेंबर २०२३ रोजी शासन निर्णय प्रसिद्ध करत शाळेतील इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात उकडलेली अंडी, अंडा भुर्जी, अंडा बिर्याणी, केळी देण्याचा निर्णय जाहीर केला होता. हा शासन निर्णय ५ डिसेंबर २०२३ पासून लागू केला होता. शास्त्रीयदृष्ट्या मांसाहार आरोग्यास हानिकारक आहे. डॉ. कल्याण गंगवाल पोषण आहारात अंडी दिली जाऊ नयेत,” अशी मागणी  गंगवाल केली होती. नुकताच राज्य सरकारने शालेय शिक्षण आहारातून अंडी बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे एक प्रकारे डॉ. कल्याण गंगवाल त्यांच्या लढ्याला यश आहे. अशी माहिती पत्रकाद्वारे त्यांनी दिली.

‘हर हर महादेव’ रंगावली प्रदर्शनातून उलगडणार महादेवांच्या लीला

श्रीरंग कलादर्पण फाउंडेशन तर्फे आयोजन : रंगावलीकार अक्षय शहापूरकर आणि त्यांच्या १०० विद्यार्थ्यांचा सहभाग
पुणे : श्रीरंग कलादर्पण फाऊंडेशन च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हर हर महादेव या प्रदर्शनातून महादेवांच्या लीला पुणेकरांसमोर उलगडणार आहेत. बालगंधर्व कलादालन येथे दि. ६ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे, अशी माहिती सुप्रसिद्ध रंगावलीकार अक्षय शहापूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
पत्रकार परिषदेला संजय महामुनी, सचिन मरशेट्टी, अरुण नाईक आदी उपस्थित होते. 
प्रदर्शनात रंगावलीकार अक्षय शहापूरकर आणि त्यांचे १०० विद्यार्थी महादेवांच्या लीला रांगोळीच्या माध्यमातून साकारणार आहेत. रंगावली चे विविध प्रकार देखील आपल्याला प्रदर्शनात पाहायला मिळतील. यामध्ये थ्री डी रांगोळी, टू इन वन रांगोळी, पाण्यावर – पाण्याखाली तसेच पाण्याच्या मधोमध रांगोळी, प्रतिबिंब रांगोळी, हलती रांगोळी तसेच आणखी बरेच प्रकार पुणेकरांना अनुभवायला मिळतील. प्रदर्शनात ३० रंगावलींचा समावेश आहे. 
प्रदर्शनाचे उद्घाटन दि. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता राज्यमंत्री माधुरी मिसाळ, ज्येष्ठ अध्यात्मिक गुरु व प्रवचनकार स्थितप्रज्ञानंद सरस्वती माताजी आणि शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अक्षय शहापूरकर, प्रतीक अथणे, अजित पवार, रंगावली कार जगदीश चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन करण्यात, आले आहे.

भारताची संस्कृती आणि ज्ञानसाधना धार्मिक संस्थानी पुढे न्यायला हवी-प. पू. भागवताचार्य शरदशास्त्री जोशी 

श्री देवदेवेश्वर संस्थान तर्फे शरदशास्त्री जोशी आणि स्वानंद पुंड यांना श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक ,अध्यात्मिक आणि सामाजिक पुरस्कार प्रदान
पुणे:  भारतीय ज्ञान साधना आणि भारतीय संस्कृती ही अत्यंत साधेपणाने असणारी आहे. आजच्या काळामध्ये हा सात्विक आविष्कार कमी होत चालला आहे. ही भारताची संस्कृती आणि ज्ञानसाधना धार्मिक संस्थानी पुढे न्यायला हवी. लोक हे वरवरच्या गोष्टीना भुलतात आणि खरेपणापासून लांब राहतात. ही समाजातील दरी आहे आणि ही दरी कमी करण्याचे काम धार्मिक संस्थांनी केले पाहिजे, असे मत प. पू. भागवताचार्य शरदशास्त्री जोशी यांनी व्यक्त केले.

श्री देवदेवेश्वर संस्थान अंतर्गत सारसबाग मंदिरातील श्री सिद्धिविनायक देवतेच्या वार्षिक महोत्सवात श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक ,अध्यात्मिक आणि सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आले. यंदाचा पुरस्कार प. पू. भागवताचार्य शरदशास्त्री जोशी (पुणे) आणि प्रा.स्वानंद पुंड (वणी) यांना डॉ. कल्याणीताई नामजोशी यांच्या हस्ते  प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थानचे मुख्य विश्वस्त रमेश भागव , विश्वस्त सुधीर पंडित, पुष्कर पेशवा, जगन्नाथ लडकत, आशिष कुलकर्णी उपस्थित होते. रोख रक्कम, सन्मानपत्र, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

डॉ. कल्याणीताई नामजोशी म्हणाल्या,  महाराष्ट्रामध्ये पुष्कळ कर्मयोगी आहेत ज्यांनी आपल्या जीवनामध्ये यज्ञांची सत्रे केली आहेत आणि त्यांचा कर्ममार्ग उजळला आहे. आताचा योग वेगळा आहे, पूर्वीचा योग अंतकरणात ठेवा. कुंभच्या निमित्ताने योगींचे दर्शन होत आहे, असेही त्यांनी सांगितले.

