Home Blog Page 415

विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी,शीतल म्हात्रे म्हणाल्या,मंज़िलें अभी और भी हैं…

0

मुंबई : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी 27 मार्च रोजी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. विधान परिषदेतील 5 सदस्य विधानसभेवर निवडून गेल्याने त्यांच्या रिक्त जागेवर ही निवडणूक होणार आहे. रविवारी भाजपने 3 उमेदवारांची घोषणा केल्यानंतर आज शिवसेना शिंदे गटाने आपला उमेदवार जाहीर केला आहे. या नेत्याला राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये ठाकरे गटाकडून संधी देण्यात आली होती. मात्र, तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारने पाठवलेल्या यादीला मंजुरी दिली नव्हती.अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास उरले असताना एकनाथ शिंदे यांच्याकडून चंद्रकांत रघुवंशी यांचे नाव जाहीर करण्यात आले. त्यामुळे विधानपरिषदेवर जाण्यासाठी इच्छूक असलेल्या शीतल म्हात्रे काहीशा नाराज झाल्या.

महायुतीकडे प्रचंड बहुमत असल्याने या पाचही जागांवर त्यांचे उमेदवार विजयी होण्याइतके संख्याबळ आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा अर्ज आहे. विधानपरिषदेचे सदस्य असलेले आमश्या पाडवी, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि राजेश विटेकर हे विधानसभेवर निवडून गेल्याने या जागा रिक्त झाल्या होत्या.आमश्या पाडवी यांनी वर्षभरापूर्वी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला होता. आता एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा नंदूरबार-धुळेमधील नेतृत्वाला संधी दिली आहे.

रघुवंशी यांचे नाव जाहीर झाल्यामुळे विधानपरिषदेवर जाण्यासाठी इच्छूक असलेल्या शीतल म्हात्रे मात्र काहीशा नाराज झाल्या.शीतल म्हात्रे यांनी सोशल मीडियावर स्टेटस शेअर करुन आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी ट्विटरवर एक शायरी शेअर केली आहे. या शायरीतून शीतल म्हात्रे विधानपरिषदेची उमेदवारी न मिळाल्यामुळे काहीशा निराश झाल्याचे दिसत आहे. मात्र, राजकीय जीवनात आणखी संघर्ष करण्याची आपली तयारी असल्याचे संकेतही शीतल म्हात्रे यांनी दिले आहेत.

मंज़िलें अभी और भी हैं
चलना अभी दूर तक और भी है।

जो चाह थी मेरी
वो मुझे नहीं मिली,
पर जो कुछ भी मिला
वो किसी स्वपन देखी चाह
से कम भी नहीं…

‘बरे झाले पक्ष फुटला’:अशा व्यक्तीसोबत काम करू शकत नाही- सुप्रिया सुळेंची टीका; मुंडेंनंतर आणखी एक विकेट जाणार असल्याचा दावा

पुणे-बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणारा आकाचा आका हा एकच व्यक्ती आहे. हाच व्यक्ती संतोष देशमुख यांची हत्या होत असताना फोनवरून विकृतपणे या सगळ्याची मजा घेत होता, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. पक्षाच्या रविवारी पार पडलेल्या बैठकीत बोलताना सुळे यांनी हा आरोप केला असल्याचा दावा केला जात आहे.संतोष देशमुख हत्या प्रकरणासह मंत्र्यांच्या भ्रष्टाचार प्रकरणात सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला घेण्याचा प्रयत्न केला. यात त्यांनी धनंजय मुंडे यांच्याप्रमाणे लवकरच आणखी एकाची विकेट जाणार असल्याचा दावा देखील केला आहे. मात्र, त्या व्यक्तीचे नाव सांगण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे ती व्यक्ती कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे आवादा कंपनी विरोधात केंद्र सरकारला पत्र पाठवणारी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात व्हिडिओ पाहणारी ती व्यक्ती कोण? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

या संबंधात मला मिळालेल्या माहितीनुसार सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण होत असताना तिकडे एका व्यक्तीने फोन केला होता. ही व्यक्ती त्याची गंमत पाहत होती. हे किती विकृती आहे? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. ही व्यक्ती खंडणी, सत्ता आणि पैशाच्या जीवावर हे सगळे करत होती. इतकेच नाही तर आवादा कंपनीच्या विरोधात केंद्र सरकारला तीन पत्रे पाठवली होती, असा दावा त्यांनी केला आहे. यामध्ये आवादा कंपनी ही वाईट आहे, त्यांच्याकडे चांगले काम होत नाही. त्यांना बीड मधून बाहेर काढून टाका, असा उल्लेख या पत्रात केला होता. तर दुसरीकडे कंपनीवर आरोप करणारा तोच व्यक्ती दुसरीकडे त्यांना खंडणी मागायचा. असे प्रकार होत असल्याचा आरोप देखील सुळे यांनी केला आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांची नुकतीच विकेट गेली आहे. मात्र, मंत्रिमंडळातील आणखी एका नेत्याची विकेट जाणार असल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे. आणखी सहा महिने थांबा, आणखी एका व्यक्तीची विकेट जाणार आहे. हा व्यक्ती बायकोच्या आड सर्व उद्योग करत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी समोर येऊन लढावे, असे आव्हान देखील सुप्रिया सुळे यांनी दिले आहे. त्यामुळे आता तो मंत्री कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

धनंजय मुंडे यांच्या विरोधात ते आमच्यासोबत पक्षात असताना देखील लढाई सुरू होती, असा दावा सुळे यांनी केला आहे. मात्र बरे झाले पक्ष फुटला. बायकोच्या गाडीमध्ये बंदूक ठेवणाऱ्या व्यक्तीसोबत मी काम करू शकले नसते, अशा शब्दात सुळे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. जो व्यक्ती स्वतःची पत्नी, मुलांची आई असलेल्या महिलेच्या गाडीत बंदूक ठेवू शकतो, अशा पुरुषासोबत मी काम करू शकत नाही. मी याबाबत आज पहिल्यांदा बोलत असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे. मी विरोधी पक्षात आयुष्य काढेल. मात्र नैतिकता तोडणार नाही. माझे घर कंत्राटदारांच्या पैशावर चालत नसल्याचे सुळे यांनी म्हटले आहे.

