Home Blog Page 463

७ ते ९ मार्च  दरम्यान पुण्यात गांधी विचार साहित्य संमेलन

संमेलनाध्यक्षपदी सुरेश द्वादशीवार
पुणे:

महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या पुढाकाराने दि. ७ ते ९ मार्च २०२५ दरम्यान पुण्यातील गांधी भवन (कोथरूड)  येथे ‘गांधी विचार साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.गांधी विचार साहित्य संमेलनाचे प्रमुख निमंत्रक महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी,  साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ,महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त अभय छाजेड ,सचिव अन्वर राजन ,एड. राजेश तोंडे यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
ज्येष्ठ साहित्यिक  सुरेश द्वादशीवार  हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत .खासदार मनोज कुमार झा यांच्या हस्ते ७ मार्च उद्घाटन होणार आहे.८,९ मार्च रोजी जावेद अख्तर सहभागी होणार आहेत ९ मार्च रोजी समारोपाला सामाजिक कार्यकर्ते हे सोनम वांगचुक यांना निमंत्रित करण्यात आले आहे.  गांधीजींचे विचार आणि जीवनासंबंधी ८ परिसंवाद या संमेलनात होणार असून २५ मान्यवर त्यात मार्गदर्शन करणार आहेत.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, राम पुनियानी, तुषार गांधी, सिसिलिया कार्व्हलो हेरंब कुलकर्णी,चंद्रकांत झटाले, यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. या संमेलनानिमित्त प्रकाशित होणाऱ्या स्मरणिकेत अनेक मान्यवरांचे लेख प्रकाशित होणार आहेत.संमेलनाच्या तयारीसाठी स्वागत समिती तयार करण्यात आली असून त्यामध्ये डॉ. कुमार सप्तर्षी ,डॉ. शिवाजीराव कदम , ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त मंडळ ,प्रवीण गायकवाड, आबेदा इनामदार,माजी खासदार ॲड .वंदना चव्हाण, राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष नितीन वैद्य , डॉ.विश्वंभर चौधरी अशा अनेक मान्यवरांचा समावेश आहे. संमेलनात सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून त्यासाठी एड.राजेश तोंडे 9890100820,सचिन चौहान 94213 64406 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे संमेलनात मर्यादित निवास व्यवस्था असून ५०० रूपये आकारण्यात येणार आहेत.गांधी विचार साहित्य संमेलनात बाहेरगावाहून येणाऱ्या प्रतिनिधींच्या (जे आधी कळवतील तेवढ्याच शिबिरार्थींची) निवासाची व्यवस्था संयोजकामार्फत करण्यात आली आहे. सर्व प्रतिनिधींच्या भोजन, चहा व नाष्ट्याची निःशुल्क  व्यवस्था आहे.गांधी विचाराचे साहित्य संमेलनाचे प्रतिनिधी शुल्क, वेळापत्रक इ तपशील वेळोवेळी जाहीर करण्यात येईल.  
*विविध पैलूंवर गांधी विचाराच्या आधाराने चर्चा*
स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे गांधी, अहिंसा आणि सत्याच्या आधाराने अन्यायाचा प्रतिकार करण्याच्या त्यांच्या प्रणालीमुळे जगभरात मान्यता पावले आहेत. भारतात विविध भाषांच्या साहित्यावर गांधी विचारांचा प्रभाव पडलेला दिसतो. मराठी साहित्यात मोजके साहित्य गांधी विचाराने प्रभावित झाले; पण प्रस्थापित ज्येष्ठ मराठी साहित्यिकांनी गांधींच्या विचाराकडे हवे तेवढे लक्ष दिले नाही. काही साहित्यिकांनी तर गांधी विचारांचा द्वेष व हेटाळणी केली. दुर्दैवाने ती द्वेष भावना आज नवीन पिढीपर्यंत पोहोचली आहे.
आजच्या काळात महात्मा गांधीच्या विचाराचे यापूर्वी कधी नव्हे, तेवढे महत्व प्राप्त झाले आहे. धर्मद्वेषाचे वातावरण हिंसाचारात रूपांतरित होत असताना दिसते. जातीच्या अभिनिवेशामुळे समाजात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक जात स्वतःला ‘स्वतंत्र राष्ट्र’ मानू लागली आहे. या काळात गांधीचा विचार, साहित्यात होणारे त्याचे दर्शन याचा विचार करण्याची आम्हाला आवश्यकता वाटते.
मार्च मध्ये होणाऱ्या या गांधी विचार साहित्य संमेलनात समाजाच्या विविध पैलूंवर गांधी विचाराच्या आधाराने चर्चा होणार आहे. जात, धर्म, लिंग यातील स्त्री पुरूष समानता, जातीच्या वर्चस्वाचे राजकारण, हिंदु-मुस्लीम प्रश्न, युवकांच्या जगात सोशल मिडियात दिसणारे गांधी, गांधी विचारांची आजची प्रासंगिकता इ. विषयावर मान्यवर साहित्यिक आणि विचारवंत आपले विचार मांडणार आहेत.
*संमेलनाध्यक्षपदी सुरेश द्वादशीवार*
प्रा. सुरेश द्वादशीवार हे  ज्येष्ठ पत्रकार आणि कादंबरीकार आहेत. ते अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि विदर्भ साहित्य संघ या संस्थांचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांनी लिहिलेली  तांदळा, राजधर्म व हाकुमी,गांधीजी आणि त्यांचे टीकाकार, राजधर्म अशी अनेक  पुस्तके  वाचकप्रिय आहेत.

बँकॉकला निघालेला तानाजी सावंत यांचा मुलगा वडिलांच्या मार्फत झालेल्या पोलीस कारवाईमुळे माघारी घरी

