Home Blog Page 443

सातारा येथे 31 जुलै रोजी पर्यटन विकास कार्यशाळेचे आयोजन

पुणे दि.26:- पर्यटन विकास स्थानिक अर्थ वृध्दी या उपक्रमासाठी सातारा येथे 31 जुलै रोजी पर्यटन विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून इच्छूकांनी या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात 9511874008 या क्रमांकावर व https://forms.gle/hmZ7jx6PKVF9dChcA या संकेतस्थळावर आपली नांव नोंदणी करावी, असे आवाहन पुणे विभागीय पर्यटन कार्यालयाच्या उपसंचालक शमा पवार यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग आणि सातारा जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हयातील विविध पर्यटन स्थळांचा विकास, इको-टुरिझम आणि साहसी पर्यटन वाढविण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेतले जात असून या उपक्रमामध्ये ट्रेकर्स, गिर्यारोहक, पर्यटन मार्गदर्शक, होमस्टे/ हॉस्पिटॅलिटी सेवा देणारे, ट्रॅव्हल ब्लॅगर्स, सोशल मीडिया मार्केटर्स, साहसी खेळ व इव्हेंट आयोजक, पर्यटन संस्था व स्थानिक उद्योजक, युवक, महिला बचत गट सदस्य व महिला उद्योजक, संलग्न क्षेत्रांतील व्यक्तींनीही सहभाग नोंदवावा, असेही आवाहन श्रीमती. पवार यांनी प्रसिद्धी पत्रकानव्ये केले आहे.

हॉलिवूड नगरीत मराठी तारे-तारकांचे जल्लोषात स्वागत!

अमेरिकेतील ‘द कॅलिफोर्निया थिएटर’ मराठी कलाकारांच्या रेड कार्पेट एन्ट्रीसाठी सज्ज!

• ‘नाफा २०२५ जीवन गौरव’ पुरस्काराविषयी विशेष उत्सुकता!
सॅन होजे,: ‘नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन’ (नाफा)च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे ‘नाफा’ परिवाराने जल्लोषात स्वागत केले आहे. आज, २४ जुलैच्या रात्री ‘नाफा’चे संस्थापक – अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील निवासस्थानी सर्व कलाकारांचा जंगी सत्कार करण्यात आला. या पूर्व-सांस्कृतिक संध्येला कलाकारांच्या उपस्थितीने रंगत आली असून, उत्सवाची बहारदार सुरुवात झाली आहे.

उत्तर अमेरिकेत मराठी चित्रपट लोकप्रिय व्हावेत आणि समृद्ध मराठी संस्कृतीचे दर्शन संपूर्ण अमेरिकेतील प्रेक्षकांना घडावे, या हेतूने ‘देऊळ’ आणि ‘भारतीय’ या चित्रपटांची यशस्वी निर्मिती करणारे राष्ट्रीय सुवर्णकमळ पुरस्कार प्राप्त निर्माते व यशस्वी उद्योजक अभिजीत घोलप यांनी ‘नाफा’ची स्थापना मागील वर्षी केली.त्यांनी सुरू केलेला हा उपक्रम आज एक मोठा सांस्कृतिक सोहळा ठरतो आहे. अभिजीत घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी ‘नाफा’चे सुमारे 100 – 150 स्वयंसेवक गेले काही महिने अथक परिश्रम घेत आहेत.

आज, २५ जुलैपासून ‘नाफा मराठी चित्रपट महोत्सव २०२५’ ला सुरुवात होत असून, सलग तीन दिवस ‘फिल्म एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवसाची सुरुवात भव्य आणि ग्लॅमरस ‘फिल्म अवॉर्ड नाईट’ने होणार आहे. या पुरस्कारांमध्ये ‘नाफा जीवन गौरव  पुरस्कार’ नेमका कोणत्या कलावंताला दिला जाणार? या विषयी विशेष औत्सुक्य निर्माण झाले आहे.

हॉलिवूडमधील प्रतिष्ठित ‘द कॅलिफोर्निया थिएटर’मध्ये अंथरले गेलेले ‘रेड कार्पेट’, झगमगते कॅमेरे आणि प्रकाशझोतात आलेले मराठी कलाकार – या अविस्मरणीय दृश्यातून मराठी चित्रपटांची अमेरिका वारी किती प्रभावी ठरत आहे, हे स्पष्ट होते. ‘नाफा’च्या या तेजस्वी ‘फिल्म अवॉर्ड नाईट’मुळे संपूर्ण सॅ’न होजे’ शहर उत्सवमय वातावरणात न्हालं आहे. हॉलिवूड नगरीने मराठी तारे-तारकांसाठी रेड कार्पेट अंथरून आपले स्वागताचे दार खुले केले आहे.

यंदाच्या महोत्सवात महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यासह डॉ. मोहन आगाशे, अमोल पालेकर, सचिन खेडेकर, महेश कोठारे, गजेंद्र अहिरे, अश्विनी भावे, सोनाली कुलकर्णी, संध्या गोखले, स्वप्नील जोशी, अवधूत गुप्ते, आदिनाथ कोठारे, वैदेही परशुरामी आणि मधुर भांडारकर यांसारख्या अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या कलाकारांच्या स्वागतासाठी नाफा टीमचे पदाधिकारी आणि सदस्य – रिया ठोसर, अरुंधती दात्ये, अर्चना सराफ, डॉ. गौरी घोलप, अनूप निमकर, विनायक फडणवीस, वृषाली मालपेकर, योगी पाटील, लक्ष्मण आपटे, गौरी कुलकर्णी, निरंजन पागे, हर्षा, पूजा, निमा, मनीष आणि मानसी देवळेकर – यांच्यासह अमेरिकेतील शेकडो स्वयंसेवक, कलाकार आणि तंत्रज्ञ सज्ज झाले आहेत.

गेल्यावर्षी  पासून ‘नाफा मराठी चित्रपट महोत्सव’ कॅलिफोर्नियातील सॅन होजे शहरात मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे. यंदा या महोत्सवाची दखल थेट अमेरिकेच्या संसद भवनाने घेतली आहे. अमेरिकेतील मराठी वंशाचे खासदार श्री. ठाणेदार यांनी नुकतेच संसदेच्या सभागृहात या महोत्सवाबद्दल गौरवपूर्वक माहिती दिली.

