Home Blog Page 472

आरटीई प्रवेशासाठी प्रलोभनांना बळी न पडण्याचे पालकांना आवाहन

पुणे, दि. ५ : आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक प्रक्रिया असून या प्रक्रियेत लॉटरी पध्दतीने सोडत काढून प्रवेश पात्र लाभार्थी व प्रतिक्षाधिन लाभार्थी याची शाळानिहाय यादी घोषित केली जाते. यामध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप केला जात नाही. पालकांनी बालकांच्या प्रवेशासंदर्भात कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये असे आवाहन शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी केले आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार आरटीई २५ टक्के प्रवेश वंचित व दुर्बल घटकातील मुला-मुलांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. पालकांना प्रलोभन देण्याचे गैरप्रकार निदर्शनास आल्यास याबाबत संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), प्रशासन अधिकारी मनपा, नपा, संबंधित विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे (depmh2@gmail.com), आयुक्त (शिक्षण), पुणे (educommoffice@gmail.com) यांचेकडे ई-मेलद्वारे अथवा समक्ष आपली तक्रार पुराव्यासह नोंदविण्यात यावी.

असा कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितावर नियमानुसार फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही श्री. गोसावी यांनी कळविले आहे.
0000

दादासाहेब फाळके चित्रनगरीत 50 वृक्षांची लागवड

50 व्या वाढदिवसानिमित्त सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर यांचा अभिनव उपक्रम

मुंबई 05 फेब्रुवारी : दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये स्वच्छ व हरित शाश्वत चित्रनगरी सप्ताह साजरा केला जात आहे. याच पार्श्वूमीवर महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी अनोख्या पद्धतीत वृक्षारोपण करत आपला वाढदिवस साजरा केला आहे.

चित्रनगरीत 3 ते 8 फेब्रुवारीदरम्यान शाश्वत व हरित चित्रनगरी उपक्रम राबवण्यात येत आहे. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने चित्रनगरीला अधिक हरित बनवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी आपल्या वाढदिवशी वृक्षारोपण करुन पर्यावरण स्नेही वाढदिवस साजरा केला.

यावेळी डॉ. सावळकर म्हणाले,”महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘माझी चित्रनगरी, हरित चित्रनगरी’ हा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे या उपक्रमाला जोडूनच आज मी वाढदिवसानिमित्त आपली गोरेगावची चित्रनगरी आणखी हरित करण्याच्या दृष्टीने 50 बहावा या कोकणातल्या वृक्षाची ज्याला सुंदर अशी सोनेरी रंगाची फुले येतात, अशा रोपांची लागवड करण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या चित्रनगरीतील सर्व सहकाऱ्यांचेही आभार”.

स्टुडिओ नंबर दोनच्या समोर ही रोप लावण्यात आली असून यावेळी चित्रनगरीतील अधिकारी- कर्मचारी यांनीही वृक्षारोपण केलं. दरम्यान डॉ. सावळकर यांचा वाढदिवसही उत्साहात साजरा करण्यात आला.

महाबळेश्वर येथे 26 ते 28 एप्रिल पर्यटन महोत्सवाचे आयोजन- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. 5 : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग, पर्यटन संचालनालयाद्वारे राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी दि. 26 ते 28 एप्रिल 2025 या कालावधीत तीन दिवस महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. पर्यटन विभाग व स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणाऱ्या तीन दिवसीय महोत्सवात प्रेक्षणीय स्थळे, स्थानिक कला – संस्कृती , खाद्यसंस्कृतीची ओळख पर्यटकांना व्हावी आणि या माध्यमातून पर्यटन वृद्धी व्हावी हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
या तीन दिवसीय पर्यटन महोत्सवाला पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी,सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील.
स्ट्रॉबेरी व कृषी पर्यटन महोत्सवाचे आयोजन
या महोत्सवात कला-संस्कृती, हस्तकला, पाककृती तसेच स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी व स्थानिक पर्यटन स्थळांना पर्यटनात्मक प्रसिध्दी देण्यात येईल. यासह महोत्सवात स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडविणारे कार्यक्रम तसेच नामांकीत कलाकारांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमांचे आयोजन करणे. त्याचप्रमाणे, स्ट्रॉबेरी व कृषी पर्यटन महोत्सवाचे आयोजन, महाबळेश्वर परिसरातील पाचगणी, कास पठार, कोयनानगर, तापोळा, गड-किल्ले दर्शन व इतर पर्यटन स्थळ दर्शन सहलीचे आयोजन , पर्यटकांसाठी विविध श्रेणीच्या तंबू निवास उभारणी, पॅराग्लाडींग, पॅरामोटरींग, जलक्रिडा, ट्रेकींग, रॉक क्लायबींग, घोडेस्वारी इ. विविध साहसी उपक्रम राबविणे, स्थानिक बचत गटांचे हस्त कला-कृतीचे प्रदर्शन व विक्रीचे दालन उभारणी, स्थानिक पाककलाकृती संस्कृती व खाद्य महोत्सव दालन उभारणी, महाबळेश्वर येथील विविध प्रेक्षणीय स्थळे व पुरातन मंदिरांचे दर्शन इत्यादी कार्यक्रम आयोजित केले आहेत.
या महोत्सवात विशेषतः देशांतर्गत विविध राज्यातील पर्यटन क्षेत्राशी निगडीत भागधारक, प्रवासी संस्थांचे प्रतिनिधी, ट्रॅव्हल एजेंट, टूर ऑपरेटर्स, सोशल मीडिया प्रभावक यांना आमंत्रित करुन त्यांचा समावेश असलेल्या परिचय सहलीचे आयोजन करण्यात येईल.
तीन दिवसीय महोत्सवाची वैशिष्ट्ये :-
स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडविणारे कार्यक्रम तसेच नामांकीत कलाकारांचा सहभाग,स्ट्रॉबेरी व कृषी पर्यटन महोत्सवाचे आयोजन, पर्यटकांसाठी विविध श्रेणीच्या तंबू निवास उभारणी,पॅराग्लायडींग, पॅरामोटरींग, जलक्रीडा, ट्रेकींग, रॉक क्लायबिंग, घोडेस्वारी इ. विविध साहसी उपक्रम राबविणे,स्थानिक बचत गटांचे हस्त कला-कृतीचे प्रदर्शन व विक्रीचे दालन,स्थानिक पाककलाकृती संस्कृती व खाद्य महोत्सव दालन,महाबळेश्वर येथील विविध प्रेक्षणीय स्थळे व पुरातन मंदिरांचे दर्शन असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
महाबळेश्वरनजिक अन्य पर्यटन स्थळे :-
महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाटात वसलेले हे एक गिरीस्थान आहे. हे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर समुद्रासपाटीपासून सुमारे ४५०० फूट उंचीवर वसलेले आहे. जुन्या बॉम्बे प्रेसीडेन्सीची ही पूर्वीची ऊन्हाळी राजधानीचे ठिकाण होते. येथील विलक्षण हिरवळ सुंदर बागा आणि श्वास रोखून धरणारी दृश्य हे पर्यटकांना भुरळ घालतात. ब्रिटीश काळात बांधलेल्या असंख्य भव्य वास्तू आजही गत स्मृतीची आठवण करुन देतात. हे ठिकाण स्ट्रॉबेरी व्यतिरिक्त असंख्य नद्या, भव्य कॅस्केड, भव्य शिखरे, प्राचीन मंदीरे, बोर्डींग स्कूल, सुंदर आणि हिरवेगार घनदाट जंगल, धबधबे, टेकड्या व दऱ्यांसाठी देखील प्रसिध्द आहे.
निवासव्यवस्था आणि उपक्रम
पर्यटकांसाठी विविध श्रेणींतील निवास व्यवस्था उपलब्ध असणार आहे. ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग आणि घोडेस्वारी यासारख्या साहसी उपक्रमांचा अनुभवही पर्यटकांना घेता येईल. तसेच, स्थानिक बाजारापेठांमध्ये फेरफटका, सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीचा आस्वादही पर्यटकांना घेता येईल. रोजच्या दिनक्रमातून दूर जात अनुभवसमृद्ध पर्यटनासाठी हा महोत्सव उत्तम पर्याय आहे.
परिचय सहली आणि परिसंवाद कार्यक्रम
भागधारक, ट्रॅव्हल एजन्सीचे प्रतिनिधी, टूर ऑपरेटर आणि सोशल मीडिया प्रभावक यांच्यासाठी परिचय सहलीचे आयोजन केले जाईल. त्याचप्रमाणे, पर्यटन क्षेत्राशी निगडीत भागधारक, व्यावसायिक व ट्रॅव्हल एजेंट इ. यांचा सहभाग असलेल्या परिसंवाद कार्यक्रमही पार पडेल. महाबळेश्वरची संस्कृती, सौंदर्य आणि साहस अनुभवू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी महाबळेश्वर पर्यटन महोत्सव हा परिपूर्ण उपक्रम आहे.