पुणे -बँकॉकला निघालेला तानाजी सावंत यांचा मुलगा वडिलांनी केलेल्या पोलीस कारवाई मुळे वाटेतूनच माघारी पुण्यामध्ये परतला असून बँकॉकसाठी ते चार्टर विमानाने निघाले होते. मात्र आता हे विमान पुणे पोलिसांच्या कारवाई मुळे विशाखापट्टणहुन पुन्हा माघारी पुणे विमानतळावर दाखल झाले आहे. तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज यांच्यासोबत त्याचे दोन मित्र देखील होते. यादरम्यान ऋषीराज सावंत यांनी टू वे चार्टर्ड फ्लाईट साठी जवळपास 1कोटी 68 लाख रुपये खर्च केल्याचे समजते.पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा म्हणाले की आम्हाला तक्रार मिळाली होती की ऋषिराज सावंत यांचे अपहरण झाले आहे, ते बेपत्ता झाले आहे. त्यामुळे त्यानुसार आम्ही तपास चालू केला होता. मात्र, पुढील चौकशीमध्ये ते बँकॉकला निघाले असल्याचे आम्हाला समजले. त्यानुसार मग आम्ही वैमानिकाला संपर्क साधून अर्ध्या रस्त्यातूनच ते विमान पुन्हा पुण्यामध्ये बोलावण्यात आले.या प्रकरणावर बोलताना तानाजी सावंत म्हणाले, पहाटे उठून त्याने अभिषेक देखील केला होता. त्यानंतर तो सकाळी आवरून कॅम्पससाठी निघाला होता. पण त्याची हे अचानक टूर ठरली याबद्दल मला माहीत नव्हते. तो नेमका कशासाठी गेला होता हे भेटल्यानंतर कळेल.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारच्या सुमारास माहिती मिळाली की तानाजी सावंत यांच्या मुलाला कोणीतरी घेऊन केले आहे. ही माहिती मिळाल्यानंतर तात्काळ सर्व टीम ऍक्टिव्हेट झाली . त्यानंतर तातडीने यांची माहिती मिळवणे सुरू झाली आहे. ते पुण्यावरून फ्लाईटमध्ये गेले असे समजले आणि फ्लाईट आता कोणत्या देशाने चालले आहे याबाबत कन्फर्मेशन मिळवणे सुरू केले. तसेच त्यांना परत आणण्यासाठी सर्व यंत्रणा लागली . या संदर्भात किडनॅपिंगची एफआयआर दाखल करण्यात आली .तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हा नेमका बँकॉकला कशासाठी जात होता याची चौकशी अद्याप सुरू आहे. आता तानाजी सावंत यांचा मुलगा सुखरूप परतला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच त्याच्यासोबत त्याचे दोन मित्र देखील असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे बडे नेते तथा माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत यांचे अपहरण झाल्याचा दावा केला जात होता. ऋषिकेश सावंत हे पुणे विमानतळ परिसरातून बेपत्ता झाले असेही वृत्त होते. त्यांचे पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीतून आलेल्या 4 जणांनी अपहरण केल्याचे सांगितले गेले.त्यामुळे पुणे पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर घटनेचा तपास सुरू केला .

तानाजी सावंत यावर बोलताना म्हणाले होते, हे बेपत्ता आहे की अपहरण याबद्दल आम्हाला नेमकं माहित नाही. त्याच्यासोबत जे होते ते त्याचे मित्र होते, त्याच्या गाडीतून जाण्याच्या ऐवजी त्याच्या मित्राच्या गाडीतून तो गेला. तसेच कुठे जात आहे याची माहिती मला नसल्याने मी काळजीमुळे लगेच पोलिसांना याबद्दल माहिती दिली आहे. फोन केल्याशिवाय तो कुठे जात नाही, मात्र आज तसे झाले नाही म्हणून मी पोलिसांत तक्रार दिली आहे. तसेच याबद्दल मला माहिती आमच्या चालकाकडून मिळाली की मी त्यांना विमानतळावर सोडून आलो. पण मला याची कल्पना नव्हती म्हणून मी पोलिसांशी संपर्क साधला.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत मुलाचे अपहरण झाल्याचा निनावी फोन पुणे पोलिसांच्या कंट्रोल रुमला आला. त्यानंतर पोलिसांची एकच धावपळ सुरू झाली. पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून आलेल्या 4 अज्ञात व्यक्तींनी सिंहगड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील नऱ्हे परिसरातून सायंकाळी 4.57 मिनिटांनी त्यांचे अपहरण केल्याची माहिती आली. पोलिस या प्रकरणी ऋषिकेश सावंत यांचे कॉल रेकॉर्ड तपासून पाहिले गेले . तसेच या प्रकरणी कथित अपहरण झालेल्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही फूटेजही तपासले गेले.

ऋषीराज सावंत आणि 2 मित्रांनी चार्टर्ड फ्लाईट बुकिंग केल्याची ही पावती

आम्हा कुटुंबियांचा प्रत्येक श्वास संगीतासाठी समर्पित : उस्ताद फैय्याज हुसेन खाँ

गानवर्धनतर्फे स्वरगंधा टिळक स्मृती पुरस्काराने फैय्याज हुसेन खाँसाहेब आणि कुटुंबियांचा गौरव

पुणे : कष्टाशिवाय संगीत कला साध्य होत नाही, या क्षेत्रात यश मिळणे सोपे नाही. संगीत कला ही अशी गोष्ट आहे ज्यातून आयुष्यभर आनंद मिळतो. आम्ही कुटुंबिय संगीतासाठी जगत आहोत. आमचा प्रत्येक श्वास संगीतासाठी समर्पित आहे, असे भावोद्गार उस्ताद फैय्याज हुसेन खाँसाहेब यांनी काढले. कृ. गो. धर्माधिकारी यांनी गानवर्धन संस्थेच्या माध्यमातून अनेक कलाकारांना मंच उपलब्ध करून दिला, त्यांना उचित मान दिला. गानवर्धन संस्थेचे कार्य आजही उत्तम तऱ्हेने सुरू आहे, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

‌‘गानवर्धन‌’तर्फे देण्यात येणारा नारायणराव टिळक पुरस्कृत ‌‘कै. सौ. स्वरगंधा टिळक स्मृती सांगीतिक कुटुंब पुरस्कार‌’ हरियाणातील झझ्झर घराण्यातील सात पिढ्यांची सांगीतिक परंपरा असलेल्या उस्ताद फैय्याज हुसेन खाँसाहेब यांच्या कुटुंबियांना आज (दि. 10) सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे वितरण आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खाँ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. एस. एम. जोशी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 40 हजार रुपये, शाल, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर, कोषाध्यक्ष सविता हर्षे, कै. स्वरगंधा टिळक यांची कन्या आलापिनी जोशी, अन्वर हुसेन, एहजाज हुसेन, अली हुसेन, सायरा अली मंचावर होते. नारायणराव टिळक यांनी गानवर्धन संस्थेस दिलेल्या देणगीवर मिळणाऱ्या व्याजातून या पुरस्काराचे वितरण केले जात आहे.

उस्ताद फैय्याज हुसेन खाँसाहेब पुढे म्हणाले, उस्ताद उस्मान खाँसाहेब यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या पुरस्कारामुळे तुम्ही रसिक आमच्या कुटुंबियांवर भरभरून प्रेम करत आहात हे जाणवते.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उस्ताद उस्मान खाँसाहेब म्हणाले, गानवर्धन संस्थेच्या माध्यमातून कृ. गो. धर्माधिकारी यांनी अनेक होतकरू कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. ते संगीत क्षेत्रात कार्यरत नसतानाही गानवर्धन संस्थेची निर्मिती करून त्यांनी महान कार्य केले आहे. गानवर्धन संस्थेची सांगीतिक कुटुंब पुरस्कार ही संकल्पना वैशिष्ट्यपूर्ण आहे.

गानवर्धन संस्थेच्या स्थापनेमागील भूमिका विशद करून प्रास्ताविकात दयानंद घोटकर यांनी फैय्याज हुसेन खाँसाहेब यांच्या कुटुंबातील कलाकारांची ओळख करून दिली.

पुरस्काराविषयी बोलताना आलापिनी जोशी म्हणाल्या, माझी आई स्वरगंधा टिळक (सरस्वती काळे) यांनी वयाच्या आठव्या वर्षी गायनाला सुरुवात केली. माझा मोठा मामा तबलावादक होता तर दुसरा मामा कार्यक्रमाची सर्व आखणी करीत असे. यातूनच माझे वडिल नारायणराव टिळक यांना सांगीतिक कुटुंब पुरस्काराची संकल्पना सुचली.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर उस्ताद फैय्याज खाँसाहेब यांनी गानवर्धन संस्थेच्या कार्याचे कौतुक करून संस्थेस 51 हजार रुपयांची देणगी दिली.

