Home Blog Page 465

नाट्यसंगीतात अनुकरण नव्हे तर अनुसरण व्हावे : फैय्याज


महाराष्ट्र गंधर्व नाट्यसंगीत स्पर्धेचे पारितोषिक वितरण
भरत नाट्य संशोधन मंदिर, लायन्स क्लब ऑफ पुणे, सहकारनगर यांचा संयुक्त उपक्रम

पुणे : ताना मारणे म्हणजे नाट्यसंगीत नव्हे. नाट्यसंगीत सादर करताना शब्दांमागील विचार समजून घेत हृदयापासून गाणे उमटले पाहिजे. गायन सादर करताना अनुकरण न करता अनुसरण व्हावे. गायकाने आपल्यातील उपजत गुणवैशिष्ट्ये विकसित करावीत, असा ज्येष्ठत्वाचा सल्ला प्रसिद्ध गायक अभिनेत्री फैय्याज यांनी दिला.
भरत नाट्य संशोधन मंदिर, पुणे आणि लायन्स क्लब ऑफ पुणे, सहकारनगर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र गंधर्व नाट्यसंगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे पारितोषिक वितरण फैय्याज यांच्या हस्ते आज (दि. 9) झाले. त्या वेळी त्या अध्यक्षपदावरून बोलत होत्या. भरत नाट्य मंदिर येथे स्पर्धा व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, ज्येष्ठ ऑर्गन वादक राजीव परांजपे, लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल चंद्रशेखर शेठ, लायन्स क्लब ऑफ पुणे, सहकारनगरच्या अध्यक्षा श्रद्धा हाटे, संयोजक डॉ. प्रसाद खंडागळे, मिलिंद तलाठी मंचावर होते.
स्पर्धेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते झाले. या वेळी ह. भ. प. नारायण महाराज गोसावी, अशोक जाधव उपस्थित होते. स्पर्धेचे यंदाचे 13वे वर्ष असून स्पर्धेत गोव्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातून 80 स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचे परीक्षण संगीत रंगभूमीवर कार्यरत असलेल्या सुप्रसिद्ध गायक कलाकार चिन्मय जोगळेकर आणि सावनी दातार-कुलकर्णी यांनी केले. स्पर्धेच्या आयोजनासाठी कै. सुधाकर वामन खंडागळे अध्यासन, दुर्गम प्रतिष्ठान तसेच प्रदीप रत्नपारखे, नंदकुमार जाधव, दीपक दंडवते, रवींद्र पठारे यांचे सहकार्य लाभले.
स्पर्धकांशी संवाद साधताना फैय्याज पुढे म्हणाल्या, भविष्यात संगीत रंगभूमीवर पदार्पण करणार असाल तर नाट्यसंगीत सादर करताना चेहऱ्यावर भाव दर्शविता येणे आवश्यक आहे. नाट्यगीत हे संवादातून जे मांडायचे करायचे नाही ते व्यक्त करण्यासाठीचे माध्यम असण्याचे भानही ठेवावे. स्पर्धा संयोजकांचे कौतुक करून युवा कलाकारांसाठी मार्गदर्शक कार्यशाळा घेतल्या जाव्यात अशी सूचनाही त्यांनी केली.
स्पर्धेच्या माध्यमातून नाट्यसंगीत गाणाऱ्यांची नवीन पिढी घडत आहे याबद्दल चंद्रशेखर शेठ यांनी आनंद व्यक्त केला.
प्रास्ताविकात डॉ. प्रसाद खंडागळे म्हणाले, नवीन पिढीला अभिजात संगीताची, मराठी नाट्यसंगीताची ओळख व्हावी आणि ही परंपरा अखंडितपणे प्रवाहित रहावी या हेतूने स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
परीक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना सावनी दातार-कुलकर्णी म्हणाल्या, स्पर्धकाने आपल्या आवाजाला पूरक गीत निवडावे. नाट्यगीत सादर करताना ती बंदिश वाटू नये याची काळजी घ्यावी तसेच सुरांकडे लक्ष द्यावे.
उद्घाटनसत्रात मनोगत व्यक्त करताना डॉ. पराग काळकर म्हणाले, अभिजात मराठी भाषा विकसित होण्यासाठी संगीत नाटकांची परंपरा जपली गेली पाहिजे. पारंपरिक कला, संस्कृती, ज्ञान पुढील पिढीपर्यंत प्रवाहित ठेवून कलेचा जागर करणे आवश्यक आहे.
मान्यवरांचा परिचय अभय जबडे यांनी करून दिला तर सूत्रसंचालन निलम खंडागळे यांनी केले. आभार प्रसाद कुलकर्णी यांनी मानले. स्पर्धेनिमित्त नाट्यगीताविष्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात ऐश्वर्या भोळे, वज्रांग आफळे, अनुष्का आपटे यांनी नाट्यगीते सादर केली. त्यांना मोहन पारसनीस (तबला), देवेंद्र पटवर्धन (संवादिनी) यांनी साथसंगत केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल
गट क्र. 1 : (वयोगट 8 ते 15) प्रथम आर्या लोहकरे, द्वितीय मनवा देशपांडे, मैत्री थत्ते. उत्तेजनार्थ शौनक कुलकर्णी, देव मुळे, ऋत्विक लोणकर.
गट क्र. 2 (वयोगट 16 ते 30) प्रथम श्रुती वैद्य, द्वितीय शार्दुल काणे, प्रणव बापट. उत्तेजनार्थ अर्णव पुजारी, सृष्टी तांबे.
गट क्र. 3 (वयोगट 31 ते 60) प्रथम बिल्वा द्रविड, द्वितीय संतोष बिडकर. उत्तेजनार्थ अमृता मोडक-देशपांडे.
गट क्र. 4 (वयोगट खुला) प्रथम संजय धुपकर, द्वितीय मेघना जोशी. उत्तेजनार्थ श्रीकांत बेडेकर.

९८ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, पंजाब आणि बंगालमधील साहित्यिकांचे योगदान या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

पुणे:सरहद, पुणे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त घेण्यात येणाऱ्या ९८ कार्यक्रमांच्या अंतर्गत रशिया, स्नेहवर्धन रिसर्च इन्स्टिट्यूट आणि सरहद संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने २६ व्या आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ‘महाराष्ट्र, पंजाब आणि बंगाल मधील विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वांचे योगदान’ ही मध्यवर्ती संकल्पना होती. या परिषदेमध्ये जगभरातून ११२ पेक्षा अधिक शोध निबंध सादर करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते परिषदेतील शोधनिबंधांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रसंगी सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार यांनी महाराष्ट्र, पंजाब आणि बंगाल मध्ये क्रांतिकारकांची व साहित्यिकांची उज्ज्वल परंपरा आहे असे प्रतिपादन करून दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या साहित्य संमेलनाविषयी भूमिका मांडली. प्रभारी प्राचार्य डॉ. संगीता शिंदे यांनी स्वागतपर मनोगताद्वारे परिषदेच्या नियोजनाचा आढावा घेतला व महत्त्व सांगितले. कला शाखा व मराठी विभाग प्रमुख डॉ. वंदना चव्हाण यांनी महाराष्ट्र, पंजाब आणि बंगाल येथील क्रांतिकारी चळवळ, साहित्य, संतपरंपरा यांच्यातील तौलनिक आढावा घेऊन परिषदेच्या आयोजना मागची भूमिका स्पष्ट केली.

