Home Blog Page 474

अवैध मद्यविक्रीविरोधात धाड मारताना मृत्युमुखी पडलेल्या जवानाच्या कुटुंबाला अवघ्या साडेसात लाखाची भरपाई

नाशिक -अवैध दारू विरोधी कारवाईत मृत्युमुखी पडलेल्या नाशिक येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील जवान तथा वाहन चालक कैलास गेणू कसबे यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून विशेष बाब म्हणून अवघे साडेसात लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.

नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथक क्रमांक 1 मधील अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात अवैधपणे मद्यविक्री करणाऱ्या ढाब्यावर 7 जुलै 2024 रोजी रात्री कारवाई केली होती. अवैध मद्यविक्री करणाऱ्या आरोपींच्या वाहनाचा पाठलाग करीत असताना राज्य उत्पादन शुल्क नाशिक यांच्या भरारी पथकाच्या वाहनाला आरोपींच्या वाहनाने धडक दिली व त्यामध्ये जवान तथा वाहनचालक कैलास गेणू कसबे यांचा मृत्यू झाला होता.

उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी या खात्याचा कार्यभार घेताच या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घातले. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सन 2014 मध्ये गृह विभागाने केलेल्या मदतीच्या धर्तीवर (पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय ठरल्याप्रमाणे साडेसात लाख रुपये) राज्य उत्पादन शुल्क विभागातील दिवंगत जवान कैलास कसबे यांच्या वारसांना विशेष बाब म्हणून 7.50 लाख नुकसान भरपाई मंजूर केली आहे.दरम्यान, संबंधित मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाला विभागाकडून मदत देऊ, अशी घोषणा तत्कालीन उत्पादन शुल्क मंत्री शंभुराजे देसाई यांनी केली होती. तसेच, आमची जी मोहीम सुरू आहे ती अशीच सुरु राहील. कर्तव्य बजावत असताना कर्मचाऱ्याचा जीव घेणे योग्य नाही. यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत ४ लाखाहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त

पुणे, दि.४ : राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथक क्रमांक १ च्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत वानवडी आणि मोहम्मदवाडी हद्दीत छापा मारुन ४ लाख ८३ हजार ९५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त आला आहे.

वानवडी हद्दीत लुल्लानगर चौक ते नेताजी नगर कॉलनी रोडच्या डाव्या बाजूला एक इसम महाराष्ट्र राज्यात विक्रीस, वाहतुकीस तसेच स्वतःजवळ बाळगण्यास प्रतिबंधित असलेल्या उच्च प्रतीचे विदेशी मद्य विक्रीच्या उद्देशाने पुरवठा करणार असल्याची माहिती भरारी पथक क्रमांक १ ला मिळाली त्यानुसार याठिकाणी राजकुमार उदा नारायण उपाध्याय यांच्या बॅगमधून ७५० मिली क्षमतेच्या विविध ब्रॅण्डच्या उच्च प्रतीचे विदेशी मद्याच्या एकूण ११ सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.

त्याच्या कडून चौकशीअंती मिळालेल्या अधिक माहितीच्या आधारे दिपेश कुमार विजय कुमार सहा हा राहत असलेल्या धनश्री आशियाना सोसायटी ए विंग फ्लॅट नं. ७०१ मोहम्मदवाडी, येथे छापा टाकला असता राज्यात विक्रीस, स्वतः जवळ बाळगणे तसेच वाहतूक करण्यास प्रतिबंधीत असलेल्या उच्चप्रतीच्या विदेशी मद्याच्या ७००/७५० मिली क्षमतेच्या विविध ब्रँडच्या एकूण १२८ सिलंबद बाटल्या जप्त करण्यात आल्या. दोन्ही कारवाईत मद्य वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या बॅग्ज, मोबाईल जप्त करून ४ लाख ८३ हजार ९५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई भरारी पथक क्रमांक १ चे निरीक्षक देवदत्त पोटे, दुय्यम निरीक्षक दिनेश सूर्यवंशी, पी. ए. कोकरे, सहायक दुय्यम निरीक्षक साबळे, जवान अहमद शेख, चंद्रकांत नाईक, भरत नेमाडे, अक्षदा कड, अमर कांबळे, विजय भानवसे यांनी पार पाडली. गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक दिनेश सूर्यवंशी करीत आहेत. अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक तसेच साठवणुकीबाबत काही माहिती मिळाल्यास तात्काळ राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहन निरीक्षक श्री. पोटे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

