Home Blog Page 461

वीजपुरवठा खंडित केल्यामुळे थकबाकीदाराकडून लोखंडी पाइपने मारहाण; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे, दि. १२ फेब्रवारी २०२५: वीजबिलाच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केल्यानंतर परस्पर वीजपुरवठा घेणाऱ्या थकबाकीदाराने महावितरणच्या जनमित्रास लोखंडी पाइपने मारहाण केली. तुपेवस्ती (ता. हवेली) येथे सोमवारी (दि. १०) ही घटना घडली. यात जखमी जनमित्राला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर एका आरोपीविरुद्ध उरूळी कांचन पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, महावितरणच्या उरुळी कांचन उपविभाग अंतर्गत वरिष्ठ तंत्रज्ञ नीलेश चाकणे व विद्युत सहायक शहाबाज शेख हे तुपेवस्तीमधील साईनगर परिसरात थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांची तपासणी करीत होती. यात वीजग्राहक प्रकाश परदेशी यांच्या मालकीच्या घराचा वीजपुरवठा थकबाकीमुळे २३ जानेवारीला खंडित केला होता. मात्र त्या ठिकाणी परस्पर वीजपुरवठा घेण्यात आल्याचे तपासणीत दिसून आले. याबाबत पुढील कारवाई करण्यात येत असताना भाडेकरू कमलेश उत्तम लोंढे याने अंगावर धावून येत ‘खंडित वीजपुरवठा सुरु केला तर तुम्ही विचारणारे कोण’ असे म्हणत दोन्ही कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली व नंतर लोखंडी पाइपने वरिष्ठ तंत्रज्ञ नीलेश चाकणे यांच्या डोक्यावर मारहाण केली. यात जखमी झालेल्या चाकणे यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले.

या प्रकरणी महावितरणकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात आरोपी कमलेश लोंढे विरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियमच्या कलम १३२, १२१ (१), ११८ (१), ३५१ (१), ३५१ (३) व ३५२ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातून चोरी करून नेलेला १८ लाखाचा ऐवज गुजरात मध्येजाऊन चोरट्यासह पुणे पोलिसांनी पकडला

पुणे- इलेक्ट्रीक साहित्याने भरलेला टेंपो चोरुन नेणा-या चोराच्या गुजरात राज्यात जाऊन पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या आणि त्याच्याकडून १८,६९,४१७/-रु. चा महाराष्ट्रातून चोरी करून नेलेला माल केला हस्तगत.
विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर २३/२०२५, भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०३ (२) या गुन्हयाचा तपास विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पोउनि राठोड व तपास पथकाचे अंमलदार तपास करत असताना पो. हवा भोसले, संजय बादरे, व पो. अमंलदार अक्षय चपटे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा इसम नामे प्रशांत दिगंबर पाटील रा.औरंगाबाद याने केला असून तो गुन्हयात चोरलेला माल घेऊन विकण्यासाठी भरुच गुजरात या ठिकाणी गेला आहे. मिळालेल्या बातमी प्रमाणे तपास पथकाचे पोउनि नितीन राठोड, व स्टाफ हे भरुच गुजरात या ठिकाणी जाऊन तेथील स्थानिक पोलीसांची मदतीने आरोपीचा शोध घेऊन मोठ्या शिताफीने आरोपीस गुन्हयात चोरीस गेलेले महिंद्रा पिकअप व त्यामध्ये असलेले इलेक्ट्रीक साहित्यासह पकडून त्याचेकडून २,५०,०००/-रु. किंमतीचा महिंद्रा पिकअप व त्यामध्ये असलेले १६,१९,४१७/- रु. किंमतीचे इलेक्ट्रीक साहित्य असा एकूण १८,६९,४१७/-रु.चा माल केला हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ४, पुणे शहर, श्री. हिंमत जाधव, मा. सहा. पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर श्री. विठ्ठल दबडे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर, श्रीमती कांचन जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री गंगेश हांडे, यांचे सुचनेप्रमाणे विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार बबन वणवे, यशवंत किर्वे, कृष्णा माचरे, अमजद शेख, वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, संदीप देवकाते, अक्षय चपटे, किशोर भुसारे यांनी केली आहे.

राहुल सोलापूरकरांच्या व्हिडिओमध्ये अजून तरी काही आक्षेपार्ह सापडले नाही- पोलीस आयुक्त अमितेश कुमार

पुणे-अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी एका पॉडकास्टमध्ये बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून चांगलाच गदारोळ उठला असून राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात अनेक संघटनांनी आक्रमक भूमिका घेत तीव्र निषेध व्यक्त केला आहे. तसेच राहुल सोलापूरकर यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला असून यात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी विधान केले होते. यामुळे आंबेडकरी अनुयायांनी देखील संताप व्यक्त केला आहे.

राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. तसेच त्यांच्या घरासमोर शिवभक्त तसेच आंबेडकरी अनुयायांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी पोलिसांनी राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी या प्रकरणावर भूमिका स्पष्ट केली आहे.

पोलिस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले, राहुल सोलापूरकर यांचे दोन्ही व्हिडिओ पुणे पोलिसांनी तपासले आहेत. या व्हिडिओमध्ये अजून तरी काही आक्षेपार्ह सापडले नाही. सध्या त्यांच्या घराच्या बाहेर पोलिस बंदोबस्त दिला आहे. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून तो पोलीस बंदोबस्त आहे. गरज पडली तर राहुल सोलापूरकर यांना चौकशीसाठी बोलवून घेऊ. तसेच अजून तरी राहुल सोलापूरकर यांच्यावरती कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नाही, अशी माहिती अमितेशकुमार यांनी दिली.