मॉरिशस मराठी विभागाच्या डॉ.मधुमती कौंजूल यांनी मॉरिशस मध्ये १९६० च्या दशकात मराठी विषयाला मिळालेल्या मान्यतेचा तपशील सांगून, मॉरिशस मधील मराठी भाषेचे स्वरूप व वैशिष्ट्ये स्पष्ट केले. श्री. विश्वदीप कौंजूल यांनी मॉरिशस मधील सामाजिक स्थितीचे वर्णन केले आणि केवळ मॉरिशस मध्येच नाही तर जगभरामध्ये महाराष्ट्र, पंजाब आणि बंगाल या तीनही राज्यांतील व्यक्तीमत्वांचा मोठा प्रभाव असल्याचे सांगितले.
समारोप सत्रामध्ये लेखक व अनुवादक प्रशांत तळणीकर यांनी परिषदेच्या पार्श्वभूमीवर जागतिक योगदान देणाऱ्या काही व्यक्तिमत्त्वांच्या कर्तृत्वाचा परिचय करून दिला. इतिहास संशोधक व भाषातज्ज्ञ संजय सोनवणी यांनी संशोधक वृत्ती जोपासून ज्ञानसाधना केली पाहिजे असे मत व्यक्त केले.
परिषदेसाठी सचिव सुषमा नहार, विश्वस्त शैलेश वाडेकर, डॉ. स्नेहल तावरे, डॉ. मधुमती कौंजूल, विश्वदीप कौंजूल, संजय सोनवणी, प्रशांत तळणीकर, डॉ. संगीता शिंदे, डॉ. वंदना चव्हाण, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

पुण्यातील डॉ. डुंबरे पाटील ‘आयर्नमॅन’ कुटुंबाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समधे नोंद

इटलीतील आयर्नमॅन स्पर्धेत डॉक्टर पती-पत्नी, मुलगा व मुलीची विक्रमी कामगिरी; कुटुंबातील चौघांनी स्पर्धा पूर्ण करण्याची पहिलीच वेळ
पुणे: शहरातील डॉ. डुंबरे पाटील कुटुंबाने इटलीत नुकत्याच झालेल्या ‘७०.३ आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धे मध्ये बाजी मारत पुण्याचा आणि भारताचा झेंडा जगाच्या नकाशावर रोवला आहे. हडपसरमध्ये राहणारे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. संपत शिवाजीराव डुंबरे पाटील, त्यांच्या पत्नी रेडिओलॉजिस्ट डॉ. वैशाली डुंबरे पाटील, कन्या प्राची व मुलगा प्रसाद यांनी ही स्पर्धा निर्धारित वेळेत पूर्ण करत विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. हा विक्रम झाल्याचे मानपत्र नुकतेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या वतीने डॉ. चित्रा जैन यांनी डुंबरे पाटील कुटुंबाला प्रदान केले.

‘आयर्नमॅन ट्रायथलॉन’ ही स्पर्धा इटलीतील रोमालिया येथे २२ सप्टेंबर २०२४ रोजी झाली. या स्पर्धेत डॉ. संपत, डॉ. वैशाली आणि बीजे वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे अंतिम वर्षात शिकणारी प्राची व प्रथम वर्षात शिकणारा प्रसाद यांनी सहभाग घेतला. एड्रियाटिक समुद्रामध्ये १.९ किमी पोहणे, त्यानंतर लगेच ९० किमी सायकल चालविणे आणि २१ किमी धावणे असे या स्पर्धेचे स्वरूप होते. ही संपूर्ण स्पर्धा आठ तासात पूर्ण करण्याचे आव्हान स्पर्धकांसमोर होते.
विविध देशातील ३५०० पेक्षा जास्त स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. पोहण्याच्या वेळी समुद्रातील लाटांचा व सायकलिंगच्या वेळी प्रचंड वारा व चढ उतारांचा सामना स्पर्धकांना करावा लागला. परंतु डुंबरे-पाटील कुटुंबातील चारही सदस्यांनी शारीरिक व मानसिक आव्हानांवर मात करत अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेसाठी चौघेही गेल्या ८ ते १० महिन्यांपासून प्रचंड मेहनत घेत होते. प्राची व प्रसाद दोघांनीही आपला अभ्यास सांभाळून स्पर्धेसाठी सरावाला वेळ दिला.

डॉ. संपत डुंबरे पाटील म्हणाले, “ही स्पर्धा आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी एक अविस्मरणीय अनुभव आहे. एकाच कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकाच स्पर्धेत अशी कामगिरी करणे हे केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील एकमेव उदाहरण आहे. अभ्यासाबरोबरच आपल्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी मुलांनी सजग राहावे, हा या मागचा हेतू होता. व्यायाम व शरीर स्वास्थ्यासाठी एकत्र आल्यामुळे आमच्यातील फॅमिली बॉन्डिंग खूप छान झाले आहे.”

कु. प्राची डुंबरे पाटील म्हणाली की, “आयर्नमॅन स्पर्धेसाठी तंदुरुस्ती खूप महत्वाची असते. निर्धारित वेळेत ही स्पर्धा पूर्ण करताना आमच्या चौघांचे छान टीमवर्क झाले. या फिटनेसमुळे आम्हाला इतर गोष्टींमध्ये चांगला फायदा होत आहे. आई-वडिलांसोबत अशी आंतरराष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा जिंकताना आनंद झालाच; पण त्यांच्याविषयीचा आदरही वाढला.”