अधिक माहितीसाठी व सविस्तर कार्यक्रम वेळापत्रकासाठी:
https://northamericanfilmassociation.org

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी संसदरत्न पुरस्काराने सन्मानितसंसदेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या हस्ते सन्मान

पुणे: राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांना संसदेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी ‘संसदरत्न’ या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र व उपरणे असे या पुरस्काराचे स्वरूप होते. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते महाराष्ट्र सदन येथे आयोजित सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण झाले. प्रसंगी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, केंद्रीय कायदा व न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, खासदार श्रीरंग बारणे आदी उपस्थित होते.

प्राईम पॉइंट फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी लोकसभा आणि राज्यसभेतील उल्लेखनीय कार्याबद्दल खासदारांना ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पुरस्कारांचे यंदा १५ वे वर्ष होते. यंदा १७ खासदारांना या पुरस्काराचा मान मिळाला. राज्यसभेची पहिलीच टर्म असलेल्या प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संसदेत सक्रिय सहभाग नोंदवत सर्वच आघाड्यांवर उल्लेखनीय व लोक-देशहिताचे मुद्दे मांडत प्रभावी कामगिरी केली. सर्वोत्तम कामगिरीसाठी डॉ. कुलकर्णी यांचा गौरव करण्यात आला. यंदा राज्यसभेतील प्रभावी कामगिरीसाठी निवड झालेल्या खासदारांमध्ये प्रा. डॉ. कुलकर्णी यांचा समावेश झाल्याने महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः पुण्यासाठी ही गौरवाची बाब ठरली आहे.

प्रा. कुलकर्णी यांनी महिला आरोग्य, ग्रामीण विकास, शिक्षण, सामाजिक न्याय, वक्फ बोर्डाच्या संबंधित विषयांवर संसदेमध्ये सातत्याने मुद्देसूद भाष्य केले आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात त्यांनी ग्रामीण भागातील महिलांमध्ये वाढत चाललेल्या कर्करोगाच्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त करत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली होती. तसेच नवीन शिक्षण धोरणासंबंधित काही सूचना केल्या होत्या.

पुरस्कार स्वीकारताना प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “हा सन्मान केवळ माझा नाही, तर जनतेच्या अपेक्षा संसदेत प्रभावीपणे मांडण्याच्या प्रयत्नांचा गौरव आहे. लोकशाहीत लोकप्रतिनिधीची खरी ओळख त्याच्या कृतिशीलतेत असते. पहिल्यांदाच खासदार झालेली असताना संसदरत्न पुरस्कार मिळणे ही जनतेच्या आशीर्वादाची पावती आहे. लोकहितासाठी यापुढे परखडपणे भूमिका मांडत राहील.”

‘पुनीत बालन ग्रुप’तर्फे गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व ग्रंथालय

सौ. शोभा रसिकशेठ धारिवाल अभ्यासिका व ग्रंथालयाचे भूमिपूजन

पुणे ः ‘पुनीत बालन ग्रुप’च्यावतीने गरजू विद्यार्थ्यांसाठी शहरात सुसज्ज अभ्यासिका व ग्रंथालय बांधण्यात येणार असून सौ. शोभा रसिकशेठ धारिवाल यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या या अभ्यासिका व ग्रंथालयाचे भूमिपूजन ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांच्याहस्ते करण्यात आले. यामुळे शहरातील गरजू विद्यार्थ्यांना हक्काची अभ्यासिका व ग्रंथालय उपलब्ध होणार आहे.

शिक्षण, क्रिडा, वैद्यकीय, अध्यात्मिक आदी विविध क्षेत्रात ‘पुनीत बालन ग्रुप’चे कार्य हे उल्लेखनीय असे आहे. त्यांच्या या कामाचे क्षेत्र केवळ पुणे शहरापुरते मर्यादित नाही तर या कामाचा विस्तार काश्मिरपर्यंत झालेला बघायला मिळतो. पुणे हे तर राज्यातील शिक्षणाचे प्रमुख केंद्र आहे. याठिकाणी शिक्षणाच्या दृष्टीने राज्याच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी येत असतात. परंतु अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासिका व ग्रंथालयाचे भरमसाठ शुल्क भरणे शक्य होत नाही. या विद्यार्थ्यांनाही चांगले शिकून मोठे होण्याचे स्वप्न साकार करता यावे या दृष्टीने ‘पुनीत बालन ग्रुप’ने पुढाकार घेतला आणि पुण्यात अशा गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व ग्रंथालय बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार श्री वृध्देश्वर-सिध्देश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट मंदिर परिसरात ७ हजार ५०० चौ. फुट इतकी प्रशस्त अशी दुमजली अभ्यासिका व ग्रंथालय बांधण्यात येणार असून या बांधकामाचे भूमिपूजन श्री. पुनीत दादा बालन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आर्किटेक्ट शिरीष केंभावी, श्री वृध्देश्वर-सिध्देश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष हनुमंतराव बहिरट-पाटील, सचिव सुधीर दुर्गे, खजिनदार शशिकांत भोसले, विश्वस्त संजय सातपुते आणि वृद्धेश्वर चौपाटीचे लाला गायकवाड उपस्थित होते.


‘‘विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती गरीब असली तरी बौद्धिक परिस्थिती मात्र गरीब नसते. पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या महाराष्ट्रातील दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना या अभ्यासिका व ग्रंथालयात मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाच्या वाटेवर अभ्यासिका व ग्रंथालयाच्या माध्यमातून एक दिवा लावण्याची संधी आम्हाला मिळाली. यातूनच देशाची आणि समाजाची अधिक चांगली सेवा करणारे विद्यार्थी घडतील, असा विश्वास आहे.’’

  • पुनीत बालन (अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप)

FC रस्त्यावरील विक्रेत्यांवर कारवाई -इमारतींमधील अतिक्रमणांना मात्र अभय.

