Home Blog Page 47

बिहारमध्ये अजितदादांचे सर्व 14 उमेदवार 500 च्या आत गारद

मुंबई-बिहार विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी एनडीएने विरोधी बाकावरील महाआघाडीचा पुरती दाणादाण उडवली आहे. बिहारमध्ये पुन्हा मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकार येणार हे स्पष्ट झाले आहे. त्यात आता वेगवेगळ्या पक्षांनी केलेली सुमार कामगिरीही समोर येत आहे.

महाराष्ट्रातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने बिहार विधानसभा निवडणुकीत तब्बल 14 जागा लढवल्या होत्या. पण या सर्वच जागांवर राष्ट्रवादीला पराभवाचे तोंड पहावे लागण्याची शक्यता आहे. आतापर्यंत यापैकी एकाही उमेदवाराला 500 मतांचा टप्पा ओलांडता आला नाही. त्यांच्याहून अधिक मते अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना पडली आहेत. सध्या या ठिकाणी एनडीए किंवा महाआघाडीच्या उमेदवारांनी विजयी आघाडी घेतली आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या बिहारमधील उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता वाढली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने नारकटियागंज येथे मोहम्मद राशिद अझीम यांना उमेदवारी दिली होती. त्यांना आतापर्यंत केवळ 104 मते मिळाली. नौटन विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार जय प्रकाश यांना केवळ 43 मते मिळाली. तर पिंप्रा येथील अमित कुमार कुशवाहा यांना 370, मनिहारी येथील सैफ अली खान यांना 196, पारसा येथील बिपीन सिंह यांना 144, सोनेपूर येथील धर्मवीर कुमार यांना अवघी 25 मते मिळाली आहे.

याशिवाय महुआ विधानसभा मतदारसंघात अखिलेश कुमार ठाकूर यांना 149 मते, राघोपूर येथे अनिल सिंह यांना 147 मते, बाखरी येथील विकास कुमार यांना 127 मते, अमरपूर येथील अनिल कुमार सिंह यांना 52 मते, पाटना साहिबचे राष्ट्रवादीचे उमेदवार आदिल आफताब खान यांना 192 मते, मोहानिया मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार मुन्ना कुमार यांना 80 मते, सासाराचे उमेदवार आशुतोष सिंह यांना 21 मते व दिनारा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मनोज कुमार सिंह यांना अवघ्या 53 मते मिळाली आहे. सध्याचा ट्रेंड पाहता 14 पैकी कोणताही उमेदवार 500 मतांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता नाही. त्यामुळे या सर्वांवर डिपॉझिट जप्त होण्याची टांगती तलवार उभी राहिली आहे.

बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोगाचे : हर्षवर्धन सपकाळ

ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. यशपाल भिंगे यांचा पदग्रहण सोहळा टिळक भवनमध्ये संपन्न.

मधुकर पिचडांची नात गिरिजा पिचड यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

मुंबई, दि. १४ नोव्हेंबर २०२५

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे सर्व श्रेय निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांचे आहे. मतचोरी, बोगस मतदान आणि SIR च्या माध्यमातून विरोधकांचे मतदार वगळण्याने भाजपा व मित्रपक्षाचा विजय झाला आहे, असे म्हणत बचेंगे तो और भी लढेंगे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे नवनियुक्त अध्यक्ष प्रा. डॉ. यशपाल भिंगे यांचा पदग्रहण सोहळा टिळक भवन येथे पार पडला. या सोहळ्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ज्येष्ठ नेते, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष डॉ. अनिल जयहिंद, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव जितेंद्र बघेल, सहप्रभारी बी. एम. संदीप, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, सचिन नाईक, राजेंद्र राख, सरचिटणीस दादासाहेब मुंडे, रामहरी रुपनवर, शाह आलम शेख, पल्लवी रेणके आदी उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर प्रसार माध्य़मांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, बिहारच्या निकालानंतर सत्ताधारी जे आरोप करत आहेत त्यात काहीही सत्य नाही ते निराधार आहेत. पाच वर्ष गरिब जनतेकडे दुर्लक्ष करून निवडणुकीच्या तोंडावर महिलांना दिलेले १० हजार रुपये याचाही परिणाम झाला का, यावर चर्चा होईल. पण ज्या पद्धतीने निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाला निवडून आणण्यासाठी काम करत आहे हे पाहता हा प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. देशाला आता टी. एन. शेषन सारख्या निवडणूक आयुक्तांची गरज आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..

ज्येष्ठ नेते, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, ओबीसी समाजातील छोट्या छोट्या जातीकडे लक्ष देण्याची गरज आहे, त्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहचले पाहिजे. लहान घटकांना एकत्र करून संघटनेची ताकद वाढवा. काँग्रेस व राज्यघटनेचा विचार एकच आहे, हा विचार समतेचा आहे आणि आपल्या संत महंतानी जे सांगतिले तेच राज्य घटनेत आहे. देश सध्या एका संकटातून जात असून जो लढतो त्याचा इतिहास लिहिला जाते. आज राहुल गांधी देश, लोकशाही व राज्यघटना वाचवण्याची लढाई लढत आहेत या लढाईत सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे आवाहन थोरात यांनी केले.

या पदग्रहण सोहळ्यात बोलताना ओबीसीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल जयहिंद म्हणाले की, महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, संत, महापुरुष, वारकरी संप्रदायाची भूमी आहे. सामाजीक न्यायाचा मार्ग महाराष्ट्राने देशाला दाखवून दिला आहे. आज राहुल गांधी हे सामाजिक न्यायाची लढाई लढत आहेत. देशातील ९० टक्के जनतेकडे सत्तेतील भागिदारी सर्वात कमी असून मूठभर लोकांच्या हातात सत्तेची भागिदारी आहे. हे चित्र आपल्याला बदलावे लागणार आहे आणि राहुल गांधी हे त्यासाठीच लढत आहेत, असे ते म्हणाले.

