Home Blog Page 458

ओबीसी महामंडळाची एकरकमी परतावा योजना

पुणे, दि. १४ : ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रकमेत ५० टक्के सवलत देण्याबाबतची एकरक्कमी परतावा (ओटीएस) योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत राबविण्यात येत असून महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थीनी या योजनेचा लाभ घेवून कर्जमुक्त व्हावे असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस.जे.पाटील यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि महामंडळ हे शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असून या महामंडळाकडून इतर मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तींना स्वयंरोजगाराकरीता अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येते. महामंडळामार्फत थेट कर्ज योजना, वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहेत. कर्ज योजनांची माहिती व ऑनलाईन अर्ज महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत, असेही श्री. पाटील यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतिम निकाल प्रसिद्ध

पुणे, दि. १४ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतिम निकाल परिषदेच्या http://mahatet.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविली आहे.

या परीक्षेसाठी प्रविष्ठ एकूण ३ लाख ५३ हजार ९५२ परीक्षार्थीपैकी ११ हजार १६८ परीक्षार्थी पात्र ठरले होते. या परीक्षेचा अंतरिम निकाल ३१ जानेवारी २०२५ रोजी प्रसिद्ध करुन १० फेब्रुवारीपर्यंत आक्षेप मागविण्यात आले होते. पात्र उमेदवारांना अंतिम निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळावर उपलब्ध असून प्रमाणपत्राची प्रत संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, शिक्षण निरीक्षक, मुंबई (उत्तर, दक्षिण, पश्चिम) यांच्यामार्फत यथावकाश पाठविण्यात येईल, असेही श्रीमती ओक यांनी कळविले आहे.

आयटीआय प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात होणार उद्घाटन

मुंबई, दि. १४ : राज्य सरकारचा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने सोमवार, दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध येथे प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रम अर्थात ‘ट्रेन द टीचर्स’ या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार असून, विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील.

यावेळी माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, टाटा स्ट्राईव्हचे सीओओ अमेय वंजारी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी आभासी (ऑनलाईन) पद्धतीने शा. औ. प्र. संस्था, संभाजीनगर, शा. औ. प्र. संस्था, अमरावती, राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, मुंबई आणि इंडो-जर्मन टुल रूम, संभाजीनगरचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य हेतू प्रशिक्षित प्रशिक्षक निर्माण करणे असून, दिनांक १७ फेब्रुवारीपासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे

सद्गुरु शंकर महाराज मठ पुन्हा वाहतुक विकासाच्या योजनेमुळे धोक्यात

सद्गुरु शंकर महाराज समाधी स्थळाच्या खालून मेट्रो मार्ग नको-शहरातील ३५ गणेशोत्सव मंडळांचे पुणे मेट्रो आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन
पुणे : स्वारगेट ते कात्रज या महामार्गाच्या रुंदीकरणाने धोक्यात आलेला सद्गुरु शंकर महाराज मठ आणि बालाजीनगरच्या असंख्य इमारती उड्डाण पुलाने वाचविल्या हा इतिहास असताना आता सद्गुरु शंकर महाराज मठ पुन्हा वाहतुक विकासाच्या योजनेमुळे धोक्यात येऊ पाहत आहे .स्वारगेट ते कात्रज हा मेट्रोचा भुयारी मार्ग धनकवडी येथील शंकर महाराज समाधीच्या खालून जात आहे. मेट्रोच्या या मार्गामुळे शंकर महाराजांच्या समाधी स्थळाला धोका पोहाेचू शकतो, त्यामुळे हा भुयारी मार्ग थोडा सरकवून घेतल्यास धोका होणार नाही आणि लोकांच्या भावना ही दुखावल्या जाणार नाहीत. असे निवेदन पुण्यातील ३५ गणेशोत्सव मंडळांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुणे मेट्रो च्या संचालकाना दिले आहे. 
अखिल मंडई मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, श्री गुरुजी तालीम गणेशोत्सव, श्री तुळशीबाग गणपती, केसरी वाडा सार्वजनिक गणेशोत्सव, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळ, लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट, हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्ट, पासोड्या विठोबा मंदिर, कै.लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट, साईनाथ मंडळ ट्रस्ट, श्री गजानन मंडळ ट्रस्ट, अकरा मारुती चौक मंडळ, महाराष्ट्र तरुण मंडळ, वीर शिवराज मंडळ, सेवा मित्र मंडळ, अकरा मारुती कोपरा गणेशोत्सव मंडळ, गुरुदत्त मित्र मंडळ, विधायक मित्र मंडळ, श्री हनुमान मंडळ प्रतिष्ठान, जनार्दन पवळे संघ, थोरले बाजीराव मंडळ, तरुण शिव गणेश मित्र मंडळ, राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ, वीर हनुमान मित्र मंडळ, वैभव मित्र मंडळ, महाराष्ट्र तरुण मंडळ सिटी पोस्ट, फणी आळी तालीम मंडळ इत्यादी मंडळांनी पुढाकार घेतला आहे. 
अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात म्हणाले, भूमिगत मेट्रो  धनकवडी येथील सद्गुरु शंकर महाराज समाधीच्या खालून जाणार नाही, यासाठी योग्य मार्ग काढावा. पवित्र समाधीखाली भूमिगत मेट्रो ट्रॅक असणे ही धार्मिक आणि भावनिक दोन्ही दृष्टिकोनातून चिंतेची बाब आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो लोक मठात दर्शनासाठी येतात. विकास गरजेचा आहे, परंतु भक्तांच्या भावनांचा आदर देखील करायला हवा. 