हिंदू गर्जना चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धाचा पुण्यात ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान रंगणार जंगी आखाडा

  • हिंदू गर्जना प्रतिष्ठान व पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

पुणे :
हिंदू गर्जना प्रतिष्ठान व पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने ‘हिंदू गर्जना चषक महिला व पुरुष राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा २०२५ येत्या दि. ७ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत रंगणार आहे या कुस्ती स्पर्धेसाठी तब्बल ४५ लाखांची बक्षिसे असून खुल्या विजेत्याला महिंद्रा थार गाडी, चांदीची गदा आणि २ लाख ५१ हजारांचे बक्षिस दिले जाणार आहे.
पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन आणि हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे यांनी पत्रकार परिषदेत या स्पर्धे विषयी माहिती दिली. शिक्षण प्रसारक मंडळीच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने ही स्पर्धा होणार आहे.
टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेत खुला गट हा राज्यस्तरीय पुरुष आणि महिला असा असणार असून इतर गट पुणे शहर आणि जिल्हा अशा स्वरूपाचा असणार आहे. खुल्या गटातील पुरुष विजेत्याला महिंद्रा थार, चांदीची गदा आणि २ लाख ५१ हजार आणि स्मृतीचिन्ह असे बक्षीस देण्यात येणार आहे. तर दुसऱ्या क्रमांकाला १ लाख ५१ हजार आणि स्मृतीचिन्ह आणि तृतीय क्रमांकाला १ लाख ५१ हजार असे बक्षीस देण्यात येणार आहे. तर खुल्यातील गटातील महिला विजेत्याला २ लाख ५१ हजार ई- बाईक आणि चांदीची गदा, द्वितीय क्रमाकांच्या विजेत्याला चषक आणि १ लाख ५१ हजार आणि तृतीय क्रमांक विजेत्याला चषक आणि १ लाख असे बक्षिसाचे स्वरूप आहे.
तर कुमार गटातील कुस्ती स्पर्धा पुणे शहर आणि जिल्ह्यातील पैलवानांसाठी असणार आहे. त्यामधील पहिल्या क्रमांकाच्या विजेत्याला चांदीची गदा आणि १ लाख, द्वितीय क्रमांक विजेत्याला ५० हजार आणि चषक आणि तृतीय क्रमांक विजेत्याला २५ हजार आणि चषक अशा स्वरूपाची बक्षिसे देण्यात येणार आहेत. याशिवाय कुमार गटातील वय वर्ष १७ आणि वय वर्ष १४ च्या खालील गटातील पहिल्या क्रमांकाच्या विजेत्यांना सायकल आणि रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी (दि.७ ) रोजी सायंकाळी ५ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार असून यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्ता मामा भरणे हे उपस्थित राहणार आहेत. तर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ अन्य मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तर इराणचे मल्ल मिर्झा आणि आली यांचा प्रेक्षणीय सामना या स्पर्धे दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. तर अनेक हिंदकेसरी महाराष्ट्र केसरी उपस्थित राहणार असून या निमित्ताने त्यांचाही विशेष गौरव करण्यात येणार आहे.