डॉ. यशपाल भिंगे यावेळी म्हणाले की, भाजपा व आरएसएसने ओबीसी समाजाचा आवाज दडपला आहे. शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारा हाच मनुवादी विचार आहे. आजही भाजपा सरकारमध्ये ओबीसींचा आवाज दडपला जात आहे. लोकशाही विरोधातील अपप्रवृत्तींच्या विरोधात आक्रमकपणे उत्तर देण्याची गरज असून जशास तसे उत्तर दिले जाईल असे सांगून २०२९ साली महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचा असेल यासाठी काम करू असे डॉ. यशपाल भिंगे म्हणाले. यावेळी यशपाल भिंगे यांनी ओबीसीचा अध्यक्ष म्हणून पुढील वर्षभरात काय करणार याचा संकल्प हर्षवर्धन सपकाळ व अनिल जयहिंद यांना सादर केला.

गिरीजा पिचड यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश..

ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांची नात गिरीजा पिचड यांनी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सपकाळ यांनी त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. गिरीजा पिचड यांच्या रुपाने आदिवासी समाजाला एक नेतृत्व मिळाले असून त्या आदिवासी समाजाच्या न्याय हक्काची लढाई लढतील, असे सपकाळ यावेळी म्हणाले…

नेहरु जयंती निमित्त ‘शिदोरी’च्या विशेषांकाचे प्रकाशन..

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती निमित्त काँग्रेस पक्षाचे मुखपत्र ‘शिदोरी’च्या विशेष अंकाचे प्रकाशन आज प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, बाळासाहेब थोरात यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

मुंबईत शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमध्ये राडा:हॉटेल ताज लँडच्या बाहेर शिवसैनिकांचा गोंधळ,अनिल परबांचा आक्रमक पवित्रा

कामगारांची फसवणूक केल्याचा ठाकरे गटाचा आरोप

मुंबई-शिवसेना ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मुंबई येथील हॉटेल ताज लँडच्या बाहेर राडा झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी ठाकरे गटाचे आमदार व नेते अनिल परब देखील आक्रमक भूमिकेत पाहायला मिळाले. शिवसेना ठाकरे गटाच्या भारतीय कामगार सेनेच्या कामगारांची फसवणूक करत भाजप प्रणीत संघटनांमध्ये घेत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. त्यानंतर शिवसैनिक हॉटेलच्या बाहेर जमले असता गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले.

अखिल भारतीय कर्मचारी संघ ही भाजप प्रणीत संघटना आहे, तर भारतीय कामगार सेना ही शिवसेनेची संघटना आहे. या दोन्ही संघटनांमध्ये वाद झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते हॉटेल ताज येथे दाखल झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत अनिल परब देखील उपस्थित होते. ताज लँड हॉटेलमध्ये भाजपच्या प्रतिनिधींना जाब विचारण्यासाठी अनिल परब त्या ठिकाणी आले असता त्यांना पोलिसांनी अडवले. त्यानंतर परब यांचा रुद्रावतार पाहायला मिळाला.

कोणत्याही परिस्थितीत मी माझ्या कार्यकर्त्यांना अडवू शकत नाही, असे म्हणत अनिल परब यांनी पोलिसांनाच जाब विचारला. यामुळे येथे काही वेळासाठी गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी भाजप नेत्यांशी चर्चा करण्यासाठी फक्त अनिल परब आणि इतर काही लोकांनीच जावे असे पोलिसांनी सांगितले. त्याला अनिल परब यांनी विरोध केला. माझ्यासोबत किमान 25 लोक मी आतमध्ये घेऊन जाणार. सत्तेत आहेत म्हणून त्यांना इतका माज आलाय का? असा संतप्त सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला.

भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांना फसवून भाजपच्या अखिल भारतीय कर्मचारी संघात घेतले जात असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. कामगारांना फसवून त्यांच्या सह्या घेण्यात आल्याचा आरोप अनिल परब यांनी केला. भाजपकडून हॉटेलमध्ये चुकीच्या पद्धतीने कामगार संघटना स्थापन करण्यात आली आहे, त्यात शिवसेनेच्या कामगार संघटनेच्या कामगारांच्या सह्या फसवून घेतल्याचा दावा परब यांनी केला.

गझलनवाझ भीमराव पांचाळे यांना ‘मृदगंध जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

१५ वा मृदगंध पुरस्कार सोहळा २६ नोव्हेंबरला रंगणार

काही व्यक्ती त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा अमीट ठसा उमटवत जगतात. त्यांच्या जाण्यानंतरसुद्धा तो ठसा पुसला जात नाही. उलट त्यांच्या पाऊलखुणा कायमच राहतात. आपल्या बहुआयामी कलासाधनेने अवघ्या महाराष्ट्रावर मोहिनी घालत लोककलेचा वारसा सक्षमपणे  पुढे नेणारे महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप यांची एक प्रतिभावंत लोकशाहीर ही ओळख कधीही विसरली जाणार नाही. भारूड, गोंधळ, पोवाडे अशा विविध लोकधारेने रसिकांची मने चिंब भिजवणारे शाहीर विठ्ठल उमप मराठी जनमानसांसह देश-विदेशात नावाजले गेले. लोकशाहीर, लोकगायक, गीतकार असं बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या शाहीर विठ्ठल उमप यांच्या १५व्या स्मृतीदिनानिमित्त १५वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार’ वितरणाचा भव्य सोहळा बुधवार २६ नोव्हेंबरला रवींद्र नाट्यमंदिर येथे सायं. ६.०० वा. संपन्न होणार आहे. 

कलाक्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना विठ्ठल उमप फाउंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार’ सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येतो. यंदाच्या ‘मृदगंध पुरस्कार २०२५’ पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ गझलनवाझ श्री. भीमराव पांचाळे (जीवनगौरव), शाहीर श्री राजेंद्र राऊत (लोककला क्षेत्र), श्री.प्रदीप शिंदे (शिल्पकला), अभिनेते श्री. जयवंत वाडकर (अभिनय क्षेत्र), श्री. परेश मोकाशी (दिग्दर्शक), श्रीमती मधुगंधा कुलकर्णी (अभिनेत्री आणि निर्माती), अभिनेत्री रिंकू राजगुरू (नवोन्मेष प्रतिभा-अभिनय क्षेत्र) ही मान्यवर मंडळी आहेत. शाल, पुष्पगुच्छ, मानपत्र व लोकशाहीर विठ्ठल उमपांची प्रतिकृती असलेले सुरेख मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

याप्रसंगी बोलताना लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे चिरंजीव, प्रसिद्ध गायक व  विठ्ठल उमप फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदेश वत्सला विठ्ठल उमप म्हणाले, ‘लोककला ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे. बाबांनी जनसामान्यांशी एक वेगळा ऋणानुबंध निर्माण केला. याच कारणाने रसिक प्रेक्षकांनी आम्हालाही आपलसं केलं. कलेशी असलेली ही बांधिलकी जपत समाजाप्रती आपले उत्तरदायित्व तसेच समाजसंस्कृतीचा वारसा जपण्यासाठी आम्ही कायमच कटिबद्ध राहू असा विश्वास नंदेश उमप यांनी यावेळी व्यक्त केला’. 