प्रा.स्वानंद पुंड म्हणाले, पुराणकथांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असायला पाहिजे. त्या समजून घेण्याच्या कथा आहेत. अनंत कोटी ब्रह्मंडात जे काही आहे ते आपल्यात आहे. त्यामळे या कथा आपल्यामध्ये पहायच्या आहेत. आपल्या ऋषीमुनींना काही पहायचे असेल तर ते डोळे मिटतात आणि अंतर्मुख होतात. अष्ट विकारांवर मात करणारे अष्ट विनायक आपल्यातच आहेत. विकारांनीच आपण तयार झालेले असतो, त्यामुळे विकार सुटत नाहीत, परंतु ते नियंत्रित आणि सुनियोजित करता येतात. रमेश भागवत यांनी प्रास्ताविक केले. सुधीर पंडित यांनी आभार मानले. अदिती अत्रे यांनी सूत्रसंचालन केले.

आळंदीतील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांवर ४८ तासात कारवाई करा- राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर

पुणे, दि.३: आळंदीतील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांवर ४८ तासात कारवाई करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिले. आळंदी परिसरातील वारकरी विद्यार्थी वसतीगृहांमध्ये होणाऱ्या बालकांच्या लैंगिक शोषण संदर्भात महिला आयोगाकडे प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने वारकरी शिक्षण संस्थांची पाहणी करत आतापर्यंत झालेल्या पोलीस तपासाचा आढावा त्यांनी आज घेतला.

यावेळी पोलीस उपअधीक्षक शिवाजी पवार, आयोगाच्या सदस्य सचिव श्रीमती नंदिनी आवडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनीषा बिरारीस, प्रांताधिकारी अनिल दौंडे, तहसीलदार ज्योती देवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. एस.नरके, मुख्याधिकारी कैलास केंद्रे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

पोलीस तपासाचा आढावा घेतल्यानंतर श्रीमती चाकणकर म्हणाल्या, वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्थांमध्ये गैरप्रकार सुरू असल्याच्या व मुलांचे लैंगिक शोषण होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. गुन्हा दाखल झालेल्या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास करावा. तसेच पोलीसांनी पुढाकार घेत, मुलांना विश्वासात घेऊन अजून असे प्रकार झाले असतील तर त्या दृष्टीने ही कारवाई करावी असे त्यांनी सांगितले.

बालकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार खाजगी वसतीगृहांसाठी नियमावली करण्यात आली आहे. या नियमावलीचे पालन न करणाऱ्या संस्थांचा अहवाल सात दिवसात सादर करावा. संस्था सुरू करण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास विभाग यांची परवानगी तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी नसलेल्या संस्थांवर दोन दिवसात कारवाई करा असे त्यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या, परवानगी असलेल्या परंतु नियमावलीचे पालन न करणाऱ्या संस्थांची मान्यता रद्द करण्यात यावी. नियमावलीनुसार मुला- मुलींची निवास व्यवस्था स्वतंत्र करण्यात यावी. वसतीगृहांमध्ये आवश्यक कर्मचारी वर्ग असावा, पुरेशी निवास व्यवस्था, स्वतंत्र अभ्यासिका, बालकांच्या संख्येनुसार स्नानगृहे, स्वच्छतागृहे असावीत. पालकांच्या विनंती अर्जानुसार बालकांना संस्थेमध्ये प्रवेश द्यावा, पुरेसे स्वच्छ व निर्जंतुक पिण्याचे पाणी इत्यादी नियमांचे तंतोतंत पालन संस्थांनी करावे असेही त्यांनी सांगितले. स्थानिक पातळीवर पोलीस विभाग, महिला व बाल विकास, महसूल, नगरपालिका, शिक्षण व स्थानिक ग्रामस्थ यांची समिती करण्यात येईल. या समितीकडून संस्थांची वारंवार तपासणी करून त्याचा अहवाल शिक्षण विभागात सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी त्यांनी आळंदीतील ग्रामस्थांसोबत संवाद साधून त्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेविषयी तक्रारी जाणून घेतल्या. स्थलांतरित संस्था तसेच वारकरी शिक्षण संस्थांना भेटी देऊन विद्यार्थी संख्या, त्यांची राहण्याची व्यवस्था, संस्थेतील विद्यार्थी नोंदणी रजिस्टर आदींची पाहणी केली.