धायरी येथील रखडलेल्या सर्व चारही डीपी रस्त्यांसाठी तातडीने कार्यवाही करण्याचे पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांचे आदेश

पुणे:धायरी गाव व सिंहगड परिसरातील रखडलेल्या चारही डिपी रस्त्यांसाठी कायदेशीर भुकंपादनासह सर्व कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे आदेश आज महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी संबंधित विभागाला दिले.रखडलेल्या डीपी रस्त्याच्या निषेधार्थ प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी सर्व पक्षीय नागरिकांच्या वतीने धायरी येथे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले होते .या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांसमवेत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आज बैठक झाली.त्यावेळी आयुक्तांनी रखडलेल्या डीपी रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी आदेश दिले अशी माहिती पुणे शहर आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी दिली.यावेळी रूपाली चाकणकर धनंजय बेनकर राहुल पोकळे सनी रायकर निलेश दमीस्टे नेताजी बाबर विजय लायगुडे चिंतामणी पोकळे. यशवंत लायगुडे विकास कामठे भाग्यश्री कामठे इतर ग्रामस्थ उपस्थित होते
प्रजासत्ताकदिनी अन्नत्याग आंदोलनाची आमदार भिमराव तापकीर यांनी भेट घेतली. यावेळी आमदार तापकीर तसेच
पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी फोनवरून आंदोलकांशी संवाद साधला. तसेच आठ दिवसांत ठोस कार्यवाहीचे आश्वासन दिले होते.२८ वर्षांपासून रखडलेल्या धायरी गावातील डीपी रस्त्यांना कोणी वाली उरला नाही.वर्षानुवर्षे डीपी रस्ते कागदावरच आहेत .पर्यायी रस्ते नसल्याने धायरी गावासह इतर रस्त्यावर वाहतूक कोंडीची गंभीर बनली आहे.रोजच्या वाहतूक कोंडीने नागरिकांचे हाल सुरू आहेतसिंहगड रोड ते धायरी सावित्रीगार्डन डी पी रोडसाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा होऊनही हा रस्ता कागदावरच आहे.तर काकासाहेब चव्हाण बंगला ते नऱ्हे, बेनकर वस्ती ते नऱ्हे व पारी कंपनी ते लक्ष्मी लाॅज हे तीन रस्तही कागदावर आहेत.आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले,

प्रशासनाने धायरी गावात ४ डीपी रस्त्यांचे नियोजन हे २८ वर्षांपूर्वी केले आहे. मात्र याबाबत कोणतीही हालचाल करण्यात येत नाही.काही ठिकाणी अर्धवट भूसंपादन करण्यातआले आहेत.धायरी गावातील सर्व चारही डि. पी. रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात यावीत यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मुंबईत आझाद मैदानावर उपोषण केले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्याची दखल घेत राज्य शासनाच्या मुख्य सचिवांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीही प्रशासन सुस्त असल्याने अन्नत्याग आंदोलन करावे लागले.

जिल्हास्तरावरील युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे दि.४: राज्याचे युवा धोरण जाहीर करण्यात असले असून या शिफारशींच्या अनुषंगाने राज्य व जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येणार आहेत. तरी २०२३-२४च्या पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.

जिल्हास्तरावर एक युवक, एक युवती तसेच एक नोंदणीकृत संस्था यांना गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम या स्वरुपात पुरस्कार देण्यात येणार आहे. युवक, युवतीसाठी रोख रक्कम ५० हजार रुपये तर संस्थेकरीता १ लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. युवक-युवती १३ ते ३५ या वयोगटातील असावा. अर्जदाराचे त्या जिल्ह्यात सलग ५ वर्षे वास्तव्य असणे आवश्यक आहे. पुरस्कार दिल्यानंतर दोन वर्ष क्रियाशील राहणे आवश्यक आहे. संस्था नोंदणीकृत व किमान पाच वर्ष कार्यरत असावी. अर्ज करणाऱ्या उमेदवार, संस्थेने मुलाखती व कार्याची संगणकीय सादरीकरणाची (पीपीटी) सीडी आदी सबळ पुरावे पृष्ठांकन करुन जोडणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी व अर्जासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, विभागीय क्रीडा संकुल, महाराष्ट्र हौसिंग सोसायटी, मोझे हायस्कुल समोर, येरवडा-06 (क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुकस्वार भ्रमणध्वनी क्र. ९५५२९३१११९) येथे संपर्क साधावा, असे श्री. कसगावडे यांनी केले आहे.

