Home Blog Page 460

प्रगत एरोस्पेस उत्पादनासाठी भारत फोर्ज आणि लिब्हेर आले एकत्र

बंगळुरू (भारत), 13 फेब्रुवारी 2025 – एरो इंडिया 2025 दरम्यान, भारत फोर्ज आणि लिब्हेर यांनी जागतिक एरोस्पेस उद्योगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पादन प्रकल्प स्थापन करण्याच्या भागीदारीची घोषणा केली. या धोरणात्मक भागीदारीअंतर्गत, भारत फोर्ज आपल्या पुणे (भारत) मुख्यालयात अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प उभारणार असून, ती 2025 मध्ये कार्यान्वित होण्याची योजना आहे.

नवीन प्रकल्प अत्याधुनिक फोर्जिंग आणि मशिनिंग तंत्रज्ञानासह रिंग मिल असणार आहे, ज्याद्वारे लँडिंग गीयर घटकांसह उच्च-प्रेसिजन घटकांचे उत्पादन केले जाईल.

भारत फोर्ज लिमिटेडच्या नेतृत्वाखालील ही गुंतवणूक, लिब्हेर आणि त्याच्या जागतिक ग्राहकांसाठी उच्च दर्जाच्या समाधानांची पूर्तता करण्याच्या कंपनीच्या वचनबद्धतेला अधोरेखित करते.

भारत फोर्ज लिमिटेडचे एरोस्पेस सीईओ गुरू बिस्वाल म्हणाले कीलिब्हेरसोबतचे हे सहकार्य एरोस्पेस उत्पादन क्षेत्रातील नवकल्पना आणि उत्कृष्टतेबाबत आमच्या सामा वचनबद्धतेचा पुरावा आहेरिंग मिल आणि लँडिंग गीयर शिनिंग क्षमतांमधील आमच्या गुंतवणुकीमुळेअचूक अभियांत्रिकी घटक प्रदान करण्यावर आणि एरोस्पेस उद्योगासाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करण्यावर आमचा भर असल्याचे स्पष्ट होते.”

लिब्हेरएरोस्पेस अँड ट्रान्सपोर्टेशन एसएएसचे चीफ कस्टमर ऑफिसर ॅलेक्स व्हिलँडर यांनी सांगितले कीही अत्याधुनिक प्रकल्प स्थापन करण्यासाठी भारत फोर्जसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहेया प्रगत तंत्रज्ञानांच्या एकत्रीकरणामुळे आम्हाला एरोस्पेस क्षेत्राच्या कठोर मानकांची पूर्तता करता येईल, तसेच आमची पुरवठा साखळी क्षमता मजबूत करता येईल.”

‘रणरागिणी ताराराणी’ रंगभूमीवर

महाराष्ट्राचा गौरवशाली ‘शिवइतिहास’ घडला तो सह्याद्रीच्या साक्षीने आणि कर्त्या व्यक्तींच्या असामान्य कर्तृत्वाने ! त्यात कर्त्या स्त्रियांचादेखील महत्त्वाचा सहभाग होता. अशाच स्त्रियांपैकी एक म्हणजे महाराणी ताराराणी! ‘स्वराज्याची वीरांगना, मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी’ असे ज्यांचे वर्णन केले गेले आहे, अशा महाराणी ताराराणींची गाथा आता मराठी रंगभूमीवर पहायला मिळणार आहे. आपल्या कर्तबगारीने मराठ्यांचे नेतृत्व करणाऱ्या रणरागिणी ताराराणी यांचा इतिहास भव्य नाट्यरूपाने उलगडण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ(ट्रस्ट) यांच्या सहयोगाने सरस्वती एज्युकेशन सोसायटीने पुढाकार घेतला आहे. 

युवराज पाटील लिखित आणि विजय राणे दिग्दर्शित रणरागिणी ताराराणी या नाटकाचा शुभारंभ येत्या १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या मुहूर्तावर श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर येथे होणार आहे. चंद्रकांत सावंत हे या नाटकाचे मार्गदर्शक तर ब्रिगेडियर सुधीर सावंत हे रणरागिणी ताराराणी नाट्यनिर्मितीचे संकल्पक आहेत.  

“ताराराणींचा इतिहास हा जनसामान्यांपासून दुर्लक्षित राहिला आहे. त्यांचा प्रचंड पराक्रम नव्या पिढीपर्यंत येणे गरजेचे आहे. आपला देदीप्यमान इतिहास जगभरात पोहचावा; या उद्देशाने आम्ही या नाटकाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे,” असे सरस्वती एज्युकेशन सोसायटी व श्री शिवाजी स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सांगितले. मराठेशाहीचे स्थैर्य आणि छत्रपती ताराराणी यांनी समर्थपणे राखलेली मराठेशाहीची गादी यावर आधारित असलेल्या रणरागिणी ताराराणी या नाटकात ५० कलाकारांची फ़ौज असणार आहे.

“नाटकात काम करायचं, या डेडिकेशनने नाटकातल्या प्रत्येक कलाकाराने आपली भूमिका प्रामाणिकपणे केली आहे. रंगमंचावर या नाटकाच्या निमित्ताने एक वेगळा देखणा प्रयोग पहायला मिळणार आहे. जो रसिकांना वेगळा आनंद देईल,” असा विश्वास दिग्दर्शक विजय राणे यांनी व्यक्त केला.

“ऐतिहासिक संदर्भ घेत हा प्रेरणादायी लढा रसिकांसमोर आणण्याचा प्रयत्न आम्ही केला असून त्याला नाट्यरसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभेल,” असा विश्वास लेखक युवराज पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

तनीषा वर्दे (ताराराणी), कृष्णा राजशेखर (येसूबाई), सिद्धी घैसास (जानकी), चेतन म्हस्के (शंभूराजे), अरुण पंदरकर (राजाराम), उमेश ठाकूर (संताजी/रामाजी/ मिरखान), ऋषिकेश जोशी (धनाजी), सुनील गोडसे (औरंगजेब), मोहिका गद्रे (चेन्नमा/झीनत), मुकुल देशमुख (जुल्फीकार) आदि कलाकारांच्या रणरागिणी ताराराणी या नाटकात भूमिका आहेत. श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट) यांच्या सहयोगाने सरस्वती एज्युकेशन सोसायटी निर्मित,अद्वैत थिएटर्स प्रकाशित रणरागिणी ताराराणी नाटकाचे व्यवस्थापन हरी पाटणकर सांभाळत आहेत.

श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ(ट्रस्ट) मुंबई ही संस्था गेली ८२ वर्ष शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक,आरोग्य अशा  विविध क्षेत्रात लक्षवेधी कार्य करीत आहे. या संस्थेतर्फे दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदाच्या शिवजयंतीला रणरागिणी ताराराणी या नाटकाच्या  शुभारंभाचा प्रयोग श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह, येथे दुपारी ३.३० वा. रंगणार आहे.

“समाजसेवकांचे कार्य दीपस्तंभासारखे” – डॉ. माधवी वैद्य

पुणे: “कथा, कादंबऱ्या आणि कवितांमध्ये दुःख व्यक्त करता येते, पण तुम्ही जे दुःख जगता, ते वेगळेच असते. शोषित, पीडित आणि दुःखी व्यक्तींसाठी अहोरात्र झटणाऱ्या समाजसेवकांचे कार्य दीपस्तंभासारखे आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका डॉ. माधवी वैद्य यांनी केले.