या स्पर्धेसाठी स. प. महाविद्यालयात मातीचे दोन स्वतंत्र आखाडे असणार असून जवळपास १० हजार प्रेक्षकांची बसण्याची सोय होईल असे भव्य स्टेडियम उभारण्यात आले आहे. तसेच वाहनांच्या पार्किग साठी मोठी व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी येणाऱ्या पुरुष आणि महिला पैलवानांसाठी राहण्याची आणि भोजनाची सोय आयोजकांच्यावतीने करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र केसरीच्या तोडीस तोड ही स्पर्धा आयोजित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या स्पर्धेसाठी नामवंत खेळाडू, कलावंत, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे धीरज घाटे आणि पुनीत बालन यांनी सांगितले. पुणेकरांनी या स्पर्धेसाठी उपस्थित राहून मातीतील कुस्तीचा थरार अनुभवावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

सर्वसामान्यांना परवडणारी, दर्जेदार घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे,दि.०५ : प्रत्येक सर्वसामान्य माणूस त्याचे स्वत:चे हक्काचे घर असावे, असे स्वप्न घेवून जगत असतो. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो खूप कष्ट घेतो. अशा सर्वसामान्यांचे हे स्वप्न म्हाडा पूर्ण करीत आहे. अशाप्रकारे सर्वसामान्यांना परवडणारी, दर्जेदार घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आज ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे कोकण विभागातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत 2 हजार 147 सदनिका आणि 117 भूखंड विक्रीसाठी संगणकीय सोडत कार्यक्रम पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे, कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, मुंबईच्या मुख्याधिकारी रेवती गायकर, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, म्हाडाच्या सह अधिक्षक वंदना सुर्यवंशी, मुख्य अभियंता शिवकुमार आडे, देखरेख कमिटीचे सदस्य व इतर अधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मागील आठवड्यात पुणे व पिंपरी-चिंचवड येथील घरांची लॉटरी काढण्यात आली. घरांच्या दर्जामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड न करण्याच्या स्पष्ट सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. ज्यांना आज घरे मिळाली त्यांचे अभिनंदन व ज्यांना नाही मिळाली त्यांना येथील पारदर्शी व्यवस्थेमुळे पुढील लॉटरीत निश्चितपणे घरे मिळतील, असा विश्वास आहे. सर्वसामान्य आणि गरजूंना आपल्या हक्काचे परवडणारे दर्जेदार घर मिळावे, यासाठी शासन कटिबद्ध आहे. अडीच वर्षांपासून या राज्यातल्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके ज्येष्ठ व लाडके शेतकरी या सर्वांसाठी शासनाने विविध योजना आणल्या आहेत. त्या माध्यमातून राज्याच्या विकासाचा वेग आपण वाढविला आहे.

ठाण्यात विविध विकासकामे सुरु आहेत. मेट्रोची कामे सुरु आहेत, सुशोभिकरणाची कामे सुरु आहेत, तलाव सुशोभिकरणाची कामे सुरु आहेत, वाहतूक कोंडीवर उपाययोजना करीत आहोत. शासनामार्फत मागील अडीच वर्षात अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यात आले. अडीच वर्षात शासनाने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. आपण आता नवीन गृहनिर्माण धोरण करतोय. या गृहनिर्माण धोरणामध्ये अनेक बदल आम्ही घडवतोय. त्यामध्ये परवडणारी घरे पाहिजेत, परवडणारी भाड्याची घरे पाहिजेत त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी घरे पाहिजेत. वर्किंग वूमन साठी घरे, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, गिरणी कामगार, कंपन्यांमधील कामगारांसाठी घरे, पोलीसांसाठी, डबेवाले तसेच पत्रकारांसाठी घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गिरणी कामगारांनादेखील या माध्यमातून आपण घरे देणार आहोत. मुंबई उभी करण्यात गिरणी कामगारांचे मोठे योगदान आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, जेव्हा जेव्हा सोडतीचा कार्यक्रम असतो तेव्हा मी आवर्जून उपस्थित असतो. कारण हा एक आनंदाचा कार्यक्रम असतो. म्हाडाच्या लॉटरीत पारदर्शकता असल्याने या लॉटरीवर लोकांचा विश्वास आहे. 2 हजार 264 सदनिकांकरिता प्राप्त झालेल्या 31 हजार 465 अर्जांवरून नागरिकांमध्ये म्हाडाबद्दलची विश्वासार्हता वाढल्याचे दिसून येते.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले की, आशिया खंडातील सर्वात मोठे क्लस्टर आपण ठाण्यात निर्माण करतोय. पाच ठिकाणी कामेदेखील सुरू आहेत. क्लस्टर ही संकल्पना आशिया खंडात आपण सुरू केली. क्लस्टर म्हणजे ‘सिटी विधीन डेव्हलप्ड सिटी’. शासन शाश्वत विकास देण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेला चालना देण्यात आली आहे. पाच वर्षात आठ लाख घरे निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. काही घरे दिल्यानंतर आम्ही तेथे भेट देऊन त्यांची गुणवत्ता तपासणार आहोत.

यावेळी प्राथमिक स्वरूपात उपमुख्यमंत्री श्री.  शिंदे यांच्या हस्ते उपस्थित लाभार्थ्यांना घरांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित लाभार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कोकण मंडळात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधूदुर्ग या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. सध्याच्या लॉटरीमध्ये 2 हजार 147 सदनिकांचा समावेश आहे. यात 20 टक्के सर्वसमावेशक योजनेमधील 594 सदनिका (ठाणे व कल्याण), म्हाडा कोकण गृहनिर्माण योजनेतील 728 सदनिका (ठाणे, कल्याण, रत्नागिरी), 15 टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेतील 825 सदनिका (डोंबिवली) यांचा समावेश आहे. या सदनिकांसाठी एकूण 31 हजार 465 अर्ज प्राप्त झाले. या सदनिकांचे चटई क्षेत्रफळ 23 चौरस मीटर ते 50 चौरस मीटर दरम्यान असून सदनिकांची सरासरी किंमत रुपये 10 लक्ष ते 35 लक्षपर्यंत आहे. तर सिंधूदुर्ग जिल्ह्यातील मौजे ओरस येथे निवासी भूखंड योजना राबविण्यात आली. यात सदर भूखंडाचे 60 चौरस मीटर ते 150 चौरस मीटर (600 चौरस फुट ते 1500 चौरस फुट) इतक्या क्षेत्राचे आहे. 117 भूखंडांसाठी 231 अर्ज प्राप्त झाले.

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची भाजपा सरकारकडून फसवणूक, ६ हजारांचा भाव कधी देणार?

