Home Blog Page 439

महामृत्युंजय यागातून पुणेकरांनी अनुभवली भक्ती उर्जा

अखिल मंडई मंडळात महामृत्युंजय याग; भाविकांच्या वतीने लक्ष बिल्वपत्र अर्पण


पुणे:  ॐ त्र्यंबकं यजामहे…’ च्या मंत्रघोषात अखिल मंडई मंडळाच्या वतीने आयोजित महामृत्युंजय याग अत्यंत भक्तिभावपूर्ण वातावरणात भक्तांच्या उपस्थितीत पार पडला.  श्री शारदा गजानन मंदिर, महात्मा फुले मंडई येथे  मंत्रोच्चार, हवन व धार्मिक विधी यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. यानंतर दुपारी लक्ष बिल्वपत्र अर्पण करण्यात आले. यामध्ये  महिला, पुरुष आणि तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

यावेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, विश्वास भोर, विक्रम खन्ना, सुरज थोरात, तुषार शिंदे, चेतन वाघमळे उपस्थित होते. राजेश कराळे यांनी सपत्निक पूजा केली.

अण्णा थोरात म्हणाले, जीवनातील व्याधी, संकटे आणि मृत्यूचे भय दूर व्हावे, तसेच आरोग्य, चैतन्य व शांती लाभावी, या उद्देशाने मंडळाने यागाचे आयोजन केले होते.  महामृत्युंजय यागाच्या माध्यमातून पुणेकरांनी श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मकतेचा अनुभव घेतला. अशा धार्मिक उपक्रमांमुळे समाजात आध्यात्मिक जागृती निर्माण होते.

यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी तणावमुक्त, मानसिकदृष्ट्या सक्षम व्हावे-डॉ. दत्ता कोहिनकर  

धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानतर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार व करिअर मार्गदर्शन

पुणे: “आजच्या स्पर्धात्मक युगात फक्त अभ्यासात हुशार असणे पुरेसे नाही. यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी मानसिकदृष्ट्या सशक्त असणे, करिअरबाबत स्पष्टता असणे आणि तणावावर प्रभावी नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, बदलत्या काळात येणाऱ्या आव्हानांचा सामना सकारात्मक दृष्टिकोनातून करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये असली पाहिजे. यासाठी योग्य मार्गदर्शन, वेळेचे नियोजन आणि भावनिक समतोल या गोष्टींचा समावेश त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात झाला पाहिजे,” असे प्रतिपादन माईंड पॉवर ट्रेनर डॉ. दत्ता कोहिनकर यांनी केले.धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात डॉ. कोहिनकर बोलत होते. संस्थेच्या राजमाता जिजाऊ माँसाहेब सभागृहात ‘यशाचा सन्मान, भविष्यासाठी दिशा’ संकल्पनेवर झालेल्या कार्यक्रमावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप, संस्थेचे सल्लागार विद्यासागर सर, संचालक अनिकेत चव्हाण, संदीप चव्हाण, सीए हर्षदा अनिकेत चव्हाण यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिंहगड रोड परिसरातील जवळपास ३० शाळांमधील दहावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेतर्फे गौरव करण्यात आला.

अनिकेत चव्हाण म्हणाले, “गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार म्हणजे फक्त यशाचे कौतुक नाही, तर त्यांच्या विचारांना दिशा देणे, निर्णयांमध्ये स्पष्टता आणणे आणि पुढच्या वाटचालीसाठी योग्य दिशा देणे ही खरी आपली जबाबदारी आहे. अशा उपक्रमांतून शिक्षण संस्था ही केवळ अभ्यासापुरती मर्यादित न राहता, जीवन घडवणारी कार्यशाळा बनते,अशी माझी भूमिका आणि दिशा आहे.”

“दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्तम निकाल मिळवला याचा आनंद तर आहेच, पण त्याचबरोबर पुढील शैक्षणिक प्रवासासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन देणे ही समाज आणि संस्थेची सामूहिक जबाबदारी आहे. केवळ गुणवंतांचा सत्कार न करता, त्यांच्यात मानसिक स्थैर्य, करिअरविषयी स्पष्टता आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा, हा या कार्यक्रमामागचा खरा उद्देश आहे.”

– काकासाहेब चव्हाण, संस्थापक अध्यक्ष, धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान

अण्णाभाऊंचा ‘फकिरा’  आमच्या घरी!

लेखक: आचार्य रतनलाल सोनग्रा

१९६४ साल असेल, अण्णा भाऊ साठेंच्या ‘फकिरा’ च्या कादंबरीवर चित्रपट निर्मिती होत होती. ‘फकिरा’ च्या झुंजार जीवनावर चित्रपट काढायचा होता. चित्रपटासाठी लागणारं वेगवान कथानक त्यात होतं. स्वत: अण्णाभाऊ साठे आणि प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक लेखक के. ए. अब्बास = (ज्यांनी राज कपूरच्या आवारा, बूटपॉलीश, मेरा नाम जोकर इ. बहुतेक चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या) यांनी ‘फकिरा’ ची पटकथा तयार केली होती. या चित्रपटाचे चित्रीकरण नगर तालुक्यातील अकोळनेर या गावी घेण्यात येत होते.

नगर जिल्हा तसा साम्यवादी चळवळीत फार आघाडीवर होता. राजकीय कार्यकर्त्यांची एक संपूर्ण तरूण पिढी साम्यवादी विचारांनी भारावलेली हेाती. राहुरीचे कडू पाटील, शेवगाचे एकनाथ भागवत, पाथर्डीचे बाबुजी आव्हाड, लक्ष्मण पालवे, श्रीरामपूरचे अण्णासाहेब शिंदे – नगरचे चंद्रभान आठरे पाटील, पारनेरचे भास्करराव औटी, नेवाश्याचे वकिलराव लंघे, नगरचे बाळासाहेब नागवले किती नावे घ्यावीत.

डॉ. श्रीराम रानडे हे अहमदनगरचे लोभस आणि सर्व पुरोगामी चळवळींना आणि कार्यकर्त्यांना सदैव मदतीचा हात देणारे व्यक्तिमत्त्व ! एका अर्थाने ‘नगरचे नेहरू’ च होते.‘फकिरा’च्या सर्व कलाकारांचा मुक्काम त्यांच्या एैसपैस घरात होता… अर्थात कलावंतांना आपापल्या सोयीचे हॉटेल होतेच. पण डॉक्टरांना भेटल्यावरच, त्यांच्याशी चर्चा केल्यावरच सर्व पाने हलायची. अण्णाभाऊ साठे मला तिथेच भेटले. त्यांनी ‘फकिरा’ ची एक प्रत स्वहस्ताक्षरात  ‘सप्रेम भेट’ लिहून मला दिली. अण्णाभाऊंचं ते सावळे रूप मला अत्यंत कोमल आणि विनम्र वाटलं …

साम्यवादी चळवळीत अण्णाभाऊंना विविध शिबिरांतून भाषणांतून आधुनिक जगातील सर्व प्रवाह समजत असत. गिरणी कामगारांचे संघर्षमय जीवन जगणार्‍याने आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय शोषक सत्तेचे स्वरूप ओळखले. ‘सर्व सत्ता लोकांसाठी’ करायची असेल तर पुरोगामी विचार या मातीच्या लोककलेतून मांडायला हवा. अण्णाभाऊ आणि त्यांचे सहकारी इंडियन पीपल्स थिएटर’ (इष्टा) या संस्थेमार्फत लोकजागृतीची विविध माध्यमे वापरत असत. यात स्मृतिशेष बलराज सहानी, नीतिन  सेठी, ए. के. हन्गल, कबीर बेदी – रमेश तलवार, सुलभा आर्य आदि कलावंत सहभागी होत असत.

