Home Blog Page 451

कोकाटे वरच्या कोर्टात दाद मागणार:म्हणाले – राजकीय वैमनस्यापोटी केलेल्या केसचा निका लागायला ३० वर्षे का लागली ?

0

नाशिक-सुमारे 30 वर्षांपूर्वी तुकाराम दिघोळे यांनी राज्यमंत्री असताना राजकीय द्वेषापोटी माझ्यावर ही केस दाखल केली होती. आज या केसचा निकाल आला. निकाल पत्र मी अद्याप वाचले नाही. या निकालाविरोधात उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले आहेत . न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर मी रीतसर जामीन घेतलेला आहे, असा दावाही माणिकराव कोकाटे यांनी केला.कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. 1995 च्या प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासंदर्भात माणिकराव कोकाटे यांनी हि प्रतिक्रिया दिली आहे.

माणिकराव कोकाटे यांच्यावर 1995 मध्ये सदनिकांच्या घोटाळ्यांसंदर्भात कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी त्यांच्यावर भादंवि कलम 420 (फसवणूक), 465 (कृत्रिम दस्तऐवज तयार करणे), 471 (बनावट दस्तऐवजाचा उपयोग करणे) आणि 474 (सत्यता लपवणे) या कलमांखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा न्यायालयात खटला सुरू होता. याप्रकरणी न्यायालयाने आज निकाल दिला असून माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनिल कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.

कोकाटे म्हणाले.,’ही राजकीय केस होती. गेल्या 30 वर्षांपूर्वी ही केस दाखल झालेली आहे. त्यावेळी दिघोळे हे राज्यमंत्री होते. माझे आणि त्यांचे राजकीय वैर होते. या वैरात्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावर ही केस केली होती. त्या केसचा निकाल आज 30 वर्षांनंतर पहिल्यांदा लागला आहे. निकाल पत्र हे 40 पानांचे असून मी अद्याप वाचले नाही. ते वाचल्यानंतर त्याबाबत माहिती देईल. निकालाविरोधात अपील करण्याचा निर्णय मी घेतलेला असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे माणिकराव कोकाटे म्हणाले.मी राजकारणात जेव्हा प्रवेश केला होता, तेव्हाचे हे प्रकरण आहे. मी त्यावेळी आमदार सुद्धा होतो की नाही, मला माहीत नाही. तो काळ आणि आजच्या काळात फरक आहे. नंतरच्या काळात दिघोळे आणि माझ्यात सलोख्याचे संबंध पण निर्माण झाले. परंतु, एखादी केस नोंदवल्यानंतर नियमान्वये प्रक्रिया होत असते. उशिरा प्रक्रिया झाल्यामुळे आज निकाल लागलेला आहे, असे ते म्हणाले. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर मी रीतसर जामीन घेतलेला आहे, असा दावाही माणिकराव कोकाटे यांनी केला.हे प्रकरण समोर आल्यानंतर माझ्या राजीनाम्याची मागणी होऊ शकते. राजकीयदृष्ट्या देशामध्ये अशाप्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत. एक नागरिक म्हणून मला न्याय मागण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मी उच्च न्यायालयात न्याय मागणार असल्याचे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

माणिकराव कोकाटेंवर 1 नव्हे 4 घरे लाटल्याचा आरोप; जवळपास 29 वर्षांनी निकाल

0

नाशिक-राज्याचे कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने 1995 च्या एका प्रकरणात 2 वर्षांची कैद व 50 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणी कोकाटे बंधूंवर एक नव्हे तर चार सदनिका लाटल्याचा आरोप आहे. एका अधिकाऱ्याने दाखल केलेल्या तक्रारीमुळे त्यांना हा दिवस पहावा लागला.
माणिकराव कोकाटे यांनी नाशिक शहराच्या मध्यभागी असणाऱ्या बॉईज टाऊन शाळेलगतच्या एका इमारतीमधील सदनिका बनावट दस्तऐवजांच्या आधारावर मिळवल्या. त्यानंतर इतर दोघांच्या सदनिकाही लाटत तिथे अवैध बांधकाम व अतिक्रमण केले.यासंबंधीच्या माहितीनुसार, माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी 1995-97 दरम्यान शासनाकडून मिळणाऱ्या सदनिका घेतल्या होत्या. यासाठी त्यांनी आमचे उत्पन्न कमी असून, आम्हाला दुसरे कोणते घरही नाही अशी बतावणी केली होती. त्यानंतर त्यांना या सदनिका मिळाल्या. विशेष म्हणजे कोकाटे बंधूंनी केवळ त्यांना मिळालेल्या सदनिकाच घेतल्या नाही, तर इतर दोघांना मिळालेली घरेही गरीब म्हणून लाटली.ही बाब अप्पर जिल्हाधिकारी विश्वनाथ भास्कर पाटील यांच्या लक्षात आली. त्यांनी यासंबंधी तक्रार दाखल केली. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनीही यासंबंधी एका याचिकेद्वारे कोकाटे यांच्यावर कागदपत्रांत फेरफार व फसवणुकीचा आरोप केला होता.या प्रकरणी नाशिकच्या सरकार वाडा पोलिस ठाण्यात भादंवि कलम 420, 465, 471,47 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयात हे प्रकरण 1997 पासून सुरू होते. त्याचा आज निर्णय आला. प्रस्तुत प्रकरणात एकूण 4 आरोपी होते. त्यात माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांच्यासह इतर दोघांचा समावेश होता. पण कोर्टाने इतर दोन आरोपींना कोणत्याही स्वरुपाची शिक्षा ठोठावली नाही.पण कोकाटे बंधूंना 2 वर्षांची शिक्षा व 50 हजार रुपयांच्या आर्थिक दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात एकूण 6 साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. जवळपास 29 वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला आहे.