या समारोहाच्या माध्यमातून कलेच्या विविध क्षेत्रातील कलावंत आपल्या सादरीकरणातून लोकशाहीर विठ्ठल उमपांना सांगितिक मानवंदना देणार आहेत. उस्ताद शाहीद परवेझ खान (सतार) तसेच लावणी कलावंत रेशमा मुसळे परितेकर(पुणे) यांची  संगीत बारी असा सादरीकरणाचा रंगारंग कार्यक्रम या सोहळ्यात रंगणार आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून सांस्कृतिक कार्यमंत्री मा.श्री.आशिष शेलार, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, आय.ए एस.ऑफिसर डॉ. हर्षदीप कांबळे, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार श्री.अमितजी साटम, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री.विभीषण चवरे आदी मान्यवर मंडळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची धुरा डॉ. समीरा गुजर सांभाळणार आहेत. या सोहळ्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे.

लोककलेच्या सेवेसाठीआयुष्य वेचणा-या शाहीर विठ्ठल उमप यांच्या नावाने २०१२ साली स्थापन झालेल्या विठ्ठल उमप फाऊंडेशनचे  सामाजिक कार्य ही  वाखाणण्याजोगे आहे. फाऊंडेशनतर्फे आजवर अनेक गरजूंना मदतीचा हात देण्यात आला आहे. यात शेतकऱ्यांपासून कॅन्सरग्रस्त रुग्णांपर्यंत तसेच शैक्षणिक ते सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक लोककलावंतांचा समावेश आहे. कोविड काळातही अनेक कलाकार, लोककलाकार, साहित्यिक यांना फाऊंडेशनतर्फे सहकार्याचा हात देण्यात आला. कलेसाठी झटत समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ विठ्ठल उमप फाऊंडेशने आपल्या वेगवेगळ्या उपक्रमांतून आजवर जपली आहे. वडिलांचा वारसा जपत त्यांचा मुलगा नंदेश उमप यांनी हा वारसा समर्थपणे सांभाळला आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक पूर्वतयारी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला आढावा

पुणे, दि. 14 नोव्हेंबर- संभाव्य जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात विभागनिहाय नेमलेल्या नोडल अधिकाऱ्यांच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. निवडणूक प्रक्रिया निर्दोष, शांततामय आणि कार्यक्षम पद्धतीने पार पडावी, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. येत्या बुधवारी, दि. 19 नोव्हेंबर रोजी तयारीचा पुनरावलोकन आढावा पुन्हा घेतला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती कदम, जिल्हास्तरीय प्रमुख नोडल अधिकारी श्रीमती चारूशिल देशमुख तसेच विविध विभागांचे नोडल अधिकारी उपस्थित होते.

आढावा बैठकीत मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण वेळेत पूर्ण करणे, आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती, निवडणूक साहित्याची उपलब्धता, ईव्हीएम-तपासणी, तसेच मतदान केंद्रांसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची पूर्तता यासंबंधी प्राधान्याने चर्चा झाली. संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची स्वतंत्र यादी तयार करून त्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणेला अधिक सतर्क ठेवण्या बाबतची तयारी. मतदान कर्मचाऱ्यांच्या वाहतूक व्यवस्था यांसारख्या सुविधा निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार पूर्ण ठेवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.

प्रत्येक विभागाने आपापल्या जबाबदाऱ्या शून्य त्रुटी तत्त्वावर पूर्ण करून रोजची प्रगती अहवाल स्वरूपात सादर करावा, सर्व स्तरांवर योग्य तो समन्वय ठेवून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठीचे दिशा निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.

कुष्ठरोग शोध अभियान अंतर्गत राज्यात १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान घरोघरी तपासण्या

0

मुंबई – केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात मागील पाच वर्षांप्रमाणे यंदाही कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येत आहे. १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये व्यापक सर्वेक्षणाद्वारे कुष्ठरोगाचे रुग्ण शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

यंदाच्या अभियानात ८.६६ कोटी लोकसंख्या आणि १ कोटी ७३ लाख २५ हजार घरे सर्वेक्षणासाठी निवडली असून, ६५,८३२ पथके आणि १३,१६६ पर्यवेक्षक या मोहिमेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. ग्रामीण भागात प्रत्येक पथक दररोज २० घरे, तर शहरी भागात २५ ते ३० घरांना भेट देऊन प्रत्यक्ष शारीरिक तपासणी करणार आहे. प्रत्येक पथकात एक आशा स्वयंसेविका आणि एक पुरुष स्वयंसेवक सहभागी असून, ते सलग १४ दिवस सर्वेक्षण करतील.

कुष्ठरुग्ण शोध अभियानाच्या राज्यस्तरीय जनजागरण समितीची बैठक आज (दि.१४ नोव्हेंबर) आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला आरोग्य सेवा सहसंचालक (क्षयरोग व कुष्ठरोग) डॉ. राजरत्न वाघमारे, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाचे सहायक संचालक डॉ. संजयकुमार जठार, दूरदर्शन प्रतिनिधी डॉ. आलोक खोब्रागडे, आकाशवाणी मुंबईचे राजेश शेजवले, अलर्ट इंडियाचे वरिष्ठ प्रोग्रामर विन्सेंट के. ए., ‘अपाल’चे अध्यक्ष माया रणवरे, महाराष्ट्र कुष्ठ पीडित संघटनेच्या सदस्या मदिना शेख, तसेच जनसंपर्क अधिकारी विकास सावंत या बैठकीला उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना तसेच जिल्ह्याधिकारी व गावांच्या सरपंचांना पत्र लिहून ही मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. आपल्या जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध अभियानात जास्तीत जास्त कुष्ठरुग्णांचे निदान निश्चितीसाठी सर्व यंत्रणांना मार्गदर्शन करुन आपल्या प्रभावी नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश अबिटकर यांनी केले आहे. त्याचप्रमाणे आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉ. निपुण विनायक यांनी या अभियानाचा सखोल आढावा घेतला आणि सर्व जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे हे अभियान यशस्वी करण्यासाठी आवाहन केले आहे. राज्यातील नागरिकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले असून, कुष्ठरोगावरील उपचार पूर्णपणे मोफत, प्रभावी आणि सर्व सरकारी आरोग्य यंत्रणेमार्फत सहज उपलब्ध असल्याची माहितीही आरोग्य विभागाने दिली आहे.