रेडिएशन सुरक्षा आणि रेडियोलॉजीमधील नवीन प्रवाहांवर सेमिनार रविवारी

 पुणे जिल्ह्यातील तज्ञांचा सहभाग; रेडियोग्राफर्स असोसिएशन आॅफ महाराष्ट्र आणि एप्ट मेडिकल सिस्टिम्स प्रा. लि. यांच्या वतीने आयोजन
पुणे: रेडियोलॉजीमधील रेडिएशन सुरक्षा आणि नवीन प्रवाहांवर लक्ष केंद्रित करणारा सेमिनार पुण्यात होणार असून, याचे आयोजन रेडियोग्राफर्स असोसिएशन आॅफ महाराष्ट्र आणि एप्ट मेडिकल सिस्टिम्स प्रा. लि. यांच्या वतीने करण्यात आले आहे. ‘रेडिएशन सुरक्षा आणि रेडियोलॉजीमधील नवीन प्रवाह’ या शीर्षकाखालील हे सेमिनार रविवार, १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३.३० या वेळेत पूना हॉस्पिटल आॅडिटोरियममध्ये होणार आहे, अशी माहिती केतन आपटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला रेडियोग्राफर्स असोसिएशन आॅफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रमेश तांबे, माजी अध्यक्ष जगदीश जगताप आणि एप्ट मेडिकल सिस्टिम्सचे संचालक केतन आपटे आणि गीता आपटे हे उपस्थित होते.
सेमिनारमध्ये प्रख्यात ज्येष्ठ रेडियोलॉजिस्ट डॉ. श्रीनिवास नाटेकर, डॉ. आर. व्ही. परांजपे, डॉ. डी. डी. शेट्टी आणि डॉ. लाख्खर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. याशिवाय,एइआरबी च्या रेडिएशन सुरक्षा आणि नियामक बाबींमध्ये विशेषतज्ञ असलेले वैज्ञानिक अधिकारी हर्ष देसले, अनुभवी रेडियोग्राफर चंद्रकांत शहाणे आणि बायोमेडिकल अभियंते अशोक श्रृंगारपूरे, अनिल जठार, समीर श्रृंगारपूरे आणि मुथुकुमार इत्यादी आपले विचार मांडणार आहेत.
सेमिनारचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे रेडियोलॉजीमध्ये सुरक्षा प्रोटोकॉल आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानांबद्दल सहभागींना शिक्षित करणे. तसेच रेडियोग्राफरच्या दृष्टिकोनातून एक्स-रे तंत्रज्ञानातील बदल, एक्स-रे तंत्रज्ञानाचा विकास, आणि रेडियोलॉजीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यावर सखोल चर्चा होणार आहे. पुणे जिल्ह्याच्या विविध भागांतील तज्ञ यावेळी सहभागी होणार आहेत.
याव्यतिरिक्त, सेमिनारमध्ये रेडियोलॉजिस्ट, रेडियोग्राफर आणि अभियंता यांना त्यांच्या क्षेत्रातील योगदानासाठी सन्मानित करण्यात येणार आहे. प्रमुख वक्त्यांव्यतिरिक्त सन्मानितांमध्ये अनंत तेलधुने, सुधाकर रणदिवे , सुधीर नाडर, रत्नकांत नाईक, नाडुकरन, तानाजी जगताप, सुभाष बनसोडे, आणि प्रल्हाद कांबळे यांचा समावेश आहे. एप्ट मेडिकल सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेड,  रेडियोग्राफर्स असोसिएशन आॅफ महाराष्ट्र आणि वैरेक्स इमेजिंग इंडिया प्रा. लि. यांनी या उपक्रमाला सहकार्य केले आहे.

