Home Blog Page 419

ज्ञान, शक्ती आणि भक्तीच्या त्रिवेणी संगमातून स्वराज्यनिर्मिती

इतिहास अभ्यासक रायबा नलावडे ; प्रभात मित्र मंडळातर्फे ‘शिवसूर्य’ स्मरणिका प्रकाशन
पुणे : प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या विचारांचा संगम जर कलियुगात पाहायचा असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये पाहायला मिळतो. शिवरायांच्या चरित्रातून आपल्याला प्रेरणा मिळते. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे या भूमीचे दोन डीएनए आहेत. त्यांनी ज्ञान, शक्ती आणि भक्तीच्या त्रिवेणी संगमातून स्वराज्यनिर्मिती केली असल्याचे मत इतिहास अभ्यासक रायबा नलावडे यांनी व्यक्त केले.

गुरुवार पेठेतील प्रभात मित्र मंडळाच्या ‘शिवसूर्य; स्मरणिका प्रकाशन कार्यक्रम श्री नाकोडा भैरव जैन धर्मशाळा येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, जनता सहकारी बँक,पुणेचे संचालक नाना कांबळे, ऍड. प्रताप परदेशी, मंडळाचे अध्यक्ष किशोर चव्हाण, उत्सव प्रमुख नितीन घोगरे, अमोल व्यवहारे, रवींद्र भन्साळी, मंगेश शिंदे, ओमकार नाईक, हेमराज साळुंके, अमोल थोरात, अथर्व बोगम, कृष्णा परदेशी आदी उपस्थित होते.

स्मरणिका प्रकाशन सोहळ्याचे हे ९ वे वर्ष होते. कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे हवेली तालुका कला क्रीडा सामाजिक संस्था, पुणे यांचे पदाधिकारी पै.भरत चौधरी व पै.भीमराव वांजळे यांचा मान्यवरांचे हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

अण्णा थोरात म्हणाले, शिवजयंती सोहळा हा प्रत्येकामध्ये उत्साह निर्माण करीत असतो. आपल्याकडे तारखेप्रमाणे आणि तिथीप्रमाणे अशी दोन वेळा शिवजयंती साजरी होते. तारखेच्या वेळी जेवढा उत्साह असतो, तेवढाच तिथीप्रमाणे सोहळा साजरा करताना दिसतो. ही अत्यंत चांगली बाब आहे.

किशोर चव्हाण म्हणाले, शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांसोबतच विचारांचे प्रबोधन व्हावे, यासाठी स्मरणिका प्रकाशन केले जाते. स्मरणिकेकरिता मंडळाचे कार्यकर्तेच लेखापासून ते इतर नियोजनांपर्यंत सर्व काम करतात. शहराच्या पूर्व भागातील शिवजयंतीचा भव्य दिव्य सोहळा प्रभात मित्र मंडळ साजरा करीत असून त्याची सुरुवात प्रकाशन सोहळ्याने होते, असेही त्यांनी सांगितले. निलेश कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

‘एक पोळी होळीची सामाजिक बांधिलकीची’

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून कोथरुडमध्ये उपक्रम

पुणे-दुष्ट आणि वाईट प्रवृत्ती नष्ट करणारा म्हणून होळीचा सण साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक घरात पुरणाच्या पोळ्यांचा नैवेद्य केला जातो. होलिका दहन झाल्यानंतर प्रत्येक घरातून एक पोळी होळीला अर्पण केली जाते. होळीच्या अग्नीमध्ये दृष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा’ हा त्यामागचा उद्देश असतो.

हे अन्न जळून खाक होण्याऐवजी ते गरीब आणि अर्धपोटी झोपणार्‍यांच्या मुखात जावे या उद्देशाने नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला असून, ‘एक पोळी होळीची, सामाजिक बांधिलकी’ची हा उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमाच्या माध्यमातून २० हजार पोळ्यांचे संकलन झाले असून, या सर्व पोळ्या गरीब विद्यार्थी, अनदेण्यात आल्या.

कोथरुड हे विद्येचे माहेरघर असल्याने, देशभरातून लाखो विद्यार्थी हे इथे शिक्षणासाठी येत असतात. यामधील असंख्य विद्यार्थी गरीब आणि अल्पभूधारक कुटुंबातील असल्याने, त्यांना अनंत अडचणींवर मात करत आपले शिक्षण पूर्ण करावे लागते.

यामध्ये असंख्य विद्यार्थी हे अर्धपोटीच शिक्षण घेत असल्याने, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांना पोषक आहाराचे डबे सुरु केले आहेत. होळीच्या सणाचा आनंद देखील या विद्यार्थ्यांना मिळावा, यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी एक पोळी होळीची समाजिक बांधिलकीची हा उपक्रम हाती घेत, कोथरुडमधील प्रत्येक कुटुंबांना गरीब विद्यार्थ्यांसाठी पोळी दान करण्याचे आवाहन केले होते.

ना. पाटील यांच्या आवाहनानंतर २० हजार पोळ्यांचे संकलन झाले. या सर्व पोळ्या गरीब विद्यार्थ्यांना देऊन, त्यांचा हा आनंद द्विगुणित करण्यात आला. यावेळी भाजपा कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला यांच्या हस्ते या पोळ्यांचे वितरण केले गेले.

प्रशासकीय काळात वाढली मुजोरी अन भ्रष्टाचार..महिला अधिकाऱ्यासह २ वरिष्ठ अधिकाऱ्यांना अँटीकरप्शनची कारवाई

पुणे- सरकार, निवडणूक आयोग आणि न्यायालयाच्या कचाट्यात अडकलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारभारात सुमारे ८० टक्के नवे कर्मचारी/ अन अधिकारी आता दिसू लागले असून त्यांची मनमानी, मुजोरी भ्रष्टाचार वाढल्याच्या पार्श्वभूमीवर लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने आता कारवाईला प्रारंभ केल्याचे दिसत आहे .जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडील कामांची देयके मंजूर करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी कार्यकारी अभियंत्यासह उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाकडून ही कारवाई करण्यात आली.कार्यकारी अभियंता बाबूराव कृष्णा पवार (वय ५७), उपअभियंता दत्तात्रेय भगवानराव पठारे (वय ५५) आणि कनिष्ठ अभियंता अंजली प्रमोद बगाडे अशी ताब्यात घेतलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. पवार हे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात (दक्षिण) आणि अन्य दोघेजण दौंड शिरूर उपविभागात कार्यरत आहेत.