कोथरूडमधील अनियमित पाणीपुरवठ्यावरुन चंद्रकांतदादा संतप्त.. स्वर्गीय बापटांची झाली अनेकांना आठवण

राजकीय दबावाला बळी पडू नका!पाणीपुरवठा अधिकारी आणि व्हॉलमनना सूचना

पुणे- एके काळी कसब्याच्या पाणीपुरवठ्याच्या समस्येवरून खासदार गिरीश बापटांनी पालकमंत्र्यांच्या बैठकीतून सभात्याग करत आयुक्तांच्या बंगल्यावर देखील धाड मारत तिथे पाणी कसे प्रेशरने मिळते असे सवाल उपस्थित केले होते. महापालिकेत भाजपची सत्ता असताना , मी संसदेत दिल्लीत गेलो कि माझ्या मतदार संघात पाण्याची टंचाई कशी निर्माण होते असे प्रश्न उपस्थित करत महापालिकेच्या प्रशासनाला फैलावर घेतले होते . या घटनेची आज आठवण व्हावी असा प्रसंग घडला आहे. कोथरूड मतदारसंघातील अनियमित पाणीपुरवठ्यावर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील चांगलेच संतप्त झाल्याचे पाहायला मिळालं. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता, नियमीत पाणीपुरवठा करावा अशा सक्त सूचना त्यांनी यावेळी दिल्या. कोथरुड विधानसभा मतदारसंघातील पाणीपुरवठ्यासंदर्भात महापालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी, व्हॉलमन आणि नागरीक अशी संयुक्त बैठक कोथरूड मधील अंबर हॉल येथे झाली. या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप, कार्यकारी अभियंता शंकर कोडूसकर कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे विजय नायकल, वारजे-कर्वेनगरचे दीपक राऊत, औंध-बाणेरचे गिरीश दापकेकर, भाजपा कोथरुड दक्षिण अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, गणेश कळमकर यांच्या सह सर्व माजी नगरसेवक तथा पाणी पुरवठा विभागाचे सर्व‌ अधिकारी, कर्मचारी, व्हॉलमन उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी कोथरूड मधील विविध भागातील पाणीपुरवठ्याबाबतच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी उपस्थित माजी नगरसेवकांनी अनियमित पाणी पुरवठ्याबाबतच्या तक्रारींचा पाढा वाचला. गेल्या काही वर्षांपासून महापालिका वेगवेगळ्या भागात दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद असल्याचे जाहीर करते. मात्र, त्यानंतर पुढील दोन-चार दिवस पाणीपुरवठा सुरळीत होत नाही.

तसेच, बालेवाडी गावठाण मध्ये ठिकाणी दहा-दहा दिवस पाणीपुरवठा होत नाही. तर एसएनडीटी येथील समान पाणीपुरवठा योजने अंतर्गत पाण्याची टाकी उभारली असली, तरी ते काम निकृष्ट झाले असून, टाकी सुरु होण्यापूर्वीच गळती लागल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच अनेक भागात पाणीपुरवठा करणारे कर्मचारी कामात कुचराई करत असल्याचे निदर्शनास आणले.

त्यावर नामदार पाटील यांनी संतप्त होत अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. “पुणे महापालिकेच्या २४×७ योजनेअंतर्गत पहिली पाण्याची टाकी बाणेर बालेवाडी मध्ये कार्यान्वित झाली. त्यानंतर उर्वरित पुण्याला मार्गदर्शक ठरेल, असे याचे कार्यन्वयन सुरू झाले. पाण्याच्या टाक्या बांधण्याचे काम सुरू आहे. समान पाणीपुरवठ्यासाठी प्रत्येक घरात मिटर लावण्याचा निर्णय झाला असून, त्याचेही काम सुरू होईल.”

ते पुढे म्हणाले की, “दुसरीकडे पाणीपुरवठ्याबाबत अनेक तक्रारी वारंवार येत आहेत. सदर तक्रारमध्ये अनेक भागात राजकीय दबावामुळे अनियमित पाणीपुरवठा होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे ही बाब खपवून घेतली जाणार नाही. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नये. पाणी ही अत्यावश्यक बाब असल्याने नागरिकांना त्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केल्यास कठोर पावले उचलावी लागतील,” अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

स्वरगंधा टिळक स्मृती सांगीतिक कुटुंब पुरस्कार जाहीर: ‌उस्ताद फैय्याज हुसेन खाँसाहेब कुटुंबियांचा होणार गौरव