माणिकराव कोकाटे यांचा राजकीय प्रवास-माणिकराव कोकाटे हे राज्याचे कृषिमंत्री आहेत. त्यांचा जन्म नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सोमाठाणे येथे झाला. त्यांच्या राजकारणाची सुरुवात NSUI या विद्यार्थी संघटनेपासून झाली. त्यानंतर त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. जिल्हा परिषद सभापती, सिन्नर पंचायत समिती सभापती, आमदार आणि मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. त्यांनी गतवर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातीतल महायुती सरकारमध्ये कृषिमंत्री म्हणून पदभार हाती घेतला.माणिकराव कोकाटे यांनी 1999 मध्ये सिन्नर विधानसभेची जागा पहिल्यांदा लढवली आणि विजय मिळवला. त्यानंतर 2004 , 2009 मध्ये ते आमदार म्हणून पुन्हा निवडून आले. 2014 मध्ये त्यांचा पराभव झाला. 2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला. 2024 मध्ये त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत विजय मिळवला. त्यानंतर त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याच्या कृषिमंत्रिपदाचा कार्यभार सोपवण्यात आला.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांचा कारावास:50 हजार रुपयांचा दंड

मुंबई-राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 1995 मधील एका प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली. कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.दरम्यान, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाकडून जामीन मिळाला आहे. 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन देण्यात आला. माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजुर झाला असला, तरी त्यांना पुढील 30 दिवसांत सत्र न्यायालयात अपील करावे लागणार आहे.

1995 मध्ये कागदपत्रांची फेरफार आणि फसवणुकीच्या आरोपांवरून हा निर्णय देण्यात आला आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी 1995 मध्ये माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात सदनिकांच्या घोटाळ्यांसंदर्भात याचिका दाखल केली होती. आमच्याकडे घर नाही आणि आमचे उत्पन्न कमी असल्याचे सांगून माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांनी मुख्यमंत्री निधीतील सदनिका घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावावर भादंवि कलम 420 (फसवणूक), 465 (कृत्रिम दस्तऐवज तयार करणे), 471 (बनावट दस्तऐवजाचा उपयोग करणे) आणि 474 (सत्यता लपवणे) या कलमांखाली गुन्हा दाखल झाला होता.30 वर्षांनंतर या खटल्याचा आज नाशिक जिल्हा न्यायालयाने निकाल दिला. त्यानुसार माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनिल कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या सुनावणीला माणिकराव कोकाटे स्वतः जिल्हा न्यायालयात हजर होते. जिल्हा न्यायालयाने शिक्षा ठोठावताच माणिकराव कोकाटे यांच्याकडून तत्काळ जामीन मिळण्यासंदर्भात हालचारी सुरू झाल्यात आहेत. त्यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे.

या प्रकरणामुळे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत आले आहेत. त्यांच्या आमदारकी आणि मंत्रीवर टांगती तलवार आहे. कारण लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यास त्याचे सभागृहाचे सदस्यत्त्व रद्द होते. तसे झाल्यास माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय कारकीर्दीला ब्रेक लागू शकतो.

आता माणिकराव कोकाटे यांच्या रुपाने अजित पवार गटाचा दुसरा मंत्री अडचणीत आला आहे. धनंजय मुंडे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या नेत्याचे मंत्रिपद संकटात सापडले आहे. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे, अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय पावले उचलणार, हे बघावे लागेल. तसेच यावरून भाजप आणि शिंदे गटाची भूमिका काय राहील? याकडे लक्ष लागले आहे.​​​​​​​

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे बुधवारी पंडित कुमार गंधर्व महोत्सव

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे बुधवार, दि. 26 फेब्रुवार 2025 रोजी पंडित कुमार गंधर्व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता मयूर कॉलनीतील बालशिक्षण मंदिराजवळील एमईएस सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. कुमार गंधर्वांची गायकी याविषयी पंडित कुमार गंधर्व यांचे ज्येष्ठ शिष्य पंडित सत्यशील देशपांडे संवाद साधणार असून प्रात्यक्षिकासह सादरीकरण करणार आहेत. तसेच विदुषी सानिया पाटणकर यांचे गायन होणार असून पुष्कर लेले हे पंडित कुमार गंधर्व यांच्या निर्गुणी भजनाविषयीची वैशिष्ट्ये गायनातून दर्शविणार आहेत. कलाकारांना माधव लिमये, यश सोमण, गौतम टेंबेकर, अंशुल प्रतापसिंग साथसंगत करणार आहेत. नृत्यसंध्या या कार्यक्रमाअंतर्गत अरुंधती पटवर्धन आणि कलावर्धिनी ग्रुपच्या नृत्यांगना भरतनाट्यम्‌‍ नृत्याविष्कार सादर करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालक विभिषण चवरे, सांस्कृतिक विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.

शिव छत्रपतींचे जन्मस्थान शिवनेरी हे राष्ट्रीय स्मारक व्हावे..!काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

सत्ता पक्षा कडुन, शिव छत्रपतींना अपेक्षित राजधर्माचे पालन व्हावे

पुणे दि १९
हिंदूस्थानचे अराध्य दैवत, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करून “रयतेच्या जनकल्याण राज्य व्यवस्थेची” स्थापना केली, त्याचा प्रत्यय शिवमुद्रेची प्रतीमा संविधानात प्रतिबिंबित होत
असल्याने देशवासीयांना येतो. उत्तम राज्यकारभाराचा आदर्श जगासमोर ठेवणारे, प्रजाहितदक्ष व लोककल्याणकारी राज्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज होते. सत्ता पक्षाने, शिवाजी महाराजांना अपेक्षीत ‘रयते प्रती, महीला – भगींनींचे प्रती, सुरक्षा पुरवुन व बळीराजा शेतकऱ्यां प्रती त्यांच्या पिकास योग्य भाव देण्याचा व राजकीय उत्तरदायीत्वाचा कृतीशील राजधर्म निभवण्याची आज गरज आहे. तरच ते शिव छत्रपतींना खरोखरचे अभिवादन व खरी सुमनांजली ठरेल अशी अपेक्षा काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
तसेच पुणे जिल्ह्यातील शिव छत्रपतींचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला हे राष्ट्रीय स्मारक व्हावे.. अशी मागणी देखील काँग्रेस प्रवक्ते यांनी केली.
पुणे मेडीसीन असो व डीलीव्हरी बॉईज तर्फे सदाशीव पेठेत “श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस” पुष्पहार अर्पण व अभिवादन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
या प्रसंगी संयोजक मा प्रसन्न पाटील, पप्पू शेठ गुजर, डॉ शैलेश गुजर, संजय अप्पा बिबवे, अनिल पाटोळे, भंडारे, दिवाकर जी, राठी साहेब, धनंजय भिलारे, गणेश शिंदे, अँड स्वप्नील जगताप इ सह मेडीसीन डीलीव्हरी बॉईज मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

सात्विक आहार, आचार व विचारांच्या परंपरेतून नैतीक मुल्याधारीत, संवेदनशील समाज निर्माण व्हावा: श्रीपाल सबनीस

शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी परिवाराच्या वतीने “अन्नब्रम्ह” पुरस्कार मुरलीधर भोजनालयाचे संचालक तिवारी कुटुंबीय यांना प्रदान

पुणे : अन्न हे पूर्णब्रह्म असून अन्न तयार करणाऱ्याच्या कामाचा व ते सामाजिक दृष्टीकोनाची जोड देऊन विक्री व्यवसायाच्या कष्टाचा सन्मान होतोय ही आनंदाची बाब आहे. संविधानाला जात धर्म नसतो, तसा अन्नालाही जात धर्म नसतो. अन्नदानाची सात्विक भावना ही मानवतेची आहे. समाजीक बेबनाव, क्रुरता व असुरक्षा रोखण्या करीता सात्विक आहार, आचार व विचारांच्या परंपरेतून ‘नैतीक मुल्याधारीत, संवेदनशील समाज निर्माण होणे ही काळाची गरज आहे. असे मत अ भा साहीत्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. 

बल्लवाचार्य कै. म. वा. जोशी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा यंदाचा (२०२४-२५) चा चौथा “अन्नब्रम्ह” पुरस्कार, पुणे शहरातील नामांकित ‘श्री मुरलीधर व्हेज’ अर्थात पूर्वाश्रमीचे मुरलीधर भोजनालयाचे संचालक श्री व सौ शारदा गोपाळदादा तिवारी कुटुंबीय यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस हे बोलत होते.  सौ. विमलाबाई गरवारे हायस्कूल येथे सावित्रीबाई फुले पुणे वि‌द्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांचे हस्ते या पुरस्कारचे वितरण करण्यात आले.यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार उल्हासदादा पवार,  पुरस्काराचे संयोजक ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी, प्रसाद जोशी उपस्थित होते. 

डॉ. पराग काळकर म्हणाले, अलीकडच्या तरुण पिढीला अन्न किंवा अन्नदान ही संकल्पनाच कळलेली नाही. ‘टू मिनिट नूडल्स’च्या जमान्यात त्यांना अन्न तयार करण्यामागचे कष्ट कळत नाही. पुण्याच्या विकासात जसे उद्योग क्षेत्राचे महत्त्व आहे तसे शिक्षण क्षेत्राचे पण आहे. पुण्यात दरवर्षी 4 लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. त्यातील बहुतांशी विद्यार्थी नोकरी निमित्त पुण्यातच राहतात. या काळात भोजनालयाचा खूप मोठा आधार त्यांना असतो.
उल्हासदादा पवार म्हणाले, पिझा – बर्गर सारख्या पाश्चात्य फास्ट फूड खाद्य संस्कृतीच्या वावटळीत, भारतीय खाद्य संस्कृती जपण्याचे काम मुरलीधर भोजनालय व तिवारी कुचुंबिय करत आले आहे जे निरोगी प्रकृती करीता आवश्यक आहे त्यामुळे परदेशी लोकांना पण या खाद्य संस्कृतीने भुरळ घातली आहे. मात्र ज्या प्रमाणे उडपी आपल्या देशाच्या प्रत्येक भागात व्यवसाय करताना दिसतात, तसा मराठी माणूस खाद्य व्यवसाय करताना दिसत नाही अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.
पुरस्काराला उत्तर देताना गोपाळदादा तिवारी म्हणाले, पुर्वाश्रमीच्या मुरलीघर भोजनालयाची ओळख जपण्यासाठी ‘विद्यार्थी मेस’ची संकल्पना मर्यादित संख्येत आज ही राबवीत आहोत. सामाजिक बांधीलकीच्या जाणीवेने व्यवसायात नैतिक मुल्यांचे अधिष्ठान ठेवणे गरजेचे असून, ‘नफ्या बरोबर ग्राहकांचा संतोष व समाघान’ कमावणे हे मुरलीघर’ चे प्रथम पासुन वडीलोपार्जित ऊद्दीष्ट ठरले आहे. राज्याच्या विविघ भागातुन अनेक महत्वाचे कलाकार, राजकीय व्यक्ती, उद्येग व्यवसाईक, उच्च पदस्थ यांनी मुरलीघर भोजनालयातील जेवणाचा आस्वाद घेतला आहे. हा पुरस्कार तीन पिढ्यांच्या तपस्येचा, ऊत्तरदायीत्वाच्या सातत्याचा सन्मान आहे. ते म्हणाले, या पुरस्काराचे दुसरे वैशीष्ठ्ये म्हणजे डॉ जोशी सरांनी वडीलांच्या कष्टप्रद आयुष्याचे स्मरण जपत इतर ‘अन्न – व्यवसाईकांना’ सामाजिक जाणीवेची प्रेरणा देण्याचा हेतू साधला आहे. कामगार वर्गा’ प्रती आजवर जपलेला कौटुंबिक व मानवी दृष्टीकोन व त्याची कृतीशील दखल इ मुळे हे शक्य झाल्याचे ही गोपाळदादा तिवारी यांनी यावेळी सांगीतले. तसेच ‘परगांवच्या गरीब, गरजू विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांच्या मुलांना, दुष्काळजन्य परिस्थितीत व कोरोना काळात सेवा देण्याऱ्या घटकांना’ मुरलीघर भोजनालयातुन, व्यवसाईक दृष्टीकोना पेक्षा सामाजिक दृष्टीकोनातुन’ सेवा दिली गेली याचा अभिमान वाटतो..!

डॉ. न. म. जोशी आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हणाले, माझे वडील हे आचारी काम करायचे म्हणून त्यांच्या स्मृतीदिनी श्राद्ध घालण्यापेक्षा अन्न क्षेत्रात काम करणाऱ्यांचा सन्मान करण्याचं आम्ही ठरवलं. हीच खरी त्यांना आदरांजली आहे असे मला वाटते. मुरलीधर भोजनालायाची कीर्ती पूर्वी पासून आम्ही ऐकत आलोय.  मुरलीधर च्या भोजनाची वाजवी किंमतीतील सुग्रास चव चोखंदळ पुणेकरांच्या पसंतीची आहे.गोपाळदादा तिवारी हे सामाजिक जाणीव असलेले राजकारणी असल्याचे डॅा न म जोशी सरांनी सांगितले.