दरम्यान, राज्यभरतून संताप व्यक्त होत असल्याचे पाहून अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी माफी देखील मागितली आहे. मात्र, त्यांनी माफी मागीतल्यानंतर त्यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला ज्यात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मण असल्याचे म्हंटले होते. यावरून आंबेडकरी अनुयायांनी संताप व्यक्त करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यावरून पुन्हा एकदा राहुल सोलापूरकर यांनी माफी मागितली आहे.

काय म्हणाले राहुल सोलापूरकर?

राहुल सोलापूरकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक चुकीचा शब्द गेला आणि शिवभक्तांची मी जाहीर माफी मागितली. लाच शब्द बोललो, मी अनेकांच्या भावना दुखावल्या त्याबद्दल माफी मागितली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल मी बोललेला असा एक व्हिडिओ समोर आला. बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज यांच्याबद्दल मी अनेक व्याख्याने देत असतो, तरी हे का केलं जात आहे, याबद्दल मी अनभिज्ञ आहे. मी पुन्हा एकदा जाहीर माफी मागतो. महान व्यक्तीला कलुशीत करण्याचा प्रयत्न माझ्याकडून होणार नाही.

मंत्री उदय सामंत यांनी घेतली स्वागताध्यक्ष शरद पवार यांची भेट

0

नवी दिल्ली, दि. १२:  ९८ वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियमवर होत आहे. त्याअनुषंगाने मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी साहित्य संमेलनाच्या स्थळाची पाहणी केली. त्यानंतर साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

यावेळी खासदार नरेश मस्के साहित्य संमेलनाचे निमंत्रक सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार आणि समन्वयक डॉ. शैलेश पगारिया उपस्थित होते.

भेटीनंतर माध्यमांशी  बोलताना मंत्री सामंत म्हणाले की,  राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून दिल्लीमध्ये होणाऱ्या मराठी अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आढावा घेण्यासाठी आज दिवसभर राजधानीत असून या संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्घाटक आहे. या सर्व नियोजनाच्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी आज पवार यांची भेट घेतल्याचे सांगितले.

‘लाडकी बहीण’ योजनेस मुख्यमंत्र्यांचा आश्वासक आधार

0

मुंबई, दि. १२ : “लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही, तर आमच्या जगण्याचा आधार आहे”, असे घरकाम करणाऱ्या महिलांनी सांगतानाच “ही योजना कधीही बंद पडणार नाही” अशी आश्वासनपर ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील घरकाम करणाऱ्या २० महिलांना रसिकाश्रय या संस्थेने “जीवाची मुंबई, श्रमाची आनंदवारी” या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घडविली. मुख्यमंत्र्यांसह झालेल्या भेटीदरम्यान अनेक महिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. घरकाम करुन ५०० रुपयांत कुटुंब कसं चालवायचं, असा प्रश्न होता. पण ‘लाडकी बहीण’ योजनेने आम्हाला मोठा आधार मिळाला,” असे म्हणताना एक वृद्ध महिला गहिवरली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भावना समजून घेत “लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. याहीपेक्षा अधिक मदत कशी करता येईल, याचाही विचार करतोय,” असे सांगितले.

या महिलांसाठी ही भेट केवळ योजनांविषयी नव्हती, तर जीवनभर लक्षात राहणारा अनुभव होता. “आम्ही कधी विमान पाहिलं नव्हतं, पण आता आम्ही त्यातून प्रवासही केला,” असे एका महिलेने मुख्यमंत्र्यांना सांगितले.

या भेटीत महिलांनी आणखी एक विनंती केली की, “सन्माननिधी म्हणून मिळणारे १० हजार रुपये दरवर्षी मिळावेत.” यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत “या मागणीचा जरुर विचार करू,” असे सांगितले. तसेच काही वृद्ध महिला ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र नसल्याने त्यांना ‘निराधार योजना’ अंतर्गत मदत देण्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

या भेटीचे आयोजन “रसिकाश्रय” संस्थेने केले. “या महिलांच्या संघर्षाची जाणीव करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी संस्थेचे अभिनंदन केले. राज्यातील गरीब जनतेचे जीवन सुसह्य करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या भेटीनंतर महिलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. “मुख्यमंत्र्यांची भेट स्वप्नवत वाटली. लाडकी बहीण योजना कायम राहील, हे ऐकून समाधान झाल्याचे एका महिलेने सांगितले.

साहित्य संमेलनाच्या धर्तीवर राजधानीतून कवितासंग्रह प्रकाशित होणे स्तुत्य उपक्रम- उदय सामंत

0

साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिल्लीतील महाराष्ट्र प्रकर्षाने दिसत आहे- मुरलीधर मोहोळ

‘उजेडाचे प्रवासी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आणि दिल्लीतील मराठीजणांचा सन्मान सोहळा

नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत राहून दिल्लीतील मराठी माणूस मनापासून मराठीपण जपत आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले. तर साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिल्लीतील महाराष्ट्र प्रकर्षाने दिसत आहे, अशा भावना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केल्या. सरहद, पुणे आयोजित अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ‘उजेडाचे प्रवासी’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले आणि दिल्लीत विविध क्षेत्रात कार्यरत मराठी बांधवांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मंत्री उदय सामंत आणि मुरलीधर मोहोळ बोलत होते.

