Home Blog Page 430

पुणे ग्रामीण जिल्ह्यात २१ मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

पुणे दि. ६: पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी दिनांक ८ मार्च रोजी मध्यरात्री १२.०५ वाजल्यापासून ते दिनांक २१ मार्च २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेणे, दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणत्याही इसमाच्या चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, मोठ्याने अर्वाच्च्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

सभ्यता अगर नितिमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, अविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करुन त्याचा जनतेत प्रसार करणे, कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पद्धतीने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) विरुद्ध वर्तन करणे, कलम ३७ चे पोटकलम (३) अन्वये पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करणे तसेच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या पूर्वपरवानगीशिवाय सभा घेणे किंवा मिरवणूक काढणे यासदेखील प्रतिबंध करण्यात आला आहे. हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरीष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे व त्याबाबत परवानगी आहे त्यांना लागू होणार नाही.

आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम उत्तरसूची प्रसिद्ध

पुणे, दि. ६: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ९ फेब्रुवारी, २०२५ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (५ वी)आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ ८ वी) परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

अंतरिम उत्तरसूचीमध्ये आक्षेप असल्यास त्याबाबत परिषदेच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन स्वरुपात ११ मार्च २०२५ पर्यंत अर्ज करता येईल.ऑनलाईन निवेदन पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. विहित मुदतीत प्राप्त व ऑनलाईन निवेदनांचाच विचार केला जाईल. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषय तज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तर सूची परिषदेच्या यथावकाश संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन आवेदनपत्रातील माहितीत व शाळा माहिती प्रपत्रात विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडीलांचे नाव, आईचे नाव, लिंग, जन्मतारीख, जात प्रवर्ग, शाळेचा अभ्यासक्रम व शाळेचे क्षेत्र इत्यादी दुरुस्ती करण्यासाठी दिनांक ११ मार्चपर्यंत शाळांच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे, असेही श्री. राठोड यांनी कळविले आहे.

पंडीत दीनदयाल उपाध्याय महिला रोजगार मेळाव्याचे ८ मार्च रोजी आयोजन

पुणे, दि. ६ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, पुणे व यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स आणि यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार ८ मार्च रोजी सकाळी १० वाजता यशस्वी भवन, एल्प्रो चौक, प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहापुढील चौक, चिंचवड गाव येथे ‘पंडीत दीनदयाल उपाध्याय महिला रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील विविध उद्योजकांनी रिक्तपदे कळविली असून किमान १० वी, १२ वी, पदवीधर अशा विविध पात्रताधारक महिला उमेदवारांना नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरीइच्छुक महिला उमेदवारांनी विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन मेळाव्यातील रिक्त पदांसाठी अर्ज करावा. मुलाखतीस येताना उमेदवारांनी सोबत आपल्या सर्व शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती, पासपोर्ट साईज फोटो, आवश्यकतेनुसार अर्जाच्या (रेझ्यूमे) प्रती सोबत आणाव्यात. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे, रास्ता पेठ, सरदार मुदलीयार रोड, पुणे ११ येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा अथवा ०२०-२६१३३६०६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता प्र. सहायक आयुक्त सा. बा. मोहिते यांनी केले आहे.

‘पीसीओएस’ पासून बचावासाठी निरोगी जीवनशैलीचा अवलंब गरजेचा – डॉ. संजीव खुर्द 

पुणे : बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांच्या पीसीओएस म्हणजेच पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम विषयीच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. यासाठी तरुणी व महिलांनी स्वत:च्या आरोग्यकडे विशेष लक्ष द्यायला हवे. औषधांपेक्षा निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे आवश्यक आहे. जंक फूड कमी करुन घरचे अन्न खाणे तसेच 80 टक्के सात्विक आहार व 20 टक्के व्यायाम करणे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ वैद्यकीय तज्ञ डॉ. संजीव खुर्द यांनी व्यक्त केले.  

अ‍ॅक्युअर लाईफ सायन्स फाउंडेशन आणि डॉ. खुर्द गायनॅक इंडॉस्कॉपी व आयव्हीएफ सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एरंडवणे भरत कुंज कॉलनी येथील डॉ. खुर्द  हॉस्पिटल येथे पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम (पीसीओएस) विषयी जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनचे डॉ.शंतनु जोशी, डॉ. साक्षी जोशी, डॉ. साधना खुर्द, डॉ. आदित्य खुर्द आदी उपस्थित होते. स्त्रियांकरिता मोफत वैद्यकीय शिबीर, व्याख्यान व समुपदेशनाद्वारे याविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच याविषयी माहिती देणारे फलक लावून प्रदर्शनाचे देखील आयोजन करण्यात आले.

डॉ. संजीव खुर्द म्हणाले, अनेक तरुणी व महिलांमध्ये अनियमीत पाळी ही तक्रार असते. याशिवाय तारुणपिटीकांमध्ये अडचणी आणि वंधत्व या तीन विषयांमध्ये पीसीओएस आढळतो. हा कोणत्याही प्रकारचा रोग नसून सिंड्रोम आहे. अनेक लक्षणं एकत्रितपणे म्हणजे सिंड्रोम. याकरिता योग्य आहार आणि व्यायाम महत्वाचा आहे. पीसीओएस हा स्त्रियांमध्ये १० ते २० टक्के या प्रमाणात आढळणारा, आधुनिक जीवनशैलीमुळे वाढत जाणारा आणि वंध्यत्वाच्या अनेक कारणांपैकी एका महत्वाचे कारण असणारा आजार आहे.

ते पुढे म्हणाले, मासिक पाळीतील अनियमितता, चेह-यावरील जास्तीचे केस आणि काही रुग्णांमध्ये वजन वाढणे, ही याची लक्षणे असू शकतात. पीसीओएस मुळे वंध्यत्व, मधुमेह, हृदयरोगापासून ते गर्भाशयाच्या कर्करोगापर्यंत गंभीर आजार निर्माण होऊ शकतात. त्यामुळे याविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे. याविषयी संस्थेमध्ये संशोधन प्रकल्प देखील सुरु आहे.