पुणे : ‌‘गानवर्धन‌’तर्फे देण्यात येणारा नारायणराव टिळक पुरस्कृत ‌‘कै. सौ. स्वरगंधा टिळक स्मृती सांगीतिक कुटुंब पुरस्कार‌’ हरियाणातील झझ्झर घराण्यातील सात पिढ्यांची सांगीतिक परंपरा असलेल्या उस्ताद फैय्याज हुसेन खाँसाहेब यांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त शास्त्रीय, उपशास्त्रीय व गायन-वादनाचा ‌‘स्वरपरंपरा‌’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
पुरस्कार वितरण सोहळा सोमवार, दि. 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता एस. एम. जोशी हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे. 40 हजार रुपये, शाल, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्काराचे वितरण आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खाँ यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती ‌‘गानवर्धन‌’चे अध्यक्ष दयानंद घोटकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
झझ्झर घराण्यामध्ये तानकप्तान उस्ताद हाफिज खाँ, बशीर खाँ, हबीब खाँ, उस्ताद रशीद खाँ अशा नामवंत गायक तसेच सारंगी आणि व्हायोलिन वादकांचा समावेश आहे. महान गायिका अंजनीबाई मालपेकर यांना उस्ताद अजीमबक्ष संगत करीत असत. तर केसरबाई केरकर यांना उस्ताद अब्दुल मजीद खाँ आणि रोशनआरा बेगम यांना उस्ताद अमीरबक्ष संगत करीत असत. नटसम्राट बालगंधर्व यांना उस्ताद मुल्लाजी कादरबक्ष आणि त्यांचे चिरंजीव उस्ताद महंमद हुसेन खाँ आणि चुलत भाऊ गफूरभाई, मुग्नी खाँ साथीला असत. तसेच महंमद खाँ यांचे शिष्य कै. पंडित मधुकर खाडिलकर, पं. मधुकर गोळवलकर, शब्बीर खाँ हेही साथसंगत करत.
उस्ताद महंमद हुसेन खाँसाहेब यांनी 1940 मध्ये पुण्यात टिळक रस्त्यावर अरुण म्युझिक क्लासची सुरुवात केली आणि अनेक कलाकार तयार केले तसेच त्यांनी ‌‘बंदिश‌’ व ‌‘उपज‌’ ही दोन स्वरचित पुस्तकेही प्रकाशित केली.
घराण्याची सांगीतिक परंपरा पुण्यामध्ये उस्ताद फैय्याजहुसेन खाँ, अन्वर हुसेन, एहजाज, अली हुसेन पुढे नेत आहेत. तर मुंबईमध्ये उस्ताद सज्जाद हुसेन, अश्फाक हुसेन यांनी सुरू ठेवली आहे.
मानाचा आणि प्रतिष्ठेचा हा पुरस्कार या पूर्वी उस्ताद उस्मान खाँ परिवार, पं. सुरेश तळवलकर, पं. अतुलकुमार उपाध्ये परिवारास प्रदान करण्यात आला आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर उस्ताद फैय्याजहुसेन परिवारातील कलाकार व शिष्य गायन-वादनाचा सांगीतिक आविष्कार सादर करणार आहेत. कार्यक्रम रसिकांसाठी खुला असून प्रवेश विनामूल्य आहे.

आंत्रप्रेन्युअर्स स्टार ॲवॉर्ड्‌‍स वितरण सोहळा शनिवारी

पुणे : औद्योगिक क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या उद्योजकांचा अर्थार्थ वेल्थ मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड पुणे, एसएमई चेंबर ऑफ इंडिया यांच्या वतीने आंत्रप्रेन्युअर्स स्टार ॲवॉर्ड्‌‍स 2025 ने सन्मान केला जाणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दि. 8 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे. सहसंवाद फाऊंडेशन यांच्या सहयोगाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सेंटर फॉर पोलिस रिसर्च ऑडिटोरियम, पाषाण रोड येथे हा कार्यक्रम होणार आहे. दुपारी 2 वाजेपासून उद्योग-व्यावसायिकांचे प्रेझेंटेशन होणार असून सायंकाळी 5 वाजता पुरस्कार वितरण सभारंभ होणार आहे. पुरस्कारांचे वितरण उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, उच्च व तंत्रज्ञान शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती अर्थार्थ वेल्थ मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या अध्यक्षा स्मिता भोलाणे, सहसंवाद पुणेच्या प्रमुख केतकी महाजन-बोरकर आणि संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
या प्रसंगी महाराष्ट्र इंडस्ट्रीअल टाउनशीपचे कार्यकारी अध्यक्ष पी. डी. मलिकनेर, महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट असोसिएशन ॲन्ड एसएमइ चेंबर ऑफ इंडियाचे संस्थापक, अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे तसेच चितळे बंधू मिठाईवालेचे केदार चितळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन अर्थार्थ वेल्थ मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे निरज भाटीया, किरण भोलाणे, असोसिएशन ऑफ व्हॅल्यूएशन प्रोफेशनल्सचे राममोहन भावे, सहसंवाद फाऊंडेशनच्या केतकी महाजन-बोरकर यांनी केले आहे.
व्यावसायिक जगतात एमएसएमइ, एसएमइ, उत्पादन क्षेत्र, सेवा क्षेत्र, रिअल इस्टेट, आर्किटेक्चर अशा उद्योग क्षेत्रात नाविन्यपूर्ण, कल्पक आणि भरीव कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील 30 उद्योजकांचा आंत्रप्रेन्युअर्स स्टार ॲवॉर्ड्‌‍सने सन्मान केला जाणार आहे.
वुमेन आंत्रप्रेन्युअर्स डेव्हलपमेंट कौन्सिल, असोसिएशन ऑफ व्हॅल्यूएशन प्रोफेशनल्स, बीएसई, एलआयसी म्युच्युअल फंड, जनसेवा सहकारी बँक लिमिटेड, हडपसर, भगिनी निवेदिता सहकारी बँक लि. पुणे, बिझनेस आयकॉन यांचे कार्यक्रमास सहकार्य लाभले आहे.