संशयित रुग्णांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून, कुष्ठरोग निदान झाल्यास त्यांना तत्काळ बहुविध औषधोपचार सुरू करण्यात येणार आहे. घरोघर तपासणी करून समाजातील लपलेले, निदान न झालेले कुष्ठरुग्ण शोधून उपचाराखाली आणणे व संसर्गाची साखळी खंडित करणे, कुष्ठरोगाबाबत समाजात जनजागृती वाढवणे, सन २०२७ पर्यंत ‘शून्य कुष्ठरोग प्रसार’ या ध्येयाच्या दिशेने वाटचाल मजबूत करणे, ही या अभियानाची उद्दिष्ट्ये आहेत. अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य स्तरावर सर्वेक्षणाविषयी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली जात आहे. तसेच जिल्हा व तालुका स्तरावर समन्वय समित्या आणि प्रा.आ. केंद्रांवर पथक सदस्यांचे प्रशिक्षण सुद्धा सुरू आहे.

राज्यात कुष्ठरोगाचा प्रसार रोखण्यासाठी आणि रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने नुकतेच कुष्ठरोगाला ‘नोटिफायबल डिसीज’ म्हणून घोषित केले आहे. यानुसार कुष्ठरोगाचे निदान झालेल्या सर्व रुग्णांची नोंद दोन आठवड्यांच्या आत संबंधित जिल्हा आरोग्य कार्यालय, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा, कुष्ठरोग तसेच स्थानिक नागरी आरोग्य अधिकाऱ्यांकडे करणे आता सर्व डॉक्टर आणि आरोग्य संस्थांसाठी बंधनकारक आहे.

महाराष्ट्रातील खाजगी प्रसूती रुग्णालयांसाठी आरोग्य विभागाचा‘लक्ष्य-मान्यता’ उपक्रम

मातामृत्यू कमी करण्यासाठी आणि आदरयुक्त प्रसूती सेवांसाठी राज्य शासन व FOGSI यांचा संयुक्त प्रयत्न

मुंबई, दि. 14 – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने राज्यातील खाजगी प्रसूती रुग्णालयांमध्ये सेवा गुणवत्ता वाढवून प्रसूतीदरम्यान होणाऱ्या मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने “लक्ष्य-मान्यता” (LaQshya-Certification) हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.

हा उपक्रम राज्यातील सर्व खाजगी रुग्णालयांमध्ये दर्जात्मक, सुरक्षित आणि आदरयुक्त प्रसूती सेवा (Respectful Maternity Care) सुनिश्चित करण्यासाठी राबविण्यात येत आहे. महाराष्ट्राने मागील काही वर्षांत मातामृत्यू कमी करण्यामध्ये उल्लेखनीय प्रगती केली असून, आता हा प्रयत्न खाजगी क्षेत्रापर्यंत विस्तारित करण्यात आला आहे.

“लक्ष्य-मान्यता” कार्यक्रमाचा मुख्य हेतू म्हणजे प्रसूतीदरम्यान माता आणि नवजात बालकांचे मृत्यूदर कमी करणे, खाजगी रुग्णालयांमधील सेवा गुणवत्ता, रुग्ण सुरक्षा आणि रुग्ण काळजीत सुधारणा करणे, प्रत्येक महिलेला सुरक्षित व आदरयुक्त प्रसूती अनुभव मिळवून देणे.

हा उपक्रम महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग, फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनॉकॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया (FOGSI) आणि Jhpiego या आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे.

Jhpiego संस्थेमार्फत फॉग्सी आणि खाजगी रुग्णालयांना आवश्यक तांत्रिक सहाय्य, प्रशिक्षण आणि मूल्यांकन सहाय्य पुरविले जाणार आहे.

या कार्यक्रमांतर्गत खाजगी प्रसूती रुग्णालयांना २६ मानकांवर आधारित प्रशिक्षण व मूल्यांकन दिले जाईल.
ही मानके फॉग्सी आणि आरोग्य विभागाच्या तज्ञांच्या सहकार्याने तयार करण्यात आली असून, त्यामध्ये पुढील चार प्रमुख घटकांचा समावेश आहे –

  1. पायाभूत सुविधा आणि यंत्रणा मजबुतीकरण
  2. साधनांची उपलब्धता व वापर
  3. क्लिनिकल कौशल्ये आणि उपचार क्षमता
  4. नोंद व अहवाल प्रणाली (Record & Reporting Mechanism)

यापैकी १६ मानके क्लिनिकल काळजीशी संबंधित असून, १० मानके आरोग्य संस्थात्मक व्यवस्थापनाशी निगडीत आहेत.

खाजगी प्रसूती रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांना सेवा गुणवत्ता, सुरक्षितता आणि काळजी याबाबत सविस्तर प्रशिक्षण दिले जाईल.या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील स्किल लॅब, VC रूम आणि प्रशिक्षण हॉल यांचा वापर करण्यात येईल. प्रशिक्षणादरम्यान लागू असलेले शासकीय शुल्क संबंधित संस्थांकडून अदा केले जाईल.

प्रशिक्षण व कार्यक्रमासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे.मूल्यांकनासाठी राज्यस्तरीय मूल्यांकनकर्ता उपलब्ध करून देणे. जिल्हा स्तरावर फॉग्सी सोसायटीसोबत नियमित आढावा बैठकांचे आयोजन करणे. याची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सक यांची असेल.

राज्यातील खाजगी प्रसूती रुग्णालयांमध्ये दर्जात्मक व सुरक्षित प्रसूती सेवा उपलब्ध होतील. महिलांना प्रसूतीदरम्यान आदरयुक्त व सन्मानपूर्वक देखभाल मिळेल. आरोग्यसेवेतील विश्वास, पारदर्शकता आणि गुणवत्ता वाढेल. मातामृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन महाराष्ट्रातील आरोग्य निर्देशांकात सकारात्मक बदल घडेल.