अण्णाभाऊंचा आधुनिक चित्रपटसृष्टीशी आणि त्यातील कथानक पात्रांशी इंग्रजी चित्रपटाच्या माध्यमातून संपर्क होता. ‘मेट्रो’ ला लागलेले उत्कृष्ट इंग्रजी चित्रपट ते कधी चुकवीत नसत – तेव्हा तत्कालिन प्रसिद्ध चित्रपट BENHUR QUAWADIS THE TEN COMANDMENTS M.G. वेल्सचे THE TIME MACHINE त्याच प्रमाणे चार्ली चॅप्लीनचे प्रख्यात चित्रपट  MODERN TIMES CITY LIGHT हे अत्यंत प्रभावी होते.

अण्णाभाऊंना ‘कथा’ सांगण्याची-लिहिण्याची जबरदस्त ओढ होती ! त्यांनी कादंबरी हा प्रकार अत्यंत परिणामकारक रीतीने हाताळला. मॅक्झिम गॉर्की, पर्ल बक यांच्या कादंबर्‍यांचे अनुवाद त्यांनी वाचले होते. विशेषत: जागतिक वाङ्मयात रशियन कादंबरी अत्यंत श्रेष्ठ गणली जाते. उदा., ‘क्राईम अँड पनिशमेंट’ सारखी अजरामर कादंबरी. अनेक भाषांत चित्रपटाचे विषय होते. त्या साहित्यकृतीवरील रशियन चित्रपटही अत्यंत भव्य दिव्य होते. अण्णाभाऊंनी याचा जिवंत अनुभव घेतला होता.

चित्रीकरण सुरू

अगदी सकाळीच आम्ही अकोळनेरसाठी रवाना होत असू. मी आणि माझा मित्र लक्ष्मीनारायण रोहीवाल, आम्ही डेव्हीड यांना सोबत देत होतो. सिने अभिनेते डेव्हिड त्यात गोर्‍या इंग्रज अधिकार्‍यांची भूमिका करीत होते.

विष्णुपंत कुलकर्णी, नाना पळशीकर होते. डॉ. श्रीराम रानडे यांची धिप्पाड देहयष्टी असून नाट्याभिनयाची जाण होती. त्यांना फकिराच्या पित्याची भूमिका देण्यात आली. सौ. कमलाबाई रानडे यांनीही सावकार पत्नीची भूमिका केली. आमचे मित्र दूर इंग्रज अधिकार्‍यांचे शिपाई म्हणून उभे राहत असत. व्ही. शांताराम यांचे सहाय्यक दिग्दर्शक असलेले कुमार चंद्रशेखर हे दिग्दर्शक होते. चित्रिकरणाचे काम फारच कंटाळवाणे होते. एक एक दृश्य घेण्यासाठी कितीतरी वेळा तालीम करावी लागे. प्रत्येक वेळी तो ‘मूड’ येईलच असे नव्हते. नदीच्या पात्रात दहापंधरा वेळा उतरून तोच तोच ‘सिन’ देताना कमालीचे धैर्य लागते. रूपेरी कागदाचे फळ्यांवरचे पडदे .. पांढर्‍या कपड्यांना निळसर रंग दिलेला. चित्रपट सृष्टीचे लोक म्हणजे आम्हाला देवलोकातील गंधर्वच वाटत हाते. तेथील मातंग वस्तीत मातीचे घर, त्यातील चूल आणि त्याच ठिकाणी तळपणारी ‘फकिरा’ ची तलवार. आमच्या समोर हे विस्मयकारी चित्रीकरण घडत होत होते.

अहमदगनर हे ऐतिहासिक शहर आहे. त्यातील काही वाडे – किल्ला-मशिदी पाहून चित्रपटातील कलावंत मंडळी खूप खुश होत. कुणी काही वस्तू मागायचा अवकाश की आम्ही ती आणून द्यायला तत्पर असू. के. ए. अब्बासना कुणीतरी म्हणालं इथं ‘बर्फी’ फार चांगली मिळते. झालं ! रात्री अकराच्या सुमारास चितळे रोडवरील वखारेच्या हॉटेलात त्यांना बर्फी खाऊ घातली.

डॉ. रानडे यांचा दरबार !

अहमदनगरमधील सारडा गल्लीत आमचे जुने घर आहे. डॉ. श्रीराम रानडे यांच्याकडे सर्व कलावंत येत असत. डॉ. साहेब दिलदार आणि पुरोगामी चळवळीचे समर्थक असल्याने त्यांचा ‘दरबार’ म्हणजेच दिवाणखाना नेहमी कलावंतांनी फुललेला असे. फकिरातील विष्णुपंत कुलकर्णी म्हणजेच ज्येष्ठ नटवर्य नाना पळशीकर गप्पा मारीत. तेही कुठेतरी मुंबईला घाटकोपरच्या डोंगरावर झोपडपट्टीजवळच रहात होते. त्यांना दलित जीवनाची अत्यंत जवळून जाणीव होती.’

‘फकिरा’ चे चित्रीकरण म्हणजे नगरकरांचा चित्रपट उत्सवच होता. चंद्रकांत, सूर्यकांत हे अभिनेते भालजी पेंढारकरांच्या चित्रपटामुळे विशेष प्रसिद्ध होते.

या सगळ्या धामधुमीत मला ताप आला आणि एकदोन दिवस मी तिकडे फिरकलोलो नाही. डॉक्टरसाहेबांना संध्याकाळी मित्रासमवेत अहमदनगर स्टेशनवर  जाऊन तेथील स्पेशल चहा पिण्याची सवय होती. ‘चहा’ तयार होईपर्यंत आम्ही वेटींग रूममध्ये गप्पा मारीत असू. पण दोन दिवस मी नव्हतो. अचानक रात्री नऊच्या सुमारास डॉ. रानडे यांची २४२४ ही गाडी सारडा गल्लीत आली.

‘डॉक्टर आले… डॉक्टर आले …. अशी तमाम गल्लीत द्वाही पसरली. मी तिसर्‍या मजल्यावर होतो. डॉक्टरसाहेब आमचा अत्यंत अवघड फरशीचा जिना चढून वर आले. त्यांचे उंचेपुरे व्यक्तिमत्त्व अशा जिन्यातून सहजतेने चढणे मुश्कील होते. त्यांना आपले ‘डोके’ वाचवून चढावे लागले ! डॉक्टरसाहेब आत येताच मी उठून बसलो. पहातो तर त्यांच्यामागे ‘फकिरा’ ची भूमिका करणारे अभिनेते ‘सूर्यकांत’. विष्णूपंत कुलकर्णी – ऊर्फ नाना पळशीकर होते. आमच्या घरातील दोन लाकडी व एक लोखंडी खुर्ची देण्यात आली. आपल्या घरांत चित्रपटातील मंडळी आली आहेत हे  फक्त माझ्या मोठ्या भावालाच माहीत होते. वडिलांना डॉक्टरसाहेब घरी आले याचेच ‘अप्रूप’ होते…

‘‘काय म्हणतोस रतन ?’’ डॉक्टर म्हणाले.

‘‘काही नाही, जरा ताप होता…..’’ मी म्हणालो.