डॉ. चित्रा जैन यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने डुंबरे पाटील कुटुंबाच्या विक्रमाची नोंद घेतली असून, या ऐतिहासिक कामगिरीबद्दल अभिनंदन करत असल्याचे नमूद केले. या स्पर्धेच्या तयारीसाठी योग्य मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक चैतन्य वेल्हाळ, स्ट्रेंथ ट्रेनर पियूष कुमार, स्विमिंग प्रशिक्षक शुभंकर झरे, योगप्रशिक्षक आराध्या व अविनाश यांना डुंबरे-पाटील कुटुंबाकडून यावेळी सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेच्या शेवटच्या काही दिवसात अनेक अडथळे आले. प्राचीच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने तिला ३ महिने वॉकर वापरावा लागत होता. परिणामी तिचा व्यायाम नीट होत नव्हता. स्पर्धेच्या १५ दिवस आधी तिने मेहनत घेत ताकद मिळवली. प्रसादचीही बारावी व ‘नीट’ परीक्षेची तयारी सुरु होती. अभ्यास सांभाळून त्यानेही प्रशिक्षण पूर्ण केले व आयर्नमॅन स्पर्धेसोबतच बी. जे . वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला.
मुलांना योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले, तर मुले निश्चितच त्यात यशस्वी होतात. नियमित व्यायामाचा दोन्ही मुलांना त्यांच्या अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी खूप उपयोग झाला. त्यांची शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती निश्चितच वाढली. या स्पर्धेच्या तयारीसाठी एकत्रित केलेला हा प्रवास आमच्यासाठी अतिशय आनंददायी व अविस्मरणीय आहे. ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने त्याची नोंद घेतली, याचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे.”
– डॉ. वैशाली डुंबरे पाटील, रेडिओलॉजिस्ट

पीएमआरडीएतील 10 सेवा नागर‍िकांसाठी ऑनलाईन

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत सेवांसाठी घेता येणार लाभ

पुणे : नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात, यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार १० सेवा १ फेब्रुवारीपासून प्रारंभ करण्यात आल्या आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. नागरिकांची शासकीय कामे घरबसल्या ऑनलाईन व्हावी, यासाठी पीएमआरडीएच्या माध्यमातून सेवा सुविधा ऑनलाईन करण्यात येत आहे.

शासनाच्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान आणि विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंमलात आला आहे. या अंतर्गत नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन शासकीय सेवा देण्याच्या दृष्टीने शासनाचे निर्देश आहे. त्या अनुषंगाने पीएमआरडीएच्या माध्यमातून १० सेवा नागरिकांना दि १ फेब्रुवारी २०२५ पासून ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. संबंध‍ित सेवांचा लाभ नागर‍िकांना घ्यावा, असे आवाहन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.

मॅसेजद्वारे कळणार माह‍िती
या ऑनलाईन प्रणालीत अर्जदार नागर‍िकांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्ज प्राप्त झाल्याचा संदेश म‍िळेल. यामुळे नागर‍िकांना कार्यालयात येण्याची गरज राहणार नाही. संबंध‍ितांना आपली फाईल कुठल्या टेबलवर पुढील कार्यवाहीसाठी आहे, याची माह‍िती अर्जसोबत नमूद केलेल्या क्रमांकावर या ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून कळणार आहे.

या सेवा ऑनलाईन उपलब्ध
नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या १० सेवा ऑनलाईन उपलब्ध करून द‍िल्या असून त्या खालीलप्रमाणे आहेत.
विकास परवानगी व‍िभाग
१) अभिन्यास / इमारत बांधकाम परवानगी
२) जोता मोजणी प्रमाणपत्र
३) भोगवटा प्रमाणपत्र
४) झोन दाखला
५) भाग नकाशा
जमीन व मालमत्ता विभाग
६) वाटप भूखंडाचे / गृहयोजनेतील सदनिकांचे हस्तांतरण करणे
७) वाटप भूखंडावर / गृह योजनेतील सदनिकांवर वारस नोंद करणे
८) वाटप भूखंडावर / गृहयोजना सदनिकांवर कर्जासाठी ना हरकत प्रमाणपत्र देणे
अग्निशमन विभाग
९) प्राथमिक अग्निशमन ना हरकत दाखला
१०) अंतिम अग्निशमन ना हरकत दाखला

सदर सेवा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या https://www.pmrda.gov.in या संकेत स्थळावर नागर‍िकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. या १० सेवांसाठी १ फेब्रुवारी २०२५ पासून नागर‍िकांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज करण्यास अडचणी आल्यास संबंध‍ित व‍िभागाला भेट दयावी. त्याठ‍िकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याकर‍िता नागर‍िकांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार आहे.

परवडणारी घरे:पीएमआरडीएच्या सदन‍िकांची बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोडत

पुणे (दि.९) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पेठ क्र. १२ आण‍ि पेठ क्र. ३०-३२ येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत लॉटरी काढण्यात आली होती. त्याची सोडत बुधवारी (दि.१२) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते मुंबईत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करण्यात येणार आहे.

पीएमआरडीएच्या पेठ क्र. १२ येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ईडब्ल्यूएस (१ बीएचके) प्रवर्गातील ४७ सदनिका व एलआयजी (२ बीएचके) प्रवर्गातील ६१४ सदनिका आणि पेठ क्र. ३०-३२ येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत ईडब्ल्यूएस (वन आरके) प्रवर्गातील ३४७ सदनिका व एलआयजी (१ बीएचके) प्रवर्गातील ३२९ सदनिका अशा एकूण १३३७ शिल्लक सदनिकांची लॉटरी काढण्यात आली होती. यासाठी १५ ड‍िसेंबर २०२४ पर्यंत ३ हजार २७१ लाभार्थ्यांनी अर्ज सादर केले होते. त्यापैकी ३२५६ अंतिमतः पात्र झाले तर उर्वरित १५ लाभार्थी अपात्र ठरले होते. पात्र लाभार्थ्यांकरिता सदनिकाची सोडत २२ जानेवारीला नियोजित होती. मात्र प्रशासकीय कारणामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती.

सदनिकांची सोडत बुधवार, १२ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, नगरविकास व‍िभागाच्या राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रिमंडळ परिषद सभागृह, सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथे हा कार्यक्रम होणार आहे. स्थान‍िक पातळीवर सोडतीचा कार्यक्रम श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, आकुर्डी येथे होणार आहे. अर्जदारांनी पीएमआरडीएच्या आकुर्डी येथील कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.

लोणीकंद ते तुळापूर फाटा रस्त्याच्या दुतर्फा असलेलीअतिक्रमने पीएमआरडीएच्या पथकाकडून न‍िष्कास‍ित

पुणे : अनाधिकृत बांधकाम, पत्राशेडसह इतर अनाधिकृत बांधकामांवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अनधिकृत बांधकाम व न‍िर्मुलन व‍िभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. गत दोन द‍िवसात लोणीकंद ते तुळापूर फाटा रस्त्याच्या दुतर्फा असलेली तसेच इतर ठ‍िकाणची एकूण ८७ अतिक्रमने पथकाच्या माध्यमातून न‍िष्कास‍ित करण्यात आली. या कारवाईदरम्यान काही नागर‍िकांनी पीएमआरडीएच्या पथकाला सहकार्य करत स्वत: ची अतिक्रमने काढून घेतली.

कटकेवाडी, लोणीकंद ते तुळावर फाटा रस्त्याच्या दुतर्फा उभारण्यात आलेली ३५ पत्राशेडची अतिक्रमने बुधवारी (दि.५) पीएमआरडीएच्या पथकाने न‍िष्कास‍ित केली. तर गुरुवारी (दि.६) तुळापूर फाटा ते पेरणे फाटा रस्त्याच्या दुतर्फा असलेली ५२ अतिक्रमने काढण्यात आली. गत आठवडयाभरात सव्वा पाचशेपेक्षा अध‍िक अतिक्रमनावर पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम व न‍िर्मुलन व‍िभागाच्या पथकाने कारवाई केली. यात अतिक्रमित व अनधिकृत बांधकाम केलेले दुकाने, आरसीसी स्ट्रक्चर, सीमा भिंती, तात्पुरते पत्राशेड, होर्डिंग्ज आदी हटविण्यात आले.