अंतर्वस्त्रांमध्ये लपवून सोन्याची तस्करी:मुंबई विमानतळावर 8.47 कोटी रुपयांचे सोने जप्त

मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने १० किलो सोने जप्त केले आहे. त्याची बाजारभाव किंमत ८.४७ कोटी रुपये आहे. विमानतळाच्या तीन खासगी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.विमानतळ कर्मचाऱ्यांना हे सोने त्यांच्या अंतर्वस्त्रांमध्ये लपवून विमानतळाबाहेर न्यायचे होते. सीमाशुल्क विभागाने १३ ते १५ मार्च दरम्यान हे जप्त केले. सोमवारी याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली.

पहिल्या जप्तीमध्ये, विमानतळावरील एका खाजगी कर्मचाऱ्याच्या पँटच्या खिशात 6 कॅप्सूल आढळून आले. यामध्ये २४ कॅरेट सोन्याच्या पावडरचे वजन २.८ किलो भरले होते. त्याची बाजारभाव किंमत २.२७ कोटी रुपये एवढी आहे.दुसऱ्या एका जप्तीमध्ये, अधिकाऱ्यांनी दुसऱ्या एका वैयक्तिक कर्मचाऱ्याकडून २.३६ कोटी रुपये किमतीचे २.९ किलो २४ कॅरेट सोन्याचे पावडर जप्त केले. हे सोने सात कॅप्सूलमध्ये ठेवण्यात आले होते.

तिसऱ्या जप्तीमध्ये, आणखी एका कर्मचाऱ्याला पकडण्यात आले. त्याच्या अंतर्वस्त्रांमधून १.३१ कोटी रुपये किमतीचे १.६ किलो २४ कॅरेट सोन्याचे पावडर असलेले दोन पाउच जप्त करण्यात आले.

कचऱ्याच्या पिशव्यांमध्ये ३.१ ग्रॅम सोन्याची पावडर आढळली
इतर दोन प्रकरणांमध्ये, विमानाच्या शौचालय आणि पेंट्रीमधून कचऱ्याच्या पिशव्यांची तपासणी करताना कस्टम अधिकाऱ्यांना दोन काळ्या पिशव्यांमध्ये ३.१ ग्रॅम सोन्याची पावडर सापडली. त्याची किंमत २.५३ कोटी रुपये आहे.

माधव भंडारींना पुन्हा डावलले …विधान परिषदेसाठी भाजपचे ३ उमेदवार जाहीर

मुंबई-संघ परिवारातील निष्ठावंत असा लौकिक प्राप्त असलेल्या माधव भंडारींना विधानपरिषद उमेदवारी देताना पुन्हा डावलले आहे. भाजपने ३ उमेदवारांची यादी आज जाहीर केली आहे. यामध्ये संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांना उमेदवारी दिली गेली आहे.भाजपाकडे स्पष्ट बहुमत आहे, यामुळे पुरेशी मते असल्याने हे तिन्ही उमेदवार निवडून येणार आहेत.

विधान परिषदेवर आमश्या पाडवी यांचा विधानपरिषदेचा कार्यकाळ ७ जुलै २०२८ पर्यंत आहे. तर, राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांचा कार्यकाळ २७ जुलै २०३० पर्यंत आहे. भाजप नेते प्रवीण दटके यांचा कार्यकाळ १३ मे २०२६ पर्यंत असून आमदार रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर यांचाही कार्यकाळ १३ मे २०२६ पर्यंत आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत हे सर्व आमदार विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या विधान परिषदेच्या जागा रिक्त झाल्या . निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे.विधानपरिषदेच्या या ५ जागांसाठीची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे आता विधानपरिषदेच्या या ५ जागांवर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे. विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून २७ मार्च रोजी मतदान प्रकिया पार पडणार आहे. यासाठी भाजपाने ३ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांना पुन्हा डावलण्यात आले आहे.महायुतीत भाजपकडून ५ पैकी ३ जागांवर उमेदवार देण्यात येणार होते. तर एकनाथ शिंदे गट १ व अजित पवार गट १ अशा ५ जागा वाटून घेण्यात आल्या होत्या. दरम्यान १० मार्च ते १७ मार्च अर्ज भरण्याची प्रक्रिया असणार आहे. त्यानुसार भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांच्यासह दादाराव केचे आणि अमरनाथ राजूरकर यांची नावे प्रदेश पातळीवरून केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवण्यात आली होती.

माधव भंडारी यांचे नाव यापूर्वीही अनेकदा विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आले होते. मात्र वारंवार चर्चा होऊनही अद्याप त्यांना विधिमंडळात संधी मिळालेली नव्हती. आता त्यांना संधी देऊन ज्येष्ठ नेत्यांना न्याय देण्यात येईल, अशी चर्चा होती. मात्र या निवडणुकीतही भाजपाने भंडारींना स्थान दिलेले नाही. भाजपने ३ उमेदवारांची यादी आज जाहीर केली आहे. यामध्ये संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांची वर्णी लागली आहे. भाजपाकडे स्पष्ट बहुमत आहे, यामुळे पुरेशी मते असल्याने हे तिन्ही उमेदवार निवडून येणार आहेत.