अन्नब्रम्ह पुरस्कार मानपत्र, सन्मान चिन्ह व रु ५०००/- असे स्वरुप होते.. मात्र रु ५०००/- हे तिवारी कुटुंबीयांनी गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहाय्या करीता डॅा न म जोशी सरां कडे सुपुर्त केले..  मानपत्राचे वाचन दीप्ती डोळे यांनी केले. या वेळी सभागृहात घटनातज्ज्ञ प्रा ऊल्हास बापट, मा विठ्ठल मणीयार, रवि चौधरी, सुर्यकांत मारणे, डॉ मोहन ऊचगांवकर, माजी उपप्राचार्य प्रा संजय कंदलगावकर, विष्णु कुलकर्णी, गणेश नलावडे, खाद्यविक्रेता संघाचे अध्यक्ष किशोर सरपोतदार, शेखर बर्वे, दत्ता ऊभे, जयंत पवार, दत्त मंदीर ट्रस्ट अध्यक्ष राजेंद्र बलकवडे, टिळक गणपती ट्रस्ट अध्यक्ष रविंद्र पठारे, राम विलास तापडीया, राधेश्याम कासट, डॅा तांदळे, राजेद्र खराडे, मेघराज निंबाळकर, अमोल सावंत, किशोर सरदेसाई, प्रा सुरज कुलकर्णी, उमेश चाचर, सुरेश पारखी, मंगेश झोरे, अँड फैयाज शेख, सुभाष जेधे, विनायक सोनवणे, शेखर बनसोड, प्रमोद वडके, सुरेश नांगरे, गोरख पळसकर, बंडू शेडगे, विकास घोले, अण्णा गोसावी, अविनाश गोडबोले, शंकर थोरवे, नितीन पायगुडे, महेश अंबिके, योगेश भोकरे, महादेव ढमाले, आशीश गुंजाळ, धनंजय भिलारे, शंकर शिर्के, गणेश शिंदे, ॲड स्वप्नील जगताप, सुनील मारणे, महेश हराळे, संजय अभंग, गणेश मोरे, नरेश आवटे, श्रीकांत सांखला बंधू, राजेश सुतार, इ सह  सह विविध क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.प्रसाद जोशी यांनी सुत्र संचालन व आभार प्रदर्शन केले. अमर काळे यांच्या ‘गायन कार्यक्रमा’सह मुरलीधर च्या ‘स्नेह भोजना’ने कार्यक्रमाची सांगता झाली.

साहित्य, साहित्यिक ही महाराष्ट्राची संस्कृती : उदय सामंत

मराठी साहित्ययात्री संमेलनाचा दिमाखात शुभारंभ
ढोल-ताशांचा गजर, राष्ट्रगीत-महाराष्ट्र गीताने दुमदुमले रेल्वेस्थानक

पुणे : बाराशे साहित्यिक व साहित्यप्रेमी एकत्र येऊन संमेलनानिमित्त प्रवास करणे हा जागतिक विक्रम आहे. चार साहित्यिक एकत्र आल्यावर चांगले विचार ऐकायला मिळतात. तसेच अनेक वाद देखील होऊ शकतात, पण सकारात्मक विचार करता वाद हे जीवंतपणाचेच लक्षण आहे, हे जाणवते. साहित्यिक म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आहे. या संस्कृतीची जपणूक या संमेलनानिमित्ताने होत आहे, असे प्रतिपादन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले.
सरहद, पुणे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे दिल्ली येथे 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या निमित्त मराठी साहित्ययात्री संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे ते दिल्ली प्रवासादरम्यान फिरत्या चाकांवर हे प्रवासी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाचे उद्घाटन आज (दि. 19) मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्या वेळी ते बोलत होते. डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिका डॉ. संगीता बर्वे उपस्थित होते.
सुरुवातीस शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताच्या सादरीकरणाने रेल्वे स्टेशन परिसर दुमदुमून गेला होता. प्रत्येकात चैतन्याची भावना निर्माण झाली होती. पंढरपूर येथून आलेल्या ग्रंथ दिंडीचे या वेळी स्वागत करण्यात आले. ही दिंडी रेल्वेद्वारे दिल्लीकडे निघाली आहे. या मराठी साहित्ययात्री संमेलनादरम्यान उदय सामंत यांनी रेल्वेतून प्रवास करत साहित्यिक, साहित्यप्रेमी आणि पत्रकारांशी संवाद साधला.
मराठी साहित्ययात्री संमेलनाचे अध्यक्ष शरद तांदळे, कार्यकारी अध्यक्ष वैभव वाघ, कार्याध्यक्ष शरद गोरे, कार्यवाह सचिन जामगे, मुख्य समन्वयक ॲड. अनिश पाडेकर, सोमनाथ चोथे, गणेश बेंद्रे, निमंत्रक अक्षय बिक्कड उपस्थित होते.
उदय सामंत पुढे म्हणाले, साहित्यिकांच्या मागे उभे राहणे म्हणजे मराठी माणसाच्या मागे उभे राहणे आहे. आणि मराठी माणसामागे उभे राहणे म्हणजे अवघ्या महाराष्ट्राच्या पाठीशी असणे होय. विशेष रेल्वेला महान सेनानी महादजी शिंदे यांचे नाव दिले हे अभिमानास्पद आहे. महाराष्ट्रातील नागरिक छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांचा आदर करणारे आहेत. या महान व्यक्तिंविषयी वाईट उद्गार काढणे हा देशद्रोह आहे आणि या विरोधात अख्खा महाराष्ट्र-मराठी माणूस पेटून उठेल. या संमेलनाच्या निमित्ताने मराठी भाषेला सातासमुद्रापलिकडे नेण्याचे मोठे कार्य घडत आहे.
डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, मराठी भाषा साहित्य संमेलन हे साहित्य आणि संस्कृतीची गौरवशाली परंपरा आहे. या संमेलनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्राला दिलेली शौर्याची शिकवण पुढे नेणाऱ्या पराक्रमी सेनानी महादजी शिंदे यांना वंदन केले जात आहे. त्यांचे धैर्य, शौर्य व नेतृत्व मराठी माणसासाठी अभिमानास्पद आहे. रेल्वेतील साहित्ययात्री संमेलन जगभरात प्रथमच घडत आहे, या विषयी संजय नहार व त्यांच्या सहकार्यांचे विशेष अभिनंदन. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा सोहळा अलौकिक होईल याची खात्री आहे.
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित कवी केदारनाथ सिंह यांच्या ‌‘केदारनाथ सिंह की पचास कविताएं‌’ या कविता संग्रहाचा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिका डॉ. संगीता बर्वे यांनी मराठीत केलेल्या ‌‘सर्जनात्मक हस्तक्षेप‌’ या अनुवादीत पुस्तकाचा प्रकाशन समारंभ या निमित्ताने पुणे रेल्वे स्थानकावर झाला. या पुस्तकाचे प्रकाशन मंत्री उदय सामंत आणि डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते झाले. या विषयी बोलताना सामंत म्हणाले, संगीत बर्वे यांनी खऱ्या अर्थाने मराठीपण जपत पुस्तकाचे प्रकाशन या साहित्ययात्री संमेलनाच्या निमित्ताने केले आहे, ही मराठी भाषेसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
साहित्ययात्री संमेलनाची ग्लोबल बुक ऑफ द एक्सलन्स, इंग्लडमध्ये नोंद
पुणे ते दिल्ली प्रवासादरम्यान रेल्वेत होणाऱ्या मराठी साहित्ययात्री संमेलनाची ग्लोबल बुक ऑफ द एक्सलन्स, इंग्लडमध्ये नोंद करण्यात आली असून ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लडचे उपाध्यक्ष डॉ. दीपक हरके यांनी आज रेल्वे स्थानकावर झालेल्या मराठी साहित्ययात्रर संमेलनाच्या उद्घाटन समारंभात राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत व संयोजकांना याविषयीचे प्रमाणपत्र प्रदान केले.