‘‘कसला ताप – नुसता भटकतोस !‘’ ते म्हणाले. खरे म्हणजे डॉ. रानडे यांच्यासमोर पेशंट त्यांना पाहूनच बरा होत असे.

‘‘उद्या सकाळी येतो.’’ मी म्हणालो.

‘‘डॉक्टरसाहेब, आज आपण आलात आणि विष्णुपंतांना व सूर्यकांतनापण बरोबर आणले.’’

‘‘यांनाही रात्री लवकर कुठली झोप येते ?’’

‘‘सहज आणले….’’

‘‘अरे वा ! हा फोटो कुणाचा ?’’ सूर्यकांतजींनी विचारले. ‘‘मगजींचा… माझ्या आजोबांचा !’’ मी म्हणालो. माझे आजोबा राजपूत योद्ध्यासारखे होते. त्यांच्या पांढर्‍या शुभ्र गलमिशा, डोक्यावर राजस्थानी फेटा, खूपच शोभून दिसत असे.

‘‘डॉक्टरसाहेब, ‘राणोजी’ चा मेकअप असाच हवा नाही ?’’

डॉ. रानडेंना फकिरात  भूमिका देण्यात आली होती. त्यांची धिप्पाड बांधेसूद अंगकाठी ! वेषभूषेनंतर ते खूपच छान दिसायचे !

आमच्या घरातली सगळी मंडळी जिन्यात येऊन हळूच या सिनेअभिनेत्यांना पाहून जात होती. माझ्या वडिलांचा व बंधूंचा मी परिचय करून दिला. आपला रतन वयाने लहान असला तरी किती मोठी मंडळी त्यांच्याकडे येतात असे कौतुकमिश्रित भाव त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होता. मीही मनातल्या मनात भाव खात होतो. ‘फकिरा’ ची क्रांती माझ्या डोक्यात भिनली होती. किती लवकर सगळं बदलून टाकू असं मला झालं होतं. शोषणा मुक्त समाजाचं स्वप्न सतत नजरेसमोर दिसत होता. चहापान करून मंडळी रात्री परत गेली.

मला वाटतं, नदीच्या दोन्ही बाजूला उभे राहून दुसर्‍या दिवशी फकिराचे मस्तक घेण्याचे काम होतं.  फकिराचे अंतिम संस्कार कोण करणार ? इंग्रज सरकारची प्रचंड दहशत होती. या प्रसंगाचे चित्रीकरण होते. कॅमेरा… लाईट … अ‍ॅक्शन … हे शब्द आसमंतात सतत ऐकू येत होते…  फक्त मस्तक ताब्यात घेण्याच्या दृश्याला संपूर्ण दिवसाचे बलिदान करावे लागले.

चित्रपटात भूमिका करणं निर्मिती करणं या गोष्टी सोप्या नाहीत. त्याला अत्यंत कष्ट लागतात. आपल्याला वाटतं, सिनेमात खूप पैसा आहे. पण खरं सांगायचं तर खूप परिश्रम आहेत. अण्णाभाऊंनी ‘फकिरा’ त आपले आयुष्य घातले. जगाच्या साहित्यक्षेत्रात एक झुंजार क्रांतिकारक वास्तववादी खर्‍याखुर्‍या पात्राने आपली हजेरी लावली आहे. रिचर्ड अ‍ॅटिन्बरोने ‘गांधी’ निर्माण केला. आता कुणीतरी इंग्रजीत ‘फकिरा’ निर्माण करायला हवा. ‘ज्यूलियस सिझर’, ‘स्पार्टाकस, ‘रॉबिन हूड’, ‘सॅम्सन’ च्या तोडीचा हा ‘नायक’ साकार होईल. ‘फकिरा : द ग्रेट’ ह्या पात्राची मी सिनेमास्कोप पडद्यावर वाट पहात आहे. ‘फकिरा’ माझ्या घरी आला आणि अण्णाभाऊ साठेंच्या झुंजार लेखणीचा अद्भुत चमत्कार मी अनुभवला !

‘अण्णा भाऊ साठे जीवनाच्या मांगल्याचे साहित्यिक’ होते.

रशियातील कामचटका येथे 8.8 तीव्रतेचा भूकंप:त्सुनामीच्या 4 मीटर उंच लाटा

0

जगातील सहाव्या क्रमांकाचा सर्वात मोठा भूकंप रशियाच्या पूर्व द्वीपकल्प कामचटका येथे झाला आहे. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण (USGS) नुसार, भूकंपाची तीव्रता 8.8 होती. भारतीय वेळेनुसार बुधवारी पहाटे 4:54 वाजता हा भूकंप झाला.रॉयटर्सच्या मते, कामचटकाला 4 मीटर उंचीपर्यंतची त्सुनामी आली आहे. त्यामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. USGS ने सांगितले की भूकंपाचे केंद्र जमिनीपासून 19.3 किलोमीटर खोलीवर होते.

कामचटकाचे राज्यपाल व्लादिमीर सोलोडोव्ह यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आणि सांगितले की आजचा भूकंप दशकांमधील सर्वात शक्तिशाली होता. त्यांनी सांगितले की एका बालवाडी शाळेचे नुकसान झाले आहे.

जपानच्या NHK टेलिव्हिजननुसार, देशाच्या पूर्व किनाऱ्याजवळ एक फूट उंचीच्या पहिल्या त्सुनामी लाटा आल्या आहेत. जपानने 20 लाख लोकांना बाहेर काढले आहे आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी नेले आहे. याशिवाय, त्यांच्या फुकुशिमा अणुभट्टीतील लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.
जपानमधील सुमारे २० लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्यास सांगण्यात आले आहे. देशाच्या किनारपट्टी भागात त्सुनामीच्या लहान लाटा धडकत आहेत. तथापि, लाटा पूर्वी नोंदवलेल्या आकारापेक्षा खूपच लहान आहेत.

जपानच्या आपत्ती व्यवस्थापन संस्थेनुसार, देशातील २१ वेगवेगळ्या प्रांतांमधील स्थानिक अधिकाऱ्यांनी लोकांना त्यांची घरे रिकामी करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आदेश दिले आहेत.

सर्वाधिक प्रभावित लोक होक्काइडो, कानागावा आणि वाकायामा सारख्या भागात आहेत. होक्काइडो हे जपानचे सर्वात उत्तरेकडील बेट आहे. त्सुनामीच्या पहिल्या लाटा येथे धडकल्या. अनेक माध्यमांच्या वृत्तानुसार लोक छतावर आश्रय घेत असल्याचे दिसून आले आहे.
रशियातील भूकंपानंतर पेरू, इक्वेडोर आणि चीनमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. एएफपीच्या वृत्तानुसार, पेरू आणि इक्वेडोरच्या गॅलापागोस बेटांवर इशारा देण्यात आला आहे.

खबरदारी म्हणून काही भागातून लोकांना बाहेर काढण्यात येत आहे. जरी हे भाग रशियाच्या कामचटका द्वीपकल्पातील भूकंपाच्या केंद्रापासून सुमारे १३,००० किलोमीटर (८,००० मैल) अंतरावर असले तरी, संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर अजूनही खबरदारी घेतली जात आहे.

याशिवाय, पूर्व चीनच्या काही किनारी भागात त्सुनामीच्या लाटा येण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) नुसार, हा आतापर्यंतच्या सहाव्या सर्वात शक्तिशाली भूकंपांमध्ये गणला जाईल.