वाचनीय वैचारिक लेखनाकडे वळायला हवे-डॉ. सदानंद मोरे

पुणे –
“दर्जेदार वैचारिक लेखन हे इतर साहित्य प्रकारांच्या तुलनेत रटाळ व रुक्ष असते, असा आपल्याकडचा प्रचलित समज आहे. मात्र, वैचारिक लेखनामध्ये नाट्यमयता नसेल, तर ते सर्वसामान्यांच्या पसंतीस उतरत नाही. त्यामुळे वैचारिक वा संशोधनपर लेखन करणाऱ्यांनी आपल्या कसदार शैलीद्वारे दर्जेदार व तितक्याच वाचनीय वैचारिक लेखनाकडे वळायला हवे,” असे मत महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी रविवारी व्यक्त केले.
राष्ट्रीय पुस्तक न्यास, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि समर्थ युवा फाउंडेशनतर्फे पुणे विद्यापीठात आयोजित ‘मी लेखक होणारच’ या कार्यशाळेमध्ये डॉ. मोरे बोलत होते. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, न्यासाचे संचालक राजेश पांडे, प्राचार्य डॉ. संजय चाकणे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. कार्यशाळेमध्ये डॉ. मोरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना ‘वैचारिक, संशोधन आणि सामाजिक लेखन’ या विषयावर मार्गदर्शन केले.
डॉ. मोरे म्हणाले, “वैचारिक लेखनामध्ये नाट्यमयता आणण्याची गरज लक्षात घेताना, लेखकांना आपला तोल जपता यायला हवा. आपल्या लेखनामधून आपण नेमके कोणत्या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत, याची स्पष्टता हवी. वैचारिक लेखनासाठी आपल्याला पडणारे प्रश्न हे व्यापक असावेत. त्यासाठी लेखक-संशोधकांनी आपले कुतूहल जागृत ठेवायला हवे.” उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना चांगले प्रश्न विचारणारे व्हा, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. पांडे यांनी डॉ. मोरे यांचे स्वागत केले. डॉ. अमित गोगावले यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

आयोजकांचे अभिनंदन…
डॉ. मोरे यांनी या वेळी विद्यार्थ्यांना लेखनाकडे वळविण्यासाठी आयोजकांनी केलेल्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले. मोरे म्हणाले, “राजेश पांडे पुण्यामध्ये सध्या त्यांच्या संस्कृतीकारणाच्या माध्यमातून खूप मोठे योगदान देत आहेत. पुस्तक महोत्सवाद्वारे ते खूप महत्त्वाचे कार्य करत आहेत. डिजिटल माध्यमांच्या काळामध्ये नव्या पिढीला पुस्तकांकडे आणि लेखनाकडे वळविण्याचे हे काम महत्त्वाचे आहे.”

कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी आयोजित इतर सत्रांमधून रविवारी विद्यार्थ्यांना प्रसाद मिरासदार, राजेंद्र खेर आणि योगेश सोमण यांनीही मार्गदर्शन करत आपले अनुभव सांगितले. मिरासदार यांनी ‘कथा बीज ते कथा रचना’ विषयावर बोलताना दर्जेदार कथानिर्मितीची प्रक्रिया स्पष्ट करून सांगितली. त्यासाठी गरजेचे निरीक्षण, तपशील व बारकावे टिपण्याची सवय, कथांमधील पात्रे व त्यांच्या व्यक्तिरेखांची निर्मिती प्रक्रिया आदी बाबींची माहिती दिली. खेर यांनी कादंबरी लेखनाविषयी माहिती देताना आपले लेखन अधिकाधिक सखोल, तसेच वाचकांसाठी विश्वासपात्र ठरण्यासाठी महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकला. तर सोमण यांनी संहिता लेखन या विषयी मार्गदर्शन करताना कथेचा सार, कथानक, पात्रांचे नियोजन, शेवट आदी बाबी विचारात घेत गरजेची असणारी संवाद रचना आदी बाबींमधील तांत्रिकता सहजसोप्या मांडणीतून स्पष्ट करून सांगितली.

औरंगजेब समजून बहादूर शाह जफरांचा फोटो जाळला:पुण्यात ‘पतित पावन संघटने’कडून मोठी गफलत

बहादूर शाह जफर हे मुघल साम्राज्याचे शेवटचे सम्राट होते. 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी ब्रिटिशांविरोधात मोठी भूमिका बजावली होती. ब्रिटिशांनी त्यांना कैद करून रंगून येथे पाठवले होते. त्यांनी आपले उर्वरित आयुष्य रंगून येथेच काढले आणि तिथेच त्यांचे निधन झाले. त्यांचा औरंगजेबाशी कोणताही संबंध नव्हता.


पुणे-औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचा निषेध करण्यासाठी पतित पावन संघटनेच्या वतीने पुण्यात आंदोलन करण्यात आले. मात्र, या आंदोलनात आंदोलनकर्त्यांकडून मोठी चूक झाली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी औरंगजेबाऐवजी चक्कत मुघल बादशहा बहादूर शाह यांचा फोटो जाळला. ‘पतित पावन’च्या आंदोलनातील ही घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.दरम्यान, आमच्या कार्यकर्त्याने चुकून चुकीचा फोटो छापून आणला. आम्हाला औरंगजेबाच्या उदात्तीकरण करणाऱ्यांचा विरोध करायचा होता आणि औरंगजेबाचा फोटो जाळायचा होता, असे स्पष्टीकरण पतीत पावन संघटनेने दिले आहे. तसेच, आपल्याकडून अनवधानाने ही चूक झाल्याचेही आंदोलकांनी मान्य केले आहे.