“लक्ष्य-मान्यता” हा उपक्रम महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात असून, सार्वजनिक व खाजगी क्षेत्राचा संयुक्त सहभाग हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. या उपक्रमामुळे राज्यातील खाजगी रुग्णालयांमध्ये सेवेचा दर्जा आणि मातृत्व आरोग्याचे परिणाम दोन्ही सुधारतील, असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.

पुणे जिल्ह्यातील २५ विद्यार्थी नासा येथे अभ्यासदौऱ्यासाठी रवाना

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या शुभेच्छा

पुणे, दि.१४ : पुणे जिल्हा परिषद शाळांमधील ग्रामीण भागांतील २५ गुणवंत विद्यार्थ्यांची १० दिवसांच्या अमेरिकेतील शैक्षणिक दौऱ्यासाठी निवड झाली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी विद्यार्थ्यांच्या चमूला प्रवासासाठी शुभेच्छा देत दौऱ्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संवाद कौशल्य विकसित होईल, असा विश्वास डॉ.पुलकुंडवार यांनी व्यक्त केला.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू तसेच शिक्षक व पालक उपस्थित होते.

डॉ. पुलकुंडवार म्हणाले, अमेरिकेतील नासा येथे भेट देण्याची ही खूप मोठी संधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळाली असून ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. अमेरिकेतील शिस्त व शिष्टाचाराचे अत्यंत काटेकोरपणे पालन करा, अनोळख्या वस्तूला हात लावू नका, एकमेकांना मदत करा, सर्वांनी एक संघ रहा, शिक्षकांच्या सूचनांचे पालन करा, तब्येतीची काळजी घ्या अशा सूचना दिल्या. देशाला बळकट करण्यासाठी अभ्यास दौऱ्याचा उपयोग करा असे सांगून वारंवार विदेश दौरे करायला मिळावेत , अशा शुभेच्छा दिल्या.

या शैक्षणिक दौऱ्यात विद्यार्थी नासा केनेडी स्पेस सेंटर, स्मिथसोनियन नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियम, नासा अर्थ इन्फॉर्मेशन सेंटर, तसेच सॅन फ्रान्सिस्कोमधील प्रमुख तंत्रज्ञान कंपन्या यांना भेट देणार आहेत. शिष्टमंडळ १५ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे मुंबई येथून प्रस्थान करणार आहे. या दौऱ्यात इयत्ता ६ वी व ७ वी मधील ९ मुली व १६ मुलांचा समावेश असून त्यांच्यासमवेत आयुकाचे शास्त्रज्ञ समीर दुर्डे, शिक्षिका माया लंघे (हवेली), प्रमिला जोरी (आंबेगाव), सुनीता खलाटे (बारामती), तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उज्वला साळुंके (दौंड) यांचा समावेश आहे .

हा कार्यक्रम ‘पुणे मॉडेल स्कूल प्रकल्पातील’ महत्त्वाच्या उपक्रमांपैकी एक असून, पुणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी आयुकाच्या सहकार्याने करण्यात येत आहे. या उपक्रमाला ग्रामीण विद्यार्थ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, १७,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. निवड प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये काटेकोरपणे पूर्ण करण्यात आली.
नासाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयुकाने विशेष तयारी वर्गांचे आयोजन केले, ज्यामध्ये वैज्ञानिक विषय, आंतरराष्ट्रीय संशोधन पद्धती आणि अवकाश विज्ञान संकल्पना यांची ओळख करून देण्यात आली. तसेच, आयुकाने शिक्षकांसाठीही प्रशिक्षणकार्यक्रम घेतले असून, त्याद्वारे शिक्षकांना अन्वेषण-आधारित शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वर्गात प्रभावीपणे आणण्याच्या पद्धती शिकविण्यात आल्या आहेत.

बरेली येथे ८ ते १६ डिसेंबर दरम्यान युनिट मुख्यालय कोट्यातूनअग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन

पुणे, दि. 14: जॅट रेजिमेंटल केंद्र, बरेली यांच्या वतीने अग्निवीर जनरल ड्यूटी , अग्निवीर ट्रेड्समन आणि अग्निवीर लिपिक (ऑफिस असिस्टंट) पदांसाठी भरती मेळावा ८ ते १६ डिसेंबर २०२५ या कालावधीत युनिट हेडक्वार्टर कोटा अंतर्गत आयोजित करण्यात आला आहे.

हा भरती मेळावा सर्व श्रेणीतील उमेदवारांसाठी असणार असून, युद्ध विधवांचे पुत्र, सर्व्हिसमन/माजी सैनिकांचे पुत्र, युद्धातील जखमी जवानांचे पुत्र, जाट रेजिमेंटच्या कर्मचाऱ्यांचे कायदेशीर दत्तक पुत्र, जाट रेजिमेंटमधील सर्व्हिसमन/माजी सैनिकांचे सख्खे भाऊ, इतर रेजिमेंटमधील सर्व्हिसमन/माजी सैनिकांचे कायदेशीर दत्तक पुत्र, उत्कृष्ट (मेधावी) खेळाडू यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

या भरती मेळाव्यात सहभागी होणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह नियोजित तारखांना जॅट रेजिमेंटल केंद्र, बरेली येथे उपस्थित राहावे, असे आवाहन लेफ्टनंट कर्नल हंगे एस. डी. (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे.

बालकांच्या हक्काचे संरक्षण करुन पुरोगामी महाराष्ट्र अधिक मजबूत करुया-सह आयुक्त राहुल मोरे

पुणे, दि.१४: बालकांच्या हक्काचे संरक्षण हे महिला व बालविकास विभागाचे आद्य कर्तव्य आहे, त्यादृष्टीने बालकांच्या हक्कांचे आणि अधिकाराचे सरंक्षण करुन पुरोगामी महाराष्ट्र अधिक मजबूत करुया, असे आवाहन महिला व बाल विकास आयुक्तालयाचे सह आयुक्त राहुल मोरे यांनी केले.

बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय बाल हक्क सरंक्षण आयोग आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित बाल हक्क संरक्षण परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील, अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत, विभागीय उपायुक्त संजय माने, राष्ट्रीय बाल हक्क सरंक्षण आयोगाचे प्रतिनिधी रितू यादव, प्रेरणा कौशिक, जिल्हा महिला बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे आदी उपस्थित होते.