मुंबई, दि. ५ फेब्रुवारी २०२५
राज्यातील विशेषकरून विदर्भ व मराठवाड्यातील सोयाबीन शेतकऱ्यांकडे अद्याप लाखो क्विंटल सोयाबीन पडून आहे. ६ फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन खरेदी केंद्र सुरु ठेवण्यात येणार आहेत. परंतु या कालावधीत शेतकऱ्यांकडील सर्व सोयाबीन खरेदी होणार नाही, राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्यांकडून सर्व सोयाबीन खरेदी करेपर्यंत ही खरेदी केंद्रे सुरु ठेवावीत वेळप्रसंगी खरेदी केंद्रांची संख्या वाढवा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यात ३० लाखांहून अधिक सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत, यातील जवळपास साडेसात लाख सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी राज्यभरातील विविध खरेदी केंद्रांवर नोंदणी केली आणि त्यातील साधारणपणे तीन- तीनसाडेतीन लाख शेतकऱ्यांकडील सोयाबीन खरेदी करण्यात आल्याचे समजते. यातील बहुतांश शेतकऱ्यांनी बाजारात मिळेल त्या किंमतीला सोयाबीन विकले आहे. खुल्या बाजारात व बाजार समितीत सोयाबीनला ३५०० ते ४००० हजार रुपये भाव मिळत आहे. तर हमी भाव ४८५१ रुपये आहे. सोयाबीनसाठी होणारा खर्च व बाजारातील भाव पाहता शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही काळजी घेत खरेदी केंद्रांची सख्या वाढवावी व जोपर्यंत शेतकऱ्यांकडील सर्व सोयाबीनची खरेदी होत नाही तोपर्यंत खरेदी केंद्रे सुरु ठेवावीत.

सोयाबीन खरेदी केंद्रे सुरु केल्यानंतर सुरुवातीला साठवणुकीचा प्रश्न उभा राहिला, त्यानंतर बारदाणा नसल्याची सबब सांगण्यात आली. एकूण सरकारी खरेदी केंद्रावर सावळा गोंधळच पहायला मिळाला. ६ फेब्रुवारी पर्यंत मुदत वाढवली असली तरी अद्याप लाखो क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. आधीच भाव कमी त्यात खरेदी केंद्रे बंद केली तर मिळेत त्या भावाला सोयाबीन विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येईल व यातून त्यांचे मोठे नुकसान होईल. भाजपा युती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सोयाबीनला ६ हजार रुपये भाव देण्याचे आश्वासन दिले पण ते पाळले नाही. आतापर्यंत खरेदी केलेल्या सोयाबीनचे पैसे शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. धानाची व कापसाची अवस्थाही अशीच आहे. धान खरेदीही कमी भावात केली जात आहे तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे हालही तसेच असून भाजपा युती सरकार शेतकऱ्यांची घोर फसवणूक करत आहे, असेही नाना पटोले.

‘‘जयति जय मम भारतम’ २०२५गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये समाविष्ट

पुणे, दि.  ५   फेब्रुवारी : देशाच्या एकात्मेचे आणि विविधतेचे प्रतीक असलेले भारतातील सर्वात मोठा भारतीय लोकनृत्य महोत्सव ‘जयति जय मम भारतम्’ २०२५ ला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. युनिव्हर्सल ट्राइब्स आणि रजत रमेश रघतवान यांच्या अथक परिश्रमाने देशासाठी ही अभिमानास्पद गोष्ट ठरली आहे. तसेच कोरियोग्राफर सुभाष नकाशे यांनी नृत्याला वेगळीच उंची दिली आहे तसेच संगीत नाटक अकादमीचे मनीष मंगाई यांचे बहुमूल्य योगदान लाभले आहे
या लोकनृत्यामध्ये ५ हजार पेक्षा अधिक कलाकारांचा सहभाग आणि ५० पेक्षा अधिक विविध पारंपरिक लोकनृत्याचे सादरीकरण करण्यात आले. दिल्लीत आयोजित या ऐतिहासिक सोहळ्याला सन्माननीय केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, संयुक्त सचिव श्रीमती उमा नंदुरी आणि संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा उपस्थित होत्या.
देशाच्या ७६व्या प्रजासत्ता दिनाच्या गौरावशाली प्रसंगी केंद्रीय संस्कृती मंत्रालय आणि संगीत नाटक अकादमी यांच्या सहकार्याने ‘जयति जय मम भारतम्’ २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातील ठळक आकर्षणपैकी एक म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी होळी नृत्य, ज्यामध्ये भंगारपाणी
आणि आडगाव गावातील ५० आदिवासी कलाकारांनी सहभाग घेतला होता. या कलाकारांनी आपली कला तर सादर केली. ती त्यांच्या स्वप्नपूर्तीची यात्रा होती. विशेष म्हणजे यातील ४५ पेक्षा अधिक नर्तकांना हिंदी किंवा मराठी भाषा येत नव्हती तरी त्यांनी केवळ त्यांच्या स्थानिक आदिवासी भाषेतच संवाद साधला.
केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले,” भगवान बिरसा मुंडा यांची १५०वीं जयंती साजरी करत असतांना आदिवासी नृत्याने विश्व रेकॉर्ड रचला आहे. ५ हजार आदिवासी कलाकारांनी १ महिना अथक परिश्रम करून सादर केलेले हे नृत्य देशातील एकतेचे प्रतिक आहे. या कलेमुळे आदिवासी संस्कृती, परंपरा जनतेला कळली आहे.”
या संदर्भात कलाकार गौतम खरडे म्हणाले,” महाराष्ट्रातील आदिवासी नृत्याचा गौरवाचा क्षण म्हणजे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड में नाव समाविष्ट करणे आहे. आज महाराष्ट्रातील या नृत्याची ओळख संपूर्ण जगभर पोहचेल. यावेळी आम्ही होळीला सादर केले जाणारे भोद्या व बावा नृत्य सादर केले.”
युनिव्हर्सल ट्राइब्स आणि रजत रमेश रघतवान यांनी या सर्व कलाकरांचा खर्च उचला आहे. दिल्लीत आयोजित या सोहळ्याने महाराष्ट्रातील आदिवासी कलाकारांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे. रजत रमेश रघतवान यांच्या समर्पणामुळे भारताच्या सांस्कृतिक वारशाच्या जतन आणि संवर्धनाचा महत्वाचा टप्पा गाठला आहे. ही एक अविस्मरणीय ऐतिहासिक घटना ठरली आहे.