गानवर्धन संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या शास्त्रीय गायन स्पर्धेतील विजेत्यांना या वेळी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्काराचे वितरण उस्ताद उस्मान खाँसाहेब यांच्या हस्ते झाले. स्पर्धेविषयीची माहिती स्पर्धा संयोजक डॉ. राजश्री महाजनी यांनी दिली.

पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर शास्त्रीय, उपशास्त्रीय, गझल गायन व वादनाचा ‌‘स्वरपरंपरा‌’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात उस्ताद फैय्याजहुसेन खाँसाहेब, अन्वर हुसेन, अली हुसेन, एहजाज हुसेन, श्रुती राऊत, विरींची जोगळेकर, मीना जोगळेकर, सायरा अली यांचा सहभाग होता. शंकर कुचेकर (तबला), सचिन भुमरे (गिटार), अनय गाडगीळ (सिंथेसायझर) यांनी साथसंगत केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नीलिमा राडकर यांनी केले.

प्रस्तावित उन्नत पुलातील हयात हॉटेल विमाननगर ते खराडी जकात नाका ही लांबी कमी करू नये; बापूसाहेब पठारे यांचे वाहतूक मंत्र्यांना निवेदन

नवी दिल्ली: पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने ‘हयात हॉटेल विमाननगर ते शिरूर’ उन्नत पूल प्रस्तावित करण्यात आला होता. परंतु, सध्या पूलाची लांबी कमी करण्याबाबत चर्चेला उधाण आले आहे. ज्यात शहरी भागातील चार किलोमीटर वर्दळ असलेल्या भाग कमी करण्यात आल्याचे समजते. यावर वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली.

भेटीदरम्यान, प्रस्तावित असणाऱ्या उन्नत पुलाची लांबी कमी न करता पुर्वी प्रस्तावित असलेला ‘हयात हॉटेल विमाननगर ते शिरूर’ कायम ठेवण्याबाबतचे निवेदन पठारे यांनी दिले. यावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले, की “विमाननगर ते खांदवे नगर यामध्ये काही प्रमुख चौक अत्यंत वर्दळीचे आहेत. सोबतच, खराडी व वाघोली या भागात आयटी कंपन्या, शाळा-महाविद्यालये, निवासी प्रकल्प तसेच बैठी घरे यांमुळे नागरीकरण वाढले आहे. विमाननगर सीटीआर कंपनी समोरील चौक, टाटा गार्ड रूम, खराडी बायपास, इऑन आयटी पार्ककडे जाणारा जनक बाबा दर्गा येथील चौक, खराडी जकात नाका चौक या प्रमुख चौकांत रोज वाहतूक कोंडी होत आहे. पुलाच्या कमी केलेल्या लांबीमुळे वाहतूक कोंडीचा त्रास आहे तसाच राहील आणि भविष्यात या प्रश्नाची दाहकता अधिक वाढेल.”

सदर पूल पूर्वी प्रस्तावित केल्याप्रमाणे झाल्यास एकूणच पुणे-नगर रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागेल, असे त्यांनी निवेदनात नुमद केले आहे. प्रस्तावित पुलाची लांबी कमी का करण्यात आली, हे कारण अद्यापही स्पष्ट करण्यात आले नाही. नवी दिल्ली येथील लोकसभा सचिवालय येथे संसदीय अभ्यासवर्गाला गेले असताना आमदार बापूसाहेब पठारे यांनी वाहतुक मंत्री गडकरी यांची भेट घेतली.

निवदेनाद्वारे केलेल्या संबंधित मागणीवर नितीनजी गडकरी साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे मनपुर्वक आभार व्यक्त करतो. ‘एमएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक दिक्षीत यांनी सदर रस्ता पुणे महानगरपालिकेने एमएसआयडीसीला हस्तांरीत केल्यास हयात हॅाटेल विमाननगर ते खराडी जकात नाका येथील पुलाची लांबी कमी न करता प्रस्तावित केलेला पूल साकारला जाऊ शकतो.

-बापूसाहेब पठारे (आमदार, वडगावशेरी विधानसभा)

क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी एसपीएफ स्पोर्ट्स मेनियाचे मोठे योगदान

सुप्रसिद्ध अभिनेते रणविजय सिंघा व वरुण सुद यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा संपन्न

पुणे: सुरेंद्र पठारे फाऊंडेशन यांनी आयोजित केलेल्या एसपीएफ स्पोर्ट्स मेनियाचा महाअंतिम सोहळा व बक्षीस वितरण सोहळा रविवारी (ता. ९) पार पडला. खराडी येथील गेरा ग्राउंड येथे याचे आयोजन करण्यात आले होते. ३ नोव्हेंबर ते ८ फेब्रुवारी या कालावधीत खराडी, चंदननगर, कल्याणीनगर, वडगावशेरी येथील विविध ठिकाणी विविध स्पर्धा संपन्न झाल्या.

स्पोर्ट्स मेनियाच्या समारोप सोहळ्याच्या निमित्ताने, सुप्रसिद्ध अभिनेते रणविजय सिंघा व वरुण सुद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. क्रिकेट, स्केटींग, लॉन टेनिस, व्हॉलीबॉल, बॉक्स फुटबॉल, स्विमिंग, टेबल टेनिस, बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम या क्रीडा प्रकारांत विविध वयोगटातील एकूण ६९४३ स्पर्धक खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

“एसपीएफ स्पोर्ट्स मेनियाच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्राच्या उन्नतीसाठी व खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम दरवर्षी करत आलो आहोत. विविध क्रीडा स्पर्धेत नागरिक उत्साहाने सहभागी होत असतात. एकजुटीचे, सहकार्याचे व सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यातही स्पोर्ट्स मेनियाचा मोठा वाटा आहे. न्यू पुणे तसेच एकूणच पुणे शहरातील नागरिकांसाठी क्रीडाकौशल्ये सादर करण्याचे व्यासपीठ देता येतेय, याचा आनंद आहे. येणाऱ्या काळात स्पोर्ट्स मेनिया ही इतर क्रीडा महोत्सवासाठी दिशादर्शक ठरेल”, असे मत सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र पठारे यांनी व्यक्त केले.

सोहळ्याप्रसंगी, स्पोर्ट्स मेनियात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली. नागरिकांनीही स्पोर्ट्स मेनियाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करत नागरिक म्हणाले, “नागरिकांसाठी सुरेंद्र पठारे फाऊंडेशनने दरवर्षी राबवण्यात येणारा हा उपक्रम प्रशंसनीय आहे. विशेषत: उदयोन्मुख खेळाडूंसाठी हे व्यासपीठ पर्वणी आहे. यातून नक्कीच आपल्या भागातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार होतील.”