मानव्य संस्थेच्या संस्थापिका कर्मयोगिनी कै. विजयाताई लवाटे यांच्या २०व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्यात ‘कर्मयोगिनी कै. विजयाताई लवाटे पुरस्कार’ डॉ. इरा शहा (एम.डी. पेडियाट्रिक्स) आणि ‘कै. डॉ. अरुंधती सरदेसाई स्मृती पुरस्कार’ स्वयंप्रेरित संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांना प्रदान करण्यात आला. भांडारकर इन्स्टिट्यूटमधील नवलमल फिरोदिया सभागृहात मंगळवारी झालेल्या या कार्यक्रमात डॉ. माधवी वैद्य यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

कर्मयोगिनी कै. विजयाताई लवाटे पुरस्काराच्या विजेत्यांना रुपये १५,००० रोख, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ, तर कै. डॉ. अरुंधती सरदेसाई स्मृती पुरस्कारासाठी रुपये १०,००० रोख, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. यंदा कै. डॉ. अरुंधती सरदेसाई स्मृती पुरस्काराचे पहिले वर्ष होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानव्य संस्थेचे अध्यक्ष शिरीष लवाटे होते. यावेळी संस्थेचे विश्वस्त डॉ. गिरीश कुलकर्णी, विनया देसाई आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. माधवी वैद्य म्हणाल्या, “दुसऱ्याच्या दुःखाचा शोध घेऊन त्यांच्या आयुष्यासाठी कार्य करणे हे सोपे काम नाही. स्वतःच्या अस्तित्वाचा विसर पाडून तुम्ही समाजसेवेत झोकून देता, ही बाब प्रेरणादायी आहे. आमच्यात दुसऱ्याच्या दुःखात आनंद शोधण्याची क्षमता नाही; आम्ही फक्त संवेदना व्यक्त करू शकतो. विजयाताईंच्या कार्यातून माणसांमधील देवत्व पाहण्याची दृष्टी मिळते. त्यामुळे समाजाने त्यांच्या कार्याला हातभार लावला पाहिजे.”

सत्काराला उत्तर देताना डॉ. इरा शहा म्हणाल्या, “जीवन आनंदाने जगावे. भविष्याची चिंता करत राहिल्यास वर्तमानाचा आनंद घेता येत नाही. २००१ मध्ये मी वैद्यकीय क्षेत्रात कार्य सुरू केले. एड्सबाबत जनजागृती नव्हती, औषधे नव्हती, पण आज संशोधनामुळे हा आजार नियंत्रणात आला आहे. मात्र, समाज आजही एड्सग्रस्तांना स्वीकारायला तयार नाही, ही खंत आहे.”

संतोष पवार यांनी सांगितले, “हा पुरस्कार माझ्या कार्याला आणि संस्थेला मिळालेला सन्मान आहे. यामुळे आमच्या कार्याला नवे बळ मिळेल. स्वयंप्रेरित संस्थेच्या माध्यमातून आम्ही गेली २५ वर्षे एड्सग्रस्त व गरजू विद्यार्थ्यांच्या पुनर्वसनासाठी झटत आहोत. या प्रवासात अनेक अडचणी आल्या, पण समाजाच्या पाठिंब्यामुळे आम्ही पुढे जात आहोत.”

डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले, “विजयाताईंच्या कार्यामुळे आम्हाला नवी चेतना मिळते. मानव्य आणि स्नेहालय संस्था त्यांच्याच प्रेरणेने कार्यरत आहेत. त्यांच्या स्वप्नातील कार्य पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

अध्यक्षीय भाषणात शिरीष लवाटे म्हणाले, “मानव्य संस्थेच्या माध्यमातून मुलांसाठी आणि महिलांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. ‘माहेरवासिमाहेरवाशीणीनी’साठी ‘नवांकुर’ उपक्रम सुरू केला जाणार आहे.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनया देसाई यांनी केले, तर आभार प्रदर्शन ढवळे यांनी केले.

पुरस्कार विजेते आणि त्यांचे कार्य डॉ. इरा शहा – बी.जे. वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रन, मुंबई येथे बाल संसर्गजन्य आजार आणि यकृत-गॅस्ट्रो विभागाच्या प्रमुख, तसेच नानावटी हॉस्पिटलमध्ये सल्लागार.

संतोष पवार – संगमनेर येथे स्वयंप्रेरित संस्था स्थापन करून गरीब, गरजू व एचआयव्ही संसर्गित विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व पुनर्वसन कार्य. ते व त्यांच्या पत्नीने गेली २५ वर्षे शाळेत राहून विद्यार्थ्यांच्या आरोग्य व शिक्षणाची जबाबदारी सांभाळली.

वातावरणातील आर्द्रतेपासून पाणी तयार करण्यासाठी आयसीआयसीआय बँकेने युनिट्स बसवले

·         दररोज 8,000 लीटर पिण्यायोग्य पाणी निर्मितीची या युनिट्सची उत्पादन क्षमता आहे

·         या उपक्रमाचा लाभ बेंगळुरूचेन्नईहैदराबाद आणि मुंबई येथील 4,200 कर्मचाऱ्यांना होतो

मुंबई: आयसीआयसीआय बँकेने आपल्या उपक्रमांची शाश्वतता वाढविण्याच्या दृष्टीने वातावरणातील आर्द्रतेपासून पिण्याचे पाणी तयार करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची घोषणा केली आहे. वातावरणातील आर्द्रतेपासून दररोज 8,000 लीटर पिण्यायोग्य पाणी तयार करण्यासाठी बँकेने युनिट्स स्थापित केली आहेत, ज्यामुळे बेंगळुरू, हैदराबाद आणि मुंबईतील प्रत्येकी एक आणि चेन्नईमध्ये दोन अशा पाच कार्यालयांतील 4,200 कर्मचाऱ्यांना फायदा झाला.

वातावरणातील आर्द्रतेचे रूपांतर 100% सूक्ष्मजंतूमुक्त, ताजे आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्यात करण्यासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करणारे हे युनिट ॲटमॉस्फेरिक वॉटर जनरेटर (AWGs) म्हणून ओळखले जातात. द्रवीभवनाने पाण्याच्या वाफेचे थेंबांमध्ये रूपांतर होते, आणि त्यानंतर शुद्धतेसाठी त्यांना अनेक चाचण्यांमधून जावे लागते. प्रक्रियेच्या शेवटी आवश्यक मिनरल्स त्यात जोडली जातात. AWGs संपूर्ण वर्षभर पाणी तयार करू शकतात कारण ते सभोवतालचे तापमान (18°C- 45°C) आणि सापेक्ष आर्द्रता (25%-100%) मध्ये कार्य करू शकतात.

आयसीआयसीआय बँकेचे ग्रुप चीफ ह्युमन रिसोर्सेस ऑफिसर श्री. सौमेंद्र मट्टागजसिंग म्हणाले, “आम्ही आमचा व्यवसाय शाश्वत उपाय आणि जबाबदारीने पार पाडण्यासाठी तसेच आमच्या कामकाजामुळे पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी वचनबद्ध आहोत. वातावरण आणि पर्यावरण संवर्धनासाठी आमची रणनीती पर्यावरणीय कारभाराच्या 4R (रिड्युसरियूजरिसायकल आणि रिस्पॉन्सिबल डिस्पोजल) या तत्त्वानुसार आहे. वातावरणातील आर्द्रता ही पृथ्वीवरील सर्व नद्यांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर ताज्या पाण्याचा सोर्स आहे. या नूतनीकरणीय साधनाचा लाभ घेण्यासाठीपाण्याची वाफ पिण्याच्या पाण्यात रूपांतरित करण्यासाठी आम्ही आमच्या कार्यालयात AWG स्थापित केली आहे. या उपक्रमामुळे वातावरणातील ओलाव्याचा चांगला वापर करण्याबरोबरच पॅकेज्ड  पाण्यावरील आपले अवलंबित्व कमी होते.”