क्रीडा स्पर्धेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये खेळाडूवृत्ती, संघभावनेची निर्मिती

सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांचे प्रतिपादन

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेचे बारामतीमध्ये थाटात उद्घाटन

बारामतीदि. ५ फेब्रुवारी २०२५: ‘वीज क्षेत्रासारख्या अत्यंत धकाधकीच्या क्षेत्रामध्ये राज्यातील तीन कोटींपेक्षा अधिक ग्राहकांना वीज सेवा देण्यासाठी सांघिकता अत्यंत महत्वाची आहे. दरवर्षीच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये खेळाडूवृत्ती व संघभावना निर्माण होते व तेच अभिप्रेत आहे’ असे प्रतिपादन महावितरणच्या कोकण विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप जगदाळे यांनी केले.

बारामती येथील विद्यानगरीच्या क्रीडा संकुलात बुधवारी (दि. ५) राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटक म्हणून श्री. जगदाळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे प्रादेशिक संचालक व आयोजन समितीचे अध्यक्ष श्री. भुजंग खंदारे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य अभियंते सर्वश्री राजेंद्र पवार, ज्ञानेश कुलकर्णी, सुनील काकडे, स्वप्नील काटकर, चंद्रमणी मिश्रा, ज्ञानदेव पडळकर, धर्मराज पेठकर, मुख्य महाव्यवस्थापक (मासं) श्री. भुषण कुलकर्णी, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. संजय ढोके, मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री. भारत पवार, आयएसएमटी कंपनीचे किशोर भापकर, विद्या प्रतिष्ठानचे श्री. डी. एस. पवार, सहमुख्य औदयोगिक संबंध अधिकारी श्री. ललीत गायकवाड यांची उपस्थिती होती.

या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत महावितरणच्या १६ परिमंडलाच्या संयुक्त आठ संघातील सुमारे ११५० महिला व पुरुष खेळाडू सहभागी झाले आहेत. या खेळाडूंनी संचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. यावेळी बारामती परिमंडलातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनी लोककला नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी महावितरणमधील आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रतिक वाईकर, अमित जाधव, गुलाबसिंग वसावे, अमोल गवळी, दत्तात्रेय ठाकूर, नीलेश बनकर आदींचा गौरव करण्यात आला. तसेच बारामती परिमंडलातील पाच दिव्यांग कर्मचाऱ्यांना दूचाकी वाहन वितरीत करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजन समितीचे कार्याध्यक्ष व मुख्य अभियंता श्री. धर्मराज पेठकर यांनी केले. सूत्रसंचालन सौ. मृदूला शिवदे, श्री. रोहित राख, श्री. सुशांत कांबळे यांनी केले. या क्रीडा स्पर्धेत २२ क्रीडा प्रकारातील सामने रंगणार असून येत्या शनिवारी (दि. ८) समारोप होणार आहे.

१०० मीटर धावस्पर्धेत मसाणे, अंबादे प्रथम – अतिशय चुरशीच्या १०० मीटर धावस्पर्धेत पुरुष गटात साईनाथ मसाणे (सांघिक कार्यालय-भांडूप) यांनी बाजी मारत सुवर्णपदक जिंकले. तर गुलाबसिंग वसावे (पुणे-बारामती) यांना रौप्यपदक मिळाले. महिला गटात श्वेतांबरी अंबादे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) यांनी सुवर्णपदक पटकावले तर मेघा झुणघरे (कल्याण-रत्नागिरी) यांनी रौप्यपदक मिळवले. विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते सुवर्ण व रौप्यपदक प्रदान करण्यात आले.

उमेद, धाडस वाढविण्यासाठी चांगली पुस्तके वाचा..

उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांचे “मुंबई ग्रंथोत्सव २०२४” मध्ये आवाहन..

मुंबई दिनांक-५ फेब्रुवारी…
मराठी साहित्य अजरामर करणारे वरदान आहे.मुलामुलींचे उमेद,धाडस वाढविण्यासाठी चांगली पुस्तके वाचायला द्या,वाचन संस्कृती वाढवा असे आवाहन विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी केले आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय मुंबई शहर आणि मुंबई मराठी ग्रंथालय,दादर यांच्या वतीने मुंबई ग्रंथोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे.५ आणि ६ फेब्रुवारी अश्या दोन दिवस सुरू राहणाऱ्या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन मराठी भाषा मंत्री उदय सामंत,विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांच्या हस्ते करण्यात आले.
मुंबई मराठी ग्रंथालय,दादर यांनी ग्रंथालयीन अभ्यासिका सुरू केली,जतन केली याबद्दल आभार व कौतुक करते.महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नवीन लेखक लिखाण करत आहेत अनेक अनुभव लिहले जात आहेत याचा समाजाला नक्की फायदा होणार आहे.राज्य सरकार बालक व महिला साहित्य संमेलन घेणार आहेत यामुळे वाचन संस्कृती जोपासण्यास मदत होईल अश्या डॉ.नीलम गो-हे म्हणाल्यात.
कुटुंबामध्ये लोकशाही नाही अशी मी मानते, लोकशाही असती तर ऑनर किलींगसारख्या घटना घडल्या नसत्या.समाजात वर्ण,रंग,लिंगभेद दुजाभाव वाढत चालल्याची खंत नीलम गो-हे यांनी यावेळी व्यक्त केली.सध्याच्या सोशल मीडियाच्या जमाना आहे काही वेबसाईटमुळे बुद्धीगहाण टाकण्यापर्यंत,आत्महत्त्येपर्यंत लोकांची मानसिकता तयार होत आहे.अश्यात सोशल मीडिया कायद्याच्या चौकटीत असायला हवे असे उपसभापती डॉ. नीलम गो-हे म्हणाल्या.
मुंबई मराठी ग्रंथालय,दादर प्रामाणिकपणे ग्रंथालय,वाचनालय चालवत आहेत.पुस्तक आदानप्रदान झाल्याने ३५ हजार पुस्तके ग्रंथालयात आली तीच पुन्हा घरोघरी गेली हा चांगला उपक्रम आहे.पुस्तक वाचन संस्कृती वाढविण्यासाठी महाराष्ट्र सरकार बाळ साहित्य संमेलन,युवा साहित्य संमेलन आणि महिला साहित्य संमेलन सुरू करणार असल्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यावेळी म्हणाले.मराठी भाषेविरोधातील दादागिरी मोडीत काढण्यासाठी सरकारने तयारी केल्याचेही मंत्री उदय सामंत म्हणाले.
“मुंबई ग्रंथोत्सव २०२४”च्या कार्यक्रमासाठी मराठी भाषा मंत्री उदय सामंत,विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गो-हे, सुप्रसिद्ध लेखक व ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार, ग्रंथालय संग्रहालय महाराष्ट्र राज्य प्रभारी अशोक गाडेकर, प्रमुख कार्यवाहक रवींद्र गावडे, किरण ढंढोरे, ज्येष्ठ पत्रकार शीतल करदेकर उपस्थित होत्या.यावेळी ग्रंथ दिंडीत सहभाग घेणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करावी- जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