डॉ. शंतनु जोशी यांनी आहार आणि पीसीओएस शी असणारा संबंध याविषयी माहिती सांगितली. आहार प्रेरित दाह आणि पीसीओएस चा संबंध याविषयी विवेचन केले. तसेच डॉ. शंतनु जोशी यांनी त्यांच्या पीसीओएस संशोधना संदर्भात विवेचन केले

अॅक्सिस म्युच्युअल फंडातर्फे ‘अॅक्सिस निफ्टी AAA बॉन्ड फायनान्शियल सरव्हिसेस – मार्च 2028 इंडेक्स फंड’ सादर

(निफ्टी AAA फायनान्शियल सरव्हिसेस बॉन्ड मार्च 2028 इंडेक्सच्या घटकांमध्ये गुंतवणूक करणारा एक ओपन-एंडेड टार्गेट मॅच्युरिटी इंडेक्स फंड. मध्यम प्रमाणात व्याजदर जोखीम आणि तुलनेने कमी क्रेडिट जोखीम.)

फंडाची ठळक वैशिष्ट्ये:·         मापदंड:  निफ्टी AAA फायनान्शियल सरव्हिसेस बॉन्ड मार्च 2028 इंडेक्स·         अपेक्षित योजना मॅच्युरिटी दिनांक: 31 मार्च 2028·         एनएफओ कालावधी: 27 फेब्रुवारी 2025 ते 4 मार्च 2025·         किमान गुंतवणूक: 5,000 रु. आणि त्यानंतर 1 रु. च्या पटीत·         फंड व्यवस्थापक:  हार्दिक शाह·         एक्झिट लोड: शून्य

मुंबई: भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या फंड हाऊसेसपैकी एक असलेल्या अॅक्सिस म्युच्युअल फंडातर्फे‘अॅक्सिस निफ्टी AAA बॉन्ड फायनान्शियल सरव्हिसेस – मार्च 2028 इंडेक्स फंड’यात्यांच्या नवीन फंड ऑफरची (NFO) घोषणा करण्यात आली. हा एक ओपन-एंडेड टार्गेट मॅच्युरिटी इंडेक्स फंड असून तो निफ्टी AAA बॉन्ड फायनान्शियल सरव्हिसेस – मार्च 2028 इंडेक्सच्या घटकांमध्ये गुंतवणूक करतो. या फंडाला मध्यम व्याजदर जोखीम आणि तुलनेने कमी क्रेडिट जोखीम आहे. हार्दिक शाह (फंड मॅनेजर) यांच्या द्वारे व्यवस्थापित हा नवीन फंड निफ्टी AAA फायनान्शियल सरव्हिसेस बॉन्ड मार्च 2028 इंडेक्स बेंचमार्कला  अनुसरतो. किमान गुंतवणुकीची रक्कम 5,000 रु. असून त्यानंतर 1 रु. च्या पटीत गुंतवणूक करता येईल. या फंडाला एक्झिट लोड नाही आणि एनएफओ कालावधी 27 फेब्रुवारी 2025 ते 4 मार्च 2025 असा असेल.

अॅक्सिस निफ्टी AAA बॉन्ड फायनान्शियल सरव्हिसेस – मार्च 2028 इंडेक्स फंड

या योजनेचे गुंतवणूक उद्दिष्ट म्हणजे शुल्क आणि खर्चाच्या आधी निफ्टी AAA बॉन्ड फायनान्शियल सरव्हिसेस बॉन्ड मार्च 2028 इंडेक्सच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या सिक्युरिटीजच्या एकूण परताव्याशी जवळपास जुळणारा गुंतवणूक परतावा (ट्रॅकिंग एरर/ ट्रॅकिंग डिफरन्स अधीन राहून) प्रदान करणे. मात्र, योजनेचे गुंतवणूक उद्दिष्ट गाठले जाईल याची खात्री दिली जाऊ शकत नाही.

ही योजना 95% ते 100% पर्यंत निधी इंडेक्सशी संबंधित फिक्स्ड इनकम इन्स्ट्रुमेंट्स मध्ये गुंतवेल, तर उर्वरित निधी डेब्ट आणि मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स मध्ये तरलता राखण्यासाठी गुंतवला जाईल. सविस्तर मालमत्ता वाटप आणि गुंतवणूक धोरणांसाठी कृपया SID पहा.

फंडाच्या ओपन-एंडेड स्वरूपामुळे गुंतवणूकदारांना सुव्यवस्थितपणे गुंतवणूक करता येते. तसेच विड्रॉ सुविधा वापरू शकतात. त्यामुळे त्यांना गरजेनुसार लवचिकतेने योजनेत प्रवेश करता येतो  आणि बाहेर पडता येते. रीडेम्शन किंवा पुनर्संतुलन उद्देशासाठी विक्री केली नाही तर ही एक पॅसिव्हली मॅनेज योजना असून Buy and Hold धोरणावर आधारित असून फायनान्शियल सरव्हिसेस क्षेत्रातील डेब्ट इन्स्ट्रुमेंट्स मॅच्युरिटीपर्यंत धरून ठेवले जातील.  

फंड सादरीकरणाबद्दल बोलताना अॅक्सिस एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बी. गोपकुमार म्हणाले: “आमच्या वाढत्या पॅसिव्ह डेब्ट ऑफरिंग्समध्ये महत्त्वाची भर असलेला अॅक्सिस निफ्टी AAA बॉन्ड फायनान्शियल सरव्हिसेस – मार्च 2028 इंडेक्स फंड सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. या नव्या योजनेद्वारे गुंतवणूकदारांना फायनान्शियल सरव्हिसेस क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणाऱ्या उच्च-गुणवत्तेच्या AAA-रेटेड पोर्टफोलिओमध्ये गुंतवणुकीची संधी मिळेल. टार्गेट मॅच्युरिटी स्ट्रक्चरमुळे, गुंतवणूकदारांना स्थिर आणि पूर्वानुमानित गुंतवणुकीचा मार्ग उपलब्ध होईल. जोखीम आणि परतावा यांचे संतुलन राखू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी तो आदर्श आहे. आम्ही सातत्याने नाविन्य आणत आहोत आणि आमच्या योजनांचा विस्तार करत आहोत. त्यामुळे हे सादरीकरण आमच्या गुंतवणूकदारांच्या वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण करण्यासाठी किफायतशीर गुंतवणूक उपाय पुरविण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळकटी देते.”