महा एनजीओ फेडरेशन तर्फे ३०० दिव्यांगांना ट्रायसिकल व्हीलचेअर व अंधकाठी

पुणे : महा एनजीओ फेडरेशन यांच्या माध्यमातून आणि कार्डमॉम लॉजिस्टिक असेट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सीएसआर उपक्रमातून ३०० दिव्यांग बांधवांना मोफत ट्रायसिकल व्हीलचेअर व अंधकाठी याचे वाटप करण्यात आले. चाकण येथील श्रेया लॉन्स येथे आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 
साहित्याचे वाटप प्रसिद्ध अभिनेते संदीप पाठक, दिव्यांग भवन फाउंडेशन चे कार्यकारी संचालक ओमप्रकाश देशमुख, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, कार्डमॉम लॉजिस्टिक्स असेस्टस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे व्यवस्थापक अजित पाटील, महा एनजीओ फेडरेशनचे संचालक अमोल उंबरजे, मुकुंद शिंदे, योगेश बजाज, पोलीस निरीक्षक नकुल न्यामने यांच्या हस्ते करण्यात आले.
दिव्यांग बांधवांना स्वतःचा उदरनिर्वाह चालू करण्यासाठी ट्रायसिकल मध्ये बॉक्स टेबलची व्यवस्था केलेली आहे. जेणेकरून वस्तूंची विक्री करून ते स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतील व तसेच अपंग लोकांना व्हीलचेअर उपयोगी पडण्यासाठी याचे वाटप करण्यात आले. यावेळी संदीप पाठक यांनी सेवा व कलाकार याविषयी सांगितले व वऱ्हाड निघालय लंडनला या नाटकातील काही भाग सादर करून सर्व दिव्यांग बांधवांची मने जिंकली. 
महाराष्ट्र गो सेवा आयोगाचे अध्यक्ष तथा महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा यांनी दिव्यांगांना कोणकोणत्या प्रकारच्या माध्यमातून सेवा कार्य करता येईल, याबाबत उपस्थितांना संबोधित केले. दिव्यांग भवन फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख म्हणाले, महा एनजीओ फेडरेशन सारखे संस्था व कार्डमॉम सारखे कंपनी व शासन मिळून अश्या प्रकारचे उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करावेत. 
कार्डमॉम लॉजिस्टिक्सचे अजित पाटील म्हणाले, कंपनी नेहमी अश्या सामाजिक उपक्रमांसाठी आपण नेहमी सहकार्य करत असतो. महा एनजीओ फेडरेशनचे संचालक व ह्या उपक्रमाचे संयोजक अमोल उंबरजे यांनी या उपक्रमाचा उद्देश सांगत म्हणाले, दिव्यांगसोबत नेहमी आपण असे सामाजिक उपक्रम राबवू. 
कार्यक्रमावेळी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. तसेच दिव्यांगांसाठी शासकीय योजनांचा प्रचार व प्रसार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अर्चना घुंडरे, राहुल जगताप, अपूर्वा कारवा, कोमल विठ्ठल, रवींद्र चव्हाण, सागर पाटील, चेतन मराठे, दिलीप शेलवंटे, अजित मनामी, रत्नशिल गायकवाड, विठ्ठल काळे, यांचा सहभाग होता.

महाबळेश्वर, जावळी तालुक्यातील कोयना जलाशयातील बुडीत बंधारे बांधण्यासाठी १७० कोटी रूपयांची तरतूद

मुंबई-सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व जावळी तालुक्यातील कोयना जलाशयामध्ये बुडीत होणारे २५ बंधारे बांधण्यासाठी १७० कोटी रूपयांची तरतूद करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

कोयना जलाशय परिसरातील हे २५ बंधारे बुडीत क्षेत्रात येतात. या जलाशयाची पाणी पातळी फेब्रुवारी ते मे या महिन्यांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात कमी होते. त्यामुळे या परिसरातील स्थानिक रहिवाश्यांना पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची समस्या भेडसावते. ही समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना म्हणून या बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यासाठी या बंधाऱ्यांच्या बांधकामांसाठी १७० कोटी रुपयांची तरतूद करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली.

मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करा:मंत्रिमंडळातून बडतर्फ करा- विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

मुंबई- सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महायुती सरकारमधील तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेले सदरील आरोप अत्यंत गंभीर असून त्यांच्यावर तातडीने राज्य शासनाने गुन्हा दाखल करून मंत्रिमंडळातून बडतर्फ करा, अशी मागणी शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.थेट लाभ हस्तांतरांचे नियम बंधनकारक असताना मंत्री धनंजय मुंडे यांनी आणि कृषीखात्याने खतांची खरेदी करताना सर्व नियम धाब्यावर बसवले. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे हस्तांतरित न करता अनेक वस्तू बाजारपेठेतून खरेदी करण्यात आल्या. प्रत्येक गोष्टीमागे बाजारभावाच्या तुलनेत दुप्पट पैसे मोजण्यात आले असल्याने धनंजय मुंडे यांनी कृषीमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांच्या विभागात तब्बल 88 कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा,गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.

शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या मंत्र्याला ताबडतोब घराचा आहेर दाखवला पाहिजे. राज्य सरकारने कसलाही वेळ न दवडता मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे.आगामी काळात राज्याचे विधीमंडळ अधिवेशन असून त्यांच्या राजीनामा शिवाय हे अधिवेशन चालूच देणार नसल्याचा इशारा,दानवे यांनी राज्य सरकारला दिला.शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा हा प्रकार आहे.अव्वाच्या सव्वा दराने हे कृषी साधने खरेदी करण्यात आली असून विना कंत्राट देताही शासकीय आदेश काढण्यात आले असल्याची गंभीर बाब समोर आली, असल्याची माहिती अंबादास दानवे यांनी दिली.

राज्याचे कृषी मंत्री असा भ्रष्ट कारभार करत असताना मुख्यमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या ही बाब लक्षात आली नाही, याचे आश्चर्य वाटते. त्यांनी ठरवून सदरील प्रकरणाकडे डोळेझाक केली आहे, अशी नाव न घेता तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अंबादास दानवे यांनी टीका केली.धनंजय मुंडे यांनी कृषी खात्याचे दिलेले भ्रष्ट प्रस्ताव तात्कालीन मुख्यमंत्री यांनी मंजुरी दिली होती, याचा अर्थ संपूर्ण सरकार यामध्ये सहभागी होते की काय? असा प्रश्न उपस्थित करत धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांच्या दबावाखाली तत्कालीन अधिकारी पारदर्शक कामे करू शकली नाही. व्ही. राधा सारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांना ही सुव्यवस्थित कामे करता आले नाही. कुख्यात खंडणीखोर वाल्मीक कराड कृषी खाते चालवत असल्याची, प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली.

धनंजय मुंडे सारखे भ्रष्ट मंत्री कोणत्याच समाजाचे अथवा जातीचे होऊ शकत नाही.खरेतर ते समाज कंटक आहे, असा गंभीर आरोप करत शेतकरी विरोधी व्यक्तीचे कधीच कल्याण होऊ शकत नाही.धनंजय मुंडे यांच्या कृषी विभागातील भ्रष्ट कारभाराला तत्कालीन महायुती शासनाचे संरक्षण होते. गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचे काम धनंजय मुंडे यांचे आहे.वाल्मिक कराड सारख्या कुख्यात गुन्हेगाराला धनंजय मुंडे पोसतात,असा जोरदार हल्लाबोल दानवे यांनी यावेळी केला.

टेमघर प्रकल्पाचे मजबुतीकरण, गळती रोखण्याच्या कामांसाठी ३१५ कोटी ५ लाख रूपयांच्या खर्चास मान्यता

मुंबई/पुणे -जिल्ह्यातील टेमघर प्रकल्पाचे (ता. मुळशी) मजबुतीकरण व गळती रोखण्याच्या कामांकरिता ३१५ कोटी ५ लाख रूपयांच्या खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