पुणे, दि. 5: जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याच्यादृष्टीने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले. शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे कसे वळविता येईल यादृष्टीनेदेखील प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांच्यासह सर्व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

कृषी विभागाने आपले नियमित काम करत असताना वैशिष्ट्यपूर्ण बाबी करण्यावर भर द्यावा, असे सांगून ते म्हणाले, पुणे व मुंबई यातील जवळचे अंतर, मोठी बाजारपेठ तसेच निर्यातीसाठी जवळची सुविधा असेलले मुंबई शहर या जिल्ह्यासाठी जमेच्या बाजू आहेत. जिल्ह्यात फलोत्पादन आणि फूल शेतीच्या वाढीला मोठा वाव असून यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडून येऊ शकते.

तालुका कृषी अधिकाऱ्यांनी आपल्या तालुक्यात सध्या लागवड होत असलेली वैशिष्ट्यपूर्ण फळपिके, फूल शेती तसेच अन्य कृषीमाल व त्यांचे शेतकरी व लागवडीचे क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. एकच वैशिष्ट्यपूर्ण पीक अधिक प्रमाणात उत्पादित करणारे गाव किंवा गावांचा समूह निवडून या पिकाचे क्षेत्र कसे वाढेल यासाठी प्रयत्न करावेत. त्या गावाची प्रसिद्धी त्या पिकांच्या नावाने कशी होईल यासाठी प्रयत्न करावेत.

सध्या अस्तित्वात असलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या, स्वयंसहायता गटांमध्ये अधिक शेतकऱ्यांना सहभागी करून घ्यावे. त्यांच्या माध्यमातून उत्पादित करण्यात येणाऱ्या कृषीमालाची प्रचार प्रसिद्धी (ब्रँडिंग), प्रक्रियेसाठी यंत्रसामुग्री तसेच बाजारपेठेशी जोडणी करुन देण्याच्यादृष्टीने जिल्हा नियोजन समितीतून निधीच्या अनुषंगाने प्रस्ताव सादर करावा.

केंद्र शासनाचे नैसर्गिक शेती अभियान, राष्ट्रीय फळबाग अभियान, ठिबक सिंचन व अन्य सूक्ष्म सिंचनासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आदी योजनांचे एकत्रिकरण करून वैशिष्ट्यपूर्ण पिकांच्या लागवडीला चालना देता येऊ शकते.

यावेळी श्री. काचोळे यांनी जिल्ह्यात महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आदींना प्रायोगिक तत्त्वावर ड्रोन खरेदीसाठी नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्हा नियोजन समितीतून निधी मिळण्याची मागणी केली. त्यावर सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले.

जुन्नर तालुक्यातील शिवनेरी हापूस, पुरंदर तालुक्यातील अंजीर व सिताफळ, इंदापूर तालुक्यातील द्राक्षे, केळी, भोर, वेल्हा, मुळशी तालुक्यातील नाचणी, बारामती तालुक्यातील कोरडवाहू भागात सूर्यफूल, करडई, साबळेवाडी, म्हसोबावाडी परिसरातील रेशीम उत्पादन, मावळ व आंबेगाव तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ, मावळ तालुक्यातील फूलशेती, जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील भाजीपाला उत्पादन आदींच्या अनुषंगाने संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून, शेतकरी उत्पादक कंपन्या आदींकडून करण्यात येत असलेल्या नाविण्यपूर्ण कृषीविषयक उपक्रमांची माहिती दिली.

कोथरुडमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांना निवेदन

मुंबई, दि. ५ – कोथरुड विधानसभा मतदारसंघातील वाढती वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मिसिंग लिंकससाठी आवश्यक निधी देण्यासंदर्भात निवेदन दिले.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणे शहरातील रस्ते विकासामध्ये येणाऱ्या अडथळ्यांविषयी चर्चा करत, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शहरातील रस्ते विकासासाठी आवश्यक तो निधी राज्य सरकारकडून दिला जाईल, अशी ग्वाही दिली.

पुणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील ३३ प्रमुख रस्त्यांपैकी १५ प्रमुख रस्त्यांच्या विकासासाठी ‘मिशन १५’ हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी एकूण ८७० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, कोथरुड मतदारसंघातील रस्ते विकासासाठी ३२५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. यापैकी १५० कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून अपेक्षित आहे.

पुणे शहराचा वेगाने होत असलेला विस्तार लक्षात घेता, येथील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येत आहे. त्यामुळे रस्ते सुधारणा, पुलांचे बांधकाम आणि वाहतूक व्यवस्थापनासंदर्भात ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. याकरिता राज्य सरकार आणि पुणे महापालिकेच्या संयुक्त प्रयत्नांतून तांत्रिक व प्रशासकीय अडथळे दूर करून विकासकामांना गती देऊन पुणेकरांच्या सोयीसाठी हे काम प्राधान्याने पूर्ण केले जाईल, असे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले.

कलाकारांच्या आरोग्याची काळजी घेणे हे समाजाचे कर्तव्यच – संदीप खर्डेकर.

समर्थ युवा प्रतिष्ठान,ऑल आर्टिस्ट फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे कलाकारांची मोफत आरोग्य तपासणी- योगेश सुपेकर.