लोणीकंद येथे रंगणार १ ली ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

दिनांक २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी किताबासाठी लढणार मल्ल 

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने जिल्हा कुस्तीगीर तालीम संघ पुणे यांच्या सहकार्याने व पै. ओंकार कंद युवा फाऊंडेशन, श्री प्रदीपदादा कंद युवा मंच यांच्या वतीने आयोजन
पुणे :  महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने १ ल्या वरिष्ठ ग्रीको रोमन राज्यस्तरीय अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी लोणीकंद मधील हिंद केसरी मैदान येथे ही स्पर्धा होणार आहे. जिल्हा कुस्तीगीर तालीम संघ पुणे यांच्या सहकार्याने व पै. ओंकार कंद युवा फाऊंडेशन, श्री प्रदीपदादा कंद युवा मंच यांच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी दिली. 
स्पर्धेचे उद्घाटन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार राहुल कुल, कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष  रामदास तडस व सरचिटणीस योगेश दोडके यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
संदीप भोंडवे म्हणाले, या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची मान्यता असलेले  ६ महानगरपालिका  व ३६ जिल्हा असे एकूण ४२ जिल्हा कुस्तीगीर संघ सहभागी होणार आहेत. एकूण १० वजनगटामध्ये ३७५ ते ४०० कुस्तीगीर स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी ३० तांत्रिक अधिकारी ( पंच ) निवडण्यात आले असून ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी किताबासाठी ८७ ते १३० किलो हा वजनगट निश्चित करण्यात आलेला आहे 
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडामंत्री  दत्तामामा भरणे, नामदार जयकुमार गोरे, आमदार ज्ञानेश्वर कटके व आमदार बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते होणार आहे. ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लास चांदीची गदा देण्यात येणार आहे, अशी माहिती स्पर्धेचे स्वागताध्यक्ष पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप दादा कंद व स्पर्धेचे आयोजक भाजपा युवा नेते ओंकार हनुमंत कंद यांनी दिली.

मोक्कामधील जामिनावर असलेल्या सराईत आरोपीकडून एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र व एक जिवंत काडतूस जप्त

पुणे-मोक्कामधील जामिनावर असलेल्या सराईत आरोपीला एक देशी बनावटीच्या अग्निशस्त्र व एक जिवंत काडतूसासह पोलिसांनी पकडले आहे.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दि.13/02/2025 रोजी कोंबिंग ऑपरेशन दरम्यान युनिट 6 कडील प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण व युनिट 6 कडील पथक असे लोणी काळभोर पो.स्टे. हद्दीत गस्त करीत असताना पोलीस अंमलदार सकटे यांना मिळालेल्या खबरीवरून मोक्का गुन्ह्यामध्ये जामिनावर असलेला अभिलेखावरील आरोपी अनिकेत गुलाब यादव ,वय 22 वर्षे सोपाननगर ,कदमवाक वस्ती, लोणीकाळभोर, पुणे येथुन ताब्यात घेतले असता त्याचेकडे एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र व एक जिवंत काडतूस मिळून आले असुन पंचांसमक्ष जप्त करण्यात आले आहे.सदर आरोपीविरुद्ध लोणीकाळभोर पो.स्टे. गु.र.नं. 89/2025 आर्म अॅक्ट कलम 3,25, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1)(अ) सह 135 अन्वये गुन्हा दाखल करून सदरचा गुन्हा पुढील तपास कामी लोणीकाळभोर पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे -2) राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट -6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा.पोलीस निरीक्षक मदन कांबळे,पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी,पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे,नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश ताकवणे,सचिन पवार,ऋषीकेश व्यवहारे,शेखर काटे,गणेश डोंगरे,समीर पिलाने, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे,सुहास तांबेकर,म.पोलीस अंमलदार प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली

शेतकऱ्यांना भिकारी म्हणणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्या: अतुल लोंढे

अन्नदाता शेतकऱ्यांना भिकारी म्हणण्याची हिम्मत होतेच कशी? काही संवेदना आहेत की नाही?

