पुणे : महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक आयोजित महामाता रमाई महोत्सवात हास्य मैफलीत सादर करण्यात आलेल्या कविता, किश्यांनी हास्याचे फवारे उडाले.
महामाता रमामाई भीमराव आंबेडकर स्मारक येथे आडकर फौंडेशनच्या सहकार्याने हास्यमैफलीचे आयोजन करण्यात आले होते. भालचंद्र कोळपकर, अनिल दीक्षित यांनी कवितांचे सादरीकरण केले. महोत्सवाचे मुख्य संयोजक विठ्ठल गायकवाड, अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, कार्याध्यक्ष सचिन ईटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कवी भालचंद्र कोळकर यांनी ‘बुलेट प्रेम’ कवितेद्वारे कॉलेजमध्ये अभ्यास सोडून प्रेम करायला गेलेल्या युवकाची कशी फजिती होती हे सांगितले. त्यानंतर काही किस्से सांगून ‘हीरोइन’ ही कविता सादर केली. या कवितेत एक युवक हिरोईनशी लग्न करण्याचं स्वप्न पाहतो आणि ते कसं भंग पावतो हे या विनोदी रचनेतून सांगितले. ‘भांडण’ या कवितेतून नवरा बायकोमधील वाद हा कसा संवादात परिवर्तित होतो आणि नवरा बायकोच्या नात्यांमध्ये भांडण कसे आवश्यक आहे हे अतिशय मजेशीररित्या सांगितले. ‘लाजरे पोरा’ या विडंबन कवितेतून आजकालची मुलं अभ्यास सोडून मोबाईलच्या नादी लागतात व पदरात अपयश पाडून घेतात त्यामुळे त्यांचे कसे हाल होतात याचे मार्मिक टिपण केले. अखेरीस ‘बाप झाल्यावर’ जबाबदारीची जाणीव करून देणारी कविता सादर केली.
अनिल दीक्षित यांनी नोट बंदीवरील विडंबन काव्याद्वारे मैफलीची सुरुवात केली. कविवर्य नारायण सुर्वे यांच्या कवितेचं विडंबन ‘पत्रात लिव्हा’द्वारे शेतकऱ्यांची व्यथा मांडली. त्यानंतर ‘अन्याय रोखण्याचा तलवार भीम माझा जखमेवरील फुंकर हळुवार भीम माझा’ ही भीमगझल सादर केली. ‘लाजू कशाला उगीच कुणाला जयभीम म्हणायला, तुझ्यामुळेच शिकलो भिमा ताठ मानेनं जगायला’ या भीम गीताने मैफलीची सांगता केली.
प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी रमाई महोत्सवानिमित्त आयोजित हास्य मैफल या उपक्रमाची माहिती दिली.
सचिन ईटकर म्हणाले, सर्व समाजातील घटकांना एकत्र करणारा हा रमाई महोत्सव असून दरवर्षी प्रसिद्ध व्यक्तींना या मंचावर आपली कला सादरीकरणासाठी बोलाविले जाते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी केले.
रमाई महोत्सवात रंगली हास्य मैफल
निवृत्त बीएसएफ महिला उपनिरीक्षकाच्या गळ्यातील चैन हिसकावली
पुणे-रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी जाण्याच्या घटना पुणे शहरात दिवसेंदिवस वाढतच आहेत. सोनसाखळी चोरांचे मोठे आव्हान पुणे पोलिसांसोमर उभे ठाकले आहे. सीसीटीव्ही असताना देखील चोरटे भीती बाळगत नसल्याने पुण्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याची चिन्हे आहेत.
लुल्ला नगर चौकात नातवाला शाळेला पाठ्वण्यासाठी बसची वाट पाहत थांबणाऱ्या सेवानिवृत्त बीएसएफ महिला उपनिरीक्षकाच्या गळ्यातील चैन दोघा दुचाकीस्वारांनी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी महिला या बीएसएफ उपनिरीक्षकापदावरून सेवानिवृत्त झाल्या आहेत. ते दररोज आपल्या नातवाला डीपीएस स्कुल महमंदवाडी शाळेत पाठविण्यासाठी लुल्लानगर चौकात शाळकरी बसची वाट पाहत थांबत असतात. दि. ४ रोजी सकाळी ७ च्या दरम्यान व्ही एस होम स्टोर समोरील रास्ता ओलांडत असताना दुचाकी वरून आलेल्या दोघा चोरटयांनी गळ्यातील ३० ग्राम वजनाची चैन हिसकावली.
कापूस साठवणूक पिशव्या खरेदीत महायुती सरकारकडून ४१ कोटींचा भ्रष्टाचार: नाना पटोले.
बेकायदेशीर रित्या निविदा काढल्या, एकाच परिवाराच्या चार कंपन्यांना काम; निवडणूक आयोगाची परवानगी न घेता आचारसंहितेत मंजूरी कशी दिली ?
महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे महाव्यवस्थापकीय संचालक (एमडी) तथा उप सचिव वस्त्रोद्योग श्रीकृष्ण पवार आणि तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी संगनमत करून ५७७ रुपयांची पिशवी १२५० रुपयांना खरेदी करून केला ४१ कोटी ५९ लाख रुपयांचा भ्रष्टाचार
या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून श्रीकृष्ण पवार आणि धनंजय मुंडेंवर कारवाई करा
मुंबई, दि. ६ फेब्रुवारी २०२५
तत्कालीन एकनाथ शिंदे-भाजपा सरकारमधील भ्रष्टाचाराची मालिका संपत नाही. शेतकऱ्यांच्या नावावर भ्रष्टाचार करून खिसे भरण्याचा आणखी एक प्रकार शिंदे फडणवीस अजित पवार सरकारच्या काळात झाला आहे. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग मंडळाच्या माध्यमातून कापूस साठवणूक बॅग खरेदीसाठी निविदा वेगळ्या शिर्षका खाली काढून ७७ कोटी रुपयांची खिरापत वाटून ४१.५९ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
कृषी विभागातील भ्रष्टाचारावर तोफ डागताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजपा युती सरकारने भ्रष्टाचाराचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. शेतकऱ्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. कापूस साठवणूक पिशव्या खरेदीतही भ्रष्टाचार करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाच्या माध्यमातून हा भ्रष्टाचार करण्यात आला असून ७७.२५ कोटी रुपये यासाठी देण्यात आले. एकाच परिवारातील ४ वेगवेगळ्या कंपन्याना बेकायदेशीर रित्या निविदा काढून हे काम देण्यात आले. यंत्रमाग महामंडळाचे महाव्यवस्थापकीय संचालक तथा उप सचिव वस्त्रोद्योग श्रीकृष्ण पवार यांनी त्यांच्या मर्जीतील एका पुरवठादाराला माहिती देऊन त्यांच्या संगनमताने सर्व प्रक्रिया राबवून गैरव्यवहार करण्यात आला आहे. ही खरेदी प्रक्रिया लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना निवडणूक आयोगाची परवानगी न घेताच करण्यात आली. या कामा साठी चार कंपन्यांची निवड करण्यात आली त्यातील तीन कंपन्या ओसवाल या एकाच परिवारातील आहेत तर चौथी कंपनी ओसवाल यांच्या सनदी लेखापालाची आहे.