श्री. मोरे म्हणाले, महिला व बाल विकास विभागाच्या वतीने गर्भधारणेपासून ते १८ वर्षेपूर्ण होईपर्यंत बालकांकरिता विविध योजना, उपक्रम राबविण्यात येतात. विभागाच्यावतीने सुमारे १० हजाराहून अधिक अनाथ बालकांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे. अनाथांना शासकीय नोकरीत १ टक्के आरक्षण देण्यात आले असून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन आतापर्यंत वर्ग १ ते वर्ग ४ या पदावर सुमारे एक हजार अनाथांना शासकीय नोकरी मिळाली आहे. राष्ट्रीय बाल हक्क सरंक्षण आयोगाच्या पोर्टलच्या माध्यमातून बालकांचे पुनर्वसन, मिशन वात्सल्याच्या माध्यमातून हरवलेल्या मुलांना त्याच्या आईवडिलांकडे सोपविण्यात येत आहे. राज्यात बालविवाह रोखून गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. जिल्हास्तरावर बालकल्याण समिती, बाल न्याय मंडळ आणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष कार्यालयाच्या माध्यमातून मदत करण्यात येते. बालकांच्या हक्काच्या संरक्षणाकरिता आरोग्य विभाग, पोलीस विभाग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील जिल्हा बाल संरक्षण समिती आदींच्या सहकार्याने महिला व बालविकास विभाग कटीबद्ध आहे, असेही श्री. मोरे म्हणाले.

श्रीमती पाटील म्हणाल्या, बालकांच्या अडीअडचणी समजून घेण्याकरिता कुटुंबासह शालेय पातळीवर समुपदेशन करण्याची गरज आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या बालकांचे समुपदेशन करण्याकरिता शाळा, सामाजिक संस्थांनी पुढे येत सक्रीयपणे काम करण्याची गरज आहे. बालगुन्हेगारीच्या अनुषंगाने सर्व कायद्यांची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे, त्यानुसार कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे. अनाथ, निराश्रित, वंचित बालकांना शासकीय यंत्रणेने मदत करुन त्यांना समाजात ओळख निर्माण करून देऊन त्यांना खऱ्या अर्थांने आधार देण्याचे काम करावे. १८ वर्षापर्यंत सर्व बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने मदत करण्यात येईल, याकरिता प्राधिकरणाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्रीमती पाटील यांनी केले.

श्री. राऊत म्हणाले, लहान वयात बालकांवर संस्कार होत असल्याने घरात पालकांची आणि शाळेत शिक्षकांची मोठी जबाबदारी असते. समाजातील अनाथ, निराश्रित आणि वंचित बालके शोषणाला बळी पडू नयेत, याकरिता सर्वांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. आधुनिक शिक्षणासोबत मुल्यशिक्षणाची जोड देवून शिक्षण दिल्यास पुढची पिढी संस्कारक्षम घडण्यास मदत होईल, असेही श्री. राऊत म्हणाले.

राष्ट्रीय बाल हक्क सरंक्षण आयोगाच्या कार्यप्रणालीविषयी माहिती देवून श्रीमती यादव म्हणाल्या, गेल्या सहा महिन्यांत राष्ट्रीय बाल हक्क सरंक्षण आयोगाने विविध महत्त्वपूर्ण उपक्रम यशस्वीरीत्या राबवले आहेत. यामध्ये सुमारे २६ हजार बालहक्क उल्लंघन प्रकरणांची दखल घेवून त्यावर वेळेत कार्यवाही करण्यात आली. राज्य बाल हक्क सरंक्षण आयोग आणि स्थानिक संस्थांच्या समन्वयातून २ हजार ३०० हून अधिक मुलांची मानवी तस्करीसह विविध असुरक्षित परिस्थितीतून सुटका करण्यात आली. एक हजारापेक्षा अधिक मुलांना त्यांच्या मूळ जिल्ह्यातील बालसंरक्षण संस्थांमध्ये पुनर्वसित करण्यात आले.

शाळांमधील शारीरिक शिक्षा आणि मानसिक छळावर बंदी, तसेच बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम व पोक्सो कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा व राज्यस्तरीय कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे. राष्ट्रीय व राज्य मंडळांशी संलग्न सर्व शाळांमध्ये “शुगर बोर्ड”स्थापित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राज्य व जिल्हा पातळीवरील यंत्रणांच्या सहकार्यामुळे या उपक्रमांची अंमलबजावणी प्रभावीपणे करता आली. राज्य आयोगांच्या सहकार्याने तळागाळातील बालसंरक्षण यंत्रणा बळकट करण्यावर भर देण्यात येत आहे. कामकाजात पारदर्शकता व कार्यक्षमता वाढीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येत असल्याचेही श्रीमती यादव यांनी सांगितले.

श्रीमती ढवळे प्रास्ताविकात म्हणाल्या, महिला व बाकविकास विभागाच्यावतीने प्रधानमंत्री वंदना योजना, एकात्मिक बालविकास सेवा योजना, बाल संगोपन योजना आदी बहूआयामी योजना राबविण्यात येत आहे. बालकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी विभाग कटिबद्ध आहे, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी मान्यवरांच्या बालकाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामकाज केलेल्या हस्ते अंगणवाडी पर्यवेक्षिका छाया मगदूम, रंजना भणगे ‘होप फॉर द चिल्ड्रेन फॉऊंडेशन’च्या संस्थापक डॉ. कॅरोलिन डी. वॉल्टर यांचा सत्कार करण्यात आला.

बिहारच्या निकालाने मतदान मोजणीत घोळ होतो यावर शिक्कामोर्तब- रोहित पवार

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे मतमोजणीत घोळ होत असल्यावर शिक्कामोर्तब झाल्याचा दावा केला आहे. सरकारचे बुजगावणे झालेली यंत्रणा व निवडणूक आयोग यामुळे लोकशाही व पर्यायाने आरक्षण व संविधान धोक्यात आले आहे, असे ते म्हणालेत.