पुणे : एफसी रस्त्यावरील पदपथांवर अतिक्रमण वाढल्याने पदपथ पादचाऱ्यांसाठी कि विक्रेत्यांसाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच सातत्याने कारवाई करुन देखील अतिक्रमण होत असल्याने आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आवाज उठविल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अतिक्रमण विरोधी कारवाई करत अतिक्रमणे काढून टाकली.मात्र एकीकडे रस्त्याच्या बाजूची अतिक्रमणे काढत असताना दुसरीकडे मोठ मोठ्या इमारतीमधील अनधिकृत बांधकामांकडे तसेच साईड मार्जिन मध्ये अतिक्रमणे करून याच परिसरात असलेल्या बड्या व्यवसायिकांकडे मात्र दुर्लक्ष केले जात असल्याने सामन्य लोकांवर कारवाई आणि बड्यांना अभय असे चित्र येथे निर्माण झालेले दिसते आहे. बड्या इमारती मधील अनधिकृत बांधकामे आणि साईड मर्जीन मधील बांधकामे किंवा अतिक्रमणे यामुळे तिथे होऊ शकणारे पार्किंग रस्त्यावरील पार्किंगची जागा बळकावत असल्याने हि वाहतुकीची आणि पार्किंग ची समस्या निर्माण होत असल्याचे कारण दिले जाते आहे. ज्याकडे महापालिका वारंवार नव्हे तर वर्षानुवर्षे दुर्लक्ष करत आली आहे. येथील प्रख्यात हॉटेल्स देखील अशाच अनधिकृत छत्राखाली चालत असल्याचे स्पष्ट आहे .पण त्याकडे कोणी लक्ष देत नाही अशी स्थिती आहे.

एफसी रस्त्याला अतिक्रमणाचा वेढा पडलेला आहे. या रस्त्यावर पुणेकरांची मोठी गर्दी असते. तसेच खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची रहदारी लक्षणीय आहे. याचाच फायदा घेत एफसी रस्ता तसेच जंगली महाराज रस्त्यावर विक्रेत्यांनी अतिक्रमण करत ठाण मांडले आहे. हा भाग शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात येतो. नुकत्याच झालेल्या विधीमंडळाच्या अधिवेशनात पदपथांवर केल्या जाणाऱ्या अतिक्रमणांवर चर्चा झाली होती. दोन दिवसांपूर्वी शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्येही या दोन्ही रस्त्यावर वाढत असलेल्या अतिक्रमणांबाबत शिरोळे यांनी नाराजी व्यक्त करत महापालिकेच्या कारभारावर शंका घेतली होती. या पार्श्वभूमीवर महापालिकेने पावले उचलत कारवाई केली आहे.

एफसी रस्त्यावरील आर्यभूषण पंपिंग स्टेशन, खंडोजी बाबा चौक, बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (बीएमसीसी) रस्ता तसेच जंगली महाराज रस्त्यावरील पदपथांवर अतिक्रमण करुन बेकायदा पद्धतीने गॅस सिलिंडरचा वापर करणारे खाद्य पदार्थांची विक्री करणारे व्यावसायिक तसेच खेळणी, कटलरी, होजिअरी व्यावसायिकांच्या बाबत महापालिकेला तक्रारी मिळाल्या होत्या. महापालिकेच्या पथकाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली आनियेथे अनधिकृतपणे व्यवसाय करणारांवर कारवाई केली .

एफसी रस्त्यासह जंगली महाराज रस्त्यावरील पदपथांवर होत असलेल्या अतिक्रमणांमुळे नागरिकांना रस्त्यावरून चालताना त्रास सहन करवा लागत होता. त्यामुळे महापालिकेच्या अतिकमण विभागाच्या पथकाने या दोन्ही रस्त्यावरील बेकायदा पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करत त्यांच्या वस्तू जप्त केल्या. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त संदीप खलाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डेक्कन पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.

सहाय्यक महापालिका आयुक्त तिम्मया जंगले, क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक संजय कुंभार, सहायक अतिक्रमण निरीक्षक रवी जाधव, शरद पवार, भरत बिरादार यांचे पथकाने FC रस्त्यावर कारवाई केली. यामध्ये २२ कपडे पथारी व्यावसायिक, २१ गँस सिलिंडर, ९ शेड यांच्यावर कारवाई करुन ते काढून टाकण्यात आले. कारवाई पथकामध्ये महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचे (एमएसएफ) सहा जवान, १० बिगारी सेवक, एक ट्रक, एक पिंजरा यांचा समावेश होता. या दोन्ही रस्त्यांसह शहरातील इतर भागातही अशी कारवाई केली जाणार असल्याचे अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत गजानन महाराज पथ येथे अनधिकृत गणेश मुर्ती विक्री मांडवांवर Ward officer, अतिक्रमण निर्मूलन स्टाफ आणि स्थानिक बंदोबस्त यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली.
विक्री व्यवसायिकांना रीतसर वाहतूक NOC नंतर अधिकृत पणे परवानगी देण्यात येईल असे महापालिकेने सांगितले आहे.
स्थानिक कार्यकर्ते यांनी यावेळी मोठा विरोध कार्यवाहीच्या सुरुवातीस केला, परंतु पोलीस बंदोबस्त असल्याने कार्यवाही झाली…तसेच सदर कारवाईसाठी पर्वती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड व स्थानिक पोलीसांनी बंदोबस्त दिला

विधिमंडळ अधिवेशन: तडकाफडकी १६ अधिकारी निलंबित; हे नैसर्गिक न्यायाला धरुन नाही राजपत्रित अधिकारी महासंघाची नाराजी

मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशात दोन्ही सभागृहात विविध विभागाच्या मंत्र्यांनी १६ पेक्षा अधिक अधिकाऱ्यांना निलंबित तर २५ पेक्षा अधिक प्रकरणांची चौकशी सुरू केली आहे. मात्र अशाप्रकारचे तत्काळ निलंबन हे नैसर्गिक न्यायाला धरुन नसल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून केली आहेपावसाळी अधिवेशनात सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी कोणतीही ठोस चौकशी तसेच संबंधित प्रशासकीय विभागप्रमुखांच्या अभ्यासपूर्ण प्रस्तावाशिवाय काही प्रकरणांमध्ये शासकीय अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आश्वासन देणे, हे संबंधित प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक असल्याचे मत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई व समीर भाटकर यांनी पत्रात म्हटले आहे.