यंत्रमाग महामंडळाने कापूस साठवणूक पिशव्या खरेदीसाठी प्रति पिशवी १२५० रुपयांचा दर मंजूर करण्यात आला. आयसीएआर नागपूर यांना याच पिशव्या ५७७ रुपये या दराप्रमाणे पुरवठा करण्यात आल्या आहे. म्हणजे प्रति पिशवी ६७३ रुपये जास्त दराने खरेदी करून एकूण ४१ कोटी ५९ लाख ३५ हजार ५३६ रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाने आयुक्तालयाकडून कापूस साठवणूक बॅग उत्पादनासाठी कच्चा माल खरेदी करण्यासाठी निधी अग्रीम स्वरुपात ७७.२५ कोटी रुपये महामंडळास अदा करुन घेतला. महामंडळ कापूस साठवणूक पिशवी उत्पादकाकडून विकत घेऊन पुरवठा करणार होते, यात कच्चा मालाच्या खरेदीचा प्रश्नच येत नसताना कच्चा माल पुरवठा करण्यासाठी या शिर्षकाखाली हा व्यवहार करण्यात आला असेही नाना पटोले म्हणाले.
एकनाथ शिंदे सरकारच्या काळात धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कृषी साहित्य खरेदी आणि पुरवठ्याच्या डीबीटी योजनेत नियमबाह्य बदल करून मोठा गैरव्यवहार झाला आहे. या संदर्भात काँग्रेस पक्षाने सातत्याने सभागृहात व रस्त्यावर उतरून आवाज उठवला होता पण सरकारने काहीच कारवाई केली नाही. तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ही सर्व खरेदी तत्कालीन अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या परवानगीने आणि मान्यतेने झाली आहे असे पत्रकार परिषदेत सांगितले आहे. त्यामुळे या घोटाळ्यात हे सर्वच सहभागी आहेत त्यामुळेच मुंडेंवर कारवाई करत नाहीत का? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला.
महायुती सरकारने शेतक-यांच्या नावाखाली विविध महामंडळाच्या माध्यमातून खरेदी आणि पुरवठ्यांच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून लूट केली आहे. काँग्रेस पक्ष महामंडळाच्या माध्यमातून सुरु असलेल्या या भ्रष्टाचाराविरोधात विधिमंडळात आवाज उठवणार असून सरकारने कारवाई केली नाही तर रस्त्यावरची लढाई लढून या भ्रष्टाचा-यांवर कारवाई करायला सरकारला भाग पाडू असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
क्रिकेटरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा क्रीडाविश्वाचा चालताबोलता ज्ञानकोष हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
मुंबई, दि. 6 :- कोट्यवधी क्रिकेटरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा क्रीडाविश्वाचा चालताबोलता ज्ञानकोष हरपला आहे. प्रदीर्घ काळ क्रीडा पत्रकारिता केलेल्या द्वारकानाथ संझगिरी यांच्याकडे क्रिकेटसह क्रीडा विश्वातील रंजक गोष्टींचा खजिना होता. रंजक गोष्टी खुमासदार शैलीत लिहिण्याची, सांगण्याची कला अवगत होती. या कलागुणांच्या जोरावर त्यांनी कोट्यवधी क्रिकेटरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांचं निधन ही महाराष्ट्राला चटका लावणारी घटना आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातलं त्यांचं स्थान अढळ आणि योगदान अविस्मरणीय आहे. संझगिरी यांनी पत्रकारितेच्या पलिकडे जावून क्रिकेट, क्रीडाक्षेत्राची खेळाची सेवा केली. खेळांचा आत्मा समजून घेत खेळ आणि खेळाडूंना जोडण्याचं काम केलं. क्रीडाक्षेत्रातील घटना, त्या घटनेचं विश्लेषण खुमासदार लेखनशैली, जिवंत समालोचनाद्वारे रसिकांपर्यंत पोहचवण्याचं काम केलं. क्रिकेटसह सर्वच क्रीडा प्रकारांबद्दल त्यांना सखोल ज्ञान होतं. खेळांमधले बारकावे समजावून सांगण्याची शैली अद्वितीय होती. त्यांच्याकडे बघत क्रीडा पत्रकार, क्रीडारसिकांच्या अनेक पिढ्या मोठ्या झाल्या. त्यांच्या निधनाने मराठी क्रीडा पत्रकारितेतील दीपस्तंभ ढासळला आहे. क्रीडा पत्रकारिता आणि क्रीडाक्षेत्राच्या इतिहासात त्यांचं नाव अजरामर राहणार आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली आहे.
अंगणवाडी भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन
मुंबई, दि. 6 : महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडीत पर्यवेक्षकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी, अधीक्षक ही पदे भरण्यात येत आहेत. भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शक पद्धतीने होणार असून, कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या 100 दिवस उद्दिष्टपूर्ती अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील रिक्त पदांची भरती विभाग करीत आहे. परीक्षा केंद्रांवर जॅमर बसविण्यास येणार आहे. सरळसेवा व पदोन्नती प्रकारातील पद भरती प्रक्रिया संदर्भातही कार्यवाही सुरू आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी शासन यंत्रणा सज्ज असून, उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील वाढते औद्योगिकीकरण लक्षात घेता उद्योगास पोषक वातावरण तयार करावे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे, दि.६: महाराष्ट्र राज्याचे तंत्रज्ञान व मॅन्युफॅक्चरिंगची राजधानी म्हणून पुणे जिल्ह्याची ओळख आहे; उद्योगधंद्ये वाढीच्यादृष्टीने जागतिक पातळीवर संवाद साधण्यात येत असून त्यामाध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे, त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील औद्योगिकीकरण लक्षात घेता उद्योगास पोषक वातावरण निर्मिती करीता पोलीस दलाने काम करावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
चिखली येथील पिंपरी-चिंचवड आयुक्तालय व पुणे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचे लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार अमित गोरखे, विजय शिवतारे, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, शरद सोनवणे, शंकर जगताप, बाबाजी काळे, बापूसाहेब पठारे, ज्ञानेश्वर कटके, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त योगेश म्हसे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पीएमपीएल व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर आदी उपस्थित होते.