यापूर्वी, त्याच तीव्रतेचे आणखी दोन मोठे भूकंप झाले होते. एक २०१० मध्ये चिलीच्या बायोबायो प्रदेशात आणि दुसरा १९०६ मध्ये इक्वेडोरमधील एस्मेराल्डास येथे आला.

यूएसजीएस नुसार, चिलीच्या भूकंपात ५२३ लोकांचा मृत्यू झाला आणि ३.७ लाखांहून अधिक घरे उद्ध्वस्त झाली. त्याच वेळी, इक्वेडोरच्या भूकंपामुळे आलेल्या मोठ्या त्सुनामीत १,५०० लोकांचा मृत्यू झाला आणि लाटा अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोपर्यंत पोहोचल्या.

आणखी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे आतापर्यंतचा पाचवा सर्वात तीव्र भूकंप रशियाच्या कामचटका प्रदेशातही आला. हा भूकंप १९५२ मध्ये आला होता आणि तो जगातील पहिला ९ तीव्रतेचा भूकंप मानला जातो.

त्या भूकंपामुळे हवाईला प्रचंड त्सुनामी आली ज्यामुळे तेथे १० लाख डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान झाले.

चाकण एमआयडीसीतील वीजपुरवठा सुरळीत

पुणे,- महापारेषण कंपनीच्या २२० केव्ही चाकण फेज-२ अतिउच्चदाब केंद्रातील ५० एमव्हीए क्षमतेचे रोहित्र नादुरुस्त झाल्याने गेल्या चार दिवसांपासून चाकण औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांचा व परिसरातील गावांचा वीजपुरवठा चक्राकार पद्धतीने सुरु होता. महावितरण व महापारेषण या दोन्ही कंपन्यांनी युद्धपातळीवर काम करुन मंगळवारी (दि. २९) दुपारी १२.१९ वाजता बिघाड दुरुस्त करत वीजपुरवठा पुर्ववत करण्यात यश मिळविले आहे.

चाकण फेज-२ अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात महापारेषण कंपनीचे ५० एमव्हीए क्षमतेचे दोन अतिउच्चदाब रोहित्रे आहेत. पैकी एकामध्ये २१ तारखेला बिघाड झाला. चाकण औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांना रविवारची सुटी असल्याने विजेची मागणी कमी असते. त्यामुळे २६ तारखेला दुपारी ४ वाजता नादुरुस्त रोहित्र बदल्याचे काम पारेषण कंपनीने हाती घेतले. २८ तारखेला सकाळी ९.३५ वाजता काम पूर्ण करुन वीजपुरवठा सुरु करण्यात आला. तो दिवसभर चालला. मात्र सायंकाळी त्याच रोहित्रात पुन्हा बिघाड झाला. भरपावसात पुन्हा बिघाड दुरुस्ती करण्यात आली. शेवटी मंगळवारी (२९ जुलै) दुपारी १२.१९ वाजता उच्चदाब रोहित्र पूर्ण क्षमतेने कार्यन्वित करण्यात यश आले.

महापारेषणच्या बिघाड दुरुस्ती काळात संबंधित रोहित्रावर असलेला ४० मेगावॅटचा भार दुसऱ्या रोहित्रावर वळवून चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा करण्यात आला. या संपूर्ण काळात उच्चदाबाचे १९० व लघुदाबाचे ११०० औद्योगिक ग्राहक तर वराळे, भांबोळी, सावरदरा, शिंदे, वासोली व सांगुर्डी आदी गावांमधील अंदाजे ६५०० वीजग्राहकांना याची झळ बसली. महावितरणने गावांना रात्री तर उद्योगांना दिवसा चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा केला. उच्चदाब औद्योगिक ग्राहकांमध्ये टाटा टॅको, जीई, पॅकटाईम, इमरसन, इमीटेक, इस्सार, प्लास्टिक ओम्नीअम, बजाज इलेक्ट्रिक आदी ग्राहकांचा समावेश होता.

महावितरणचे मुख्य अभियंता सुनील काकडे, महापारेषणचे मुख्य अभियंता अनिल कोलप, अधीक्षक अभियंता युवराज जरग (महावितरण) व विठ्ठल भुजबळ (महापारेषण), महावितरणचे कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके, उपकार्यकारी अभियंता प्रकाश शेळके, सहा. अभियंता विक्रांत वरुडे यांनी युद्धपातळीवर यंत्रणा कामाला लावून बिघाड दुरुस्तीचे व वीजपुरवठ्याचे नियोजन केले.

शिवाजीनगर एसटी स्थानकाचा कोणासाठी केला भाजपने खेळ खंडोबा-माजी आमदार मोहन जोशी

पुणे : एसटी प्रवाशांसाठी सोयीचे असलेले शिवाजीनगर एसटी स्थानक सहा वर्षांनंतरही बांधले जात नाही. भाजप कोणासाठी प्रवाशांची ही सोय अडवून ठेवून, खेळ खंडोबा करत आहे आहे? असा सवाल माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी पत्रकार परिषदेत केला.

मेट्रो रेल्वेसाठी जुने शिवाजीनगर एसटी स्थानक सहा वर्षांपूर्वी पाडले आणि ते पुणे -मुंबई रस्त्यावरील वाकडे वाडी येथे स्थलांतरित करण्यात आले. वाहतुकीसाठी ही जागा अतिशय धोकादायक आहेच तसेच ती प्रवाशांसाठीही खूपच गैरसोयाची आहे. पण, एसटीसाठी नवीन स्थानक मूळ जागीच पुन्हा लवकरच उभे राहील, या आशेवर प्रवाशांनी धीर धरला. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने आश्वासने दिली की, मूळ जागी तातडीने हे स्थानक उभारू. मात्र, ते आश्वासन गुंडाळले जावून आता त्याजागी खाजगी व्यावसायिकामार्फत एसटी स्थानकाबरोबरच व्यावसायिक संकुलही उभे करण्याचा खटाटोप भाजपकडून चालू आहे.यात कोणाचेतरी हितसंबंध आहेतच. शिवाय व्यावसायिक संकुल बांधताना हा प्रकल्पही लांबणीवर पडेल. या प्रकाराला काँग्रेस पक्षाचा विरोध राहील, असा इशारा मोहन जोशी यांनी दिला आहे.

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने तीन महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी पुणेकर प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मूळ जागी स्थानक लवकर उभे करावे, अशी मागणी करण्यात आली आणि मेट्रो कंपनी आणि परिवहन खाते यांच्यातील करारानुसार एसटी स्थानक उभारण्याचे काम मेट्रो कंपनी करणार आहे, त्यादृष्टीने दोन्ही कंपन्यांमध्ये समन्वय साधला जावा , हे ही तेव्हा उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले, त्यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी लगेचच फोनवर परिवहन मंत्री आणि मेट्रो च्या अधिकाऱ्यांशी बोलणी केली. दरम्यान, मेट्रो ऐवजी ९८ वर्षाच्या कराराने खाजगी व्यावसायिकाकडून व्यापारी संकुल उभे करण्याचा प्रस्ताव भाजपने तयार करवून घेतला, असे खात्रीलायक समजले, हा सगळा खटाटोप आणि खेळ खंडोबा कोणासाठी चालला आहे? असा प्रश्न मनात येतो, असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे.