अन्न व औषध विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ – नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील बाजारातील खाद्य तेलाच्या सदोष असल्याचे मान्य करीत अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त आणि सहआयुक्त निलंबित

महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे – अक्कलकुवा तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याने मृत अंगणवाडी सेविकेच्या नावे पगार उचलला. संबंधित अधिकारी आणि पर्यवेक्षिका निलंबित

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील – जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईत गैरव्यवहार झाल्याप्रकरणी तहसीलदार निलंबित तर ५७ कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – छत्रपती संभाजीनगर येथील विद्यादीप बालसुधारगृहातील अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी जिल्हा महिला बालविकास अधिकाऱ्याचे निलंबन

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे – शालार्थ आयडी, शिक्षक समायोजन आणि रात्र दिवस शाळेच्या माध्यमातून दोन पगार घेणे अशा अनियमितता करणाऱ्या मुंबई शिक्षण उपसंचालक संदीप सांगवे यांना निलंबित करण्याचा आदेश

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर – पेण तालुक्यातील वरवणे येथील आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी मुख्याध्यापक आणि अधीक्षक निलंबित

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे – नाशिक जिल्हा परिषदेतील लैंगिक अत्याचार प्रकरणी एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे निलंबन तर अशाच स्वरूपाच्या तक्रारीमध्ये दुसऱ्या एका अधिकाऱ्याची चौकशी यांनी जाहीर

आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके – अनुसूचित जमातीच्या सदोष प्रमाणपत्र तपासणी प्रकरणी तत्कालीन सहआयुक्तांचे निलंबन.

पालिका शाळांमधीलपटसंख्या वाढीसाठीशाळांमध्ये सुधारणा करणार-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : महापालिका शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी इमारत दुरुस्ती, स्वच्छता आदी उपाययोजना हाती घेऊन सुधारणा करण्यात येतील, तसेच शाळांचा दर्जा वाढवला जाईल, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (शुक्रवारी) प्रसारमाध्यमांना दिली.

छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघांमध्ये असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या शाळा सुधारणांच्या संदर्भात आज उपायुक्त, शिक्षणाधिकारी आणि शाळेचे मुख्याध्यापक यांच्यासमवेत शिक्षण मंडळ येथे सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली.

छत्रपती शिवाजीनगर मतदार संघामध्ये पुणे महानगरपालिकेच्या २८ शाळा आहेत. काही शाळांच्या इमारतींची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. या कामात येणाऱ्या अडचणी दूर करण्या संदर्भात अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर चर्चा झाली. शाळेचा परिसर, पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता, स्वच्छतागृहांची स्वच्छता तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य त्या सूचना यावेळी देण्यात आल्या, शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितली.

या बैठकीला शिक्षण उपायुक्त विजय थोरात, शिक्षण अधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग सुनंदा वाखारे, शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग आशा उबाळे हे अधिकारी तसेच शैलेश बडदे, आनंद छाजेड, प्रकाश ढोरे, सचिन वाडेकर, वसंत जुनवणे, अनिल भिसे, अपर्णा कुऱ्हाडे, गौरी शिरोळे, समाधान शिंदे, रोहित आगळे, अजय दुधाणे, सुजित घोटेकर ,विजय ढोणे, देवेंद्र बिदलन , संकेत कांबळे आदी उपस्थित होते

डी.एड. महाविद्यालयांवर बंदीचे सावट,५०० शिक्षक आणि ५,००० विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात: खा.मेधा कुलकर्णींनी वेधले लक्ष

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडे डी.एड. महाविद्यालयांचे रूपांतर व शिक्षकांचे पुनर्वसन करण्याची मागणी

पुणे: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू करण्याच्या प्रक्रियेत महाराष्ट्रातील डी.एड. महाविद्यालयांवर बंदीचे सावट आहे. यामुळे सुमारे ५०० शिक्षक आणि ५,००० विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केंद्रीय शिक्षामंत्री धर्मेंद्र प्रधान यांची नवीन दिल्ली येथे भेट घेऊन लेखी निवेदन दिले. 

या निवेदनात त्यांनी महाराष्ट्रातील ९७ अनुदानित डी.एड. महाविद्यालयांचे इंटीग्रेटेड टीचर एज्युकेशन इंस्टिट्यूट (आयटीईआय) किंवा स्वतंत्र बी.एड. महाविद्यालयांमध्ये रूपांतर करण्यासाठी केंद्र शासनाने मार्गदर्शन व मान्यता द्यावी, अशी विनंती केली आहे.

तसेच डी.एड. महाविद्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या उच्चशिक्षित शिक्षकांना, ज्यांच्याकडे एमएड, एमए, एमफिल, नेट/सेट किंवा पीएचडी पात्रता आहे, त्यांना विषयानुसार राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांमधील रिक्त पदांवर समाविष्ट करण्यासाठी विद्यापीठ अनुदान अयोग्य व संबंधित संस्थांना निर्देश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. उर्वरित शिक्षकांना कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये समायोजित करण्याचा प्रस्तावही त्यांनी सुचवला आहे.

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी डी.एड. अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या रोजगार संधीसंदर्भातही चिंता व्यक्त केली. त्यांना अंगणवाडी केंद्रे, बालवाडी आणि प्री-प्रायमरी शाळांमध्ये शिक्षक म्हणून नियुक्त करण्यासाठी पात्र मानावे, अशी विनंती केली आहे. हे विद्यार्थी बालविकास व प्राथमिक शिक्षणासाठी आवश्यक ती तयारी घेतलेले असून, ‘एनईपी २०२०’मध्ये अधोरेखित उद्दिष्टांसाठी ते उपयुक्त ठरतील, असेही त्यांनी नमूद केले आहे.

“हा प्रश्न केवळ शिक्षकांच्या नोकऱ्यांपुरता मर्यादित नसून, तो राज्यातील प्राथमिक व पूर्व-प्राथमिक शिक्षणाच्या पायाभूत संरचनेशी जोडलेला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन न्याय्य व शाश्वत तोडगा काढावा, अशी अपेक्षा असल्याचे खासदार डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या.

अनेक वर्षांपासून अतिक्रमित शीवरस्ता खुला; विभागीय आयुक्तांकडून सरपंचांचे कौतुक

पुणे – सांगली जिल्ह्यात तासगाव तालुक्यातील आळते आणि खानापूर तालुक्यातील कार्वे या दोन गावामधील अनेक वर्षांपासून अतिक्रमित असल्याने बंद असलेला शीवरस्ता विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या पुढाकाराने व दोन्ही गावच्या सरपंचांच्या सहकार्याने खुला करण्यात आला. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी या ठिकाणी भेट देऊन समाधान व्यक्त केले.