श्री. फडणवीस म्हणाले, मुंबईनंतर पुणे शहराचे पोलीस आयुक्तालय मोठे होते. पुणे शहराचा विस्तार तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणात झालेले नागरीकरण तसेच पिंपरी चिंचवड शहरातील मोठ्या प्रमाणातील औद्योगिकीकरण आणि परिसरातील गुन्हेगारी नियंत्रित ठेवणे याबाबींचा विचार करुन सन २०१८ मध्ये पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. यावर्षी नवीन पोलीस आयुक्तालय स्वतःच्या इमारतीत जाणार असून त्याचे आज त्याचे भूमिपूजन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, शासकीय इमारती चांगल्या झाल्या पाहिजे असा राज्य सरकारचा आग्रह आहे. यादृष्टीने देशातील सर्वात आधुनिक पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड शहरात होत आहे. त्याच प्रमाणे पोलीस अधीक्षक कार्यालयाची इमारतही होत आहे. याकामी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने अतिशय सुंदर इमारत या ठिकाणी होत आहे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता अत्यंत चांगली निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. या इमारती बघितल्यानंतर एखाद्या खासगी विकासकाला मागे टाकतील, अशा आहेत.
उद्योगधंद्याला राज्यात त्रास होता कामा नये
सामाजिक उत्तरदायित्व निधीतून म्हाळुंगे औद्योगिक पोलीस संकुल बांधण्यात आले आहे. याचा मनस्वी आनंद आहे, असे सांगून ते म्हणाले, उद्योग क्षेत्राच्या वाढीसाठी राज्य शासन प्रयत्न करत असताना उद्योगधंद्याला राज्यात त्रास होता कामा नये. उद्योजकांकडून प्राप्त तक्रारीची दखल घेऊन कडक कारवाई करावी. गुन्हेगारी वृत्तीला आळा घालण्याकरिता मकोका सारखी कारवाई केली पाहिजे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने विविध लोकाभिमुख प्रकल्पावर भर
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने मध्यवर्ती अग्निशामक केंद्र आणि अग्निशामक प्रबोधिनी इमारतीचे काम हाती घेतले आहे, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. शहराच्या हद्दीत याकरीता आरक्षित जागेचा पुरेपूर वापर केला पाहिजे. कृत्रीम बुद्धिमत्तेचा वापर करुन अनधिकृत जाहिरात फलकावर नियंत्रण ठेवण्याकरीता एक चांगली यंत्रणा तयार केली आहे, नागरिकांनी अधिकृत जागेवरच जाहिरात फलके लावली पाहिजे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरात विविध चांगले प्रकल्प हाती घेतले असून नागरिकांना याचा लाभ होणार आहे. प्रशासनात लोकाभिमुखता, पारदर्शकता आणून नागरिकांना उत्तरदायी प्रशासन सिटी हब फॉर डेटा अँड कम्युनिकेशन (सीएचडीसी) च्या माध्यमातून निर्माण होण्यास मदत होणार आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे असलेल्या जागेबाबत महानगरपालिकेसोबत बैठक लावून जागेबाबतचा निर्णय घेण्यात येईल. त्या जागेवर आधुनिक शहराला पूरक अशा बाबी करण्यात येईल.
पुरंदर विमानतळ हे पुण्याचा विकासाला चार पटीने पुढे नेणार
पुरंदर विमानतळ हे पुण्याचा विकासाला चार पटीने पुढे नेणार आहे. येथे केवळ विमानतळ नसून लॉजिस्टिक पार्क तयार करण्यात येईल. पुण्याच्या औद्योगिकरणासाठी ‘इको सिस्टीम’ तयार होईल, तरुणांना रोजगार मिळेल. त्यामुळे जोपर्यंत आपण नवीन विमानतळ बांधणार नाही तोपर्यंत पुणे शहराला आंतरराष्ट्रीय शहर म्हणून ख्याती मिळणार नाही. विमानतळासाठी भूसंपादन करताना कोणाचेही नुकसान होणार नाही. याकरीता चांगले दर ठरवून दर देण्यात येतील, असेही श्री. फडणवीस म्हणाले.
आगामी ५० वर्षाचा विचार करुन अद्ययावत इमारतीची उभारण्यावर भर-उपमुख्यमंत्री अजित पवार
श्री. पवार म्हणाले, या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुमारे ७३० कोटी रुपयांचे विविध विकासकामे होणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ४७५ कोटी आणि पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयाचे १८० कोटी रुपये आणि पोलीस अधीक्षक कार्यालय इमारतीचे ६२ कोटी रुपयांची विविध विकासकामे करण्यात येत आहे. ही कामे दर्जेदार, आकर्षक व्हावीत याकरिता संकल्पना स्पर्धा घेण्यात येतात, यामधून उत्तम आराखड्याची निवड करण्यात येते. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीत वाढ होण्यासोबतच त्या इमारतीत नागरिकांना समाधान वाटले पाहिजे, यादृष्टीने आगामी ५० वर्षाचा विचार करुन अद्ययावत , इको फ्रेडली इमारतीचे कामे करण्यात येत आहे.
शहरात विविध शासकीय इमारतीचे बांधकाम सुरु
पुणे शहरात ८७ कोटी रुपये खर्च करुन सारथीची इमारत पूर्ण करण्यात आली आहे. शिक्षण, कृषी, नोंदणी, कामगार, सहकार आणि पणन भवन, जमाबंदी आयुक्तालय, पुणे शहर पोलीस आयुक्तालय, सामाजिक आयुक्तालय, सारथी प्रादेशिक कार्यालय, येरवडा येथे न्यायालय, मनोरुग्णालय, नवीन मध्यवर्ती इमारत, बालेवाडी येथे ऑलम्पिक भवन तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका इमारत, न्यायालय, आदी इमारतीचे काम करण्यात येत आहे. इमारतीचे कामे करताना जागेचा पुरेपूर वापर करुन जागा सपाटीकरण करुन वाहनतळ, स्वच्छ सूर्यप्रकाश, सौर ऊर्जा आदी सुविधा विचारात घेऊन दर्जेदार, टिकाऊ, हरित इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात लोकसंख्या वाढ होत आहेत, नागरिकांना पायाभूत सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत, यादृष्टीने काम करण्यात येत आहे.