क्रिकेट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या विजयी संघांची नावे: ग्रीनविल रेड, एमएनजी ब्लु पॅंथर्स, लिवियानो स्मॅशर्स, लक्ष्मी बेलविस्टा, केव्हिएस क्रिकेट क्लब

व्हॉलीबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेच्या विजयी संघांची नावे: व्हॉलीबॉल स्टार्स

बॉक्स फुटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेच्या विजयी संघाची नावे:

बुद्धिबळ चॅम्पियनशीप स्पर्धेच्या विजेत्यांची नावे: प्रतिका नंदी, निवाण अग्रवाल, क्षितिज प्रसाद, सिद्धांत साळुंके, स्पर्श बत्रा, त्यागी दयाळ, अदिती कायल, अभिषेक केळकर

कॅरम चॅम्पियनशीप स्पर्धेच्या विजेत्यांची नावे: देवांश गौतम, रहीम खान, शैफाली शर्मा, फिरोज बंगी-रहीम खान, मनोज रणदीर-अशोक भगत, अन्वर शैखी

स्केटिंग चॅम्पियनशीप स्पर्धेच्या विजेत्यांची नावे: रेयांश कुलकर्णी, तरणजित, शौर्य निलेश परंडवाल, तनय सोनडेकर, प्रचिती लगड, कायरा तांडलेकर, जिया शेट्टी, वेदांत देसाई, संचित गावडे, ओमकार काळे, ऋग्वेद येवले, इक्रा शहाजहान, श्रेया महाजन, ऋग्वेदा विरकर, शिवांश सिंग, ऋत्विक सोळंकी, चिन्मय गायकवाड, ऋग्वेद टिंगरे
ऋशिका कार्वा, वैदेही खोडे, जान्हवी मोरे

स्विमिंग चॅम्पियनशीप स्पर्धेच्या विजेत्यांची नावे: श्राव्या शिवकुमार, सई दिघे, अनन्या कपिल, श्रुती धापसे, पार्थ रोंगे, वरद कदम, विराज ढोकळे, सिद्धार्थ गर्ग, स्मृती कवितके, वरद कदम, साहिल पवार

टेबल टेनिस चॅम्पियनशीप स्पर्धेच्या विजेत्यांची नावे: वरदान कोलते, परिषी इस्सराणी, सहर्ष कुमार, नविश मिश्रा, फौजिया मेहरअली, अभिजीत सिंह, नविश मिश्रा-गजानन सावंजी

लॉन टेनिस चॅम्पियनशीप स्पर्धेच्या विजेत्यांची नावे: आर्जव लुहादिया, समायरा चौधरी, कृशांक जोशी, एहावी राव, शीतल गोरुले, श्रीकांत माने, गुलशन वासवानी-राजकुमार परसाई, जसमीत साव्हने-प्रणिता पेडणेकर

बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेच्या विजेत्यांची नावे: परस्मय राणे, स्वरीत सातपुते, साक्षी एस., धनश्री हल्लोळी, विभा धीमान,पियुष श्रीवास्तव, सुधाकर राणा, परिधी-शेलार एस., सुमीत नायक-विकास सामवेदी, अथर्व लाटे-अश्वजित सोनवणे, सयाजी शेलार

तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता:अपहरण कि आणखी काही … तपास सुरु

पुणे-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे बडे नेते तथा माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हे पुणे विमानतळ परिसरातून बेपत्ता झालेत. त्यांचे पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीतून आलेल्या 4 जणांनी अपहरण केल्याचे सांगितले जात आहे. पुणे पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर घटनेचा तपास सुरू केला आहे.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत मुलाचे अपहरण झाल्याचा निनावी फोन पुणे पोलिसांच्या कंट्रोल रुमला आला. त्यानंतर पोलिसांची एकच धावपळ सुरू झाली. पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून आलेल्या 4 अज्ञात व्यक्तींनी सिंहगड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील नऱ्हे परिसरातून सायंकाळी 4.57 मिनिटांनी त्यांचे अपहरण केल्याची माहिती आहे. पोलिस या प्रकरणी ऋषिकेश सावंत यांचे कॉल रेकॉर्ड तपासून पाहत आहेत. तसेच या प्रकरणी कथित अपहरण झालेल्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही फूटेजही तपासले जात आहे.

कौटुंबिक वादानंतर बेपत्ता झाल्याचा दावा– ‘एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, ऋषीराज सावंत हे कौटुंबिक वादानंतर दुपारी 4.15 च्या सुमारास घरातून निघून गेल्याचा दावा केला जात आहे. या वृत्तानुसार, ऋषिकेश सावंत यांचा आज आपल्या कुटुंबातील सदस्यांशी वाद झाला. त्यानंतर ते चार्टर फ्लाईटने बँकॉकला निघून गेले. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित विमान कंपनीशी संपर्क साधून माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. बँकॉकला जाणारे हे चार्टर विमान भारताच्या हद्दीत असेल तर त्याला भारतातच उतरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचीही माहिती आहे. तूर्त सिंहगड पोलिस ठाण्यात या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नव्या वर्षात कालपर्यंत कैद्यांचे नातलगांशी झाले 3,16,647 व्हिडीओ कॉल