आळते आणि कार्वे या दोन गावांच्या हद्दीवरील खानापूर तासगाव रस्त्यापासून सुरू होऊन ओढा पर्यंत जाणारा अंदाजे दोन किलोमीटरचा रस्ता बऱ्याच वर्षापासून बंद होता. यामुळे शेतकऱ्यांना ये-जा करण्यास तसेच शेतामध्ये मोठी अवजारे आणि वाहने नेण्यास अडचणी येत होत्या. या कारणाने त्यांच्या उत्पन्नावरही परिणाम होत होता. या रस्त्याची शासकीय तसेच खाजगी मोजणी होऊन सुद्धा शेतकऱ्यांमध्ये त्या रस्त्याबाबत एकमत होत नव्हते. दोन्ही तालुक्यांच्या हद्दीवरील रस्ता हा या खानापूर व तासगाव या दोन तालुक्यांच्या शीवेवरचा हा रस्ता खुला झाल्याने दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी आळते गावचे सरपंच बालाजी मोहिते आणि कार्वे गावचे सरपंच बाळासो जाधव यांची भेट घेऊन याकामी पुढाकार घेतल्याबद्दल दोघांचे तसेच शेतकऱ्यांचे कौतुक केले. यासोबतच त्यांनी इतर शेतकऱ्यांनीही सामंजस्याची भूमिका घेऊन महसूल प्रशासनाच्या मदतीने अधिकाधिक रस्ते खुले करून घ्यावेत तसेच त्या रस्त्यांची सात बारावर नोंद करून घ्यावी, असे आवाहन केले.

यावेळी विटा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल आणि खानापूर – विटा तालुक्याचे तहसीलदार योगेश्वर टोंपे, कार्वे गावच्या शेतकरी तसेच पोलीस पाटील ज्योत्स्ना पाटील, अमित पाटील, रोशन जाधव व आळते गावचे माणिक सूर्यवंशी उपस्थित होते.
०००००

हर्षल पाटील यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही;थकबाकीविरोधात न्यायालयात जाणार: बीएआय

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे हर्षल पाटील यांना श्रद्धांजली; मुंबईत आंदोलन छेडण्याचा इशारा

पुणे: जलजीवन मिशनमध्ये १.४० कोटीचे काम करूनही बिले अदा न केल्याने, तसेच या कामासाठी काढलेल्या ६० लाखांच्या कर्जाचे हप्ते भरून न शकल्याने कर्जबाजारी झालेल्या तरुण कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची घटना दुर्दैवी आहे. राज्यातील विविध विकासकामांमध्ये गुंतलेल्या कंत्राटदारांची सुमारे ९० हजार कोटी रुपयांची थकबाकी राज्य शासनाकडे प्रलंबित आहे. पैसे मिळत नसल्याने कंत्राटदार कंगाल झाले आहेत. शासनाने झालेल्या कामाचे पैसे अदा करावेत, यासाठी दोनवेळा नोटीस पाठवली. मात्र, शासनाकडून त्याला केराची टोपली दाखवली असून, कंत्राटदारांची थकबाकी लवकर अदा करावी, या मागणीसाठी आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (बीएआय) पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. तसेच मुंबईत तीव्र स्वरूपाचे धरणे आंदोलन करण्याचा इशाराही दिला.

सांगलीच्या वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी तांदुळवाडी येथील हर्षल अशोक पाटील यांनी कर्जबाजारी होऊन आपली जीवनयात्रा संपवली. हर्षल पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ‘बीएआय’च्या वतीने शोकसभेचे आयोजन केले होते. संगम पुलाजवळील ‘बीएआय’च्या सभागृहात आयोजित शोकसभेला बीएआय महाराष्ट्राचे अध्यक्ष जगन्नाथ जाधव, बीएआय पुणेचे अध्यक्ष अजय गुजर, राज्यसचिव मनोज देशमुख, पुणे केंद्राचे उपाध्यक्ष महेश मायदेव व राजाराम हजारे, सचिव सी. एच. रतलानी, खजिनदार महेश राठी, माजी अध्यक्ष सुनील मते, डॉ. राजीव कृष्णानी, पुणे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे रवींद्र भोसले आदी उपस्थित होते. हर्षल पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, दोन मिनिटे शांतता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.

जगन्नाथ जाधव म्हणाले, “राज्याच्या विविध विभागातील विकासकामे यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी राज्यभरात हजारो कंत्राटदार आपले आयुष्य पणाला लावतात. काम पूर्ण केल्यावर बिले निघतील, या आशेवर स्वतःजवळची जमापुंजी गुंतवतात. वेळप्रसंगी दागदागिने मोडून, कर्ज काढून ही कामे पूर्ण करतात. मात्र, शासनाकडून काम पूर्ण होऊन वर्षे लोटली, तरी पैसे दिले जात नाहीत. त्यामुळे कंत्राटदार मोठ्या संकटात सापडले आहेत. गेल्या तीनचार वर्षांपासून कंत्राटदारांचे सुमारे ९० हजार कोटी रुपये थकीत आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही शासन त्याची दखल घेत नाही. परिणामी, हर्षल पाटील यांच्यासारखे दुर्दैवी पाऊल उचलले जात आहे. यावर आता कंत्राटदार गप्प बसणार नाहीत. हर्षलचे बलिदान वाया जाऊ देणार नाहीत. उच्च न्यायालयाचे दार ठोठावण्यासह आंदोलनाचा मार्गही अवलंबला जाणार आहे.”

अजय गुजर म्हणाले, “हर्षलसारख्या तरुण कंत्राटदाराचे असे अकाली जाणे वेदनादायी आहे. या संवेदनशील विषयातही राज्यकर्ते हर्षल हा सबकॉन्ट्रॅक्टर होता, त्याची सरकारकडे नोंद नाही, अशा संवेदनाहीन प्रतिक्रिया देत आमच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. देशाच्या विकासात भरीव योगदान देणाऱ्या, शेती क्षेत्रानंतर सर्वाधिक रोजगार निर्माण करणाऱ्या कंत्राटदारांवर ही वेळ येणे दुर्दैवी आहे. आधीची बिले काढली नसताना, सरकार नवीन कामे काढते. निधीची तरतूद केली जात नाही. तरतूद केली, तर ती अन्य योजनांमध्ये वळवली जाते. त्यामुळे पैसे मिळत नाहीत. कंत्राटदारांचे आयुष्य कंगाल होत आहे. ही थकबाकी दिली नाही, तर येणाऱ्या काळात आत्महत्यांचे हे सत्र वाढत जाईल. सरकारने आमचा अंत पाहू नये.”