कायद्याचे उल्लघंन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी
पुणे व पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत राहण्याकरीता पोलीस दलाला सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. पोलीस दलाने कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत ठेवावी. कायद्याचे उल्लघंन करणाऱ्यावर कठोर कारवाई करुन गुन्हेगाराला शिक्षा केली पाहिजे, नागरिकांनी कायद्याचे पालन करावे. ताथवडे येथे पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयाला २० हेक्टर जागा पुरेशी असून उर्वरित जवळपास ४५ हेक्टर जागा आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला नागरी सुविधांकरीता द्यावी, अशी मागणी देण्याबाबत मुख्यमंत्री यांच्याकडे केली.
विकासाला गती देण्याकरीता पुरदंर विमानतळ आवश्यक
विमानतळामुळे जिल्ह्याच्या विकासाला मर्यादा येत असून विकासाला गती देण्याकरिता पुरंदर विमानतळ करणे आवश्यक आहे. याकरीता भूसंपादनामध्ये जाणाऱ्या जमिनीला राज्यसरकारच्यावतीने योग्य तो मोबदला देण्यात येईल, याकामी नागरिकांनी सहकार्य करावे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी रस्ते, पूल बांधण्यासोबतच रिंगरोड, मेट्रो, पीएमपीएमपीएल सेवा सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. सार्वजनिक विकास कामे करताना अतिक्रमणे काढण्यात यावी, असेही श्री. पवार म्हणाले.
आमदार श्री. लांडगे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहर आयुक्तालयाच्या माध्यमातून गुन्हेगारी नियंत्रण, विविध लोककल्याणकारी योजना व उपक्रम राबविण्यात आलेले आहे. शहराचे नावलौकिक वाढविण्यासोबतच वैभवात भर पाडणारी इमारत उभी राहणार आहे. आगामी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतील, अशी अपेक्षा श्री. लांडगे व्यक्त केली.
पिंपरी-चिंचवड शहरात विविध विकास कामे आणि प्रकल्पांचे ई-भूमिपूजन व लोकार्पण
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते पोलीस आयुक्त कार्यालय, पिंपरी चिंचवड, म्हाळुंगे औद्योगिक पोलीस संकुल व पोलीस विश्रामगृह देहुरोड, पुणे पोलीस अधीक्षक या इमारतींचा भुमीपूजन तसेच प्रेमलोक पार्क, चिंचवड येथील पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय मधील शिवनेरी सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. पिंपरी येथील भूखंडावरील मध्यवर्ती अग्निशामक केंद्र आणि अग्निशामक प्रबोधिनी इमारत, आकुर्डी प्राधिकरण येथील हेडगेवार भवनजवळील अग्निशमन केंद्र, पवना नदीवरील मामुर्डी ते सांगवडे दरम्यान जोडणाऱ्या पुलाच्या कामाचे भूमीपूजन तसेच मधुबन हॉटेल ते इंदिरा रोड, २४ मी. डी.पी रस्ता, सिल्व्हर स्पून हॉटेल ते इंदिरा रोड १८ मीटर डी.पी रस्ता तसेच या दोन्ही रस्त्यांना जोडणाऱ्या वाकड शिवेपर्यंतचा १८ मीटर रुंदीच्या रस्त्याचे कॉक्रीटीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
स्मार्ट सिटीच्या वतीने जीआयएस आधारित ईआरपीअंतर्गत कोअर ॲप्लिकेशन (सॅप). नॉन कोअर ॲप्लिकेशन, ई-ऑफिस (डीएमएस) आणि भौगोलिक माहिती प्रणालीमध्ये विकसित केलेल्या संगणक प्रणाली, तालेरा रुग्णालय नवीन इमारत, शहरातील विविध ठिकाणी ‘वेस्ट टू वंडर’टाकाऊ वस्तूंपासून निर्मित केलेल्या टिकाऊ कलाकृती, महापालिकेच्या विविध प्रशासकीय इमारतीवर बसविण्यात आलेल्या रुफ टॉप सोलर प्रणालीचे लोकार्पण तसेच सिटी हब फॉर डेटा अँड कम्युनिकेशन उपक्रम आणि कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे स्वयंचलित होर्डिंग शोध व सर्वेक्षण प्रणाली उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्यावतीने मुलांना गुन्हेगारी वृत्तीपासून दूर ठेवण्यासाठी दिशा उपक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या फुटबॉल स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आले. सायबर गुन्हेगाराचा तपास करणाऱ्या तसेच दहशतवाद विरोधी पथकातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
श्री. सिंह यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत करण्यात येणारी विविध विकासकामे आणि प्रकल्पाबाबत माहिती दिली. तर श्री. चोबे आणि श्री.देशमुख यांनी नवीन इमारतीबाबत प्रास्तविकात माहिती दिली. उपस्थित मान्यवरांचे आभार अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी मानले.
क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाने सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्राची मोठी हानी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. ६ : क्रीडा समीक्षणात साहित्यविश्वाचे सौंदर्य ओतून आपल्या ओघवत्या कथनशैलीमुळे क्रीडाक्षेत्राची आवड मनामनांत पेरणारे प्रसिद्ध समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनामुळे मराठीच्या सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
आपल्या शोक संदेशात उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, द्वारकानाथ संझगिरी हे साक्षेपी साहित्यिक, पत्रकार, स्तंभलेखक आणि चित्रवाणी कार्यक्रमांचे निर्माते अशा विविध क्षेत्रांत ठसा उमटविणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनाने एका मिश्किल आणि खुमासदार शैलीच्या क्रीडा पत्रकाराला महाराष्ट्र मुकला आहे.
उत्कृष्ट पत्रकारिता, लेखनशैली, समीक्षा अशा अनेक गुणांनी संपन्न असलेल्या संझगिरी यांनी मराठी, इंग्रजी आदी भाषांतील लेखनातून वाचकांशी साधलेल्या संवादाचा धागा तुटला आहे. त्यांच्या असंख्य पुस्तकांनी मराठी वाचकांना आनंद दिला आणि त्यांचे अनुभवविश्व समृद्ध केले. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी दीर्घकाळ जाणवत राहील, असेही उपमुख्यमंत्र्यांनी शोक संदेशात म्हटले आहे.
महिला आयोगाच्या निर्देशानुसार आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थांची तपासणी सुरू
मुंबई दि. ५ फेब्रु –
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रूपाली चाकणकर यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी, पुणे यांनी आळंदी परिसरातील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांची तपासणी सुरू केली आहे. पुढील दोन दिवसात २० समिती सखोल चौकशी करून आपला अहवाल सादर करणार आहेत.