गुन्हेगारांना जेल मधून जामीनावर बाहेर काढण्याकरीता उभे केलेले बनावट जामीनदार व संबंधीत वकील यांचे रॅकेट केले उध्वस्त

पुणे-गुन्हेगारांना जेल मधून जामीनावर बाहेर काढण्याकरीता उभे केलेले बनावट जामीनदार व संबंधीत वकील यांचे रॅकेट उध्वस्त केल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला आहे.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या गंभीर गुन्हयात न्यायालयाने जेलमध्ये रवानगी केलेले गुन्हेगारांना कोणी लायक जामीन (Surities) मिळत नसे. त्यांना जामीनदार होण्यास अनुदार लोक घाबरत असत. त्यामुळे त्यांना न्यायालयातून जामीन मिळवुन देणेकामी काही वकीलांच्या साथीने एक बनावट जामीनदारांचे रॅकेट निर्माण झाले होते बनावट जामीनदार हे न्यायालयात येणाया गुन्हेगारांच्या नातेवाईकांना हेरुन त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करत असत. त्यानंतर नमुद टोळी हे बनावट जामीनदार यांचे दुस-याचे नावाने आधारकार्ड, रेशनकार्ड व ऑनलाईन ७/१२ वरील नावात बदल करुन ते कागदपत्रे तयार करत होते. रेशनकार्ड खरे वाटावे म्हणून त्यावर पुरवठा विभागाचे उपायुक्तांचे रबरी स्टॅम्प मारुन खोटी सही करीत होते. त्याद्वारे त्यांचे प्रतिज्ञापत्र तयार करुन संबंधित कोर्टातील सहाय्यक अधिक्षक (नाझर) यांचेकडुन बनावट कागदपत्रे पडताळणी करुन खरे असल्याचे प्रमाणित करायचे. न्यायालया समक्ष जामीनदारांना हजर केल्यावर वकील व बनावट जामीनदार हे खरे असल्याचा आवआणत आणि न्यायालयाची दिशाभूल करुन जेलमधील गुन्हेगारांना जागीन मिळवून देत असत.
वानवडी पोलीस ठाणेकडील तपास पथकातील पोलीसांना या बनावट जामीनदारांच्या रॅकेटबाबत गोपनिय माहिती मिळाली. त्याआधारे दिनांक ०४/०१/२०२५ रोजी पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांचे आदेशान्वये लष्कर कोर्ट आवारात सापळा लावण्यात आला. सापळा यशस्वी झाला. त्यामध्ये इसम नामे संतोषकुमार शंकर तेलंग याचे सह ५ बनावट जामीनदार ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी त्याचा मुख्य साथीदार हा गर्दीचा फायदा घेऊन पळुन गेला. सदर कारवाई वरुन वानवडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. ११/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३१९ (२), ३१८ (४),३३८,३३६(३),३४० (२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करुन सुरूवातीला ६ आरोपी अटक करुन सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास केला गेला. सदरचा तपास चालु असताना अटक आरोपीतांकडून मिळालेल्या माहितीवरुन मुख्य साथीदार हा बनावट व चोरुन रबरी शिक्के तयार करुन देणारा १) दर्शन अशोक शहा, वय ४५ वर्षे रा. सोलापुर बाजार, कॅम्प, पुणे यास अटक केली व त्याचेकडुन एकुण ९ रवरी स्टॅम्प व मशिन जप्त केली. एकेरी पानाचे रेशनकार्ड प्राप्त करुन देणारे २) पिराजी उर्फ चंद्रकांत मारुती शिंदे, वय. ६० वर्षे, रा. भारतमाता चौक, मोशी, ता. हवेली ३) गोपाळ पुंडलीक कांगणे, वय. ३५ वर्षे, रा. मोरवाडी, पिंपरी कोर्टाचे शेजारी, पिंपरी यांना दि. ०९/०१/२०२५ रोजी अटक केली सदर गुन्ह्याच्या पोलीस तपासामध्ये अटक आरोपी व पाहिजे आरोपी यांनी मिळून संगणमताने त्यांचे स्वतःचा आर्थिक फायदा करुन घेण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली असुन आतापर्यंत त्यांचे ताब्यातुन व घरझडती पंचनाम्यामध्ये एकुण रु. ८९,०२०/- कि. चा मुद्देमाल त्यामध्ये एकुण ९५ संशयित रेशनकार्ड, ११ संशयित पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५, पुणे वानवडी पोलीस ठाणे, पुणे शहर Email id:-dcpzone5.pu-mh@gov.in आधारकार्ड व इतर संशयित कागदपत्रे आणि मोबाईल हन्डसेट, डिओ मोपेड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर गुन्हयाचे तपासात गुन्हयातील न्यायालयीन कोठडीतील आरोपी नामे संतोषकुमार शंकर तेलंग याने न्यायालया समक्ष भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १८३ अन्वये दि.१५/०१/२०२५ रोजी कबुली जबाब दिला आहे. त्यामध्ये आरोपीस सदर गुन्हा करण्यामागे मुख्य सुत्रधार व त्याचे सहकारी इसम १) अॅड. असलम सय्यद, २) अॅड. योगेश जाधव व अजुन काही यांचे साथीदारांसोबत संगनमताने करुन बनावट जामीनदार उभे करुन जामीन करणेकामी त्यांनी वेळोवेळी मदत केली व त्याचा मोबदला म्हणून रोख स्वरुपात पैसे दिले आहेत. आरोपीकडुन जप्त केलेले बनावट रेशनकार्ड /आधारकार्ड याद्वारे न्यायालयातुन कोणकोणत्या आरोपीतांना आजपर्यंत जामीन मिळाला व त्याकामी आरोपीतास कोणी मदत केली इत्यादी माहिती न्यायालयाकडून प्राप्त करण्यात आली आहे. त्यामध्ये मा. न्यायालयातील काही वकीलांचा व कोर्टातील स्टाफचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे त्याप्रमाणे अॅड. असलम गफुर सय्यद, वय ४५ वर्षे, रा. वैदवाडी, हडपसर व अॅड. योगेश सुरेश जाधव, वय ४३ वर्षे, रा. हडपसर यांना नमूद गुन्ह्यामध्ये दिनांक ०२/०२/२०२५ रोजी अटक केली आहे. आज रोजी दोन्ही वकील आरोपीतांना न्यायालया समक्ष हजर करणार आहोत सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक धनाजी टोणे वानवडी पोलीस ठाणे हे करीत आहेत.