बिहार विधानसभा निवडणुकीत राजद व काँग्रेसच्या महाआघाडीचा पार धु्व्वा उडाला आहे. तिथे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकार पुन्हा एकदा सत्तेत येण्याची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी मतमोजणीत घोळ झाल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, हरियाणा, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीकडे जनतेचा कौल होता. हे चित्र पोस्टल मतदानात देखील स्पष्ट झाले होते. EVM व्होटिंगदरम्यान पहिला एक तास हा कल पोस्टलप्रमाणेच राहिला. परंतु पुढच्या एक दीड तासात सर्व चित्र पालटले. भाजपा आश्चर्यकारक रित्या पुढे गेली आणि धक्कादायक निकाल समोर आला.

आज सेम-टू-सेम याच पद्धतीचे चित्र बिहार निवडणुकीचे निकाल येताना दिसत आहे. येणाऱ्या निकालाने मतदान मोजणीत घोळ होतो यावर शिक्कामोर्तब झालं आहे. सरकारचं बुजगावणं झालेल्या यंत्रणा, निवडणूक आयोग यामुळे एकंदरीतच लोकशाही आणि पर्यायाने आरक्षण व संविधान धोक्यात आलंय हे नक्की!

महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा गुवाहाटी व्हाया सुरत जसा प्रवास झाला तसाच निवडणूक निकाल लावण्याचा आयोगाचा प्रवास हरियाणा टू बिहार व्हाया महाराष्ट्र असा दिसून येतो. असो,
हि निवडणूक थेट बिहारची जनता विरुद्ध इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्यात आहे. तेजस्वी यादव यांना मिळालेला प्रतिसाद त्यांच्या सभांमध्ये उसळलेला जनसागर आणि त्यांनी युवांचे, शेतकऱ्यांचे मांडलेले प्रश्न बघता आजचा निकाल काहीही लागला, तरी जनतेची खरी पसंद आणि जनतेच्या मनातला मुख्यमंत्री मात्र तेजस्वी यादव आहेत यात तिळमात्र शंका नाही, असे ते म्हणालेत.

शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनीही भाजपवर बिहार निवडणूक महिला मतदारांना तब्बल 10 हजारांची उघड लाच देऊन जिंकल्याचा आरोप केला आहे. महिला मतदारांना अधिकृत उघडपणे दहा हजार प्रत्येकी लाच, पाहिजे ते करून देणारा गुलाम निवडणूक आयोग, वाट्टेल त्यात मदत करणारी लाचार सरकारी यंत्रणा, विरोधकांना ब्लॅकमेल करणारी ईडी, सीबीआय, सर्वबाजूंनी कमावलेला निवडणूकीत बेशरमपणे वापरलेला अफाट काळा पैसा, गुंडगिरी, चोरटेपणा सर्वकाही, असे अनेक मुद्दे बिहार निवडणुकीवर बोलण्यासारखे आहेत. भारतात मतपेटीतून राजकीय परिवर्तन होते वगैरे हा इतिहास झाला, ते वर्तमान नाही, असे ते म्हणालते.

दिपोत्सावाने आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन

पुणे- सालाबाद प्रमाणे यंदाही आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला दिपोत्सावाने अभिवादन करण्यात आले क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान व मातंग एकता आंदोलन यांनी याक्रय्क्रामाचे आयोजन केले होते .
पुणे शहर यांच्या वतीने दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत्या या वेळी माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे यांच्या हस्ते दिप प्रज्वलंन करुन दिप उत्सवाला सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित या भागातील माजी नगरसेवक अविनाश बागवे , सौ इंदिरा अविनाश बागवे, विठ्ठल थोरात , आरुण गायकवाड , यासेरबागवे , राजश्री अडसूळ ,लहुजी समता परिषद अध्यक्ष अनिल हातागळे, रवीअप्पा पाटोळे , जेधे फाउंडेशनचे कान्होजी जेधे नाना करपे , सुनील बावकर , गोविंद जाधव , हुसेन शेख , मारुती कसबे, अदित्य गायकवाड , सुनील साळवे , जयदीप शेलार , कुमार आडगळे , श्रावण पाटोळे , राहुल चिदम, मोसिन शेख व मोठ्या संख्येने महिला भगिनी व प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते
.

जे सत्तेवर येणार होते त्यांना EVM ने ५० च्या आत संपवले

मुंबई- उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज लागलेल्या बिहार निवडणूक निकालावर त्यांनी भाष्य केले आहे. बिहारमध्ये जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती, त्यांना 50च्या आत संपवले असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

या संदर्भात संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये पुन्हा एकदा निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. निवडणूक आयोग आणि भाजप यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. या ठिकाणी एकदम महाराष्ट्र पॅटर्न दिसत असल्याचा दावा देखील राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी केलेली पोस्ट देखील पहा…

या संदर्भात आपल्या पोस्टमध्ये संजय राऊत यांनी म्हटले की, बिहाराच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही. निवडणूक आयोग आणि बी जे पी यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते! एकदम महाराष्ट्र पॅटर्न! जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्याना ५० च्या आत संपवले!

बिहार निवडणुकीचे निकाल स्पष्ट होत आहेत. 243 जागांसाठीच्या कलांमधून एनडीएला स्पष्ट यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. एनडीए 198 जागांवर आघाडीवर आहे आणि महाआघाडी 39 जागांवर आघाडीवर आहे. 2020 च्या तुलनेत एनडीएला 65 पेक्षा जास्त जागा मिळत आहेत, तर महाआघाडीला जवळजवळ तितक्याच जागांचे नुकसान होत आहे. गेल्या वेळी 43 जागांपर्यंत मर्यादित असलेले जेडीयू यावेळी 75+ जागांवर आघाडीवर आहे. याचा अर्थ नितीशकुमार सरकार पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे आणि नितीशकुमार दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. दरम्यान, 90 जागांवर आघाडी घेऊन भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे. महाआघाडीत, राजद 29 जागांवर आघाडीवर आहे, तर 61 जागांवर निवडणूक लढवणारा काँग्रेस फक्त 4 जागांवर आघाडीवर आहे. 243 जागांवर निवडणूक लढवणारा प्रशांत किशोर यांचा पक्ष, जनसुराज, आपले खाते उघडू शकलेला दिसत नाही.