सदर कारवाई पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पोलिस अधिक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकाम व न‍िर्मुलन व‍िभागाच्या स‍ह आयुक्त (प्र) डॉ. दीप्ती सूर्यवंशी – पाटील, उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार सचिन मस्के, तहसीलदार रविंद्र रांजणे, कनिष्ठ अभियंता अभिनव लोंढे, विष्णू आव्हाड, गणेश जाधव, हरीश माने, सागर जाधव, दीपक माने, प्रशांत चौगुले, प्रणव डेंगळे, ऋतुराज सोनावणे, तेजस मदने यांनी पार पाडली.

  • डॉ. ज्ञानेश्वर भाले, जनसंपर्क अधिकारी, पीएमआरडीए

वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी पीएमआरडीएचा पुढाकार:सात द‍िवसात ४१६ अतिक्रमने न‍िष्कास‍ित

पुणे : शहरासह परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अनधिकृत बांधकाम व न‍िर्मुलन व‍िभागाकडून अनाधिकृत बांधकामावर न‍िष्कासनाची कारवाई सुरु आहे. गत सात द‍िवसात 416 अनधिकृत बांधकामावर पीएमआरडीएच्या पथकामार्फत कारवाई करण्यात आली. या संदर्भात मा. पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अज‍ित पवार यांनी वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने निर्देश द‍िले होते. त्या अनुषंगाने गत सात दिवसापासून व‍िव‍िध भागातील अनधिकृत बांधकामावर पीएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पोलिस आयुक्तालय यांनी संयुक्तपणे वाघोली, केसनंद, आव्हाळवाडी येथून धडक कारवाईला सुरूवात केली आहे.

अनधिकृत बांधकामावर २९ जानेवारीपासून कारवाई करण्यात येत असून ०४/०२/२०२५ पर्यंत एकूण ४१६ वाहतुकीस अडथळा करणारे रस्त्यावरील अतिक्रमित व अनधिकृत बांधकाम केलेले स्ट्रक्चर यामध्ये दुकाने / गाळे / आरसीसी स्ट्रक्चर / सीमा भिंती / तात्पुरते पत्राशेड / होर्डिंग्ज (फलक) इत्यादी हटविण्यात आले. या कारवाईमुळे त्या परिसरातील वाहतुकीची कोंडी कमी झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यापूर्वी १७ जानेवारी २०२५ रोजी हिंजवडीतील लक्ष्मी चौकात आणि २३ ड‍िसेंबर २०२४ रोजी नवले ब्रीज येथे प्राधिकरणातर्फे मोठी कारवाई झाली होती. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे हद्दीतील अनधिकृत बांधकामधारकांनी सदरची अनधिकृत बांधकाम थांबविणेबाबत नोटिस प्राप्त झाली असता बांधकाम सुरूच ठेवले तर उक्त अधिनियमाप्रमाणे कारवाई चालू राह‍िल असे उपजिल्हाधिकारी तथा सह आयुक्त डॉ. दिप्ती सुर्यवंशी-पाटील यांच्याकडून सांगण्यात आले.

संबंध‍ित कारवाई पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पोलिस अधिक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकाम व न‍िर्मुलन व‍िभागाच्या सह आयुक्त (प्र) डॉ. दीप्ती सूर्यवंशी – पाटील, उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार सचिन मस्के, तहसीलदार रविंद्र रांजणे, कनिष्ठ अभियंता अभिनव लोंढे, विष्णू आव्हाड, गणेश जाधव व इतर यांनी पार पाडली.

या भागात होणार पुढील कारवाई
आगामी काही द‍िवसात पुणे-सातारा, पुणे-सोलापूर, मुळशी-पौड, चांदणी चौक ते पिरंगुट या रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा आणणारे अनधिकृत व अतिक्रमित बांधकामे पाडण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने लवकरच सर्व्हेक्षणासाठी पथकांची नेमणूक करण्यात येणार आहे.

आपल्या कामासाठी नागरिकांनी थेट कार्यालय,अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, पीएमआरडीएतर्फे आवाहन

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयात बाहेरील मध्यस्थी व्यक्ती नागरिकांना परस्पर भेटून तुमची कामे आम्ही करून देतो असे सांगून दिशाभूल करत आहे. त्यामुळे संबंधित नागरिकांनी त्यांच्या भूलथापांना बळी न पडता आपली कामे थेट संबंधित विभागाकडून करून घ्यावी, असे आवाहन पीएमआरडीएतर्फे करण्यात येत आहे.

पीएमआरडीए कार्यालयात नागरिक आपली शासकीय कामे घेऊन सातत्याने येत असतात. यात प्रामुख्याने बांधकाम परवानगी, जमीन मालमत्ता आणि अनधिकृत बांधकाम विभागासह इतर ठिकाणी नागरिक आपल्या कामांसाठी येत असतात. मात्र काही बाहेरील मध्यस्थी व्यक्ती जागा मालकाला परस्पर गाठून तुमची कामे आम्ही करून देतो, असे सांगून त्यापोटी आर्थिक मागणी करत असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र अशा प्रकारे पीएमआरडीएमध्ये कुठलीच कामे होत नसल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे. नागरिकांनी स्वतः आपल्या कामासाठी संबंधित विभागाशी संपर्क साधावा, एजंट किंवा इतर मध्यस्थी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पीएमआरडीए प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

विकसित भारतासाठी राजकारणात या – केंद्रीय मंत्री राममोहन नायडू किंजरापू 

देशात उत्कृष्ट विमानसेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, त्यासाठी आवश्यक असणार्‍या पायाभूत सुविधा उभारणीचे काम वेगाने सुरू आहेत. येत्या काही दिवसात तुम्हाला विमानसेवा क्षेत्रात अमूलाग्र बदल झालेले दिसतील.
– राममोहन नायडू, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री