ESG धोरणाच्या अंतर्गत ICICI बँक शाश्वततेसाठी उपक्रम राबवत आहे. बँकेने आर्थिक वर्ष 2032 पर्यंत स्कोप 1 आणि स्कोप 2 उत्सर्जनामध्ये कार्बन न्यूट्रल होण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 4.95 दशलक्ष चौरस फुटांवर व्यापलेल्या बँकेच्या 180 हून अधिक साइट्स इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (IGBC) प्रमाणित (31 मार्च 2024 पर्यंत) आहेत. बांद्रा – कुर्ला कॉम्प्लेक्स येथील बँकेचे सर्व्हिस सेंटर आर्थिक वर्ष 2024 मध्ये ‘नेट झिरो वेस्ट’ प्रमाणित म्हणून घोषित करण्यात आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत बँकेने आर्थिक वर्ष 2024 मध्ये तिचा अक्षय्य ऊर्जा वापर 75.73 दशलक्ष kWh एवढा चौपट केला. आर्थिक वर्ष 2022 पासून 3.7 दशलक्ष झाडे लावली आणि शाळा आणि जलकुंभांमध्ये दरवर्षी 25.8 अब्ज लीटर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण केली.

* स्कोप 1 उत्सर्जन हे थेट हरितगृह (GHG) उत्सर्जन आहे जे एखाद्या संस्थेच्या मालकीच्या किंवा नियंत्रित स्त्रोतांमधून होते.

* स्कोप 2 उत्सर्जन हे अप्रत्यक्ष GHG उत्सर्जन आहे जे वीज, स्टीम, उष्णता किंवा शीतलक खरेदीशी संबंधित आहे.

आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग शिअरफोर्स शुक्रवारपासून 

विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर तर्फे आयोजन

पुणे: विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग शिअरफोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पोर्ट्स लीगमध्ये फुटबॉल, बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉल स्पर्धा होणार आहेत. वानवडी येथील एस.आर.पी. एफ. मैदानावर दिनांक १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धा होणार आहेत, अशी माहिती विवेकानंद  इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे सचिव जितेंद्र पितळीया आणि प्राचार्य प्रसन्न देसाई यांनी दिली.

यावेळी अध्यक्ष अभय छाजेड, क्रीडा संघ सदस्य समीक्षा वानवे, सनी गुंजाळ, ऋचा बाणकर, पायल जयस्वाल, प्रथम चांडक, कार्तिक हादके, नमन पारेख, आदित्य पवार, कर्ण तोरस्कर, कविता ताजने उपस्थित होते.

बास्केटबॉल, फुटबॉल आणि व्हॉलीबॉल या स्पर्धांमध्ये १८ ते २३ या वयोगटातील सुमारे ६०० पेक्षा अधिक विद्यार्थी खेळाडू खेळणार आहेत. यामध्ये मुलांचे आणि मुलींचे एकूण ४३ संघ सहभागी होतील. स्पर्धेचे उद्घाटन १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता होणार आहे आणि पारितोषिक वितरण समारंभ दिनांक १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

स्पर्धेमध्ये पुण्यातील १४ वास्तुकला महाविद्यालयातील संघाचा समावेश आहे. यामध्ये  मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (एम.एम. सी. ओ. ए.) , डाॅ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील  स्कूल ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी (डी. वाय. पी. सी. ओ. ए.), डाॅ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, लोहेगाव (डी. वाय. पी. सी. ओ. ए.), भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (बी. एन. सी. ए.), अलाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (ए. सी. ओ. ए.),  डाॅ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (डी. वाय. पी. सी. ओ. ए.), ब्रिक स्कूल ऑफ  आर्किटेक्चर (बी. एस. ओ. ए.), आयोजन स्कूल ऑफ डीझाईन (ए. एस. ए. डी.) , भारती विद्यापीठ डीम्ड युनीव्हर्सिटी  कॉलेज ऑफ  आर्किटेक्चर (बी. व्ही. डी. यू.), सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (एस. सी. ओ. ए.),एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर पिंपरी चिंचवड (एस.बी.पी. सी.ओ.ए.),मराठवाडा मित्र मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ एन्विरॉन्मेंटल डिझाईन,डी.वाय.पी.सी.ई.टी. कोल्हापूर,श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर,पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (पी. व्ही.पी. सी. ओ. ए.)आदी महाविद्यालये स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

मायरा मुतगीने एकल नृत्यामध्ये पटकावला प्रथम क्रमांक

पुणे:  अनास इंडिया द्वारे आयोजित अखिल भारतीय १६ व्या राष्ट्रीय सांस्कृतिक नृत्य स्पर्धेत नृत्य दर्पण या नृत्य प्रकारात ध्रुव ग्लोबल स्कूलची पाचवी ची विद्यार्थीनी मायरा मुतागीने प्रथम क्रमांक पटकावला.
या यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी व प्रिन्सिपल संगीता राउत यांनी भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्यात.
मायराच्या पायातील घंगरुचा आवाज आणि चेहर्‍यावरील सुंदर स्मित हास्याने उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला. नृत्यांगणा मायराचे घुंगरू आणि स्मित हास्य दोन्ही एकाच सुरात डोलत होते. ती आपल्या नृत्यातून सुंदर झंकार निर्माण करीत होती. सूर, लय, वेग, मुद्रा प्रत्येक अभिव्यक्तीमध्ये तीची एक लय होती. उत्कृष्ट सादरीकरणाबरोबरच तीचे नृत्य एक अदभूत संयोजन आणि अभिव्यक्ती असून याच जोरावर तीने प्रथम क्रमांक पटकाविला. मायरा मुतागीने भारतीय शास्त्रीय ओडिसी नृत्य प्रकारातील कनिष्ठ वयोगटातील एकल नृत्यात भाग घेऊन प्रथम क्रमांक पटकावला. तसेच तिला सत्रातील सर्वोत्कृष्ट कलाकार म्हणूनही गौरविण्यात आले.
तीने शुभश्री राऊतराय यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्याची तयारी केली होती.

लोकसंस्कृतीमध्ये तमाशाचे महत्व या विषयावर रंगला परिसंवाद.

0

श्री. छ. शाहु कला मंदिर येथे रसिकांची मोठी गर्दी

सातारा- आजच्या आधुनिक युगात देखील ढोलकी फडाचा तमाशा लोकांचे रंजन आणि उद्बोधन घडवीत आहे ढोलकी हलगीची सलामी, गाणं, मुजरा, गवळण, रंगबाजी, फारसा, वग हा तमाशाचा अविष्कार आजही कायम आहे लोकसंस्कृतीमध्ये तमाशा सारख्या रंजनपर लोककलेचे महत्व आढळ ध्रुव पदासारखे आहे. असे मत लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर प्रकाश खांडगे यांनी सातारा येथील ढोलकी फडाच्या तमाशा महोत्सवात नोंदविले.

सातारा येथील श्री. छ.शाहु कला मंदिर येथे दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित “लोकसंस्कृतीमध्ये तमाशा कलेचे महत्व”या लोककला परिसंवादानिमित्ताने राज्य सरकारने चर्चा घडवून आणली.
सदर परिसंवाद लोककलेचे जेष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी लोकसाहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, लोककलेचे मार्गदर्शक आणि मंत्रालयाचे जेष्ठ पत्रकार खंडूराज गायकवाड यांनी सहभाग घेतला होता.
महाराष्ट्र शासनाने बहुजनांच्या या कलेची दखल घेतली आणि त्यासाठी मला योगदान देता आले हे अभिमानाची गोष्ट आहे. लोककलावंतांचे सर्व्हेक्षण सरकारने तातडीने करावा. अन त्यांना कलावंत म्हणून ओळखपत्र दयावे . असे विचार ज्येष्ठ पत्रकार आणि लोककलेचे अभ्यासक मंत्रालयातील जेष्ठ पत्रकार खंडूराज गायकवाड यांनी व्यक्त केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होत असताना ग्रामीण साहित्य, लोकसाहित्य आणि लोककला यांचे योगदान मराठी भाषेच्या जडणघडणीत नजरेआड करून चालणार नाही, असे मत तमाशा आणि लोककलेचे अभ्यासक प्रभाकर होवाळ यांनी व्यक्त केले.

पोलीस स्फुर्तीसाठी तरंग-२०२५ हा मनोरंजनपर कार्यक्रम

पुणे- दगदगीच्या आणि धावपळीच्या आयुष्यातून विरंगुळा म्हणून किंवा थोडे थांबून पुन्हा स्फूर्ती मिळावी म्हणून पोलिसांसाठी पुनीत बालन ग्रुप ने तरंग-२०२५ हा मनोरंजनपर कार्यक्रम आयोजित केला आहे.

पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार हे सतत विविध बंदोबस्त, निवडणुका, मोर्चे, अधिवेशन, इ. कर्तव्यावर तैनात असल्याने पोलीस अधिकारी/अंमलदार समवेत त्यांचे कुटूंबिय देखील ताणतणावामध्ये असतात मागील २०२४ हे वर्षे लोकसभा/विधानसभा निवडणुका विविध महत्वाचे बंदोबस्त, व्हिव्हिआयपी दौरे यामध्ये व्यस्त गेल्याने पोलीस अधिकारी व अंमलदार यांना त्यांच्या कुटुंबियासोबत आनंदाचे क्षण व्यतित करता यावेत व उत्साहाचे वातावरण मिळावे यासाठी पोलीस आयुक्त पुणे शहर यांचे संकल्पनेतुन तरंग-२०२५ हा मनोरंजनपर कार्यक्रम दि.१५/०२/२०२५ रोजी सांय.०५/३० ते १०/०० वा.चे पर्यत पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पुणे येथे आयोजित करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमाचे प्रायोजक पुनित बालन (पुनित बालन ग्रुप) हे आहेत.

तरंग-२०२५ या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजितदादा पवार, केंद्रीय राज्यमंत्री, सहकार व नागरी विमान वाहतूक,मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, माधुरी मिसाळ,इतर मान्यवर उपस्थित राहणार असुन सदर कार्यक्रमांतर्गत ‘अजय अतुल लाईव्ह’ संगीत रजनी हा मनोरंजनपर कार्यक्रम ठेवण्यात आलेला असुन बॉलिवुड व मराठी सिने सृष्टीतील कलाकार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास पुणे शहरातील सर्व शांतता कमिटी / मोहल्ला कमिटी सदस्य व इतर महत्वाचे व्यक्ती तसेच सर्व प्रिंट व इलेक्ट्रानिक मिडीयाचे संपादक व प्रतिनिधी यांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे.

खासदार सुनेत्रा पवार यांनी तीन हजार महिलांना उपलब्ध करून दिला रोजगार

0

मुंबई- महिला सक्षमीकरनासाठी एक पाऊल पुढे टाकत राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा अजितदादा पवार यांनी जवळपास तीन हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
आठ मार्च हा ‘जागतिक महिला दिन’ लवकरच जगभर साजरा केला जाईल मोठ्या मोठ्या भाषणात आणि लेखात महिला सक्षमीकरणाबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातील पण एक महिला महिलांसाठी काय करू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे बारामती हाय-टेक्सटाईल्स पार्क असल्याचा दावा करण्यात येतो आहे राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागांअंतर्गत असलेल्या उमेद या कार्यालयामार्फत बांद्रा कुर्ला कॉम्लेक्स येथील एमएमआरडीए मैदानावर महालक्ष्मी सरस या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

खासदार सुनेत्रा पवार म्हणाल्या कि,’ या प्रदर्शनात बारामती हाय-टेक्सटाईल्स या कंपनीचा माहिती देणारा स्टॉल लावण्यात आला आहे या स्टॉल ला भेट दिली त्यावेळी महिलांना रोजगार देण्याबाबत सुरु असलेल्या या कामाची व्याप्ती समजली.

महिलांना कायम रोजगार मिळावा त्यांच्या हाताला काम मिळावे या हेतूने बारामतीत आपल्या माध्यमातून जवळपास मागील पंधरा वर्षापासून विविध कामे सुरु आहेत. बारामती येथील एमआयडीसी मध्ये हजारो महिलांना प्राधान्याने काम दिली जात आहेत.याच भागात मागील पंधरा वर्षांपूर्वी बारामती हाय-टेक्सटाईल्स लिमिटेड हा प्रकल्प केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या एस.आय.टि.पी योजनेअंतर्गत विकसित करण्यात आला आहे. या प्रकल्पात गारमेंट्स’ची सोळा युनिट चालू करण्यात आलेली आहेत यामध्ये प्रसिद्ध कॉटन किंग तसेच पेपरमिंट अशा अनेक नामाकिंत कंपन्यांचा समावेश आहे.

ग्रामीण भागातील जवळपास तीन हजारापेक्षा जास्तीच्या महिलांना या पार्क मधील विविध कंपन्यातुन रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आणि या सर्व कंपन्याच्या माध्यमातून जवळपास प्रत्यक्ष अप्रतेक्ष असा पाच हजार महिलांना कायमचा रोजगार उपलब्ध झाला आहे. महिला सक्षमीकरणसाठी खऱ्या अर्थाने उचलले हे एक पाऊल असल्याचे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.

महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आदरणीय वाहिनी नेहमीच अग्रेसर असतात. महिलांच्या उपजत गुणांना वाव दिला तर कोणतीही महिला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होते या विश्वासाने अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. महिलांच्या हाताला काम दिले तर उत्कृष्ट निर्मिती होऊ शकते या विश्वासाने बारामती या टेक्स्टाईल्स कंपन्यांनी दाखवून दिले आहे. आज अनके नामांकित कंपन्यांमध्ये महिलांना काम दिले जात आहे त्यांच्या राहत्या गावापासून कारखाण्यापर्यंत सुरक्षित ने आण करण्याची जबाबदारी देखील या कंपंन्यांवर देण्यात आली आहे. गावाजवळ रोजगार मिळाल्याने महिला आर्थिक स्वावलंबी बनल्या आहेत.निसर्ग संवर्धन आणि त्याबाबत जनजागृती करण्याच्या उदात्त हेतूने आदरणीय वहिनींच्या मार्गदर्शनाखाली एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया हि सामाजिक संस्था देखील चालवली जाते. ज्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात.वृक्षलागवड हा त्यातील प्रमुख उपक्रम आहे. काटेवाडी हे गाव ग्रामस्वच्छता अभियानात प्रथम क्रमांकावर आहे तसेच हे गाव निसर्ग संवर्धनासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वृक्ष प्रेम संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. बारामती आणि आजूबाजूची गावे झाडांनी हिरवीगर्द झाली आहेत याचे श्रेय देखील सुनेत्रावहिणी यांनाच जाते.केवळ रोजगार निर्मितीत नाही तर आरोग्य क्षेत्रात देखील हजारो लोकांच्या डोळ्यांची मोफत शस्त्रक्रिया बारामती करण्यात आल्या आहेत. मात्र या सर्व प्रसिद्धी पासून दूर राहून अनेक लोक उपयोगी जनसेवेसाठी अखंड काम वहिनींच्या माध्यमातून सुरुच आहेत. यातील अनेक कामे वाखाणण्याजोगी आहेत.समाजातील प्रत्येक महिला स्वावलंबी सुरक्षित आणि रोजगारक्षम झाली पाहिजे यासाठी खासदार सुनेत्रा वाहिनी पवार यांनी सुरु केलेले हे काम राज्यासाठी दिशादर्शक आणि महिला सक्षमीकरणासाठी पुढचे पाऊल ठरेल असा विश्वास आहे.

सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

पुणे, १२ फेब्रुवारी: पुण्यातील लोकप्रिय युवा सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने १५ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत “सुपर सनी विक” या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना सोमेश्वर फाउंडेशनचे आणि या स्पर्धांचे मुख्य समन्वयक प्रताप जाधव यांनी सांगितले की गुणवान व उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमीत्त या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. व्यसनमुक्तीचा संदेश समाजामध्ये देण्यासाठी, तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण करणे या उद्देशाने या स्पर्धा होणार असल्याचे समन्वयक उमेश वाघ यांनी सांगितले.
या सप्ताहात पुणे व पिंपरी चिंचवड शहरास जोडणारी, व्यसनमुक्तीचा संदेश देणारी पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन, रन फॉर अमृतकाल स्पर्धेचे आयोजन पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक संघटनेच्या मान्यतेने व सहकार्याने रविवार, २३ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. शिक्षणाचे माहेर घर असलेले पुणे शहर व औद्योगिक क्रांतीचे प्रतिनिधित्व करणारे पिंपरी चिंचवड यांच्यातील सहकार्य व सामंजस्यचा दुवा दर्शवणारी ही स्पर्धा असेल.
ही मॅरेथॉन स्पर्धा २१ किमी, १० किमी, ५ किमी आणि ३ किमी प्रकारात होणार आहे. महाळुंगे – बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलमध्ये पहाटे ५ वाजता सुरू होणाऱ्या या स्पर्धेमध्ये २५,००० हुन अधिक धावपटूंनी आपला सहभाग निश्चित केला आहे. या मॅरेथॉन मधील सर्व सहभागी धावपटूंना टी शर्ट, गुडी बॅग, पदक, ई टायमिंग प्रशस्तिपत्रक, वैद्यकीय सुविधा विनामूल्य देण्यात येणार आहेत. तसेच या स्पर्धेसाठी ५,५५,५५५ रुपयांची पारितोषिक देण्यात येताल. या स्पर्धेची तांत्रिक नियोजन यश रायकर पाहणार आहेत. इच्छुक स्पर्धकांना या स्पर्धेची नांव नोंदणी दि. १४ फेब्रुवारीपर्यंत www.sunnynimhan.com या संकेतस्थळावर करता येईल.
आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक मा. देविदास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय १४ वर्षाखालील मुले आणि मुलींसाठी आंतर शालेय निमंत्रित व्हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. डेक्कन जिमखाना मैदानावर ही स्पर्धा शनिवार, १५ फेब्रुवारी आणि रविवार १६ फेब्रुवारी रोजी रंगणार आहे. युवा खेळाडूंना प्रोत्सहण देण्याच्या सनी विनायक निम्हण यांच्या धोरणानुसार होणा-या या स्पर्धेत एकूण ७०,५५५ रुपयांची बक्षिसे, प्रशिस्तपत्र आणि विजेत्यांना चषक देण्यात येणार आहेत. यामध्ये प्रत्येक सामना जिंकणा-या संघास रुपये १००० आणि हरणा-या संघास रुपये ५०० रुपये उत्तेजनार्थ देण्यात येणार असून या स्पर्धेचे हे आकर्षण ठरले आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहेत.

स्केटिंग अस्सोसिएशन पुणे यांच्या मान्यतेने व सहकार्याने रविवार, १६ फेब्रुवारी रोजी हॉटेल शिवांजली पाषाण समोरील रोड, सूस येथे रोलर स्केटिंग च्या रोड रेस स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धांचे आयोजन जिल्हा असोसिएशनचे सचिव मा. अशोक गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून ह्या स्पर्धा ६ वर्षाखालील , ६ ते ८ वर्षे, ८ ते १० वर्षे , १० ते १२ वर्षे , १२ ते १४ वर्षे व १४ वर्षावरील मुले आणि मुलींसाठी घेण्यात येणार आहेत. क्वाड , इनलाइन , रेक्रिएशनल इनलाईन ह्या प्रकारात ह्या स्पर्धा घेण्यात येतील. तसेच विशेष मुले आणि मुलींसाठी विशेष वेगळी स्पर्धा घेण्यात असल्याची माहीती समन्वयक उमेश वाघ यांनी दिली.
विनर्स कराटे असोसिएशनच्या मान्यतेने व सहकार्याने राज्यस्तरीय कराटे चँम्पियनशिप २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यभरातील सुमारे ४०० कराटेपट्टूंनी आपला सहभाग निश्चित केला असल्याची माहिती सेनसेई संतोष पवार यांनी दिली. मुले व मुलींसाठी या स्पर्धा २३ फेब्रुवारी रोजी लाईफ स्पोर्टस्, सोमेश्वर वाडी येथे होणार आहेत. या स्पर्धा ६, ८, १०, १२, १४ वर्षाखालील आणि १४ वर्षावरील मुले व मुलींसाठी होतील.
सोमेश्वर चषक २०२५ बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन १५ आणि १६ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. द लाईफ स्पोर्टस्, सोमेश्वर वाडी, पाषाण येथे या स्पर्धा ११, १३, १५, १७ वर्षे वयोगटात मुले आणि मुलींसाठी होतील. तर वरीष्ठ गटात पुरुष व महिलांसाठी दुहेरीच्या स्पर्धा रंगणार आहेत. मंत्रेशी सागर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा होत असून विजेत्यांना रोख पारितोषीकांसह सर्व सहभागी खेळाडूंना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहेत.
याशिवाय स्वच्छ भारत या विषयावर १५ आणि १६ फेब्रुवारी रोजी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आहे आहे. इयत्ता १ ली आणि २ री, इयत्ता ३री, ४थी आणि ५वी व इयत्ता ६ वी , ७वी आणि ८वी अशा तीन गटात ही स्पर्धा होणार आहे. मा. अमित मुरकुटे यांनी या स्पर्धेची जबाबदारी स्वीकारली असून एकाच वेळी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, बोपोडी, आनंदबन क्लब, औंध, कै. संजय निम्हण ग्राम संस्कृती उद्यान, पाषाण आणि राणी लक्ष्मी गार्डन, खडकी येथे चित्रकला स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत एकूण ३५०० विद्यार्थ्यांनी सहभाग निश्चित केला असून प्रत्येक स्पर्धकाला प्रशस्तीपत्र, मेडल देण्यात येणार आहेत तर विजेत्यांना विविध स्वरुपात बक्षिसे देण्यात येतील.

मराठा उद्योजकांचे ‘बिझनेस कार्निव्हल २.०’ पुण्यात संपन्न

महाराष्ट्रातून ३०० हून अधिक उद्योजकांचा सहभाग ; मराठा आंत्रप्रेन्युअर्स असोसिएशनतर्फे आयोजन
पुणे : मराठा आंत्रप्रेन्युअर्स असोसिएशनतर्फे मराठा उद्योजकांचे ‘बिझनेस कार्निव्हल २.०’ चे आयोजन पुण्यातील हॉटेल शेरेटन ग्रँड येथे करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्रातील ३०० हून अधिक उद्योजकांनी सहभाग घेतला. व्यवसाय हा समाजामध्ये अमूलाग्र बदल घडवू शकतो, यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवे, ही धारणा ठेवून परिषदेचे आयोजन करण्यात आले.  

कार्यक्रमात यशस्वी व उल्लेखनीय कार्य केलेल्या उद्योजकांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण निम्हण,  भारती मुरकुटे, ऋतुजा मोरे, किशोर जगताप, गौरव मोरे, देवेंद्र कानवडे, रोहित माने, चैत्राली कोंढरे, रेश्मा थोपटे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात  ‘बिझनेस कार्निव्हल २.०’ च्या विषेशांकाचे प्रकाशन झाले.

बांधकाम, पायाभूत सुविधा, उत्पादन आणि शिक्षण व व्यावसायिक सेवा क्षेत्रातील दिग्गज सहभागी झाले होते. विविध क्षेत्रातील दिग्गज व नामवंत उद्योजकांना एकत्र आणून त्यांच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी. तसेच यातून देशांतर्गत व्यवसायवृद्धी व्हावी, हा यामागील उद्देश होता.

अरुण निम्हण म्हणाले, सन २०१४ साली या असोसिएशनची स्थापना झाली असून. देशाच्या विकासासाठी उद्योगांचा विकास होणे गरजेचे आहे, ही धारणा ठेवून हा एकत्रीकरणाचा प्रयत्न करण्यात आला आहे. मराठा समाजातील उद्योजकांनी इतर संस्थांसोबत संलग्न होत कशा प्रकारे व्यवसायवृद्धी करता येईल, हे पाहणे देखील गरजेचे आहे. व्यवसायात अनेक आव्हाने असून एकमेकांच्या सोबतीने पुढे जायला हवे, असेही त्यांनी सांगितले.