राज्यात छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर औरंगजेबावर मोठा वाद सुरू झाला असून वातावरण तापले आहे. आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे गुणगान गायल्यानंतर विविध संघटनांनी त्याला जोरदार विरोध केला आहे. त्यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. औरंगजेब एक क्रूर शासक होता आणि हिंदू धर्मीयांवर अत्याचार करणारा बादशहा होता, असे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे औरंगजेबाचा गौरव करणाऱ्या वक्तव्यांवर सातत्याने आक्षेप घेतले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर रविवारी पुण्यात पतीत पावन संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मात्र, यावेळी औरंगजेबाऐवजी बहादूर शाह जफार यांचा फोटो जाळण्याची चूक घडली.

पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचा निषेध करण्यासाठी पुण्यात आंदोलन केलं. मात्र, या आंदोलनादरम्यान आंदोलकांकडून मोठी गफलत घडली. आंदोलकांनी औरंगजेब समजून चक्क मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांच्या फोटोला चपलांचा हार घालून तो जाळला. या चुकीमुळे आता या आंदोलनाची चर्चा रंगली आहे.

पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लाल महाल चौकात औरंगजेबविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. परकीय आक्रमक आणि क्रूर शासक असलेल्या औरंगजेबाचा उदो उदो करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते. मात्र, आंदोलकांकडून मोठी चूक झाली आणि त्यांनी औरंगजेबाऐवजी शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर याचा फोटो जाळण्यात आल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले असून, अनेक जण यावर टीका करत आहेत. तर काहींनी हा प्रकार अज्ञानातून झाल्याचे सांगितले.

महापालिकेची उद्याने आता रात्री नऊ वाजेपर्यंत खुली-उद्यान विभाग प्रमुख अशोक घोरपडे

पुणे- उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून शालेय सुट्ट्या सुरू असल्याने पुणे महापालिकेने सार्वजनिक उद्यानांची वेळ एक तास वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पूर्वी रात्री आठ वाजता बंद होणारी उद्याने आता रात्री नऊ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत.महापालिकेच्या उद्यान विभागाचे प्रमुख अशोक घोरपडे यांनी ही माहिती दिली.

पुणे महापालिकेने प्रत्येक उद्यानाची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र टीम नियुक्त केली आहे. यामध्ये खराब झालेल्या खेळण्यांची नोंद घेतली जात आहे. तसेच उद्यानांमध्ये सुरक्षेसाठी पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि स्वच्छतेवरही भर दिला जात आहे. संध्याकाळच्या वाढीव वेळेत उद्याने अधिक प्रकाशमान राहावीत, यासाठी अतिरिक्त स्ट्रीटलाइट्स आणि दिवे बसवण्यात येत आहेत. स्वच्छता मोहिमा नियमितपणे राबवून उद्यानांचे सौंदर्य टिकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. जनतेच्या तक्रारी व निरीक्षण अहवालाच्या आधारे तत्काळ दुरुस्ती केली जात आहे, जेणेकरून मुलांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होणार नाही असे अशोक घोरपडे यांनी सांगितले.

पुणे शहरात महापालिकेची २२० हून अधिक सार्वजनिक उद्याने आहेत. ही उद्याने नागरिकांसाठी आवश्यक विश्रांती आणि आरोग्यवर्धक ठिकाणे आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये येथे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते.उन्हाळ्यात तापमान वाढल्याने बहुतांश नागरिक संध्याकाळी पाचनंतर उद्यानांकडे वळतात. पूर्वीच्या वेळेनुसार सकाळी सहा ते अकरा आणि संध्याकाळी चार ते आठ या वेळेत बागा उघड्या असत. मात्र नागरिकांना संध्याकाळचा अधिक वेळ मिळावा म्हणून आता रात्री नऊ वाजेपर्यंत उद्याने खुली ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले आहे. रोजच्या कामाच्या व्यापातून बाहेर पडून थोडा वेळ उद्यानांमध्ये घालवण्याची संधी यामुळे उपलब्ध होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांनाही संध्याकाळी अधिक वेळ फिरण्याचा पर्याय मिळणार असल्याने त्यांनी महापालिकेच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

पुणे महापालिका पुढील काळात उद्यानांचे आणखी नूतनीकरण करण्याचा विचार करत आहे. वार्षिक देखभाल निधीतून उद्याने सुधारण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याचा मानस महापालिकेचा आहे. बसण्याची अतिरिक्त सोय, पाण्याच्या सुविधा आणि लँडस्केपिंगसाठीही योजना आखण्यात येत आहे, असे महापालिकेच्या उद्यान विभागाकडून सांगण्यात आले.पुणे महापालिकेकडून उद्यानांची देखभाल करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. विशेषतः मुलांच्या खेळाच्या ठिकाणी अधिक लक्ष दिले जात आहे. कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ही ठिकाणे अधिक वापरली जातात.

 88 कोटी रुपयांच्या मेथमॅफेटाईन गोळ्यांचा मोठा साठा पकडला

इंफाळ आणि गुवाहाटी प्रदेशामध्ये आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करांच्या टोळीतील चार जणांना अटक

अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांची दया केली जाणार नाही, असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. 88 कोटी रुपयांच्या मेथमॅफेटाईनच्या गोळ्यांचा मोठा साठा जप्त केल्याबद्दल आणि आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करांच्या चार जणांना अटक केल्याबद्दल अंमली पदार्थ नियंत्रण विभाग -एनसीबीचे गृहमंत्री शाह यांनी अभिनंदन केले. हस्तगत केलेला अंमली पदार्थांचा साठा सखोल आणि चौफेर तपासाचा उत्कृष्ट नमुना ठरतो आहे, असे शाह यांनी आपल्या सामाजिक माध्यमावरच्या एका पोस्ट मध्ये म्हटले आहे. 