फंडाची मुख्य वैशिष्ट्ये:

• Index YTM: गुंतवणूकदारांना एक अनुमानावर आधारित परतावा प्रोफाइल पुरवत अंतर्निहित निर्देशांकाच्या आधारे स्पष्ट Yield to Maturity (YTM) ऑफर करणे. 25th Feb 2025 पर्यंत निर्देशांकाचा YTM 7.69% आहे.

• कमी खर्चाची पॅसिव्ह गुंतवणूक: सक्रियपणे व्यवस्थापित फंडाशी जोडलेल्या उच्च शुल्काशिवाय फिक्स्ड इनकम मार्केटमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सोपी, सुलभ आणि किफायतशीर गुंतवणूक संधी.

• उच्च-गुणवत्तेचा पोर्टफोलिओ: आवश्यक तरलतेसाठी एक छोटा भाग राखीव ठेवत AAA-रेटेड मालमत्तांमध्ये गुंतवणूक करून उच्च स्थिरता आणि संरक्षण सुनिश्चित करणे
• सिक्युरिटी निवडीमध्ये कमी पूर्वग्रह (Bias): हा पॅसिव्हली मॅनेज केलेला फंड आहे जो त्याच्या बेंचमार्कचे अनुकरण करतो. त्यामुळे निवड प्रक्रियेत पूर्वग्रह कमी होतो आणि पारदर्शकता आणि सातत्य राखले जाते.

• सोपे आणि सुलभ : फायनान्शियल सरव्हिसेस क्षेत्रातील टार्गेट मॅच्युरिटी पोर्टफोलिओवर लक्ष केंद्रित करून गुंतवणूकदारांना सुलभता आणि स्पष्टता पुरवणारे सरळ गुंतवणूक धोरण

सामाजिक सौहार्द व बंधुभावाची पुर्नस्थापना करण्यासाठी ८ मार्च पासून मस्साजोगहून काँग्रेसची सद्भावना पदयात्रा.

मुंबई, दि. ६ मार्च २५
महाराष्ट्र ही साधू, संत व महापुरुषांची भूमी असून पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राने देशाला कायमच दिशा देण्याचे काम केले आहे. परंतु मागील काही दिवसात राज्यातील सामाजिक वातावरण बिघडलेले आहे, काही शक्ती राजकीय फायद्यासाठी जाणीवपूर्वक महाराष्ट्राची संस्कृती व परंपरेला बदनाम करण्याचे काम करत आहेत. राज्यात सामाजिक सौहार्द वाढवणे ही काळाची गरज असल्याने काँग्रेस पक्षाने सद्भावना पदयात्रेचे आयोजन केले आहे. शनिवार दि. ८ मार्च रोजी बीडच्या मस्साजोग येथून यात्रेची सुरुवात होणार असून त्यापूर्वी शुक्रवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे मढी येथे कानिफनाथांच्या समाधीचे, भगवानगड येथे संत श्री. भगवानबाबांच्या समाधीचे आणि नारायणगड येथे भगवान नगद नारायणाचे दर्शन घेऊन सामाजिक एकोप्यासाठी साकडे घालणार आहेत.

शनिवारी ८ मार्च रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मस्साजोग येथे स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेवून ५१ किलोमीटरच्या सद्भभावना पद यात्रेला सुरुवात करतील. दोन दिवस प्रवास करून ही पदयात्रा रविवारी ९ मार्च रोजी सायंकाळी बीड येथे पोहोचेल. तिथे सद्भावना मेळाव्याने पदयात्रेची सांगता होणार आहे. या सद्भावना यात्रेत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गट नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम, हिमाचल प्रदेशच्या प्रभारी खासदार रजनीताई पाटील, जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, विविध सामाजिक संघटना व संस्थांचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

त्यापूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्या शुक्रवारी सकाळी अहिल्यानगर जिल्ह्यातील आदर्श ग्राम हिवरे बाजार येथे पोपटराव पवार यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर दुपारी ते पाथर्डी तालुक्यातील मढी येथे जाऊन संत कानिफनाथांच्या समाधीचे, भगवानगड येथे संत भगवान बाबांच्या समाधीचे आणि नारायणगड येथे भगवान नगदनारायणाचे दर्शन घेऊन सामाजिक एकोपा आणि शांततेसाठी साकडे घालणार आहेत.

भाषिक रचनेवर महाराष्ट्र आणि गुजरातची निर्मिती झाली असताना मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी गुजराती लादण्याचा डाव

मुंबई, दि. ६ मार्च २५
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाला मुंबईबद्दल नेहमीच आकस असून सातत्याने मुंबई व मराठीचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न या विचारसरणीचे लोक करत असतात. संघाचे भैय्याजी जोशी यांचे मुंबई व मराठी भाषेबद्दलचे वक्तव्य हे जाणीवपूर्वक केलेले असून मराठी भाषेचा व मुंबईचा हा अपमान आहे. मराठी भाषा व मुंबईचा अपमान करणाऱ्या भैय्याजी जोशी यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना अतुल लोंढे पुढे असे म्हटले आहे की, मुंबईसह महाराष्ट्राची भाषा मराठी आहे, परंतु आरएसएसच्या लोकांना मुंबई व मुंबईतील मराठी भाषा, मराठी जनता यांच्याबद्दल कायमच आकस राहिला आहे. मुंबईतील महत्वाची कार्यालये व संस्था, गुंतवणूक मुंबईबाहेर घेऊन जाण्याचा उद्योग भाजपाच्या राज्यात सतत होत आहे. आता मुंबईतील मराठी भाषेलाही कमी लेखून गुजरातीसह इतर भाषा लादण्याचे षडयंत्र सुरु आहे. त्याच मानसिकतेतून भैय्याजी जोशी यांचे वक्तव्य आहे. मुंबई व महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे व त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, जर कोणी मराठी भाषेचा अपमान करत असेल तर तो कदापी खपवून घेतला जाणार नाही.