अपघात टाळण्यासाठी 6 हजार कोटींचा उन्नत मार्ग लवकरच कार्यान्वित होणार

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नवले पूल परिसराला भेट देत केली पाहणी

आपत्काकालीन उपायांबाबत उद्या बैठक,नऱ्हे ते रावेत उन्नत मार्गाचाही करणार पाठपुरावा

पुणे (प्रतिनिधी) नवले पूल परिसरात गुरुवारी रात्री झालेला अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. असा प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी आपत्काकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाईल. आपत्कालीन उपाययोजनांसंदर्भात उद्या (शनिवारी) संबंधित यंत्रणांसोबत बैठक घेतली जाईल.6 हजार कोटींचा उन्नत मार्ग – नऱ्हे ते रावेत व्हाया सुतारवाडी या उन्नत मार्गाचा विस्तृत प्रकल्प आराखडा (डीपीआर) मंजूर झाला असून त्याला गती देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल,’अशी माहिती पुण्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी दिली.

नवले पूल येथे गुरुवारी झालेल्या अपघातानंतर शुक्रवारी सकाळी मोहोळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या वेळी खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर, पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संजय कदम आदी उपस्थित होते.

मोहोळ म्हणाले, ‘२०२२ मध्ये येथे मोठा अपघात झाला होता. त्यानंतर जांभूळवाडी ते वडगावपर्यंत सातत्याने होणारे अपघात थांबविण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना निश्चित करण्यात आल्या. त्यातील रम्बलर्सची संख्या वाढवणे, स्पीड गन्स वाढवणे, पंक्चर्स बंद करणे यासारख्या काही अल्पकालीन उपाययोजना अमलातही आणल्या गेल्या आहेत. त्यामुळे गेल्या दोन तीन वर्षात अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु,​ गुरुवारच्या दुर्दैवी अपघातात आठ जणांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे कायमस्वरूपीच्या उपाययोजनांना गती देणे आवश्यक आहे,’.

‘मागील अपघातानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत पुण्यात तसेच दिल्लीतही बैठक झाली होती. त्यात जांभूळवाडी ते सुतारवाडी व सुतारवाडी ते रावेत या ३२ किलोमीटर लांबीच्या व सुमारे सहा हजार कोटी रुपये खर्चाच्या उन्नत मार्ग (एलिव्हेटेड रोड) करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचा ‘डीपीआर’ही मंजूर झाला आहे. त्यामुळे येथील अपघात थांबविण्यासाठीच्या या दीर्घकालीन उपाययोजनेला गती देण्यासंदर्भात गडकरीजींची भेट घेऊन पाठपुरावा केला जाईल, असे मोहोळ यांनी नमूद केले.

‘अल्पकालीन उपाययोजनांमध्ये या मार्गावरून येणाऱ्या ट्रक्सची खेड शिवापूर टोल नाक्याजवळच लोड व ब्रेक तपासणी करणे, स्पीड गन्स वाढवून कारवाई करणे, रम्बलर्स वाढवणे आणि सेवा रस्ते पूर्ण क्षमतेने विकसित करणे आदींचा समावेश आहे. तसेच अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने पुढे पाठवता येण्याविषयी चाचपणी केली जाईल. यासंदर्भात पुणे महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा प्रशासन आणि पीएमआरडीए या सर्व घटकांची एकत्रित बैठक शनिवारी घेण्यात येईल. या सर्व यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव दिसल्यास कारवाई केली जाईल, असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.

बिहारमध्ये NDA सरकार, मोदी म्हणाले- सुशासनाचा विजय

बिहार निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. एनडीए २४३ पैकी २०२ जागांसह विक्रमी विजयाकडे वाटचाल करत आहे, तर महाआघाडीला ३४ जागा मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी एक्स वर लिहिले आहे की हा सुशासनाचा विजय आहे.

२०२० च्या तुलनेत एनडीए ७० पेक्षा जास्त जागा मिळवत आहे, तर महाआघाडी जवळजवळ तितक्याच जागा गमावत आहे. प्रचंड विजयादरम्यान, सम्राट चौधरी आणि ललन सिंह यांनी नितीश कुमार यांची भेट घेतली.

गेल्या वेळी ४३ जागांपर्यंत मर्यादित असलेल्या जेडीयूकडे आता ८०+ जागा आहेत. भाजप ९१ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे.

प्रमुख उमेदवारांमध्ये, तेजस्वी यादव यांनी राघोपूरमध्ये सुमारे १२,००० मतांनी विजय मिळवला. त्यांचे मोठे भाऊ तेज प्रताप यांचा महुआमध्ये पराभव जवळजवळ निश्चित आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री जिंकण्याची शक्यता आहे.

महाआघाडीत, आरजेडीकडे २६ जागा आहेत, तर काँग्रेसला चार जागा मिळण्याची शक्यता आहे. पीके यांचा पक्ष, जन सुराज आणि व्हीआयपी यांना त्यांचे खाते उघडता आले नाही. इतरांसह अपक्ष सहा जागांवर आघाडीवर आहेत.

अमित शाह यांनी X वर पोस्ट करून पक्षाचे विजयाबद्दल अभिनंदन केले आणि घुसखोरांना संरक्षण देणाऱ्यांना जनतेकडून “योग्य उत्तर” असे म्हटले. पंतप्रधान मोदी संध्याकाळी ६ वाजता दिल्लीतील भाजप कार्यालयाला भेट देतील.


गेल्या निवडणुकीपेक्षा एनडीएला ६० पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत.
२०२० पासून जेडीयूला ४०+ जागा मिळाल्याने त्यांचा सर्वात मोठा फायदा होत असल्याचे दिसून येते.
२८ जागांवर निवडणूक लढवणारा लोजपा २१ जागांवर आघाडीवर आहे.
सर्व २९ मंत्र्यांमध्ये एनडीए आघाडीवर
जेजेडीचे तेजप्रताप महुआमधून पिछाडीवर आहेत
रघुनाथपूरमधून आरजेडीचे ओसामा शहाब आघाडीवर आहेत
सरायरंजनमधून जेडीयूचे विजय चौधरी आघाडीवर आहेत
बाहुबली आणि आरजेडीचे उमेदवार रीतलाल यादव दानापूरमधून आघाडीवर आहेत
भोजपुरी अभिनेते आणि आरजेडीचे उमेदवार खेसारी लाल छपरातून पिछाडीवर आहेत.
भोजपुरी गायिका आणि भाजपच्या उमेदवार मैथिली ठाकूर अलीनगरमधून आघाडीवर आहेत.