मुंबई, दि. १४ फेब्रुवारी २५
भाजपा युती सरकारमधील मंत्र्यांचा शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन चांगला नाही. शेतकऱ्यांना भिकारी म्हणून अपमान करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपदावर बसण्याचा अधिकार नाही. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा घेऊन घरी पाठवावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

“हल्ली भिकारीही एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांत पीकविमा दिला”, या कृषीमंत्री माणिकराव कोकोटे यांच्या वक्तव्यावर अतुल लोंढे यांनी तीव्र आक्षेप घेत माणिकराव कोकाटे व भाजपा युती सरकारवर तोफ डागली. शेतकरी अन्नदाता आहे, देशाचा मालक आहे, तो घाम गाळून पिकवतो म्हणून आपल्या ताटात अन्न येते, स्वतः उपाशी राहून तो लोकांचे पोट भरतो त्या शेतकऱ्यांना भिकारी म्हणण्याची हिम्मत कशी होते? पीक विमा योजनेत भ्रष्टाचार झाला आहे पण भ्रष्टाचार होतच असतात असेही कृषी मंत्री कोकाटे म्हणत आहेत. सरकारमधील लोकांना काही लाजलज्जा आहे का? कसले लोक मंत्रिमंडळात घेतले आहेत? असा सावल विचारत अजित पवार यांनी या प्रकरणी लक्ष घालावे असे अतुल लोंढे म्हणाले.

आका अन बाका सोडा.. थेट दादाच पाठीशी,धनंजय मुंडे यांचा अजितदादांनी केला पक्षाच्या ‘कोअर ग्रुप’मध्ये समावेश

मुंबई-सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाप्रकरणी संकटात सापडलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठिशी राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे उभी राहिली आहे. एवढेच नाही तर त्यांच्यावर दृढविश्वास व्यक्त करत त्यांचा पक्षाने स्थापन केलेल्या बड्या नेत्यांच्या एका कोअर ग्रुपमध्येही समावेश केला आहे. यामुळे कितीही आरोप झाले तरी, धनंजय मुंडे यांचे राष्ट्रवादीतील ठळक स्थान अधोरेखित होत आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी पक्षाची संघटनात्मक बांधणी, धोरणात्मक निर्णय आणि जनविकासाच्या योजना व अंमलबजावणी यासाठी पक्षांतर्गत प्रमुख नेत्यांचा एक कोअर ग्रुप स्थान केला आहे. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह पक्षसंघटनेची बांधणी, त्यासाठीचे कार्यक्रम व पक्षासंदर्भातील महत्त्वाच्या धोरणांची आखणी व अंमलबजावणी करणे हा या कोअर ग्रुपचा महत्त्वाचा उद्देश आहे. या ग्रुपमध्ये राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा समावेश करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने जारी केलेल्या निवेदनानुसार, या महत्त्वाच्या कोअर ग्रुपमध्ये पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ व संतोष देशमुख हत्या प्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या धनंजय मुंडे यांचा समावेश आहे. बीडमधील कथित गुन्हेगारीच्या मुद्यावरून धनंजय मुंडे यांना सर्वपक्षीय नेत्यांकडून टार्गेट केले जात असतानाही अजित पवारांनी या महत्त्वाच्या कोअर ग्रुपमध्ये त्यांचा समावेश केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.दुसरीकडे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे सादर केलेत. तसेच त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. पण अजित पवारांसह फडणवीसांनी या प्रकरणी एकमेकांवर जबाबदारी ढकलत ही मागणी एकप्रकारे फेटाळून लावली आहे. विशेषतः अजित पवारांनी या प्रकरणी धनंजय मुंडे यांचा हात या प्रकरणी स्पष्ट होईपर्यंत त्यांचा राजीनामा न घेण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे मुंडे यांचे पक्षातील स्थान अधिक बळकट झाल्याचे दिसून येत आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप सिद्ध होईपर्यंत कारवाई नाही:अजित पवार यांनी पुन्हा दिले अभय

मुंबई-NCP च्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अडचणीत सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांची पुन्हा एकदा अभय दिले आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी राष्ट्रवादीच्या एका अनौपचारिक बैठकीत केला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना पक्षीय पातळीवर मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरण, वाल्मीक कराडशी असणारे आर्थिक संबंध, कृषी घोटाळा आदी मुद्यांवर गंभीर आरोप होत आहेत. यामुळे त्यांच्यावरील राजीनाम्याचा दबाव वाढला आहे. त्यातच करुणा मुंडे यांच्या प्रकरणात कोर्टाने ओढलेले ताशेरे यामु्ळेही राष्ट्रवादी काँग्रेसची पुरती नाचक्की होत आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर गुरुवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांची अनौपचारिक बैठक झाली.