‘एसीबी’चे पोलिस उपअधीक्षक दयानंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शासकीय ठेकेदार आहेत. त्यांना दौंड तालुक्यातील खुटबाव रस्ता ते गलांडवाडी पाणंद शिव रस्ता आणि गलांडवाडी मंदिर ते ज्ञानदेव कदम घर रस्ता या कामांची निविदा मंजूर झाली होती.\या निविदेनुसार त्यांना ४० लाख रुपयांच्या कामाची वर्कऑर्डर मिळाली होती. ही कामे पूर्ण केल्यानंतर कनिष्ठ अभियंता अंजली बगाडे कामाची पाहणी करतील. त्याचा अहवाल समितीला देण्यासाठी १४ हजार रुपयांची मागणी केली.तसेच तक्रारदाराच्या दोन कामांची देयके मंजूर करण्यासाठी दोन टक्क्यांप्रमाणे कार्यकारी अभियंता बाबूराव पवार आणि उपअभियंता दत्तात्रेय पठारे यांनी प्रत्येकी ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती एक लाख ४२ हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदाराने १० मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची ११ मार्च रोजी पंचासमक्ष पडताळणी केली. त्यात बगाडे, पवार आणि पठारे यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार १३ मार्च रोजी पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यालयात सापळा रचून तिघांना लाच घेताना ताब्यात घेण्यात आले. पवार यांच्या कार्यालयात एका बॅगेत आठ लाख ५८ हजारांची रोकड आढळली असून ती जप्त करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या अभ्यासातून उलगडणार  शहरीकरणाचे बदलते पैलू

‘अंडरस्टॅंडिंग अर्बनायझिंग पेरिफेरीज ऑफ पुणे प्रदर्शन’ –  १६ ते १९ मार्च दरम्यान आयोजन

पुणे : विवेकानंद इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने  ‘अंडरस्टॅंडिंग अर्बनायझिंग पेरिफेरीज ऑफ पुणे’ या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. उपनगरातील शहरीकरणाच्या वाढत्या प्रक्रियेचा सखोल अभ्यास मांडणारे हे प्रदर्शन आहे. रविवार, दिनांक १६ ते १९ मार्च २०२५ या कालावधीत यशवंतराव चव्हाण कलादालन येथे प्रदर्शन होणार आहे. 

या प्रदर्शनाचे उद्घाटन १६ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता  माजी खासदार ॲड. वंदना चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे. विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ट्रस्टचे चेअरमन ॲड. अभय छाजेड, सचिव जितेंद्र पितळीया आणि संचालक प्रसन्न देसाई यावेळी उपस्थित राहणार आहेत. 

प्रा. हृषीकेश अष्टेकर, देवेंद्र देशपांडे, गरिमा बुरागोहैन, गुंजन महेश्वरी, मीनाक्षी सरावगी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाचे संचालक आर्किटेक्ट प्रसन्न देसाई आणि समन्वयक आर्किटेक्ट शेखर गरुड यांनी या उपक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 

पुण्याच्या परिघीय शहरीकरणाचा सखोल अभ्यास विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मधील चौथ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ‘अर्बन डिझाईन’ अभ्यासक्रमांतर्गत विविध अभ्यास प्रकल्प सादर केले आहेत. गेल्या आठ वर्षांत विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी हिंजवडी,  खराडी,  देहू,  भूगाव,  चिखली, नऱ्हे या भागांचा सखोल अभ्यास केला होता.

गेल्या आठ वर्षांपासून त्यांनी पुण्याच्या विविध दिशांमधील सहा परिघीय भागांचा सखोल अभ्यास केला आहे.अभ्यासातील महत्त्वाचे पैलूया अभ्यासात प्रतिमा, ओळख, संस्कृती व वारसा, भूगोल, पर्यावरण, अर्थव्यवस्था, वास्तुशैली, वाहतूक, पायाभूत सुविधा, सामाजिक सुरक्षितता इत्यादी सात महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. पुण्याच्या बाहेरील १०-१५ किमी अंतरावर शहरीकरणाची गती, सरकारी योजना, महामार्ग व सांस्कृतिक केंद्रे यांचा प्रभाव याचा यात विशेष अभ्यास केला आहे. 

प्रदर्शन  नागरिकांसाठी सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत विनामूल्य खुले असेल. 

शिवनेरीवर तिथीनुसार (दि.१७) शिवनेरी स्मारक समितीतर्फे होणार शिवजयंती उत्सव,नितेश राणे ,एकबोटे उपस्थित राहणार  

0

राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान सोहळा ; सवाद्य छबिना मिरवणुकीचे आयोजन

पुणे : श्री शिवनेरी स्मारक समिती पुणेचे वतीने किल्ले शिवनेरी येथे फाल्गुन वद्य तृतीया म्हणजेच शिवतृतीयेला सोमवार, दिनांक १७ मार्च रोजी सकाळी ७ वाजता शिवजयंती उत्सव सुरु होणार आहे. शिवाई मातेस अभिषेक, शिवजन्मोत्सव, पालखी सोहळा, शिवजागर धार्मिक कार्यक्रम व पुरस्कार वितरण असे विविध कार्यक्रम गडावर होणार आहेत. उत्सवाचे यंदा ४६ वे वर्ष आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी दिली.

कै.ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी आणि कै.शाहीर किसनराव हिंगे यांनी १९८० सालापासून शिवनेरी गडावर हा उत्सव सुरु केलेला आहे. तीच परंपरा पुढे चालू ठेवत शनिवारी श्री शिवाई मंदिर ते जन्मस्थळ अशी महाराजांच्या प्रतिमेची चांदीच्या शिवपालखीतून सवाद्य छबिना मिरवणूक निघेल. यावेळी हिंदूधर्मवीर नितेश राणे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

अनेक शिवप्रेमी युवक-युवतींसह अनेक शाहीर देखील मिरवणुकीत सहभागी होणार आहे. श्रीजगद्गुरु तुकाराम महाराज यांचा प्रसाद म्हणून श्री क्षेत्र देहू संस्थानच्या वतीने श्री शिवछत्रपती शिवजयंती उत्सवानिमित्त दरवर्षी महावस्त्र पाठविले जाते. सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाच्यावतीने देखील महावस्त्र पाठविण्यात येणार आहे.