पुणे-कलाकारांच्या आरोग्याची काळजी घेणे हे समाजाचे कर्तव्यच असल्याचे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले. तसेच कलावंतांच्या थकीत निवृत्तीवेतनासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असून लवकरच ज्येष्ठ कलावंतांना थकीत निवृत्तीवेतन मिळवून देऊ असेही संदीप खर्डेकर म्हणाले.कलावंत हे चित्रपट, नाटक, सिरीयल च्या माध्यमातून समाजात मनोरंजनाचे महत्कार्य करत असतात व आपल्या जीवनात आनंद फुलवत असतात, मात्र उतारवयात त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते त्यावेळी त्यांच्याप्रतीचे ऋण हे कर्तव्य म्हणून आपण फेडले पाहिजे असेही खर्डेकर म्हणाले.
ना. चंद्रकांतदादा पाटील आणि समर्थ युवा प्रतिष्ठान च्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे ऑल आर्टिस्ट फाउंडेशन च्या माध्यमातून कलावंतांसाठी दोन दिवसीय मोफत आरोग्य चिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले आहे त्यावेळी ते बोलत होते.यावेळी भरत मित्र मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर, समर्थ युवा प्रतिष्ठान चे सुनील पांडे,ऑल आर्टिस्ट फाउंडेशन चे अध्यक्ष योगेश सुपेकर,कार्याध्यक्ष अविनाश खेडकर, उपाध्यक्ष गणेश गायकवाड,सचिव गणेश मोरे,खजिनदार रशीद शेख,उपसचिव अश्विनी कुरपे,उपखजिनदार मनोज माझीरे,संचालक सोमनाथ फाटके,राजरत्न पवार, आमिर शेख,प्रमुख सल्लागार संदीप पाटील, जितेंद्र भुरूक,विशेष सल्लागार अभय गोखले इ पदाधिकारी उपस्थित होते.
ना. चंद्रकांतदादा पाटील सातत्याने ऑल आर्टिस्ट फाउंडेशन ला मदत करत असून त्यांनी समूत्कर्ष च्या माध्यमातून ऑल आर्टिस्ट फाउंडेशन च्या सभासद असलेल्या कलावंतांना दरमहा निम्म्या दरात किराणा सामान उपलब्ध करून दिला याबद्दल आम्ही त्यांचे कायम ऋणी आहोत असे फाउंडेशन चे अध्यक्ष योगेश सुपेकर म्हणाले. आज मा. चंद्रकांतदादांनी आमच्यासाठी आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून जे नातं जोडलंय त्यामुळे आम्ही सर्व कलाकार कृतज्ञ असल्याचेही सुपेकर यांनी सांगितले.
ह्या शिबिरात रक्त तपासणी,तोंडाचा कर्करोग,स्तनाच्या कर्करोगाची तपासणी, कोलेस्ट्रॉल, डोळे, दात, रक्तातील घटक तपासणी अश्या विविध तपासण्यांचा समावेश असून ह्या सर्व तपासण्यांसाठी साधारणत: 13500 रुपये खर्च येतो असे क्रिएटिव्ह फौंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर आणि समर्थ युवा प्रतिष्ठान चे सुनील पांडे यांनी सांगितले.
ऑल आर्टिस्ट फाउंडेशन ने केवळ पडद्यावरील कलाकारच नव्हे तर बॅकस्टेज आर्टिस्ट यांच्यासह प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या सिने नाट्य उद्योगाशी संबंधित सर्व घटकांच्या एकत्रीकरणावर आणि त्यांच्या समस्या सोडविण्यावर भर दिला असल्याचे योगेश सुपेकर, रशीद शेख,गणेश मोरे,गणेश गायकवाड यांनी यावेळी स्पष्ट केले.कलाकारांनी ह्या शिबिरास भरभरून प्रतिसाद दिला आहे.

KBC ज्युनियरमध्ये प्रनुशा थामके झळकली – अमिताभ बच्चनने लहानपणीच्या आठवणी शेअर केल्या

या आठवड्यात, कौन बनेगा करोडपती या लोकप्रिय ज्ञान-आधारित गेम शोमध्ये KBC ज्युनियर्स म्हणून 8 ते 15 वर्षे या वयोगटातील हुशार मुले स्पर्धक म्हणून येणार आहेत. ही मुले आपली हुशारी दाखवतील आणि थरारक आव्हानेही पेलताना दिसतील. या सगळ्या डोकेबाज मुलांमध्ये प्रनुशा थामके ही विदर्भातून आलेली सहावीत शिकणारी एक बेधडक आणि प्रसन्न मुलगी देखील आहे. होस्ट अमिताभ बच्चन यांच्याशी तिने खूप गप्पा मारल्या. आपल्या माता-पिता आणि बहिणीसह या कार्यक्रमात आलेली प्रनुशा अत्यंत निर्धाराने हॉटसीटवर विराजमान झाली.
गेम हळूहळू रंगत असताना या छोट्या मुलीने श्री. बच्चन यांच्याशी एक हलका फुलका क्षण शेअर केला. स्वतःची ओळख तिने ‘सुपरपॉवर बाथरूम सिंगर’ अशी करून दिली. आपल्या शैलीत तिच्याशी बोलताना श्री. बच्चन म्हणाले, “या जगात असे कुणीच नसेल, जो बाथरूम सिंगर नसेल.” यातून गप्पांना एक रोचक वळण मिळाले. त्यावेळी बिग बींनी त्यांच्या परिचयाच्या एका गायकाचा किस्सा सांगितला. “एक गायक आहे, जो गावात राहतो. त्याला गायला खूप आवडायचे. तो ट्रॅक्टर चालवायचा आणि त्याच्या सुरात सूर मिळवून गात राहायचा.”
आठवणींच्या ओघात श्री. बच्चन यांनी लहानपणीचा एक धाडसी किस्साही सांगितला. ते म्हणाले, “गार हवेसाठी आम्ही आमच्या टेबल फॅनच्या पुढ्यात बर्फाचे तुकडे ठेवायचो. काही वर्षांनी आमच्या घरी फ्रिज आला. तो उघडला तेव्हा आमच्या लक्षात आले की तो आतून गार गार आहे. आम्ही त्यावेळी लहान होतो आणि एके दिवशी आम्ही फ्रिजमध्ये अडकलो आणि फ्रिजचे दार लॉक होऊन गेले.” त्यानंतर त्यांनी हसत हसत सांगितले की, “आम्ही आरडाओरडा केला, तेव्हा कोणी तरी येऊन आम्हाला बाहेर काढले. गरमीतून वाचण्यासाठी आम्ही काहीही करायला तयार असायचो.” जाता जाता त्यांनी प्रनुशाच्या छोट्या बहिणीला ‘तू असे करू नकोस’ असा खेळकर सल्लाही दिला. जे ऐकून प्रेक्षक खूप हसले. त्या चुणचुणीत मुलीनेही तत्काळ उत्तर दिले, “आमच्या फ्रिजचा अजून तसा वापर झालेला नाही.”
या भागात जिव्हाळा, हास्य आणि किश्श्यांची जी देवाणघेवाण झाली, त्यामुळे हा भाग नक्कीच अविस्मरणीय ठरणार आहे.