कारागृहातील बंद्याकरिता ई-मुलाखात सुविधा

पुणे- महाराष्ट्र राज्यातील कारागृहांमध्ये बंदीस्त असलेल्या भारतीय व विदेशी बंद्यांना त्यांच्या
कुटुंबियांशी व वकिलांशी संवाद साधण्यासाठी ePrisons या प्रणाली अंतर्गत e-Mulakat सुविधा दिनांक
04 जुलै 2023 पासुन सर्व कारागृहांत उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. यापूर्वी मुलाखात नाव
नोंदणीसाठी नातेवाईकांना खूप दूरवरुन प्रवास करत येवून कारागृहाबाहेर तासन्-तास वाट पाहत बसावे
लागत असल्याने बंद्यांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. परंतु आता
बंद्यांसोबत मुलाखात घेण्याकरीता बंद्यांचे नातेवाईक काहीदिवस अगोदरच ePrisons (ICJS)
प्रणालीद्वारे नोंदणी करतात व त्यामुळे त्यांना त्यांच्या इच्छित दिवशी व वेळी बंद्यांची मुलाखत घेता येते.
राज्यातील विविध कारागृहांमध्ये विविध देशातील नागरिक विदेशी बंदी म्हणुन दाखल असून
त्यांचे परदेशातील मुले / मुली व नातेवाईकांशी ई-मुलाखत / व्हीडीओ कॉन्फरसद्वारे विहीत अटीवर
सदरील सुविधा लागू करण्यात आलेली आहे. राज्यातील कारागृहांमध्ये सुमारे 1105 पेक्षा अधिक विदेशी
बंदी असून अनेक दिवसांपासून किंवा वर्षांपासून त्यांचा आपले कुटुंबिय, आई-वडील, मुले-मुली यांच्याशी
संपर्क होऊ शकलेला नव्हता. परंतु e-Mulakat सुविधा सुरु झाल्यामुळे विदेशी बंद्यांचा त्यांच्या
कुटुंबियांशी संवाद होऊ लागला असून त्यांच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येऊ लागले आहेत.
अनेक वर्षांनंतर आपल्या कुटुंबियांशी ई-मुलाखतीद्वारे संवाद साधतांना विदेशी बंद्यांच्या चेहऱ्यावर
समाधानाची भावना दिसून येत आहे.
दिनांक 01 जानेवारी 2024 दिनांक 09 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये सुमारे 3,16,647 ई-
मुलाखती झालेल्या आहेत. सदर कालावधीमध्ये येरवडा मध्यवर्ती कारागृह 45,174, तळोजा मध्यवर्ती
कारागृह-43,848, ठाणे मध्यवर्ती कारागृह-36,371, मुंबई मध्यवर्ती कारागृह-29,347, नागपूर मध्यवर्ती
कारागृह-31,444, कल्याण जिल्हा कारागृहा-22,608, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह- 23,860 इतक्या
ई-मुलाखती झालेल्या आहेत. राज्यातील उर्वरित कारागृहांमधील ई-मुलाखत सुविधेचा लाभ घेणाऱ्या
बंद्यांची संख्या देखील लक्षणिय आहे
.
बंद्यांना e-Mulakat सुविधेचा लाभ देण्यासाठी अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक,
कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे दिनांक 22 मार्च 2024 रोजीचे परिपत्रक निर्गमित केले
असून त्यानुसार न्यायाधीन बंद्यांना महिन्यातुन चार वेळा व शिक्षाधीन बंद्यांना दोन वेळा नातेवाईक, मित्र
व वकीलांसोबत नियमांचे अधीन राहुन e-Mulakat देण्यात येत आहे. बंद्यांना e-Mulakat सुविधा
देण्यासंबंधीच्या मार्गदर्शक सुचना सदर परिपत्रकात असून त्यानुसारच सदरची सुविधा बंद्यांना पुरविण्यात
येत आहे.
बंद्यांना सदरची सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे जास्तीत जास्त बंद्यांच्या नातेवाईकांचा e-
Mulakat सुविधा वापरण्याकडे कल दिसून येत आहे व त्यामुळे बंद्यांच्या कुटुंबियांच्या प्रत्यक्ष
मुलाखतीसाठी येण्याच्या खर्चात देखील बचत झालेली आहे. सदरील सुविधेच्या अंमलबजावणीबाबत
प्रशांत बुरडे (भा.पो.से.) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा,
महाराष्ट्र राज्य, पुणे व डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से.), विशेष पोलीस महानिरीक्षक (मुख्यालय),

कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून वेळोवेळी मार्गदर्शन होत असून सदरची सुविधा
चांगल्या प्रकारे बंद्यांना उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
सदरील सुविधा लागू झाल्याची माहिती बंद्यांच्या नातेवाईकांना मिळण्याकरीता सर्व कारागृहांच्या
दर्शनी भागांमध्ये नातेवाईकांची गर्दी असणाऱ्या ठिकाणी माहिती फलक लावण्यात आलेले आहेत. तसेच
नातेवाईक भेटीच्या ठिकाणी बंद्यांच्या नातेवाईक/वकील यांना NPIP पोर्टलवर मुलाखत नोंदणी कशी
करावी, याचे प्रात्यक्षिक LED Screen वर Video Clip द्वारे दाखवण्यात येत आहे.
परिणामी, बंद्यांच्या
नातेवाईकांना ई-मुलाखत अधिक सुलभ झाल्यामुळे बंदी व नातेवाईकांमध्ये समाधानाची भावना दिसून
येत आहे. ई-मुलाखतीस बंद्यांचे नातेवाईकांना चांगला प्रतिसाद देण्यात सुरुवात केलेली असून सदरील बाब
कारागृह विभागाची आधुनिकतेकडे वाटचाल सुरु असल्याचे सुतोवाच करणारी आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून दिल्लीच्या साहित्य संमेलनाच्या अभिजात गीताचे लोकार्पण

0

नागपूर – दिल्ली येथे २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत होऊ घातेलल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अभिजात गिताचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कौतुक केले.या संमेलन गिताचे लोकार्पण नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. ‘आम्ही असू अभिजात’ असे या गीताचे शब्द आहेत.नागपूर येथे झालेल्या या छोटेखानी सोहळ्याला संगीतकार आनंदी विकास, विकास देशमुख, अनिल मुळजकर, आदित्य विकास, योगेश कदम यांची उपस्थिती होती.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे संमेलन देशाच्या राजधानीत ७० वर्षांनी होत आहे. या संमेलनाचे यजमानपद पुण्यातील सरहद संस्था भूषवित आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तारा भवाळकर संमेलनाध्यक्ष आहेत. संमेलनाच्या निमित्ताने डॉ. अमोल देवळेकर यांनी लिहिलेले ‘आम्ही असू अभिजात’ हे संमेलन गीत संगीतकार आनंदी विकास यांनी संगीतबद्ध केले आहे.

हरिहरन, शंकर महादेवन यांचे स्वर
संमेलन गिताला सुप्रसिद्ध गायक-संगीतकार शंकर महादेवन आणि हरिहरन यांच्यासह मंगेश बोरगावकर, सागर जाधव, शमिमा अख्तार यांचे स्वर लाभले आहेत. ना. श्री. गडकरी यांनी संमेलन गिताचे कौतुक केले. तसेच शंकर महादेवन व हरिहरन यांच्यासारख्या दिग्गज गायकांच्या स्वरांमुळे खऱ्या अर्थाने अभिजात निर्मिती झाली असल्याचे गौरवोद्गारही काढले.

काव्य निर्मिती ही मानवी मनाला मिळालेली अमूल्य देणगी- जेष्ठ साहित्यिका आणि उद्योजिका चंद्रलेखा बेलसरे 

पहिले राज्यस्तरीय काव्यविश्व साहित्य संमेलनाचे उद्घाटन

पुणे, 10  फेब्रुवारी: काव्य निर्मिती ही मानवी मनाला मिळालेली अमूल्य देणगी असून ती जपण्याबरोबरच विकसित करणे आणि तिचे संवर्धन करण्याची आवश्यकता आहे असे विचार जेष्ठ साहित्यिका आणि उद्योजिका व पहिल्या राज्यस्तरीय काव्यविश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा चंद्रलेखा बेलसरे यांनी व्यक्त केले.

काव्यमित्र संस्था आणि अपेक्षा मासिक परिवार, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने उद्यानप्रसाद कार्यालय, सदाशिव पेठ, पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राज्यस्तरीय काव्यविश्व साहित्य संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष, ज्येष्ठ समाजसेवक सुरेश कोते, संमेलनाचे उद्घाटक, पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, उद्योजक अशोक कदम, छंद दिवाळी अंकांचे संपादक दिनकर शिलेदार,काव्यमित्र संस्थेचे अध्यक्ष  राजेंद्र सगर व अपेक्षा मासिकाचे संपादक  दत्तात्रय उभे उपस्थित होते. यावेळी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी डॉ जयश्री घोडके,  नामदेव हुले,  श्रीराम भोमे, प्रकाश नाईक, अंकुश उभे आदींचा विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला.