सोमवारी (दि.१७) सकाळी ७ वाजता शिवजन्मस्थळावर शिवाई मातेस सौ. व श्री. विद्यावाचस्पती डॉ.नंदकिशोर एकबोटे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा होईल. मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री मंत्री नितेश राणे, विद्यावाचस्पती डॉ. नंदकिशोर एकबोटे, शिवव्याखाते सौरभ कर्डे यांच्या उपस्थितीत हा उत्सव संपन्न होणार आहे. उत्सवात पालखी सोहळा व पारंपरिक पद्धतीने पंचक्रोशीतील महिला पाळणा म्हणून सकाळी ९  ते १० यावेळेत शिवजन्मोत्सव साजरा करतील.

यावेळी पंचक्रोशीत विशेष काम करणा-या महिलेला राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ओतूरच्या डॉ. रश्मी घोलप, कळंबच्या ह.भ.प.सुरेखा शिंदे, गोद्रेच्या सरपंच अनिता रेंगडे, पाडळीच्या सरपंच स्वाती कबाडी, सामाजिक कार्यकर्त्या राणी बो-हाडे यांना गौरविण्यात येणार आहे.

सोहळ्यासोबतच ध्वजारोहण होऊन धर्मसभा होईल. यात शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे वतीने पोवाड्यांचा कार्यक्रम होणार आहे. पोवाडे गायन कार्यक्रमानंतर जाहीर अभिवादन सभा होईल. त्यामध्ये सौरभ कर्डे यांचे व्याख्यान होईल. सायंकाळी ६ वाजता जुन्नर शहरातून मिरवणूक व रात्री सांगता सभा होणार आहे. समितीचे कार्याध्यक्ष मधुकर काजळे, चिटणीस रमेश कर्पे व शिवप्रेमींनी उत्सवाच्या आयोजनात सहभाग घेतला आहे. पंचक्रोशीतील पन्नास गावांमधून मोठया संख्येने शिवभक्त गडावर येणार असून महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. 

मंगळवार पेठेतील ‘तो’भूखंड नका घालू बिल्डरच्या घशात ,ती जागा डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवनाचीच :केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे गाऱ्हाणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण समिती भेटली केंद्रीय राज्य मंत्र्यांना

पुणे: मंगळवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या भावी विकास व योजनेसाठी आरक्षित जागा खासगी बिल्डरला देण्याचा निर्णय दुर्दैवी आहे. हा करार रद्द करून सदरची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारासाठी त्वरित द्यावी, अशी मागणी दलित, बहुजन व आंबेडकर अनुयायांची आहे. सामाजिक हिताच्या दृष्टीकोनातून या संवेदनशील व महत्वपूर्ण जागेचा प्रश्न मार्गी लावून डॉ. आंबेडकर भवनाचे विस्तारीकरण करण्यात पुढाकार घ्यावा, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण समितीने केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली.

सदरच्या जागेत आंबेडरकर भवनाचा विस्तार व्हावा, डॉ. आंबेडकरांचे भव्य स्मारक व्हावे, यासाठी पुण्याचे खासदार या नात्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा, या मागणीचे निवेदन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण समितीच्या वतीने मुरलीधर मोहोळ यांना देण्यात आले. प्रसंगी माजी आमदार ॲड. जयदेव गायकवाड, ॲड. अविनाश साळवे, डॉ. सिद्धार्थ धेंडे, रोहिदास गायकवाड, परशुराम वाडेकर, संजय सोनावणे, शैलेश चव्हाण, राहुल डंबाळे, शाम गायकवाड, महिपाल वाघमारे युवराज बनसोडे यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनालगत मंगळवार पेठेतील सर्व्हे नंबर ४०५ मधील जागा विस्तारीकरणासाठी देण्याचा निर्णय २० जुलै २००० मध्ये पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत झाला होता. मात्र, ४ सप्टेंबर २०२४ पासून एन. जी. व्हेंचर्सला ६० वर्षांच्या भाडेकरारावर देण्याचा करार केला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एखादा ठराव सर्वानुमते मंजूर झाल्यास त्याची तात्काळ अंमलबजावणी होण्याऐवजी नियम धाब्यावर बसवून कायद्याची पायमल्ली करत घाईगडबडीने हा भूखंड खाजगी कंपनीला देण्याचा निर्णय घेतला. पक्ष व राजकारण बाजूला ठेवून आंबेडकरी जनतेच्या अस्मितेचा विषय असलेली ही जागा खासगी बिल्डरच्या घशात देऊ नये. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारीकरणासाठी आंबेडकरी जनतेच्या भावना तीव्र आहेत. या भवनाचे विस्तारीकरण करण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख व देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यामुळे महापालिकेने २००० मध्ये केलेल्या ठरावाची त्वरित अंमलबजावणी करून येथे आंबेडकर भवनाचा विस्तार व स्मारकाचे काम त्वरित सुरु करावे. महापालिकेच्या वतीने आंबेडकरी विचारांचे प्रचार व प्रसार केंद्र, संशोधन केंद्र, स्पर्धा परीक्षा केंद्र, अभ्यासिका यासह डॉ. आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारावे, जेणेकरून आंबेडकरी समाजाला न्याय मिळेल, असे या निवेदनात म्हटले आहे.