टेमघर धरणातून पुणे शहराला दरवर्षी ३.४०९ अघफू पाणी पिण्यासाठी उपलब्ध केले जाते. तसेच मुळशी तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-याद्वारे १ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. हा प्रकल्प पुणे शहराच्या वरच्या बाजूस आहे. या प्रकल्पाला गळती लागल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. यामुळे धरणाच्या तसेच पुणे शहराच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसा अहवाल विविध समित्यांनी दिला आहे. त्यांच्या शिफारशींचा विचार करता धरणाची गळती रोखण्यासाठी तातडीने उपाय योजना करण्याची आवश्यकता आहे. हे काम केल्याने गळती थांबणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठीही पाणी उपलब्ध होणार आहे. या सर्व बाबींचा एकत्रित विचार करता आज झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने टेमघर प्रकल्पाच्या गळती रोखण्यासाठीच्या उपाययोजना व धरण मजबुतीकरण कामासाठी ३१५ कोटी ५ लाख रुपयांच्या किंमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली.

 टेमघरच्या खराब बांधकामासंदर्भात शासनातर्फे मुकुंद विठ्ठल म्याकल (४२) यांनी फिर्याद २०१६ मध्ये पोलिसात दिलेली आहे.   दोन कंपन्यामधील ९ जणांनी व इतर २४ शासकीय अधिकाऱ्यांनी संगनमत करून धरणाचे बांधकाम करताना बनावट व कमी दर्जाचे साहित्य वापरून धरणाची गुणवत्ता राखली नाही. तसेच खोटे दस्तावेज करून शासनाच्या निधीचा अपहार करून फसवणूक केली.अशी हि तक्रार होती धरणातून पाण्याची गळती होत असल्याचे समोर आल्यानंतर तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी धरणाची पाहाणी केली.आणि एकूण ३४ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणाचे पुढे काय झाले ते समजू शकले नाही. मात्र त्यापूर्वीपासून धरणाची दुरुस्ती सुरूच असल्याचे सांगितले जाते.

वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरणाच्या अभय योजनेस वर्षभराची मुदत वाढ

मुंबई-शासकीय भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरणासाठी सवलतीच्या दराने अधिमूल्य आकारण्याच्या अभय योजनेस वर्षभराची मुदत वाढ देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

कृषिक, निवासी, वाणिज्यिक किंवा औद्योगिक प्रयोजनासाठी दिलेल्या शासकीय जमिनींचे किंवा भाडेपट्टयाने दिलेल्या वर्ग-२ जमिनींचे वर्ग-१ मध्ये रूपांतरण करण्यासाठी सवलतीच्या दराने अधिमूल्य भरण्यासाठीची मुदत संपली आहे. मात्र, राज्यात अशी रुपांतरणाची खूप प्रकरणे प्रलंबित असल्याने या योजनेस मुदतवाढ देण्याबाबत वारंवार मागणी करण्यात येत होती. त्यामुळे या सवलतीच्या दराने अधिमूल्य भरण्याच्या योजनेस आणखी एक वर्षांची मुदत वाढ देण्यास मान्यता देण्यात आली. यानुसार यापूर्वी प्रलंबित असलेल्या प्रकरणांना तसेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत दाखल होणाऱ्या अर्जांसाठी ही योजना लागू राहणार आहे. याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

रास्त भाव दुकान परवाना मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. ४: जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १३ तालुक्यांमध्ये ४४६ ठिकाणी रास्त भाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून परवाना मिळण्याच्या अनुषंगाने १५ फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.pune.nic.in या संकेतस्थळावर हा जाहीरनामा उपलब्ध आहे. या जाहीरनाम्यात सविस्तर अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रांचा तपशील, नमुना अर्ज आदीबाबतची माहिती समाविष्ट असून संबंधीत तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेत याबाबत संपूर्ण तपशील व कोरे अर्ज उपलब्ध आहेत.

तहसील कार्यालयात परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचा कालावधी ३० जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२५ असा असून तरी इच्छुकांनी विहित मुदतीत अर्ज करावेत; मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी पसिद्धी पत्रकान्वये कळवले आहे.

सैनिक कल्याण विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन

पुणे, दि. ४: सैनिक कल्याण विभागामार्फत माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरपत्नी, वीरमाता व वीरपिता यांना ऑनलाईन पद्धतीने आर्थिक मदतीचा लाभ घेण्याकरीता www.ksb.gov.in या संकेतस्थळावर नवीन ओळखपत्राकरिता नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सेवानिवृत्त सैनिकी अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरपत्नी, वीरमाता व वीरपिता यांनी सैनिक कल्याण विभागाच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतर कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, चौथा मजला, बी. विंग, विधानसमोर पुणे- 1 येथे अर्जाची मूळ प्रत जमा करुन आपली माहिती अद्यावत करावी तसेच नवीन ओळखपत्रही प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कर्नल हंगे स.दै. (नि) यांनी केले आहे.