अंमली पदार्थ मुक्त भारत निर्मितीच्या मोदी सरकारच्या मोहिमेला गती मिळत असून, त्याचाच भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय इंफाळ आणि गुवाहाटी या भागातील अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीच्या 4 जणांना अटक करण्यात आली आहे, असे देखील शाह यांनी आपल्या सामाजिक माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

अशी सविस्तर कारवाई….

13 मार्च 2025 रोजी केलेल्या पहिल्या कारवाईमध्ये इंफाळ विभागातल्या अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लिलॉंग परिसरात एका ट्रकला थांबवून त्याची चौकशी केली असता, ट्रकच्या मागील भागातल्या एका कोपऱ्यामध्ये लपवून ठेवलेल्या 102.39 किलो मेथमॅफेटाईनच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या  तसेच ट्रक मधल्या दोन जणांना अटक करण्यात आली. या कारवाईनंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी लगेच पुढच्या कारवाईकडे आपला मोर्चा वळवला आणि लीलोंग परिसरात असलेल्या संशयित अमली पदार्थ तस्करांना ताब्यात घेतले, आणि त्यांच्याकडूनही ड्रग्स तस्करीसाठी वापरले जाणारे चार चाकी वाहन जप्त केले. या प्रकरणातल्या आणखी काहींचा शोध घेतला जात आहे.

या कारवाईनंतर त्याच दिवशी एका माहितीच्या आधारे गुवाहटी विभागातील अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सिलचर जवळच्या आसाम- मिझोराम सीमेवर संशयित करीमगंज या ठिकाणी एका चार चाकी गाडीला अडवले व त्याची देखील सखोल तपासणी करण्यात आली, आणि या तपासात गाडीच्या स्टेफनी टायर मध्ये 7. 48 किलो मेथमॅफेटाईन पदार्थाच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या. या गाडीतून एकाला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणामध्येही संशयित असणाऱ्या इतरांचा देखील शोध आता घेतला जातो आहे.

यानंतरच्या दुसऱ्या घटनेमध्ये मिझोराम राज्य उत्पादन शुल्क विभागाने 6 मार्च रोजी ब्रिगेड बावंगकॉन एझोल येथून 46 किलो क्रिस्टल मेथ जप्त केले. या प्रकरणाचा तपास आता अंमली पदार्थ नियंत्रण विभाग करतो आहे. या प्रकरणामध्ये आंतरराज्य किंवा आंतरराष्ट्रीय तस्करीचे धागेदोरे शोधण्यासाठी अंमली पदार्थ नियंत्रण विभाग या प्रकरणाचा तपास करतो आहे.

ईशान्य प्रदेशातील भौगोलिक स्थानामुळे या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी होते. म्हणूनच हा प्रदेश देशातील सर्वात असुरक्षित म्हणून ओळखला जातो आहे. त्यामुळेच केंद्रीय गृहमंत्रालयाने 2023 मध्ये या प्रदेशातील अंमली पदार्थाच्या विरोधातील लढाईला बळकटी देण्यासाठी अंमली पदार्थ नियंत्रण विभागाला सशक्त केले आहे. अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या पाच शाखांच्या माध्यमातून तसेच ईशान्येकडील प्रादेशिक मुख्यालयाकडून या प्रदेशात होणाऱ्या अमली पदार्थाच्या तस्करीच्या विरोधात विशेषता (YABA)  म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेथमॅफेटाईनच्या गोळ्यांसारख्या कृत्रिम औषधांच्या तस्करीत सहभागी होणाऱ्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आणि सतत कारवाई केली जात आहे. अमली पदार्थ तस्करीमुळे केवळ या भागातील तरुण लोकसंख्येलाच नव्हे तर संपूर्ण देशाच्या सुरक्षेलाही धोका निर्माण झाला आहे,असे याबाबतच्या वृतात म्हंटले आहे.

***

नवीन कायदेविषयक माहिती जाणून घ्या : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायाधीश नितीन सांबरे यांचे आवाहन

नव्या भारताचे नवे कायदे, भारतीय न्याय संहिता 2023 मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

नागपूर, 16 मार्च 2025

नागरिकांना जलद व सुलभ न्याय मिळण्याकरिता भारत सरकारने लागू केलेल्या नवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी नागरिकांनी प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायाधीश नितीन सांबरे यांनी आज येथे केले.

माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर तर्फे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,  नागपूर व श्री सती अनुसया माता देवस्थान, पारडसिंगा यांच्या सहकार्याने श्री सती अनुसया माता देवस्थान पारडसिंगा देवस्थान परिसर, ता. काटोल जि. नागपूर येथे आयोजित केलेल्या नव्या भारताचे नवे कायदे, भारतीय न्यायसंहिता 2023 या विषयावरील मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश अभय मंत्री, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश दिनेश सुराणा, आमदार चरणसिंग ठाकूर, जिल्हाधिकारी विपिन ईटणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सचिन पाटील, केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, उपविभागीय अधिकारी पियुष चिवंडे उपस्थित होते.

यावेळी क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांनी वरिष्ठ प्रशासकीय न्यायाधीश नितीन सांबरे यांचा तसेच उपस्थित इतर मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन उमेश महतो यांनी केले. 