राजधानी दिल्लीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या साहित्य संमेलनापूर्वी विविध उपक्रमांची रेलचेल राजधानीत आहे. या उपक्रमांचा एक भाग म्हणून दिल्लीतील मराठी नागरिकांनी लिहिलेल्या ‘उजेडाचे प्रवासी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. जीवन तळेगावकर यांनी या काव्यसंग्रहाचे संपादन केले आहे. तसेच विविध क्षेत्रात कार्यरत दिल्लीतील मराठी बांधवांचा सन्मान यावेळी करण्यात आला. दरम्यान, या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, इंदिरा गांधी कला केंद्राचे सदस्य सचिव सच्चिदानंद जोशी, निवृत्त परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे, महेंद्र कुमार लड्डा, सरहदचे संजय नहार, जीवन तळेगावकर यावेळी मंचावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले की, साहित्य संमेलन दिल्लीत होत असून अधिकाधिक मराठी लोकांनी या साहित्य संमेलनाचा भाग व्हावा, दिल्लीतील मराठी लोक या साहित्य संमेलनाचे राजदूत असून साहित्य संमेलनामुळे उत्साहाचे वातावरण सर्वदूर पसरत असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे साहित्य संमेलन विशेष असल्याचाही उल्लेखही सामंत यांनी यावेळी केला.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाचा भाग होता येत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे पहिलेच संमेलन आहे, त्यामुळे हे संमेलन विशेष आहे. दिल्लीत मराठी बांधवांचा सत्कार करताना दिल्लीतही महाराष्ट्र किती विस्तारला आहे, याची प्रचिती येते, असेही ते म्हणाले.

ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे, निवृत्त परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनीही याप्रसंगी समायोजित भाषणे केली.

एका वर्षात वडगावशेरी मतदारसंघ टँकरमुक्त करणार; आमदार बापुसाहेब पठारे यांचा निर्धार

पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी संपूर्ण भागाला सुरळीत पाणी पुरवठा करण्याचे केले मान्य

पुणे-: वडगावशेरी मतदारसंघाला ३१ मार्च २०२६ पर्यंत टँकरमुक्त करून सर्व भागाला नळाद्वारे सुनियोजित व सुरळीत पाणी पुरवठा करणार, असा निर्धार आमदार बापुसाहेब पठारे यांनी केला आहे.

येरवडा क्षेत्रीय कार्यालय येथे बुधवारी (ता. १२) घेतलेल्या पाणी पुरवठा विभागासोबत घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. सकाळी ७ च्या सुमारास पठारे यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. बैठकीदरम्यान, वडगावशेरी मतदारसंघातील पाणी पुरवठ्यासंदर्भातील प्रश्नांवर सखोल चर्चा झाली. गेल्या काही वर्षांपासून, नागरिकांना विस्कळीत पाणी पुरवठा होत असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. पाणी पुरवठ्याच्या प्रश्नाला घेऊन आमदार बापूसाहेब पठारे यांनी ठोस पाऊले उचलल्याचे दिसून येते. बैठकीत त्यांनी अधिकारी वर्गाला तातडीने कार्यवाही करण्याबाबतचे आदेश दिले आहेत.

पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी एका वर्षात संपूर्ण वडगावशेरी मतदारसंघाला सुरळीत पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन बैठकीदरम्यान दिले. तसेच, पोरवाल रस्ता परिसर, निंबाळकर नगर, साठे वस्ती, स्वामी समर्थ नगर या भागांना येत्या २५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत, तर येत्या १५ मार्चपर्यंत डीवाय पाटील रस्ता परिसर, चिरके कॉलनी, पठारे वस्ती, आदर्श नगर, गणेश नगर, कर्मभूमी नगर, लेक व्ह्यू, खांदवे नगर यासह लोहगाव पूर्व भागाला पूर्ण क्षमतेने पाणी दिले जाईल. तसेच, २५ मे २०२५ पर्यंत धानोरी डोंगर परिसर, सहारा परिसर, न्याती बिल्डिंग परिसरात जलवाहिन्या टाकून नियमित पाणी देणार, असल्याचे शाखा अभियंता सुधीर आलुरकर यांनी स्पष्ट केले.

आमदार बापूसाहेब पठारे यांनी येरवडा, वडगावशेरीतील गलांडे नगर, विमाननगर यांसह पाणी टंचाई असणाऱ्या भागात देखील नियमित पाणी पुरवठा करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. येत्या वर्षभरात पाण्याच्या टाक्या, जलवाहिन्या यांची कामे पूर्ण करून मतदारसंघातील सर्व भागात नियमित पाणी पुरवठा करा, अशा सूचना देखील केल्या.

येरवड्यात ४० वर्षांपूर्वीच्या जुन्या जलवाहिन्या असल्याने अशुद्ध व दूषित पाणी पुरवठा होतो. त्यामुळे येरवड्यातील जलवाहिन्या बदलण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीदेखील आमदारांनी आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याकडे फोनद्वारे केली. आयुक्तांनी देखील यावर सकरात्मक प्रतिसाद देत मागणी मान्य केली आहे.

बैठकीच्या निमित्ताने, यावेळी पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप, अधीक्षक अभियंता इंद्रभान रणदिवे, झोन १ चे उपायुक्त राजीव नंदकर, अधीक्षक प्रकल्प अभियंता श्रीकांत वायदंडे, कार्यकारी अभियंता एकनाथ गाडेकर, उप-अभियंता रविंद्र पाडळे, उप अभियंता चंद्रसेन टिळक, प्र. उप- अभियंता अन्वर मुल्ला, येरवडा क्षेत्रीय कार्यालय सहायक महापालिका आयुक्त वंदना साळवे, कार्यकारी अभियंता तुळशीराम नागटिळक, महेंद्र बहिरम, राजेंद्र खांदवे, संतोष आरडे, किशोर विटकर, संजय गलांडे, डॅनियल लांडगे, विशाल मलके, शैलेश राजगुरू, गणेश ढोकले आदि उपस्थित होते.