.पुणे शहरातील भाजपचे सर्व मंत्री, आमदार यांना आम्ही ताजमहाल उभा करायला सांगत नाही आहोत, एसटी स्थानक उभा करायचा आहे. ते ही त्यांना जमत नाहीये. याचा अर्थ त्यांना पुणेकरांच्या सुख सोयींशी काही देणेघेणे नाही. फक्त निवडणुका जिंकणे, एवढाच त्यांचा अजेंडा आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

पुणेकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला एसटी स्थानक हा विषय मार्गी लागावा म्हणून काँग्रेस पक्ष संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी, निवेदने, आंदोलने अशा विविध मार्गांनी पाठपुरावा करत आहे आणि करत राहील, असे मोहन जोशी यांनी पत्रकारांना सांगितले.

ॠषिकेश ते रामेश्वरम गौ राष्ट्र यात्रेचे पुण्यात उत्साहात स्वागत .

पुणे: गौमाता की जय… भारत माता की जय… अशा घोषणा देत वंदे गौमातरम – गौ आधारित भारताच्या पुनर्निमाणाच्या दिशेने ६१ दिवसांच्या ऐतिहासिक गौ राष्ट्र यात्रेचे पुण्यात आगमन झाले. महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या वतीने औंध येथील गोसेवा आयोग कार्यालयाच्या प्रांगणात या यात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले. ही यात्रा देशभरातील १२ राज्यांतून प्रवास करत एकूण १०,१२७ किलोमीटर अंतर कापणार आहे.

यात्रेचे नेतृत्व भारतीय वेटर्नरी अ‍ँड अ‍ॅग्री रिसर्च इन्स्टिट्यूट अध्यक्ष व डेअरी अ‍ॅग्री कन्सल्टंट भारतसिंह राजपुरोहित आणि राष्ट्रीय गौ सेवक संघाचे संस्थापक नरेंद्र कुमार हे करीत आहेत. सदर यात्रेमध्ये राष्ट्रीय गो सेवक संघ अध्यक्ष रोहित कुमार बिष्ट हे सुद्धा सक्रियपणे सहभागी होते.

यात्रा स्वागत प्रसंगी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, सदस्य संजय भोसले, डॉ. नितीन मार्कंडेय, सदस्य सचिव डॉ मंजुषा पुंडलिक, अधिकारी डॉ संगीता केंडे, डॉ आशिष पवार आणि आयोगाचा सर्व कर्मचारी वृंद हजर होता. स्वागत समारंभाला पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयातील सहायुक्त मुख्यालय डॉ. श्यामकांत पाटील, उपायुक्त पुणे डॉ. परिहार आदी उपस्थित होते. महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या सभागृहात पुणेरी पगडी, शाल देऊन गौ राष्ट्र यात्रेच्या आयोजकांचा सन्मान करण्यात आला.

भारतसिंह राजपुरोहित म्हणाले, गायीचा विषय सरकारने समाजावर सोडला अहे. त्यामुळे समाजाला देखील याविषयामध्ये सशक्त व्हायला हवे. गाय हे प्रत्येकाच्या प्रतिष्ठेचे प्रतिक बनेल, असा प्रयत्न आपल्याला करायला हवा. महाराष्ट्रात गोमातेला राज्यमाता म्हणून घोषित करण्यात आले. सर्वच राज्यात अशा प्रकारे गोमातेला राज्यमातेचा दर्जा द्यायला हवा. तब्बल ४२ दिवस आम्ही यात्रेत आहोत. यापुढेही ही यात्रा अशीच सुरु राहणार असून गोबर क्रांती आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. जनजागृती आणि संवादातून गाय हे प्रतिष्ठेचे प्रतिक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केले. राजपुरोहित यांनी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अल्पावधीत केलेल्या भरीव कामाचे कौतुक केले.

महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा म्हणाले, देशी गोवंशाचे संगोपन आणि संवर्धन व्हावे, तसेच गोआधारित शेती केली जावी, याविषयावर जनजागृतीपर ही यात्रा पुण्यात आली आहे. गाय वाचली तरच देश वाचेल. आपण तीन मातांना मानतो. त्यामध्ये सर्वप्रथम आपली आई म्हणजेच माता, मायभूमी म्हणजेच भारतमाता आणि गोमाता. त्यामुळे सर्वांचे कर्तव्य आहे की गोमातेचे रक्षण आणि संवर्धन करायला हवे. गोमातेला राष्ट्र मातेचा दर्जा देखील मिळायला हवा, असेही त्यांनी सांगितले. नरेंद्र कुमार, संजय भोसले, डॉ. नितीन मार्कंडेय यांनी मनोगत व्यक्त केले.

‘संगीतसंध्या’ मैफलीत दमदार तबलावादन आणि आश्वासक गायनाचा आविष्कार

‘कलासक्त’ आयोजित ‘संगीतसंध्या’ मैफलीस रसिकांची दाद

पुणे : डॉ. प्रांजल पंडित यांचे दमदार तबलावादन आणि युवा गायिका मृण्मयी भिडे यांचे सुरेल, आश्वासक गायन ही ‘संगीतसंध्या’ मैफलीची वैशिष्ट्ये ठरली.
कलासक्त कल्चरल फाऊंडेशन आणि आय. एम. ए. आर्ट्स सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘संगीतसंध्या’ या मैफिलीत गायन-वादनाचा बहारदार कलाविष्कार रसिकांनी अनुभवला. डॉ. के. एच. संचेती सभागृह, टिळक रोड येथे ही मैफल रंगली.
कलासक्त फाऊंडेशनचे श्रीरंग कुलकर्णी, आय. एम. ए.चे डॉ. रणजीत घाटगे, डॉ. मोहन जोशी, डॉ. दाक्षायणी पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीरंग कुलकर्णी यांनी कलासक्त कल्चरल फाऊंडेशनच्या कार्याची माहिती दिली. प्रामुख्याने तरुण कलाकारांना वाव मिळावा, त्यांची कला रसिकांसमोर यावी या उद्देशाने कलासक्त फाऊंडेशन कार्यरत आहे. फाऊंडेशनतर्फे शास्त्रीय गायन स्पर्धा घेण्यात येते. आगामी काळात वाद्यवादन स्पर्धेचेही आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘संगीतसंध्या’ मैफलीची सुरुवात डॉ. प्रांजल पंडित यांच्या तबलावादनाने झाली. पंडित आनंद सिधये यांचे शिष्य असलेल्या डॉ. प्रांजल पंडित यांनी ताल त्रिताल सादर केला. पेशकार, कायदा, गत असे सादरीकरण उत्तरोत्तर रंगत गेले. त्यांना मानस साखर्पेकर यांनी लेहरासाथ केली.
उत्तरार्धात मृण्मयी भिडे यांनी राग रागेश्रीमथील ‘प्रथम सूर साधे’ या विलंबित एकतालातील पारंपरिक बंदिशीने सुरुवात केली. त्यानंतर ‘आवत भावत’ ही द्रुत एकतालातील रचना सादर केली. राग मियामल्हारमधील ‘घन गरजत बरसे’ (एकताल) आणि ‘कहे लाडला’ (द्रुत एकताल) ही रचना पेश करत त्यांनी वातावरण निर्मिती केली. ‘धाडिला राम तिने का वनी’ या नाटकातील ‘घाई नको बाई अशी आले रे बकुळफुला’ हे नाट्यपद, ‘तळमळ दूर करी’ ही रचना तन्मयतेने गाऊन ‘बोला अमृत बोला’ या भैरवीने त्यांनी सांगता केली. त्यांना सारंग जोशी (संवादिनी) आणि चिंतामणी वारणकर (तबला) यांनी अनुरूप साथसंगत केली.
असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुनील इंगळे यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. आय. एम. ए. आर्ट सर्कलच्या सचिव डॉ. गीतांजली शर्मा यांनी सूत्रसंचालन केले.