किल्ले शिवनेरी येथे होणाऱ्या शिवजयंती उत्सवानिमित्त वाहतुकीत बदल

पुणे, दि. ४ : किल्ले शिवनेरी (ता. जुन्नर) येथील शिवजयंती उत्सवाच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते २० फेब्रुवारी २०२५ रोजी मध्यरात्रीपर्यंत (०.०० वा.) जुन्नर शहर व परिसरात काही मार्गावर एकेरी वाहतुकीचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत.

या आदेशानुसार नारायणगाव येथून जुन्नरकडे येणारी वाहतूक ही घोडेगाव फाटा-खानापूर महाविद्यालय मार्गे धामनखेल मार्गाने शिवनेरी किल्ल्याकडे ताथेड वाहनतळ या ठिकाणी जातील. ताथेड वाहनतळ ठिकाणी लावण्यात आलेली वाहने पुन्हा माघारी जाताना वडज-सावरगाव-वारुळवाडी-नारायणगाव- घोडेगाव मार्गे जाईल.

गणेशखिंड- बनकफाटा- ओतूर या मार्गे शिवनेरीकडे येणारी वाहने ही मुंढे माध्यमिक शाळा व आसपासच्या परिसरात असलेल्या वाहनतळाच्या ठिकाणी लावतील व पुन्हा त्या मार्गे कल्याण- अहिल्यानगर, नाशिक मार्गे जातील. आपटाळे – सोमतवाडी ता. जुन्नर कडून येणारी वाहने ही प्रदक्षिणा मार्गाने हॉटेल शिवबा समोरुन ताथेड वाहनतळ येथे जातील व पुन्हा वडज मार्गे जातील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

अंजलीताई, फडणवीस-शिंदेंना सेफ का करता ? :सुषमा अंधारेंचा सवाल

मुंबई-सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांनी कृषीमंत्री असताना पावणे तीनशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. मात्र, या पत्रकार परिषदेतून धनजंय मुंडेंना लक्ष्य करताना, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सेफ करण्याचा प्रयत्न दमानिया यांच्याकडून केला जातोय का? असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. तसेच या पत्रकार परिषदेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपीही त्यांनी केला.

सुषमा अंधारे यांनी अंजली दमानिया यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर सोशल मीडिया एक्सवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमधून त्यांनी अंजली दमानियांच्या पत्रकार परिषदेवर प्रश्न उपस्थित केले. तसेच पत्रकार परिषदेतील एक वाक्यावर आक्षेप घेत या पत्रकार परिषदेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या.

पत्रकार परिषदेत बोलताना आज दमानिया देवेंद्र फडणवीस आणि तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका सेफ झोनमध्ये ठेवण्याचा प्रयत्न का करत होत्या ते कळलं नाही, असा प्रश्न ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला.

अंजली दमानियांच्या लढ्याबद्दल कौतुकच. पण आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना, “… एक डेप्युटी सेक्रेटरी आहे आणि तोही कराडच ” हे वाक्य पत्रकार परिषदेला जातीय रंग देणारे आहे याचे कृपया त्यांना भान असावे. वाल्मीक कराड किंवा या हत्या प्रकरणाशी संबंधित जो जो गुन्हेगार आहे त्या प्रत्येकाला फाशीच व्हायला हवी. मात्र कराड नावाची प्रत्येक व्यक्ती गुन्हेगारच असते हा चष्मा काढून टाका. कारण मग या न्यायाने आपण वि. दा. कराड यांना सुद्धा गुन्हेगार ठरवायला मागेपुढे बघणार नाहीत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातला फोकस हलू नये यासाठी ही मांडणी महत्वाची आहे, असे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

बीडमध्ये दादागिरी करणे,जमिनी लाटणे असे करणारांनी,मला बदनामिया ऐवजी पुराविया म्हणायला हवे