चौकट
“पाणी सोडणारे वॉलमॅन जर पैशाची मागणी करत असतील, तर नागरिकांनी मला अथवा पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी”, असेही आवाहन आमदार पठारे यांनी केले.

शिवाजीनगर एसटी बस स्थानकाचे भूमिपूजन मे मध्ये होणार

आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची माहिती

पुणे ता. 12 फेब्रुवारी
शिवाजीनगर येथे अत्याधुनिक एसटी बसस्थानक उभारण्यासाठी येत्या मे महिन्यात भूमिपूजन करण्यात येणार आहे, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी बुधवारी सांगितले. शिवाजीनगरला पूर्वीच्या जागेवर बसस्थानक बांधण्यासाठी एसटी महामंडळ आणि महा मेट्रो यांच्यामध्ये येत्या आठवड्यात एम ओ यु करार होणार आहे . या प्रकल्पासाठी सुमारे 600 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तीन वर्षात बस स्थानक बांधण्यात येईल.

शिरोळे यांनी शिवाजीनगर बस स्थानक पूर्वीच्या जागी उभारण्यासाठी गेले वर्षभर पाठपुरावा केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सोबत त्यांनी गेल्या महिन्यात पुण्यात बैठक घेतली. तेथे झालेल्या निर्णयाचा पाठपुरावा करीत शिरोळे यांनी सोमवारी पवार यांना निवेदन दिल्यानंतर, उपमुख्यमंत्री पवार यांच्या मंत्रालयातील दालनात संबंधित सर्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आज बुधवारी सकाळी झाली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक,राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे बैठकीला उपस्थित होते. त्यात याबाबतचे निर्णय घेण्यात आले.
शिरोळे बैठकीतील निर्णयाची माहिती देताना म्हणाले, ” वित्त, नियोजन, परिवहन, एसटी महामंडळ आणि महा मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. नागरिक व प्रवाशांच्या अपेक्षा मी बैठकीत मांडल्या. शिवाजीनगर एसटी बस स्थानकाच्या पूर्वीच्या जागी मेट्रोचे भुयारी स्थानक बांधण्यात आले आहे. तेथे वरील बाजूला अत्याधुनिक बसस्थानक उभारण्यासाठी एसटी महामंडळ आणि महा मेट्रो यांच्यात येत्या आठवड्यात एम ओ यु करार करण्याचा निर्णय घेण्यात आला. महा मेट्रो मार्फत पीपीपी तत्त्वावर हे बांधकाम करण्यात येईल. येत्या तीन आठवड्यात याबाबतच्या निविदा काढण्यात येतील. निविदा मंजूर करून मे महिन्यापर्यंत प्रत्यक्ष काम सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले आहेत. त्यामुळे मे महिन्यात एसटी बसस्थानक उभारणीसाठी भूमिपूजन करण्यात येईल.
शिवाजीनगर एसटी बस स्थानक 2019 मध्ये पुणे मुंबई रस्त्यावर वाकडेवाडी येथे डेअरीच्या जागेत स्थलांतरित करण्यात आले आहे. ते पुन्हा मूळच्या जागेवर येईल. या ठिकाणी दिवसभरात सुमारे दोन हजार गाड्यांची ये-जा होते. मुख्यत्वे विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मुंबई या भागात जाणाऱ्या एसटीच्या गाड्या शिवाजीनगर बसस्थानकावरून जातात. त्यामुळे प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. बस स्थानकाच्या सोबतच एसटी गाड्यांसाठी मोठे वर्कशॉप, गाड्या पार्किंग साठी जागा, पहिल्या मजल्यावरही गाड्या उभ्या करण्याची सोय करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 600 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पीपीपी तत्त्वावर हा प्रकल्प तीन वर्षात उभारण्यात येईल, अशी माहिती शिरोळे यांनी दिली.

सरकार चित्रपट उद्योग उद्ध्वस्त करत आहे:जया बच्चन यांचा राज्यसभेत आरोप

राजकारणासाठी वापर करत सिनेमाला लक्ष्य केले जात आहे

नवी दिल्ली– समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत चित्रपट उद्योगाचा मुद्दा उपस्थित केला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ वरील सर्वसाधारण चर्चेदरम्यान त्यांनी सरकारवर चित्रपट उद्योग उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला आहे. तसेच, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना उद्योगाला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यसभेत २०२५-२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेदरम्यान बोलताना जया बच्चन म्हणाल्या, ‘तुम्ही एका उद्योगाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. सरकारे हे पूर्वीही करत आली आहेत. आणि आज ते खूप जास्त आहे. जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा तुम्ही त्यांना (उद्योगाला) बोलावता. फोटो काढतात आणि नंतर त्याकडे दुर्लक्ष करतात. चित्रपट उद्योगाबद्दल तुमचे काय मत होते? जीएसटी बाजूला ठेवा. परिस्थिती इतकी वाईट आहे की सर्व सिंगल स्क्रीन बंद करण्यात आल्या आहेत. लोक छोट्या पडद्यावर चित्रपट पाहण्यासाठी जात नाहीत. कारण सगळंच खूप महाग झालं आहे. तुम्हाला हा उद्योग संपवायचा आहे का?सरकारवर आरोप करत जया म्हणाल्या की, आजचे सरकार उद्योग पूर्णपणे नष्ट करू इच्छित आहे. हा एकमेव उद्योग आहे जो भारताला उर्वरित जगाशी जोडतो. रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांचे जगणे कठीण झाले आहे. मी चित्रपट उद्योगाच्या वतीने बोलत आहे. मी सरकारला चित्रपट उद्योगावर दया दाखवण्याचे आवाहन करत आहे. मी अर्थमंत्र्यांना याचा विचार करण्याची आणि उद्योगाला मदत करण्याची विनंती करते.