या बैठकीत अजित पवारांनी धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांप्रकरणी आपली भूमिका पुन्हा एकवार स्पष्ट केली. धनंजय मुंडेंवरील आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, असे ते म्हणाले. सूत्रांच्या माहितीनुसार, तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीला धनंजय मुंडे यांच्यासह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आदी पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. कृषी घोटाळ्याचा अहवाल येईपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये, अशी भूमिकाही यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावेळी घेतल्याचे समजते. पक्षाच्या या भूमिकेमुळे धनंजय मुंडे यांना पक्षीय पातळीवर मोठा दिलासा मिळाल्याची चर्चा आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप अत्यंत गंभीर आहेत. यामुळे त्यांचे राजकीय भवितव्य संकटात सापडले आहे. विरोधक या मुद्यावरून सातत्याने राष्ट्रवादीची चौफेर कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. विश्लेषकांच्या मते, धनंजय मुंडेंवर एखादी कारवाई केल्यास त्याचा राष्ट्रवादीच्या प्रतिमेवर मोठा परिणाम होईल. या प्रकरणी गटबाजी उफाळून येण्याचीही भीती आहे. त्यामुळे अजित पवार सध्या यासंबंधी अत्यंत सावध भूमिका घेत आहेत.

दुसरीकडे, मंत्री धनंजय मुंडे सध्या बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामुळे अडचणीत सापडलेत. संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या झाली होती. या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराडला अटक झाली आहे. त्याच्यावर मकोका अंतर्गतही कारवाई झाली आहे. त्यामुळे विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. पण मुंडे यांनी ही मागणी धुडकावून लावत या प्रकरणी अजित पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच योग्य तो निर्णय घेतील असे ठणकावून सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी त्यांना तूर्त अभय दिले आहे.

महावितरण अभय योजनेची मुदत मार्च अखेरपर्यंतच

विजेची गरज नसली तरी थकबाकीमुक्त होण्याची संधी

पुणे, दि. १४ फेब्रुवारी २०२५: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, वीजबिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलल्यानंतर देखील नवीन जागामालक किंवा ताबेदारांना थकबाकीची रक्कम भरावी लागेल. त्यामुळे जागा वापरासह विजेची गरज असो किंवा नसो. मात्र वीजबिलांच्या थकबाकीतून मुक्त होण्याची संधी महावितरणच्या अभय योजनेअंतर्गत घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर अकृषक ग्राहकांना येत्या मार्चपर्यंत उपलब्ध झाली आहे.

दरम्यान, पुणे प्रादेशिक विभागामध्ये या योजनेत सहभागी २९ हजार ५०१ पैकी १७ हजार २६१ वीजग्राहकांनी सध्या विजेची गरज नसतानाही योजनेचा लाभ घेऊन थकबाकीमुक्ती मिळवली आहे. तर १० हजार १३५ वीजग्राहकांकडे विजेची पुनर्जोडणी करण्यात आली आणि ५९०८ ग्राहकांना नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. वीजबिलांच्या थकबाकीमुळे दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या तसेच कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित सर्व अकृषक वीजग्राहकांसाठी महावितरण अभय योजना दि. ३१ मार्च २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे.

महावितरण अभय योजनेनुसार थकबाकीदारांनी केवळ मूळ थकबाकीचा भरणा केल्यास संपूर्ण १०० टक्के व्याज व विलंब आकाराची (दंड) रक्कम माफ होत आहे. तसेच मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना आणखी १० टक्के तर उच्चदाब ग्राहकांना आणखी ५ टक्के सूट मिळत आहे. यासोबतच मूळ थकबाकीची सुरवातीला ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यांत भरण्याची देखील सोय आहे. थकबाकीमुक्तीसाठी वीजग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे यांनी केले आहे.