पुण्यात अफूची शेती … पोलिसांची कारवाई. ४५ वर्षीय महिला अटकेत

पुणे-आळंदी म्हातोबाची या गावातील परिसरामध्ये अफु या अंमली पदार्थाची शेतात लागवड करणा-यावर लोणी काळभोर पोलीसांनी कारवाई केली आहे.
दि.१४/०३/२०२५ रोजी दुपारी १५/०० वा. चे सुमारास आळंदी म्हातोबाची येथील, जगताप मळा रोड चे कडेला असलेल्या नितीन टिंबळे यांचे प्लॉटींगचे मागील बाजुस असलेल्या जमीनीमध्ये अफु या अंमली पदार्थाची विक्री करण्याचे उद्देशाने, पिक लागवड करण्यात आलेली आहे. वगैरे मजकुरची गोपनिय खबर लोणी काळभोर पोलीसांना प्राप्त झाली.
सदर प्राप्त खबरी नुसार लोणी काळभोर पोलीसांनी दोन पंचांसह घटनास्थळी जावुन छापा कारवाई केली असता कारवाई दरम्यान, आळंदी म्हातोबाची येथील गट नंबर ७७५ मध्ये एकुण ४०,०००/-रुपये किंमतीचे, व ४ किलोग्रॅम वजनाचे, ६६ अफु चे झाडे मिळुन आले आहेत. सदरची आफु ची झाडे दोन पंचांसमक्ष पंचनामा करुन ती जप्त करणेत आलेली आहेत. तसेच त्याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाणे पुणे शहर येथे जमीन मालक महिला नामे मंगल दादासो जवळकर वय ४५ वर्षे रा. अमराई वस्ती, आळंदी म्हातोबाची ता. हवेली, जि. पुणे हिचे विरुध्द एन.डी.पी.एस. अॅक्ट क.८ ब,१८ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आलेला असुन सदर महिला आरोपीस ताब्यात घेणेत आले आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५, पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पन्हाळे, पोलीस उप निरीक्षक अनिल जाधव, पो.हवा. क्षिरसागर, वणवे, सातपुते, पो. अमंलदार कटके, कुदळे, नानापुरे, तेलंगे म.पो. अमंलदार निकंबे, यादव, यांनी केलेली आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत अशाप्रकारे आफु ची लागवड करणाऱ्या लोकांविरुध्द यापुर्वीदेखील २ वेळा गुन्हे दाखल करुन कारवाई करणेत आलेली आहे. अशा प्रकारचे अवैध धंदे करणाऱ्या इसमांवर लोणी काळभोर पोलीसांचे वतीने कायदेशीर कारवाइ ‘करुन अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्यात येणार आहे.

जर्मनीतील शिक्षणा करीता मार्गदर्शन

पुणे, १३ मार्च २५ – सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे (SSPU) ने ॲलेन युनिव्हर्सिटी, जर्मनी सोबत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मार्गदर्शना करीता चर्चा सत्राचे आयोजन केले होते.  आज ॲलेन युनिव्हर्सिटीच्या अधिकाऱ्यांनी सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीला भेट दिली.

ॲलेन युनिव्हर्सिटीतील, मिरियम कोल्मर-ट्रायनी (एमए), आंतरराष्ट्रीय संबंध आणि संशोधन विपणन तज्ञ, आणि प्रा. डॉ. अंजा डायकमन यांनी शिष्यवृत्तींबद्दल मौल्यवान माहिती दिली. या वेळी मेजर सोनाली कदम (निवृत्त) आणि राघवन संथानम, संचालक – स्कूल ऑफ पोर्ट्स, टर्मिनल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट हे देखील उपस्थित होते.

या चर्चा सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष आणि आंतरराष्ट्रीय शिक्षणाचे फायदे जाणून घेतले. सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आणि ॲलेन युनिव्हर्सिटी यांच्या सहयोगामुळे जागतिक संधी आणि शैक्षणिक प्राविण्य मिळवण्यासाठी एक नवा मार्ग खुला झाला आहे.

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

पुणे दि. १३: समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून प्रसिद्धी मोहिमेचा आज शुभारंभ करण्यात आला. सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय येथे या चित्ररथाला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

यावेळी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, माहिती अधिकारी सचिन गाढवे यांच्यासह समाजकल्याण सहायक आयुक्त कार्यालयातील निरीक्षक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील विविध तालुक्यातील सुमारे ११० गावांमध्ये दोन एलईडी चित्ररथ फिरणार असून जिल्हा माहिती कार्यालयाच्या सौजन्याने समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणार आहेत. शैक्षणिक साहाय्याच्या योजना, शिष्यवृत्ती योजना, वैयक्तिक लाभाच्या योजना, व्यवसाय, उद्योगासाठी कर्ज, अनुदान, सामाजिक सुरक्षेच्या योजना आदी सर्व योजनांची प्रसिद्धी या माध्यमातून केली जाणार आहे.

घरगुती गॅस सिलेंडर मधुन गॅस चोरी करून कमर्शियल सिलेंडर भरून ते विकणारे लोणीकाळभोर पोलिसांनी पकडले

पुणे- घरगुती गॅस सिलेंडर मधुन गॅस चोरी करून कमर्शियल सिलेंडर भरून ते विकणारे लोणीकाळभोर पोलिसांनी पकडले आणि १३५ सिलेंडर सह सुमारे सव्वादोन लाखाचा ऐवज जप्त केला आहे .

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दि.१२/०३/२०२५ रोजी युनिट ६ कडील प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. वाहिद पठाण व युनिट ६ कडील पथक असे लोणी काळभोर पो.स्टे. हद्दीत गस्त करीत असताना पोलीस अंमलदार शेखर काटे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, महादेव मंदिरा जवळ, लोणी काळभोर, पुणे येथे एक इसम घरगुती गॅस सिलेंडर मधील गॅस पाईपचे सहाय्याने काढून तो लहान मोठ्या व कमर्शियल गॅस सिलेंडर मधे भरत आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पुरवठा अधिकारी इम्रान मुलानी व पथक, लोणीकाळभोर पोलीस स्टेशन कडील स्टाफ यांचे सह सदर ठिकाणी छापा कारवाई केली असता त्याठिकाणी मदन माधव बामणे वय २० वर्षे रा. महादेव मंदिराजवळ, लोणी काळभोर, पुणे हा घरगुती गॅस सिलेंडर मधील गॅस पाईपचे सहाय्याने काढून तो लहान मोठ्या व कमर्शियल गॅससिलेंडर मधे भरत असताना मिळून आला आहे. सदर ठिकाणी वेग वेगळ्या कंपनीचे लहान मोठे व कमर्शियल गॅससिलेंडर एकूण १३५, इलेक्ट्रिक वजनकाटा, गॅस भरण्यासाठी लागणारे पाईप, नोजल असा एकूण ०२,१३,९५०/- रु. किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे.
सदर आरोपीता विरुद्ध लोणीकाळभोर पो.स्टे.गु.र.नं.१२५/२०२५ भा. न्या. सं. कलम २८७, २८८ सह जीवनावश्यक वस्तू कायदा, १९५५ चे कलम ३,७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपी व मुद्देमाल पुढील तपासकामी लोणी काळभोर पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आला आहे.
सदरची कामगीरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे २) श्री. राजेद्र मुळीक, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युनिट ६ गुन्हे शाखा, चे प्रभारी वाहिद पठाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकाळभोर पो.स्टे. चे राजेंद्र पन्हाळे सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप-निरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस उप-निरीक्षक अनिल जाधव (लोणीकाळभोर पो.स्टे.) पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, सुहास तांबेकर, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, गणेश डोंगरे, समीर पिलाने, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, मपोअं. प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे, लोणीकाळभोर पो.स्टे. कडील पोलीस अंमलदार प्रदिप क्षीरसागर, अक्षय कटके, सचीन सोनवणे, बालाजी बांगर यांनी केली आहे.