मनोज देशमुख, डॉ. राजीव कृष्णानी, संजय आपटे यांनीही श्रद्धांजली वाहिली.  

संविधानाच्या मार्गदर्शक तत्वावर आधारित समाज निर्मितीसाठी ॲट्रोसिटी कार्यशाळा उपयुक्त- महासंचालक सुनील वारे

पुणे दि.25 :- समाजात सलोखा रहावा यासाठी महापुरूषांच्या विचारांचे स्मरण करून तसेच संविधानाच्या मार्गदर्शक तत्वावर आधारित समाज निर्मितीसाठी ॲट्रोसिटी कार्यशाळा अत्यंत उपयुक्त आहे असे, प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ) चे महासंचालक सुनिल वारे यांनी केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ), आणि सहायक आयुक्त समाज कल्याण, विभाग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम 1989 व सुधारित अधिनियम 2016 या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळाचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशिय सभागृहात आयोजन करण्यात आले होते त्यावेळी सुनिल वारे बोलत होते.
या कार्यशाळेला सहायक पोलीस आयुक्त पुणे शहर अनुराधा उदमले, सहायक पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड बाळासाहेब कोपनर, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद राधाकिसन देवडे, सहायक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे यावेळी उपस्थित होते.
महासंचालक श्री. वारे म्हणाले, बार्टीसंस्थेतर्फे समाजाच्या कल्याणासाठी अनेक उपक्रम नियमित राबविले जातात. समाजात जातीय सलोखा रहावा, समाजाचा उत्तम विकास व्हावा या उद्देशाने ॲट्रोसिटी कार्यशाळा आयोजित केली आहे. ॲट्रोसिटी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे, शासकीय अधिकारी, विधीज्ञ आणि सामान्य जनतेला या कायद्यासंदर्भात ज्या अडचणी येतात त्या अडचणीवर मार्ग काढण्यासाठी या कार्यशाळेचा निश्चितच उपयोग होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्वातंत्र, समता आणि बंधुता या तत्वांची अंमलबजावणी करत जगातील विविध देशांनी यासंदर्भात मोठा विकास साधला आहे. त्याचे अनुकरण करून तसाच विकास आपण साध्य करू शकतो. बार्टी संस्थेतर्फे नुकतीच नॅशनल ॲट्रोसिटी हेल्पलाईनची सुरूवात करण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागातर्फे ॲट्रोसिटी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी अशाप्रकारच्या कार्यशाळा प्रत्येक जिल्ह्यात होत असून या कार्यशाळेमध्ये ॲट्रोसिटीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या कार्यशाळेच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येवून चर्चा करून समाजातील अन्यायग्रस्त लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र हे देशातील प्रगतशील राज्य असून अशा राज्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लोकांवर अन्याय अत्याचार होऊ नये, समाजात सद्भावना वाढीस लागावी यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात त्याचा समाजाला चांगला उपयोग होतो असे ते म्हणाले.
या एकदिवसीय कार्यशाळेत विविध वक्त्यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याची पार्श्वभूमी या विषयावर सामाजिक वक्ते सुभाष केकाण, कायद्यांतर्गत न्यायालयीन कामकाज पध्दती या विषयावर अतिरिक्त सरकारी अभियोक्ता मिलिंद दातरंगे यांनी तर न्यायालयीन प्रक्रीया या विषयावर सहाय्यक सरकारी वकील जावेद खान, सामाजिक सलोखा या विषयावर विशेष सरकारी वकील अमोल सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त श्री. लोंढे यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमाबाबत आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेचा उद्देश व प्रयोजनाबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यशाळेच्या सुरूवातीला संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. कार्यशाळेला पोलीस, महसूल, सामाजिक न्याय विभागांचे अधिकारी, कर्मचारी व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
00000

रविवारी – नागरिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी खासदार मुरलीधर मोहोळ थेट जनतेशी थेट संवाद साधणार

  • छत्रपती शिवाजीनगरमध्ये खासदार जनसंपर्क सेवा अभियानाचा दुसरा टप्पा

पुणे – नागरिकांचे प्रश्न थेट समजून घेता यावेत आणि ते सोडविले जावेत, या उद्देशाने केंद्रीय मंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांनी सुरु केलेल्या खासदार जनसंपर्क सेवा अभियानाचा या उपक्रमाचा दुसरा टप्पा सुरु असून रविवारी हे अभियान छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात राबविण्यात येणार आहे. रविवार, २७ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता, औंध येथील इंदिरा गांधी शाळा येथे हा उपक्रम होणार आहे. या अभियानात नागरिकांनी आपले प्रश्न, समस्या आणि नवकल्पना घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.खासदार म्हणून निवडून आल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी विधानसभानिहाय “जनता दरबार” या स्वरूपात हा उपक्रम सुरू केला. या संवादातून नागरिकांच्या नागरी समस्या, प्रलंबित कामे आणि नव्या कल्पनांचा विचार करून त्यावर कार्यवाही करण्यात येते. सध्या सध्या या अभियानाचा दुसरा टप्पा सुरु असून यात कोथरूड, कसबा आणि शिवाजीनगर या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला आहे. आता छत्रपती शिवाजीनगरमध्ये दुसऱ्यांदा हे अभियान होत आहे.या उपक्रमात महापालिका, पोलीस प्रशासन आणि विविध सरकारी विभागांचे स्टॉल्स लावण्यात येणार आहेत, जेथे नागरिकांना थेट माहिती मिळते आणि समस्यांचे निराकरणही करता येते. तसेच केंद्र, राज्य सरकार आणि पुणे महापालिकेच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती देखील उपलब्ध करून दिली जाते आणि पात्र लाभार्थ्यांना लाभही घेता येईल.या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर खासदार मुरलीधर मोहोळ म्हणाले,“माझ्याकडे केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी असली तरी पुणेकरांचा खासदार म्हणून त्यांच्या अडचणी समजून घेणे, त्या सोडवणे हे माझे कर्तव्य आहे. आतापर्यंत झालेल्या अभियानांना मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. छत्रपती शिवाजीनगरकरांनी पुन्हा एकदा आपल्या भागातील मुद्दे, अडचणी आणि सूचना घेऊन या अभियानात भाग घ्यावा, ही विनंती आहे. या उपक्रमातून अनेक प्रश्न मार्गी लागले असून नागरिकांच्या समाधानकारक प्रतिक्रिया आम्हाला प्रेरणा देत आहेत.”या अभियानामुळे सशक्त लोकप्रतिनिधित्व, प्रभावी संवाद आणि गतिमान कामकाज याला चालना मिळत असून जनतेचा सरकारशी थेट संपर्क घडवून आणण्याचे एक प्रभावी साधन म्हणून या अभियानाकडे पाहिले जात आहे.