महिनाभरात ८ मृत्यू होऊनही राज्य सरकारला GBS आजाराचे गांर्भीय नाही: नाना पटोले

आणखी किती मृत्यू होण्याची वाट भाजपा सरकार पाहणार आहे?

मुंबई, दि. १२ फेब्रुवारी २५
राज्यात GBS चा पहिला रुग्ण सापडून एक महिना झाला आणि या एका महिन्यात या आजाराने ८ मृत्यू झाले आहेत. या आजाराचे रुग्ण आता मुंबईतही सापडू लागले आहे परंतु राज्य सरकार मात्र या आजाराकडे फारसे गांभिर्याने पहात असल्याचे दिसत नाही, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, जीबीएसचा पहिला रुग्ण ९ जानेवारीला पुण्यात सापडला आणि आतापर्यंत जवळपास १७० ते १७५ रुग्ण असल्याची माहिती मिळत आहे, यामध्ये १०० पेक्षा जास्त रुग्ण पुणे शहर, ग्रामीण तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात सापडले आहेत. यातील ५० रुग्ण आयसीयुमध्ये असल्याचे समजते. काल मुंबईत या आजाराने एकाचा मृत्यू झाला. जीबीएस रुग्णांसाठी सरकारी रुग्णालयात विशेष व्यवस्था करण्याच्या सुचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या पण त्याचे पुढे काय झाले? सरकारने यासाठी काही विशेष उपाय योजना केल्या आहेत का? जीबीएसच्या रुग्णाला द्यावे लागणाऱ्या एका इंजेक्शनची किंमत २० हजार रुपये आहे असे समजते. एवढ्या किंमतीचे इंजेक्शन सर्वसामान्यांना परवडणारे नाही. राज्य सरकारने त्यासाठी काही तरतूद केली आहे का? केवळ सूचना करून काही होणार नाही, ठोस पावले उचलावी लागतील, असे नाना पटोले म्हणाले.

जीबीएसमुळे पहिला मृत्यू झाला त्याचवेळी आम्ही सरकारला जागे केले होते पण सरकारला त्यांच्यातील अंतर्गत वादातून जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास फारसा वेळ आहे असे दिसत नाही. राज्याचा आरोग्य विभाग या आजाराला तोंड देण्यासाठी किती सक्षम आहे, काय उपाय योजना केल्या, खबरदारी काय घ्यावी यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांची जाहिराबाजी केली जाते पण जीबीएस सारख्या गंभीर आजाराच्या जनजागृतीसाठी व उपाय योजनांसाठी सरकार पैसा खर्च करत नसेल तर राज्याचे दुर्दैव आहे असेही नाना पटोले म्हणाले.

‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचा दिल्ली दौरा:राहुल गांधी यांची भेट घेतली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळवले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे अनेक नेते शिवसेनेच्या वाटेवर आहेत. काही पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. तर आगामी काळात सहा खासदार देखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या खासदारांनी एकत्र पत्रकार परिषद घेत या वृत्ताला नकार दिला होता. मात्र एकनाथ शिंदे यांच्या सत्कार समारंभाला उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांनी उपस्थिती लावल्याने याबाबतची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या वतीने आता ऑपरेशन टायगर राबवले जात असल्याची चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांचे पुत्र आमदार आदित्य ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. यादरम्यान त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची देखील भेट घेतली. तसेच ते आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांची देखील भेट घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दरम्यान आदित्य ठाकरे हे सर्व खासदारांची एकत्रित बैठक घेणार आहेत. ठकारे गटाच्या खासदारांचा शिंदे गटात प्रवेशात होणार या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानले जात आहे.

काँग्रेस व शिवसेनेच्या ठाकरे गटातील अनेक नेते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री मंत्री उदय सामंत यांनी केला होता. यासंबंधीचे ऑपरेशन टायगर लवकरच टप्प्याटप्याने राबवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले होते. त्यानंतर ही चर्चा सुरु झाली होती. या खासदारांनी एकत्र येत हे वृत्त फेटाळले देखील होते. मात्र, संजय दिना पाटील यांच्या शिंदेंच्या कार्यक्रमाच्या उपस्थितीवरुन ही चर्चा पुन्हा सुरु झाली. यात काही नावे प्रकाशात आली असून काही नावे अद्याप प्रकाशात आलेली नसल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला चांगले यश प्राप्त झाले आहे. मात्र, देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे पुढची पाच वर्षे सत्ताधारी पक्षात बसण्याची ठाकरे गटाच्या खासदारांची इच्छा आहे. मात्र, आता पक्ष फुटला तर पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. या कायद्यातून वाचायचे असेल तर सहा खासदारांचा आकडा महत्त्वाचा आहे. त्यामुळे सहा खासदारांचे मन वळवण्यात शिंदे गटाला यश आले असल्याचे बोलले जात आहे. या खासदारांच्या बाबतीत पडद्यामागची जुळवणी पूर्ण झाली असून लवकरच हे सहा खासदार शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी केलेल्या वक्तव्याकडे पाहिले जात आहे.

शरद पवार यांनी केला एकनाथ शिंदे यांचा गौरव

नवी दिल्ली- अखेरीस शरद पवार यांनी दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिंदेशाही पगडी घालून स्वहस्ते महादजी शिंदेंच्या नावाचा पुरस्कार मंगळवारी प्रदान करत सन्मान केला आहे.