रिपब्लिकन पक्षाच्या मार्गदर्शन शिबिरास कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पुणे शहरच्या वतीने  सिहंगड पायथा, डोणजे या ठिकाणी एक दिवसीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,  शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या नैतृत्वाखाली हे कार्यकर्ता शिबिर घेण्यात आले. एक दिवसीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर दोन सत्रामध्ये होते, पहिल्या सत्रात पक्ष संघटन व पक्ष बांधणी या विषया वर  कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दुसऱ्या सत्रात आगामी महानगर पालिका निवडणूक, सभासद नोंदणी या विषयावर नेत्यांचे मार्गदर्शन झाले व नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले.

याप्रसंगी शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर, असित गांगुर्डे, अशोक कांबळे, मंदार जोशी, मोहन जगताप, महेंद्र कांबळे, विशाल शेवाळे, महिपाल वाघमारे, बाबूराव घाडगे, बसवराज गायकवाड, भगवान गायकवाड, वसंत बनसोडे, शाम सदाफुले, वीरेन साठे, निलेश आल्हाट, हबीब सैय्यद, विनोद टोपे, उमेश कांबळे, प्रवीण ओव्हाळ, अविनाश कदम, डॉ. कपिल जगताप, भारत भोसले, वसंत ओव्हाळ, संदीप धाडोरे, चिंतामन जगताप, सुगत धसाडे, गणेश जगताप, सज्जन कवडे, शशिकांत मोरे, मिलिंद पानसरे, सिदधू कांबळे, संतोष खरात, महादेव कांबळे, मिलिंद बनसोडे, रामभाऊ कर्वे, संग्राम रोहम, अंबादास कोतले, भीमराव वानखेडे, मंगल रासगे, शोभा झेंडे, चांदणी गायकवाड, संजय जाधव, अंकिता भालेराव, शंकर शेलार, शिवाजी गायकवाड, रामकृष्ण खिलारे, राजू कांबळे, यादव हरणे, सुनील जाधव, रोहित कांबळे, संजय पटणपल्लू, प्रमोद कदम, गोविंद साठे, अतुल भालेराव, शांतीनाथ चव्हाण, रमेश तेलवडे, हनुमंत गायकवाड, के. जी. पवळे, तुरुकमारे, वसंत वाघमारे, सुभाष शिंदे, बाळासाहेब खंकाळ, तानाजी तापकीरे, भीमराव वाघमारे, बाळासाहेब शेलार, अमित सोनवणे, शरनू गायछोडे, सशाक माने, प्रवीण येवले, शिवाजी उजागरे, खंडू शिंदे, अक्षय गायकवाड, अंबादास कोतले, अयुब जहागीरदार, संग्राम साळवे, शिवशरण गायकवाड, अमित सोनवणे, निखिल कांबळे, जाईल ऍंथोनी, मिलिंद चलवादी, शिवाजी वाल्हेकर, अनिकेत मोहिते, सचिन गायकवाड, संतोष कांबळे, विक्की वाळके, फक्कड शेळके, सुदर्शन कांबळे, सदा शिंगे, निखिल कांबळे, सागर सोनवणे व चारशे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिपाल वाघमारे व प्रास्ताविक शाम सदाफुले यांनी केले.

पिंपरी-चिंचवडमध्ये जिल्हा व सत्र न्यायालयासह वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई, दि. 29:- पिंपरी-चिंचवड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास राज्य मंत्रीमंडळाने आज मान्यता दिली आहे. पिंपरी-चिंचवडकरांसाठी दिलासादायक आणि ऐतिहासिक ठरणाऱ्या या निर्णयाला आज मूर्त स्वरूप मिळाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

उद्योग नगरी म्हणून ख्याती असणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरांच्या विकासात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे योगदान आहे. या उद्योग नगरीचा विस्तार सातत्याने वाढत आहे. येथील नागरिकांना आपल्या फौजदारी आणि दिवाणी प्रकरणांसाठी पुणे येथील न्यायालयांपर्यंत धाव घ्यावी लागत होती. सोळा किलोमीटर अंतर, वाढलेली लोकसंख्या, वाहतुक कोंडी, औद्योगिकीकरण आणि सतत न्यायालयीन वाढत्या प्रकरणांची संख्या पाहता, स्थानिक न्यायालयांची गरज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक वेळा अधोरेखित केली होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पिंपरी-चिंचवडमध्ये जिल्हा व सत्र न्यायालयासह वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास मंत्रीमंडळाची मंजुरी मिळाली आहे. या पाठपुराव्याचा परिणाम म्हणजेच 26 पदांसह जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायालय, 24 पदांसह वरिष्ठस्तरीय दिवाणी न्यायालय व चार पदांसह शासकीय अभियोक्ता कार्यालयासाठी एकूण 54 नवीन पदांना मान्यता देण्यात आली असून, चार कोटी तीस लाख रुपये वार्षिक आवर्ती खर्च आणि 68 लाख रुपये अनावर्ती खर्च, असे एकूण मिळून चार कोटी 98 लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे.

सध्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मालकीच्या इमारतीत कनिष्ठ न्यायालये कार्यरत असून, त्याच ठिकाणी प्रस्तावित न्यायालयांसाठी कक्ष उपलब्ध करून दिले जाणार आहेत. न्यायाधीशांच्या निवासासाठी अजमेरा शासकीय वसाहत, पिंपरी येथील 19 रिक्त घरांचा वापर होणार आहे.

“पिंपरी-चिंचवडसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या महापालिकेला स्वतंत्र जिल्हा व सत्र न्यायालयाची नितांत गरज होती. नागरिकांना आता पुण्याला न जाता स्थानिक न्यायालयांतूनच न्याय मिळेल, याचा अत्यंत आनंद आहे.” अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.