१४व्या भारतीय छात्र संसदेत ’भारत अस्मिता जन प्रतिनिधी श्रेष्ठ’  पुरस्काराने नायडू सन्मानित
पुणे, ९ फेब्रु. : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे देशाला एक लाख युवा लोकप्रतिनिधींची आवश्यकता आहे. राजकारणात उच्चशिक्षित आणि चारित्र्यवान उमेदवार आले नाही, तर पुन्हा वाईट प्रवृत्तीचे लोकप्रतिनिधी येतील. आपले संविधान सर्वोच्च असून, आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला आहे. संविधानाने आपल्या सर्वांना समान हक्क आणि मूलभूत अधिकार दिले आहेत. त्यामुळे पुढे येऊन विकसित भारताच्या निर्मितीसाठी जबाबदारी घ्या आणि लोकसेवा करण्यासाठी राजकारणात या, असे आवाहन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजरापू यांनी भारतीय छात्र संसदेतील देशभरातील युवा प्रतिनिधींना केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्मेंट, पुणे यांच्या वतीने आयोजित १४ व्या भारतीय छात्र संसदेच्या तिसर्‍या सत्रात ‘भारतीय संस्कृती की पाश्चात्य ग्लॅमर : भारतीय युवकांची कोंडी’ या विषयावर नायडू बोलत होते. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ दा. कराड होते. यावेळी हिमाचल प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया, लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन, खासदार अरूण गोविल, ज्येष्ठ अभिनेत्री खुशबू सुंदर, माजी केंद्रीय मंत्री सी. पी. जोशी, आचार्य शिवम, भारतीय छात्र संसदेचे संस्थापक व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ.राहुल कराड, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस उपस्थित होते.
राममोहन नायडू किंजरापू म्हणाले की, भारतातील युवा पिढीचा जगात दबदबा आहे. ही पिढी विकसित भारताचा कणा आहे. केंद्रीय मंत्री म्हणून भारतातील युवा पिढीबाबत मला आदर आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांंच्या विचारांनी आणि शिकवणीने युवा पिढीचे कल्याण होणार आहे. वडिलांचे निधन झाल्यानंतर, माझ्या कुटुंबावर आणि तेलगू भाषिक जनतेवर प्रचंड दुःखाचा डोंगर आमच्यावर कोसळला होता. मात्र, हार न मानता जबाबदारी घेण्याचे ठरविले आणि कामाला सुरुवात केली. मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासोबतच, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यात यशही आले. त्यामुळे मतदारसंघातील नागरिकांनी मला तिसर्‍यांदा निवडून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर विश्वास टाकत, मला केंद्रीय मंत्री केले. त्यामुळे माझ्यावर मतदार संघातील आणि देशातील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी असून, ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, तसेच, सुमित्रा महाजन यांनी एका आईप्रमाणे माझी काळजी घेतली. मला वेळोवेळी मार्गदर्शन केले.  
खुशबू सुंदर म्हणाल्या की, भारताला विकसित बनविण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे. राष्ट्रीय एकात्मतेला प्राधान्य दिले पाहिजे. आम्ही भारतीय हे दोन शब्दच आपली सभ्यता आणि संस्कृती जगासमोर आणतात. भारतातील युवा पिढी उद्याचे भविष्य आहे.
अरुण गोविल म्हणाले , संस्कृती ही हृदयात असते. असे असतानाही आई- वडिलांकडून पाश्चात्य संस्कृती आपल्याला लहानपणीपासून दिली जाते. भारतीय संस्कृती आत्मसात केल्यावरच, आपला देश विश्वगुरू होणार.
कुलदीप सिंह पठानिया म्हणाले, युवा पिढीने पाश्चिमात्य संस्कृती किंवा भारतीय संस्कृती या दोन्ही संस्कृतीमधील चांगल्या गोष्टी घ्याव्यात. हे करीत असताना, भारतीय संस्कृतीला अजिबात विसरून चालणार नाही.
डॉ.राहुल कराड यांनी भारतीय छात्र संसदेच्या आयोजनाचा उद्देश सांगत, देशात सक्षम लोकशाहीच्या निर्मितीसाठी युवा पिढीला शिक्षण आणि प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचे सांगितले.
सूत्रसंचालन डॉ. गौतम बापट यांनी केले.

कल्याण ज्वेलर्सतर्फे कारागिरांचे हित साधण्यासाठी ‘क्राफ्टिंग फ्युचर्स’ हा नवा उपक्रम

थ्रिसुर,– कल्याण ज्वेलर्सने क्राफ्टिंग फ्युचर्स हा नवा क्रांतीकारी, सीएसआर उपक्रम जाहीर केला असून ब्रँडच्या विथ लव्ह या तत्वावर तो आधारित आहे. हा उपक्रम दागिने घडवणाऱ्या कारागिरांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांची कला जपण्यासाठी आणि सामाजिक विकास साधण्यासाठी हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाचा पाया रचून अमलबजावणी करण्यासाठी कल्याण ज्वेलर्सने तीन कोटी रुपयांची बांधिलकी जाहीर केली आहे. त्यामुळे सुरुवातीपासून या उपक्रमाचा ठोस परिणाम साधण्यास मदत होणार आहे.

व्यापक आणि अर्थपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी कल्याण ज्वेलर्स आपले भागीदार आणि भागधारकांना यात सहभागी होण्याचे आवाहन करत आहे. क्राफ्टिंग फ्युचर्स हा उपक्रम सुरू असून दीर्घकालीन कृती योजना त्याअंतर्गत आखण्यात आली आहे. त्यानुसार हा उपक्रम येत्या काही वर्षांत विकसित होईल आणि त्याचा वेगाने विस्तार केला जाईल.

‘दागिने म्हणजे केवळ सोने आणि जेमस्टोन्स नसतात, तर कारागीर आपली कला आणि आत्मा त्यात ओतून जिवंत करतात. त्यांची कारागिरी ही एक सजीव परंपरा आहे, जी जपणं आणि पुढे नेणं गरजेचं आहे. क्राफ्टिंग फ्युचर्सच्या मदतीने आम्ही पारंपरिक कारागिरी आधुनिक कामगिरीसह मेळ घालत या क्षेत्राचा वारसा जपणाऱ्या कारागिरांच्या पिढ्यांसाठी ठोस भूमिका घेत आहोत. या चळवळीमध्ये सहभागी होऊन प्रत्येक कारागिराला चांगले भविष्य मिळवून देण्याचे, त्यांना सक्षम करण्याचे व योग्य मूल्य मिळवून देण्याचे आवाहन करतो,’ असे कल्याण ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक टीएस कल्याणरामन म्हणाले.

क्राफ्टिंग फ्युचर्स हा केवळ एक सीएसआर उपक्रम नाही, तर शाश्वत बदल घडवण्यासाठी आखलेली मोहीम आहे. हा उपक्रम परंपरांचा नाविन्याशी मेळ घालणारा, कामाची ठिकाणे सुधारणारा, तंत्रज्ञानाचा समावेश करणारा व कौशल्य विकासाची संधी देणारा आहे. या धोरणामुळे कारागिरांचा वारसा जपला जाईल, शिवाय त्यांना बदलत्या उद्योगक्षेत्रात टिकून राहाण्याची सक्षमता मिळेल. त्याशिवाय हा उपक्रम कारागिरांच्या मुलांच्या शिक्षणासा पाठिंबा देईल, आरोग्यसेवा पुरवेल आणि कारागीर व त्यांच्या कुटुंबीयांना दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी काम करेल.