पखवाज, बासरी वादनाची रंगणार मैफल : गुरू-शिष्यांचे सहवादन

ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍तर्फे शनिवारी ‌‘परंपरा‌’ संगीत मैफलीचे आयोजन
पुणे : ऋत्विक फाऊंडेश फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍ आयोजित ‌‘परंपरा‌’ या मालिकेअंतर्गत पखवाज आणि बासरी वादनाची सुरेल मैफल रंगणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दि. 15 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 5:00 वाजता ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍, वेदभवन जवळ, कोथरूड येथे करण्यात आले आहे.
शिष्यांना आपल्या गुरुंसोबत मैफलींना जाण्याची संधी उपलब्ध होते; परंतु त्यांच्यासह सादरीकरणाची संधी क्वचितच मिळते. ‌‘परंपरा‌’ मैफलीअंतर्गत ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍च्या माध्यमातून सुप्रसिद्ध पखवाज वादक सुखद मुंडे यांच्यासह त्यांच्या शिष्यांना तसेच सुप्रसिद्ध बासरी वादक पंडित रूपक कुलकर्णी यांच्यासह त्यांच्या शिष्यांना एकाच मंचावर वादनाची संधी प्राप्त होणार आहे.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात सुखद मुंडे यांच्यासह कृष्णा नवगिरे, हर्ष पाटील, मंगेश खैरनार आणि प्रदिप दराडे हे शिष्य पखवाज वादन करणार असून त्यांना संतोष घंटे संवादिनीवर साथ करणार आहेत.
दुसऱ्या सत्रात पंडित रूपक कुलकर्णी यांच्यासह त्यांचे शिष्य मृगेंद्र मोहडकर, लितेश जेठवा, मेहुल प्रजापती, तनय कामत, रिंगचड ब्रह्मा आणि रेणुका लिखिते बासरी वादन करणार आहेत. वादकांना महेशराज साळुंके तबलासाथ करणार आहेत.
सुखद मुंडे यांनी वयाच्या सहाव्या वर्षापासून त्यांचे वडिल सुप्रसिद्ध पखवाज वादक पं. माणिक मुंडे यांच्याकडून पखवाज व तबला वादनाची तालीम घेतलेली आहे. सुखद यांनी जगविख्यात गायक-वादकांना तसेच अनेक कथक नृत्याविष्कारांना पखवाजची साथ केली आहे. देश-विदेशात अनेक प्रसिद्ध संगीत महोत्सवांमध्ये त्यांचे वादन झाले आहे. त्यांनी पुणे विद्यापीठातून पखवाज वादनात एम्‌‍.ए. पदवी प्राप्त केली आहे.
रूपक कुलकर्णी हे जगविख्यात बासरी वादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे पहिले गंडाबंध शिष्य आहेत. वडिल पंडित मल्हारराव कुलकर्णी यांच्यामुळे रूपक यांना संगीतात रुची निर्माण झाली. वयाच्या नवव्या वर्षापासून त्यांनी प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यांना धृपद व खयाल गायकीचेही मार्गदर्शन मिळाले आहे. पंडित रूपक कुलकर्णी यांनी देशविदेशात बासरी वादनाच्या अनेक मैफली गाजविल्या आहेत तसेच विविध संगीत महोत्सवांमध्ये बासरी वादन केले आहे. मधुर आलाप, मंत्रमुग्ध करणारी लयकारी आणि सर्जनशीलता हे रूपक कुलकर्णी यांच्या वादनाचे वैशिष्ट आहे.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

नृत्याच्या माध्यमातून विशेष मुलांचा परिवर्तनात्मक प्रवास

पुणे : कोणत्याही शारीरिक मर्यादा असल्या तरी प्रत्येक मुलाला व्यक्त होण्याचा हक्क आहे. या भावनेतून विशेष मुलांचा नृत्याविष्कार पुणेकरांनी अनुभवला. निमित्त होते अंतर्नाद आयोजित विशेष मुलांच्या नृत्यसादरीकरणाचे!
अंतर्नादतर्फे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात अंतर्नादच्या संचालिका, मानसोपचारतज्ज्ञ अश्विनी पाटील यांच्या पुढाकारातून डान्स ऑरा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डाउन सिंड्रोम, ऑटिझम आणि विशेष मुलांना नृत्याद्वारे नवी उमेद मिळावी या हेतूने अंतर्नादच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जातात.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. या नंतर देशभक्तीपर गीते तसेच प्रसिद्ध चित्रपट गीतांवर विशेष मुलांनी आत्मविश्वासने ठेका धरला. या नृत्याला उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली. आपले मूल मंचावर आत्मविश्वासाने नृत्य सादर करताना पाहून पालकांचे डोळे पाणावले. विशेष मुलांबरोबरच त्यांचे पालक, थेरपिस्ट आणि समन्वयक देखील या नृत्य सादरीकरणात उत्साहाने सहभागी झाले.
विशेष मुलांना मार्गदर्शन करणे पुरेसे नाही, तर या मुलांसाठी विविध उपक्रम आयोजित करणे गरजेचे असते. नृत्य हा त्यातील एक विशेष प्रकार. कार्यक्रमाचे आयोजन करताना सराव सत्रे, योग्य मंचाची निवड, वेशभूषा तसेच इतर व्यवस्था यासाठी योग्य ते नियोजन करावे लागते. जेव्हा ही मुले मंचावर आत्मविश्वासाने नृत्य सादर करतात, तेव्हा ती समाजाच्या दृष्टीकोनाला नवा आयाम देतात, असे अश्विनी पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंदा वझे आणि आदिती कुलकर्णी यांनी केले.