विमाननगर वाहतूक विभागांतर्गत वाहतूक बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी

पुणे, दि. ३: वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता पुणे शहरातील विमाननगर वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीत तात्पुरते बदल करण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

फिनिक्स मॉल (विमाननगर चौक, जंक्शन) ते सोमनाथ नगर चौक दरम्यान गोलाकार पद्धतीने वाहतुकीत बदल करण्याकरीता विमाननगर चौक, जंक्शन जंक्शन हे प्रायोगिक तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आले आहे. विमाननगर येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी विमाननगर चौकातून डावीकडे वळन घेऊन सोमनाथ नगर चौक येथून यू टर्न घेवून इच्छितस्थळी जावे. नगरकडून पुण्याकडे येणाऱ्या व विमाननगर फिनिक्स मॉलकडे जाणाऱ्या वाहनांनी अग्निबाज गेट समोरुन यू टर्न घेऊन इच्छितस्थळी जावे.

या आदेशाबाबत नागरिकांच्या काही सूचना व हरकती असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस जवळ, बंगला क्रमांक ६, विमानतळ मार्ग, पुणे यांच्या कार्यालयात १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत लेखी स्वरूपात कळविण्यात याव्यात. नागरिकांच्या सूचना व हरकतीवर विचार करून व अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून वाहतूक बदलाबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात येतील, असे पोलीस उपआयुक्त अमोल झेंडे यांनी कळविले आहे.
0000

ज्येष्ठ छायाचित्रकार राम झोंड यांचे निधन

पुणे-पुण्यातील ज्येष्ठ मुक्त छायाचित्रकार पत्रकार राम झोंड यांचे आज (ता. ३ फेब्रु ) सकाळी सुमारे ६ वा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांना पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा आहे. गेल्या तीन दशकांपासून ते पत्रकार क्षेत्रात मुक्त छायाचित्रकार पत्रकार म्हणून कार्यरत होते. हसतमुख व्यक्तिमत्वाच्या राम झोंड यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, सलाम पुणे अशा माध्यम तसेच कला क्षेत्रातील संस्थांसाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते.

त्यांच्या आकस्मित जाण्यामुळे पत्रकार क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर आज सायंकाळी सहा वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पुण्यातील आजी-माजी पत्रकार आणि कला ,व समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

सनई चौघाड्यांच्या मंगलमय सुरात नवजात बालकाचे घरी स्वागत

-इंद्रजीत काळभोर यांनी बाळाच्या स्वागताला जपली मराठी परंपरा

लोणी काळभोर : सनई चौघाड्यांचे मंगलमय सुर.., तुतारी, मराठमोळ्या नऊवारी साडीतील महिला आणि मराठी परंपरेला साजेशा  पद्धतीने औक्षण, फुलांचा वर्षाव, रांगोळ्यांच्या पायघड्या आणि घरावर गुढी अशा पारंपारिक पद्धतीने आज वाकवस्ती, लोणी काळभोर येथे नवजात बालकाचे मोठ्या उत्साहात त्याच्या आई वाडिलांसाह नातेवाईकांनी स्वागत केले. 