चंद्रलेखा बेलसरे म्हणाल्या,  आंतरमनातील अनुभूतीचा आविष्कार म्हणजे कविता होय. भाव भावनांच्या वर्तुळात काव्य आकार घेत असते. तर कधी सूर आणि तालाच्या माध्यमातुन मनाला भिडते. काव्याची उंची, त्यातील भाव आणि अर्थ ही त्याची व्याप्ती असते. काव्य म्हणजे भाव भावनांचा मुक्त हुंकार असतो. तर मनाच्या गाभाऱ्यातून ती फुलत असते. काव्य हा जिव्हाळ्याचा विषय असून प्रत्येकाच्या मनात विविध माध्यमातुन व्यक्त होत असते.

दिनकर शिलेदार म्हणाले, साहित्याच्या व्याप्तीचे मोजमाप करता येत नाही. विविध प्रकारां मधून ते व्यक्त होते व विविध संमेलनामधुन त्याची प्रचिती येत आहे.

सुरेश कोते म्हणाले, पुस्तक वाचण्यापेक्षा मी आजवरच्या वाटचालीत सेवेच्या माध्यमातून विविध स्वभावाची माणसे वाचली. असे असले तरी साहित्याच्या क्षेत्रात जी मंडळी काम करीत आहेत त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम मनापासून करतो. कारण त्यामध्ये मला आनंद मिळतो.

राजेंद्र बांदल म्हणाले, साहित्य विषयक विविध उपक्रम हे समाजपयोगी असून यामुळे वाचन आणि साहित्य संस्कृतीला अधिक बळ मिळणार आहे. या संमेलनाच्या माध्यमातुन नव कवींना व्यासपीठ मिळणार आहे.

संमेलनाच्या दुपारच्या सत्रात निमंत्रितांच्या हास्य कवी संमेलनाने तसेच आधी झालेल्या निमत्रितांच्या कवी संमेलनात कवींनी काव्यानंद रसिकांना देऊन मंत्रमुग्ध केले. सपान,दैना,चहा,संडे,नवी स्कूटर, बायकोचा रुसवा,व्यथा,प्रेम प्रेमच असते,असे रोजच्या वाटचालीतील विषय हिंदी आणि मराठी गाण्यांच्या चालीवर सादर केले.श्रीराम घडे, देवेंद्र गावंडे, बिभिषण पोटरे,  हणमंत मेहेत्रे जयवंत पवार या कवींचा यात सहभाग होता.

त्यानंतरच्या सत्रात जीवन गौरव पुरस्कार, साहित्य गौरव पुरस्कार, आणि विशेष कृतज्ञता सन्मान जेष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश वाकचौरे आणि अन्य पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तर दुपारच्या सत्रात “काव्यविश्व आणि मराठी कवितेची वाटचाल” या विषयावर परिसंवाद झाला. डॉ. शीतल मालुसरे अध्यक्षस्थानी होत्या.यामधे प्रा.विजय लोंढे आणि प्रा.अनघा ठोंबरे हे वक्ते सहभागी झाले होते. साक्षी सगरने सूत्रसंचालन केले.

दत्तात्रय उभे यांनी प्रास्ताविकात संमेलनाच्या आयोजन मागची भूमिका स्पष्ट केली. दोन्ही संस्थांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संमेलनाचं आयोजन करण्यात आले आहे. साहित्याच्या क्षेत्रात काव्याला विशेष महत्त्व आहे. अनेक ग्रंथ काव्याच्या माध्यमातुन पुढे आले आहेत. यामुळे मराठी भाषा समृद्ध होण्यास हातभार लागला आहे. नवोदित कवींना व्यक्त होण्याचे व्यासपीठ म्हणजे हे काव्यविश्व साहित्य संमेलन होय.

सुरुवातीला ग्रंथ पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले. सुप्रसिद्ध गायिका वैजू चांडवले यांनी स्वागत गीत सादर केले.

सूत्रसंचालन राजेंद्र सगर यांनी केले.

संवाद हा लोकशाहीचा सेतू-पवन खेरा यांचे विचार

– राष्ट्रीय विधायक सम्मेलन भारततर्फे आमदारांसाठी दोन दिवसीय क्षमता वृद्धी कार्यक्रमाचा समारोप

पुणे, १० फेब्रुवारी: संवाद हा दोन व्यक्ती, वर्ग आणि समुदायांमध्ये सेतूचे काम करतो. सभ्य समाजात संवादातूनच वाद सोडविता येतात, अन संवादानेच लोकशाहीच्या धमन्यातील रक्त कायम सळसळते राहू शकते. असे विचार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता पवन खेरा यांनी व्यक्त केले.

एमआयटी डब्लयूपीयू येथे राष्ट्रीय विधायक सम्मेलन, भारत यांच्या तर्फे आमदारांसाठी आयोजित केलेल्या कायदेकर्त्यांसाठी लीडरशिप कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम च्या समारोप समारंभात ते स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन : मीडिया प्रभावीपणे हाताळणे या विषयावर मार्गदर्शन करत होते.

या प्रसंगी मेघालय विधानसभेचे अध्यक्ष थॉमस संगमा, महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष प्रा.राम शिंदे, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीचे माजी संचालक संजीव चोप्रा, मार्केटिंग आणि ब्रँडिग तज्ज्ञ सिद्धार्थ नारायण, परिषदेचे संस्थापक निमंत्रक डॉ. राहुल विश्वनाथ कराड,  कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस आणि डॉ.परिमल माया सुधाकर हे उपस्थित होते.

या प्रसंगी एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे माजी विद्यार्थी आणि आमदार हेमंत ओगले यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच परिषदेत सहभागी आमदारांना प्रमाणपत्र देण्यात आली.

पवन खेरा म्हणाले, राजकारणात संवाद अत्यंत आवश्यक असून, एकमेकांचे दृष्टीकोन व विचार समजून घेतल्यावरच समाज गतिशील रहातो. देशात अनेक विचार, मतप्रवाह वाहतात. प्रत्येक विचार मौल्यवान आहे. मनाची कवाडे उघडून तो खुल्या मनाने ग्रहण केला पाहिजे. बोलण्यापेक्षाही ऐकणे हा संवादाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. ऐकण्याची क्षमता वाढविल्याने आपली वाणी प्रखर होते. न ऐकणारे नेते हे जास्त काळ लोकांचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत. ही लोकशाहीची ताकद आहे. त्यामुळे मतदारांचे ऐकल्यास लोकप्रतिनिधीचे, त्यांच्या पक्षाचे व पर्यायाने समाजाचे भवितव्य उज्वल होईल.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे म्हणाल्या, विधानसभेत सार्वजनिक प्रश्न मांडण्यासाठी आमदारांकडे १६-१७ प्रकारची साधने असतात. तारांकित प्रश्न, लक्षवेधी प्रश्न आणि स्थगन प्रस्ताव. यांचा योग्य व प्रभावी वापर केला तर लोकांच्या समस्या सोडविता येतील आणि त्यांना खरा न्याय मिळू शकेल.

महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष प्रा.राम शिंदे म्हणाले, विविध राज्यांच्या आमदारांमध्ये संवाद व विचारांची देवाणघेवाण सुलभ करण्याच्या उद्देशाने एमआयटीने सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संकल्पित केलेल्या वन नेशन वन प्लॅटफॉर्म उपक्रमाला एमआयटी सारख्या शैक्षणिक संस्थांकडून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पाठिंबा मिळत आहे.