पीसीसीओईआर ला स्वायत्तता म्हणजे स्वतंत्र ओळख- ज्ञानेश्वर लांडगे

पीसीसीओईआर मध्ये नियामक मंडळाची पहिली बैठक संपन्न

पिंपरी, पुणे (दि. २९ जुलै २०२५) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अभियांत्रिकी शैक्षणिक क्षेत्रात जागतिक पातळीवर अभिमानाने नाव घेतले जाते. या ट्रस्ट अंतर्गत रावेत येथे २०१४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) या महाविद्यालयाने अल्पावधीतच स्वायत्तता मिळवली आहे. आता हे महाविद्यालय स्वतंत्र ओळख निर्माण करून आणखी तांत्रिक कुशल मनुष्यबळ करेल असा विश्वास पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी व्यक्त केला.
पीसीईटीच्या रावेत येथील पीसीसीओईआर मध्ये नियामक मंडळाची २०२५- २६ या शैक्षणिक वर्षाची पहिली बैठक संपन्न झाली.
यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे बोलत होते. यावेळी उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, विशेष निमंत्रित शिक्षण तज्ञ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर तसेच प्रा. डॉ. प्रफुल्ल पवार, श्रीकांत पाटील, डॉ. गोविंद कुलकर्णी, डॉ. राहुल मापारी आदी उपस्थित होते.
लांडगे यांनी सांगितले की, या महाविद्यालयात कॉम्प्युटर, आयटी, इ अँड टीसी, मेकॅनिकल, सिव्हिल या अभियांत्रिकीच्या पदवीसह बीबीए आणि बीसीए एक कोर्स शिकवले जातात. आतापर्यंत २५०० पेक्षा जास्त अभियंते येथे घडले आहेत आणि ते देशाच्या कानाकोपऱ्यात तसेच परदेशात कार्यरत आहेत. येथे विद्यार्थ्यांसाठी अध्यायावत उच्च तंत्रज्ञान नियुक्त सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत तसेच बहुतांशी प्राध्यापकांनी पीएचडी पदवी प्राप्त केली आहे.
पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी कृती अहवाल सादर केला. या अहवालात कॉलेजला मिळालेले “नॅक ए प्लस प्लस” मानांकन, युजीसीचे एनबीए मानांकन आणि आयएसओ प्रमाणपत्र, शैक्षणिक स्वायत्तता याचा समावेश होता. तसेच संशोधन प्रकाशन, उद्योग प्रायोजित प्रयोगशाळांना प्रोत्साहन, सल्लागार आणि निधी प्रकल्पांचे प्रमाण, विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट, उद्योजकता सुधारणे यासारख्या विषयांवर २०२५ – २०३० च्या धोरणात्मक सादरीकरण करण्यात आले.
या बैठकीत नियामक मंडळाकडून स्वायत्तेखाली शैक्षणिक परिषद, अभ्यास मंडळ, परीक्षा मंडळ, वित्त समिती, आयक्यूएसी इतर शैक्षणिक सुविधा व सुधारणा अशा वैधानिक समित्यांच्या स्थापनेला मान्यता देण्यात आली.
विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रादेशिक आव्हानांना सामोरे जावे असे प्रा. डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी सांगितले.
उद्योग संस्थाच्या मदतीने आणि एआय वर आधारित नवीन तंत्रज्ञानाच्या सहकार्याने नवनवीन विकास उपक्रम सुरू केले आहेत त्याचे प्रा. डॉ. प्रफुल पवार यांनी समर्थन केले.
ट्रेन द ट्रेनर या कार्यक्रमाला श्रीकांत पाटील यांनी पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.

उपसंचालक डॉ. राहुल मापारी यांनी स्वागत केले.

गृहमंत्री अमित शाहांची संसदेत खोटी माहिती, संसद हल्ला, अक्षरधाम, कंदहार प्रकरणी गप्प का? चीनचे नाव घेण्याची हिम्मत का होत नाही ? : अतुल लोंढे

हुर्रियत काँन्फरन्सबरोबर सर्वात जास्त चर्चा वाजपेयी सरकारकडून, देशाशी गद्दारी करण्याचे पाप भाजपाचे..

काँग्रेस सरकारने अफजल गुरु, कसाबला फाशी देऊन जेलमध्येच गाडले, पण भाजपा सरकारने याकूब मेमनचा मृतदेह कुटुंबाला दिला.

मुंबई, दि. २९ जुलै २०२५

ऑपरेशन सिंदूर विषयी संसदेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नेहमीप्रमाणे खोटे बोलले. काँग्रेस सरकार असताना अतिरेकी हल्ले झाले हे सांगताना भाजपा सरकारच्या वेळी झालेल्या हल्ल्यांचा उल्लेख त्यांनी केला नाही. वाजपेयी सरकार असताना संसदेवर हल्ला झाला, अक्षरधाम हल्ला झाला आणि कंदहार विमान अपहरण प्रकरणी तर मंत्री जसवंत सिंह हे सुरक्षेसह पाच कुख्यात अतिरेक्यांना कंदहारला सोडून आले. पाकिस्तानी आयएसआयला पठाणकोटला बोलवण्याचे पापही भाजपा सरकारनेच केले. खरे पाहत देशाशी गद्दारी करण्याचे काम भाजपा सरकारनेच केले आहे असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला.

अमित शाह यांच्या निवेदनाचा समाचार घेत अतुल लोंढे म्हणाले की, अमित शाह यांनी काँग्रेस सरकारवर खोटे आरोप केले, काँग्रेस सरकार असताना अतिरेक्यांचे मृतदेह परत दिलेले नाहीत. अफजल गुरु व कसाबला फाशी दिली व जेलमध्येच गाडले. या उलट १९९३ च्या मुंबई बॉम्ब स्फोटातील दोषी याकूब मेमन याला २०१५ साली फाशी दिल्यानंतर त्याचा मृतदेह मेमनच्या कुटुंबियांना देण्यात आला याची माहिती अमित शाह यांनी घ्यावी. हुर्रियत काँन्फरन्सबरोबर वाजपेयी सरकारनेच सर्वात जास्त चर्चा केली आहे पण अमित शाह मात्र काँग्रेसवर आरोप करत आहेत. डॉ. मनमोहनसिंह यांचा जन्म पाकिस्तानातील, ते १० वर्षे पंतप्रधान होते पण ते पाकिस्तानला गेले नाहीत पण नरेंद्र मोदी आमंत्रण नसताना पाकिस्तानला जाऊन नवाज शरिफ यांची बिर्याणी खाऊन आले. नरेंद्र मोदींनी शपथविधीलाही नवाज शरिफ यांना आमंत्रण दिले होते, याची आठवण लोंढे यांनी करून दिली.

ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तान फक्त पुढे होता खरा सुत्रधार तर चीन होता, तोच सर्व करत होता असे लष्कराचे उपप्रमुख राहुल के. सिंग यांनी सांगितले आहे. पण अमित शाह यांनी चीनचे नाव घेण्याची हिम्मत दाखवली नाही. संयुक्त राष्ट्राच्या मुद्द्यावर बोलतानाही अमित शाह खोटे बोलले. संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना ही १९४५ साली झाली व अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, चीन व रशिया हे त्याचे सदस्य होते, त्यावेळी भारत स्वतंत्र झालेला नव्हता असेही अतुल लोंढे यांनी सांगितले.

राष्ट्रीयकृत बँकांचे खाजगीकरण करण्याचा मोदी सरकारचा डाव हाणून पाडण्याची गरज: विश्वास उटगी.

0

राष्ट्रीयकृत बँका वाचवण्यासाठी काँग्रेसचा पुढाकार, १ ऑगस्ट रोजी टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत बैठक.

मुंबई, दि. २९ जुलै..
इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयकरण करून सर्वसामान्य जनतेला बँकांचे दरवाजे खुले केले. या ऐतिहासिक घटनेला आज ५६ वर्ष झाली. पण आता मात्र केंद्रातील भाजपा सरकारची धोरणे राष्ट्रीयकृत बँकांच्या हिताची नाहीत. राष्ट्रीयकृत बँका भांडवलदारांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न सुरु आहे. बँकिंग क्षेत्रातील तज्ञ, सर्वसामान्य जनता व समविचारी संघटनांनी मोदी सरकारचा हा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे. यासाठी काँग्रेसच्या पुढाकाराने प्रदेशाध्य हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपह १ ऑगस्ट रोजी दादरच्या टिळक भवन येथे एका बैठकीचे आयोजन केले आहे, अशी माहिती बँकिंग क्षेत्रातील तज्ञ विश्वास उटगी यांनी दिली आहे.

यासंदर्भातील सविस्तर माहिती देताना विश्वास उटगी म्हणाले की, बँकांचे ताळेबंद सशक्त आहेत पण भारत सरकार व रिजर्व बँक, सार्वजनिक क्षेत्रातील मेाठी बँक IDBI ची विक्री विदेशी बँकांना करीत आहे. अर्थ व्यवस्थेत बॅंकीग क्षेत्रात विदेशी भांडवलाचा प्रवेश हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे पण राष्ट्रीयकरण संपविणे ही या प्रक्रियेची सुरुवात आहे. १२ राष्ट्रीयकरण झालेल्या बॅंकांपैकी ५ बॅंकांना केंद्र सरकारच्या असेट मेानेटायझेशन पाइपलाइन मार्फत Disinvestment कार्यक्रम राबविण्यात येईल व या बॅंकांच्या खाजगीकरणाची सुरुवात होईल. यांची विक्री विदेशी भांडवलदारांना होणे हे जनतेला मान्य होणारे नाही. याला कडाडून विरेाध करणे आवश्यक आहे. बँक कामगार संघटना हे काम करीत आहेत. राजकीय पक्ष व पुरेागामी विचारांच्या संघटनांनी व्यापक भूमिका घेऊन बॅंक राष्ट्रीयकरण या संकल्पनेला सुरुवातीपासून विरोध करणारे आजच्या केंद्र सरकारमध्ये आहेत त्यामुळे बॅंकाविषयी काय कारस्थान व आंतरराष्ट्रीय भांडवलदारांशी काय साटेलेाटे आहेत हे जनतेपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.

राष्ट्रीयकरणाने देशाचा विकास कसा करावा याचे मार्गदर्शन केले आहे. मागील १० वर्षांत मेादी सरकारने ही व्यवस्था खिळखिळी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. बॅंक राष्ट्रीयीकरण वाचविण्याचा प्रयत्न हा आता नागरिकांच्या व बॅंकांचे लाभार्थी यांची एकजुट करून मेादी सरकारचा डाव हाणून पाडता येईल. बँकातील कर्मचारी व अधिकारी आणि निवृत्त बँक कर्मचारी जर अग्रेसर असतील तर या लढयाला मेाठया चळवळीचे स्वरूप प्राप्त होईल. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुढाकाराने पहिली जाहीर सभा होत असून टिळक भवन येथे १ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता ही सभा होत आहे. या सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी खासदार कुमार केतकर, विश्वास उटगी, संजीव चांदोरकर यांच्यासह बँकिंग क्षेत्रातील लोक उपस्थित राहणार आहेत असेही विश्वास उटगी यांनी सांगितले आहे.

काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांचा भाजपामध्ये प्रवेश:भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत

मुंबई:परभणी जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांनी मंगळवारी आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी श्री. वरपुडकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले. प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर, आ. तानाजी मुटकुळे, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. संजय केनेकर, आ. विक्रांत पाटील, माधवी नाईक, मराठवाडा विभागीय संघटन मंत्री संजय कोडगे, अमर राजुरकर, भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, परभणी महानगर अध्यक्ष शिवाजी भरोसे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की, सुरेश वरपुडकर हे सामाजिक बांधिलकी ठेवून काम करणारे व्यक्तिमत्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून विकसित भारत आणि महाराष्ट्र घडवण्यासाठी या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बनवून, प्रत्येक क्षेत्रात राज्याला अव्वल बनवण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. दांडगा अनुभव पाठीशी असलेल्या श्री. वरपुडकर यांच्या पक्षप्रवेशाने परभणी जिल्ह्यात भाजपा संघटना अधिक मजबूत होईल. पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचा भाजपामध्ये सन्मान राखला जाईल अशी ग्वाही श्री. चव्हाण यांनी दिली.
यावेळी महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले की सहकार क्षेत्रातील कार्य आणि समाजकार्यामुळे परभणी जिल्ह्याच्या राजकारणात चार दशकांपासून ठसा उमटवणारे श्री. वरपुडकर यांच्या भाजपा प्रवेशाने पक्ष संघटनेला बळ मिळेल.
भाजपाच्या विकासनीतीला साथ देण्यासाठी भाजपामध्ये प्रवेश केल्याचे श्री. वरपुडकर म्हणाले. सर्वांच्या साथीने भाजपाची विचारधारा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून पक्षवाढीस हातभार लावण्याचा संकल्प श्री. वरपुडकर यांनी केला.
भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये परभणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समशेर वरपुडकर, जिल्हा परिषद माजी सभापती परभणी धोंडीराम चव्हाण, पंचायत समितीचे माजी सभापती तुकाराम वाघ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रेरणा वरपुडकर, माजी समाजकल्याण सभापती द्वारकाबाई कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती अजय चव्हाण, जिल्हा परिषद माजी सदस्य तुळशीराम सामाले, पंचायत समितीचे माजी उपसभापती रामेश्वर कटिंग, पंचायत समितीचे माजी सदस्य मधुकर लाड, दिलीपराव साबळे आदींचा समावेश आहे.

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तिन्ही राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण करावे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे मागणी

मुंबई, दि. २९:- पुणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० (नाशिक फाटा ते खेड), राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ (हडपसर ते यवत), तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८डी (तळेगाव–चाकण–शिक्रापूर) या तिन्ही प्रमुख राष्ट्रीय महामार्गाचे तातडीने रुंदीकरण करावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्राद्वारे केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पुणे महानगर आणि औद्योगिक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता पुणे परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० (नाशिक फाटा ते खेड) – सध्या ४ लेन असलेला हा रस्ता ६ लेनमध्ये रुपांतर करावा, राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ (हडपसर ते यवत) – विद्यमान ४ लेन रस्त्याचे ६ लेनमध्ये रूपांतर करावा, तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८डी (तळेगाव–चाकण–शिक्रापूर) – सध्या २ लेन असलेला मार्ग ४ लेन करण्याची आवश्यकता आहे. या तिन्ही मार्गांवर शिक्षण संस्था, औद्योगिक पट्टा, वसाहती, रुग्णालये, पेट्रोलियम आणि वाहन उद्योग तसेच व्यापारी हब असल्यामुळे वाहतुकीचा ताण प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. रस्त्यांवर सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून वाहनचालकांच्या सुरक्षेवरही प्रश्न निर्माण झाले आहेत.

श्री पवार यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, या मार्गांवरील प्रवास करणाऱ्या वाहनांच्या संख्येची कमाल मर्यादा ओलांडली आहे. अशा परिस्थितीत या महामार्गावर तात्काळ लेन वाढवण्याचे काम करण्यात यावे, जेणेकरून येत्या काळात उभारल्या जाणाऱ्या एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या कामासाठीही पर्यायी मार्ग उपलब्ध होऊ शकेल.

हे तिन्ही महामार्ग पुणे शहराच्या प्रवेशद्वारांशी जोडले गेलेले असल्यामुळे, बाह्य भागातील मोठ्या प्रमाणावर वाहने शहरात प्रवेश करताना मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. यामुळे या मार्गांवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. तसेच, तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्गावरील रुंदीकरणाच्या कामास सध्या चालू असलेल्या एलिव्हेटेड हायवे निविदेच्या अंतिम टप्प्यापर्यंत तात्पुरता पर्याय म्हणूनही उपयोग होईल.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रस्तावास मान्यता देऊन आवश्यक निधी आणि प्रशासकीय मंजुरी तातडीने मिळवून देण्याची विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे, जेणेकरून पुणे औद्योगिक परिसरातील वाहतूक समस्या दूर होण्यास मदत होईल.