‘तळ्यातले आकाश‌’ कवितासंग्रह दीपाली दातार यांचा अमृतानुभव : हेमकिरण पत्की

पुणे – कवयित्री दीपाली दातार यांचा ‌‘तळ्यातले आकाश‌’ हा कवितासंग्रह म्हणजे त्यांचा अमृतानुभव आहे, असे मत ज्येष्ठ कवी, लेखक हेमकिरण पत्की यांनी व्यक्त केले. कवितालेखन केवळ स्वतः पुरते नसते. स्वतःसहित सर्वांनाच कविता उजळवत असते, हा अनुभव दातार यांच्या कविता देतात, असेही ते म्हणाले.
सृजनसंवाद प्रकाशनाच्या वतीने कवयित्री, लेखिका दीपाली दातार यांच्या ‌‘तळ्यातले आकाश‌’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पत्की बोलत होते. याप्रसंगी कवयित्री दीपाली दातार, ज्येष्ठ कवयित्री, लेखिका अंजली कुलकर्णी आणि प्रकाशक गीतेश शिंदे, मुकुंद दातार, अनिरुद्ध दडके आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
हेमकिरण पत्की म्हणाले,“शीर्षकापासूनच हा कवितासंग्रह वैशिष्ट्यपूर्ण आहे. कवयित्रीची सत्य, सौंदर्य आणि शिवत्वाची ओढ या कवितांमधून व्यक्त झाली आहे. कवयित्रीचे भावोत्कट स्फुरण संवेदनशीलपणे इथे प्रकट झाले आहे”.
अंजली कुलकर्णी म्हणाल्या, “कवयित्री दीपाली यांच्या आत्मशोधाची ही कविता आहे. जीवनजाणिवांचा, स्त्रीपणाचा, मानवी नातेसंबंधांचा, निसर्गाच्या रूपांचा आणि आत्मरूपाचा शोध घेण्याचा ध्यास या कविता व्यक्त करतात. हा शोध दीपाली यांची कविता सजगतेने, प्रगल्भतेने आणि तीव्रोत्कट पद्धतीने घेताना दिसते”.
मनोगत मांडताना दीपाली दातार म्हणाल्या, “हा माझा पहिलाच कवितासंग्रह आहे. माझ्या भाववृत्ती आणि जगणं यांची एकात्म अभिव्यक्ती कवितांमधून अभिव्यक्त झाली असावी. आध्यात्मिक धारणांचे आशयसूत्र असून, निसर्ग संवेदन, संवादाची ओढ यातून कलात्मक विकसनाला अवकाश मिळतो का, हे शोधण्याचा एक प्रयत्न आहे”.
प्रकाशक गीतेश शिंदे यांनी कलाकारांचे, लेखक, कवींचे सृजन रसिकांपर्यंत नेण्यामधील दुवा म्हणून काम करत असल्याचा उल्लेख केला. सर्जनशीलतेला कोंदण देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकलेल्या ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांचे मनोगत वाचून दाखवण्यात आले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात दीपाली दातार यांच्या ‌‘तळ्यातले आकाश‌’ या कवितासंग्रहातील निवडक कवितांचे अभिवाचन अनिरुद्ध दडके, संजय गोखले आणि वृषाली पटवर्धन यांनी केले. श्रुती विश्वकर्मा मराठे यांनी काही कवितांचे गायन केले. व्हायोलीनची साथ अनुप कुलथे यांनी केली. अनिरुद्ध दडके यांनी सूत्रसंचालन केले. मुकुंद दातार यांनी स्वागत केले.

शिवाजीनगर बसस्थानकाच्या बांधकामाच्या आढाव्यासाठीउद्या मंत्रालयात बैठक

पुणे : येथील शिवाजीनगर बसस्थानकाच्या बांधकामाचा आढावा घेण्यासाठी उपमुख्य मंत्री अजित पवार यांनी उद्या (बुधवारी) सकाळी मंत्रालयात बैठक बोलावली आहे, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

ही बैठक उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्या दालनात होणार असून, या बैठकीला आमदार शिरोळे यांच्यासह वित्त, परिवहन, नगरविकास खात्याचे सचिव, वरिष्ठ अधिकारी, महामेट्रो, पुणे चे व्यवस्थापकीय संचालक उपस्थित रहाणार आहेत.

महामेट्रो च्या कामासाठी शिवाजीनगर एसटी स्थानक शासकीय दूध डेअरीच्या शेजारी हलविण्यात आले. महामेट्रोचे काम आता पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे प्रवाशांची गैरसोयही आता टाळली जायला हवी, याकरिता लवकरात लवकर शिवाजीनगर बसस्थानक मूळ जागी उभे रहावे, यासाठी आमदार शिरोळे यांनी उपमुख्य मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची नुकतीच भेट घेऊन, या कामात त्यांनी लक्ष घालावे, अशी विनंती केली होती. मंत्रालयात संबंधित खात्यांचे सचिव आणि अधिकारी यांची बैठक घेऊ, असे आश्वासन पवार यांनी दिले होते. त्यानुसार ही बैठक होणार असल्याचे शिरोळे यांनी सांगितले.