बालाजीनगरमध्ये पवार हॉस्पिटलमागे पिस्टल घेऊन उभ्या असलेल्या तरुणाला पकडले

पुणे-बालाजीनगरमध्ये पवार हॉस्पिटलमागे पिस्टल घेऊन उभ्या असलेल्या तरुणाला पुणे पोलिसांनी पकडले, त्याच्याकडून पिस्टल व तीन जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. ऋतीक संजय ननावरे वय २४ वर्षे ,रा. विजयश्री अपार्टमेंट ए/२ विंग चौथा मजला फ्लॅट नं. १९ पवार हॉस्पीटलमागे बालाजीनगर असे या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले कि,’दि.०३/०२/२०२५ रोजी सहकारनगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे वरिष्ठांचे आदेशान्वये स.नगर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हयांना प्रतिबंध घालणेचे अनुषंगाने पेट्रोलींग करीत बालाजीनगर येथील तुळजाभवानी मंदीराजवळ आले असताना पोलीस अंमलदार महेश मंडलीक यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, एक इसम पवार हॉस्पीटल पाठीमागील बजरंग दल चौकाजवळील अर्धवट बांधकाम चालु असलेल्या बिल्डींगचे बाहेरील रोडवर बालाजीनगर पुणे येथे कोणाची तरी वाट पाहत थांबला असुन त्याचे कंबरेला पिस्टल सारखे हत्यार लावलेले दिसत आहे.
अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदरची बातमी सहकारनगर पोलीस स्टेशन कडिल वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गौड यांना कळविली असता त्यांनी तपास पथकाचे सपोनि सागर पाटील व अंमलदार यांची टीम तयार करुन त्यांना सुचना व मार्गदर्शन करून बातमीचे ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले.
त्यानुसार लागलीच सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बातमीचे ठिकाणी जावुन छापा टाकुन आरोपी नामे ऋतीक संजय ननावरे वय २४ वर्षे धंदा काही नाही रा. विजयश्री अपार्टमेंट ए/२ विंग चौथा मजला फ्लॅट नं. १९ पवार हॉस्पीटलमागे बालाजीनगर पुणे यास ताब्यात घेवुन त्याची स्टाफचे मदतीने पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे पँन्टमध्ये खोचलेले एक गावठी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस मिळुन आल्याने सदरचे ६३,०००/-रु कि.चे एक गावठी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस पंचासमक्ष जप्त करुन त्याचेविरुध्द सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ३८/२०२५ आर्म अॅक्ट क ३(२५) व महा.पो.अधि. क ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे शहर प्रविणकुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ-२, श्रीमती स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग राहुल आवारे, सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती सुरेखा चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहा. पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार महेश मंडलीक, अमोल पवार किरण कांबळे, बजरंग पवार, चंद्रकांत जाधव, अमित पदमाळे, सागर सुतकर, योगेश ढोले, महेश भगत, खंडु शिंदे यांनी केली आहे.

राहुल सोलापूरकर नाक घासून माफी मागा अन्यथा कडेलोट करू – शिवसेना आक्रमक….

पुणे- मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एका मुलाखती मधे बोलताना महाराजांची बदनामी करणारे व महाराजांच्या पराक्रमाची व्याप्ती व शौर्य कमी करणारे वक्तव्य केले होते, त्याविरोधात शिवसेना पुणे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा स्मारक, कोथरूड गावठाण येथे अभिनेता राहुल सोलापूरकरच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी राहुल सोलापूरकरच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले, त्याला पायदळी तुडवला. त्याच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच आंदोलन स्थळावरून सर्व शिवसैनिकांनी राहुल सोलापूरकरच्या घराच्या दिशेने मोर्चा वळविला आणि त्याच्या घरापर्यंत शिरून त्याच तोंड रंगवण्याचा प्रयत्न केला, यावेळी पोलिस प्रशासनाने ताकदीने अडविल्यामुळे शिवसेना पक्षाच्या वतीने त्याच्या घराखालीच ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांनी सदर प्रकरणात अभिनेता राहुल सोलापूरकर वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. सरकार त्याला पोलीस संरक्षण का देत आहे ? तसेच त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख न करता त्यांच्या पायावर नाक घासून माफी मागावी अशी मागणी केली. तरच माफी मिळेल अन्यथा शिवसेना पुन्हा तीव्र आंदोलन करून त्याचा कडेलोट करणार असल्याचे सांगितले. आंदोलनामधे पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, उपशहर प्रमुख राजेश पळसकर, प्रशांत राणे, भरत कुंभारकर, मा नगरसेवक योगेश मोकाटे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, शहरसंघटक राजेंद्र शिंदे , संतोष गोपाळ, विलास सोनवणे, पराग थोरात, दिलीप पोमन, नितीन पवार, शिव आरोग्य सेनेचे रमेश क्षीरसागर, युवासेना शहर संघटक राम थरकुडे, सनी गवते, महिला सहसंपर्क संघटीका कल्पना थोरवे, छायाताई भोसले, जोती चांदेरे, करुणा घाडगे, सुनिता खंडाळकर, सोनाली जुनवणे, प्रज्ञा लोणकर, भारती भोपळे, युवासेनेचे परेश खांडके, गणेश काकडे, सोहम जाधव, वैभव दिघे, नीरज नभी, चिंतामण मुंगी, मयूर कोंडे, वैभव कदम, शिवसेना विभाग प्रमुख सुरज लोखंडे, संतोष तोंडे, भरत सुतार, हेमंत यादव, चंदन साळुंके, दिलीप व्यवहारे, अजय परदेशी, नंदू येवले, पुरुषोत्तम विटेकर, संतोष भुतकर, प्रसाद काकडे, अमित जगताप, मकरंद पेठकर, अनिल माझिरे, जगदीश दिघे, शिवाजी गाढवे, गिरीश गायकवाड, दिलीप जानवरकर, नागेश गायकवाड, संजय कोंडके, श्रीपाद चिकणे, प्रकाश चौरे, संजय साळवी, नितीन रावळेकर, बकुळ डाखवे, आकाश बालवडकर, नागेश खडके, ओंकार मारणे, राहुल शेडगे, संजय कोंडके, गणेश पोकळे, प्रणव आडकर इतर शिवसैनिक , शिवप्रेमी उपस्थित होते.