हा उपक्रम पुढे नेत असताना कल्याण ज्वेलर्स दीर्घकालीन भागीदारक व भागधारकांना त्यात सहभागी होण्याचे आवाहन करत आहे. एकत्रितपणे कारागिरांना बहरण्यासाठी, परंपरा जपण्यासाठी व त्यांच्या योगदानाची दखल घेतली जाण्यासाठी शाश्वत यंत्रणा उभारण्याचे ध्येय आहे.

अनिता माने यांना रंगत-संगत प्रतिष्ठानचा प्रेमकवी पुरस्कार

पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानच्या काव्य विभागातर्फे व्हॅलेंटाईन डेनिमित्त गुरुवारी प्रेमकवी पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यंदाच्या प्रेमकवी पुरस्काराने प्रसिद्ध कवयित्री अनिता माने यांचा गौरव केला जाणार आहे.
पुरस्कार वितरण समारंभ दि. 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, दुसरा मजला, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला असून पुरस्काराचे वितरण प्रसिद्ध लेखिका व कवयित्री डॉ. वर्षा तोडमल यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रेम कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून यात कांचन सावंत, डॉ. ज्योती रहाळकर, सुजित कदम, कविता क्षीरसागर, चंचल काळे, जयश्री श्रोत्रिय, केतकी देशपांडे, निरूपमा महाजन, विजय सातपुते, मनीषा सराफ, स्वप्नील पोरे, तनुजा चव्हाण, प्रभा सोनवणे यांचा सहभाग असणार आहे, असे रंगत-संगत प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष मैथिली आडकर यांनी सांगितले. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

प्रसाद रेशमे, धनंजय औंढेकर यांच्या भागिदारीने क्रिकेट सामन्यात मुख्यालय विजयी

भुजंग खंदारे यांचे तीन बळी; शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला सामना

बारामतीमहावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेनिमित्त आयोजित क्रिकेटच्या प्रदर्शनीय सामन्यात कर्णधार संचालक (प्रकल्प) श्री. प्रसाद रेशमे व कार्यकारी संचालक श्री. धनंजय औंढेकर यांनी ३७ धावांची भागीदारी केल्यामुळे मुंबई मुख्यालय संघाने पुणे प्रादेशिक संघावर शेवटच्या चेंडूवर विजयी धाव घेत एक गडी राखून मात केली. पुणे प्रादेशिक संचालक व कर्णधार श्री. भुजंग खंदारे यांनी गोलंदाजीमध्ये अचूक मारा करीत तीन बळी मिळवत सामन्यात रंगत आणली. मात्र मुंबई मुख्यालयाच्या उर्वरित फलंदाजांनी सावध पवित्रा घेत संघाला विजय मिळवून दिला.

बारामती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयमवर शनिवारी (दि. ८) झालेल्या १६ षटकांच्या क्रिकेट सामन्यात पुणे प्रादेशिक संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी स्वीकारली. यात कार्यकारी अभियंता श्री. संजय गायकवाड (२३ धावा) व सहायक महाव्यवस्थापक श्री. शशिकांत पाटील (१३ धावा) यांनी जोरदार सुरवात केली. त्यानंतर मुख्य अभियंता श्री. स्वप्निल काटकर व श्री. धर्मराज पेठकर, कार्यकारी अभियंता श्री. विकास आल्हाट यांनीही धावसंख्येला आकार दिला. त्यामुळे पुणे प्रादेशिक संघाने १६ षटकांत ५ बाद ७८ धावा केल्या. यात मुख्यालय संघातील कार्यकारी संचालक सर्वश्री परेश भागवत, दिनेश अग्रवाल, दत्तात्रेय पडळकर, महाव्यवस्थापक राजेंद्र पांडे, कार्यकारी अभियंता सुनील पावरा यांनी अचूक गोलंदाजी करीत पुणे प्रादेशिक संघाला रोखण्यात यशस्वी झाले.

७९ धावांचे आव्हान स्विकारून मुंबई मुख्यालय संघाने फलंदाजी सुरु केली. मात्र शशिकांत पाटील यांच्या पहिल्याच षटकात एक फलंदाज शून्य धावसंख्येवर गमावला. कार्यकारी संचालक श्री. दिनेश अग्रवाल व सहायक महाव्यवस्थापक श्री. वैभव थोरात यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघेही सावधपणे धावसंख्या वाढवत असताना बाद झाले. त्यानंतर संचालक (प्रकल्प) श्री. प्रसाद रेशमे (२१ धावा) व कार्यकारी संचालक श्री. धनंजय औंढेकर (१९ धावा) यांनी डाव सावरला आणि चौफेर फटकेबाजी करीत ३७ धावांची भागीदारी केली.

ही भागीदारी वाढत असताना पुणे प्रादेशिक संघाचे कर्णधार भुजंग खंदारे यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत अचूक मारा सुरु केला. त्यांनी दोन षटकांत तीन फलंदाजांना बाद करीत सामन्याची रंगत वाढवली. मात्र गौरव खरे व हसीब खान यांनी सावध फलंदाजी करीत एकेरी, दुहेरी धावा केल्या. त्यामुळे मुख्यालय संघाची धावसंख्या ८ बाद ७२ झाली आणि शेवटच्या षटकात विजयासाठी ७ धावांची आवश्यकता होती. शेवटचे षटक श्री. खंदारे यांनी सुरु केले. यात दुसऱ्याच चेंडूवर मुख्यालय संघाचा फलंदाज धावचित झाला आणि सामन्याच्या निकालाची आणखीनच उत्कंठा वाढली. मात्र शेवटच्या चेंडूवर दोन धावांची आवश्यकता असताना सुमेध कोलते यांनी संघाला विजय मिळवून दिला.

आयएनएस तुशील सेशेल्समधील पोर्ट व्हिक्टोरिया येथे दाखल

मुंबई- आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याभोवती पहिल्यांदाच प्रवास करणाऱ्या आयएनएस तुशीलचे 7 फेब्रुवारी 2025 रोजी सेशेल्समधील पोर्ट व्हिक्टोरिया  येथे नियमित कार्यासाठी आगमन झाले. भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकारी आणि भारतीय नौदलाच्या तुकडीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी जहाजाचे उत्साहाने स्वागत केले. या बंदर भेटीदरम्यान, कमांडिंग ऑफिसर कॅप्टन पीटर वर्गीस यांनी सेशेल्समधील भारताचे उच्चायुक्त  कार्तिक पांडे आणि सेशेल्स संरक्षण दलांचे प्रमुख मेजर जनरल मायकेल रोसेट यांचे स्वागत केले. भेटीदरम्यान यावेळी ‘निशार-मित्र’ टर्मिनलचे प्रात्यक्षिक देखील दाखवण्यात आले.