‘आयसीएआय’ पुणे शाखेला दोन पारितोषिके

पुणे : दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलच्या (डब्ल्यूआयआरसी) पुणे शाखेला २०२४ मधील उल्लेखनीय कार्याबद्दल विभागीय स्तरावर दोन पारितोषिके मिळाले आहेत. सर्वोत्तम शाखा म्हणून पहिले, तर सर्वोत्तम विद्यार्थी (विकासा) शाखा म्हणून दुसरे पारितोषिक मिळाले आहे. दोन्ही पारितोषिके ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुणे शाखेच्या अध्यक्षा सीए अमृता कुलकर्णी व ‘विकासा’चे अध्यक्ष सीए प्रणव आपटे यांच्या नेतृत्वाखाली मिळाली आहेत.
मुंबई येथे नुकत्याच झालेल्या सोहळ्यात ‘आयसीएआय’च्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे (डब्ल्यूआयआरसी) अध्यक्ष सीए अंकित राठी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. यावेळी ‘डब्ल्यूआयआरसी’चे उपाध्यक्ष सीए राहुल पारीख, सीए पिंकी केडिया, सीए गौतम लाठ, ‘विकासा’चे चेअरमन सीए पियुष चांडक, पुणे शाखेचे कार्यकारिणी सदस्य सीए राजेश अग्रवाल, सीए प्रितेश मुनोत, सीए हृषीकेश बडवे, सीए अजिंक्य रणदिवे आदी उपस्थित होते.

सीए अमृता कुलकर्णी म्हणाल्या, “संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षात अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना ‘शाश्वत विकास’ ही संकल्पना घेऊन उपक्रम राबवले. प्लास्टिकचा वापर बंद केला. यासह सीए व विद्यार्थ्यांसाठी विविध आर्थिक विषयांसंदर्भात नवनवीन कार्यक्रम, चर्चासत्रे, कार्यशाळा, राष्ट्रीय परिषदांचे आयोजन केले. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम, फॉरेन्सिक अकाउंटिंग, जीएसटीवर मार्गदर्शनपर कार्यक्रम झाले. ‘अकाउंटिंग स्टॅंडर्ड डे’ साजरा करणारी पुणे शाखा देशातील एकमेव शाखा ठरली. या सर्व उपक्रमांत शाखेचे पदाधिकारी, कार्यकारी मंडळाचे सदस्य, मुख्य कार्यालयाच्या कार्यकारणीचे सभासद, पश्चिम विभागीय कार्यकारणीचे सभासद, पुणे शाखेच्या कार्यकारिणीचे सदस्य, पुण्यातील सर्व सभासद, व्याख्याते, विद्यार्थी, शाखेमधील सेवक इत्यादीचा महत्वाचा सहभाग मिळाला. सर्वांच्या सहकार्याने व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने हे यश संपादन करणे शाखेला शक्य झाले आहे.”

सीए प्रणव आपटे म्हणाले, “भविष्यातील ‘सीए’समोर असणारी आव्हाने आणि संधी विचारात घेऊन वर्षभरात कार्यक्रमांची आखणी केली. पाठ्यक्रमाच्या अनुषंगाने वैविध्यपूर्ण उपक्रम, रक्तदान शिबीर, स्वच्छ भारत अभियान, क्रीडा स्पर्धा व अन्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता उद्योगांना भेटी, आर्टिकलशिप कशी करावी, याबाबत मार्गदर्शनपर कार्यक्रम, प्रोत्साहनपर व्याख्याने झाली.”—————————–

शिवजन्मोत्सव स्वराज्यरथांचे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून स्वागत