ब्रिटिशकालीन कालबाह्य कायद्यांमध्ये सुधारणा करून भारत सरकारने १ जुलै २०२४ पासून नवीन कायदे अमलात आणले आहेत. या नवीन कायद्यांमध्ये नागरिकांना जलद व सुलभ न्याय मिळण्याकरिता तरतूद करण्यात आली आहे. तसेच नवीन तंत्रज्ञान विषयक नवीन कायद्यांचा समावेश करण्यात आला आहे. याबाबतची माहिती नागरिकांना करून देण्याकरिता माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर तर्फे काटोल तालुक्यातील पारडसिंगा देवस्थान येथे दोन दिवसीय मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनात नवीन कायदे तसेच बदलण्यात आलेल्या जुन्या कायद्यातील सुधारित नवीन कायदे याबाबत सविस्तर मांडणी करण्यात आली आहे. नागरिकांना मिळणाऱ्या कायदेविषयक सल्ला तसेच सुविधांविषयी माहिती देण्यात आली आहे. हे प्रदर्शन १७ मार्च २०२५ पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत नागरिकांसाठी निःशुल्क खुले ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन कायदेविषयक माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय नागपूर तर्फे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूरचे तांत्रिक सहाय्यक संजय तिवारी, सहाय्यक मंगेश टिककस, एम.टी.एस. नरेश गच्छकायला परिश्रम घेत आहेत.

विद्यार्थ्यांनी उलगडले उपनगरांमधील शहरीकरण

विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने

‘अंडरस्टॅंडिंग अर्बनायझिंग पेरिफेरीज ऑफ पुणे प्रदर्शन’
पुणे : पुण्याबाहेरील शहरीकरण, शहरीकरण होताना निर्माण होणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि पर्यावरणीय समतोल अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांनी ‘अर्बनायझिंग पेरिफेरीज ऑफ पुणे’ या प्रदर्शनात पुण्याच्या उपनगरांमधील शहरीकरण सखोल अभ्यासातून उलगडले.

विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने ‘अंडरस्टॅंडिंग अर्बनायझिंग पेरिफेरीज ऑफ पुणे’ या विशेष प्रदर्शनाचे आयोजन यशवंतराव चव्हाण कलादालन येथे करण्यात आले आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ट्रस्टचे चेअरमन ॲड. अभय छाजेड, सचिव जितेंद्र पितळीया आणि संचालक प्रसन्न देसाई यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

ॲड. अभय छाजेड म्हणाले, “विकास आराखडे तयार करताना अर्बन प्लॅनिंगकडे खूप कमी लक्ष दिले जाते. महाराष्ट्र आज जवळजवळ ५०% शहरीकरणाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. मुंबईपेक्षाही पुणे शहराची वाढ वेगाने होत आहे. अशी वाढ होत असताना पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधा यांची योग्य आखणी आवश्यक आहे. यासाठी वेगळ्या निधीची तरतूद केली पाहिजे.”

पुण्याच्या परिघीय शहरीकरणाचा सखोल अभ्यास विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मधील चौथ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ‘अर्बन डिझाईन’ अभ्यासक्रमांतर्गत विविध अभ्यास प्रकल्प सादर केले आहेत.

प्रा. हृषीकेश अष्टेकर, देवेंद्र देशपांडे, गरिमा बुरागोहैन, गुंजन महेश्वरी, व मीनाक्षी सरावगी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच, महाविद्यालयाचे संचालक आर्किटेक्ट प्रसन्न देसाई व समन्वयक आर्किटेक्ट शेखर गरुड यांनी या उपक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

हे प्रदर्शन दिनांक १९ मार्च पर्यंत सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत विनामूल्य खुले असेल.

महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्याची गरज : सुप्रिया बडवे 

पुणे : अथक परिश्रम, चिकाटी आणि वेगवेगळ्या आघाडय़ांवर एकाच वेळी काम करण्याचे कसब … असे उद्योजक होण्यासाठी आवश्यक असणारे गुण महिलांमध्ये उपजतच असतात. परंतु महिलांना योग्य वेळी संधी न मिळाल्यामुळे अनेक महिला उद्योग क्षेत्रामध्ये मागे राहतात. महिलांचे उद्योग क्षेत्रातील प्रमाण वाढण्यासाठी महिलांना योग्य वेळी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे,असे मत उद्योजिका सुप्रिया बडवे यांनी व्यक्त केले.

शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मंडळाचा उपक्रम असलेल्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) तर्फे उद्योग क्षेत्रातील महिलांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला संस्थेचे कार्याध्यक्ष-विश्राम कुलकर्णी, कार्यवाह श्रीकांत जोशी, हर्षल लेले, युवा महिला आघाडी सदस्या प्रतिभा संगमनेरकर, स्वाती कुलकर्णी, कार्तिकी जोशी, मंजुषा वैद्य,अंजली दारव्हेकर, उपेंद्र केळकर, आशिष कुलकर्णी, सचिन पंडित, प्रशांत देशपांडे, अजय कुलकर्णी मंदार महाजन उपस्थित होते.  
स्वयंसिद्धा पुरस्कार पुण्यातील गजानन एंटरप्राईजेसच्या संचालिका वैशाली धर्माधिकारी यांना आणि युवा उद्योजिका पुरस्कार आर्टिसन प्रिंट अ‍ँड पॅकच्या संचालिका सानिया वाळिंबे यांना प्रदान करण्यात आला. तसेच यंदा युवा गौरव पुरस्कार पोलीस निरीक्षक प्रतिभा जोगळेकर यांना प्रदान करण्यात आला.युवा उपक्रमांतर्गत कै.सौ. सावित्रीबाई नारायण जोशी स्मरणार्थ स्वयंसिद्धा पुरस्कार आणि कै.मनोरमा शामराव कुंभोजकर स्मरणार्थ युवा उद्योजिका पुरस्कार दिला जातो. तर, युवा गौरव पुरस्कार हा युवा कार्यकारिणी पुरस्कृत आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

सुप्रिया बडवे म्हणाल्या, घर आणि उद्योग सांभाळताना महिलांची कायम कसरत होत असते. घर सांभाळताना येणाऱ्या अडचणी आणि उद्योग सांभाळताना येणाऱ्या अडचणी या वेगवेगळ्या असतात. या दोन्ही सोडवण्यासाठी कौशल्यांची गरज असते. काही कौशल्ये आत्मसात करता येतात तर काही कौशल्ये उद्योग करताना शिकता येतात. त्यातूनच खचून न जाता महिलांनी विविध क्षेत्रांमध्ये उद्योगांसाठी पुढे आले पाहिजे.