आळंदी परिसरात वारकरी विद्यार्थी वसतीगृहांमध्ये होणाऱ्या बालकांच्या लैंगिक शोषण संदर्भात आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती चाकणकर यांनी सोमवार दिनांक ३ फेब्रुवारी रोजी आळंदी पोलीस स्टेशन येथे आढावा बैठक घेत परिसरातील वारकरी शिक्षण संस्थांची पाहणी केली होती. नोंदणी नसलेल्या, नियमावलीचे पालन न करणाऱ्या वारकरी शिक्षण संस्थांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते.
त्यानुसार जिल्हाधिकारी, पुणे यांनी ३ सदस्यांचा सहभाग असलेल्या २० समिती स्थापन केल्या असून दिनांक ६ आणि ७ फेब्रुवारी या दोन दिवसात शिक्षण संस्था, वसतिगृहे यांची सखोल तपासणी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायसह अहवाल सादर करण्याचे निर्देश या समितींना दिले आहेत. या २० समिती ८ फेब्रुवारी रोजी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, पुणे यांना आपला अहवाल सादर करणार आहेत. यासाठी यादी तसेच विहित नमुना ही तयार करून देण्यात आला आहे.
अध्यक्ष आणि दोन सदस्य अशी तीन सदस्यांच्या एकूण वीस समिती नेमण्यात आल्या असून यात गट शिक्षण अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, नायब तहसीलदार, प्रशासन अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, संरक्षण अधिकारी, समुपदेशक, विधी सल्लागार, शिक्षक, मुख्यसेविका यांचा समावेश आहे.
समिती स्थापन झाल्यानंतर श्रीमती चाकणकर म्हणाल्या, वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदीमध्ये सुरू असणाऱ्या वारकरी शिक्षण संस्थांमध्ये गैरप्रकार सुरू असून मुलांचे लैंगिक शोषण होत असल्याच्या तक्रारीची दखल घेऊन हे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या प्रकरणात गुन्हा दाखल झालाय तिथे पोलिस तपास करत आहेत. आता समिती मार्फत सर्व अनधिकृत संस्थांचा सखोल तपास होणार आहे. सर्व २० समितीचा अहवाल आणि त्यावरील एकत्रित अहवाल आल्यानंतर या प्रकरणाची पुढील दिशा स्पष्ट करण्यात येईल.
‘दिल्लीत होणारे मराठी साहित्य संमेलन दिल्लीतील मराठी माणसाचे महत्व वाढवणारे ठरेल’
‘मराठी भाषा, मराठी माणूस आणि दिल्ली’ या विषयावरील परिसंवादात मान्यवरांच्या भावना
नवी दिल्ली :
‘दिल्लीत होणारे मराठी साहित्य संमेलन दिल्लीतील मराठी माणसाचे महत्व वाढवणारे ठरेल’, अशा भावना ‘मराठी भाषा, मराठी माणूस आणि दिल्ली’ या परिसंवादात मान्यवरांनी व्यक्त केल्या. दिल्ली हे शहर महाराष्ट्रापासून काहीसे दूर असले तरी दिल्लीचे तख्त मजबूत राखण्यासाठी कायम मराठी माणूस मजबुतीने उभा राहिला आणि यामध्ये मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि एकूण मराठीपणाचे मोठे योगदान होते, अशाही भावना मान्यवरांनी बोलून दाखवल्या. सरहद, पुणे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या परिसंवादाचे दिल्लीत आयोजन करण्यात आले होते.
मराठी साहित्य संमेलनानिमित्त महाराष्ट्रासह दिल्ली आणि देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. याचाच एक भाग म्हणून दिल्लीत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे, खासदार अरविंद सावंत, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, केंद्रीय शिक्षण मंत्रालयातील अतिरिक्त सचिव आनंद पाटील, भारतीय डाक विभागातील संचालक सौरभ देशमुख, दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे वैभव डांगे, दिल्लीस्थित जेष्ठ पत्रकार सुनील चावके यांनी सहभाग घेत आपले विचार व्यक्त केले. दिल्लीस्थित पत्रकार प्रशांत वाघाये आणि नुपूर साळुंखे यांनी हा संवाद घडवून आणला.
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबवले जात आहेत. साहित्य संमेलनाची संपूर्ण आयोजक चमु आणि त्यांचे नेतृत्व करत असलेले संजय नहार हे अत्यंत उत्कृष्ट आयोजन करत आहेत. यापूर्वीही त्यांनी अनेक चांगले कार्यक्रम राबवले आहेत. दिल्लीत होत असेलेले ९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन ऐतिहासिक होईल, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
या परिसंवादादरम्यान, बोलताना आनंद पाटील म्हणाले की, तमिळनाडूपासून दिल्लीपर्यंत महाराष्ट्राबाहेर राहून महाराष्ट्र अनेक वर्षांपासून बघितला. महाराष्ट्राबाहेर विविध राज्यांमध्ये नोकरी, व्यवसाय या निमित्ताने इतर राज्यांमध्येही मराठी माणसं काम करत आहेत. त्यांना एक संघटित स्वरूप प्राप्त व्हावं, या माध्यमातून आपला देदीप्यमान इतिहास आपल्या नव्या पिढ्यांनाही माहिती व्हावा आणि महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या मराठी बांधवांकडूनही महाराष्ट्राची सेवा घडावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. तर अनेक लोकांना नोकरी, व्यवसायासाठी जेव्हा आपल्या महाराष्ट्र राज्याव्यतिरिक्त बाहेर पडावे लागते तेव्हा त्यांनाही विविध अडचणींचा सामना करावा लागतो. अशावेळी दिल्ली किंवा ठिकठिकाणी काम करणारे मराठी भाषिक ज्येष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शन हे अत्यंत महत्त्वाचे असते. अनेक अधिकाऱ्यांना, लोकांना महाराष्ट्राबाहेर स्थिरस्थावर होताना नोकरीच्या निमित्ताने ज्येष्ठ अधिकाऱ्यांची मदत झाली. त्यांनी स्थापन केलेले मराठी माणसाचे समूह, संस्थांची मदत झाली. त्यामुळे मराठीजणांचं हे जाळं खूप महत्त्वाचं असतं, अशा भावना सौरभ देशमुख यांनी व्यक्त केल्या.
तर डॉ. मेधा कुलकर्णी आणि अमोल कोल्हे यांनी खासदार होण्यापूर्वी महाराष्ट्रातून दिल्लीला राजधानी म्हणून ते कसे बघत होते, त्यावेळी त्यांच्या काय भावना होत्या. पुढे संसदेत खासदार म्हणून आल्यानंतर दिल्लीतून महाराष्ट्र आणि देशाकडे कसे बघतात यावर भाष्य केले. महाराष्ट्रात जन्माला आलेले महापुरुष, इतिहासात त्यांनी गाजवलेलं कर्तृत्व हे कायम प्रेरणादायी असल्याचे सांगत छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य, पानिपतची लढाई अशा ऐतिहासिक घडोमोडींचे संदर्भ दिले.