घाटकोपर हा मुंबईचाच भाग आहे असे असताना घाटकोपरची भाषा गुजराती आहे असे म्हणण्याचे धाडस जोशी करुच कसे शकतात. घोटकोपरमध्ये लाखो लोक मराठी आहेत व ते मराठीच बोलतात. भैय्याजी जोशी यांच्या विधानाचा काँग्रेस पक्ष जाहीर निषेध करत असून सरकारने यावर भूमिका जाहीर करावी. भैय्याजी जोशी यांचे विधान अजित पवार व एकनाथ शिंदे यांना मान्य आहे का, त्यांनीही भूमिका जाहीर करावी असेही अतुल लोंढे म्हणाले.

पुणे – मुंबई इकोनॉमिक कॉरीडोरसाठी समर्पित प्राधिकरण असावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

पुणे, दि. ६ मार्च, २०२५ : पुणे – मुंबई इकोनॉमिक कॉरीडोरद्वारे होणारे धोरणात्मक एकत्रीकरण हे महाराष्ट्राची आर्थिक प्रतिष्ठा उंचावण्यामध्ये महत्वाचा वाटा उचलेल. त्यामुळे या कॉरीडोरच्या विकासाला प्राधान्य देत त्याच्या नियोजन आणि अंमलबजावणीसाठी एक समर्पित प्राधिकरण स्थापन करावे अशी मागणी छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधीमंडळ अधिवेशनात व्यक्त केला. मुंबई येथे सुरु असलेल्या राज्य विधीमंडळाच्या २०२५ च्या पहिल्या अधिवेशनात ते बोलत होते.

सध्याचे राज्यसरकार करीत असलेली पर्यावरणाला अनुकूल व सर्वसमावेशक धोरणनिर्मिती, वेगवान पद्धतीने होत असलेली धोरणांची अंमलबजावणी आणि महाराष्ट्राचे अव्वल स्थान अबाधित राखण्यासाठी होत असलेले प्रामाणिक प्रयत्न यांच्या आधारे नजीकच्या भविष्यात महाराष्ट्र राज्य हे जागतिक ‘पॉवरहाऊस’ म्हणून पुढे येईल असा विश्वास देखील यावेळी शिरोळे यांनी व्यक्त केला.

राज्य सरकारने मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) ला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी जोडणाऱ्या उन्नत मार्गिका व मुंबई-पुणे द्रुतगती मार्गालगत भूविकासासाठी मार्गिका नियोजन हाती घेतले असले तरी पुणे – मुंबई इकोनॉमिक कॉरीडोरद्वारे या दोन प्रमुख शहरांमधील संपर्क आणखी वाढण्यास, औद्योगिक वाढ होण्यास, परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यास आणि रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होण्यास मोठी मदत होणार आहे. पुणे आणि मुंबईच्या एकत्रित आर्थिक शक्तींचा पूर्णलाभ घेण्यासाठी इकोनॉमिक कॉरीडोर प्रकल्प महत्त्वाचा असून यामध्ये भौतिक पायाभूत सुविधांच्या सुधारणा, विशेष आर्थिक क्षेत्रांची निर्मिती, नवोन्मेष क्लस्टर्स, आणि व्यवसाय संचालन सुलभ करण्यासाठी सुसंगत नियामक ढांचा यांचा समाविष्ट करणे गरजेचे असल्याचेही शिरोळे यांनी नमूद केले.

याबरोबरच या प्रकल्पांसाठी भौतिक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, विशेष आर्थिक क्षेत्रांची निर्मिती, नवोन्मेष क्लस्टर्स व व्यवसाय संचालन सुलभ करण्यासाठी सुसंगत नियामक ढांचा समाविष्ट करणे अशी आवश्यक संसाधने प्रदान केली जावी अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

लाडक्या बहिणींप्रती असणारी स्नेहभावना महायुती सरकारने आपल्या कृतीतूनच व्यक्त केली आहे. नमो द्रोण दीदी योजना, लखपती दीदी योजना यांसारख्या योजनांना प्रोत्साहन देत सरकारच्या वतीने लवकरच १८ हजार अंगणवाडी सेविकांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असल्याचे जाहीर करून या सरकारने महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन दिले असल्याचे शिरोळे म्हणाले.

महायुती सरकारने राज्यातील औद्योगिक वाढ प्रोत्साहित करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून यामध्ये विविध उद्योगांना ५ हजार कोटी इन्व्हेस्टमेंट प्रमोशन्स सबसिडीचे वाटप, एमआयडीसी माध्यमातून ३५०० एकर औद्योगिक भूखंडाचे वाटप, वाढती मागणी लक्षात घेत औद्योगिक विकासासाठी जमीन वाटप याबरोबरच १० एकात्मिक औद्योगिक पार्क व एकात्मिक लॉजिस्टिक्स पार्कची विभागणी यांचा समावेश असल्याचे सांगत शिरोळे पुढे म्हणाले, “राज्यातील औद्योगिक वाढीचा फायदा हा सर्वांनाच होणार असून यामुळे जागतिक पातळीवर योग्य अशी औद्योगिक परिसंस्था विकसित होण्यासही मदत होणार आहे. हे होत असताना औद्योगिक क्षमता वाढविणे, आवश्यक त्या धोरणांची लवकरात लवकरात निर्मिती व अंमलबजावणी करणे महत्त्वपूर्ण आहे.”

यासोबतच राज्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्र, हरित ऊर्जामुक्त प्रवेश (ग्रीन एनर्जी ओपन अॅक्सेस रुल्स) नियमांच्या अंमलबजावणीतील विलंब, एमएसईडीसीएलला तातडीने पावले उचलण्याचे निर्देश देणे, एमईआरसीच्या नियमांचे पालन करत व्यापारी परिपत्रके जारी करणे, गट-संबंधित व स्वतंत्र नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे स्पष्ट करणे, तसेच एसएलडीसीकडून ग्रीन ओपन अॅक्सेस अर्जांच्या पारदर्शक प्रक्रियेसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करणे यांकडेही शिरोळे यांनी लक्ष वेधले.