मुंबई-सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. बदनाम लोकांचे जर मी पुरावे देत असेल तर मला काही फरक पडत नाही. तुम्हाला तुमची जागा दाखवणार, असे म्हणत अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाण साधला आहे.अंजली दमानिया म्हणाल्या, तुम्ही जेवढा वेळ काढला म्हणजे कराडसोबत जेवढा वेळ तुम्ही घालवला होता. मंत्री म्हणून तुम्ही जरा वेळ दिला असता तर ही वेळ आली नसती. पण बीडमध्ये जाऊन दादागिरी करणे, जमिनी लाटणे असे प्रकार तुम्ही करत बसलात, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.धनंजय मुंडे यांनी मला बदनामिया असे नाव ठेवले. खरं तर त्यांनी पुराविया असे ठेवायला पाहिजे होते. पण बदनाम लोकांना त्यांचे पुरावे मी देत असेल, तर मला कुठलंही नाव चालेल. त्यांना जे म्हणायचे ते म्हणू द्या, असा टोला अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांना लगावला. एक-एक पुरावे बाहेर काढून तुम्हाला तुमची जागा दाखवणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला. तुम्ही जितका वेळ एक मंत्री म्हणून काढला, जेवढा वेळ तुम्ही कराड बरोबर काढला असेल, त्याच्या 1 टक्का जरी मंत्री म्हणून तिथे बसला असता, तर आज तुम्हाला आज हे दिवस बघावे लागले नसते.

तुम्ही जे जे बोलत होतात, ते कसे खोटे आहे, हे दाखवण्यासाठी मी पुन्हा पत्रकार परिषद घेत आहे. आता हे अपलोड केले कागदपत्रे मी पुन्हा वाचून दाखवत आहे. कारण तुम्ही जे जे म्हणालात, ते कसे चुकीचे आहे ते मी दाखवणार आहे.

यावेळी अंजली दमानिया यांनी जीआर वाचून दाखवला. त्या म्हणाल्या, 12 एप्रिल 2018 चा जीआर आहे. दिनांक 5 डिसेंबर 2016 च्या परिच्छेद एक मध्ये नमूद केल्यानंतर थेट लाथ हस्तांतरण संदर्भात नवीन वस्तुंचा समावेश करण्याचे अधिकार माननीय मुख्यमंत्री यांना देण्यात आलेले आहेत. तथापी, वस्तू वगळण्याचे अधिकार देण्यात आलेले नाहीत. कृपया याची नोंद घ्या. मुख्यमंत्र्यांना वस्तू वगळण्याचे अधिकार देण्यात आलेले नाहीत. डॉक्युमेंट नंबर 26 अपलोड केलेले आहे, ते कृपया धनंजय मुंडे यांनी डोळे उघडून बघावे, असे आवाहन अंजली दमानिया यांनी केले.

अंजली दमानिया म्हणाल्या, दोन अधिकारी आहेत, त्यातील एक अधिकारी म्हणतात महाराष्ट्र शासनाने थेट लाभहस्तांतरण धोरण स्वीकारल्यापासून शेतकऱ्यांना द्यायच्या निवेष्ठा आणि शेतकऱ्यांना खरेदी विक्रीची मुभा देण्यात आली असून म्हणजे 19/04/2017 चा शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मागे शासन पुरस्कृत संस्था जसे मी म्हणाले होते, एमआयडीसी किंवा महाबिज जे काही बनवून देते ते सगळे वगळून डीबीटीने थेट देण्यात यावे, असे पूरक पत्र 12/09/2017 रोजी निर्गमित करण्यात आले आहे. पुढे ते म्हणतात कापूस व सोयाबीन उत्पादकता वाढीमध्ये आवश्यक असणाऱ्या या निवेष्ठा देखील महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ तसेच शासकीय संस्थेमार्फत राबावण्याबाबत शासनमान्यता देण्यात आली आहे.

अंजली दमानिया पुढे बोलताना म्हणाल्या की, शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर जर कुठे कठीण वाटत असेल, एखाद्या लोकप्रतिनिधीला वाटत असेल, अमुक पुस्तक डीबीटीमध्ये न जाता, ते थेट देण्यात यावेत, असे कुणाला वाटत असेल, त्याच्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करण्यासाठी एक छानणी समिती स्थापन करणे शासनाच्या विचाराधीन होते. त्याअनुषंगाने ही समिती स्थापन केले जात असल्याचा उल्लेख आहे. ही समिती जोपर्यंत मान्यता देत नाही, तोपर्यंत कुठलीही वस्तू डीबीटीच्या बाहेर वगळण्याचे मुख्यमंत्री, कृषीमंत्री किंवा कोणालाही अधिकार नाहीत. मुख्य सचिव, अप्पर मुख्य सचिव नियोजन, प्रधान सचिव माहिती व तंत्रज्ञान आणि इतर 9 लोकांना याबाबत निर्णय घेऊ शकतात.