राजधानी दिल्लीत अनेक लोक नोकरी, व्यवसाय, शिक्षणाच्या निमित्ताने येतात. पुढे येथे स्थिरस्थावर होतात. मध्येच पुन्हा गावाकडे जाण्याची ओढ लागते. या परिस्थितीमध्ये आपले मराठी सण, उत्सव, आपल्या लोकांना साजरे करता आले पाहिजेत. आपण जिथे राहतो तिथे मराठी वातावरण नाही, अशा भावना दिल्लीत आलेल्या मराठीजणांच्या मनात येऊ नयेत, यासाठी दिल्लीत राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती आणि त्याचे महत्त्व वैभव डांगे यांनी सांगितले.
सुनील चावके यांनी अनेक वर्षांपासून राजधानी दिल्लीत येत असलेली नेतेमंडळी, त्यांचं दिल्लीतील राजकीय जीवन यावर भाष्य केले. तसेच नोकरीचा भाग म्हणून अनेक माध्यमकर्मी, व्यावसायिक देखील दिल्लीत आहेत, त्यांचा प्रवास त्यांना आलेल्या अडचणी आणि त्यातून मार्ग कसा काढावा, यावरही त्यांनी भाष्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल यांनी तर आभार प्रदर्शन लेशपाल जवळगे यांनी केले.
चौकट- एकेकाळी यशवंतराव चव्हाण, मधू लिमये, वसंत साठे, प्रमोद महाजन अशी दिग्गज नेते मंडळी दिल्लीत होती. या सर्वांची आठवण परिसंवादात सहभागी सर्व मान्यवरांनी काढली. आज केवळ शरद पवार आणि नितीन गडकरी हे दोनच नेते मराठी वजनदार नेते म्हणून दिसतात, इतर लोकं मात्र इथे रमताना दिसत नाही, असाही सूर या परिसंवादात उमटला.
चौकट- महाराष्ट्रातील मराठी माणूस दिल्लीत राहतो, त्यांच्या पुढच्या पिढ्यांना आपली भाषा नीट बोलता आली पाहिजे, ती शिकवली गेली पाहिजे. मराठी भाषिक लोकांचं सण-उत्सवानिमित्त एकत्रीकरण झालं पाहिजे, या सगळ्या गोष्टींसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत. मराठी माणसासाठी हक्काचं व्यासपीठ उभारलं पाहिजे आणि राजधानी दिल्लीतील ‘महाराष्ट्र सदन’ हे दिल्लीत राहणाऱ्या मराठी लोकांना आपलं माहेरघर वाटलं पाहिजे, यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने प्राधान्याने काही गोष्टी कराव्यात, अशा अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
मुख्यमंत्री वर्षावर कधी जातील, तुम्हाला काय घेणं-देणं; अजित पवारांचा संजय राऊतांना सवाल
पुणे-
राज्यात सरकारस्थापन होऊन बरेच दिवस झालेत, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अद्याप मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान म्हणून ओळख असणाऱ्या वर्षा बंगल्यात राहायला न गेल्यामुळे संजय राऊत यांनी राग उठवले आहे. वर्षा बंगला परिसरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्याची शिंग पुरले असल्याचा चर्चा सुरू आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला. मुख्यमंत्री वर्षावर कधी जातील, याच्याशी तुमचे काय घेणे देणे, असा सवाल करत अजित पवारांनी संजय राऊतांवर टीका केली.
राज्याचे मुख्यमंत्री यांचे अधिकृत निवासस्थान हे मलबार हिल परिसरातील वर्षा हा बंगला आहे. त्यामुळे वर्षा हा बंगला कायमच चर्चेत असतो. मात्र, उपमुख्यमंत्री पदावरुन मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री पदाचे उपमुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांनी अद्याप वर्षा बंगल्यात संदर्भात काहीही निर्णय घेतलेला नाही. या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्याकडून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका होत आहे. या टीकेला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले.
पिंपरी चिंचवड येथे आज पोलिस आयुक्त कार्यालयाचा भूमिपूजन समारंभ पार पडला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. एकनाथ शिंदे यांनी घर खाली केल्यानंतर मुख्यमंत्री तिथे राहायला जात नाहीत. मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर कधी जातील, याच्याशी तुमचे काय घेणे देणे, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संजय राऊत यांना केला. आता वर्षा बंगला पाडून तिथे नवीन बिल्डींग बांधायची, असेही म्हणत आहेत, असा शब्दांत अजित पवारांनी समाचार घेतला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर न जाण्याचे कारणही सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या लेकीची दहावीची परीक्षा आहे. मुलगी एकुलती एक असल्यामुळे ती जे म्हणेल, ते मुख्यमंत्र्यांना ऐकावे लागते. माझी परीक्षा झाल्यावर आपण वर्षावर राहायला जाऊ, असे त्यांच्या मुलीचे म्हटले आहे. कोणीतरी रोज सकाळी टीव्हीवर भोंगा वाजवतो. आता असे होणार, आता तसे होणार, असे ते सांगतात. वर्षावर आमकं पुरलंय, तमकी शिंगे पुरली. यापेक्षा राज्याचे हित कशात आहे, ते बघा, असा टोला अजित पवार यांनी संजय राऊतांना लगावला.
कार्यक्रम पोलिसांचा आहे, शिट्या बंद करा, अन्यथा…; अजित पवारांनी भरला दम
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांलयाच्या इमारतीचे भूमिपूजन, महापालिकेच्या विविध कार्यक्रमांचे भूमिपूजन, उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होत आहे. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध मान्यवरांचा सन्मान केला जात होता. उपस्थित असलेले तरुण शिट्ट्या वाजवत होते. त्यामुळे अजित पवार संतापले. त्यांनी माइकचा ताबा घेऊन तरुणांना इशारा दिला. चिखली, जाधववाडी येथे होत असलेल्या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गृह राज्यमंत्री योगेश कदम, महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ यावेळी उपस्थित आहेत.मंचावर मान्यवरांचे सत्कार सोहळे सुरु असताना खाली बसलेल्या काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात शिट्ट्या वाजवल्या. ही गोष्ट अजित पवार यांच्या लक्षात येताच, अजित पवारांचा पारा चढला. त्यांनी थेट माईक हातात घेतला. या अतिउत्साही कार्यकर्त्यांना चांगलेच सुनावले, हा मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आहे ना, का शिट्ट्या वाजवायचा कार्यक्रम आहे? काही शिस्त बिस्त आहे की नाही? या भाषेत अजित पवारांनी भर कार्यक्रमांमध्ये कार्यकर्त्यांना सुनावले.