कंत्राटदारांचे कामांचे पैसे द्या; श्वेतपत्रिका काढा-सुनील माने यांची मागणी

पुणे ता. २५ : सांगली जिल्ह्यात हर्षल पाटील या कंत्राटदाराने शासनाकडून बिले मिळत नाहीत म्हणून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. यांच्यासारख्या अनेक कंत्राटदारांची बिले सरकारकडे थकीत आहेत. मात्र सरकार याबाबत नेहमी खोटी माहिती देत आहे. याबाबत सरकारने श्वेतपत्रिका काढून खरी माहिती जनतेसमोर अणावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ता सुनील माने यांनी केली आहे.
याबाबत बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रात जवळपास ८० हजार लहान मोठे नोंदणीकृत कंत्राटदार आहेत. त्या प्रत्येकाकडे १० ते १५ कामगार कामाला आहेत. म्हणजे ३० ते ४० लाख लोक या असंघटित क्षेत्रात काम करत आहेत. त्या सर्वांवर उपासमारीची व बेरोजगारीची वेळ आली आहे. छोटे कंत्राटदार कामे करूनही आत्महत्या करण्याच्या विचारात आहेत. महाराष्ट्रात छोट्या मोठ्या कंत्राटदारांचे नव्वद हजार कोटी रुपये शासनाने थकवले आहेत. जवळपास पन्नास लाख लोक या असंघटित क्षेत्रात काम करत आहेत. त्यांच्याही परिस्थितीचे काय होईल अशी चिंता या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आता लागली आहे.
या सर्व कंत्राटदारांनी जुलै महिन्यात शासनाला पत्र दिले. मा. मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन त्यांनी त्यांच्या समस्या मांडण्यासाठी भेटीची वेळ मागत आहेत. ८९ हजार कोटी रुपये शासनाकडे थकलेत अशी त्यांची तक्रार आहे. किती पैसे कोणत्या खात्यात थकले आहेत या संदर्भातल्या याद्या दिलेत. जसे सार्वजनिक बांधकाम विभागात ४० हजार कोटी रुपये, जलजीवन मिशनकडे १२ हजार कोटी, ग्रामविकास मध्ये ६००० कोटी, जलसंधारण, जलसंपदा १३ हजार कोटी, नगर विकास अंतर्गत डीपीडीसी आणि विशेष बाबीचा निधी म्हणून ४२१७ कोटी, ग्रामीण सुधारणा विभाग २११५ आणि १८००० कोटी अशी रक्कम थकीत आहे.
ही रक्कम गेली वर्षभर कंत्राटदार मागत आहेत. कंत्राटदारांनी कर्ज काढून प्रकल्प पूर्ण केलेत, पैसे नसल्याने आता त्यांचे जगणे अवघड झाले आहे. शासनाकडे जवळपास १ लाख कोटी जमलेत. ज्या कंत्राटदारांनी कामे केलीत त्यांना द्यायला शासनाकडे पैसे नसतील तर हे खूप गंभीर आहे. त्यांच्यावर अवलंबून असलेल्या जवळपास ५० लाख लोकांना वाचवायचं काम शासनाला तातडीने हातात घ्यायला लागेल.लाडकी बहीण योजना, महागडे महामार्ग, स्मारके, पुतळे यांच्यासाठी कोट्यावधी रुपये सरकार कर्ज काढत आहे. वेगवेगळ्या योजनातून पैसे वळवत आहे. हे सर्व पैसे लोकांना जगण्यासाठी, ज्यांनी कामे केली त्यांची देयक देण्यासाठी सरकारने वापरले पाहिजेत.
आमची तर मागणी आहे की सरकारने या पद्धतीने जी मान्यता नसताना कामे काढली ती निवडणुकीच्या आधी टक्केवारी घेण्यासाठी कामे काढली का ? जर २० हजार कोटी रुपयांच्या कामाची गरज असेल तर ४०००० कोटीचं काम कसं होतं त्याची चौकशी माननीय मुख्यमंत्री यांनी केली पाहिजे. अर्थसंकल्पात मंजुरी नसताना हजारो कोटींच्या वर्कॲार्डर देणाऱ्या आणि त्यात मलिदा खाणाऱ्या मंत्री अधिकाऱ्यांवर याबाबत मुख्यमंत्र्यांनी गंभीर कारवाई केली पाहिजे. एकूण ९० हजार कोटी रुपयांचा आकडा असताना सरकार कमी आकडे दाखवत हे नेहमीप्रमाणे चालू झाले आहे. आता सरकारने याबद्दल श्वेतपत्रिकाही काढली पाहिजे. लोकांची बिल दिली पाहिजे आणि या सर्व असंघटित कामगारांना, छोट्या मोठ्या कंत्राटदारांना जीवदान दिले पाहिजे. अन्यथा हर्षल पाटील सारखे अनेक कंत्राटदार आत्महत्या करतील, त्यामुळे सरकारने यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी सुनील माने यांनी केली आहे.