या संदर्भात पवार यांनी असे म्हटले आहे कि,’राजधानी दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सोहळ्यात आज सर्व मान्यवर मंडळींसह उपस्थिती लावली. या संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्या कुटुंबाचं प्रचंड योगदान आहे ते ज्योतिरादित्य सिंधिया (शिंदे), केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, ज्यांचा आपण या ठिकाणी सन्मान केला ते महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते एकनाथराव शिंदे, राम सुतार, संजय नहार, व्यासपीठावरचे अन्य सहकाऱ्यांसह सर्वांशी संवादही साधला. दरम्यान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित केले. एक आनंदाची गोष्ट अशी आहे की, यंदाच्या वर्षीचं मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीमध्ये होतंय. अनेक वर्षांनंतर हा योग आलाय. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा साहित्य संमेलन दिल्लीमध्ये झालं, ज्यामध्ये जवाहरलाल नेहरू होते आणि त्याचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ होते. इतका काळ लोटल्यानंतर मराठी भाषिकांना देशाच्या राजधानीमध्ये ही संधी मिळते. त्याच्यामध्ये सरहद आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी, साहित्य परिषदेने पुढाकार घेतला व कष्ट केले त्याबद्दल त्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन केले. या अधिवेशनाला इतिहास आहे. मला आठवतंय की, देशाचे जाट समाजाचे एक प्रधानमंत्री होते. चंद्रशेखर यांच्यानंतर त्यांनी ही सूत्र हातात घेतली होती. कधी माझी भेट झाली की नेहमी ते टीकाटिप्पणी करायचे. ते नेहमी सांगायचे तुम्ही लोकांनी आणखी इतिहास घडवायला पाऊलं टाकायला हवी होती. मी त्यांना विचारलं तुमची तक्रार काय आहे? त्यांनी सांगितलं सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली मराठे दिल्लीपर्यंत आले. त्यांनी दिल्लीचा ताबा घेतला आणि दिल्ली सोडून तालकटोरामध्ये गेले व तिथे राहिले. सदाशिवराव भाऊंनी सांगितलं की आम्हाला गंगेत स्नान करण्यासाठी जायचं आहे, आता इथे थांबायची आवश्यकता नाही. त्यावेळी सुरजमल जाट हा दिल्लीचा राज्यकर्ता होता. त्यांनी सांगितलं की, मराठ्यांनी आयुष्यात केलेली ही चूक आहे. गंगेमध्ये स्नान कधीही करता आलं असतं. पण दिल्ली हातात असताना ती दिल्ली सोडून भलतीकडे जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला, हा काही योग्य नव्हता. असं सुरजमल जाटने सांगितलं, मी काही इतिहास तज्ज्ञ नाही.आज या ठिकाणी एकनाथरावांचा सन्मान आहे. त्यांनी सांगितलं की, आम्ही सगळे सातारकर आहोत. माझी गंमतीची गोष्ट आहे, दोन ठिकाणी मला अडचणी होतात. एक ठाणे महानगर पालिकेमध्ये सन्माननीय सभासद होते, अनेक वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था चालू होती. माझा आणि त्या संस्थेचा कधी संबंध आला नाही. एकदा वेगळ्या अशा प्रकारचं व्यासपीठ होतं, अनेक मोठे नेते होते. मला आठवतंय, हेगडे यांचं नेतृत्व होतं व प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू त्याठिकाणी होते. मराठीतले एक महत्वाचे कवी जे सातारकर होते त्यांचं नाव पी. सावळाराम. त्यांची काही गाणी ही खेड्यापाड्यात सुद्धा लोकांच्या मुखात होती. एक काळ असा होता की, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये मुला- मुलींचं लग्न लागलं की सनईवर किंवा रेकॉर्डवर एक गाणं यायचं ‘जा मुली जा, तु दिल्या घरी सुखी रहा’ वगैरे.. त्याचे कवी सावळाराम पाटील हे ठाण्याचे नगराध्यक्ष आणि सातारकर होते. मला याची आठवण झाली त्याला एक कारण आहे. मी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी होतो. वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते, ग. दि. माडगूळकर आमदार होते आणि ठाण्याला निवडणूक होती. माडगूळकरांनी नाईक साहेबांना सांगितलं की, आमच्या सावळाराम पाटलाला अध्यक्ष करा. पक्षाचा सचिव म्हणून मला बोलावून घेतलं आणि सांगितलं की ठाण्याला जायचं, दोन- तीन दिवस बसायचं आणि काहीही झालं तरी सावळाराम पाटील अध्यक्ष होतील हे बघायचं. आता मी काँग्रेसवालाच होतो, काय उद्योग करायचे ते माहित होते. ते उद्योग केले आणि त्यांना त्याठिकाणी अध्यक्ष केलं. मी नाईक साहेबांना फोन केला की तुमचं काम झालंय. ते म्हटले त्यांना घेऊन या. कारण ही सूचना माडगूळकरांची होती आणि सुदैवाने माडगूळकर आज माझ्या घरी आहेत. मी सावळाराम पाटलांना बरोबर घेतलं आणि नाईक साहेबांच्या घरी ‘वर्षा’वर गेलो. माडगूळकर यांनी त्यांना मिठी मारली आणि माझ्या पाठीवर थाप मारली. ‘गड्या, मोठं काम केलं तु’.. ‘येड्याचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष केला’..! सावळाराम पाटील यांच्या गावाचे नाव येडं मच्छिंद्र. त्यामुळे येड्याचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष केला हे मोठं काम तू केलं, म्हणून त्यांनी माझं कौतुक केलेलं होतं. त्या ठाण्याच्या महानगर पालिकेमध्ये हे सावळाराम होते, शिंदे साहेब होते, रांगणेकर होते. ज्यांनी ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्या प्रयत्नांचा मोठा वाटेकरी किंवा जबाबदारी ही एकनाथराव शिंदे यांच्याकडे होती, हे याठिकाणी सांगायला हरकत नाही.मला आनंद आहे की, त्यांचा सत्कार याठिकाणी आहे. सांगताना त्यांनी सांगितलं की, सातारचं आहे. एकनाथराव, साताऱ्याने बरेच मुख्यमंत्री दिले. अनेकांना माहित नसेल मुंबई राज्याचा पहिला मुख्यमंत्री धनजीभाई कूपर. साताऱ्यात कूपर नावाची एक कंपनी होती. त्याचे मालक जे आता नाहीत ते मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यानंतरच्या काळामध्ये यशवंतराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण झाले व त्यानंतर एकनाथराव झाले. मला त्यांना आठवण करून द्यायचीये, तुमची यादी बरोबर आहे पण एक नाव राहिलं. त्या गावाचे नाव नांदवळ आणि त्या गावच्या मुख्यमंत्र्याचं नाव आहे शरद पवार! त्यामुळे मला आनंद आहे की, आज महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली. नुसतं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं असं नाही. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुढे कसा जाईल? याप्रकारची काळजी त्यांनी घेतली.ठाणे, नवी मुंबई, मुंबई हा सगळा नागरी भाग आहे. अलीकडच्या ५० वर्षांमध्ये नागरी प्रश्नांसंबंधित जाण असलेला नेता कोण? याची जर माहिती घेतली तर कटाक्षाने एकनाथ शिंदे यांचं नाव घ्यावं लागेल. मग ते ठाणे असेल, ठाणे नगरपालिका असेल, नवी मुंबई असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील. म्हणून एक योग्य दिशा देण्याचं काम त्यांनी सातत्याने केलं. हे करत असताना कुठलाही पक्षीय अभिनिवेश न ठेवता विविध क्षेत्रातील लोकांशी सुसंवाद ठेऊन राज्य आणि विशेषत: हा नागरी परिसर त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक कशी होईल? यामध्ये लक्षकेंद्रित करण्याचं काम त्यांनी केलं, याची नोंद ही महाराष्ट्राच्या सार्वजनिक इतिहासामध्ये निश्चितपणाने राहिल. त्यामुळे त्यांचा सन्मान होतोय, याचा मला मनापासून आनंद आहे. तो सन्मान कसा होतोय? शिंदे यांचा पुरस्कार! शिंदेंना शिंद्यांचा पुरस्कार! तो ही जावई असलेल्या शिंदेंच्या हातून.. आनंद आहे.सरहदने हा कार्यक्रम घेतला. माझी खात्री आहे की, ज्या अगत्याने आज आपण याठिकाणी उपस्थित राहिलो त्याचं महत्वाचं कारण मी गेले काही दिवस दिल्लीमध्ये बघतोय, इथलं वातावरण बदललंय. दिल्लीमध्ये आम्हा लोकांना स्थानिक लोक भेटायला येत असत. अलीकडे जो येतो तो प्रत्येकजण साहित्य संमेलनासंबंधी काही ना काहीतरी सांगायला येतोय. आज दिल्लीकर आणि दिल्लीचे मराठी भाषिक अतिशय खुशीत आहेत. ते वाट बघतायत की २१, २२, २३ कधी येते? प्रधानमंत्र्यांचं भाषण कधी होतंय? अन्य कार्यक्रम कधी होतील? गेले काही दिवस बघतोय दिल्लीची रोजची संध्याकाळ सरहद असो, साहित्य परिषद असो व अन्य संस्था असो त्या सगळ्यांनी विविध प्रकारचे उपक्रम याठिकाणी आयोजित करून दिल्लीकरांना एक प्रकारचं मानसिक समाधान देण्याचं काम सुरु केलं. माझी खात्री आहे की, हे साहित्य संमेलन अतिशय यशस्वी होईल व लोकांच्या लक्षात राहिल. दिल्लीकरांनी त्याच्या पाठीशी जी शक्ती उभी केली त्याची नोंद सबंध देशातील मराठी भाषिकांच्यात घेतली जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करून माझ्या संवादाला पूर्णविराम दिला.

पवारांनी शिंदेंचा सन्मान केल्याने संजय राऊत संतप्त;​​​​​​​गद्दारांचा सन्मान हा मराठी अस्मितेला धक्का:साहित्य संमेलन नसून राजकीय दलाली

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या गद्दाराचा केलेला सन्मान महाराष्ट्राच्या अस्मितेला लागलेला धक्का लावणारा असल्याची संतप्त टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. दिल्लीत होणारे साहित्य संमेलन हे दलाल व भ्रष्टाचाऱ्यांचे संमेलन असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. राऊत यांनी यावेळी थेट शरद पवारांवर टीका केल्यामुळे महाविकास आघाडीत बेबनाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शरद पवार यांनी मंगळवारी दिल्लीत आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सोहळ्यात शिवसेनेचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान केला. त्यांच्या या कृतीमुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत चांगलेच संतप्त झालेत. त्यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना या प्रकरणी शरद पवारांवर थेट निशाणा साधला. ते म्हणाले, राज्याचे राजकारण हे फार विचित्र दिशेने जात आहे. कोण कुणाला टोप्या घालत आहे आणि कोण कुणाच्या टोप्या उडवत आहे, कोण कुणाला गुगली टाकत आहे आणि कोण स्वतः हीट विकेट होत आहे हे पुन्हा एकदा समजून घ्यावे लागेल.

ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे सरकार पाडले, बेईमानी केली, त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होते ही आमची भावना आहे. महाराष्ट्रातल्या लोकांपुढे आम्ही कोणत्या तोंडाने जाणार? राजकारणात कुणी कुणाचा शत्रू किंवा मित्र नसतो हे ठीक आहे. पण ज्याने महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआमपणे जाऊन बसलेत, त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणे हे महाराष्ट्राच्या अस्मितेला व स्वाभिमानाला धक्का लावणारे आहे असे आम्हाला वाटते. कदाचित शरद पवारांची भावना वेगळी असेल. पण महाराष्ट्राच्या जनतेला हे काही पटले नाही.

शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, अमित शहांच्या सहकार्याने फोडली व महाराष्ट्र कमजोर केला, अशांना आपण सन्मानित करता, यामुळे मराठी माणसांच्या हृदयाला नक्कीच वेदना झाल्या आहेत. आम्हाला तुमचे दिल्लीतले राजकारण माहिती नाही. आम्हालाही राजकारण कळते. पण काल जे काही झाले ते पाहून आम्हाला नक्कीच वेदना झाल्या आहेत. काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात. तुमचे व अजित पवारांचे गुफ्तगू होत असेल. तो तुमचा वैयक्तिक प्रश्न असेल. पण तरीही आम्ही अजित पवारांनी तुमचा पक्ष फोडला, तुमचे कुटुंब फोडले म्हणून याचे भान राखून आम्ही आमचे पाऊले टाकत असतो.

ठाण्याचे राजकारण योग्य दिशेने नेण्याचे मोठे काम एकनाथ शिंदे यांनी केल्याचे कौतुक शरद पवारांनी केले आहे. पत्रकारांनी ही बाब संजय राऊत यांच्या निदर्शनास आणून दिली असता ते म्हणाले की, हे खोटे आहे. शरद पवारांकडे चुकीची माहिती आहे. ठाण्याचे राजकारण योग्य दिशेने नेण्याचे काम मागील 30 वर्षांत ठाकरेंच्या शिवसेनेने केले आहे. त्यांना माहिती नसेल तर सांगतो ठाण्याचा विकास हा सतीश प्रधान यांच्या काळात झाला. आज ठाण्यात जे काही दिसत आहे ते सर्वकाही बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पना होत्या. सतीश प्रधान यांना विकासाची एक दृष्टी केली. त्यांनी टेंडरबाजी केली नाही. त्यानंतर शिवसेनेचे अनेक महापौर झाले. एकनाथ शिंदे हे ठाण्याच्या राजकारणात फार उशिरा आले. शरद पवारांना हे माहिती हवी असेल तर आम्ही आमचे ठाण्यातील प्रमुख कार्यकर्ते राजन विचारे त्यांच्याकडे माहिती देण्यासाठी पाठवू. एकनाथ शिंदे हे फार उशिरा आमदार झाले. विधानसभेत आले. त्यानंतर ठाण्याची वाट लागण्यास सुरुवात झाली.

मुंबईतील व्यावसायिक तथा शस्त्रास्त्र डीलर अभिषेक वर्मा यांनी नुकताच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. संजय राऊत यांनी यावरूनही शरद पवार व एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. शरद पवारांनी काल शिंदेंचा सत्कार केला. त्यामुळे त्यांनीच त्याचे उत्तर दिले पाहिजे. तो ही महादजी शिंदे यांच्या नावाने सत्कार केला. शिंदेंचा पक्ष म्हणजे अमित शहांचा पक्ष आहे. त्यामुळे त्यांनीही त्याचे उत्तर दिले पाहिजे. त्यांना देशद्रोहाचा आरोप असणारे चालत आहेत. काल पवारांनी शिंदेंचा नव्हे तर महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या, महाराष्ट्राचे उद्योगधंदे पळवून नेणाऱ्या अमित शहांचा सत्कार केला. आणि हे जे काही तुम्ही नावे घेत आहात, दलाल, भ्रष्टाचाऱ्यांचे, देशद्रोही आदींचे ते तुमच्या पक्षामध्ये येत आहेत. त्यांच्या मुखियाचा सत्कार शरद पवार करत आहेत.देवेंद्र फडणवीस यांनी काल दलालांना धडा शिकवण्याचे विधान केले होते. पण आंतरराष्ट्रीय कीर्तीचे दलाल त्यांच्या पक्षात गेलेत. त्यामुळे त्यांनी याविषयी बोलू नये.

संजय राऊत यांनी यावेळी दिल्लीतील साहित्य संमेलनावरही टीका केली. ते म्हणाले, हा मुद्दा नाराजी व्यक्त करण्याचा नाही. या आमच्या पक्षाच्या भावना आहेत. दिल्ली सुरू असणारे साहित्य संमेलन हे साहित्य संमेलन नसून राजकीय दलाली आहे. तिथे दलालीच सुरू आहे. कुणालाही कसेही पुरस्कार देत आहेत, कुणाचाही कसाही सत्कार करत आहेत. या लोकांचा साहित्याशी संबंध काय? माझा आयोजकांना प्रश्न आहे, तुम्ही दिल्लीत दलाली करण्यासाठी आला आहात का? तुम्ही साहित्याची कोणती सेवा करत आहात? कोण करत आहे हे साहित्य संमेलन आयोजित? हा भाजपचा एक उपद्व्याप आहे. काय चालू आहे मराठीची सेवा? महाराष्ट्राच्या मानेवर पाय ठेवणाऱ्या लोकांचा इथे सत्कार केला जात आहे? कोण करत आहे हे सगळे? यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. हे साहित्य संमेलन नसून, दिल्लीतील दलाली आहे. आम्ही या संमेलनाला जाणार नाही, असेही संजय राऊत यावेळी संतप्त सूरात म्हणाले.

ठाकरेंनी अजित पवारांचा सन्मान केला, पण आम्ही बोललो नाही – अमोल कोल्हे

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होतोय, याचा आनंद आहे. मात्र त्याला गालबोट लावण्यापेक्षा काही सूचना असतील तर सुचवाव्यात, अशा शब्दात शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी देखील अजित पवार यांचा सत्कार केला होता. त्यावेळी आमच्या पक्षातील कोणीही त्यावर आक्षेप घेतला नाही, अशी आठवणही त्यांनी या प्रकरणी ठाकरे गटाला करवून दिली आहे. महादजी शिंदे यांचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही. मात्र पुरस्काराचे निकष काय? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. मला त्या निकषांची कल्पना नाही. त्यामुळे त्यावर टीका करणे योग्य ठरणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
पवारांवर टीका करण्याएवढे संजय राऊत मोठे झाले का? -शंभूराज देसाई

दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनीही या प्रकरणी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. शरद पवारांवर टीका करण्याएवढे राऊत मोठे झालेत का? असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. ते म्हणाले, शरद पवारांवर टीका करण्याएवढे मोठे संजय राऊत झाले का? हेच राऊत आतापर्यंत म्हणायचे की शरद पवार यांच्यासारखा नेता महाराष्ट्राला भेटला हे राज्याचे भाग्य आहे. पण काल पवारांनी दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार केला आणि राऊत पवारांनाच त्यांनी काय करावे व काय करू नये हे सांगायला लागलेत.