राज्यातील उद्योगांना हरित ऊर्जेकडे संक्रमण करण्यास पाठिंबा देण्यासोबतच याविषयीचे प्रश्न सोडवीत असताना संबंधित हितधारक, ऊर्जातज्ज्ञ, उद्योग प्रतिनिधी आणि ग्राहक व्यवहार अधिकारी यांचा समावेश असलेली एक समर्पित कार्यसमिती स्थापन करता येऊ शकते, असेही शिरोळे यांनी सुचविले.

महाराष्ट्रातील प्रतिबंधात्मक भू-वापर नियम हे औद्योगिक कार्यक्षमता व स्पर्धात्मकतेला मोठ्या प्रमाणात बाधा आणत असताना सर्वोत्तम पद्धतींनी सुसंगत अशा धोरणात्मक सुधारणा करण्याची शिफारस यावेळी शिरोळे यांनी केली. यामध्ये प्रामुख्याने आवश्यकतेप्रमाणे सुधारणा करणे, पार्किंग नियमांमधील सुधारणा, फ्लोअर एरिया रेशोमधील वाढ यांचा समावेश आहे.

उत्तम धोरणे आखणे आणि त्याची प्रभावी कार्यवाही करणे या दोहोंमध्ये सध्याचे राज्य सरकार कृतीशील असून याचे संपूर्ण श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे आहे असे सांगत विकसित भारताचे उद्दीष्ट साध्य करतांना महाराष्ट्राचे योगदान सर्वाधिक असेल आणि महाराष्ट्र हेच देशातील अव्वल राज्य असेल असा विश्वास सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केला.

भय्याजी जोशींच्या विधानाशी महाराष्ट्रातील भाजपा सहमत आहे का ?.. राज ठाकरेही मैदानात

मुंबई-मराठी भाषेवर बोलताना भैय्याजी जोशी यांनी आपण मराठी आहोत याचे भान सोडावे? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केला. जोशीबुवांनी अशा काड्या करू नये, अशा शब्दात त्यांनी या वक्तव्याचा समाचार घेतला. इतकेच नाही तर या वक्तव्याचा भाजप निषेध करणार आहे का? असा प्रश्न विचारत त्यांनी भाजपला देखील आव्हान दिले आहे.या संदर्भात राज ठाकरे यांनी एका पोस्टच्या माध्यमातून भाजप आणि भैय्याजी जोशी यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत असल्याचे देखील ते म्हणाले. इतकेच नाही तर मराठी माणूस हे वाक्य कधीही विसरणार नाही, हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावे, असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे. यावर सविस्तर 30 तारखेला गुढीपाडव्याच्या मेळाव्यात बोलणार असल्याचा इशारा देखील राज ठाकरे यांनी दिला आहे.

राज ठाकरे यांनी केलेली पोस्ट देखील पहा…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही, असं विधान केल्याच ऐकलं . देशाची झालेली भाषावार प्रांत रचना, त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून १०६ हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान या सगळ्याबद्दल भय्याजी जोशींना माहीत नसेल असं अजिबात नाही. पण कायम महाराष्ट्राबद्दलच किंवा मराठीबद्दलची अशी विधाने करायची याचं कारण काय ? भय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं…. आणि भय्याजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का ? उद्या समजा संघाच्या सोडाच इतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने असं विधान जर इतर राज्यात केलं असतं तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता… भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का ? सध्या MMR रिजन मधे चाललेला विकास आणि त्यामागील राजकीय हेतू हे जोशींच्या वक्तव्यातून सुरवात होताना दिसत आहेत . हे काय चाललय हे न समजण्या इतकी मराठी जनता दुधखुळी नाही हे जोशींनी लक्षात घ्यावं ! हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान पण जोशींनी सोडाव ? आत्ताच कोल्डप्ले नावाचा वाद्यवृंद मुंबईत येऊन गेला , त्याचे मुख्य गायक ख्रिस मार्टिन हे देखील इथे येउन मराठीत बोलून गेले . त्या ब्रिटिश माणसालाही मुंबईत कोणती भाषा चालते आणि ही मुंबई कोणाची आहे हे समजते तर मग जोशी बुवांना हे समजू नये ? या असल्या काड्या घालून ( अर्थात राजकीय हेतू असल्या शिवाय हे होणे नाही ) नवा संघर्ष आपण उदयाला आणत आहात हे जरूर ध्यानात ठेवावे ! बाकी सविस्तर ३० तारखेला गुढीपाडव्याला बोलूच ! महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे आणि मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावं !

भैय्याजी जोशी चिल्लर माणूस म्हणून जाहीर करा:त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा- उद्धव ठाकरे

मुंबई- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईची कोणतीही एक भाषा नसल्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांचा चिल्लर माणूस म्हणून उल्लेख केला आहे. या प्रकरणी त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवत भैय्याजी जोशी यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी भैय्याजी जोशी हा माणूस चिल्लर म्हणून जाहीर करावा किंवा तो बंदा रुपया असेल तर त्याच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असे ते म्हणालेत.उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना भैय्याजी जोशी यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, काल महायुतीच्या आमदारांसाठी छावा चित्रपटाचा खास खेळ आयोजित करण्यात आला होता. मी त्याचे कौतुक केले होते. पण गद्दारांनी त्याला दांडी मारली. पण ही सर्व लोक छावा चित्रपट पाहत असताना काही अनाजी पंत इकडे मुंबईत येऊन मराठी अमराठी अशा वादाचा विष पेरून गेलेत. दुर्दैवाने आता छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज पुन्हा जन्माला येऊ शकत नाहीत. पण महाराष्ट्रात फूटी पाडणारे औरंगजेब व औरंगजेबाला मदत करणारे अनाजी पंत याही जमान्यात जन्माला आलेत. यासारखे दुर्दैव असू शकत नाही.