पुणे प्रादेशिक विभागामध्ये या योजनेसाठी आतापर्यंत ३३ हजार ३०४ ग्राहकांनी अर्ज केले आहे. तर २९ हजार ५०१ थकबाकीदारांनी ४३ कोटी ११ लाख रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केला आहे. यात पुणे जिल्ह्यात १२ हजार ९६ ग्राहकांनी २७ कोटी ५६ लाख, सातारा जिल्ह्यात १६६७ ग्राहकांनी २ कोटी ९ लाख, सोलापूर जिल्ह्यात ४७१९ ग्राहकांनी ४ कोटी २ लाख, कोल्हापूर जिल्ह्यात ६४५३ ग्राहकांनी ६ कोटी ३६ लाख आणि सांगली जिल्ह्यातील ४५६६ ग्राहकांनी ३ कोटी ८ लाख रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केला आहे.

फ्रेंचायझीमधील ग्राहकांना सुद्धा लागू असलेल्या या अभय योजनेत सहभागी होण्यासाठी महावितरणच्या अधिकृत वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे ऑनलाइन अर्ज व थकबाकी भरण्याची सोय उपलब्ध आहे. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी नजीकच्या कार्यालयात संपर्क साधावा.

महावितरण अभय योजनेचे ठळक मुद्दे –

» घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर अकृषक जागेसाठी वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीची संधी.

»  मागणीप्रमाणे त्वरित नवीन वीजजोडणी उपलब्ध.

» मूळ थकबाकी एकरकमी भरल्यास लघुदाब ग्राहकांना आणखी १० टक्के तर उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के सूट.

» मूळ थकबाकीची ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम सहा व्याजमुक्त हप्त्यांत भरण्याची सोय.

» दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या थकबाकीदार वीजग्राहकांना संधी.

» महावितरण अभय योजना येत्या दि. ३१ मार्च २०२५ पर्यंत सुरू राहणार.

मुठा परिसर स्वच्छतेने पुणेकरांनी साजरा केला ‘व्हॅलेंटाईन डे’ 

पुणे : मुळा-मुठा सह्याद्रीच्या लेकी…वुई लव्ह मुळा-मुठा…ध्यास स्वच्छतेचा, ध्यास प्रगतीचा…नद्या वाचवा, जीवन वाचवा…असे फलक हातात घेत घोषणांसह महाविद्यालयीन युवक-युवती, शालेय विद्यार्थी आणि पुणेकरांनी मुठा परिसर स्वच्छतेने व्हॅलेंटाईन डे साजरा केला. एक हजारहून अधिक पुणेकरांनी मुठा नदी पात्रात एकत्र येत माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन उपक्रमात सहभाग घेत मुठा नदी विषयी प्रेम व कृतज्ञता व्यक्त केली.

वर्शिप अर्थ फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणेकर नदी परिसर स्वच्छ करून ‘माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन’ हा उपक्रम राबविण्याकरिता भिडे पूल परिसरात एकत्र आले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री राजकुमार सिंग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. पराग काळकर, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल, अभिनेते प्रविण तरडे, प्रशासकीय अधिकारी आशा राऊत, निखील देशमुख, आशिष शेटे, अनिल सातव, नितीन देशपांडे, वर्शिप अर्थ फाउंडेशनचे संस्थापक पराग मते, सह संस्थापक राज देशमुख, व्यवस्थापन टीममधून आम्रपाली चव्हाण, समीर पौलस्ते, सुरज शिराळे, विद्यार्थी प्रतिनिधी अक्षना कांबळे, सानिका दळवी, यश आगवणे यांसह विविध धर्मांचे धर्मगुरु देखील उपस्थित होते.

मुळा-मुठा नदी स्वच्छतेविषयी यावेळी उपस्थितांनी शपथ घेतली. यामध्ये जपान, ब्राझील, रशिया, श्रीलंका या देशातील पर्यावरणप्रेमींनी देखील सहभाग घेतला. पर्यावरण रक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल नीलय उपाध्याय यांना यावेळी मुळा-मुठा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
राजकुमार सिंग म्हणाले, कोणत्याही नदीला मुक्तपणे प्रवाहित होऊ दिले नाही, तर संपूर्ण पर्यावरणाचा -हास होऊ शकतो. वाढते शहरीकरण आणि मानवी अतिक्रमण यामुळे नदी विषमय होत आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने याविषयी आत्मपरिक्षण करायला हवे. मुळा-मुठा नदी नीट आणि सुंदर ठेवणे, ही पुणेकरांची जबाबदारी आहे. यासाठी आज पुणेकर एकत्र आल्याचे चित्र प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ.पराग काळकर म्हणाले, मुळा-मुठा ही पुण्याची वाहिनी आहे. नदीच्या काठाने माणसाचे जीवन विकसित झाले आहे. नदी हा मानवी जीवनाचा आवश्यक भाग असून पाण्यातील प्रदूषणाने अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. आपण एक पाऊल पुढे टाकून नदी सुधार आणि आरोग्याच्या दृष्टीने टाकायला हवे.