बंदिशींद्वारे भारतीय स्त्री शक्तीचा सन्मान

भक्तिसुधा फाऊंडेशनच्या वतीने उर्जा’ : सन्मान भारतीय स्त्री आदर्शांचा सांगीतिक कार्यक्रम

पुणे : सीतामातेवरील बंदिश कमलसी कोमल कमल नयनसी  मिथिला किशोरी जनक नंदिनी, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पत्नी यमुनाबाई यांच्यावरील माई सांगिनी विनायकी ही बंदिश. राजमाता जिजाबाई यांच्यावरील बंदिश जय जय जिजाऊ…अशा विविध शास्त्रीय बंदिशींच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीमध्ये आजपर्यंत झालेल्या महान स्त्रियांमुळे संस्कृतीला मिळालेल्या भक्ती, शक्ती, शौर्य, मातृत्व, त्याग आदी विविध गुणांचे दर्शन गायिकांनी उलगडून दाखवले

भक्तिसुधा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘ऊर्जा – सन्मान भारतीय स्त्री आदर्शांचा’ या कार्यक्रमाचे आयोजन कोथरुडच्या बाल शिक्षण मंदिर येथे करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ गायिका निर्मला गोगटे,  खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, सुशील ओक, पं.सुहास व्यास, विदुषी माधुरी डोंगरे, विदुषी मंजिरी कर्वे-आलेगावकर, डॉ. शुभांगी बहुलीकर, अपर्णा केळकर, शेखर कुंभोजकर, पं. विकास पुरंदरे उपस्थित होते.

‘शास्त्रीय बंदिशी द्वारा देवी सीतामाता, संत मुक्ताबाई, संत मीराबाई, राजमाता जिजाबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी, यमुनाबाई सावरकर अशा महान व्यक्तिमत्वांच्या  त्याग, तपस्या, भक्ती, शौर्य, मातृत्व, शक्ती अशा गुणांचा परिचय झाला. भारतमातेवरील विशेष बंदिश या कार्यक्रमात सादर करण्यात आली.

भारतीय संस्कृतीमधील स्त्रियांचे योगदान, त्यांनी दाखवून दिलेला पराक्रम आणि त्यांचा समाजमनावर झालेला परिणाम हे या बंदिशीच्या माध्यमातून रसिकांना अनुभवायला मिळाले.   संत मीराबाई यांची श्रीकृष्णावरील भक्ती, राजमाता जिजाऊ यांनी आपल्या संस्कारातून छत्रपती शिवाजी महाराज यांना दिलेली शक्ती, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाई सावरकर यांनी केलेला त्याग या गुणांना अनुभवताना रसिकांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी तरळले.

संगीतकार आशिष केसकर यांच्या मार्गदर्शनात या संपूर्ण कार्यक्रमाची मांडणी केली गेली.   बंदिशींची रचना आणि सादरीकरण संगीतभूषण पं. राम मराठे यांच्या तिसऱ्या पिढीतील गायिका पल्लवी पोटे, मृणाल भिडे, प्राजक्ता मराठे व श्रुती विश्वकर्मा-मराठे यांनी केली. तबल्याची साथ सावनी तळवलकर व हार्मोनियमची साथ सुप्रिया जोशी यांनी केली. कीर्तनकार मानसी बडवे यांनी सूत्रसंचालन केले तर आदिती केसकर यांनी निवेदन केले.

पूनावाला फिनकॉर्पचा शैक्षणिक कर्ज व्यवसायात प्रवेश; 3 कोटी रु. पर्यंतचा वित्तपुरवठा करणार

मुंबई – सायरस पूनावाला ग्रुपच्या अंतर्गत कार्यरत असलेली ग्राहक व एमएसएमईना वित्तपुरवठा करण्यावर लक्ष केंद्रित करणारी बिगर बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड (PFL) ने आंतरराष्ट्रीय विद्यापीठात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्यवसाय सुरू केला आहे. या सुविधेचा उद्देश वेगवान प्रक्रिया व त्वरित मंजुरी प्रदान करून विद्यार्थ्यांना अडथळाविरहित अनुभव देणे हा आहे. या सादरीकरणाचा एक भाग म्हणून कंपनीने शैक्षणिक कर्जासाठी तत्काळ मंजुरी देण्याच्या या उद्योग क्षेत्रातील पहिल्या उपक्रमाची घोषणा केली आहे. हा सुलभ, तंत्रज्ञान प्रणीत वित्तपुरवठा सेवा अनुभव नव्या आणि विद्यमान PFL ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी याचे महत्व काय आहे?

·         3 कोटी रु. पर्यंतचे कर्ज (तारणासह) – विद्यार्थी आणि सह-अर्जदार यांच्यासाठी ट्यूशन फी, राहण्याचा खर्च, प्रवास, पुस्तके आणि विमा हप्ते कव्हर करणारे कर्ज, सोपी सुलभ मंजुरी प्रक्रिया

·         1 कोटी रु. पर्यंतचे कर्ज – विनातारण अर्ज करू शकण्याचा पर्याय उपलब्ध

·         तत्काळ मंजुरी – त्वरित निर्णय प्रक्रिया सुनिश्चित करत 75 लाख रु. पर्यंतच्या कर्जासाठीचा उद्योगक्षेत्रातील प्रथम उपक्रम 

·         आकर्षक व्याजदर – आंतरराष्ट्रीय विद्यापीठात शिक्षण घेण्याचे नियोजन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कर्ज सुलभ करण्यासाठी स्पर्धात्मक, आकर्षक व्याजदर

पूनावाला फिनकॉर्पचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अरविंद कपिल या सादरीकरणाबद्दल म्हणाले, “शिक्षण ही भविष्याची सर्वात प्रभावी गुंतवणूक आहे आणि आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या स्वप्नांना मर्यादा येता कामा नये. आमच्या शिक्षण कर्ज योजनांद्वारे, आम्ही विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षणाच्या संधी मिळवण्यासाठी मदत करण्याकरता आणि त्यांचे उज्ज्वल भविष्य घडवण्याकरता कटिबद्ध आहोत.”