भारताचे सेशेल्ससोबत द्विपक्षीय संबंध ऐतिहासिक संपर्कांनी जोडलेले असून, उभय देशात घनिष्ठ मैत्री, समजूतदारपणा आणि सहकार्याचे ते प्रतीक आहे.  29 जून 1976  रोजी सेशेल्सला स्वातंत्र्य मिळाले तेव्हाच भारताचे सेशेल्सशी राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. आयएनएस निलगिरीच्या एका तुकडीने सेशेल्सच्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात भाग घेतला होता. आयएनएस तुशीलची ही भेट दोन्ही हिंद महासागर प्रदेशाच्या राष्ट्रांमधील संबंध आणखी दृढ करण्यास मदत करेल.

m

सत्याची  विचारधारा पकडून राजकारणात या – डॉ. कन्हैय्या कुमार

१४व्या भारतीय छात्र संसदेच्या पहिल्या सत्रात

पुणे : सत्तेचे आणि सत्याचे असे दोनच प्रकारचे राजकारण आपल्या देशात आहे. सत्याच्या विचारधारेत संघर्ष भरपूर आहे. मात्र, या विचारधारेला धरुनच काम करा. सत्तेच्या राजकारणाच्या विरोधात हिंमतीने आणि विचारांनी लढून काम करायची इच्छा असेल, तेव्हाच राजकारणात या. तुम्हाला सत्तेच्या राजकारणाशी हातमिळवणी करून, आरामात आयुष्य जागता येईल. मात्र, सत्याची कास धरल्यावर तुम्हाला महात्मा गांधी, गौतम बुध्द, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावरून वाटचाल करण्याची संधी मिळेल, असे स्पष्ट मत नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे (एनएसयुआय) प्रभारी डॉ. कन्हैया कुमार यांनी व्यक्त केले


एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट पुणे यांच्या वतीने आयोजित १४ व्या भारतीय छात्र संसदेच्या पहिल्या सत्रात ’भारतीय राजकारणाची विचारधारा डावीकडे, उजवीकडे की नजरेच्या बाहेर’  या विषयावरील परिसंवादात  डॉ. कुमार बोलत होते. या परिसंवादात हिमाचल प्रदेशच्या विधानसभेचे अध्यक्ष कुलदीपसिंह पठानिया, खासदार राजकुमार रोत, खासदार ड. ए. ए. रहीम सहभागी झाले होते. यावेळी कुलगुरु डॉ. आर.एम.चिटणीस व विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.
डॉ. कन्हैय्या कुमार म्हणाले की, आपल्या देशाचे राजकारण हे विचारधारेपेक्षा जुळवाजुळवीचे झाले आहे. देशातील राजकारण्यांना राजकारण हे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्सप्रमाणे वाटत असून, त्यांचा ते वेळोवेळी उपयोग करून घेत आहेत. राजकारणाच्या संरचनेत दोन प्रकाराचे लोक असतात. एक म्हणजे लाभ घेणारे, तर दुसरे राजकारणापासून पिढीत झालेले. तुम्हाला लाभ मिळत असेल तर तुम्ही राजकारणाचे गोडवे गाता. मात्र, त्याच राजकारणापासून तुम्हाला त्रास होत असल्यास, तुम्ही त्याच्या विरोधात उभे रहाता. भारतात समानतेची आणि वैचारिक विचारधारा फार जुनी आहे. त्यामुळे ती कोणत्याही देशापासून आयात करण्याची आवश्यकता आहे. विचारधारा नसणारे लोक आणि कुत्र्यांमध्ये कोणताही फरक नाही. त्यामुळे विचारधारा नसल्यास, तुम्हाला प्रश्न विचारण्याची किंवा विरोधात लढण्याची हिंमतच आली नसती. लढाई नेहमी सत्य आणि सत्तेची राहिली आहे.

कुलदीप सिंह पठानिया म्हणाले, आपल्याला इतिहासात रमून चालणार नाही. देशासाठी काय करायचे आहे, याचा विचार आपल्याला आता वर्तमानकाळात करायचा आहे. स्वातंत्र्याच्या वेळी आपली लोकसंख्या ३४ कोटी होती, ती आता १४० कोटी झाली आहे. बिहार, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश येथील लोकांच्या राहणीमान किंवा आर्थिक परिस्थितीचा महाराष्ट्रातील लोकांच्या परिस्थितीशी तुलना केल्यास, उत्तर आपल्याला मिळेल. सर्व राज्यांचा समान विकास होणे गरजेचे आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. अजूनही लहान आणि मागास राज्यातील लोकांना अन्न, वस्त्र, निवारा या तिन्ही गरजांसाठी लढावे लागत आहे. तेथे अजूनही रोजगाराच्या समस्या आहे. मात्र, आपण देश म्हणून विकासाच्या मोठ्यामोठ्या गप्पा मारतो. आपल्याला देशातील प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करून, आपली पावले टाकण्याची गरज आहे. आपल्या देशाला राईट किंवा लेफ्ट नाही, तर माणसाचा आणि माणुसकीचा विचार करणार्‍या विचारधारेची आवश्यकता आहे. तुम्ही राजकारणात जाण्यासाठी इच्छुक आहात, ही चांगली बाब आहे. भविष्यात लोकप्रतिनिधी होऊ शकले नाही, तरी देशासाठी आपल्याला चांगले योगदान द्यायचे आहे, हा विचार नक्की करा.

राजकुमार रोत म्हणाले की, देशातील गेल्या १० ते १५ वर्षाचा इतिहास पाहिल्यास राजकीय विचारधारा कमकुवत होत असून, व्यक्तिगत स्वार्थ वाढत आहे. एखादा लोकप्रतिनिधी १५ वर्षे एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असतो. मात्र, अचानक सत्तेसाठी किंवा राजकीय स्वार्थासाठी विचारधारा सोडून दुसर्‍या पक्षात जात असल्याच्या घटना वाढत आहे. आपले शरीर हे एखाद्या राजकीय  पक्षासारखे असून, त्यातील आत्मा ही राजकीय विचारधारा आहे. अशावेळी राजकीय विचारधारा नसणारे पक्ष म्हणजे आत्माविना शरीर असून, ते भविष्यात टिकू शकणार नाही. प्रत्येक विचारधारेत काही ना काही चांगल्या गोष्टी आहेत. आपल्याला त्या  चांगल्या गोष्टी वेचायच्या आहेत. डाव्या विचारधारेत गरिबांचा विचार आहे, तर उजव्या विचारसरणीत प्रखर राष्ट्रवाद आहे. देशाची गरीबीची परिस्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत तुमची विचारधारा कोणतीही असो, आपल्याला देशाचा मजबूत करायचे असून, त्या देशातील गरीब व्यक्तीचा विकास होण्याची गरज आहे. गरीबाला त्याचा हक्क मिळायला हवा. आपण जातीपातीच्या राजकारणातून बाहेर निघत नाही, तोपर्यंत आपला देश विश्वगुरू होणार नाही,