 डॉ. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले, बदलत्या काळात सक्षम लोकप्रतिनिधी निर्माण करण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. त्यानुसार एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटने सात राज्यांच्या कायदेमंडळांसोबत करार केले आहेत. ज्याद्वारे संस्था दर्जेदार राजकीय नेतृत्वाच्या विकासात योगदान देत आहे. राजकारणात लोकशाही आणि सुशासनाचे नवे मॉडेल उदयास येत आहेत. देशाचा सांस्कृतिक पाया व लोकशाही मजबूतीसाठी राष्ट्रीय सभेचे व्यासपीठ निर्माण होत आहे.

एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटने शिष्यवृत्ती जाहीर केल्या. आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातून नामांकित केलेल्या तरूण तरूणींना राजकीय नेतृत्व आणि प्रशासन या विषयात दोन वर्षाचा एम.ए.अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी दरवर्षी ५५ हजार रूपयांची शिष्यवृत्ती दिली जाईल.

या नंतर सिद्धार्थ नारायण यांनी स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशनः सोशल मीडियाचा प्रभावी वापर या विषयावर मार्गदर्शन केले.

डी. एल. एड्. परीक्षेचा निकाल जाहीर

पुणे, दि. १० : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत डिसेंबर २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या डी.एल.एड्. परीक्षेचा निकाल परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविली आहे.

मराठी, उर्दू, हिंदी, इंग्रजी व कन्नड माध्यमाच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या ४ हजार २८५ विद्यार्थ्यांपैकी ४ हजार २२९ विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते. सर्व माध्यमातील एकूण २ हजार ४६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना निकालाचे मूळ गुणपत्रक संबंधित अध्यापक विद्यालयामार्फत यथावकाश हस्तपोच मिळणार असून उत्तरपत्रिकेची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेची छायाप्रत मागणीसाठी २० फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज करता येईल, असेही श्रीमती ओक यांनी कळविले आहे.

शहरवासियांनी आपल्या मुळ गावाची नाळ तोडू नये : प्रवीण दरेकर

शहरवासियांनी स्वत:च्या विकासासोबत गावाच्याही विकासावर भर दिला पाहिजे : प्रवीण दरेकर

पोलादपूर तालुका रहिवासी संघातर्फे भव्य सत्कार, हळदी कुंकु समारंभ उत्साहात संपन्न

पुणे : पोलादपूर मुळ निवासी पुणे शहरात वास्तव्यास असणाऱ्या शहरवासीयांनी आपल्या गावाची नाळ न तोडता शहरात आपल्या विकासासोबत गावाच्या ही विकासाचा विचार करावा असे प्रतिपादन पोलादपूर भूमिपुत्र प्रवीण दरेकर (आमदार- विधान परिषद, अध्यक्ष-मुंबई बँक) यांनी पोलादपूर तालुका रहिवासी संघातर्फे आयेजित भव्य सत्कार समारंभात बोलत होते.
पोलादपूर तालुका रहिवासी संघातर्फे प्रवीण दरेकर यांच्या हस्ते माधुरीताई मिसाळ (राज्यमंत्री, महाराष्ट्र ) आणि संतोष मेढेकर (उद्योजक ) यांचा  नरवीर तानाजी मालुसरे  आणि सिंहगडची ऐतिहासिक प्रतिमा आणि शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास पोलादपूर तालुका रहिवासी संघ अध्यक्ष किसनजी भोसले, अरविंद चव्हाण (कार्याध्यक्ष), सुनील कदम (उपाध्यक्ष), राजेंद्र मोरे (सचिव), सचिन पार्टे (सहसचिव), ज्ञानेश्‍वर साळुंखे (कोषाध्यक्ष), ज्ञानेश्‍वर साळुंखे (खजिनदार), डॉ. खरोसे (सह-कोषाध्यक्ष), शंकर खरोसे (हिशेबानी), लहू उतेकर (सह-हिशेबानी),  राजू कदम (कार्यकारी प्रतिनिधी), ड.पांडुरंग जगदाळे (सल्लागर) आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, “स्नेहसंमेलन, हळदी कुंकू कार्यक्रम दर वर्षी घेतले पाहिजे जेणेकरून कौटूंबिक जिव्हाळा निर्माण होतो . तसेच ज्या मातीतून आपण आलो त्यासाठीही पुणे मुंबई करांनी योगदान दिले पाहिजे. आमदार निधीतून पोलादपूर तालुका रहिवासी संघाचे भव्य कार्यालय बांधणसाठी उपलब्ध करून देवू असे” आश्‍वासन यावेळी दरेकर यांनी दिले.

राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ म्हणाल्या की, “प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो, त्याच पध्दतीने कोणताही कार्यक्रम यशस्वी करण्याच्या मागे ही महिलांचा हाथ असतो, तो आज ऐवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थित महिलांना पाहून दिसत आहे. महिला ज्या प्रमाणे हळदी कुंकू समारंभात एकत्रित येतात, अशाच पध्दतीेने महिला सक्षमिकरणासाठी ही एकजूट होणे गरजेचे आहे”.
पोलादपूर तालुका रहिवासी संघातर्फे आयोजित सत्कार समारंभ, स्नेहसंमेलन आणि हळदी कुंकू कार्यक्रमांस उदंड प्रतिसाद मिळला. यामध्ये सुमारे 4000 ते 4500 पोलादपूरवासी एकत्रित आले हाते. यावेळी खेळ पैठणीचा घेण्यात आला, यामध्ये  20 महिलांना पैठणी भेट देण्यात आली. तसेच पोलादपूरची प्रसिद्ध नथ भेट देण्यात आली.  यामध्ये  सुमारे 68 गावातील नागरिक सहभागी झाले होते. तसेच सुनंदा उपाळे, आशा कदम, छाया भोसले, जयश्री मोरे, सुनंदा पवार या जेष्ठ महिलांचाही सन्मान करण्यात आला.