वाढत्या बाजारपेठेवर लक्ष केंद्रित

एक उभरती अर्थव्यवस्था म्हणून भारताचा शिक्षण क्षेत्र आणि विद्यार्थ्याच्या आकांक्षा यांवरील वाढता भर यामुळे शैक्षणिक कर्ज क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. हा एक आकर्षक उद्योग असल्याची जाण PFL ला आहे. आपल्या ग्राहक-केंद्रित व्यवसाय मॉडेलवर लक्ष केंद्रित करून विविध कुटुंबांशी जोडून घेत या क्षेत्रात अग्रणी राहण्याचे, पसंतीचे नाव बनण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. यासाठी कंपनीने भारतभरातील शैक्षणिक सल्लागारांशी भागीदारी केली आहे. विद्यार्थ्यांच्या गरजांनुसार वित्तपुरवठा करण्यासाठी आणि ग्राहक अनुभव उंचावण्यासाठी उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञांना आपल्या संघात समाविष्ट केले आहे.

उत्पादन सादरीकरणात वैविध्य आणण्यासाठी आणि समग्र, व्यापक आर्थिक सेवा सुविधा पुरवण्यासाठी शैक्षणिक कर्ज व्यवसाय क्षेत्रातील पदार्पण हा PFL च्या व्यापार विस्तार धोरणाचा एक भाग आहे. नुकतेच, कंपनीने नोकरदार, पगारी व्यावसायिकांसाठी डिजिटल प्राइम वैयक्तिक कर्ज सुरू केले आहे.

PFL त्याच्या जोखीम-प्रथम दृष्टिकोनावर ठाम आहे आणि सध्याच्या वित्तीय गरजांना उत्तर देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना सादर करत आहे. कर्ज प्रक्रिया सुलभ करणे, ग्राहकांचे समाधान वाढवणे आणि त्यांना सर्वोत्तम अनुभव देणे ही कंपनीसाठी सर्वोच्च प्राधान्याची गोष्ट आहे.

सलमान खान इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी

ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होणाऱ्या काही शर्यतींमध्ये सलमान खान उपस्थित राहणार आहे.

मुंबई: भारताच्या मोटरस्पोर्ट्स क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवणाऱ्या पहिल्या सीझननंतर इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) ला बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान यांना अधिकृत ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सहभागी करून घेण्यात मन:पूर्वक आनंद होत आहे. त्यांची दमदार ‘लार्जर दॅन लाईफ’ प्रतिमा आणि प्रचंड लोकप्रियता यामुळे सलमान खान यांचा ISRL मधील सहभाग हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. सलमान खान यांच्यामुळे लीग मुख्य प्रवाहातील क्रीडा मनोरंजनाच्या नवीन युगाच्या अग्रस्थानी येईल. मोटरस्पोर्ट्सबाबतची त्यांची आवड आणि सर्व वयोगटांतील प्रेक्षकांशी असलेले भावनिक नाते यामुळे सलमान खान यांची उपस्थिती ISRL च्या लोकप्रियतेला अधिक गती देईल आणि त्यामुळे सुपरक्रॉस भारतातील घराघरात पोहोचेल.

या सहकार्यातून सलमान खान मोटरस्पोर्ट्सच्या जाहिरात क्षेत्रात प्रवेश करीत असून त्यांच्या संपूर्ण भारतभरातील लोकप्रियतेचा फायदा ISRL च्या धडाकेबाज रेसिंग अॅक्शनला मिळणार आहे. सलमान खान यांची शहरी भागापासून दूरवरच्या ग्रामीण भागांपर्यंत असलेली प्रचंड फॅन फॉलोइंग आणि ISRL चा जोशपूर्ण स्पर्धात्मक थरार यांचा सुरेख संगम या सहयोगातून साधला जात आहे. केवळ रोमांचक रेसिंग लीगपुरतेच मर्यादित न राहता, ISRL चा दुसरा सीजन संपूर्ण कुटुंबासाठी एक परिपूर्ण मनोरंजन सोहळा ठरणार आहे. त्यामध्ये सलमान खान आघाडीवर राहून सर्व वयोगटातील चाहत्यांसाठी हा खेळ अधिक सहज आणि आकर्षक बनवतील. मोटरसायकल्स, फिटनेस आणि अॅक्शन स्पोर्ट्सबाबत असलेल्या त्यांच्या आवडीमुळे सलमान खान सुपरक्रॉस रेसिंगमधील जोशपूर्ण ऊर्जेचे आणि साहसी दृष्टिकोनाचे प्रतीक आहेत आणि लीगला यशाचे नवे उंच शिखर गाठण्यासाठी आदर्श अॅम्बेसेडर ठरणार आहेत.

या सहयोगाबाबत आनंद आणि उत्साह व्यक्त करताना सलमान खान म्हणाले, “मोटरसायकल्स आणि मोटरस्पोर्ट्सबाबत मला प्रचंड आकर्षण आहे आणि त्यामुळे अशा गोष्टीचा भाग होण्याचा मला खूप आनंद आहे. ISRL जे निर्माण करत आहे ते खरोखरच क्रांतिकारी आहे आणि दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून ते पुढे जात आहेत. या लीगमध्ये अफाट मनोरंजन मूल्य आहे आणि ती आवड जागृत करण्याचे, कौशल्य दाखवण्याचे आणि पुढच्या पिढीला प्रेरणा देणाऱ्या हिरोंची निर्मिती करण्याचे काम ही लीग करत आहे. एकत्रितपणे, आपण सुपरक्रॉसला भारतात घराघरात पोहोचवू आणि आपल्या रायडर्सना जागतिक स्तरावर नेऊ.”

ISRL चे व्यवस्थापकीय संचालक वीर पटेल म्हणाले, “ISRL परिवारात सलमान खान यांचे स्वागत करणे हा भारतीय मोटरस्पोर्ट्ससाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. मोटरस्पोर्ट्सला जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळत असताना इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) ने भारताला जागतिक मोटरस्पोर्ट्स नकाशावर भक्कमपणे स्थिर केले आहे. या सहकार्यातून आमची भारतीय मोटरस्पोर्ट्सला अव्वल स्तरावर नेण्याची समान महत्त्वाकांक्षा प्रतिबिंबित होते. त्यांची शर्यतीच्या वेळी असणारी उपस्थिती, सक्रिय सहभाग आणि मार्गदर्शनामुळे आपण मोटरस्पोर्ट्स क्षेत्रात क्रांती घडवत आहोत. भावी भारतीय रायडर्सना यातून प्रेरणा मिळेल आणि भारताला जागतिक पातळीवर सुपरक्रॉसचे एक प्रमुख स्थळ म्हणून स्थान मिळवून देता येईल.”