अ‍ॅड. ए. ए. रहीम म्हणाले की, देशातील श्रीमंत व्यक्ती श्रीमंत होत असून, त्यांची संपत्ती दुप्पट आहे. बोटावर मोजण्याइतक्या लोकांकडे देशातील निम्म्यापेक्षा अधिक संपत्ती आहे. त्याचवेळी गरीब आणि वंचित लोकांना जगण्यासाठी झगडावे लागत आहे.  डाव्या विचारसरणीत गरीब आणि आर्थिकदृष्ट्या वंचित लोकांचा विचार करण्यात येतो. त्यानुसार देशातील सर्व स्तरातील नागरिकांचा फायदा होईल, या दृष्टीने धोरणे आखली जातात. मात्र, उजव्या विचासरणीत श्रीमंतांचा विचार करण्यात येत असून, त्यांना फायदा पोहोचविण्यासाठी ध्येय – धोरणे आखण्यात येतात. गरीबाला केंद्र बिंदू मानून शिक्षण, आरोग्य, उद्योग, पर्यावरण अशा सर्व क्षेत्रातील लाभ नागरिकांना मिळवून देणार्‍यांची कास आपल्याला पकडावी लागेल. डावी किंवा उजवी यापैकी कोणतीही विचारधारा कोणतीही असू द्या. मात्र, मानवतेची विचारधारा विसरू नका.

वैज्ञानिक दृष्टिकोन ठेऊन वाटचाल करा
भविष्यात लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचे असल्यास, वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेऊन वाटचाल करा. तेव्हाच तुम्हाला फिजिक्स आणि क्वांटम फिजिक्स यामधील फरक कळेल. वैज्ञानिक दृष्टिकोन जपाल, तर भविष्यातील भारतासाठी ध्येय धोरणे आखू शकाल. बदलत्या काळात अशिक्षित लोकप्रतिनिधी आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या बाबींवर धोरणे आखू शकत नाहीत. त्याचप्रमाणे आपल्याला इतिहासाची माहिती असायला हवी. इतिहास माहिती नसल्यास, तुम्हाला तुमची मते ठामपणे मांडता येणार नाही. त्यामुळे राजकारणात उच्चशिक्षित लोकांनी येण्याची गरज आहे. त्याशिवाय आपल्या देशाची प्रगती होणार नाही.

गोपीचंद हिंदुजा यांच्या ‘आय अॅम?’ या संकलित पुस्तकाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते प्रकाशन

·         सर्व धर्मांमध्ये दिसून येणारी भारतीयता ही गुणसंपदा या पुस्तकात अधोरेखित झाल्याची उपराष्ट्रपतींची भावना

मुंबई, : प्रसिद्ध उद्योगपती आणि हिंदुजा समूहाचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांनी संकलित केलेल्या ‘आय अॅम?’ या पुस्तकाचे प्रकाशन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या आज हस्ते झाले. उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानी आयोजित एका भव्य समारंभात हा प्रकाशन सोहळा झाला. या प्रसंगी राजकीय, व्यावसायिक आणि राजनैतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

धनखड यावेळी म्हणाले, “हा खरोखरच एक विलक्षण आणि महत्त्वाचा क्षण आहे. गोपीचंद पी. हिंदुजा यांनी संकलित केलेल्या ‘आय अॅम?’ या विचारशील आणि चिंतनात्मक पुस्तकाचे आज प्रकाशन होत आहे. जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक अशा सनातन संस्कृतीच्या भारतभूमीत, जागतिक आध्यात्मिक केंद्रस्थानी हे पुस्तक प्रकाशित होत आहे, याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे पुस्तक भारतीयत्वाच्या सार्वत्रिक महत्त्वावर प्रकाश टाकते. भारतीयत्व ही गुणसंपदा सर्व धर्मांमध्ये दिसून येते. तिच्यानुसार आपण इतरांच्या ‘सत्य’ या तत्त्वाचा सन्मान करू शकतो. त्यासाठी धर्मांतर करणे आवश्यक नसते. एकता म्हणजे एकसंधता नव्हे. भारतीयत्व हे याचे उत्तम उदाहरण आहे. विविधतेतील ऐक्य याचे ते प्रतीक आहे. या माझ्या विधानांना बळकट आधार आहे. युनायटेड किंगडमचे राजे चार्ल्स तृतीय यांनी या विचारांना मान्यता दिली आहे. तसेच, संयुक्त अरब अमिरातीचे धर्मश्रद्धा, सहिष्णुता व इच्छाशक्ती या खात्याचे मंत्री शेख नह्यान बिन मुबारक अल नह्यान यांनीही या ग्रंथाचे गौरवगान केले आहे.”

हिंदुजा ग्रुप ऑफ कंपनीजचे (इंडिया) अध्यक्ष अशोक पी. हिंदुजा आपल्या भाषणात म्हणाले, “विविध सांस्कृतिक आणि भौगोलिक प्रदेशांमध्ये काम करीत असताना आमच्या कुटुंबाने आपली सनातन परंपरा कायम ठेवली आहे. आमच्या व्यवसायाची भरभराट याच कारणामुळे झाली. बहुसांस्कृतिक समजूतदारपणा वाढवणे हा आमच्यासाठी नेहमीच आस्थेचा विषय राहिला आहे. गोपी (जी. पी.) यांनी अनेकदा विचार केला आहे, की धर्म हा जर एखाद्याच्या आध्यात्मिक शोधाचा एक टप्पा असेल, तर मग ज्याने सर्वांना एकत्र आणायला हवे, असा हा धर्म माणसा-माणसांत विभाजन कसे निर्माण करू शकतो? या विषयावर विविध आध्यात्मिक गुरु, विचारवंत आणि जागतिक नेत्यांशी झालेल्या संवादांमधून प्रेरणा घेत, जी. पी. यांनी हे पुस्तक संकलित केले. यातून तरुण पिढीला या जागतिकीकरणाच्या आणि परस्पर जोडलेल्या जगात सकारात्मक दिशा मिळू शकेल.”

परमार्थ निकेतन ट्रस्टचे अध्यक्ष स्वामी चिदानंद सरस्वती म्हणाले, “गोपीचंद पी. हिंदुजा यांचे हे पुस्तक सर्वसमावेशकतेबद्दल बोलते. ‘मी’पासून ‘आपण’पर्यंतचा हा प्रवास आहे. ही मानसिकता बाळगली तरच मानवता आजारातून आरोग्याकडे वाटचाल करू शकते. ऋग्वेदातील वसुधैव कुटुंबकम्’ (संपूर्ण विश्व हे एक कुटुंब आहे) या संदेशाला हे तत्त्व मूर्त रूप देते.”

या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, प्रख्यात विधिज्ञ व राज्यसभा सदस्य डॉ. अभिषेक मनु सिंघवी, ब्रिटिश उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन, ‘एचडीएफसी कॅपिटल’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विपुल रुंगटा, ‘जिंदाल स्टील अँड पॉवर लि.’चे अध्यक्ष व लोकसभेचे सदस्य नवीन जिंदाल आदी उपस्थित होते.