केवळ मैत्रीसाठी भेट ; राज ठाकरे यांच्या भेटीचे देवेंद्र फडणवीसांनीच सांगितले कारण

मुंबई- राजकारणातील चर्चा केवळ माध्यमांमध्ये सुरू असते. माझी आणि राज ठाकरे यांची राजकीय भेट नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरे यांनी मला फोन करून अभिनंदन केले होते. त्याचवेळी मी घरी येईल, असे मी त्यांना सांगितले होते. त्याचप्रमाणे मी आज त्यांच्या घरी गेलो. तसेच त्यांच्याच घरी ब्रेकफास्ट केला आणि आमच्यात गप्पा झाल्या. आमच्या बैठकीमध्ये किंवा चर्चेचा कोणताही राजकीय संदर्भ नाही. केवळ आमच्यातील मैत्रीसाठी मी त्यांच्या घरी गेलो होतो, असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर महायुतीमध्ये मनसेचा समावेश होणार का? याबाबत प्रश्न विचारले जात आहेत. इतकेच नाही तर अमित ठाकरे यांना राज्यपाल कोट्यातून आमदार करणार असल्याची चर्चा देखील सुरू झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.आमच्यातील मैत्रीसाठी आपण राज ठाकरे यांची भेट घेतली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

देशाला पुढे नेण्यासाठी युवाशक्ती ची आवश्यकता- दत्तात्रय भरणे

– १४व्या भारतीय छात्र संसदेचा समारोप.
पुणे, १० फेब्रुवारी: आपल्या देशाची खरी ताकद म्हणजे तरुणाईत आहे. देश आणि राज्याला पुढे नेण्याची जबाबदारी तरुणांवर आहे आणि त्यासाठी देशाला युवा शक्तीची आवश्यकता आहे. असे मत राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी व्यक्त केले. भरणे यांनी तरुणांना आयुष्यात स्वतःला कमी लेखू नका, आत्मविश्वास बाळगा, इच्छाशक्तीच्या बळावर तुम्ही सर्वकाही साध्य करू शकता असे आवाहन केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे यांनी आयोजित केलेल्या १४ व्या भारतीय छात्र संसदेच्या समारोप समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी मेघालय विधानसभेचे अध्यक्ष थॉमस संगमा, राज्यसभा टीव्ही चॅनेलचे माजी कार्यकारी संचालक राजेश बादल, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्यकारी अध्यक्ष आणि छात्र संसदेचे संस्थापक डॉ. राहुल विश्वनाथ कराड आणि कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस उपस्थित होते.
दत्तात्रेय भरणे म्हणाले, तरुणांनी राजकारणात यावे. काही डॉक्टर होतील, काही अभियंते होतील आणि काही इतर क्षेत्रात जातील. राजकारणाच्या माध्यमातून आपण लोकांची सेवा करू शकतो. शहरी तरुण राजकारणाबद्दल नकारात्मक असल्याचे दिसून येते. राजकारणातील काही लोक चुकीचे आहेत म्हणून सर्व राजकारणी चुकीचे आहेत असा तरुणांनी विश्वास ठेवू नये.
चळवळीतून उदयास येणारा नेता राज्याचे आणि देशाचे नेतृत्व करतो. माझ्या कुटुंबात कोणताही राजकीय वारसा नाही. माझ्या कॉलेजच्या काळात मी एका युवा संघटनेच्या माध्यमातून सामाजिक जीवनात सक्रिय झालो. तरुणांनी कठोर परिश्रम करावेत, ते नक्कीच यशस्वी होतील.
डॉ. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले, भारतीय छात्र संसद ही लोकशाहीमध्ये नेतृत्वाची संधी प्रदान करणारा एक उपक्रम आहे. राजकारणाचे प्रशिक्षण देणारी ही पहिली शैक्षणिक संस्था आहे. आमचा प्रयत्न चांगल्या आणि सुशिक्षित तरुणांना राजकारणात आणण्याचा आहे. गेल्या २० वर्षांत आम्ही तरुणांच्या मनात राजकारण ही चांगली गोष्ट आहे हे बिंबवले आहे. जर तरुण समाजाच्या गरजा ओळखू शकत नसतील, तर त्यांनी मिळवलेल्या पदव्या समाजासाठी फायदेशीर ठरणार नाहीत. हे लक्षात घेऊन आम्ही सामाजिकदृष्ट्या उपयुक्त पदवीधर तरुण तयार करत आहोत
थॉमस संगमा म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सोशल मीडियाच्या वापराकडे संतुलित दृष्टिकोन असला पाहिजे. यासाठी पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करणारे, वापरकर्त्यांच्या माहितीचे संरक्षण करणारे आणि चुकीच्या माहितीचा प्रसार वेळेवर रोखणारे धोरण आवश्यक आहे.
राजेश बादल म्हणाले, भारत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात जगाचे नेतृत्व करेल. या क्षेत्राच्या विकासासाठी सरकारने अनुदान दिले आहे.  मानव  AI वर नियंत्रण ठेवतात, परंतु काही वर्षांतच AI मानवांवर नियंत्रण ठेवेल. भविष्यात मानवी संस्कृतीचा अंत होईल. हे लक्षात घेऊन, सकारात्मक बदलासाठी एआयचा वापर केला पाहिजे.
प्रा. डॉ. अंजली साने यांनी आभार मानले. डाॅ.  गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.

उद्यापासून बारावी बोर्डाची परीक्षा:15 लाखांहून अधिक विद्यार्थी देणार परीक्षा

0

15 मे पर्यंत निकाल लागण्याची शक्यता,राज्यात 271 भरारी पथकांची नेमणूक

मुंबई-महाराष्ट्रात आता उद्यापासून दिनांक 11 फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा होणार आहे. यंदाच्या वर्षी बारावीच्या परीक्षेला एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या एकूण संख्येपैकी 8 लाख 10 हजार 348 मुले, तर 6 लाख 94 हजार 652 मुली आहेत. या परीक्षेला 37 तृतीयपंथी नागरिकांनी देखील नोंदणी केली आहे.

महाराष्ट्रात एकूण 10 हजार 550 कनिष्ठ महाविद्यालयातील या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांसाठी 3 हजार 373 मुख्य केंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. विज्ञान शाखेला 68 हजार 967 विद्यार्थी, कला शाखेला तीन लाख 80 हजार 410 विद्यार्थी, वाणिज्य शाखेला तीन लाख 19 हजार 439 विद्यार्थी तर किमान कौशल्य आधारित अभ्यासक्रम 31 हजार 735 विद्यार्थी आहेत. टेक्निकल सायन्स 4 हजार 486 असे एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थी यंदा परीक्षा देणार आहेत, अशी माहिती माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

यावेळी बोलताना शरद गोसावी म्हणाले, पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळा अंतर्गत बारावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात होत आहे. यंदाच्या वर्षी बारावीची परीक्षा 10 दिवस अगोदर होत आहे. ही परीक्षा लवकर घेतल्याने निकाल लवकर लागेल, 15 मे पर्यंत बारावी आणि दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे.

पुढे बोलताना शरद गोसावी म्हणाले, परीक्षा काळात संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा, या दृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात 271 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली. तर मागील पाच वर्षाच्या काळात 818 केंद्रावर सातत्याने गैरप्रकार आढळून आले आहेत. त्यामुळे ती सर्व केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहे. त्याबाबत सांगायचे झाल्यास, पुणे 125, नागपूर 104, छत्रपती संभाजीनगर 205, मुंबई 57, कोल्हापूर 39, अमरावती 124, नाशिक 88, लातूर 73, कोकण 3 ही एकूण 818 केंद्र आहेत. या सर्वांवर विशेष लक्ष मंडळाचे असणार असल्याचे शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, राज्य शासनाकडून कॉपीमुक्त अभियनासाठी परीक्षा केंद्रावर ड्रोन फिरवले जाणार आहेत. परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधीत घटकांची एफसीआरव्दारे म्हणजे फेस रिडींगद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. या बोर्ड परीक्षेत कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी बोर्डाकडून विशेष सूचना जारी करण्यात आल्या आहेत.