युवा उद्योजक इंद्रजीत अभय काळभोर आणि त्यांच्या पत्नी जान्हवी यांना नुकतेच पुत्ररत्न प्राप्त झाले. घरातील नव्या सदस्याचे स्वागत करताना अलीकडे डीजे, फटाके यांचा अतिरेक केला जातो मात्र या सर्व गोष्टींना फाटा देत जान्हवी आणि इंद्रजीत यांनी आपल्या बाळाचे स्वागत पारंपारिक पद्धतीने करायचे असे ठरवले होते, त्यानुसार त्यांनी आज मोठ्या उत्साहात आपल्या बाळाचे घरी स्वागत केले. 

या विषयी बोलताना इंद्रजीत काळभोर म्हणाले,  बाळ येणार यांची चाहूल लागल्यानंतर प्रत्येक घरात जसे आनंदाचे, उत्साहाचे वातावरण असते तसेच आमच्याकडे होते. आपल्या बाळाचे घरी आगमन होताना कसे स्वागत करायचे याचा आम्ही विचार करत असताना मुलगी झाली तर  आणि मुलगा झाला तर कसे स्वागत करायचे या दोन्हींचा विचार आम्ही करून ठेवला होता.  त्यानुसार आज आम्ही प्रभू रामचंद्र किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचे जसे स्वागत झाले असेल त्याच पद्धतीने राजेशाही थाटात, पारंपारिक मराठमोळ्या पद्धतीने स्वागत केले. जान्हवी यांच्या माहेरून निघताना बाळाच्या स्वागतासाठी आमच्या मित्रपरिवारातील 500 हून अधिकजण मोठ्या उत्साहात 200 दुचाकी आणि 50 चारचाकी वाहनांसह सहभागी झाले होते असेही इंद्रजित काळभोर यांनी सांगितले.

लोकसेवेसाठी जीवन समर्पित करा

जीवन गौरव पुरस्कार स्विकारल्यावर डॉ अभय बंग यांचे विचार

एमआयटी डब्ल्यूपीयूतर्फे प्रा.भरत भास्कर, डॉ. सौम्या स्वामीनाथन, विवेक अग्निहोत्री व शेखर सेन यांना ‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान

पुणे, दि. ३ फेब्रुवारी: “देशातील ११ कोटी जनतेला आज ही आरोग्य सेवा मिळत नाही. त्यांच्या सेेवेसाठी आपले जीवन अर्पीत करा. विनोबा भावे यांनी ‘जय जगत’ या शब्दांचे उच्चारण केले. आज तीच अनुभूती डॉ. विश्वनाथ कराड यांचे विश्व शांतीचे कार्य पाहून होत आहे.” असे विचार सामाजिक कार्यकर्ते व सर्च फाऊंडेशनचे संचालक डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे भारत ,पुणे यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार २०२५ प्रदान समारंभ संपन्न झाला. त्या प्रसंगी जीवन गौरव पुरस्कार स्विकारल्यानंतर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड होते.

यावेळी जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर व आबुधाबी स्कूल ऑफ मॅनेजमेंट बोर्डाचे अध्यक्ष डॉ. तईब कमली हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष व भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार समितिचे निमंत्रक राहुल विश्वनाथ कराड, डॉ. मंगेश तु. कराड व कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस उपस्थित होते.

यावेळी अहमदाबाद येथील आयआयएमचे संचालक प्रा.भरत भास्कर यांना भारत अस्मिता आचार्य श्रेष्ठ पुरस्कार, डब्ल्यूएचओच्या माजी प्रमुख शास्त्रज्ञा व एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौम्या स्वामीनाथन यांना भारत अस्मिता विज्ञान-तंत्रज्ञान श्रेष्ठ पुरस्कार, सुप्रसिध्द चित्रपट निर्माता, दिग्दर्शक व लेखक विवेक अग्निहोत्री आणि प्रख्यात गायक व संगीतकार शेखर सेन यांना भारत अस्मिता जन जागरण श्रेष्ठ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रत्येकी अडीच लाख रूपये, सन्मानपत्र व स्मृती चिन्ह हे पुरस्काराचे स्वरूप होते.

फाउंडर्स डे निमित्त डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचा उपस्थित पाहुण्यांनी घोंगडी, तुकाराम महाराजांची पगडी, सायटेशन्स ऑफ ऑनर आणि विणा देऊन सत्कार करण्यात आला.

डॉ. अभय बंग म्हणाले,” आजचे युग भौतिकवादी जगाकडे पळत आहे. परंतू येथे विज्ञान, अध्यात्म आणि विवेकानंद यांचा संगम पाहताना आनंद होतो. आजचा पुरस्कार हा गडचिरोलीतील सर्व नागरिकांना समर्पित करत आहे, असे ही ते म्हणाले. ”

डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले,” समाजासाठी कार्य करणार्‍या सर्व पुरस्कार्थींचा सर्वांनी आदर्श घेऊन सामाजिक कार्य करावे. भारत अस्मिता पुरस्कार विजेते खर्‍या अर्थाने युवकांचे प्रतीक आहेत. तरूणांनी आपली ऊर्जा सकारात्मक कार्यासाठी वापरावी यासाठी लक्ष केंद्रित करावे.”

विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” संत ज्ञानेश्वर महाराजांनी दाखविलेल्या मार्गावर चालून विनाशकारी दिशेने चालल्या जगाला थांबवू शकतो. जगातील सर्वात मोठ्या डोम मूधन भारतीय तत्वज्ञान, परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन होते. अंतिम सत्य काय आहे, जीवन कसे जगावे आणि जगू नये याचे ज्ञान होणे गरजेचे आहे. ”

डॉ. राहुल कराड म्हणाले,”भारत अस्मिता पुरस्कार हा आपला राष्ट्र गौरव निर्माण करणारा आहे. आजच्या काळात सर्व युवकांनी आपली विचारधारा म्हणजेच वसाहतवादी मानसिकता बदलणे गरजेचे आहे. इंडिया ऐवजी भारत या शब्दाचा उच्चारणात आपलेपणा जाणवतो.”

पुरस्कार स्विकारल्यानंतर भरत भास्कर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुसार २०४७ साली देशाला विकसीत राष्ट्र करण्यासाठी शिक्षण संस्था या १६ पटीने वाढविणे गरजेचे आहे.

विवेक अग्निहोत्री म्हणाले, येथील सर्व विद्यार्थी हे भारताच्या स्वातंत्र्यसाठी अत्यंत महत्वाचे आहे. येथील डोम मधिल सर्व संत हेच आमचा आत्मा आहेत.

पद्मश्री शेखर सेन म्हणाले, देशातील प्रत्येक व्यक्ती ने आपल्या मातृभूमीची सेवा करावी. शिक्षण घेतांना देश सेवेचे लक्ष्य ठेऊन ते प्राप्ती पर्यंत कार्य करावे.

डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या, म. गांधीजींनी सांगितले होते की, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापरामुळे मानवाचा विकास होतो. आजचे युग हे सोशल मीडियाचे असल्याने युवकांसमोर अनेक आव्हाने आहेत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. गौतम बापट व आभार प्रदर्शन डॉ. मंगेश तु. कराड यांनी केले.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर

पुणे, दि. ३:महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २०२४ इयत्ता १ ली ते ५ वी व इयत्ता ६ वी ते ८ वीचा अंतरिम निकाल परिषदेच्या http://mahatet.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविली आहे.

दोन्ही परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल दिनांक ३१ जानेवारी २०२५ पासून संकेतस्थळावर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. या परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने गुणपडताळणी करावयाची असल्यास अथवा त्रुटी आक्षेप असल्यास http://mahatet.in या संकेतस्थळावर ६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत उमेदवारांच्या लॉगीन मधून ऑनलाईन पद्धतीने नोंदविता येईल, अन्य मार्गाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या उमेदवारांनी आपले निवेदन ६ फेब्रुवारी पर्यंत mahatet24.msce@gmail.com या इमेल वर पाठवावे, त्यानंतर प्राप्त झालेल्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी, असेही श्रीमती ओक यांनी कळविले आहे.

अंकुश चौधरी प्रथमच झळकणार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत

‘पी.एस.आय.अर्जुन’ची घोषणा

मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयकौशल्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा आणि ‘स्टाईल आयकॅान’ म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्राचा लोकप्रिय अभिनेता अंकुश चौधरीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांना पहिल्यांदाच एका दमदार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. पोस्टरमध्ये अर्जुनचा करारी आणि धाडसी लूक दिसत असून प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे एक पर्वणी ठरणार आहे. व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा, ड्रिमविव्हर एंटरटेनमेंट निर्मित ‘पी.एस.आय.अर्जुन’चे भूषण पटेल दिग्दर्शक आहेत तर विक्रम शंकर आणि ध्रुव दास निर्माते आहेत.

यापूर्वी प्रेक्षकांनी अंकुशला रोमँटिक, ॲक्शन हिरोच्या अंदाजात पाहिले आहे. मात्र या चित्रपटात अंकुश एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. सध्या तरी या चित्रपटात कोण कलाकार झळकणार हे समोर आले नसले तरी लवकरच याबद्दलची माहिती प्रेक्षकांसमोर येईल.

चित्रपटाचे निर्माते विक्रम शंकर म्हणतात, “ या चित्रपटाच्या माध्यमातून मी मराठी सिनेसृष्टीत निर्माता म्हणून पदार्पण करत आहे. यापूर्वी मी विविध भाषेत चित्रपटांची निर्मिती केली आहे. परंतु मला मराठीबद्दल नेहमीच कौतुक राहिले आहे. मुळात मराठी प्रेक्षक जाणकार आहेत. त्यांना वैविध्यपूर्ण विषय आवडतात. हा विषयही खूप वेगळा आहे आणि म्हणूनच मी या चित्रपटाची निवड केली. त्यात अंकुश चौधरीसारखा प्रतिभावान अभिनेता या चित्रपटाला लाभला आहे, त्यामुळे हा एक उत्तम योग जुळून आला आहे. अंकुश मराठीतील एवढा मोठा अभिनेता असूनही त्याचे आम्हाला खूप सहकार्य लाभले.