राहुल सोलापूरकरवर ॲट्रॉसिटी आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची रिपाइं (आठवले) ची मागणी

सोलापूरकरच्या घराबाहेर रिपाइं चे तीव्र आंदोलन

पुणे : अभिनेता राहुल सोलापूरकर याने महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्य करण्याची मालिका सुरू ठेवली आहे.  आधी छत्रपती शिवाजी महाराज आणि आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  या महापुरुषांवर आक्षेपार्ह वक्तव्य करून महाराष्ट्रातील सामाजिक  सलोखा बिघडविण्याचे काम सोलापूरकर करत आहे. सोलापूरकर याच्यावर देशद्रोहाचा  गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने आज  सोलापूरकरच्या घरासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. 

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर,  शैलेन्द्र चव्हाण, असित गांगुर्डे, महेंद्र कांबळे, मंदार जोशी, बसवराज गायकवाड,   माजी उपमहापौर सुनीता वाडेकर,  महिपाल वाघमारे,  शाम सदाफुले,  विरेन साठे, शाम  गायकवाड, नीलेश आल्हाट, अक्षय गायकवाड, अविनाश कदम, अविनाश गायकवाड, उमेश कांबळे, आकाश बहुले, अप्पा वाडेकर,खंडू शिंदे, मिना गालटे,  कोथरूड अध्यक्ष वसंतराव ओव्हाळ, केशव पौळे, बाळासाहेब खंकाल, दीपक सगर, गंगाधर ओव्हाळ, दत्ता चव्हाण, अरविंद शिंदे, नीलेश आगळे, उज्वला सर्वगौड,  अण्णा लोखंडे, विलास पाटोळे, बी. पी. शेजवळ, पासोटे मामा, शिवाजी कांबळे, बापू गोरे, महादेव खळगे, स्वप्नील जाधव, गोविंद साठे, नीलेश आगळे, रोहित कांबळे,रमेश तेलवडे यांच्यासह रिपाइं चे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी बोलताना परशुराम वाडेकर म्हणाले, राहुल सोलापूरकर महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडविण्यासाठी जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. ज्या माणसाने राजर्षी शाहू महाराजांची भूमिका केली त्याला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत? यांची पूर्णपणे कल्पना आहे, तरीही हा व्यक्ती वादग्रस्त वक्तव्य करत आहे, त्यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ॲट्रॉसिटी आणि देशद्रोहाचा गुन्हा तत्काल दाखल करून त्याला अटक करावी. 

शहराध्यक्ष संजय सोनवणे म्हणाले, राहुल सोलापूरकरने केलेले वक्तव्य अत्यंत निंदनीय आहे. महापुरुषांविरुद्ध जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य हा व्यक्ती करत आहे. पोलिस आणि राज्य सरकारने त्याला पाठीशी घालू नये, त्याचे पोलिस संरक्षण त्वरित कमी करावे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून पोलिस कोठडीत त्याची रवानगी करावी.

सह्याद्रि हॉस्पिटल्समध्ये पहिली लेझर-असिस्टेड, स्टेन्टविरहित अँजिओप्लास्टी यशस्वी

महाराष्ट्रातील मुंबईबाहेरील पहिली मेटल स्टेन्ट विरहित अँजिओप्लास्टी

पुणे – ११ फेब्रुवारी २०२५ – हार्ट अटॅक आलेल्या एका ७० वर्षीय मधुमेहग्रस्त रुग्णावर पुण्यातील डेक्कन जिमखाना इथल्या सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पुण्यातील पहिली लेझर-असिस्टेड, स्टेन्टविरहित अँजिओप्लास्टी पार पडली. सह्याद्रि हॉस्पिटल्स, डेक्कन जिमखानाच्या कार्डिओलॉजी विभागाचे संचालक डॉ. अभिजीत पळशीकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या क्रांतिकारी प्रक्रियेमुळे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजीच्या क्षेत्रामध्ये एक लक्षणीय टप्पा गाठला गेला आहे.

मधुमेहाने ग्रस्त असलेल्या रुग्णाला या प्रक्रियेच्या तीन दिवस अगोदर हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता व त्याच्यावर औषधांच्या मदतीने सुरुवातीला उपचार सुरू होते. मात्र, या प्रकरणामध्ये डॉक्टरांना दोन प्रमुख आव्हाने समोर आली. पहिले म्हणजे आर्टरीमध्ये कॅल्शियमचा जाड थर जमा झाल्याने स्टेन्ट टाकण्याची प्रचलित प्रक्रिया पार पाडणे कठीण होते, आणि दुसरे आव्हान म्हणजे स्वत: रुग्ण स्टेन्ट टाकून घेण्यास फारसे राजी नव्हते. हे प्रश्न सोडविण्यासाठी वैद्यकीय टीमने लेझरच्या सहाय्याने करण्यात येण्यारी अँजिओप्लास्टी करण्याचा व त्याला औषध-वेष्टित फुग्याची (ड्रग-कोटेड बलून) जोड देण्याचा पर्याय निवडला, ज्यामुळे कायमस्वरूपी धातूचे स्टेन्ट बसविण्याची गरज न भासता आर्टरी मोकळी करण्यात यश आले.

या अँजिओप्लास्टी प्रक्रियेमध्ये एक्सिमर लेझर (Excimer laser) हे आर्टरीजच्या आत जमलेल्या कॅल्शियम आणि कोलेस्ट्रोलचे थर प्रभावीपणे दूर करणारे अत्यंत प्रगत तंत्रज्ञान वापरण्यात आले. यानंतर ड्रग-कोटेड बलूनचा वापर करण्यात आला, जो पारंपरिक स्टेन्स्ट्साठीचा एक अभिनव पर्याय आहे. कायमस्वरूपी इम्प्लान्ट बसविण्याऐवजी असा ड्रग-कोटेड बलून औषधाला आर्टरीपर्यंत पोहोचवतो आणि त्यानंतर तो काढून घेतला जातो व तिथे कोणत्याही धातूचा अंश उरत नाही.