एसबीआय लाईफ इन्शुरन्सने 7,268 कोटी रुपयांचा न्यू बिझनेस प्रीमियम नोंदवला

देशातील आघाडीची जीवन विमा कंपनी असलेल्या एसबीआय लाईफ इन्शुरन्सने 30 जून 2025 रोजी संपलेल्या कालावधीत 7,268 कोटी रुपयांचा न्यू बिझनेस प्रीमियम नोंदवला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीसाठी हा प्रीमियम 7,033 कोटी रुपये होता. तर 30 जून 2024 रोजी संपलेल्या याच कालावधीच्या तुलनेत यंदा नियमित प्रीमियममध्ये 12% ची वाढ झाली आहे.

संपूर्ण लक्ष सुरक्षेवर केंद्रित करत एसबीआय लाईफचा प्रोटेक्शन न्यू बिझनेस प्रीमियम 30 जून 2025 रोजी संपलेल्या कालावधीसाठी 980 कोटी रुपये होता. तर प्रोटेक्शन इंडीव्हिज्युअल न्यू बिझनेस प्रीमियम याच कालावधीसाठी 165 कोटी रुपये होता. 30 जून 2024 रोजी संपलेल्या कालावधीच्या तुलनेत वैयक्तिक नवीन व्यवसाय प्रीमियम 4% वाढीसह 4,939 कोटी रुपये होता.

30 जून 2025 रोजी संपलेल्या कालावधीत एसबीआय लाईफचा कर वजा जाता नफा 594 कोटी रुपये झाला आहे, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील नफ्यापेक्षा 14% नी वाढला आहे.

कंपनीचा सॉल्व्हन्सी रेशो सामान्यपणे 1.50 च्या आसपास असण्याची आवश्यकता असते. त्या तुलनेत 30 जून 2025 रोजी 1.96 वर राहिला आहे.

एसबीआय लाईफच्या एयूएममध्ये 15% ने वाढ होऊन 30 जून 2025 रोजी तो 4,75,813 कोटी रुपये झाला. गेल्या वर्षी याच कालावधीत (30 जून 2024) तो 4,14,772 कोटी रुपये होता, ज्यात डेबिट-इक्विटीचे गुणोत्तर 60:40 होते. 94% कर्ज गुंतवणूक AAA आणि सॉवरेन इंस्ट्रुमेंट्समध्ये आहे.

कंपनीकडे 3,23,838 प्रशिक्षित विमा व्यावसायिकांचे वितरण नेटवर्क आहे तसेच देशभरात 1,146 कार्यालये देखील आहेत. यामध्ये मजबूत बँकाश्युरन्स चॅनल, एजन्सी चॅनल आणि कॉर्पोरेट एजंट्स, ब्रोकर्स, पॉइंट ऑफ सेल पर्सन (पीओएस), विमा मार्केटिंग फर्म्स, वेब एग्रीगेटर्स आणि डायरेक्ट बिझनेस यांचा समावेश आहे.

30 जून 2025 रोजी संपलेल्या कालावधीतील कामगिरी

  • आयआरपी आणि इंडस्ट्रीज एनबीपीमध्ये खासगी बाजारपेठेतील अनुक्रमे 22.3% आणि  25% बाजार हिस्सा घेत आघाडी.
  • वार्षिक प्रीमियम इक्विव्हॅलंटमध्ये (एपीई) 9% वाढ नोंदवत रु. 3,969 कोटी.
  • 73% वाढ नोंदवून वैयक्तिक नवीन व्यवसाय विमा रक्कम रु. 66,631 कोटी.
  • 13 दशलक्ष आणि 61 दशलक्ष स्थिरतेमध्ये अनुक्रमे 58 बीपीएस आणि 501 बीपीएसने सुधारणा.
  • नवीन व्यवसायाचे मूल्य (व्हीओएनबी) 12% वाढीसह 1,088 कोटी रु.
  • व्होएनबी मार्जिन 27..
  • इंडियन एम्बेडेड व्हॅल्यू (आयईव्ही) 20% वाढ नोंदवत 74,257 कोटी रु. झाली आहे.
  • 14% वाढीसह करपश्चात नफा (PAT) 594 कोटी रु. झाला आहे.
  • सॉल्व्हन्सी रेशो मजबूत 1.96 वर.
  • 15% वाढीसह व्यवस्थापनाखालील मालमत्ता 4,75,813 कोटी रु. झाली आहे.

एसबीआयकडून 13,455 ज्युनिअर असोसिएट्सच्या नियुक्तीला सुरुवात

संपूर्ण देशभर ग्राहक सेवा बळकट करण्याचे उद्दिष्ट्य

मुंबई, 25 जुलै 2025: देशाची सर्वात मोठी आणि विश्वासार्ह बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया देशभरातील आपल्या विस्तृत शाखा नेटवर्कमध्ये नव्याने भरती करण्यात आलेल्या 13,455 ज्युनिअर असोसिएट्स (कनिष्ठ सहायक) च्या नेमणुकीला सुरुवात करत आहे.

हे नवे असोसिएट्स बँकेच्या अग्रणी, आघाडीवरील कर्मचाऱ्यांच्या कार्यशक्तीत एक मोलाची भर घालत आहेत. त्यायोगे एसबीआयच्या सेवाभावाला अनुसरून नवचैतन्य, बांधिलकी आणि ग्राहक प्रथम हा दृष्टिकोन जोमाने पुढे येत आहे. या महत्वपूर्ण टप्प्यामुळे ग्राहकांना मिळणाऱ्या सेवांचा  अनुभव उंचावण्यासाठी आणि प्रत्येक पातळीवर कार्यक्षमता वाढवण्यासाठी बँकेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना बळकटी मिळणार आहे.

एसबीआयने 11 जून रोजी ज्युनिअर असोसिएट्सच्या भरतीची घोषणा केली होती. त्यावेळी बँकेचे अध्यक्ष श्री. सी. एस. सेठी यांनी बदलत्या कार्यात्मक व तांत्रिक गरजांशी सुसंगत अशा सुव्यवस्थित कौशल्य विकास कार्यक्रमांच्या अंमलबजावणीद्वारे मनुष्यबळ विकास क्षमतेच्या बळकटीकरणावर भर दिला होता.

एसबीआयचे 2,36,000 हून अधिक कर्मचारी असून बँकिंग क्षेत्रातील व्यावसायिकांच्या पुढील पिढीला घडवण्याचा त्यांना अभिमान आहे. अधिक मजबूत, सर्वसमावेशक भविष्याच्या उभारणीसाठी एसबीआय कटिबद्ध आहे.