पुणे -पुण्यनगरीत लाल महाल मार्गावर शिवजन्मोत्सवानिमित्त आलेल्या स्वराज्यरथांचे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापित केलेल्या स्वागत कक्षाकडून स्वागत करण्यात आले.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा १९ फेब्रुवारी रोजी जन्म दिवस हा देशभरासह महाराष्ट्रात पुण्यात शिवजयंती उत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिवजयंती महोत्सव समितीतर्फे गेली १३ वर्षांपासून शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा या भव्यदिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. या मिरवणुकांमध्ये सरसेनापती, सरदार, सुभेदार, वीर मावळे आणि वीर मातांच्या स्वराज्यरथांचा सहभाग असतो. यामध्ये सहभागी असलेल्या स्वराज्यरथांचे स्वागत करत सरदारांच्या वारसदारांचा सन्मानपत्र, शाल देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे उपाध्यक्ष दत्ताभाऊ सागरे व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिवप्रेमीसाठी पाणी व्यवस्था व जेवणाची व्यवस्थासुद्धा करण्यात आलेली होती. पुणे राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष श्री. आनंद दत्ताभाऊ सागरे यांनी अतिशय चांगल्याप्रकारे या स्वागत कक्ष उपक्रमाचे आयोजन केले होते.
सदर प्रसंगी कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख,माजी विरोधी पक्षनेते दत्ता सागरे,माजी नगरसेवक शांतीलाल मिसाळ, सेल अध्यक्ष युवती पूजा झोळे, विद्यार्थी शुभम माताळे, अल्पसंख्याक समीर शेख, व्यापारी वीरेंद्र किराड, सोशल मिडिया शीतल मेदने, अल्पसंख्याक महिला नूरजहाँ शेख, तृतीयपंथी सेल निर्जला गुरु गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कसबा अध्यक्ष अजय दराडे, विधानसभा कार्याध्यक्ष राहुल तांबे,राहुल पायगुडे,विपुल म्हैसूरकर,महिला विधानसभा अध्यक्ष नीता गायकवाड, सुप्रिया कांबळे, विधानसभा युवक अध्यक्ष गजानन लोंढे, सरचिटणीस दुष्यंत जाधव, संदीप गाडे, उपाध्यक्ष डिंपल इंगळे, युवक उपाध्यक्ष गिरीश मानकर, संघटक सचिव विलास बहिरट, अतुल बहिरट, चिटणीस चेतन मोरे, संघटक सचिव रवींद्र कवडे, अय्याज शेख, युवती कार्याध्यक्ष लावण्या शिंदे, महिला संघटक सचिव सुनिता चव्हाण,महिला उपाध्यक्ष प्रीती डोंगरे, राधिका वाईकर,गौरी कोंडे, कविता राक्षे, सुनिता बडेकर,पद्मिनी ओस्वाल,विधानसभा विद्यार्थी अध्यक्ष कार्तिक थोटे, युवती कार्याध्यक्ष श्रेया तांबे,शाहरुख शेख,सुनीता कांबळे तसेच शिवप्रेमी लाल महाल परिसरात मोठ्या संख्येने जमले होते.

जयंतीच्या दिवशी कोणी श्रद्धांजली अर्पण करते का?:विचारपूर्वक शब्दप्रयोग करावा, छत्रपती संभाजीराजेंचा राहुल गांधींना सल्ला

पुणे -छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. त्यानिमित्ताने अनेकांनी सोशल मीडियावर अभिवादन केले आहे. त्यात कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अभिवादनच्या ऐवजी श्रद्धांजली अर्पण केली आहे. यावरून त्यांच्यावर टीका केली जात आहे. शिवजयंती दिनी ‘श्रद्धांजली’ असा उल्लेख केल्याने टीका केली जात आहे. यावर छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंतीच्या दिवशी कोणी श्रद्धांजली अर्पण करते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

छत्रपती संभाजीराजे म्हणाले, जयंतीच्या दिवशी कोणी श्रद्धांजली अर्पण करते का?’ जयंती हा साजरा करण्याचा, प्रेरणा घेण्याचा दिवस असतो. त्यामुळे अशा वेळी ‘श्रद्धांजली’ हा शब्दप्रयोग चुकीचा असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले आहे. शिवजयंती ही महाराजांच्या विचारांची पुनर्स्मृती करण्याची संधी असते, श्रद्धांजली नव्हे. त्यामुळे सार्वजनिक नेत्यांनी भाषेची आणि परंपरांची योग्य जाण ठेवून विचारपूर्वक शब्दप्रयोग करावा, असेही छत्रपती संभाजीराजे म्हणाले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, एकनाथ शिंदे म्हणाले, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा ते वारंवार अपमान करत आले आहेत. आता त्यांची मजल छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापर्यंत पोहोचली आहे. हे तमाम शिवभक्तांचा अपमान आहे. हे चुकून झालेले नाही. हे त्यांची जीभ घसरलेली नाही, तर हे त्यांनी जाणीवपूर्वक केलेले विधान आहे. त्यांनी केलेल्या या विधानावर त्यांनी माफी मागायला पाहिजे.

दरम्यान, यावर कॉंग्रेसकडून सारवासारव केली जात आहे. राहुल गांधींनी केलेल्या ट्वीटमुळे वाद उफळला असता, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून मात्र सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ते म्हणाले, राहुल गांधींनी शिवाजी महाराजांना अभिवादन करत असताना काय म्हटले, तर माय हंबल ट्रिब्युट. म्हणजे मी त्यांना अभिवादन करतो, नमन करतो हा त्यांचा त्या मागचा भाव आहे. आता ‘ध’ चा ‘मा’ करून विनाकारण घाणरेडे राजकारण विरोधकांनी करू नये, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे महिला सुरक्षितता,अस्मिता आणि सन्मान कायम..

0

उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांचे छत्रपतींना कृतज्ञतापूर्वक वंदन..

मुंबई दिनांक- १९ फेब्रुवारी.
विधान भवन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.विधान परिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानसभा उपसभापती डॉ. नीलम गो-हे, आमदार राजेश विटेकर,सचिव जितेंद्र भोळे,सचिव विलास आठवले यांनी विधानभवन आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालत जयघोष केला.यावेळी विधान भवन अधिकारी,कर्मचाऱ्यांनी महाराजांना वंदन केले.
छत्रपती शिवाजी महाराज
यांच्यामुळे अस्मिता,वीरत्व,शौर्यत्व
त्व,देशभक्ती, धर्मभक्ती,त्याच बरोबर सगळ्या समूहाला नेतृत्व करत इतिहास घडविला आहे.शिवाजी महाराज यांनी सत्ता अन्याय,अत्याचाराचा मुकाबला केला ते पाहिल्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेले कार्य आणि नंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेले कार्यामुळे नंतरच्या काळात मराठी साम्राज्य दिल्लीपर्यंत पोहचले.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी सातत्याने परकिय आक्रमण रोखण्याचे काम केले तसे स्वधर्म देशहिताचा जागविण्याचे कामही केले. शिवाजी महाराजांमुळे महिलांच्या संदर्भात सुरक्षितता, अस्मिता, आणि सन्मान कायम राहिला आहे. राजमाता जिजाऊ माँसाहेब यामध्ये फार मोठे योगदान होते अश्या शब्दात शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कृतज्ञतापूर्वक वंदन केले.

अरेरे ..पुण्यात पोलिसांची अवस्था मोठी दयनीय..चार बेवड्यांनी एका पोलिसाला बदडले आणि पोलिसांनी साधी तक्रारही नाही घेतली…

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कानावर हा प्रकार जाताच, चतुःश्रृंगी पोलिसांनी तीन दिवसानंतर गुन्हा दाखल केला असून मारहाण करणाऱ्या दारुड्यांना अटक करण्यात आली आहे..

पुणे-कोम्बिंग ऑपरेशन करून घरी परतत असताना सेनापती बापट मार्गावरील रत्ना रुग्णालयाच्या परिसरात चार बेवड्यांनी एका पोलिसाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.पोलिस कर्मचारी चंद्रकांत जाधव यांना चौघांनी मारहाण केल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. चंद्रकांत जाधव हे गुरुवारी दिनांक 13 रोजी मध्यरात्री आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोम्बिंग ऑपरेशन संपवून घरी परत निघाले होते. रत्ना हॉस्पिटलच्या परिसरात आले असता, चौघेजण त्यांना रस्त्यावर एका रिक्षात मद्यप्राशन करत गोंधळ घालत होते. जाधव यांनी त्यांना हटकले आणि त्याचा त्यांना राग आला. त्यांनी जाधव यांना धमकावत आम्हाला माहिती आहे तू पोलिस आहेस, परंतू तू इथला पोलिस नाहीस, त्यामुळे तु आम्हाला शिकवू नको, असे म्हणत चौघांनी जाधव यांना रिक्षात डांबून बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली.

आरोपींनी तो दगड उचल आणि ठार मारून टाक त्या पोलिसाला असे म्हणत डोक्यात दगडाने मारहाण केली. आपली सुटका जाधव यांनी केली आणि मोबाईलमध्ये आरोपींचे फोटो काढले. मात्र आरोपींनी त्यांचा मोबाईलही हिसकावला. गंभीर प्रकार म्हणजे जाधव हे पोलिस असल्याची माहिती असताना देखील निर्ढावलेल्या गुन्हेगारांप्रमाने चौघांनी त्यांना मारहाण केली. हा प्रकार घडल्यानंतर जाधव यांनी ओळखीच्या चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यातील एका अधिकार्‍याला फोन करून आपल्याला मारहाण झाल्याचे सांगितले. ते सांगत असताना, सर्व प्रकार समोरील अधिकार्‍यांना ऐकू जात होता. तरी चौघे जाधव यांना मारहाण करत होते.जखमी झालेल्या चंद्रकांत जाधव यांनी हा प्रकार चतुःशृंगी पोलिस ठाण्यात सांगितला व तक्रार दाखल करून घेण्यास सांगितले. मात्र येथील पोलिस कर्मचाऱ्यांनी आता नको उद्या पाहू असे म्हणत वेळ मारून घेतला. तक्रार दाखल करून घेण्याची विनंती केली असता त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.दुसऱ्या दिवशी परत जाधव चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात गेले. त्यांनी तेथील अधिकार्‍यांना भेटून कैफियत मांडली. कोर्टाचे काम असल्याचे सांगून हे अधिकारी निघून गेले. जाधव तेथेच ताटकळत उभे होते. शेवटी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना त्यांना भेटवण्यात आले, त्यांनी आपल्या वरिष्ठांच्या कानावर घातले. आरोपींना पकडून तुमच्यासमोर उभे करतो असे म्हणून त्यांची बोळवण करण्यात आली. त्यानंतर तर पोलिसांची हद्दच झाली. त्यांनी आपल्या वजनदार माणसाचा वापर करत मारहाण झालेल्या जाधव यांना प्रकरण मिटवून घेण्याचा अजब सल्लाच दिला.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कानावर हा प्रकार जाताच, चतुःश्रृंगी पोलिसांनी तीन दिवसानंतर गुन्हा दाखल केला असून मारहाण करणाऱ्या दारुड्यांना अटक करण्यात आली आहे.. रुपेश मांजरेकर (वय २५), अनिकेत राजेश चव्हाण (वय २१), अनिकेत घोडके (वय २४ ), अभि डोंगरे (वय २४, सर्व रा. रामोशीवाडी, वडारवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

राहुल गांधींनी जयंतीदिवशी शिवरायांना वाहिली श्रद्धांजली अन भाजपने उठविली टीकेची झोड

मुंबई- लोकसभेतील विरोधपक्ष नेते राहुल गांधी जयंतीदिवशी ट्विटर अर्थात X वरून शिवरायांना श्रद्धांजली वाहिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाचे भांडवल करत भाजपने टीकेची झोड उठविली आहे आणि नव्याच वादाला तोंड फुटले आहे. राहुल गांधी यांच्याकडून महापुरुषांचा सतत अपमान सुरू असल्याचा आरोप करत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने, राहुल यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्रासह देशभरात आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. शिवप्रेमींपासून राजकारण्यापर्यंत सर्वच स्तरातील लोकांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात राहुल गांधी यांनीही शुभेच्छा दिल्या. मात्र शिवजयंतीनिमित्ताने छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्याऐवजी राहुल गांधी यांनी श्रद्धांजली या शब्दाचा उल्लेख केला आहे.

राहुल गांधी यांनी छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणतात की, शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या धैर्याने आणि शौर्याने त्यांनी आम्हाला निर्भयतेने आणि पूर्ण समर्पणाने आवाज उठवण्याची प्रेरणा दिली. त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी राहील.भाजपकडून माफीची मागणी…

महाराष्ट्रातील लोकांचा, महापुरुषांचा राहुल गांधी यांच्याकडून सतत अपमान केला जात असतो. जयंतीच्या दिवशी आदरांजली वाहतात. परंतु राहुल गांधी महाराष्ट्रातील महापुरुषांच्या विषयी कळत नकळत अनादार व्यक्त करतात. त्यातील हा गंभीर प्रकार आहे. त्यांनी हे ट्विट मागे घ्यावे, अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले, असा इशारा भाजप नेते अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

औरंग्याच्या पिलावळाकडून अजून दुसरी काय अपेक्षा नाही. हे हिरवे साप आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा जगभरात एक वर्ग आहे. त्या राजाच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्ही श्रद्धांजलीचा उल्लख करता! राहुल गांधींनी देशाची, जनतेची आणि शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे. शिवरायांच्या पुतळ्यासमोर येऊन नतमस्तक व्हावे. राहुल गांधींनी महाराजांची माफी मागितली नाही, तर त्यांना फिरू देणार नाही, असा इशारा मंत्री नीतेश राणे यांनी दिला आहे.

शिवरायांचा मालवणमधील पुतळा कोसळून अवमान केल्याबद्दल मोदी-फडणवीस केंव्हा माफी मागणार?

मुंबई, दि. १९ फेब्रुवारी २५
शिवजयंतीच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटवरून भाजपाचे नेते जो आकांडतांडव करत आहेत त्याआधी त्यांनी त्यांचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीट नीट पहावे आणि नंतर बोलावे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान जर कोणी केला असेल तर भाजपानेच वारंवार केला असून त्यांनीच माफी मागावी, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना अतुल लोंढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवजयंती निमित्त ट्विट करून श्रद्धांजली अर्पण केली आहे, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त केलेल्या ट्विटमध्येही नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली असेच लिहिलेले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या ट्विटवरून भाजपा नेत्यांनी राजकारण करू नये. मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी केले होते. भाजपाच्या सरकारनेच हा पुतळा उभारला आणि अवघ्या आठ महिन्यात तो कोसळला आणि महाराजांचा अवमान केला, कोट्यवधी शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या पण अजून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली नाही. अरबी समुद्रात छत्रपतींचे भव्य स्मारक उभारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जलपुजनही करण्यात आले पण अद्याप या स्मारकाची एक विटही रचलेली नाही, त्याबद्दल भाजपा माफी कधी मागणार, असा प्रश्न अतुल लोंढे यांनी विचारला आहे.

भाजपाच्या अनेक नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अवमान केला. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही महाराजांचा अपमान केला पण त्याबद्दल भाजपाच्या नेत्यांना जराही शरम वाटत नाही, माफी मागत नाहीत आणि राजकीय स्वार्थासाठी महाराजांचा वापर करतात अशा प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो असेही अतुल लोंढे म्हणाले.

भाजपा सरकारची अवस्था दिल्लीत मुजरा, गल्लीत गोंधळ सारखी, डान्सबार पुन्हा सुरु करण्यास काँग्रेसचा विरोध.

गड-किल्ले आपली प्रेरणा व अस्मिता, पर्यटनाच्या नावाखाली गड, किल्ल्यांवर बार, पब सुरु करु नका.

मुंबई, दि. १९ फेब्रुवारी २०२५
छत्रपती शिवाजी महाराजांनी आठरापगड जातीच्या मावळ्यांच्या साथीने स्वराज्य उभे केले. बलाढ्य शुत्रूच्या विरोधात गनिमी कावा पद्धतीने त्यांनी लढाई लढली, तीच आमची प्रेरणा आहे. शिवाजी महाराज केवळ औरंगजेब, निजामशाह, आदिलशाह यांच्याशीच लढले नाहीत तर तत्कालीन धर्मव्यवस्थेशी त्यांना लढा द्यावा लागला. या लढ्यात वारकरी संप्रदाय, चक्रधर स्वामी, महात्मा बसवेश्वर यांच्या प्रवाहाची कास शिवाजी महाराजांनी धरली होती. बहुजन हिताय, बहुजन सुखाय ही महाराजांची शिकवण आहे, ती शिकवण त्यांची प्रेरणा घेऊनच आम्ही वाटचाल करु, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली, त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते, ते पुढे म्हणाले की, शिवाजी महाराजांविरोधातही अनेक प्रवृत्ती काम करत होत्या, त्यांच्या राज्याभिषेकालाही विरोध केला होता, त्याच प्रवृत्ती आजही आहेत. शिवाजी महाराज यांची लढाई राज्यव्यवस्था व तत्कालीन अर्थव्यवस्थे विरोधातही होती तशाच पद्धतीने आज सत्ता ही मूठभर लोकांच्यासाठी राबवली जात आहे. धर्मव्यवस्थेतही मूठभर लोक आम्हीच सर्वेसर्वा असे माननारे आहेत, या प्रवृत्तींच्या विरोधात आम्हाला लढावे लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेचे व त्यांनी दिलेल्या सामाजिक दर्शनाच्या माध्यमातूनच वाटचाल करू असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती म्हणजे महाराष्ट्र धर्म जागवावा ही शपथ घेण्याचा दिवस आहे. आपण सर्व जाती धर्माचे लोक एक आहोत, हे आपले स्पिरीट आहे, आपला संस्कार आहे. या निमित्ताने स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्या जीवनावरील ‘छावा’ चित्रपट सरकारने करमुक्त करावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली.

गड किल्याच्या विषयावर बोलताना सपकाळ म्हणाले की, गड किल्ले आपल्या अस्मितेचे विषय आहेत, सत्तेत येण्यासाठी लाडकी बहिण योजनेकडे वारेमाप पैसा वळवला जाऊ शकतो तर आपल्याला प्रेरणा देणाऱ्या गड किल्ल्याकडेही पहावे, त्याचे खाजगीकरण करु नये, पर्यटकांच्यासाठी म्हणून गड, किल्ल्यावर बार, पब सुरु करु नयेत असेही ते म्हणाले.

डान्सबार संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राज्यातील सरकार म्हणजे दिल्लीत मुजरा व गल्लीत गोंधळ असा प्रकार आहे. डान्सबार बंद करत असताना सामाजिक पार्श्वभूमी व केस स्टडी करण्यात आल्या होत्या, या डान्स बारमुळे अनेक कुटुंबं उद्ध्वस्थ झाली, काहींनी शेती विकून डान्स बार मध्ये पैसे उधळले हे पाहूनच डान्सबार बंदी करण्याचा धाडसी निर्णय तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी घेतला होता. डान्सबार सारख्या विकृत्तीला चालना देऊ नये, काँग्रेसचा त्याला विरोध असेल असेही सपकाळ म्हणाले.

कल्याणमधील ६५ अनधिकृत इमारतींच्या प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुंबई अदानीच्या व बिल्डरच्या घशात घालण्याचे भाजपा सरकारचे षडयंत्र सुरुच आहे. हजारो एकर शासकीय जमीन देऊनही त्यांची भूख भागत नाही म्हणून ते आता सर्वसामान्यांची घरेही गिळत आहेत. कल्याणमधील हजारो लोकांना रस्त्यावर यावे लागणे हे शासन प्रशासनाचा निर्ढावलेपणा आहे. परंतु कुठल्याही परिस्थितीत कष्टकरी, नोकरदार व झोपडट्टीतील लोकांच्या अधिकाराचे हनन होता कामा नये ही काँग्रेसची भूमिका आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी बी. एम. संदीप, रामकिसन ओझा आदी उपस्थित होते.