यूबीटी (सलमान खानची टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी) चे सहसंस्थापक विक्रम तन्वर म्हणाले, “ISRL च्या पहिल्या सीजनला मिळालेले जबरदस्त यश आम्ही पाहिले आहे. भारतातील आणि जागतिक स्तरावरील अव्वल रायडर्सनी या स्पर्धेत आपली अतुलनीय प्रतिभा सादर केली. लीगला नव्या उंचीवर नेण्यासाठी आणि भारतात या क्रीडा प्रकाराची भरभराट होण्यासाठी आम्ही हा सहयोग करत आहोत. सलमान खान यांची विविध लोकसमूहांमध्ये असलेली अफाट लोकप्रियता सुपरक्रॉसच्या जोशपूर्ण विश्वाला लाखो नव्या चाहत्यांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.”

ISRL चे सहसंस्थापक आणि संचालक ईशान लोखंडे म्हणाले, “सलमान खान यांचा ISRL सोबतचा सहयोग ही सुपरक्रॉसला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि भारतीय ब्रँड्सना या रोमांचकारी खेळाच्या जागतिक परंपरेशी जोडण्यासाठीचे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. त्यांच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे आणि देशभरातली चाहत्यांशी असलेल्या घट्ट नात्यामुळे भारतभरातील ब्रँड्सना या जोशपूर्ण प्रवासाचा भाग होण्यासाठी प्रेरणा मिळेल. या खेळातील नवीन हिरो पुढे येतील आणि सुपरक्रॉसला भारतात त्याचे खरे घर मिळेल. जागतिक स्तरावर प्रत्येक भारतीय अभिमानाने उभा राहील असा आपण सुपरक्रॉसचा पुढचा अध्याय लिहिणार आहोत.”

ISRL च्या पहिल्या उद्घाटन सीजनने भारतातील मोटरस्पोर्ट्स इव्हेंट्ससाठी नवे मापदंड प्रस्थापित केलेती स्पर्धा 30,000 हून अधिक लोकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहिली आणि केवळ दिवसांच्या प्रसारणात 11.5 दशलक्ष लोकांनी हा कार्यक्रम पाहिला. सुपरक्रॉस इव्हेंटसाठीचा हा एक नवा जागतिक विक्रम ठरला आहे.

या स्पर्धेत जगभरातील 48 सर्वोत्तम रायडर्सनी भाग घेतला. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय दिग्गज जॉर्डि टीक्सीअर, मॅट मॉस आणि अँथनी रेनार्ड यांनी विविध श्रेणींमध्ये आपली प्रतिभा सादर केली. भारताच्या डकार अग्रणी सी एस संतोष यांच्या नेतृत्वाखालील टीम बिग रॉक मोटरस्पोर्ट्सने विजेतेपद पटकावत स्पर्धेसाठी एक उच्च मापदंड प्रस्थापित केला. पहिल्या हंगामाने भारतात जागतिक दर्जाच्या सुपरक्रॉससाठी असलेली आवड यशस्वीपणे प्रदर्शित केली आणि या खेळाच्या वाढीसाठी भक्कम पाया रचला.

शेतकरी कैलास नागरेची आत्महत्या हा भाजपा युती सरकारने घेतलेला बळी: हर्षवर्धन सपकाळ.

नागरे यांना आत्महत्या करायला भाग पाडणा-या प्रशासकीय अधिका-यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा

आश्वासन देऊनही खडकपूर्णा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीला पाणी न देणारे युती सरकार शेतकरीविरोधी

उद्योगपती व कंत्राटदारांचे खिसे भरणाऱ्या भाजपा युती सरकारची शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास मात्र टाळाटाळ.

मुंबई, दि. १३ मार्च २०२५
राज्यातील भाजप महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य जनता व शेतकरी, कष्टकरी यांचे नसून ते फक्त मूठभर उद्योगपती व कंत्राटदारांचे आहे. शेतमालाला भाव नाही, शेतीला वीज, पाणी नाही म्हणून शेतकरी त्रस्त आहे पण कुंभकर्णी झोपेतील सरकारला ते दिसत नाही. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळचा तरुण शेतकरी कैलास नागरेनी केलेली आत्महत्या ही भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचे उदाहरण आहे. कैलास नारगेच्या आत्महत्येस भाजपा सरकारच जबाबदार असून हा सरकारी बळी आहे असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

कैलास नागरे यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली यावेळी ते म्हणाले, कैलाश नागरे यांच्या निधानाचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. त्याच्यांशी आपला अनेक वर्षांपासून स्नेह होता. नागरे हे प्रगतीशील शेतकरी आणि सामाजिक जाणिव असलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी शेतीमध्ये अनेक चांगले प्रयोग केले होते मी माझ्या मुलाला तुझी शेती पहायला पाठवतो असे त्यांना सांगितले होते. माझ्या मुलाला आदर्श म्हणून दाखवलेला माणूस अशा प्रकारे आपल्यातून निघून जातो हे अत्यंत वेदनादायी आहे.

राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्याला होळीच्या सणाच्या दिवशी विषारी औषध पिऊन जीवन संपवावे लागले ही महाराष्ट्राला लाज आणणारी बाब आहे. शेतकरी हा अन्नदाता आहे पण त्याच्या ताटातच अन्न नसेल तर तो आपल्या कुटुंबाचे पोट कसे भरेल. कैलास नागरे या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी तीन पानाची नोट लिहून शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला आहे. कैलाश नागरे यांनी खडकपूर्णाच्या डाव्या कालव्यातून शेतक-यांना पाणी द्यावे म्हणून डिसेंबर महिन्यात सात दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यावेळी प्रशासनाने पाणी सोडण्याचे आश्वासन दिले होते पण तीन महिने उलटूनही पाणी मिळत नसल्याने नागरे निराश झाले होते व त्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.

एक ट्रिलीयनची अर्थव्यवस्था करण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या सरकारला आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकाला पाणीसुद्धा उपलब्ध करुन देता येत नाही हे अत्यंत लाजीरवाणे व वेदनादायी आहे. एक तरुण शेतकरी आपले आयुष्य संपवतो याहून दुसरे दुर्दैव काय, पण सत्तेत बसलेल्यांना फक्त हिंदू, मुस्लीम, औरंगजेब याच्यापलीकडे काही दिसतच नाही. हे सरकार मुर्दाड आहे, मुजोर आहे क्रूरकर्मा औरंजेबापेक्षा निष्ठूर आहे, या सरकारचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे.