सानिया वाळिंबे म्हणाल्या, उद्योग क्षेत्रामध्ये भरभराट होण्यासाठी महिलांना त्यांच्या स्वतःच्या कुटुंबातून तसेच ज्या क्षेत्रामध्ये त्या उद्योग करत आहेत, त्या क्षेत्रातील कुटुंबाचे प्रोत्साहन असणे गरजेचे असते. दोन्हीचा ताळमेळ योग्य साधला तर निश्चितच महिला उद्योग क्षेत्रामध्ये आघाडीवर जाऊ शकतात.

प्रतिभा जोगळेकर म्हणाल्या, स्वतःच्या परिवाराकडून मिळालेला हा पुरस्कार म्हणजे माझ्या कामगिरीवर मला मिळालेली कौतुकाची थाप आहे. मला सासर आणि माहेर दोन्हीकडून चांगला पाठिंबा मिळाल्यामुळे मी पोलीस क्षेत्रामध्ये एक महिला असूनही चांगली कामगिरी करू शकले.

वैशाली धर्माधिकारी म्हणाल्या, युवा परिवाराने दिलेला पुरस्कार हा केवळ माझा एक महिला म्हणून सत्कार नव्हे तर एक उद्योजिका म्हणून सत्कार आहे. हा पुरस्कार केवळ माझ्यासाठीच नव्हे तर सर्व महिलांसाठी प्रेरणादायी पुरस्कार आहे. एक महिला उद्योजिका झाली तर ती केवळ आपल्या कुटुंबासाठी हातभार लावत नाही तर समाजाचा विकास करण्यासाठी हातभार लावत असते, असेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन आयुषी भावे यांनी केले व हर्षल लेले यांनी आभार मानले. 

पतित पावन संघटनेतर्फे औरंगजेब याचे उदात्तीकरण करणाऱ्यांचे विरोधात आंदोलन

पुणे : परकीय आक्रमक क्रूरशासक औरंगजेब याचे आपल्या देशात व आपल्या मातृभूमीवर उदात्तीकरण करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई झालीच पाहिजे, प्रतापगड च्या पायथ्याशी जशी अफजल खानाच्या कबरीच्या आजूबाजूला अतिक्रमण झाली तसेच संभाजीनगर मध्ये अतिक्रमण झाली आहेत तीच नष्ट व्हावी, अशा मागण्या करीत पतित पावन संघटना पुणे शहर तर्फे आंदोलन करण्यात आले.

लाल महाल चौक येथे  संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष स्वप्नील नाईक, जिल्हाध्यक्ष दिनेश भिलारे, गुरु कोळी, रवींद्र भांडवलकर, मिलिंद तिकोणे, यादव पुजारी, योगेश वाडेकर, स्वप्निल आंग्रे, राजाभाऊ रजपूत, योगेश पाटील, चेतन कांबळे, राजाभाऊ कारकुड, विराज सांगळे, गणेश बोडके, अक्षय भालेराव, ध्रुव जगताप, आकाश लोढा, अक्षय जम्बुरे, सचिन मोहिते, सुनील येनगुल, तेजस नाईक यांच्यासह  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

स्वप्नील नाईक म्हणाले, परकीय आक्रमक, क्रूर शासक औरंगजेब याचे उदात्तीकरण करणाऱ्यांचे विरोधात आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी व थोर पुरुष यांची अवेहलना करणाऱ्यांच्या विरोधात कठोर व सक्षम कायदा निर्माण व्हावा. प्रसारमाध्यमांवर ( इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर व्हाट्सअप)  औरंगजेबाचा उदत्तीकरण करणारे व छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या विरोधात पोस्ट करणारे किंवा चुकीचा इतिहास पसरवणारे यांच्यावर त्वरित कारवाई होण्यासाठी पुणे पोलिसांनी स्वतंत्र समिती गठीत करावी व या गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त यासारख्या उच्चस्तरीय अधिकारी नेमण्यात यावे, अशी आमची मागणी आहे.

औरंगजेबाचे उद्दतीकरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि धर्मवीर संभाजीराजांनी केलेल्या बलिदानाचा अवमान आहे. औरंगजेबाचे उद्दातीकरण करणे म्हणजे आपल्या भारतीय कायदा सुव्यवस्था व संविधानाचा अपमान व आव्हान करणे आहे. औरंगजेबाच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले असून दि. २२ मार्च पर्यंत जर औरंगजेबाची कबर या भारत भूमीतून निघाली नाही, तर २३ मार्चला तर त्याच्या प्रतिकात्मक कबरीचे दहन याच पुण्याच्या कसब्यात केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

पाक सैन्यावर बलुच आर्मीचा हल्ला: 90 सैनिक मारल्याचा दावा

इस्लामाबाद-बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने रविवारी दावा केला की त्यांनी पाकिस्तानी सैन्यावर आत्मघातकी हल्ला केला होता, ज्यामध्ये ९० पाकिस्तानी सैनिक ठार झाले होते. बीएलएच्या मते, त्यांच्या माजीद ब्रिगेड आणि फतेह ब्रिगेडने लष्कराच्या ताफ्यावर आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणला.