सध्या काही लोक ब्रह्मदेवाला आम्हीच जन्म दिला अशा अविर्भावात फिरत आहेत. ते जगभर ब्रह्मज्ञान सांगत फिरत असतात. त्यातलेच एक असणाऱ्या भैय्याजी जोशी यांनी मुंबईत येऊन इथे राहणाऱ्यांना मराठी येण्याची काहीच गरज नाही असे द्वेषाचे गोमूत्र शिंपडून गेले. याचा अर्थ असा की, हा संघाचा व भाजपचा छुपा अजेंडा आहे. यांचे दाखवायचे व खायचे दात वेगळे आहेत. गत काही दिवसांपासून या लोकांनी हिंदुस्तान – पाकिस्तान काढला नाही. आता त्यांनी बटेंगे तो कटेंगे हा विषय काढला आहे. बटेंगे तो कटेंगे म्हणजे केवळ हिंदू – मुस्लीम नाही तर मराठी व अमराठी, पुन्हा मराठीत मराठे व मराठेत्तर अशी सगळी वाटणी करायची आणि राज्य बळकावयाचे हा त्यांचा डाव आहे.उद्धव पुढे म्हणाले, आपल्या देशात भाषावर प्रांतरचना करण्यात आली आहे. आता हे मुंबईत गल्लीवार प्रांतरचना करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा तोडा, फोडा व राज्य कराचा प्रकार आहे. ही अत्यंत घाणेरडी व विकृत मानसिकता सर्वांपुढे आली आहे. काल ज्या प्रमाणे विधानपरिषदेत मुख्यमंत्री बोलले की, कोरटकर-कोरटकर काय बोलता? कोरटकर हा चिल्लर माणूस आहे. आता त्यांनी भैय्याजी जोशी हे सुद्धा चिल्लर माणूस आहे हे म्हणून दाखवावे. त्यांनी भैय्याजी जोशी हा चिल्लर माणूस आहे म्हणून जाहीर करावे किंवा हा चिल्लर किंवा बंदा रुपया काय आहे ते त्याच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा.
अभिजात भाषेचा दर्जा देऊन उपकार केले नाही-मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणजे तुम्ही काही उपकार केले नाहीत. कारण, मराठी भाषेचे महत्त्व संघ किंवा भाजपला कळले नसले तरी इंग्रजांना कळले होते. कारण, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? हा जो अग्रलेख लोकमान्यांनी लिहिला होता तो मराठीत होता. तसेच आम्हीच आमच्या राज्य सरकारला विचारतो की, तुमचे डोके ठिकाणावर आहे का? कारण, मराठी माणसांनी आपले बलिदान देऊन मुंबई मिळवली आहे. मला संघ व भाजपला सांगायचे आहे की, जेव्हा केव्हा मुंबईवर संकट येते तेव्हा आम्ही सर्वजण महाराष्ट्राचे नागरीक म्हणून एकमेकांना वाचवण्यासाठी पुढे येतो. मग तो अतिरेकी हल्ला असो, नैसर्गिक संकट असो की अन्य एखादे संकट असो आम्ही एकजूट होतो.

मुंबई चांगले काम करून जिंका, विष कालवून नाही-हे लोक वात लावून पळतात. कोरोनाच्या काळातही आम्ही सर्वांना आपलेपणाने जपले होते. त्यामु्ळे तुम्हाला साखर टाकता येत नसेल तर मिठाचा किंवा विषाचा खडा टाकू नका. मुंबई एक चांगली महानगरी आहे ती जिंकायची असेल तर चांगले काम करून जिंका, विष कालवून जिंकू नका. तुम्हाला स्पर्धा करायची असेल तर चांगल्या कामाची स्पर्धा करा. मुंबईत शिवसेनेने जागतिक रक्तदानाचा विक्रम केला होता. संघाने असे एखादे काम करून दाखवावे. आम्ही त्यांच्या विधानाचा निषेध करतो. अशी विषवल्ली या सरकारने वेळीच ठेचली पाहिजे. भाजप आता उत्तर विरुद्ध दक्षिण असा देश तोडत आहे, असेही उद्धव ठाकरे यावेळी भैय्याजी जोशींचा समाचार घेताना म्हणाले.

आता मुंबईत राहायचे असेल, तर गुजराती बोलायचे? केम छो भाई तमे, सारू छो ना?:आव्हाडांचा सरकारला टोला

मुंबई-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैय्याजी जोशी यांनी मुंबईची भाषा ही मराठी नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांकडून अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले जात आहे. भैय्याजी जोशींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गुजराती भाषेमधून संवाद साधला. आव्हाड यांनी विधानभवन परिसरात भाजप नेते प्रविण दरेकरांशी गुजरातीमध्ये बोलता त्यांना टोला लगावला आहे. दरेकर भाई केम छो तमे, सारू छो ना? असा सवाल विचारत आव्हाड यांनी दरेकरांना डिवचले. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना देखील गुजराती भाषेतून सुरुवात केली.मुंबईत विविध राज्य, प्रांत आणि भाषा बोलणारे नागरिक राहतात. मुंबईत अनेक भाषा आहेत आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकलं पाहिजे असे नाही. विशेष म्हणजे त्यांनी हे वक्तव्य महाराष्ट्राचे मंत्री व भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या समोरच केले होते. त्यांच्या या विधानावर आता नवीन वाद निर्माण झाला आहे. विरोधकांकडून भैय्याजी जोशी यांच्यासह सरकारवर टीका केली जात आहे.जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना केम छो भाई, सारो छे ना असे म्हणत सुरुवात केली. यावरून पत्रकारांनी त्यांना विचारले असता, आता मराठी नाही बोलायचे, असे आव्हाड म्हणाले. आता मराठी नाही, तर केम छो, ढोकला, फाफडा, जलेबी आता आपल्याला मराठी बटाटा वडा, वडापाव नाही बोलायचे. आता मुंबईत राहायचे असेल, तर गुजराती बोलायचे. आपल्या पोरांना गुजराती शाळेत घाला. कारण गुजराती ही आता घाटकोपरची भाषा झाली. ती कालांतराने मुलुंटची भाषा होईल. त्यानंतर दहिसर आणि अंधेरीची भाषा होईल. मराठी फक्त दादरची भाषा मराठी राहील. म्हणजे आपण फक्त दादरपुरते मर्यादीत राहणार. मराठी माणसांना जागे केल्याबद्दल थँक्यू भैय्याजी जोशी, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

भाजपच्या पोटातले ओठात आले:भैय्याजी जोशींवर कारवाई करा -आदित्य ठाकरे

मुंबईची भाषा मराठीच हे त्यांना सांगा

मुंबई- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी बुधवारी मुंबईची कोणतीही एक भाषा नसल्याचे विधान करत घाटकोपरची भाषा गुजराती असल्याची मुक्ताफळे उधळली होती. त्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे व आमदार वरुण सरदेसाई यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. भैयाजी जौशी यांच्या विधानावरून भाजपच्या पोटातील ओठात आले असून, त्यांचा मुंबई तोडण्याचा डाव स्पष्ट झाला आहे, असे ते म्हणालेत.