राज देशमुख म्हणाले, ‘वसुधैव कुटुंबकम’ या उक्ती प्रमाणे संपूर्ण मानवजाती एक परिवार असून या पृथ्वीतलावरील जल, मृदा, वायू, वनस्पती, वन औषधी जीव जंतू इत्यादी सर्व बाबीचा आपण मनुष्य म्हणून उपभोग घेतो. त्यामुळे त्याचे रक्षण व संवर्धन करायची जबाबदारी माणूस म्हणून सर्वांची आहे. यासाठीच या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात नदीच्या बाजूचा परिसर स्वच्छ करून जसे सुका कचरा असेल प्लास्टिक असेल ही स्वच्छता मोहीम घेण्यात आली.
यावेळी वर्शिप अर्थ फाउंडेशन कडून विद्यार्थ्यांसाठी २ लाखांची शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी वर्शिप अर्थ फाउंडेशन ने नाविन्यपूर्ण उपाय सुचवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २ लाखांची शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. या शिष्यवृत्तीचा उद्देश विद्यार्थी वर्गाला पर्यावरणपूरक संकल्पना शोधण्यास आणि त्यावर कार्य करण्यास प्रेरित करणे हा आहे. 

अन्नब्रम्ह पुरस्कार मुरलीधर भोजनालयास जाहीर

सौ विमलाबाई गरवारे हायस्कूल येथे रविवारी पुरस्काराचे वितरण

पुणे : स्व. म. वा. जोशी यांचे स्मरणार्थ दिला जाणारा यंदाचा (२०२४-२५) चा “अन्नब्रम्ह” हा पुरस्कार पुणे शहरातील नामांकित “श्री मुरलीधर व्हेज” पूर्वाश्रमीचे मुरलीधर भोजनालय; संचालक ‘श्री व सौ शारदा गोपाळदादा तिवारी कुटुंबीय”यांना जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्कार प्रदान कार्यक्रम रविवार, दि.  १६ फेब्रु वारी 2025 रोजी रोजी सायं ६ वा. सौ. विमलाबाई गरवारे हायस्कूल, प्रभात रोड, पुणे येथे संपन्न होणार आहे.
ज्येष्ठ  नेते माजी आमदार उल्हासदादा पवार यांचे अध्यक्षते खाली, सावित्रीबाई फुले पुणे वि‌द्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांचे हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पुरस्काराचे संयोजक डॉ. न. म. जोशी यांनी दिली आहे.
नारायण पेठेतील “श्री मुरलीधर व्हेज (भोजनालय)” हे भोजनालय गेली अनेक वर्षे पुणेकरांच्या सेवेत कार्यरत आहे. विद्यार्थी, नोकरदार व चोखंदळ पुणेकर यांना सकस जेवण उपलब्ध करून देण्याचा सेवाभाव जोपासत आहे. त्यांचा दर्जा व सेवा याबाबत चौफेर होत असलेली ख्याती, ग्राहकांचा अनुभव इ लक्षांत घेऊन त्यांना यंदाचा अन्नब्रम्ह पुरस्कार जाहीर करत असल्याचे डॉ. न. म. जोशी यांनी सांगितले.
सदर पुरस्कार आम्ही विद्येचे माहेरघर’ असलेल्या पुण्यनगरीत, परगावच्या विद्यार्थ्यांना भोजन खाऊ घालतांना व्यावसायिक दृष्टीकोनास, सामाजिक दृष्टीकोनाची जोड देत विद्यार्थ्यांची व विविध कारणाने पुणे शहरात येणाऱ्या ग्राहकांची सेवा करणाऱ्या ‘मुरलीधर भोजनालयाची’ विशेष नोंद या पुरस्काराच्या निमित्ताने घेण्यात आली आहे.

ड्रंक अँड ड्राईव्ह 7 दिवसाची झाली कैद

पुणे: शहरातील एका आयटी (IT) कर्मचाऱ्याला मद्य प्राशन करून मोटारसायकल चालविल्याप्रकरणी मोटार वाहन न्यायालयाने दोषी ठरवले. न्यायालयाने त्याला सात दिवसांचा साधा कारावास आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.विशेष म्हणजे, यापूर्वीही आरोपीला मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला होता.