बीएलएने म्हटले आहे की क्वेट्टाहून कफ्तानला जाणाऱ्या ८ लष्करी वाहनांवर हल्ला करण्यात आला. नोश्की येथील महामार्गाजवळ आत्मघातकी दहशतवाद्यांनी वाहनांना लक्ष्य केले. एका आत्मघातकी बॉम्बरने स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने लष्कराच्या ताफ्याला धडक दिली.

यानंतर, बीएलएच्या फतेह पथकाच्या सैनिकांनी सैन्याच्या ताफ्यात घुसून सैनिकांना ठार मारले. ज्या वाहनावर आत्मघातकी हल्ला करण्यात आला तो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. जखमींना नोश्की येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परिसरात आणीबाणी लागू करण्यात आली आहे.

फक्त ५ दिवसांपूर्वी बीएलएने एका प्रवासी ट्रेनचे अपहरण केले होते. बीएलएने सर्व २१४ ओलिसांना मारल्याचा दावा केला. पाकिस्तानी सैन्याने म्हटले की त्यांचे फक्त २८ सैनिक मारले गेले, तर सर्व ३३ बलुच सैनिक मारले गेले.

उत्तर मॅसाडोनियाच्या नाईटक्लबला आग; 50 ठार:क्लबमधील संगीत मैफिलीत अपघात, 1500 लोक उपस्थित होते

स्कोप्जे-युरोपीय देश उत्तर मॅसेडोनियामधील एका नाईट क्लबमध्ये शनिवारी रात्री लागलेल्या आगीत किमान ५० जणांचा मृत्यू झाला तर १०० हून अधिक जण जखमी झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोकानी शहरात आयोजित एका हिप हॉप संगीत मैफिल दरम्यान हा अपघात झाला.सुमारे ३०,००० लोकसंख्या असलेल्या या शहरातील एका नाईट क्लबमध्ये प्रसिद्ध हिप-हॉप जोडी एडीएनचा संगीत कार्यक्रम सुरू असताना आग लागली. या हिप-हॉप कॉन्सर्टसाठी क्लबमध्ये १५०० लोक जमले होते.कार्यक्रमादरम्यान कोणीतरी क्लबमध्ये फटाके फोडले, ज्यामुळे आग लागली, असा अंदाज आहे. आग लागल्यानंतर गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरीत काही लोक चिरडले गेले.संगीत मैफिलीत फटाके फोडण्यात आले होते, जे आगीचे कारण असल्याचे मानले जात आहे.

अपघाताचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला…

पंतप्रधान ह्रिस्टिजान मिकोस्की यांनी X वर लिहिले: उत्तर मॅसेडोनियासाठी हा एक कठीण आणि खूप दुःखद दिवस आहे. इतक्या तरुणांचे दुःखद नुकसान कधीही भरून निघू शकत नाही. या कठीण काळात पीडितांचे दुःख कमी करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, जखमींना राजधानी स्कोप्जेसह देशभरातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये अनेक स्वयंसेवी संस्थांची मदतही घेतली जात आहे. या प्रकरणात एका व्यक्तीला अटकही करण्यात आली आहे, परंतु अद्याप त्याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.

पश्चिम अमेरिकेत 26 वादळे, 34 जणांचा मृत्यू:130 Kmph वेगाने धुळीचे वादळ

10 कोटी लोकसंख्या प्रभावित, 2 लाख घरे वीजेशिवाय
वॉशिंग्टन-अमेरिकेत, अर्कांसस, कॅन्सस, मिसूरी, इलिनॉयसह सुमारे 6 पश्चिमेकडील राज्ये चक्रीवादळाच्या विळख्यात आहेत. एबीसीच्या अहवालानुसार, या राज्यांमध्ये आतापर्यंत २६ वादळे आली आहेत.शनिवार आणि रविवारी आतापर्यंत ३४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मिसूरीमध्ये सर्वाधिक १२ मृत्यू झाले आहेत. १० कोटी अमेरिकन लोकसंख्येवर याचा परिणाम झाला आहे. २ लाख घरांमध्ये वीज गेली आहे.

कॅन्ससमध्ये धुळीच्या वादळामुळे महामार्गावर सुमारे ५० वाहने एकमेकांवर आदळली. यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला. मिसिसिपीमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आणि तीन जण बेपत्ता झाले.१०० किमी/तास वेगाने धुळीचे वादळ वाहत आहे. इमारती आणि रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत. कॅनडाच्या सीमेवर हिमवादळे आणि उष्ण भागात जंगलातील आगी लागण्याची शक्यता आहे.
अमेरिकेतील वादळ अंदाज केंद्राने असा दावा केला आहे की, हे वेगाने वाहणारे वादळ गंभीर धोका निर्माण करू शकतात. आज अनेक राज्यांमध्ये बेसबॉलच्या आकाराचे गारा आणि वादळ देखील शक्य आहे.
पूर्व लुईझियाना, मिसिसिपी, अलाबामा, पश्चिम जॉर्जिया आणि फ्लोरिडामध्ये चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. टेक्सास, कॅन्सस, मिसूरी आणि न्यू मेक्सिको हे जंगलातील आगींचा धोका आहे.
टेक्सास, ओक्लाहोमा, मिसूरी, इलिनॉय, इंडियाना आणि मिशिगनमध्ये जोरदार वाऱ्यांमुळे २,००,००० हून अधिक घरांची वीज गेली आहे.
राष्ट्रीय हवामान सेवेने दक्षिण डकोटा आणि पश्चिम मिनेसोटाच्या काही भागांसाठी हिमवादळाचा इशारा जारी केला आहे. या भागात ६ इंचांपर्यंत बर्फवृष्टीची शक्यता आहे.