दरम्यान, आमदार महेश लांडगे यांनी अजितदादांचे नाव घेणे टाळले, विकास कामे झाले ती फक्त मुख्यमंत्र्यांमुळेच झाली, असं ते म्हणाले. त्यानंतर अजितदादांनी महेश लांडगे यांना भाषणातून सुनावले, माझं नाव घ्यायला काय वाईट वाटते काय माहिती, अशा शब्दात अजितदादांनी लांडगेंना सुनावलं.
मंत्री धनंजय मुंडे घरगुती हिंसाचारामध्ये दोषी; करुणा मुंडेना दरमहा एवढी पोटगी
दरमहा 1,25,000 रुपयांची पोटगी देण्याचे कोर्टाचे आदेश
मुंबई-मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. त्यांच्या विरोधात करुणा शर्मा-मुंडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप मान्य केले आहेत. त्यामुळे करुणा शर्मा-मुंडे यांना पोटगी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात वाल्मिक कराड अटक झाल्यानंतर आता याप्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्यावरील दबाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यासंदर्भात कोर्टाने दिलेल्या निकालानुसार करुणा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप कोर्टाने मान्य केले आहेत. करुणा मुंडे या कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरल्या असल्याचे कोर्टाने मान्य केले नसले, तरी धनंजय मुंडे यांनी करुणा यांना दरमहा एक लाख 25 हजार तर त्यांची मुलगी शिवानी हिला दरमहा 75 हजार रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. इतकेच नाही तर खटला लढण्यासाठी करुणा यांना 25 हजार रुपये खर्च देण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत. ही पोटगीची रक्कम खटला सुरू झाला तेव्हापासून आतापर्यंत धनंजय मुंडे यांना द्यावी लागणार आहे.
मला करुणा शर्मा नाही तर करुणा धनंजय मुंडे म्हणा, अशी प्रतिक्रिया करुणा यांनी वृत्त वाहिनीशी बोलताना दिली. न्यायालयाने मीच धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी असल्याचे मान्य केले आहे. हे नाव मिळवण्यासाठी मी खूप मोठी किंमत चुकवली असल्याचे देखील करुणा मुंडे यांनी म्हटले आहे. ‘न्याय जिंकला’ हीच माझी पहिली प्रतिक्रिया असल्याचे देखील करुणा मुंडे यांनी म्हटले आहे.
धनंजय मुंडे यांच्या वकील सायली सावंत यांनी म्हटले आहे की, आजचा आदेश फक्त अंतिम देखभालीसाठी रक्कम देणे बाबत इतकाच आहे. जो केवळ आर्थिक निकष लक्षात घेऊन पारित केलेला आहे. कथित हिंसाचाराच्या कोणत्याही आरोपावर आधारित नाही. धनंजय मुंडे यांनी स्वतः ते शर्मा व मुले यांच्याबरोबर लिव ईन मध्ये असल्याबाबतची यापूर्वीच कबुली दिली आहे. तोच या आदेशाचा आधार आहे. माध्यमांना विनंती आहे की, जबाबदारीने व अचूक वृत्तांकन करावे आणि आदेशाबाबत कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या खोट्या वृत्ताकनापासून दूर राहावे. कोणत्याही मीडियाच्या व्यक्तीला काहीही शंका असल्यास ते रिपोर्टिंग करण्यापूर्वी वकिलांकडून स्पष्टीकरण मागू शकतात आणि असे स्पष्टीकरण देऊनच बातम्या प्रसिद्ध कराव्यात असे आवाहन त्यांनी केले आहे.
वाल्मीक कराडने कलेक्टर दीपा मुधोळ-मुंडेंसमोर जिल्हाधिकारी कक्षात मला मारहाण केली: करुणा मुंडेंचा आरोप
माझ्या बहिणीवरही अत्याचार
मुंबई-वाल्मिक कराडने मला कलेक्टर दीपा मुधोळ-मुंडे यांच्या कक्षात त्यांच्यासमोर मारहाण केली. यावेळी त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी गुरुवारी करुणा मुंडे यांनी केली. मला धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी म्हणून कोर्टाने मान्यता देत पोटगी दिली आहे. करुणा धनंजय मुंडे नावासाठी मी मोठी किंमत चुकवली. यापुढे मला करुणा शर्मा नाही, तर करुणा धनंजय मुंडे म्हणावे असे आवाहनही त्यांनी केले.
करुणा मुंडे यांना मंत्री धनंजय मुंडे यांच्या पहिली पत्नीची मान्यता देत, त्यांना दर महिना सव्वालाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या निकालानंतर करुणा मुंडे यांनी पत्रकारांशी सविस्तर संवाद साधत आपली कैफयित मांडली.
करुणा मुंडे म्हणाल्या की, गेली 3 वर्षे मी ह्या प्रकरणात लढत आहेत. यात मला खूप त्रास झाला, पण माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास होता. मी कोर्टाचे, न्यायाधीश आणि एक रुपया न घेता माझ्या बाजू मांडणाऱ्या माझ्या वकिलांचे आभार मानते. वाल्मीक कराड यांने मला जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात मला मारहाण केली, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तर 15 लाख रुपयांची पोटगी देण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
करुणा मुंडे म्हणाल्या की, मला जी पोटगीची रक्कम मिळणार आहे ती तुटपुंजी आहे. माझ्या घराचा 1 लाख 70 हजार रुपये हप्ता आहे. 30 हजार रुपये मेंन्टेनन्स खर्च आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे काम करणाऱ्या व्यक्तीकडे हजारो कोटींची संपत्ती आहे. पण आमच्या नावावर काहीच नाही. माझा मुलगा 21 वर्षांचा असून तो घरात बेरोजगार बसला आहे. आम्हाला महिन्याला कमीत कमी खर्च 15 लाख रुपये हवे आहेत. त्यासाठी मी हायकोर्टात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
करुणा मुंडे म्हणाल्या की, वाल्मीक कराड यांने मला जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात मला मारहाण केली. वाल्मीक कराडने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. त्याने माझी गाडीही फोडली. यांच्याकडून मला खूप त्रास देण्यात आला. माझ्या बहिणीवर अत्याचार करण्यात आला. हे सर्व प्रकार आम्ही कोर्टात मांडले. सव्वालाख लाख रुपयांच्या पोटगीवर आम्ही समाधानी नाही. या प्रकरणात माझ्या आईच्या जीव गेला आहे. तिने आत्महत्या केली होती.