सह्याद्रि सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलडेक्कन जिमखाना येथील कार्डिओलॉजी विभागाचे संचालक डॉ. अभिजीत पळशीकर यांनी या प्रक्रियेचे तपशील व फायदे उलगडून सांगितले. “या प्रक्रियेचे प्रमुख फायदे म्हणजे यात धातूचे कायमस्वरूपी इम्प्लान्ट वापरले जात नाही. स्टेन्ट शरीरात कायमचे राहते व त्यातून रिस्टेनोसिस (आर्टरी पुन्हा अरुंद होणे)चा धोका उद्भवू शकतो. लेझरच्या सहाय्याने ही प्रक्रिया करण्याची पद्धत वापरल्याने ही चिंता दूर होते. त्याशिवाय यामुळे रुग्णाची तब्येत लवकर सुधारते. या रुग्णालय तर एका दिवसात घरी परतता आलेस्वतंत्रपणे चालता आले आणि लगेचच आपली दैनंदिन कामे पूर्वीप्रमाणे सुरू करता आली. दुसऱ्या दिवसापर्यंत ते हिंडू-फिरू लागलेत्यांना आपणहून रेस्टरूमपर्यंत जाता आले त्यामुळे दुपारपर्यंत त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला.

हि प्रक्रिया मिनिमली इन्व्हेजिव्ह स्वरूपाच्या पारंपरिक स्टेन्टिंग पद्धतींना एक अधिक सुरक्षित आणि रिणामकारक पर्याय म्हणून अतिशय चांगली आहे. पुण्यात पार पडलेली अशा प्रकारची पहिलीच प्रक्रिया यशस्वी झाल्याने इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजीच्या क्षेत्रातील एक नवे पर्व सुरू होण्याचा मार्ग खुला झाला आहे.” असे सह्याद्रि ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आणि मेडिकल डिरेक्टर डॉ. सुनील राव यावेळी म्हणाले.

या प्रक्रियेत वापरले गेलेले एक्सिमर लेझर हे तंत्रज्ञान कॅल्शियमयुक्त प्लाकचे अचूकतेने उच्छेदन करते. तसेच  हा प्लाक प्रभावीपणे काढून टाकताना रुग्णास असणाऱ्या धोक्याचा प्रभाव देखील कमी करते. या तंत्रज्ञानाच्या जोडीला वापरले जाणारे ड्रग-कोटेड बलून्स निश्चित ठिकाणाला लक्ष्य करणारी उपचारपद्धती पुरवितात. यामुळे कायमस्वरूपी इम्प्लान्ट बसविण्याची गरज भासत नाही व रिस्टेनोसिसला रोखता येते. त्याशिवाय ही प्रक्रिया अत्यंत सुरक्षित आहे, ज्यात लेझरवर अतिशय काटेकोरपणे नियंत्रण ठेवता येणे शक्य असते. तसेच ‘स्टेन्ट-ब्लॉकेज’ असलेल्या रुग्णांसाठीच सुद्धा ही प्रक्रिया एक उत्कृष्ट पर्याय आहे, कारण लेझर थेरपीमुळे आणखी एक स्टेन्ट बसविल्याशिवाय देखील अडथळा दूर करता येणे शक्य होते.

असे अनेक फायदे असल्याने लेझर-असिस्टेड, स्टेन्ट विरहित अँजिओप्लास्टी भविष्यात एक सर्रास केली जाणारी प्रक्रिया बनेल व अनेक रुग्णांच्या बाबतीत पारंपरिक अँजिओप्लास्टीची जागा घेऊ शकेल अशी अपेक्षा आहे. ही प्रक्रिया केवळ कोरोनरी आर्टरी डिसीजेससाठीच नव्हे तर जिथे स्टेन्स्ट फारसे परिणामकारक ठरत नाही अशा तुलनेने छोट्या रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेजेसवर उपाय करण्यासाठीही एक उपयुक्त पर्याय ठरू शकते.

एक नवी वाट निर्माण करणारी ही प्रक्रिया अँजिओप्लास्टीच्या उपचारांची संकल्पनाच बदलून टाकणारी आहे. कायमस्वरूपी स्टेन्ट्स बसविण्याविषयी साशंक असणाऱ्या रुग्णांना किंवा गुंतागुंतीचे कॅल्शियमयुक्त ब्लॉकेजेस असलेल्या रुग्णांना आता अधिक चांगल्या परिणामांची व धोका कमी करण्याची हमी देणारा पर्याय यामुळे उपलब्ध झाला आहे. पुण्यातील पहिल्या लेझर-असिस्टेटस्टेन्ट विरहित अँजिओप्लास्टीला मिळालेले यश कार्डिअॅक उपचारांच्या एका नव्या युगाच्या आरंभाचा संकेत आहे. भविष्यात या पद्धतीचा सर्वदूर स्वीकार होईल, अशी आपली अपेक्षा आहे.” डॉ. पळशीकर पुढे म्हणाले.

सह्याद्रि हॉस्पिटल असाधारण कार्डिअॅक उपचारांसाठी व रुग्णांना सर्वोत्तम परिणाम मिळवून देण्याऱ्या  नवीनतम वैद्यकीय तंत्रज्ञानांना उपचारांत समाविष्ट करून घेण्यासाठी आणि त्यायोगे जपलेल्या रुग्ण बांधिलकीसाठी प्रख्यात आहे.