एखाद्याच राजकीय आणि सामाजिक आयुष्य संपवणे एवढे सोपे नसते, अंजली दमानिया नव्हे या तर अंजली बदनामिया – धनंजय मुंडेंनी दिले प्रत्युत्तर

मुंबई-अंजली दमानिया यांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे आहेत. हे केवळ त्यांच्या स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करण्यासाठी केले गेले आहेत. कृषी विभागात मी मंत्री असतानाच्या काळात झालेली सर्व खरेदी ही शासन नियमानुसारच झाली असल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केला आहे.सनसनाटी, धादांत खोटे आरोप करायचे आणि स्वतःची प्रसिद्धी मिळवायची, याव्यतिरिक्त याच्यात मला काहीही आढळत नसल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. गेल्या 59 दिवसापासून माझ्यावर मीडिया ट्रायल चालू आहे. ते का चालू आहे? कोण चालवतेय? हे मला माहिती नाही, असे देखील मुंडे यांनी म्हटले. यावेळी त्यांनी अंजली दमानिया यांचा अंजली बदनामिया असा उल्लेख करत टोला हाणला.

धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना त्या विभागात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. त्यांच्या या आरोपाला मुंडे यांनी सडेतोड उत्तर दिले आहेत. आम्ही शांत बसलो म्हणजे आम्हाला बोलता येत नाही, असा होत नाही. मुख्यमंत्र्यांचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांना ऐवजी दमानियांना माहित आहे का? असा प्रश्न देखील मुंडे यांनी उपस्थित केला. अंजली दमानिया यांचा खोटेपणा हा केवळ मला बदनाम करण्यासाठी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अंजली दमानिया यांनी आजपर्यंत केलेले कोणतेच आरोप खरे निघाले नसल्याचेही मुंडे यांनी म्हटले आहे.

अंजली दमानिया जेव्हापासून आरोप करतात तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी केलेला एकही आरोप सिद्ध झाला आहे का? असा प्रश्न देखील धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. या आधी ज्या नेत्यांवर त्यांनी आरोप केले, त्या नेत्यांकडे जाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. असे देखील मुंडे यांनी म्हटले आहे. संतोष देशमुख यांचे आरोपी मारले गेले आहेत, असा दावा देखील दमानिया यांनी केला होता. हा देखील दमानियांचा खोटेपणा होता, असे देखील मुंडे यांनी म्हटले आहे. आरोप करण्याचे काम ज्यांनी केले, त्यांना शुभेच्छा. मात्र, माझे राजकीय आयुष्य मायबाप जनतेवर अवलंबून असल्याचा दावा देखील मुंडे यांनी केला आहे.

मी मंत्री असताना कृषी विभागात जी प्रक्रिया राबवली गेली ती पूर्ण पूर्व मान्यतेनेच राबवली गेली असल्याचा दावा मंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्यामध्ये विविध कंपन्यांकडून स्पर्धात्मक दर मागवले गेले होते. त्यात जास्तीत जास्त कंपन्यांनी सहभाग व्हावे म्हणून दोन वेळा निविदा प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली होती. भ्रष्टाचार करायचा असता तर दोन वेळा मुदत वाढ देईल का? असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला.

बीडमध्ये भयंकर घटना घडली आहे. ही संवेदनशील घटना आहे. या प्रकरणी आरोपींना फासावर लटकवणे आमची जबाबदारी आहे. यातून वाद विवाद नको म्हणून मी गप्प आहे. एक विषय झाला की दुसरा विषय काढला जातोय? काय करायचं? अंजली दमानिया माझ्यावर सातत्याने आरोप करण्याचे काम करत आहेत. त्यांना हे काम ज्यांनी कोणी दिले असेल त्यांना माझ्या शुभेच्छा. मात्र साप साप म्हणून जमीन थोटपणे, मीडियातून सनसनाटी निर्माण करणे आणि एखाद्याच राजकीय आणि सामाजिक आयुष्य संपवणे एवढे सोपे नसते, असे आव्हान देखील मुंडे यांनी दिले आहे.