करुणा मुंडे म्हणाल्या की, कोर्टात हे प्रकरण सुरू होते तेव्हा अनेकदा माझी आणि धनंजय मुंडेंची भेट झाली त्यांनी मला हे प्रकरण मिटवून घ्यावे असे अनेकदा सांगितले. कारण यात माझ्या मुलाचे आणि मुलीचे शिक्षण बंद आहे. माझ्या मुलांना खूप त्रास होत आहे. माझ्या मनात अनेकदा विचार येतो की, आत्महत्या करावी, पण माझ्या आईने आत्महत्या केल्यांतर मला किती त्रास झाला ही मला लक्षात येते. जर माझी आई असती तर देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा जरी धनंजय मुंडे यांना पाठिंबा असता तर मला रोडवर सोडू शकले नसते.
करुणा मुंडे म्हणाल्या की, मी मुंबईत राहत असताना माझ्या घरी कधीही पोलिस येत होते आणि मला पोलिस ठाण्यात घेऊन जात. म्हणून मी मुंबई सोडली आणि आता बीडमध्ये राहते आहे. मी अगदी छोट्या घरात राहते आहे. आमच्या वादानंतर धनंजय मुंडे यांनी राजश्री मुंडेच्या नावावर संपत्ती केली. 27 वर्षे मी धनंजय मुंडे यांच्यासोबत संसार केला आहे. आमच्या नावावर त्यांची काही संपत्ती नाही. पण दुसऱ्या पत्नीच्या नावावर संपत्ती आहे, त्याविरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत. धनंजय मुंडेंच्या कुटुबांसोबत नेहमी बोलणे होत असते, माझ्या मुलांचे आणि धनंजय मुंडे यांचे नातं खूप चांगले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
करुणा मुंडे म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांनी माझ्या दोन्ही मुलांचा प्रतिज्ञापत्रात उल्लेख केला आहे. पण माझा उल्लेख केला नाही. आम्ही लिव्ह इनमध्ये राहिलो नाही तर 27 वर्षे संसार केला. मी निवडणूक आयोगात केस टाकली आहे असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. धनंजय मुंडेंनी विधानसभेची निवडणुकीच्या वेळी 200 बुथवर मतदान होऊ दिले नाही. तिथे त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदान केले.
क्लीन सिटी इंदौरच्या अभ्यास दौऱ्यासाठी १०० सफाई कर्मचाऱ्यांसह दोनशे कार्यकर्ते रवाना.
- स्वच्छ कसबा अभियानात पोलीस खातेही होणार सहभागी – अमितेश कुमार
- आगामी काळात लोक जगभरातून नक्कीच स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा बघायला येतील – हेमंत रासने

पुणे (दि ५): आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा अभियानास पोलीस विभागाच्या माध्यमातून देखील संपूर्ण सहकार्य आगामी काळामध्ये राहणार आहे. पोलीस स्टेशन परिसराच्या स्वच्छते सोबतच कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेली वाहन अस्ताव्यस्त पडणार नाहीत, रस्त्यावरील वाहनांची पार्किंग व्यवस्थितपणे व्हायला हवी, याची देखील आम्ही काळजी घेऊ, एक लोकप्रतिनिधी आपला मतदारसंघात चांगला उपक्रम राबवण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांना अभ्यास दौऱ्यासाठी घेऊन जात असल्याचे कौतुक असल्याची भावना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केली. क्लीन सिटी इंदौरला निघालेल्या अभ्यास दौऱ्याच्या प्रस्थानपूर्व कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
आमदार हेमंत रासने यांच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा अभियाना अंतर्गत तीन दिवसीय क्लीन सिटी इंदौरचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्याचा प्रस्थानपूर्व समारंभ पुणे महापालिकेत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी आमदार हेमंत रासने यांच्यासह महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, प्रसिद्ध उद्योजक सुधीर मेहता, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी, शहर अभियंता . प्रशांत वाघमारे, घनकचरा विभागाचे प्रमुख संदीप कदम, भाजपा कसबा अध्यक्ष राजेंद्र काकडे यांच्यासह पलिका प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, कसबा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते .
यावेळी बोलताना हेमंत रासने म्हणाले, “कसबा मतदारसंघाला भारतातील सर्वात स्वच्छ, सुंदर आणि विकसित मतदारसंघ करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन कार्य केले जात आहे. आज सर्वांसोबत क्लीन सिटी इंदौरच्या अभ्यास दौऱ्यासाठी निघालो असून तेथील स्वच्छतेच्या बाबतीत करण्यात आलेल्या उपाययोजना आगामी काळामध्ये आपल्याकडे राबवण्याचा येतील. यंदा इंदौरला जात असलो तरी पुढील वर्षी लोक स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा बघायला येतील हा आमचा संकल्प आहे”.
इंदौरच्या अभ्यास दौऱ्यासाठी पुणे महानगरपालिकेचे १०० पेक्षा जास्त सफाई कर्मचारी, कसबा मतदारसंघातील स्थानिक कार्यकर्ते, गणेश मंडळ कार्यकर्ते, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच शिक्षक अशा तीनशे जणांचा समावेश आहे. अभ्यास दौऱ्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने पहिल्यांदाच सफाई कर्मचारी राज्याबाहेर जात आहेत.
ढोले पाटील स्कूल फॉर एक्सलेन्स मध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन
-चित्रकलेतून महाकुंभ मेळ्यातील अध्यात्मिकतेचे दर्शन
पुणे: महाकुंभ मेळा-२०२५ प्रयागराज येथे भरला आहे. हा मेळा अध्यात्मिकतेचा सोहळा असतो. या मेळ्यात मोठ्या संख्येने भाविक व साधू एकत्र येतात. या कुंभमेळ्याचे औचित्य साधून सी.बी.एस.सी च्या परिपत्रानुसार ढोले पाटील स्कूल फॉर एक्सलेन्स मध्ये प्रयागराज येथे सुरु असलेल्या आध्यात्मिक उत्सव महाकुंभच्या सांस्कृतिक आणि औपचारिक परंपरावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये इयत्ता ६ वी,७ वी व ८ वी चे विद्यार्थी सहभागी झाले होते.
या स्पर्धेला संस्थेचे अध्यक्ष श्री.सागर ढोले पाटील,शाळेच्या मुख्याध्यापिका प्राचार्या डॉ.अनुराधा अय्यर आणि चित्रकला विषयाच्या शिक्षिका सौ.ज्योती वाघचौरे यांचे मार्गदर्शन लाभले.