कैलास नारगे या तरुण शेतकऱ्याच्या आत्महत्येने सरकारने खडबडून जागे व्हायला हवे पण तसे होताना दिसत नाही. कैलास नागरेची आत्महत्या ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राला शमरेने मान खाली घालायला लावणारी आहे. सरकारमध्ये थोडीफार लाज शरम शिल्लक असेल तर त्यांनी कैलास नागरे यांच्या आत्महत्येला जबाबदार अधिका-यांवर कठोर कारवाई करून नागरे यांच्या कुटुंबाला भरीव आर्थिक मदत द्यावी व महाराष्ट्रात पुन्हा कोणी कैलास नागरे आत्महत्या करणार नाही, याची खबरदारी घ्यावी असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

स्व.प्रकाश ढेरे स्मृत्यर्थ कला जीवन गौरव पुरस्कार सोहळा अन कवी संमेलन रंगले

पुणेकरांचे कधीही प्रेम करू शकत नाही – अशोक सराफ

पुणे : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण अशा थोर व्यक्तीच्या नावाने मला पुरस्कार मिळाला, हे माझे भाग्यच आहे. पुणेकरांनी आजपर्यंत मला भरभरून प्रेम दिले आहे, त्यांचे हे प्रेम मी कधीही विसरू शकणार नाही. मला मिळालेले पुरस्कार मी जपून ठेवले असून ते मला सतत ऊर्जा देणारे आहेत, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केली.
स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट व गंगालॉज मित्र मंडळातर्फे पहिले मुख्यमंत्री, लोकनेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण कला व साहित्य पुरस्कार समारंभात कै. प्रकाश ढेरे स्मृत्यर्थ ‘कला जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांना जेष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते टिळक स्मारक मंदिरात प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते नागराज मुंजुळे उपस्थित होते.
याप्रसंगी सुनिता झाडे (नागपूर) यांना ‘शब्दांच्या पसाऱ्यातील आत्महत्या’ या कविता संग्रहासाठी कै. शिवाजीराव अमृतराव ढेरे यांच्या स्मृत्यर्थ ‘साहित्य पुरस्कार’, फेलिक्स डिसोजा (वसई) यांना
आरशात ऐकु येणार प्रेम या कविता संग्रहासाठी कै. बाबासाहेब जाधव यांच्या स्मृत्यर्थ साहित्य पुरस्कार, सफर अली इसफ (वैभववाडी) यांना ‘अल्लाद ईश्वर’ कवितासंग्रहासाठी कै. धनाजी जाधव स्मृत्यर्थ ‘साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.जेष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ, ज्येष्ठ कवी व वात्रटिकाकार रामदास फुटाणे, जेष्ठ लेखक व कवी प्रा. फ.मु. शिंदे, अशोक नायगावकर , ट्रस्टचे विजय ढेरे, संजय ढेरे, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, गौरव फुटाणे, सचिन जाधव, कुणाल जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
पुरस्काराला उत्तर देताना अशोक सराफ म्हणाले, थोर व्यक्तीच्या नावाने मला पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार माझा सन्मान आहे, प्रेम मी विसरणार नाही. स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्टचा ऋणी आहे. पुणेकरांनी नेहमीच माझे कौतुक केले याचेही यावेळी त्यांनी नमूद केले.
डॉ. मोहन आगाशे म्हणाले, अशोक सराफ हा कलाकार तळागाळात मिसळणारा आहे. त्यांच्यात बडेजावपणा, इगो अजिबात नाही. कधीही केव्हाही भेटणारा साधा सरळ हा माणूस आहे. साध्या सरळ माणसाला हा पुरस्कार मिळाल्याने खरोखर आनंद आहे.
नागराज मुंजुळे म्हणाले, अशोक मामाच्या साध्या आणि सरळ स्वभावामुळे मीच नव्हे तर अख्खा महाराष्ट्र त्यांचा चाहता आहे. हा माणूस आभाळासारखा आहे. कारण मी त्यांना अनुभवलं आहे. मी काहीही नसताना त्यांचा बाईट घेण्यासाठी गेलो असता, कुठून आला, कोण आहेस असे कोणतेही आढेवेढे न घेता माझ्या खांद्यावर हात ठेवून मला पहिला बाईट दिला. हा माणूस चित्रपट क्षेत्रातलाच नव्हे तर खऱ्या जीवनातला देखील हिरो आहे, सही यावेळी त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ढेरे व जाधव परिवाराने गेली 39 वर्षे कार्यक्रमातून यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती जतन ठेवल्या आहेत. यशवंतराव चव्हाण यांचा संस्कृतपणा आणि राजकारण पुढे घेऊन जायचे आहे. सध्याची महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृतपणा हरवत चाललेला आहे. महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा जोपासण्याचे आपले सर्वांचे काम आहे. यशवंतरावाचा सुसंस्कृतपणा ढेरे-जाधव परिवार जोपासत आहे कौतुकास्पद आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले .
तीन पुरस्कार विजेते कवींसह अंजली कुलकर्णी, प्रकाश होळकर, कल्पना दुधाळ, मृणालिनी कानिटकर, अनिल दीक्षित, बालिका विखले, वैशाली पतंगे, शशिकांत तिरोडकर, नितीन देशमुख, गुंजन पाटील यांनी सहभाग घेतला होता. ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, प्रा. फ. मुं. शिंदे व अशोक नायगावकर यांनी कवि संमेलनाचे सूत्रसंचालन केले. यावेळी राजकारण, समाजातील व्यथा कवितेतून केले. तसेच आपल्या खास भाषेतून कविता सादर करुन श्रोत्यांची मने जिंकली.
गझल, प्रेमगीते, राजकरण्यांवर विडंबन कविता सादर करत उत्तोरात्तर संमेलन रंगत गेले. त्याचबरोबर कवि रामदास फुटाणे व अशोक नायगावकर यांच्या खास शैलीतील किस्यात श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.
कवीनीं श्रोत्यांची वाहवा मिळविली. कवि डॉ. विठ्ठल वाघ यांनी कार्यक्रमाचा समारोप केला. या कवी संमेलनास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून कवितेचा आस्वाद घेतला