न्यायाधीश अमृत बिराजदार यांनी निकाल देताना सांगितले की, ‘आरोपीने या शिक्षेतून धडा घेतला असता, तर त्याने परत असा गुन्हा केला नसता. आरोपीने वारंवार हा गुन्हा केला असून, त्याला केवळ दंड ठोठावून सोडता येणार नाही. आरोपीला कठोर शिक्षेची गरज आहे.’

मनमोहन बालेश्वर त्यागी (वय ४५, रा. पिंपळे सौदागर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, आरोपीने दंड भरल्यानंतर त्याची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.

१२ डिसेंबर २०२४ रोजी वाकड (Wakad) परिसरात पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिस (Pimpri-Chinchwad Traffic Police) वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत होते. दुपारी दोनच्या सुमारास आरोपी भूमकर चौकातून वाकड गावाच्या चौकाकडे जात असताना पोलिसांनी त्याची तपासणी केली. त्यावेळी, आरोपीने मद्य प्राशन केल्याचे आढळले. पोलिसांनी आरोपीवर मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ व १८५ नुसार गुन्हा दाखल करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. आरोपीने सात फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहून आपला गुन्हा कबूल केला. (Pune News)

‘आपण कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य आहोत आणि तुरुंगवासाची शिक्षा झाली, तर आयटी कंपनीतील नोकरी गमवावी लागेल व कुटुंब रस्त्यावर येईल,’ असे सांगून आरोपीने न्यायालयाकडे नरमाईची विनंती केली. मात्र, न्यायालयाने सांगितले की, ‘आरोपी यापूर्वी मद्याच्या नशेत वाहन चालविल्याबद्दल दोषी ठरला होता.

कायद्याचा हेतू विचारात घेतल्यास सार्वजनिक रस्ता वापरणाऱ्या लोकांच्या संरक्षणासाठी अशा प्रकारच्या आरोपींना दंड ठोठावला जातो. मात्र, दंड ठोठावल्यानंतरही आरोपी धडा शिकला नाही. त्यामुळे त्याला कठोर शिक्षा मिळायला हवी, परंतु आरोपीच्या शिक्षेचा फटका त्याच्या कुटुंबीयांना बसू शकतो. त्यामुळे आरोपीची विनंती आणि समाजाचे कल्याण यात समतोल साधून शिक्षा सुनावण्याची गरज आहे.’

विद्यापीठातल्या उंदरांचा बंदोबस्त करा – थेट विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंचे आदेश

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित ही गंभीर समस्या लक्षात घेता, त्वरित उपाययोजना करण्याच्या विद्यापीठ प्रशासनाला सूचना

पुणे दि. १३ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये गेल्या काही महिन्यांपासून अस्वच्छतेचे प्रमाण वाढल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. वसतिगृह परिसरात उंदरांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, त्यांच्या वाढत्या संख्येमुळे विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत वसतिगृहातील एका विद्यार्थ्याला उंदराने चावा घेतल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित ही गंभीर समस्या लक्षात घेता, विद्यापीठ प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात अशा सूचना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केल्या आहेत.

विद्यार्थ्यांनी वारंवार संबंधित प्रशासनाकडे तक्रारी केल्या असल्या तरी यावर ठोस उपाययोजना झालेली नाही. उंदरांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याचे नुकसान होत असून, स्वच्छतेच्या अभावामुळे डास आणि इतर कीटकांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्याचबरोबर या पार्श्वभूमीवर, वसतिगृहामध्ये त्वरित स्वच्छता मोहीम राबवावी, उंदरांचे निर्मूलन करण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, भविष्यात अशी समस्या उद्भवू नये म्हणून नियमित स्वच्छता आणि निगराणी ठेवावी, तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक समस्या टाळण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्याची नेमणूक करावी अशा महत्त्वाच्या सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विद्यापीठाच्या कुलगुरू यांना केलेल्या आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे महाराष्ट्रातील अग्रगण्य विद्यापीठांपैकी एक असून, येथे शिक्षण, संशोधन आणि नवकल्पनांसाठी विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो. मात्र, अशा प्रकारच्या समस्यांमुळे विद्यार्थ्यांचे दैनंदिन जीवन आणि अभ्यासावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित व स्वच्छ वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे.