Home Blog Page 449

पहिल्या ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी स्पर्धेत तब्बल ३७५ हून अधिक कुस्तीपटू लढणार

लोणीकंद येथे रंगणार ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी स्पर्धा : दिनांक २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी स्पर्धा

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने जिल्हा कुस्तीगीर तालीम संघ पुणे यांच्या सहकार्याने व पै. ओंकार कंद युवा फाऊंडेशन, श्री प्रदीपदादा कंद युवा मंच यांच्या वतीने आयोजन

पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने पहिल्या वरिष्ठ ग्रीको रोमन राज्यस्तरीय अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी लोणीकंद मधील हिंद केसरी मैदान येथे ही स्पर्धा होणार आहे. जिल्हा कुस्तीगीर तालीम संघ पुणे यांच्या सहकार्याने व पै. ओंकार कंद युवा फाऊंडेशन, श्री प्रदीपदादा कंद युवा मंच यांच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत ३७५ पेक्षा अधिक कुस्तीपटू ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी किताबासाठी लढणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे आणि सरचिटणीस योगेश दोडके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष विलास कथुरे, स्पर्धेचे स्वागताध्यक्ष पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद व स्पर्धेचे आयोजक भाजपा युवा नेते ओंकार हनुमंत कंद, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मेघराज कटके उपस्थित होते. स्पर्धेचे उद्घाटन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार राहुल कुल, कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस व सरचिटणीस योगेश दोडके यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

संदीप भोंडवे म्हणाले, या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची मान्यता असलेले ६ महानगरपालिका व ३६ जिल्हा असे एकूण ४२ जिल्हा कुस्तीगीर संघ सहभागी होणार आहेत. एकूण १० वजनगटामध्ये ३७५ ते ४०० कुस्तीगीर स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी ३० तांत्रिक अधिकारी ( पंच ) निवडण्यात आले असून ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी किताबासाठी ८७ ते १३० किलो हा वजनगट निश्चित करण्यात आलेला आहे

प्रदीप कंद म्हणाले, स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडामंत्री दत्तामामा भरणे, नामदार जयकुमार गोरे, आमदार ज्ञानेश्वर कटके व आमदार बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते होणार आहे. ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लास चांदीची गदा देण्यात येणार आहे.

ओंकार हनुंमत कंद म्हणाले, स्पर्धा पहायला येणारे कुस्ती शौकीन, कुस्तीपटू, तांत्रिक अधिकारी यांच्या दृष्टीने योग्य व्यवस्थापन करण्यात आले आहे. कुस्तीपटूंना सर्व आवश्यक सुविधा यावेळी देण्यात येतील. महाराष्ट्र केसरी विजेत्यास चांदीची गदा व रोख बक्षीस तसेच इतर वजनीगटांसाठी देखील आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

MIT १८व्या राष्ट्रीय पातळीवरील आंतर-विद्यापीठ व महाविद्यालय ‘समिट-२०२५’ क्रीडास्पर्धेचे आयोजन


(क्रीडा माध्यमातून राष्ट्रउभारणी आणि विश्वशांती)
या स्पर्धेत पुण्यातील १४० महाविद्यालये, महाराष्ट्रातून १० व इतर राज्यातून ३ महाविद्यालयांचा सहभाग
 
पुणे, दि.२२ फेब्रुवारी : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे १८वी राष्ट्रीय पातळीवरील आंतर-विद्यापीठ व  महाविद्यालय ‘समिट-२०२५’ या क्रीडास्पर्धेचे मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ ते शनिवार, दि.१ मार्च २०२५ पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २००४ पासून घेण्यात येत आहेत.
सर्वसाधारणपणे अभियांत्रिकी बरोबर अन्य शाखेतील विद्यार्थांना त्यांच्या अभ्यासक्रमामुळे विद्यापीठाच्या क्रीडा स्पर्धा व इतर स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास अडचणी येतात. त्यामुळे बहुतांशी विद्यार्थ्यांना इच्छा असूनही व क्रीडा नैपुण्य असूनही त्यांना क्रीडा कौशल्य दाखविण्याची संधी मिळत नाही. ही निकड दूर करण्यासाठी एमआयटी संस्था गेली १८ वर्षे समिट क्रीडा स्पर्धाचे आयोजन करत आलेली आहे. सर्वप्रथम २००४ साली स्पर्धेची सुरूवात झाली, २००७ सालापासून सातत्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून याआधी व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, सुशील कुमार, विजेंदर सिंग, मेरी कोम, दिलीप वेंगसरकर, इरफान पठाण, योगेश्वर दत्त, चेतेश्वर पुजारा, बायचुंग भुतिया, पी.आर.श्रीजेश, रेहान पोंचा व रंजन सोढी हे लाभले होते.
उद्घाटन समारंभ
या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी सायं ५.०० वा. एमआयटी डब्ल्यूपीयूच्या क्रीडांगणावर होणार आहे. या समारंभासाठी अर्जुन पुरस्कार सन्मानीत व पॅरा ऑलम्पिक सुवर्ण पदक विजेते श्री.मुरलीधर पेठकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे असतील. ही स्पर्धा एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याकारी अध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनात संपन्न होत आहे.
या समारंभात क्रीडा क्षेत्रात भरीव कामगीरी केल्याबद्दल ऑलम्पिकमध्ये हॉकी खेळात अद्वितीय खेळी खेळल्याबद्दल अर्जुन पुरस्कार विजेत्या रेखा भिडे यांना एमआयटी-डब्ल्यूपीयू क्रीडा महर्षि पुरस्कार तसेच, ज्युडो खेळातील शिवछत्रपती पुरस्कार सन्मानीत योगेश धाडवे यांना एमआयटी-डब्ल्यूपीयू क्रीडा आचार्य पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
या स्पर्धेमध्ये क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धीबळ, कबड्डी व ई स्पोर्टस अशा एकूण ९ क्रीडाप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.
या स्पर्धेसाठी करंडक, पदके व रोख रक्कम असे एकूण ११ लाख रुपयांची बक्षिसे व प्रशस्तीपत्रके दिली जातील. सर्व साधारण विजेत्या संघाला रोख बक्षिस व करंडक दिले जाईल. प्रत्येक क्रीडाप्रकारातील विजेत्या संघाला करंडक, सुवर्ण पदक व रोख पारितोषिक देण्यात येईल. याखेरीज उपविजेत्या संघाला करंडक, रौप्य पदक व रोख पारितोषिक देण्यात येणार  आहे.
पारितोषिक वितरण समारंभ
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार, दि.१ मार्च २०२५ रोजी सायं ४.०० वा. माईर्स एमआयटी, पुणेच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात होणार आहे. या समारंभासाठी कुस्ती खेळासाठी अर्जुन अवार्ड आणि द्रोणाचार्य पुरस्कार सन्मानीत पै. सुजीत मान हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेत पुणे विभागातून १४० महाविद्यालये, उर्वरित महाराष्ट्रातून १० व महाराष्ट्राबाहेरून ३ विद्यापीठ व महाविद्यालये असे एकूण १५३ महाविद्यालयांनी विविध क्रीडास्पर्धांमध्ये आतापर्यंत भाग घेतला आहे. या सर्व विद्यापीठ व महाविद्यालयांचे मिळून एकूण सुमारे २२०० स्पर्धक भाग घेत आहेत. इतक्या व्यापक प्रमाणात खेळाडूंचा सहभाग असलेली देशातील ही एकमेव  स्पर्धा आहे.
खेळाच्या माध्यमातून राष्ट्रउभारणी आणि विश्वशांती हा या स्पर्धेच्या आयोजनामागचा प्रमुख हेतू आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमाखेरीज शारीरिक क्षमतेकडेही लक्ष द्यावे, अशी संयोजकांची अपेक्षा आहे. विविध क्रीडाप्रकारांमधील निष्णात खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे व इतर विद्यार्थ्यांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी हा ‘समिट -२०२५’  स्पर्धेच्या आयोजनातील एक प्रमुख हेतू आहे.
अशी माहिती  समिट २०२५ च्या आयोजन समितीचे एमआयटी डब्लयूपीयूचे विद्यार्थी प्रतिनिधी व एमआयटी डब्ल्यूपीयूच्या क्रीडा विभागाचे सहयोगी संचालक प्रा. विलास कथुरे व प्रा.अभय कचरे, प्रा. रोहित बागवडे, राहुल बिराजदार, निखिल वणवे आणि सहकारी बाळू सणस व अशोक नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

‘सावरकर ते शिरवाडकर‌’ सांगीतिक कार्यक्रम 26 फेब्रुवारीला

पुणे : मराठी राजभाषा दिन आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ‌‘सावरकर ते शिरवाडकर‌’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देणाऱ्या अनमोल रत्नांचा माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते या प्रसंगी सन्मान केला जाणार आहे.
पुणे पुस्तक महोत्सव आयोजित आणि संवाद, पुणेची निर्मित गीत-संगीत, अभिवाचन, कविता, पोवाडा यांचा समावेश असलेला कार्यक्रम बुधवार, दि. 26 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे आणि संवाद, पुणेचे सुनील महाजन यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
कार्यक्रमाची संकल्पना संवाद, पुणेचे सुनील महाजन यांची असून सूत्रधार निकिता मोघे आहेत. संहिता लेखन आणि निवेदन अक्षय वाटवे यांचे असून चैत्राली अभ्यंकर, संजीव मेहेंदळे, सुजित सोमण गीते सादर करणार आहेत. केदार परांजपे (की-बोर्ड), दिप्ती कुलकर्णी (संवादिनी), राजू जावळकर (तबला), उद्धव कुंभार (ताल वाद्य) साथसंगत करणार आहेत.
मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देणारे ज्येष्ठ कवी, लेखक फ. मुं. शिंदे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, डॉ. श्रीपाल सबनीस, लक्ष्मीकांत देशमुख, भारत सासणे, डॉ. रवींद्र शोभणे यांचा माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

सुनियोजित व सुंदर शहरांसाठी ‘डिझाईन’ महत्त्वपूर्ण-माधुरी मिसाळ; व्हीके ग्रुप आयोजित ‘व्हीकलेक्टिव्ह’ प्रदर्शनाचे व शहरीकरणावर चर्चासत्राचे उद्घाटन

पुणे, ता. २१: “पुणे शहर वेगाने विकसित होण्यासह सर्वच दिशांनी विस्तारत आहे. त्यामुळे नगरनियोजनासोबत शहरातील बांधकामांचे, सार्वजनिक तसेच खासगी आस्थापनांचे डिझाईन अतिशय महत्त्वाचे आहे. शहर नियोजन आणि डिझाईन या संदर्भातील प्रयत्नांना राज्य सरकार पाठिंबा देईल,” असे प्रतिपादन राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केले.

आर्किटेक्चर, एन्व्हायर्नमेंट, इंटेरियर डिझाईन, टाऊन प्लॅनिंग व अर्बन डिझाईन क्षेत्रात कार्यरत पुण्यातील व्हीके ग्रुपच्या वतीने ५१ व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित ‘व्हीकलेक्टिव्ह-बिल्डिंग द सिटी वि कॉल होम’ या तीन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन माधुरी मिसाळ यांच्या हस्ते झाले. घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्रात झालेल्या कार्यक्रमात आमदार सिद्धार्थ शिरोळे, व्हीके ग्रुपचे संस्थापक विश्वास कुलकर्णी, व्यवस्थापकीय संचालक ऋषिकेश कुलकर्णी, अनघा परांजपे-पुरोहित, अपूर्वा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी मगरपट्टा सिटी कॉर्पोरेशनचे प्रतीक मगर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रावत, पीएनजी ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ, सवाई गंधर्व महोत्सवाचे संचालक मुकुंद संगोराम व केपीआयटी कमिन्सचे रवी पंडित यांना ‘लीडर्स ऑफ चेंज’ने सन्मानित करण्यात आले. राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीत व्हीके ग्रुपने गेल्या ५० वर्षांत साकारलेल्या आकर्षक, नाविन्यपूर्ण व वास्तुकलेच्या डिझाईन्स व प्रकल्पाच्या संग्रहाचे प्रदर्शन पाहण्याची संधी पुणेकरांना यानिमित्ताने मिळणार आहे.
माधुरी मिसाळ म्हणाल्या, “पुण्याची परंपरा मोठी आणि अभिमानास्पद आहे. मात्र, आधुनिक काळात पुणे शहराचे नव्याने नियोजन करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी डिझाईनचे महत्त्व आहे. सर्व दिशांनी सतत वेगाने विस्तारणारे आपले शहर वाहतुकीच्या समस्येनेही ग्रासले आहे. शहराचा विस्तार होताना बांधकाम, नियोजन आणि डिझाईन, यांचा विचार प्राधान्याने झाला पाहिजे. शहराचे काही क्लस्टर विभाजन करणे आवश्यक आहे. त्यातून शहराचे सौंदर्य टिकून राहण्यास साह्य मिळेल, असा मार्ग आर्किटेक्ट असोसिएशन आणि अन्य घटकांनी मिळून काढला पाहिजे.”
“व्हीके ग्रुपच्या माध्यमातून गेली ५० वर्षे सातत्याने पुण्यासह इतरत्रही उत्तम दर्जाच्या इमारती, आरेखन, पर्यावरणपूरक बांधकामे असे कार्य सातत्याने सुरू आहे. सलग पाच दशके असे योगदान देणे, ही महत्त्वाची बाब असून, त्यासाठी व्हीके ग्रुप अभिनंदनास पात्र आहे. आज इथे सन्मानित विविध क्षेत्रातील मान्यवर पुणेकरांचे ‘कलेक्शन’ सादर केले आहे. पुण्याच्या सर्वांगीण विकासात त्यांचे योगदान मोलाचे राहिले आहे,” अशा शब्दात माधुरी मिसाळ यांनी कौतुक केले.
‘पुणे हे सर्व क्षेत्रांत अतुलनीय भरारी घेणाऱ्या प्रतिभावंतांचे शहर आहे. पुणेकरांनीच शहर आणि शहराचे कर्तृत्व वाढवले व उंचावले आहे,’ असे मुकुंद संगोराम यांनी, तर ‘सध्या नियोजन बाजूला ठेवून अफाट एफएसआय दिला जात असल्याने शहराचे मूळ सौंदर्य आणि आटोपशीरपणा नष्ट झाला असून, शहराची चुकीच्या पद्धतीने होणारी वाढ थांबवण्याबाबत विचार करावा, असे प्रमोद रावत यांनी नमूद केले. अपूर्वा कुलकर्णी यांनी मानपत्रांचे वाचन केले. विजय साने यांनी प्रास्ताविक केले. मीनल पाटील यांनी सूत्रसंचालन केले

भविष्यातील शहरांवर चर्चा
‘बिल्डिंग द सिटी ऑफ टुमारो’ या विषयावरील चर्चासत्र कार्यक्रमाच्या उत्तरार्धात झाले. त्यामध्ये ‘क्रेडाई’चे अध्यक्ष रणजित नाईकनवरे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सच्या पुणे चॅप्टरचे चेअरमन विकास अचलकर, पर्सिस्टंट सिस्टीम्सचे मुख्य प्रशासकीय अधिकारी जयंत कोंडे, एमसीसीआयएच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य विवेक साधले, ब्रिक्सच्या संस्थापिका पूजा मिसाळ, व्हीके ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आर्कि. हृषीकेश कुलकर्णी सहभागी झाले होते.

सर्वसामान्यांच्या भाषेला सामावून घेतल्यास मराठीला अधिक समृद्धी – डॉ.तारा भवाळकर

0

दिल्ली दि.२१- मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला हे अभिमानास्पद असून मराठीचा वापर- व्यवहार सर्व स्तरांत व सर्वदूर वाढला पाहिजे. प्रमाण लेखनाइतकीच बोलीभाषाही महत्वाची आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या भाषेला सामावून घेतले तरच आपली भाषा अधिकाधिक समृद्ध होईल, असे प्रतिपादन ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी आज येथे केले.   

नवी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियम मध्ये उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरीत  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या दुसऱ्या सत्रात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार,  मावळते अध्यक्ष डॉ.रवींद्र शोभणे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषा तांबे, कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे , कोषाध्यक्ष प्रकाश पागे,  संमेलनाचे निमंत्रक संजय नहार आदी उपस्थित होते.

डॉ.भवाळकर म्हणाल्या, मराठी भाषेची संमेलने आयोजित करतांना. मराठी लिहिणारी, बोलणारी, मराठीत व्यवहार करणरी माणसे वाढणे आणि ग्रामीण आणि सीमावर्ती भागात मराठी भाषेला पुढे नेण्याचे प्रयत्न करणाऱ्या लेखक, कवी, प्रकाशकांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, मराठी भाषा शिक्षणातून कमी होत चालली आहे.  मराठी भाषेच्या विकासासाठी दहावीपर्यंतचे शिक्षण मराठीतूनच व्हावे. इंग्रजी माध्यमातून मराठीचे शिक्षण देतांना उच्च मराठीची पुस्तकेच शिकवावी.  मराठी भाषेचा विस्तार होण्यासाठी सर्वांनी कृतीशील होण्याची  आणि तिला वैश्विकतेकडे नेतांना  आपणही विशालतेच्या भावनेने  समावेशकतेचे सूत्र स्विकारण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले.

साहित्य संमेलन सुरू झाल्यानंतर ते विशिष्ट वर्गाचे संमेलन असल्याचे नमूद करून त्या म्हणाल्या, आज संमेलनाची व्याप्ती विस्तारते आहे.  मराठी भाषेचा विकासात  शिक्षण न घेतलेल्या, परंपरेने शहाणपण आलेल्यांनीदेखील महत्वाचे  योगदान दिले आहे. साक्षरतेच्या जोडीला शहाणपण नसेल तर साक्षरतेचा उपयोग नाही. पुस्तकापेक्षा संत कवींनी, पारंपरिक शिक्षण न घेतलेल्या महिला कवयित्रींनी जास्त ज्ञान दिले आहे.

भाषा समाजातील सर्व परंपरा , लोकव्यवहार आणि विचारांची वाहक असते.  लोककलेत  नृत्य, गाणी, नाट्य, संगीत, कला, वाद्य, कथा असते,  एखादी देवता यांच्याशी लोककला जोडलेली असते. जीवनाचं समग्र आकलन लोककलेसोबत  प्रत्यक्ष लोकजीवनात असतं. लोकजीवनातील सर्व साधनं मिळून लोकसाहित्य बनते. लोकसाहित्यात या सगळ्याचा अविष्कार होतांना दिसतो.

लोककलेतील गीतांचा उपयोग सामाजिक चळवळींसाठी मोठ्या प्रमाणात झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात जात्यावरची ओवी गाणारी स्त्री राजकीयदृष्ट्याही जागरूक होती. भोवतालच्या वातावरणातून आलेलं शहाणपण हे लोकपरंपरेतून मोठ्या प्रमाणात होतं, म्हणून कामगार चळवळीतून आलेली मंडळी मोठ्या प्रमाणात लेखक-कवी झाले. त्यातून लोकसंस्कृतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. लोकसंस्कृतीत आदीम काळापासून आजपर्यंतचा प्रवाह दिसतो.

डॉ.शोभणे म्हणाले,  मराठी भाषेचा प्रवास गेल्या अडीच हजार वर्षापासून अव्याहतपणे सुरू आहे आणि पुढेही असाच जोमाने सुरू राहणार आहे. बृहन्महाराष्ट्रातील विविध साहित्य संस्था मराठी भाषेच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत. या साहित्य संस्थांमध्ये वावरणारी नवी पिढीदेखील आस्थेने काम करीत आहे. अशा साहित्यिक संस्थांना शासनाकडून आर्थिक पाठबळ मिळाल्यास  या प्रयत्नांना बळ मिळेल. नव्या मंडळीच्या मनात साहित्याविषयी गोडी निर्माण करण्याचे कार्य जुन्या मंडळींनी करणे आवश्यक आहे. या संदर्भात शासनाची भूमिका अत्यंत सकारात्मक आहे. मराठी भाषा विभागाची स्थापना करून त्या माध्यमातून मराठीच्या विकासाचे चांगले कार्य करण्यात येत आहे. विश्व संमेलनाच्या निमित्ताने जगातील मराठी माणसांना एकत्र आणण्याचे कार्य झाले असल्याचे सांगून त्यांनी राज्य शासनाला धन्यवाद दिले.

अध्यक्षपदाची सूत्रे नूतन अध्यक्षांकडे सोपवितांना कृतार्थतेची भावना असल्याचे नमूद करून डॉ.शोभणे म्हणाले,  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे हे संमेलन असल्याने त्याला महत्व आहे, हा योग अतिशय महत्वाचा आहे. आजच्या मराठी साहित्य विश्वाला तर्कनिष्ठ आणि वैज्ञानीक दृष्टी देणारे साहित्यिक म्हणून तर्कतिर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या अध्यक्षतेखाली 1954 मध्ये दिल्लीत साहित्य संमेलन झाले होते.  त्याच पायवाटेवरून पुढे जाणाऱ्या आणि संशोधनाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या  डॉ.तारा भवाळकर अध्यक्ष झाल्या आहेत.  साहित्य संमेलनाच्या माध्यमातून  सकारात्मक ऊर्जा देण्याचे आणि त्यासाठी पायवाट निर्माण करण्याचे कार्य होते, असे डॉ.शोभणे म्हणाले.

यावेळी ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.रवींद्र शोभणे यांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रे डॉ.भवाळकर यांच्याकडे सोपविले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे वार्षिक  ‘अक्षरयात्रा-मराठी साहित्यिकांचे समाजभान’ चे प्रकाशन डॉ.भवाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

सरकारी जाहिरातींवर कोट्यावधींचा खर्च पण, महिला संमलेनाध्यक्षांचाच् विसर…!


संमेलनाध्यक्षा या ‘महीला साहीत्यीक व लेखीका’ असल्याने उल्लेख नाही काय..?

काँग्रेस चा संतप्त सवाल…

९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या जाहिरातीं मधून संमलेनाअध्यक्ष गायब  

पुणे : दि २१ फेब्रु
मराठीला भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर मायमराठीचा जागर देशाच्या राजधानीत करण्यासाठी
“९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन” आज (जागतिक मातृभाषा दिन) पासून.. दिल्ली येथे सुरू झाले आहे.
प्रत्येक मराठी माणसासाठी ही अभिमानास्पद बाब आहे. संमेलन दिल्लीत असले तरी राज्य सरकार कडून या अ भा मराठी ‘साहित्य संमेलनाच्या’ जाहिरातींवर कोट्यावधी रुपयांचा खर्च सरकारी तिजोरीतुन करण्यात आला आहे.
मात्र या जाहिरातीं मधून संमेलनाध्यक्षा, महीला साहीत्यीक व लेखीका श्रीमती तारा भवाळकर यांचेच छायाचित्र वा साधे नामोल्लेख ही नाही.. ही चिड आणणारी बाब असून, ‘भाजप अधीन महायुती सरकारचे’ महीलां बाबत असलेला दृष्टिकोन यातून स्पष्ट होत असल्याची टिका कॉँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली असून याचा निषेध ही केला आहे.    
साहित्यिकांचा मेळा समजल्या जाणाऱ्या या संमेलनाच्या जाहिरातींमधून संमेलनाध्यक्षांना व स्वागताध्यक्षांना वगळणे हा मराठी साहित्य संस्कृतीचा अवमान असल्याचे त्यांनी सांगितले.
पंडीत नेहरू पंतप्रधान असतांना दिल्ली येथे अ भा मराठी साहित्य संमेलन झाले होते व तत्कालीन स्वागताध्यक्ष हे पुणे शहराचे प्रतिनिधित्व करणारे तत्कालीन केंद्रीय मंत्री काका साहेब गाडगीळ होते..!
त्या नंतर यंदा दुसऱ्यांदा दिल्ली येथे सरहद, पुणे`च्या पुढाकारातून साहित्य संमेलन होत असताना, सरहद्द संस्थेचे संजय नहार, साहित्य संमेलनाच्या ६ व्या महीला अध्यक्षा श्रीमती तारा भवाळकर, स्वागताघ्यक्ष शरदराव पवार व मराठी भाषेस अभिजात दर्जा मिळणे बाबत.. केंद्र सरकार कडे २०१४ सालीच प्रस्ताव पाठवणारे राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण इ चा नामोल्लेख करणे महाराष्ट्राच्या संस्कार व संस्कृतीला अधिक शोभले असते असेही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी म्हटले आहे.
या ऐतिहासिक संमेलनाच्या जाहिरातींवर फडणवीस सरकारने वारेमाप खर्च केला आहे. मात्र या जाहिरातींवर केवळ उद्घाटक पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचेच फोटो टाकुन केवळ साहीत्य संमेलनाच्या संबंधितांचा नामोल्लेख टाळून, केवळ स्वतःचीच मिरववण्याचा उद्योग निंदनीय असल्याचे काँग्रेस ने म्हटले आहे. पान भर जाहिरातींमध्ये राज्यात झालेल्या साहीत्य संमेलना बाबत ची पुरक माहिती दिली असती तर राज्यातील जनतेच्या दृष्टीने ते हितावह झाले असते.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्या नंतर राजधानी दिल्लीत मराठी भाषेचा जागर होत असताना संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ लेखिका डॉ. तारा भवाळकर आणि संमेलन स्वागताध्यक्ष शरद पवार यांचा राज्य सरकारला विसर पडल्याचा निषेध कॉँग्रेस प्रवक्ते व प्रदेशाध्यक्ष गोपाळदादा तिवारी यांनी केला आहे.

कोथरुड मधील समान पाणीपुरवठा योजनेची कामे जलदगतीने पूर्ण करा!

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश

पुणे-कोथरुड विधानसभा मतदारसंघातील समान पाणी पुरवठा योजनेची कामे जलदगतीने पूर्ण करावीत, असे निर्देश नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिले. तसेच, पाणी गळती रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील पाणीपुरवठ्याचा आढावा नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज घेतला. या बैठकीला पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप, अधिक्षक अभियंता श्रीकांत वायदंडे, प्रसन्नराघव जोशी, कार्यकारी अभियंता विनोद क्षीरसागर, उप अभियंता प्रशांत कदम, कनिष्ठ अभियंता गणेश काकडे उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पुणे आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील कामाबाबतचा सविस्तर तपशील नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या समोर मांडला. समान पाणीपुरवठा प्रकल्प अंतर्गत पुणे शहरात १४१ झोन निश्चित केले असून त्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात एकूण १७ झोन आहेत. प्रत्येक झोन मध्ये अस्तित्वातील GSR अथवा प्रस्तावित ESR/ GSR (पाण्याच्या टाक्यांमधून) झोनसाठी पाणीपुरवठा प्रस्तावित आहे. अस्तित्वातील वितरण नलिका व आवश्यकतेनुसार नवीन जलवाहिन्या टाकून नागरिकांना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे, असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी नामदार पाटील यांना दिली.

तसेच, कोथरूड मतदारसंघातील १७ झोनमधील अस्तित्वातील नवीन पाण्याच्या टाक्यांपैकी १६ टाक्यांचे काम पूर्ण झाले असून; आयडियल कॉलनी टाकीच्या जागेबाबत लॉ कॉलेज, पुणे महानगरपालिका यांच्यामध्ये जागेबाबत न्यायालयीन वाद सुरू आहे. त्यामुळे पाण्याचे टाकीचे काम अपूर्ण असल्याची बाब निदर्शनास आणून दिली.त्यावर सदर सर्व कामे जलदगतीने पूर्ण करावीत; तसेच आयडियल कॉलनीच्या टाकीचा प्रश्न सामोपचाराने सर्वांना विश्वासात घेऊन मार्गी लावावा, अशा सूचना दिल्या.

समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत कोथरुड मधील १७ झोन मध्ये २८३९७ इतके AMR मीटर बसविणे प्रस्तावित असून २३२०९ AMR मीटर बसवण्यात आले असून उर्वरित सुमारे ५००० AMR मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. सदर कामामुळे पाण्याच्या गळतीचे प्रमाण पूर्वीपेक्षा कमी झाले असून २०% पर्यंत कमी करण्यासाठी आवश्यक कामे सुरु आहेत, अशी माहिती ही अधिकाऱ्यांनी नामदार पाटील यांना दिली.

त्यावर नामदार पाटील यांनी समाधान व्यक्त केले. तसेच, पुणे शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची मागणी पाहता, खडकवासला मधून पाणीपुरवठा होणे शक्य नाही. त्यामुळे पुणेकरांसाठी मुळशी धरणातून पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून; त्यावर लवकरच मार्ग निघेल, असा विश्वास व्यक्त केला.

“सुनीता विल्यम्स १९ मार्च रोजी सुखरूप घरी परततील”

0

एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडिया २०२५ मध्ये डॉ. गौतम चट्टोपाध्याय

·         “येथे कोणताही कट रचण्याचा सिद्धांत नाही; तांत्रिक बिघाडामुळे सुनीता विल्यम्सचे परतणे उशिरा झाले,” असे डॉ. गौतम चट्टोपाध्याय म्हणाले.

·         “पृथ्वीबाहेर आपल्याला जीवन सापडलेले नाही; एकही पेशी नाही,” डॉ. गौतम चट्टोपाध्याय म्हणाले.

मुंबई, २१ फेब्रुवारी २०२५: “येथे कोणताही कट रचण्याचा सिद्धांत नाही. नासा सुनीता विल्यम्सना अंतराळात ठेवत नाहीये. तांत्रिक बिघाडामुळे सुनीता विल्यम्सचे परतणे उशिरा झाले, परंतु १९ मार्च रोजी ते सुरक्षितपणे घरी परततील. खरं तर, आम्ही या संधीचा वापर अवकाशाचा अधिक शोध घेण्यासाठी करत आहोत,” असे नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि कॅलटेक येथील अभ्यागत प्राध्यापक डॉ. गौतम चट्टोपाध्याय यांनी आज मुंबईत एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडिया २०२५ मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) अडकलेल्या नासाच्या सुनीता विल्यम्सबद्दल सांगितले.

अंतराळ संशोधनात भारताच्या वाढत्या नेतृत्वाच्या पार्श्वभूमीवर, विश्व समजून घेण्याच्या प्रयत्नात मानवजातीच्या नवीनतम शोधांचा शोध घेत डॉ. गौतम चट्टोपाध्याय म्हणाले, “पृथ्वीच्या बाहेर जीवन अस्तित्वात असू शकते का? उत्तर हो आहे. परंतु आपल्याला पृथ्वीच्या बाहेर जीवन सापडलेले नाही; एकही पेशी नाही. परंतु ४०० अब्ज तारे आणि त्यापैकी बहुतेक ग्रह त्यांच्याभोवती फिरत असल्याने, पृथ्वीच्या पलीकडे जीवन अस्तित्वात असण्याची शक्यता आहे. आपले ध्येय असा ग्रह शोधणे आहे जिथे जीवन शाश्वत असेल.”

‘अवकाशातील साहसे – विश्वातील आपले स्थान’ या सत्रात बोलताना डॉ. गौतम चट्टोपाध्याय पुढे म्हणाले, “आपण ज्ञात असलेल्या ज्ञानाने अज्ञाताचा शोध घेतो.पण आपल्याला हे देखील माहित नाही की जीवनाची सुरुवात कशी होऊ शकते किंवा ते कुठे असू शकते. आपण तेच शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. या विश्वात आनंदी जीवन जगण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणजे आपली पृथ्वी. आपण मंगळावर थेट का जावे? तुम्हाला हवे असल्यास आम्ही तुम्हाला तिथे पाठवू शकतो, पण ते एकतर्फी तिकीट आहे.”

डॉ. गौतम चट्टोपाध्याय यांनी जागतिक परिदृश्यात भारताच्या अतुलनीय क्षमतेवर भाष्य केले आणि ते म्हणाले, “इस्रो आणि नासा सध्या एका प्रकल्पावर सहयोग करत आहेत. इस्रो उत्तम काम करत आहे आणि यशस्वी मोहिमा राबवत आहे.”

खगोलशास्त्र हे ज्योतिषशास्त्रापेक्षा कसे वेगळे आहे याबद्दल बोलताना डॉ. गौतम चट्टोपाध्याय म्हणाले, “खगोलशास्त्र खरोखरच विश्वाकडे पाहण्याची तुमची दृष्टी उघडते आणि हे एक मोठे रहस्य आहे जे आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत.”

‘मानवतेची पुढची सीमा’ या थीमवर केंद्रित असलेल्या एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडिया २०२५ मध्ये, वेगाने बदलणाऱ्या जगात भारताच्या उदयातील आव्हाने आणि संधींचा शोध घेण्यासाठी विचारवंत आणि नवोन्मेषकांना एकत्र आणले जाईल. हवामान बदल, भू-राजकीय संघर्ष आणि एआय सारख्या तांत्रिक प्रगतीच्या पार्श्वभूमीवर, शिखर परिषदेने भारताची एक प्राचीन संस्कृती आणि भविष्य घडवण्यात लोकसंख्याशास्त्रीय शक्तीगृह म्हणून भूमिका उलगडली. दोन दिवसांच्या या शिखर परिषदेत जागतिक विचारवंत, बुद्धिजीवी आणि बदल घडवणाऱ्यांच्या कल्पनांचा संगम झाला, ज्यामध्ये विज्ञान, औषध, सामाजिक करार आणि जागतिक नेतृत्वातील परिवर्तनात्मक शक्यतांचा समावेश होता, विविध क्षेत्रातील तज्ञ सर्वांसाठी चांगल्या, अधिक शाश्वत जगाचे धाडसी दृष्टिकोन देत होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आले याचा मला फार आनंद, शरद पवारांनी केले मोदींचे कौतुक

0

नवी दिल्ली – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा राजधानी दिल्ली येथे पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले आहे.

शरद पवार म्हणाले, मराठी माणूस केवळ महाराष्ट्रात नव्हे तर आपल्या महाराष्ट्राचा झेंडा अटकेपार फडकावला आहे. दिल्ली मध्ये दिसतो, हरियाणामध्ये दिसतो, गुजरातमध्ये दिसतो. देशाच्या कानाकोपऱ्यात मराठी माणूस दिसून येतो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानीत दुसऱ्यांदा होत आहे. यावेळी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आले याचा मला फार आनंद झाला आहे. महाराष्ट्र शासन, महाराष्ट्राचे रसिक, साहित्यिक या सर्वांनी पाठपुरावा केला आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान मोदींनी मिळवून दिले.

पुढे बालताना शरद पवार म्हणाले, 1954 साली पहिल्यांदा दिल्लीला मराठी साहित्य संमेलन झाले. त्यावेळी देशाचे प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू होते. त्यांनी याचे उद्घाटन केले होते. मी जेव्हा याचे निमंत्रण देण्यासाठी गेलो तेव्हा मोदींनी एक मिनिट सुद्धा लावला नाही आणि महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आहे तर माझी उपस्थिती असणार आहे असे त्यांनी सांगून टाकले. इतकी संमेलने झाली, मात्र केवळ चार महिलांनाच संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले. तारा भवाळकर यांना संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले हे आनंददायी आहे. दिल्ली आणि महाराष्ट्राचे एक नाते आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीचे राजकीय आणि सांस्कृतिक संबंध आहेत, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, साहित्य क्षेत्रात अनेक भगिनींनी भर घातली आहे. साहित्य संमेलन म्हटले की राजकारण्यांचा इथे काय संबंध अशी चर्चा सुरू होते. राजकारण आणि साहित्य यांच्यातील संबंध जवळचा आहे. सध्या संवाद कठीण आणि नाजूक परिस्थितीमधून जात आहे. त्यामुळे आता साहित्यिकांची जबाबदारी वाढली आहे. संमेलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित आहेत, त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

माय मराठीच्या जयघोषात दुमदुमली राजधानी

0

दिल्लीकरांनी अनुभवला माय मराठीच्या ग्रंथदिंडीचा अभूतपूर्व सोहळा
दिल्ली : भव्य शोभा यात्रा, माय मराठीचा जागर, महाराष्ट्राची उज्जवल परांपरा जपणाऱ्या लोक कलाकारांच्या सादरीकरणाने आज (दि. 21) दिल्ली दुमदुमली. ग्रंथदिंडीचा दिमाखदार सोहळ्याने प्रारंभ आणि मान्यवरांच्या हस्ते संमेलनाचे ध्वजारोहण करण्यात आले. सरहद, पुणे आयोजित, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दि. 21 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी (तालकटोरा) येथे आयोजन करण्यात आले आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची ‌‘अमृतातही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळवीन‌’ ही ओवी तसेच कवी कुसुमाग्रजांच्या ‌‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा‌’ या ओळी चित्ररथावर साकारल्या होत्या. सरस्वतीचे चिन्ह, संत ज्ञानेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, वीणा यांची प्रतिकृती तसेच ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिकांच्या पुस्तकांच्या प्रतिकृती, छायाचित्रे अशा सांस्कृतिक ठेव्यातून अभिजात मराठीची भाषेची गुढी उभारण्यात आली होती.
अंबारीच्या चित्ररथातून ही दिमाखदार शोभायात्रा काढण्यात आली. ढोल ताशाचा गजर, आदिवासी नृत्य, लेझीम पथक, विविध महापुरुषांच्या वेशभूषेत सहभागी झालेले रसिक यांचा या शोभायात्रेत विशेष सहभाग होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पारंपरिक मराठी वेशभूषेतील स्त्री-पुरुष मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. चित्ररथाची संकल्पना महाराष्ट्र शासनाची होती.
पंचक्रोशी मावळ हवेली तालुक्यातील वारकरी संप्रदायाच्या घोरावडेश्वर डोंगर प्रासादिक दिंडीने टाळ, मृदंग, वीणेसह धरलेल्या तालावर साहित्यप्रेमी दंग झाले. दिंडीपुढेे डोक्यावर तुळस घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या. महिलांनी मराठी संस्कृतीची ओळख दर्शविताना फुगडीचा फेर धरला तर कल्याणच्या लेझिम पथकाने बहारदार लेझिम सादर केलेे. युवक-युवतींनी आदीवासी नृत्य केले. सार्थ तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी, लीळाचरित्र, दासबोध आणि भारताचे संविधानाने ग्रंथदिंडीतील पालखीची शोभा वाढवली.
बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकेसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी मागणी करणाऱ्या टोप्या घालून सीमा भागातील मराठी बांधव साहित्य ग्रंथदिंडीत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
दिल्लीतील अमराठी रसिकांनी ढोल-ताशा वादन तसेच्या गोंधळींच्या सादरीकरणाच्या तालावर केलेले भांगडानृत्य विशेष आकर्षण ठरले. दिल्लीच्या प्रशस्त मार्गांवरून निघालेला हा पालखी सोहळा डोळ्यांत साठविण्यासोबतच आपापल्या मोबाईलमध्ये कैद करण्याचीही चुरस दिल्लीकरांत दिसून आली. रस्त्याच्या दुतर्फा झालेली लोकांची गर्दी, वाहने पांगवताना वाहतूक पोलीसांनीही या पालखी सोहळ्याचा आनंद लुटला. यावेळी दिल्ली पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने उत्तम नियोजन आणि संयोजन करण्यात आले होते.
संसद भवन ते तालकटोरा मैदान दरम्यान काढण्यात आलेल्या ग्रंथ दिंडीचे स्वागत छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत मोठ्या जल्लोषात करण्यात आले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नावाने असलेले ग्रंथनगरीचे प्रवेशद्वार सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्यासमोर साहित्यप्रेमी आदराने नतमस्तक होत होते. या प्रसंगी दिल्लीस्थित राम मीना या विद्यार्थ्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुरेख रेखाचित्र काढले.
या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडप येथे संमेलनाचे ध्वजारोहण महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे, निमंत्रक संजय नहार, नियोजित अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, मिलिंद मराठे, 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, राजन लाखे, सुनीताराजे पवार, ॲड. प्रमोद आडकर, विनोद कुलर्की आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ पोलिसांवर संतापले .. म्हणाले,तेच तेच १० वेळा सांगायचे काय ? समजत नसेल तर ….

पुणे-कोथरूड मधील भाजपचा कार्यकर्ता देवेंद्र पुरुषोत्तम जोग (वय ३३, रा. कोथरूड) याला गजा मारणे टोळीकडून मारहाण झाल्यावर त्याबाबत माध्यमांमधून पडसाद उमटताच आज केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ पोलिसांवर प्रचंड संतापलेले दिसले . म्हणाले तेच तेच १० वेळा सांगायचे काय ? समजत नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने पाहू …

शिवजयंती च्या दिवशीं कोथरूड मध्ये देवेंद्र पुरुषोत्तम जोग (वय ३३, रा. कोथरूड) असे टोळक्याच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेचार ते पावणेपाचच्या सुमारास कोथरूडमधील भेलकेनगर चौक येथे घडली.त्यानंतर पोलिसांनी माध्यमांना याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने माध्यमांनी या प्रकरणी दिलेल्या वृत्तातून केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारणे टोळीकडून मारहाण झाल्याचे वृत्त वेगाने सोशल मीडियातून पसरले आणि आज मोहोळ स्वतः माध्यमांपुढे आले आणि त्यांनी सांगितले .. देवेंद्र जोग हा माझ्या कार्यालयात काम करत नाही मात्र तो भाजपचा कार्यकर्ता आहे . पोलिसांना वारंवार सांगायचे काय ? पुण्यातील गुन्हेगारीला त्यांनी आला घातला पाहिजे . नेमके मोहोळ काय म्हणाले ते ऐका त्यांच्याच शब्दात

गजा मारणे टोळीतील तिघांना 24 फेब्रु. पर्यंत पोलीस कोठडी

पुणे- आय टी अभियंता असलेल्या भाजपा कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्या गजा मारणे टोळीतील तिघांना न्यायालयाने 24 फेब्रु. पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ओम तिर्थराम धर्मजिज्ञासू Om Tirtharam Dharmajigyasu (वय ३५,रा. शिंदे चाळ, शास्त्रीनगर, कोथरुड), किरण कोंडिबा पडवळ Kiran Kondiba Padwal (वय ३१, रा. शेख चाळ, शास्त्रीनगर, कोथरुड), अमोल विनायक तापकीर Amol Vinayak Tapkir (वय ३५, रा. लालाबहादूर शास्त्री कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरुड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार कोथरुडमधील भेलकेनगर चौकात १९ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला होता. पोलिसांनी या तिघांना २० फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता अटक केली. त्यांचा चौथा साथीदार बाब्या ऊर्फ श्रीकांत संभाजी पवार (Babya Alias Shrikant Sambhaji Pawar हा फरार आहे. फरार बाब्या पवार याच्याविरुद्ध खुन, खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी असे कोथरुड, भारती विद्यापीठ, पौड, अलंकार पोलीस ठाण्यात ९ गुन्हे दाखल आहेत.

त्यापैकी ४ गुन्ह्यामध्ये त्याची निर्दोष सुटका झाली आहे. अमोल तापकीर याच्याविरुद्ध कोथरुड, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोड्याच्या तयारीत, मारामारी असे ६ गुन्हे दाखल आहेत. त्यातील एका गुन्ह्यात त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे.किरण पडवळ याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, खंडणी, आर्म अ‍ॅक्ट खाली ४ गुन्हे दाखल आहेत. ओम धर्मजिज्ञासू याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण करुन खंडणी मागणे, मारामारी असे चार गुन्हे दाखल असून त्यातील एका गुन्ह्यात निर्दोष सुटका झाली आहे.

याबाबत देवेंद्र जोग (कोथरुड) यांनी कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. जोग हे दुचाकीवरुन जात असताना रस्त्यावर लोकांची गर्दी असल्याने ते थांबले होते. त्यावेळी पांढरा शर्ट घातलेला एक जण त्यांना म्हणाला की, काय रे गाडी हळु चालविता येत नाही़ धक्का मारतो का. त्यावर ते म्हणाले, दादा मी तुम्हाला धक्का दिला नाही, असे बोलत असताच त्यांच्यातील दुसरा पिवळा शर्ट परिधान केलेल्याने त्यांच्या कानाखाली व तोडांवर बुक्का मारला. त्यामुळे नाकातून रक्तस्त्राव होऊ लागला. त्यामुळे दुचाकीवरुन खाली पडल्याने खरचटले. त्यानंतर ३ ते ४ जणांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. ते मारहाण करीत असतानाच एकाने कमरेचा पट्टा काढून मारहाण केल्याने त्यांना मुका मार लागला. त्यानंतर मारहाण करणारे गुजरात कॉलनीच्या दिशेने दुचाकीवरुन पळून गेले.

पोलिसांनी आज तिघांना न्यायालयात हजर केले. यावेळी पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे समाजामध्ये दहशत असल्याने त्यांच्याविरुद्ध साक्षीदार होण्यास अगर तक्रार देण्यास नागरिक समोर येत नसल्यामुळे या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी आरोपी पोलीस कोठडी रिमांडमध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे.

फिर्यादी यांच्या जिवितास धोका उत्पन्न होईल, अशा पद्धतीने जिवे ठार मारण्याचे उद्देशाने कृती केली आहे, तरी आरोपींनी जीवे ठार मारण्याची कृती ही नेमके कोणत्या कारणासाठी केली आहे, याबाबत प्रत्यक्षात आरोपींना विश्वासात घेऊन तपास करणे आवश्यक आहे. गुन्हा करण्याकरीता आरोपींना कोणी चिथवणी दिली आहे तसेच या गुन्ह्यात इतर कोणाचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग आहे का याबाबत आरोपींकडे तपास करायचा आहे.

यातील फरार आरोपी बाब्या पवार याचा ठावठिकाणाबाबत अटक आरोपीकडे चौकशी करुन त्याला अटक करायची आहे. फिर्यादी यांना मारहाण केलेले हत्यार (कमरेचा पट्टा) जप्त करायचा आहे. मोटारसायकली जप्त करायचे आहे. गुन्ह्याचे तपास पुरावे कामी रक्त नमुने काढून घेणे बाकी आहे, गुन्हा करताना परिधान केलेले कपडे जप्त करायचे आहे. या गुन्ह्यात अन्य कोणाचा सहभाग आहे का याचा तपास करायचा असे पोलिसांनी सांगितले.

आरोपींच्या वतीने अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तीवाद करताना सांगितले की, सुरवातीला किरकोळ मारहाणीचा गुन्हा दाखल असताना जाणीवपूर्वक जीवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करणे योग्य नाही. अशा प्रकारे खोटे गुन्हे दाखल होणार असतील तर मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. त्यानंतर न्यायालयाने तिघांना २४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

केंद्रीय मंत्री मोहोळांच्या कार्यकर्त्याला मारणे टोळीकडून मारहाण

पुणे-केंद्रीय मंत्री मोहोळांच्या कार्यकर्त्याला मारणे टोळीकडून मारहाण झाल्याच्या वृत्ताने राजकीय आणि शासकीय वर्तुळात जोरदार चर्चा उसळली आहे. या प्रकरणी केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्या गजा मारणेच्या टोळीतील गुंडांची नावे समजू नये यासाठी पोलिसांचा आटापिटा सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे.
केंद्रीय राज्यमंत्री यांच्या जवळच्या कार्यकर्त्याला भर चौकात भर दुपारी मारहाण होते. पोलीस गुन्हा तर दाखल करतात. पण, गजा मारणेच्या गुंडाची नावे मीडियामध्ये येणार नाही, यासाठी धडपड करताना दिसतात. त्यामुळे पुण्यात पोलिसांचे नेमके काय चालले आहे.ते दबावाखाली आहेत कि जर पोलिसांवरच अन्याय होत असेल, तर आपला कोणी वाली आहे की नाही, असा प्रश्न पुणेकरांना आता पडला तर नवल वाटणार नाही.

पोलिसाला बेदम मारहाण झाल्याप्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी खरडपट्टी काढल्यानंतर तीन दिवसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा चतु:श्रृंगी पोलिसांना दाखल करुन आरोपींना नाईलाजाने अटक करावी लागली. हे प्रकरण ताजे असतानाच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी कोथरुडमध्ये IT इंजिनिअरला भर दुपारी शेकडो लोकांच्या समोर बेदम मारहाण झाली. हा प्रकार कोथरुडमधील तसेच शहरातील सर्व महत्वांच्या भाजपच्या पदाधिकार्‍यांपर्यंत पोहचला. त्यामुळे कोथरुड पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा तर दाखल करुन घेतला. पण मारहाण करणारे हे गजा मारणे यांच्या टोळीतील आहेत, हे लक्षात आल्यावर पोलिसांची धावपळ सुरु झाली. ही माहिती मीडियापर्यंत पोहचल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप देशमाने यांच्यासह पोलीस अधिकार्‍यांना पत्रकारांचे फोन सुरु झाले. परंतु, कोथरुडमधील पोलीस अधिकारी पत्रकारांना टाळाटाळ करु लागल्याचे चित्र समोर आले आहे. ज्याला मारहाण झाली तो आपल्या कार्यालयात कामाला नाही मात्र भाजपचा कार्यकर्ता असल्याचे मोहोळ यांनी म्हटले आहे.

कंत्राटी प्रशिक्षक पदाकरीता अर्ज करण्याचे आवाहन

पुणे दि. 21 : महासंचालनालय राष्ट्रीय छात्र सेना येथे माजी सैनिक कनिष्ठ आयोग अधिकारी आणि हवालदार यांना कंत्राटीपद्धतीने प्रशिक्षक कर्मचारी म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे. अधिक माहिती https://nis.bisag-n.gov.in/downlosds-public या संकेतस्थळावर भेट द्यावी. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 13 मार्च 2025 आहे, अशी माहिती असे लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

पशुसंवर्धन विभागाकडून कुक्कुट पक्ष्यांचे स्वॅब, विष्ठा नमुना तपासणीची कार्यवाही सुरु

चिकन खाण्यास हरकत नाही-पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचे नागरिकांना आवाहन : पावसाळा ऋतुत कॉलरा सारखे आजार दुषित अन्न पाण्यामुळे होतात तसेच कंम्पायलोबॅक्टर जेजूनाय जिवाणू आजारास कारणीभूत ठरू शकतात. कच्चे अर्धवट शिजवलेल्या मासांतून हा जिवाणूचा प्रसार होतो. यासाठी पाणी उकलून तसेच ब्लीचिंग पावडरची योग्य मात्रेत प्रक्रिया करुनच पिण्यास वापरावे. भाज्या व मांस स्वच्छ करुन व पुर्ण शिजवूनच सेवन करण्यात यावे. हा आजार संसर्गजन्य नसल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, व्यवस्थित शिजवलेले चिकन खाल्ल्यास या जिवाणूचा संसर्ग होत नाही. त्यामुळे चिकन खाण्यास हरकत नाही-पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे

पुणे, दि. २१ : कुक्कुट पक्ष्यांचा ‘गुलियन बॅरे सिंड्रोम’ या आजाराच्या प्रादुर्भावाशी संबंध असण्याची शक्यता पडताळून पाहण्याच्या केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार खडकवासला धरणाच्या नजिकच्या लोकवस्त्यांमधील कुक्कुट पक्ष्यांचे क्लोॲकल स्वॅब नमुने, विष्ठा नमुने, पाण्याचे नमुने संकलित करुन नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणे या संस्थेस परिक्षणासाठी सादर करुन तपासणीची कार्यवाही सुरु असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

पुणे शहराजवळील खडकवासला धरणाच्या नजिकच्या लोकवस्त्यांमध्ये गुलियन बॅरे सिंड्रोम या आजाराच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या आजारास कारणीभूत घटकांमध्ये कुक्कुट पक्ष्याचा समावेश असल्याची तसेच दुषित पाण्यातून हा आजार पसरत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.
पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने बाधीत क्षेत्रालगत पाण्याचे मुख्य स्रोत असलेल्या खडकवासला धरणाच्या भागातील ११ कुक्कुट प्रक्षेत्राना भेट दिली. या प्रक्षेत्रामध्ये वेंकटेश्वरा समुहाचे ६ अंडी देण्यासाठी कुक्कुट पक्षी संगोपन करणारे प्रक्षेत्र आणि ५ व्यक्तिगत मांसल कुक्कुट पालन प्रक्षेत्र आहेत. वेंकटेश्वरा समुहाचे कुक्कुट पालन प्रक्षेत्रावर जैवसुरक्षा पालन करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले व त्यापैकी दोन प्रक्षेत्रासाठी पक्ष्यांद्वारे उत्सर्जित मैला प्रक्रिया व्यवस्था आहे. इतर प्रक्षेत्रावर मैला साठवण व्यवस्था आहे. सदर पक्ष्यांचा मैला शेतीसाठी खत म्हणून विक्री करण्यात येतो.
व्यक्तिगत कुक्कुट पालकांच्या ५ प्रक्षेत्रावर गादी पध्दतीने मांसल कुक्कुट पालन करण्यात येत आहे. या प्रक्षेत्रावर साधारणत: ४५ दिवसात बॅच विक्रीस तयार होते. पक्षी विकी नंतर पक्षीघरातील तुस-गादीची विक्री शेतीसाठी खत म्हणून करण्यात येते. पथकास या प्रक्षेत्रांच्या पासून उत्सर्जित सांडपाणी नजीकच्या पाण्याच्या स्त्रोतात मिसळत नसल्याचे आढळून आले आहे.
नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणे या संस्थेकडून प्राप्त झालेल्या तपासणी अहवालानुसार एकूण नमुन्यांपैकी १०६ क्लोॲकल स्वॅब ८९ व कुक्कुट विष्ठा १७ तसेच नमुने (९ प्रक्षेत्रावरील २ कुक्कुट विष्ठा आणि २२ क्लॉॲकल स्वॅब नमुने) कंम्पायलोबॅक्टर जेजूनाय या जिवाणूसाठी होकारात्मक आलेले आहेत. एका प्रक्षेत्रावरील ५ नमुने नोरोव्हायरससाठी होकारात्मक आलेले आहेत.

नॅशनल व्हायरॉलॉजी संस्थेने कुक्कुट प्रक्षेत्रावरील २९ पाणी नमुने तपासले असून त्यापैकी २६ पाणी नमुने कंम्पायलोबॅक्टर जेजूनाय अस्तित्व नकारार्थी आहे आणि उर्वरित ३ नमुने तपासणी सुरु आहे.
कुक्कुट प्रक्षेत्र धारकांनी जैवसुरक्षा सुनिश्चित करावी. व्यक्तिगत स्वच्छता आणि प्रक्षेत्राचे नियमितपणे निर्जंतुकीकरण करावे. कोणतेही कुक्कुट पक्षी उत्सर्जने पाणवठ्यात जाणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना पशुसंवर्धन विभागाने दिल्या आहेत.

कुक्कुट पक्ष्यांच्या आतड्यांमध्ये कंम्पायलो बॅक्टर जेजूनाय हा सामान्यत: अस्तित्वात असणारा जिवाणू आहे. तसेच हा जिवाणू इतर प्राणी व मानवांतही आढळतो. ही शास्त्रोक्त माहिती आहे. परिक्षेत्रातील कुक्कुट प्रक्षेत्रावरील सांडपाणी अथवा विष्ठा नजीकच्या पाणी स्त्रोतात मिसळले नसल्याने काही दूरचित्रवाहिन्या या आजाराचा कुक्कुट पक्ष्यांपासून पसरत असल्याच्या चुकीच्या बातम्या देत आहेत. यामुळे कुक्कुट पालकांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला असून नागरिकांमध्ये देखील संभ्रम निर्माण होत आहे.