भैय्याजी जोशी बुधवारी एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते की, मुंबईची कुठलीही एक भाषा नाही. मुंबईच्या अनेक भाषा आहेत. वेगवेगळ्या भागांत वेगवेगळी भाषा असते. जशी घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला गिरगावात हिंदी बोलणारे कमी सापडतील. तिथे तुम्हाला मराठी भाषा बोलणारे लोक दिसतील. मुंबईत येणाऱ्या व्यक्तीने मराठी शिकले पाहिजे असे काही नाही.उल्लेखनीय बाब म्हणजे मुंबईसह आसपासच्या भागात अलीकडच्या काळात सातत्याने मराठी भाषिकांवर परप्रांतीयांकडून हल्ले होण्याच्या घटनांत वाढ होत आहे. त्यातच जोशी यांनी हे विधान केल्यामुळे मोठा संताप व्यक्त केला जात आहे.

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी भैय्याजी जोशी यांच्या विधानावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी या प्रकरणी थेट सत्ताधारी भाजपवर टीका केली आहे. काल भैय्याजी जोशी यांनी घाटकोपरची भाषा गुजराती असल्याचा दावा केला. आज तुम्हाला कळले असेल की, बुलेट ट्रेन का करत आहेत? कुणासाठी करत आहेत? तामिळनाडू व केरळ आपल्या भाषेबद्दल अभिमान का बाळगतात? आपल्याकडे लाखो लोक रोजगारासाठी येतात. पण मुंबईची भाषा मराठीच आहे. हे भय्याजी जोशी यांनी जाणून घ्यावे. त्यांनी त्यांच्या विधानासाठी माफी मागावी.छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानास्पद विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकर व राहुल सोलापूरकर यांच्यावर कारवाई करण्याची आमची मागणी आहे. आता भैय्याजी जोशी यांच्यावरही कारवाई करण्याची आमची मागणी आहे. मुंबईत अनेकजण मोठे होण्याची स्वप्न घेऊन येतात. पण मुंबईची भाषा मराठीच आहे हे भैय्याजी जोशी यांना सांगण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी आपली भूमिका मांडली. आम्ही त्याचे स्वागत करतो, असे आदित्य ठाकरे म्हणाले.ते पुढे म्हणाले, खरी परिस्थिती ही आहे की राज्यात मराठी भाषा भवन आपण मरिन ड्राईव्हला करत होतो. त्याला या सरकारने स्थगिती दिली. मराठी नाट्य दालन आपण गिरगावमध्ये करत होतो, त्यालाही या सरकारने स्थगिती दिली. भगतसिंह कोश्यारी असतील कोरटकर असतील किंवा सोलापूरकर असतील हे आपल्या महापुरुषांचे अपमान करतात. आपण किती सोसायचे याचा विचार करायला हवा.

वरुण सरदेसाई यांचेही टीकास्त्र

दुसरीकडे, ठाकरे गटाचे वांद्र्याचे आमदार वरुण सरदेसाई यांनीही या प्रकरणी भैय्याजी जौशी यांच्यावर टीका केली आहे. भैय्याजी जोशी यांच्या माध्यमातून भाजपच्या पोटातील ओठात आले आहे. भाजपला मुंबई तोडायची आहे. मराठीला दूर करायचे आहे. भाजपने घाटकोपरमध्ये पराग शाहला उमेदवारी दिली आहे. या लोकांचा मराठी भाषिकांना लांब करायचे आहे. आरएसएस असे बोलत असेल, तर मग भाजपचे हेच धोर आहे का? मुंबईत अनेक लोक येतात, पण कुणीही मुंबईची भाषा बदलण्याचा प्रयत्न करू नये, असे ते म्हणालेत.

मराठी हीच महाराष्ट्राची राजभाषा:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवेदन; भैय्याजी जोशी यांच्या विधानाचे विधानसभेत तीव्र पडसाद

मुंबई-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्यावरून विधानसभेमध्ये उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. भैय्याजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्यावर राज्य सरकारची भूमिका काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील सरकारच्या वतीने बाजू स्पष्ट करत मराठी हीच महाराष्ट्राची राजभाषा असल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर इतर भाषेचा देखील येथे सन्मान असल्याचे प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिले आहे. मात्र या सर्व प्रकरणावर चर्चा सुरू असताना सभागृहात गोंधळ झाल्याने सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले होते.

मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. अलीकडेच या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. राज्यपालांच्या अभिभाषणात देखील त्याचा उल्लेख असल्याचे उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी विधान सभेत म्हटले आहे. महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक परंपरा ही सर्वांना माहिती आहेच. आपण महाराष्ट्र राज्याचे नागरिक आहोत हे देखील आपण अभिमानाने बोलत असतो. त्याचा अभिमान हा प्रत्येकाला असायलाच पाहिजे. 106 हुतात्म्यातून आपल्याला हे राज्य मिळाले असल्याचेही जाधव यांनी म्हटले आहे. अशा वेळी सुरेश ऊर्फ भैय्याजी जोशी यांनी घाटकोपर येथील सभागृहामध्ये निवेदन करताना महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला मराठी बोलता आलीच पाहिजे, अशी आवश्यकता नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय? – भास्कर जाधव

या मुंबईत वेगवेगळ्या भागाची वेगवेगळी भाषा असल्याचे असे देखील भैय्याजी जोशी यांनी म्हटले आहे. त्यामुळेच मराठी भाषा ही सर्वांनाच आली पाहिजे, सर्वांनी बोललीच पाहिजे, याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. घाटकोपरमध्ये ज्या ठिकाणी मी संबोधित करत आहे, त्या घाटकोपरमध्ये गुजराती सर्वात जास्त राहतात. त्यामुळे येथील भाषा ही मराठी नसली तरी काहीही हरकत नाही. अशा प्रकारचे विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे एका बाजूला आपण महाराष्ट्रातील प्रत्येक कामकाज मराठीत चालवले पाहिजे म्हणून कायदा केला आहे. त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केला जातोय. तर दुसरीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असल्यामुळे उदो उदो करणारे कार्यक्रम करत आहोत. तर त्याच महाराष्ट्रात मराठी भाषेचा अपमान करणे व भाषेविषयी विधान करणे यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय? असा प्रश्न भास्कर जाधव यांनी उपस्थित केला.

मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच, इतर भाषेचाही इथे सन्मान – फडणवीस

भास्कर जाधव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, भैय्याजी जोशी यांचे वक्तव्य मी ऐकलेले नाही. त्यामुळे ते पूर्णपणे ऐकून त्यावर माहिती घेऊन बोलणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मात्र सरकारची भूमिका काय? हे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईची, महाराष्ट्राची, महाराष्ट्र शासनाची भाषा ही मराठीच आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकले पाहिजे, प्रत्येकाला मराठी बोलता आले पाहिजे. माझ्या या वक्तव्यासंदर्भात भैयाजी जोशी यांचे देखील दुमत असेल, असे मला वाटत नाही. मात्र तरी देखील शासनाच्या वतीने मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठी असल्याचे ते म्हणाले. इतर भाषांचाही इथे सन्मान आहे. कोणत्याही भाषेचा मी अपमान करणार नाही. कारण जो स्वतःच्या भाषेवर प्रेम करतो, तोच दुसऱ्यांच्या भाषेवर देखील प्रेम करू शकतो. त्यामुळे तो सन्मान आहेच. त्यामुळे शासनाची भूमिका पक्की असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांकरिता स्थगित-भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केलेल्या मतांवर चर्चा सुरु असताना सभागृहात गोंधळ सुरु झाला. देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सभागृहात बोलण्याचा प्रयत्न केला. यात त्यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करणार असल्याचे म्हटले. मात्र, त्याच वेळी सत्ताधारी पक्षातील मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना विरोध दर्शवला. त्यामुळे सभागृहात या प्रकरणावरून चांगलाच गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांकरिता स्थगित केले.

PoK मिळताच काश्मीरचा प्रश्न संपेल:जयशंकर

लंडनमध्ये काश्मीरबाबत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीर (पीओके) रिकामे करून हा प्रश्न पूर्णपणे सोडवला जाईल. जयशंकर ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. ५ मार्च रोजी लंडनमधील चॅथम हाऊस थिंक टँकमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
जयशंकर यांना विचारण्यात आले की पंतप्रधान मोदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी असलेल्या संबंधांचा वापर काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी करू शकतात का? त्याच वेळी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणातील बदलाचा भारताला फायदा होईल.

जयशंकर म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात झालेला बदल अपेक्षेप्रमाणे आहे. ट्रम्प प्रशासनाच्या कृतींमुळे जग एका नवीन व्यवस्थेकडे वाटचाल करत असल्याने हे अनेक प्रकारे भारतासाठी अनुकूल आहे.परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले की, आम्ही काश्मीरचे बहुतेक प्रश्न सोडवले आहेत. कलम ३७० रद्द करणे हे पहिले पाऊल होते. मग दुसरे पाऊल म्हणजे काश्मीरमध्ये विकास, आर्थिक क्रियाकलाप आणि सामाजिक न्याय पुनर्संचयित करणे. मोठ्या प्रमाणात मतदान झालेल्या निवडणुका घेणे हे तिसरे पाऊल होते.
जयशंकर पुढे म्हणाले, “मला वाटते की आपण ज्याची वाट पाहत आहोत ती म्हणजे काश्मीरचा तो भाग परत मिळावा जो पाकिस्तानने चोरून ठेवला आहे. जेव्हा हे घडेल, तेव्हा मी तुम्हाला खात्री देतो की काश्मीर प्रश्न सुटेल.

लंडनमध्ये खलिस्तानी समर्थकांनी जयशंकर यांची गाडी घेरली:तिरंगा घेऊन परराष्ट्रमंत्र्यांसमोर पोहोचले आणि तो फाडला

लंडनमध्ये परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या गाडीला खलिस्तानी समर्थकांनी घेरले होते. त्यापैकी एक जण त्यांच्या गाडीसमोर आला आणि त्याने तिरंगाही फाडला. परराष्ट्र मंत्री सध्या लंडनमध्ये आहेत. त्यांनी येथे चॅथम हाऊस थिंक टँकच्या एका विशेष कार्यक्रमात भाग घेतला.कार्यक्रम संपताच तो त्याच्या गाडीकडे निघाला. त्याला पाहून तिथे आधीच निदर्शने करणाऱ्या खलिस्तानी समर्थकांनी घोषणाबाजी सुरू केली. यानंतर, एक निदर्शक तिरंगा घेऊन त्याच्या गाडीसमोर उभा राहिला आणि त्याने रस्ता अडवला. यावेळी त्याने भारताचा राष्ट्रध्वज फाडण्यासारखे लज्जास्पद कृत्यही केले.खलिस्तान समर्थक तिरंगा फाडताना दिसताच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले आणि गाडीतून दूर नेले. दुसरीकडे, काही लोक हातात खलिस्तानचा झेंडा घेऊन घोषणा देत होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे भारतीय समुदायात संताप आहे.या घटनेनंतर लंडनमध्ये भारतीयांनी निदर्शने केली. भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी लोक ब्रिटिश सरकारकडे करत आहेत. भारत सरकारनेही हा मुद्दा राजनैतिक पातळीवर उपस्थित करणे अपेक्षित आहे.

परदेशात खलिस्तान समर्थक यापूर्वीही भारतविरोधी कारवाया करत आहेत. ब्रिटन, कॅनडा आणि अमेरिका सारख्या देशांमध्ये भारतीय दूतावासाबाहेर अशा घटना घडल्या आहेत, ज्यावर भारत सरकारने आधीच निषेध व्यक्त केला आहे.